दिल्लीतील अशीच एक संध्याकाळची वेळ. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बंगल्या समोरील हिरवळीवर खुर्च्या टाकून बाबासाहेब आणि प्राचार्य म.भि.चिटणीस संस्थेच्या नियोजना संबधी चर्चा करत होते. बोलता बोलता चिटणीस सहज म्हणाले "बाबासाहेब, आपल्या 'What Congress and Gandhi have done to the untouchables' या पुस्तकाबद्दल कॅांग्रेसवाल्यांची आणि गांधीभक्तांची फार कडवट प्रतिक्रिया आहे. हिन्दूवर आपण अतिशय कठोर प्रहार केला असेच त्यांना वाटत आहे." यावर बाबासाहेब काही क्षण गंभीर झाले आणि मग म्हणाले " त्या लोकांना जर माझ्या पुस्तकातील सत्य व वस्तुस्थिति ही कठोर टीका वाटत असेल तर आजवर हजारो वर्षे, हिन्दू उच्चवर्णियांनी माझ्या समाजाला दिलेल्या अमानुष वागणुकीबद्दल काय म्हणायचे ? त्याचे वर्णन करण्यासाठी माझे शब्द अपुरे पडताहेत. माझ्या पुस्तकातील फक्त शब्द त्यांना कठोर वाटतात तर माझ्या समाजाने तो अमानुष छळ कसा सोसला असेल ?" बाबासाहेब भावनाविवश झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पाहून आम्हा सर्वांच्या मनाला अतिशय वेदना झाल्या. चिटणीसांना आपण हा विषय उगीच छेडला अशी अपराधीपणाची भावना झाली. मी आयुष्यात राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय व सामाजिक क्षेत्रांत अनमोल कार्य करणा-या अनेक व्यक्तिंची चरित्रे वाचली, पण आपल्या समाजावर आपल्या अपत्यापेक्षाही जास्त प्रेम करणारा द्रष्टा महामानव फक्त एकच आढळला..........डॅा. बाबासाहेब आंबेडकर
( ' आठवणींतले बाबासाहेब ' लेखक योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन या पुस्तकातून. प्रकरण- मंतरलेले दिवस-न्यायमूर्ति भालचंद्र वराळे )
( ' आठवणींतले बाबासाहेब ' लेखक योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन या पुस्तकातून. प्रकरण- मंतरलेले दिवस-न्यायमूर्ति भालचंद्र वराळे )
No comments:
Post a Comment