अनुक्रमणिका
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( ( भाग १ )*
*पाल ...विषारी असते का ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( ( भाग २ )*
*मांजर आडवे गेले....काम होत नाही ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( ( भाग ३ )*
*अस्वलाचे केस...म्हणे भीती दूर घालवते*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( भाग ४ )*
*हंस ...दूध शोषितो ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( भाग ५ )*
*कोकिळाव्रत ....करता का हो ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग ६ )*
*कोंबड्याच्या पिल्लूचे बलिदान ...*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग ८ )*
*रेड्यांमुखी वेद ....??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग ९ )*
*हैद्राबादी मासा...म्हणे दमा बरा करतो ?*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १० )*
*मुंगूस...झाडाची मुळी खाते ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात... ( भाग ११ )*
*बाळूमामांचा बोकड....दूध देतो ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग १२ )*
*खारूताईला....न्याय मिळायला हवा*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग १३ )*
*गाढवांची बदनामी कशासाठी ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १४ )*
*उंटाच्या पोटात....पाण्याची पिशवी ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १५ )*
*कुत्र्याच्या रडण्याने अशूभ समाचार येतो ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १६ )*
*आँक्टोपसची भविष्यवाणी...किती खरी किती खोटी*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग १७ )*
*घुबडाचे तोंड पाहू नये ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( भाग १८ )*
*सुंदर मोराचे पाय का खराब ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १९ )*
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २० )*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २१ )*
*विंचू चावला...काय मी करू ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २२ )*
*कबुतरांना..छतावर दाणे टाकू नयेत ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २३ )*
*कासवं...जातयं जिवानिशी*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २४ )*
*घोरपड.....वास्तव समजून घेताना*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग २५ )*
*वटवाघूळ.....मृत्यूचे दूत ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग २६ )*
* वाघ....वाचवायला हवा*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २७ )*
*फुलपाखरू....असते कसे ?*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात..... ( भाग २८ )*
*कावळ्याच्या रुपात आत्मा येतो ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २९ )*
*मुंगी आणि तिचे वारूळं...*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात..... ( भाग ३० )*
*मधमाशीचा डंख....टाळावा कसा ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग ३१ )*
*माकड आणि वानर....फरक कोणता ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग ३२ )*
*गरूड....मानसन्मानाचा पक्षी*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग ३३ )*
*गाय....इतकी पवित्र कशी ??*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग ३४ )*
*चिमणी.....जपायला हवी*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग ३५ )*
*साप....अंधश्रध्दाचे कोठार*
|
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....लेखसमाप्ती*
|
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १ )**पाल ...विषारी असते का ??*
भिंतीवर तिच्या सळसळत्या हालचालीने लक्ष वेधणारी पण थोडीशी अंगावर काटा आणणारी पाल. पालीबद्दल एक अनामिक अशी भीती समाजमनात घट्ट रुतल्याने पाल हाताने हाताळायच नुसतं मनात आले तरी शिसारी येते. स्वयंपाकघरात पाल पाहिली की मन शंकेने भरून जाते. पालीचे चुकचुकणे अशुभ मानले जाते. "पालीची कारीका " नावाचे पुस्तक पालीविषयी अत्यंत अज्ञान व गैरसमज पसरवणारे आहे. वास्तविक घरातील झुरळे , डास , उपद्रवी किटक यांना खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण राखणारी पाल अत्यंत उपयुक्त आहे. "होम क्लीनर " अशी उपाधी तिला शोभून दिसते.
*पाल ...विषारी असते का ?? हा इथे मुख्य विषय आहे. कित्येक वेळा जेवणातून विशेषतः लग्नसमारंभ अथवा महाप्रसाद याप्रसंगी अन्नातून विषबाधा झाली अस आपण ऐकतो. त्यासाठी बहुसंख्य ठिकाणी "पाल पडली" अस कारण सांगितलं जाते. पाल जेवणात पडून तिच्या अंगातील विष जेवणात मिसळले व विषाबाधा झाली असे ऐकवले जाते. पण सत्य काय आहे ???....मोठमोठया समारंभात अथवा महाप्रसाद ठिकाणी जी मोठाली भांडी वापरतात. ती तांब्याची किंवा पितळीची असतात. त्यांना व्यवस्थित कल्हई केलेली नसाते. अशावेळी ती व्यवस्थित स्वच्छ केली नाहीत तर त्यावर हिरवट रंगाचा थर जमा होतो. यामध्ये "मर्क्युरिक आँक्साईड " सारखा विषारी घटक असतो. जो पोटात गेल्यास जुलाब व उलट्या होतात. प्रसंगी मृत्यू संभवतो. चूक व अज्ञान आपले असते दोष मात्र पालीचा जातो. ......लेखक जे. सी. डँनियल यांच्या "इंडियन रेप्टाईल्स " या पुस्तकात स्पष्टपणे व संशोधनाव्दारे नोंदवले आहे की " भारतातील कोणतीच पाल अजिबात विषारी नाही". पालीच्या शरीराचे प्रयोगशाळेत विश्लेषण केल्यावर कोणताही विषारी घटक पालीच्या शरीरात आढळला नाहीय. आणखी एक पुरावा देतो.....अंनिसचे कार्यकर्ते व सर्पतज्ञ राजेश ठोंबरे यांनी पाल विषारी आहे का हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला होता. त्यांनी स्वतः चहामध्ये पाल टाकून ती चहा प्याले होते. स्वतः नंतर आपल्या जवळच्या मित्रांना चहा पिण्यासाठी दिला. कुणालाही विषबाधा झाली नाही. तेव्हा पाल विषारी नसते एवढे ध्यानात असूदे.*
समंजस व विचारी लोकांनी पालीबद्दलची अकारण भीती व कीळस मनातून काढावी हेच उत्तम. डास , उपद्रवी किटक यांना खाऊन आपले घर स्वच्छ ठेवणारी "होम क्लीनर " पाल मानवासाठी उपयुक्त आहे यात शंका नको.
*!! पाल नसते विषारी ...काढा मनातील शिसारी !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग २ )*
*मांजर आडवे गेले....काम होत नाही ??*
मांजर..."वाघाची मावशी" अशा विशेषणाने प्राणीसृष्टीत आपली दखल घ्यायला लावणारा पाळीव प्राणी. विविध रंगात व ढंगात आकर्षक असल्याने बरेच घरात पाळीव प्राणी म्हणून याला स्थान असते. अंधश्रध्दाचे ग्रहण या प्राण्याच्या पाठीशी आहे. मांजर मारले की काशीला जाऊन यावे अस आमच्याकडे जुनी माणसे सांगायची. हातून मांजर मारल गेल नाही अन् आमची काशीयात्राही झाली नाही. तरीही एवढया खोलात न शिरता एका सर्वत्र आढळणाऱ्या अंधश्रध्देचा समाचार घेऊया.
*मांजर...आडवे गेले की काम होत नाही अस बरेचदा आपण ऐकतो. एखाद्या महत्वाच्या कामासाठी मनुष्य घाईघाईने रस्त्यावरून जात असतो अन् अचानकच एखादे सुंदर मांजर आडवे जाते. या प्रकाराने कपाळावर आठ्या उमटतात. मन शंकेने भरून जाते. आपल संकल्पित काम होणार की नाही याची धास्ती मनात तयार होते. मनातल्या मनात त्या मांजराच्या १०० पिढ्यांचा "उध्दार" केला जातो. यात खरेतर त्या मांजराचा काय दोष हो ? त्याला जर मनुष्य जमात वेडेपणाने ज्या गोष्टी शुभाशुभ म्हणून पाळते याचे ज्ञान असते तर ते मनुष्याच्या आडवे एकतर गेले नसते अथवा आपल्या भाच्याची ( वाघाची ) आठवण व्हावी अशा तोर्यात रस्त्यावरच ठाण मांडून बसते.पण ते बिचारे या माणसाएवढे शहाणपण कुठून आणणार ? ....खरेतर कित्येक घरात मांजरांचा मुक्त वावर असतो.कित्येक वेळी ते आपल्या आडवे घरातच जात असते. आपल्या घरची स्त्री स्वयंपाकसाठी गँस पेटवायला जाताना तिच्या आडवे मांजर गेले तर ती ते काम करत नाही का ?? की मांजर आडवे गेले म्हणून गँस पेटतच नाही अथवा गँस आपघात होतात ?. एखादा इलेक्ट्रिशियन घरात विजेची जोडणी करत असतो तेव्हा त्याच्या आडवे मांजर गेले तर काय घरात वीज येत नाही कि विजेचा करंट बसून तो पंगू बनतो ?? विचार व्हावा. आता जे मांजर घरात आडवे गेले तर काही फरक पडत नाहीय ते रस्त्यावर आडवे गेले तर कोण आकाश कोसळते हो ?. यात पुन्हा एक विचित्र सोय उपलब्ध आहे. रस्त्यावर मांजर आडवे गेले की व्यक्ती थांबते. क्षणभर वाट पाहते. आपल्या अगोदर त्या वाटेवरून दुसऱ्या कुणाला तरी जाऊ देते. हेतू हा की आलेच संकट तर त्याच्यावर कोसळू दे. किती परोपकारी भावना ?? अत्यंत वाईट्ट अशी ही भावना माणसाचे माणूसपण नासवते.*
इतर प्राण्यापेक्षा माणसाला "बुद्धी " नावाचा जो ऐवज मिळाला आहे त्या सुंदर ऐवजाचा वापर इतर प्राणीमात्रावरील संकट दूर करण्यासाठी व्हावा हे विवेकी माणसाचे लक्षण आहे. अंधश्रध्दा बाळगून स्वतःच्या माणूसपणाला कमीपणा आणण्यापेक्षा अंधश्रध्दा उच्चाटन करून "माणूस " म्हणवून घेण्यात धन्यता आहे. तुम्हाला काय वाटते ??
*!!पिते दूध डोळे मिटूनी , जात मांजराची.....मनी चोरट्याच्या का रे , भिती चांदण्याची !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( भाग ३ )*
*अस्वलाचे केस...म्हणे भीती दूर घालवते*
अस्वल...नाव उच्चारताच काळ्या रंगाचे अस्वलाचे रूप झटकन समोर येते. जंगलात एकवेळ वाघ पाठीशी लागलेला परवडला पण अस्वल नको अस म्हटल जाते. अस्वलाचा मुकाबला करणे हे सामान्य माणसाचे काम नव्हे. कोल्हापूरच्या शाहू राजांनी अस्वलाशी केलेला मुकाबला सर्वश्रुत आहे. तो शाहू राजाच म्हणून ...नाहीतर खैर नव्हती. माणूस एक अजब प्राणी आहे. आपल्या पोटासाठी तो जनावराना माणसाळवतो आणि आपल्या पोटाची सोय करून जगतो. अस्वला बाबतीत ही त्याचे असेच प्रयोग केलेले आपण पाहतो.
*सुगीच्या दिवसांत लोकाचे मनोरंजन व स्वतःच्या पोटची खळगी भरण्यासाठी दरवेशी लोक अस्वल घेऊन येतात. रस्त्यावरून फिरवतात , मनोरंजक खेळ करून घेतात.लहानापासून मोठ्यापर्यत औत्सुक्य असते. खेळ करता करता पैसा जमतो. याचवेळी एक अंधश्रध्दा तिथे उगम पावत असते. अस्वलाला केसांची काय कमतरता ? असे म्हटल जाते. हे केसच अंधश्रध्दा जन्माला घालतात. अर्थात यात अस्वलाचा दोष नव्हे तर माणसाच्या वेड्या समजूतीचा दोष असतो. खेळ संपताना अस्वलाच्या पाठिवरील केस उपटून घेतात लोक आणि एका तावीजमध्ये बांधून ते गळ्यात घालतात. शक्यतो लहान मुलांच्या. हेतू हा की अस्वलाचे केस जवळ बाळगल्याने मनातील भिती दूर होते. सत्य काय आहे ??...जीवनात मनुष्याला अनेक गोष्टीचे भय वाटत असते. त्यापासून दूर रहाण्याचा तो यथाशक्ति प्रयत्न करतो. अंधश्रध्दा बाळगून अस्वलाचे केस जवळ करून कुणाचे भय जाईल ?? विचार व्हावा. उदाहरणे बघू. ज्या व्यक्तीला पाण्याचे भय वाटते त्या व्यक्तीच्या गळ्यात अस्वलाची केस लटकावून नदीत पोहायला उतर म्हणून सांगितलं तर त्याच्या मनातील भीती दूर होईल ?? ज्याला उंचावर गेल्यावर खाली पाहताना भितीने भोवळ येते त्या व्यक्तीला उंच जागेवर नेऊन एखादे सुंदर गाणे म्हणायला लावले तर ...तो गाईल ?? एखाद्याला सापांची प्रचंड भिती वाटते त्याला गळ्यात अस्वलाची केस बाळगून अगदी साधा बिनविषारी साप हाताळायला दिला तरीही तो भितीमुक्त होऊन हाताळेल ?? भयापासून दूर होण्याचा मार्ग अस्वलाची केसं जवळ बाळगून मिळत नाही हे समजायला हवं.*
अस्वलाचे केस जवळ बाळगून तात्पूरता मानसिक आधार मिळेल पण प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिला तर हा आशावाद न टिकणारा आहे हे ध्यानात येईल. अंधश्रध्दा बाळगणारी व्यक्तीने जरा सकारात्मक विचार केला तर त्याचे केस नक्कीच डोक्यावर उभे राहतील. अस्वलाच्या केसानी भिती दूर होते तर मग दरवेशी ...जो त्या अस्वलाचा मालक असतो तो त्या अस्वलाला रस्त्यावरून फिरवताना त्याच्या तोंडात काठी अडकवून स्वतः ची सुरक्षितता का शोधतो ?? अख्ख अस्वल ज्याच्या मालकीचे असते तोच दरवेशी त्याच अस्वालाकडून आपल्या जिवाची भिती बाळगतो. अधिक काय सांगावे....
*!! भयमुक्त व्हायच तर....संकटाचा सामना करायला शिका !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( भाग ४ )*
*हंस ...दूध शोषितो ??*
हंस....अत्यंत सुंदर पक्षी. एखाद्या माणसाच्या सौदर्याचे वर्णन करताना " तो राजहंसच जणू " असा वाक्प्रचार ऐकायला मिळतो. तसेच ज्यावेळी जीवनाचे एखादे उदात्त तत्वज्ञान सांगायचं असते त्यावेळी " माणसानं कस राजहंसासारख असाव , म्हणजे चांगले ते जवळ ठेवावे आणि वाईट ते फेकून द्यावे " असे बोल ऐकायला मिळतात. याला आधार म्हणून राजहंस हा पक्षी पाण्यात दूध मिसळले तर फक्त दूध शोषून घेतो अस सांगितलं जाते. हे खरे आहे काय ??
*जरा विचार तर करा...खरेच अस होऊ शकेल काय ?? म्हणजे समजा आपण पाणी व दूध एकत्र केल तर राजहंस त्यातील फक्त दूध शोषून घेतो अस मी पाहिलय अस सांगणारा एकतरी पक्षीतज्ञ माझ्या पाहण्यात वा वाचण्यात नाहीय. राजहंसाच्या या कृतीला "नीर क्षीर विवेक " अस म्हटल जाते. यातून दूध व पाण्यातून अचूकपणे दूधा वेगळे करण्याची हंसाचे कौशल्य गृहीत आहे. पण याबाबतीत सत्यता तपासली तर काय हाती येईल ?? यासाठी हंसाच्या खाद्यसवयीकडे लक्षपूर्वक पहावे लागेल. निरीक्षण कराव लागेल. कमलनाल अथवा बिसतंतू हे हंसाचे आवडते खाद्य. हंस कमळाच्या देठातील बिसतंतू ओढून खातात. हे बिसतंतू शुभ्र रंगाचे असतात. त्यामधून दूधासारखा पांढरा द्रव स्त्रवत असतो. तो रस गोड असतो व त्यालाही क्षीर अस म्हटल जाते. कमलनाल पाण्यात असतात आणि त्यात क्षीरासारखा अर्थात दूधासारखा पांढरा रस असतो. हेच असते हंसाचे पाण्यातून क्षीर ( दूध ) पिणं. शब्दशः अर्थ घेतला की मग भलताच घोटाळा होतो.*
आपल्या कडे एक आव्हान देणारे वाक्य जरा यासंबंधी सतत उच्चारल जाते. "होऊन जाऊदे ...दूध का दूध , पानी का पानी ". मग जरा एवढं आव्हान स्विकारून पडताळा करूया. जवळ हंस असेल तर पाण्यात दूध टाकून हंस फक्त दूधच पितो का ?? एवढेच पहायचे. आहात का तयार ?? शब्दशः अर्थ कुठं घ्यायचा अन् कुठं सोडायचा याचा "नीर क्षीर विवेक " आपल्या जवळ हवा ना...
*!! राजहंस बना....पण विवेकाच्या बाबतीत !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( भाग ५ )*
*कोकिळाव्रत ....करता का हो ??*
कोकीळ...कुहु कुहु असा मंजूळ स्वर कानी पडला की मनं मोहरून उठते.कावळ्यासारखाच काळा रंग असला तरीही कोकीळ कर्कश नसते. तिच्या आवाजाचा गोडवा इतका मधूर असतो की सुंदर आवाजात गाणे गाणारीला "गाणंकोकीळा " अस म्हटल जाते. कावळ्याइतकी बदनामी जरी वाट्याला आली नसली तरीही गैरसमजांचा प्रदेश कोकीळेलाही सुटलेला नाहीय.
*भारतीय समाजात धार्मिक व्रतांची कमी नाहीय. कोकीळेच्या नावानेही एक व्रत आहे. या व्रताचे नावचं "कोकीळव्रत " आहे. त्याची थोडक्यात कथा अशी....पार्वतीचा बाप दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञ केला. पण पार्वती व शंकर यांना निमंत्रण दिले नाही. तेव्हा अपमानित पार्वतीने यज्ञकुंडात स्वतःच्या जीवनाची आहुती दिली. तेव्हा संतप्त शंकराने तांडव करून दक्षाचा यज्ञ उध्वस्त केला. नंतर शांत झाल्यावर पार्वतीने स्वतः आत्मघाताचे पातक केले म्हणून शंकराने तिलाही शाप दिला. तेव्हा व्यथित पार्वतीने उःशाप मागितला. तेव्हा शंकराने तिला कोकीळि होण्याचा उःशाप दिला अशी आख्यायिका आहे. त्यामुळं स्त्रीया आपल्या सौभाग्यासाठी हे व्रत करतात. समजा कोकीळव्रताच्या दिवशीच आपल्या घरात प्रत्यक्ष कोकीळ अवतरली तर ?? लोकांच्या झुंडी तिच्या दर्शनासाठी येतील यात शंका नाही. असा प्रकार १९९६ साली नाशिकमध्ये घडला होता. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जागरुकपणे त्यातील "सत्य " उघडकीस आणले होते.*
कोकीळ हा जंगली वृक्षराईमध्ये राहणारा पक्षी. तो सहसा जमिनीवर उतरत नाही.त्यामुळं स्वतःहून तो कुणाच्याही घरी येऊन "दर्शन " देणे ही अशक्यप्राय गोष्ट. आणि मूळात कोकीळ हा तसा लबाड पक्षी. कोकीळा ही जाणीवपूर्वक बरेचदा कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते. कावळी अर्थात मिसेस कावळा या मात्र भलेपणानं कोकीळेची पिल्लेही आपलीच समजून वाढवते अस सांगितलं जाते. ह्यातील तथ्यांश लक्षात घेऊन एक प्रश्न उमटतो...लबाड कोकीळेच्या नावानं एखादं धार्मिक व्रत असणे ही नैतिकता आहे काय ?? विचार व्हावा.
*!! नैतिकतेशिवाय धर्म पध्दती ....म्हणजे निव्वळ अंधश्रध्दा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग ६ )*
*कोंबड्याच्या पिल्लूचे बलिदान ...*
कोंबडा - कोंबडी ....नुसतषनाव ओठांवर आल की झर्रकन जिभेवर चव पसरते. कोंबड्याचा रस्सा म्हटल की , चेहरा कोण खुलून जातो. त्यातही आपण कोकण प्रांतात असू तर वडा - कोंबडा अत्यंत प्रसिद्ध आहे. आपल्या घाटावर सुध्दा देवीला वाहणाऱ्या परडीच्या माध्यमातून या मुक्या प्राण्यांच्या हत्या सर्रास होत असतात. देवाच्या नावाखाली होणारी पशूहत्या रोखण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर काम केले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीही गाडगेबाबांचा हा वारसा पुढे चालवते हे सर्वश्रूत आहे. अशीच एक अंधश्रध्दा इथे नोंदवतोय.
*कोकण प्रांतात ही विशेषतः आढळते. कोकणात वळणदार घाटांची रेलचेल भरपूर आहे. या घाटातूध सुरक्षित व सुखाचा प्रवास व्हावा म्हणून कुणी नारळ देत तर कुणी अगरबत्ती वाहत असते. आपल्या गाडीत जर एखादं नवीन लहान मुलं असेल तर त्याच्या जिवाच्या संरक्षणासाठी घाटातून प्रवास करताना एखादं कोंबडीचे लहान पिलू घाटामध्ये सोडायच अशी अंधश्रध्दा बरेच जण बाळगतात. घाटातील देव - देवतेसमोर ते लहान पिलू सोडायच व पुढील प्रवास करायचा अशी रीत आहे. मानवाचे बालक वाचावे म्हणून कोंबडीच्या निरागस बालकाचा जीव घाटात सोडून देणे हे कुठल्या नैतिकतेत बसते ?? जसे माणसाचे बालक माणसाला प्रिय तसेच कोंबडीचे पिलू कोंबडीला प्रिय असणार एवढं साध शहाणपण माणसाला का सुचत नसावे ?? अपघाताची कारणे विविध व मानवनिर्मित असतात . यामध्ये कोंबडी अथवा इतर प्राणी सृष्टीचा काय संबंध येतो जरा विचार व्हावा. आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून कोंबडीच्या पिल्लाला घाटात सोडणे व त्या लहान निरागस पिल्लाचा जीवनप्रवास अक्षरशः संपवाणे यात कोणती माणुसकी आहे ??*
मित्रहो...निरुपद्रवी प्राण्यांची केवळ आपल्या अंधश्रध्दा बाळगून असणाऱ्या हितासाठी जीव घेणे हे कोणत्याही विवेकी माणसाला सुचणर नाही. या अंधश्रध्दा वेळीच रोखायला हव्यात. या पृथ्वीवर माणसाचा हक्क तसाच इतर छोट्या मोठ्या प्राण्यांचाही असतो एवढा विवेक आयुष्यभर बाळगावा हीच अपेक्षा.
*!! पशूहत्या टाळा , अंधश्रध्दा सोडा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग ८ )*
*रेड्यांमुखी वेद ....??*
रेडा...जंगलातील एक वजनदार प्राणी. जवळजवळ १००० किलौचे हे धड जंगलात उधळायला लागले की जणू काही इतर प्राण्याचा भितीने थरकाप उडावा. धिप्पाड शरीर लाभलेल्या वजनदार माणसालाही "रेड्याच्या कातडीचा " म्हणून उपहासपूर्ण चेष्टा केली जाते. असा हा प्राणी मानवनिर्मित कोणत्या गुंत्यात न गुरफटला तरच नवल.
*साधारणपणे १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या तोंडातून "वेद " वदवून दाखवले अशी कहाणी ऐकत आलोय आपण. हे सत्य म्हणून स्विकारणारा बराच मोठा समूह आजही आहे. ज्ञानेश्वरांनी असा चमत्कार खरोखरीच केला असेल ?? खरेच रेडा बोलला असेल ?? सुवाच्चरीत्या व अर्थपूर्ण बोलणे हे फक्त मानव नावाच्या प्राण्यालाच आजवर शक्य झालयं. यासाठी मानवाच्या विकसित होणाऱ्या मेंदूचा फार मोठा वाटा आहे. माणसासारखे बोलण्याचा चमत्कार रेड्यासारख्या एखाद्या प्राण्याने केल्याचे उदाहरण जगाच्या पाठीवर इतरत्र नाही. अपवाद ज्ञानेश्वरांच्या या रेड्याचा. यामागील सत्य नेमके काय असावे ??....मूळात ज्ञानेश्वरांनी स्वतः लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत या चमत्काराचा उल्लेख आहे का ?? तपासून घ्या. ज्ञानेश्वरांचे पहिले ठोस असे चरीत्र त्यांच्या मृत्यूनंतर २५० वर्षांनी लिहिल्याचे ऐकिवात आहे. ज्ञानेश्वरांना ज्या प्रवृत्तीनी आयुष्यभर छळले त्यांच्याच वारसानी ज्ञानेश्वर नावाचा गैरफायदा घेण्यासाठी अशा कहाण्या रचल्या असाव्यात. संतांनी समाजाला समतेची व मानवतेची शिकवण दिली. संतांचे मोठेपण त्यांच्या या मानवतावादी कृतीत आहे , कोणत्याही चमत्कारात नाही. सावरकरानी विज्ञान व समाज या लेखात "ज्ञानेश्वर जर रेड्यामुखी वेद वदवू शकले तर मग अल्लाउद्दीन खिलजी हा देवगिरीवर चालून येत आहे हे रामदेवरायाला मंत्रबळे का सांगू शकले नाहीत ?? असा समर्पक प्रश्न विचारला आहे.*
असाच एक प्रकार आमच्या कोल्हापूरनगरीत घडत होता. राजर्षी शाहू महाराजांनी शिकार केलेला रेडा अथवा गवा भवानी मंडप या ठिकाणी ठेवला आहे. तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर लोक या रेड्याचेही मनोभावै दर्शन घेत व कुणी हळदकुंकु तर कुणी पुष्पहार गळ्यात घालीत. काहीजण त्याच्या कपाळावर पैसा चिकटवून आपण भाग्यवान आहोत का असा पडताळा करत. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर नगरीची जिथे ही अवस्था तिथे इतरांची कथा काय वर्णावी ??. आमचा भारतीय समाज विवेकवाद कधी शिकणार हा एकच प्रश्न सध्या मला छळतोय. चमत्काराला नमस्कार ही पध्दती बंद होऊन "चमत्काराला आव्हान " हे बोल ऐकू येतील तोच खरा सुदिन.
*!! चमत्काराच्या भरी भरोनी , झाली अनेकांची धुळधाणी , संत चमत्कार यापुढे , नका सांगू सज्जन हो....!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग ९ )*
*हैद्राबादी मासा...म्हणे दमा बरा करतो ?*
मासा...जलचर प्राणी. विविध प्रकारचे मासे समुद्रात , नदीत , विहिरीत , तलावात विहार करत असतात. कोकणातील माणसाचे मुख्य अन्न म्हणजे मासा. मासा हा देखील माणसाने आपल्या फायद्याकरता कसा वापरला आहे व एक गैरसमजूत कशी व्यापक रूप धारण करते आहे याचे एक उदाहरण येथे देत आहे.
*दमा..हा आजार दिर्घकाळ टिकणारा असतो. जो दमवतो तो दमा असेही याबाबतीत म्हटल जाते. कोणत्यातरी अँलर्जी अथवा शारीरिक कारणामुळे श्वासनलिका आंकुचन पावतात. श्वसनमार्गाची रुंदी कमी असल्याने श्वास घेण जड जाते आणि घुं- घुं असा आवाज येतो. अजून तरी दमा कायमचा बरा करणारा खात्रीशीर उपाय आपणांस माहिती नाही. असे असताना हैद्राबादी मासा खाल्ला तर दमा बरा होतो असे काही वैदू सांगून बक्कळ पैसा कमावतात. यातील सत्य काय आहे ??.... हैद्राबाद मधले काही वैदू घशात मासा सोडून दमा बरा करण्याचा दावा करतात. हैद्राबाद हे नाव सांगून गावोगाव धंदा करणाऱ्या वैदूकडे एक पावडर असते. या पावडरचा एक महिन्याचा कोर्स ते देताता.या पावडरमध्ये "स्टिराँईड " असते. दम्याच्या अँलोपेथीक औषधात स्टिराँईड वापरतात हे खरं असले तरीही त्याचे कारण अँटँकची तीव्रता कमी व्हावी म्हणून , नेहमी नाही. कारण सतत स्टिराँईड घेणे हे घातक होऊ शकते. विशेषतः उतारवयातील रुग्णांना उच्च रक्तदाब त्रास असेल तर तो अधिक वाढतो. हाडं ठिसूळ होतात. हे वैदू थातूरमातूर माहिती विचारून सरसकट पावडर देतात. हे धोकादायक आहे. मासा खाण हे आरोग्यदायी असल तरी मासा खाऊन दमा बरा होतो अस कुणीही छातीठोकपणे सांगू नये. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीय.*
होत काय की...दिर्घकाळ टिकणारे,आजार माणसाची सहनशक्ती नासवतात. इतर उपायाबरोबरच हा उपाय पण करून बघू या भावनेने या वैदूचे फावते. कमाई वैदूची , नाव माशाचे अन् त्रास रुग्णाला असा हा प्रकार आहे. ही आरोग्य विषयक अंधश्रध्देचे एक रूप आहे. सरळसरळ फसवणूक आहे. आपण सावध राहूया.....इतकेच.
*!! आरोग्याबाबतीत....भोंदूगिरीला बळी पडू नका !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १० )*
*मुंगूस...झाडाची मुळी खाते ??*
मुंगूस...सापाचा मुख्य शत्रू म्हणून प्रसिद्ध. आपल्याकडे मुंगूसाचे तोंड पाहणे लाभदायक समजले जाते. ( अंधश्रध्दा ) नाग आणि मुंगूस यांच्या लढाईत एक कोण तरी संपल्याशिवाय लढा संपत नाही. दोघांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. यात सर्रास मुंगूस जिंकत असते. याला कारण म्हणून ...लढाईच्या वेळी एका विशिष्ट प्रकारची मुळी खाऊन मुंगूस सापाच्या विषापासून स्वतः चा बचाव करते असा गैरसमज प्रचलीत आहे. सत्य काय आहे ??
*नाग व मुंगूस ह्यांच्या लढाईत मुंगूस जखमी झाल्यास विशिष्ट मुळी खाते व पुन्हा नागावर झडप घालते असा एक समज आहे. मूळात साप हे मुंगूसाचे भक्ष्य आहे. भक्ष्य पकडण्यासाठी अतिशय चपळाईने मुंगूस हल्ला करत असते. प्रतिहल्ल्याच्या उद्देशाने नागही तुटून पडतो. अशावेळी चलाखीने मुंगूस आपले शरीर ताठ करतो. त्यामुळे मुंगूसाच्या शरीरावरील दाट केस उभे राहतात. हे केस दाट व तोंडाला टोकदार असल्याने नागाचे विषारी दात मुंगूसाच्या शरीरापर्यत जाऊन विष टोचण्यात अडचणी तयार होतात. या केसांची लांबी एक किंवा दोन इंच असते. प्रत्येकवेळी नाग दंश करताना मुंगूस हे केस उभे करते व हे केस नागाच्या जबड्याला टोचतात. विष टोचले जात नाही . मुंगूस बचावते. समजा मुंगूसाच्या अंगावरील सर्व केस काढून टाकले आणि मग नाग व मुंगूस लढाई लागली तर ?? मुंगूस बचाव करू शकणे मुश्कील होईल . लढाईवेळी मुंगूस जमिनीची माती आपल्या अंगावर घेते जेणेकरून केस सतत राठपणे उभे राहतील. या मातीच्या व केसांच्या जोरावरच मुंगूस विषारी सापाला भिडते. आपण हा प्रयोग घरातील केरसुणी बाबत करून बघा. केरसुणी फुलावी म्हणून त्यात माती घातली जाते. असाच प्रकार मुंगूसाचे केसाबाबतीत होतो. तेव्हा कोणतीतरी मुळी खाऊन मुंगूस जिंकते हा गैरसमज काढून टाका.*
पहिल्यांदा सांगितलं कि..मुंगूस पाहणे हे हिंदू धर्मात लाभदायक मानतात. मला प्रश्न पडतो की..ज्या नागाला हिंदू परंपरेत अथवा इतर धर्मियातही महत्त्वाचे अर्थात देवतेचे स्थान दिले गेले त्याचा शत्रू लाभदायक कसा ?? असे प्रश्न जनसामान्यांना पडत नाहीत म्हणून तर धर्मात अनेक विसंगती भरल्या असतात. पु.ल. नी या संस्कृतीला "गप्प बसा संस्कृती " असे उगाच नाही म्हटल. तेव्हा जरा डोळे उघडून घटना बघा..कारण शोधा...मग अर्थ लावा.
*!! गैरसमजांच्या प्रदेशात ....किती काळ रहायच ?? !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात... ( भाग ११ )*
*बाळूमामांचा बोकड....दूध देतो ??*
बोकड...या प्राण्याचा मांसाहार मनुष्याच्या जिभेवर स्वाद पसरवतो. पण आजकाल बोकड दूध देतो हे वाचून बरेच जणांना आश्चर्यचा धक्का बसेल. आदमापूरच्या प्रसिद्ध बाळूमामांच्या ताफ्यातील बकरे अमावास्या अथवा पौर्णिमेला दूध देतो आणि हा दैवी चमत्कार आहे असा प्रचार ऐकू येत असतो. गायीचे दूध , म्हैशीचे दूध , शेळीचे दूध यामध्ये आता बोकडाचे दूध हा प्रकारही समाविष्ट केला जाईल अशी आशंका येते. यामागचे वैज्ञानिक सत्य काय आहे हे जाणूया..
*इस्ट्रोजेन....या हार्मोनचा प्रभाव गर्भधारणेनंतर मादीच्या शरीरात वाढल्यामुळे दूधाची निर्मिती होते. नराच्या शरीरात याचे प्रमाण कमी असते. मात्र इस्ट्रोजेनचे इंजेक्शन नराला टोचल्यास काही नरांच्यात हार्मोन प्रमाण वाढते व अतिशय कमी प्रमाणात दूध येऊ शकते. प्रायोगिकरित्या बैल व कुत्रा या प्राण्यावर ही गोष्ट विदेशात सिद्ध झालीय ल त्याचे रेकाँर्ड उपलब्ध आहे. भाकड गायीनाही काही प्रमाणात दूध आणणे शक्य आहे. "स्वीट क्लोव्हर " नावाच्या गवतात वनस्पतीजन्य "फायटोइस्ट्राँन " असते. सतत वेगवेगळ्या ठिकाणी चरणार्या शेळ्या व मेंढरे यांसारख्या प्राण्यातील नराने म्हणजेच बोकडाने हे गवत सातत्याने मोठया प्रमाणात खाल्ले तर त्याच्या शरीरात इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते व काही प्रमाणात दूध तयार होते.बोकडाला दूध येणे ही गोष्ट विज्ञानाला परिचीत आहे. यात दैवी चमत्कार नाही. ज्या नराच्या शरीरात गवताव्दारे अथवा इंजेक्शनव्दारे असे हार्मोन्स निर्माण झाले नाहीत अशा बोकडाला अथवा इतर कोणत्याही प्राण्याला दूध येणे कदापि शक्य नाही. बाळूमामाच्या नावे चालणारी ही अंधश्रध्दा थांबवायला हवी.*
बाळूमामाचा बोकड दूध देतो...या तथाकथित चमत्काराला अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आव्हान दिले आहे. ११ लाखाचे बक्षिसही जाहीर केले होते. आव्हान स्विकारूनही प्रत्यक्ष प्रयोगावेळी बाळूमामाचे हितसंबंधी भक्तगण चाचणीला समोर आले नाहीत. या बकर्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात भाग्य फळफळते व समृद्धी येते असा बनावटी प्रचार केला जातो. या मेंढराच्या कळपाविरोधात काही ठिकाणी शेतकरी बांधवानी तक्रारी दाखल केल्या आहेत. बाळूमामाच्या नावाखाली भरलेला हा अंधश्रध्देचा बाजार आता बाळूमामाच्या अस्सल अनुयायीनी उधळायला हवा. २१ व्या शतकात राहून आपले डोके १५व्या शतकात ठेवणे हे कितपत शहाणपणाचे आहे ?? विचार व्हावा.
*!! जग सुखी करण्याचा मार्ग....अंधश्रध्दा निर्मूलन !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग १२ )*
*खारूताईला....न्याय मिळायला हवा*
खारूताई....नुसत नाव घेतल तरी अंग मोहरतं. अत्यंत देखणा प्राणी. लहानापासून मोठ्यापर्यत प्रत्येकाला आवडणारी अशी ही खारूताई. कुणालाही आपल्या अंगाखांद्यावर बिनदिक्कतपणे खेळावी असा वाटणारा हा छोटा प्राणी. या खारुताईला एका बाबतीत न्याय देण्याची गरज आहे. ही पोस्ट जरा मनोरंजक असली तरीही महत्त्वाची नक्कीच आहे. म्हणून तुमच्या समोर एक गोष्ट आणू पाहतोय.
*आपण बरेच जण केसांना रंग लावत असतो. त्यासाठी चांगले चांगले ब्रश बाजारात उपलब्ध असतात. असाच एक ब्रश आहे " कँमल हेअर ब्रश ". नावावरून असे वाटते की हा ब्रश उंटाच्या केसापासून बनवला असावा . आणि " कँमल " कंपनीने तो बनवला असावा. पण हा गैरसमज आहे. मूळात हा ब्रश उंटाच्या नव्हे तर खारूताईच्या केसापासून बनवलेला असतो. म्हणजे खार जाते जिवानिशी अन् नाव मात्र उंटाचे. उंटाच्या केसाचा यासाठी उपयोग असता तर कँमल हेअर ब्रश हे नाव योग्य असते. पण वास्तव असे की यासाठी खारूताईचा जीव जात असतो. मग विधायक अर्थाने खारूताईच्या नावे हा ब्रश असायला हवा असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते. बलिदान खारूताईचे अन् नाव मात्र उंटाचे असा हा प्रकार. शेवटी मार्केटमध्ये " कँमल " नावाला एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे म्हणून असा प्रकार असावा का ?? मला तरी हेच वाटते. तरीही मी खारूताईचीच बाजू घेणे न्यायाचे वाटते.*
शेवटी काय हो...ज्याच्या त्याच्या वाट्यात ज्याचे त्याचे श्रेय मिळावे इतकाच हेतू. तुम्हाला काय वाटते ??
*!! खारूताई...तुझ्या न्यायासाठी हा अल्प प्रयत्न !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग १३ )*
*गाढवांची बदनामी कशासाठी ??*
गाढव ...अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक प्राणी. अहोरात्र कष्टाचे ओझे पाठीवर घेऊन मानवाची सेवा बजावणारा एक प्रामाणिक साथी. तरीही माणसाने आपल्या स्वतःच्या मूर्खपणाला " गाढवपणा " हा शब्द देऊन टाकला. चूक माणसाची व दूषण गाढवाला असा हा प्रकार आहे. एखाद्याला मूर्ख ठरवायचे असेल तर " गाढव लेकाचा " असा शब्दप्रयोग सहज उच्चारला जातो. "मुर्खपणाचा अँम्बँसिडर " बनवलेल्या गाढवापेक्षाही मोठा मूर्खपणा समाजातील लोक करतात तेव्हा त्याला काय म्हणावे ??
*उन्हाळा संपायला लागला की पावसाची ओढ सुरु होते. पावसाच्या आगमणाने पृथ्वी हिरवीगार बनते. पाणी भरून नद्या वाहू लागल्या की माणसाच्या जीवात "जीव" येतो. पण हाच पावसाळा पहिल्या टप्प्यात जर लांबला तर ??.... मग अंधश्रध्दाळू भारतीय जनता पाऊस पडावा म्हणून वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करते. कुणी देवाला साकडे घालत देवाचा गाभारा पाण्याने भरते तर कुणी नवससायास बोलते. सर्वधर्मीय प्रार्थना केल्या जातात .तर कुणी "अतिशहाणे " पाऊस पडावा म्हणून गाढवांचे लग्न लावतात. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बँड - बाजा वाजवत जाहिरपणे गाढवाचे लग्न लावले जाते. या मूर्खपणावर दस्तरखुद्द गाढवही मनातल्या मनात हसत असावे. खरे तर विज्ञानाच्या सहाय्याने प्राथमिक शाळेत शिकणार्या लहान मुलगा अथवा मुलगी सुध्दा पाऊस कशामुळे पडतो हे सांगू शकतो. बदलत्या वातावरणामुळे पाऊस पुढेमागे होऊ शकतो. पण अंधश्रध्दायुक्त कर्मकांडाची सवय अंगी पडलेल्या समाजाला हे कधी कळणार ? गाढवांचे लग्नाचा व पाऊस पडण्याचा तिळमात्रही संबंध नसातो. यातून नकळतपणे गाढव देखील बदनाम होत जाते. स्वतःला माणूस म्हणवणारे पाऊस पडावा म्हणून जेव्हा गाढवाच लग्न लावातात तेव्हा स्पष्टपणे स्वतःच्या बुध्दीमत्तेचा सपशेल पराभव करतात हेच खरे.*
लाथा झाडणारा प्राणी म्हणून गाढवाची ओळख आहे. अंधश्रध्दा जोपासताना माणूसही गाढवासारखाच वैज्ञानिक दृष्टिकोनाला लाथा झाडत असतो. यातून समस्त मानवजातीचा बौद्धिक पराभव करत असतो. यापेक्षा गाढवाप्रमणे प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास या देशाचे अन् विश्वाचे कल्याण झालेवाचून राहणार नाही. कष्टाचे हे " शहाणपण " गाढवाकडून घेतले तरी पुरेसे आहे...जीवन आनंदाने जगायला.
*!! माणसा माणसा , कधी व्हशील "माणूस " !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १४ )*
*उंटाच्या पोटात....पाण्याची पिशवी ??*
*उंट....म्हणजे सौंदर्याच्या रूढ परिव्याख्येत न बसणारा अर्थात कुरूप प्राणी. फताडे नाक , लांबणारे ओठ , बटबटीत डोळे , लहान कान , लांबलचक वाकडी मान, फेंगडे पाय असे उंटाचे रूप. उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. पायाचे तळवे पसरट व मऊ असल्याने वाळवंटात वाळूत न रुतता जलदगतीनै उंट पळू शकतो. वाळवंट आणि पाणी यांचे प्रमाण व्यस्त असते. पाण्याअभावी जिथे झाडेही खुरटी निपजतात तिथे उंटासारखा मोठया देहाचा प्राणी टिकून राहतो हे वैशिष्ट्ये आहे. उंट आपल्या पोटात पाण्याची पिशवी ठेवून असल्याने तो पाणी गरजेनुसार वापरत आयुष्य जगतो असा एक गैरसमज आहे. सत्य काय ते पाहूया....सत्य असे की उंटाच्या पोटातच नव्हे तार शरीराच्या कोणत्याही भागात पाण्याची पिशवी नसते. गायीम्हशीना जसे इतर भाग असतात उंटलाही तसेच भाग असतात. फरक इतकाच की , पहिला हिस्सा ज्याला रुमेन म्हणतात , त्यात उंटाला खिशाप्रमाणे अनेक कप्पे असतात. अनेकांची समजूत अशी की या भागात उंट पाणी साठवात असतो. वस्तुस्थिती अशी असते की , या कप्प्यामध्ये उंट अर्धवट चर्वण झालेले व पातळ खिरीसारखे अन्न असते व तेही जेमतेम पाच लिटर भरेल इतकेच असते. तहानलेल्या उंटाला जर आपण पाणी पाजले तर १० मिनिटांत जवळजवळ १३० लिटर पाणी झपाटयाने पितो. याचाच अर्थ असा की रुमेन म्हणजे पाण्याची पिशवी नव्हे. मग वाळवंटात उंट पुरेशा पाण्याविना कसा तग धरतो ?? उंटाला मिळालेल्या काही निसर्गदत्त देणग्यानी हे शक्य झालंय. पाण्याच्या कमतरता असेल तेव्हा त्यावेळी उंटाच्या मुत्राचे प्रमाण घटून युरीया या नत्रयुक्त टाकाऊ पदार्थाचे प्रमाण वाढते. रक्तात त्याचे अभिसरण होऊन ते उदरात जाते व तेथे त्यापासून प्रथिने तयार होतात. उंटाच्या शरीरातील २५% पाणी कमी झाले तरीही त्याला फक्त अशक्तपणा येतो , मृत्यू येत नाही. घाम फारच कमी येतो. पाठीवरचे केस दाट असल्याने पाठ फारशी तापत नाही व त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण फारच कमी असते. हिवाळ्यात त्याला पाण्याची फारच म्हणजे फारच कमी गरज असते. सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे तो पाण्यावाचून कित्येक दिवस जगू शकतो. असा हा वैशिष्ट्येपूर्ण प्राणी आहे. वाळवंटातील या जहाजात म्हणजेच उंटाच्या शरीरात पाण्याची पिशवी नसते एवढे सत्य जाणून घेऊया.*
जणू काही हा प्राणी..वाळवंटात जगण्यासाठी जन्माला आला असावा. तप्त वाळवंटात जगणे म्हणजे ऐरोबागैरोबाचे काम नाही. तिथे उंटाच्या जातीचेच शरीर हवे. होय ना ??
*!! उंट.... वाळवंटात सुखाने जगू शकतो ....त्याला शतशः सलाम !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १५ )*
*कुत्र्याच्या रडण्याने अशूभ समाचार येतो ??*
कुत्रा ...अत्यंत इमानदार प्राणी. टाकलेला तुकडा निमुटपणे खाऊन अहोरात्र आपल्या घरांचे संरक्षण करणारा बिनपगारी प्रामाणिक रखवालदार. पिसाळलेला कुत्रा चावला की रेबीज हा रोग होण्याचा धोका असतो . काही ठराविक जातीच्या कुत्र्यावर हजारो रूपये उधळणारे श्रीमंत असतात तसेच दुसऱ्या बाजूला कुत्रा दिसला की दगड घेऊन नेम धरणारे महाभागही समाजात कमी नसतात. अंधश्रध्दा व कुत्रा यांचे एक नाते इथे मांडतोय.
*कुत्र्याचे रडणे...अत्यंत अशुभ समजले जाते. रात्रीच्या वेळेस गल्लीत एखादे कुत्रे रडायला लागले अर्थात विव्हळायला लागले तर सारी वस्ती शिव्यांची लाखोली वाहते. दगड फेकून कुत्र्याला इजा पोचवण्याचा प्रयत्न होतो. ऐकीव कथा अशी की...माणसाचा जीव घ्यायला येणारा यमराज कुत्र्याला दिसतो व त्याला बघून कुत्रे रडू लागते. कोणत्याही यमराजावर माझा विश्वास नाही. तरीही वादासाठी यमराज जीव घ्यायला येतो हे जरी तात्पुरते खरं मानल तरीही काही प्रश्न उभे राहतात. यमराज ज्या कुणा माणसाचे जीव घ्यायला आला असतो त्या माणसाला अथवा कुटुंबियांना कुत्र्याच्या रडण्याने पूर्वसूचना तर मिळतेच ना ? आगाऊ सूचना देऊन सावध करणाऱ्या कुत्र्याला अशुभ का मानावे ??खरे तर जगातील कोणतीही वस्तू अथवा घटना शुभ अशुभ नसतेच. खरे तर कुत्र्याच्या रडकथा माणसाऐवजी यमराजासाठी अशुभ असायला हवे. कारण यमराजाच्या "नियोजित " कामात अडथळा उत्पन्न करण्याचे काम कुत्रा करत असतो. माणसाच्या जगात सरकारी कामकाजात अडथळा आणला तर त्याच्यावर कारवाई केली जाते. हाच नियम यमराजाने अंमलात आणला तर ? यमराजाने माणसाआधी त्या कुत्र्याचा जीव घेतला तर ? पण असे काही होत नाही हे आपल्या समोर आहे.*
जे कुत्रे माणसाची प्रामाणिकपणे सेवा बजावते त्याच्या एका रडण्यासारख्या नैसर्गिक कृतीशी माणसाने शुभ अशुभ गोष्टी जोडाव्यात हे कितपत योग्य ?? घरामध्ये चोरी झाली तर चोरांचा माग काढण्यासाठी कुत्र्याचा उपयोग होतो. बाँम्बशोधक पथकामध्ये काम करून असंख्य मानवी जिवांना वाचवण्याचे अनमोल कार्य कुत्रा करत असते. माणसाचा जीव वेगवेगळ्या पातळीवर वाचवणारा कुत्रा हा माणसाचा मदतनीस आहे. त्याच्या एका कृतीला अशुभ म्हणण म्हणून तर योग्य नाही. माणसाच्या या अप्रामाणिक वृत्तीसाठीच त्याला कुत्र्याच्या इमानपणाची आठवण करून दिली जात असावी. जगण्याचे स्वातंत्र्य जसे माणसाला तसेच कुत्र्यालाही आहे. त्याच्या चलनवलनातून आपले भविष्य आजमावणे हा तद्दन मुर्खपणा आहे.
*!! इमानी प्राण्यावर अशुभतेचा शिक्का , माणसा तुझ्या बुध्दीचा झालायं बघ बुक्का !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १६ )*
*आँक्टोपसची भविष्यवाणी...किती खरी किती खोटी*
आँक्टोपस...माहिताय ना.२०११चा विश्वचषक आठवतोय ? फुटबाँलचा. कोणता संघ विश्वविजेता होणार याच भाकीत जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांपासून सट्टेबाजांपर्यत सर्वांचे डोळे "पाँल आँक्टोपस " या भविष्यवेत्याकडे लागलेले असायचे. स्पेनचा संघ विश्वविजेता बनला आणि पाँल नावाचा हा आँक्टोपस रातोरात स्टार बनला. त्याचे भविष्यकथन अर्थात अंदाज म्हणजे नेमके काय होते हे जाणून घेऊया.
*पाँल आँक्टोपस....हा आँक्टोपस व्हल्गँरीस या प्रजातीतला आहे. याचे वय ६ महिने ते १४ वर्षे असते. या प्राण्याला तीन हृदय असतात. त्यांना अजिबात ऐकू येत नाही. त्यांना नीट शिकवता येते. त्यांना काही गोष्टी पकडता येतात , आकार ओळखता येतात. त्यांना दिशेच भानं असते आणि प्रकाशाची तीव्रता व वस्तूचा आकार त्यांना समजतात. ते आडव्या आकाराकडे आकर्षित होतात हे पूर्वी सिध्द झालंय. गंमत म्हणजे पाँलने निवडलेल्या ध्वजामध्ये आडवे पट्टे असतातच. निव्वळ वासाच्या आधारे योग्य पेटी निवडण्याचे प्रशिक्षण देण्याइतपत आँक्टोपस शहाणे असतात. अंतर व अवकाश याबाबतीत त्याचे आकलन चांगले असते. ही भाकीत करताना ८ पैकी ६ वेळा पाँलने ( कँमेरा बाजूने ) उजवीकडची पेटी निवडली होती. ७ पैकी ३ वेळा जर्मनीचा ध्वज उजव्या पेटीवर होता. तर आँस्ट्रेलिया सर्बिया इंग्लंड स्पेन सामन्याच्या वेळी डाव्या बाजूस पेटीवर होता. महत्त्वाचे असे की.. पाँलला शक्याशक्यतेच्या नियमानुसार दोन संघापैकी एकाची निवड करायची होती म्हणजे ५०% शक्यता विजयाची व पराजयाची असते. यामध्ये "वारंवारता" हा नियम पाँलला लावला गेला नाही. एकदा भविष्य कथन झाल्यावर पुन्हा चाचपणी केली गेली नाही. ही भाकीतं गणितातल्या शक्यताच्या सिध्दांतावर आधारित असतात. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी सर्व देशाच्या ध्वजातून अंतिम विजेता शोधण्याची जबाबदारी पाँलवर टाकली असती तर ?? वारंवारतेचा नियम लावून एका सामन्याची किमान पाच वेळा भाकीते करायला लावली असती तर ? महत्त्वाचे म्हणजे याच पाँल आँक्टोपसने युरोपियन लीगच्या अंतिम सामन्याचे वर्तवलेले भविष्य खोटं ठरले होते याचे भान असायला हवे.*
खरं सांगायचं तर...भारतीय माणूस काय किंवा विदेशी माणूस काय ..अंधश्रध्दा ह्या जगभर पसरलेल्या असतात. उपांत्य सामन्यात जर्मनीला विजेता ठरवून हिरो बनलेल्या पाँलला अंतिम सामन्यात जर्मनी हारणार या भविष्य कथनाबद्दल जर्मन जनता आपल्या या "हिरो " ला "खलनायक" ठरवून जीव घेईल हे साधे सोपे भविष्य महान भविष्यवेत्ता पाँलला कळू नये ? खरेतर त्या बिचाऱ्या प्राण्याला दोष देण्यापेक्षा आमची मनुष्य जातच पुन्हा प्राणी बनायच्या तयारीला लागलीय असे मला प्रामाणिकपणे वाटते. आपले मत काय ??
*!! भविष्य कथनापायी जातोय बघा जीव...करू नका नसती उठाठेव , नसती उठाठेव !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग १७ )*
*घुबडाचे तोंड पाहू नये ??*
घुबड...अत्यंत भेदक व भेसूर डोळे. गोल चेहरा व बसके नाक यांमुळे "कुरुप" सदरात मोडणारे. अंधश्रध्देच्या दुनियेत बदनाम झालेला आणखी एक जीव. या अंधश्रध्दा जोपासणाच्या वेडापायी जादुटोणा, मंत्रतंत्राच्या नावाखाली घुबडाची हत्या केली जाते. घुबडाची कुरुपता इतकी सर्वमान्य झालीय की , घुबडाचे तोंड पहायच नाही असा बदनामीकारक संकेत समाजात रुढ आहे. घुबडाविषयी सर्वसामान्य माणसाला फारशी माहिती नसल्याने व त्यातही अज्ञान व अंधश्रध्दा यांची सरमिसव झाल्याने घुबड व भिती हे जणू समीकरणच झालयं. खरे तर ही कुरुपता जशी निसर्गाने त्याला बहाल केलीय तसेच काही वैशिष्ट्येही बहाल केलीयत. ती जाणून घेतली तर घुबडाची भिती वाटण्याचे कारण उरणार नाही.
*घुबड...कड्याकपारीत , निवडुंगाच्या ठिकाणी अथवा अडचणीच्या ठिकाणी वस्ती करत असते. घुबड आपल्या पिल्लांना आपल्या पंखामध्ये ऊब देण्यासाठी ठेवून घेते. ही पिल्ले व्यवस्थित मोठी होईतोवर मादी घुबड घरट्यात राहते व नर घुबड जेवणाची व्यवस्था करतो. उंदीर , सरडे , उपद्रवी किटक , लहान साप , छोटे पक्षी हे घुबडाचे खाद्य आहे.मादी घुबड छोट्या पिल्लांना स्वतः चे अन्न स्वतः मिळवायला शिकवते.अंड्यातून पिलू बाहेर यायला १२ तास लागू शकताता. शिकारी पक्ष्याकडून पिल्लाना धोका पोचू नये म्हणून घुबड अतिशय दक्ष असते. जन्मलेवर ५-६ दिवस पिलू डोळे उघडत नाही.ज्या भेसूर व भेदक डोळ्यामुळे घुबडाला पुढील काळात अंधश्रध्दा मार्गाने बदनामी वाट्याला येते त्याचा " निषेध " म्हणून हे कृत्य घडता असेल का ?? की जे अंधश्रध्दा बाळगणारे लोक घुबडाचे तोंड बघणे टाळतात त्यांचेच तोंड पहिले ५-६ दिवस न बघण्याचा नैसर्गिक अधिकार घुबड बजावत असेल ? घुंबडाची मान ३६० अंशात गर्रकन फिरते. सर्व दिशाना ती एकाचवेळी फिरत असल्याने हे दृश्य पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. ज्या परिसरात रहायचे त्या परिसराला अनुरुप रंग घुबड धारण करते. किती वैशिष्ट्येपूर्ण जीव आहे बघा.*
हिंदू धर्मात "लक्ष्मी "ला महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी ही सुख समृद्धी , धन संपत्ती वा भरभराटीची देवता मानली जाते.अशी ही "शुभ " म्हणवणारी लक्ष्मी आपले वाहन म्हणून घुबड का निवडते बरं ? ज्या घुबडावर प्रत्यक्षात लक्ष्मी वास करते त्याच्यावर मानवाची वर्कदृष्टी का ? रोज सकाळी लक्ष्मीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणारे भाविक सकाळी अथवा केव्हाही घुबडदर्शन अशुभ का मानतात ? मजेची गोष्ट अशी की ज्याला लक्ष्मी घरी यावी असे वाटेल त्याला एवढं ज्ञान अवश्य असावे की लक्ष्मी घुबड नावाच्या वाहनावरूनच तुमच्या घरी येऊ शकते. घुबडाचे तोंड पाहणे टाळता येणार नाही अशावेळी. पण असे प्रश्न उपस्थित केले तर भाविकांच्या श्रध्दा दुखावल्या जातात. पण स्वतःच्या अंधश्रध्देपायी घुबडावर आपण अन्याय करतोय हे मात्र या भाविकाच्या ठायी नसते. समाजातील विवेकी मंडळीनी अशा अंधश्रध्द लोकांचे तोंड पाहणे बंद केले तर ....बहुसंख्य जनतेला कड्याकपारीत रहाव लागेल. पण तेथेही त्यांना राहणे मुश्कील आहे. कारण ....कारण तिथे तर घुबडांचा नित्यनिवास आहे.
*!! अंधश्रध्दा सोडा....घुबडाचे तोंड पहा...त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात...( भाग १८ )*
*सुंदर मोराचे पाय का खराब ??*
मोर....हा आपला राष्ट्रीय पक्षी. आपल्या लेखमालेत जर त्याची दखल नाही घेतली तर मग मोठी उणीव राहून जाईल. १९६३ साली मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषीत झाला. तेव्हा पासून मोराला "वजन" प्राप्त झाले. तत्पूर्वीही कालिदासासारख्या महान कवीने त्याच्याही लेखनात मोराला त्याकाळचा राष्ट्रीय पक्षी मानले होते. मधला बराच काळ विजनवासात गेल्यावर पुन्हा एकदा मोर राष्ट्रीय पक्षी बनलाच.
*मोर...अत्यंत सुंदर व देखणा पक्षी. मोराला आपला पिसारा फुलवत नाचताना पाहणे हा अवर्णनीय आनंद असतो. रंगीबेरंगी असणारा तो पिसारा अत्यंत विलोभनीय असतो. असा सुंदर पिसारा ही ज्याचे मोठे वैशिष्ट्ये आहे त्याच मोराला दुसऱ्या एका विसंगतीला सामोरे जावे लागते. सुंदर असणाऱ्या मोराचे पाय मात्र अजिबात सुंदर नसतात. असे का ??...याबाबतीत एक लोककथा प्रसिद्ध आहे. तिचाच समाचार आपणांस घ्यायचा आहे. लोककथेत असे सांगितलं गेलयं की...मैनेला एकदा एका लग्नाला जायचे होते. मैनेचे पाय पूर्वी फारच खराब होते. त्यामुळे कुठे बाहेर जाताना मैनेला संकोच व्हायचा. लग्नाला जातेवेळी मैना मोराकडे आली व त्याला म्हणाली " मोर मामा , मला लग्नाला जायचे आहे. लग्नाच्या वेळेपुरती मला तुझे पाय देतोस का ?? नंतर मी परत करेन ". बिचारा मोर तयार झाला अन् आपले सुंदर पाय मैनेला दिले. मैना ते पाय घेऊन जी गेली ती आजपावेतो मोराला पाय परत करायला परत आलीच नाही. मोराचे पाय तसेच खराब राहिले. मित्रहो...लोककथा पण अत्यंत अजब असतात. अत्यंत अवैज्ञानिक व अशास्त्रीय अशी ही लोककथा आहे. ती मैनेवर अन्याय करणारीही आहे अन् मोराचे पारडे जड करणारीही आहे. जरा विचार करा....जर लोककथा खरी असती तर संबंध पृथ्वीवर त्याकाळी एकच मोर व एकच मैना असायला हवी होती. हे शक्य असेल ?? दुसरे म्हणजे असे कुणाच्याही शारीरिक अवयवांची अदलाबदल करणे शक्य होईला का ?? तिसरे म्हणजे मोराचे पाय निसर्गतः खराब असताना बिचाऱ्या मैनेवर त्याचा दोषारोप लावणे कितपत योग्य आहे ?? मैनेला जर सौंदर्यच हवे होते तर तिने मोराचा सुंदर पिसाराच मागून घेतला नसता का ?? सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोघांच्या शरीराची ठेवणच जर वेगवेगळ्या आहेत तर एकमेकांचे अवयव दुसऱ्याला कसे काय मापात बसू शकतील ?? मानवाच्या धडावर हत्तीचे डोके लावण्याची लोककथा आहे तशीच ही लोककथा बिनबुडाची व अविश्वासू आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
मोर हा शंकरपुत्र कार्तिकेय याचे वाहन समजला जातो. देवदेवताशी असणारा त्याचा संबंध लक्षात घेऊन हिंदू समाज त्याला दिव्य पक्षी म्हणतो. जो सन्मान गायीला तोच मोराला समजून त्याची कुणी हत्या करत नसत. इतके महत्त्वाचे स्थान असताना कुणाही देव देवतेला आपल्या चमत्काराने अथवा आशिर्वादाने मोराला "न्याय " द्यावा वाटत नाही याचे कोणतेही कारण समजत नाही. मोराचे पाय कितीही खराब असोत आम्हाला मात्र मोराचे सौंदर्य त्याच्या पिसांच्या फुलोरात दिसते व यापुढेही दिसत राहील. मोराच्या अप्रतिम सौदंर्याचा सन्मान आम्ही आमच्या निकोप नजरेने कायमच करत राहू....इतकेच सांगणे.
*!! दृष्टी निकोप असेल तर....अस्सल सौंदर्य नजरेत कायम राहते !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग १९ )*
*झुरळांची भीती ....कशासाठी ??*
झुरळ....म्हटल रे म्हटल की मानवी कपाळावर बहुतांशी वेळा आठ्या उमटतात. माणसातील बरेच मोठ्या समुहाला ज्या काही थोड्या प्राण्यांची किळस वाटते अशापैकी एक म्हणजे झुरळ. आपल्या अवतीभोवती नेहमी वावरणारे हे झुरळ अनेक कारणाने मानवाला उपद्रवी वाटते. आमच्या स्त्री वर्गाला तर याची प्रचंड भीती असते. झुरळ पाहीले की एक मोठाली किंकाळी ठोकलीच पाहिजे असा बहुतेक नियम आमच्या स्त्री जातीने केला असावा. याचाच उपयोग बरेच चित्रपटात हिरो हिरोईन मिलन घडवणेसाठी खुबीने करतात. हिरोईन झुरळ बघून किंचाळते व पटकन हिरोच्या छातीला लागते. आमचा हिरो लागलीच त्या झुरळाचे मनोमन आभार मानतो. मलाही या झुरळाचे कौतुक करावयाचे आहे पण..पण एका वेगळ्या कारणासाठी..
*झुरळ....भिंतीवर अथवा आपल्या आसपास कुठंही सहजतेने वावरणारा लहान प्राणी. झुरळाच्या एकूण चारहजार जाती अस्तित्वात आहेत. याचे वैशिष्ट्ये म्हणजे यापैकी २५ जाती ह्या आनंदाने माणसाबरोबर राहू शकतात. झुरळ हा पृथ्वीतलावरील प्राचीन जिवांपैकी एक आहे. तरीही याचे आणखी एक वैशिष्ट्य ज्याचे मला अपार कौतुक वाटते ते म्हणजे ..झुरळ हे माणसाप्रमाणेच संवेदनशील व सामाजिक जीव आहे याचा. माणूस जसा समुहात राहतो तसेच झुरळही राहते. माणूस जसा कुटुंबातील घटकाशी भावनिकदृष्टया जोडलेला असतो तसेच झुरळही कुटुंबातील सदस्यांशी भावनिक दृष्टीने समरूप असते. कुटुंबातील सदस्याना चांगले ओळखते. माणूस जसा समाजात राहणेसाठी काही नियम बनवतो व पालन करतो तसेच झुरळही काही नियम आपल्या समाजाअंतर्गत बनवते व पालन करते. एका कुटुंबातील अनेक पिढ्यांचे सदस्य एकत्र राहतात. काही अमेरिकन प्रजातीचे वैशिष्ट्ये असेकी त्यांना एकटे रहावे लागले तर त्यांना मानसिक व भावनिक धक्का बसतो व ते विपरीत वर्तन करतात. काही संशोधक असे मांडतात की झुराळ इतके संवेदनशील असते की एकटे ठेवल्यास आजारी पडते....इतकी मानवतावादी व संवेदनशील वैशिष्ट्ये असणाऱ्या झुरळाची आम्हा माणसांना व विशेषतः स्त्री वर्गाला याची भीती का वाटावी ?? झुरळ या प्राण्याने कुणा माणसाचा जीव घेतलाय अथवा जीव घ्यायला कारणीभूत झालाय असे माझ्या तरी ऐकीवात व वाचण्यात नाहीय. फक्त वर्षानुवर्षे मानवी मनात बसलेली कीळस हेच याचे कारण असावे असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
लोकहो....मला मान्यय की काही प्रमाणात झुरळाच्या वावरण्याने थोडाफार उपद्रव होत असेल. पण याचा अर्थ एवढया छोट्या कारणाकरता एका संवेदनशील व सामाजिक जीवाची कीळस आपल्या मनात साचावी हे कितपत योग्य आहे ?? विचार करा. जे झुरळ एकटेपणा सहन करू शकत नाही ते झुरळ मानवासारख्या सुंदर जीवापासून अंतर ठेवून कसे वागेल बरं. मला वाटते आपण आपल्या मनातील कीळस काढून टाकूया व एका संवेदनशील जीवाची भीती काढून टाकूया.
*!! कुणाही जीवाचा न वाटावी कीळस ....मानवी मनं येऊदे या फळासं....!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २० )*
*टिटवी ...घरावरून ओरडत गेली की अशूभ ??*
आपल्या मानवी जीवनात कोणकोणत्या मार्गाने अंधश्रध्दा येऊन ठेपतील याचा काही नेम नाहीय. मानवी मनच असे आहे की ते इतर प्राण्यांच्या वागण्याचा आपल्याला अनुकूल प्रतिकूल अर्थ लावत असते. यातून काही प्राणी शूभ तर काही अशूभ ठरतात. प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनाचाही विपर्यस्त अर्थ लावून माणूस त्या प्राण्याला अंधश्रध्द या श्रेणीत मोडून टाकतो. हे गैर आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. अशीच एक नोंद.....
*टिटवी....एक छोटा पक्षी. साधारणपणे ३५ सेमी. इतक्या लांबीचा. पाठ व पंख फिकट तपकीरी. पोटाकडची बाजू पांढरी. डोळे मान व गळा काळ्या रंगाचा. चोच तांबडी परंतु टोकाला काळी. पाय लांबट व तीनच बोटे तेही पुढील बाजूला. अस हे व्यक्तीमत्व टिटवी म्हणून ओळखले जाते. किटक अळ्या सुरवंट गोगलगाय याचबरोबर तृणधान्ये कोवळी पाने फुलांच्या पाकळ्या अशा गोष्टीवर हा जीव आपला उदरनिर्वाह करतो. जगभरात केवळ २५ जाती आहेत हिच्या. साधारणपणे पाणवठ्याचे जागी वास्तव्य. कळपाने असतात. अत्यंत प्राचीन ग्रंथात हिचे उल्लेख आहेत तर ज्ञानेश्वर व एकनाथांच्या काव्यातही उल्लेख असणारा पक्षी. एकनाथानी हिच्यावर भारुडं लिहिलय. बुलढाण्याजवळ टिटवी नावाची छोटी नदी व टिटवी नावाचे गाव देखील आहे असे ऐकीवात आहे. पायाच्या विशिष्ट रचनेमुळे हिला फांदीवर अथवा तारेवर बसता येत नाही. असा हा आगळावेगळा पक्षी त्याच्या टिव टिव या ओरडण्याने अशूभ समजला जातो. रात्री अपरात्री हा आवाज ऐकला तर मग विचारायलाच नको. वास्तविक टिटवी हा पक्षी अत्यंत सतर्क असतो. आपल्या पिल्लाला अथवा घरट्याला काही धोका जाणवला तर पूर्ण ताकदीने ती ओरडते. नर व मादी एकत्र आवाज देऊन स्वतःच्या कुटुंबाची काळजी वाहत असतात. हे स्वरक्षण असते कुटुंबाचे. यालाच माणसे अशुभ समजतात. या मानवी प्रवृत्तीला काय म्हणावे ?? टिटवी नावाचे गाव व नदी जिथे वास्तवात आहे तिथेच अशा अंधश्रध्दा उगम पावतात हे योग्य आहे का ?? विचार व्हावा. टिटवीला "यमाची तराळीण " म्हटल जाते. तराळ म्हणजे वेठबिगार जमा करणारा व गस्त घालणारा. त्याचे काम करणारी म्हणून तराळीण. टिटवीचा संबंध अशाप्रकारे मृत्यू देवता म्हणवणारी यमाशी जोडला गेला. हे अन्यायकारक व अंधश्रध्दायुक्त आहे.*
मानवी जीवनात मृत्यूचे भय सतत अस्तित्वात असते. म्हणून त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटक अशुभ मानला जातो. हे योग्य नाही . आपल्या अंधश्रध्दा बाळगल्याने एका छोट्या जिवावर अन्याय करण्याची अत्यंत नीच कृती आपल्या हातून घडते. तेव्हा अंधश्रध्दा टाळूया , जीवन सुंदर बनवूया.
*!!स्वकुटुंब रक्षणासाठी असते टिटवीची हाक.....नका देऊ त्याला अंधश्रध्दाचे बाकं !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २१ )*
*विंचू चावला...काय मी करू ??*
विंचू....शब्द कानावर पडला तरी सर्रकन एक काटा सरकतो अंगावर. विंचवाचा दंश अत्यंत घातक समजला जातो हे त्याचे एक कारण. अनेक अवैज्ञानिक गोष्टी अथवा उपाय विंचवाचे दंशासंबधी जनमाणसात आहेत. तेव्हा विंचू व त्याच्या दंशाविषयी थोडे जाणून घेऊया....
*विंचू....महाराष्ट्रात दोन प्रकार आढळतात. एक काळा विंचू वा दुसरा लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा पण कमी घातक व सर्वत्र आढळतात. याउलट लाल विंचू जास्त घातक व कोकणात आढळतात. काळ्या विंचवाचा दंश खूप वेदनादायी. दंशाच्या जागेपासून वेदना वरवर चढते.घाम येतो , स्नायू थरथरतात , रक्तदाब वाढतो ,नाडीचा वेग मंदावतो. परंतु यापेक्षा अधिक दुष्परिणाम नसतात. लाल विंचूच्या दंशामुळे फुफ्फुसे सुज येते , उलटी होते , घाम येतो , दम लागतो , हातपाय थंड पडतात , खोकल्यात रक्त पडते अशी लक्षणे आढळतात. पूर्वी यामुळे रुग्ण दगावत. हे सर्व दुष्परिणाम विंचवाचे विषामुळे आँटोनामिक चेतासंस्थेशी निगडीत आहेत.पण कोकणातील या घातक विंचूदंशावर कोकणातीलच सुपुत्राने संशोधन करून उपाय शोधलाय. डाँ. बावीस्कर असे यांचे नाव.प्रासोजिन व निफेडिपीन यापैकी गोळी ही लक्षणे दिसताच द्यावीत. प्रासोजिन गोळी पोटात द्यावी व दर चार तासांनी खोकलावाटे रक्त येणे वगैरे लक्षणे थांबेतोवर द्यावी. निफेडीपीन गोळी चोखावी. याचा परिणाम पंधरा मिनिटांत दिसतो. मात्र एक महत्त्वाची सूचना ही औषध केवळ न् केवळ अशी लक्षणे दिसली तरच द्यावीत. खरेतर विंचू चावू नये म्हणून काही उपाय आवश्यक असतात.,...विंचू हे छप्पर , जुने कपडे , चपला व बुट , अडगळीची जागा याठिकाणी असतात. यासाठी कौलारु छपराखाली लाकडी सिलींग असावे. शेतीकाम करता हातात जाड कापडी मोजे वापरावेत. गुंडाळून ठेवलेली अंथरुण पांघरूण नीट तपासून अंथरावीत. किटकनाशक फवारणीने विंचू सहज मरतात. म्हणून वर्षातून एकदा किटकनाशक फवारणी करावी. मातीची घरे व छप्पर , झोपड्या व अडगळीची ठिकाणी फवारणी आवश्यक असते. विशेषतः कोकणात तर अत्यावश्यक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऐकीव व अशास्त्रीय उपचार करत बसू नयेत. आता विंचूदंशावर खात्रीशीर उपाय उपलब्ध आहे.*
लोकगीते अथवा सिनेमागीतातून विंचू अर्थात इंचू चावला तर मज्जा वाटते. मात्र प्रत्यक्षात तो दंश अत्यंत वेदनादायी असतो. प्रतिबंध करणे व योग्य शास्त्रीय उपचार घेणे हेच योग्य. म्हणजे कुणालाही विंचू चावलाच तर तो बोंब ठोकणार नाही की....विंचू चावला , काय मी करू ??
*!! शास्त्रीय उपचार करावा....विंचू दंश प्रतिबंध करून टाळावा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २२ )*
*कबुतरांना..छतावर दाणे टाकू नयेत ??*
कबुतरे ...हा जीव सर्वाच्या आवडीचा. शांततेचे प्रतीक समजला जाणारा हा पक्षी. कबुतरांना दाणे टाकून त्यांना ते खाताना पाहणे हा अनुभव अत्यंत आनंददायी असतो. अनेक ठिकाणी अनेक लोक हा आनंद भरभरून घेतात. पण....पण आमच्या ज्योतिषी लोकांना मात्र कशातही खोट काढायची सवय लागलेली . त्यासंबंधी ही एक नोंद .....
*कबुतरे ...छतावर येतात अन् लोक त्यांना दाणे टाकतात. कबुतरे ही लक्ष्मी भक्त असतात. कबुतरे घराच्या परिसरात वास केली तर लक्ष्मी प्रसन्न होऊन सुखशांती येते यामुळे कबुतराना दाणे टाकले जातात अशी धार्मिक समजूत आहे.ज्योतिषीनुसार कुंडलीत राहू व बुध एकत्र आले की जीवनात स्थिती खराब होते. ज्योतिषीनुसार कबुतर आहे बुध व घराचे छत म्हणजे आहे राहू. लोक छतावर दाणे टाकतात व ते खायला कबुतरे येतात तेव्हा या क्रियेमुळे बुध व राहू एकत्र येतात. तिथे घोळ होतै. कबुतरे दाणे खाऊन शीट टाकून जातात. छताचा अर्थ राहू . अर्थात यामुळे राहू खराब होतो व यामुळे राहूचा आपल्या जीवनात रिझल्ट खराब येतो. नेहमी प्रमाणे ज्योतिषी यावर उपाय पण सांगतात की छताशिवाय इतर ठिकाणी कबुतरांना दाणे टाकणेस जागा नसेल तर दाणे खाऊन कबुतरे गेल्यावर छत पाण्याने धुवून टाका. आता या ज्योतिषी लोकांना काय करावे सांगा ? कुठलाही घटक कुठेही जोडून काहीतरी विचित्र निष्कर्ष काढण्याची सवयच यांना लागलीय. म्हणून तर असे काही विचित्र सुचत असते. दैनंदिन जीवनात सहज मिळू शाकणारा हा आनंद निर्वेघपणे लोकांना मिळू नये असा ज्योतिषी लोकांचा अट्टाहास नव्हे काय ?? शांततेचे प्रतीक असणारे कबुतरे या अशा घोळामुळे कलंकीत होऊन जातात नाहक. अशा अशास्त्रीय तर्काना दूर भिरकावत अगदी सहजपणे कबुतराना दाणे टाकून त्यांना ते खाताना पाहणे हे अधिक अधिक आनंददायी आहे.*
पूर्वी कबुतरे संदेश पोचवण्याचे काम करायचे. आता आधुनिक युगात हे घडत नाही. पण मला असे वाटते की ....कबुतरांच्या एका झुंडीने "आमच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नका , तुमच्या अशास्त्रीय बोधापासून मानवी मेंदूची नाहक बदनामी होते " असा संदेश देशातील समस्त ज्योतिषी लोकांना पाठवावा. तुम्हाला काय वाटते ??
*!! नका देऊ थारा जीवनात , अशास्त्रीय ज्योतिषीला अन् त्याच्या भुक्कड कपोकल्पीत तथाकथित शास्त्राला...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २३ )*
*कासवं...जातयं जिवानिशी*
कासव....हिंदू धर्मात गाय हत्ती यांबरौबरच कासवाला "शुभलक्षण " मानलं जाते. त्यामुळं बहुतेक सर्व मंदिरात मूर्तीसमोर कासवाची प्रतिमा कोरलेली असते. भारतात कासवाच्या विविध जाती सापडतात. मऊ पोट व कठीण पाठ असणाऱ्या आणि जमीन व पाणी याठिकाणी राहणाऱ्या प्राण्याला आपण कासव म्हणतो. कासवाचे प्रत्येक जातीचे वेगवेगळ्या वैशिष्ट्ये असतात. समुद्रात , नदीत व जमिनीवर राहणाऱ्या कासवाला इंग्रजीत वेगवेगळी नावे आहेत. समुद्रात अर्थात खार्या पाण्यात राहणाऱ्या कासवाला "टर्टल " म्हटल जाते. नदीच्या म्हणजे गोड्या पाण्यात राहणाऱ्या कासवाला "टेरपीन" असे इंग्रजी नाव आहे. जमिनीवर राहणाऱ्या कासवाला " टाँरटाईज " अस म्हणतात. आपण सर्रास जे कासव पाहतो त्याला पाय असतात व पायाला बोटेही असतात. कोणताही धोका दिसला की कासव पाय कवचात ओढते व संरक्षण घेते. पण गोड्या पाण्यातील कासवाना हे सहज शक्य नसते. कारण नदीत राहणाऱ्या कासवाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात. समुद्री कासवाचे पाय एक प्रकारे वल्ही असते. मोठ्या प्रमाणावर सतत पोहायला लागत असल्याने नैसर्गिक ते पाय जमलेले असतात.
*कासव..म्हटल की आठवते त्याची कठीण व टणक पाठ. पण हीच पाठ कासवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरतेय. मंत्रतंत्रासारख्या प्रकारात पाठीचा वापृर होत असल्याने कासवाची हत्या होते. कासवाचे मांस खाल्ल्याने शक्ती वाढते व हातापायाचे सांधे दुखत नाहीत अशी अंधश्रध्दा आहे. यातूनच कासवांची तस्करी वाढलीय. कासवाची कठीण पाठीचे कवच उगाळून प्यायलेस पोटदुखी थांबते असा गैरसमज आहे. पण हे वैद्यकीय परिभाषेत कुठेही सिद्ध झाल नाहीय. रुचकर मांस म्हणून कासवहत्या होते. कासवाच्या पाठीपासून शोभेच्या वस्तू बनवतात व त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. कासवामुळे घरात सुबत्ता येते असाही गैरसमज आहे. फेंगशूईचे वेड वाढल्यावर फिशटँकमध्ये कासव ठेवले जाते. आजकाल २१ नखांचे कासव मिळविण्यासाठी अंधश्रध्द व विवेकहीन माणसांची फौज भ्रमात पळत सुटलीय. यासाठी लाखो रुपयांची उधळण सुरू आहे.*
लोकहो...जरा विचार करा. कासवामुळे घरात सुबत्ता येते हे खरं असेल तर सरकारला "गरीबी हटाव " कार्यक्रम जोरात सुरु करायला हरकत नाहीय. दारिद्रयरेषेखालील गरीब कुटुंबाना घरी एक कासव पाळायला दिले की पुरे. कासवाचे मांस खाऊन शक्ती येते हे खरं असेल तर भारतातील दर ७ मिनिटाला जे कुपोषीत बालक मरत आहे त्यांच्या कुपोषणावर अव्वल उपाय सापडला म्हणायचा. सांधेदुखी अथवा पोटदुखी थांबते हे कुठल्याही संशोधनाचा आधार नाही. २१ नखाचे कासव सापडून वैभव मिळो अथवा भरभराट होवो न् होवो पण ही अंधश्रध्दा बाळगणारी लोक विज्ञानयुगात रहायला लायक नाहीत एवढे खरं. थोडे शहाणपण कासवाकृडून घेऊन कासवाच्या कठीण वा टणक पाठीचा दाखला घेऊन आपण संकटातून वाचण्यासाठी आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायला हावा. तरच आपण " माणूस " म्हणायला लायक असू. पण लक्षात कोण घेतो ??
*!! अंधश्रध्दापायी जातो कासवाचा जीव....माणसा घेऊ नको कासवाचा जीव !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २४ )*
*घोरपड.....वास्तव समजून घेताना*
प्रत्येक प्राण्याचे काही एक वैशिष्ट्ये असते. ह्या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्याबद्दल म्हणून तर नेहमीच कुतुहल असते. तिच्या या वैशिष्ट्याचा उपयोग मानवी जीवनात कौण कशाप्रकारे करेल हे सांगता येत नसते. ते वैशिष्ट्ये खरं असला तरीही त्याच्यासोबत जोडलेल्या कथा या नेहमीच सत्य असतातच असे नाही. काळाचे धुके त्यावर आवरण चढवून असते. काही वेळा अपवाद म्हणून एखादी गोष्ट सिद्ध झाली असाली तरीही काही मानवी स्वभावानूसार सरसकट तशाच पध्दतीने घटना पाहिल्या जातात. अन् मग गोंधळ उडतो. प्रश्न उभे राहतात. काही प्रश्नांची उत्तर मिळतात तर काही अनुत्तरीत राहतात. माझ्या दृष्टीने अनुत्तरीत राहिलेला आपल्या लेखमालेशी संबंधित एका प्राण्यांच्या ऐतिहासिक घटनेविषयी मला तुमच्याशी संवाद करायचाय. ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची माझी इच्छा मात्र कायम आहे.
*घोरपड....पाल सरडा अशा प्राण्यांच्या जातकुळीत शोभणारा प्राणी. घोरपडीला सरड्याची थोरली बहीण असेही म्हटल जाते. कातळाला अथवा जमिनीला घट्ट चिकटून राहण्याचा गुण घोरपडीत असतो. घोरपड तिच्या नखांनी खडकसदृश कठीण भागात घट्ट धरून राहू शकते. एखाद्या बिळात अथवा कडेकपारीत लपलेली घोरपड तिचे अंग फुगवते तेव्हा तिला तेथून ओढून काढणे कठीण असते. यामुळेच तिला "चिकटा " असे म्हटल जाते. घोरपडीला उष्ण व ओलाव्याची हवा लागते त्यामुळे हा प्राणी उष्ण कटीबंधातील नदीनाल्यांच्या आसपास आढळतो. घोरपडीचे डोके धडाला एका मणक्याने वैशिष्ट्यपूर्ण जोडलेले असते. पाच फुट लांब असणाऱ्या घोरपडीचे वजन साधारणपणे शंभर किलो भरते. अशी ही घोरपड आपल्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळवून आहे....घोरपड आणि तानाजी मालूसरे हे एक समीकरण झालयं. नरवीर तानाजी मालूसरे यांनी सिंहगड अर्थात कोंढाणा किल्ला सर करताना घोरपडीच्या पाठीशी दोर बांधून आपले मावळे किल्ल्यावर चढवले व नंतर याच मावळ्यानी कोंढाणा सर करून ऐतिहासिक कार्य केले. या प्रसंगातील घोरपड "यशवंती" नावाने प्रसिद्ध आहे. काही इतिहासाचे अभ्यासक या घटृनेतील घोरपडीच्या सहभागाविषयी साशंक आहेत. त्याकाळी मराठा सरदार हे किल्यावर जायला "शिडी " लावत. हा प्रसंग मात्र त्याला अपवाद ठरतोय. घोरपडीची वैशिष्ट्ये डोक्यात घेऊनही तिच्या पाठीशी बांधलेल्या दोराला धरून मावळे गडावर गेले ही वस्तुस्थिती खरी की खोटी याविषयी मतमतांतरे आहेत. मी माझ्या इतिहास संशोधक मित्राशी यावर बोललो तर त्यांनीही घौरपड म्हणून एखादे अवजार असावे अशी शक्यता वर्तवली. आणि त्याचवैळी घोरपडीचा उपयोग करून विशाळगड सर केल्याची घटना सांगितली. घोरपडे या किताबाविषयी बोलले. अर्थात या विषयावर माझ्या संशोधक मित्राचै अंतिम मत नाहीय तेव्हा माझ्या सारख्या सामान्य वाचकाने यावर आपले मत मांडावे अस मला वाटत नाहीय. संशोधन सुरू असते व पुढे येणारी माहिती योग्य पुराव्यानिशी स्विकारावी हेच बरे. पण अशी ही घौरपड इतिहासात अमर होऊन राहिलीय एवढं मात्र खरं.*
घोरपड...औषधी गुणधर्मासाठीही प्रसिद्ध आहे. घोरपडीचे मांस खाऊन ते पचविण्यासाठी पळत राहणारी माणूस मी पाहिली आहेत. घोरपडीच्या चिकटा गुणधर्मामुळे तिचे रक्तमांस पचायला जड असते असा समज आहे. पण या गोष्टीत वास्तविक तथ्य नसावे असे मला प्रामाणिकपणे वाटते. कधीकाळी घोरपड खाण्याचा प्रसंग आलाच तर यावर निश्चितच विचार करेन. घोरपडीसारखेच चिकटा गुणधर्म तोवर माझ्याही मनात असेल एवढेच खरं.
*!! ऐतिहासिक तथ्ये योग्य पुराव्यानिशी समोर आल्या तर न् तरच स्विकाराव्यात !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग २५ )*
*वटवाघूळ.....मृत्यूचे दूत ??*
मानवी स्वभावाला नेमके काय म्हणावे हेच कळत नाही. आपल्या अंधश्रध्दा जोपासण्याने इतर पशूपक्ष्यांच्या जीवनाशी खेळताना त्याला काहीच कसे वाटता नाही कोण जाणे. बहुतेक प्राण्यांना शुभ व अशुभ या पध्दतीत पाहण्याची त्याला सवयच जडलीय. अशुभ म्हणून शिक्का मारताना हे योग्य कर्म नव्हे हे त्याला समजतच नसते. एखाद्या विषयी शास्त्रीय माहिती जाणून न घेता कोणत्याही पशू पक्षाला काही तरी विचित्र समज टिकवून ठेवायचा व वर्षानुवर्षे जोपासायचा हा मानवी गुणधर्म मला नेहमीच खटकतो. आज एका अशाच प्राण्याची अशुभ या कँटँगिरीतून सुटका करूया...
*वटवाघूळ....नुसतं नाव उच्चारले तरीही डोळ्यासमोर येते ते झाडावर उलटे लटकत असणारा काळाभोर प्राणी. कातडी काळी तुकतुकीत असते व रंग असातो काळा अथवा राखाडी. लहानसे पण धारदार नखांचा प्राणी. पंख मिटले की आकार २० सेमी होतो व तोच आकार पंख पसरताच होतो १२० सेमी. या पंखाच्या जोरावरच दूरावर उडण्याची क्षमता असणारा एकमेव सस्तन प्राणी म्हणजे वटवाघूळ. पंख असूनही याला पक्षी म्हटल जात नाही तर त्याला प्राणी अस्सच म्हणतात. याला थोडे कमी दिसते. काही जणांचा असा समज की वटवाघळे पूर्णपणे आंधळे असतात. पण हे सत्य नाही. आपल्याकडे पतंगाच्या सहाय्याने वटवाघूळ मारणारी पोरं आहेत. खाण्यासाठी व औषध म्हणून ते वापरतात. अशा या प्राण्याला आपल्याकडे "मृत्यूदूत " म्हटल जाते. भूत पिशाच्च व रोग यांचे प्रतिक मानले जाते. ड्रँक्युला असही म्हटल जाते. अत्यंत भयप्रद असे वातावरण निर्माण करण्यासाठी चित्रपटात कायमच वटवाघूळ वापरतात. यातूनच या प्राण्याविषयी अंधश्रध्द समाजमनात भीती दाटून राहते. समाज यांच्या पासून लांब राहतो वा वर्षानुवर्षे या अंधश्रध्दा बळकट होतात. याला मृत्यूचा दूत ठरवण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण कुणीही सांगावे. उगाचच शिक्के मारून अशा प्राण्याना बदनामी करण्यात काय हशील आहे ?? यापेक्षा यांचा शास्त्रीय अभ्यास करून मानवी जीवनात यांचा कसा ल कुठे उपयोग होईल याचे संशोधन गरजेचे आहे. प्रत्येक प्राण्यांची स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात. ती शास्त्रीय पध्दतीने जाणून घेतलीत तर बरेच प्रश्न सुटताता. वाटवाघळाविषयी असेच खोलात जाऊन संशोधन व्हायला हवे असे प्रामाणिकपणे वाटते.*
पाश्चात्त्य जगताचे भारतीय माणसाला नेहमीच आकर्षण वाटते. मग या पाश्चात्त्य देशांची वटवाघूळ विषयी जाणीव सुध्दा मनात रुजवा. चीनमध्ये वटवाघळाला दिर्घायुष्य व आनंदाचे प्रतिक समजतात. पोलंडमध्ये शुभ मानतात. इंग्लंडमध्ये वटवाघळाला इजा केली तर दंड ठोठावला जातो. अमेरिकेत टेक्सास प्रांतात पंधरा लाख वाटवाघळाचे अभयारण्य आहे....पाश्चात्त्य जगताचे हे वटवाघूळ प्रेम भारतीय समाजात रुजले तर त्याला कुणीच "मृत्यूदूत " ठरवून बदनामी करणार नाही एवढं नक्कीच.
*!! मृत्यूचे भयाला जोड देतात प्राण्यांच्या वैशिष्ट्याची....बदनामी प्राण्यांची व बौद्धिक मानहानी मानवाची !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग २६ )*
*वाघ....वाचवायला हवा*
वाघ....भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून समजला जातो. भारत हे वाघाचे माहेरघर म्हटल जाते. केवळ १०० वर्षापूर्वी आशिया खंडात १लाख वाघ अस्तित्वात होते अन् आज संपूर्ण जगात केवळ पाच - सहा हजार वाघ आहेत. सध्याही जवळजवळ निम्मे वाघ फक्त भारतातच आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने २०१६ ची आकडेवारी जाहीर केली त्यानुसार वर्षात ११७ वाघ मृत्यू पावलेत. २०१५ च्या तुलनेने ही संख्या २४% जास्त आहे. वाघावाघातील भांडणे , विजेच्या धक्कातंत्राने , पाण्यात बुडून , अपघाताने , विषबाधेने , नैसर्गिकरित्या व शिकारीमूळे हे वाघ मृत्यू पावलेत. वाघ या प्राण्याविषयी भीती व अज्ञान प्रचंड आहे. यातूनच वाघ मृत्यूपंथाला लागलाय.
*वाघ...म्हटल की आठवतो तो त्याचा जंगलातील दरारा. एका अर्थाने तो जंगलाचा कुटुंबप्रमुख म्हणूनच वावरत असतौ. वाघ मानवी वस्तीत घुसला की तो जणू काही माणसे मारण्यासाठीच आलाय अशा पध्दतीने व्यवहार केला जातो. नरमांस खाणारा वाघ अशीच त्याची सर्वत्र ओळख आहे. पण....पण यात किती सत्यता आहे ?? वाघ म्हणजे जणू माणसे खाणाराच प्राणी अशी गैरसमज प्रचलित आहे. वाघ नरभक्षक असतात हे मान्यय मला. पण किती टक्के प्रमाण आहे हे तपासायाला हवे. नरभक्षक असणाऱ्या वाघांचे एकूण वाघांच्या संख्येशी प्रमाण हजारास तीन - चार इतकेच आहे. वाघाकडून जेवढ्या संख्येने मनुष्य मनुष्य मृत्यू पावतो त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने सर्पदंशाने मृत्यू होतात. सुंदरबनमध्ये १८० वाघ आहेत. प्रत्येकी ७ चौ. किमी. एक असे हे प्रमाण. हा प्रदेश पाणथळ असल्याने हरीण - सांबर हे वाघाचे मुख्य भक्ष्य इथे कमी आहे. तरीही वर्षाला साधारणपणे ३० माणसे इथे मारली जातात. वाघांच्या एकूण अन्नापैकी हे प्रमाण ०. २८% इतकेच आहे. सांगण्याचा मथितार्थ इतकाच की ....माणूस म्हणजे वाघाच्या ताटातील रोजचे अन्न नव्हे. याउलट माणसाकडून मारले गेलेले वाघ तितकेच संख्येने असातात. किंबहुना जास्तच. वाघाला जगण्यासाठी लागते तरी काय ? घनदाट अरण्याचा निवांत निवारा , मुबलक पाणी , हरीण-- सांबरे--डुक्कर असे प्राणी हीच वाघाची प्रमुख आवश्यकता असते. माणूस हा वाघाचे मुख्य अन्न नाही. पण खरे वास्तव असे की, वाघाला नामशेष करण्यात मानवी हात फारच महत्त्वाचा आहे. जंगल व जंगलातील संपत्ती याच्या हव्यासाने माणूस जंगल संपवत चालालाय. त्यामुळं वाघाच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिलाय. यातून मग अपघाताने माणूस समोर दिसला की वाघ त्याची शिकार करतो. वाघाच्या भितीने जंगल थोडेफार शिल्लक आहे हे खरं वास्तव आहे. जंगल टिकले तरच निसर्गसाखळी टिकेल व पर्यायाने मनुष्य जगेल.*
वाघाचे कातडे , वाघनख्या व इतर अवयवाकरता वाघ मारला जातो. वाघ हा हिंस्त्र प्राणी असला तरीही निसर्गचक्रात मोलाची भुमिका बजावतो. ह्या निसर्गचक्रावरच मानवी जीवन अवलंबून आहे. वाघ अथवा इतर प्राण्यांच्या जीवनविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेणे म्हणून तर माणसाला आवश्यक ठरते. वाघाच्या शूरपणाची , धाडसाची , दराराची , ऐटीची आपण नेहमीच साक्ष देत असतो एकमेकांना. उद्या वाघच राहीला नाही तर....तर आपल्या पोराबाळांना शौर्य , पराक्रम , धाडस कुणाचे सांगणार ??? विचार व्हावा.
*!! वाघ वाचवा...निसर्ग वाचवा..माणूस वाचवा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २७ )*
*फुलपाखरू....असते कसे ?*
फुलपाखरू.....आवडत नाही असा माणूस शोधावा लागेल. अत्यंत सुंदर व मोहक अशा फुलपाखरांना फुलावर , झाडावर , इतरत्र बागडताना पाहिले की मन आनंदाने भरून जाते. त्याला पटकन पकडावे आणि कायमचे आपले करूध टाकावे हा मोह आवरणे फारच कठीण असते. फुलपाखराच्या प्रेमात पडणे हे खरंचा आनंददायी असते. फुलपाखरू दिसते कसे ? असे बालगीत आपण ऐकले असते. आज जरा फुलपाखरू असते कसे ? हे थोडक्यात जाणून घेऊया.
*फुलपाखरू....देशातील १५% फुलपाखरू आपल्या महाराष्ट्रात आहेत. "राज्य फुलपाखरू " जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. २२ जून २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य फुलपाखरू म्हणून " ब्लू माँरनाँन " या प्रजातीची निवड केली गेली. ब्लू माँरनाँन हे आकाराने सर्वात मोठे व काळ्या रंगाचे असते. भारतात महाराष्ट्र व दक्षिण भारत याठिकाणी हे आढळते. फुलपाखरांना या जगात आयुष्य फारच कमी मिळते. ३ अथवा ४ दिवस ते एक वर्षे असा या सुंदर जीवाचा जीवनक्रम असतो. जैवविविधता व परागीभवानात महत्त्वाचा वाटा उचलणारा हा जीव आजाकाल स्मगलींग पण केला जातो. एका फुलपाखराला पाच हजार पर्यंत रक्कम भेटते असे ऐकिवात आहे. फुलपाखराचा जीव तो किती ?....फुलपाखराविषयी एक गैरसमज आहे की फुलपाखरे केवळ मध खाऊन जगतात. हे खरे नाहीय. मधाबरोबरच पशूपक्ष्यांच्या विष्ठा , जीवनक्षार , मलमूत्र अशा गोष्टी हे त्याचे खाद्य असते. काही विशिष्ट फुलपाखरे विषारी असतात. विशेषतः रुईच्या झाडावर वाढणारे " प्लेन टायगर " हे विषारी असते. हे विषारी घटक त्यांना अन्नझाडापासून मिळतात. पण हे विषारी घटक फक्त त्याच्या भक्ष्यकरता उपयोग पडते. प्रत्येक फुलपाखराचे एक विशिष्ट अन्नझाड ठरलेले असते. त्या एकाच वर्गातील अन्नझाडे सोडून इतर वर्गातील अन्नझाडावर फुलपाखरू अंडी घालत नाही हे वैशिष्ट्य आहे. फुलपाखराची रंगीबेरंगी दुनिया ही विविध वैशिष्ट्याने अशी भरलेली आहे.*
मानवी जीवनचक्रात लहानमोठ्या पशूपक्ष्यांचे स्थान अत्यंत बहुमोल आहे. त्या जीवांना समजून घेणे व त्याचा जीवनक्रम ध्यानात ठेवून त्यांच्याशी विधायक व्यवहार करणे हे सृष्टी चक्रातील माणूस नावाचा प्राणी टिकण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. फुलपाखरू दिसते कसे हे जसे महत्त्वाचे तसेच फुलपाखरू असते कसे हे जाणून घेणेही जास्त महत्त्वाचे आहे. त्याचसाठी हा खटाटोप.
*!! फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया.....खोलात जाऊन समजून घेऊया !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात..... ( भाग २८ )*
*कावळ्याच्या रुपात आत्मा येतो ??*
कावळा....आठवतो तो मुख्यतः माणूस मेल्यानतर. हिंदू धर्मात एखादी व्यक्ती मरण पावली तर रक्षाविसार्जानदिवशी मृत व्यक्तीच्या मुलाने भाताचे गोळे अर्थात पिंड करून पत्रावळीनवर ठेवायचे असतात. जर मृत मनुष्याचा आत्मा अतृप्त असेल तर पिंडाभोवती घुटमळतो. हा आत्मा फक्त कावळ्याला दिसतो अथवा कावळ्याचे रुपात येतो अशी अंधश्रध्दा आहे. पिंडाला कावळा शिवला की आत्मा तृप्त आणि नाही शिवला तर मृत माणसाची एखादी इच्छा अजून बाकी असे समजले जाते. यासाठी कावळा हा पक्षी महत्त्वाचा साक्षीदार असतो. सत्य नेमके काय आहे ??
*कावळा...हा मूळातच धीट पक्षी आहे. गेवीन हंट या शास्त्रज्ञांच्या संशोधानाचा पेपर "नेचर " या प्रसिद्ध नियतकालिकात आला आहे. कावळ्याची संधीसाधूपणाची जाणीव उच्चप्रमाणात विकसित झाली आहे. तो सदैव जागरूक असतो. समस्या सोडविण्यासाठी त्याची क्षमता प्रचंड असते. चमकदार वस्तूबद्दल आकर्षण असते. शत्रूपासून संरक्षणासाठी संरक्षक साधने तयार करतो. लाकडाच्या बेचकीत लपलेले किडे - किटक बाहेर काढण्यासाठी आकड्यासारख्या वाकड्या डहाळीचा वापर करतात. झाडाचे पान विशिष्ट प्रकारे छाटून भक्ष्याच्या शरीरावरील अनावश्यक भाग काढून टाकणेसाठी सँडपेपरसारखा त्याचा उपयोग कावळा करतो. लहान पक्ष्यांच्या घरट्यावर पाळत ठेवून अंडी अथवा पिल्ले खाणे हा नेहमीच उद्योग. अत्यंत त्रासदायक पण बुध्दीमान असा हा पक्षी. कावळा व पिंड याचा संबंध पाहूया...कधीकधी क्षणात तर कधीकधी तासभर अशा फरकाने कावाळा पिंड शिवतो. खरेतर पिंडाला शिवणे अथवा दूर राहणे हे कावाळ्याला किती प्रमाणात भूक आहे यावर अवलंबून असते. कावळा सर्वभक्षी आहे. मांस विशेष आवडते. पिंडाजवळ मांस अथवा अंडे ( चमकदार वस्तू ) असेला तर पटकन त्याला कावाळा शिवतो. एक उदाहरण पाहूया....सर्व सुखात लीळलेली ९० वर्षाची म्हातारी मरते पण तिच्या पिंडाला कावाळा शिवत नाही आणि बाळंतपणात अपत्य झालेली तरुण स्त्री दगावतै तेव्हा तिच्या पिंडाला चटकन कावळा शिवतो. विचार करा. ज्या तरुण स्त्रीची स्वप्न पूर्ण फुललीही नाहीत तिचा आत्मा ( आत्मा ...माझा विश्वास नाही ) सुखासुखी तृप्त होईल ?? आयुष्यभर शाकाहारी राहिलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कावाळा नेमका मांस उचलतो तेव्हा कोणते तर्कशास्त्र लावणार बरं ?? तेच तेच कावळे एका पिंडावरून दुसऱ्या तिसऱ्या पिंडावर चोच मारत फिरतात तेव्हा त्या सारे मृतात्म्याची गट्टी जमली असे समजायच का ?? मेलेली व्यक्ती स्त्री असेल तर " कावळी" यायला हवी ना पिंड शिवायला. की हा लिंगभेद मान्यय ?? जरा विचार करा.*
कावळ्याच्या रुपात आत्मा येतो ही आदिम संकल्पना आहे. आधुनिक मानवाने यावर विश्वास ठेवावा म्हणजे संत तुकारामांच्या भाषेत मुर्खपणा आहे. संत तुकाराम म्हणतात " भुकेपणी अन्न अन्न , मेल्यावरी पिंडदान ...". हे कशासाठी असा रोकडा सवाल तुकोबारायांचा आहे. यात पुन्हा विषमता अशी की , ब्राम्हण समाजात पिंड शिवण्यासाठी कावळा नसातो तर गाईसारखी " पुण्यवान माता " असते. ब्राम्हण समाज हिंदू धर्मातर्गत मोडतो तर ही विषमता कशासाठी ?? असो. पिंडाला कावळा शिवणे व कावाळ्याचे रुपात मृतात्मा येतो असे समजणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे एवढं निश्चितच.
*!! कावळ्याच्या रुपाने अंधश्रध्देची कावं कावं....बंदच व्हायला हवी !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग २९ )*
*मुंगी आणि तिचे वारूळं...*
मुंगी....एक छोटासा किटक. आपल्या अवतीभवती सहज दिसणाऱ्या. एक इवालासा जीव. पण यांच्या हालचाली व जगण्याची चिकाटी पाहिली की थक्क व्हायला होते.जमिनीवर पडलेला अन्नाचा एखादा तुकडा ज्या कौशल्याने मुंग्या नेत असतात यात त्यांच्या संघटनात्मक जीवन पध्दतीचा परिचय होतो. मुंगी व हत्ती याविषयी कथा आपण ऐकलेल्या असतात. साहित्यातही..मुंगी उडली आकाशी अथवा एका मुंगीचे महाभारत आपण वाचलेले असते. अशी ही मुंगी व तिचे जीवन थोडक्यात नजरेखाली घालूया.
*साधारणपणे लाल व काळ्या रंगाच्या मुंग्या असतात. मुंग्या अंगावर चढल्या की त्या चावा घेतात हे आपण पाहातो. मानवी अथवा अन्य शत्रूपासून स्वतःच्या रक्षणासाठी हा चावा ती घेत असते. बरेचदा फाँरमिक अँसिड उडवतै. हे अँसिड माणसाकरता हानिकारक नाही त्यामुळं त्याचा प्रभाव आपणांस जाणवत नाही. मुंगीचे निवासस्थान असते वारूळ....वारूळ म्हटल की आपल्याकडे लगेच नागोबा अथवा साप आठवतात. वारूळात नागराज राहतो अशी अफवा आहे. म्हणून तर नागपंचमीला वारूळावर दूध अथवा लाह्या टाकून सुवासिनी वारूळ पूजतात. पण वारूळ हे नाग अथवा सापाचे निवासस्थान नसून मुंग्याचे निवासस्थान आहे. वाळवीच्या सहाय्याने मुंग्या त्याचे घरटे अर्थात वारूळ बनवतात. जमिनीवर बिळे अथवा भोके पाडून अत्यंत गुंतागुंतीची मालिका करून वारूळ रचले जाते. वारूळाच्या आतील भागात कोठ्या व रस्त्याच्या जाळ्या असतात. उच्च प्रजातीच्या वाळवीच्या वारूळाचा जमिनीवर मातीचा फार मोठा ढिगारा असतो. काही वारूळ ६ मीटर एवढया अवाढव्य उंचीचे आहेत. मातीचे कण , चिखल , लाळ , विष्ठा यांचा वापर करून हे वारूळ बनते. हे सर्व एकत्र आले की सिमेंट सारखे कठीण बनते. या वारूळाचा व नागसापाचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो. एखाद्या वेळेस गरूड अथवा इतर शत्रू पासून वाचण्यासाठी ऐनवेळी या वारूळात साप अथवा नाग शिरतो . लोक या घटनेलाच अंतिम समजतात व वारूळात नाग असतो ही अफवा फैलावते. तेव्हा ध्यानात असूदे की वारूळ हे मुंग्याचे निवासस्थान आहे. आयत्या घरी नागोबा अशा म्हणी प्रचलित असतातच. म्हणून हे वास्तव समजून घ्यावे.*
मुंग्याचे हे छोटे विश्व खरोखरीच अजब असते. कुठून , कधी मुंग्या उगवतील याचा नेम नसातो. आपल्या नजरेतील या छोटया जीवाला समजून घेणे हे देखील निसर्गचक्रासाठी महत्त्वाचे आहे. म्हणून तर हा सारा प्रपंच.
*!! मुंगीच्या घरात नागोबा शिरतो....लोकांच्या नजरेत तोच मालक म्हणून भरतो.....पण वास्तव असते निराळेच. !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात..... ( भाग ३० )*
*मधमाशीचा डंख....टाळावा कसा ??*
मधमाश्या ....ह्या किटकासंबधी थोडी माहिती असण गरजेचय. कारण मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असा हा जीव आहे. आपले १/३ अन्न हे मधामाश्यावर थेट अवलंबून असते. जगातील १,३०००० झाडाच्या फलोत्पादनासाठी मधमाश्या असणे अनिवार्य असते. मधमाश्या पाळून त्यापासून मध बनवून त्याची विक्री करणे हा किफायतशीर व्यापार आहे. शेतकरी वर्गाला जोडधंदा अथवा बेकार तरूणाईला व्यवसाय मधमाश्या पालनातून मिळू शकृतो.
*मधमाश्या ..ह्या मध गोळा करतात हे सर्वांना माहिती आहेच. पण माशी या प्रजातीतील सर्व माश्या काही मध गोळा करत नसतात. " एपिस " या प्रजातीतील माश्या मध गोळा करतात .या प्रजातीलाच शास्त्रीय भाषेत मधमाश्या असे म्हटल जाते. मधमाश्या बारमाही समुहाने मेणचे पोळे बनवून मध साठवतात. हा मध अत्यंत उपयुक्त व महागडाही असतो. हा मध काढताना अथवा मधाच्या पोळ्याजवळून जाताना मधमाश्या हल्ला करतात व डंख मारतात. हा डंख टाळण्यासाठी काही गोष्टी जाणून घेऊया....हल्ला टाळण्यासाठी हलक्या रंगाचे कपडे वापरावेत , जास्त सुगंधी अत्तर परफ्युम लावू नये , घामाच्या वासाने मधमाश्या चिडतात हे ध्यानात ठेवा , फुलझाडापासून लांब रहा , मधमाश्या धूराचा व्देष करतात तेव्हा धूर सहसा करू नका , अस्वच्छ ठिकाणी मधमाश्या घोंघावताता तेव्हा परिसर स्वच्छ ठेवा....एवढं सारे करून चुकून मधमाश्या हल्ला करण्यासाठी आल्याच तर पुढील गोष्टी कराव्यात. दंशापासून वाचण्यासाठी मधामाश्या घोंगावत असल्यास चेहरा झाका , जमिनीवर उताणे झोपा , प्रतिक्रिया देऊ नका , हाकलण्याचा प्रयत्न केल्यास सगळ्या मधमाश्या एकत्र हल्ला करतात हे ध्यानात ठेवा , एकाचवेळी अनेक मधमाश्या हल्ला करत असतील तर शक्य असेल तर पाण्यात उडी मारा. ...मधमाश्याचा डंख अशा उपाययोजना योजून टाळणे शक्य आहे.*
मानवी जीवनात अत्यंत बहुमोल कार्य करणाऱ्या या छोट्या जिवाला उगाचच न डिवचता त्याला हावे तसे जगू द्या. कधीकधी चेष्टा म्हणून पोळे उठवलै जाते हे कृत्य करू नका. मधमाश्याचा डंख अत्यंत वेदनादायी असतो. दिर्घकाळ न विसरता येणारा तो अनुभव असतो. जगा अन् जगू द्या याच वृत्तीने मानवी जीवन सुखी होऊ शकते हेच खरं.
*!! मधमाश्या ....जीव असतात छोटे पण ..मानवी जीवनात त्यांचे स्थान आहे मोठे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग ३१ )*
*माकड आणि वानर....फरक कोणता ??*
माकड...या प्राण्याला मानवाचा पूर्वज असे आपण मानतो. माकडापासून उत्क्रांत होत होत आजचा आधुनिक मानव जन्माला आला असे चार्ल्स डार्विन या महान शास्त्रज्ञांने जगाला दाखवून दिले. अशा या माकड नावाच्या प्राण्याविषयी बरेच लोकांना अत्यंत जुजबी माहिती असते. तेव्हा आपल्या या लेखमालेत माकडावीषयी जाणून घेऊया...
*माकड आणि वानर....यातील फरक अगदी सहज ओळखता येतो. माकड म्हणजे लाल तोंडाचे व वानर म्हणजे काळ्या तोंडाचे इतकाच काय तो फरक असतो. भारतात माकडाच्या ६ जाती आहेत. पान , फुल , फळ असा आहार करणारा हा शाकाहारी प्राणी आहे. शहरात व खेड्यात देऊळ अथवा पाण्याच्या टाकीजवळ सर्रास आढळतात. विशेष म्हणजे जंगलातही माकडाची हद्द ठरलेली असते. नैसर्गिकच थंडीपासून बचाव करण्यासाठी दाट केस असतात. आणि कधीतरी गरज पडलीच तर पाण्यात उत्कृष्ट पोहण्याची कलाही अंगात असते. जंगलात वाघ अथवा बिबट्या दिसला तर विशिष्ट आवाज काढून इतर प्राण्याना सावध करत आपण झाडांच्या शेंड्यावर जाऊन बसण्याची करामत माकड करत असते. वाघ ज्याप्रकारे माकडाची शिकार करतात त्याला "सायकाँलाजीकल किलींग " म्हणतात. वानर हे शेतीचे फारच नुकसान करत असातात. याला उपद्रवी प्राणी म्हटल जाते या कारणाकरता. यावर उपाय म्हणजे माकडाची एक जोडी पाळणे. माकड एकटे मात्र पाळू नये. कारण माकड एकटे पाळले तर वानरीण त्याला नादी लावून पळवून नेते.( हा गुण माणसात माकडापासून आला की माणसाकडून माकडाकडे गेला असेल बरं ..) माकडाच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते ती मात्र मला अजिबात पटली नाहीय , तुम्हीही विचार करावा. गोष्ट अशी की...जसा माणूस थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून ऊब मिळवतो हे आपण पाहतो. माकड मात्र म्हणे डोळ्यातून लाकडातील आग शोषून घेतात. ही आग शोषल्यावर ते लाकूड कितीही जाळायचा प्रयत्न केला तरी जळत नाही. यात तथ्य अजिबात नसावे. जंगलात जेव्हा "वणवा" पेटतो तेव्हा ती आग आपल्या डोळ्यांत शोषून माकडे जंगलसंपत्ती जपतील का ?? विचार व्हावा.*
आणखी एक गंमतीदार नोंद ....टोपीवाला व माकडे ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोय. या गोष्टीत शेवटी टोपीवाला आयडिया करतो की स्वतः जवळील टोपी जमिनीवर टाकतो त्यासरशी सारी माकडे तीच कृती करतात. सगळ्या टोप्या गोळा करून टोपीवाला निघून जातै. ही बालकथा मनोरंजक खरी. पण हा प्रयोग कधीतरी कुणी प्रत्यक्षात करून पाहिलाय का ? समजा...आपण माकडाला खायला म्हणून एखादं कणिसाचा तुकडा दिला आणि जाणीवपूर्वक परीक्षा घ्यायची म्हणून आपल्या हातातील तुकडा लांब भिरकावला तर...तर माकडं आपल्या सारखीच कृती करेल ?? प्रयोग करून तर पहा अन् मला उत्तर जरूर कळवा.
*!! मानवाचे पूर्वज आहेत बघा माकडं....अशास्त्रीय गोष्टीचे फेकून द्या जोखडं !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग ३२ )*
*गरूड....मानसन्मानाचा पक्षी*
गरूड ....पक्षीराज म्हणून आपण ओळखतो. भेदक व तीक्ष्ण नजर , टोकदार चोच , पायाला लांब नखे , मजबूत पंजा , पांढरे डोळे व रंग काळा व हलका पिवळा. लांबी साधारणपणे ६०-९०सेमी. पूर्णतया मांसाहारी पक्षी. ससे , उंदीर , लहान पक्षी , हरणाची नवजात पिल्ल , लहान लांडगे , कुत्री , मांजरे , गिरगिट व साप ही भक्ष्य. साधारणपणे २५ ते ५० वर्ष आयुष्य. गरूड कडेकपारीत आपले घरटे बांधतो. जोडी आयुष्यभर एकत्र राहते. मादी नरापेक्षा फारच आक्रमक. भारतात तुरळक अशा गरूड जाती आढळतात. गरुडाविषयी भारतीय पुराणे , शिल्प व नाणी यामध्ये जितकी माहिती मिळते तितकी प्रत्यक्षात त्याच्या जीवनाविषयी अथवा प्रजनन किंवा स्वभावधर्मबद्दल क्वचितच माहिती मिळते. संशोधकाचा हा दुर्लक्षितपणा लौकर संपावा व शास्त्रीय माहितीचा अजून जास्त स्त्रोत उपलब्ध व्हायाला हवा असे मला प्रामाणिकपणे वाटते.
*गरूड ....या पक्षाला भारतीय व पाश्चात्त्य जीवनात अनेक मानसन्मान वाट्याला आले आहेत. अमेरिकेचा राष्ट्रीय व भारताचा धार्मिक पक्षी म्हणून गरूड विख्यात आहे.ताकदीचे प्रतीक म्हणून रोमन सम्राट राजचिन्ह म्हणून सन्मान देत तर रेड इंडियन सरदार हे शौर्य व श्रेष्ठत्वाचा प्रतिक म्हणून त्याच्या पिसाचा टोप वापरीत. राजे लोक शिकारीसाठी याचा वापर करत. भारतीय समाजात गरूड हा एकमेव पक्षी असा आहे की ज्याच्या नावाने पुराणं लिहिल गेलय. " गरूडपुराण ". २७९ अध्याय व १८००० श्लोक असणारे हे गरूडपुराण आहे. भारतीय अंधश्रध्द मानसिकतेप्रमाणे यातही काही गोष्टी अशास्त्रीय आहेत. उदा. कुणाच्या घरी जेवू नये ? अशा १० लोकांची यादी यात दिली आहे. किंवा कोणत्या ६ घटकांची पूजा केल्यास इच्छित फळप्राप्ती होते त्याच्याविषयी माहिती आहे. आजच्या आधुनिक युगात कालबाह्य झालेल्या या गोष्टी फक्त मनोरंजक म्हणून सोडून द्यावी अशाच. हा पक्षी देखील एका गैरसमजाची शिकार ठरतोय. सोनेरी गरूड या पक्षाची संख्या अमेरिकेत साधारणपणे दहाहजार असावी. हा सोनेरी गरूड लहानलहान मेंढ्या मारून खातो या गैरसमजातून मेंढपाळ लोक याची मोठया प्रमाणावर हत्या करतात. तसेच त्यांच्या घरट्याचीही नासधूस करतात. हे थांबायला हवे.*
भारतात विष्णू या देवतेचे वाहन म्हणून गरूड प्रसिद्ध आहे. गरूडाची प्रतिमा विष्णू मंदिरात हमखास असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय वायुदलाचे मानचिन्ह म्हणून गरूड प्रसिद्ध आहे. इतकी धार्मिक , साहित्यीक प्रतिष्ठा या गरुडाच्या वाट्याला येऊनही यावर अधिक खोलात जाऊन शास्त्रीय संशोधन का होत नाही ?? हा प्रश्न मला सतावतोय. श्रध्देची जाग कायम ठेवून त्याला अभ्यासाची जोड दिली तर पक्षीराज गरुडासंबंधी अधिक वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळू शकते. पण लक्षात कोण घेतो ?
*!! मानसन्मान लाभलेला पक्षी...शास्त्रीय अभ्यासाचा विषय व्हावा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग ३३ )*
*गाय....इतकी पवित्र कशी ??*
गाय...३३ कोटी देवदेवता जिच्या पोटात निवास करतात अशी श्रध्दा ( ? ) असणाऱ्या हिंदू समाजात अत्यंत पवित्र म्हटला गेलेला पशू म्हणजे गाय. "गोमाता " असे म्हटल जाऊन गाईला साक्षात आईची उपमा दिली गेली. धार्मिक कार्यात देवाला वाहिलेला नैवेद्य गाईच्या मुखात घातला जातो , हेतू हा की हा नैवेद्य देव खातो अशी श्रध्दा आहे. महाराष्ट्र सरकारनेही सत्तेवर येताच गोवंश हत्याबंदी कायदा करून आपले गो - प्रेम सिद्ध केल. गाईला इतके पवित्र का मानले जाते ??
*भारतीय संस्कृतीचा विचार करायचा तर ख्रिस्तपूर्व ३००० वर्षापासून अस्तित्वात असणाऱ्या भारतीय समाजात गाय हा पशू इतका पवित्र समजला जात नव्हता. मोहेंजोदडो - हडप्पा संस्कृतीत चित्रात अथवा प्रतिकृतीत गाय थेटपणे येत नाही. प्राचीन काळातील नाण्यावर गाईचे चित्र नाही. याउलट आज पवित्र वाटणारी गाय धार्मिक कार्याप्रसंगी सर्रास कापली जायची. "गौमेध यज्ञ यामध्ये गाई मारण्याचा उल्लेख आहे. आपल्या शेजारच्या नेपाळ या एकेकाळी हिंदूराष्ट्र म्हणवलेल्या देशात कालीमातेला गायीचाच नैवेद्य दिला जायचा. "वेदकाळात एक गाय पाच ब्राम्हण खात " अशा आशयाचे विधान विवेकानंद यांचे आहे. याचा अर्थ वैदीक काळापासून अगदी अलिकडे १० व्या शतकापर्यत गोमांस हे धार्मिक प्रसंगी खाल्ले जायचे हे वास्तव आहे. आजही कणकीची गाय अथवा पिठाची गाय करून प्रतिकात्मकरित्या गोवध होत असतो. महाभारत काळानंतर गायीचे महत्त्व बरेच वाढले . पण त्याचे कारण धार्मिक कमी व उपयुक्तपणा जास्त असे होते. बुध्दकाळात गाय जपली गेली व सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्यत गोहत्याबंदी केल्याचे उल्लेख आहेत. पुढे मुस्लिम आक्रमकाच्या काळात गाय मारली जाऊ लागली व याचाच फायदा कर्मठ हिंदूनी घेऊन गाय "पवित्र " ठरवली गेली. धर्मांध मुस्लिम गाय मारून हिंदूला डिवचतो व धर्मांध हिंदू या गोष्टीचा वापर मुस्लिमविरैधी प्रचाराकरता करतात हे आजचे चित्र आहे. पण ....पण गाय फक्त मुसलमानच खातात का ? वास्तविक मोठ मांस हे देशातील गोरगरीब लोकाचे अन्न आहे. मांसाहारी जेवणात जवळजवळ ४०%मांस गोवंशातील असते. ९%मुस्लीम , २%ख्रिश्चन , तर जवळजवळ २८% हिंदू समाजाअतर्गत मोडणारे दलित - आदिवासी भटके व इतर मागास समाज खात असतात. चांभार , ढोर , होलार , कसाई या लोकाचा व्यवसायच गोवंश संबंधित आहे. पवित्र ठरवली गेलेली गाय वास्तविक आर्थिक दृष्ट्या जास्त संबंधित व उपयुक्त पशू आहे हे वास्तव समजून घ्यावे.*
गाय पवित्र ठरवायची तर.....काही प्रश्न उभे राहतात. ३३ कोटी देवदेवताचे निवासस्थान असणारी गाय भाकड का बनते ?.. पूर्वी उच्चवर्ग व आज बहुतांशी मागासवार्ग यांना गोहत्या करावी लागली अथवा लागते हे वास्तव नाकारणार काय ??... गाय माता असेल तर बैल कोण ??.. ज्या विशिष्ट लोकांना गाय पवित्र वाटते ती लोक गायीच्या संवर्धानासाठी काय प्रयत्न करतत ??..भाकड जनावराला रोज १० किलो चारा व ४५ लिटर पाणी लागते. चाराटंचाई व पाणीटंचाई काळात भाकड जनावरे पोसणे शेतकऱ्यांना शक्य आहे काय ?? गाईला आई बनवणारे लोक आपल्या घरी भाकड गाई नेऊन तिला आयुष्यभर जपतील काय ?? विचार व्हावा. दुभत्या गायींचे संवर्धन जरूर करावे तथापि भाकड जानावराबाबतीत धार्मिक श्रध्दा बाजूला ठेवून वस्तुस्थिती स्विकारून निर्णय घ्यावा हीच अपेक्षा. ( गायीचे औषधी उपयोग सांगणाऱ्या लोकांनी ...गोसंवर्धन जरूर करावे ) गाय हा इतर पशूसारखा एक उपयुक्त प्राणी आहे हे खरे ...पण धार्मिक दृष्ट्या पवित्र अथवा अपवित्र अशा अंधश्रध्देत राहू नये एवढेच सांगणे.
*!! गाईंची उपयुक्तता मान्यय ....गाईंचे पवित्रपण पटत नाही !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....( भाग ३४ )*
*चिमणी.....जपायला हवी*
मानवी जीवनात सर्वात प्रथम ज्या पक्ष्यांची ओळख होते त्यात चिमणीला बहुधा अग्रक्रम असावा. चिऊच्या गोष्टी ऐकत आपण मोठे झालो. चिव चिव या ध्वनीने आपली पहाट सुंदर बनवली. आपल्या लहानग्यांनाही ज्या पक्ष्यांची कधीही भीती वाटली नाही त्यात चिमणी प्रथम असावी. चिऊताई...आहेच तशी. पण आजकाल हा पक्षी कमी कमी होत चाललाय याची चिंता आपणांस आहे. चिमणी विषयी थोडक्यात माहिती व तिला वाचवण्यासाठी काही उपायांची चर्चा असे या लेखाचे स्वरूप आहे.
*चिमणी....भारतातील सर्वाधिक संख्येचा पक्षी. किटक , धान्य , मध , शिजवलेले अन्न हे चिमणीचे खाद्य. चिमणीचे घरटे हे गवत , कापूस , पिसे अशा मिळतील त्या वस्तू वापरून बनलेले असते. घराचे छतावर , झाडावर , वळचणीच्या जागेवर कुठेही ते दृष्टीस पडते. ६ महिने ते ३ वर्षे इतके सरासरीचे आयुष्य असते. चिमणीबाबत एक गैरसमज आढळतो तो असा की , एखाद्या चिमणीला माणसाने पकडले व परत सोडले तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्या गटात घेत नाहीत. चोचीने मारतात किंवा बहिष्कृत करतात. मला तरी हे खरं वाटत नाही. चिमणीचे एक वैशिष्ट्य असे की , तिच्या जिभेला इवलेसे हाड असते. म्हणून चोचीने बिया व धान्य खाताना कठीण चोच व ताठर जिभेच्या सहाय्याने चिमणीकुलीन पक्षी टरफले सोलून थुंकुन टाकतात व आतील गर खातात. चिमण्याना किडलेले धान्य चालते. घराच्या आवारात शेवगा व कडीपत्ता लावलेस चिमणी तिथे वावरू शकते. पाण्यासाठी पसरट भांडे ठेवल्यास तिची तहान भागू शकते. आजकाल शहरात मोबाईल टाँवर , अन्नाची अनुपलब्धता व वाढते प्रदूषण यामुळे चिमण्याच्या संख्येवर मर्यादा आलीय. आणखी महत्त्वाचे कारण जे आपण थोड्या प्रयत्नाने टाळू शकलो तर चिमणी वाचू शकते. आपल्या घरी भांडी घासण्यासाठी तारेचा चोथा वापरतात. भांडी घासताना चोथ्यात अन्नपदार्थ अडकतात. हा चोथा शक्यतो बाहेर नळाजवळ ठेवला जातो. होत काय की , या चोथ्यातील अडकलेले अन्नपदार्थ खायला चिमण्या येतात आणि चोथ्याच्या तारा त्यांच्या पोटात जातात. जिवाला धोका होतो. या तारेच्या चोथ्याऐवजी जर आपण नारळाच्या शेंडीचा उपयोग भांडी घासायला केला तर चिमणी जीवास मुकणार नाही. दुसरे असे की , वर्षभर धान्य ठेवण्यासाठी त्यात आपण बोरीकृ अँसिड पावडर टाकतो. ही पावडर चिमणीसाठी घातक आहे. या केमिकल ऐवजी दुसऱ्या गोष्टी वापरात आणल्या तरीही मोठे काम होऊ शकेल . विचार व्हावा.*
चिमणीचा जीव भलेही छोटा असेल पण तिची चिवचिवाट फार मोठा आनंद देणारी असते. ती चिवाचिवाट अखंड टिकावी व जसा आनंद आपल्या आयुष्यात आपण घेतला तसाच आपल्या पुढील पिढीपर्यत पोचला तर ते अधिक आनंददायी असेल. याचसाठी चिमणी वाचवायाला हवी एवढं नक्की.
*!! २० मार्च....जागतिक चिमणी वाचवा दिवस ...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात.... ( भाग ३५ )*
*साप....अंधश्रध्दाचे कोठार*
साप....नुसता शब्द उच्चारला तरी अंगावर काटा उमटून मनात भीती दाटून येते. सर्व प्राण्यात साप या प्राण्याविषयी जितक्या अंधश्रध्दा आढळतात तितक्या इतर कुणाही प्राण्याविषयी नाहीत. एकीकडे "नाग" नावाचे साप देवदेवतांच्या जवळ असल्याने पूजनीय ठरतात तर दुसरीकडे इतर साप मात्र दिसला ते दिसला की माणसाच्या हातून मारला जातो. वर्षातून एकदा नागपंचमी करायची अन् वर्षभर सर्पहत्या करायची अशी विसंगती दिसून येते. सापाविषयी अज्ञान व अंधश्रध्दा यामुळे ही परिस्थिती ओढवलीय. साप जगावा आणि सर्पदंशाने माणूसही मरू नये अशी परिस्थिती प्रयत्नपूर्वक शक्य आहे. त्याची पहिली पायरी म्हणून सापाविषयी अंधश्रध्दा कोणत्या ते पाहूया....
*साप दूध पितो , सापाला सुगंध आवडतो , मंत्राने सर्पविष उतरते , साप डूख धरतो , नागाच्या डोक्यावर नागमणी असतो , देवाचा नाग असतो त्याच्या अंगावर दाट केस असतात , साप धनसंपत्तीचे रक्षण करतो , साप हजारो वर्षे जगतो , सापाचे दोन तुकडे केल्यास त्याचे मुंडके मारणारा माणूस शोधून काढते , पट्टेदार साप चावल्यास शरीरावर चट्टेपट्टे उमटतात , राँकेल ओतल्यावर मृत साप जिवंत होतो , साप गाडीखाली सापडलेस त्याचे भूत बनते , डुरक्या घोणस चावला की कुष्ठरोग होतो , भक्ष्याच्या शरीरात विष सोडण्यासाठी साप उलटा होतो , पुजा केल्यावर साप प्रसन्न होतो , धामण व म्हैस यांची नजरानजर होऊन म्हैस मरते अशा कितीतरी अंधश्रध्दा जनमाणसात आहेत. या अंधश्रध्दापायी साप मारला जातो. वास्तविक पर्यावरणीय दृष्ट्या साप अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. मानवजातीला लागणाऱ्या अन्नधान्याचा संरक्षक आहे. हे ध्यानात घेतले तर साप व मानव यांचे जीवन सुरक्षित राहू शकते.*
सर्व साप विषारी नसतात. नाग , मण्यार , फुरसे व घोणस या मुख्य जाती विषारी व इतर सर्व बिनविषारी असतात. सापाचे मुख्य अन्न उंदीर . देशातील ३०%धान्य उंदीर फस्त करतात. उंदराची एक जोडी वर्षाला ८५० पिल्ले पैदा करतात. अशावेळी उंदीर खाऊन साप त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो. त्याचप्रमाणे पाणसाप अथवा झाडावरचे काही साप पिकावरील छोटे किटक खातात त्यामुळे पिकाचे संरक्षण होते. हिरव्या पाठीच्या पाणसर्पाची पिल्ले डासांच्या अळ्या व अंडी खातात त्यामुळं डासांना प्रतिबंध होतो. फेफरे , दमा , उसण , माकडहाडचे दुखणे , निद्रानाश यावर उपलब्ध औषधासाठी सर्पविष उपयुक्त असते. साप चावलेवर "प्रतिसर्प विष इंजेक्शन " देतात. अशा सर्व कारणाने सापाचे संरक्षण हे निसर्गाचे व पर्यायाने मानवाचे संरक्षण ठरेल. म्हणून सापाविषयी शास्त्रीय माहिती जाणून त्याच्याशी योग्य व्यवहार करायला हवा.
*!! सर्पदंशाने माणूस मरू नये व माणसाच्या हातून साप मारला जाऊ नये....हे योग्य !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
===============================================================================
===============================================================================
*पशूपक्ष्यांच्या विश्वात....लेखसमाप्ती*
साथींनो....गेले सलग ३५ दिवस आपण पशूपक्ष्यांच्या विश्वात रमून गेलो. काही माहिती नसलेल्या गोष्टी समोर आल्या. काही जुन्या गोष्टीची उजळणी होऊन त्यात विधायक भरही पडली. खरेतर अजूनही कितीतरी ही लेखमाला वाढवता आली असती पण....पण योग्य वेळी थांबता आल पाहिजे हे माझे पूर्वीपासूनचे मत आहे. पुन्हा कधीतरी या विषयाला नव्याने हात घालता येईल. तूर्त मात्र थांबणेच इष्ट.
*मित्रहो , मराठा मोर्चा ( ३० भाग )...बहुजनांनो जिभेला वळण लावा ( ३१ भाग )...विच्छा माझी पुरी करा (३२ भाग ) ....विवेकाचे बंधन ( ३३ भाग ) आणि आता ....पशूपक्ष्यांच्या विश्वात (३५ भाग ) लिहून झाले. या लेखमालेवेळी अनेक ठिकाणाहून फोन आले , नवे साथी मिळाले , स्नेही मिळाले. माझा गोतावळा पुनश्च वाढला याचा आनंद आहे मला. लेखमालेत काही बाबतीत राहिलेल्या त्रुटी व उणीवा माझ्या पर्यत पोचत्या केल्या त्यामुळे माझ्याही ज्ञानात भरच पडली. मी काही पशू अथवा पक्षी तज्ञ नाहीय. वाचन हा माझा आवडिचा प्रांत. वेगवेगळ्या विषयावर वाचता वाचता ही लेखमाला सुचली अन् ती तुमच्या पर्यत पोचली इतकेच. या विषयावर साधारणपणे दैनिक मुक्तनायक मध्ये साधारणपणे १८ पशूपक्ष्यांच्या विषयी लिहिले होते. आज तीच लेखमाला ३५ भागापर्यत पोचली याचा आनंद आहे. तुमच्या सर्वाचे प्रेम व सहकार्य यामुळेच हे शक्य झाल.*
आता एखाद्या नवीन विषयावर पुनश्च तुमच्या भेटीला येण्याची ओढ लागलीय. पशूपक्ष्यांच्या विश्वात ही लेखमाला पक्षीतज्ञ डाँ. सलीम अली यांना समर्पित करतोय. यापुढे लौकरच एका नव्या ( कदाचित् ) विषयावर तुमच्याशी संवाद साधायला नक्कीच आवडेल. तोवर अलविदा !!
*!! अज्ञान व अंधश्रध्दा यांना ओहोटी लागो....ज्ञान व विज्ञान यांची संवादमार्गी भरती येवो ..हीच सदिच्छा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
चिभणी जपायलाहवी!!!
ReplyDelete