Flash

Tuesday, 25 April 2017

विवेकाचे बंधन....उमेश सूर्यवंशी

अनुक्रमणिका 

*विवेकाचे बंधन....( भाग )*                                 *पुष्पहार ....महामानवांच्या " चरणी " अर्पावेत*
*विवेकाचे बंधन.....( भाग )*                                *बागेतील फुले खुडू नका....*
*विवेकाचे बंधन.....( भाग )*                                *दाखल्यावरची जात ....दाखल्यावरच राहू द्या*
*विवेकाचे बंधन....( भाग )*                                 *वर्तमानपत्रावर जाहिरातीचे बंधन असावे...*
*विवेकाचे बंधन....( भाग )*                                 *टि.व्ही. मालिकांच्या "एपिसोड संख्येवर" मर्यादा हवी....*
*विवेकाचे बंधन....( भाग )*                                 *रस्त्याच्या मधोमध ...मंदीर, मशिदी , चर्च , विहार नसावेत*
*विवेकाचे बंधन....( भाग )*                                 *लोकसंख्या नियंत्रण साधने स्वस्त हवीत ..सर्वत्र हवीत*
*विवेकाचे बंधन....( भाग )*                                 *"कन्यादान " वर्ज्य व्हायला हवे...*
*विवेकाचे बंधन....( भाग )*                                 *महामानवांचा "विचारअंश " कृतीत जपा*
*विवेकाचे बंधन....( भाग १० )*                              *स्नेहसंमेलन....लहान मुलं नटवण्यासाठी पेक्षा घडवण्यासाठी असावे*
*विवेकाचे बंधन....( भाग ११ )*                              *प्रदर्शनात मांडलेल्या चित्राखाली ...किमान चार ओळी असाव्यात*
*विवेकाचे बंधन....( भाग १२ )*                              *न्यायालयात " वेळेवर " न्याय मिळायला हवा...*
*विवेकाचे बंधन....( भाग १३ )*                              *थिएटर मध्ये " फिल्मी बुक शाँप " असायला हवे*
*विवेकाचे बंधन...( भाग १४ )*                                *भारतीय राज्यघटना ....घराघरात असावी*
*विवेकाचे बंधन....( भाग १५ )*                              *पुरुषांनी स्वयंपाक करायला हवा*
*विवेकाचे बंधन....( भाग १७ )*                              *सार्वजनिक मुतारीमधील जाहिरातीवर बंधन हवीत*
*विवेकाचे बंधन...( भाग १८ )*                                *प्रतिनिधी सभागृहात श्रध्दांजली वाहून कामकाज चालू ठेवावे*
*विवेकाचे बंधन....( भाग १९ )*                              *शालेय सहलीची ठिकाणे "अभ्यासनीय " असावीत*
*विवेकाचे बंधन....( भाग २० )*                              *बायकोच्या मित्राचा आदर करावा...*
*विवेकाचे बंधन,....( भाग २१ )*                             *निवडणूकवेळी दाखवलेला पक्षीय जाहिरनामा पाळायला हवा*
*विवेकाचे बंधन....( भाग २२ )*                              *किरकोळ कामाचे दर ...सारखे स्वस्त असावेत*
*विवेकाचे बंधन...( भाग २३ )*                                *परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांना .....*
*विवेकाचे बंधन....( भाग २४ )*                              *इतिहासकार " तटस्थ " असावा*
*विवेकाचे बंधन....( भाग २५ )*                              *आशिर्वाद देताना " विवेक " हवा...*
*विवेकाचे बंधन....( भाग २६ )*                              *बालक पालक आणि रिक्षावाले मामांसाठी...*
*विवेकाचे बंधन.....( भाग २७ )*                             *आपल्या बरोबर "इतर" जणांचा विचार व्हावा...*
*विवेकाचे बंधन....( भाग २८)*                                *धरणग्रस्तांचे अश्रू ....संपावेत*
*विवेकाचे बंधन....( भाग २९ )*                              *मंत्र्यांचे दौरे...सर्वसामान्य वेठीस कशासाठी*
*विवेकाचे बंधन....( भाग ३० )*                              *राष्ट्रपती महोदयांनी "राष्ट्रपित्याचा " हा आदर्श घ्यावा*
 =================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग १ )*

*पुष्पहार ....महामानवांच्या " चरणी " अर्पावेत*

आपला भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. विविध जातीधर्मात विभागलेला हा समाज नेहमीच विविध जातीधर्मांच्या सण उत्सवात रमलेला असतो. हे उत्सव बहुतांशी धार्मिक स्वरुपाचे असतात. तरीही त्या त्या समाजाव्यतिरिक्त इतर धर्मबांधवही त्यात आनंदाने सामिल होतात ही इथली बहुसांस्कृतिक ओळख आहे. दिवाळी सणात मुस्लिम बांधव....ईद सणात हिंदू बांधव...ख्रिसमस सणात इतर धर्मीय बांधव राजीखूशीने सामिल होताना आपण पाहतो. ही माणसांची घुसळण आपण सांस्कृतिक एकता म्हणून गौरवत असतो.
*विविध जातीधर्मांच्या उत्सवांबरोबरच येथे सर्वधर्मीय महामानवांच्या जयंती व स्मृतीदिनही समस्त समाज त्यांना अभिवादन करून करत असतो. प्रत्येक जातीधर्माचे महामानव आपण येथे पुतळ्यांच्या रुपात पाहतो. श्रध्दाळू भक्त त्यांना मूर्ती म्हणतात... पण खरेतर असतो तो विविध धातूंचा पुतळा.. माणसाने घडवलेला. तरीही या पुतळ्यांबाबत समाज अधिक संवेदनशील असतो. समाजाच्या सामुदायिक भावना त्यात गुंतलेल्या असतात. म्हणून तर "पुतळ्यांची विटंबना " ही कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे कारण ठरते. असो.... मुद्दा हा आहे की ...महामानवांच्या जयंती अथवा स्मृतीदिनाला अभिवादन करताना पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्याची आपली पध्दती असते. या दोन दिवशी हजारो लाखो अनुयायी ठिकठिकाणी असे अभिवादन करत असतात. हा पुष्पहार घालण्यासाठी महामानवांच्या पुतळ्याच्या चबुतर्यांवर तौबा गर्दी होते. कुणी उजव्या बाजुला तर कुणी डाव्या बाजूला...कुणी पुतळ्याच्या पाठी अथवा कुणी पुढे उभा राहुन जयजयकार करताना घोषणा देत "फोटोसेशन" होत असते. या गोंधळात पुतळा अवघडतो. उदाहरणार्थ ...शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तलवार असते तिच्या अवतीभवती विचित्र अवस्थेत उभे राहताना कार्यकर्त्यांना भान नसते. अथवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती असेच दृश्य असते. अशा गोंधळावेळी शिवरायांची तलवार अथवा बाबासाहेबांच्या चष्म्याची निगा राखली जात नाही . नकळत भावनेच्या भरात काहीही होण्याचा संभव असतो......*
*दुसरे असे की...या महामानवांना पुष्पहार अर्पण करताना होणारी कसरत टाळावी लागेल. कधीकधी कार्यकर्त्यांच्या गराड्यात महामानवाचा चेहरा शोधावा लागतो. चेहऱ्यावर इतके हार असतात की समजणे कठीण होते...अर्धपुतळा असेल तर पुतळ्यापेक्षा कार्यकर्ते उंचीने मोठे दिसतात. कुणी उत्साही कार्यकर्ते महामानवांच्या मागे उंच उभे राहतात... जणू यांनीच त्यांना छत्र दिलंय... हे सर्व टाळायला हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
*विवेकाचे बंधन*....अनुयायांनीच स्वतःला घालावे लागते. असे करता येऊ शकते की...शिवरायांच्या पुतळ्याला एकच शासकीय मानाचा हार असावा व बाकीचे हार फुले ही कार्यकर्त्यांनी शिवचरणी अर्पावीत... हीच गोष्ट बाबासाहेब व गांधीजी तसेच इतर महामानवांबाबत करणे शक्य आहे. शेवटी काय हो.....महामानव स्वकर्तृत्वाने त्या उंचीला पोचलेले असतात. आपल्या सारख्या लाखो अनुयांयाची जीवनाची बेरीज केली तरीही आपण त्यांच्या पायापर्यतच पोचू शकतो. मग आपणच स्वतःला हे विवेकाचे बंधन घातले तर महामानवांचा सन्मान योग्यरित्या जपला जाईल. *महामानव हे दिशादर्शक असतात....त्यांच्या पासून विवेकाची किमान ही दिशा घ्यावी ....*
*!! प्रतिमापूजनाबरोबरच....विचारांचे अनुयायी व्हा...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन.....( भाग २ )*
*बागेतील फुले खुडू नका....*

बाग....आनंदाचे ठिकाण. अनेक वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसे जिथे एकत्र येतात...एकमेकांना पाहून किमान स्मित करतात...लहान मुले खेळताना पाहून हरखून जाणारे चेहरे....प्रेमीयुगुलांना मनातील गुजगोष्टी बोलण्याचे ठिकाण ....वयोवृध्दांना हसतखेळत वय विसरण्याचे ठिकाण .....अशा अनेक अंगानी बाग मनात वसत असते. म्हणून ही बाग जपली पाहिजे .
*बागेत....माणूस हा माणूस असतो. तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ,बौद्ध नसतो... तो आस्तिक वा नास्तिकही नसतो...आपली सगळी भलीबुरी कवचकुंडले उतरवून तो बागेत आनंद घेत असतो. किमान...किमान तो त्यावेळीतरी फक्त माणूस असतो. त्याचे हे माणूसपण सुखावणारं असतं. बागेत लहान मुले असतात तसेच कोवळी रंगीबेरंगी फुले असतात. रंगाची ही विविधता आपल्याला अधिक आनंददायी बनवत असते. एखाद्या फुलाला " मनापासून " स्पर्श करून बघा. अंग मोहरून येते नुसते. अत्यंत सुवासिक असे ते फूल मग कुणा मुलीला आपल्या डोक्यात खोवावेसे वाटते अथवा एखाद्या वृध्देला घरी देवपुजेला न्यावे वाटते. अगदी चांगल्या भावनेनेच ते फूल मग आपल्या हाताने खुडले जाते..आपण आनंदतो. पण....पण निसर्ग दुखावतो. फुले ही झाडावरच छान दिसतात. प्रेयसीला द्यायला अथवा देवाला वाहण्याकरिता फुले बाजारात विकत घेणे अधिक श्रेयस्कर. बागेतील फूल ...हे सार्वजनिक असते. ते सर्वांचे असते. ते पैशांनी विकत घेता येत नाही. त्याला पाहून जसा आपल्याला आनंद मिळतो तसाच आनंद इतरजण घेत असतात. आपण ते खुडले तर...आपण एकटे आनंदी अन् इतरजण नाराज . ही नाराजी आपल्या प्रेयसीच्या चेहऱ्यावर गोड स्मित आणेल का ?? अथवा देवपूजा फळेल का ?? ...विचार करा.*
विवेकाचे बंधन....यासाठी आपण घालून घ्यायला हवे. बाग ही सार्वजनिक मालमत्ता असते. तिथे फुलणारे फूल हे सार्वजनिक मालकीचे असते. खरेतर या फुलांवर फक्त न् फक्त निसर्गाचीच मालकी असते. निसर्गाला ओरबाडून माणूस सुखी होत नाही. फूल...बागेतील झाडांवरच राहू द्या ....त्याचा सुवासिक गंध घेऊन घरी या ...अन् घर सुगंधित बनवा.
*!! फूल तोडण्यापेक्षा.....एखादे फुलझाड लावा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन.....( भाग ३ )*
*दाखल्यावरची जात ....दाखल्यावरच राहू द्या*

जात...हा शब्द अत्यंत अमानुष व्यवस्था दर्शवित असतो. ही जात भारतीय माणसाच्या मनात घट्ट स्थान रोवून बसलीय. मनातून ही जात घालवणे कठीण काम असले तरीही ती जात मनातून घालवण्याचे " माणुसकीचे कार्य " चालूच ठेवले पाहिजे. जातीनिर्मूलन हीच भारतीय समाज सशक्त होण्याची पूर्वअट आहे.
*जात...माणसाला कोणत्याही कष्टाविना मिळणारी सहजसाध्य गोष्ट. ही मिळवायला कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. माणूस जन्मल्यापासून मरेपर्यत त्याला ही चिकटून असते. मुल जरा मोठे होते व शाळेत जाऊ पाहते. त्याचा फाँर्म भरायचा असतो त्यावेळी प्रवेशाच्या फाँर्मवार एक रखाना असतो. जात रखाना. हा रखाना काढून टाकावा अशी न्याय्य मागणी परिवर्तनवादी संघटना करतात. हा नियम लागू व्हायला हवा यात शंका नाहीय. सरकारची इच्छाशक्ती केव्हा तयार होईल कोण जाणे. तोपर्यत एक विवेकी व जबाबदार नागरिकानी काही गोष्टी मनापासून केल्यास ही जातीचा चिकटपणा थोडा कमी होऊ शकेल. जातीच्या दाखल्यावर जात असणे हे मागास समाजाला आरक्षण व कमी उत्पन्न गटाना ईसीबी सवलत साठी आवश्यक मानले जाते. ही अडचण लौकर दूर व्हायला हवी. महत्त्वाचे म्हणजे ....दाखल्यावर लिहिलेली जात ही व्यवहारात उतारू नये याची दक्षता प्रत्येक गटाने घ्यायला हवी. जात निर्मूलन होण्याअगोदर हवी तर ही जातीचे घटिकरण म्हणून एक पायरी समजावी. दाखल्यावरची जात ही दाखल्यावरच ठेवली तरीही बरेच प्रश्न सुटु शकतील. मुख्य लढा जात मनामनातून कायमची घालवणे हाच आहे तर ही पायरी यात मुख्य भुमिका बजावू शकते. जातीचा अहंकार नाहीसा झाला तरच चिवटपणा कमी होतो. जात हे आजचे वास्तव असले तरीही उद्या साठी जात ही टाकाऊ गोष्ट ठरायला हवी. यासाठी समाजव्यवहार हा जात फक्त कागदावर ठेवून नंतर हळुवार ती कायमची मनातून काढणे असाच व्हायला हवा. अर्थात यामध्ये अडचणी येणार हे कबुल आहे. तरीही हा प्रयत्न करायलाच हवा. कधीकधी झाडं मूळातून उखडायचे असल्यास काही कारणाने झाडाच्या फांद्या छाटाव्या लागतात. झाड हलके होते. मगच मुळापासून ते काढता येते हे उदाहरण डोळ्यासमोर असावे.*
जातीनिर्मुलनाचा वारसा...अशा छोट्या वाटणाऱ्या गोष्टीनी अधिक प्रशस्त होऊ शकतो. विवेकाचे बंधन....स्वतः पासून लावून घ्यावे लागते. हे बंधन ..जातीव्यवस्थेचे अमानुष कर्मठ बंधन..सैल करु शकते. विचार व्हावा.
*!! जात संपेल....तोच नवभारताचा पहिला दिवस असेल !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ४ )*
*वर्तमानपत्रावर जाहिरातीचे बंधन असावे...*

रोज सकाळची सुरुवात हातात वर्तमानपत्र घेऊनच होते. सगळीकडची खबरबात एकदा वाचून झाली की दिवस सुरु झाला असे वाटते. राजकीय बातम्या ....सामाजिक घटना...सांस्कृतिक कार्यक्रम ...शैक्षणिक गोष्टी ...कला व क्रिडा संबंधित बातम्या अशा अनेक प्रकारचे " ज्ञान " वर्तमानपत्र व्दारे लोक मिळवत असतात. अत्यंत विश्वास असतो त्याचा . पेपरात छापलय म्हणजे सत्यच असते इथपर्यत हे समिकरण झालंय. त्यामुळे वर्तमानपत्र चालवणारे वर्गाची जबाबदारी अधिक वाढते.
*वर्तमानपत्र .....चालवणे म्हणजे एक प्रकारे सुधारणेची चळवळ चालवणे असे पूर्वी समजल जायचं. पत्रकारिता हा तेव्हा धंदा नव्हता तर सत्व होते. अनेक नावाजलेले थोर नेते जनतेशी संवाद या माध्यमातून करत. महात्मा गांधी ...बाबासाहेब आंबेडकर ...आगरकर...टिळक...असे नावाजलेले संपादक अथवा भुमिका मांडणारे देशभक्त आपण जाणतो. या लोकांनी लेखणी हे शस्त्र बनवले. कार्ल मार्क्स याचे प्रसिद्ध वचन आहे ....वर्तमानपत्र जेव्हा धंदा करते तेव्हा ते आपले अभीव्यक्ती स्वातंत्र्य गमावते " अशा आशयाचे हे वचन आहे. आजकाल आपण वर्तमानपत्र उघडायची पण गरज नसते. पहिल्या पानापासून पानपानभर जाहिराती दृष्टीस पडतात. एकही पान असे नसते की जिथे जाहिरात नसते.( संपादकीय पानाचा थोडा अपवाद असतो ) जाहिराती सुध्दा अशा मांडलेल्या असतात की , जाहिरात कोणती व वाचण्याचा मजकूर कोणता हेच शोधावे लागते. पूर्वी जाहिरातीचे एक पान असायचे आता मात्र सर्व वर्तमानपत्र मिळून एक पान वाचनीय मजकूर असतो. त्यातही कुणा "थोर" पुढाऱ्यांचा वाढदिवस असला की विशेष पुरवाणी निमित्ताने अनेक "कार्यकर्ते " आपल्या सदिच्छा व शुभेच्छा पाठवत असतात. ही सुध्दा जाहिरातच असते. थोडक्यात काय तर सध्या वर्तमानपत्रे ही जाहिराती पोचवण्याचे सर्वोच्च माध्यम झालयं.*
जाहिराती मिळाल्याशिवाय वर्तमानपत्र खर्च निघत नाही हे वास्तव आहे. ४ रु. एवढी किंमत देऊन जवळजवळ २० पानै भरतील एवढे मोठे वर्तमानपत्र असते. है व्यावसायिक गणित लक्षात घेऊनही व त्याची अपरिहार्यता ध्यानात घेऊनही यातून सुवर्णमध्य काढायला हवा असे मला प्रामाणिकपणे वाटते. वाचनाचा मजकूर वेगवेगळ्या भागात दरदिवशी विभागणी करून २० ऐवजी ८ पानाचे वर्तमानपत्र केले तरी हरकत नाहीय. अट एकच ...यामध्ये जाहिरात अत्यल्प असेल. वर्तमानपत्रेच्या आकाराहून जास्तीत जास्त ५% एवढया भागावरच या जाहिराती असाव्यात. हे विवेकाचे बंधन...वर्तमानपत्र मालकाला व वाचकालाही लागु असेल. असा प्रयत्न केल्यास त्याला प्रतिसाद मिळेल का ?? प्रयत्न तर व्हावा. ज्या जाहिरातीची सत्यासत्यता जबाबदारी खुद्द वर्तमानपत्र घेत नाहीय त्या वाचून वाचक निर्णय घेऊ लागला तर ती त्याची दिशाभूल ठरते. वर्तमानपत्रे मुख्य हेतू हा वेगवेगळ्या प्रकारचा वाचनीय मजकूर वाचण्यासाठी असतो. त्यासाठीच वाचक पैसे मोजतो. मग त्याला हव ते देण्याची जबाबदारी घ्यायला हवी ना. शेवटी काय तर.....प्रश्न किमतीचा नाही ....पानांच्या संख्येचा नाहीय ...तसा तो जाहिरातीचा पण नाहीय ....आम्हाला हवय एक वाचनीय वर्तमानपत्र . बस्स .
*!! पाने चार असावीत..पण जाहिरातीविना...फक्त वाचनीय मजकूर !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ५ )*
*टि.व्ही. मालिकांच्या "एपिसोड संख्येवर" मर्यादा हवी....*

टि. व्ही. ...अर्थात इडियट बाँक्स. प्रत्येक घराची व घरातील माणसांची गरज बनलीय. Tv सोबत जगणे...सोबत झोपणे...टाईमपास ही त्याच्या सवे.....वैचारिक प्रबोधन पण त्याच्या सवे....मनोरंजन तर त्याच्याच सवे...असा आजकालचा फंडा आहे. कामाचा वेळ सोडल्यास इतर वेळेवर या Tv नावाच्या गोष्टीने जणू कब्जाच करुन टाकलाय. सध्याच्या मानवी जीवनातून ही वस्तू वगळणे म्हणजे महाकठीण काम आहे.
*टि. व्ही.....याला इतके मुल्य येण्याची अनेक कारणे आहेत. धावपळीच्या जगात मनोरंजनाच्या वाटा आपल्या वेळेत शोधायची तर हा एक उत्तम उपाय समजला जातो. या मनोरंजन मध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असताता. पण एक आवड मात्र जास्तीत जास्त काँमन ठरू पाहतेय. ती म्हणजे या इडियट बाँक्सवर चालू असणाऱ्या मनोरंजन मालिका. डेली एपिसोड दाखवून प्रेक्षक वर्ग अक्षरशः खिळवून ठेवण्याचे कसब या लोकांनी निश्चितच मिळवलयं. अस म्हणण्याचे कारण असे की...वर्षानुवर्षे म्हणजे अगदी चारपाच वर्षे रोज एकच मालिका सुरु असते अन् ती मालिका कधी आवडिने तर कधी उत्सुकतेने पाहणारी मोठा वर्ग आहे. डेली एपिसोड दाखवणार्या मालिकांचे तर एक हजार देखील भाग झाल्याचे ऐकिवात आहे. साँस बहुवाल्या या मालिका लोकावर इतका पगडा कशा टाकू शकतात हा अभ्यासाचा विषय ठरावा. लोक या मालिका पाहण्यासाठी आपल्या दैनंदिन कार्यक्रमाची रचना देखील हा कार्यक्रम चुकणार नाही अशा पध्दतीने करतात तेव्हा डोके फुटायचे तेवढे शिल्लक राहते. लोकांचा मनोरंजन हक्क मान्य असूनही स्पष्ट म्हणावेसे वाटते की हे मनोरंजन सध्या तरी व्यसन बनत चाललयं. तेव्हा हे वेळीच रोखायला हवे. एखादी मालिका सुरु करताना मालिकाचे जे सेन्सॉर बोर्ड असेल त्यांनी या मालिकेचे प्रक्षेपित होणाऱ्या भागांची संख्या अगोदरच विचारून कायम करावी. मालिका लोकप्रिय होतेय असे दिसताच संबंधित हितसंबंध राखणारे लेखक ..अभिनेते..निर्देशक..निर्माता हे सर्वजण ती मालिका लांबवू पाहतात. यामुळे मालिकेचि गाभा असणारी कथा राहाते बाजूला व इतर उपकथांवरच अनेक एपिसोड तयार होतात. हा सरळसरळ सार्वजनिक वेळेचा जाणीवपूर्वक केलेला अपव्यय मानला जाऊन तो दंडास पात्र असावा. शंभर अथवा दोनशे भागात कोणतीही कथा सांगून होतेच हो. फाफटपसारा पसरवला की मग त्याचे हजार भाग होतात. यावर नियंत्रण असायला हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
अनेक गाजलेल्या मालिका या आटोपशीर होत्या. आजही नुक्कड अथवा सर्कस या मालिकांची लोक आठवण काढतात. याउलट साँस भी कभी....आठवाते का हो ?? सध्या त्यातील अभिनेत्री केंद्रीय मंत्री असल्याने आठवत असेल एवढेच. यालि काही अर्थ नसतो. मालगुडी डेज पुन्हा पुन्हा पहाविशी वाटते यातच जनमाणस ओळखावे. सेन्सॉर बोर्डाने हे....विवेकाचे बंधन मालिकावाल्याना लावून सार्वजनिक वेळेचा अपव्यय टाळावा. असे व्हायला काय हरकत आहे ??
*!! मालिका....आठवणीत राहील अशी आटोपशीर बनवा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ६ )*
*रस्त्याच्या मधोमध ...मंदीर, मशिदी , चर्च , विहार नसावेत*

आपला भारतीय समाज हा मुख्यतः पूजक आहे. तो कोणत्याही जातीधर्माचा असो त्याला एक प्रार्थनास्थळ लागते. ते प्रार्थनास्थळ कधी मंदीर कधी मशीद कधी चर्च वा कधी विहार या नावाने ओळखले जाते. आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्याला श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिले आहे. हा हक्क जपताना सार्वजनिक गोष्टी यापासून दूर रहाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे. ही जबाबदारी योग्य रित्या घेतली तर मग कुणाला कसलीच अडचण नसावी.
*ईश्वर अथवा प्रेषिताची आराधना करणे हा पुरातन कालापासून चालत आलेले कर्मकांड आहे. आजकालच्या धावपळीच्या व चंगळवादी युगातही हे कर्मकांड कमी नहोता वाढताना दिसतय. जगण्याची अनिश्चितता वा स्पर्धायुगात पाठी राहिलो तर संपण्याची धास्ती यामुळेही मनुष्य या कर्मकांडात जास्त ओढला जातो. आपल्या दिवस भरातील बराच वेळ या कर्मकांडासाठी जणू राखीवच ठेवत असतो. या श्रध्दा कधीकधी इतक्या टोकदार बनतात की आपले ऐहिक जीवन अडचणीत आले तरीही पर्वा नसते. आपण जर चहुबाजूला नजर फेरली तर ही प्रार्थनामंदिरे रस्त्याच्या मधोमध आलेली दिसतात. गर्दीचि रस्ता व मधोमध प्रार्थनास्थळ यामुळे अडचणी तयार हौतात. वाहतूक विस्कळीत होते. प्रार्थनास्थळात आलेले भाविक आपली वाहने पुन्हा त्याच रस्त्यावर जवळपास कुठंतरी लावत असतात. अडचणीत भर पडते. असे प्रार्थनास्थळ हे बरेच वर्षापूर्वीचे असल्याने व काही लोकाचे रोजचे येणेजाणे असल्याने वर्षानुवर्षे ते तिथेच राहते. शक्य झालं तर आजुबाजूचा परिसर काबीज करु पाहते. कालांतराने शहराची लोकसंख्या वाढते..वाहने वाढतात..मार्केट वाढते ...रहदारी वाढते आणि मग...हे प्रार्थनास्थळ अडचणीचे ठरु लागते. ते थोडे बाजूला हटवले तर बरेच गोष्टी सुलभ होणार असतात. पण प्रश्न उभा राहतो तो श्रध्देचा. आणि मग सारासार विवेक बाजूला पडतो. अडचणी सोसत सोसत समाज जगतो पण ती अडचण सोडविण्यासाठी पुढे येऊन कार्यवाही करू पाहत नाही. हे योग्य नाहीय असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
प्रत्येक माणसाला धर्म असतो. त्याच्या त्याच्या श्रध्दा असतात. पण प्रत्येक नागरीक हा देशाचा नागरीक असतो आणि आपला भारत देश विविध जाती धर्म पंथ यांचा बनला आहे. अशावेळी " विवेकाचे बंधन " ज्या त्या गटाने स्वतः स्विकारायला हवे. आपल्या श्रध्दा व उपासनेपोटी इतर जणांना अडचण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . शहर सुंदर बनवताना वा रहदारी सुटसुटीत होण्यासाठी एखादे प्रार्थनास्थळ आड येत असेल तर मोठ्या मनाने व विवेकाने रस्ता मोकळा करता यायला हवा. रस्ता हा सार्वजनिक मालकीचा असतो . श्रध्दा व उपासना हे वैयक्तिक कर्मकांड असते. पुढे समाज न्यायचा असेल तर धार्मिक स्वातंत्र्य उंबर्याच्या आत असावे. हेच योग्य आहे. विवेकाचे हे बंधन खुशीने सर्वानी पाळल्यास बरेच प्रश्न सुटतील.
*!! धार्मिक स्वातंत्र्य उंबरठ्याच्या आत असावे....!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ७ )*
*लोकसंख्या नियंत्रण साधने स्वस्त हवीत ..सर्वत्र हवीत*

लोकसंख्या ....हा समस्त मानवजातीसमोर एक मोठा प्रश्न बनलाय. पृथ्वी एक आणि तिच्यावर अवलंबून असणारे अब्जोवधी जीव असे हे व्यस्त प्रमाण आहे. हे व्यस्त प्रमाण कमी करून पृथ्वी तोलू शकेल एवढया जीवांची संख्या नियंत्रणात ठेवणे हे फारच महत्त्वाचे आहे. यासाठी शासनस्तरावर काही जबाबदारी आहे तसेच काही संस्था संघटना या देखील प्रबोधन करत असतात. हे अत्यंत गरजेचे आहे.
*लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांची आवश्यकता असते. पुरुष कंडोम वापरतात तसेच स्त्रीयांनाही वेगवेगळी साधने असतात. गर्भनिरोधक गोळ्या असतात. पण....पण सांगायच कारणच हे आहे. ही लोकसंख्या नियंत्रण साधने स्वस्त असणे व सर्वत्र कायमस्वरुपी उपलब्ध असणे ही गोष्ट महत्त्वाची असते. मी याचा जाणीवपूर्वक अनुभव घेतलाय. तो इथे नोंदवतो. माझी पत्नी सुषमा हिला बाईकवर घेऊन मी " माला - डी " खरेदी करण्याचा प्रयोग करून पाहिला. जवळजवळ १७ मेडिकल स्टोअर्स पालथे घातले पण माला - डी मिळाली नाही. शेवटी शेतकरी संघाच्या मेडिकल मध्ये मिळाली. असे का ?? याचा विचार केला तेव्हा काही गोष्टी ध्यानात आल्या. माला - डी हि गोळी स्वस्त आहे. तीन रुपयाला पाकीट आहे. त्याच्या विक्रीतून फारसा नफा मेडिकल वाल्याला मिळत नसतो. त्याऐवजी इतर लोकप्रिय गोळ्या विकून फायदा जास्त मिळतो.दुसरे असे की....माला - डी गोळीला शासकीय अनुदान मिळायचे म्हणून स्वस्त मिळायची. आता ते अनुदान कमी अथवा बंद होत आलयं. त्यामुळं तुटवडा आहे. खरेतर..स्वतः शासनानेच पुढाकार घेऊन अशा गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध करायला हव्यात. ३० रुपयांचे पाकीट प्रत्येकाला घेण जमत नसते. विशेषतः गरीब पट्ट्यातील लोकांना हे प्रत्येक वेळी जमतय अस नाहीय. यासाठीच शासनाने पुढाकार घेऊन स्वतः लोकसंख्या नियंत्रण साधने स्वास्तात उपलब्ध करून देणे ही गरज बनते.*
लोकसंख्या नियंत्रणसाठी प्रबोधन जरुरी आहे तशीच कायमस्वरूपी विविध उपाययोजना गरजेची आहे. पुरुषांनीही आपली जबाबदारी निभावावी. स्वंतःची नसबंदी करून घेतली तर अपत्यनिर्मितीच्या एका मोठया घटनेतून बाहेर आलेल्या आपल्या पत्नीला अपत्यनियंत्रणासाठी अशा गोळ्या ज्या तिच्या शरीराला त्रासदायक ठरु शकतात त्या घ्यावी लागणार नाही. शेवटी आपल्या पत्नीचे आरोग्य जपणे हे *विवेकाचे बंधन* पुरुषानाही हवेच की. अपत्यनिर्मिती हा आनंदाचा व सृजनाचा सोहळा आहे. हा सोहळा आपल्या इतर मानवजातीवर बोजा वाटू नये याचि खबरदारी प्रत्येक घटकाने घ्यावी व शासनस्तरावर थोडा हात ढिला करत यासाठी पैसा उपलब्ध करावा. हा महाराष्ट्र र.धो. कर्वे व मालतीबाई कर्वे यांचा वारसा जपतो. या अजोड दांपत्याला त्यांच्या अनमोल त्यागाला नमन करण्यासाठी हे *विवेकाचे बंधन*आवश्यक आहे असे मला वाटते.
*!! लोकसंख्या आवरा...पृथ्वी सावरा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ८ )*
*"कन्यादान " वर्ज्य व्हायला हवे...*

स्त्री ...भारतीय व जागतिक संस्कृतीतही बरेचदा उपभोग्य वस्तू समजली गेलीय. धर्माच्या संस्थापकानी..धर्मग्रथांनी...व्यवस्था राबवणारे हितसंबंधी लोकांनी सतत स्त्री कायमची पुरुष वर्चस्वाखाली राहील व स्वतःचे हितसंबंध जपले जातील याची अहोरात्र काळजी वाहिलीय. स्त्री मुक्तीचा लढा हा म्हणून तर मानवमुक्तीचा लढा असतो. स्त्री जन्मापासून मृत्यूनंतरही अशीच दाबली जाते.
*कन्यादान.... ही विधी लग्नाच्या वेळी केला जातो. या विधीवैळी मुलीचा बाप मुलीचा हात मुलाच्या हातात देतो. त्यानंतर भटजी मुलीच्या वडिलांना धर्मेच्छ..अर्थेच्छ..कामेच्छ असे तीनवेळा मुलाकडे पाहत मुलीच्या बापाला म्हणायला लावतो. त्यानंतर मुलगा "नातीचराणी " असे म्हणतो. याचा अर्थ भटजी सांगतो जो तत्पूर्वी वधूपिता वधूवर आणि उपस्थित कुणालाही ठाऊक नसतो. मग भटजी अर्थ सांगतो...धर्म अर्थ व काम या त्रिसुत्रीला अनुसरून मी माझी कन्या तुमच्या स्वाधीन करत आहे. वधूपित्याचे हे बोल वरमुलगा नातीचराणी अर्थात स्विकृती देत स्विकारतो. आता थोडे विवेकाच्या अंगाने या गोष्टी पहा बघू. जी मुलगी लहानपणापासून आनंदाने जो पिता वाढवतो ...पालनपोषण करतो तो पिता आपल्या काळजाचा तुकडा असणारी मुलगी लग्नप्रसंगी एका मुलाच्या " स्वाधीन " करतो. ही गोष्ट कितपत विवेकाला धरून आहे ?? भारतीय समाजात स्त्रीला स्वतंत्र असे अस्तित्व मूळातूनच पुसुन टाकले आहे. लहानपणी पित्याच्या , तरुणपणी नवरोबाच्या , म्हातारपणी मुलांच्या अस्तित्वात स्वतः चे अस्तित्व तिने विरघळून टाकावी अशी अपेक्षा भारतीय संस्कृती स्त्री कडून ठेवते. स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून ठेवण्याची ही प्रवृत्ती आहे. ज्यांना माणुसकी आहे व ज्यांना आपल्या आपल्या आई पत्नी मुलगी बहीण सखी यांच्याविषयी आत्मियता आहे अशा प्रत्येक विवेकशील पुरुषाने " कन्यादान " हा प्रकार टाळायला हवा असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
लग्नप्रसंगी बडेजाव नको...हुंडा पध्दती नको...अतोनात खर्च नको...जेवणाची नासाडी नको...भटजीची अमानुष मध्यस्थी नको...अशा अनेक सत्प्रवृत्ती आपण सांगतो व जमेल तितके जगतो. तशीच आता " कन्यादान नको " ही सत्प्रवृत्ती वाढायाला हवी. स्त्री त्वाचा सन्मान करणे हे विवेकशील संस्कृतीचे लक्षण आहे. हे लक्षण जो आचरणात आणेल तोच खरा मनुष्य.
*!! कन्यादान टाळा...स्त्रीत्वाचा मान राखा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ९ )*
*महामानवांचा "विचारअंश " कृतीत जपा*

सामान्य लोकांच्या हिताची भुमिका घेऊन ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्या मनुष्यांना आपण महामानव असे ढोबळपणे म्हणत असतो. त्यांच्या ऋणात राहून आपण आपल्या जीवनाची वाटचाल रेखत असतो. त्यांना आदर्श मानून त्यांनी दिलेलु जीवनमुल्ये स्वतःला व इतरांना सांगत असतो. जमेल तस आचरणात आणत असतो. महामानव ही सुध्दा तुमच्या आमच्या सारखीच मनुष्य असतात. पण त्यांनी आपले जीवन कार्य म्हणून " बहुजन हिताय , बहुजन सुखाय " हे तत्वज्ञान आचरणात आणलेले असते. म्हणून तर साधारण मनुष्यापासून असाधारण मनुष्यापर्यत अर्थात महामानव या उपाधीपर्यत त्यांची वाटचाल होत असते.
*महामानवांचे विचार अंगिकारणे व आचरणात आणणे हीच त्या महामानवाला वाहिलेली कृतीशील आदरभावना असते. पण...पण आमच्या समाजजीवनात काही महाभाग मात्र महामानवांचा विचार व आचार महत्त्वाचा मानण्यापेक्षा सोप्या कृती करण्यात धन्यता मानतात. अर्थात या "बहुरुपी" लोकांची संख्या फार कमी असते. तरीही यांची दखल घेणे गरजेची असते. आपण चहुबाजूला नजर फिरवली तर आपणाला महामानवाच्या सारखे दिसणारे काही चेहरे दिसतात. उदाहरणार्थ ....उभट चेहरा व तासदार नाक असणारा गोरागोमटा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसत असतो. मग तो मुलगा स्वतःला "प्रतिशिवाजी " समजून महाराजांसारखी दाढी ठेवतो....कपाळावर चंद्राकार गंधटिळा लावतो...मनगटात कडे अडकवतो....केशरचना करतो...गळ्यात एखादे लाँकेटपण अडकवतो...स्वतःच्या गाडीवर शिवरायाचा चेहरा रेखाटतो...क्षत्रियकुलावंतस , जगदंब , वगैरे वगैरे शब्द रेडियममधून कोरून चिकटवतो. आणि मग रुबाबदारपणे एक अशी नजर फिरवातो की समोरच्याला वाटावे की आपण साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांनाच पाहत आहोत. पण हा संपूर्णपणे दंभ असतो. अहंकार असतो.शिवरायांसारखी चेहरेपट्टी असणाऱ्या लोकांना व्यसने करताना व गर्दीचे ठिकाणी अक्षम्य वावरताना पाहिले की मनात संताप उमटतो. महामानवासारखे नुसतं "दिसणे" महत्त्वाचे नसते तर महामानवासारखे "असणे" महत्त्वाचे असते. खरेतर अशा बहुरुप्यांनी महाराजांचा खरा इतिहास वाचायला हवा. शिवाजी महाराजासारखा दिसतो म्हणून नाभिक समाजाचे वीर शिवा काशीद हसतहसत मरणाला सामोरे गेले. आजचे हे बहुरुपी किमान गोष्टीसाठी तरी पुढे सरसावतील का ?? विचार व्हावा. या लोकांनी स्वतः वरच "विवेकाचे बंधन" घालून शिवरायांसारखा प्रत्यक्ष व्यवहार करायला शिकले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
महामानव...हे समाजाचे दिपस्तंभ असतात. आपण अभिनेते अथवा सेलिब्रिटी लोकांचे "डुप्लीकेट" पाहिलेले असतात. त्यांच्या विषयी आपल्या मनात थोडी तरी सहानुभूती दाटते पण जे डुप्लीकेट शिवाजी राजांसारखे फक्त दिसतात पण प्रत्यक्षात वेगळे वर्तन करतात त्यांना पाहून संतापच दाटतो. अशा बहुरुप्यांना किंमत न देणे हेच योग्य असते. महामानव आपल्या जीवनात तत्वाने वा व्यावहाराने उतरवायचे असतात हे ज्यादिवशी या महाभागांना समजेल तो सुदिन.
*!! महामानवांची नक्कल नको....अक्कल घ्यावी !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन.....( भाग १० )*
*स्नेहसंमेलन....लहान मुलं नटवण्यासाठी पेक्षा घडवण्यासाठी असावे*

आजकाल सर्वत्र स्नेहसंमेलन अर्थात गँदरींग सिझन आहे. शाळा मग ती लहान असो वा मोठी , मराठी असो वा इंग्रजी , शासकीय असो वा खाजगी दरवर्षी नित्यनेमाने हा उपक्रम पार पडत असतो. हा लेख मी विशेषतः दहावी पर्यतचे विद्यार्थी व अल्पउत्पन्न गटातील पालक यांना डोळ्यासमोर ठेवून लिहितोय. वाचताना याची दक्षता घ्यावी .
*स्नेहसंमेलन अर्थात गँदरींग...हा आनंदाचा ठेवा असतो. लहान मुलांतील कलासंस्कृतीला उत्तेजन देणे , त्याचे " स्टेज डेअरींग " घडवणे , सामुदायिक भावना रुजवणे , शाळेचे वेगळेपण जपणे अशा विविध कारणासाठी केले जाते. शाळेतील कलाशिक्षक यामध्ये सक्रीय असतात. तसेच हा उपक्रम अधिक चांगला व्हावा यासाठी बाहेरील काही "तज्ञ " कलाकार अथवा तंत्रज्ञची सहकार्य घेतले जाते. हौशी मुलाला व त्यांच्या पालकांना ही सुवर्णसंधी असते. बरेचदा यामध्ये गाणे कोणते असावे...डान्स कसला असावा...कोणते महामानवांची विचारकृती सादर व्हावी...याचे निर्णय शिक्षक घेत असतात. काही हौशी पालक स्वतः च पुढाकार घेऊन आपल्या मुलांसाठी " कँरेक्टर " शोधतात. कधीकधी आपल्या हौशेपायी त्या कँरँक्टरमध्ये मुलांना अक्षरशः कोंबतात. यासाठी येणारा खर्च आपल्या मर्जीने करतात. पण....पण इथेच एक गोष्ट निसटते. या उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना प्रत्येक आयटमसाठी वेगवेगळे कपडे व इतर साहित्य लागते. शाळेकडून ते उपलब्ध होण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ. मग हा सारा खर्च पालकवर्गाकडे आपसूक जातो. त्यातही मुले एकापेक्षा दोनतीन आयटममध्ये सहभागी असेल तर प्रत्येकाचा खर्च वेगळा असतो. जरा विचार करा...अल्पउत्पन्न गटातील पालकांना हा खर्च शक्य असतो का ?? खरेतर नाहीच. पण मुलांची हौस असते व आपले मुल कुठं कमी पडू नये आणि पालक म्हणून आपल्यात कुठं काही कमतरता इतर जणांना दिसू नये म्हणून हे गरीब पालक काहीतरी तजवीज करतात व हे कपडे व इतर साहित्य घेऊन येताता.लहान मुलांचा कोणत्याही एका ड्रेफरीला साधारणपणे तीनचारशे खर्च येतोच. आपल पोरं दोनतीन आयटममध्ये असेल तर किमान हजार रूपये खर्च येतो. हे आर्थिक गणित व आर्थिक कोंडी समजून घेणारी शाळा वा शिक्षक असताता काय हो ?? मग तुम्ही तुमच्या मुलाला "कोरस " मध्ये ठेवा. ( या कोरसचा पण एक ड्रेस असतोच ) एखाद्या महामानवाची भुमिका असेल तर ठीक आहे हो. त्याला वेशभूषा गरजेचीच असते. पण एखाद्या फिल्मी गाण्यासाठी अथवा कोरसमध्ये असणाऱ्या मुलामुलीना हा " ड्रेसकोड " ऐच्छिक असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते. कारण मूळ उद्देश हा मनोरंजन कमी व स्टेज डेअरींग जास्त असाच असावा. कुणाचीही हुबेहूब नक्कल करणे व स्वतःला त्याहीपेक्षा अधिक सकस बनवणे यामध्ये मुलभूत फरक असतो. नकला मध्ये पोरं कमी पडूदे हरकत नाही पण स्वतःला घडवण्यात आपण त्याला साहाय्यकारी व्हावे हे अधिक चांगले होईल. " विवेकाचे बधन" शाळा व शिक्षकांना लागू व्हावे असे मला वाटते.*
लहान मुल म्हटल की त्याला नटवणे हे ओघाने आलेच. ते असावे पण प्रत्येक पालकाच्या खर्च करण्याचा शक्तीवर. ऐच्छिक असावे. पैसा नाही म्हणून ड्रेफरी घेता येत नाही पण त्या पोराला स्टेजवर जायची हौस आहे तर तिथे ही हौस पुरवली जावी. काटेकोर नियम लावू नये. एखाद्या साध्या पण स्वच्छ कपड्यामध्ये हातात तलवार ( खोटी ) घेऊन आलेला शिवाजी रुपातील छोकरा तितकाच गोड वाटेल हो. प्रत्येक वेळी उंची पोशाख घालूनच रयतेचा राजा कसा दाखवणार ?? आठआठ महिने घोड्याचा लगाम हातात धरणारा हा " अजिंक्य योध्दा " राजेशाही वेशातच कायम कशाला वावरेल हो. जरा विचार करा. एखाद्या गरीब मुलाला शिवाजीराजाचे नेतृत्व गुण माहिती असतील ...त्याला योग्य संवाद म्हणता येत असतील.... तर त्याला हे पात्र साकारायला मिळायाला हवे. माझा शिवाजी राजा असाच तर गोरगरीब मावळ्यांना हाताशी धरत छत्रपती झाला. ह्या सवंगडी निष्ठावान मावळ्याच्या गरीब मुलाला शिवाजीराजे साकारायला तांत्रिक गोष्टी आडकाठी कशाला ?? ....स्नेहसंमेलन हे कतृत्वाचे असावे. नटण्यामुरडण्याच्या व तांत्रिक गोष्ट आग्रह धरण्यासाठी इतर बरीच क्षेत्र आहेत.
*!! बाह्यरुपावर नको....अंतरंगावर मेहनत हवी !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ११ )*
*प्रदर्शनात मांडलेल्या चित्राखाली ...किमान चार ओळी असाव्यात*

चित्रे ....कलेची मोठी अभिव्यक्ती आहे. रंगाचे आकर्षण मानवी जीवनात साहजिकच असते. वेगवेगळ्या रंगात रंगणे हे आनंददायी काम असते. पण ह्या वेगवेगळ्या रंगाना एका थिमखाली शिस्तीत बांधून एक नवा अर्थ प्राप्त करून देणे हे चित्रकार नावाची व्यक्ती करत असते. यांच्या कल्पनाशक्तीतून निघणारा एकेक फटकारा नवनवे आयाम समाजमनाला दाखवत असतो. संपूर्ण मानवी जीवनात ह्या कलेचे एक मोठे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.
*चित्रे ....पाहणे हा आनंददायी उपक्रम असतो. मी नेहमीच कोल्हापूर येथील शाहूस्मारक भवन आर्ट गँलरीत लागणारी चित्रप्रदर्शने पाहत असतो. खरं सांगायचं तर चित्रे पाहण्याची एक विशिष्ट शैली माझ्या जवळ नाहीय. पण हा आनंददायी अनुभव मला जगावासा वाटतो. म्हणून काही कळो न् कळो या आर्ट गँलरीत माझा जीव मी जाणीवपूर्वक घुटमळवतो. माझ्या चित्रकार बंधूना इथे एक नम्र विनंती मला करायचीय.....बंधूहो , तुमच्या कलेतील शास्त्रीय ज्ञान मला नाहीय हे खरं. परंतु तुमच्या कलेने मला समृद्ध अनुभव दिलाय. तुमच्या चित्रात तुम्हाला नेमके काय व्यक्त व्हायचे आहे हे माझ्या सारख्या अडाणी माणसाला समजत नाहीय हो. तुमचा संकेतभंग होईला कदाचित पण तुम्ही तुमच्या चित्राविषयी माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला आकलन होईला अशा चार ओळी लिहिल्या तर चित्रे पाहण्याचा आनंद व्दिगुणीत होईल. जरा विचार व्हावा. हे " विवेकाचे बंधन " तुम्हा रसिककलाकारांनाही आनंददायी वाटेल अस मला प्रामाणिकपणे वाटते.*
मी एक गरीब मनुष्य आहे. सध्याही भाड्याच्या घरातच राहतो. पण माझ्या कुवातीने चित्र खरेदी करण्याची माझी हौस मी यथाशक्ति सांभाळतो. माझे स्वतः चे जर कधीकाळी घर झालंच तर त्यातील बहुतांशी भिंतीवर चित्र असणे हे मला आनंददायी वाटेल. या आनंदासाठी या कलेची व चित्रकारबंधूला आपल्या चित्रातून नेमके काय व्यक्त व्हायचे आहे हे समजले तर प्रदर्शनीय चित्रे खरेदी करणे सुलभ होईल. इतकेच.....
*!! कुंचला....थोडा शब्दातूनही व्यक्त व्हावा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग १२ )*
*न्यायालयात " वेळेवर " न्याय मिळायला हवा...*

लोकशाहीत न्यायव्यवस्थेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लोकशाहीच्या प्रमुख स्तंभात याचा समावेश आहे. सामान्य माणसापासून श्रीमंत व्यक्तीपर्यत प्रत्येकाला न्यायालयाचे निर्णय मानावे लागतात. अत्यंत महत्त्वाच्या अशा वेगवेगळ्या प्रश्नवर न्यायालयाचा न्याय समाजात अंतिम समजला जातो हे वास्तव आहे.
*न्याय....मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे अनेकजण कोर्टाची पायरी झिजवत असतात. खाजगी जीवनासंबधी अथवा मालमत्तेच्या वादाविषयीची प्रकरणे कधी मुदतीत लागल्याचे ऐकिवात नसते. आजोबाने दाखल केलेला दावा नातवाच्या म्हातारपणात निकाली लागतो असा अनुभव आहे. या दरम्यानचा काळ ते कुटुंब प्रत्येक क्षणाला डोळ्यात आसवे व अपेक्षा धरून वावरत असते. " उद्याचा दिवस " आपला असेल म्हणून " आज " कष्टात काढणारी अनेक कुटुंब आपण पहात असतो. वर्षानुवर्षे साचलेली हि प्रकरणे अनेकदा तीव्र दुश्मनीत वावरत असतात. न्यायाची जागा ईर्ष्या घेते. ईर्ष्या राग निर्माण करते. राग वाईट कृत्य घडवून आणतो. वाईट कृत्य माणसाला माणसातून उठवतो. म्हणून .....म्हणून खाजगी अथवा घरगुती वादाविषयी प्रकरणे ही ठराविक मुदतीत निकाली व्हायाला हवीत. यासाठी न्यायालयावर मुदतीत निकाल देण्याचे " विवेकाचे बंधन " असायला हवे. ( काही अपवादात्मक प्रकरणाना यातून वगळावे ) शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे हताश उद्गार योग्य नसतात. ते ओठांवर येऊ नयेत म्हणून हे विवेकाचे बंधन असायला हवे. लोकशाहीत लोकांना न्यायाची अपेक्षा असते. पण ही "न्यायाची प्रतिक्षा " इतकी रेंगाळते की भीक नको पण कुत्रा आवर अस म्हणायची सर्वसामान्य माणसावर वेळ येते. भगवान के घर देर है , अंधेर नही हे वाक्य लोकशाहीत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणार्या माणसाच्या तोंडी येणे हे या व्यवस्थेचे अपयश मानावे लागेल. वेळेत न्याय देण्याची यंत्रणा विकसित करावी लागेल. त्यासाठी न्यायक्षेत्रातील रोजगार वाढवायला हवा. तंत्रज्ञान जगात मुदतीत न्याय देणे अशक्य अजिबात नाहीय. प्रश्न आहे तो विकसित पण न्याय्य व्यवस्था विकसित करण्याचा.*
लोकशाहीत यंत्रणेवरचा विश्वास टिकवणे व वाढवणे फारच महत्त्वाचे असते. लोक कंटाळून ती व्यवस्था झिडकारू लागतील हे निकोप लोकशाहीचे लक्षण नव्हे. लोकशाही लोकांना विश्वास देऊनच बळकट करता येते. " मुदतीत न्याय " हे त्या दृष्टीने एक पाऊल ठरावे .
*!! तारीख पे तारीख .....हा डायलाँग विसरायला हवा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

==================================================================================================================================================================
*विवेकाचे बंधन....( भाग १३ )*
*थिएटर मध्ये " फिल्मी बुक शाँप " असायला हवे*

सिनेमा अथवा नाटक ....ही दोन्ही क्षेत्रे बहुसंख्य लोकांच्या आवडिची असतात. सिनेमा पाहण व नाटकाचा आनंद घेणे हा अनुभव सर्वाच्या गाठीचा असतो. ही दोन्ही कलाक्षेत्रे प्रचंड लोकप्रिय असतात. यांचा बरेच प्रमाणावर समाजात अनुकरणही होत असते.
*सिनेमा अथवा नाटक ....पहायला आपण थिएटर मध्ये जातो. आजकाल जमाना मल्टीप्लेक्स अथवा एअरकंडिशन नाट्यगृहांचा आहे. महागडे तिकीट खरेदी करून...कुटुंब अथवा मित्र परिवारासहीत सामुदायिकरित्या या कलांचा आस्वाद घेतला जातो. थिएटर मध्ये खायला मिळते...कोल्ड्रीक प्यायला मिळते ....काही थिएटर मध्ये आता लहान मुलांना खेळण्याकरता खेळणीही असतात. भव्य रुपेरी पडदा ...माऊशार गादीसारख्या खुर्च्या ...बिसलरी ठेवण्याची सोय..अत्यंत चकाचक असे थिएटर असते. हेतू हा की...प्रेक्षकाचे पैसे वसूल व्हावेत. पण.....ज्या थिएटर मध्ये एवढया सोयी असतात त्यामध्ये एखादे " फिल्मी बुक शाँप " अनिवार्य असायला काय हरकत आहे ?? आजकाल १०० कोटी सिनेमा चलती आहे. मोठमोठया स्टार्सचे चित्रपट सहज हा टप्पा आठवड्यात गाठतात. पण यामध्ये सिनेमा लोकप्रिय होतो पण तो " दर्जेदार " असेलच याची शाश्वती अत्यंत तुरळक. अत्यंत सवंग हाणामारी असणारे चित्रपट बाँक्स आँफीस हादरवतात तेव्हा लोकांच्या चाँईसबद्दल शंका येऊ लागते. लोकशाहीत जशी प्रजा तसा राजा असा व्यवहार असतो. हेच सूत्र चित्रपट माध्यमाला लावले तर मग भारतीय सिनेमाचे दिवस अत्यंत वाईट आहेत अस म्हणायला जागा आहे. निव्वळ फील्मीपणा हा कलेचा दर्जेदार प्रकार निश्चितच नाहीय. सिनेमा अथवा नाट्य क्षेत्रातील लोकांनी हे " विवेकाचे बंधन " लोकासाठी लावून घ्यायला हवे की लोकांची अभिरुची ही दिवसेंदिवस उच्च होत राहिली पाहिजे. समोर दर्जेदार प्रेक्षक असेल तर कलावंताला देखील दर्जेदार अभिनय करावा लागेल. त्यासाठी कथा दर्जेदार असावी लागेल. दिग्दर्शक विचारी असावा लागेल. " एक सकस कलाकृती " तेव्हाच जन्माला येते. प्रेक्षकाची अभिरुची खालावली तर काही काळ तुम्ही व्यवसाय कराल तोच प्रेक्षक थिएटर कडे वळेनासा झाला तर ?? विचार करा. थिएटर मध्ये जवळजवळ तीन तास लोक असतात. मध्यतर पंधरा मिनिटाचे असते. त्यावेळी प्रेक्षकांची अभिरुची वाढवणारी काही फिल्मी अथवा नाट्य विषयावरील पुस्तके अथवा नियतकालिके वाचायला मिळाली तर याचा फायदा उद्या या व्यवसायालाच मिळू शकतो. पाचशे रूपये खर्च करणारा प्रेक्षक शंभर रूपयाचे पुस्तक घरी नेऊ लागला तर याचा पूर्ण फायदा थिएटर मालक व इतर हितसंबंधी लोकांना होऊ शकतो. लोकांना वाईट सवयी लावणाऱ्या अनेक बाबी असतात पण लोकांना चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक लावाव्या लागतात. हा त्याचाच एक भाग समजावा.*
शेवटी काय हो.....कलाकृती समाधान देणाऱ्या तयार व्हायला हवी तर समोरचा प्रेक्षकही दर्जेदार असावा लागेल. प्रेक्षक व कलाकृती यांचा संबंध थेट असतो. व्यवसाय म्हणून जरी हे क्षेत्र टिकायचे असेल तरीही "कलाप्रबोधन" मस्टच आहे. परिणाम बरावाईट काही होवो...प्रयोग करायला काय हरकत आहे ??
*!! प्रेक्षक दर्जेदार ....कलाकृती दर्जेदार ...आस्वाद दर्जेदार !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन...( भाग १४ )*
*भारतीय राज्यघटना ....घराघरात असावी*

आपले घर आपण अनेक वस्तूंनी सजवत असतो. काही वस्तू संग्रही ठेवत असतो कायमच्या... काही वस्तू नित्य बदलत असतो. आपल्या जीवनाला जे जै उपयोगी आहे,ते ते आपण आपल्या घरात आणून ठेवत असतो. हेतू हा की आपल्याला योग्य वेळी योग्य वस्तू हातात मिळायला हवी. आपल्या घरात मनोरंजन करण्यासाठी टिवी असतो..कपडे ठेवायला कपाट असते...झोपायला बेड असतो...स्वयंपाक करायला गँस असतो....नानाविध गोष्टी आपल्या घरात असतात. त्या आवश्यक पण असतात. आपल्या घराचे आपणच मालक असतो. अगदी तसेच आपण आपल्या देशाचे नागरिकही असतो. घराचा मालक म्हणून जसे हक्क,अधिकार,कर्तव्य असतात तसेच हक्क,अधिकार,कर्तव्य देशाचे नागरिक म्हणूनही असतात. म्हणून ...म्हणून आपल्या घरात ,आपला देश ज्याव्दारे चालवला जातो अशी *"भारतीय राज्यघटना"* आपल्या घरात असायलाच हवी. हे सर्व नागरिकांचे " विवेकाचे बंधन " आहे.
*भारतीय राज्यघटना....२६ जानेवारी हा दिवस आपण भारतीय राज्यघटना अंमलात आणल्याचा दिवस "राष्ट्रीय सण " म्हणून साजरा करतो. भारतदेश हा विविध जाती,धर्म, पंथ यांनी बनलेला आहे. प्रत्येकाच्या विविध चालीरीती व रुढीपरंपरा आहेत. वेगवेगळ्या उपासना पध्दती आहेत. राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला काही हक्क,अधिकार दिलेले आहेत. तशीच काही कर्तव्ये सुध्दा नागरिक म्हणून सांगितली आहेत. आपल्या घरात मुलांची अभ्यासाची पुस्तके असताता...धार्मिक गोष्टीसाठी धर्मग्रंथ असतात...हलकेफुलके मनोरंजनसाठी मासिके अथवा वृत्तपत्रे असतात.....ज्या वेळी आपणांस त्यांचा उपयोग करायचा असतो तेव्हा आपण अभ्यासपुस्तके , धर्मग्रंथ अथवा मासिके यांचा आधार घेत असतो. मग....मग एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या घरात ज्या राज्यघटनेआधारे हा देश चालतो,ती भारतीय राज्यघटना आपल्या जवळ असायला हवी की नको ?? विचार व्हावा... आपल्या देशात बरेच प्रश्न निर्माण होत असतात. अशावेळी त्या प्रश्नावर आपण कोणती भुमिका घ्यायला हवी यांच्या मार्गदर्शनासाठी भारतीय राज्यघटना प्रत्येक घरात असायलाच हवी असे माझे प्रामाणिक मत आहे.*
२६ जानेवारी हा दिवस आपण गोडधोड खाऊन साजरा करतो. या गोडधोडाच्या खर्चात एकवेळ.. फक्त एकवेळ आपण २०० रूपये भर टाकून यादिवशी " भारतीय राज्यघटना " प्रत घरी आणली तर या दिवसाचे खर्या अर्थाने सार्थक होईल. एक विवेकी व जबाबदार नागरिक म्हणून हे " विवेकाचे बंधन " राजीखूशीने स्विकारावे. आपण भारतीय आहोत ...अन् शेवटपर्यत भारतीयच राहू.
*!! गीता , बायबल हो या कुराण....सबसे आगे है संविधान !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५

==================================================================================================================================================================
*विवेकाचे बंधन....( भाग १६ )*
*पुरुषांनी स्वयंपाक करायला हवा*

प्रत्येक माणसाला शरीर असते. शरीराला अवयव असतात. त्या प्रत्येक अवयवाचे एक विशिष्ट कार्य असते. प्रत्येक अवयव आयुष्यभर व्यवस्थित काम करता रहावा म्हणून व्यक्ती तंदुरुस्त राहू इच्छिते. हात पायांना तेल माँलीश करते...डोळ्यांना गाँगल अथवा चष्मा वापरते...केसांना शाम्पू लावते...चेहऱ्यावर क्रीम लावते...नाना तर्हा आपण करत असतो. हे सर्व आपले अवयवा आहेत म्हणून जास्त काळजी करत असतो. हे बरोबरच आहे.
*पोट ....एक महत्त्वाचा अवयव आहे. जगात माणूस कष्ट करतो व अर्थार्जन करतो त्याचे एक महत्त्वाचे कारण त्याला त्याचे व कुटुंबियाचे " पोट " भरायच असते. सारे काही पोटासाठी अस म्हणतात ते यासाठीच. मग....ह्या पोटाला लागणारे अन्न आपण स्वतः शिजवले तर ?? आपल्या घरी स्त्री अन्न शिजवते व कुटुंब जेवते हा सर्रास प्रकार असतो. घरच्या बाईने स्वयंपाक करावा हा जणू काही अलिखित नियमच करून टाकलाय. माझ्या घरी मी माझी पत्नी सुषमा हिला मला जेवण बनवायला शिकव असे दौन वर्षे मागे लागलोय. अजून काही तिने मनावर घेतले नाहीय. प्रत्येक माणसाला एक पोट असते तर त्याला त्या पोटासाठी अन्न शिजावता आले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. पशू पक्षी प्राणी यांना ही सवय असते. माणूस मात्र माकडापासून उत्क्रांत झाला मात्र काही चांगले गुण तो हरवून बसला. हे गुण परत मिळवणे हे " विवेकाचे बंधन " प्रत्येकाने लावून घ्यायला हवे.*
शेवटी काय हो....सारे काही पोटासाठी असेल तर या पोटासाठी थोडे कष्ट घ्यायला हवेतच. आपल्या घरची महिला रोज अन्न शिजवते . आपण पंधरवडा अथवा किमान महिन्यातून एकदा जरी स्वयंपाक केला तरीही घरच्या बाईच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद जीवन सार्थक बनवून जाईल. स्वयंपाक येणे हे विवेकाचे लक्षण समजावे पण मुख्य ध्येय स्त्री पुरुष समानता हेच असावे. छोट्या छोट्या गोष्टीतून ही समानता आचरणात आणणे हे सुध्दा महत्त्वाचे आहे.
*!! पोटासाठी अन्न स्वतःला शिजवायला यायला हवे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग १७ )*
*सार्वजनिक मुतारीमधील जाहिरातीवर बंधन हवीत*

आजकाल जमाना मार्केटिंगचा आहे हे मान्यय मला. प्रत्येक उत्पादक आपल्या मालाला जास्त मागणी यावी म्हणून निरनिराळ्या क्लुप्त्या योजीत असतो. धंदा झाला तरच त्याला अपेक्षित फायदा होत असतो. जाहिरातबाजी करून लोकांना आकर्षित करणे व आपला माल खपवणे हे उद्योजकाच्या दृष्टीने योग्यच असते. म्हणून तर शहरातील मुख्य ठिकाणी आपणास मोठमोठे फ्लेक्स दिसत असतात. ही उजळ माथ्याची जाहिरात असते. पण काही छुप्या जाहिरातीचेही तंत्र असते. हे पहायच असल्यास कोणत्याही सार्वजनिक मुतारीला सदिच्छा भेट द्यावी.
*सार्वजनिक मुतारी....हि जाहिराती करण्याचे मुख्य क्षेत्र बनलय. पूर्वी चित्रपट पोस्टर्स मुतारीच्या बाहेरील बाजूस लावून प्रसिद्धी केली जायची. सध्या हे प्रमाण कमीय. पण काही सार्वजनिक कार्यक्रमाची जाहिरात मात्र हमखास असते. कोणत्या तरी बुवाच्या सत्संगापासून ते संप मोर्चाची जाहिराती पण मुतारीवर खुलेआम नांदत असतात.पण हा खरा प्रश्न नाहीय. तुम्ही जर मुतारीच्या आतीला बाजूला गेलात तर एकाच व्यवसायाच्या असंख्य जाहिरातीचे क्षेत्र दिसून येते. या सर्व जाहिराती गुप्तरोग विषयी असतात. शीघ्रपतन , भगंदर , ताठरपणा कमी असणे , लिंग वाकडे असणे अशा अनेक प्रश्नावर "आमच्याकडे नामी इलाज " आहे अशा या सर्वसाधारण स्वरूपाची जाहिराती असते. वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येकाच्या जाहिरातीवर " भोंदू डाँक्टरपासून सावधान " अशी सूचना पण असते. हा या लोकांच्या धंद्याचा भाग झाला तरी या क्षेत्रातील वास्तव निराळे आहे. गुप्तरोगावर अथवा इतर लैंगिक प्रश्नावर आता शास्त्रीय पध्दतीने उपचार केले जातात. त्यासाठी "सेक्साँलाँजिस्ट " उपलब्ध असतो. त्याच्या सल्ल्याने योग्य उपचार घेतले तर समस्या निराकरण होताता. हे सेक्साँलाँजिस्ट आपल्या व्यावसायाचे असे फालतू पध्दतीने जाहिरात करत नाहीत. खरेतर याचा एक तोटा असा असतो की सर्वसामान्य माणसाला " सेक्साँलाँजिस्ट " माहिती होत नाही. त्यांना या समस्यावर वरील जाहिरातीतील "भोंदू उपचाराकडे" वळावे लागते. हे धोकादायक आहे. कारण यात समस्या निराकरण राहिले बाजूला अत्यंत अशास्त्रीय उपचार पध्दतीने भलतेच घडण्याची शक्यता जास्त असते. सरकारी पातळीवर अशा जाहिराती करणाऱ्या लोकांची कानउघाडणी करायला हवी. त्यांच्या उपचार पध्दती वर बारीक लक्ष ठेवून अशास्त्रीय उपचार करणाऱ्या भोंदूना कडक शिक्षा व्हायला हवी. यासाठी या क्षेत्रातील तज्ञांची सरकारने मदत घ्यायला हवी. तसेच लैंगिक उपचार शास्त्रीय पध्दतीने करणाऱ्या डाँक्टर मंडळीनी एकत्र येऊन शासानाकडे या भोंदूवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करायला हवा. लोकांना खरे शास्त्रीय ज्ञान मिळायला हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
सर्वसामान्य लोक ...गुप्तरौग म्हटल कि घाबरता. संकोचतात. लाजताता. परिणामी यावर खुले बोलणे टाळले जाते. उपचार पण लपूनछपून करण्याची मानसिकता बळावलीय. हे योग्य नाही. आपल्या आरोग्याची ही हेळसांड तुमचे जीवन नासवू शकते. तेव्हा शासनाने जनहितार्थ यावर लक्ष ठेवावे. या भोंदू व बनावट उपचार करणाऱ्या जाहिरातीवर त्या लोकांचा संपर्क नंबर असतो. योग्य चिकीत्सा करून कारवाई करायला ते पुरेस आहे. लोकांनी लैंगिकता या विषयावर जरा खुलेपणे बोलायला हवे. तरच ते भोंदूगिरीला बळी पडणार नाहीत. लोकहितार्थ " विवेकाचे बंधन " सरकार व या क्षेत्रातील तज्ञानी मनावर घ्यायला हावे.
*!! बनावट व फसव्या जाहिराती ..सावध रहा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन...( भाग १८ )*
*प्रतिनिधी सभागृहात श्रध्दांजली वाहून कामकाज चालू ठेवावे*

आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो. ग्रामपंचायतपासून जिल्हापरिषद , नगरपालिका ते महानगरपालिका , विधानसभागृह ते लोकसभागृह अर्थात संसदेच्या माध्यमातून आपण राज्यकारभार हाकत असतो. लोकप्रतिनिधी आपल्या समस्या वा इतर काही मतमतांतरे इथे मांडतात. चर्चा संवादा करून काही निर्णय घेतले जाताता. ही सभागृहे म्हणजे लोकांच्या समस्या निवारणाची केंद्रे आहेत अस म्हटल तर अतिशयोक्ती होऊ नये. ( अर्थात ही व्यवस्थित व सुरळीत कामकाजात सुरु राहिली तरच...) सभागृहातील निर्णयकडे नागरिकाचे डोळे लागलेले असताता. आपल्या प्रश्नावर नेमके काय निर्णय होतात यासाठी हि वाट पाहणे असते. सभागृह काटेकोरपणे चालणे हे समृद्ध लोकशाहीचे मुख्य लक्षण आहे. असे हे सभागृह सभासदांच्या गोंधळाने बरेचदा बंद पडते तेव्हा संताप होतो. कधीकधी एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या अथवा नैसर्गिक आपत्तीना बळी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहून कामकाज बंद ठेवले जाते.
*मृत्यू ....हा मानवी जीवनात अटळ असा भाग आहे. आजवर कुणालाही तो टाळता आला नाहीय. मृत्यूनंतर त्या व्यक्ती अथवा समुदायाविषयी आत्यंतिक प्रेमाची जाणीव उमटून आपण त्यांना श्रध्दांजली वाहत असतौ. हे योग्यच असते. लोकशाहीच्या सारे सभागृहात सुध्दा काही मोठ्या लोकांच्या व समुदायाच्या मृत्यूनंतर श्राध्दांजली वाहण्यात येते. हे सुध्दा बरोबरच आहे. प्रश्न ....प्रश्न आहे तौ असा की श्राध्दांजली वाहून झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज का बंद ठेवले जाते ?? प्रत्येक सभागृहाचा दैनंदिन खर्च हा लोकांच्या करातून होत असतो. हा खर्च अफाट असतो. श्रध्दांजली वाहून सभागृहाचे कामाला सुरुवात करण्यास हरकत ती कसली. त्या व्यक्तीच्या मोठेपणाला आपण नतमस्तक होणे हे आपले नैतिक कर्तव्य असते तसेच नैतिक कर्तव्य नागरिकांच्या करातून चाललेल्या सभागृहात कामकाज होण्यासंबंधी असावे. जी व्यक्ती इतकी मोठी असते ती नेहमीच आपल्या कार्यक्षेत्रात सतत कार्यान्वित असावी. मग अशा व्यक्तीला श्रध्दांजली वाहणेचा खरा उपक्रम हा आपण सुध्दा आपापल्या क्षेत्रात कार्यान्वित होऊन करणे अधिक चांगले. सभागृहाचे कामकाज रोखून चा वेळ लोकप्रतिनिधी नेमके काय करतात हा अभ्यासाचा विषय ठरावा. अगदी अपवादात्मक स्थितीत सभागृह बंद ठेवणे मान्यय हो. अपरिहार्य कारण समजू शकते. कलेच्या प्रांतात जसे " शो मस्ट गो आँन " असते तसेच " विवेकचे बंधान " प्रत्येक लोकप्रतिनिधी व सभागृहाला लागू असावे. मृत व्यक्तीचा मानसन्मान हा त्याला साजेशा कार्यातूनच व्यक्त होतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
या प्रत्येक सभागृहात विविध विषयावर निर्णय घेतले जाताता. कायदे केले जाताता. मग ह्या जिव्हाळ्याचे प्रश्नावर एकदा निर्णय व्हायला हरकत कसली. मृत्यूचे वास्तव स्विकारूनच मनुष्य जीवन पुढे जात असते. एक दिवस सभागृह बंद ठेवल्याने सभागृहाचा खर्च थांबत नाही. तेव्हा सदसदविवेकबुध्दी जागृत ठेवून याविषयी विचार व्हावा.
*!! अखंड कार्यरत...हीच खरी श्रध्दांजली !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग १९ )*
*शालेय सहलीची ठिकाणे "अभ्यासनीय " असावीत*

सहल...म्हटल की आनंदाची पर्वणी असते. त्यातही शालेय स्तरावरील सहली हा नेहमीच आपल्या कौतुकाचा विषय असतो. अनेक आठवणी जपलेल्या असतात आपण. ज्या ठिकाणावर आपली सहल जातै तो परिसर आपल्या डोक्यात कायमचा घट्ट राहत असतो. याची कारण वेगवेगळी असतात. हि ठिकाणे आपले शिक्षक ठरवत असतात. तिथे जाणे हे मुलामुलीना अपरिहार्य ठरते.
*शालेय सहली ...हा प्रत्येक शाळेचा तसेच पालकांच्याही औत्स्युकाचा विषय. या विषयात शिक्षक व पालकांची एकत्र भेट होऊन चर्चेतून ठिकाण ठरावायाला हवीत. होत काय की...शिक्षक हे कायमची ठिकाण दरवर्षी ठरवतात. ती प्रामुख्याने असतात धार्मिक स्थळे. कोणत्या तरी मंदिराला अथावा देवस्थानाला भेट असेच बहुतेक शालेय सहलीचे स्वरूप असते. ही शालेय सहल कमी व धार्मिक भेट जास्त होते. लहान मुलामुलीना कोवळ्या वयात धर्माचे अथवा दैववादाचे संस्कार हे घरातून होतात. त्याचाच पुढील भाग म्हणून शालेय स्तरावर होतो. खरेतर या वयात याची जरूरी असते काय ?? विचार व्हावा. वास्तविक शिक्षकांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा. शालेय शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे शिक्षणाचे मुख्य सूत्र असते. अशावेळी याला धारूनच साहली ह्या विविध विज्ञानकेंद्रे , थोरामोठ्याची स्मारके , धरणक्षेत्र , निसर्गसौदर्य असणारी ठिकाणे , समाजसेवी संस्था संघटना यांचे कार्यालये ( विशेषतः विज्ञानविषयक ) अशा वेगवेगळ्या ठिकाणी सहल असावी. या सहलीमुळे मुले वैज्ञानिक जाणीवेत रस घेऊ लागतील. शिक्षणाचा खरा हेतू साध्य होईल. कोणत्याही धार्मिक ठिकाणी जाऊन विद्यार्थी वर्गावर कोणते संस्कार होत असताता हे शिक्षकच जाणोत. वर सुचवलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी सहल आयोजित करण्याचा प्रयोग करायला हरकत नाहीय.*
अभ्यासक्रमला पूरक असेच ठिकाण सहालीसाठी ठेवावे असे " विवेकाचे बधन " शालेय स्तरावरील सहलीना घालावे लागेल. यासाठी आपण एक जागृत पालक म्हणून यासंबंधी आपली मते पालक मेळाव्याता सांगावीत. शिक्षकांना वेळोवेळी सूचना कराव्याता. शिक्षक वर्गानेही आपल्या विद्यार्थी हे मन , मेंदू आणि मनगट यांनी खंबीर बनतीला असे काम करायला हवे. याचाच एक भाग म्हणून शालेय सहली या धार्मिक ठिकाणापेक्षा इतर जीवनोपयोगी ठिकाणी नेण्याचे आयोजन करावे.
*!! सहली...मुलांना दैववादी बनवणार्या नसाव्यात ..तर त्याची वैज्ञानिक जाणीव बळकट करणाऱ्या असाव्यात !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग २० )*
*बायकोच्या मित्राचा आदर करावा...*

आजचे युग हे संपर्काचे युग आहे. जग हेच खेडे बनलय हे वास्तव आहे. माणसाला माणसाशी संपर्क साधण्यासाठी अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. साहजिकच यामुळ नव्या ओळखी होतात. मैत्री वाढते. शक्य तर प्रेमसुध्दा होता हे वास्तव आहे. संपर्काची असंख्य साधने बाजारात उपलब्ध असताना कुणाशी मैत्री होणारच नाही हे असंभव असते. मोबाईल व काँम्प्युटरचे माध्यमातून तर वेगवेगळ्या लोकाशी मैत्री हे नित्याचेच होऊन बसलयं. हे रोखता येण शक्य नाहीय. तेव्हा ते सहजपणे स्विकारणे हेच योग्य असते.
*आपण पाहतो...की आपल्या आजूबाजूला अनेकजण आपल्याशी मैत्री संबंध राखून असतात. हे संबंध वेगवेगळ्या मार्गातून निर्माण झाले असताता. हे संबंध जपणे व शक्य तर विधायक रूपाने वाढवणे अधिक चांगले असते. आपल्या संस्कृतीत स्त्रीला कोणत्याही स्वातंत्र्यसाठी झगडावे लागते. अन् हा प्रत्येक झगडा " पुरुष " नावाच्या प्रवृत्तीशी असतो. स्त्री ही सुध्दा आपल्या सारखी " जितीजागती माणूस " आहे हे पुरूष कबुल करत नाही. भडका इथे उडतो. होत काय की...मोबाईलवरील माध्यमातून पुरुषाला काही मैत्रीण भेटतात. तो दिलखुलासपणे तिच्या बरोबर बोलतो. सुखदुःख शेअर करतो. आपला भावनिक आधार जपतो. पण....पण हाच पुरुष हे स्वातंत्र्य आपल्या बायकोला देतो का ?? अगदी थोडे पुरुष हे स्वातंत्र्य देतात पण भलामोठा पुरुषसमुह मात्र याबाबतीत नाकं मुरडतो हे वास्तव आहे. जशी आपल्याला मैत्रीण आहे तशीच आपल्या बायकोला मित्र असू शकतो याचे भान तो ठेवत नाही. एका अनोळखी पुरुषाशी कसली ती मैत्री ...असा संशयाने पेरलेला सवाल तो सतत तिला विचारतो. कधीकधी आपल्या सभर्थनार्थ " माझ्या मित्रांमध्ये माझी काय इज्जत राहील " असा भुक्कड सवाल करतात. जणू काही हेच मित्र याला मैत्रीण असल्याबद्दल शाबासकी देतात जणू. नवरा व बायको हे नाते सामंजस्याचे व विश्वासाचे असते. आपल्या नवरोबाला असणारी मैत्रीण बायकोनै खुल्या मनाने स्विकारावी व आपल्या बायकोचा मित्र नवरोबाने दिलदारपणे स्विकारावा. हे " विवेकाचे बंधन " दोघांनी मनापासून स्विकारले तर जीवन अधिक सुंदर बनेला. याउलट कुणीही एकाने दुसऱ्याच्या स्वातंत्र्य आड येऊ घातले तरा सत्यानाश ठरलेला आहे. संस्कृती , पवित्रता , रुढी परंपरा या नावाखाली सतत स्त्री समाजाची मुस्कटदाबी करून पुरुषसत्ताक पध्दती दृढ झालीय . पण....पण आता नवे युग विज्ञान तंत्रज्ञान युग आहे. बंडखोरीला आपसूक चालना देणारे आहे. स्त्री पुरुष जीवन या बंडखोरीपासून कसे वाचेल ?? तेव्हा शहाणपण याताच आहे की " नव्या जीवन पध्दतीला जुळवून जगावै ". अन्यथा उगाचच निष्कारण वाद वाढवून जीवन नासाले जाईल.*
मित्रहो...किती काळ आणि कोणत्या कारणाने स्त्री मुक्तीची वाट रोखून धराल ?? विविध मार्गाने मुक्तीची पहाट तिच्या जीवनात उगवणारच. ती वाट अडवण्याचा विफल प्रयत्न करून स्वतःच्या माणूसपणाला घाण करू नका. मन खुले व उदार ठेवा. आपल्या बायकोला मनं आहे. भावना आहेत. त्या जपण्याचा अधिकार तिला आहे. तिच्या स्वातंत्र्याचा आदर करा. जशी आपल्याला मैत्रीण तसाच बायकोला मित्र हे समिकरण ध्यानात ठेवा. उगाचच संशयाची पेरणी करून जीवन बरबाद करू नका हेच सांगणे.
*!! आपल्या बायकोच्या ....स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते व्हा. जीवन अधिक सुंदर होईल !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन,....( भाग २१ )*
*निवडणूकवेळी दाखवलेला पक्षीय जाहिरनामा पाळायला हवा*

लोकशाही....म्हटलं की निवडणूक अटळच. भारतीय जनमाणसात निवडणूक म्हटलं की वेगवेगळे प्रवाह समोर येतात. प्रत्येक प्रवाहाला जनमाणसाचे मत मिळवून येथे सत्ता मिळवावी लागते. ही सत्ता पाच वर्षांसाठी असते. पुन्हा जनमत आजमावून सत्ता मिळवावी लागते. हे ढोबळ चित्र सर्वाना माहिती असते...
*निवडणूक काळात प्रत्येक राजकीय पक्ष आपापले जाहिरनामे अर्थात वचननामा सादर करत असतो. हे जाहिरनामे सामान्य जनता फारशी वाचत नसते हे खरे असले तरीही त्यातील ठळक बाबी त्यांच्यापर्यत बरोबर पोचलेल्या असतात. लोकांना हे जाहिरनामे " सत्यवचन " वाटत असते. लोक मोठ्या मनाने मत देतात ( बरेचजण पैसे घेऊन मतदान करतात हे ठाऊक ) पुढील पाच वर्षात आपले जीवन बदलणार ही अपेक्षा असते. दिवस सरत जातात अन् लोकांच्या अपेक्षा भंगत जातात. कालांतराने लोक सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या जाहिरनाम्याची गोष्ट विसरू लागतात... अन् इथेच सत्ताधारी वर्गाचे फावते. जाहिरनामा हा बंधनकारक नसतो , पण ज्यांना नैतिकतेची चाड आहे अशा राजकीय पक्षांनी स्वतःच हे "विवेकाचे बंधन " घालून घ्यायला हवे.राजकीय पक्ष आश्वासन देऊन सत्ता मिळवतात व नंतर आश्वासन विसरतात हे लोकांना माहिती होते आणि नकळत राजकारण व राजकारणी लोकांबद्दल चीड , संताप , राग येत राहतो. लोक " अराजकीय " बनू लागतात. खरा धोका इथेच असतो...लोकशाहीत मोठा समुदाय अराजकीय होणे म्हणजे लोकशाही धोक्यात येणे. आपल्याकडे निवडणूक आयोग नावाची यंत्रणा निवडणूक काळात लोकांसमोर येते.. निवडणूक झाली की यंत्रणा गायब होते. ही यंत्रणाच निवडणूक आचारसंहिता राबवत असते. या किंवा दुसऱ्या एखाद्या यंत्रणेला राजकीय पक्षांनी निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन अर्थात वचननाम्याची पाच वर्षात किती पूर्तता करतात यावर "वॉच " ठेवायला लावले पाहिजे. पुढील निवडणूक वेळी याचा सारांश लोकासमोर या यंत्रणेने जाहीर करावा व आपला चांगला-वाईट शिक्का मारावा. भारतीय लोक यंत्रणांवर विश्वास ठेवतात. तेव्हा या यंत्रणेने स्वतःची सद्सद्विवेकबुध्दी जागृत ठेवावी.. हा प्रयोग व्हायला हरकत नाहीय असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
आपल्या देशात "जिभेच्या शब्दाला " फार मोठा मान आहे. लोक शब्दासाठी आपले सर्वस्व गहाण ठेवतात...हा इतिहास ताजा आहे. ही खरेतर "अस्सल भारतीयत्वाची " लक्षणे आहेत. ही लक्षणे आता राजकीय पक्षांमध्ये यायला हवीत तरच आपली लोकशाही सच्च्या अर्थाने लोकशाही म्हणून पात्र होईल. त्यासाठीच हे " विवेकाचे बंधन " राजकीय पक्षाना लावायलाच हवे.
*!! शब्दाला जागणारा ..खरा भारतीय ....आणि जाहिरनामा पाळणारा तोच सच्चा राजकीय पक्ष !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग २२ )*
*किरकोळ कामाचे दर ...सारखे व स्वस्त असावेत*

पोटासाठी जो तो कमावत असतो. घामाच्या कमाईतून आपला जीवन व्यवहार सामान्य मनुष्य करत असतो. प्रत्येक माणसाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्या त्या गरजा पुरवित राहणे म्हणजे ढोबळ अर्थाने व्यवसाय करणे. व्यवसाय करणाऱ्याला पण पोट असतेच. आपल्या कमाईची रक्कम ठरविण्याचा त्याचा अधिकार मान्य असूनही ती कमाई दुसऱ्या कष्टकरी वर्गाची लुबाडणूक करणारी असू नये एवढे " विवेकाचे बंधन " लहानमोठ्या विक्रेत्याने स्वतः जाणीवपूर्वक घेतले तर फारच मोठी गोष्ट घडून येईल.
*आपल्या वेगवेगळ्या गरजा असतात. आणि सामान्य माणूस "रिसायकलींग " करतच वस्तू वापरत असतो. श्रीमंत माणूस किरकोळ वस्तू भंगारात काढू शकतो पण गरीब घटकाला हे शक्य नसते. आपल्या अवतीभवती पाहील तर....आपल्या घरी एखादी वापरात असणारी लेडीज पर्स अथवा पावसाळी जँकेट उदाहरणार्थ घेऊ. यांचे चेन अथवा रनर खराब झाले तर ते दुरुस्त करायला आपण अमुक एका व्यक्तीकडे जातो. रनर बदलायाचा असेल तर कमीतकमी ३० रुपये खर्चावे लागतात. रनरचे एकुण जडणघडणीचा खर्च माझ्या अंदाजाने ५ ते ७ रुपये असावा. तो बसवायची मजुरी मात्र जवळजवळ २० रुपयाहून अधिक असते. हे योग्य आहे का ?? विचार व्हावा. अशी छोटी पण महत्त्वाची कामे करणारी कमी लोक असतात. पण याचा अर्थ त्यांना लुबाडणूक परवाना दिलाय असा होत नाही . वापरातली पर्स अथवा पावसाळी जँकेट पुन्हा पुन्हा वापरणे हे कष्टकरी व गरीब वर्गच करत असतो. त्याच्या कमाईतील हिस्सा अशा जास्त नफेखोर पध्दतीने लुबाडणे हे योग्य नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. या दुरुस्ती करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात योग्य हमीभाव रक्कम स्थानिक प्रशासनाने ठरवून द्यावी. अशा प्रकारचे अनेक उद्योग यामुळे एका योग्य हमीभावात यावेत. यामध्ये त्या कष्टकरी वर्गाच्या घामाचे योग्य मोल त्याला मिळायलाच हवे ..त्याचबरोबर दुसऱ्या कष्टकरी वर्गाच्या घामाचे दाम लुबाडू जाऊ नयेत अशी न्याय्य व्यवस्था आखायला हवी. एक मोठी उपलब्धी यामुळे होऊ शकते. लोक वस्तू "रिसायकलिंग" पध्दतीने पुन्हा पुन्हा वापरतील. कच्चा मालाची बचत होईल. भंगार कमी होईल. याचा विचार व्हावा.*
शेवटी काय हो....पोट प्रत्येकाला असते. मात्र आपण मानवी जीवन हे सहजीवन म्हणून जगतो. यात आपल्या बरोबर दुसऱ्याच्या पोटाची काळजी करायला हवीच. तरच आपण माणूस म्हणून जगू शकू.
*!! जगा...अन् जगू द्या !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन...( भाग २३ )*
*परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांना .....*

बदल हा जगाचा नियम आहे हे खरे ....परंतु हा बदल काही आकाशातून घडून येत नाही. तर बदलासाठी कारण असावे लागते. कुणाचातरी हात असावा लागतो. कुणाचे तरी डोके लढावे लागते. कुणाला तरी संघटन बनवावे लागते. कुणाला तरी जनमत तयार करावे लागते. कुणाला तरी दबावगट निर्माण करण्यासाठी रणनीती आखावी लागते. अशा...कुणाकुणाच्या तरी माध्यमातून बदल हळुवारपणे घडत असतो. हे जे कुणी कुणी असतात त्यांना मी "परिवर्तन चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते " समजतो. समाजासाठी ही माणसे अत्यंत आवश्यक व अनमोल असतात. हि स्वतः घडतात व बरोबरच समाजही घडवतात. पण हे काही एका रात्रीचा चमत्कार नसतो. यासाठी अखंड साधना करावी लागते. लोभमोहाचे प्रसंग सोडावे लागतात. मनाला सतत विधायक अभ्यासाची जोड द्यावी लागते. काळ व परिस्थिती नुसार रणनीती आखावी लागते व ती यशस्वी होण्यासाठी कौशल्य अंगी असावे लागते. अशा बरेच गोष्टी एकत्र आल्यावर एक विधायक बदल घडतो व दिर्घकाल टिकतो.
*शहीद डाँ. नरेंद्र दाभोलकर...हे नाव सार्वानाच परिचित आहे. या निस्पृह व विवेकी माणसाबरोबर आयुष्यात दोन पावले विवेकी वाटेवर चालू शकलो ही भावना माझ्या सारख्या असंख्य छोट्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी आहे. दाभोलकर यांची शेवट भेट त्यांच्या खूनाच्या अगोदर साधारणपणे चार महिने प्रत्यक्षात झाली होती. संदर्भ होता कोल्हापूर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा प्रेरणा मेळावा. यावेळी आम्हा कार्यकर्त्यांना संबोधित करताना दाभोलकरानी एक महत्त्वाचा संदेश दिला होता. दाभोलकर म्हटले होते " परिवर्तन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी चार "प" पासून नेहमी दूर रहायला हवे. ते म्हणजे पद , पैसा , प्रतिष्ठा व प्रसिद्धी ". आजही हा संदेश मनावर कोरलाय माझ्या. अत्यंत समर्पक व योग्य सल्ला होता . या चार प पासून जो दूर राहू शकतो तोच "एक सच्चा विवेकवादी माणूस " बनू शकतो हे दाभोलकरांचे म्हणणे मला पूर्णपणे मान्यय. खरेतर हा सल्ला कमी व "विवेकाचे बंधन" जास्त आहे. हे विवेकाचे बंधन अवघड परंतु आनंददायी आहे. जो हे मनापासून स्विकारून कार्यरत राहील तो एक आनंददायी व्यक्ती असेल असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
आज शहिद डाँ. नरेंद्र दाभोलकर ...हे नाव समाजाला विधायक दिशा देणाऱ्या एका मार्गदर्शक माणसाचे नाव आहे. दाभोलकरानी सांगितलेला वरील सल्ला प्रत्येक माणसाने अवलंबिला तर समाज विवेकशील निश्चित बनेल. थोडे कठीण नक्कीच आहे पण अशक्य नाही. हे विवेकाचे बंधन परिवर्तन चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाने समजून घ्यावे व व्यवहार तसा करावा. डाँ. दाभोलकरांना एक प्रकारे ही आदरांजली आहे.
*!! विवेकाचा आवाज बुलंद...करूया !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग २४ )*
*इतिहासकार " तटस्थ " असावा*

"इतिहास हा माणसाला शहाणपण शिकवणारा विषय आहे " असे एका युरोपियन विचारवंताचे बोल आहेत. मानवी जीवनात वर्तमान व भविष्य जितके महत्त्वाचे असते तितकेच भुतकाळ महत्त्वाचा असतो. इतिहास म्हणजे घडून गेलेला प्रत्येक मागील क्षण असतो. या घडून गेलेल्या क्षणापासून आपण वर्तमानात काही शिकलो तर आपल्याला भविष्य सुकर होते. इतिहास हा सतत आठवणीत साठवावा लागतो. त्याची सतत उजळणी करावी लागते. त्याचे कालसुसंगत अर्थ लावावे लागतात. नुसत्या घटना व सणावळी मांडून इतिहास पुस्तकात रचायचा नसतो तर त्या घटनांचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन तारतम्य भाव जागृत ठेवून करायचे असते. हे काम इतिहासकार अथवा इतिहास संशोधक करत असतात. हे मानवी जीवन जतन करणारे लोक समाजजीवनात फार महत्त्वाची भुमिका बजावत असतात.
*इतिहासकार...खरेतर समाजाचे डोळे व मेंदू जोडणारा दुवा असतो. इतिहासात घडलेल्या घटना फक्त डोळ्यांनी पहायचे नसतात तर त्याचा सुसंगत अर्थ लावायचा असतो. हा अर्थ लावताना इतिहासकार " तटस्थ " असावा लागतो. त्याच्या वैयक्तिक जाणिवा त्याने इतिहासावर बिंबवायचे नसतात. अन्यथा इतिहास भरकटतो. अनेकदा भारतीय इतिहासात तटस्थपणा हा गुण वारंवार वरखाली होतो. "जात " हे याचे महत्त्वाचे कारण. इतिहासकार सुध्दा या जात नावाच्या आँक्टोपसच्या विळख्यात सापडलेले आपण पाहतो. एखादा प्रज्ञावंत असूनही केवळ आपल्या जातीच्या भल्यासाठी इतिहासाची चाके आपल्या दिशेने फिरवणारे इतिहासकार आपणांस ठाऊक आहेत. स्वतःच्या जातीचे हितसंबंध जपण्यासाठीच जणू यांनी सुपारी घेतलेली असते. या अशा इतिहासकारामुळे इतिहास संशोधनाची वाट लागते. त्याचे परिणाम पुढील समस्त पिढ्याना भोगावे लागतात. समाजात सतत अस्मितेच्या नावाखाली तणाव चालू राहतात. खरा इतिहासकार हा निर्लेप वृत्तीचा असावा लागतो. त्यासाठी संशोधनाची चाड , अभ्यासाची योग्य बैठक , दुरदृष्टी , कालसुसंगत अर्थ लावण्याचे कौशल्य , कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी वाहणारा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे संशोधनात पुढील काळात काही नवे पुरावे समोर आले तर त्या पुराव्यांना प्रमाण मानत इतिहासाची पुर्नमांडणी करणारा असावा. इतिहासकारांसाठी हे " विवेकाचे बंधन " आहे. ते जर त्यांनी कसोशीने पाळले तर खात्रीने समाजात एकता व स्वास्थ्य नांदू शकते. इतिहास शहाणपण शिकवतो हे बोल म्हणून मला प्रामाणिक वाटतात.*
इतिहास सृंशोधनाच्या वाटा ह्या अशा तारतम्य राखणारे असावी लागतात. नवनवे संशोधन समोर यावे लागते. प्रत्येक इतिहासाची मांडणी ही कालसापेक्ष खरी असते. नवे पुरावे समोर येताच इतिहासाची पुर्नमांडणी सुरु हौते. ती आवश्यकच असते. फक्त ....ती करताना आपल्या वैयक्तिक अस्मिता बाजूला ठेवणारा इतिहासकार हवा....समाजात अशा माणसांची फारच कमी आहे...दुर्दैवाने .
*!! इतिहास आकलनाच्या नव्या वाटा....समाजाला शिकवल्या पाहिजेत !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन...( भाग २५ )*
*अतिरिक्त वस्तूंचा साठा कशासाठी ....*

आपल्याला एक नेहमी सवय असते. वस्तूंचा ढीग रचायचा. एकाच प्रकारच्या अनेक संख्येने वस्तू बाळगायच्या. यूज अँड थ्रू अशा पध्दतीने जगून कचरा वाढवत रहायच. " आपली वस्तू " हि संकल्प मागे पडून " माझी वस्तू " या संकल्पनेकडे आपली वाटचाल सुरुय. अनावश्यक अथवा अतिरिक्त वस्तू इतक्या अंगवळणी पडतात की आपण स्वतः कधीकधी अनावश्यक वस्तू वाटायला लागतो. म्हणून ...म्हणून हे " विवेकाचे बंधन " स्वेच्छेने पाळावे असे मला वाटते.
*आपलं घर....किती चांगले सजवतो आपण. पण या घरातच किती अतिरिक्त गोष्टी असतात ते बघायला हवां. टिवी उदाहरण घेऊ. बंगला असेल अथवा चार खोल्याचे मोठे घर . हाँलमध्ये एक ...बेडरूममध्ये एक ...मुलांच्या खोलीत एक ...जमलच तर गेस्ट रुम तर तिथेही एक . एका घरात दोन तीन टिवी असतात. खरंच इतकी गरज असते ?? किमान टिवी निमित्तानं एकत्र बसावा एवढे तरी समजून घ्यायला हवं. दुसरे म्हणजे ...घरी वापरणारी गाड्या. घरात माणसे चार अन् गाड्या सहा अशी अवस्था आहे. विदाऊट गिअर एक , गिअरवाली एक , स्पोर्टस बाईक एक , चारचाकी किमान एक , यातील प्रत्येक गाडी "चाँईस " म्हणून आणखी एकेक. गाड्यांचे जणू गँरेजच असते आपल्या घरी. माँल मध्ये फिरून खरेदी करायची भारी हौस आपणांस. त्यामुळे कपड्यापासून अनेक छोट्या मोठ्या वस्तू परतपरत खरेदी करायची सवय आपणास जडलीय. असूदे ...एक स्पेअरला असे म्हणत अनेक वस्तू साठत जातात. खरेतर...प्रत्येक वस्तूला एक मुल्य असते. ते चुकवूनच आपण वस्तू घेतो. ते मुल्य मार्केटमध्ये पुन्हा फिरते व पुन्हा वस्तू निर्माण करते . पण.....पण वस्तूंचे रिसायकलींग करण्याची पध्दती आपणांस सांगितली अथवा शिकवली जात नाही. मार्केटचा सवाल असतो ना...फायदा महत्त्वाचा. जरा बारकाईनं पाहील तर अशा अनेक वस्तू आपल्याला सुचतील. मोबाईलपासून साडीपर्यत व चपलांपर्यतही. जयललिता माहिती आहेतच आपणास. त्यांच्याकडे दहाहजार साड्या व साडेसातशे चप्पलजोड होते म्हणे. दिवसाला दोन साड्या धरल्यातरी आज नेसलेली साडी चौदा वर्षाचा वनवास भोगूनच पुन्हा नेसायला हवी. हे योग्य व जरुरी आहे का ?? विचार व्हावा.*
पैसा आहे म्हणून तो कसाही वापरावा हे योग्य नसते. मार्केट उठावाला महत्त्व देते, गरीब श्रीमंतीला नाही. हे मार्केट सर्वांना सोईचे असेल अशा तर्हेने ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी वागायला हवं. आपल्या बरोबर इतरानांही थोडेफार जगण्याची सोय उपलब्ध असणे ही किमान माणूसपणाची अट असते. तेव्हा आपल्या गरजा योग्य पण आवरत्या ठेवल्या तर अनावश्यक ढिग रचायची गरज नसते. वस्तूंचे मुल्य त्याच्या खरेदीवरही ठरत असते. तेव्हा जरा नीट विचार करावा एवढेच मतं.
*!! आवश्यक गरजा जरूर पूर्ण करा....पण अनावश्यकपणा टाळा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग २६ )*
*प्रवास तिकिटावर डेपो क्रमांक असावा..*

प्रवास.....हा कुणाला आनंददायी तर कुणाला त्रासदायक अनुभव असतो. पण प्रवास केल्याशिवाय लांबवरचा माणूस भेटत नाही. प्रवासाची आर्थिक तयारी जशी करावी लागते तशीच बरेच जणांना मानसिक तयारीही करावी लागते. या तयारीत काही गोष्टी विसरूनही जातात. काही वेळा भांबावलेपण येते. प्रत्येक प्रवास सुखदायक होईलच अस नसले तरीही छोट्या छोट्या गोष्टींची "विवेकाचे बंधन " जर लागू झाले तरीही बरेच चांगले घडू शकेल.
*प्रवास...हा करावाच लागतो. काही कामानिमित्त तर काही सहज म्हणून घडत असतो. अशावेळी आपण तयारी करतोच. ही पोस्ट मुख्यतः जी सर्वसामान्य लोक शासकीय वाहनातून अर्थात एस टी तून करतात त्यांकरीता आहे. एस टी प्रवास -- सुरक्षित प्रवास असे ब्रीद आहे. ते बरेच अंशी खरं आहे. पण एस टी "लागते " म्हणून बरेचदा प्रवास टाळला जातो. या "लागण्याच्या " प्रक्रियेत अनेकदा चूक घडते. एखाद्या स्टाँपवर एस टी थांबली की " मोकळे " होण्यासाठी उतरणारे प्रवासी आपण पाहतो. कधीकधी या लोकांची एस टी चुकते. अर्थात ही लोक मागे राहतात अन् एसटी निघून जाते. या सर्वसामान्य लोकांचे साहित्य एसटी तच असते. अशावेळी काय करावे हे सुचत नाही. धावपळ उडते , तारांबळ होते. वास्तविक दोष एसटीचाही नसतो. पण ....पण या सर्वसामान्य माणसाने तिकिट घेऊन प्रवास केलेला असतो. याअर्थी एसटी त्याच्या हर सुरक्षेला बरेच अंशी जबाबदार असते. यामध्ये एक छोटीशी कृती एसटी खात्याने केली तरी बरेच प्रश्न सुटु शकतात. प्रवासी जे तिकिटे घेतात त्या पाठिमागे प्रवास जिथून सुरु होतो अन् जिथे संपणार असतो त्या डेपो चौकशी खिडकिचा फोन नंबर जर तिकिटावर छापला असेल तर वेगवेगळ्या अडचणीवेळी तात्काळ मदत मिळू शकते. तसेच बरेच प्रश्न सुटु शकतात. यावर विचार व्हावा.*
एसटी....सुरक्षित असते यात वाद नाहीय. पण ती अधिक आनंददायी झाली तर लोक स्वतः हून एसटी पर्याय निवडतील . यासाठी अशा छोट्या पण महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध झाली तर सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल असे मला प्रामाणिकपणे वाटते . वर नोंदवलेला अनुभव बरेच लोकांना आला असण्याची शक्यता आहे.त्यांची त्यावेळची आठवण या निमित्तानं जागी होईलच पण अशा सुविधा प्राप्त झाल्या तर एसटी अधिक सुरक्षित वाटेल. आपणास काय वाटते ??
*!! प्रवासातील छोट्या पण महत्त्वाच्या सुविधा....सार्वजनिक वाहतूक फायदेशीर बनवू शकतात !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग २७ )*
*आशिर्वाद देताना " विवेक " हवा...*

"तुमचे कल्याण होवो " असा आशिर्वाद आपण भारतीय मनःपूर्वक देत असतो. हा आशिर्वाद अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. एखाद्या मोठया कामासाठी बाहेर पडताना आपण घरी आई वडिलांचे , गुरुजनांचे आशिर्वाद घेत असतो. देवाकडेही बरेच जण आशिर्वाद मागतात. यामागचा हेतू हा की माझे काम फत्ते व्हावे यासाठी आपला आशिष माझ्या मागे असूदे. ही भावना सार्थ व नैसर्गिक आहे. त्या आशिर्वादाचा प्रत्यक्षात त्या कामात उपयोग होत नसतो हे वैज्ञानिक सत्य माहिती असूनही वारंवार ही कृती माणसाकडून घडत असते. यामागे बहुधा एकटेपणाची भावना लोपून समूह आपल्या बरोबर असला तर अंगीकृत कामात आपणांस बळ वा धैर्य मिळते हा कयास असावा.
*आशिर्वाद....घेणारा व देणारा इथे महत्त्वाचे आहेत. आपण काय अगदी कुणाकडेही आशिर्वाद मागत फिरत नसतो अथवा कुणालाही आशिर्वाद देतही फिरत नसातो. पण....पण एक महत्त्वाचे "विवेकाचे बंधन " आपण घालून घ्यायला हवे. आपण आशिर्वाद कुणाला द्यावा याचा विवेक आपणाजवळ असावा. योग्य व्यक्ती व योग्य काम हे किमान निकष असावेत. यासाठी आपण महाभारताचा दाखला घेऊ. रणांगणावर श्रीकृष्ण आपल्या बरोबर असायला हवा तर आपला विजय सुकर होईल अशी पांडव व कौरव दोघांचीही भावना हौती. म्हणून पांडवाच्या वतीने अर्जून व कौरवांच्या वतीने दुर्योधान दोघेजण कृष्णाला भेटायला गेले. दुर्योधनाचा पूर्वेतिहास ठाऊक असल्याने कृष्णाने अर्जूनाला साहाय्य करण्याचे कबूल केले. पांडवांचे मनोधैर्य तिथे मोठ्यानं वाढले. हा आशिर्वाद जर कृष्णाने दुर्योधनाला दिला असता तर ?? इथे महाभारत घडले की नाही हा मुद्दा नाहीय तर कृष्णाचा "विवेक " महत्त्वाचा आहे. यापासून एवढेच शिकावे की आपला आशिर्वाद अर्थात सहाय्य हे "विधायक बाजूला " असावे. कुणाच्याही माथ्यावर हात ठेवताना प्रथम ते डोके कोणत्या वळणाचे आहे आणि त्या डोक्यात कोणते हेतू आहेत याचा प्रथम अंदाज घ्या. केवळ उद्या आपणांस उपयोगी पडेल म्हणून कुणालाही आशिर्वाद अथवा सहाय्य करू नका. हे विवेकाचे बधन फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते.*
शेवटी काय हो....खरेतर आपल्या आशिर्वादाने मूळ परिस्थिती बदलत नसतेच पण....पण ज्या डोक्यावर आपण हात ठेवतो त्याला मनोधैर्य वाढण्यास मदत होते. तेवढेच पुरेसेही असाते बरेच कायापालट करायला. म्हणून योग्य व्यक्ती व योग्य हेतू यांच्या पाठीशीच आपण असावे.
*!! समाजात विधायक बदलासाठी....आशिर्वाद असावा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग २८ )*
*मानसिक आरोग्यासाठी....*

ताणतणाव अथवा उदासिनता हा नजीकच्या काळातील सर्वात मोठा गंभीर आजार म्हणून गणला जाईल. जसे आपले पोट बिघडते , खांदे दुखतात , घसा खवखवतो , डोके दुखते अथवा इतर काही तत्सम आजार आपणांस होतात तसेच आपले मनंही आजारी पडते. व त्याला योग्य समुपदेशन व औषधोपचाराने पूर्ववत बनवता येते. यालाच ढोबळपणे "मानसोपचार " म्हटल जाते.
*होतं काय की....आपल्या समाजात मन आजारी पडते ही संकल्पनाच नीट रुजली नाहीय. मानसोपचार सुरु आहेत म्हणजे तो ठार वेडा झाला अशी मूर्ख बतावणी रुढ आहे. त्यामुळं लोक या योग्य व शास्त्रीय उपचारापासून दूर पळतात आणि अशास्त्रीय भोंदूगिरीला बळी पडतात. व्यक्तीचे बौध्दिक , मानसिक व आर्थिक नुकसान होते. म्हणून ...म्हणून तर मानसोपचाराची योग्य ओळख करून घेणे व त्याचा प्रचार करणे हे विवेकी व जबाबदार नागरिकांसाठी " विवेकाचे बंधन " आहे. यामध्ये समाजहित सामावलयं म्हणून. जीवनातील प्रचंड स्पर्धा , कुटुंब व्यवस्थेचे बदलते स्वरूप , टिकून राहण्याची धडपड यातून सर्वसामान्य ते श्रीमंत वर्गापर्यत सर्वधर्मीय लोक ताणतणावाखाली जगतात.जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो की , भारतातील एकूण आरोग्य व्यवस्थेवर जो खर्च होतो त्याच्या फक्त १% मानसिक आरोग्यावर खर्च होतो. संपूर्ण भारतात मानसिक उपचार करणारे फक्त ४००० डाँक्टर आहेत. याचा अर्थ दहाहजार लोकांमागे फक्त ३ डाँक्टर. यामुळे होत काय की...७०% मानसिक आरोग्याचे रुग्ण अंधश्रध्दा जोपासणारे चुकीचे व अघोरी उपाय योजतात. सौम्य व गंभीर मानसिक आजार , लहान मुले वा वृध्दाचे मानसिक आजार ,स्त्री पुरुष लैंगिक समस्या , महिलांचे मानसिक प्रश्न यातूनच अंधश्रध्देची बुवाबाजी वाढते. भोंदू बुवा वाढतात. विवेक नाहीसा होतो. मानसिक आरोग्याचा प्रश्न हा थेट समाजपरिवर्तनाशी जोडला गेलाय. त्यामुळे त्याचा प्रतिवाद सर्व स्तरातून व्हायाला हवा असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
मानसिक आजारावरील सुविधा लोकांपर्यत पोचवण्यासाठी मानसोपचार तज्ञ, समुपदेशक , विशेष प्रशिक्षित नर्स अशा सर्वानी स्वतः हून हे " विवेकाचे बंधन " समाजपरिवर्तनासाठी घ्यायला हवे. त्यासाठी अंधश्रध्दा उच्चाटन व जनसंवाद असे मार्ग वापरायाला हवेत. मानसिक आरोग्याचा प्रश्न हा राष्ट्रबांधणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा याचा जरुर विचार व्हावा....
*!!समाजपरिवर्तनासाठी.....चला , मानसमित्र बनूया !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग २९ )*
*बालक - पालक आणि रिक्षावाले मामांसाठी...*

आपण आजकाल पाहतो...की आपली मुले शाळेला जाताना एका रिक्षातून जात असतात. शाळा दूर असते व आपल्याकडे रोचचा वेळ उपलब्ध नसतो तेव्हा आपण हा रिक्षा वाहतूकिचा मार्ग निवडतो. रिक्षा वेळेवर येते , मुले शाळेत पोचतात व संध्याकाळी वेळेत घरी पोचतात. म्हणजे एक प्रकारे रिक्षावाले मामा म्हणजे आपले कुटुंब सदस्यच बनून जातात.
*रिक्षा आणि रिक्षावाले मामा...यांच्या बाबतीत समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतात. इथे आपण फक्त शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षावाले मामा विषयी बोलतोय. होत काय की....एखाद्या वेळी दुर्घटना घडते आणा सरसकट सारेच खापर रिक्षावाल्यांच्या डोक्यावर फोडले जाते. कितीही सत्यांश असता तरीही एक महत्त्वाचे ध्यानात असावे की , आपली मुले सुरक्षित रहायची असतील तर या रिक्षावाले मामांची "सुरक्षितता " जपायला हवी हे वास्तव आहे. यासाठी पालकांनी रिक्षावालेंशी भावनिक बंध जपायला हवेत. त्यांची मासिक फी वेळेवर न कुरकुरता द्यायला हवी.शासनानेही एक राष्ट्रीय बधन म्हणून या रिक्षाकरता माफक दरात इंधन पुरवावे.या रिक्षाचा रंग वेगळा असावा. शक्य झालं तर अंबर दिव्यासारखा एखादा दिवा रिक्षावर लावण्याचे बंधन असावे. जेणेकरून कोणत्याही अडिअडचणीवेळी लौकर मदत पोचू शकेल. रिक्षावाले मामांनीही "विवेकाचे बंधन " खूशीने घ्यायला हवे. "बालकांची सुरक्षितता " हा अग्रक्रम मानून रिक्षा कायमस्वरुपी अपडेट असावी. किरकोळ कारणही नजरअंदाज करू नये. घरचे अथवा बाहेरील टेन्शन मागेच सोडून रिक्षा स्टार्ट करावी. रिक्षातील लहान बालकांशी पोटच्या पोराप्रमाणे व्यवहार करावा. थोडा वेळ झाला म्हणून लगेचच चिडचिड करू नये. रिक्षामध्ये कोंबड्याप्रमाणे मुले कोंबू नयेत. हे विवेकाचे बधन पालक / शासन व रिक्षावाले मामा या सर्वानी स्विकारायला हवे असे मला वाटते.*
खरं सांगायच तर....या रिक्षा केवळ मुलामुलींचे शालेय वाहतूक करणाऱ्या साधन नसून समृद्ध राष्ट्रांचे भवितव्य घडवणारे प्रवाह आहेत. यासाठी या सूचना गांभिर्याने घ्याव्यात. इतकेच सांगणे.
*!! बालकांची सुरक्षितता ....हाच अग्रक्रम !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन.....( भाग ३० )*
*आपल्या बरोबर "इतर" जणांचा विचार व्हावा...*

ह्या सुंदर जगात आनंदाने जगण्याचा हक्क जसा आपणांस आहे तसाच इतर जणांनाही आहे. हा विचार म्हणजे "विवेकाचे बधन " ठरू शकते. जगातील सर्व प्राणीमात्रांनी एकमेकांचा विचार केला तरच आपण मानवजाती म्हणून शिल्लक राहू. अन्यथा केवळ पैसा आहे व तंत्रज्ञान आहे म्हणून सगळं आपणच ओरबडून खायच ही अमानुष रित झाली. चंगळवादालाही मर्यादा असावी हाच मनी हेतू धरून ही पोस्ट लिहीतोय.
*ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ९८ ...चा एक संदर्भ वाचनात आला अन् सून्न झालो. जगामध्ये सर्वाना मुलभूत शिक्षण देण्याचा खर्च ६ अब्ज डाँलर आहे. जे अजून शक्य झालं नाहीय. परंतु एकटी अमेरिकन जनता ८ अब्ज डाँलर केवळ सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करते. जगात सर्वाना पाणी व स्वच्छता यांसाठी खर्च आहे ९ अब्ज डाँलर. हे अजून साध्य नाहीय. पण अमेरिकन जनता केवळ आईस्क्रीमवर ११ अब्ज खर्च करते. सर्व स्त्रीयाना प्रसूती आरोग्याचा खर्च आहे १२ अब्ज डाँलर जे आपल्या आवाक्याबाहेर म्हटल जाते पण...पण युरोप अमेरिकन जनतेचा सुगंधी द्रव्याचा खर्च आहे १२ अब्ज डाँलर. प्राथमिक आरोग्य पोषणासाठी अभिप्रेत १३ अब्ज डाँलर मिळत नसताना युरोप अमेरिकेत मांजर - कुत्र्याच्या आहारावर १७ अब्ज खर्च करतात. याशिवाय युरोप सिगरेटवर ५० अब्ज संपवते. मादक पदार्थावर ४०० अब्ज खर्च होतात. अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगाचा लष्करी खर्च आहे ७८० अब्ज डाँलर. ( ही आकडेवारी १९९८ सालची ) या आकडेवारीवर वेगळे भाष्य आवश्यक आहे का ??*
चंगळवाद किती ओतप्रोत भरलाय ते ध्यानात येते. नैसर्गिक संपत्तीच्या लुटीवर अंकुश असायलाच हवा. पैसा व तंत्रज्ञान आहे म्हणून आपल्याला हवे तसे जगायचे हा फाँर्म्युला अत्यंत घातक आहे.श्रीमंत हे जगाचे विश्वस्त असायाला हवेत , दरोडेखोर नव्हे. स्वतः छान जगाच पण..पण गरीब बांधवाला किमान गरजा पुरवणे हा " मानवधर्म " आहे. त्याला सच्चा दिलाने जागूया....इतकेच .
*!! चंगळवाद रोखा....मानवधर्म वाढवा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ३१ )*
*धरणग्रस्तांचे अश्रू ....संपावेत*

पाणी ...हे जीवन आहे. सर्वात बहुमोल अशी ही गोष्ट. हे पाणी आपल्या घरी एक दिवस आले नाही तर आपल्या डोळ्यांत पाणी येते. पाण्याशिवाय मानवी जीवन हे अशक्य आहे. म्हणून या पाण्याला आपण जीवन म्हणतो. पण...पण हे पाणी जरी आकाशातून पडत असले तरीही ते साठविण्यासाठी अतोनात कष्ट व जाणीवपूर्वक काही गोष्टी त्याग कराव्या लागतात हे वास्तव आहे. म्हणून तर पाण्यासंबधी कृतज्ञ असायलाच हवे पण या पाण्यासिठी ज्यांनी त्याग केलाय त्यांच्या संबंधीही आपण कृतज्ञ असलेच पाहिजे. हे " विवेकाचे बंधन " सर्वानी जपावे.
*धरणग्रस्त जनता....ज्यांनी धरण बांधण्यासाठी व नंतर ते पाणी वाहून नेण्यासाठी आपली घरे , शेती , जमिनी यांचे त्याग केली ती जनता. या धरणग्रस्तांना शासनाने धरण बांधाताना काही गोष्टी कबूल केलेल्या असतात. धरण होऊदे मग तुमचेही कल्याणच आहे असा विश्वास जागवलेला असतो. या विश्वासाला व लोकहिताकरता ही जनता आपल्या सर्वस्वाचा त्याग करायला सिध्द होते. ( कधीकधी त्यांच्या पुढे शासनदरबारी झुकण्याशिवाय पर्यायच नसतो हे वास्तव ) धरण तयार होते...पाणी साठते...पाणीपुरवठा व वीज सुरु हौते...अन् तरीही शासनाने कबूल केलेल्या गोष्टी या जनतेच्या ताटात येत नाहीत. तेव्हा हे हवालदिल होतात..मोडतात..पुन्हा उठतात आणि शासनाकडे आपल्या न्याय्य मागण्याकरता हेलपाटे सुरु करतात. वर्षे निघून जातात पण हक्क मिळत नाहीत. मग डोळ्यांत अश्रू साठतात. तुम्ही एकदा तुमच्या कलेक्टर आँफीसकडे बघा तरी....अधेमधे बरेचदा ही धरणग्रस्त मंडळी आपल्या न्याय्य हक्कासाठी आपल्या बायकापोरासाहीत ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता ठिय्या मारून बसलेली असतात. त्यांना ना पोटासाठी अन्न असते ना प्रातःविधीची सोय. कसही आवरायच अन् शासन अधिकारी कडे डोळे लावून बसायच हाच दिनक्रम असातो. मायबापहो ! एक विवेकाचे बंधन आपण स्विकारूया. ज्यावेळी असे धरणग्रस्त दिसतील तेव्हा त्यांच्या जवळ जाऊन त्यांना किमान शब्दाव्दारे आधार देऊया. त्याच्या डोळ्यातील वेदना समजून घेऊया. शक्य झालं तर त्यांना भाकरी देऊया. ध्यानात असूदे ....ह्या लोकांच्या त्यागावरच आपल्या घरी पाणी वाहत असते. त्याची जाण राखूया असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
एखाद्या माणसाला अश्रू मुक्त करणे हे परिवर्तन आहे. हे अश्रू जर आपल्या कारणे वाहिले असतील तर ती जाणीव ठेवून ते अश्रू पुसणे हे कर्तव्य व मानवधर्म आहे. धारणग्रस्ताना बेदखल करू नका , टाळू नका ..कारण त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे धरणातील पाणीसाठ्यापेक्षाही अनमोल आहेत. आपल्या बांधवांचा सन्मान करा ...शक्य झालं तर त्यांच्या लढ्यात त्यांना साथ करा. इतकेच सांगणे.
*!! धरणग्रस्त बांधवांनो....आम्ही तुमचे ऋणी आहोत !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बधन...( भाग ३२ )*
*मंत्र्यांचे दौरे...सर्वसामान्य वेठीस कशासाठी*

आपण लोकशाही व्यवस्था स्विकारलीय. आपण आपले लोकप्रतिनिधी निवडतो. निवडून येण्याअगोदर उमेदवार हात जोडतो अन् निवडून आल्यावर आपण त्यांना " साहेब " म्हणत पाया पडायला लागतो. लोकशाही व्यवस्थेत सारे समान असे तत्व आहे. मग...हे आमचे " साहेब " काय आमच्या पेक्षा निराळे असतात काय ?? खरेतर हे लोकांचे सेवक असतात. पण आमच्या जनतेची करामत अशी की त्यांना सेवकाची " साहेब " करून टाकते.मग ह्याना विशेष वेगळा मानसन्मान सुरु होतो. अन् इथेच लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात दरी रुंदावते.
*आमचे कार्यक्षम मंत्री ...जेव्हा दौऱ्यावर येताता तेव्हा त्यांचा रुबाब पाहण्याजोगा असतो. एक मंत्री ....अन् पाठोपाठ खासदार आमदार नगरसेवक शासकीय अधिकारी आणि हितसंबंधी लोकांच्या गाड्यांचा ताफा असा सरंजाम असतो. ही सरंजामी व्यवस्था ज्या रस्त्यावरून जाते तो रस्ता सर्वसामान्य माणसाला वाहतुकीला रोखला जातो. सामान्य माणूस हा सरंजामी लवाजमा नुसता पाहत असतो. कुणाला शाळेत जायची घाई तर कुणाला कामावर वेळेत पोचायचे असते पण...पण हे मंत्रीमहाशय गेल्याशिवाय रस्ता मोकळा होत नाही. मनातल्या मनात तो घालमेल जोखत असतो. मंत्री सुरक्षेकरता हे पाऊल उचलावे लागते म्हणे. मला तरी या देशात कुणाही मंत्री महोदयांच्या जिवाला धोका आहे असे वाटत नाही. इथे मला वि. स. खांडेकर आठवतात. भाऊंकडे एक मंत्री समाजकल्याणाचा मार्ग विचारायला आपल्या ताफ्यासहीत आले होते. भाऊनी सांगितलं की.."लोककल्याणाचा एक मार्ग सांगतो. यापुढे सर्कीट हाऊसपासून चालतच माझ्या घरी या. वाटेत तुम्हाला लोक भेटतील. त्यांच्याशी बोला. म्हणजे तुम्हाला लोककल्याणाचा मार्ग सापडेल ". भाऊंनी पुढे पुस्तीही जोडली की पूर्वी राजे लोक वेष पालटून रात्रीच्या वेळी बाहेर पडायचे व रयतेशी संवाद करायचे. खांडेकरांचा हा सल्ला लाखमोलाचा आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
लोकप्रतिनिधीनी जनतेशी दुरावा राखू नये. जनतेला आपल्यामुळे त्रास होईल अशी सरंजामी वृत्ती बाळगू नये. अन्यथा ...ये पब्लिक है , ये सब जानती है. सुज्ञास अधिक काय सांगावे.
*!! लोकप्रतिनिधींनो...तुमच्या सारखीच आम्हा सर्वसामान्य लोकांची पण महत्त्वाची कामे असतात हो...वाईचं समजून घ्या !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विवेकाचे बंधन....( भाग ३३*
*राष्ट्रपती महोदयांनी "राष्ट्रपित्याचा " हा आदर्श घ्यावा*

आपल्या देशाचा कारभार राष्ट्रपती महोदयांच्या नावे चालतो. देशातील सर्वोच्च व्यक्ती असे या पदाचे स्वरूप आहे. प्रधानमंत्री पेक्षा अधिकार कमी असले तरीही या पदाचा गरीमा औरच आहे. या पदाचा सन्मान आदरणीय असाच आहे. तरीही .....तरीही जसे "विवेकाचे बंधन " इतरांना लागू होते तसेच आमच्या आदरणीय राष्ट्रपतीनाही लागू होते असे " एक सर्वसामान्य भारतीय माणूस " म्हणून मला प्रामाणिकपणे वाटते.
*राष्ट्रपती ....ज्या निवासस्थानात राहतात त्याला राष्ट्रपती भवन म्हटल जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात गव्हर्नर जनरलसाठी ही वास्तू १९२९ साली बांधली गेली. आज स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाचे प्रमुख राष्ट्रपती हे या ठिकाणी राहतात. ही वास्तू ३२० एकरांत बांधली गेलीय. एकूण ३४० खोल्या आहेत. ७५० लोक इथे स्टाफ म्हणून काम करतात. दरवर्षी सुमारे १०० कोटी रूपये राष्ट्रपती भवनाचा खर्च आहे. विचार करा....ज्या भारत देशात गरीब लोक साधारणपणे ७७% राहतात. ज्यांना स्वतःच्या मालकीचे पाय पसरण्याएवढेही घर अथवा जागा नाहीय असे कोट्यावधी भारतीय आहेत."विकसनशील देश " म्हणून भारताला जगात ओळखले जाते. मग...मग या गरीब देशात राष्ट्रप्रमुख असले तरीही इतका खर्च व लवाजमा असावा का ?? विचार व्हावा. राष्ट्रपतीची सुरक्षा हा मुद्दा मान्यय मला. पण आजवर "देशाच्या राष्ट्रपतीना जिवाचा धोका " अशी बातमी मी तरी कधी ऐकली नाही. या पदाचा योग्य मानसन्मान राखला जावाच हे मान्यय मला. पण इथल्या गरीब रयतेचे राष्ट्रपती हे पद " प्रमुख " आहे हे ध्यानात घेता यावर विचार व्हावा. इथे मला " राष्ट्रपिता " महात्मा गांधीजी आठवतात. एका छोट्याशा आश्रमातून त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ चालवली. अत्यंत साधी राहणी हे बापूंचे वैशिष्ट्य. कोणताही बडेजाव या भारताच्या सर्वोच्च नेतृत्वाने कधी मिरवला नाही. मग...मग गांधींचा आदर्श आजच्या सर्वोच्च भारतीय नेत्याने का गिरवू नये ?? कालसुसंगत धोरण आखून , योग्य तेवढे औचित्य राखून , आमच्या राष्ट्रपतीनी जर आपला डामडौल कमी केला तर माझ्या सारख्या असंख्य भारतीयांना ते अधिक आदर्शवत वाटतील.*
देश प्रथम व्यक्ती नंतर ...हेच तत्व इथे अपेक्षित आहे. जर राष्ट्रपती महोदयच साधी आचारसंहिता राबवू लागले तर त्याचा नैतिक दबाव साहजिकच खालील सर्व पदांवर होऊ शकतो. देशातील सर्वोच्च नेतृत्वाचा आदर्श इतरांना प्रेरणादायी बंधन ठरु शकते. आमच्या राष्ट्रपतीनी हे " विवेकाचे बंधन " खूशीने स्विकारावे आणि " राष्ट्रपित्याच्या " पावलांवर एक पाऊल टाकावे इतकीच अपेक्षा.
*!! "आदर्श " वरून खाली झिरपतो...हे सोदाहरण दाखवावे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...