शाहू महाराजांचे अनेक विचार शाहू भक्तांपर्यंत पोहोचले नाहीत . त्यांच्या व्यवहाराचा अर्थ त्यांच्या प्रतिमा आणि पुतळे पूजणार्यांपर्यंत गेलेला नाही . त्यांच्या व्यवहारासंबधी अनेक गैरसमज आहेत . मुद्दाम पसरविलेले आहेत . त्यांचे विचार आणि त्यांच्या व्यवहाराचा खरा अर्थ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू देण्यात आलेला नाही .
अजूनही खरे शाहू महाराज पूर्णत्वाने बहुजनसमाजापर्यंत पोहोचलेले नाहीत . म्हणून हा लेख प्रपंच करीत आहे .
शाहूराजांचे वारस कोण ?
आज आपणास आणखी एक विचित्र स्थिती दिसते . सरकारी - निमसरकारी नोकर्यांत राखीव जागा ठेवण्यास विरोध करणारे सुद्धा शाहूराजांचा जयजयकार करतात आणि राखीव जागा असाव्यात असे म्हणणारेही जयजयकार करतात . गोरगरीब शेतकर्यांची कष्टाची किंवा शेती पिकावी म्हणून त्यांना धरण बांधून , सवलती देवून मदत करावी म्हणणारेही शाहू प्रतिमेचे पूजन करतात आणि ज्याचे त्याने पहावे , सरकार कुणालाही मदत वगैरे करू नये असे म्हणणारेही शाहू प्रतिमेचे पूजन करतात . चातुर्वर्ण्याचा , सतिप्रथेचा , उच्च - निचतेचा पुरस्कार करणारेही शाहू महाराज की जय म्हणतात आणि त्यांना विरोध करणारेही तेच करतात . कामगारांनी आपले संघ स्थापून भांडवलदारांच्या पिळवणूकीस विरोध करावा असे मुंबईच्या कामगारांसमोर भाषण करणाऱ्या शाहू महाराजांच्या जाहीरपणे व्यक्त झालेल्या विचारासारखे विचार स्वीकारून संघटना स्थापनारे व चालविणारेही शाहू उत्सवांत सहभागी होतात आणि कामगार संघटनांना विरोध करणारे ही उत्सव करतात . बहुजनांना शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे असे सांगणार्या शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे ती मागणी आजही करणारे शाहूभक्त आहेत आणि शिक्षणाचे खाजगीकरण करावे , शिक्षण ही शासनाची जबाबदारी नाही असे म्हणणारेही शाहुभक्त आहेत .
यातले शाहूराजांचे खरे वारस कोण ? आणि खोटे मतलबी वारस कोण आहेत ?
आजच्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांच्या भाषेत बोलायचे तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनासुद्धा शाहू महाराजांचे कौतुक करतात आणि दलितांच्या संघटनाही शाहू भक्ती करतात . कॉंग्रेस पक्षही शाहूभक्त म्हणवितो आणि क्मुनिस्ट सोशालीस्टसुद्धा शाहूंचा वारसा पुढे घेऊन जाण्याची भाषा करतात . शाहू महाराज हे शुद्र आहेत म्हणून त्यांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही , असे म्हणणारे भट - भिक्षुक ब्राम्हणही शाहू महोत्सवात सहभागी होतात आणि वेदच टाकाऊ आहेत असे सांगणारेही शाहूश्रद्धा बाळगतात . स्वतःच्या व्यवहारांनी आणि विचारांनी सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक विषमता वाढविणारेही ' जयशाहू ' म्हणतात आणि सरप्रकारच्या समतेसाठी संघर्ष करणारेही ' जयशाहू ' म्हणतात आणि सर्व प्रकारच्या समतेसाठी संघर्ष करणारेही ' जय शाहू ' म्हणतात . म्हणूनच शाहू महाराजांच्या विचारांच्या आधारे आणि त्यांच्या व्यवहारामागील भूमिकेच्या आधारे शाहू महाराजांचे खरे वारस कोण हे तपासले पाहिजे .
- वाचा - राजर्षी शाहू ; वसा आणि वारसा . ले . ad. गोविंद पानसरे . पृष्ठ -१०.
- वाचा - राजर्षी शाहू ; वसा आणि वारसा . ले . ad. गोविंद पानसरे . पृष्ठ -१०.
No comments:
Post a Comment