आजपासून मी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या *परिवर्तन : शास्त्रही, कलाही* या पुस्तकातील सुभाषित पोस्ट करणार आहे.
*लेखकाचं मनोगत...*
प्रस्तुत पुस्तकात समतावादी, परिवर्तनवादी अशा विविध चळवळींतल्या कार्यकर्त्यांशी हितगुज करण्याचा प्रयत्न केला आहे.
बहुजनांच्या परिवर्तनवादी चळवळी फसू नयेत, भरकटू नयेत, फुटू नयेत, मोडू नयेत, उलट कार्यक्षमतेनं उफाळून याव्यात आणि पूर्णपणे यशस्वी व्हाव्यात, या सद्भावनेनं हे सगळं मांडलं आहे. आयुष्याच्या मावळत्या क्षितिजावर असताना आस्थेपोटी आणि आत्मीयतेपोटी मन मोकळं करण्याचा, अपेक्षा व्यक्त करण्याचा माझा एवढा अधिकार माझ्या भावंडांनी मान्य करावा, असं मी त्यांना मनापासून विनवू इच्छितो.
परिवर्तनाची प्रक्रिया ही एक सुंदर तपश्चर्या आहे, असं मला वाटतं. आपण ही तपश्चर्या निष्ठेनं, विवेकानं, संयमानं, परस्परविश्वासानं आणि परस्परसहकार्यानं करूया. परिवर्तनवादी कार्यकर्ता होण्यासाठी व्यक्तीनं आधी चांगला माणूस कसं बनायचं ते शिकलं पाहिजे आणि तसं बनलंही पाहिजे, असं मी मानतो. जे ही प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्ते बनले आहेत, त्यांच्यापुढं मी नतमस्तक आहे.
सद्य:स्थितीत जे सांगणं अत्यावश्यक आहे, ते सांगण्याचं कर्तव्य पार पाडलं, याचं मला समाधान आहे. हे लेखन किमान विचारात घेण्यासारखं आहे असं आपण मानाल, असा माझा विश्वास आहे.
"गणितशास्त्र, मानसशास्त्र इत्यादीसारखी कोणतीही ज्ञानशाखा घेतली, तरी तिचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावंच लागतं. नेमकं तेच परिवर्तनशास्त्राच्या बाबतीतही आहे. युरेनिअमसारखं मूलद्रव्य असो, मेंदूसारख्या अवयवाची रचना व कार्य असो, संगणकाची प्रणाली असो वा अगदी ज्वारीच्या पिठाची भाकरी करणं असो, एक शास्त्र म्हणून स्वतः शिकून घेतल्याशिवाय कोणीही यांपैकी काहीही दुसऱ्याला शिकवू शकणार नाही. त्याच पद्धतीनं संस्कृती, नीती, इतिहास, धर्म, सण, उत्सव, देवता इत्यादींच्या बाबतीत गांभीर्यानं अध्ययन केल्याशिवाय कुणालाही त्या क्षेत्रांत निर्दोष परिवर्तन घडवता येणार नाही."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ७)*
"परिवर्तनाला ज्ञानाच्या अंगानं शास्त्र म्हणून मानत असतानाच सौंदर्यानुभवाच्या अंगानं मी त्याला कलाही मानू इच्छितो. खरं तर, परिवर्तनाच्या प्रक्रियेत काम करणाऱ्यांच्या व्यक्तिमत्वात शास्त्र आणि कला यांचा एकात्म असा समन्वय व्हायला पाहिजे, त्यांची एक रेशम गुंफण व्हायला पाहिजे. आणि जसं शास्त्राचं शिक्षण घेतलं पाहिजे, तसंच कलेचंही शिक्षण घेतलं पाहिजे - मग ते औपचारिक असो व अनौपचारिक असो. निदान अंत:स्फूर्तीनं का असेना, जाणीवपूर्वक स्वतःची स्वतः काही तपश्चर्या तरी करायलाच हवी !
शास्त्र एक अधिष्ठान देतं, आधार देतं आणि कला त्यामध्ये सौंदर्य आणि आनंद भरून टाकण्याचं काम करते. परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्येही विचारांचं पक्कं अधिष्ठान आणि त्याला उत्कट भावनांची, संवेदनांची जोड, असा मेळ बसला असता परिवर्तन यशस्वी होण्याची वाट सापडते."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ७)*
"मनात परिवर्तनाची उर्मी येणं ही गोष्ट स्वागतार्हच असते. पण उर्मी येणं ही सुरुवात असते, पर्वताचा पायथा असते, शिखर नव्हे. मनात उर्मी उठली, की आपण क्रांती घडवली, असं मानू लागणं हे यशाचं गमक नव्हे."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ८)*
"आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊर्जा हवीच. पण ऊर्जेला सुनियंत्रित केलं नाही, तर ती इतरांसह आपलाही विध्वंस करू शकते. याउलट, तिला सुरेख शिस्त असेल, तर ती आपल्या सगळ्या अंत:शक्तींचा मधुर आविष्कार करू शकते, आपल्या समग्र जीवनाला एक सुंदर कलाकृती बनवू शकते, आपल्या संपूर्ण समाजाची निर्मितीक्षमता फुलवू शकते."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ८)*
"परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आधी स्वतःमध्ये परिवर्तन करणं, हे पहिलं आणि कठीण आव्हान असतं आणि त्यानं ते स्वहितासाठीही आणि समाजहितासाठीही पेललं पाहिजे.
स्वतःला बदलताना किती सायास पडतात, हे एकदा स्वानुभवानं ओळखलं, की मग परिवर्तनाचं काम करताना संयम, समतोल, समंजसपणा येतो. ज्यांना बदलायचं आहे, त्या इतरांच्या बाबतीत असहिष्णू, अनुदार, निंदक, नकारात्मक विचार करायला वाव रहात नाही. कार्यकर्ता आत्मपरीक्षण करू लागतो. स्वतःच्या गुणदोषांचं आकलन करू लागतो. तटस्थपणानं स्वतःचं मूल्यमापन करू लागतो. स्वतःचे दोष दूर व क्षीण करणं आणि गुणांची संख्या व दर्जा वाढवणं, या दृष्टीनं आधी स्वतःवर जास्तीत जास्त काम करावं, स्वतःला कठोरातील कठोर निकष लावावेत, इतरांच्या बाबतीत मात्र यथोचित व प्रसंगानुरूप लवचिकपणा ठेवावा आणि मगच परिवर्तनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्याला अधिकार प्राप्त झाला, असं मानावं."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १०)*
"समाजव्यवस्थेत शोषक एका टोकाला असतात. दुसऱ्या टोकाला शोषण नाकारण्याच्या उदात्त ध्येयानं झपाटलेले कार्यकर्ते असतात. या दोहोंच्या मधे एक विशाल बहुजनसमाज असतो. परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या कार्यकर्त्यांनी विचाराची पाचर कुठं मारली पाहिजे, ते स्पष्ट आहे. शोषक घटक बहुजनसमाजापासून अलग पडतील, अशा रीतीनं पाचर मारली, तर बहुजनसमाज या कार्यकर्त्यांबरोबर एकसंध स्वरूपात राहील. पण त्यांनी पाचर मारताना ती विचार न करता भावनेच्या भरात कुठंही आणि कशीही मारली, तर लाकडाचा ढलपा उडावा तसे ते उडून स्वतःच बहुजनांपासून बाजूला पडतील आणि बहुजनसमाज शोषकांबरोबर अगदी घट्ट बंधनात बांधला जाईल. म्हणूनच *रूढी, परंपरा, सण इत्यादी नाकारताना त्यांपैकी कोणते पूर्ण नाकारता येतील, कोणते अंशतः नाकारता येतील, कुणाचा अन्वयार्थ बदलावा लागेल, ऐतिहासिक सत्य नेमकं काय आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात काय शक्य आहे इत्यादी बाबींचा विचार केला, तर पाचर नेमक्या जागी मारता येईल आणि समाजापासून स्वतःच तुटून जाण्याऐवजी शोषक घटक मात्र बाजूला करण्यात नक्की यश लाभेल.*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १२)*
"आपल्याला जीवनात विविध प्रकारच्या गोष्टी साध्य करायच्या असतात. कित्येकदा आपली उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपण अगदी उतावीळ झालेले असतो. आपलं काम लवकरात लवकर व्हावं, म्हणून उत्सुक, उत्कंठीत झालेले असतो. पण या उतावीळपणापोटीच आपण काम करण्याची चुकीची पद्धत स्वीकारतो. नको तिथं श्रम वाया घालवतो. वेळेची हानी करून घेतो. या प्रयत्नात कित्येकदा आपण आपली उद्दिष्टपूर्ती स्वतःच दूर ढकलतो किंवा काही वेळा तर त्या उद्दिष्टापर्यंत पोचण्याच्या वाटाच बंद करतो."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १३)*
"विजेचा दिवा चालू अथवा बंद करण्यासाठी जशी योग्य ती कळ दाबली पाहिजे, तशाच पद्धतीनं आपल्या परिवर्तनाच्या उद्दिष्टासाठी पावलं उचलताना आपण भलत्याच ठिकाणी परिणामकारक नसलेल्या पद्धतीनं आपली शक्ती वाया तर घालवत नाही ना, याचा गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. तसं न केल्यास अवघं आयुष्य खर्च करूनही हाती काहीच न लागल्यामुळं वैफल्यग्रस्त होण्याचा प्रसंग येऊ शकतो. सगळंच वाया गेल्याच्या भावनेनं पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. हे टाळायचं असेल, तर आपली कार्यप्रणाली आपल्याला नि:संशयपणे आपल्या उद्दिष्टाच्या दिशेनं पुढं घेऊन जात आहे, याची खातरजमा करणं महत्वाचं मानलं पाहिजे.
काही वेळा घण मारावे लागतात, हे खरं आहे. डोंगर फोडून बोगदा करण्यासाठी सुरुंग लावावा लागतो, हेही खरं आहे. पण घण देखील भलत्याच जागी मारून उपयोग नसतो. बोगदा एकीकडं करायचा असताना सुरुंग दुसरीकडं लावून हवं ते साधत नसतं. घण आणि सुरुंग ही देखील त्या त्या कामाच्या स्वरूपाच्या दृष्टीनं कळच असते. आणि *कळ कुठं दाबायची, ते कळलं, तरच उद्दिष्टाच्या दिशेनं वाटचाल सुरु होते आणि आज ना उद्या त्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यात यश मिळू शकतं.*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १४)*
"परिवर्तनाची प्रक्रिया नेमकी कशी असते, तिचं स्वरूप काय असतं, ती यशस्वी कशी करायची, याचं ज्ञान नीट आत्मसात केल्याशिवाय परिवर्तनवादी चळवळीतला कोणताही कार्यकर्ता यशस्वी होऊ शकणार नाही. परिवर्तनाचा एखादा विचार ऐकला, तरी खोलात जाऊन त्याचं नीट आकलन करून घेण्याची तयारी मात्र अनेकदा नसते. परिवर्तनाची सैद्धांतिक आणि व्यावहारिक बाजू काय असते, हे जाणून घेण्यासाठी काही वेळ देण्याची, शिस्तबद्ध रीतीनं काही श्रम करण्याची आवश्यकता वाटत नाही. झटपट यश मिळवण्याची इच्छा असते. कमालीचा उतावीळपणा असतो. *आपल्याला अभिप्रेत असलेली क्रांती आपणच आणि एका दमातच करून टाकणार आहोत, अशा ऊर्मीनं झपाटलेलं असतं.* अजून स्वतःलाच नेमकं कळालेलं नसतं, वरवरची उथळ माहिती घेऊन डोक्यात नशा चढलेली असते. अर्धवट युक्तिवाद, अनुभवांचा अभाव, विचारांचा कच्चेपणा, मूल्यांच्या जाणिवांची अस्पष्टता, या सगळ्या मर्यादांनी स्वतःच बंदिस्त झाल्याची अवस्था असते आणि तरीही अत्यंत आक्रमकपणानं सरळ समजावून सांगण्याचा, इतरांना मूर्ख वा प्रतिगामी ठरवून शहाणं करण्याचा, सुधारण्याचा वा बहिष्कृत करण्याचा आक्रस्ताळा पवित्रा घेतला जातो. प्रबोधनाची सर्व सूत्रं अशा व्यक्तींच्या हाती असतील, तर आपलं सामाजिक जीवन प्रबोधनानं उजळून कसं निघणार ? आपण अंधाराला गुरु करून प्रकाश कसा प्राप्त करणार ?"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १८)*
"आपल्याला सत्याचा फक्त एखादाच पैलू नीटपणानं कळलेला असेल, तर इतरांना तो जरूर सांगितला पाहिजे. नव्हे, तो सांगणं हे आपलं नैतिक कर्तव्यच असतं. फक्त तो सांगताना आपल्याला त्या विषयाच्या सर्व पैलूंचं अचूक ज्ञान प्राप्त झालेलं आहे असा आव मात्र आणू नये. जेवढं कळलं आहे, तेवढं नम्रपणानं दुसऱ्याला जरूर सांगावं आणि अजून आपल्याला जे कळलेलं नाही, ते इतरांना सांगण्याची उठाठेव करण्याऐवजी ते जाणून घेण्याची धडपड मात्र मनापासून चालू ठेवावी. जाणल्यानंतर सांगण्याचा अधिकार अबाधित असतोच !"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १८)*
"शिकण्याचा एक मार्ग म्हणजे दुसऱ्याचं ऐकणं. बोलणं आणि ऐकणं ही परस्पर प्रतिसादांची एक अखंड साखळी असते. हा प्रवास दुतर्फा असला, तरच तो जिवंत संवाद ठरतो. असा संवाद आनंददायक असतो आणि तो भावी वाटचालीसाठी योग्य दिशाही दाखवतो."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १९)*
"परिवर्तनवादी चळवळीत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या मित्रांना, सहकार्यांना, इतर संबंधितांना मोकळेपणानं बोलू दिलं पाहिजे. त्यांना आपलं दडपण वाटता कामा नये. संकोच वा भीती वाटता कामा नये. धाक व दहशत तर मुळीच वाटू नये. आपले अनुभव, प्रतिक्रिया, मतभेद आणि प्रसंगी टीका देखील करण्याची त्यांची इच्छा असेल, तर त्यांच्या त्या इच्छेचा मान राखणं, हे हिताचं असतं. थोडक्यात म्हणजे 'feedback' घेणं आवश्यक असतं. खरं तर, हे तत्व केवळ सहकाऱ्यांच्या बाबतीतच नव्हे, तर विरोधकांच्या बाबतीतही लागू केलं पाहिजे. असं केल्यामुळंच आपल्याला दुसरी बाजू समजते, वेगळे पैलू ध्यानात येतात. दुसऱ्याचं ऐकून घेतल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा, तो आपल्या मनानंच घ्यावा, त्यासाठी आपला विवेकच वापरावा, परंतु इतरांचं ऐकण्याचा लाभ इतकाच असतो, की त्यांच्या अनुभवांचा आपली निर्णयप्रक्रिया बिनचूक करण्यासाठी उपयोग होत असतो. आपल्या किरकोळ का होईना चुका दुरुस्त होत असतात. कधी कधी गंभीर चुका टाळण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकते. आणि ही मदत केवळ अनुभवी जाणकारांकडूनच नव्हे, तर एखाद्या नवशिक्या तरुणाकडून देखील होऊ शकते. हेच विविध प्रकारच्या लोकांबरोबर होणाऱ्या संवादाचं महत्व असतं. म्हणूनच आपल्या एकतर्फी भाषणानं इतरांबरोबरचं संभाषण तुटायचं नसेल, तर इतरांचं ऐकण्याची सवय लावायला हवी."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १९)*
"पूर्वीच्या काळी विद्वानाला 'बहुश्रुत' असं म्हणत असत. 'ज्यानं खूप काही ऐकलं आहे, तो' असा या शब्दाचा अर्थ होतो. विद्वानासाठी 'जो खूप काही बोलला आहे, तो', या अर्थानं 'बहुभाषित' असा शब्द वापरला गेला नाही, हे आवर्जून ध्यानात घेण्यासारखं आहे. निसर्गालाही बहुधा हेच अभिप्रेत असावं. आपण ऐकतो कानांनी आणि बोलतो तोंडानं. निसर्गानं ऐकण्यासाठी दोन कान विकसित केले, पण बोलण्यासाठी तोंड मात्र एकच ठेवलं. निसर्गानं केलेली ही विभागणी आपल्यासाठी जणू काही योग्य व्यगांर्थ देते, असं म्हणता येईल."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २०)*
"काही नवं निर्माण करण्याची प्रज्ञा असलेले प्रतिभावंत आपल्या कलात्मक सर्जनशीलतेच्या द्वारे चित्तवेधक, अप्रतिम लावण्यानं नटलेल्या सुंदर-सुंदर कलाकृती निर्माण करतात. हे कलेचं विलक्षण सामर्थ्य असतं. परिवर्तनवादी चळवळीतला जो कार्यकर्ता ऐकण्याची कला प्राप्त करेल, तोही समाजात एक अतिशय देखणी अशी पर्यायी संस्कृती उभी करू शकतो - आणि हे काही केवळ चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी नाही, ते दैनंदिन व्यवहार पार पाडणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठीही मार्गदर्शक आहे."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २०)*
"घोषणा देणं, जयजयकार करणं, यांसारख्या कृती आपल्या मेंदूमधे विचारपूर्वक केलेल्या चिंतनाला अनुसरून स्वतः त्या व्यक्तीचं आचरण घडेल आणि तिचं आवरण पाहून तिचं बोलणं ऐकणाऱ्यांच्या आचरणातही योग्य ते बदल होतील, परंतु बोलणाराचं बोलणंच त्याच्या आत चिंतनाची काही प्रक्रिया न घडता प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणं केवळ ओठांतून बाहेर पडत असेल, तर ऐकणारांचे कानही त्या बोलण्याला प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणंच प्रतिसाद देण्याची शक्यता आहे, ते शब्द त्यांच्या कानांच्या पाळ्यांवर धडकले, तरी ते आत मनापर्यंत जाणार नाहीत, याची खबरदारी त्यांच्या शरीराकडून घेतली जाईल. मग अशा घोषणा, असे जयजयकार यांच्यामधून इष्ट प्रबोधन घडण्याची अपेक्षा कशी बरं बाळगता येईल ? आपल्या घोषणा, आपले जयजयकार कोणत्या प्रकारात बसतात, ते ज्याचं त्यानं ठरवावं ! शरीरातली प्रतिक्षिप्त क्रिया विशिष्ट प्रसंगी उपकारकच असते, परंतु घोषणा वगैरेंच्या बाबतीत तिचा काय उपयोग आहे ?"
जिभेनं प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून उच्चारलेली घोषणा आणि मेंदूनं विचारपूर्वक दिलेल्या आज्ञेचं पालन म्हणून तिनं उच्चारलेली तीच घोषणा, यांच्यात स्वरूप, प्रभाव, फलप्राप्ती इ. दृष्टींनी अंधार आणि प्रकाश यांच्याइतकं किंवा केवळ शून्य आणि समग्र पूर्णांक यांच्याइतकं अंतर नसतं, यात शंका नाही. हा जिभेचं महत्व नाकारण्याचा प्रयत्न नव्हे."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २२)*
"माणसाची जीभ फार फार महत्वाची आहे. तिच्याकडून उच्चारली जाणारी भाषा माणसाला गुलामही बनवू शकते आणि स्वतंत्रही बनवू शकते. त्याचं माणूसपण हिरावूनही घेऊ शकते आणि भारावूनही टाकू शकते. पण तिच्यामधे हे नकारात्मक व भावात्मक सामर्थ्य केवळ तिच्या स्वतःच्या स्वरूपामधून येत नाही. तिला मेंदूनं दिलेल्या विवेकाच्या प्रेरणेतून तिला हे सामर्थ्य प्राप्त होतं. मेंदूचा संबंध नाकारून ती स्वैर सुटली, तर अनर्थ घडवणार. एवढंच नव्हे तर मेंदूने चुकीचा आदेश देऊन तिच्याकडनं काही वदवून घेतलं, तरीही ती अनर्थ घडवणार. याचा अर्थ, तिनं मेंदूला न जुमानता काही केलं, तर घडणाऱ्या अनर्थाची जबाबदारी तिच्या माथी आणि मेंदूनं चुकीची आज्ञा दिली, तर मात्र मेंदूच गुन्हेगार. अर्थात, दोन्ही प्रकारांत अखेरीस जीभ आणि मेंदू यांचा स्वामीच-स्वतः समग्र मनुष्यच जबाबदार !"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २३)*
"डोक्याची मदत न घेतलेल्या जिभेच्या जोरावर लढू पाहणारा माणूस कितीही गर्जना करीत असला किंवा डरकाळ्या फोडत असला, तरी डोक्यानं लढणारा माणूस, आपल्या जिभेलाही डोक्यानं आदेश देणारा माणूस हाच खऱ्या अर्थानं विजयी होत असतो !"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २४)*
"निसर्गानं आपल्या छातीच्या मजबूत बरगड्या या आपलं हृदय, फुप्फुसं, यकृत, जठर, इ. महत्वाच्या अवयवांचं रक्षण करावं म्हणून विकसित केल्या आहेत. बरगड्यांच्या रक्षणासाठी हे अवयव निर्माण केलेले नाहीत. याचा अर्थ हे अवयव बरगड्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत, त्यांना जपणं हे साध्य आहे. तीच स्थिती डोक्याची कवटी व मेंदू यांचीही आहे.
मेंदूच्या रक्षणासाठी कवटीचं कवच तयार करण्यात आलेलं आहे. कवटीसाठी मेंदू निर्माण केलेला नाही. कवटी मेंदूचं रक्षण करते. अर्थात तोही तिचं रक्षण करतोच, पण अखेरीस ते देखील त्याच्या रक्षणासाठीच असतं. याचा अर्थ कवटीपेक्षा मेंदू फार महत्वाचा आहे. *सृष्टीमधली महत्वाची गोष्ट अशी, की काही अपवाद वगळता इतर सर्व माणसांच्या कवटीच्या आत उत्तम दर्जाचा मेंदू विकसित झालेला असतो. त्यांनी त्याचं महत्व ओळखावं आणि तो वापरावा, हे निसर्गाला अपेक्षित असतं.* निसर्गानं त्याची उगाचच निर्मिती केलेली नाही. *मेंदू ही काही कवटीमधली अडगळ नाही !*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २५)*
"पक्ष, संघटना, जात, जमात, धर्म वगैरेंबरोबर कडवी बांधिलकी मानणारे लोक आपलं नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या मेंदूनं दिलेले जे आदेश असतात, त्यांचं तंतोतंत पालन करतात. स्वतःच्या मेंदूचा स्वतंत्रपणानं मुळीच उपयोग करीत नाहीत. नेत्यांचं बोलणं कितीही निराधार, चुकीचं व घातक असलं, तरी ते नाकारण्याची इच्छा व धैर्य ते दाखवीत नाहीत. *वस्तुतः निसर्गाला हेच अभिप्रेत असतं, तर त्यानं फक्त आदेश देणाऱ्या माणसाच्या कवटीतच मेंदू विकसित केला असता आणि इतरांच्या कवट्या रिकाम्या ठेवल्या असत्या.*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २५)*
"आपल्याला स्वतंत्र मेंदू मिळाला आहे, म्हणजे आपली इच्छाशक्ती स्वैरपणे वापरण्याचा परवाना मिळाला आहे. आवश्यकतेनुसार इतरांची इच्छा समजून घेणं, तिचा आदर करणं, समाजातल्या इतर व्यक्तींशी योग्य रीतीनं जुळवून घेणं म्हणजेच त्यांच्याशी समन्वय व समायोजन साधणं, काही समान मूल्यांसाठी संघटितपणानं काम करणं, हे करायलाच हवं. मनुष्य एक व्यक्ती म्हणून जसा स्वतंत्र आहे, तसाच समाजाचा घटक म्हणून त्याच्यावर काही बंधनं, काही जबाबदाऱ्याही आहेत. समाजाचा घटक म्हणून वावरताना एका बाजूनं निकोप मानवी संबंध बाधित होऊ द्यायचे नाहीत आणि दुसऱ्या बाजूनं निसर्गानं दिलेल्या मेंदूचं नकोप स्वातंत्र्यही यथोचित रीतीनं जपायचं, हे संतुलन त्यानं साधलंच पाहिजे. असं झालं, तरच आपल्या कवटीत विकसित झालेल्या इतक्या सुरेख मेंदूचं चीझ झालं असं म्हणता येईल!"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २६)*
"आपण समाजाला बदलायला सांगताना जे काही देत आहोत, ते खरोखरच हिताचं आहे, पोषक आहे, आहे, सत्यावर आधारलेलं आहे, याची खातरजमा केल्याशिवाय काही द्यायला जाऊ नये. आपण जे देऊ पाहतो, ते रत्न आहे की गारगोटी आहे, हे आधी आपण जाणून घ्यावं. गारगोटीचंही काही खास सौंदर्य असतं, हे खरं आहे. तरीही हिरा म्हणून गारगोटी विकणं ही फसवणूकच ठरते.
तथापि, जिथं गारगोटीला हिरा म्हणणारे रत्नपारखी असतील, तिथं हिरा उकिरड्यावर फेकू पाहणारी गिऱ्हाईकं गर्दी करणार, यात काही शंका नाही. ज्या सराफकट्टयावर पितळेला सोनं म्हणणारे लोक असतील, तिथनं सोन्यानं आपलं अंग काढून घ्यावं, हेच चांगलं. अशा समाजात सौंदर्याचा आस्वाद घेण्याची अभिरुची निर्माण तरी कशी होणार आणि तिची अभिवृद्धी तरी कशी होणार ?तो समाज रत्नांनी समृद्ध-संपन्न कसा होणार ? आणि तो फसवला गेला, कंगाल राहिला, तर त्याची जबाबदारी गिऱ्हाईकांपेक्षा पारख करणारांवर अधिक असणार, हे विसरून चालणार नाही."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २७)*
"कोणी परिवर्तनवादी कार्यकर्ता अमृताची बरसात करण्याची भाषा करीत करीतच आपल्या अनुयायांना, वाचकांना, श्रोत्यांना, चाहत्यांना आपल्या मनातल्या घातक विखारांचं विकारभोजन देत असेल, तर तो त्यांचा हितचिंतक, सन्मित्र वा सच्चा मार्गदर्शक असू शकत नाही. ज्यांना माणूस म्हणून आपलं मन निर्मळ ठेवायची इच्छा आणि भान असेल, अशा कोणीही असल्या विषाक्त मनातनं बाहेर पडणाऱ्या तुषारांमध्ये भिजू नये."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २८)*
"ज्यांनी नदीचा महापूर पाहिलेला असतो, त्यांनी बहुदा तिच्या पात्रात विशिष्ट ठिकाणी बनलेला भोवराही पाहिलेला असतो. भोवऱ्यात एखादा लाकडाचा तुकडा व अशीच एखादी वस्तू सापडली, तर ती एकाच ठिकाणी गोल गोल फिरत तळाशी जाते. एखादा पट्टीचा पोहणारा देखील भोवऱ्यात अडकला, तर सहसा बाहेर पडू शकत नाही, गोल गोल फिरत तो तळाशी जातो आणि प्राण गमावून बसतो. श्रेयासाठी धडपडणाऱ्या चळवळी स्वतःभोवती फिरायला लावणाऱ्या या भोवऱ्यासारख्या असतात. *श्रेयासाठी हपापलेली, वाटेल त्या थराला जाणारी, हिताचा सल्लाही न मानणारी, मनात कपट ठेवून गोड बोलणारी, आपल्याच सहकाऱ्यांचं खच्चीकरण करून वर चढू पाहणारी खुज्या मनाची माणसं समाजाचं काही हित करतील असं मानणं, हा मोठा भ्रम आहे.*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २९)*
"एक प्रश्न विचारावासा वाटतो - प्रबोधनाची चळवळ ही तुमची करिअर आहे की कमिटमेंट ? व्यवसाय आहे की बांधिलकी ? प्रसिद्धी, प्रतिष्ठा, वर्चस्व इ. मिळवण्याचा धंदा आहे, की आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणं जपण्याची मूल्यनिष्ठा आहे ? एखाद्यानं करिअर म्हणूनही चार चांगल्या गोष्टी केल्या, तर त्या निंद्य व त्याज्य नव्हेत, त्या स्वागतयोग्यच होतं. परंतु तरीही एक गोष्ट स्पष्टपणे दिसत असते. *खरी कमिटमेंट नसलेला, करिअरसाठी जगणारा माणूस करिअर जपण्यासाठी वा वाढवण्यासाठी कमिटमेंट सोडून देण्याची तडजोड करू शकतो, करतो, करतोच आणि कमिटमेंटसाठी जगणारा माणूस आपल्या निष्ठेवरून करिअर ओवाळून टाकायला तयार असतो.* दोघे जणू काही दोन दिशांनी जात असतात, दोन विरोधी ध्रुवांवर उभे असतात. दोघे वरवर सारखे दिसले, तरी आपण त्यांना ओळखण्यात चूक करू नये. याला तो आणि त्याला हा समजणं, हा सामाजिक-सांस्कृतिक जीवनातला गुन्हा ठरेल !"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३०)*
"भ्रमाची पेरणी करून समतेचं पीक पिकवू पाहणाऱ्यांच्या मागं फरफटत जायचं, की प्रेमाची, न्यायाची, सत्याची पेरणी करून समतेचं फळ प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा, हे लोकांनाच ठरवावं लागेल. *कोवळ्या वयातल्या निष्पाप, निरागस तरुणांची माथी भडकवून देणारे लोक त्या तरुणांचे हितचिंतक आहेत, की त्यांना विनाशाचा मार्ग दाखवणारे आहेत, याविषयीचा निर्णय घ्यावा लागेल. महामानवांचं नाव घेऊन नुसता धिंगाणा घालायचा आहे, की त्यांचं स्वप्न खरोखरच साकार करायचं आहे, याचाही निर्णय घ्यावाच लागेल.* कोणतीही कृती करण्यापूर्वी आपलं श्रद्धास्थान असलेल्या महामानवांना ती कृती आवडली असती का, याचाही क्षणभर तरी विचार करावाच लागेल!"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३४)*
"चिकित्सा करण्याचा अधिकार आहे, 'पण' चिकित्सा करण्याचा आवाकाही असायला हवा. *चिकित्सा हे एक अतिशय महत्वाचं शास्त्र आहे आणि अतिशय काळजीपूर्वक चालवण्याचं शस्त्रही आहे.* ज्या विषयाची चिकित्सा करायची, त्या विषयाचा आपला काही किमान व्यासंग असला पाहिजे. त्याविषयी काही वाचलेलं, काही ऐकलेलं असलं पाहिजे. त्या क्षेत्रातल्या जाणकारांशी काही चर्चा केलेली असली पाहिजे. त्यांच्याकडनं काही जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे. त्यासाठी अंगी काही विनयही हवा. आपल्या अज्ञानाचं भानंही हवं. स्वतःचं म्हणून काही चिंतनही हवं. *हे सगळं एका दिवसात, एका रात्रीत होत नसतं. हे वेळ खाणारं काम आहे. श्रम करायला लावणारं काम आहे. आपल्या चिकाटीची परीक्षा घेणारं काम आहे.*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३५)*
"काही कार्यकर्ते आपली तयारी नसताना चिकित्सेच्या नावाखाली दिसेल त्याच्यावर क्रूरपणानं घाव घालतात. समोरचा मनुष्य मित्र आहे की शत्रू, याचीही पर्वा करीत नाहीत. ज्याच्या कामाचं, उद्देशाचं आणि कार्यपद्धतीचं कणभरही आकलन नाही आणि आकलन करण्याचा आवाकाही नाही, त्याला वाटेल तसं छळतात. ज्याच्याकडून शिकायचं, त्यालाच शिकवायला धजतात. ज्याचे उपकार मानायला हवेत, त्यालाच गद्दार ठरवू लागतात. ज्याच्या छातीवर शत्रूशी समोरासमोर लढताना शेकडो जखमा झाल्या आहेत आणि तरीही ज्यानं युद्ध थांबवलेलं नाही, त्यालाच भेकड ठरवतात आणि तेही स्वतःचं पहिलं पाऊलही नीटपणानं रणभूमीवर पडलेलं नसताना !
असे कार्यकर्ते आपल्या गुणवत्तेविषयी, दर्जाविषयी कौशल्यानं एक आभास मात्र निर्माण करतात. ज्यांचा काही अभ्यास नसतो, त्यांना काहीही खोटंनाटं सांगून भुलवतात. त्यासाठी मुख्य विषय बाजूला सारून आणि असंबद्द, भलत्या-सलत्या गोष्टींचं प्रदर्शन करून आपल्या बुद्धीचा झगमगाट निर्माण करतात. खरं तर, प्रस्थापितांनी, शोषकांनी आजवर हेच केलं आहे. ती व्यवस्था बदलण्याची जर प्रामाणिक इच्छा असेल, तर त्यांच्या अनैतिकतेला समर्थ युक्तिवादांनी उत्तर द्यायला हवं. ज्यांच्याकडं तो आवाका नसतो, ते विषयांतर करून लोकांनी दिशाभूल करतात. ते प्रस्थापित व्यवस्थेवर खरोखरच मात करू इच्छित असतील, तर त्यांनी चिकित्सेची तत्वं शिकून घ्यावीत, आपली क्षमता आणि आवाका वाढवावा आणि लढाईत उतरून ती जिंकावी."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३६)*
"ज्याला यशस्वी योद्धा व्हायचं असेल, त्यानं अगदी चक्रव्यूहातही कसं घुसायचं, तिथं शत्रूवर मात कशी करायची आणि त्या व्यूहातून बाहेर कसं पडायचं, हे आधी शिकावं लागतं. बौद्धिक चक्रव्यूहांचंही असंच आहे. *चक्रव्यूहात कसं शिरायचं ते देखील ठाऊक नाही आणि शत्रूला जिंकलं म्हणून नगारे वाजवत सुटायचं, हे काही खऱ्या पराक्रमाचं लक्षण नव्हे.*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३६)*
"चळवळींचं कितीही नुकसान झालं तरी बेहत्तर, आंदोलन चांगल्या उद्दिष्टापासून कितीही भरकटलं तरी हरकत नाही - मी माझ्या पद्धतीचा धुमधडाका लावून लोकांचं लक्ष माझ्याकडे वेधून घेणारच ! चळवळींतले कोणी कार्यकर्ते अशा घमेंडीनं वागत असतील आणि चळवळींचे सूत्रधार त्यांना योग्य दिशा देण्याऐवजी त्यांचं कौतुक करीत असतील, त्यांना छुपं बळ देत असतील व उघड प्रोत्साहनच देत असतील, तर असे स्वैर सुटलेले कार्यकर्ते बहुजनांच्या हिताचा सत्यानाश करणार, यात काही शंका नाही."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३८)*
"चळवळीतले कार्यकर्ते आपला अभ्यास, अनुभव, संपर्क, चिंतन इत्यादींच्या आधारे काही मतं बनवत असतात. ही मतं समाजातल्या रूढी, श्रद्धा, सण, उत्सव, व्यक्ती, संप्रदाय, सिद्धांत अशा अनेक गोष्टींविषयी बनवलेली असतात. ही मतं जर योग्य कसोट्या लावून, वस्तुनिष्ठ सत्य जाणून आणि संतुलित वृत्तीनं बनवलेली असतील, तर ती बाळगण्यात आणि लोकांपुढं मांडण्यातही काहीच गैर नाही. किंबहुना, समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी अशी मतं लोकांना सांगण्याचा त्यांना अधिकारही असतो आणि ते त्यांचं नैतिक कर्तव्यही असतं. *लोकांनी अनिष्ट गोष्टी नाकाराव्यात आणि हिताच्या गोष्टींचं आचरण करावं, म्हणून त्यांचं प्रबोधन करणं, हे कार्यकर्त्यांच्या मनातल्या करुणेचं द्योतकच असतं.*
काही कार्यकर्ते मात्र आपली मतं अशी विवेकपूर्ण बनवत नाहीत. त्यांना बेभरवशाच्या माणसांनी सांगितलेल्या भलत्या-सलत्या गोष्टी खऱ्या मानून मतं बनवण्याची सवय जडलेली असते. त्यांनी आपली अशी मतं लोकांना सांगण्याचीही घाई झालेली असते. अशा कार्यकर्त्यांना कुणी तरी सबुरीचा सल्ला देणं, सावध करणं, सावरणं, योग्य मार्गावर आणणं आवश्यक असतं."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३९)*
"एखाद्या व्यक्तीविषयी वा सणाविषयी कार्यकर्त्यांनी चुकीचं मत मांडलं असेल, ते थोड्या दिवसांपर्यंतच मांडलं असेल, मोजक्या लोकांपुढंचं सांगितलं असेल, सौम्य भाषेत व्यक्त केलं असेल, तर त्यांना आपलं मत बदलताना फार अवघड जाणार नाही. याउलट, त्यांनी आपलं हे मत अनेक वर्षं मांडलं असेल, ते हजारो-लाखो लोकांपर्यंत पोचवलं असेल, अतिशय आग्रहानं वा आक्रमकपणानं सांगितलं असेल, तर आपली चूक दुरुस्त करणं त्यांच्या दृष्टीनं सोपं असणार नाही. अशा वेळी पुढं जावं तरी पंचायत आणि माघारी फिरावं तरी ते अवघड, अशा कात्रीमध्ये हे कार्यकर्ते सापडतात. विवेक खरोखरच जागा झाला असेल आणि विवेकाचा आदेश पाळण्याचा प्रामाणिकपणा आणि धैर्य असेल, तर ते माघारी फिरतील. याउलट, कुणी रेटून त्याच रस्त्यानं पुढं जातील आणि कुणी चळवळीचं कामच सोडून देतील. तात्पर्य, कुठलाही निर्णय घेतला, तरी मनस्ताप आहे, मानहानी आहे वा संकटही आहे. वैफल्य तर आहेच आहे."
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३९)*
"पावलं टाकत पुढं-पुढं जाताना पहिल्या पावलापासूनच वेळोवेळी आणि जागोजागी थोडं थबकून आपली वाट चुकत नसल्याची खातरजमा करून घ्यावी आणि त्यानंतर पुढं सरकावं - मग माघारी वळण्याची मानहानी नाही, की पश्चातापाचा प्रसंग नाही. त्यातूनही रस्ता चुकलाच आणि कुणी रस्ता चुकल्याचं दाखवून दिलंच, तर जितक्या लवकर परत फिरता येईल, तितक्या लवकर पावलांची दिशा बदलावी. कारण, *चुकीच्या रस्त्यानं जितकं पुढं जावं, तितकं माघारी वळणं अवघड बनत जातं!*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ४०)*
"खरं तर, आपल्या आतल्या प्रतिभेचे, क्षमतेचे झरे जोपर्यंत वाहते असतात, त्यांचे स्रोत आटून जात नाहीत, त्यांची उत्स्फूर्तता सुकून जात नाही, तोपर्यंतच आपण 'जिवंत' असतो, 'वर्तमान' असतो. हे झरे आटले, की आपण 'भूतकाळ' बनलेले असतो आणि नुसतेच भूतकाळ बनलेले नसतो, तर 'कालबाह्य' भूतकाळ बनलेले असतो. आपले श्वासोच्छवास चालू असले, तरी ते नुसतं हवेचं येणं-जाणं असतं. खरं तर आपला जीवच 'निर्जीव' झालेला असतो, प्राणच 'निष्प्राण' झालेले असतात. *आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत 'जिवंत' राहायचं असेल, तर आपल्या त्या श्वासातूनही चैतन्याचा झरा वहायला हवा, ज्ञानाचा झरा ओसंडायला हवा!*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ४७)*
"जीभ हे नुसतं धारधार शस्त्रच नाही, तर ते मधाचं मधुर पोळंही आहे. तो डोंगराकडे कापत कोसळणारा उग्र प्रपातच नाही, तर डोंगरकुशीतून झुळूझुळू वाहणारा नाजूक निर्झरही आहे. *आवश्यक तिथं, आवश्यक तेव्हा शस्त्र जरूर चालवलं पाहिजे आणि ते चालवावंही. पण सदा सर्वकाळ शस्त्र घुमावण्याच्या नशेत स्वतःच शस्त्रमय, शस्त्रात्म बनू नये. योग्य तिथं, योग्य वेळी पुष्पमय, पुष्पात्मही बनावं.*"
*(परिवर्तन : शास्त्रही, कलाही, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ४८)*
"हळुवार भावना हरवली, तर भेदक-छेदक तर्क घेऊन काय करायचं आहे? माणसं तुटली, तर तर्क काय स्वतःच्याच छातीत खुपसून घ्यायचे आहेत ? खरं तर *कठोर तर्क प्रेमाच्या ओलाव्यात बुडवून घ्यावा, हेच प्रगल्भ, प्रसन्न आणि प्रफुल्लित मनुष्यत्वाचं चिन्ह असतं.*"
*(संदर्भग्रंथ : परिवर्तन : शास्त्रही, कलाही, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
*"माझ्या भावंडांनो, द्वेषाच्या दलदलीत लोळण्याची चटक लागली, की प्रेमाच्या पुष्करिणीकडे ढुंकूनही पहावसं वाटत नाही. तुम्ही सदा न् कदा कुणाचा ना कुणाचा द्वेष करीत असाल, तर तुम्ही स्वतःच मूर्तिमंत द्वेष बनाल. तुमच्या काळजातच द्वेषाचं विष भरलेलं असेल, तर तुमचे उच्छवास अखंडपणे वातावरणात द्वेषाचे परमाणूच पेरत जाणार. तुम्ही स्वतः निर्विष नसाल, तर इतरांना तरी निर्विष कसे कराल ?*
*तुम्ही लोकांना गुलामगिरीतून मुक्त करू इच्छिता ना ? मग लोकांनी काय त्यांच्या गुलामगिरीतून सुटून तुमच्या गुलामगिरीत अडकायचं ? शत्रूंनी आपल्या गळ्याभोवती आवळलेला फास दुःखद आणि मित्रांनी आवळलेला फास सुखद, असं असतं काय ? शत्रूंनी केलेलं कपट कडू आणि मित्रांनी केलेलं कपट गोड, असं असतं काय ?"*
*(संदर्भग्रंथ : परिवर्तन : शास्त्रही, कलाही, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
"काटेरी तर्क चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीनं वापरले, तर ते तुमच्या हृदयांत निरागस फूलपाखरांना जगूच देणार नाहीत. आणि इतरांच्या हृदयांतल्या निष्पाप, नाजूक, नितान्त सुंदर फूलपाखरांनाही मारून टाकणार ! आणि आपण हृदयांतली फूलपाखरंच अशी गमावली, तर आपल्या काळजांत नुसते सुरवंटच उरतील ना ! नाही, असं होऊ द्यायचं नाही. आपण फूलपाखरं जपायचीच!"
*(संदर्भग्रंथ : परिवर्तन : शास्त्रही, कलाही, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
No comments:
Post a Comment