Flash

Wednesday, 19 April 2017

शिवाजी कोण होता? *लेखक - गोविंद पानसरे.*

*•शिवराय समजून घेताना•*
…शिवाजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायांत शिवाजी हे परमेश्वराचेच अवतार होते, अशी समजूत आहे. कुणी शिवाचा अवतार म्हणवतात तर कुणी विष्णूचा. आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही. ऐतिहासिक थोर पुरूषाचं सोडा, एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देवमाणूस म्हणण्याची आपली रित आहे.
कुणी एखादा थोर पुरुष असला, त्यानं लोकहिताचं काही कार्य केलं की त्याला आपण देव मानतो. हा जसा देवभोळेपणा असतो आणि आहे तसा काहींचा सिद्धसाधकपणाही असतो. *देव तयार केल्याखेरीज भक्तांचं साधत नसतं आणि म्हणून भक्त देव घडवत असतात आणि आपले कार्य साधत असतात.* शिवाजींना समकालीनांनी अवतार मानला होता की नाही कुणास ठाऊक. परंतु त्यांच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य, चमत्कारिक सामर्थ्य इत्यादी लादलं होतं असं दिसतं. शिवाजींना पक्षासारखं उडता येतं. ते शाहिस्ता खानासमोर भिंतीतून प्रगटले, त्यांना अदृश्य होण्याचं सामर्थ्य लाभलं होतं, अशी वर्णनं आढळतात. ही सारी वर्णनं खोटी आहेत यात वाद नाही. त्या काळी या अफवांचा त्यांना निष्ठा मिळवायला आणि यश संपादन करायला उपयोगही झाला असेल. पण अडाणीपणा आणि इतिहास यात फरक आहे.
*शिवाजी माणूस होते. चांगले माणूस होते. थोर माणूस होते. हुशार व दूरदृष्टीचे माणूस होते. नीतिमान आणि व्यवहारी माणूस होते. शूर लढवय्ये आणि कुशल संघटक होते. पण माणूस होते.* देव नव्हते. अवतार नव्हते.
*शिवाजींचा देव केला मग काय होतं?* _त्यांच्यासारखं वागण्याची आपल्यावर जबाबदारी राहत नाही._ *"शिवाजींसारखं वागा."*, *"रयतेला सतावू नका."*, *"बलात्काऱ्यांना पाठीशी घालू नका."*, *"रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका."*, *"स्वत:च्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करू नका."* असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं, *"ते शिवराय कुठं? आपण कुठं? ते देवाचे अवतार आणि आपण माणूस. आपल्याला ते कसं जमणार?* आपण आपलं असंच वागायचं."
देव असल्यामुळे वर्षातून एकदा 'शिवाजी महाराज की जय!' म्हणायचं, जयंती करायची, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची. जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची. कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की काम झालं. *शिवभक्त म्हणवून घ्यायला आपण रिकामे झालो. शिवाजींसारखं वागायची आपली जबाबदारी नाही.* शिवाजींनी रयतेला मदत केली. आता त्यांच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्यांचाच उपयोग करताहेत.दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजीचा झेंडा अन् शिवाजीचा फोटो लावायचा अन् काळे धंदे चालवायचे. हा शिवाजीच्या प्रतिमेचा गैरवापर आहे. *भोंदू कोण अन् भक्त कोण हे ओळखायला शिवाजींना नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे.*
*संदर्भग्रंथ-*
शिवाजी कोण होता?
*लेखक - गोविंद पानसरे.*


" हिंदू धर्मरक्षक" म्हणून शिवरायांना बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की.,याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यास विरोध केला होता....
बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर ह्या मुसलमान झालेल्या व मुसलमानांत दहा-पाच वर्षे राहिलेल्या मराठ्यांना शिवरायांनी पुन्हा हिंदू करवून घेतले....
"लान्ड्या" म्हणून ज्याला हिणवत होते त्या बजाजी निंबाळकराच्या मुलास शिवरायांनी आपली स्वतः ची मुलगी दिली.
अफगानिस्तानात महंमद कुलीखान म्हणून आठ वर्षे राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतः च्या पंक्तीत बसविले...
धर्मासंबधीचा हा पुरोगामी विचार पेशवाईत इतका मागे पडला की पेशवाईतला सर्वात शूर पुरुष बाजीराव स्वतः च्या मुसलमान प्रेयसीच्या-मस्तानीच्या -मुलास हिंदू करण्याची इच्छा असुनही हिंदू करू शकला नाही......
मग
शिवकालीन हिंदू धर्म आणि पेशवेकालीन हिंदू धर्म एकच काय ??
शिवरायांनी अस्पृश्यांना व महारांना किल्लेदार बनविले होते..
आणि
पेशवाईत अस्पृश्य आणि महारांच्या पाठीला झाप आणि गळ्यात लोटके अडकवून रस्त्यांची शुद्धता केली जात होती....
शिवरायांच्या नावाने सेना स्थापून हिंदू ऐक्य घडवायला निघालेल्या सेनापतीना कोणता हिंदू धर्म प्रस्थापित करायचाय
शिवशाहीतला की पेशवाईतला ???
(संदर्भ-शिवाजी कोण होता? लेखक कॉ.गोविंद पानसरे)

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...