Flash

Wednesday, 19 April 2017

‘चावट’पणाची उलटतपासणी - वैशाली चिटणीस


जगात सगळीकडेच दर काही काळाने एखाद्या कलाकृतीच्या निमित्ताने अश्लीलतेसंदर्भात वाद निर्माण होत असतात. सतत का होतात हे असे वाद? एखाद्या कलाकृतीमुळे समाजात अश्लीलता वाढली आहे, असं खरोखरच होत असेल का?
* अश्लीलता हा मेंदूचा गुण असतो. - र. धों. कर्वे
* जगात अश्लील नसलेलं असं एकच पुस्तक आहे, ते म्हणजे टेलिफोन डिरेक्टरी - जॉर्ज बर्नाड शॉ
अश्लीलतेसंदर्भातल्या चर्चेला संदर्भ आहे, प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या एका कृतीचा. नाटय़गृहाने ‘एक चावट संध्याकाळ’ आणि ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या दोन्ही नाटकाच्या सादरकत्यार्ंना आपल्या नाटय़गृहात ही दोन्ही नाटकं सादर करायला मनाई केली. प्रेक्षकांनी तोंडी तक्रार केल्यामुळे असा निर्णय घेतल्याचं पत्र नाटय़गृहाने सादरकत्यरंना पाठवलं आहे. त्यानिमित्ताने नाटय़क्षेत्रातले कार्यकर्ते अशोक मुळे यांनी पुढाकार घेऊन ‘नक्की चावट कोण?’ असा एक परिसंवाद आयोजित केला. त्या परिसंवादात बोलण्यासाठी ‘एक चावट संध्याकाळ’चे लेखक अशोक पाटोळे, ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’च्या लेखिका वंदना खरे, नाटय़ परिषदेच्या कार्यवाह स्मिता तळवलकर, सेक्सॉलॉजिस्ट डॉ. विठ्ठल प्रभू आदी सगळी मंडळी आली होती.
‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे नाटक गेली काही वर्षे सादर होत आहे. ‘चावट संध्याकाळ’ हे मात्र नवीन नाटक. पण फक्त प्रौढ पुरुषांसाठी अशी जाहिरात केली गेल्यामुळे या नाटकाकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. मग हे नाटक स्त्रियांसाठी का नाही, हा प्रश्न उपस्थित केला गेला. नाटकातला आशय स्त्रियांना आवडणार नाही, नाटक बघितलं तर त्या मोर्चे घेऊन येतील असा लेखकाचा दावा होता. त्यामुळे हे नाटक सुरुवातीला स्त्रिया बघू शकल्या नाहीत. आता नुकतंच ते स्त्रियांसाठीही खुलं केलं गेलेलं असलं तरी अजून तरी मोजके अपवाद वगळता हे नाटक स्त्रियांनी बघितलेलं नाही, हे गृहीत धरूनच त्यासंदर्भातली चर्चा झाली आहे. ‘मुळात स्त्रियांनी बघू नये’ असं लेखकालाच वाटावं, असं या नाटकात काय आहे..

लाट असेल तर ओसरेल -अशोक पाटोळे
विनोदी नाटकासाठी विषय शोधताना मला लक्षात आलं की पार्टी जोक्स लोक एन्जॉय करतात. पण ते अद्याप स्टेजवर आलेले नाहीत. म्हणजे ते लोकांना हवेत की नकोत, असा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. त्यातून हे नाटक उभं राहिलं. ‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक फक्त प्रौढ पुरुषांसाठीच का, असा लिंगभेद का केला जातो आहे, असा ओरडा सुरू झाला. पण काही जोक हे पुरुष बायका नसतानाच सांगतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक सगळ्यांसाठी खुलं ठेवलं असतं तर स्त्रियांचाच हे नाटक फाजील आहे असं म्हणत मोर्चा आला असता. शिवराळ साहित्याची मानसिक, शारीरिक गरज या विषयावर पीएचडी करणाऱ्या एक बाई मानसशास्त्राच्या प्राध्यापकांना संपर्क साधतात. तो आपल्या सेक्सॉलॉजिस्ट मित्राला बोलवतो आणि ते दोघंही पौंगडावस्था ते वृद्धत्व या काळातली पुरुषाची मानसिकता, त्याची गरज या विषयावर जोक्स सांगत चर्चा करतात आणि ती चर्चा रेकॉर्ड करून त्या बाईंना देतात, असं या नाटकाचं स्वरूप आहे. यात नॉनव्हेज जोक्स आहेत. ते पुरुषांच्या मानसिकतेचा वेध घेतात. ते नेटवर पण उपलब्ध आहेत, पण नाटकातून काहीतरी कलात्मक आनंद मिळतो म्हणून लोक येतात. लोकांना लैंगिकता या विषयात फार उत्सुकता आहे. आपल्या समाजात फार दडपणं आहेत. सेक्शुअल डिप्रेशन आहे. मुलांना नीट माहिती, मार्गदर्शन मिळत नाही. ते मिळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्यांना हा असभ्यपणा वाटतो त्यांनी नाटक बघू नये. हे नाटक बघायला येताना लोक काही उदात्त हेतूने येत नाहीत. ते दोन घटका हसायला, करमणूक करून घ्यायला येतात. दुसऱ्याचं दु:ख कणभर का होईना कमी करणं हा माझा हेतू आहे. पार्टी जोक्स स्टेजवर स्वीकारले जातात की नाही हा मला प्रयोग करून बघायचा होता. आता काहीजणांचं म्हणणं आहे की हे नाटक आवडणं ही लाट आहे. तसं असेल तर योग्य वेळी ती ओसरेल एवढंच माझं म्हणणं आहे.

तर एका स्त्रीच्या पीएचडीच्या निमित्ताने दोन पुरुषांनी एकमेकांशी मारलेल्या गप्पा आणि या गप्पांमध्ये पार्टीत किंवा एरवी सांगितले जाणारे नॉनव्हेज म्हणता येतील असे जोक्स. ते अर्थातच जाहीरपणे ऐकायला स्त्रियांनाच आवडणार नाही, असं लेखकाचं म्हणणं आहे.
पुरुषांची लैंगिकता आणि मानसिकता - डॉ. विठ्ठल प्रभू
‘एक चावट संध्याकाळ’ या नाटकात पुरुषांच्या पौंगडावस्था ते वृद्धत्व या दरम्यानच्या काळातल्या मानसिकतेची, गरजांची चर्चा करण्यात आली आहे, असं नाटककारानेच सांगितलं आहे. काय असतात या गरजा आणि काय असते या वेगवेगळ्या वयोगटातली पुरुषांची मानसिकता?
आपल्या समाजामध्ये लैंगिकतेकडे विनाकारण वेगळ्या नजरेने पाहिले जाते. ती एक नैसर्गिक गोष्ट असल्याने निसर्गाच्या नियमानुसार या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचे एक शास्त्र आहे. आपल्याकडे लैंगिकतेबद्दल फारसे संशोधन झालेले नाही. जर आपण मानवी शरीराची रचना अभ्यासली तर आपल्यासमोर काही गोष्टी स्पष्ट होतील आणि लैंगिकतेबद्दल असणारे अनेक गैरसमज दूर होतील. आपल्या शरीराची जी गरज आहे तिला आनंदाची जोड दिली गेली आहे. पोषण आणि पुनरुत्पादन ही सजीवांची प्रमुख गरज मानली जाते. स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराची रचना पाहिली तर असे दिसते की, स्त्रीच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि प्रोलॅक्टीन ही संप्रेरके आहेत. यातील कोणतेही संप्रेरक हे सेक्सची इच्छा वाढवणारे नाही. याउलट पुरुषांमध्ये असणारे टेस्टोस्टोरॉन हे संप्रेरक सेक्सची इच्छा निर्माण करणारे आणि शुक्राणू निर्माण करणारे आहे. जसजसे पुरुषाचे वय वाढत जाते तसे या संप्रेरकाचे शरीरातील प्रमाण कमी होते. त्यामुळेच उतारवयात त्यांची सेक्सची इच्छा कमी होते. वयाच्या १२ व्या वर्षांनंतर पुरुषाच्या लैंगिक जाणिवा जागृत होण्यास सुरुवात होते. त्याला स्त्रीच्या शरीराचे आकर्षण वाटायला लागते. याच काळात स्वप्नदोष होण्यास सुरुवात होते. हळूहळू तो हस्तमैथुन करण्यास सुरुवात करतो. हे सर्व नैसर्गिकपणे होत असते. ते होणे आवश्यक असते. हस्तमैथुन करण्यात कोणताच धोका नाही. ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. आपल्याकडे याबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे काही मुलांना हस्तमैथुन करण्यामध्ये अनैतिकता वाटते. म्हणून ते हे टाळतात, पण त्यामुळे त्यांना नैराश्य येते. काही वेळा सततच्या नैराश्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे हस्तमैथुन करण्यामध्ये काही गैर नाही. जर ही नैसर्गिक क्रिया झाली नाही तर विवाहानंतर वीर्यस्खलन नीट होत नाही.
पुरुष विवाहानंतर जेव्हा संभोगाचा अनुभव घेतो तेव्हा सुरुवातीला त्याला त्याचे आकर्षण वाटते. पुढे जसे वय वाढत जाते तसे त्याचे लैंगिक आकर्षण कमी होते. याचे शास्त्रीय कारण जर पाहिले तर आपल्याला असे दिसते की जसे त्याचे वय वाढते तसे त्याच्या शरीरातील टेस्टोस्टोरॉनचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे त्याच्यामधील लैंगिकता कमी होते.

अश्लीलतेची चर्चा समाजात नेहमीच चालत असते. कारण सभ्यतेच्या, अर्थातच श्लीलतेच्या प्रत्येक समाजाच्या म्हणून काही कल्पना असतात. खरं तर त्या स्थलकालव्यक्तीसापेक्ष असतात. म्हणजे एके काळी स्त्रियांनी शिकणं हेसुद्धा चुकीचं मानलं गेलं होतं. स्त्रियांना शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना दगड आणि शेणाच्या माऱ्याचा सामना करावा लागला होता. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं पाश्चात्त्य समाजात अश्लील समजलं जात नाही. पण आपल्याकडे ते आक्षेपार्हच आहे. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला अश्लील वाटते तर दुसरीला वाटत नाही. त्यामुळे अश्लीलते-बद्दलचे वाद हे नेहमी होतच आले आहेत.
आताही ‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक अश्लील, बीभत्स आहे, दोन-चार पुरुषांनी कंपू करून एकमेकांना सांगायचे अश्लील विनोद रंगभूमीवरून सांगणं याला नाटक कसं म्हणायचं, असं हे नाटक बघून येणाऱ्यांचं म्हणणं आहे.
चावट, अश्लील, बीभत्स, पांचट, हिडीस, भ्रष्ट या सगळ्यांमध्येच एक पुसट अशी सीमारेषा आहे. ती ओलांडायची नाही हे सगळ्यांनाच माहीत असते. तसा अलिखित संकेत असतो, कारण ती ओलांडणं हे अवमूल्यन असतं. पण तरीही ती ओलांडली जाते तेव्हा ती प्रतिक्रिया येते.
खरं तर या सगळ्या चर्चेत हे नाटक, त्याला होणारा विरोध हे फारसं महत्त्वाचं नाहीच. त्याचं कारण म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की जे सकस असतं, काळाच्या पलीकडे जाणारं असतं, ज्याच्यात टिकण्याची क्षमता असते ते कितीही, कसाही विरोध झालं तरी टिकतंच. तेंडुलकरांची नाटकं हे त्यासंदर्भातलं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे एखाद्या कलाकृतीला विरोध करण्यापेक्षा ज्याला जे हवं ते त्याने करावं, ज्याला जे हवं ते त्याने पाहावं. चांगलं असेल ते आपोआपच टिकतं आणि हिणकस असेल ते नष्ट होतं. मुळात एखाद्या पुस्तकामुळे, नाटकामुळे, सिनेमा बघून समाजात अश्लीलता वाढीला लागली आहे, समाजाचं मानसिक आरोग्य बिघडलं आहे, असं कधी होत नसतं.
समाजाच्या नैतिकतेच्या कल्पना काळानुसार बदलत असतात. त्यामुळे अमुक गोष्ट श्लील आणि तमुक गोष्ट अश्लील असं काही ठरवता येत नाही. तशी काही व्याख्याही करता येत नाही. र. धों कर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे अश्लीलता हा तुमच्या मनाचा गुणधर्म असतो. तुम्ही पाहाल तसं दिसतं. त्यामुळे या सगळ्यामध्ये मुद्दा आहे मानसिकतेचा. एखाद्या गोष्टीला किती बळी पडायचं, तिला किती महत्त्व द्यायचं याचा. कोणतीही कलाकृती पटली नाही, आवडली नाही की स्वत:ला संस्कृतिरक्षक मानणारे लोक उठून विरोधात उभे राहतात. पण त्यापेक्षा तुम्ही तिची खोलवर समीक्षा करा. जे आहे ते वाईटच कसं आहे सैद्धांतिक मांडणी करा. ती लोकांना पटवून द्या आणि त्यांनाच निर्णय घेऊ द्या. एखादी कलाकृती चार लोकांना आवडली नाही म्हणून त्यांनी उरलेल्या ९६ लोकांचा ती बघून चांगली-वाईट ठरविण्याचा हक्क नाकारणं चुकीचंच आहे.
आणखी एक मुद्दा आहे चावट, अश्लील, हिणकस, बीभत्स, हे सगळं नेमकं कशाला म्हणायचं? या सगळ्या गोष्टी फक्त लैंगिकतेशी संबंधितच असतात का?

चावट विनोद हा हिंसाचारच - वंदना खरे
कोणत्याही नाटकावर अश्लीलतेचा शिक्का मारला जातो आणि त्यातून वाद होतात तेव्हा हे सगळे वाद हे वेगवेगळ्या सेन्सॉरशिपशी जोडलेले असतात. मला असं वाटतं की कोणत्याही कलाकृतीवर समाजाची, गुंडांची, सरकारची सेन्सॉरशिप असू नये. समाजात सर्व प्रकारच्या भावनांना व्यक्त व्हायला वाव असला पाहिजे. ज्यांना ज्या प्रकारची नाटकं करावीशी वाटतात, त्यांना ती करता यावीत. ज्यांना ज्या प्रकारची नाटकं पाहावीशी वाटतात, त्यांना ती पाहता यावीत. ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या माझ्या नाटकाला तसंच पाटोळे यांच्या ‘एक चावट संध्याकाळ’ या नाटकाला प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाने मनाई केली. मग मी फेसबुकवर पोस्ट टाकली की हे असं करणं बरोबर आहे का? त्याला १००-१५० लोकांनी प्रतिक्रिया टाकल्या की हे चुकीचं आहे.
प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाने ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ आणि ‘एक चावट संध्याकाळ’ या दोन्ही नाटकांच्या सादरीकरणाला मनाई केल्यामुळे या दोन्ही नाटकांना एकत्र ठेवून चर्चा होते आहे. पण माझं असं मत आहे की या दोन्ही नाटकांची तुलना होऊच शकत नाही. कारण आपण पुरुषप्रधान समाजात वावरतो. सर्व प्रकारची अगदी भाषा वापरण्याचीही सत्ता निर्विवादपणे पुरुषांच्या हातात आहे. या भाषिक सत्तेचा दुरुपयोग करून स्त्रियांवर हिंसाचार होतो. त्या सत्तेमुळे स्त्रियांचं दमन होतं. दमन झालेला गट वेगवेगळ्या माध्यमातून स्वत:चा विरोध नोंदवायचा प्रयत्न करतो. दमन करणाऱ्या गटानेही तेच करणं हे मला मान्य नाही.
पाटोळे म्हणतात की, स्त्रियांसाठी वेगळी टॉयलेट्स असतात, बस असतात, ट्रेनचा डबा असतो, मग पुरुषांसाठी वेगळं नाटक असायला काय हरकत आहे? स्त्रियांसाठी या सगळ्या सुविधा वेगळ्या असतात त्या हिंसाचारापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी. बचाव करण्यासाठी. पुरुषांवर असा कुठला हिंसाचार होतो की त्यासाठी त्यांच्यासाठी वेगळं नाटक असण्याची गरज वाटावी..
अशोक पाटोळे यांचा मला त्यांच्या नाटकाला मनाई केल्यावर फोन आला. त्यांचं नाटक मी पाहिलेलं नाही पण त्यांच्या नाटकावरही नाटय़गृहाने अशी बंदी आणू नये, असं माझं मत आहेच; पण पुढे जाऊन मी असं विचारेन की, प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या समांतर सेन्सॉरशिपला पाटोळे एकीकडे विरोध करतात आणि दुसरीकडे स्त्रियांनी आपलं नाटक बघू नये, ही समांतर सेन्सॉरशिप ते स्वत: राबवतात त्यांचं काय?
दुसरीकडे अशोक पाटोळे अशीही दुटप्पी भूमिका घेतात की हे नाटक स्त्रियांनी पाहू नये, असं मला वाटतं. कारण त्यात पुरुषांची प्रायव्हसी जपली आहे. मग तसं असेल तर तुम्ही हे नाटक सार्वजनिक ठिकाणी का करता?
‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नाटकातून स्त्रीच्या लैंगिकतेचं सातत्याने जे दमन होतं असतं, त्याविरुद्धची माझी कॉमेंट मी मांडली आहे आणि मुख्य म्हणजे माझ्या बाकीच्या आयुष्यातही मी हेच काम करते. मी गेली २० वर्षे स्त्री-पुरुषांच्या लैंगिकतेसंदर्भात कार्यशाळा घेते. त्यामुळे ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे नाटक माझ्या कामाचा, माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून येतं. मग स्त्रियांना अपमानास्पद वाटतील असे विनोद सांगणं हा पाटोळेंच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे की काय? त्यांचं हे नाटक मी पाहिलेलं नाही. स्त्रियांना अपमानास्पद वाटेल असा काही भाग त्यांच्या नाटकात आहे, असं मला सांगितलं गेलं आहे. ते नाटक स्त्रियांनी पाहू नये असं त्यांचंही म्हणणं आहे. मग असं नाटक मुळात तुम्ही का लिहिता? स्टेजवरून सादर तरी का करता? स्त्रियांचा असा विनोदाच्या अंगाने अपमान करायचा तुम्हाला काय हक्क आहे? ही केवळ करमणूक नाही तर स्त्रियांना अपमान वाटेल असे विनोद सांगणं हा स्त्रियांविरुद्धचा हिंसाचार आहे आणि वर्षांनुवर्षे पुरुष तो करतच आहेत त्यात तुम्ही भर का घालता?

कॉमेडीच्या नावाखाली..
प्रौढांसाठी असलेले सिनेमे नाटकं बघण्यासाठी उठून नाटय़गृहापर्यंत जावं लागतं. म्हणजे या गोष्टी थेट तुमच्या घरापर्यंत येऊन धडकत नसतात. त्या घराबाहेर थोपवणं, लहान मुलांना त्यापासून लांब ठेवणं तुलनेत शक्य असतं. पण घराघरात टीव्हीवर मराठी, विशेषत: हिंदी वाहिन्यांवर विनोदी कार्यक्रमांच्या नावाने जो काही धुडगूस सुरू असतो त्याचं काय? या कार्यक्रमांमध्ये काही वेळेला अक्षरश हिणकस, बीभत्स, अश्लील, चावट असे सगळ्या प्रकारचे सादरीकरण असते. त्या विनोदांना हसणं, त्यांना विनोदी समजणं तर शक्यच नसतं, उलट त्या सादरीकरणाची किळसच येते. हे कार्यक्रम एकाच वेळी लाखो घरामध्ये पाहिले जात असतात. तेही आजीआजोबा, लहान मुलं सगळे एकत्र असतात. अशा वेळी इतक्या हिणकस गोष्टी माथी मारल्या जात असताना त्याविरुद्ध मात्र कुणीच काहीच बोलत नाही. हे टीव्हीवरचे तथाकथित विनोदी आणि खरं तर बटबटीत, बीभत्स कार्यक्रम लहान मुलांनी ऐकू नयेत, पाहू नयेत असे विनोद करतात आणि ते आपल्या घरात आपल्या दिवणखान्यात थेट येऊन पोहोचतात. त्यांना आपण कधी आणि कसा आक्षेप घेणार? या बाबी संस्कृतीरक्षकांच्या लक्षात येत नाहीत का?

वास्तव नव्हे, प्रतिक्रिया - अ. द. मराठे 
(संपादक, अभ्यासक- मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार )
मराठीतल्या असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार या पुस्तकाच्या निमित्ताने अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं आहे की, अश्लीलता हे वास्तव नाही तर ती एक प्रतिक्रिया आहे. संस्कृती, शिक्षण यांच्या दडपणातून माणूस विशिष्ट पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला शिकतो. आजही ग्रामीण भागात ही दडपणं तुलनेत कमी असल्यामुळे शहरी समाज ज्याला असंस्कृत म्हणतो अशा म्हणी, वाक्प्रचारांचा सर्रास वापर होतो आणि त्याबद्दल कुणाचा काहीही आक्षेपही नसतो. कारण ती भाषा ही त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असते.
आमच्या गावाकडची म्हणजे राजापूरकडची उदाहरणं सांगतो. एका मुलीचं लग्न मोडलं. ती सारखी रडत बसायची. आई तिला म्हणते, कशाला रडतेस ७७७ तुला कुणीही दुसरा मुलगा मिळेल. त्या पोराला काय सात ७७७ आहेत का?
दुसरं उदाहरण. घरातल्या लहान मुलाने मोलकरणीची खोडी काढली तर तिने जे शब्द वापरले ते ऐकून त्या मुलाची आई तिला ओरडली की मुलांसमोर हे असले शब्द काय वापरतेस. पुन्हा एक शिवी घालत मोलकरीण म्हणाली, ७७७माझ्या लक्षातच नाही आलं. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, संवादासाठी ज्यांचा बोलीभाषेवर भर असतो त्यांना ते अश्लील वाटतच नाही. कारण तशी भाषा हा त्यांच्या जगण्याचा भाग असतो. ती त्यांची भाषिक अभिव्यक्ती असते.
म्हणजेच अश्लीलता ही सापेक्ष गोष्ट आहे. एखादा शब्द एखाद्याला अश्लील वाटेल तो दुसऱ्याला तसा वाटेलच असं नाही. एखाद्या प्रांतात तो अश्लील असेल तर दुसऱ्या प्रांतात अश्लील असेलच असं नाही. श्री. के. क्षीरसागर तसंच प्र. के. अत्रे यांनी उद्धव ज. शेळके यांच्या एका कादंबरीवर अश्लील म्हणून टीका केली होती. कारण त्यांना ती अश्लील वाटली होती. पण माझ्या दृष्टीने तो मराठी भाषेच्या प्रगतीचा टप्पा होता. कारण त्यामुळे ते विशिष्ट शब्द, त्यांच्या संकल्पना लिखित भाषेच्या वर्तुळात आल्या.

गरीब आदिवासी पोरांना उपाशी ठेवून त्यांच्यासाठीचे पैसे हडप करून स्वतच्या तुंबडय़ा भरणं हा व्यवहार फक्त भ्रष्ट? गेले काही दिवस कोळसा प्रकरणावरून ज्या पद्धतीने संसदेचं कामकाज रोखून धरलं गेलं आहे, त्यामुळे देशाचं जे करोडो रुपयांचं नुकसान होतं आहे ते फक्त राजकारण? अनाथाश्रमातल्या मुलींच्या बाबतीत जे केलं जातं ते फक्त शोषण? ए. राजा आणि कंपनीने व्यवस्थेतल्या त्रुटींचा फायदा घेत देशाचं करोडो रुपयांचं नुकसान करणं काय आणि भोपाळ वायूपीडितांना आजही न्याय न मिळणं काय! आपले, आपल्या पक्षाचे खिसे भरताना रस्ते जाणीवपूर्वक वाईट दर्जाचे राहिले आणि लाखो लोकांचं रोजचं जगणं वेठीला धरलं गेलं तरी त्याची तमा न बाळगणं हे सगळे व्यवहार म्हणजे भ्रष्टाचार आहे असं म्हणून आपण त्यांचं गांभीर्य कमी करतो. खरं तर हे सगळेच व्यवहार अश्लील, बीभत्स, हिणकस, चावटपणाचे आहेत. ते करणाऱ्यांच्या बाबतीत सगळं माहीत असूनही आपण गप्प बसतो. कारण तिथे विरोध करणं आपल्याला शक्य नसतं आणि मग एखादं नाटक, एखादं पुस्तक, एखादा सिनेमा घेऊन त्यात न पटलेल्या गोष्टींना चावट, अश्लील म्हणून धोपटत राहतो. कारण ते सोपं असतं.
response.lokprabha@expressindia.com

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...