"समजा दहा हजार फूट उंचीचा एक पहाड आहे. त्याच्या पायथ्यापासून वीस किलो वजनाची साखरेची एक गोणी आपल्याला त्याच्या शिखरापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी आपल्याला खूप श्रम करावे लागतील. किती तरी वेळ द्यावा लागेल. चिकाटीनं आणि आशावादी आत्मविश्वासानं सगळा चढ चढावा लागेल. त्यानंतरच आपण ती गोणी शिखरावर पोचवू शकू. आता, ती गोणी तिथून दहा हजार फूट खाली टाकायची असेल, तर मात्र यातलं काहीही आवश्यक नाही. तिला थोडंसं ढकललं, की ती क्षणार्धात आपोआप खाली कोसळते. मैत्रीसारख्या नात्यांचंही असंच आहे. ती जोडायला, वाढवायला, खूप खूप काही आवश्यक असतं. ती मोडायला, संपवायला एखादा शब्द, एखादं पाऊल, एखादा क्षण पुरेसा होतो. ती जपली, तर जीवनाचा जमाखर्च फायद्याचा, नाही तर...?"
(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, मलपृष्ठावरून)
"आपल्या अज्ञानाचा पुरेसा तपशील हा आपल्या ज्ञानाकडच्या प्रवासामधला आपला एक महत्वाचा साथीदार म्हणा वा वाटाड्या म्हणा बनू शकतो आणि महत्वाचं म्हणजे ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेली नम्रता आणि उत्कंठा जपण्याचं कामही त्यामुळे होऊ शकतं. पेरणी करण्यापूर्वी शेतकरी पुरेशी मशागत करून पावसाची वाट पाहतो आणि पावसानं जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली, की बी पेरतो, त्याप्रमाणं आपल्या अज्ञानाच्या जाणिवेमुळं ज्ञानाच्या पेरणीसाठी आपली मनोभूमी सज्ज केली जाते. एक प्रकारे आपल्या अज्ञानाचं भान हेच आपण ज्ञानाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल, हेच ज्ञानाचं बीजारोपण, असंही म्हणता येईल. अर्थात, अज्ञानाचं भान आल्यावर ते दूर करण्याची इच्छा आणि त्यासाठी काही प्रयत्न आवश्यक आहेत, हे विसरू नये."
(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १७)
जो अज्ञानी मनुष्य आपलं अज्ञान ओळखतो, तो तेवढ्यामुळं देखील ज्ञानी ठरतो. याउलट, जो मनुष्य आपण ज्ञानी आहोत असं मानतो, त्यालाच 'अज्ञानी' असं म्हटलं जातं. आपण एखाद्या बाबतीत अज्ञानी आहोत असं कळणं, हेच एका मर्यादेत का होईना ज्ञानी असण्याचं, शहाणपणाचं, विवेकाचं लक्षण असतं.
आपल्या अज्ञानाचं भान असलं, तर मनुष्य मत बनवताना, निर्णय घेताना, कृती करताना उतावीळपणा करीत नाही. धीर धरतो. कळ काढतो. संयम बाळगतो. नम्र बनतो. इतरांबरोबरची नाती चांगल्या रीतीनं जपतो. त्याच्यावर धरसोड करण्याची, तोंडघशी पडण्याची, पश्चाताप करण्याची व क्षमा मागण्याची वेळ येत नाही. त्याउलट आपल्या अज्ञानाचं भान न ठेवता बेदरकारपणानं कृती केली, तर गंभीर चुका होऊ शकतात, नाती तुटू शकतात, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होऊ शकतं आणि वेळ टळून गेल्यावर चूक कळली तरी पश्चाताप करूनही हाती काही बी लागण्याचा धोका संभवतो.
अर्थात, आपल्या अज्ञानाचं भान आलं नाही, कृती करताना चुका झाल्या आणि क्षमा मागण्याची वेळ आली, तर क्षमा मागण्याचं उमेदपणही जरूर दाखवलं पाहिजे. हे उमेदपण आपल्याला आपल्या अज्ञानाचं भान आल्याचं सुचिन्ह म्हणता येतं."
(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १७)
"काही लोक असे असतात, की आपल्याला कळत नाही हे त्यांना कळत नाही आणि काही लोक असे असतात, की आपल्याला कळत नाही हे त्यांना कळतं. आपल्याला कळत नाही हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत ज्ञानाच्या दिशेनं पाऊल टाकण्याची प्रेरणाच स्फुरु शकत नाही. याउलट, ज्या क्षणी आपल्याला कळत नाही हे कळतं, त्या क्षणी ज्ञानाच्या दिशेनं आपल्या प्रवासाला सुरुवात होते - निदान होऊ शकते, होण्याचा मार्ग खुला होतो. अंधार हीच सृष्टीतील स्वाभाविक, सर्वोच्च आणि कल्याणकारक अवस्था आहे, अशी पक्की धारणा जोपर्यंत मनात असते, प्रकाश नावाची काही फार वेगळी, उत्तम चीज अस्तित्वात असते याची जोपर्यंत मनाला चाहुलच लागलेली नसते, तोपर्यंत अंधार नाकारण्याची, प्रकाश शोधण्याची इच्छा कशी निर्माण होईल ?"
(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १७)
"विशिष्ट व्यक्ती व ग्रंथ यांना पूज्य, पवित्र आणि निर्दोष मानलं जात असेल आणि त्यांच्याकडून दिली जाणारी चुकीची माहिती कमालीच्या श्रद्धेनं स्वीकारली जात असेल, तर अज्ञानच ज्ञानाचा मुखवटा घेऊन वावरतं, ते अज्ञान बाळगणारा कट्टर आणि प्रसंगी हिंसक बनवतं आणि यथार्थ ज्ञानाच्या वाटा रोखून धरतं. हे सर्व टाळायचं असेल, तर बाहेरून ज्ञान घेतलं तर पाहिजेच, पण ते घेताना ते यथार्थ आहे की नाही ते तपासलं पाहिजे, चिकित्सा करून ते स्वीकारायचं की नाकारायचं ते ठरवलं पाहिजे."
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - १८)*
"परिस्थितीचं अचूक ज्ञान प्राप्त करून हितकारक निर्णय घेता येणं, यथार्थ मूल्यमापन करून चांगलं स्वीकारणं आणि वाईट नाकारणं, एखाद्या गोष्टीचं शुद्धीकरण करणं, दोष दूर करणं, योग्य मार्गानं विकास साधणं, निरागस आनंद प्राप्त करणं, एखाद्याच्या विकासाला योग्य दिशा देऊन हातभार लावणं, एखाद्या गोष्टीविषयी संतुलित मत बनवण्यासाठी लोकांना मदत करणं, अशा प्रकारच्या उद्दिष्टांनी केलेली चिकित्सा समाजालाही मार्गदर्शक ठरते आणि चिकित्सा करणाराचंही उत्थान साधते. याउलट, कुणाचं चारित्र्यहनन करणं, बदनामी करणं, खच्चीकरण करणं, पूर्वग्रह निर्माण करणं, यांसारख्या नकारात्मक उद्दिष्टांनी केलेली चिकित्सा तात्पुरतं यश देऊन गेली, तरी अखेरीस अशा चिकित्सेवरचा विवेकी लोकांचा विश्वास उडतो, लोक तिच्याकडं गांभीर्यानं पहात नाहीत. याचा अर्थ अशी चिकित्सा चिकित्सेचा हेतूच गमावून बसते. याउलट, संतुलित चिकित्सापद्धती स्वीकारली असता यथार्थ ज्ञान योग्य रीतीनं प्राप्त करण्याचा मार्ग खुला होतो."
(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - २२)
"प्रत्येक माणसामधे अनंत अंत:शक्ती असतात. पण अनेकांना या शक्तींपैकी बहुतांश शक्तींच्या अस्तित्वाचं भानच नसतं, मग त्या साकार करणं ही दूरची गोष्ट झाली. अशा स्थितीत, आपण कोणाला त्याच्या अंत:शक्तीचं भान आणून दिलं, त्या साकार करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण केली, त्या साकार करण्यासाठी त्याला प्रयत्न करण्याचा मार्ग दाखविला, सहकार्य केलं, त्याला जबाबदारी पेलण्यासाठी स्वतंत्र व समर्थ बनवलं आणि आपल्या प्रेरणेतून त्याच्या हातून प्रत्यक्षरीत्या काही नवनिर्मिती घडवून आणली, तर त्याला अस्सल 'माणूस' बनवण्याची ही नवनिर्मिती फार फार सुंदर असते. इतरांना मोहरून-बहरून येण्यासाठी आपला थोडा का होईना हातभार लागणं, या निर्मितीचं लावण्य शब्दांच्या पलीकडचं आहे. निर्मिती चांगल्या अर्थानं संसर्गजन्य होणं आणि आपल्या समाजात नवनिर्मितीची मालिका व शृंखला निर्माण होणं, हे आपलं स्वप्न असायला हवं."
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३३)*
"सूर्य किती तेजस्वी, किती प्रखर आणि त्यामुळं किती प्रभावी आहे, हे प्रत्येकाला अनुभवला येत असल्यामुळं ते स्वतंत्रपणानं सांगण्याची आवश्यकता नाही. तरीही त्याची एक मर्यादा आहे. इतका तेजस्वी असूनही तो एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करू शकत नाही. पृथ्वीचा जो भाग त्याच्याकडं नसतो, तिथला अंधार नष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं नाही. हे नोंदवणं म्हणजे सूर्याच्या प्रकाशाची वा तेजाची निंदा करणं नव्हे, तर सृष्टीच्या अस्तित्वाशी संबंधित असलेलं एक वास्तव समजून घेणं आहे.
अनेकदा आपल्या सामर्थ्याविषयीच्या आपल्या कल्पना भन्नाट, अफलातून, गैरवाजवी, अतिशयोक्त असतात. त्यामुळं थोडंसं यश मिळालं, तरी आपण हुरळून जातो. आपली घमेंड वाढते. वास्तवाचं भान विरून जातं. याचं दुसरं टोक म्हणजे थोडंसं अपयश आलं, तरी आपण खचून जातो, आपल्या कर्तृत्वावरचा आपला विश्वास उडतो आणि मोठ्या उमेदीनं पाहिलेली आपली स्वप्नं आपणच चुरगाळून-कुस्करून फेकून देतो. ही दोन्ही टोकं टाळता यावीत, म्हणूनच सूर्याचं उदाहरण आपल्याला खूप उपयोगी पडू शकतं, असं मला वाटतं."
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ४२)*
"सर्व जग बदलण्याचं स्वप्न जरूर पहावं, पण आपल्या संपर्कातील एखाद-दुसऱ्या व्यक्तीला आणि तेही थोडंसं बदलू शकलो, तरी समाधान मानावं आणि मनुष्य मुख्य म्हणजे इतर कुणाला बदलण्याचा उद्योग सुरु करण्यापूर्वी आपण स्वतःला बदलण्याच्या दिशेनं शक्य तितका प्रवास केलेला असावा ! सूर्यही सगळं जग एकदम प्रकाशित करू शकत नसेल, तर आपण तसं करण्याचा हट्ट कशाला धरायचा ? पण सगळं जग एकदम प्रकाशित करू न शकणारा सूर्य स्वतःही सातत्यानं प्रकाशमय राहतो आणि आपली किरणं विशिष्ट क्षणी जिथपर्यंत पोचत असतील तिथपर्यंतचा प्रदेशही अखंडितपणे प्रकाशित करतो. एका बाजूनं मोठी मर्यादा असूनही दुसऱ्या बाजूनं त्याचं हे अखंडितपणानं प्रकाशमय असणं आणि इतरांना प्रकाशित करणं, हे अपल्याला जीवनाची सुंदर वाट दाखविणारं आहे.
*आपण सगळं जग बदलू शकणार नाही, हेही खरं आहे आणि आपण जगाला थोडं का होईना बदलल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकंच खरं आहे.* पहिल्या गोष्टीबद्दल निराश होण्याचं कारण नाही आणि दुसऱ्या गोष्टीची गैरवाजवी नशा डोक्यात चढू देण्याचंही कारण नाही !"
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ४२)*
"विशिष्ट पिकांना जन्म न देणारी नापीक जमीनही सर्वार्थानं नापीक असत नाही; मग पेरणी करण्यात आली नसल्यामुळं पडीक राहिलेली आणि निर्मितीच्या प्रतीक्षेत असलेली जमीन तर नापीक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्थात, हजारो वर्ष अज्ञानात पिचत पडलेल्या लोकांच्या पडीक प्रतिभेलाही हे लागू पडतंच - अगदी शंभर टक्के !"
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ३७)*
"आपण स्वतःच चांगल्या, हितकारक, उपयुक्त गोष्टींना मुकू, इतका आपला नकार ताणू नये, अशी माझी भावना आहे. आपल्याकडं येणारं जे काही अपायकारक असेल, ते दूरच अडवलं पाहिजे, हे खरं आहे. पण प्रकाशकिरण येण्याच्या वाटा मात्र कधीही बंद करू नयेत, असं मला वाटतं. त्या वाटा बंद केल्या, तर प्रकाशाचं काही नुकसान होत नाही, पण आपल्या भोवतीचा अंधार मात्र गडद होतो !"
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ४०)*
"खरं तर प्रत्येक माणसाच्या अंतर्यामी एक कवी असतो, एक तत्ववेत्ता असतो, एक कलावंत असतो. काही जणांना अनुकूल परिस्थिती लाभते आणि आपल्या प्रतिभेचा विकास करण्याची संधी मिळते. याउलट, काही जणांची उज्ज्वल प्रतिभा देखील प्रतिकूल, बाधक परिस्थितीच्या तडाख्यामुळं विरुन जाते, दबून राहते. अर्थात, बाहेरच्या रेट्यामुळं ती कितीही दाबून टाकली गेली, तरी त्या रेट्याला न जुमानता त्यांच्या आतील प्रतिभेच्या काही उर्मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे उसळी मारून बाहेर येतातच, आपल्या अवती भोवतीच्या, सर्वसामान्य परिस्थितीत जगणाऱ्या लोकांच्या जीवनात आपण थोडंसं डोकावलो, तरी देखील आपण सहजपणे त्यांच्या अंतर्यामी अस्तित्वात असलेल्या कवींचं आणि तत्ववेत्त्यांचं दर्शन घेऊ शकतो."
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ४४)*
"निसरड्या वाटेवरून चालताना आपला तोल जाऊ लागला, तर आपण हाताला लागेल त्या खांबाला, काठीला, झाडीच्या बुंध्याला व अशाच एखाद्या बाह्य आधाराला पकडून स्वतःला सावरतो. पण प्रत्येक वेळी आपल्या हाताला लागेल असा बाह्य आधार आपल्या आसपास असतोच असं नाही. एखाद्या शेवाळलेल्या खडकावरून आपण घसरू लागतो आणि आसपास काही आधार नसतो, तेव्हा तोल सावरण्यासाठी आपली आपल्यालाच कसरत करावी लागते. त्या तसल्या खडकावरच तळपाय कसे घट्ट टेकवता येतील, शरीराला क्षणार्धात योग्य बाजूनं कसं झुकवता-स्थिरावता येईल, ते पहावं लागतं.
आपलं मनही अनेकदा निसरड्या परिस्थितीवरून असंच घसरत असतं. त्याचा तोल सावरण्यासाठी प्रत्येक वेळी बाहेरून एखादा आधार मिळेलच, अशी स्थिती नसते. अशा वेळी आपण स्वतःच स्वतःला सावरावं लागतं."
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ६२)*
"यश कितीही झळकणारं असलं, तरी ते एक साधन असतं, ही त्याची दुसरी बाजू म्हणा व मर्यादा म्हणा असते. *जीवनाचं साध्य म्हणजे निकोप, निर्मळ, निरागस आनंद होय.* स्वतः अशा प्रकारचा आनंद मिळवायचा, आपल्या इतरांना सहभागी करून घ्यायचं, आपल्या यशानं-कर्तृत्वानं-सहवासानं इतरांना आनंद द्यायचा आणि इतरांच्या आनंदात सहभागी व्हायचं, यांसारखी त्याची अनेक रूपं असू शकतात. व्यावहारिक यशामुळं आनंद प्राप्त होण्याच्या वाटा खुल्या होतात आणि काही वेळा प्रत्यक्षात आनंद प्राप्त होतोही; पण त्याबरोबरच काही वेळा यश मिळूनही आनंद प्राप्त होत नाही, काही वेळा तर प्रत्यक्षरीत्या दुःख निर्माण होतं आणि त्यामुळं अनेकदा यश हे आनंदप्राप्तीमधला अडथळाही बनतं. याउलट, काही वेळा यशाच्या अभावीही आनंद मिळू शकतो."
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ७१)*
"आपल्या विकासाला विधायक प्रेरणा देणारी तुलना जरूर असावी. त्याबरोबरच मन उमदं ठेवून नाती जपणारी आणि सहकार्याला उत्तेजन देणारी तुलनाही जरूर असावी. पण मनाला कलुषित करणारी तुलना मात्र
आपला सगळा आनंदच हिरावून घेते आणि *आनंदच गमावून बसल्यावर जीवनात चोथ्याखेरीज दुसरं काय उरतं ?*"
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ७२)*
"यशापयश तरी कसं जोखायचं ? स्वतःच्या श्वासांवरून की दुसऱ्याच्या श्वासांना आपल्या श्वासांवर स्वार करून ? आपल्या हृदयाच्या स्पंदनांवरून, की दुसऱ्याच्या स्पंदनांना आपले स्वामी बनवून ? यशाची महत्वकांक्षा जरूर असावी, पण ती आपल्या रक्तात विष कालवीत असेल, तर ? ती आपल्याला पेलवत नसेल, चिरडून टाकत असेल, तर ? जीवनात यशापयश येतंच. आपण अपयश धैर्यानं पचवावं, पण यश विवेकानं पचवावं, जगावं आपल्या निसर्गानुसार, आपल्या अस्तित्वाच्या आधारे. कुणाबरोबर नकारात्मक तुलना करून स्वतःला स्वतःपासून तोडू नये, आपला आनंद गमावू नये !"
*(मित्रांना शत्रू करू नका, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक - ७२)*

No comments:
Post a Comment