Flash

Wednesday, 19 April 2017

दुर्लक्षित बाबासाहेब...

कुटुंब म्हणजे आपल्या प्रजेचे संरक्षण व संगोपन करण्यास समाजाने स्थापन केलेली एक संस्था आहे. ही संस्था चालविणारी दांपत्ये जितकी जास्त शुध्द, सात्विक, अभिमानी असतील तितकीच त्यापासून निपजणारी संतती जास्त शुध्द, सात्विक, अभिमानी असू शकेल. एका बाईने पुष्कळ नवरे करावेत किंवा एका पुरूषाने पुष्कळ बायका कराव्यात ही कौटुंबिक पध्दत फार अप्रशस्त आहे.
*विचार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*दि. १० व ११ एप्रिल १९२५ निपाणी, बहिष्कृत परिषद- अधिवेशन तिसरे, अध्यक्षीय भाषण*

*संदर्भ:-बाबासाहेबांचे समग्र भाषणे खंड १, पृ. ४२.*



डॉ.आंबेडकर हे चांगला तबला देखील वाजवत असत, एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ.आंबेडकर यांनी खूप छान तबला वाजवला, त्यावेळी लोकांनी तोंडात बोटे घातली.
डॉ.भीमराव आंबेडकर .....लेखक - चांगदेव खैरमोडे , खंड 2


!!! एक उत्कृष्ट फलंदाज बाबासाहेब आंबेडकर!!!
काल बारामती येथे सचिन तेंडुलकर अजिंक्य रहाणे यांच्या उपस्थितिमध्ये शरदचंद्र पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम चे उद्घाटन बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती वर्ष औचित्य बघुन केल .यावरून मला अस वाटल की शरद पवार ने बाबासाहेब आणि क्रिकेट यांचा संबंध सांगायला हवा होता अर्थात शरद पवार सह अनेकांना याबद्दल माहिती नसेल .
पण बाबासाहेबांचा शालेय जीवनात मुम्बई ला आल्यावर सर्वात आवडता खेळ कोणता होता तर तो म्हणजे क्रिकेट !!! अनेकांना आश्चर्य वाटेल पण बाबासाहेब आपल्या शालेय जीवनात असताना हॉकी ,फुटबॉल, क्रिकेट चे खेळ सुरु केले यामध्ये क्रिकेट हा बाबासाहेबांचा आवडता खेळ यात वरळी ,परळ, कोळीवाडा, सातरस्ता इ.भागातील इतर जातीच्या टीम्स ची मैच खेळत आणि स्वत: च्या टीम चे captain असत. अनेक मैच ते जिंकत .बाबासाहेब एक चांगले फलंदाज (batsman) होते .त्यांना फलंदाजितले बारकावे माहीत होते आणि ते आपल्या टीम मधील सहकार्याना समजावून सांगत .खेळता खेळता भांडणे ही होत .त्यातही बाबासाहेब पुढे राहात.

(संदर्भ-डॉ भीमराव रामजी आंबेडकर खंड १ पा.नं.61 ले.चांगदेव भ. खैरमोडे)


माणूस कितीही मोठा असला तरी बायकोपुढं तो तीचा नवरा असतो...!!
माणूस कितीही मोठा असला तरी बायकोपुढं तो तीचा नवरा असतो. हक्काचा मित्र असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही वेगळं नव्हतं. बाबासाहेब कोलंबियाहून परतले. चळवळीत पूर्णवेळ उतरण्याआधी त्यांनी स्वतःला एका चांगल्या वकिलाच्या स्वरूपात स्थापन करण्यात आपली पूर्ण ताकद लावली. बाबासाहेब कित्येकदा सकाळी सात ला घरातून निघाले तर रात्री पार एक दोन वाजता घरी येत. अशातच त्यांना विधी महाविद्यालयात म्हणजे आजच्या जीएलसी (लॉ कॉलेज) ला व्याख्याता म्हणून काम करण्याचं निमंत्रण मिळालं. बाबासाहेबांनी ते स्विकारलं. कालांतराने ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य देखील झाले. पण हा किस्सा त्यांच्या व्याख्याते असण्याच्या कालखंडातला... त्यावेळेस डॉ. आंबेडकरांचे लेक्चर म्हटलं की, बाहेरच्या अनेक कॉलेजेस मधून विद्यार्थी, प्राध्यापक जातीनं हजेरी लावत. त्यांच्या व्याख्यानांच्या नोट्सवर अनेकदा बॉम्बे क्रॉनिकल्स मध्ये आर्टिकल छापून येत. खूप मोलाचे डॉक्युमेंट होते ते. पण कुणीही सांभाळून न ठेवल्याने आता ते उपलब्ध नाहीत. तर बाबासाहेबांना या व्याख्यानांचं बऱ्यापैकी मानधन मिळायचं. मानधन मिळालं की, बाबासाहेब ते आणून सरळ रमाईंच्या हातात देत असत. आता तेवढ्यावर रमाईचं मन भागत नव्हतं. साधी भोळी माई ती. एकदा बाबासाहेबांना तडक म्हणाली, साहेब, तुम्हाला घरादाराची काळजीच नाही. कधीतरी भाजीपाला आणून द्यावा.. मीच एकटी काय काय करणार... बाबासाहेब म्हणाले.. हो रामू... बाबासाहेबांना गोल्ड स्टँडर्डवर प्रबंध लिहायला सांगितला असता तर सोप्पं वाटलं असतं. पण आता भाजीपाला घेऊन जायचा म्हटलं तर त्यांना थोडंसं कठिण वाटू लागलं होतं...
भायखळ्यांच्या ज्या भाजीमार्केट मध्ये त्यांचं रमाईसोबत लग्न झालं होतं त्या ठिकाणी गेले बाबासाहेब. अडतीस रुपयाचा भाजीपाला घेतला. एक छोटी मोळी बसेल एवढे बोंबील,
कोथिंबीर, मेथी अन् इतर भाज्यांच्या पंधरा पंधरा जुड्या घेतल्या. बरीच फळं पण घेतली. स्वारी खुश होती. आज रामू पुन्हा टोकणार नाही हा विचार मनात डोकावूनच ते घरी निघाले. बीडीडी चाळीतल्या घरात येताच बाबासाहेबांच्या हातातलं सामान पाहून रमाई जी वैतागली त्याला तोड नव्हती. बाबासाहेब म्हणाले, मी महिनाभर पुरेल इतकं सामान आणलंय, आता तरी खुश... रमाई म्हणाली.. ते बोंबील आता तीनेक दिवसात खराब होतील. ह्या भाज्या उद्यापर्यंत खराब होतील. हे असलं रोज थोडं थोडं आणायचं असतं. तरी रमाईनं हिशोब विचारलाच... किती पैसे झाले.. बाबासाहेब उत्तरले अडतीस रुपये.. पुन्हा रमाई चक्रावली.. म्हणाली.. पंचवीस रुपयाच्या जिन्नसा तुम्हाला महागात विकल्या. यानंतर परत बाजारहाट करायचा नाही तुम्ही. थोडा वेळ असाच गेला.. बाबासाहेब स्वतः बसले रमाईसोबत. भाज्या विलग केल्या. बोंबील ही जुडीने बांधले. स्वतःपुरते ठेवले. आणि बाकीचे पोयबावाडीतल्या शेजाऱ्यांना वाटले. स्वतः भाजी खुडून देणाऱ्या बाबासाहेबांना नंतर रमाईनं कधीच परत असल्या कामांसाठी तगादा लावला नाही. ती मनोमन खुश होती. अन् बाबासाहेबही. त्या दोघांमधल्या प्रेमाचं नातं भलतंच विलक्षण होतं.
धन्यवाद- Vaibhav Chhaya
संदर्भ- धनंजय कीर लिखित आणि खैरमोडे लिखित खंड
माहित नसलेले हे बाबासाहेब शेअर करत चला..


बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे...
बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे. ते अशासाठी की त्या काळात अप टू डेट राहणारी केवळ तीनच माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती. पं. जवाहरलाल नेहरू, बॅ. मोहम्मद अली जिन्ना आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सधन कुटूंबातील. बालपण आणि तारुण्य सर्व सुख सोयी आणि संसाधनांनी भरलेल्या वातावरणात गेलं. याउलट बाबासाहेबांच्या घरी कमालीचं दारिद्र्य होतं. जातीव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे चटके अलग. तरी वकिली व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार केलं होतं. तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपीयनच होते. पोटाला खायला मिळालं नाही तरी चालेल पण अंगावर चांगलं कापड हवं हा त्यांचा आग्रह असे. बाबासाहेबांना सिडनहम कॉलेजमध्ये असताना पहिला पगार मिळाला. त्यांनी रमाईला सांगितलं की घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोक्त खरेदी करून घे. रमाई सुद्धा जिंदादील माणसाचीच सोबती. बैलगाडी भरून कपड्यांची खरेदी केली. हा भाग वेगळा की त्या वेळी बाबासाहेबांना नऊशे रुपये पगार झाला होता. तर बाबासाहेबांकडे उंची सुट होते.
प्रत्येक मोसमात घालता येतील अशा पद्धतीने त्यांनी कापडांची निवड सुट साठी केलेली होती. प्रत्येक सुटची शिलाई वेगळ्या ढंगाने केलेली होती. प्रत्येक सुट हा थ्री पीस असे. सुटच्या आत पेनांसाठी वेगळा खिसा, अचानकपणे टिपणे काढल्यानंतर कागद सुरक्षित रहावा म्हणून असलेला वेगळा खिसा अशी ठेवण असायची. त्यातल्या त्यात त्यांच्या जोधपुरी सुटची मिजास ही भारीच असायची. पंजाबात असताना त्यांनी परिधान केलेला काळा जोधपुरी सुट हा मला त्यांनी आजवर परिधान केलेला सर्वात बेस्ट सुट वाटतो. अन् दुसरा सुट हा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्यासोबत असताना घातलेला पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सुट. त्यांची पँट मस्त ढगाळ, लांबीला भरपूर अन् पोटापर्यंत ओढलेली असायची. त्यांचे वापरायचे बेल्ट हे साधे असले तर उच्च दर्जाचे होते. त्यांना हॅट आवडत. त्याचं एक वेगळं कलेक्शन होतं त्यांच्याकडे.
बाबासाहेबांच्या चष्म्याची फ्रेम मला सर्वात जास्त स्टाईलिश आणि सेक्सी फ्रेम वाटते. इथं सेक्सी या शब्दावर आकांडतांडाव करण्यापेक्षा डोळ्यांवर घातलेला गॉगल किंवा इतर चष्मा हा तुमच्या व्यक्तीमत्त्वाला अधिक मादक बनवत असतो हे लक्षात घ्या. तर त्यांच्या चष्म्याच्या फ्रेम ह्या त्यांनी अनेकदा युरोपात असताना बनवून घेतल्या होत्या. बाबासाहेबांचं कपाळ भव्य होतं. डोळे मोठे होते. कान सुद्धा मोठे होते. त्यांचे हात आणि हातांची बोटंसुद्धा साधारण लांबीपेक्षा मोठी होती. ही सारी गुणवैशिष्ट्ये बुद्धाच्या शरिरातही होती. खरे तर ही लक्षणे एका महान प्रकांड पांडित्याची असतात. त्यामुळे गोलाकार... थोडक्यात अंडाकृती फ्रेमचा चष्मा त्यांना परफेक्ट शोभायचा. बाबासाहेब शर्टवर तसे फारच कमी असायचे. फावल्या वेळेत ते लेहंगा किंवा
लुंगी नेसत. त्यांचा फक्त शर्टवरचा एकमात्र फोटो आहे तो मिलिंद कॉलेज, औरंगाबदमधला.
आता थोडंसं पुढे येऊयात... बाबासाहेबांच्या खिशाला एकाच वेळेस सहा पेन असत. त्यातील कित्येक पेन महागडे असायचे. तब्बल
दोनशे रुपयांचे पेन असायचे ते. त्यांना इन्क पेन आवडायचे. त्यांची पेन पकडण्याची पद्धत सुद्धा अफाट होती. कित्येक पेनवरची कव्हर कलर अजूनही शाबूत आहेत. इतक्या लेवीश पेनचं कलेक्शन अजूनतरी कोणा इतरांकडे असेल असे वाटत नाही. बाबासाहेब युरोपीयन स्टाईलवालं चैनीचं घड्याळ वापरायचे. तसंच त्यांच्या हातातील घड्यांळ्यांचं कलेक्शन सुद्धा फार सुंदर होतं.
बाबासाहेब सुट परिधान करताना आतला शर्ट हा कोटांच्या पुढे कसा असेल आणि शर्टाला असलेली बटणं आणि पुढचं घड्याळ शिस्तीत कसं असेल याकडे खुप बारकाईने लक्ष ठेवायचे. तीच गत त्यांच्या बुटांच्या बाबतीत. त्यांनी वापरलेले बुट हे त्या काळातले सर्वोत्तम बुटांपैकी एक होते. आज अनेक ठिकाणी त्यांनी वापरलेल्या बुटांचे जोडे आपल्याला पहायला मिळतात.
मी मघाशीच म्हटलं की त्यांना हॅटचा शौक होता. त्यांनी विविध प्रकारच्या हॅट वापरल्या, काही वेळा कॅप वापरल्या. राऊंड कॅप सुद्धा घातली. तसेच काळ्या चष्म्यांच्या बाबतीतही
तीच गत होती. त्यांच्याकडे निरनिराळ्या रंगाच्या टाय होत्या. कोणत्या रंगाच्या सुटसोबत कोणत्या टाय असाव्यात याबाबतचा त्यांचा चॉईससुद्धा भन्नाट होता. डायबिटीसचा त्रास झाल्यानंतर त्यांनी काठीचा आधार घ्यायला सुरूवात केली. पण त्यांच्या काठीवर नक्षीकाम आणि काठ्यांचं कलेक्शनही तसंच स्टाईलिश होतं.
बाबासाहेबांनी अनेकदा भावूक होऊन सांगितलं होतं की, न्हावी पैसे घेऊन सुद्ध सुद्धा त्यांचे केस कापत नसे. त्यांची बहिणच त्यांचे केस कापून देई. परंतू बाबासाहेबांनी कधी वाढलेले केस, दाढी असा अवतार ठेवला नाही. क्लिन शेव्ह्ड असायचे ते. बाबासाहेबांचं राजबिंड रुप खुलून दिसायचं. त्यांना उद्धारकर्ता, बाप या भावनेतून पाहील्यानं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं असं आकलन करण्याला आपण वावच ऊरू दिला नाही. सेम केस तात्यासाहेब फुल्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. त्यांचंही स्टाईल स्टेटमेंट असंच अफाट होतं.
तर दोस्तहो थोडक्यात काय तर... कुणीही कधी तुम्हाला म्हटलं की एवढं लॅविश का राहता? हे असं सोनं नाणं का घालता? हे असलं उंची का जेवता? तर एवढंच सांगा.. आमच्यात हे असंच करतात.. असंच खातात.. असेच कपडे घालतात. आपल्या शेकडो पिढ्या बिनकपड्यांच्या हिंडल्यात. एक सितारा जन्माला आला अन् त्यानं सारं काही पालटून टाकलं. जे घालाल ते चांगलंच घाला. भारीच घाला. आपलं सौंदर्यशास्त्र ठासून सांगा, दाखवा अन् मिरवा ही. याला भले ते निर्लज्ज प्रदर्शन म्हणोत तर म्हणूदे.. मेहनतीच्या कमाईने आलेल्या वस्तूला निर्लज्जपणा म्हणत नाहीत. स्वाभिमान म्हणतात.
धन्यवाद- वैभव छाया


बाबासाहेबांचं अर्थशास्त्राचं ज्ञान अगाध होतं. त्यांना स्टॉक मार्केट च्या एकुण कारभारात विशेष रस होता. सुरूवातीच्या काळात म्हणजेच 1915 नंतर अर्थार्जनासाठी त्यांनी शिकवण्या घेण्यास सुरूवात केली होती. ती अतिशय अल्प कालावधीची गोष्ट असल्याने त्याची नोंद फारशी घेतली गेलेली नाही. परंतू अधिक पैसे मिळवायचे असतील तर सोबतीला अजून एखादा धंदा सुरू करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात रुजत होता.
अखेरीस त्यांनी कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. फोर्ट मध्ये दलाल स्ट्रिट जिथं सुरू होतो.. त्याच्या अगदी डाव्या बाजूच्या लेन मधून बाहेर पडल्यानंतर पेन चं दुकान लागतं त्याच्या मागच्या बाजूस बाबासाहेबांनी कंपनीचं ऑफिस थाटलं. आता त्या ठिकाणी आयसीआयसीआयची बिल्डींग उभी आहे. कंपनीचं नाव होतं..
'स्टॉक्स अँड शेअर्स अॅडव्हाझर्स'.
कंपनीचं कार्य़ालय सुरू झालं. आणि अवघ्या दहाएक दिवसांतच भीमराव नावाचा एक कंसल्टंट जबरदस्त बुद्धिमान माणूस आहे. त्याचा सल्ला खुप फायदा मिळवून देणाऱा असल्याची बातमी चारो-ओर पसरली. दलाल स्ट्रीटवरील शेटजी-लाटजी भीमरावांकडे सल्ला मागण्यासाठी रांगा लावून उभे राहत होते. आजूबाजूच्या अनेकांची दुकानं थंड पडली. पण शेवटी व्हायचं तेच झालं... कुठूनतरी बातमी लागली की भीमराव नावाचा हा माणूस अस्पृश्य आहे, त्याची कचेरी ही धेडाची कचेरी आहे म्हणून.. बस्स त्या दिवसापासून तिथं कुणी ढूंकून पहायला ही तयार झालं नाही. अखेरीस भीमरावांनी वैतागून ती कचेरी बंद केली अन् पुढील शिक्षणासाठी परदेशी रवाना झाले. अन् जेव्हा ते परत आले तेव्हा भीमरावांचा... डॉ. बी. आर. आंबेडकर झालेले होते.
संदर्भासाठी चांगदेव भवानराव खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड १ चाळता येईल. मला आता पान क्रं. नीटसं लक्षात नाही. पण पान क्रमांक १०२, किंवा आसपास मिळायला हरकत नसावी. हा काळ 1917 च्या सुमारासचा असावा. तर दोस्तहो... आपल्याला कंपनी स्थापन करून उद्योगात उतरण्याची परंपरा अगदी थेट बाबासाहेबांपासून आहे बरं का.. यासाठी सर्व उदयोन्मुख उद्योजकांनी बाबासाहेबांचं आभार मानायलाच हवं..




विद्वान कोणाला म्हणावं बरं? नव्या वाटा चोखाळणाऱ्या माणसाला की, रि-सर्च करून नाव मिळवणाऱ्या माणसाला.. बाबासाहेबांचं कोलंबियाचं शिक्षण तर पाहीलंच. आता जरा त्यांच्या शिक्षणातील महत्त्वाच्या अचिव्हमेंट्स पाहू.
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास जातीतील पहिले वकिल होते.
2. डॉ. आंबेडकर हे असे पहिले भारतीय होते की ज्यांनी कोणत्याही परदेशी विद्यापीठात अध्ययन करून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती.
3. बाबासाहेब स्वतः संस्कृत भाषापंडित होते. आणि ही भाषा ते जिद्दीने स्व-अध्ययन करून शिकले. अस्पृश्यांना संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार नव्हता.
4. बाबासाहेब 1907 साली मॅट्रिकची परिक्षा पास झाले. त्या परिक्षेत त्यांना 750 पैकी फक्त 280 गुण मिळाले. ते 280 गुण प्रचंड मोठे होते. कारण महारांमधून मॅट्रिक होणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉ. आंबेडकर...
5. मे-१९१६ मधे डॉ. गोल्डनवेझर यांच्या सेमीनारमधे “Caste In India, Their Mechanism, Genesis & Development ह्या विषयावर त्यानी एक निबंध वाचला. या निबंधानं अमेरिकेतली बुद्धिजीवी वर्गात प्रचंड खळबळ माजवली. जातीव्यवस्थेच्या या क्रुरपणाचा अमेरिकेतील विद्यापीठातून जाहीर निषेध होण्याची पहिलीच वेळ होती. बाबासाहेबांमुळे भारतीय समाजव्यवस्थेची किड जगासमोर आली.
6. जुन-१९१६ ला “National Dividend of India-A Historical & Analytical Study हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला. ह्या प्रबंधाने प्रभावित झालेल्या कोलंबियातील लोकांनी त्यांच्या नावे शानदार मेजवानीचं आयोजन देखील केलं होतं. आणि स्वतःच्याच देशात मात्र अपमान पदरी पडला.
7. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस्सी. म्हणजे डॉक्टरेट ऑफ सायंस मिळवणारे बाबासाहेब हे भारतातील पहिले व्यक्ती.
8. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा आणि तत्त्वज्ञान ह्या सहा क्षेत्रांत बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
9. वरिल सहाही क्षेत्रात त्यांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवल्यात. त्यांनी सादर केलेले प्रबंध इतके महत्त्वाचे होते की त्याकाळी ब्रिटनमधल्या टॉपमोस्ट प्रकाशकांनी ते प्रबंध पुस्तकरुपाने प्रकाशित केले. त्यातील कित्येक प्रबंध आज पन्नासहून अधिक आवृत्त्या निघूनही पुन्हा पुन्हा प्रकाशित होत आहेत.
10. बाबासाहेबांच्या इंग्रजी भाषेचे खरे गुरू हे त्यांचे वडिलच होते. त्यांच्या शिक्षणासाठी सर्वस्वी जबाबदार त्यांचे वडिल रामजीबाबाच.
आजी कधी कधी गाते.. ओ रामजी... तेरे भीम ने बडा सुख दिया..
लोकं म्हणतात उत्तर भारतात.. अगर रामजी बाबा न होते.. बाबा भीमजी हमें ना मिलते...
हे असे होते आपले बाबासाहेब...
#ThanksAmbedkar




बाबासाहेबाचे संयुक्त महाराष्ट्रबद्दल विचार !!
पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र अशी माझी त्रीगट राज्याची कल्पना असून या राज्याची राजधानी अनुक्रमे मुंबई, औरंगाबाद, व नागपूर अशी राहील.
पूर्व महाराष्ट्र हा राज्य पुनर्रचना मानादालाने सुचविलेला विदर्भाचा भाग राहणार आहे. त्यात नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ. अकोला अमरावती, बुलढाणा, चांदा जिल्हा यांचा समावेश होईल.


मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यातील पाच जिल्हे; औरंगाबाद परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद व नाशिक डांग, अहमदनगर, पूर्व व पश्चिम खानदेश व सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटकला जोडलेला मराठी विभाग यांचा समावेश होईल.

बाकीचा भाग पश्चिम महाराष्ट्रात जाईल त्यात ठाणे, कुलाबा रत्नागिरी, पुणे उत्तर भाग आणि दक्षिण सातारा, कोल्हापूर, बेळगाव आणि कारगाव या जिल्ह्यांना अंतर्भूत करण्यात यावे. आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हे तीन भाग कार्यक्षम राहतील व या योजनेमुळे त्या त्या भागातील लोकांच्या आकांशाही पूर्ण केल्या जातील.
माझ्या दृष्टीने अखंड संयुक्त महाराष्ट्राची मागणी अयोग्य आहे. कारण संयुक्त महाराष्ट्रात मराठवाड्यासारख् या जिल्ह्यातील मागासलेल्या लोकांची प्रगती होऊ शकणार नाही. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण होण्याचा संभव आहे. तेव्हा या मागासलेल्या मराठवाड्याची प्रगती व्हावी अशी जर इच्छा असेल तर त्यांना स्वतंत्र मराठवाडा देणे हेच उचित होय.
माझ्या त्रीगट योजनेप्रमाणे महाराष्ट्राची तीन राज्ये करण्यात आली तर राज्यकारभाराच्या दृष्टीने ती कार्यक्षम ठरतील आणि जनतेला आपली उन्नती करून घेण्यास संधी मिळेल.
विचार. Dr बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ- जनता २४ डिसेंबर १९५५

1 comment:

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...