Flash

Tuesday, 25 April 2017

विच्छा , माझी पुरी करा - उमेश सूर्यवंशी

अनुक्रमणिका 

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग )*                                         *' आंबेडकर ' आडनावाचे ब्राम्हण गृहस्थ पहायचेतं...*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग )*                                       *योगगुरु रामदेवबाबांचा डावा डोळा ' सरळ ' पहायचायं...*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग )*                                       *गर्भसंस्काराने...संस्कारीत झालेलं मुलं पहायचयं....*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग )*                                         *' शंकराचार्य ' पदासाठी देशभर होणारी परीक्षा पहायचीयं....*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग )*                                         *आकाशातील ग्रह तारे दुर्बिणीतून दाखवणारा ज्योतिषी पहायचायं...*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग )*                                         *महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ' महिला ' पहायचीयं...*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग )*                                         *पंतप्रधान मोदीजींना संसदेत प्रश्नावर बोलताना पहायचयं...*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग )*                                         *"जातीअंतासाठी " डाव्यांनी काढलेला एक मोर्चा पहायचयं..*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग )*                                         *शिवसेनाभवनावर शिवरायांची मोठी प्रतिमा पहायचीय....*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग १० )*                                      *शरद पवारांनी स्वतः वर काढलेली " श्वेतपत्रिका " पहायचीयं....*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग ११ )*                                      *भाजपाचा " आयडाँल " पहायचयं....*
*विच्छा , माझी पुरी करा... ( भाग १२ )*                                    *घराघरात " शास्त्रज्ञांचे " फोटो पहायचेतं...*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग १४ )*                                    *प्राथमिक शिक्षकांची सभा "खेळीमेळीत " पहायचीयं...*
*विच्छा , माझी पुरी करा...(भाग १५ )*                                       *समस्त पुरोहीतवर्गात "संतहृदय " असणारे पुरोहीत पहायचेतं....*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग १६ )*                                    *पत्रकारिता "मूळ धर्माला जागताना " पहायचीय....*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग १७ )*                                      *पंढरीच्या वारीतील समानता गावपातळीवर व्यवहारात पहायचीयं...*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग १८ )*                                    *शिक्षण क्षेत्रावर % खर्च शासनाने केलेला पहायचयं...*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग १९ )*                                      *एक सर्वमान्य शिवचरित्र पहायचंय....*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग २० )*                                      *अंबानींना " रांगेत " पहायचयं...*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग २१ )*                                      *दाऊदला भारतात " शिक्षा " झालेली पहायचीयं....*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २२ )*                                    *राहुलजी गांधीना " ठामपणे लढताना " पहायचय...*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २३ )*                                    *बाबासाहेबांच्या डोळ्यातील " रिपब्लीकन पक्ष " पहायचायं...*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २५ )*                                    *सक्तीचा व्यसनविरोधी कायदा...पहायचायं*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग २५ )*                                      *भारतीय स्त्रीला रस्त्यावर शिट्टी मारताना पहायचीय....*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २६ )*                                    *संयुक्त महाराष्ट्र ...पहायचायं*
*विच्छा , माझी पुरी करा...( भाग २७ )*                                      *संघस्वयंसेवकांना " वैचारिक गुलामगिरी " तोडताना पहायचयं...*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २८ )*                                    *पुरुष "विवाहित" असल्याची खूण ....पहायचीयं*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २८ )*                                    *मराठी साहित्याला " नोबेल " पहायचयं...*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २९ )*                                    *एक "शो मँन " ....पहायचायं*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग ३० )*                                    *भारतरत्न यादीत "सामान्य माणूस "...पहायचायं*
*विच्छा , माझी पुरी करा....( भाग ३१ )*                                    *"लैंगिकता अर्थात शरीरशास्त्र" विषय अभ्यासक्रमात पहायचाय...*
*विच्छा , माझी पुरी करा...(भाग ३२ )*                                       *"प्रकाशसूर्य" संपवू पाहणारी..."भेकडांची औलाद" पहायचीय...*

=================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग १ )*

*' आंबेडकर ' आडनावाचे ब्राम्हण गृहस्थ पहायचेतं...*

डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक किर्तीचे व्यक्तीमत्व . अनेक वेगवेगळ्या विषयात मातब्बरी दाखवणारे अभ्यासक व विश्लेषक म्हणून आजही यांच्या मताचे दाखले दिले जातात. अत्यंत ज्ञानी मनुष्य , ज्यांचा अभिमान प्रत्येक विवेकी व राष्ट्रप्रेमी विचारांच्या मनुष्यास असतो असे हे निर्लेपी व्यक्तीमत्व .
*बाबासाहेबांचे मूळ आडनाव संकपाळ. दापोलीजवळचे आंबावडे या गावाच्या नावावरून 'आंबावडेकर ' असेही म्हटल गेलं. बाबासाहेबांच्या लहानपणी शाळेत आंबेडकर नावाचे ब्राम्हण सदगृहस्थ शिकवायला होते . या सदगृहस्थांनी बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव लावायाला लावले व रजिस्टरमध्ये तशी नोंद केली असे वाचनात आले. ( माझी आत्मकथा...नाग नालंदा प्रकाशन ) एका ब्राम्हण सदगृहस्थाने आपल्या विद्यार्थ्यांला आपले स्वतः चे आडनाव लावू द्यावे ही घटना मला क्रांतिकारी वाटते . याबद्दल या शिक्षकाचे मनःपूर्वक धन्यवाद मानावेसे वाटतात.*
मला असा प्रश्न पडतोय की , आजकाल ब्राम्हण कुळात हे ' आंबेडकर ' आडनावाचे घराणे कुठे लुप्त झालंय ?? आजकाल सर्वत्र प्रत्येक समाजातील माणसे आंबेडकर या नावाला अर्थात त्यांच्या ज्ञानाला जाहीर सलाम करतात. या प्रज्ञावंताशी आपले नाते जोडू इच्छितात. मग ...ज्या ब्राम्हण समाजातील पोटजातीने दस्तरखुद्द बाबासाहेबांना आपले आडनाव दिले ती पोटजाती व आंबेडकर हे आडनाव एकाएकी,कुठे गायब झाले ?? की ही घटनाच मूळात खोटी आहे ?? खरी असेल तर ब्राम्हण समाजात आंबेडकर आडनावाचा तुटवडा कसा पडला ?? अभ्यासक याचे उत्तर देतील ही अपेक्षा आहे.
*महाराष्ट्रात बरेच ठिकाणी काही कामानिमित्त फिरणे होते. पण किमान मला तरी " आंबेडकर आडनावाचे ब्राम्हण सदगृहस्थ " पाहण्यात नाहीत . तुमच्या पैकी कुणी पाहिलेत का ??......असल्यास कळवा...विच्छा , माझी पुरी करा.*
*!! हे खरं की खोटं ?? !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २ )*
*योगगुरु रामदेवबाबांचा डावा डोळा ' सरळ ' पहायचायं...*

योगगुरु रामदेवबाबा....आज देशभरातच नव्हे तर विदेशातही योगाच्या माध्यमातून पोचलेले उंची नाव. आपल्या पतंजली ट्रस्टमार्फत योगाचा प्रसार करून एक मोठे काम यांनी उभारले आहे. प्राणायाम ...या योगप्रकारातून रामदेवबाबा घराघरात पोचले. माणसाने श्वसन कसे करावे ?? याचा मुख्य धाडा म्हणजे प्राणायाम.
*योगाभ्यास ....हा भारतीय ऋषी मुनींचा मोठा हातखंडा असणारा विषय. या योगाचा प्रसार सार्या जगभर झालाय. विविध रोगांवर प्रतिबंधक उपाय म्हणूनही योगाकडे पाहिले जाते. योगगुरु रामदेवबाबा तर योगाच्या व आपल्याकडील जडिबुटींच्या औषधांच्या माध्यमातून किती तरी असाध्य रोग बरे होतात असा जाहीर दावा करत असतात. जे आजार १९५४ च्या ड्रग्ज अँड रेमिडीज अँक्ट कायद्याअंतर्गत " असाध्य " म्हणून ठरवले गेलेत व ज्यांच्यावर केवळ नियंत्रण आणणेच सध्या शक्य आहे पण या रोगाचे निर्मूलन सध्या शक्य नाही असे रोग देखील रामदेव बाबा बरा करतात असा दावा करतात. बाबांच्या या दाव्याला अनेक विवेकवादी लोकांनी जाहीरपणे आव्हानही दिलयं. प्रस्तुत ठिकाणी त्याची चर्चा नाही .*
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की....ज्या योगाच्या माध्यमातून व रामदेवबाबांच्या जडिबुटीच्या प्रभावाने असाध्य रोग बरे होतात ...त्यांचा उपयोग रामदेवबाबांनी स्वतः वर का करु नये ?? रामदेवबाबांचा डावा डोळा सारखा फडफडत असतो. हे फडफडणे आपल्याकडे थोडे विचित्र समजले जाते. त्यातून गैरअर्थ निघू शकतात. मग रामदेवबाबांनी स्वतः वरच प्रयोग करुन आपल्या डाव्या डोळ्याचे फडफडणे का थांबवू नये ?? हे आव्हान रामदेवबाबानी स्विकारायला हवे आणि आपल्या विरोधकांची तोंडे कायमची बंद करायला हवीत असे मला प्रामाणिकपणे वाटते .
*डोळा ...हा मानवी शरीरातील सर्वात नाजूक भाग. हे डोळे " सरळ " असावेत असे प्रत्येकाला वाटते . मग रामदेवबाबांना अस वाटत नाही का ??... खरंच ! योगगुरु रामदेवबाबांचा डावा डोळा " सरळ " झालेला मला पहायचयं......*
*!! बाबाजी , विच्छा माझी पुरी करा...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग ३ )*
*गर्भसंस्काराने...संस्कारीत झालेलं मुलं पहायचयं....*

अपत्यनिर्मिती हा मानवी जीवनातील अत्यंत आनंदाचा सोहळा असतो. स्त्रीपुरुष मिलनातून अपत्य जन्मते व मानवी जीवनसाखळी सुरु राहते हा नैसर्गिक नियम आहे. हा सोहळा अनुभवणे अत्यंत आनंददायी असते. प्रत्येक आईबापाला आपला गर्भ सुरक्षित व आनंददायी मार्गाने या जगात यावा असे मनापासून वाटत असते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तयारी केली जाते.
*डाँ. बालाजी तांबे...हे नाव आजकाल सर्वातोमुखी आहे. पोटातील गर्भावर संस्कार करुन त्याला संस्कारक्षम कसे बनवावे यासाठी तांबेनी एक भले थोरले पुस्तक लिहिलय. हे पुस्तक जोरदार खपतेय. बायको प्रेग्नेंट राहिली की मध्यमवर्गीय माणूस लगेच बाजारात उपलब्ध असणारे तांबेंचे " गर्भसंस्कार " नावाचे पुस्तक घरी आणतो. हेतू हा की ....प्रेग्नंसी व्यवस्थित पार पडावी व आपले अपत्या संस्कारक्षम निपजावे. हा हेतू उदात्त व योग्य आहे. याविषयी माझ काही दुमत नाहीय .*
मला प्रश्न असा पडलाय की..डाँ. बालाजी तांबे यांचे गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून ....या पुस्तकाचा प्रभाव पडून जन्माला आलेली असंख्य बाळे सध्या अस्तित्वात असावीत. गर्भसंस्कार होतो म्हणजे नेमके काय होते याबद्दल मला कुतुहल आहे. महाभारतातील अभिमन्यूची कथा मला कधीही पटली नाहीय व गर्भसंस्कार या तांबेच्या गोष्टीवरही माझा सध्या विश्वास नाहीय. तांबे हे विविध चँनेलवर कायम लोकांना विविध पातळीवर प्रशिक्षित करत असतात. म्हणून माझ कुतुहल वाढलय ते वेगळ्या दृष्टीने . मला पहायाचय की...संस्कारीत झालेले मुलं जीवनात नेमके कसे वागते ?? समाजात असणारे धार्मिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक राजकीय प्रश्नावर हे संस्कारीत बालक नेमके कसे प्रकट होते ?? स्त्री पुरुष संबंध , भ्रष्टाचार , अंधश्रध्दा , जागतिक प्रश्नांची गुंतागुंत अशा विविध प्रश्नांवर हे बालक कसे वागते ??...ज्याअर्थी हे बालक संस्कारीत आहे त्याअर्थी त्याच्याकडे या प्रश्नांची ठोस उत्तरे असण्याची शक्यता निर्माण होते...म्हणून फक्त म्हणूनच....गर्भसंस्काराने संस्कारीत झालेले अपत्य मला पहायचय...
*!! तोवर.....गर्भसंस्कार हे खूळ आहे...अस्सच आम्ही म्हणणार !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग ४ )*
*' शंकराचार्य ' पदासाठी देशभर होणारी परीक्षा पहायचीयं....*

समाजाची धारणा करतो तो धर्म ...अशी धर्माची व्याख्या केली जाते . हि धारणा ज्या धर्मग्रंथाच्या माध्यमातून केली जाते त्या धर्मग्रंथातील रुढी व संकेतांचे कालोचित अर्थ लावून समाजाला विधायक व विवेकी वळण देणे हे त्या धर्मातील धर्मप्रमुख म्हणवणारे माननीय व्यक्तीचे मुख्य काम समजले जाते . हे काम करणाऱ्या हिंदू धर्मातील व्यक्तीला ' शंकराचार्य ' असे म्हटल जाते. आद्य शंकराचार्यानी चार दिशेला चार पीठे स्थापून एक पध्दती आखून दिलीय. या पीठावर बसणारी व्यक्ती ही समाजात आदरणीय म्हणून ओळखली जाते.
*आपण सर्वत्र पाहत असतो की....एखाद्या छोट्याशा जागेवर हक्क दाखविण्यासाठी प्रत्येकाला आपली योग्यता सिध्द करावी लागते . यासाठी वेगवेगळ्या परीक्षाना बसावे लागते. तेव्हा निवडसमिती कडून नेमणूक केली जाते. प्रश्न धर्माशी संबंधित आहे म्हणून अपवाद करण्याचे कारण नाहीय . हिंदू धर्मातील मुख्य अशा शंकराचार्य पदासाठी अशी परीक्षा व्हायला हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते . साधारण ९० वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी मागणी केल्याचे माझ्या ऐकिवात आहे. अशी मागणी एक हिंदूधर्मीय म्हणून माझ्या सारख्या सामान्य माणसाने केली तर त्याला हरकत नसावी. या पदावर परंपरागत पध्दतीने फक्त ब्राम्हण समाजातील व्यक्ती बसत आली आहे. खरे तर हे या समाजासाठी आरक्षण आहे असे म्हटल तर वावगे ठरू नये. ज्याअर्थी हिंदू म्हणून ब्राम्हण बांधव माझै बंधू आहेत त्याअर्थी त्यांना जे हक्क आहेत ते मलाही असायला हरकत नाही . अशी परीक्षा घेऊन त्यामध्ये कोणतीही हिंदूधर्मीय व्यक्तीला हे पद मिळवण्याचा अधिकार असायला हवा. आखिर....हम सब एक है.....*
एखाद्या गोष्टी अथवा घटनेविषयी आपले मत लोकशाही व्यावहारात खुलेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य मला भारतीय राज्यघटना देते. एक भारतीय म्हणून व हिंदूधर्मीय म्हणून मला माझ्या मनातील " विच्छा " बोलून दाखवावीशी वाटली. यामध्ये कुणाची हरकत नसावी. माझे एवढेच सांगणे आहे की....माझी एवढी विच्छा पूर्ण करा.
*!! शंकराचार्य पदाच्या परीक्षेला बसायचं आहे...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग ५ )*
*आकाशातील ग्रह तारे दुर्बिणीतून दाखवणारा ज्योतिषी पहायचायं...*

माझा फलज्योतीष या विषयावर अजिबात विश्वास नाहीय हे सुरुवातीला स्पष्ट करतो. तरीही या देशातील सामान्य नागरीकापासून बड्या बड्या लोकांचा यावर विश्वास असल्यामुळे व ते तसा व्यवहार जीवनात करत असल्याने याविषयी एक सामान्य नागरिक म्हणून मला थोडे बोलावेसे वाटते . आपणही माझा हा सामान्य अधिकार मान्य करून थोडे डोळसपणे या विषयाकडे पाहावे एवढेच मागणे.
*फलज्योतीष हे शास्त्र नाहीय . भारतात गणित , खगोलशास्त्र व फलज्योतीष या तिन्ही शाखा जवळजवळ एकत्र लोकजीवनात कार्यरत झाल्या . गणित व खगोलशास्त्र यांना शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. याची अनेक कारणे आहेत. जसे गणितात २ गुणिले २ या प्रश्नाचे उत्तर जगभर एकच म्हणजे ४ येते. किंवा अवकाशात कोणती घटना आगामी काळात घडेल याचा अचूक अंदाज जगभरचे खगोलशास्त्री एकच वर्तवतात. तसे फलज्योतीषाचे नाहीय . एकाच व्यक्तीच्या कुंडली चार ज्योतिषी लोकांना दाखवली तर त्यावरचे त्यांचे भाष्य वेगवेगळे असते हे वास्तव आहे. हे माहिती असूनही असंख्य लोक या विषयावर विश्वास ठेवतात...त्याबरहुकुम जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेतात तेव्हा एक विवेकी माणूस म्हणून मला खरेच वाईट्ट वाटते . प्रश्न माझ्या वाईट्ट वाटण्याचा नाहीय . फक्त एवढेच मागणे आहे की...आकाशातील ग्रहतारे मानवी जीवनावर परिणाम करतात हे जर तुम्हाला मान्य असेल तर मग....आकाशातील हे ग्रहतारे दुर्बिणीच्या सहाय्याने आपल्या ग्राहकांना दाखवण्यात कोणतीच अडचण नसावी. मंगळ बुध गुरु शुक्र व शनी हे पाच ग्रह उघड्या डोळ्यांना दिसतात. पण त्याचे आकाशातील नेमके स्थान बहुतांशी ज्योतीषांना ठाऊक नसते असा आमचा दावा आहे. कारण यांचे सारे आयुष्य हे ग्रहतारे पत्रिकेत व कुंडलीत पाहण्यात जाते तेव्हा हे मान उंचावून कधी आकाशात पाहणार ?? पण यामुळे या विषयावर श्रध्दा व विश्वास ठेवणार्या लोकांच्या भावनेशी खेळ होतो. हे आकाशातील ग्रहतारे खगोलशास्त्री दुर्बिणीच्या सहाय्याने अचूक दाखवतात.*
माझ्या सांगण्याचा हेतू इतकच की.. आपल्या शरीरातील कोणत्याही घटकाला इजा झालेस त्याचे स्वच्छ दर्शन डाँक्टर मंडळी एक्सरे माध्यमातून आपणांस दाखवतात. मग आपला विश्वास बसतो. मग ...ज्या फलज्योतीषावर आपण विश्वास ठेवून जीवनात निर्णय घेता त्याकडून एवढी किमान अपेक्षा ठेवायला हरकत कसली ?? विचार करा.....
*फलज्योतीषांनी आमची ही नम्र विनंती स्विकारुन....आमची विच्छा पुरी करावी..*
*!! तोवर....फलज्योतीष शास्त्र नाहीय ....हेच खरंय..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग ६ )*
*महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ' महिला ' पहायचीयं...*

महाराष्ट्र ..हे एक प्रगत राज्य आहे. भारताच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचा वाटाही मोठा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी समजली जाते. अनेक क्षेत्रातील विधायक वळण देशाला लावण्यात महाराष्ट्राचा वाटा मोलाचा आहे. ही जशी नररत्नांची खाण आहे तशीच नारीरत्नेही इथली मोलाची आहेत. जिजाऊ पासून सावित्रीमाईपर्यतचा व त्यांनंतरचाही प्रवास अभिमानास्पद आहे. तरीही या प्रगत राज्याची धुरा लोकशाही व्यवस्थेत एकदाही या खंबीर महिला वर्गाच्या हाती आली नाहीय ही माझ्या मनाची खंत आहे.
*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आजवर अनेकांनी आपले नेतृत्व सिद्ध केलय. ते सर्व पुरुष आहेत. तरीही त्याच्याबद्दल मनात आदरणीय भावना आहे. खंत इतकीच की आपल्या राज्याच्या प्रमुखपदी एकही महिला ६० वर्षात मिळाली नाहीय. हा खरेतर क्षमता नसण्याचा मुद्दा नाहीय तर जाणीवपूर्वक सत्तेची चावी इथल्या पुरुषवर्गाने आपल्याच कंबरेला बांधली आहे अस माझ मत आहे. आज भारतात बंगालचे नेतृत्व ममतादिदि करतत...तामिळनाडूची धुरा जयललिताकडे आहे...मायावतीनी उत्तर प्रदेश सांभाळलेला होता ...दिल्लीवर शिला दिक्षित होत्या...राजस्थान वसुंधराराजेनी नेतृत्व करताहेत.....इतर राज्यांना महाराष्ट्राच्या तोडिचा उज्जवल वारसा नसतानाही ती राज्ये या महिलांनी समर्थपणे सांभाळली आहेत. मग...जिजाऊसावित्रीमाईचा वारसा सांगणाऱ्या माझ्या भगिनीला महाराष्ट्र सांभाळता येणार नाही का ??? निश्चितच ती अधिक चांगले नेतृत्व देऊ शकेल अशी खात्री आहे.*
आता ही महिला कोणत्या राजकीय पक्षाची असावी याबद्दल माझे काही मत नाहीय . मागणी इतकीच आहे की ही विधायक परंपरा महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी. महाराष्ट्राच्या माथ्यावर ही जी उणीव राहून गेलीय ती भरून निघावी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निवासस्थानचे नाव " वर्षा " आहे. या निवासस्थानात एकदा तरी ...खरीखुरी वर्षा...अर्थात महिला ..महाराष्ट्राचे नेतृत्व करताना मला पहायचीयं.....
*एवढीच ....विच्छा , माझी पुरी करा...*
*!! महाराष्ट्र खर्या अर्थाने ...."प्रगत" व्हावा..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग ७ )*
*पंतप्रधान मोदीजींना संसदेत प्रश्नावर बोलताना पहायचयं...*

लोकशाही ....आपण सर्वानी स्विकारलीय. लोकशाही ज्या चार स्तंभावर आधारित आहे.संसद..हा यातील महत्त्वाचा स्तंभ. हा स्तंभ टिकविण्यासाठी तो सतत कार्यान्वित असणे गरजेची आहे. देशाच्या महत्त्वाचे प्रश्नावर इथे चर्चा संवाद अपेक्षित असतो. यामध्ये सत्ताधारी वर्ग व विरोधी वर्ग या दोघांना महत्त्व असते. देशाचे प्रधानमंत्री हे जरी एका राजकीय पक्षाशी संबंधित असले तरीही ते मुख्यतः समस्त भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करत असतात. म्हणून त्यांचे संसदेत असणे व तिथे त्यांनी चर्चा संवाद करून प्रश्नांना तड लावणे महत्त्वाचे असते.
*आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे जगभरात देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मी स्वतः एक राजकीय कार्यकर्ता असल्याने व मोदीजींच्या पक्षाविरोधात माझी राजकीय मते असली तरीही मोदींजी आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून मान्य आहेत. लोकशाहीत त्यांना लोकांनी निवडून दिले आहे हे वास्तव आहे. माझा प्रश्न फक्त इतकाच आहे की...ज्या समस्त भारतीयांचे मोदीजी नेतृत्व करतात त्या भारतीयांच्या प्रश्नावर आमचे मा. प्रधानमंत्री लोकशाहीच्या मुख्य स्तंभाठिकाणी आपली भुमिका मांडताना दिसत नाहीत. तेव्हा मग मनं साशंक होते. मोदीजी आपल्या पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी देशभर हिंडत असतात. जागतिक पातळीवर विविध ठिकाणी आपली मते ते मांडतात. मग....मा. प्रधानमंत्र्यांना फक्त संसदेत बोलायला व चर्चा संवाद करण्यात अडचण कोणती ?? आपल्या देशाचे पूर्वप्रधानमंत्री मा. मनमोहन सिंह यांना मोदीजीनी स्वतः विरोधक असताना " मौनी " म्हणून हिणवलं होते . खरेतर मनमोहनजीनी संसदेत ११९८ भाषणे दिल्याची नोंद ऐकिवात आहे. मग ..इतके बोलून मनमोहनजी मौनी असतील तर...संसदेच्या पायरीला पहिल्या दिवशी नतमस्तक होऊन प्रत्यक्षात चर्चा व संवाद टाळणारे मोदीजींना आम्ही काय म्हणावे ??...विचार व्हावा.*
मला फक्त इतकेच सांगायचे आहे की.....मा. प्रधानमंत्र्यानी संसदेत विविध प्रश्नावर आपली भुमिका स्पष्ट करायला हवी. तरच लोकशाही मजबूत करणारे म्हणून मी त्यांना गौरविन. अन्यथा माथा टेकून नंतर लाथा घालणारे....अशीच त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यांत असेल. मोदीजी सर्वाना " मन की बात " सांगतात. मग...या एका सामान्य भारतीय नागरिकाची " मन की बात " जाणा हो...एवढी विच्छा पुरी करा.
*!! "मन की बात"...संसदेत बोला ...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग ८ )*
*"जातीअंतासाठी " डाव्यांनी काढलेला एक मोर्चा पहायचयं..*

मी स्वतः डाव्या विचारांचा कार्यकर्ता आहे हे सुरुवातीला स्पष्ट करतो. डाव्या चळवळीत गेली दहा वर्षे काम करत असल्याने अनेक विषयावर निघालेल्या मोर्चात मी माझा कृतीशील सहभाग नोंदवलाय. अन् याचा मला माझ्या परीने रास्त अभिमान आहे. डाव्या विचारांशी माझी बांधिलकी आयुष्यभर वाढतच जाईल.
*शोषीत व वंचित समाजासाठी राजकारण व समाजकारण हे डाव्या विचारांचे मुख्य वैशिष्ट्य . शेतकऱ्याचे , कामगारांचे , स्त्रीप्रश्नाचे असे विविध पातळीवर लढे उभारून प्रश्नाला वाचा फोडणे हे डाव्या विचारांचा मुख्य आचार. समाजवाद व साम्यवादी विचारांचा कैवार हा प्रमुख विचार . या विचार व आचारामुळे डाव्या लोकांना समाजात अधिक मान असतो. भांडवलशाही व शोषणशाही ( विविध क्षेत्रातील ) हे दोन मुख्य शत्रू डाव्या विचारांचे. " लाल बावटा " हातात घेऊन कष्टकरी वर्गाला त्याचे न्याय्य सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक हक्क व अधिकार मिळावेत यासाठी डावे तनमनधन अर्पून काम करत असतात. डावा विचार हा कष्टकरी वर्गाचा आवाज आहे. म्हणून माझ्या सारख्या कामगाराला हा विचार सर्वात श्रेयस्कर वाटतो.*
डाव्यांवर एक आरोप सतत होत आलाय व तो बरेच प्रमाणात खराही आहे. भारतातील अमानुष जातीव्यवस्था उध्वस्त व्हावी यासाठी डाव्यांनी आपल्या विषयपत्रिकेत अथवा धोरणात जातीअंताला म्हणावे असे योग्य स्थान दिले नाहीय असा हा आरोप. कामगारांना किमान वेतन मिळावे , शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा , स्त्री वर्गाचे दुय्यमत्वा संपावे , सर्वांना किमान शिक्षण मोफत असावे , रेशनवरा धान्य व्यवस्थित मिळावे असे एक ना अनेक प्रश्नावर मोठा जनसमुह रस्त्यावर उतरवण्याची ताकद डाव्या विचारांकडे आहे. वेळोवेळी ती दाखवलीही जाते. " रोटी प्यारी खरी , आणखी काही हवे आहे....." अशा कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ओळी आहेत. डाव्यांचा मुख्य रोख नेहमीच रोटी अर्थात भाकरीवर राहिला आहे. तो सर्वात महत्त्वाचा आहे हे मान्यय मला. पण जगण्यासाठी इतर अंगेही महत्त्वाची असतात. भारतातील जातीव्यवस्था उध्वस्त होणे ही काळाची गरज आहे. अनेक महामानवानी यासाठी खस्ता खाल्ल्या. वर्गाला प्राधान्य देणारे डावे जातीनिर्मूलनाला प्राधान्य देत नाहीत असा आक्षेप बाबासाहेबपासून इतर बरेच जणांचा आहे. व त्यात तथ्यही आहे.
*जातीअंतासाठी इतर जे घटक प्रयत्न करतात त्यांना डाव्याचा सक्रीय साथ असते हे निर्विवाद. पण...पण तरीही लाखो जनसमुह रस्त्यावर उतरवण्याची ताकद बाळगणारे डाव्यांनी किमान एकदा तरी..फक्त न् फक्त ....जातीअंत घडावा यासाठी त्या लक्षसमुहाला रस्त्यावर उतरवावे. ही मोहीम सद्यकाळात फार महत्त्वाची आहे. यंदा बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. या निमित्ताने काही मतभेद दूर सारून समस्त कष्टकरी व मागास बांधावाना एकत्र घेऊन डाव्यांनी पुढाकाराने हा मोर्चा काढून दाखवावा असे मला प्रामाणिकपणे वाटते . माझ्या सारख्या एका छोट्या डाव्या कार्यकर्त्याची ही..." विच्छा पुरी करा ".*
*!! वर्गअंताबरोबर " जातीअंत " महत्त्वाचा ....!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग ९ )*
*शिवसेनाभवनावर शिवरायांची मोठी प्रतिमा पहायचीय....*

मी शिवसैनिक नाही हे सुरुवातीला स्पष्ट सांगतो. तरीही माझ्या आयुष्यात मी सर्वात पहिले मतदान शिवसेनेला केले आहे. १९९५ विधानसभा निवडणूकीत कोल्हापूर शहरात आमदार निवडून आणण्याता माझ्या एका मताचा वाटा होता हे महत्त्वाचे आहे. त्या मताचे मुल्य मोठे असे की पहिल्यांदा शिवसेना सत्तेवर आली. म्हणून हा अधिकार कधीकाळचा शिवसेनेचा मतदार या अर्थाने वापरतोय. याला सुज्ञ शिवसैनिकांची हरकत नसावी.
*शिवसेना.....ही १९६६ साली स्थापन झाली . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून मराठी माणसाला आलेली जाग ही पुढील काळात संयुक्त महाराष्ट्र समितीला दिसली नाही व समिती जवळजवळ बरखास्त झाली . प्रबोधनकार ठाकरे या मुलुखमैदान तोफेने हा "महाराष्ट्रीय जनतेचा आवाज " ऐकला अन् शिवसेना स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख झाले. संघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर झाले . आज महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत भागीदार आहे. एकचालकानुवर्तीत्व हे वैशिष्ट्य असूनही जवळजवळ ५० वर्षे शिवसेनेचा करिश्मा कायम आहे. याला कारणीभूत बाळासाहेब ठाकरेंचे नेतृत्व आहे हे मान्यय मला. पण...पण त्याचबरोबर शिवसेना सामान्यांना जवळची वाटली ती शिवाजी महाराज हे प्रतिक व भगवा झेंडा या ध्वजामुळे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच नव्हे तर देशपातळीवर व विदेशातही आदरणीय महामानव आहेत. "महाराष्ट्र म्हणजे शिवराष्ट्र " हे वाक्य खरं आहे. किमान महाराष्ट्रात तरी शिवाजी महाराज हे व्यक्तीमत्व नेहमीच अव्वल स्थानावर राहिले आहे व ते एकदम रास्त आहे. शिवसेनेने शिवराय हे प्रतिक निवडल्याने सामान्य नागरिकांना शिवसेना जवळची वाटली हे सत्य कोणताही कट्टर शिवसैनिक नाकारणार नाही . कट्टर शिवसैनिक शिवाजी महाराजानंतर बाळासाहेब ठाकरेना आदरणीय मानतो.*
*मुंबईच्या शिवसेना भवनावर मा. बाळासाहेब ठाकरे यांची भलीथोरली प्रतिमा दृष्टीस पडते. शिवसेनेने आजवर नेहमीच शिवाजी या नावाचा वापर करून निवडणूक लढवल्या व जिःकल्याही. सामान्य जनसमुहाला आवाहन करताना शिवसैनिक नेहमीच शिवरायांचा दाखला देतात. मग....मग मला असा प्रश्न पडलाय की शिवसेनाभवनावर कुणाची प्रतिमा असायला हवी ?? मला प्रामाणिकपणे वाटते कि.....शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे हे वंदनीय असले तरीही शिवाजी महाराज हे जास्त वंदनीय आहेत. आजवर शिवसेनेने शिवरायांचे नाव वगळून व बाळासाहेबांचे नाव घेऊन साधी ग्रामपंचायतही लढली नाहीय . मग शिवसेनाभवनवर शिवरायांची प्रतिमा मोठी नको का ?? विचार व्हावा.*
"३३ कोटी देवांची फलटण रिटायर करण्याची हिंमत एकट्या शिवाजी या महामंत्रात आहे व म्हणूनच शिवाजी हा अखिल भारताचा राष्ट्रदेव आहे " असे सार्थ उद्गार दस्तरखुद्द बाळासाहेब ठाकरेंचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले आहेत. मग शिवाजी महाराज ३३कोटी देवांहून श्रेष्ठ असतील तर मग शिवसेनाभवनावर " शिवप्रतिमा " असायलाच हवी. सामान्य व कट्टर शिवसैनिकांनी हे सत्य समजून घ्यावे व शक्य झालं तर वरिष्ठांपर्यत ही योग्य मागणी करावी. कधीकाळी शिवसेनेला दिलेल्या एका मतासाठी माझ्या सारख्या सामान्य माणसाने एवढी मागणी केली तर हरकत नसावी. शिवसेना यंदा ५० वर्षे पूर्ण करतीय . त्याबद्दल राजकीय विरोधक असूनही मनःपूर्वक अभिनंदन . आठवण एवढीच की.....शिवसेनेला एकवेळ मतदान केलेल्या या सामान्य माणसाची ..." विच्छा पुरी करा ".*
*!! जय शिवाजी , जय भवानी !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६४
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग १० )*
*शरद पवारांनी स्वतः वर काढलेली " श्वेतपत्रिका " पहायचीयं....*

मा. शरदरावजी पवार हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर आदरणीय व्यक्तीमत्व . शरद पवार या नावावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील सामान्य माणसापसून नामवंत लोकांपर्यत अनेक जण आहेत. तसेच त्यांच्या नावावर राग व्यक्त करणारे..हरघडी त्यांच्या नावे शंख ठोकणारेही कमी नाहीत . असे हे आगळेवेगळे व्यक्तीमत्व . मी ही काही बाबतीत त्यांच्या धोरणाच्या विरोधी आहे पण एक जबरदस्त व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्या बद्दल माझ्या मनात कायम आदर आहे व राहील.
*महाराष्ट्राचा व देशाचा राजकीय इतिहास शरद पवार या नावांखेरीज अपूर्ण राहील. नुसत्या राजकीय नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांचे कार्य महत्त्वाचे मानल गेलय ही वस्तुस्थिती आहे. देशाचे कृषीमंत्री असताना आपला देश मोठा निर्यातदार बनला याचे मला जसे कौतुक आहे तसेच त्यांच्याच कार्यकाळात महाराष्ट्रात व देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या हे वास्तव मला वेदनादायी वाटते . असे हे परस्पर विरोधी कंगोरे शरद पवार या नावाभोवती कायमचे चिकटलेत. म्हणून " खरे शरद पवार नेमके आहेत कसे ?? " असा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य माणसाला पडतो. महाराष्ट्रात व देशात काहीही चांगले घडो अथवा वाईट्ट ...त्याचे श्रेय पहिल्यांदा या नावाला जाते. देशात नैसर्गिक भूकंप घडला तरी तो शरद पवारांनीच केला असे विधान मध्यंतरी त्यांनीच केले होते असे ऐकिवात आहे. शरद पवार या नावाचा करिश्मा हा असा आहे. विरोधक नेहमीच ....या देशात सर्वाधिक काळा पैसा कुणाकडे ..राजकारणाची "वाट" कुणी लावली....किल्लारी भूकंपात कुणी पैसे खाल्ले....इथपासून ते....मराठा मोर्चाचे सुत्रधार कोण...एकचवेळी मोदींना व सोनियांना सल्ला कोण देऊ शकत...अशा विविध प्रश्नावर विरोधाक नेहमीच शरद पवार या व्यक्तीकडे बोट दाखवतात. तर समर्थक म्हणवणारे .....नामांतराचा प्रश्न कुणी सोडवला...महिला धोरण कुणी सुरु केले...महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज कोण...फुले शाहू आंबेडकर यांचा राजकीय वारस कोण..इथवर शरद पवार याच व्यक्तीमत्वाकडे बोट दाखवतात. शरद पवार नेमके कसे आहेत हे कळत नाहीय ते यामुळेच.*
जसे डाव्या चळवळीना व काही राजकीय पक्षानाही शराद पवार आपले वाटतात तसेच डाव्याचे विरोधक असणारे शिवसेनाप्रमुखांचे शरदराव मित्र असतात तर मोदींचे राजकीय मार्गदर्शक सुध्दा असतात. कलाकारांना...खेळाडूना...इतिहाससंशोधकाना...शास्त्रज्ञांना..अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही शरदराव जवळचे वाटतात. इतका मालमसाला भरालेल व्यक्तीमत्व आजकाल फारच दुर्मिळ. म्हणून मला प्रामाणिकपणे वाटते की...शरद पवारांनी स्वतःच आता " मी नेमका कसा आहे " ते सांगावे हे बरे.
*श्वेतपत्रिका....म्हणजे एखाद्या घटनेविषयीचे ( विविध बाबतीत ) खरेखोटेपण जाणून घेण्यासाठी शासनाने जाहीर केलेले व जनतेसाठी खुले असलेले मतं. अशी ढोबळ व्याख्या आहे. आजवर सरकारच ही श्वेतपत्रिका काढते हे सत्य मला माहिताय . व्यक्ती श्वेतपत्रिका काढत नाही हे मी जाणतो. पण...पण शरद पवार हे व्यक्तीमत्वच एक संपूर्ण सरकार आहे. ज्यांच्याबद्दल खरखोट जाणून घेण्याची आस प्रत्येकाला वाटते. काहीना सहानुभूतीपोटी तर काहीना असूयेपोटी. तेव्हा या " जाणत्या राजाने " लोकांच्या भावना जाणाव्यात. आपल्या जीवनातील सगळे बरेवाईट घटना व त्यामागची शरदरावांची भुमिका त्यांनी सदसदविवेकबुध्दी वापरुन स्वतः च जनतेसमोर मांडाव्यात. शरद पवारांचे चरीत्र उपलब्ध आहे. पण खरेतर कुणाचेच चरित्र कधीच विश्वासपात्र नसते. अगदी कुणाचेही. कारण त्यात स्तुती...रंजकता व अतिशयोक्ती असते. आम्हाला शरद पवार या नावाबद्दल मनापासून आदर आहे. त्यांना नेमके जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. शरदरावांनी नेहमीच सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्यात. तेव्हा तुमचा मनःपूर्वक आदर करणाऱ्या या छोट्या माणसाची...."विच्छा पुरी करा..."*
*!! मा. शरद पवारजी ....एवढं कराचं....!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग ११ )*
*भाजपाचा " आयडाँल " पहायचयं....*

भारतीय जनता पार्टी.....अर्थात भाजपा हा सध्याचा सत्ताधारी राजकीय पक्ष. केंद्रात व महाराष्ट्र राज्यात या पक्षाचीच सत्ता आहे. साधारण १९८० साली हा पक्ष स्थापन झाला . तत्पूर्वी जनसंघ या नावाने अस्तित्व होते. अवघ्या २ खासदारांपासून सुरु झालेला राजकीय प्रवास आज २८२ खासदाराःपर्यत येऊन ठेपलाय. मी स्वतः या राजकीय पक्षाचा राजकीय विरोधक आहे तरीही या पक्षाच्या या अभूतपूर्व वाटचालीस सदिच्छा व्यक्त करतो.
*आयडाँल अर्थात प्रेरणास्थान....भारतीय समाजात प्रतिकांना फार महत्त्व आहे. भारतीय समाज हा मूळातच व्यक्तीपूजक आहे. त्यामुळे इथे कार्य करु इच्छिणाऱ्या प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक राजकीय संस्था संघटना व पक्षांना आपला वारसा कुठून आलाय हे लोकांना पटवावे लागते. बरेच प्रमाणात लोक हे प्रतिक पाहूनच कुणाच्या पाठीशी उभे रहायचे हे ठरवतात. राजकीय पक्षही आपले प्रतिक निवडतात. ते जनसमुदायासमोर विचारार्थ ठेवतात. सध्या काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधीजी व पंडीत नेहरू....कम्युनिस्ट पक्ष हे सरदार भगतसिंग....रिपब्लिकन पक्ष हे डाँ. बाबासाहेब आंबेडकर ....प्रादेशिक असणारा शिवसेना हा पक्ष शिवाजी महाराज.... दक्षिणेकडे राजकीय पक्ष पेरीयार यांना आपले आयडाँल अर्थात प्रेरणास्थान मानतात.( या महामानवांच्या विचारानुसार या राजकीय पक्षांची वाटचाल नसते हा भाग जरा बाजूला ठेवू ) मला प्रश्न इतकाच पडलाय की भारतीय जनता पार्टीला असा आजवर एकही आयडाँल का मिळाला नाही ?? सध्याचा भाजपा अर्थात पूर्वीचा जनसंघ हा स्वातंत्र्य लढ्यापासून दूर राहिला हे कारण आहे का ?? की मूळात यांच्याकडे सर्वसामान्य भारतीय जनतेवर प्रभाव टाकेल अशा व्यक्तीचा वारसाच नाहीय ?? ...काहीही असो पण भाजपाला आयडाँल म्हणून कुणी व्यक्ती आजवर मिळाली नाही हे वास्तव आहे.*
आमचा पक्ष व्यक्तीवादावर चालत नाही असा दावा हा पक्ष करू शकणार नाही. कारण मध्यंतरी काळात स्वामी विवेकानंद व भगतसिंग यांच्या राजकीय अपहरणाचे प्रयोग यांनी करुन पाहिलेत. सध्याही वल्लभभाई पटेल व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीत हा प्रयत्न अधूनमधून होतो. पण यश येत नाहीय. तसे पाहिले तर भाजपामधील बहुतांशी व्यक्ती हे डाँ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांना पुजास्थानी मानते. अधेमधे सारकरांनाही हा मान असतो. मग....मग अधिकृतपणे हा राजकीय पक्ष या तिघांपैकी एकाचा वारसा आपण चालवतोय अस छातीठोकपणे भारतीय जनतेसमोर का सांगत नाहीत बरे ?? कि या तीन व्यक्तीमत्वांना जनाधार मिळणार नाही असे त्यांना वाटते ?? सत्य काहीही असो... पण भाजपाने आपला वारसा कुठं तरी प्रामाणिकपणे जोडायला हवा असे मला प्रामाणिकपणे वाटते.
*भाजपात....पूर्वीच्या जनसंघातील श्यामाप्रसाद मुखर्जी ते दिनदयाळ उपाध्याय ते अटलबिहारी वाजपेयी पासून सध्याचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असे दिग्गज लोक आहेत. तरीही या पक्षाला एक आयडाँल मिळत नाहीय ही खेदाची गोष्ट आहे. राम....यांनी मध्येच सोडून दिला. त्यामुळे यांच्या आयडाँलवर लोकांचा विश्वास बसणेही कठीण आहे. तरीही या पक्षाने प्रयत्नपूर्वक आपला आयडाँल शोधावा व त्याच्या जोरावर स्वतःला जनतेसमोर सादर करावे. मी या पक्षाचा राजकीय विरोधक असलो तरीही त्यांचे हितं चिंतितोय या भुमिकेतून त्यांनी मला समजून घ्यावे व..."माझी विच्छा पुरी करावी.."*
*!! भाजपाने.....ही विशेषमोहीम राबवावी..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा... ( भाग १२ )*
*घराघरात " शास्त्रज्ञांचे " फोटो पहायचेतं...*

शास्त्रज्ञ ....हा तसा तुम्हाआम्हा भारतीयांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेला विषय. सहज कुणाला ५ थोर भारतीय शास्त्रज्ञांची नावे सांग पाहू असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळणे कठीण. इतकी अनास्था शास्त्रज्ञांच्या वाट्याला आलीय. हे खरेतर अजिबात चांगले लक्षण नाहीय.
*शास्त्रज्ञ .....मानवी जीवन अधिक समृद्ध व्हावे , त्याला अधिकाधिक संपन्न बनवावे , त्याच्या अतोनात परिश्रमाला थोडी विश्रांती मिळावी म्हणून रात्रंदिवस आपले डोके खाजवून नवनवीन उपकरणे व साधने बनवणारे , या पृथ्वीवरच खराखुरा स्वर्ग बनवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा थोर व्यक्ती म्हणजे शास्त्रज्ञ. एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र कष्ट करून व आयुष्य कणाकणाने झिजवून ही लोक आपल्या सारख्या बंधूसाठी नवनवे शोध लावतात. यामुळे आपले जीवन सुसह्य व आनंददायी होत असते. या प्रामाणिक लोकांबद्दल आपल्या सारख्या माणसांना आदर असतो. कुतुहल असते त्यांच्या कामाबद्दल. पण...पण तरीही आपल्या मनाचा कोपरा आपण त्यांच्यासाठी रिकामा करत नाही हे आपणांस अधःपतित करणारे वास्तव आहे. हे बदलायला हवे.*
आपल्या घरात अनेक थोरामोठ्यांचे..देवदेवतांचे...निसर्गचित्रांचे...कलाकृतीचे...आपल्या बापजाद्यांचे....फोटो असतात. रोज एकदा तरी आपण या फोटोकडे पाहून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. मग...मग बंधूनो मानवी जीवन इतके आनंददायी बनवणारे शास्त्रज्ञ या रांगेतून बाहेर का ??... या त्यांच्या फोटोला कोणताही हार फुले गंध माळा यांची गरज नाहीय. फोटो भिंतीवर असावा तो यासाठी की " आम्ही तुमच्या कामाचे मोल मनोमन मानतो व तुमचा यथोचित गौरव करतो " एवढा एक संदेश या लोकांच्या पर्यत पोचावा यासाठी. यामुळे नवीन शास्त्रज्ञांना प्रेरणा मिळेल. आपल्या घरचे मुलही " मला शास्त्रज्ञ व्हायाचेय " असे बोलू लागेल. अखिल मानव जातीच्या हिताचा हा व्यवसाय आहे. त्याचा सन्मान करूया.
*अल्बर्ट आईनस्टाईन , न्युटन , क्युरी दांपत्य हे जसे विदेशी शास्त्रज्ञ प्रसिद्ध आहेत तसेच आपल्याकडे जगदिशचंद्र बोस , सी. व्ही. रामन , अब्दुल कलाम आजाद , सी. वेःकटेश्वर राव, जयंत नारळीकर असे एकाहून एक शास्त्रज्ञ जगप्रसिध्द आहेत. या लोकांनी आपले जीवन मानवी सेवेसाठी वाहिलेले आहे. त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते . काँ. गोविंद पानसरे यांची एक मुलाखत मी अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राकरिता घेत होतो. तेव्हा अण्णांनी हा मुद्दा मला अधोरेखित करायला लावला होता. अण्णांना या लोकांच्या ज्ञानाविषयी विशेष कृतज्ञता होती हे मला जाणवले. आपणही आपली सदसदविवेकबुध्दी जागी करावी. आपल्या भिंतीवर किमान एक शास्त्रज्ञांचा फोटो हवाच हवा. फक्त एवढीच...." विच्छा पुरी करा "...*
*!! शास्त्रज्ञांप्रती.....कृतज्ञता व आदर बाळगा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६४
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग १४ )*
*प्राथमिक शिक्षकांची सभा "खेळीमेळीत " पहायचीयं...*

शिक्षक हा माणूस आपल्याकडे नेहमीच वंदनीय ठरलाय. कोणत्याही कामात एखाद्याला सल्ला घ्यायचा झाला तर शिक्षक नावाच्या माणसाला विचारतात. समज असा की " हा माणूस जरा आपल्यापेक्षा जास्त हूशार आहे व आपणांस योग्य मार्ग दाखवेल ". शिक्षकांना गुरु पण म्हटल जाते. अत्यंत मान असतो या माणसाला समाज पातळीवर. समाजातील प्रत्येक घटक आपल्या पाल्याला या शिक्षक नावाच्या व्यक्तीवर निवांत सोपवत असते. याला कारण असे की आपल्या पाल्याला हे शिक्षक नावाचे इसम जीवनात योग्य मार्ग दाखवतील. वळणावर आणतील.
*या देशातील पहिले एतद्देशीय शिक्षक व शिक्षिका अनुक्रमे महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले या वंदनीय जोडप्याला पहिल्यांदा शतशः प्रणाम. या दांपत्याचा सेवाभावी व्यवसाय आजचे आमचे शिक्षकलोक चालवतात अस एक ढोबळ चित्र समाजात आहे. ( खरेतर मला हे आपवाद वगळता पटत नाही ) आपल्या मुलांवर संस्कार करण्याचे कार्य शिक्षक लोक करतात. काय चांगले , काय वाईट्ट याचे भान आपल्या मुलांना शिक्षणातून मिळते ते काही प्रामाणिक शिक्षक वर्गामुळे. विवेकी व जबाबदार भारतीय नागरीक बनवण्याची एक मोठी जबाबदारी शिक्षक नावाच्या खांद्यावर असते. त्यामुळे मूळात हे शिक्षक पहिल्यांदा जबाबदार नागरीक असायला हवेत. कारण आडात नसते ते पोहर्यात कुठून येणार हो ?? काही अपवादात्मक शिक्षक खरोखरीच असे आहेत हे मान्यय मला. पण....पण तुम्ही कधी शिक्षकांची वार्षिक सभा पाहिलीय का हो ?? मी पाहिली नाहीय प्रत्यक्षात . पण या सभेचे फोटो मी दरवर्षी न चुकता वृत्तपत्रांत पाहतो. ते फोटो पाहून संताप व राग माझ्या मनात दाटतो. हे अगदी नित्यनेमाने दरवर्षी घडते. आमच्या पाल्यांना वळण लावणारी ही "गुरुमंडळी " एकमेकांना अर्वाच्च शिव्या देतात...एकमेकांच्या अंगावर धावून जातात...सभेचा माईक हिसकावून घेतात...बसायला दिलेल्या खुर्च्या खुशाल एकमेकांना झोडपण्यासाठी वापरतात...मोडतोड व मारहाण व शिवीगाळ या "अमुल्य गुणांशिवाय " शिक्षकांची सभा होतच नाही . जणू काही शासनाने असे फर्मानच काढलयं जणू. आमची मुले लहान असली तरीही घरातील वृत्तपत्रे हाताळतात. वर्षातील एक दिवस त्यांच्या " गुरुजनांचा " हा आदर्श अवतार त्यांना न चुकता पहायला मिळतो. आमचे मुल पण मग "आयला , आमच्यात वा यांच्यात फरक तो काय ??" अशी बाळबोध भावना करूनच शाळेत जाते. आपल्या शिक्षकांचा "आदर्श वारसा " अगदी तंतोतंत चालवते. मग....मग मात्र घडते उलटेच. आमच्या मुलांचे शिक्षक आम्हा पालकांना बजावतात " मुलांना जरा नीट वळण लावा ". माझ्या सारखा "आगळावेगळा " पालक डोक्याला हात लावतो आणि "जय हो " म्हणत मानं हलवत बाहेर पडतो.*
सांगण्याचा मथितार्थ इतकाच....की आमच्या मुलांच्या प्रिय शिक्षकवर्गहो , जरा तुम्ही आत्मपरीक्षण करा हो. अगोदर तुमची वार्षिक सभा शांततेने , खेळीमेळीत , न भांडता एक वर्ष करुन दाखवा. आणि मगच आमच्यासारख्या "आगळ्यावेगळ्या " पालकांना सल्ला द्या ......तूर्त एवढेच सांगणे की....एवढी किमान विच्छा पुरी करा.
*!! गुरुजी , एवढं कराच हो...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...(भाग १५ )*
*समस्त पुरोहीतवर्गात "संतहृदय " असणारे पुरोहीत पहायचेतं....*

तसा माझा नास्तिकतेचा प्रवास हा अवघ्या १०- १२ वर्षाचा आहे. तत्पूर्वी मी खरा आस्तिक मनुष्य होतो. नित्यनेमाने न चुकता देवळात जायचो. सोमवारी महादेव..मंगळवारी गणपती ..बुधवार कृष्णमंदीर..गुरुवारी दत्त....शुक्रवारी अंबाबाई..शनीवारी मारुतीराया..रविवारी जोतीबा असा हा अखंड प्रवास मी भक्तीभावाने केलाय. सध्या काही कारणाने मी मदिरात गेलो तर तिथले शिल्पसौंदर्य न्याहाळणे हा माझा उद्योग असतो. हे न्याहाळता न्याहाळता माझी नजर आजही मंदिरातील पुजारी अर्थात पुरोहीतवर्गावर पडते. अन् मग ...माझे डोके नवनवे विचार करत सुटते....त्यापैकीच एक खाली मांडतोय.
*पुरोहीत...म्हणजे मंदिरात देवदेवतांचे नित्यकर्म भक्तीभावाने करणारे लोक. देवाच्या गाभाऱ्यात या लोकांचा सततचा राबता असतो. कायमच ईश्वरचरणी वावर असल्याने या लोकांप्रती गाभाऱ्याबाहेर असणाऱ्या जनसमुदायात विशेषा आस्थेची , आदराची भावना असते. हि पुरौहीत मंडळी म्हणजे सज्जनांचा कळस असतो जणू या भाविकांच्या लेखी. पण हे अपवादात्मक सत्य असते. खरे वास्तव असे की...खरेच का हे पुरोहीत " सज्जन " या शब्दला जागतात का ?? याचा विचार व्हावा. कोणत्याही मंदिरात कधीही जावे व स्वतः हे भाविकांनी थोडी श्रध्दा बाजूला ठेवून तपासावे. आमचे पुरोहीत देवाच्या सानिध्यात असतानाही त्यांचे वर्तन चोख नसते हा अनुभव सर्वत्र दिसतो.(सन्माननीय अपवाद ). उघड्या अंगाची ही पुजारी मंडळी सतत देवापेक्षा अधिक लक्ष "वजनदार भाविकांवर " ठेवून असतात. त्यांना गाभाऱ्यात घेऊन व्हीआयपी दर्शन देण्यात यांचे हितसंबंध असतात. देवाच्या चरणी वाहिलेला हार , नारळ , फुले , हळदकुंकु , साखरपेढे हे सर्व अगदी साहजपणे पुन्हा पुन्हा "रिसायकल " करतात. त्याबद्दल त्यांना योग्य "आर्थिक आशिर्वाद " मिळत असतो. ही भक्तीभावाने देवाला काही अर्पण केलेल्या भाविकांची फसवाणूक नव्हे काय ?? सामान्य भाविक दर्शनासाठी देवाच्या मुर्तीसमोर आला की यांचे तोंड वेंगाडलेच. चला , आटपा , पुढे व्हा असे बोलून त्या भाविकाची " श्रध्दामय कोंडी" करण्यात हे पटाईत असताता. याऐवजी वजनदार भक्ताला मात्र व्यवस्थित सेवा पुरवतात. पान व गुटखा खाणारे पुजारीही आपण पाहत असतो. ( देवळाबाहेरचे वर्तन..विचारुच नका ) भाविकांना आरडाओरडा करून जीव मेटाकुटीला आणायचा व भाविक देवदर्शन घेतानाच त्याच्याकडे " दक्षिणा " मागायची हा भिकारधंदा हे राजरोस करतात. देवाच्या पादुकांवर भक्तीभावाने भाविक डोके टेकु इच्छितो तेव्हा हे पुजारी भाविकाचे डोके अक्षरशः त्या पादुकावर आपटतात. असे अनेक माणुसकीला काळीमा फासणारे व्यवहार हा पुरोहितवर्ग राजरोस करत असतो.*
संत..म्हणजे दिनदुबळ्याचा कैवार घेणारा. भक्तासाठी परमेश्वराबरोबर भांडणारा. माणुसकी जाणणारा व वागणाराही. संत हेच खरे ईश्वर सानिध्य असातात. (ईश्वर ..आहे की नाही हा भाग तूर्त बाजूला ) या संतांचे हृदय कायम भक्तीभावाने प्रेरीत असले तरीही त्यांना पिडल्या गेलेल्या वंचित समुदायाबद्दल अपार करुणा असते. हेच त्यांचे संतत्वाचे लक्षण . हि लक्षणे माणूसपण वृध्दिंगत करणारी आहेत. यातील शतांश जरी आमच्या पुरोहीतवर्गाच्या हृदयात उमटला तरी " देवदर्शन " सुलभ व आनंदाचे होईल. ही माझी कामना फळास यावी. माझे हे सांगणे आमचे पुरोहितवर्ग " कोमल मनाने " ऐकतील व शक्य झालं तर स्वतः मध्ये बदल घडवतील. किमान कधीकाळी मी जवळजवळ २७ वर्ष आस्तिक होतो...देवदर्शन घेत होतो...तुम्हाला हवे ते देत होतो..तेव्हा त्याच्या हवाल्याने.....मनं मोठं करुन ...समस्त पुरोहितांनी.....माझी विच्छा पुरी करावी.
*!! पुरोहितांनी..संतहृदय जाणावे...आचरणावे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग १६ )*
*पत्रकारिता "मूळ धर्माला जागताना " पहायचीय....*

मी तसा व्यावसायिक पत्रकार नाही . पण ग्रामीण पत्रकारिता हा कोर्स मी केला तो डाँ. नरेंद्र दाभोलकर या माझ्या जीवनवाटाड्यामुळे. त्यांनी मी हा कोर्स करावा अस सुचवल व त्यांच्या निधनानंतर मी हा कोर्स त्यांना आदरांजली म्हणून पूर्ण केला. सध्या मी अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राचा सहसंपादक आहे. एवढया अर्थाने मी पत्रकार आहे हे सुरुवातीला स्पष्ट करतो. या माफक हक्कानेच मनामध्ये सतत जे व्दंद्व चाललेले असते त्याचे रुपांतर माझ्या इच्छेमध्ये झालंय . ती मांडावी या हेतूने हा लेखनप्रपंच...
*पत्रकारिता.....हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. अनेक गोष्टीवर लोकांची मते बनत असताता ती वृत्तपत्रे वाचून. वृत्तपत्रातील खरे काय व खोटे काय हे जाणण्याचा सामान्य माणूस फारसा विचार करत नाही . एक तर त्याच्या मर्यादा व दुसरे जीवनव्यवाहारातील रोजची धावपळ. त्यामुळे थोडा वेळ काढून तो वृत्तपत्र चाळत असतो. त्यातील एखाद्या गोष्टीवर तो दुसऱ्याशी संवादा पण करत असतो. मत ...बनतात ती अशी धावपळीच्या संवादानी. मग त्यात त्रुटी , उणीवा व चुका होणारच. त्यामुळे पत्रकारिता करणाऱ्या सर्व घटकांची जबाबदारी फारच वाढलीय आजकाल. पण....पण खरेच आजची पत्रकारिता विवेकी , निर्भय , जबाबदार भारतीय नागरिक घडवण्याची आपली जबाबदारी अर्थात मूळ धर्म पाळतेय का ?? जरा विचार करा. पत्रकारिता हा व्यवसाय बनला आहे हे वास्तव आहे. म्हणून तर "वाढता खप " डोळ्यासमोर ठेवून बातम्या लावल्या जातात. त्या बातम्यात हवे तसे रंग भरले जातात. खरेखोटं शहानिशा करावीशी वाटत नाही . कारण विचारणारं व दटावणारं लोकमानस नाहीय हे सत्य यांना कळलंय. अच्युत कोल्हटकरांनी मज्जा म्हणून छापलेले राशीभविष्य सव्वाशे वर्षानंतरही सर्व वृत्तपत्रात राजरोस ठळकपणे छापले जाते तेव्हा "मूळ धर्म " हरवतो. मटक्याचे आकडे राजरोस छापले जातात तेव्हा " मूळ धर्म " हरवतो. जमलेल्या गर्दीचे मोठमोठे फोटो छापून त्यांची चिकीत्सा टाळली जाते तेव्हा "मूळ धर्म " हरवतो. भ्रष्टाचार करणाऱ्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसाला रंगीबेरंगी पुरवणी जाहिरात पुरस्कृत काढली जाते तेव्हा " मूळ धर्म " हरवतो. रंजकतेच्या नावाखाली किती तरी अज्ञान व अंधश्रध्दा वृत्तपत्रांत पेरल्या जातात तेव्हा "मूळ धर्म " हरावतो. पत्रकराची शोधपत्रकारिता थांबून टिवी पत्रकारिता चालू होते तेव्हा "मूळ धर्म " हरावतो. लोकशाहीची मुल्ये राजरोस तुडवाली जाताना लेखणी गप्प राहते तेव्हा "मूळ धर्म " हरवतो. एक ना अनेक गोष्टी सांगता येतील.*
भारतीय पत्रकारितेचा व महाराष्ट्रीयन पत्रकारितेचा गतइतिहास उज्जवल आहे.महात्मा गांधी , आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरे व आजच्या पी. साईनाथापर्यत ही परंपरा थोर आहे. ( यात अजून अनेक नावे आहेत ) आज मात्र हे चित्र धूसर आहे. लोकरंजन व सत्ताधारी वर्गाची मर्जी सांभाळणे हेच काम झालय. परिणामी जनमाणसात वैचारिक वादळे उठत नाहीत....मनामनात क्षणोक्षणी भूकंप घडत नाहीत .....सामान्य माणूस विचारप्रवृत्त होत नाही .....नीतिमुल्ये रुजत नाहीत ....भ्रष्टाचारी माणसाला लज्जा वाटत नाही .....गुन्हेगाराला वचक बसत नाही ....सामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत अन् राजकारण्यांच्या नाकावरील माशी उठत नाहीय .....कारण पत्रकार म्हणवणारे लोकांची लेखणी " आग " ओकत नाही . परिणामी लोकशाहीचा हा स्तंभ भुसभुशीत झाल्यामुळे मूळ लोकशाही अंधारात चाचपडतेय ... हे घातक आहे.
*माझ्या पत्रकार बांधवांनो....आपला मूळ धर्म जाणा. हा पोटापाण्याचा व्यवसाय करु नका. लेखणी जगण्यासाठी कमी व समाजमन जागवण्यासाठी वापरा. मनात व्दंद्व खेळवा व अनिष्ट रुढी परंपरा यांना लोळवा. मनात अंगार फुलवा आणि भ्रष्टाचार करणाऱ्याना जनसमुदायासमोर नंगा झुलवा. मनात प्रामाणिक विश्वास बाळगा व अंधश्रध्दा पसरवणार्या गोष्टी छापू नका. समाजात खोलवर उतरा व शोधपत्रकारिता करा. गुन्हेगारीला आळा बसेल एवढी लेखणी तीव्र करा. हाच आपला " मूळ धर्म " आहे. हा धर्म जागवा.....आपल्या या छोट्या धर्मबंधूची एवढी " विच्छा पुरी करा "...*
*!! घडवा लेखणीचा प्रहार...द्या लोकशाहीला आधार..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग १७ )*
*पंढरीच्या वारीतील समानता गावपातळीवर व्यवहारात पहायचीयं...*

पंढरीचा विठोबा....हा समस्त महाराष्ट्र व कर्नाटकी जनतेचा लोकप्रिय देव. महाराष्ट्रातील संत परंपरा या विठोबाशी आपले नाते सांगते. कोणतेही शस्त्र हाती न घेतलेला कदाचित हा एकमेव देव असावा. अनेक चमत्कार या विठोबाभोवती गुंफले गैलेत. आपल्या सामान्य भक्तांच्या मदतीला धावून जाणारा देव म्हणून विठोबाची ख्याती आहे. काही अभ्यासक या विठोबाला गौतम बुध्द समजतात. या वादात जायचे सध्या काही कारण नाही. सर्व भक्ताःप्रती समानता हा विठोबाचे मुख्य वैशिष्ट्ये मानले जाते.
*दरवर्षी नित्यनेमाने शेकडो वर्षाच्या परंपरेने विठोबा दर्शनासाठी पंढरपूर येथे वारी भरते. महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक गावांमधून लाखो लोक या वारीत सामिल होतात. या वारीत सर्व जण एकमेकांना "माऊली " या हाकेने संबोधतात. एकमेकांच्या पाया पडतात. कोणताही जातधर्म तेव्हा इथे नसतो. प्रत्येक जातीतील समुह इथे येत असतो तसेच काही मुस्लिम बांधवपण येत असतात. हा खरेतर जातीधर्माच्या अवडंबराविरहीत निघालेली वारी असते व इथे प्रत्येक जण फक्त माऊली असतो असे म्हटल जाते. प्रश्न फक्त इतकाच की....महिनाभराच्या या वारीत सर्व जातीधर्माचे लोक जातपात न बघता गुण्यागोविंदाने जर राहतात तर मग महिनाभराची वारी संपलेवर हेच लोक आपापल्या गावी गेल्यावर वारीचा हा " अनमोल संस्कार " का बरे विसरतात ?? विठुरायाचौया चरणी जर वारकरी एक असतील तर मग विठूराया सर्वत्र असतो अशी आपली समजूत व श्रध्दा असते म्हणून वारीचा कालखंड सोडला तर वारकरी वर्ग पुन्हा जातीच्या उकिरड्यात का बरे रमतो ?? विठोबा...सर्वाना समान न्याय देणारा व आपल्या सामान्य भक्तांना मदत करणारा आहे तर मग विठुरायाने वारकरी मनात कायमचा चमत्कार घडवून वारकरी मनातील जातीप्रथा का मोडू नये ??...जरा विचार व्हावा.*
विठोबा....हा खरेतर महासमन्वयक आहे. जातीप्रथेचा अंमल किमान त्याच्या वारीत घडत नाही हे चांगले आहे. पण खुद्द पंढरपूर या क्षेत्री जातीप्रथा पाळत नाहीत का ?? याचे उत्तर सांगावे लागू नृये. तरीही ही तर्कशुद्ध चिकीत्सा टाळून मला खरोखरीच प्रामाणिकपणे असे वाटते की वारकरी म्हणवणारे वर्गाने " विठोबाची आणं " घेऊन जातीनिर्मूलनाचा वसा आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात पाळावा. विठ्ठल ..महासमन्वयक आहे हे वारकरी वर्गाने आपल्या कृतीतून दाखवायाला हवे. प्रत्येक वारकरी बंधूना संताचा वारसा मिळालेला आहे. तो दाखला घेऊन या वर्षीच्या वारीच्या प्रारंभी *जातीनिर्मूलनाची शपथ* घेऊन सुरुवात व्हावी हि माझ्या सारख्या सामान्य माणसाची अपेक्षा आहे. माझ्या वारकरी बंधूनो....".विच्छा माझी पुरी करा."
*!! वारकरी बंधूनो...संतमार्ग आचरणात आणा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग १८ )*
*शिक्षण क्षेत्रावर ६% खर्च शासनाने केलेला पहायचयं...*

शिक्षण ....अज्ञानाला ज्ञानवंत करणारे माध्यम . मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट . अनेक सुभाषितांपैकी सर्वात जास्त सुभाषिते बहुधा शिक्षण या क्षेत्रावरच असावीत. आपल्या सार्या महामानवांनी शिक्षण हाच बहुजन समाजाच्या प्रगतीचा मार्ग मानला व व्यवहार केला. आजही गरीब बहुजन वर्ग शिक्षणाचे दार सतत ठोठावू पाहतो. कारण त्याला आपल्या प्रगतीची बीजे याच शिक्षण क्षेत्रात दिसतात.
*शिक्षण ....या एवढ्या महत्त्वाच्या क्षेत्रावर खरेतर आपल्या शासकीय अर्थसंकल्पात विशेष तरतूद असायला हवी. कोठारी आयोगाने १९६७ साली शिक्षण क्षेत्रावर ६% खर्च करण्याची मागणी केली होती. त्याला येत्या वर्षात पन्नाशी होईल. पण....आजवरच्या एकाही शासनाने या महत्त्वाच्या क्षेत्रावर हा खर्च केलेला नाहीय . आपला भारतीय समाज अडाणी व अज्ञानी ठेवण्यात आजवरच्या सर्व शासकांची भुमिका एकच राहिलीय. आता शासनकर्त्याकडून सामान्य माणसाला कसलीच अपेक्षा राहिली नाहीय. आजच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेची दशा पाहिली की महामानवांचे प्रयत्न ही नालायक शासनजमात कसे धुळीस मिळवत आहे हे कळते. शासकीय शाळा बंद करून खाजगी शाळांना अथवा शाळेची इमारत बिल्डरांच्या घशात घालणारी कृत्य संताप आणणारी आहेत. जिथे शाळा आहे तिथे मुलांना खेळायला चांगले मैदान नसते. विज्ञान कृतीतून शिकायला चांगली प्रयोगशाळा नसते. वाचनसंस्कार घडवणारे ग्रथालय अनिवार्य नसते.पुरेसा शिक्षक स्टाफ नसातो. शाळेत मुलांना बसायला चांगले बेंच नसतात. फळा नसातो. फळा असला तर खडू नसातो. शाळेची इमारत गळकी व धोकादायक असते. मुलामुलीना स्वच्छतागृहे अनिवार्य नसतात. शाळेतील पोषणमुल्य आहाराबद्दल बोलायलाच नको. विविध दुखापतीने ग्रस्त असे हे शिक्षण या क्षेत्राचे आजचे वास्तव आहे. हा आजार बरा करायला राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आणि ही इच्छाशक्ती निर्माण व्हायला लोकमाणसाचा एकत्रित दबाव गरजेचा आहे.*
शिक्षण ...आपल्या दारात यायला हवे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो जे पिणार ते गुरगूरणारच असे म्हटल जाते . बहुजनांचे हे " गुरगुरणे " थांबवण्यासाठीच तर या क्षेत्रातीची ही अवस्था इथल्या राज्यकर्ते वर्गानी केली असावी असे मला प्रामाणिकपणे वाटते . राज्यकर्ते आपले हितसंबंध जपतायत मग...आपण बहुजनानी आपले हित पहायला नको का ?? प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आपली ही मागणी सतत मांडायला हवी. शिकेल तो टिकेल हे खरं आहे. मग टिकण्यासाठु शिक्षण क्षेत्र मजबूत करायला हवे. ही प्रत्येक बहुजनाची इच्छा असायला हवी. मी माझे मत स्पष्ट नोंदवतोय ....मला *गुरगुरायचं* आहे....त्यासाठीच *विच्छा माझी पुरी करा*
*!! शिक्षण आमच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग १९ )*
*एक सर्वमान्य शिवचरित्र पहायचंय....*

*शिवाजी महाराज*....हे नाव उच्चारताच समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावते. छाती तट्ट फुगते. जे नाव जगायला प्रेरणा देते असे हे नाव आहे. महाराष्ट्रात तर शिवाजी महाराज हा शब्द सर्वात आदरणीय आहे. कारण *" महाराष्ट्र हे शिवराष्ट्र आहे."* लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यत व समस्त स्त्री वर्गात अत्यंत आदराने व सन्मानाने शिवाजी महाराज हे नाव घेतले जाते.
*शिवाजी महाराज .....हे भारतीय राष्ट्रपुरुष आहेत. स्वातंत्र्याचा महासूर्य, युगपुरुष, जाणता राजा , रयतेचा राजा अशा अनेक वेगवेगळ्या विशेषणांनी हे नाव समृद्ध आहे. महाराष्ट्र एकत्र जोडण्याचा हा एक मुख्य दुवा आहे. इतका जनमाणसावर प्रभाव असल्याने इथल्या जनसमुहानी नेहमीच शिवाजी महाराज या नावावर आपापल्या पध्दतीने दावे सांगितले. परिणामी शिवाजी महाराजांचे अधिकृत असे एकही सर्वमान्य शिवचरित्र आजपर्यत आपण साकारू शकलो नाहीय. याची वेदना व खंत आहे. याचा दुरुपयोग असा होतो की...इतिहासात रमण्याची मानवी प्रवृत्ती असल्याने व शिवचरित्र सर्वाना जवळचे आणि हितसंबंध जपणारे वाटल्याने प्रत्येक समुह व त्या समुहाचे इतिहासकार आपापल्या दृष्टीने शिवचरित्र सांगतात. सर्वसामान्य माणसाला नेमके खरे काय व खोटं काय हेच समजत नाही. मग जातीधर्मत फूट पाडण्यासाठी व दंगल घडवण्यासाठी शिवचरित्र वापरले जाते. हा खरेतर या युगपुरुषावर अन्याय आहे. वर्षातून तीनवेळा शिवजयंती साजरी होते. हे सुध्दा एक महाराष्ट्रीयन म्हणून व एक भारतीय म्हणून गौरवास्पद नव्हे. एक शिवरायांचा मावळा या अर्थाने म्हणून हा विषय छेडलाय.*
*शिवचरित्र ....हे एक महत्त्वाची साक्ष ठरू शकते. शिवरायांचा जन्म नेमका केव्हा झाला..त्यावेळची परिस्थिती नेमकी कशी होती ...शिक्षण कसे झाले...जिजाऊंचा प्रभाव व शहाजीराजेंचे पालकत्व...पिंडीवर बोट कापून खरोखरीच शपथ घेतली का...रांझ्याचा पाटील नेमका कोण होता ...महाराजांची नेमकी किती लग्ने झाली व कोणत्या प्रकारे....महाराजांचे खरे गुरु कोण ....अफजलखान फाडला तेव्हा अफजलखान वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी शिवरायांवर का चालून आला..महाराज अंधश्रध्दा निर्मूलक कसे होते ...अमावास्या हा अशुभ असणाऱ्या रात्रीचा महाराजांनी स्वराज्य स्थापनेत कसा वापर केला...पुरोहिताला मुलाची शांती करण्यास नकार का दिला...जिजाऊंना सती जाण्यापासून कसे रोकले...संभाजीराजेंना राजकीय धडे कसे दिले...आग्राहून सुटका करताना मदातीला कोण होते...विविध जातीधर्मीय मावळ्यांचे स्वराज्य उभारणीतील कार्य ...राज्याभिषेक विरोध कुणी व का केला...महाराजांचे रयतेच्या हिताचे निर्णय कोणते....त्यांची दुरदृष्टी व थोरावी कशात होती...मृत्यू नेमका कसा झाला....अशा एक ना अनेक घटनांबाबत इतिहास संशोधकानी एकत्रित बसून चर्चा करावी. अस्सल पुरावे मांडावेत. एक सर्वमान्य होईल असे शिवचरित्र साकार व्हावे.*
*हितसंबंध जपण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर बराच झाला. आता तो थांबायला हवा. रयतेचा राजा रयतेला नेमका कळायला हवा. महाभारत या ग्रंथाची संशोधित चिकीत्सक आवृत्ती अभ्यासक तयार करतात तर मग शिवचरित्र तयार होण्यात अडचण कसली ?? महाराष्ट्र व देशातील सर्व प्रामाणिक अभ्यासकांना यथायोग्य कालावधी देऊन ...पुरेसे मानधन देऊन ...एका मोठ्या संशोधन मंडळात एकत्र बसवून...त्यांना लागणारी साधनसामग्री पुरवून हे काम करायला हवे. शिवाजी महाराज ही अस्मिता आहे महाराष्ट्र आणि देशाची. ती योग्य प्रकारे जतन करायला हवी असे माझ्यासारख्या सामान्य शिवमावाळ्याला प्रामाणिकपणे वाटते. इतिहास संशोधक व महाराष्ट्र शासनाने आम्हांसारख्या अगणित मावळ्यांची एवढी ...." विच्छा पुरी करावी .."*
*!! रयतेच्या राजाला कोटी कोटी प्रणाम !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग २० )*
*अंबानींना " रांगेत " पहायचयं...*

अंबानी मुकेश....भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती . अवघ्या पन्नास वर्षात देशाच्या केंद्रस्थानी आलेले अंबानी कुटुंब . निरनिराळ्या उद्योगतून बक्कळ पैसा कमवलेले कुटुंब . देशातील सर्वात मोठी सेलिब्रीटी व्यक्ती म्हटल तरी हरकत नाहीय . वडील धीरुभाई अंबानींनी सुरु केलेले उद्योग मुकेश व अनिल या बंधूनी अक्षरशः गगनावर पोचवले. ( गुपित ...विचारु नका ) आज या देशात नं. १ श्रीमंत व्यक्ती कोण असा प्रश्न लहान मुलाला जरी विचारला तरी अंबानी हे नाव चटकन ओठांवर येते.
*आपण श्रीमंतीचा दुःस्वास करायच कारण नाहीय. मतभेद आहेत ते श्रीमंत होण्याच्या पध्दतीवर. पूर्वी राजे श्रीमंत असत ते गोरगरीब रयतेवर सारा अथवा कर लावून आणि युध्द करून. आजचा भांडवलशहा श्रीमंत आहे तो गोरगरिब जनतेचे शोषण करून व त्यासाठी लोकशाही राज्यकर्तेच्या माध्यमातून वेठीस धरून . भांडवलशाही वाढते ती अशीच शोषण करतकरत. भारतीय समाजात गोरगरीब माणसाला कधीही त्याच्या न्यायाचा वाटा मिळत नाही हे वास्तव आहे. उलट त्याला जमेल तितके व जमेल त्या पद्धतीने शोषून समाजात भांडवलशाही माजत असते. आपण अवतीभवती नेहमीच पाहतो की.......महिन्यात पाच लिटर केरोसीन मिळविण्यासाठी गोलागरीब वर्ग रांगाच्या रांगा लावतो.....घरगुती गँस आणण्यासाठी गेला तर तिथेही रांग असते.... मुलांना शाळेत प्रवेश घ्यायला बालवाडीपासून उच्चशिक्षणापर्यत आयुष्यभर रांगेत उभारावे लागते .....देवदर्शनासाठी भलीथोरली रांग कायमची असते....बँकेत रांग असते....बागेत झोपाळा खेळायला सुध्दा रांगेतन जावे लागते ....माँलमध्ये रांग असते...वाहनखरेदीसाठी रांग असते....देशासाठी प्राण देण्याची इच्छा व्यक्त करून सामान्य माणूस सैनिकभरतीच्या रांगेतही उभा असतो.....एटीएम वरील रांगा तर आता पहायलाच नको इतक्या थोरल्या झाल्या .....सांगण्याचा उद्देश हा की सामान्य माणसाला आयुष्यभर कुठल्या न् कुठल्या रांगेत उभारावेच लागते. त्या त्याच्या माणूस म्हणून गरजा असतात. मग प्रश्न असा....आपण माणूस आहोत तसेच अंबानी सुध्दा माणूस आहेत. आपल्या गरजा आहेत तशाच त्याच्याही गरजा आहेत. मग आपल्या सारखे अंबानी कधीही कुठेच कोणत्याही रांगेत उभा राहत नाहीत असे का बरं ???....त्यांच्याकडे रांगेत उभे राहण्यासाठी अनेक नोकर आहेत हे जसे खरे आहे तसेच वरील सर्व रांगा ह्या खुद्द अंबानीच्या दारात लागत असण्याची शक्यता जास्त आहे. कारण अंबानी हे देशातील आर्थिक पाँवर हाऊस आहे. समान नागरी कायदा जसे आपणांस आवश्यक वाटतो तसा तो कायदा भांडवलदार व सामान्य नागरिक यांना एकाच रांगेत उभा करण्यासाठी आवश्यक ठरावा असे मला प्रामाणिकपणे वाटते .*
अंबानी...या देशाचे नागरिक आहेत. आपण लोकशाही स्विकारलीय. " एक माणूस एक मत " ही आपली पध्दती आहे. वरील सर्व रांगा सोडून देऊ थोडावेळ. पण लोकशाहीत मतदान करणे हे जबाबदार नागरिकाचे कर्तव्य मानतो आपण. मग मुकेश अंबानी यांना कधी आपण मतदानाच्या रांगेत तरी पाहिलय का ?? एक वेळ ते मतदान केल्यावर बोटं दाखवताना दिसतील. पण तिथेही ते रांगेत उभे रहात नसावेत असा माझा कयास आहे. ही व्हीआयपी वागणूक अंबानी व सूर्यवंशी या नावात भयंकर अशी दरी निर्माण करते. अंबानी मला माझे वाटत नाहीत व अंबानीना माझ्या सारखे अगणित सामान्य माणसांशी काही देणेघेणे नसते. मग शाळेत शिकलेल्या "सारे भारतीय माझे बांधव आहेत " या प्रतिज्ञेचे काय ??...किमान दिखावा म्हणून तरी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माझ्या सारख्या सामान्य माणसाबरोबर किमान एका रांगेत उभे रहावेत ही माझी इच्छा आहे. दुनिया मुठ्ठीत पकडणारे अंबानीजी.....या सामान्य भारतीय नागरिकाची एवढी सामान्य " विच्छा , पुरी करा ".
*!! रांगेचा फायदा सर्वाना मिळाला पाहिजे ...होय ना ? !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग २१ )*
*दाऊदला भारतात " शिक्षा " झालेली पहायचीयं....*

दाऊद....हे नाव आपल्या सर्वाना ठाऊक आहे. एक कुख्यात स्मगलर म्हणून प्रसिद्ध आहे तो. भारतीय जनता एकमुखानै ज्या व्यक्तीला लोकशाही पध्दतीने " दंड अर्थात शिक्षा " देऊ इच्छिते तो आहे हा गुन्हेगार माणूस. अनेक वेळा याला पकडण्याच्या अथवा तो स्वतः शरण येण्याची बातमी वाचत वाचत माझ्या आयुष्याची जवळजवळ २५ वर्षे निघून गेलीत. दाऊद ना पकडला गेला ना तो शरण आला. यांच्या कारवाया मात्र चालूच आहेत.
*दाऊद इब्राहिम कासकर.....हे नाव साधारण ऐंशीच्या दशकात फारच वेगाने पुढे आले. एका पोलीस शिपायाचा हा मुलगा सुरुवातीला छोटे छोटे गुन्हे करत समस्त गुन्हेगारी जगताचा " डाँन " बनला. एका गुन्ह्यात हा जामिनावर सुटला व त्यानंतर हा गायब झाला तो आजतागायत. सर्वसामान्य माणसानी याला पाहिलय ते वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर अथवा एखाद्या शारजाहमधील क्रिकेट मँच पाहताना कँमेरा त्याच्यावर रोखला गेल्यावर. हाच का तो दाऊद अशी सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया असते. अधूनमधून याची वार्ता येते ती आपले "सेलिब्रीटी सिनेस्टार्स " दाऊदच्या पार्टीत नाचताना वगैरे बातम्या असतात. माझ्या सारखा सामान्य माणूस अचंबित होतात कारण ज्या सिनेस्टार्सना फिल्मी पडद्यावर "अन्यायाशी मुकाबला करणारा व गुन्हेगार लोकांना धुलाई करणारा हिरो म्हणून आम्ही पाहतो ते आमचे " कागदी हिरो" प्रत्यक्षात मात्र "ओरीजनल डाँन " दरबारात मुजरा घालत असतात. पण याहूनही महत्त्वाचे म्हणजे लोकांना हा दाऊद आठवतो तो निवडणूक काळात. आमचे " प्रजाहितदक्ष राजकारणी " निवडणूक काळात दाऊदला फरफटत आणू व त्याला शिक्षा करू अशा वल्गना देत असतात. यात सत्ताधारी व विरोधक दोन्ही असतात. पण आमच्या राजकारणी लोकांत ही वल्गना खरी करून दाखवणारा " माईका लाल " आजवर पैदा झालाच नाहीय हि एक सामान्य भारतीय म्हणून खंत आहे व चीड ही आहे. मध्यंतरी दहशतवादी ओसामा बिन लानेद पाकिस्तानात मारला गेल्यावर आता भारतीय सरकार अशाच पध्दतीने दाऊदला यमसदनी पाठवणार अशा बातम्या ऐकल्या. पण अजून तर काही कुणी हे देशहिताचे कृत्य केलेल नाहीय. दाऊद नेमका आहे कुठे ...इथून सारी सुरुवात असते. दुबई की पाकिस्तान एवढया वरच चर्चा चालू असाते. ज्या नराधमाच्या नावावर मुंबई बाँम्बस्फोट हे अमानुष कृत्य आहे त्या कृत्यला आता २५ वर्षे पूर्ण होतील. यामध्ये मरण पावलेले तमाम भारतीय नागरिक यांना आदरांजली द्यायची असेल तर आमच्या राजकीय नेत्यांनी राजकीय व मानसिक इच्छाशक्ती दाखवून या नरामधाला पकडून आणून लोकशाही पद्धतीने शिक्षा द्यायला हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
लोकशाही ...ही व्यवस्था विश्वासावर चालत असते. एखादा गुन्हेगार राजरोस गुन्हे करतो व आरामात देशाबाहेर आपले साम्राज्य वाढवतो आणि आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहत बसायचे हे दृश्य अत्यंत लज्जास्पद आहे. अशामुळे लोकांना लोकशाहीची किंमत वाटत नाहीय व गुन्हेगार मोकाटपणे गुन्हा करत सुटतात. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते. " शंभर अपराधी सुटोत पण एका गुन्हेगार नसणाऱ्या माणसाला शिक्षा होऊ नये " असे आपले कायद्याचे मत सांगते. व्यवहार मात्र उलटा असतो. शंभर नव्हे लाखो गुन्हेगार तयार करणारे हे "दाऊदयंत्र" एकदा मोडायलाच हवे. गुन्हेगार व्यक्तीना शिक्षा ही लोकशाहीवर विश्वास बळकट करणारी प्रक्रिया असते. हि प्रक्रिया पार पाडून लोकशाही सुस्थिर व्हावी...लोक शांततेने व निर्भयपणे जगावेत....गुन्ह्याला ल गुन्हेगार व्यक्तीला समाजात मानसन्मान लाभू नये.....न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ व्हावा...या न् अशा अनेक कारणांसाठी .....राजकीय व कायद्याच्या रक्षकांनी माझ्या सारख्या सामान्य भारतीयाची...*एवढी विच्छा पुरी करावी..*
*!! वल्गना नकोत ...प्रत्यक्ष कृती पहायचीयं...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २२ )*
*राहुलजी गांधीना " ठामपणे लढताना " पहायचय...*

राहुलजी गांधी ....हे नाव आपणास ठाऊक आहे. "उद्याचे प्रधानमंत्री " म्हणून त्यांना सतत प्रमोट केले जाते. अवघ्या चाळीशीच्या आसपासच्या या तरुणाकडून देशहिताच्या अनेक गोष्टींची अपेक्षा असणे साहजिकय. गांधी या घराण्याचा व काँग्रेस या राजकीय पक्षाचा वारसदार म्हणून त्यांना आपण सारे ओळखतो. कधीकधी आक्रमक तर कधीकधी शांत असा नेमका स्वभाव न कळणारा हा तरुण राजकीय पुढारी. माध्यमांमध्ये राहुलजी गांधी या व्यक्तीची इच्छा असो वा नसो चर्चा मात्र हमखास सुरु असते. कधी चांगल्या अंगाने तर कधी वाईट्ट मार्गाने. त्यामुळे या माणसाकडून एखादी विच्छा पुरी करून बघावी असे मला वाटले आणि या लेखमालेत राहुलजी गांधीना जाणीवपूर्वक ओवले.
*राहुलजी गांधी .....प्रख्यात नेहरु घराण्याचा व काँग्रेस पार्टीचा उज्जवल वारसा या व्यक्तीकडे आपसूक चालत आलाय. पणजोबा असणारे जवाहरलाल नेहरु...आजी इंदिरा गांधी ...पिता राजीव गांधी ....अशा देशाच्या तीन महत्त्वाचे प्रधानमंत्री राहुलजी यांच्याशी रक्ताचा व विचारांचा वारसा सांगतात. हे तीनही प्रधानमंत्री मला वंद्य आहेत कारण या प्रत्येकाच्या कारकिर्दीत भारत देशाने प्रगतीचे एक पाऊला पुढे टाकले. नेहरु कालखंडात औद्योगिक व कृषी...इंदिरा कालखंडात लष्करी व आर्थिक ...राजीव कारकिर्दीत विज्ञान व तंत्रज्ञान याबाबतीत भारत एक पाऊल पुढे गेला हे मान्य करावे लागेल. हे तीनही राजकीय नेते कमालीचे निश्चयी होते. एखाद्या गोष्टीवर यांचा ठामपणा पाहिला कि अचंबित व्हायला होते. हा करारीपणच त्यांना देशात मानाचे स्थान देऊन गेलाय. राहुलाजी..यांना हा वारसा मी दाखवून देण्याची काही गरज नाहीय. मग....प्रश्न इतकाच की हा ठामपणा अथवा करारीपणा राहुलजी का दाखवत नाहीत ?? दोन उदाहरणे ताजी आहेत...."राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीचा खून केला " अशा आशयाचे वक्तव्य मध्यंतरी त्यांनी केले होते. पण न्यायालयात मात्र त्यांनी या विधाना बाबतीत हात वर केले. नंतर पुन्हा एकदा वरच्या न्यायालयात जाऊन बाहेर मात्र माध्यमांना मी माझ्या विधानावर ठाम आहे अस सांगत राहिले.....दुसरे उदाहरण नोटाबंदीचे...."संसदेत मला बोलू देत नाहीत कारण मी बोललो तर मोदींचा घोटाळा उघड होईल व भूकंप होईल " अशा आशयाचे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली. नंतर संसद अधिवेशन काळात "शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या " असे सांगण्यासाठी मोदींची गाठ घेतली. माझ्या सारखा सर्वसामान्य माणूस मग चक्रावून जातो...विधान खरे की कृती ??? राहुलजीबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. पण हे धरसोडिचे धोरण मला काही पटत नाही . लोकशाहीत लोकांना विश्वास द्यावा लागतो. त्यासाठी किंमत मोजावी लागते. वरील दोन्ही उदाहरणात राहुलजी ठाम दिसले असते तर भारतीय जनतेने त्यांना अधिक जवळ केले असते. पण...पण सध्याच्या काँग्रेस वेटोळ्यात हा तरुण अधिक आतआत जायला लागलाय. यात त्यांचे स्वतः चे नुकसान आहेच पर्यायाने मूळ काँग्रेस परंपरेचे नुकसान आहे. विचार व्हावा.*
आजचा भारतीय समाज हा अधिक आधुनिक बनलाय. तो सतत पाहत असतो. परिस्थिती व कृती यांचा मेळ तो डोक्यात घालत असतो. निर्णय घेताना तो पुढचामागचा विचार करत असतो. याचे भान प्रत्येक राजकीय नेतृत्वला असावे लागते. राहुलजी "उद्याचे प्रधानमंत्री " होऊ इच्छित असतील तर सर्वप्रथम आपल्या घराण्याचा व मूळ काँग्रेसचा इतिहास पुन्हा पुन्हा वाचावा. ठामपणा व अखंड निर्धार या दोन मुख्य गोष्टीवर नेतृत्व कसे आहे हे जनता आजमावते. धरसोड वृत्ती लोकांना आवडत नाहीत. मी स्वतः काँग्रेस समर्थक नाहीय मी डाव्या विचारांचा पुरस्कर्ता आहे.तरीही राहुलजी बद्दल आदरभावनेतून त्यांच्याशी हा अशा पद्धतीने संवाद करावा वाटले कारण काही झालं तरी राहुलजी राजकीय सत्तेचे एक मुख्य केंद्र आहे. त्यांनी आपल्या धोरणात ठामपणा..निश्चयीपणा..निर्धार व तळमळ.....किंमत मोजण्याची तयारी दाखवली तर न् तरच ते "उद्याचे प्रधानमंत्री " बनू शकतील. माझ्या साठी नव्हे तर तुमच्या तमाम चाहत्यांसाठी तरी....*माझी विच्छा पुरी करा*
*!! राहुलजी.....कसं दाखवायालाच हवा...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २३ )*
*बाबासाहेबांच्या डोळ्यातील " रिपब्लीकन पक्ष " पहायचायं...*

डाँ. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वे जयंती वर्ष आपण साजरे करतोय. या निमित्ताने अनेक संघटना , पक्ष आपापल्या परीने बाबासाहेबांच्या कार्याचा कृतीशील होऊन अवलंब करत आहेत ही सुखद गोष्ट आहे. बाबासाहेब ....हे केवळ दलितांचे नेते म्हणून त्यांना व्यापक जनसमुहापासून तोडण्याचा कुटील डाव गेल्या काही वर्षात यशस्वी झाला. पण आता बहुजानांची पोरं इतिहास अभ्यासू लागली व वर्तमानात बाबासाहेबांच्या विचारांची प्रस्तुताता त्याच्या ध्यानात आली अन् मग बाबासाहेब हे "बहुजन हिताय , बहुजन सुखाय " लोकनेते आहेत हे वास्तव समोर आले. वेडे मनं असा विचार करते की..हे पहायला प्रत्यक्षात बाबासाहेब हवे होते. पण ..हे होणे नाहीय हे वास्तव आहे.
*बाबासाहेब ....हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. पण त्यांच्या एकुण गुणातील त्यांचा राजकीय कौशल्याचा गुण आपल्या कडून दुर्लक्षित राहिलाय. बाबासाहेब हे उत्तम दर्जाचे राजकीय नेते राहिले आहेत. समाजकारण व राजकारण हे दोन्ही एकाचवेळी करावे लागते हे सत्य जाणणार्या फार कमी लोकांमध्ये बाबासाहेब याबाबतीत अग्रणी हौते. १९३५ च्या पुढेमागे मजूर पक्ष काढून त्यांनी हा व्यवहार दाखवला होता. आयुष्याच्या अखेरीस सर्व बहुजनासाठी योग्य असा " रिपब्लीकन पक्ष " स्थापण्याची योजना त्यांच्या डोळ्यासमोर होती. आजच्या रिपब्लिकन पक्षाचे खरेतर बरीच शकले झालीयतं. हि सारी स्वतंत्र शकले स्वतःला रिपब्लीकन गट म्हणवतात. प्रकाश आंबेडकर ..रामदास आठवले..जोगेःद्र कवाडे...रा. सू. गवई....आणि इतर छोटेमोठे कुणी अशी ही शकले आहेत. यातील एक वास्तव मान्य व्हायला हरकत नसवी की....डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर नंबर २ व्यक्ती दलीत - बौध्द समाजात कोण ? या प्रश्नाचा उत्तारावर समेटाचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षेपोटी दलिताःबरोबरच शोषीत बहुजन समाजाचे अतोनात वाटोळे यामुळे झालंय हे खरं . यांच्यातील फाटाफुटीचा अचूक फायदा सत्ताधारी उठवतात व बहुजन समाजाच्या प्रगतीचे घोडे अडकून बसते. नव्हे ...आता तर ते चक्क रुतून बसायला लागलयं. सर्वानी अंतर्मुखपणे विचार करायला हवा असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
छोट्या गटातटाची सत्ता भोगून अल्पसंतुष्ट राहण्यापेक्षा बहुजन समाज एकत्रित येण्याची धोरणे आखायला हवीत. मागे इतिहासात काय घडले याचा विचार अंतर्गत पातळीवर जरा बाजूला ठेवून वर्तमानात काय वाढून ठेवलयं हे पहायला हवे. यासाठी आपले वैयक्तिक अभिनिवेश बाजूला ठेवून सामुदायिक हितासाठी एकत्र आलेत तर...न् तरच बहुजन समाजाला भवितव्य आहे. अन्यथा ....भविष्य अवघड असेल यात शंका नाहीय. *यासाठीच पहिली पूर्वअट म्हणून रिपब्लीकन गटाचे एकत्रीकरण व्हावे लागेल. त्यानंतर इतर जातीबांधवांना योग्य सन्मानाने रिपब्लीकन गटात स्थान द्यावे लागेल. असे शक्य झाले तर ....एक मोठी सामाजिक व राजकीय शक्ती अस्तित्वात येऊ शकते. या ताकदीवर "सत्ताधारी जमात " स्वप्न पूर्ण होऊ शकेल. महामानवाच्या सव्वाशेव्या जयंती वर्षानिमित्त एवढा संकल्प करून कृतीत आणूया. महामानवाचे स्वप्न पुरे करण्यासाठी .....सर्व बहुजन समाजाने...या सामान्य भारतीय नागरिकाची...."विच्छा पुरी करावी "*
*!!एकीतं....बळ असते..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २५ )*
*सक्तीचा व्यसनविरोधी कायदा...पहायचायं*

आपण गेली ६५ हून अधिक वर्षे लोकशाहीत वावरतो. या लोकशाही जपणुक करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुल्य आपण मनःपूर्वक जपतो. कोणत्याही गोष्टींची सक्ती नसावी असाच आपला आग्रह असतो. तरीही आज जाणीवपूर्वक "सक्तीचा व्यसनविरोधी कायदा" व्हावा अशी विच्छा मनात आलीय. याबद्दल मतभेद होऊ शकतात. समाज व्यसनमुक्त व्हायचा असेल तर कायदा नव्हे तर प्रबोधन गरजेचे अथवा कायदा करून व्यसने सुटतील का असे प्रश्न समोर येऊ शकतात याची मला कल्पना आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे...ज्याचे त्याने ठरवायचे जगायच कस...लोकांना काही कळत नाहीय का....तुम्हीच तेवढे कोण शहाणे लागून गेलात...पैसा आमचा आम्ही कसा पण वापरु...व्यसन संपले तर समाज सर्वागीण सुधारेल हे कशावरून ....असे एक ना अनेक प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत व काही मतभेदाने मान्यही आहेत. तरीही .....
*व्यसन...हा एक रोग आहे. रोगाचे लक्षण नव्हे. व्यसन हे कधीच व्यक्तीपुरती मर्यादित परिणाम करत नाहीय. दारु पुरुषाच्या अंगात असली तरी तिचा मुख्य परिणाम थेटपणे घरच्या स्त्रीवर व काही प्रमाणात लहान मुलांवरही होतो. सिगरेट जरी एक मनुष्य ओढत असला तरी धूर मात्र शेजारी पसरत असतो. जुगार एकटा खेळत असला तरी पैसा इतराचाही असतो. गुटखा एकटे खात असला तरी वास बोलताना समोरच्याला जाणवतो. मटका एकटा खेळला तरी त्याचे टेन्शन कडेच्याना असत हे पाहिलय मी. पुन्हा दारु पिऊन गोंधळ ...गुटखा खाऊन तणतणणं...मटका खेळून सतत तणावात..जुगार खेळून कर्जबाजारी हे प्रकार नित्याचेच. हे सर्व रोखण केवळ संवाद अथवा प्रबोधनाने शक्य नसते. त्याला कायदा जोडावाच लागेल व कायद्याची रितसर अंमलबजावणी करावीच लागेल. कायमची दारुबंदी...चोरून खाल्ला
जाणारा गुटखा पकडणे...मावा करणारे हात धरणे...जुगारअड्डे उध्वस्त करणे....मटका छापा घालणे व महत्त्वाचे म्हणजे वृत्तपत्रांनी मटका छापू नये अशी "प्रेमळ" विनंतीआदेश देणे असे निरनिराळ्या मार्गानी व्यसन रोखायला हवे. कुणी म्हणेल यातून मिळणाऱ्या महसूलाचे काय ?? त्याला ठणकावून सांगा ...मानवी जीवनाची सुरक्षितता हा सर्वात मोठा महसूल असतो. या व्यसनमुक्तीसाठी राजकीय व शासकीय पातळीवर जबरदस्त इच्छा शक्ती असायला हवी. तरच हे शक्य आहे. हि सारे व्यसने पुरवणारी लोकांच्या चरितार्थाचे काय ?? याचा विचार करायची जरुरी नाहीय. उद्या प्रत्येक दरोडेखोर अथवा चोर आपल्या चरितार्थाविषयी मागणी करू लागेल. मुठभरांच्या पोटासाठी मोठया जनसमुहाची क्रयशक्ती गमावणे हे इष्ट नसते.*
आपल्याकडे यापूर्वी "मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा " शाहूराजाने केला होता. एकुणच समाजाच्या भल्यासाठी कधीकधी सक्ती करावी लागली तर तिथे उगाचच अभिव्यक्तीचे प्रश्न उपस्थित होऊ नयेत. भारतीय समाजमन असेच हळूहळू सुधारेल. त्याला अशी सवय लावावे लागेल. अन् हि सक्ती त्या व्यसनी माणसासाठी..त्याच्या कुटुंबासाठी ...एकुणच समाजाच्या भल्यासाठी असेल तर माझं प्रामाणिक मत अस की ही सक्ती व्हावीच. व्यसनमुक्त समाज हा विवेकाच्या पहिल्या टप्प्यावर येतो. तिथून तो जीवन वृध्दिंगत करणारी जीवनमुल्ये स्वतःत गुंतवू शकतो. *"माणूस घडवण्याचा" हा एक चांगला प्रयत्न होऊ शकेल हा विश्वास आहे.*म्हणून तर...ही विच्छा पुरी करा.
*!! बलसागर भारत होवो , विश्वांत शोभुनि राहो...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग २५ )*
*भारतीय स्त्रीला रस्त्यावर शिट्टी मारताना पहायचीय....*

स्त्री समाजमनाचे अनेक कंगोरे असतात. स्त्री ही सर्व समाजात स्त्री म्हणून दुय्यम ठरवली जाते. तिच्या निर्णय क्षमतेला फारसा प्रतिसाद समाज जाणीवपूर्वक देत नाही . प्रत्येक पावलावर बंधनांचे अडथळे ...वेगवेगळ्या पातळीवर पुरुषीव्यवस्था उभारत असते. ह्या बंधनांना मग संस्कृती हा गोंडस शब्द वापरुन अधिकृतता आणली जाते. गुलामालाही बरेच वेळा गुलामीची सवय होत जाते आणि मग ती त्याला प्रियही वाटू लागते . अशाचप्रकारे स्त्री बंधनांचेही समर्थन करणाऱ्या स्त्रिया आपण पाहत असतो. काही स्त्रिया या पुरुषीव्यवस्थेविरोधात बंड करत असतात. त्या निश्चितच वंदनीय आहेत.
*भारतीय समाजात स्त्री ही एकीकडे देवी म्हणून गौरवली गेली तर दुसरीकडे तिला सती जावे लागले. एकीकडे ती एकवचनी म्हणवणार्या रामाची सिता म्हणून वंदनीय असते तर दुसरीकडे त्याच रामावर प्रेम करण्याचा " गुन्हा " केला म्हणून सामान्य शूर्पणखा लक्ष्मणकरवी शिक्षेस पात्र होते. एकीकडे द्रौपदी बनून ती पाच पुरुषांची पत्नी बनते तर दुसरीकडे जनानखाने य राजे आपण पाहिले असतात. हरतर्हेने हरक्षेत्रात स्त्री दाबली जाते. तिची कुचंबणा केली जाते. जणू तिचे अस्तित्व समाजाच्या लेखी शून्य असते. म्हणून तर संस्कृती ..रुढीपरंपरा...खानदानकी इज्जत ....सौजन्य..विनयशीलता...एकपतीत्व नव्हे पुरुषत्व अर्थात योनिशुचिता...संस्कार अशा वेगवेगळ्या गोंडस नावाखाली स्त्री बंदिस्त केली जाते .*
मुक्त झालेली स्त्री पाहणे हा एक अवर्णनीय आनंद असतो. स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी ..स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करु पाहणारी तिची धडपड ....स्त्री नव्हे व्यक्ती म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याची तिची तळमळ ...हे खरोखरीच वाखाणण्याजोगे असते. त्यासाठी तिच्या वाटेत साथी बनून बरोबर राहणे हे विवेकाचे लक्षण असते. अशी साथ भारतीय स्त्रीला मिळत गेली तर तिची वाटचाल मुक्तपणाकडे होईल यात शंका नाहीय. पण हे सारे आदर्शवादी चित्र आहे. कारण स्त्रीने कोणता पेहराव करावा इथून तिने पतीचरणी आपली सेवा योग्य कशी बजावावी असा व्हाया करत म्हातारपणी तिने कसे सोशीक वागावे हे सांगणारे धर्मग्रंथ आजही समाजावर प्रभाव गाजवतात हे वास्तव आहे.
*शिट्टी मारणे.....हे एक प्रतिकात्मक इच्छा आहे. पुरुष स्त्रीला पाहून शिट्टी मारतो हे आपण पाहतो. स्त्री भररस्त्यात शिट्टी मारताना मी तरी अजून पाहिली नाहीय. इथे " शिट्टी मारणे " याचा अर्थ तिने स्वतःच्या मुक्ततेच्या दिशेची केलेली प्रतिकात्मक घोषणा या अर्थाने धरावी. ही घोषणा तिने लौकरात लौकर करावी हि एक विवेकवादी माणूस म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे.पुरुषी समाजव्यवस्थेविरोधातील स्त्रीचे बंड हे आवश्यक आहे. घडले पाहिजे. त्यासाठी ...न् त्यासाठीच भररस्त्यावर स्त्रीने ही " शिट्टी " मारली पाहिजे. ही इच्छा प्रामाणिक विवेकातून उमाटलीय. ही..." विच्छा पुरी व्हावी..."*
*!! स्त्री जीवनात मुक्तपणा हवा...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २६ )*
*संयुक्त महाराष्ट्र ...पहायचायं*

१९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा महाराष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी महाराष्ट्रीयन जनतेने मोठा लढा उभारला.केंद्रीय सत्तेशी टक्कर दिली. चिंतामणराव देशमुखानी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील काही विघ्नसंतोषी मंडळी महाराष्ट्र हे नवे भाषिक राज्य होऊ देणार नाही अशी विधाने करत त्यांना जनरेट्याने झुकवून दाखवले. सर्व समविचारी मंडळी एकत्र आली....नियोजन झाले...जनप्रबोधानासाठी वक्तृत्वाच्या तोफा धडाडू लागल्या. शाहिरांनी आपला कंठ फुटेस्तोवर आवाज दिला. छोट्या मोठया माणसांनी तुरुंगवास भोगला.गोळीबार झेलला. १०९ हुतात्मे झाले तेव्हा सरकार झुकले व महाराष्ट्र अस्तित्वात आला. हा आपणा सर्वासाठी अभिमानाचा विषय आहे.
*मनासारखे झाले पण पूर्णपणे मनासारखे नाही झाले. ज्या एकसंध व अखंड महाराष्ट्र आपणांस अपेक्षित होता त्याचे काही तुकडे पाडून उर्वरीत महाराष्ट्र मिळाला.बिदर ,.भालकी, कारवार, बेळगाव हे प्रदेश कर्नाटक राज्याला जोडले गेले. ही भळभळती जखम आजही ताजी आहे. महाराष्ट्र कर्नाटक सिमाप्रश्न या नावाने अजूनही काही भाग होरपळतोय. या भागात राहणारे मराठी भाषिक नेहमीच महाराष्ट्र राज्यात परतण्याची आस लावून जगतात. त्यासाठी कठीणातील कठीण प्रसंग झेलतात. संघर्ष करतकरत आपली न्याय्य मागणी गेली ५७ वर्षे करत आहेत. तरीही मग्रुर शासनाला जाग येत नाहीय. आपणही आता त्यांना साथ करण्यात कमी पडतोय हे मान्य करायला हवे. आपण आपल्याच मनोराज्यात धुंद झालो हे वास्तव आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता हि मागणी आता जोर पकडत नाहीय. हे योग्य नव्हे. १०९ महाराष्ट्रीय बांधवाचे बलिदान असे वाया जाऊ नये. "अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपला " हा शिवविचार आहे. मग ...मग आपल्या बांधवांचे हाल असे उघड्या डोळ्यांनी पहायचे का ?? कर्नाटक एस टी फोडून हा प्रश्न भावनिक बनवण्यात अर्थ नाहीय. यापेक्षा लोकप्रतिनिधींची एकजूट व लोकशाहीमध्ये पुन्हा एक विधायक मार्गाने दिर्घ लढा यानेच हा प्रश्न सुटू शकेल असे मला प्रामाणिकपणे वाटते. प्रत्येक महाराष्ट्रीयन बांधवाची ही तळमळ आहे.*
तुम्ही आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे अथवा अन्य विचारधारा मांडणारे संघटनाचे असा या किमान एका मुद्द्याशी आपली बांधिलकी असलीच पाहिजे . निवडणूक कालखंडात प्रत्येक राजकीय पार्टी संयुक्त महाराष्ट्र बांधिलकी जाहीर करते पण कुणीही अग्रक्रमाने हा प्रश्न नंतर हाताळत नाहीय. आपण त्या सर्व राजकीय पक्षाना याचा जाब विचारायला हवा. १ मे यादिवशी मोठ्या वल्गना करून उपयोग नाही तर हा विषयच अग्रक्रमाचा बनला पाहिजे. १०९ हुतात्म्यांचे बलिदान सतत डोळ्यासमोर राहिले पाहिजे . एका महाराष्ट्रीयन भुमिपुत्राची....एवढी विच्छा पुरी करा.
*!! संयुक्त महाराष्ट्र ...झालाच पाहिजे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
*सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक सदिच्छा ....हे वर्ष तुमच्या कुटुंबियांना आरोग्यदायी , बुध्दीदायी व सर्व क्षेत्रात भरभराटीचे जावो.*
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...( भाग २७ )*
*संघस्वयंसेवकांना " वैचारिक गुलामगिरी " तोडताना पहायचयं...*

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा विरोधक आहे...परंतु मी संघस्वयंसेवकांचा वैयक्तिक विरोधक नाही हे सुरुवातीला स्पष्ट करतो. विचारांचा मुकाबला विचारानेच करावा हे तत्वज्ञान मला पटते. आरएसएस ९० वर्षाचा टप्पा पार करुन गेलयं. देशभरात लक्षावधी शाखा व कोट्यावधी स्वयंसेवक ही संघाची मिळकत आहे. हि मिळकत संघाच्या स्वयंसेवकानी आपल्या कष्टाने मिळवलीय हे मान्यय मला. ९०वर्षानंतर सध्या राजकीय पातळीवर संघस्वयंसेवक असणारे देशाचे प्रधानमंत्री बनलेत हा प्रत्येक संघस्वयंसेवक दृष्टीने अभिमानाचा व कौतुकाचा विषय आहे. याआधी आटलजी प्रधानमंत्री होते तरीही ते सरकार " संघाचे सरकार " म्हणून ओळखले जात नव्हते. सध्या मात्र सर्वत्र संघाचे सरकार आहे अस ऐकु येतयं. प्रगतीवर असताना केलेले आत्मचिंतन नवीन वाढीला अनुकूल असते. म्हणून संघस्वयंसेवक याचा विचार करतील ही अल्प अपेक्षा.
*आरएसएस ....या नावाभोवती अनेक आरोप प्रत्यारोपांचे जाळे नेहमीच असते. या आरोपाना व्यवस्थित उत्तर देणे अजूनही संघाला जमलं नाहीय हे वास्तव आहे. पहिल्यांदा संघ म्हणजे ब्राम्हण लोकांची छावणी अस म्हटल जायचं. सध्या मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन वर्ग दिसून येतो. पण प्रश्न असा की...डोकी जरी बहुजनांची वाढली तरी मेंदू मात्र अजूनही ब्राम्हणीच आहे त्याचे काय ?? संघात जातपात मानत नाहीत अस उत्तर दिले जाते पण हे पूर्णपणे लागू अस उत्तर नाहीय. संघाचे नेतृत्व कायमच ब्राम्हण व्यक्ती होत आलाय हे वास्तव आहे. दुसरे ....संघप्रमुख स्पष्टपणे बोलतात की " संघात तर्क चालत नाहीत तिथे फक्त आदेश पाळले जातात " अशा आशयाचे विधान त्यांनी केले. हे विधान कुणाही संघस्वयंसेवकला खटकल नाहीय याचे सखेद आश्चर्य वाटले. आदेश..मेंढरांच्या कळपाला दिले जातात. त्या आदेशामागे जाणारी मेंढरे ही कत्तलखान्याकडे ढकलली जातात. म्हणून मेंढरांच्या कळपाचा प्रमुख हा मेंढरच असावा अशा आशयाचा सल्ला शाहूराजानी दिला होता. संघस्वयंसेवक जर स्वतःच्या डोक्याला शिस्तीच्या नावाखाली विराम देत असतील तर मग त्यांनी "आपण वैचारिक गुलाम आहोत " याची कबुली द्यावी. ९० वर्षानंतर संघाने हाफ चड्डी सोडून फुल पँट स्विकारली. तसेच आता आपल्यावर होणारे आरोप पण योग्य पुराव्यानी खोडून दाकवावेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले १० संघस्वयंसेवक दाखवा....संघाचे नेतृत्व बहुजनी दाकवा....संघात मुस्लीम व्देष होत नाही याचा यथायोग्य पुरावा द्यावा ...संघात महिलांना विशेष स्थान नसते....संघ लोकशाही मानत नाही ....देशातील नंबर १ ची आतंकवादी संघटना म्हणजे आरएसएस ....संघाचे आदर्श असणाऱ्या गोळवलकर हेडगेवार यांच्या नावे संघाला मानणाऱ्या नेत्यांना मते मिळत नाहीत .....असे एक ना अनेक आरोप जाहिरपणे संघावर झालेत व होत असतात. संघस्वयंसेवक याचा जवाब का देऊ शकत नाहीत ?? ते वैचारिक गुलाम असल्याचा कुणी निष्कर्ष काढल्यास ते चूक ठरेल का ?? संघस्वयंसेवक याचा मनापासून विचार करतिल ही अपेक्षा .*
देशाची राजकीय सत्ता प्रशासनात मुख्य व मोक्याच्या जागेवर संघस्वयंसेवक हे आजचे चित्र आहे. सगळी अनुकूल पार्श्वभूमी आहे म्हणून तर निवांत होऊन आत्मचिंतन करावे व आपल्या सदसदविवेकबुध्दीचा परिचय स्वतः करून घ्यावा व इतरांनाही द्यावा. मी जरी त्यांच्या विचारांचा विरोधक असतो तरी वरील भाष्यातून मी संघस्वयंसेवक असणाऱ्या लाखो करोडो लोकांना मनापासून आत्मचिंतन करण्याचे आवाहन कृरतोय. ते समजून घेतील ही आशा आहे. बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की " गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल " मला हे वाक्य प्रामाणिकपणे पटते. संघस्वयंसेवक वैचारिक गुलाम झाले आहेत अस सर्वत्र बोलल जाते. हे बोलं खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी तरी किमान...."माझी विच्छा पुरी करा ".
*!! संघस्वयंसेवक .....आत्मचिंतन करतील एवढीच अपेक्षा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २८ )*
*पुरुष "विवाहित" असल्याची खूण ....पहायचीयं*

मी पुरुष आहे व भारतीय समाजात पुरुषसत्ताक संस्कृती नांदते हे वास्तव खेदाने मी मान्य करतो. ही पुरुषसत्ताक पद्धती नष्ट होऊन मानवसत्ताक पध्दती लागू व्हावी ज्यात स्त्री पुरुष हा भेद नसेल या विचारधारेचा मी समर्थक आहे. स्त्री व पुरुष हे दोघेही मानव आहेत म्हणून मानवसत्ताक पध्दती. जगभर हि पध्दती यावी अशी मनोमन माझी इच्छा आहे व माझ्या वकुबानुसारा मी त्यासाठी कृतीशीलही आहे.
*भारतीय समाजात स्त्री विविध मार्गानी बंदिस्त केली जाते. संस्कृती परंपरा रुढीप्रथा अशा गोंडस नावाखाली स्त्री वर्गावर पुरुषसत्ताक वर्ग वर्चस्व ठेवत असतो. समाजाच्या नीतीमान व्यवहारासाठी प्रत्येक नियम स्त्री वर्गासाठी जणू राखीव ठेवलेला. हा नियम करताना स्त्रीमनं जाणावे याची फिकीर कधी झाली नाही. अगदी साधे उदाहरण पाहूया. स्त्री विवाह करते तेव्हा ती "विवाहित " आहे याची खूण तिच्या नखशिखांत दिसण्याची " काळजी " पुरुषसत्ताक पध्दती घेताना दिसते. डोक्यातील भांगेत सिंदूर भरणे....गळ्यात मंगळसूत्र घालणे....हातात हिरव्या बांगड्या....पायात जोडवी अशा खुणा ठसठशीत नजरेत दिसतात. यामुळे अमुक अमुक स्त्री विवाहित आहे हे चटकन कळते. ( समस्त स्त्री वर्गाची माफी मागून हे वाक्य लिहितोय.......विकलेल्या मालावर जसा खरेदीदाराचा अथवा sale असा टँग लावला जातो तसाच हा प्रकार मला वाटतो ) आता तुम्हीच बघा.....स्त्री विवाहित होते याचा अर्थ तिच्या बरोबर एखादा पुरुष सुध्दा विवाहित होत असतो. लग्न दोघांचे होते. पण .....पण पुरुषाच्या अंगावर तो विवाहित आहे हे समजण्यासाठी कोणतीही खूण कायमस्वरुपी दिसत नाही . ते का बरं ?? कदाचित पुढील लांड्यालबाड्या करायला त्याला हा " अधिकृत परवाना " संस्कृती रक्षकांनी दिलाय का ?? प्रत्येक पुरुषा हा स्त्रीच्या पोटीच जन्मत असतो. मग ज्या पोटातून आपण या जगात प्रवेश केला त्या पोट असणाऱ्या स्त्री वल्गाची कैफियत या पुरुषसत्ताक वर्गाकडे का पोचत नाही ?? बहुतेक पोचते....पण पचत नाहीय.*
पुरुष विवाहित आहे....हे कळताच अनेक गुन्हे थांबू शकतात. विवाहित पुरुष आपण अविवाहित आहोत असे भासवून अविवाहित मुलीःबरोबर प्रेमाच्या नावाखाली शारीरिक संबंध ठेवतात. तिचा गैरफायदा घेतात. तिला लुटतात. आणि सत्य सामोरे आले तरीही तो नालायक पुरुष बिनधास्त हात वर करतो व यात बळी मात्र त्या अविवाहित मुलीचा जातो. हे थांबायलाच हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते. समस्त स्त्री वर्गाच्या मनातील हि इच्छा ...माझ्या सारख्या एका पुरुषाच्या मनात उमटली आहे....तिला समस्त विवेकी पुरुषानी साथ करावी...अन् माझी विच्छा पुरी करावी.
*!! " एक बंधन " ...पुरुषांनाही हवे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २८ )*
*मराठी साहित्याला " नोबेल " पहायचयं...*

मराठी साहित्य ....वाचतच मी लहानाचा मोठा झालो. सुरुवातीला चांदोबा चंपक पासून सुरु झालेला हा प्रवास अनेक वाचनीय कादंबऱ्या ते वैचारिक ग्रंथ इथवर येऊन पोचलाय. मराठी साहित्याबद्दल म्हणून एक मनाचा कोपरा हळवा आहे. मराठी मातृभाषा असल्याने त्या साहित्याची गोडी लागणे अनिवार्यच होते. या मराठी साहित्याने माझ्यातला " माणूस " जागा झाला एवढे खरं . आजही पुस्तक हेच जिवाभावाचे मित्र आहेत ते यासाठीच.
*मराठी साहित्यात ....अनेक थोर साहित्यकार होऊन गेले. ज्ञानेश्वर तुकाराम हे संत देखील मराठी साहित्याचा अनमोल वारसा आहेत. अनेक लेखक व कवीनी हा साहित्यवारसा समृद्ध केलाय. अनेक समाजहितचिंतकानी वैचारिक प्रबोधन करून लोकांना शहाणे बनवले. या सर्व "मानवमित्रांना " पहिल्यांदा मनःपूर्वक सलाम करतो. माझ्या सारख्या असंख्य दगडांना थोडाफार शहाणपणाचा पाझर फुटला तो याच साहित्यामुळे व साहित्यिकांमुळे. भारतीय पातळीवरचा मानाचा समजला जाणारे ज्ञानपीठ मराठी साहित्याने पटकावले आहे. आता माझी आस थोडी जास्त वाढलीय. भारतीय पातळीवरून आता या साहित्याने जागतिक पातळीवर मानसन्मान मिळवावा असे एक मराठी साहित्याचा छोटा वाचक म्हणून मला प्रामाणिकपणे वाटते. साहित्यातील नोबेल एकदा आपल्या मराठी साहित्याच्या वाट्याला यावे ही मनापासून इच्छा आहे. नोबैल मिळवायची क्षमता निश्चितच मराठी साहित्यात आहे. अनुवादक चांगले मिळायला हवेत. मराठीतील उत्तमोत्तम साहित्य इंग्रजी भाषेत पोचायला हवेत. जागतिक पटलावर ही प्रतिभा पोचवणे हि साहित्यिकाबरोबर राज्य शासनाचीही जबाबदारी आहे. यासाठी योग्य पावले उचलायला हवीत. राजकीय इच्छा शक्ती प्रबळ व्हायला हवी. आपल्या मराठी साहित्याचा जागतिक पटलावरीला मानसन्मान एक मराठी माणूस म्हणून आपणास आनंददायी असेल.*
केवळ नोबेल मिळाले तरच साहित्य श्रेष्ठ ठरते असे अजिबात नाहीय. तरीही उणीवा प्रयत्नपूर्वक भरून काढणे हे विवेकी माणसाचे शहाणपण आहे. मराठी साहित्याची ही उणीव लौकर भरून निघावी. यासाठी लेखणी उचलताना साहित्यिकानी अत्यंत जबाबदारीने व वास्तववादी लिखाण करावे. मराठी साहित्याच्या डोकीवर हा मानाचा तुरा लागला पाहिजे अशी तमाम साहित्य वाचकांची मनोमन इच्छा आहे. एका सामान्य मराठी वाचकाची ....एवढीच विच्छा पुरी करा.
*!! मराठमोळा साहित्यझेंडा..नोबेल नगरीवर फडकावा...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग २९ )*
*एक "शो मँन " ....पहायचायं*

एक आनदयात्री...एवढ्या पुरताच हिंदी चित्रपट सृष्टीशी माझ नातं आहे. चित्रपट पाहणे व आनंद घेणे हा माझा विरंगुळाही आहे. जीवनातील बराच वेळ हिंदी मराठी चित्रपट बघण्यात जातात. स्वाभाविकच जुने / नवे अशी नकळत तुलना होऊ लागते. मी नव्याचा विरोधक नाही व जुन्याचा कट्टर समर्थक नाही. जिथे ज्या वेळी काही चांगले पहायला मिळेल तिथे त्या वेळी आनंद घ्यायचा एवढाच साधा व सामान्य हेतू असतो माझा. तरीही फिल्मी क्षेत्राबद्दल मनात नेहमीच कुतुहल , औत्सुक्य व जिज्ञासा असते.
*चित्रपट सृष्टी म्हणजे मायानगरी. या मायानगरीत जो आला तो तिथे रमून गेला. दमून गेला. अन् मरूनही गेला. तरीही " हमारी...याद आएगी....." अस म्हणत ही लोक मनावर आजही राज्य करतात. इथे कधीही कुणी एकटाच नायक नसतो. ज्याच्या वाट्याला आज यश आहे तो आजचा नायक असे सरळ समीकरण इथे असते. म्हणून तर सुपरस्टार फ्लाँट ठरतो व फ्लाँपस्टार एकदम तेजीत येतो. एकंदर अत्यंत अनिश्चित स्वरूपाचे हे क्षेत्र आहे. इथे सततचे यश नोंदवणार्याला " ग्रेटेस्ट शो मँन " असे म्हणतात. हिंदी चित्रपट सृष्टीत राजकपूरजी व मराठी चित्रपट सृष्टीत दादा कोंडकेजी असे दोन खरे शो मँन आपण पाहिले आहेत. या दोन्ही शो मँन मध्ये बरेच साधर्म्य आहे. चित्रपट निर्माण करण्यासाठी असणाऱ्या इतर बाजूमध्ये या दोघांची विलक्षण हातोटी होती. हे दोघेही अभिनेते होते..चांगल्या कथा पटकथा निवडू शकत होते....चांगले संगीत जाणकार होते....साहित्य वाचणारे होते....सुरुवातीच्या काळात दोघावर समाजवादी ठसा होता....दोघांनी प्रचंड यश पाहिले....उत्तम दिग्दर्शक उत्तम निर्माता उत्तम वितरक अशा नानाविध भुमिका दोघांनी करून दाखवल्या. नव्हे ..पेलून दाखवल्या. म्हणून तर भले अमिताभ हिंदी चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार असेल अथवा मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफांचे स्टारडम असेल हे दोघेही फक्त उत्तम अभिनेते असतात. शो मँन नव्हे. आज चित्रपट सृष्टीला एका चांगल्या शो मँनची नितांत गरज आहे. मला माहिताय ...एका रात्रीत शो मँन घडत नाहीत. त्यासाठी दिर्घ परिश्रम घ्यावे लागतात. उत्तम कथा...संगीतकार..गीतकार..गायक...संकलक...अभिनेते...अशा सर्वाकडून योग्य टिमवर्क करून घेणारे कौशल्य असावे लागते. हे अंगभूत कौशल्य " शो मँन " निर्माण करत असते.*
राजकपूरजी व दादा कोंडकेजी यांच्या निधनानंतर एकही शो मँन आपणास मिळू नये ही शोकांतिका आहे. कुणीतरी एखादा सुभाष घई अथवा सचिन पिळगावकर असा प्रयत्न करु पाहतो पण अल्पावधीतच ही मायानगरी त्याच्यातील " टँलेंट " हिसकावून घेऊन त्यांना " व्यवहार " शिकवते. शो मँन...तिथेच मरतो. दिर्घ साधना व समाजमन जाणण्याची दृष्टी व या दोन्हीला एका उत्तम टिमवर्कची जोड यातून शो मँन उभारला जाऊ शकतो. यासाठी कौशल्यप्राप्त चित्रपट सृष्टीतील लोकांनी पुढे यायाला हवे. आव्हान स्विकारायाला हवे. कोणत्याही शो मँनला लोक विसरत नाहीत. त्याच्या मृत्यूनंतर ही ते फिल्मी रसिकांच्या मनात गुंजत असतात.हे गुंजारव आनंददायी असते. असे गुंजारव निर्माण करणारा एक शो मँन पुन्हा यायला हवा. समाज आनंदित करायला हवा. माझ्या सारख्या सामान्य प्रेक्षकांची ही सामान्य ...."विच्छा पुरी करा."
*!! शो.....मस्ट गो आँन !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग ३० )*
*भारतरत्न यादीत "सामान्य माणूस "...पहायचायं*

" भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत " प्रतिज्ञा माझ्या सकट बहुतेक भारतीयांना पाठ असते. आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आहे आपणाला. संत सुधारकांची महामानवांची विरांची ही भारतभूमी मला अत्यंत प्रिय आहे. भारत घडवण्यात अनेक पिढ्या खर्ची पडल्या. अनेक महामानव आले व भारत घडवत घडवत सन्मानाने निघून गेले. भारत देशाचा हा इतिहास आपणा सर्वाना अभिमानास्पद आहे.
*भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर आपण सर्वानी लोकशाही व्यवस्थेत प्रवेश केला. भारतदेश नव्याने बांधत बांधत आज आपण साधारणपणे सत्तर वर्षानंतर एक सशक्त शक्ती म्हणून जागतिक पटलावर आपला ठसा उमटवतोय. या नवा भारत बांधण्यात अनेक लोकांचे हात श्रमले आहेत. अनेक महामानवांची डोकी घासली आहेत. अनेक कलाकारांची कला अव्याहत वाहिली आहे. अनेक साहित्यिक लोकांनी आपली लेखणी झिजवलीयं. अनेक खैळाडूने आपली आयुष्यभरची तपस्या पणाला लावलीय. अनेक शास्त्रज्ञांच्या रात्री न् रात्री जागून काढल्यात. अनेक चांगल्या राजकीय नेत्यांनी आपले हितसंबंध भारतीय भूमीशी जोडले. तेव्हा न् तेव्हा हा भारत घडला. म्हणून तर या असामान्य भारतीय नागरिकांना ....विशेष राजकीय नेते...कलावंत ...शास्त्रज्ञ ...खेळाडू ...साहित्यिक अशा नानाविध लोकांना आपल्या भारत सरकारने आपला सर्वोच्च भारतीय पुरस्कार " भारतरत्न " देऊन सन्मानित करीत आलोय. या सर्व लोकांबद्दल अतोनात आदर आपल्या मनामनात आहे व असावाच. तरीही .....तरीही मला एक प्रश्न सतत छळतोय तो असा की , या भारतरत्नांच्या यादीत सामान्य कष्टकरी माणूस कधीच का दिसला नाही ?? त्याने या देशासाठी वेचलेले कष्ट भारतरत्नाच्या निकषासाठी पुरेसे नाहीयत का ?? आपण रोजच पाहतो.....अन्नदाता म्हणवणारा माझा शेतकरी बांधव या देशाचा रहाटघाडगा नांगराच्या रूपाने अत्यंत निष्ठेने चालवत आलाय.....श्रमिक म्हणवणारा कारखान्यातील कामगार आपल्या श्रमाने पोलाद वाकवतोय....रक्षक म्हणवणारा माझा सैनिक बांधव डोळ्यांच्या वाती करून अहोरात्र सीमा सांभाळतोय...एक उत्तम गृहीणी या देशाच्या प्रत्येक घरात रात्रंदिवस खपत असते अत्यंत निष्ठेने ......एक फेरीवाला आपल्या पोटाबरोबर देशाच्या विकासात आपल्या परीने हातभार लावतोय....अनेक कष्टकरी " मेरा भारत महान " हे कृतीत दाखवत देशाला सशक्त बनवत असतात. अशा सामान्य कष्टकरी श्रमिक वर्गाचा भारतरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात गैर ते काय ?? हवे तर सर्वाना मिळून एकदा ..या कष्टकरी समुहाला मनःपूर्वक कृतज्ञता म्हणून एकत्रित तरी हा मानसन्मान द्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.*
" पृथ्वी ही शेषाच्या नव्हे तर दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे " अस अण्णाभाऊ साठे यांनी म्हटल होत. मग...मग ज्या पृथ्वीला तोलण्यासाठी हे श्रमिकाचे हात आवश्यक असतात त्या हातांना हा सन्मान द्यायला हरकत नसावी. हा देश जसा महामानवांनी आपल्या असामान्य कतृत्वाने घडवलाय तसाच हा देश दुसऱ्या बाजूने कष्टकरी वर्गाने घडवलाय. महामानवांचा योग्य सन्मान जपला जावाच ..तो योग्यच आहे....याचबरोबर या कष्टकरी समुहाला हा सन्मान देऊन त्यांच्याप्रती आदर राखायला हवा. मी सुध्दा एक सामान्य कष्टकरी वर्गातील माणूस आहे. हा देश माझ्या सारख्या असंख्य श्रमिकांच्या श्रमाच्या धारेने न्हाऊन निघतो. त्या श्रमाच्या धारा हा देश बलवान बनविण्यासाठी अखंड वाहतच राहणार. एका सामान्य श्रमिकाची.....एवढीच विच्छा पुरी करा.
*!! व्हावा कष्टकरी वर्गाचा सन्मान ....मिळावा भारतरत्न सन्मान !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा....( भाग ३१ )*
*"लैंगिकता अर्थात शरीरशास्त्र" विषय अभ्यासक्रमात पहायचाय...*

मानवी जीवन चक्र सुरु असते ते मैथूनातून. स्त्री व पुरुष एकत्र येऊन मिलन करतात व त्यापासून नवा जीव तयार होतो. हा नवा जीव योग्य वयात पुन्हा तीच क्रिया आपल्या साथीबरोबर करतो आणि मानवी जीवन चक्र एकसारखे सुरु राहते. ही मैथून क्रिया ही संबंध मानवी जीवनाला व्यापून राहिलेली क्रिया आहे. व्यक्ती कितीही मोठी असो वा छोटी ..शास्त्रज्ञ असो वा शेतकरी ...भांडवलदार असो वा कामगार ...शिक्षित असो वा अशिक्षित ....नेता असो वा सामान्य माणूस ...साहित्यिक असो वा छोटा दुकानदार सर्व जण या मैथुन क्रियेतूनच जन्माला येतात व या क्रियेतूनच नवा जीव जन्माला घालतात. हे वैज्ञानिक सत्य आहे.
*लैंगिकता ....हा शब्द उच्चारला की अनेकांच्या भुवया उंचवतात. अनेकाचे कुतुहल जागे होते तसेच अनेक जण सोवळे नेसून आम्ही त्या गावचेच नाही असा आव आणतात. लैंगिकता हा शब्द खरेतर अत्यंत व्यापक अर्थाने वापरायला हवा. "शरीरशास्त्र " समजून घेणे म्हणजे लैंगिकता जाणून घेणे. मूल कसे जन्माला येते या प्रश्नापासून ते स्त्रीची मासिक पाळी थांबल्यावर तिच्या वर्तनात नेमके कोणते बदल घडतात अशा नानाविध प्रश्नांची उत्तर " लैंगिकता " या विषयात समाविष्ट होतात. आपल्या कडे मध्यंतरी " शरीरशास्त्र " विषय शाळेतून शिकवला जावा असा आग्रह धरण्यात आला. कचखाऊ शासनाने आपली राजकीय इच्छाशक्ती न दाखवल्याने हा विषय मागे पडला. ज्या महाराष्ट्रात र. धो. कर्वे व मालतीबाई कर्वे या जोडप्याने हा मानवी जीवनाशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या विषयावर जनप्रबोधन केले त्याच महाराष्ट्रात "शरीरशास्त्र " हा विषय शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विरोध व्हावा हे अत्यंत नामुष्कीजनक आहे. हे तथाकथित संस्कृतिरक्षक जणू काय स्वयंभू आकाशातून जन्माला आले ले असावेत. हे संस्कृतिरक्षक म्हणवणारे नित्य देवदर्शनाला मंदिरात जातात व पायरीवर माथा टेकून परततात . त्यांनी जरा माथा वर केला तर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारी "मैथुनशिल्पे" सहज दिसून येतात. "लहान मुले बिघडतील " असा भ्रामक युक्तिवाद करण्यात आला. वास्तविक लहान मुलांना शास्त्रीय माहिती मिळत नसल्याने ते कुठूनही माहिती उपलब्ध करतात व खरे ज्ञान बाजूला पडते, तेव्हा मुले बिघडतात.अज्ञान पसरायला वेळ लागत नाहीय पण ज्ञान हे लोकांपर्यत जाणीवपूर्वक पोचवावे लागते. लहान मुलांना त्यांच्या शरीराची शास्त्रीय माहिती पुरवली तर त्यांच्या मनातील अनेक विभ्रम दूर होऊन त्यांची नजर स्वच्छ होऊ शकेल असे मला प्रामाणिकपणे वाटते.अंधार दूर करायचा तर अंधारात प्रकाशाची पणती लावायची असते. अंधार अंधार ..म्हणून बोंब ठोकत दूर पळायचे नसते. र.धो. व मालतीबाई कर्वे यांना मनात जपण्याचा व त्यांनी दिलेला विचार कृतीत अवतरण्याचा हा संकल्प असेल. शासनपातळीवर याचा विचार व्हावा.*
मानवी जीवन चक्र हे अखंड चालू रहायला हवे हे खरेच परंतु ते अधिक शास्त्रीय पध्दतीने जगले पाहिजे हे त्याहूनही अधिक खरे. *" उलट्या पावलांचा प्रवास "* घातक असतो. आपल्या शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ञ याबाबतीत आग्रही असावेत. मानवी शरीरासंबंधित शास्त्रीय शिक्षण जर लोकापासून दूर राहिले तर अज्ञानात काळ कंठावा लागेल. यापेक्षा शरीरशास्त्र समजून घेऊन अधिक चांगल्या पध्दतीने जीवन जगणे अधिक श्रेयस्कर आहे. मी माझ्या जीवनात र.धो. कर्वे यांना माझ्या आदर्शात स्थान देतो. त्यांचा विचार मला समृद्ध करत गेलाय. आनंदाने जगायला शिकवलंय. हा आनंद समस्त भारतीय बांधवांना मिळावा ही मनोमन इच्छा आहे. यासाठी तरी...."माझी विच्छा पुरी करा ".
*!! शरीरशास्त्र...अभ्यासक्रमात असलेच पाहिजे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================

*विच्छा , माझी पुरी करा...(भाग ३२ )*
*"प्रकाशसूर्य" संपवू पाहणारी..."भेकडांची औलाद" पहायचीय...*

जशी प्रकाशाचे दिवस असतात तशीच अंधाराच्या रात्री असतात. अंधार हटवून प्रकाश येत असतो. प्रकाशाला घेरणारी रात्र कितीही काळीकुट्ट असली तरीही समस्त अंधाराला छेदणारी एक पणती पुरेशी असते. ही पणती प्रकाशाचा वारसा सांगते. अशा पणत्या आपण जपायच्या असतात. ज्यांना समाजाला अंधारात ठेवून स्वतःचे हितसंबंध राखायचे असतात ते या पणत्या विझवू पाहतात. एक पणती विझली की अंधारयात्रीना आनंददायी वाटते. थोडा काळ काळोख पसरतो हे खरे. पण अंधारयात्रींना हे ठाऊक नसते की....त्या पणतीच्या तेजात दुसऱ्या पणत्या जीव धरत असतात...निर्माण होत असतात. म्हणून तर अंधार हटवायाला पुन्हा नवी पणती येते अन् अंधार छेदून दाखवते..
*माझ्या आयुष्यात अंधाराचे साम्राज्य ...अज्ञानाचे साम्राज्य हटवायला ज्या दोन "पणत्या " कामी आल्या त्यातील पहिली पणती होती शहिद डाँ. नरेंद्र दाभोलकर व दुसरी पणती होती शहिद काँ. गोविंद पानसरे. पहिल्याने मला विवेक शिकवला व दुसऱ्याने संघर्ष. माझ्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांतील माणूसपण या दोघांनाही घडवले. आयुष्यात या दोघा " प्रकाशयात्रीं " बरोबर जो सहवास घडला तोच सहवास माझे इवलेशे आयुष्य माझ्यातील " खरे माणूसपण " घडवत जाईल. या दोन्ही प्रकाशसूर्याना अंधारासाथीनी देहाने नष्ट केले. अंधारसाथीना असे वाटते की "आता आम्ही जिंकलो" ..हा भ्रम आहे त्यांचा . कारण या प्रकाशसूर्यांची अनेक किरणे अंधाराला भेदण्यासाठी " विवेकी विचार व लोकशाही संघर्ष " घेऊन केंव्हाच मैदानात उतरलेत. उघड्या मैदानावर ही " सूर्यकिरणे " आपल्या विवेकाचा आवाज बुलंद करत उजळ माथ्याने फिरत आहेत. याउलट अंधारयात्री अर्थात भेकडांची औलाद मात्र कोणत्या अंधाऱ्या गुहेत तोंड काळे करून बसलेत कुणास ठाऊक . अपराधी व्यक्ती आपले तोंड लोकांना दाखवू शकत नाही तसेच या भेकडांचे आहे. दरवेळी ही भेकडांची औलाद अधिकाधिक भेकड बनते. महात्मा गांधींचा खून करणारा "न..थुथुराम " हा भेकड किमान समोर येऊन भेकड कृत्य करून गेला. ही भेकड नथुरामाची पुढील औलाद मात्र दिवसाढवळ्या खून करून अंधाऱ्या गुहेत आश्रयाला जाते. याचे कारण एकच.....आपण लढाई हरलोय याची पक्की जाणीव त्यांना झालीय. विचारांचे शस्त्र जवळ नसले तर लढाई हारणारच . "देह संपवता येतो , पण विचार संपवता येत नाहीत " हे वास्तव या भेकडांना कळेल तो सुदिन.*
आमचे " प्रकाशसूर्य " आम्हाला विवेकाचा व संघर्षाचा वारसा देऊन गेलेत. तुमच्या हजारो वर्षाच्या अन्यायी व्यवस्थेला गाडण्याची किमया आमच्या एकेका प्रकाशसूर्याने करून दाखवलीय. कधी चार्वाक बनून तर कधी बुध्द....कधी बसवेश्वर बनून तर कधी तुकाराम....कधी जोतीबा सावित्री बनून तर कधी शाहू आंबेडकर बनून...कधी गांधीजी बनून तर कधी दाभोलकर पानसरे बनून. आमच्या प्रकाशसूर्यांना गिळण्याची कितीही पराकाष्ठा केली तरीही ....ध्यानात ठेवा...तोंड तुमचेच भाजणार . कारण हे "सूर्यकिरण" फक्त "चोख व स्वच्छ " हृदयातच वसतात. अंधारयात्रीची ती " लायकी " नाही .लपून बसलेल्या या भेकडांना एकदा पहायचय मला...का माहिताय ?? ...अशासाठी की जेव्हा हे भेकड माझ्या प्रकाशसूर्यानी निर्माण केलेला माझ्या सारखे असंख्य "सूर्यकिरण" पाहतील तेव्हा त्यांच्या डोळ्यांत उमटणारी भिती , नैराश्य , लढाई हरलेल्या खुणा मला पहायच्या आहेत. आणखी एक मला पहायचंय ...हे अंधारयात्री अर्थात भेकडांची औलाद माझ्या सारख्या असंख्य सूर्यकिरणांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याची हिंमत दाखवते का .... हे त्यांना शक्य नाहीय कारण अंधाराला काळोखाचा वारसा असतो .काळोखाचा वारसा उजेड बघू शकत नाही ,,..म्हणून या हरलेल्या भेकडाची औलाद पाहण्याची इच्छा निर्माण झालीय.. एका छोट्या सूर्यकिरणाची...."एवढीच विच्छा पुरी करा ".
*!! दाभोलकर पानसरेंचे खूनी...ताबडतोब पकडा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================


No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...