
आपण साधनांच्या प्राप्तीसाठी जीवाची तारांबळ करता करता त्या साधनांद्वारे प्राप्त करायचं साध्य कित्येकदा विसरून जातो, निदान त्याची हेळसांड करतो, यात मुळीच शंका नाही. पैसा हे अत्यंत महत्वाचं साधन आहे हे कितीही खरं असलं, तरी 'पैसा', 'पैसा' करीत केवळ पैशामागं धावताना त्या पैशानं मिळवायचा निरामय-निरागस आनंद आपण कितीदा तरी हरवून बसतो.
आपण अनेकदा संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा या गोष्टींच्या मागं धावताना फुलण्यासाठी फुरसतच काढत नाही. जीवनात कितीतरी गोष्टींचं चांदणं पसरलेलं असतं, पण त्यात भिजण्यासाठी आपल्याला उसंतच मिळत नाही."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ८)*
"एरिक फ्रॉम या मानसशास्त्रज्ञाच्या 'टू हॅव ऑर टू बी ?' या पुस्तकाच्या शीर्षकातूनच त्याचा सगळा आशय अगदी समर्पक रीतीनं व्यक्त झाला आहे. त्यानं जगण्याच्या दोन पद्धती आपल्यापुढं ठेवल्यात. एक म्हणजे एकामागोमाग एक या रीतीनं असंख्य वस्तू हस्तगत करणं, त्यांच्यावर आपली मालकी प्रस्थापित करणं आणि दुसरी म्हणजे जीवनाचा खराखुरा आनंद घेणं, जीवन अनुभवणं. बहुसंख्य लोक पहिल्या मार्गानं जातात आणि बरंचसं कमावूनही खूप काही गमावतात. याउलट, थोडे लोक असे असतात, की बरंचसं गमावूनही खूप काही कमावतात."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १०)*
"जीवन चांगल्या रीतीनं जगण्यासाठी साधन म्हणून वस्तूंची आवश्यकता असते, हे नाकारण्यात अर्थ नाही. हे जग मिथ्या आहे असं म्हणणारे लोक ढोंगीपणानं वस्तूंचा जी धिक्कार करतात, तो आपण मान्य करू शकत नाही. वस्तूंचं यथोचित महत्त्व कबूल केलंच पाहिजे. आणि त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी धडपडलंही पाहिजे. पण वस्तू हे साधन आहे, साध्य नव्हे, याचं भानही ठेवलं पाहिजे. वस्तूंचा हव्यास धरून, आपल्या मालकीच्या वस्तूंची संख्या वाढवून आपलं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध होत नाही. वस्तू मिळवण्याच्या नादात आपण जीवन जगण्याचं विसरून जाण्याचा धोका असतो. आपण आपलं अनुभवविश्व किती संपन्न केलं, आपल्याला सच्ची मैत्री किती मिळाली, आपण इतरांना किती जिव्हाळा दिला, इतरांची किती कदर केली, इतरांना वाढवण्यासाठी किती आधार दिला, किती जणांचे अश्रू पुसले, आपण अश्रू ढाळत असताना ते पुसण्यासाठी आसपास किती लोक होते, यांसारख्या गोष्टींचा हिशोब करून आपल्या जीवनाची समृद्धी मोजावी. *वस्तूंवर मालकी मिळवणं पुरेसं नाही, अत्यावश्यक नाही - त्या वस्तूंसहवा प्रसंगी त्या वस्तूंच्या अभावीही जीवन उत्कटपणानं जगता येणं महत्त्वाचं आहे.*"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १०)*
"आपण अनेकदा वरवर पाहून, कुणाचं तरी ऐकून, एकांगी विचार करून मतं बनवतो. एखाद्या व्यक्तीविषयी तिच्या शत्रूनं दुष्टाव्यानं सांगितलेली गोष्ट खरी मानून आपण काही निर्णय घेतले, कृती केली, तर ती विघातक, अन्यायकारक ठरण्याचीच शक्यता असते. म्हणून मतं बनवताना आणि त्या मतांना अनुसरून कृती करताना शक्य तितक्या बाजूंनी आधी विचार करावा, हे योग्य होय. याचा अर्थ एखाद्या बाबीविषयी नुसती अनेक अंगांनी चर्चा करण्यातच वेळ घालवावा असं मात्र नाही. आवश्यक ती दक्षता घेतल्यावर निर्णय घेऊन तत्परतेनं कृती करण्याची कार्यक्षमताही जपली पाहिजेच. सर्व बाजूंनी विचार करणं, याचा अर्थ कामं कामं लांबणीवर टाकणं वा निष्क्रिय बनणं, असा नाही. त्याबरोबरच, दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे त्यानं केलेल्या अन्यायापुढं शरण जाणं वा स्वतःच्या आनंदाचा बळी देणं, असाही नव्हे. निर्णय घेताना योग्य ती खबरदारी घेणं, सावधगिरी बाळगणं, उतावीळपणा न करणं, एवढाच त्याचा अर्थ आहे."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १२)*
"जीवनाच्या प्रवासात जे संघर्ष करणं अटळ असतं, ते जरूर केले पाहिजेत. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. शोषणातून मुक्त होण्यासाठी धडपडलं पाहिजे. फक्त हे सगळं करताना आपला विवेक जागा असला पाहिजे. जो संघर्ष तडजोड न करता, लाचारी न पत्करता आणि आपल्या तत्वांपासून न ढळता टाळता येईल. तो जरूर टाळला पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार करताना, आपण ज्या घटकाला अन्याय म्हणत आहोत, तो खरोखरच अन्याय आहे काय, हे प्रथम तपासून घेतलं पाहिजे. असं केलं असता खऱ्या अन्यायाविरुद्ध तर लढायचं, पण जो अन्याय नाही त्याच्यावर विनाकारण घाव घालण्याची चूक मात्र करायची नाही, हे संतुलन सांभाळता येतं."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १२)*
"प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेकदा पराभवाचे क्षण येतात. अशा वेळी मन निराशेनं ग्रासलं जातं. स्वतःचाच तिरस्कार करणारी आत्मद्वेषाची भावना मनाला झपाटून टाकते. आत्मतुच्छतेच्या कुरूप विचारांनी आपलं अंत:करण काळवंडून जातं. वैफल्यापोटी आत्मधिक्कार करता करता आत्महत्याच करून टाकावी, अशी टोकाच्या उद्वेगाची भावना अवघ्या व्यक्तिमत्वावर कब्जा करून बसते. आपल्या मनाला कासावीस करणारी गोष्ट ही, की काही बिचाऱ्या व्यक्ती आत्महत्येची कृती करून स्वतःला नष्टही करून टाकतात, तर दुसऱ्या काही दीर्घ काळपर्यंत जणू काही क्षणोक्षणी आत्महत्या केल्याप्रमाणं स्वतःवर स्वतःच्याच तिटकाऱ्याचे घाव घालून आत्मग्लानीचं जीवन जगतात. याउलट, काही लोक मात्र संकटांचे कितीही घाव अंगावर पडले, तरी डगमगत नाहीत. जीवनावरची निष्ठा क्षीण होऊ देत नाहीत. एक बुंधा छाटलेल्या झाडाला असंख्य फुटवे फुटावेत, त्याप्रमाणं त्यांचं जीवनावरचं प्रेमही अनेक कोवळे, लुसलुशीत, आल्हाददायक "फुटवे" धारण करतं !"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक 16)*
"जीवनात यशस्वी होण्याच्या बाबतीत आपण घेतलेला दृष्टिकोनच महत्वाचा असतो. एक फूट रुंद आणि वीस फूट लांब अशी एखादी फळी सपाट जमिनीवर ठेवली आणि आपल्याला तिच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला कुणी सांगितलं, तर आपण निर्धास्तपणानं जाऊ. याउलट, तीच फळी १०० फूट उंच असलेल्या एखाद्या इमारतीच्या गच्चीपासून तितक्याच उंचीच्या दुसऱ्या इमारतीच्या गच्चीपर्यंत पोचेल अशा बेतानं ठेवली आणि तिच्यावरून चालत जायला सांगितलं तर आपण गांगरून जाऊ. फळी तीच असूनही, अंतर तेवढंच असूनही पहिल्या प्रकारात आपण निर्भय असतो, तर दुसऱ्या प्रकारात अनेक प्रकारच्या भीतींनी ग्रस्त झालेले असतो. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत असं घडत असतं. निर्भयतेमुळं आत्मविश्वास मिळून यश लाभतं, तर भीतीमुळं आत्मविश्वासाचं खच्चीकरण होऊन पदरी अपयश येतं!"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २०)*
"केवळ लेखनाच्या बाबतीतच नव्हे, तर एकूण जीवनाच्याच बाबतीत, जीवनाच्या सर्व अंगांच्या बाबतीत - आणखी फुलता येणार नाही, इतके आपण कधीच फुललेलो नसतो. कारण, आपण कितीही फुललो, तरी आणखी फुलण्याला वाव असतोच. आणखी फुलता येणार नाही असं कधी वाटू लागलं, तर ती फुलण्याची परिपूर्णता वा परिसीमा नसते; तो आपल्या विकासाचा पूर्णविराम असतो, आपल्या जीवन-प्रवासाचा शेवट असतो, आपल्या अधिक फुलण्याच्या प्रक्रियेचा मृत्यू असतो !"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २२)*
"खरं तर विद्यार्थी कसा असावा, याविषयीचं माझं एक स्वप्न आहे. जमिनीत पेरलेलं बी मातीत दडपून टाकलेलं असतं, तरीही ते गप्प बसत नाही. त्याच्यामधलं चैतन्य आतनं मातीला धडका देतं. दोन-तीन दिवसांत तिला एखाद-दुसरी भेग पाडून ते बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करतं. त्याचा अंकुर रोज थोडा का होईना वाढतो. कोवळ्या पानांचं लेणं धारण करीत-करीत तो आकाशाच्या दिशेनं झेपावतो. पुढं फुलतो-बहरतो आणि इतरांनाही आनंद देतो. आमच्या विद्यार्थ्यानंही आपल्या व्यक्तिमत्त्वावर ज्ञानाची कोवळी पालवी धारण करावी. रोज थोडं-थोडं वाढावं. त्याच्या प्रतिभेचा अंकुर वाढून त्याचा डेरेदार वृक्ष व्हावा. त्यानं रोज नवे-नवे शब्द, नवे-नवे प्रयोग, नवी-नवी प्रमेयं माहीत करून घ्यावीत.
'आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने', असं तुकारामांनी म्हटलं आहे. आमच्या विद्यार्थ्याला एक-एक नवा शब्द हा एकेका मौल्यवान रत्नाच्या प्राप्तीसारखा वाटावा. एक-एक शब्द जाणणं म्हणजे एक-एक नवा मित्र जोडणं, असं मानायला हवं. नवे शब्द आत्मसात करणं म्हणजे आपला शब्दसंग्रह नव्हे, तर जणू काही लोकसंग्रह वाढवणं, असं समजायला हवं."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३०)*
"जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय, चुकत-चुकत का होईना शिकत गेल्याशिवाय, क्षणा-क्षणाला ताजेपणानं सामोरं गेल्याशिवाय, जीवनात नावीन्याच्या ओढीनं सहभागी झाल्याशिवाय कुणाचं तरी जीवन सर्वार्थानी आणि सर्वांगानी फुलू शकेल काय ? याचा अर्थ स्पष्ट आहे. *मोठया व्यक्तींनी लहान व्यक्तींवर विश्वासानं जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत आणि लहान व्यक्तींनी सळसळत्या उत्साहानं, उत्कंठेनं, जिज्ञासेनं जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत* - आपल्या नव्या पिढ्यांची प्रतिभा विविध अंगांनी फुलण्याच्या दृष्टीनं हा एक फार महत्त्वाचा घटक आहे."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३२)*
"पत्रिका तयार करणाऱ्या अज्ञानी, लोभी व्यक्तींनी किती भोळ्या जिवांचा गळा आपल्या शब्दशस्त्रांनी कापला असेल, या कल्पनेनं माझा जीव अक्षरश: कासावीस होतो. मंगळ, मूळ नक्षत्र, खडाष्टक योग, ग्रह वक्री असणं, शनीची साडेसाती, अशुभ वेळी मृत्यू झाल्यामुळं मृताच्या कुटुंबियांनी शांती करायची आवश्यकता, अशा कितीतरी प्रकारच्या भ्रमांनी आपल्या समाजातल्या असंख्य लोकांची मनं अजूनही झपाटली आहेत, या सगळ्यापायी प्रचंड आर्थिक नुकसान, भावनिक गोंधळ, भयगंडानं अवघं व्यक्तित्व दुबळं बनून जाणं, आनंदाच्या आणि समृद्धीच्या उत्तम संधी गमावणं, असे असंख्य प्रकार घडत आहेत. ज्यांनी समाजाला या साऱ्या अंधारातून बाहेर काढण्याइतकं ज्ञान आणि सामर्थ्य प्राप्त केलं आहे, तेच त्या अंधाराला भिऊ लागले, त्यांच्यापुढं शरणागती पत्करू लागले, तर या देशात प्रकाशाचा विजय कसा आणि केव्हा होईल बरं ?"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३६)*
"वरवर पाहिलं, तर चढाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, दमछाक करणारा असतो. कारण, तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला छेदून, त्याच्या कक्षेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न असतो. ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्याची धडपड असते. याउलट, उताराचा प्रवास सोपा, सहजपणे आणि फारसे सायास न पडता घडणारा असतो. कारण, उतरणाऱ्या व्यक्तीला पृथ्वी स्वतःच आपल्याकडं खेचून घेत असल्यामुळं खाली उतरताना तिला विशेष प्रयास पडत नाहीत. जणू काही प्रवाहाबरोबर वाहत जाण्याची तयारी ठेवली, की पुरेसं होतं.
हे सगळं डोंगराळ प्रदेशातल्या चढउताराच्या प्रत्यक्ष प्रवासाला जसं लागू पडतं, तसं चढउतारांनी भरलेल्या जीवनाच्या प्रवासालाही लागू पडतं. *परिस्थिती प्रतिकूल असली, तर चढाच्या प्रवासाप्रमाणंच त्रास सोसावा लागतो. ती अनुकूल असली, तर उतारावरनं चालत असल्याप्रमाणं विनासायास पुढं सरकता येतं.*"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४७)*
*"सर्वोच्च शिखरावर चढताना कितीही त्रास झाला, तरी तिथून सगळ्या जगाकडं विजयी नजर टाकताना, आपल्या चाहत्यांचे मुजरे घेताना आणि पराभूतांची व मत्सरग्रस्तांची तिरकस नजरही एक प्रकारे सुखावून टाकत असताना माणूस जग जिंकल्याच्या धुंदीत असतो. पण त्या शिखरावरून हळूहळू खाली उतरून इतरांना जागा करून देताना त्याला होणारी वेदना किती क्लेशकारक असते !* जीवनाच्या विविध क्षेत्रांतून अत्युच्च स्थानापर्यंत पोचलेली किती तरी माणसं आपल्या अवतीभवती असतात. कुणी क्रीडापटू असतो. कुणी अभिनयसम्राज्ञी असते. कुणी महान गायिका असते. कुणी यशस्वी राजकारणी असतो. कुणी आणखी अशाच कोणत्या तरी क्षेत्रात असाधारण कर्तृत्व गाजवलेलं असतं. पण या सर्वांच्या लोकप्रियतेला केव्हा ना केव्हा ओहोटी ही लागतेच. दुसऱ्या व्यक्ती त्यांची जागा पटकावतात आणि मान्यतेच्या लाटेवर स्वार होतात. एकेकाळी असंख्य लोकांच्या हृदयाचं स्पंदन बनलेल्या व्यक्तींना निष्प्रभ व्हावं लागतं, बाजूला सारावं लागतं. हे बाजूला होणं सोपं नसतं. ही प्रक्रिया अनेकांना पचवता येत नाही. मग ते आपलं दुःख एखाद्या व्यसनात बुडवू पाहतात. *अशा वेळी विवेक शाबूत ठेवला, मनाचं संतुलन राखलं, तर मात्र आपली जागा घेणाऱ्या व्यक्तींमधे आपण आपलंच प्रतिबिंब पाहू शकतो, ती व्यक्ती आपलाच प्रवाह अखंड ठेवण्याचं काम करीत आहे, असं मानून तिचं अभिनंदन करू शकतो. ज्याला जीवनाच्या उताराचा हा प्रवास आनंदानं, समाधानानं आणि उमदेपणानं करता येतो, त्यालाच जीवन खऱ्या अर्थानं कळलं, असं म्हणता येतं !"*
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४८)*
"अनिष्टाकडून इष्टाकडं होणाऱ्या परिवर्तनालाही प्राणपणानं विरोध करणं, हे भारतीय समाजाच्या दारिद्रयाचं आणि इतर दुःखांचं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे.
इष्ट, हितकारक दिशेनं होणारं जे परिवर्तन असेल, त्याचं स्वागत जरूर केलं पाहिजे. परिवर्तन होऊच शकत नाही, ही मनोधारणा हा परिवर्तनाच्या वाटेतील कदाचित सर्वांत मोठा अडथळा ठरतो."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ५२)*
"उतावीळपणानं, साहसानं आणि अविवेकानं जुनं टाकून नव्याच्या मागं धावू नये. कारण, अनेक जुन्या गोष्टींमधे पिढ्यापिढ्यांचा हितकारक अनुभव साठलेला असतो आणि त्याचा वारसा घाईघाईनं टाकून देणं म्हणजे सगळं नव्यानं सुरु करण्याचा वेडेपणा ठरेल. तसं करण्याची गरज नाही. पण त्याबरोबरच जुनं ते सोनं म्हणून, वारसारुपानं आलेल्या अनिष्ट गोष्टींच्याही गुंत्यात अडकून राहणं, हा मात्र आत्मद्रोहहोय, असं मला वाटतं. म्हणूनच जुन्या-नव्याचं संतुलन साधत पुढं जाणं आवश्यक आहे. *अविचारानं नव्याच्या पाठीमागं धावू नये, हे जितकं खरं, तितकंच दुराग्रहानं जुन्याला चिकटून बसू नये, हेही महत्त्वाचं आहे.*"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ५२)*
"डोंगराचा मजबूत कडा फोडण्यासाठी एक अत्यंत विस्फोटक सामर्थ्य हवं असतं आणि ते पाण्याच्या ठिकाणी असतं. पण त्याबरोबरच नाजूक बुबुळाला इजा होऊ न देता त्याला स्वच्छ, शांत करण्यासाठी देखील एक वेगळ्या प्रकारचं, कमालीच्या कोमलतेनं युक्त असं संयमाचं सामर्थ्य हवं असतं आणि ते सामर्थ्यही पाण्याच्या ठिकाणी असतं, हे आपण विसरता कामा नये. कडा फोडू शकणारं पाणी कितीही प्रभावी असलं, तरी ते जर डोळ्यांसाठी वापरलं, तर ते दृष्टीसह डोळ्यांचंही अस्तित्व मिटवून टाकेल, हा धोका आपण नजरेआड करता कामा नये. *जीवनाच्या प्रवासात, सामर्थ्याचं हे दुहेरी स्वरूप ओळखणं फार आवश्यक आहे. याचाच अर्थ, प्रसंगानुसार कधी कठोर तर कधी हळवं बनण्याचा लवचिकपणा आपण जरूर बाळगायला हवा.*"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ५३)*
"एखाद्यावर आघात करून त्याला दुःखी करणं सोपं आहे. त्याच्यावर घाव घालून त्याच्या डोळ्यांतून अश्रू वहायला लावणं सोपं आहे, पण असे आघात करून आणि घाव घालून त्याच्या ओठांवर चांदण्यासारखं प्रसन्न स्मितहास्य निर्मिता येत नाही ! शस्त्रास्त्रांचे, ज्वालामुखींचे मार्ग विजय मिळवून देतील, परंतु ते प्रेम मिळवून देऊ शकत नाहीत - त्यासाठी हृदयांना जोडणाऱ्या निष्कपट भावनेचं अस्त्रच उपयोगी पडतं."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ५४)*
"माणसं कष्ट करून, मर-मर मरून पैसा जमवतात. पण तो अनाठायी खर्च करतात. खोट्या प्रतिष्ठेपायी लग्नासारख्या समारंभांतून गैरवाजवी उधळपट्टी करतात. एखाद्या व्यसनापायी आपलं सर्वस्व गमावून बसतात. मग अडीअडचणीच्या काळात त्यांची अवस्था कोलमडून पडल्यासारखी होते. परिस्थिती प्रतिकूल असलेल्या व्यक्तींना पैशाच्या अभावी चटके बसतात, तेव्हा तो प्रकार समजण्यासारखा असतो. परंतु उत्कर्षाचे दिवस भोगलेल्या लोकांना जेव्हा त्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळं दुःख भोगावं लागतं, तेव्हा परिस्थितीला दोष देण्यात काही अर्थ नसतो. म्हणूनच, *पैसा केवळ मिळवणं महत्त्वाचं नसतं, तर तो काटकसरीनं वापरणं, भावी काळासाठी त्याची बचत करणं आणि अशा विवेकी वागण्यामुळं संकटांवरही मात करणं, हेच खरं महत्त्वाचं असतं.*"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ६०)*
"ज्ञान हे एक मोठं बळ असतं, पण त्या ज्ञानाचा जोपर्यंत व्यवहारात वापर केला जात नाही, तोपर्यंत मात्र ते बळ नसतं, ते जणू काही शून्य असतं, अस्तित्वहीन असतं, असं म्हणतात. म्हणूनच *आपल्या व्यक्तित्वावर ज्ञानाचा किती मुसळधार पाऊस पडला, यापेक्षाही त्यातले किती थेंब आपण आपल्या बुद्धीत साठवून ठेवले आणि योग्य वेळी योग्य रीतीनं वापरले, हे अधिक महत्वाचं आहे.*
आपण जे मिळवलेलं असतं, ते ऐन मोक्याच्या क्षणी वापरण्यासाठी उपलब्ध नसलं, तर ते मिळवलं काय आणि न मिळवलं काय, दोहोंना समानच मानलं पाहिजे. *आपलं व्यक्तित्व हे ज्ञानाचा एक-एक थेंब साठवत-साठवत विस्तारलेलं एक निर्मळ, प्रसन्न सरोवर बनावं आणि जीवनात जेव्हा जेव्हा उन्हाळ्याचे दिवस येतील, खडतर प्रसंग येतील, संकटांचे चटके बसू लागतील, तेव्हा त्या सरोवरातील थंडगार पाण्याच्या शीतल स्पर्शानं त्या चटक्यांची दाहकता नाहीशी व्हावी - असं झालं तर जीवनातले सर्व उन्हाळेही पावसाळेच होतील!*"
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ६०)*
"दुसऱ्यांना आनंद देण्याच्या कृतीचं एक वेगळेपण आहे. एखाद्याचं साधं अभिनंदन करण्याच्या कृतीचं उदाहरण घेतलं, तरी ते स्पष्ट होईल. आपल्या अभिनंदनानं त्याला आनंद होतो, त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात, त्याला प्रोत्साहन मिळून त्याचा प्रगतीच्या दिशेनं होणारा प्रवास अधिक वेगानं व अधिक सहजतेनं होतो, हे सगळं खरं आहे. याचा अर्थ आपल्या अभिनंदनामुळं त्याचा काही ना काही लाभ होतो. पण दुसऱ्याचं अभिनंदन करण्यामुळं स्वतः आपलाही मोठा लाभ होतो. अभिनंदन करताना आपल्या मनात जे उमदेपण निर्माण झालेलं असतं, त्याच्या अनंत लहरी आपल्या नसानसामध्ये पसरून आपल्याला अधिक निर्मळ, अधिक उन्नत, अधिक उदात्त बनवतात. द्वेष-मत्सर-तिरस्कार यांच्या बाबतीतही नेमका उलटा पण याच पद्धतीचा परिणाम होत असतो. जी व्यक्ती आपल्या द्वेषाचं लक्ष्य बनते तिला त्या द्वेषाचे काही दुष्परिणाम जरूर भोगावे लागतात, पण आपण करीत असलेल्या दुसऱ्याच्या द्वेषाचं आपण स्वतःदेखील कुठल्या ना कुठल्या प्रकारे भक्ष्य बनत असतो, यात शंका नाही. या प्रक्रियेमधे जणू काही एखादा विषारी पदार्थ आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबामधे मिसळतो आणि आपलं अवघं मन जणू काही विषाक्त करून टाकतो."
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ६२)*
"आपल्या जीवनातला विकारांचा धूर जितका टाळता येईल, तितका टाळावा - प्रेमाची ऊब आणि ज्ञानाचा प्रकाश जितका वाढवता येईल, तितका वाढवावा. हे जीवन मुळातच फार सुंदर आहे. त्याला सर्व प्रकारच्या कुरुपतेपासून वाचवण्याची, जपण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामधे नव्यानव्या सौंदर्याची व उत्कट-प्रसन्न आनंदाची भर घालण्याची जबाबदारीही आपलीच आहे. ही जबाबदारी आपण अवश्य पार पडली पाहिजे. कारण, *हे जीवन कसं आपलं काळजाच्याही काळजात जपून ठेवावं इतकं प्रिय-प्रिय आहे !*
*म्हणूनच, आयुष्यात सर्व काही मिळवलं, पण 'जीवन जगायचं' तेवढं राहून गेलं, असा पश्चाताप करण्याची वेळ आयुष्याच्या अखेरीस आपल्यावर येऊ नये, अशी दक्षता आपण घेतली पाहिजे."*
*(संदर्भग्रंथ : चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ६२)*
No comments:
Post a Comment