Flash

Tuesday, 18 April 2017

विरंगी मी ! विमुक्त मी - डॉ. अंजली जोशी

 *डॉ. अंजली जोशी* यांच्या *विरंगी मी ! विमुक्त मी !* या पुस्तकातील सुभाषिते आजपासून आपल्यासमोर मांडणार आहे. ही कादंबरी *बेटी डॉडसन* या एका पाश्चात्य बंडखोर स्त्रीच्या जीवनावर आधारित आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून तिने लैंगिकतेबद्दल स्वतःची परखड मत मांडली, त्याचा प्रचार प्रसार केला आणि स्वतःच्या जीवनात उतरवली. त्यावेळची तिची मतं मला आजही तितकीच महत्वाची वाटतात. म्हणून आपल्याला वाटतीलच असं नाही. अनेकांना ती पटतील, पचतील असं नाही. तरीही आपल्यासमोर मांडण्याचं धाडस करतोय.

*कादंबरीबद्दल थोडंसं....*
एक पाश्चात्य बंडखोर स्त्री !

*लैंगिक मुक्ति ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे*, असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ती.

चित्रकलेपासून सुरु झालेल्या प्रवासात तिला एक नवीन जीवनदृष्टी मिळाली व स्वत्वाच्या शोधातून आत्मभानही येत गेले. या दोहोंच्या जाणिवेतून तिला आपल्या जीवनाचा मार्ग कसा गवसला आणि प्रस्थापित नीतिनियमांशी टक्कर देत ही संघर्षमय वाटचाल तिने कशी केली, याची कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली ही वाचनीय कहाणी.

र. धों. कर्वे यांच्या विवेकवादी परंपरेशी नाते सांगणारी, ‘मी अल्बर्ट एलिस’ नंतरची डॉ. अंजली जोशी यांची ही नवीन कलाकृती !

स्त्रियांच्या लैंगिकतेवर निर्भीड भाष्य करणारी ही कादंबरी वाचकांना निश्चितच अंतर्मुख करेल.



*कादंबरीची नायिका बेटी डॉडसन बद्दल थोडंसं...*

बेटी डॉडसन ही अमेरिकेतील एक चित्रकार व लेखिका आहे. तिचा जन्म १९२९ मध्ये ‘कॅन्सस’ या शहरातल्या ‘विचिटा’ या गावात झाला. कलेमध्ये रुची असल्यामुळे शालेय शिक्षणानंतर चित्रकलेत कारकीर्द करण्यासाठी ती न्युयॉर्कला आली व न्युयॉर्क तिची कर्मभूमी झाली. स्त्रीवादी चळवळीतही तिने काही वर्षे काम केले. स्त्रियांच्या लैंगिकतेशी तिने जवळून परिचय करून घेतला. त्याबद्दलचे अत्यंत खळबळजनक विचार तिने मांडले. *स्वत:चे लैंगिक सुख मिळवण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. लैंगिक सुखासाठी पुरुषाची मिळाली तर उत्तम; पण तशी ती मिळाली नाही तरी ती स्वत:चे कामसुख हस्तमैथुनाद्वारे उत्तमरीत्या प्राप्त करून घेऊ शकते*, असे तिचे प्रमुख विचार आहेत.

*या विचारांचा पुरस्कार करण्यासाठी स्वत:च्या कामक्रीडांच्या चित्रांचे प्रदर्शन न्युयॉर्कमध्ये भरवून तिने अनेकांचा रोष ओढवून घेतला. अशा विषयावरचे एका स्त्री-चित्रकर्तीने भरविलेले त्या काळातले अमेरिकेतले ते एकमेव प्रदर्शन होते.* तिच्यावर अनेक आक्षेप घेतले गेले. प्रचंड टीका झाली. ‘पोर्न आर्टिस्ट’ असा शिक्का तिच्यावर बसला. ती स्वत:ला स्त्रीवादी कार्यकर्ती म्हणवून घेत असली तरी मुख्य प्रवाहातल्या स्त्रीवाद्यांनी तिला लांब ठेवले. बुद्धिजीवी वर्तुळातही तिचे नाव फारसे आदराने घेतले जात नाही. या *सगळयांचा विरोध पत्करूनही तिने काही पुस्तके लिहिली. हस्तमैथुनावर तिने लिहिलेल्या पुस्तकाच्या हजारो प्रती खपल्या व त्याची सात भाषांत भाषांतरे झाली. सुमारे तीस वर्षे लैंगिकतेचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा ती न्युयॉर्कमध्ये घेत होती.*

विख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी कामप्रेरणेवर बरेच लिखाण केलेले आहे. कामतृप्तीच्या विविध तंत्रांचे वर्णन त्यांच्या अनेक पुस्तकांत वाचावयास मिळते. यापैकी ‘Sex and the Liberated Man’ या पुस्तकात बेटी डॉडसनचा उल्लेख केलेला आहे. या पुस्तकात वर्णन केलेल्या हस्तमैथुनाच्या तंत्रांमध्ये तिने शोधून काढलेली तंत्रे समाविष्ट केलेली आहेत. एलिस यांच्या ‘Sex without Guilt’ या पुस्तकामध्येही तिचा उल्लेख आहे. अपराधमुक्त हस्तमैथुन हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे, असे तिचे मत त्यात उद्धृत केले आहे.


"स्त्रियांची कामवासना एकतर त्यांना गुलाम करते; म्हणजे पुरुषाचे परावलंबित्व स्वीकारायला लावते किंवा त्यांना विमुक्त करते."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ७)*


"आज समाजात कितीतरी स्त्रिया एकट्या राहतात, कितीतरी जणींचे विवाह उशीरा होतात, काही घटस्फोटित असतात, काही विधवा असतात, काही वृद्ध असतात. *जोडीदार नसताना अशा स्त्रिया त्यांची कामपूर्ती कशी करत असतील याचा फारच क्वचित विचार केला जातो. त्या एकट्या असतात म्हणजे जणू काही त्यांना कामजीवनच नाही असे सर्रासपणे गृहीत धरले जाते. या स्त्रियांनाही कामपूर्तीचा अधिकार आहे, याचा सगळ्यांना विसर पडतो.* यातल्या प्रत्येक स्त्रीला जोडीदार उपलब्ध होतोच असे नाही. एकतर हल्लीच्या समाजात सुयोग्य व मनपसंत जोडीदार सहजासहजी मिळत नाही. असा मिळालाच तर तो किंवा ती दीर्घकाळासाठी टिकून राहीलच याचीही शाश्वती नसते. *केवळ वासनापूर्तीसाठी जोडीदाराशी संबंध ठेवण्याची मनोधारणा कित्येकींची नसते.*"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ७)*


"कित्येकदा विवाहित जोडप्यांमध्येही लैंगिक अनुरूपता नसते. कित्येक जणींचे सहचर दूरच्या ठिकाणी असतात त्यामुळे त्यांचा दीर्घकाळ संबंध येत नाही. खरेतर कामजीवनातला कोंडमारा हा एकंदरीतच फार व्यापक आहे. मग इतक्या व्यापकपणे होत असलेल्या या कोंडमाऱ्यावर उपाय तरी काय ? यावर परंपरेने जो उपाय सुचवला आहे, तो म्हणजे कामवासनेचे दमन करणे. पण *खरोखरच दमन केल्यामुळे कामवासना नाहीशी होते का, याचे उत्तर कुणीही शोधताना दिसत नाही. दमन करणे म्हणजे दडपून टाकणे. अशा दडपण्यातून कामभावना फारफार तर आत ढकलली जाईल. पण तिची पूर्ती कशी करावी हा प्रश्न लोंबकळतच राहतो.*"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ८)*


"नैसर्गिक असलेली कामप्रेरणा आपल्या पूर्तीसाठी व्यक्तीवर दबाव टाकणारच. त्यातून काही जणी इतरत्र लैंगिक संबंध ठेवतात. पण समाजमान्य चौकटीत ते बसत नसल्यामुळे लपूनछपून, चोरूनमारून ठेवले जातात. म्हणजे दमनामुळे चोरट्या पद्धतीने कामवासना शमविण्यास स्त्रियांना नकळत उद्युक्त केले जाते. अशा पद्धतीने ती शमवितानाही त्यांच्या मनात अपराधी भावना इतकी प्रबळ असते की या सुखाचा निखळ आनंदही त्यांना घेता येत नाही. काही जणींच्या बाबतीत असे संबंध ठेवण्याची संधी उपलब्ध नसेल तर लैंगिक हिंसाचार किंवा मानसिक समस्या अशा वेड्यावाकड्या मार्गांनी ती बाहेर येते. काही जणी यातला कुठलाच मार्ग न अनुसरता कामवासनेचे पूर्णपणे दमन करण्यात यशस्वी होतातही; पण बरीच मानसिक शक्ती विनाकारण खर्च करण्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. यातला कुठलाही मार्ग चोखाळला तरी कामतृप्तीच्या निखळ समाधानापासून स्त्री वंचितच राहते. म्हणजे शेवटी दमनामुळे कोंडमाऱ्यावर उत्तर मिळण्याऐवजी तो अजूनच जटिल होऊन बसतो."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ८)*


"स्त्रियांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होत असते. पण कामजीवनातल्या त्यांच्या कोंडमाऱ्यावर मात्र सगळ्या अळीमिळी गुपचिळी का होऊन बसतात, याचे उत्तर आहे *लैंगिकतेकडे पाहण्याचा समाजाचा रोगट दृष्टिकोन !* परंपरागत रूढी व संस्कारांनी हा दृष्टीकोन पक्का केला आहे. *लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलणारी स्त्री ही चारित्र्यहीन असते या पारंपरिक समजुतीचा मारा इतका जबरदस्त असतो की बऱ्याच स्त्रिया लैंगिक विषयांबाबत मौन बाळगणेच पसंत करतात. कामव्यवहारांबाबत कमालीची गुप्तता बाळगली जाते. त्यांची चर्चा जवळच्या व्यक्तीशी सोडूनच द्या; पण लग्नाच्या जोडीदाराशीही कित्येक जणी खुलेपणाने करू शकत नाहीत.*"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ८)*


"अगदी सुशिक्षित व सुविद्य स्त्रियांनाही कामव्यवहारांची फारच तुटपुंजी माहिती असते व त्यातही गैरसमजुतींचा भरणा जास्त असतो. कितीतरी जणींना स्त्रिया हस्तमैथुन करतात याचाही पत्ता नसतो. काहींनी ऑरगॅझम म्हणजे कामतृप्तीचा उत्कर्षबिंदू हा शब्दही ऐकलेला नसतो. ज्यांनी यौ ऐकलेला असतो त्यांच्याही मनात फक्त समागमातूनच ऑरगॅझम मिळू शकतो या समजुतींचा पगडा घट्ट असतो. त्यामुळे समागमाव्यतिरिक्त इतर कुठल्याही क्रियेतून ऑरगॅझम मिळू शकतो का, याचा विचारही कित्येकांच्या मनाला शिवत नाही."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ९)*


"कामतृप्तीसाठी अनुरूपता नसलेल्या विजोड जोडीदाराच्या पाठी फरफटत जाऊन स्वत्व गमावून बसू नका. कामसुखात स्वावलंबी व्हा. स्वतःवर अवलंबून राहण्याची सवय अंगी बाणवा."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ९)*


"जेव्हा व्यक्तीचा वैचारिक पाया भक्कम असतो, तेव्हाच त्या विचारांवर ती अविचल धारणा दाखवू शकते. त्या विचारांसाठी झुंज देण्याचे धैर्यही तिच्यात येते."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ११)*


"बायकांच्या नशिबी भोगणं असतंच. त्यात दिवस गेले आणि गर्भपात करायचा असेल तर शेवटी सर्व बाईलाच निस्तरावं लागतं. कधी कधी तर मृत्यूही ओढवू शकतो. पुरुष जास्तीत जास्त सहानुभूती दाखवू शकेल. त्या सहानुभूतीने यातना कमी होत नाहीत."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ४३)*


"सावध राहायचं म्हणजे काय करायचं ? स्त्री असण्याचं ओझं क्षणोक्षणी मनावर बाळगायचं की काय ? तसं केलं तर आपण मोकळेपणी जगूच शकणार नाही. आणि तसं करण्याची खरोखर गरज आहे का ? *सावध राहायचं याचा अर्थ तारतम्याने असा घ्यायला हवा की कुठल्याही अनपेक्षित प्रसंगाला कधीही तोंड द्यावं लागलं, तर त्यासाठी मनाची तयारी ठेवायची. एवढंच लक्षात ठेवायचं की अशा प्रसंगी स्वतःचं संरक्षण स्वतःच करायला हवं. स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी. स्वतःच खंबीर व्हायला हवं. मग तो प्रसंग स्त्री असण्याशी निगडित असेल किंवा नसेल.*

प्रत्येक धोकादायक प्रसंगाची स्त्री असण्याशी सांगड घालण्याची गरज नाही. स्त्री असण्याचं भांडवल करण्याची जशी गरज नाही, तसा त्याचा बाऊ करण्याचीही गरज नाही. आपल्याला स्वतःची ओळख आहे; आणि ती निव्वळ स्त्री किंवा पुरुष असण्याच्या पलीकडची आहे. त्या ओळखीवरच आता लक्ष केंद्रित करायचं."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ४८)*


"काही वेळा एखादा निर्णय आपण क्षणिक उत्साहात घेतो. त्याचा भर ओसरला की निर्णय विरघळून जातो. निर्णय विचारपूर्वक, स्वतःला पटल्यामुळे घेतला असेल तर आपण अडचणींवर मात करून चिवटपणे झुंजत राहतो."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ६०)*


"केवळ अंग झाकणं हा कपड्यांचा फार मर्यादित उद्देश आहे. कपड्यांना एक फार मोठं सामाजिक अंग आहे. सामाजिक स्थान, उच्च-नीचता, उपाध्या, शिक्षण अशा अनेक बिरुदावल्या ते वाहत असतात. ते काढले की आत असतो तो खराखुरा नैसर्गिक माणूस. कुठल्याही उपाधीच्या पलीकडचा ! लज्जा, शरम, सामाजिक दडपण यातून बाहेर आलेला विमुक्त मानव ! कपडे काळाप्रमाणे बदलते असतात; पण मानवी देह तसाच राहतो. तो कालातीत असतो."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ६७)*

"सृजनशीलता म्हणजे धैर्य. *खरा सर्जनशील कलाकार असतो जो सामाजिक दडपणातून व निर्बंधातून स्वतःला बाहेर काढू शकतो.* त्यासाठी फार मोठं धैर्य लागतं. त्या धैर्यातून निघालेली अभिव्यक्ती श्रेष्ठ प्रतीची असते. *धैर्य असेल तर कुठल्याही गोष्टीची चिकित्सा आपण कुठल्याही दडपणाशिवाय स्वतंत्रपणे करू शकतो.*"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ७०)*


"मानवी जीवनातल्या सर्वोत्कृष्ट अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचा कामप्रेरणेशी निकटचा संबंध आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे - कला ! सिग्मंड फ्रॉईड या जगविख्यात मनोविश्लेषकाने लिओनार्डो-द-विन्सीच्या चित्रांचं किंवा मायकेल अँजेलोच्या कलाकृतींचं केलेलं विश्लेषण. कामवासना मूळ स्वरूपात प्रगट केली तर समाजमान्य नसते. चित्र, शिल्प, साहित्य, संगीत अशा कलामाध्यमांतून तिला वाट करून दिली तर ती स्वीकारार्ह होते."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ८२)*

"मनोरुग्णांचा अभ्यास करताना फ्रॉईडला असं आढळलं की बहुसंख्य मनोविकारांच्या मुळाशी कामवासनाच असते. तिचं दमन झाल्यामुळे ती मनोविकारात रूपांतरित होते. हे दमन होतं समाजातल्या रुढिनियमांच्या दडपणांमुळे ! लैंगिक विचार हे निषिद्ध मानले गेल्यामुळे ते नेणिवेत ढकलले जातात. नेणिवेतल्या त्या विचारांची जाणीव करून दिली तर काही मानसिक व्याधी बऱ्या होऊ शकतात. *ज्या समाजव्यवस्थेत नैसर्गिक वासनांवर नितीकल्पनांचं दडपण जास्त, तो समाज दुःखी असतो.* अशा समाजात थोर कलाकृती क्वचितच आढळून येतात.

समाजात थोर कलाकृती निर्माण होऊ द्यायच्या असतील तर कामवासना न दडपता तिचा मुक्तपणे स्वीकार करायला हवा. हा स्वीकार फार अवघड आहे. स्त्री-पुरुष संबंध ही एक अपवित्र, घाणेरडी गोष्ट आहे, पाप आहे या समजुतीचा पगडा मनावर असेल तर अभिव्यक्तीला धुमारे फुटणार कसे ? *सृजनशीलता म्हणजे काय ? आत्तापर्यंत न केला गेलेला नवीन विचार किंवा कल्पना. असा विचार करण्यास मन आणि निर्भय असावं लागतं. विचारांना मोकळं आणि स्वतंत्र सोडावं लागतं.* एखादा विचार अगदी निषिद्ध मानला जात असला तरी त्याच्यासाठी मनाचा दरवाजा सताड उघडा ठेवावा लागतो. नीतिनियमांच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या मनाला सृजनशीलतेचा कोंब फुटणार कसा ?"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ८३)*


"कला आणि साहित्य आपल्याला गतानुगतिक रूढ विचारांच्या जोखडातून मोकळं करतात. नवी जीवनदृष्टी देतात. *समाजात जेव्हा जेव्हा वैचारिक क्रांती होते, तेव्हा या क्रांतीचं पहिलं पाऊल कलेने किंवा साहित्यानेच उचललेलं आहे. कला आपल्या जीवनविषयक जाणिवा समृद्ध करते. मग प्रश्न असा पडतो की अशा कलेच्या संपर्कात आल्यावर या प्रगल्भ जाणिवांचं प्रतिबिंब स्त्रियांच्या कलाकृतीत का आढळून येत नाही ?* स्त्री कलाकारांकडून थोर कलाकृतींची निर्मिती झाल्याची उदाहरणं विरळ का दिसून येतात ? *स्त्रियांच्या कलाकृती निसर्गचित्रं, वस्तुचित्रं, व्यक्तीचित्रं यांच्यापलीकडे का जात नाहीत ? त्यांच्यात नैसर्गिक कलागुणांची कमतरता आहे का ? मुळीच नाही ! पण समाजात स्त्रियांना अशा पद्धतीने वाढवलं जातं आणि विचार करण्यास शिकवलं जातं की सभोवतालचं जग त्यांना मर्यादित नजरेतूनच पाहता येईल.*

एकही स्त्रीला अजूनपर्यंत एखादं नग्नचित्र का रेखाटावंसं वाटलं नाही ? बहुतेक नग्नचित्र पुरुषांनी काढलेली आहेत. ती आहेत स्त्रियांची; पण काढली आहेत पुरुष चित्रकारांनी ! हा विरोधाभास नाही का ? स्त्रीची स्वतःच्या शरीराविषयी भावना त्यात कशी व्यक्त होणार ? खरंतर स्त्रियांची नग्नचित्रं स्त्रियांनीच रेखाटायला नकोत का ? *नग्नचित्रांबद्दल जी अश्लीलतेची झोड उठवली जाते, याचाही पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. ही चित्रं अश्लील आहेत हे कोण ठरवतं ? समाज ? समाजात कोण कोण असतं ? स्त्रिया, पुरुष आणि मुलं यांपैकी स्त्रियांना स्त्रियांचीच चित्रं कशी अश्लील वाटणार ? मुलांमध्ये तर लैंगिक भावना जागृत झाल्या नसल्यामुळे ती अश्लील वाटू शकणार नाहीत. म्हणजे राहता राहिले पुरुष ! समाजातल्या केवळ एकतृतीयांश घटकाला जे वाटतंय ते आपण सरसकट सगळ्या समाजालाच वाटतंय असं का गृहीत धरायचं ?*"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ८६)*


"नग्नता ही नैसर्गिक स्थिती आहे. पण नग्न राहणं किंवा त्याचं चित्रण करणं म्हणजे असभ्य आणि घाणेरडं आहे असं समजून आपण नैसर्गिक गोष्टींनाच पाप समजतो. आदिम संस्कृतीवर झालेली जगातली संशोधनं सांगतात की या समूहांच्या कामविषयक जाणिवा आधुनिक समाजापेक्षा जास्त समंजस असतात. नग्नतेचं कुठलंही अवडंबर न बाळगता हे समूह नग्न राहतात. कामवासनाही मर्यादेत असते. यावरून असा निष्कर्ष निघतो की *नग्नतेने कामवासनेला उत्तेजन मिळत नाही; उलट ती मर्यादित राहते.*"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ८७)*


"आपल्या शरीरात बाहेरून एखादा अनिष्ट पदार्थ घुसू लागला, तर त्याला रोखून धरणं, हा आपल्या शरीराचा स्वभावच आहे. एखादा रोगजंतू शरीरात घुसू लागला, तर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी लगेच त्याच्यावर तुटून पडतात. अन्न अन्ननलिकेतून जात असताना त्याचा एखादा कण वाट चुकून श्वासनलिकेकडं वळला, तरी देखील त्या कणाला बाहेर ढकलण्यासाठी आपल्याला ठसका लागतो. निसर्गानं आपल्या शरीराला ही मोठी विवेचक आणि संरक्षक देणगी दिली आहे. पण आपल्या बुद्धीला आणि मनाला मात्र असा ठसका आपोआप लागत नाही. म्हणूनच, नको असलेल्या गोष्टी बुद्धीत शिरू लागल्या, तर आपल्या बुद्धीला ठसका लागावा, याचे संस्कार स्वतःवर करणं गरजेचं असतं."

*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २६)*


"आपल्याला खरोखरंच असभ्य आणि घाणेरड्या गोष्टींची आवड होऊ नये, असं वाटत असेल तर त्या गोष्टी गूढ न करणं हाच उत्तम मार्ग आहे."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ८७)*


"आपल्याला त्या त्या वेळी वाटत असतं की एखादा मनुष्य आपल्या खूप जवळचा आहे म्हणून ! पण आपल्याला माहित असतो, तो त्या माणसाचा काही अंश ! खरा मनुष्य कसा आहे हे आयुष्य सरत आलं तरी कळत नाही."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !* 
*लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ११९)*


*"कामसंबंध ठेवणं हे पाप आहे, अनैसर्गिक आहे, असे सेंट पॉलपासून सगळे धर्मगुरू ओरडून सांगत असतात. पण *विवाहाचे चार तंत्र-मंत्र शिंपडले की हेच कामसंबंध अचानक पवित्र कसे काय होतात, याचं समाधानकारक उत्तर ते देऊ शकत नाहीत. कामसंबंध ठेवणं हे पाप असेल तर निसर्ग कामभावना स्त्रीपुरुषांच्या मनात मुळात जागवतो तरी कशाला, याचं उत्तर हे धर्मगुरू देऊ शकत नाहीत.* एकही धर्मग्रंथ निरूपण करत नाही की कौमार्यावस्थेपासून प्रदीप्त झालेली कामवासना विवाह होईपर्यंत शमवायची तरी कशी आणि जे अविवाहितच राहणार असतील त्यांचं काय ? ती शमवण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेणं हे अन्यायकारक नाही का ? का त्यांना लैंगिक वासनाच नाहीत, असा सोयीस्कर खोटा समज करून घ्यायचा ? त्यातही दुटप्पीपणा असा की *अविवाहित पुरुषांनी ब्रम्हचर्य राखलं नाही तर यांना चालतं, पण अविवाहित स्त्रियांनी कामसंबंध ठेवणं म्हणजे महापातक !* म्हणजे तथाकथित लैंगिक पावित्र्य राखण्याची जबाबदारी फक्त स्त्रियांवरच ! वा रे खासा न्याय !"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : १५८)*


"कामवासनेचं दमन करा, असं जे धर्मगुरू बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतात, तेच मुळी अनैसर्गिक आहे. स्त्री-पुरुषांमधल्या सहजस्फूर्त वासनांचं दमन केलं की मग त्या आडमार्गाने बाहेर येणारच. उलट दमन जितकं जास्त, तितके असे संबंध आडमार्गाने ठेवण्यास जास्त प्रोत्साहन मिळत जातं. अंतिमतः त्यात राष्ट्राची हानीच होते...."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : १५९)*


"चांगला नवरा म्हणजे काय ? मारझोड न करणं, कुठलंही व्यसन किंवा वाईट सवय नसणं, चांगली कमाई असणं किंवा तणतण न करता लागेल तेवढे पैसे बायकोला देणं म्हणजे चांगला नवरा का ? एखादी व्यक्ती चांगली असते म्हणजे ती चांगली जोडीदार असतेच असं कशावरून ? एखाद्या व्यक्तीचं तिच्या जोडीदाराशी जुळणं-न-जुळणं यात त्याच्या किंवा तिच्या चांगल्या असण्या-नसण्याचा प्रश्न नसतो. प्रश्न असतो तो अनुरूपतेचा !"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : १६८)*


"भावनांवर संयम असणं वेगळं आणि भावना बोथट असणं वेगळं. भावनांवर संयम ठेवण्यासाठी भावनांची परिपक्वता गाठावी लागते. पण भावना बोथट असतील तर याचा अर्थ पुरेशी संवेदनशीलता विकसित झालेली नसते."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : १७०)*

*"मद्याच्या व्यसनातून सुटका करायची असेल तर मोहाच्या क्षणांवर विजय मिळवला पाहिजे. ते आपल्याला मद्याकडे परत परत खेचून नेतात. फक्त त्या क्षणांवर लक्ष केंद्रित करा. ते क्षण मोक्याचे असतात.* त्या वेळी कच खाऊ नका. आत्मबळ एकवटा. हे आत्मबळ आपल्या प्रत्येकात असतं, फक्त त्याला उभारी द्यावी लागते. सर्वशक्तीनिशी उभारी द्या. *आपण व्यसनमुक्त होऊ शकतो; ते असाध्य नाही, असा प्रखर आत्मविश्वास मनात जागता ठेवा."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : १८९)*


"सगळ्याच स्त्रियांना एक निनावी समस्या आहे. पाहणी करताना मला जाणवत गेलं की आजूबाजूच्या सर्वच स्त्रिया कुठल्या ना कुठल्या कारणाने दुःखी आहेत. हे दुःख एकट्या वैयक्तिक स्त्रीचं नाही, तर त्यात व्यापकता आहे. हे दुःख आहे, स्वतःचं अस्तित्व लोपून गेल्याचं ! आयुष्य ओघळून गेल्याचं दुःख ! 

*याचं मुख्य कारण आहे, स्त्रीच्या आयुष्याची सार्थकता ही नैसर्गिकरीत्या लग्नात व मुलांना वाढवण्यात आहे, ही समजूत ! ही समजूत समाजाकडून हळूहळू भिनत जाणाऱ्या विषासारखी आपल्यात भिनत जाते. घरी-दारी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्त्रियांवर ठसवलं जातं की लग्न करणं किती महत्वाचं आहे ते ! ते न होणं म्हणजे फार भयंकर आहे; लग्न न होणाऱ्या स्त्रियांत काहीतरी कमतरता आहे.* स्त्रियांच्या मासिकांचे संपादकही  बहुतेक पुरुषच असतात. त्यामुळे त्यातील गोष्टी, लेख पुरुषप्रधान संस्कृतीला पोषक असेच लिहिलेले असतात व तेच रुजवले जातात. करिअर करणाऱ्या स्त्रिया खलनायिका म्हणून रंगवल्या जातात. त्यांच्याबद्दलचे प्रवाद पद्धतशीरपणे पसरवले जातात. त्यांना बदफैली ठरवलं जातं. याचा परिणाम असा होतो की लग्न होण्याची मानसिक गरज वाढीला लागते. *सुयोग्य वर हातांतून निसटून जाईल म्हणून कित्येक जणी शिक्षण अर्धवट सोडून लग्नाच्या मागे लागतात."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : १९३)*

"स्त्रिया जेवण बनवतात, घरातली कामं करतात, बाजारहाट करतात, साफसफाई करतात, पतीची शय्या सजवतात. पण *दमून-भागून अंथरुणावर पडलं की एक प्रश्न त्यांना सतावतो - मी म्हणजे फक्त एवढंच ? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची त्यांना भीती वाटते.* मग त्या स्वतःला गृहकृत्यात जुंपून घेतात, घरातली कामं ओढवून घेतात, ती अजून वाढवत बसतात; म्हणजे कुठल्या प्रश्नांना तोंड देण्याची पाळीच त्यांच्यावर येणार नाही.

अशा असमाधानी स्त्रिया मुलांचं भविष्य कसं घडवणार ? *मातेच्या असमाधानाचा दुष्परिणाम मुलांवरही होतो. अशा स्त्रिया स्वतःचं जगणं मुलांमध्ये शोधत राहतात. त्यांच्यावर दडपण आणून त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करतात.* समाजातली पुढली पिढीही अशा रोगट मानसिकतेतच वाढत आहे.

*स्त्रियांचा शत्रू त्या स्वतःच आहेत; कारण अशा समजुतींना त्या मनात थारा देतात. त्यांचं पालनपोषण मनात करत राहतात.* या समजुतीचा मनावरचा पगडा कमी करायचा असेल तर स्वतःचा व्यक्ती म्हणून विचार करा. स्वतःमधल्या सर्जनशीलतेला वाट करून द्या. *लग्न करणं किंवा मुलांना वाढवणं यातही आनंद आहे; पण तो मार्ग तुमची स्वतःची निवड असेल तर ! स्वतःला विचारा की ही खरंच माझी निवड आहे की समाजाने लादलेली, वरवर स्वतःची वाटणारी आभासी निवड आहे ?* असं केलं नाही तर आत्मप्रगटीकरणाकडे वाटचाल होणार कशी ? आत्मभान वाढवणार कसं ?"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : १९४)*


"स्त्रियांच्या वाट्याला येणारं दुःख हे निसर्गाने तयार केलं नाही. स्त्री जन्मामुळे ते आलं नाही.पुरुषप्रधान कुटुंबपद्धतीने ते आपल्यावर लादलं आहे.

कित्येक स्त्रिया हे आपलं नशीब आहे, असं म्हणत दुःख सहन करत राहतात एखादी गोष्ट नशीब म्हणून स्वीकारली की असहायता येते नशिबातली गोष्ट आपण बदलू शकत नाही, असं वाटून बदल घडवण्यासाठी प्रयत्नच केले जात नाहीत."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : १९५)*




"आपला विश्वास न बसणाऱ्याच काही गोष्टी आपल्या हातून होतात. त्यातूनही आपण शिकत जातो. विशेषतः आपण किंमत चुकवली असली ना, की कायमचे धडे मिळत जातात. एका लेखकाने म्हंटलंच आहे, की There are no mistakes, there are only lessons."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २०५)*


"ज्या लोकसमूहात धर्माचा पगडा कमी असतो अशा समूहातील लोकांच्या कामविषयक कल्पना अधिक शुद्ध, नैसर्गिक आणि समंजस असतात. आपल्या धर्मात मुळी आपल्याला असं पढवलेलं असतं की कामप्रेरणेचं नैसर्गिक प्रयोजन आहे, प्रजोत्पादन ! अनेक स्त्रियांना मग वाटतं की मुलं झाली की नैसर्गिकरित्याच आपली कामवासना कमी होते. यात नैसर्गिकतेपेक्षाही मानसिकतेचाच भाग जास्त आहे. आपण मनाने अशी समजूत करून घेतली तर शरीर निरोगी असूनही कामवासना नकोशी वाटत राहते."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २०५)*

"लैंगिकतेला नैतिकतेतून मोकळं केलं पाहिजे. लैंगिकतेकडे नीतिनिरपेक्षतेने पाहिलं पाहिजे. आपण जेव्हा खातो-पितो, गप्पा मारतो, तेव्हा हे आपण नैतिक करत आहोत का, असा प्रश्न मनात उभा राहत नाही का ? भूक, तहान, निद्रा यांसारखी कामक्षुधाही साहजिक आणि नैसर्गिक आहे. तिलाच वेगळं काढून नैतिकतेच्या पिंजऱ्यात का उभं करायचं ? जसं खाताना, पिताना आपण स्वातंत्र्य घेतो; त्यासाठी आपल्याला कुणाची परवानगी घ्यायची गरज वाटत नाही किंवा आपण काही विशिष्ट अन्न खाल्लं म्हणून आपण अनैतिक ठरत नाही, तसंच स्वातंत्र्य लैंगिक गोष्टींबाबतही मिळालं पाहिजे !"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २०६)*

*"जास्तीत जास्त ढोंगीपणा समाजात कुठे असेल तर तो असतो लैंगिक गोष्टींत ! आणि दांभिकता सगळ्यात जास्त कुठे असेल तर मध्यमवर्गात !*

लैंगिक गोष्टींतली समाजाची दांभिकताच बऱ्याचशा प्रश्नांच्या मुळाशी आहे. लैंगिक स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या शरीरावरचा स्वतःचा हक्क बजावणं. आपला शरीरानंद कसा घ्यायचा, कुठून घ्यायचा, कुणाकडून घ्यायचा हा निर्णय परंपरांगत रुढींनी पुरुषांवर सोपवलेला आहे. तो स्वतःकडे हिसकावून घ्या. कारण तो तुमचा वैयक्तिक हक्क आहे. पुरुषप्रधान मानसिकतेचा पगडा आपल्यावर इतका असतो की स्वतःच्या सुखासाठी प्रयत्न करणंही आपल्याला पाप वाटतं. *लक्षात घ्या, सुखात कोणतंही पाप नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला त्रास देत नाही, तोपर्यंत त्यात कोणतीही अनीती नाही."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २०७)*

*"आपल्याला जे लैंगिक स्वातंत्र्य अभिप्रेत आहे, त्याचा अर्थ कुठल्याही अनोळखी सहचराबरोबर कामक्षुधा भागवणं इतक्यापुरताच मर्यादित नाही.* केवळ शारीरिक क्षुधेचा प्रश्न असेल तर आपल्या देशात हे स्वातंत्र्य भरपूर आहे. पण तरीही समाज सुखी का नाही ? कारण लैंगिक स्वातंत्र्याचा अर्थ हा जास्त व्यापक आहे. *लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे शरीरासह मनालाही प्रगल्भ पातळीवर नेणारं प्रेम करण्याचं स्वातंत्र्य ! असं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्री-पुरुषांना मिळालं तर समाज सुखी होईल."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २०८)*

"विवाह ही खरी मानसिक गरजेपेक्षा सामाजिक गरज आहे. सर्वांचे मानसिक घटक विवाहाला अनुकूल नसतात. समाजाने याचा विचार करून सर्वांवर विवाहपद्धत लादणं अन्यायकारक नाही का ?"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २०९)*

"विवाहसंस्था ही स्त्रियांच्या संरक्षणासाठी आहे, असं म्हंटलं जातं खरं ! पण अविवाहित स्त्रियांपेक्षा विवाहित स्त्रियांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. पुरुषांमध्ये ही टक्केवारी अगदी उलटी आहे. अविवाहित पुरुषांपेक्षा विवाहित पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खूपच कमी आहे. याचा थोडक्यात निष्कर्ष असा की विवाहसंस्था पुरुषांनाच जास्त फायदेशीर आहे."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २१०)*

"विवाहसंस्थेचे समर्थक नेहमी एक मुद्दा मांडतात, म्हणे कुटुंबसंस्था टिकवून ठेवण्यासाठी विवाहसंस्था आवश्यक आहे. कुटुंबसंस्था म्हणजे काय ? स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची व मुलं स्वावलंबी होईपर्यंत त्यांचं पालनपोषण करण्याची व्यवस्था. सहजीवनाची व अपत्यसंगोपनाची नैसर्गिक ओढ स्त्री-पुरुषांना असते. विवाहसंस्था असो वा नसो, कुटुंबसंस्था टिकून राहणारच ! ती टिकून राहावी म्हणून तिला विवाहसंस्थेचा टेकू असलाच पाहिजे, असं नाही.

नैसर्गिक ओढीमुळे स्त्री-पुरुषांना एकत्र राहायचं असेल, तर त्यांना विवाहासारख्या बाह्य बंधनाची गरजच काय ? विवाहसंस्था नसली तरीही ते राहू शकतात की ! उलट त्यांचं सहजीवन कायद्याच्या कचाट्यात आणल्यामुळेच समस्या निर्माण होतात."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २११)*


"कामतृप्ती कशी करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. *दोन प्रौढ व्यक्ती जर स्वखुशीने कामसंबंध ठेवत असतील तर ती त्या दोघांची खाजगी बाब आहे. त्यामध्ये कायद्याने नाक खुपसण्याचं कारण नाही.* त्यासंबंधी कायदे करणं म्हणजे मूलभूत व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. आणि समाजस्वास्थ्यासाठीही ते तितकंच हानिकारक आहे. *समजा एकमेकांची ओढ ओहोटीला लागली असेल पण केवळ कायद्याच्या बंधनामुळे स्त्री-पुरुष एकमेकांशी भांडत, धुसफुसत सहजीवन व्यतीत करत असतील तर त्यात समाजाचा काय फायदा ?* आपल्या अपत्यांच्या मानसिक स्वास्थ्यसाठीही ते हानिकारकच ठरणार नाही का ?"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २११)*

"विवाहसंस्था नाहीशी झाली तर उलट प्रेम करणारी जोडपी स्वखुशीने एकत्र राहतील आणि ज्यांचं एकमेकांशी पटत नाही, ती स्वतःला जखडून न घेता आपलं आयुष्य अधिक समाधानात जगतील. हे जखडून घेणं कशामुळं होतं माहितीय ? विवाह झाला की स्त्रीची कामेच्छा ही तिच्या नवऱ्याची खाजगी मालमत्ता होते. म्हणजे परत याचं मूळ पुरुषप्रधान कुटुंबपद्धतीतच रुजलेलं दिसतं."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २११)*


"मानवी मनाची जी जडणघडण आहे, त्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींबद्दल कामवासना वाटणं साहजिक आहे. हे वास्तव विवाहसंस्थेत स्वीकारलं जात नाही. एखाद्या जोडीदाराबरोबरच्या कामसंबंधातून आनंद मिळत असेल तर खुशाल घ्यावा; पण हा आनंद सदासर्वकाळ केवळ त्याच जोडीदारापासून घेतला पाहिजे हे म्हणणं मात्र अवास्तव आहे."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २११)*

"स्त्रियांच्या बहुतांशी समस्यांचं मूळ त्यांच्या घुसमटलेल्या कामजीवनातच आहे. बहुतांश स्त्रियांना समागम सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. इच्छा नसताना लादलेल्या शरीरसंबंधांचा विचार केला तर एखाद्या वेश्येपेक्षाही विवाहित स्त्रियांना असे शरीरसंबंध जास्त वेळा सहन करावे लागतात."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २१२)*


"प्रत्येक स्त्रीचं आयुष्य म्हणजे एक मिटलेलं पुस्तक आहे. त्यांच्या पानापानावर लिहिल्या आहेत सहन न होणाऱ्या वेदना ! ठणका ! होरपळ ! असमाधान ! ही मिटलेली पुस्तकं उघडायला हवीत. त्यातल्या धगधगणाऱ्या ज्वालामुखीला वाट मोकळी करून द्यायला हवी. वर्षानुवर्षं धुमसत, धगधगत असणारा पेटता लाव्हारस अंगावर बाळगणारा ज्वालामुखी ! तो जागृत झाला की मग कुणीच त्याला थोपवू शकणार नाही. कुठल्याच विरोधाला तो जुमानणार नाही."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २२३)*

"पुरुष स्वतःच्या कामक्षमतेचा संबंध पौरुषत्वाशी जोडतात. कामशक्ती ही आपल्या व्यक्तिमत्वातल्या इतर अनेक क्षमतांसारखीच एक आहे. समजा, एखादा पुरुष गणिती क्षमतेत कमी असेल तर त्यामुळे तो स्वतःला 'पुरुष' म्हणून कमी समजतो का ? पण कामक्षमतेचं तसं होत नाही. लिंगउत्थापन थोडा वेळ जरी जास्त टिकलं नाही तरी पुरुषाचं शृंगारातलं लक्ष उडतं. आपण पुरुष म्हणून कमी आहोत ही भावना त्याला इतकी कुरतडते की लिंगउत्थापनाचे प्रयत्नच करणं तो सोडून देतो. तसं पाहिलं तर गणिती क्षमतेत आणि कामक्षमतेत फरक काय आहे ? मग फक्त कामक्षमतेलाच का म्हणून पुरुषत्वाच्या पारड्यात तोलायचं ?"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २२९)*


"ज्या स्त्रिया स्वतःला दुय्यम समजतात आणि शृंगारात सर्वस्वी पुरुषावर असतात, त्या पुरुषांची दिशाभूल करतात. त्या सेक्सबद्दलची खरी मतं पुरुषांना सांगतच नाहीत. पुरुषांना मात्र विनाकारण समज होतो की आपण अगदी उत्तम शय्यासोबत करतो ! त्याच्या हे ध्यानीमनीही नसतं की शृंगार ही एक कला आहे. तिचा आनंद घ्यायचा आणि द्यायचा असेल तर ती विकसित करावी लागते. त्यांना वाटत असतं, की शृंगारात काय शिकायचं ? तो आपल्याला निसर्गतःच येतो."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २२९)*

"एखाद्या स्त्रीची इच्छा नसताना तिला एखादी गोष्ट बळजबरीने करायला लावणं म्हणजे शोषण. पण एखाद्या स्त्रीला वेगवेगळ्या पुरुषांची रत होण्याची इच्छा असेल व पुरुषांनाही ते आवडत असेल, तर यात शोषणाचा प्रश्न येतोच कुठे ? अगदी असं मानलं की तिची अशी इच्छा नसेल पण ते करण्याचा तिला मोबदला मिळत असेल व त्या मोबदल्याच्या आशेने ती करत असेल तरीही ते शोषण कसं ठरणार ? समाजातल्या कितीतरी जणांना त्यांच्या नोकरी व्यवसायातलं काम आवडत नसतं; पण मोबदला चांगला मिळतो म्हणून ते करत असतातच ना? मग त्यांचं शोषण होतंय असं आपण म्हणतो का ? मग शरीरविक्रयाच्या क्षेत्राला वेगळे मापदंड का लावायचे ?"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २३५)*


"उपजीविकेसाठी स्त्रीने कुठलं काम करावं ते निवडण्याचा हक्क तिला आहे. ती इतर कुठलाही व्यवसाय जसा निवडू शकते तसाच तिची इच्छा असल्यास वेश्याव्यवसायही निवडण्याचा हक्क तिला कायद्याने मिळाला पाहिजे. *एखादी स्त्री बुद्धिमत्तेचा वापर करून उपजीविका करत असेल तर तिला समाज आडकाठी करत नाही; पण एखादी स्त्री जर मादकतेचा वापर करत असेल तर लगेच तिच्यावर आक्षेप घेतले जातात. तिला हीन ठरवलं जातं.* उपजीविकेचे अलैंगिक मार्ग उच्च व लैंगिकतेशी संबंधित असलेला वेश्याव्यवसाय हीन अशी वर्गवारी करायचं कारण नाही. अशी वर्गवारी त्या समाजात केली जाते जिथे लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. लैंगिकतेप्रमाणे वेश्याव्यवसायालाही जर नीतीच्या चौकटीतून बाहेर काढलं तर ही समस्या उद्भवणारच नाही.

वेश्याव्यवसायात स्त्रीचं शोषण होतं अशी टोकाची भूमिका न घेता या व्यवसायातही वैचित्र्य असतं, उलट वेश्या लैंगिकतेच्या अवाजवी निर्बंधांतून बाहेर येऊन अधिक मोकळेपणाने जीवन जगत असतात, या सत्याचाही स्वीकार केला पाहिजे. *वेश्याव्यवसायातलं सेवाशुल्क हे स्वतः स्त्रियांनीच ठरवलं तर त्यात शोषणाचा प्रश्न येणार नाही. त्यांचं दलालांवरचं अवलंबित्व त्यामुळे कमी होईल.* त्यामुळे या व्यवसायाला बंदी न घालता इतर क्षेत्रांप्रमाणे उलट त्यांना श्रमिक म्हणून मान्यता दिली तर जास्त सुरक्षितता मिळेल."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २३६)*


"विल्यम रीच ने नामकरण केलेल्या 'सेक्स पॉझिटिव्ह' या तत्वज्ञानाची मध्यवर्ती कल्पना आहे की, *समाजातल्या लैंगिक समस्यांचं मूळ हे लैंगिकतेकडे पाहण्याच्या नकारात्मक दृष्टिकोनात आहे. जर या समस्यांवर तोडगा काढायचा असेल तर या दृष्टिकोनातच आमूलाग्र बदल केला पाहिजे.* म्हणजेच तो 'सेक्स पॉझिटिव्ह' झाला पाहिजे. यासाठी पोर्नोग्राफीपासून ते समलिंगी संबंधांपर्यंत लैंगिकतेच्या सर्व आविष्कारांना मोकळीक दिली पाहिजे. फक्त ते सुरक्षित व स्वखुशीने असल्याची खबरदारी घेतली की झालं !"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २३८)*


"विल्यम रीचने त्याच्या 'लैंगिक क्रांती' या पुस्तकात लिहिलंय, प्राचीन ग्रीक संस्कृतीचा लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप होता. त्यामुळे या संस्कृतीत लैंगिक गुन्ह्यांचं प्रमाण अत्यल्प होतं. याउलट मुख्यतः ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाखाली असणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृती या संपूर्ण लैंगिकतेलाच वाईट व नकारात्मक ठरवतात. कामसुखात पाप असतं किंवा त्याचं मुख्य प्रयोजन फक्त पुनरुत्पादन हेच असतं, असे रोगट दृष्टिकोन अशा संस्कृतींत जोपासले जातात. अशा संस्कृतींत कामक्रियांची दर्जानुसार विभागणी होते. उदाहरणार्थ, वैवाहिक कामसंबंध हे श्रेष्ठ दर्जाचे व हस्तमैथुन, समलिंगी संबंध हे दुय्यम दर्जाचे तर स्व किंवा परपीडनासारख्या लैंगिक क्रिया या नीच म्हणजे विकृत ठरवल्या जातात.

लैंगिकता हे सृष्टीतलं मूलभूत तत्त्व आहे. फुलं बहरणं, वृक्ष फळाफुलांनी लगडणं, पक्ष्यांचं कूजन हे सर्व लैंगिकतेचेच वेगवेगळे आविष्कार आहेत. किंबहुना निसर्गातलं सारं सौंदर्यच मुळी लैंगिकतेमुळे आहे. मग माणसांनाच अपवाद का करायचा ?"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २३८)*


"पोर्नोग्राफीला बंदी घालणं म्हणजे लैंगिकतेबद्दल नकारात्मकता दर्शवणं. अशी बंदी घालूनही समाजातले लैंगिक हिंसाचार थांबणार नाहीत. कुठलीही गोष्ट बंदी घालून थोपवता येत नाही. उलट बंदीमुळे त्या गोष्टीबद्दलचं औत्सुक्य अजूनच वाढीला लागतं. अशाने त्या चोरून-लपून-छपून करायलाच आपण समाजाला नकळत प्रवृत्त करत असतो. "

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २३९)*


"प्रत्येक गोष्टीसाठी उठसूट पुरुषांना जबाबदार धरणं कितपत योग्य आहे? पुरुषसत्ताक समाजव्यवस्था हे एक कारण असू शकेल, पण ते एकमेव कारण कसं काय असेल ? *ज्या समाजातले स्त्री-पुरुष परस्परांच्या लैंगिकतेकडे स्वच्छ नजरेने पाहू शकत नसतील, जोडीदाराच्या इच्छेचा आदर करत नसतील किंवा एका घटकाची लैंगिकता ही दुसऱ्या घटकाच्या लैंगिकतेपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी वर्गवारी करत असतील, तर स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याच्या प्रवृत्तीला चालना मिळणारच !* म्हणजेच ही प्रवृत्ती वाढीला लागण्याचं कारण केवळ पुरुषसत्ताक समाजव्यवस्था नाही; तर त्याचं व्यापक कारण समाजाच्या दूषित दृष्टिकोनात नाही का ? असा दूषित दृष्टिकोन स्त्री-पुरुष दोघांचाही असू शकतो. एकट्या पुरुषांनाच का लक्ष्य करायचं ?

असा दृष्टिकोन जोपासल्यामुळे कामजीवनातला जो कोंडमारा होतो, तो फक्त स्त्रीचाच होतो असं थोडंच आहे ? तो तर पुरुषांचा पण होतोच की ! पुरुषाला स्त्रीच्या मानाने शमीकरणाचे थोडे अधिक मार्ग उपलब्ध असतात, एवढंच ! पण म्हणून कोंडमारा होत असलेला प्रत्येक पुरुष लगेच उठून वेश्यागमन करतो, असंही नाही  ना ? त्यामुळे लैंगिकतेच्या बाबतीत केवळ स्त्रियाच भरडल्या जातात असं नाही, तर पुरुषही भरडले जातातच की ! लैंगिक दमन स्त्री-पुरुषांत सारख्याच प्रमाणात होतं, याबाबत दुमत होण्याचं कारणच नाही !"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २३९)*

"भूक लागली म्हणजे खाणं एवढाच ती शांत करण्याचा उपाय असतो, तसंच कामक्षुधा शांत करण्यासाठी कामक्रिया हाच एकमेव उपाय असतो. तो न करता, तो दुसऱ्या कुठल्या तरी अलैंगिक क्रियेतून भागवणं ही नकारात्मक प्रतिक्रिया आहे. आपण मूळ क्रिया का करत नाही ? कारण ती जशीच्या तशी करण्याची लाज वाटत असते आपल्याला ! म्हणजेच त्या क्रियेबद्दल त्याज्य दृष्टिकोन असल्यामुळेच आपल्याला दुसऱ्या क्रियेत मन गुंतवावं लागतं. तो काढून टाकण्यासाठी कामेच्छेचं त्याच स्वरूपात शमन करणं हाच एकमेव बिनतोड उपाय आहे व या उपायाला समाजाने चालना दिली पाहिजे. तसं न करणं म्हणजे लैंगिक विकृतींना आमंत्रण देणं होय. हल्लीच्या समाजात लैंगिक विकृती वाढलेल्या दिसतात याचं कारण हेच आहे."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २४०)*


"योनिशुचितेच्या कल्पनेचा आपण सर्वांनीच विचार करायला पाहिजे. योनिशुचितेचं अवडंबर माजवून स्त्रियांना सतत बलात्काराच्या भीतीखाली डांबलं जातंय. स्त्रीचं चारित्र्य तिच्या जननेंद्रियात आहे, अशी समजूत उराशी बाळगून स्त्रिया संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेत काढतात. जननेंद्रियांना काही झालं तर आपल्या चारित्र्यावर डाग पडेल, स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असल्या समजुतींनी तर ही भीतीची छाया अजूनच गडद होते. आपल्या जननेंद्रियांना पुरुषांपासून धोका आहे, असं समजून जीवनातले एकेक अनुभव त्या बंद करतात. उदाहरणार्थ, रात्री न भटकणं किंवा भडक कपडे न घालणं, अशा कितीतरी स्वातंत्र्यांना योनिशुचितेच्या अवाजवी भयामुळे त्या मुकत जातात."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २४३)*


*"स्त्रियांचं सबलीकरण करायचं असेल तर त्यांना शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांचं मानसिक सबलीकरण केलं पाहिजे. मानसिक सबलीकरण म्हणजे योनिशुचितेचं अवडंबर मोडून काढणं.* जननेंद्रियांना शरीराच्या इतर भागापेक्षा वेगळं महत्त्व द्यायचं कारण काय ? तसं वेगळं महत्त्व देऊन उभा जन्म भीतीच्या छायेत काढण्यापेक्षा या भीतीचाच समूळ नाश करावयास हवा. दुर्दैवाने जननेंद्रियांवर हल्ला झालाच तरी कोसळून जायचं कारण नाही. तो तिथे झालेला अपघात समजावा. शरीराच्या इतर अवयवांना अपघात झाला तर आपण सावरतोच ना ? मग जननेंद्रियांनाही वेगळी वागणूक का द्यायची ? कुठले कपडे हमखास घातले किंवा कुठली वेळ नेमकी टळली की लैंगिक हिंसाचाराचा धोका टळेल याचीही निश्चिती नाही. याचा अर्थ मुद्दामहून जाऊन धोका ओढवून घ्यायचा नाही, पण तसं होईलच म्हणून सतत धास्तावून जाण्याचंही कारण नाही. एकदा का धास्तीतून बाहेर पडलं की बंद करून घेतलेले अनेक अनुभव जगता येतील. *आपण जितके वेगवेगळे अनुभव घेऊ तेवढी आपली जीवनाबद्दलची समजूत अधिक समंजस होईल. तेच खरं सबलीकरण आहे."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २४३)*


"समाजातले लैंगिक हिंसाचार थांबवण्यासाठी आपण मूळ कारणांचा शोध घेऊन काही दीर्घकालीन उपायही करणं जरुरीचं आहे. *हल्लीच्या समाजात पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप नाही, हे तर उघडच आहे; पण स्त्रियांचा तरी पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप आहे का ?* याचंही उत्तर 'नाही' असंच आहे. समाजात वाढत चाललेल्या हिंसाचारामुळे स्त्रिया पुरुषांकडे साशंकतेने पाहतात. जसं काही सगळ्या पुरुषांच्या नजरेत पाशवी वासनाच आहे. जसा काही समाजातला प्रत्येक पुरुष तिचा शत्रूच आहे. तिच्या शरीरावर हल्ला करण्यास तो टपला आहे. *ज्या समाजात स्त्री-पुरुष एकमेकांकडे दूषित नजरेने पाहतात, त्या समाजात लैंगिक हिंसाचार वाढतील का थांबतील ?."*

हल्लीच्या समाजात स्त्री-पुरुष एकमेकांना केवळ लैंगिकतेच्या परिमाणातूनच मोजताहेत. आज चित्रपट, नाटकं, साहित्य, टीव्हीवरचे कार्यक्रम सगळीकडे जणू काही लैंगिकतेचा महापूर आलाय. लैंगिक हिंसाचाराच्या बातम्या चवीने चघळल्या जात आहेत सगळ्या समाजाला जसा काही लैंगिकतेशिवाय दुसरा विषयच नाही हे होण्याचं कारण म्हणजे लैंगिकतेबद्दल सर्वत्र नकारात्मकता दाखवतोय तेवढ्याच तीव्रतेने समाजाची सगळी ऊर्जा केवळ लैंगिकतेवरच विनाकारण खर्च होतेय. त्यामुळे *नकारात्मक दृष्टिकोन सुधारणं हाच हिंसाचार थांबवण्याचा दीर्घकालीन उपाय आहे."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २४४)*

"जे गुण आपण स्त्रीविशिष्ट समजतो, उदाहरणार्थ, सलज्जता, विनयशीलता, सहनशीलता त्यात नैसर्गिकतेचा भाग फारच कमी आहे. मुळात स्त्रीत्व असं काही वेगळं नाहीच. *स्त्रीने लाजलं पाहिजे, संकोच दाखवला पाहिजे अशा अपेक्षा समाजाने तयार केल्या आहेत. त्यांचा सततचा मारा झाल्यामुळे व फक्त त्याच गुणांना प्रोत्साहन दिल्यामुळे स्त्रिया ते गुण आपसूकच आत्मसात करतात.* मग समाजात दिवंडी पिटली जाते, की बघा हे गुण स्त्रीत नैसर्गिकरित्याच आहेत !"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २४६)*

"सवलती देऊन शोषितांचं सबलीकरण होईल ही चुकीची समजूत आहे. उलट अशा तरतुदींमुळे निम्नतेची मानसिकता वाढीला लागते. *राखीव जागांची मागणी करणं म्हणजे आपण कमी असण्यावर शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे.* खरंतर ही शोषकांची धूर्त चाल आहे. सवलतींचे तुकडे शोषितांवर फेकले की ते हुरळून जातात; पण प्रत्यक्षात त्यामुळे त्यांची आपण कमी असल्याची भावना अजून पक्की होते. ती पक्की होण्यातच शोषकांचा फायदा आहे, कारण त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे वर्चस्व गाजवण्यात ते यशस्वी होतात. म्हणजे *शोषण खरोखर थांबवायचं असेल तर राखीव जागा किंवा सवलती अशा बाह्य गोष्टी न स्वीकारता शोषितांनी स्वतःच्या मानसिक सबलीकरणावर भर द्यायला पाहिजे. सवलतींच्या कृपाछत्राखाली शोषितांच्या वेगवेगळ्या गटांची गटाअंतर्गत अस्मिता वाढत जाते. मग शोषितांचा प्रत्येक गट स्वतःची वेगळी चूल मांडायला लागतो. अशा प्रत्येकाने वेगळ्या चुली मांडल्या तर समाजात एकसंधता तरी कशी राहणार ? अशाने या गटांमधील दरी कमी होण्यापेक्षा वाढत जाणार नाही का ?*"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २५२)*

"पुरुषांना शत्रू समजून त्यांचा द्वेष करण्यापेक्षा सकारात्मक भावना ठेवून पुढे जायला हवं. स्त्रीवाद म्हणजे बरोबरीचा हट्टाग्रह नाही. तसं समजणं म्हणजे पुरुषांची नक्कल करणं झालं. मग पुरुषांना जे मिळतं ते स्त्रियांना मिळाल्यावर स्त्रीवाद संपून जाईल. स्त्री-पुरुष चौकटीच्या पलीकडे जाऊन तिचा 'व्यक्ती' म्हणून विकास करण्यासाठी प्राधान्य देणं म्हणजे स्त्रीवाद."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २५३)*

"आपण नकारात्मक बिरुदांना उगाचच घाबरत असतो. ते बिरुद एकदा चिकटल्यानंतर लक्षात येतं की ते काही फारसं भयानक नसतं. समाजातला एक वर्ग असा असतो की त्यांना अशा नकारात्मक बिरुद धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दलचं आकर्षण असतं. हे लोक तुम्हाला शोधत येतात. ते सगळेच काही खलप्रवृत्तीचे नसतात. उलट त्यांना तुमच्याबाबत अधिक जाणून घेण्याची इच्छा असते किंवा स्वतःच्या आयुष्यात मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रियांनी ते इतके व्यथित झालेले असतात की त्याला कसं तोंड द्यायचं याचं उत्तर त्यांना तुमच्याकडून हवं असतं."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २६४)*

"काहींच्या मते सर्वच लैंगिक साहित्य हे पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावातून आलेलं असल्यामुळे त्याचा समूळ नायनाट केला पाहिजे. काहींच्या मते पोर्नोग्राफीत स्त्रियांचं लैंगिक शोषण असतं तर इरॉटिकात स्वसंमती असते. काहींच्या मते इरॉटिका ही उच्चभ्रू पोर्नोग्राफीच आहे, फक्त पॅकेज वेगळं आहे. ते काही जण इरॉटिक आर्ट म्हणजे सौंदर्यवादी आणि पोर्नो म्हणजे बीभत्स, अश्लील असंही मानतात. 

माझ्या मते, इरॉटिक आर्ट व पोर्नो आर्ट यात फरक करता येत नाही कारण या दोन्हींत असा भेदभाव का करावा याला कुठलाच तार्किक आधार नाही. शृंगार हा रसच मुळी सौंदर्याधिष्ठीत आहे. त्यामध्ये एक चांगलं व एक वाईट असं वर्गीकरण करणं म्हणजे परत लैंगिकतेचे काही आविष्कार श्रेष्ठ व काही कनिष्ठ यावर शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे. राहता राहिला मुद्दा शोषणाचा ! लैंगिक शोषण पोर्नोग्राफीत असतं आणि इरॉटिकात नसतं, हे कसं काय सिद्ध करणार ? कारण या दोन्हींचे दृश्य परिणाम तर सारखेच असतात. *शोषण मग ते राजकीय असो, आर्थिक असो वा धार्मिक असो, ते वाईटच आहे. पण अशा शोषणाला आपण ते अश्लील आहे म्हणून ओरड करतो का ? पण लैंगिकतेच्या बाबतीत मात्र वेगळे मापदंड का लावले जातात ? मी पुरस्कार करते तो शोषणविरहीत लैंगिक साहित्याचा! जर शोषण नसेल तर कुठलंच लैंगिक चित्रण हे बीभत्स होऊ शकत नाही. त्यात सौंदर्यच असतं. पण बघणाऱ्याच्या नजरेतच जर बीभत्सता असेल तर ती जबाबदारी दर्शकाची का कलाकाराची ?*"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २६७)*


"नग्नता अश्लील आहे ही जाणीव समाजाने आपल्या मनावर ठसवली आहे. ती उपजत नसते. तिला जर अश्लील समजलं जातं असेल तर आपल्या अवतीभवती वावरणारे सर्व प्राणीही अश्लील समजले पाहिजेत. नग्नता हे निसर्गाचं खरं स्वरूप आहे. तिला अश्लील ठरवणं ही मानसिक प्रवृत्ती आहे. ज्या समाजात नग्नतेला शरीरसंरक्षणापेक्षा फाजील महत्व दिलं जातं व जिथे कपड्यांचा फार बाऊ केला जातो, त्या समाजात नग्नतेबद्दल घृणा निर्माण होते. ज्या समाजात कपड्यांवरच श्लील-अश्लीलतेचा शिक्का मारला जात असेल तिथे कपडेसुद्धा कामुक झाले तर नवल नाही ! नग्नता व लैंगिकता यांचं जवळचं नातं आहे. ज्या समाजात नग्न असणं म्हणजे काहीतरी घाणेरडं आहे, असं ठसवलं जातं त्या समाजाचा लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही रोगट असतो."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २६८)*

"सेक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जीवनविषयक व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग असतो व तो जीवनदृष्टिकोनाशी सुसंगत असणं अपेक्षित आहे. *माझा जीवनविषयक दृष्टिकोन असा आहे की प्रत्येक व्यक्तीने समर्थ झालं पाहिजे. सामर्थ्य म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं संपूर्ण नियंत्रण स्वतःच्याच हाती घेणं. यात कामसंबंधांचं नियंत्रण स्वतःकडे असणं अंतर्भूत आहे. एखाद्या व्यक्तीच्या कामसंबंधांचं नियंत्रण समाज, कायदा किंवा इतर व्यक्ती करत असतील तर माझ्या मते ती व्यक्ती अजून गुलामगिरीतच आहे.*

सेक्स हा माझ्या आयुष्यातला मी एक महत्त्वाचा भाग मानते. पण मला तो हत्यार म्हणून वापरायचा नाही किंवा तो वापरून आयुष्य नियंत्रित करावं असंही वाटत नाही. *सेक्स आयुष्यातून अजिबात वजा करण्याऐवढा क्षुद्रही नाही. सेक्सला मी आयुष्यातला आनंदाचा एक मोठा स्रोत मानते व त्याच्याकडे नीतिनिरपेक्ष भूमिकेतून पाहते."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २६८)*

"आपलं आयुष्य सुखी होण्यासाठी स्वतःपेक्षा वेगळ्या अशा बाह्य गोष्टींचा शोध घेतला पाहिजे, हे मिथक आहे, अशी धारणा असलेले लोक सतत कशाच्या ना कशाच्या शोधात राहतात. मग तो कधी एखाद्या स्वप्नाचा शोध असतो, कधी व्यक्तीचा शोध असतो, कधी तत्त्वाचा असतो, कधी अध्यात्मिक शक्ती असते, कधी राजकीय चळवळ तर कधी औद्योगिक साहस असतं. म्हणजे ते आनंदासाठी इतर गोष्टींवर अवलंबून राहतात. *कुठल्या तरी बाह्य गोष्टींचा शोध घेण्यापेक्षा तुमच्या स्वतःकडेच सुखाचा ठेवा आहे. त्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपण जीवनात सुखी होऊ."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २६९)*

"आज आपल्या आजू बाजूला कितीतरी अविवाहित किंवा एकटे राहणारे स्त्री-पुरुष आहेत, विधवा-विधुर आहेत, वृद्ध मंडळी आहेत. या सर्वांना जणू काही कामवासना नाहीच असं आपण सर्रासपणे मानतो किंवा असली तर त्यांनी तिचं दमन करावं अशी अपेक्षा ठेवतो. हा कोंडमारा फक्त एवढ्याच स्त्री-पुरुषांकरता मर्यादित नाही. कित्येक विवाहित जोडप्यांमध्येही अनुरूपता नसते. अशा वेळी एका किंवा दोन्ही जोडीदारांनी मुकाटपणे स्वतःची कामवासना मारून टाकावी, अशी अपेक्षा ठेवली जाते. त्यांनी कामपूर्तीसाठी विवाहबाह्य संबंध ठेवलेलेही समाज मान्य करत नाही. त्यांच्याही कामवासनेचा असाच कोंडमारा होतो. वयात आलेल्या मुलामुलींबाबतही तेच घडतं. *ज्यांना सुयोग्य जोडीदार मिळेपर्यंतच्या काळात त्यांनी कामवासना कशी भागवली पाहिजे, याचं योग्य उत्तर कुणापाशीच नसतं. उलट ती वाईट आहे असं मानून त्यापासून त्यांना परावृत्त करण्याचे सर्व प्रयत्न कसोशीने केले जातात व त्यांचाही प्रचंड लैंगिक कोंडमारा केला जातो."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २६९)*


"कामवासनेचं दमन करण्याने ती नाहीशी होईल ही एक भाबडी अपेक्षा आहे. सत्य असं आहे की *दमनाने कामवासनेचा निचरा होण्याऐवजी ती चोरटेपणाने शमवण्यासाठी व्यक्तीला उद्युक्त केलं जातं. कामवासना योग्य मार्गाने कशी शमवावी याचं उत्तर देण्यात रूढ मार्ग अपयशी ठरत असतील तर अपराधमुक्त हस्तमैथुनाचा पर्याय अधिक सयुक्तिक नाही का ?* स्त्री-पुरुषांमध्ये अपराधमुक्त हस्तमैथुनाचा जेवढा जास्तीत जास्त प्रचार होईल तेवढा लैंगिक सुखाचा आनंद ते निर्भेळपणे घेऊ शकतील. यात इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट त्याचा प्रचार केल्यामुळे आज समाजात वाढलेले लैंगिक हिंसाचारही कमी होतील, असं मला प्रामाणिकपणे वाटतं." 

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २७०)*

"स्वातंत्र्य दिलं नाही तर उलट जास्त अनाचार होतात. आपल्या डोक्यात असं ठसवलेलं असतं की स्वातंत्र्य वाईट आहे. म्हणून स्वातंत्र्याला वेसण घातली पाहिजे. आपण स्वातंत्र्याची विनाकारण धास्ती बाळगतो. नियम जेवढे जास्त तेवढा मनुष्य सदाचारी ही समजूतच चुकीची आहे. नियमांनी आपण माणसातलं स्वत्वच नाहीसं करतो. त्याला नियमांनी जखडून ठेवल्यामुळे नियमात नसलेली गोष्ट करून बघण्याची त्याची जिज्ञासा उलट आपण वाढीला लावतो आणि अप्रवृत्तींना उत्तेजन देतो. *समाजाचा विकास करायचा असेल तर व्यक्तीला शक्य तेवढं स्वातंत्र्य देऊन अगदी आवश्यक तिथेच नियमन केलं पाहिजे."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २७०)*


"आपल्या सगळ्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात प्रेमाची उपजत प्रेरणा असते. त्याला पोषक परिस्थिती निर्माण झाली की मग प्रेमाचं बीज कुठेही रुजू शकतं. मग ते भिन्नलिंगी संबंध असोत नाहीतर समलिंगी !"

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २७५)*


"मुलं जे काही करत असतात त्यात आई-वडिलांच्या संस्कारांचा काही भाग असतो, यात काही शंका नाही. पण याचा अर्थ ते तंतोतंत आई-वडिलांच्या घडवणुकीप्रमाणे घडतात, ही समजूत चुकीची आहे."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २८३)*

*"लैंगिक अडसर इतके प्रबळ असतात की समागमासारखी महत्त्वाची क्रियाही जिथे घाईघाईने व बऱ्याचदा अंधारात उरकली जाते, तिथं जननेंद्रियांची स्वच्छता तर फारच दूरची गोष्ट आहे. त्यामुळे अगदी सुशिक्षित स्त्रियाही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन इतर सौंदर्यप्रसाधनांवर वेळ व पैसे खर्च करतात, पण योनीमार्गाची निगराणी राखण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत.*

जननेंद्रियांची स्वच्छता ठेवण्याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, जननेंद्रियं अस्वच्छ असतील तर जोडीदाराला घृणा वाटू शकते आणि कामक्रीडा करण्यापूर्वीच त्याची किंवा तिची कामेच्छा मावळू शकते. दुसरं कारण म्हणजे असं की अस्वच्छ जननेंद्रियांमुळे लैंगिक रोगांचा प्रादुर्भाव होतो. अमेरिकेत झालेल्या एका आरोग्य पाहणीत असं आढळून आलं की जवळ जवळ ९०% लैंगिक रोग हे केवळ जननेंद्रियांच्या अस्वच्छतेमुळे होतात. म्हणजे अशी स्वच्छता राखणं किती महत्त्वाचं आहे! *आपण आपल्या घरातल्या स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यात जेवढा वेळ घालवतो त्याहीपेक्षा कमी वेळ जननेंद्रियांच्या स्वच्छतेला लागू शकतो. पण त्यासाठी ती सवय अंगी बाणवायला पाहिजे."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २९०)*

"कुटुंब आणि समाज हे आत्मप्रगटीकरणाच्या प्रवासातले मोठे शत्रू आहेत. हे दोन्ही आपल्याला आज्ञाधारक होण्यास शिकवतात. *आज्ञाधारक व्यक्ती स्वतंत्र विचार हरवून बसते. तिला स्वतःचा कणाच राहत नाही.* या शत्रूंचं पारिपत्य करायचं असेल तर स्वतंत्र विचारांचं स्फुल्लिंग पेटवलं पाहिजे. सामाजिक दडपणांतून बाहेर आलं पाहिजे."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : २९२)*


"प्रेमभंग झाला तरीही त्याचा शांतपणे स्वीकार करा. प्रेम वाटण्याचा जसा मनुष्याला हक्क आहे, तसा कुठल्याही क्षणी न वाटण्याचाही हक्क आहे. त्या हक्काचा आदर ठेवा. माझ्या प्रेमिकाने सदासर्वकाळ माझ्यावर प्रेम केलंच पाहिजे, असं म्हणणं त्याचा हक्क नाकारणं आहे. त्याने लबाडी केली, फसवलं असं म्हणत त्याला दोष देत बसू नका. समजा अगदी खरंच त्याने तसं केलं असेल, तरी त्याने जेवढा काळ प्रेम केलं ते नंतर त्याने 'नाही' म्हटल्याने लगेच खोटं कसं होईल ? त्याचं तसं न वाटणंही समंजसपणे स्वीकारा."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३०८)*

"प्रेम म्हणजे स्वतःचं सर्वस्व दुसऱ्या व्यक्तीच्या अधीन करणं नव्हे. तुमचं सर्वस्व तुमच्याकडेच आहे. ते अगदी जिवलग व्यक्तीलाही देऊ नका. तसं दिलंत तर कधी ना कधी तरी दुःख वाट्याला येणं अपरिहार्य आहे. प्रत्येक भावना - उत्पत्ती, विकास, ऱ्हास या अवस्थांतून प्रवास करत असते. प्रेमभावनाही याला अपवाद नाही. तिचाही ऱ्हास होऊ शकतो. प्रेम तुटलं तर स्वतःचं अवमूल्यन करून माझ्यातच काहीतरी कमी आहे, आता मी प्रेम करण्याजोगी राहिलेली नाही किंवा आकर्षक नाही, असे अतिशयोक्त निष्कर्ष काढू नका. प्रेम मिळालं नाही तर उसासे टाकत खंतत बसण्याऐवजी स्वतःवर प्रेम करा."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३०९)*

"स्त्रियांना मातृत्वाची ओढ नैसर्गिक असते, या समजूतीलाच माझा आक्षेप आहे. *मातृत्वाच्या ओढीत सामाजिकीकरणाचा प्रभाव जास्त असतो. बऱ्याचशा स्त्रियांच्या बाबतीत त्यांना अपत्याची आवड आहे किंवा नाही हे पडताळून बघण्याअगोदरच त्यांच्यावर मातृत्व लादलं जातं. आपल्या समाजात मातृत्वाची आणि स्त्रीत्वाची जी सांगड घातली जाते, ती चुकीची आहे. माता होणं म्हणजे स्त्रीत्वाची कमाल आणि माता न होणं म्हणजे स्त्रीत्वात न्यूनत्व, असला नसता संबंध मी जोडत नाही. मातृत्वाचा निर्णय हा केवळ आवडीनिवडीचा किंवा प्राधान्यतेचा प्रश्न आहे, असंच मी मानते. एखाद्या स्त्रीला मातृत्वाची आवड असूनही ती माता होऊ शकत नसेल तर मी एवढंच समजते की जीवनातला एक अनुभव ती घेऊ शकत नाही बस !* इथवरच थांबते. हा अनुभव न घेतल्यामुळे काहीतरी भयंकर घडलंय किंवा तिच्या जीवनात कायमची पोकळी निर्माण झाली, असले भलतेसलते निष्कर्ष काढत नाही."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३१९)*

"लैंगिकतेची माहिती असली की आपल्या समस्या आपोआप सुटतात ही समजूत चुकीची आहे. उलट कित्येक समस्या तर माहितीच्या मायाजालामुळेच निर्माण होतात. *माहिती असल्यापेक्षा त्या माहितीचा उपयोग करणं महत्त्वाचं आहे. हा उपयोग तुम्ही तेव्हाच करू शकाल, जेव्हा तुम्हाला लैंगिकतेची नुसती माहितीच नाही तर ज्ञानही आहे. हे ज्ञान नसल्यामुळेच आज समाजात लैंगिकतेच्या एवढ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.* त्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत."

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३३२)*

"गेली काही वर्षं लैंगिक शिक्षणाचा जागर होतोय. प्रत्यक्षात या शिक्षणाच्या नावाखाली दिली जातेय, ती केवळ शारीरिक प्रक्रियांची माहिती ! म्हणजे परत तेच झालं. ही माहिती देऊनही लैंगिक समस्या सुटताहेत का ? कारण त्याची सुरुवातच मुळी चुकतेय. *लैंगिकतेचं गूढ करून माहिती दिलीत आणि तो विषय मुद्दाम वेगळा काढून शिकवलात म्हणजे तो सरळसरळ न बोलता येण्यासारखा आहे, त्याबद्दल बोलणं असभ्य आहे, असं मुलांच्या मनावर आपण ठसवत नाही का ?* म्हणजे परत मग नकारात्मक दृष्टीकोनालाच खतपाणी घातलं जातं. 

माझं म्हणणं असं आहे की आधी स्वतःच्या विचारांत सकारात्मक लैंगिकता आणा. लैंगिकतेचं शिक्षण त्याचा बाऊ न करता सहजपणे द्या. *लैंगिकतेचं शिक्षण हे जीवनाच्या शिक्षणापेक्षा वेगळं नाही. ते प्रत्यक्ष जीवनातूनच देता येईल. मग लैंगिक शिक्षणाचा वेगळा वर्ग घेऊन ते देण्याची गरजच भासणार नाही."*

*(संदर्भग्रंथ : विरंगी मी ! विमुक्त मी !, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३३३)*

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...