"सूर्यप्रकाशाच्या अभावी झाडं मोहरत नाहीत, पिकं वाढत नाहीत, शिवाय, सतत सावलीत वाढणाऱ्या पिकांवर अचानक कडक ऊन्ह पडलं, तर ते सोसण्याची ताकत त्यांच्यात निर्माण झालेली नसते. म्हणूनच *जीवनाच्या प्रवासातही आपण आपल्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना सतत नुसत्या 'सावली'तच ठेवून वाढवण्याचा प्रयत्न करू नये, असं मला वाटतं. त्यांना जळजळीत उन्हात होरपळू देऊ नये, ती कडक उन्हात भाजून निघत असताना त्यांच्याकडं दुर्लक्ष करू नये, त्यांच्या मुलांना योग्यवेळी योग्य प्रमाणात ओलावा मिळेल, अन्नद्रव्य मिळतील, याची खबरदारी घ्यावी-अगदी जरूर घ्यावी-नव्हे घेतलीच पाहिजे. आणि तरीही त्यांना ऊन्हापासून कायमचं दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र कधीही-अगदी कधीही करू नये. ऊन्ह नुसता प्रकाश देत नाही - चटकेही देतं, हे कितीही खरं असलं, तरी आपण मुलांना त्या चटक्यांसह त्या ऊन्हावर प्रेम करायला शिकवायला हवं. 'ऊन्ह' सोसण्याची, ते पेलण्याची, ते पचवण्याची, त्याचं स्वागत करण्याची, त्याच्या स्पर्शानं मोहरण्याची शक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात यायला हवी.* याचा अर्थ असा नव्हे, की त्यांना सतत ऊन्हातच उभं करावं. अधून-मधून थंडगार सावलीचा अनुभव हवाच. सावली काही नेहमीच दुष्टावा करीत नाही. कधी कधी ऊन्ह असह्य होतं, ते सोसण्याच्या सगळ्या मर्यादा संपतात, तेव्हा अंगावर थंडगार सावली हवीहवीशी वाटतेच. ती दिलासा देते, करपून जाण्यापासून वाचवते, जळून खाक होण्याच्या सीमेवरून माघारी आणते, जगण्याची उर्मी प्रबळ करते. आणि *सावलीचं असं माहात्म्य असूनही, आपल्या मुलांनी तिचा पदर सोडून बाजूला जायचंच नाही, इतकं मात्र तिच्या मोहात पडू नये. त्यांनी योग्य वेळी तिच्यापासून अलग व्हावं.* उन्हात जावं, ऊन्ह प्यावं, ऊन्ह पचवावं आणि लख्ख सूर्यप्रकाशात वाढावं, मोहरून-बहरून यावं !"
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्र.8)
"ज्या समाजात आधीच्या पिढ्या आपल्या मुलाबाळांच्या व्यक्तित्वाभोवती संरक्षक कवच उभं करतात, त्यांना जीवनरस देतात, त्यांना योग्य आकार देतात; त्या समाजात कर्तबगार व्यक्तित्वांची संख्या वाढते. त्या समाजातील सर्वसामान्य माणसांच्या कर्तृत्वाचा दर्जाही उंचावतो. उमलत्या वयात मुलांना नाउमेद करणाऱ्या क्रूर टिकेपासून वाचवलं, खच्चीकरण करणाऱ्या शक्तींपासून जपलं, प्रोत्साहन दिलं, पाठीवर थाप मारली, कौतुक केलं आणि आत्मविश्वास वाढवला, तर ही मुलं मोठेपणी सर्व प्रकारच्या टिकांचं विष पचवून, शत्रूंचे वा परिस्थितीचे आघात सोसून, विरोधाला न जुमानता ताठपणानं आपापल्या क्षेत्रात उभी राहू शकतात आणि सगळ्या समाजालाच अधिक बलशाही बनवू शकतात."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १०)*
"आपल्याला समजलेल्या अंशात्मक सत्यामुळं अहंकार प्रज्वलित झालेले दुराग्रही लोक सत्याचा दुसरा पैलू पाहणारांचा अपमान करतात, त्यांना वैरी मानतात, त्यांना निर्बुद्ध समजतात. खरं म्हणजे सत्याला इतके पदर असतात, इतके पैलू असतात, इतकी अंगं असतात, की त्या सर्वांचं परिपूर्ण ज्ञान अत्यंत प्रज्ञावान अशा व्यक्तीच्याही आवाक्यात नसतं. म्हणूनच, *प्राप्त झालेल्या ज्ञानानं इतरांशी शत्रुत्व करण्याऐवजी नम्र बनून इतरांशी मैत्र करावं, हेच विवेकाचं लक्षण होय."*
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १८)*
"जीवनामध्ये मानवी बुद्धीच्या अपार क्षमता ओळखणं आणि वापरणं, हे जसं एका बाजूनं महत्त्वाचं असतं, तसंच तिच्या मर्यादा जाणणंही आवश्यक असतं. तिच्या क्षमता जाणल्या नाहीत, तर माणूस बौद्धिक दृष्ट्या जणू काही अपंग बनतो, स्वतःला कमी लेखतो, इतरांना शरण जातो. याउलट, तिच्या मर्यादा जाणल्या नाहीत, तर त्याचं आकलन कलुषित होतं, तो उद्धट बनतो, सत्याच्या शोधापेक्षा त्याचा अहंकार प्रबळ होतो. अर्धवट ज्ञानानं निर्माण झालेला दुराग्रह हा सत्याच्या वाटचालीतील मोठा अडथळा होतो. सत्याकडून येणारे प्रकाशकिरण वाटेतच थोपवून धरण्याचं दुष्कृत्य, हा या दुराग्रहाचा पराक्रम होय. या दुराग्रहामुळं माणसाचा 'अहम्' कुरवाळला जातो, सुखावतो. पण सत्याच्या खऱ्या प्रकाशामुळं येणारी प्रसन्नता, निर्मळ आनंद यांना मात्र तो मुकतो."

"खरं म्हणजे शिक्षकाच्या दृष्टीनं विद्यार्थी हा एका बाजूनं सदैव विद्यार्थीच असतो. पण दुसऱ्या बाजूनं त्यानं शिक्षकाचाही शिक्षक होण्याचं सामर्थ्य कमावलं आणि त्या बाबतीतलं स्वातंत्र्य वापरलं, तरच त्या मूळ शिक्षकाचं शिकवणं सफल झालं, असं मला वाटतं !"
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २०)*
"खरं तर आपलं मस्तक हा एका दृष्टीनं जगातील सर्वांत पवित्र असा पदार्थ होय, अनमोल असा अवयव होय. तो कुणापुढं झुकवायचाच नाही, असं मुळीच नाही. कृतज्ञता, आदर यांसारख्या भावना व्यक्त करण्यासाठी तो विवेकपूर्वक योग्य ठिकाणी जरूर झुकवावा. पण तो झुकवण्यापूर्वी त्याला जिथं झुकवायचं ती जागा त्यानं झुकावं अशा योग्यतेची आहे की नाही, हे मात्र तपासून घ्यायला हवं.
कित्येकदा आपण जिथं मस्तक झुकवतो ती जागा त्या योग्यतेची तर नसतेच, उलट आपला अपमान करणारी, आपली विटंबना करणारी, आपल्याला अंधारात ढकलणारी असते. ती आपला तिरस्कार करीत असते आणि आपण तिचा पुरस्कार करीत असतो. ती आपला धिक्कार करीत असते आणि आपण तिचा सत्कार करीत असतो. खरं तर आपलं हे वागणं आपल्याच दृष्टीनं लाजिरवाणं असतं, शत्रूला मित्र समजणारं असतं. आपण मात्र कुठल्या तरी कल्याणकारकाची पूजा करीत असल्याच्या उदात्त भावनेनं विनम्र झालेलो असतो, भारावून गेलेले असतो.
आपली अशी घोर फसवणूक होऊ नये असं वाटत असेल, तर आपलं मस्तक झुकवण्यापूर्वी चिकित्सा करण्याची सवय लावायला हवी. व्यवहारात अगदी प्रत्येक पावलागणिक चिकित्सा करता येईल, असं नव्हे; तरीही स्थूल मानानं आपल्या बुद्धीला ही सवय लावणं आवश्यक आहे. आपल्या मस्तकाची प्रतिष्ठा राखायची असेल, आपलं स्वत्व जपायचं असेल, आपला स्वाभिमान सांभाळायचा असेल आणि आपला खराखुरा विकास साधायचा असेल, तर हे करावंच लागेल."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २२)*
"माणसांची पारख करता येणं, घटनांचं मूल्यमापन करता येणं, हे यशस्वी आणि आनंदी जीवनाचं रहस्य आहे. एखादी घटना आपल्या हिताची आहे की अहिताची, हे तिच्या नुसत्या बाह्य रुपावरून वा स्थूल दृष्टीला दिसणाऱ्या परिणामावरून ठरवू नये; तिच्या केंद्रापर्यंत जावं, गाभ्यापर्यंत जावं आणि तिची दूरगामी फळं काय आहेत, हे जाणून घ्यावं. कित्येकदा महत्तम सुखांचा मार्ग छोट्या-छोट्या क्लेशांमधून जात असतो."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २४)*
"वास्तवाचं नीट आकलन करण्याची क्षमता नसलेले लोक अनेकदा आपल्या हितचिंतकांचाच अपमान करतात. आपल्या कल्याणासाठी रात्रंदिवस तळमळणारांची विटंबना करतात. आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झटणारांचा द्वेष करतात, तिरस्कार करतात. आपल्या मित्रांना शत्रू समजून त्यांच्यावर घाव घालतात. हे केवळ मित्रांच्याच बाबतीत नाही, तर अगदी संतमहात्म्यांच्या बाबतीतही घडत आलेलं आहे आणि सर्वसामान्य व्यवहारातही सतत घडत असतं. हे सॉक्रेटिस आणि येशू ख्रिस्त यांच्या बाबतीतही घडलेलं आहे आणि तुमच्या-आमच्या जीवनातही घडत असतं. *ज्याच्या अंत:करणात आपल्याविषयी अपार करुणा असते; त्यांच्यावर घाव घालण्यासाठी शौर्य लागत नाही; विवेकाचा अभाव असला, दृष्टी पारदर्शक नसली, की असा पराक्रम सहजच गाजवता येतो. या प्रकारात आपण आपल्या हितचिंतकाला तर यातना देतोच, पण स्वतःच्या वाटेवर काटे पसरण्याचं कामही करतो. म्हणून जीवनाच्या प्रवासात थोडं सावध असावं. आपण आपल्याला सुगंध देणाऱ्या फुलांना आपल्याच हातांनी चुरगाळत तर नाही ना, याची खात्री करून मगच कोणतीही कृती करावी."*

"स्वतः निर्णय घेण्याचा एक ताण असतो, हे खरं आहे. स्वतः निर्णय घेतल्यामुळं परिणामांची जबाबदारीही स्वतःवर येते. निर्णय घेण्यासाठी बराच विचार करावा लागतो. त्याचे श्रम होतात. एक प्रकारची असुरक्षितताही वाटते. हे सगळं सोसण्यापेक्षा निर्णय घेण्याची जबाबदारी दुसऱ्यावर टाकली, की निर्धास्त होता येतं. मग एक प्रकारची सुरक्षितता वाटते. दुसऱ्या बाजूनं विचार केला, तर *स्वतः निर्णय घेण्यामध्ये काही ताण असला, तरी स्वातंत्र्याची एक अवीट गोडी असते.* आपल्या स्वत्वाचा आविष्कार असतो. आपलं व्यक्तित्व समर्थ बनवण्याची संधी असते. आपल्या सर्जनशीलतेचं अंकुरणं असतं. *दुसऱ्याची चाकोरी स्वीकारण्यात आपलं मनुष्यत्व बंदिस्त बनतं, स्वतः निर्णय घेण्यात ते मुक्त होतं!"*
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २६)*
"एक-एक वीट रचून एखादी सुंदर इमारत उभी करावी, त्याप्रमाणं ज्ञानाचा एक-एक कण देऊन आपल्या मुलांच्या, आपल्या भावंडांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करावी. या प्रकारात दोन्ही बाजूंनी आनंद आहे. जडणघडण करणाऱ्याला निर्मितीचा उत्कट आनंद मिळतो. ज्याची जडणघडण होते, त्याला समृद्ध व्यक्तित्व लाभतं. *मुलांना नुसता जन्म देणं, त्यांच्यासाठी पैसा खर्च करणं वा इस्टेट जमवून ठेवणं, यापेक्षा त्यांना स्वतःला ज्ञानाच्या आधारे सामर्थ्यशाली बनता येईल हे पाहणं महत्वाचं आहे."*
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २८)*
"भित्र्या मनाला भिण्यासाठी काही तरी निमित्त हवंच असतं. विशेषतः *भित्र्या मनावर अंधारातून प्रवास करण्याची वेळ आली, तर त्याला सगळीकडं 'भुतंच भुतं' दिसू लागतात. वाईट गोष्ट अशी, की भित्र्या माणसाची भिती त्याच्यापुरती मर्यादित रहात नाही. तिचं शास्त्र बनवलं जातं. तिचा प्रचार केला जातो.* तिची लागण होते आणि हां हां म्हणता ती असंख्य मनांना झपाटून टाकते. शिवाय, *जीवनात यशाबरोबर अपयश येतच असतं. अशा अपयशाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेण्याऐवजी दुसऱ्या कुणावर तरी ढकलल्यामुळं एखाद्या गुन्ह्याच्या आरोपातून निर्दोष सुटल्यासारखा आनंद माणसाला होत असतो. मग ही जबाबदारी माथी मारण्यासाठी रक्तामांसाचं कुणी मिळालं नाही, तर पेंढा भरलेल्या प्राण्यासारखं कुणाला तरी उभं करून त्याच्यामुळं आपली हानी झाली, असं समाधान तो मानतो. आपण आपल्या मुलामुलींच्या मनात अशा खोट्या गोष्टींच्या भीतीची बीजं पेरायचं बंद केलं, तर त्या आपलं पुढचं आयुष्य निर्भयपणानं, प्रसन्नतेनं जगू शकतील !"*
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३२)*
"विचारपूर्वक भूमिका स्वीकारून तिच्यावर ठाम राहणाऱ्या माणसाला शत्रूंचे घाव घायाळ करीत नाहीत. कारण, त्याला ते अपेक्षितच असतात. मित्रांचे घाव मात्र त्याला फार फार घायाळ करतात. म्हणून कुणीही आपल्या मित्रांवर आणि अर्थातच शत्रूंवरही घाव घालण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा. सर्व पैलू ध्यानात घ्यावेत. शहाणपणानं निष्कर्ष काढावेत. संयम बाळगावा. आततायी बनून उतावीळपणानं कृती करू नये. एवढं पथ्य सांभाळल्यावर जर तत्त्वासाठी कुणावर घाव घालणं अटळ बनत असेल, तर आणि तरच घाव घालण्यासाठी हात उचलावा ! कारण, *एखाद्याला समजावून घेणं हे त्याच्यावर घाव घालण्याइतकं सोपं नसतं !*"
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३६)*
"जीवनाच्या प्रवासात माणसापुढं अनेकदा विघातक संकटं उभी राहतात. अनंत अडचणी येतात. कस पाहणारे कठीण प्रसंग येतात. अशा वेळी दुबळ्या मनाची माणसं जीवनाचं रणांगण सोडून जाण्याचा प्रयत्न करतात. निराश होतात. छोट्या-छोट्या संकटांपुढंही शरणागती पत्करतात. अशा रीतीनं ती एक प्रकारे आपल्या मनुष्यत्वाचा अपमान करतात. याउलट, संकटं कितीही कोसळोत, त्यांचे जबडे कितीही आक्राळ-विक्राळ असोत, मी त्यांच्यापुढे झुकणार नाही, मी माझं सर्व सामर्थ्य पणाला लावून त्यांना नेस्तनाबूत करेन, अशी जिद्द बाळगणारी माणसंही जगात असतात. अनेकदा त्यांच्या प्रेरणेच्या स्रोतांचा उगम एखाद्या स्फूर्तिदायक प्रतीकात असतो."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४०)*
"एखाद्याला कोणा महापुरुषाच्या सहवासात रहायला मिळालं, तर ती त्याच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट जरूर आहे. पण या सहवासाचं फळ म्हणून काही वेगळं घडावं, अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. त्या महापुरुषाचे गुण त्याच्या सहवासात राहणाऱ्याच्या व्यक्तिमत्वात प्रविष्ट व्हावेत आणि जेव्हा तो मनुष्य सर्वसामान्य लोकांमध्ये वावरेल, तेव्हा त्याच्या सहवासात एक प्रसन्नता लाभावी, मूळ महापुरुषाच्या सहवासाचा एखादा अंश अनुभवाला यावा, क्षणभर आपण त्या मूळ महापुरुषाच्या सहवासातच आहोत की काय असं वाटावं. सहवासात राहणं म्हणजे नुसतं रक्तामांसाच्या चालत्या-बोलत्या शरीराच्या सहवासात राहणं नव्हे. त्या सहवासातून काही विचार, काही जीवनदृष्टी घेतली, तर त्या सहवासाला अर्थ आहे."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४४)*
"नुसती श्वासोच्छवासांची संख्या वाढवणं, त्यांची बेरीज वा गुणाकार करणं आणि आधीच्या क्षणाची कार्बन प्रत म्हणता येईल असा आणखी एक-एक क्षण जगत जाणं-नुसतं जगतच जाणं-एवढा काही जीवनाचा आशय मर्यादित नाही. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आपल्या श्वासोच्छवासांना जपलंच पाहिजे, यात शंका नाही. पण जीवनात असे काही प्रसंग येतात, की जेव्हा कोरडे श्वासोच्छवास जगण्यापेक्षा काही महान मूल्यांसाठी श्वासोच्छवास गमावणं हे अधिक जिवंतपणाचं ठरत असतं."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४७)*
"जीवनमूल्यांचा, कर्तव्यांचा बळी देऊन आणि स्वतःच्या अस्तित्वाभोवती संरक्षक कवच निर्माण करून आपलं अस्तित्व टिकवणारांपेक्षा शांतपणानं आपल्या कर्तव्याला सामोरं जाताना आपलं अस्तित्व विझू देणारे लोक मृत्यूमध्येही चांगलं जगतात."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४८)*
"तत्वांसाठी, सिद्धांतांसाठी, कर्तव्यांसाठी प्रसंगी प्राण गमावणं हे तर महानच, पण प्रत्येक वेळी काही प्राण गमावण्याचाच प्रसंग असतो, असं नाही. कित्येकदा तत्वांच्या व कर्तव्यांच्या विरोधात फार छोटे छोटे स्वार्थ असतात. फार क्षुल्लक फायदे असतात. आपल्या कर्तव्यांसाठी असे छोटे छोटे स्वार्थ गमावण्याची सवय स्वतःला लावली, तर तसं करण्याचा आनंद चाखलेला मनुष्य तसाच प्रसंग आला, मृत्यूलाही आनंदानंच सामोरा जाईल. शिवाय, असे मृत्यूचे मोठे प्रसंग वारंवार येतात, असं नाही. प्रत्येकाच्या जीवनात येतातच, असंही नाही.
छोटे छोटे प्रसंग मात्र प्रत्येकाच्या जीवनात येतात आणि वारंवारही येतात. आपण अशा प्रसंगांच्या कसोटीवर उतरलो, तरी आपण श्वासोच्छवासांची नुसती बेरीज केल्यासारखं होणार नाही."

"अपेक्षा करणं ही गोष्ट मुळातूनच वाईट आहे, असं म्हणता येणार नाही. आपल्या आवाक्यापलीकडच्या गैरवाजवी अपेक्षा करू नयेत, अशी मर्यादा मात्र जरूर घालावी. पण अपेक्षा वाजवी असोत वा गैरवाजवी असोत, दोन्ही प्रकारांत कुठल्या ना कुठल्या कारणानं अपेक्षाभंग होण्याचा धोका संभवतोच. निरोगी जीवन जगू इच्छिणाऱ्यानं अशा अपेक्षाभंगांना सामोरं जाण्याचं बळ आपल्या व्यक्तित्वात एकवटणं आवश्यक असतं."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४९)*
"लहानपणापासून ज्या मुलांचे अती लाड केले जातात आणि ज्यांना मागेल ते ताबडतोब मिळत गेल्यामुळं कधीच कुठल्याही अपेक्षाभंगाचा सामना करण्याचा प्रसंग आलेला नसतो, त्यांच्यावर कधी काळी एखाद्या अपेक्षाभंगाचा आघात झाला, तर लस न टोचलेल्या व्यक्तीप्रमाणं ती मुलं अपेक्षाभंगाच्या त्या आघातामुळं कोलमडून पडतात, स्वतःला सावरू शकत नाहीत, व्यसनांच्या आहारी जातात, खचून जातात वा विध्वंसक बनतात; आपलं संतुलन गमावून बसतात. याउलट, ज्यांना लहानपणापासून छोट्या-मोठ्या अपेक्षाभंगांना सामोरं जाण्याचा सराव झालेला असतो, त्यांच्यामध्ये एखाद्या फार मोठ्या अपेक्षाभंगाचा घाव सोसण्याचीही ताकत निर्माण झालेली असते. आपल्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत, याचा विवेक त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. त्या विवेकाच्या जोरावर कुठल्याही अपेक्षाभंगाचं विष पचवून प्रसन्न मनानं नव्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी त्यांना त्यांच्या आतूनच ऊर्जा मिळते."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ५०)*
"माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि स्वतःमध्ये, इतरांमध्ये आणि बाह्य सृष्टीमध्ये बदल घडवून आणण्याच्या स्वतःच्या अपार क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास असेल, तर जीवन नुसतं यशस्वीच नव्हे, तर आनंदी होण्याचीही शक्यता किती तरी पटींनी वाढते."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ५२)*
"जो समाज आपल्यातील प्रयोगशील व्यक्तींना नवेनवे प्रयोग करण्याची संधी देतो, त्याच समाजाला नेहमी नवी पालवी फुटते. ज्या समाजात मुक्त आणि उमदं वातावरण असतं, प्रोत्साहन आणि पाठिंबा असतो, कौतुक आणि गौरव असतो, त्या समाजात नव्या नव्या संशोधनाला बहर येतो. त्या समाजातील व्यक्तींची प्रतिभा कुंठित होत नाही. मनावर दडपण नसल्यामुळं, ताणतणाव नसल्यामुळं, शांत चित्तानं आपली बुद्धी पणाला लावून त्यांना नव्याचा शोध घेता येतो. याउलट, ज्या समाजात दुराग्रहानं अशा व्यक्तींची अडवणूक केली जाते, त्यांना धाक घातला जातो, त्यांनी काही नवीन करू नये म्हणून दहशत निर्माण केली जाते, त्या समाजात चिंतनाचा प्रवाह खंडित होतो. जे विशाल अशा समाजाच्या बाबतीत तेच कुटुंबाच्या वा शाळा-महाविद्यालयांच्या बाबतीतही म्हणता येतं - नव्या कळ्या उमलण्यापूर्वीच खुडून टाकण्याचा उद्योग करणाऱ्या समाजाला नवनिर्मितीचा आनंद कधीच मिळू शकत नाही !"
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ६०)*
"ज्ञान, माणुसकी, कळवळा अशा गोष्टींनी ज्यांचं जीवन भरलेलं आहे त्यांच्या संपर्कात रहावं, त्यांच्याकडचे ते सगळे गुण कणाकणानं आत्मसात करावेत. त्यांच्याइतकं उंच होता आलं नाही, तरी त्यांच्या स्पर्शानं थोडं का होईना अधिक समृद्ध व्हावं. ते ज्या दिशेनं गेले, ज्या वाटेनं गेले, त्या दिशेनं आणि त्या वाटेवर चार पावलं का होईना चालण्याचा प्रयत्न करावा. अर्थात, त्या महान व्यक्तींच्या प्रभावानं दबून जाऊ नये, त्यांचं प्रतिबिंब वा प्रतिध्वनी बनू नये, आपलं स्वत्व जरूर जपावं. पण आपला विधायक विकास होण्यासाठी त्या महान व्यक्तिमत्त्वांचा उन्मीलक स्पर्श अवश्य स्वीकारावा."
*(संदर्भग्रंथ : त्यांना सावलीत वाढवू नका !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ६२)*
"विविध क्षेत्रांतील महान व्यक्तींच्या संपर्कानं स्वतः संपन्न झाल्यानंतर उदात्त जीवनाच्या पूर्ततेसाठी आणखी एक जबाबदारी स्वीकारावी. आपण जिथं जिथं जाऊ, तिथं प्रसन्नतेचा शिडकावा व्हावा. आपण तिथं पाऊल टाकण्यापूर्वी तिथं जी स्थिती होती, तिच्यामध्ये इष्ट दिशेनं कणभर तरी परिवर्तन व्हावं. आपल्या सहवासानं इतरांना आनंद मिळावा, ज्ञान मिळावं, विवेक लाभावा आणि आपल्याकडून इतरांना हे सगळं लाभत असल्याचं बघून आपणही कृतार्थ होऊन जावं."

No comments:
Post a Comment