Flash

Wednesday, 19 April 2017

डॉ. नरेंद्र दाभोलकर

आज चुकीच्या विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतलीये म्हणून बुवा-बाबा वाढतात. उद्या जर विवेकी विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतली, तर कदाचित ज्यांना पाच हजार वर्षं मिळाली, त्यांच्याविरुद्धची लढाई आम्ही पाचशे वर्षांत जिंकू शकू.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर, 8 एप्रिल 2013


बुवाबाजी -
=========
भाग १ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
भूत उतरवणारा भगत, करणी काढणारा मांत्रिक, हातातील कुंकवाचा बुक्का करणारी, अंगात देवी आलेली बाई, चमत्कार करणारा सत्य साईबाबा हे सर्वजण बुवाबाजीच करत असतात; परंतु आणखी एका प्रकारची बुवाबाजी सध्या समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. ते कोणत्याही स्वरूपाचे कथित चमत्कार करत नाहीत तरीही त्यांच्याभोवती लोकांची गर्दी आढळते. हे सर्व बाबा फसवणूक परमार्थ, ईश्वरभक्ती, ईश्वरप्राप्ती, ब्रह्मज्ञान या नावाने करतात. पहिल्या प्रकारातील बाबांची ताकत ही त्यांच्या फसवणुकीच्या कसबात असते. तर दुसऱ्या प्रकारात लोकांच्या मनात कथित परमार्थाबद्दल परंपरेने आलेली जी विलक्षण मान्यता असते ती बाबा बुवाने खुबीने स्वतःशी जोडलेली असते. थोडक्यात जो या व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या दु:खाची कारणे व त्यावरील उपाय, विवेकवादी विचारसरणीशी विसंगत अशा बाधा व करणी यासारख्या कल्पना, दैव प्रारब्ध या संकल्पना रुढी परंपरा यांचे समर्थन याप्रकारे सांगतो, तो म्हणजे बुवा.
असा बुवा प्रश्न सोडवण्याच्या अवैज्ञानिक चुकीचा मार्ग दाखवतो व सर्वांगाने शोषण करतो. ही त्याची शोषण करण्याची कार्यप्रणाली म्हणजे बुवाबाजी.
सर्व बुवाबाजीला पारलौकिक कल्पना अथवा परमार्थ हा विचार जोडलेला असतो. इतर सर्व क्षेत्रात फसवणूक आहे व त्या अर्थाने ती बुवाबाजी आहे, असे अनेकांना वाटते; परंतु त्याला बुवाबाजी हा शब्द वापरणे बरोबर नाही. कारण त्या फसवणुकीना त्या त्या क्षेत्राशी संबंधित असे कायदे आहेत. मात्र थेट फसवणुकीच्या बाबी सोडल्या तर परमार्थ व ब्रह्मज्ञान हे असे क्षेत्र आहे की तेथे कायदा पोचत नाही. बहुसंख्यांना या विषयाबाबत काहीही माहिती नसते. कळून घेण्याची इच्छा नसते. माणसे प्रवाहपतित होतात व त्यातच धन्यता मानतात.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग २ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(१) अदृष्टाची भीती - आपल्या जीवनात यापुढे काय आहे ? याबद्दल बहुतेकांच्या मनात एक धास्तावलेपणा असतो. सर्व काही चांगलेच चालू असलेल्यांनाही हे कायमस्वरूपी राहील का ? असे वाटत असते. बाबा अदृष्ट जाणू शकतो. अशी चुकीची कल्पना असते.
(२) अतृप्त कामना पूर्ती - अनेक कामना, वासना अतृप्त असतात. त्या अक्षरशः असंख्य प्रकारच्या असतात. प्रचलित व्यवस्थेत त्या पूर्ण होण्याची शक्यता नसते. अशा वेळी बाबाची शक्ती उपयोगी पडेल; असे वाटते.
(३) आरोग्यविषयक सुविधांचा अभाव - असंख्य माणसांना अनेक आजार असतात ते वारंवार होत असतात. याबाबत खरे कारण जाणून घ्यावे, ते दूर करावे, आजारावर योग्य उपचार घ्यावा, या सर्व बाबींपेक्षा स्वतःच्या दैवी शक्तीने जादूसदृश्य उपाय करणारा बाबा, या लोकांना सोईचा वाटतो.
(४) मानसिक आजार - भारतात गंभीर मानसिक आजाराचे प्रमाण लोकसंख्येच्या १% आहे. अशा व्यक्तींना मानसोपचार देण्याची यंत्रणा आपल्या देशात अत्यंत खर्चिक व अपुरी आहे. या लोकांना असे वाटते की, बाबांची दैवीशक्ती व अध्यात्मिकता ही त्यांच्या मानसिकतेवर उपाय करू शकेल.
(५) मनोकायिक आजार - काही आजार असतात मनाचे ; परंतु व्यक्त होतात शरीरामार्फत. बाबाच्या श्रद्धेमुळे त्यांच्या सूचनांमुळे यापैकी काही आजारात तात्पुरता आराम मिळू शकतो आणि त्यामुळे बुवाबाजीला भूमी सुपीक होते.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ३ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(६) वैफल्यग्रस्त स्त्रिया - आपल्या समाजात अनेक कारणाने बाईचे मन वैफल्याने मोडून पडते. त्या मनाला आधार देणे व उभे करणे यासाठी आज कोणतीही अधिकृत यंत्रणा नाही. देव, धर्म, पूजापाठ या माध्यमातून काम करणाऱ्या बाबाचा आधार अशा स्त्रियांना घेता येतो कारण त्याला सामाजिक अनुमती असते.
(७) प्रारब्ध, नियती, दैव - या कल्पना प्रत्येक भारतीयाच्या मनात आपोआपच घट्ट बसलेल्या असतात. हे नशीब बदलण्याचे सामर्थ्यही कथित दैवी शक्ती ज्याकडे आहे, त्या बाबा, बुवा यांच्यात असेल असा सामान्य माणसाचा पूर्ण विश्वास असतो.
(८) आत्मा, परमात्मा, ब्रह्म, मोक्ष, मुक्ती - या शब्दांचा प्रभावही बहुसंख्य भारतीयांवर असतो. या सर्वांचा विपुल वापर करणारा बाबा स्वाभाविकपणेच लोकांना जवळचा वाटतो.
(९) चमत्कार - बाबांचे चमत्कार हे चिल्लर हातचलाखीचे प्रकार असतात. मात्र ते लोकांना दैवी शक्तीचे अविष्कार वाटतात, त्यामुळे बाबावरील विश्वास वाढतो.
(१०) गुरुपरंपरेला मान्यता - आपल्या समाजात, म्हणजेच समाजातील
पारंपारिक धार्मिक विचारात बाबा गुरु महाराज याबद्दल एक अपार श्रद्धा असते. व्यक्ती गुरुस्थानी मानली की, तिच्या बाबतीत बुद्धीने शरणागती पत्करणे व त्या व्यक्तीचे उदात्तीकरण करणे हे गुरु शिष्य नाते आपल्या समाजात, लोकमाणसात अस्तित्वातच आहे, याचाही फायदा बाबाला मिळतो.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ४ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
========================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(११) अगतिकता, अस्थिरता व अपराधी भावना - (अ) जागतिकीकरणामुळे असंख्य रोजगाराला मुकावे लागत आहे आणि जीवनात अनिश्चितता आली आहे. अशावेळी बाबांचा आधार वाटतो.
(ब) अस्थिरता रूढ अर्थाने जे स्थिर आहेत त्यांनाही कमालीच्या स्पर्धात्मक जगात जाणवते. नामवंत क्रिकेटपटू व अभिनेते ही याची चांगली उदाहरणे आहेत. या अस्थिर परिस्थितीवर बाबांच्या वरदहस्तामुळे मात करता येईल असे संबंधितांना वाटते.
(क) अपराधी भावना - समाजातील अनेकजण अनैतिक मार्गाने पैसा व अन्य सुखे मिळवत असतात, त्यामुळे मनात निर्माण होणाऱ्या अपराधी भावनेवर बुवाबाबांकडून उतारा मिळतो असे त्यांना वाटते.
(१२) विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती व अवतारवाद - या विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे असा बहुसंख्यांचा पारंपारिक विश्वास आहे. तिचा कृपाप्रसाद या ना त्या स्वरुपात काही जणांना लाभतो व आपले बाबा त्याचे प्रतिक आहेत असे त्या त्या बाबाच्या भक्तांना वाटते. याही पुढे जाऊन काहीजण स्वतःला देवाचा अवतार जाहीर करतात.
(१३) धूर्तता व शक्य अशक्यतेचा सिद्धांत - बाबा, बुवा, स्वामी महाराज ही मंडळी धूर्त व बहुधा कावेबाज असतात, त्यामुळे स्वतःचे एक वेगळे रूप ते चाणाक्षपणे उभे करतात. तसेच बाबा अथवा बुवा ज्या प्रश्नांची उत्तरे देतात त्यातील अनेक प्रश्न हो किंवा नाही (मुलगा होईल की मुलगी, लग्न ठरेल की नाही, निवडणूक जिंकेल की नाही) या स्वरूपाचे असतात. स्वाभाविकच यामध्ये काही उत्तरे बरोबर येतात व त्याचा फायदा बाबांना होतो.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ५ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(१४) सांस्कृतिकदृष्ट्या व्यक्त होण्याची गरज - व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे सांस्कृतिकदृष्ट्या समूहात व्यक्त होण्याची गरज असते. ग्रामीण भागातील एकत्रित कुटुंब पद्धतीत हे शक्य नाही व शहरी गतिमान संस्कृतीत ते जमत नाही. ही गरज महाराज स्वामी यांच्याकडून नकळत चांगली भागवली जाते. बाबाचा भक्त या पातळीवर तेथे शहरी- ग्रामीण, गरीब- श्रीमंत, सुशिक्षित- अशिक्षित, स्त्री -पुरुष एकत्र येतात.
(१५) महाराजांचे शिष्य बनणे, त्यांचा अनुग्रह घेणे, ही कळत नकळत एक राजकीय गरज निर्माण झाली आहे. व्यक्तीला व्यावहारिक राजकीय मोठेपणा हवा असतो. तसाच धार्मिक मोठेपणाही हवा असतो. बाबांकडे प्रचंड अनुयायी वर्ग असतो त्यामुळे महाराजांनी प्रतिष्ठित माणसांना मान्यता देणे आणि त्या माणसांनी कोडकौतुक करत त्यांचा अनुग्रह घेणे; असा सिद्ध साधक्पणा घडतो.
(१६) अचीकीत्सक सामाजिक मन - आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक वास्तवाची चिकित्सकपणे तपासणी करावी आणि त्यातील खरे खोटे, इष्ट अनिष्ट तपासून त्याबाबत निर्णय घ्यावा याऐवजी जे घडते आहे त्यावर विश्वास ठेवावा आणि ती श्रद्धा आहे असे म्हणून त्याची चिकित्सा करण्यास नकार द्यावा अशी सामाजिक मानसिकता बुवाबाजीला पोषक असते.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ६ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=========================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(१७) पैसा, सत्ता, प्रसारमाध्यमे गुंड यांची दहशत - बुवाबाजी हा एक सदैव बरकतीला आलेला धंदा आहे, त्यामुळे धंद्यातील आवश्यक नियम येथेही पाळले जातात. बुवाबाजी करणाऱ्या बाबांकडे पैसा मोठ्या प्रमाणात असतो. प्रशासकीय सत्ता व पुढारी यांच्याशी त्यांचे साटेलोटे असते. प्रसारमाध्यमे कमी जास्त प्रमाणात पैशाच्या साह्याने त्याने विकत घेतलेली असतात. आपल्या विरोधात कोणी बोलले तर त्याबाबत प्रच्छन्न धमकी दिली जाते वा काही वेळा प्रत्यक्ष हल्लाही केला जातो. अब्रू नुकसानीचे खटले घटले जातात.
(१८) दैवी दहशत - अजूनही एका बाजूला करणी, भानामती यावर लोकांचा विश्वास आहे. दुसऱ्या बाजूला प्रारब्ध बदलणारी दैवी शक्तीदेखील त्यांना खरी वाटते. याचा उलटा फायदा घेऊन करणी करून त्रास देण्यात येईल. सारे प्रारब्ध बदलून वाटोळे करण्यात येईल, या स्वरूपाच्या बाबांच्या किंवा त्यांच्या भक्तांच्या दैवी दहशतवादाच्या धमक्या बुवाबाजीचा प्रभाव वाढवण्यास कारण ठरतात.
(१९) सुसज्ज यंत्रणा - बुवाबाजी हा एक धंदा आहे; हे मान्य केले की त्यासाठी यंत्रणा उभारणी आलेच. बहुतेक मोठ्या बाबा बुवांकडे याबाबत आधुनिक व्यावसायिक दर्जाची यंत्रणा असते.
(२०) धंद्याचे रंकेट - बाबाकडील गर्दीमुळे त्यावर अवलंबून असलेले असंख्य धंद्याचे एक रंकेट तयार होते त्यांची गरज बुवाबाजी चालू राहण्यात असते.
(२१) राजमान्यता, लोकमान्यता - बुवाबाजी करणारेही काही चांगली कामे करतात. त्यातील काही पारंपारिक मान्यता असणारी असतात, तर काही आधुनिक असतात, त्यामुळे बाबाला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळते.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ७ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
======================================
बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद -
(१) चमत्कार करणारे बाबा हे असा दावा करतात की, त्यांचा चमत्कार हा परमेश्वराने त्यांना दिलेले व्हीजिटिंग कार्ड आहे, त्यामुळे लोकांना समजावे की, आपल्या मुक्तीसाठी परमेश्वराने या महामानवाला पाठवले आहे. ही त्यांची मांडणी बदमाशीची आहे, त्याचा स्पष्ट विरोध करावा.
(२) चमत्कार न करणारे अनेक बाबा तेजीत आहेत. त्यांच्या भक्तांचा प्रतिवाद असा असतो की, 'आम्हाला बाबांच्या भक्तीत काहीच साधावयाचे नाही. फक्त भक्तीच साधावयाची आहे. 'ही भक्ती कशासाठी ?' याचे उत्तर तत्परतेने असे मिळते की, या भक्तीत जीवनाचे सार्थक आहे. 'हे सार्थक कशामुळे होते ?' याचे उत्तर येते की, या भक्तीतून जीवनाचे आध्यात्मिक कल्याण घडते. 'यानंतर आध्यात्मीक कल्याण होते याचा पुरावा द्या. हा प्रश्न अप्रस्तुत असतो. कारण तसा पुरावा मागू नये अशी धारणा असते. पुरावा मागणे ही डोळसपणाची सुरवात असते आणि पुरावा न मागता शरण जाणे ही बुवाबाजीच्या श्रद्धावान मानसिकतेची पूर्वअट असते. बाबाचे असे म्हणणे असते की, भक्ताचे कल्याण कशात आहे हे त्याला समजते आणि ते भक्ताला समजणार नाही हेही बाबाला समजते.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ८ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद -
(३) श्रद्धेने महाराज अथवा गुरु यांच्यामार्फत जे सत्य स्वीकारले जाते त्याची भूमिका सर्वसाधारणपणे अशी असते की, काही सत्यांचे ज्ञान, मानवी ज्ञानशक्तीच्या पलीकडचे आहे. हे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानवी कल्याण साधण्यासाठी आवश्यक आहे. परमेश्वर कृपेने लोककल्याणासाठी काही अधिकारी व्यक्तींमध्ये ते ज्ञान प्रकटते. माझ्या बाबांमध्ये ते ज्ञान प्रकटले आहे. या ज्ञानाचा आशय असलेली विधाने सत्य आहेत की असत्य हे सिद्ध करणे मानवी शक्तीच्या पलीकडचे आहे. संबंधित अधिकारी पुरुषावर, म्हणजेच आपल्या महाराजांवर असलेल्या श्रद्धेनेच हे ज्ञान स्वीकारावे लागते.
वरवर पाहता समर्पक वाटणारी ही भूमिका आंतरविसंगत पुरेपूर भरलेली आहे. ही आंतरविसंगती कार्यकर्त्याला स्वतःला समजावयास हवी आणि इतरांना समजून सांगता यावयास हवी. उदा.
(अ) मानवी ज्ञानशक्ती पलीकडे असलेले सत्य आहे आणि तरीही त्याचे ज्ञान माणसाला होऊ शकते. असे या भूमिकेत गृहीत धरले आहे. स्वतःच्या कातडीमधून बाहेर उडी घेण्यासाठी हा प्रकार झाला.
(ब) सर्वश्रेष्ठ मानवी कल्याण करणारे हे ज्ञान आहे आणि ते सर्वज्ञ असलेल्या माझ्या महाराजांना प्राप्त झाले आहे, या बाबतीतही पुरावा काही नाही. हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि ते माझ्या महाराजांना प्राप्त झाले आहे ही बाब (अंध) श्रद्धेने स्वीकारावी लागते.
(क) कोणी सर्वज्ञ आहे असे स्वतः सर्वज्ञ असल्याशिवाय समजणे शक्य नाही आणि महाराजांची सर्वज्ञता ही देखील न तपस्लेलीच बाब राहते.
(ड) ईश्वर आहे आणि त्याने महाराजाला अधिकार दिला आहे हे माहित झाल्यामुळे, संबंधित व्यक्तीला मानव मानत नाहीत. उलट त्या व्यक्तीला अधिकारी मानत असल्यामुळे तिला ईश्वराने मानवीशक्तीपलीकडचे ज्ञान दिले असे भक्त मानतो. ईश्वर आहे की नाही, मानवी शक्तीपलीकडचे ज्ञान आहे की नाही हे माहीतच नसताना त्याने अमुक एका व्यक्तीला ज्ञानाचा अधिकार दिला हे कसे कळले ? असे कळते असे मानणे म्हणजे शांग्रील नावाचा प्रदेश आहे की नाही हेच माहित नसताना, अमका तमका माणूस शान्ग्रीलाचा राजा आहे असे मानण्यासारखे आहे.
(इ) या सर्व बाबतीत व्यक्ती प्रत्यक्षात आपापले बाबा, बुवा, गुरु, महाराज यावर श्रद्धा ठेऊन अनुभव, तर्क, पुरावा या पलीकडे उडी मारत असतात.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ९ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
========================================
बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद -
(४) ज्याप्रमाणे चांगली शाळा, चांगला शिक्षक, चांगला डॉक्टर शोधावा लागतो त्याप्रमाणे चांगला गुरुही शोधावा लागतो. पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तो लाभतो. असा गुरु भौतिक जीवनाची सर्व भीती घालवतो. प्रारब्ध बदलतो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून व्यक्तीची सुटका करतो. अशा गुरूच्या केवळ दर्शनाने वासना विकार गळून पडतात. नैतिक उन्नती होते. आणि अक्षय आनंदाचा ठेवा मिळतो. आता या स्वरूपाच्या गुरूला, म्हणजेच बाबा महाराज यांना या मांडणीद्वारे जणू प्रतिपरमेश्वर असे रूप दिले आहे. हे समजावून सांगायला हवे. भौतिक जीवनाची भीती प्रत्यक्ष जीवन संघर्षातून घालवावी लागते. प्रारब्ध नावाची काही गोष्ट नसते आणि जन्म मृत्यूचा फेराही नसतो, त्यामुळे तो बदलण्याचा प्रश्नच नसतो. कोणाच्याही दर्शनाने आपोआप वासना- विकार गळून पडत नाही आणि नैतिक उन्नती होत नाही. तेव्हा या स्वरूपाचे बुवाबाबांचे गुणवर्णन हे केवळ बुवाबाजीच्या धंद्यासाठी केले जाते, हे लोकांना पटवावयास हवे.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग १० (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद -
(५) भक्ताचे दु:ख गुरु तीन प्रकारे दूर करू शकतो. असे आसाराम बापूंनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. एक ध्यान मंत्र असे आध्यात्मिक मार्ग, दोन बौद्धिक पातळीवर सत्संग, तीन गुरूच्या भोवतीचे दैवी वलय आणि स्पंदने याद्वारे लोकांचे आजार बरे करण्यापासून ते आनंदलहरी कोट्यावधी लोकांपर्यंत पोचवण्याचे काम गुरु करतो. यात काय खरे आहे ? व्यक्तीला आर्थिक, सामाजिक, शारीरिक अशा अनेक शोषणाला तोंड द्यावे लागते. त्याला ध्यान आणि मंत्र उपयोगी पडू शकत नाही. कदाचित त्याद्वारे मनात शांतता प्रस्थापित झाल्यासारखे भासेल पण खरे दु:ख निवारण होणार नाही. या कथित गुरु आणि महाराजांच्या सत्संगातील विचार हे तर बहुतांश वेळा अत्यंत असंबंध आणि अनेकदा अशास्त्रीय व दिशाभूल करणारे असतात. कोणत्याही गुरु वा महाराज याच्याभोवती कसलेही अदृश्य दैवी वलय नसते आणि त्याची कसलीही स्पंदने लोकांचे आजार बरे करू शकत नाहीत. ही अंधश्रद्धा पसरवणे हीच बुवाबाजी आहे
.
(क्रमशः)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


"आत्मा नाही"
भूताच्या संदर्भातला एक खूलासा आपण केला पाहिजे. आपली कल्पना अशी असते की, माणसं मेल्यानंतर माणसांच्या शरीरामधून आत्मा नावाची कोणतीतरी गोष्ट बाहेर जाते आणि ती जी अत्यंत सूक्ष्म अशी आत्मा नावाची गोष्ट असते,ती पुन्हा कुठल्यातरी देहामध्ये प्रवेश करते,आणि यामुळे जीवनाचं सातत्य चालू आहे. आणि माणसाचा पुनर्जन्म शक्य असतो. पण जर आपण असं मान्य केलं की,माणसाचं माणूसपण असलेली सगळी बुध्दी,वासना,भावना,कल्पना,स्मरणशक्ती मेंदूत असते.मेंदूच्या पेशी विघटीत होतात,त्यावेळी माणूस मरतो.यावेळी एकही गोष्ट शरीराच्या बाहेर जात नाही. याच्यामुळे दुसर्या कुणाच्यातरी शरीरामध्ये ती प्रवेश करण्याची शक्यताच उरत नाही. या वैज्ञानिक दृष्टीनं विचार केला,तर आत्मा हि संकल्पना आणि पूर्वजन्मीच्या आठवणी हि शक्यताहीं स्वीकारता येत नाही.
" श्रद्धा-अंधश्रद्धा "
लेखक-डॉ. नरेंद्र दाभोलकर.
(पान नं.66,आवृत्ती 14 वी.)

"स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन"
पुरुषप्रधान व्यवस्था--
कधीकाळी मातृसत्ताक पद्धती समाजात होती,पण आज मात्र स्त्रीचं सर्व आयुष्य हे पुरूषी वर्चस्वाशी जोडललेलं असतं. लग्न होणं आणि मुलगाच होणं ही गोष्ट स्रीच्यासाठी सर्वस्वाची असते.पुरुषांसाठी ती एक बाब असते.म्हणूनच स्त्री ही कुमारी असते,प्रौढ कुमारी असते,सौभाग्यकांक्षीनि असते,सौभाग्यवती,घटस्फोटिता,
परित्यक्ता,विधवा अशी कोणीतरी असते.पुरुष हा तिचा 'मालक'असतो,
'पतिदेव'ही असतो. तिचं सारं असणं त्या संदर्भातच असतं.मुलगी ,पत्नी ,आई याभूमिकेतच कमीपणा घेवून जीवनाचं साफल्य मानणं हीच सार्थकता - असं तिला शिकवण्यात येतं.तिची सारी व्रतवैकल्ये 'चांगला नवरा व चांगला मुलगा 'यासाठीच असतात.नवरा कोणत्याही कारणाने मरण पावला ,तरी ती पांढर्या पायाची मानली जाते.हळदीकुंकू घेणं ,सणाच्या जेवणाला सन्मानाने बोलावणं यातून ती बाद होते.तिच्या हातून कोणताही मूहुर्त केला जात नाही. आणि स्वत:च्या मुलीचं कन्यादान करण्याचा अधिकार तीला उरत नाही. जीवनाच्या राजकारण ,सहकार,शिक्षण अशा अनेक क्षेत्रात मानानं मिरवणारा व स्वत:ला उच्च खानदानी कुळातील मानणारा मराठा समाज आजही आपल्या समाजातील तरून विधवेचा पुनर्विवाह करण्याच्या तीव्र विरोधी असतो.
"श्रद्धा-अंधश्रद्धा"
लेखक-डॉ. नरेंद्र दाभोलकर.
(पान नं.89.आवृत्ती 14वी)


"स्त्रियांचं मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा."
बहुसंख्य स्त्रिया या सतत मानसिक ताणाखाली असतात.नवर्याचं प्रेम नसने,सासूचा छळ,कुटुंबात मान्यता व प्रतिष्ठा यांचा अभाव, सांसारिक विसंवाद,लैंगिक असमाधान यांमधून उद् भवणार्या ताणामुळे स्त्रिचं व्यक्तिमत्व दुभंगतं.हे दुभंगणं काही विशिष्ट काळाशी ,स्थळाशी,व्यक्तीशी जोडलेलं असतं.जसं अमावास्या,पौर्णिमा, नवरात्र या काळात अंगात जास्त येतं.अंबाबाई देवी अथवा दत्ताचे स्थान या ठिकाणी घुमण्याचे प्रकार जास्त चालतात.हे अंगात येणं बहुदा ढोंग नसतं.एकतर ती असते प्रगाढ स्वसंमोहन अवस्था व दुसरं म्हणजे हिस्टेरीया,हा सौम्य मानसिक आजार,हा आजार असतो प्रासंगिक.छाती धडधडणं,अंग कापणं,अंग उडणं,कुणीतरी छातीवर बसण्यासारखं वाटणं,गळा आवळत आहे असा भास होणं या सर्व मनोविक्रुती आहेत. परंतु रुग्णाला त्याची सवय लागते.म्हणजे असं की,काही काळानंतर हा प्रकार तात्पुरता थांबतो व थोडे दिवसांनी पुन्हा प्रगटतो.डॉ क्टरांच्याकडून उपचार घेतल्यानंतरही तो पूर्ण बरा होतो, असं नाही. कारण गरज असते मुळ कारण बदलण्याची.घरामध्ये छळणारी सासू वा दारूड्या नवरा असेल तर ही मनोरूग्णता पून्हा पुन्हा उचल खाते.
"श्रद्धा-अंधश्रद्धा"
लेखक-डॉ. नरेंद्र दाभोलकर
(पान नं.92,93.आवृत्ती 14वी.)

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...