अनुक्रमणिका
*बहुजनांनो ,जिभेला वळण लावा...(भाग १ )*
*तू काय शाहू महाराज लागून गेलास होय ....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २ )*
*काय..."नगरातनं " आला आहेस काय ???*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ३ )*
*आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात होय ??*
|
*बहुजनांनो , जिभाला वळण लावा...( भाग ४ )*
*पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो रे....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ६ )*
*शिकून कोण मोठं झालंय...शिकून कुणी " धन "पाडलयं...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ७ )*
*"आम्ही उडतेल्या पक्ष्यांची पंख मोजतोय..."*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा ...( भाग ८ )*
*आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही ....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ९ )*
*" काय रे , "शेंडापार्कातून" आलायस काय "?...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १० )*
*"आमचा नाद करायचा नाही ..."*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ११ )* *नशिबात आहे तेच होणार...कशाला त्रास घ्यायचा ??*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १२ )* *रडायला काय बाई आहेस होय.....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १३ )*
*उद्याचे कुणी बघितलंय , आजच जगून घ्यायचं...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १४ )*
*गावाकडनं आलं येडं...न् भज्याला म्हणतंय पेडं...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १५ )*
*"कुठं भंगीकाम करून आलायस काय..."*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १६ )*
*" राजकारणचे तेवढे नावं घेऊ नकोस बाबा..."*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १७ )*
*" रुबाब पायजे "*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १८ )*
*ए काळतोंड्या , ए काळुंद्रे..*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १९ )*
*लै विचार करु नको...डोके फिरंलं...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २० )*
*हे अस्सच चालणार...काय बदलत नाही रावं....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २१ )*
*बाईमाणसाला यातलं काय कळतयं हो...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २२ )*
*जातीसाठी माती खावी....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २३ )*
*शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २४ )*
*वाचून कोण शहाणं झालंय आजवर....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २५ )*
*' बायकी ' कामे कसली करतोस रे....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २६ )*
*गरीब लेकाची , लै माजोरी असतात ...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २७ )*
*जे , होतंय ते , चांगल्या साठीच...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २८ )*
*प्रेमात अन् युध्दात सर्व काही क्षम्य असते...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २९ )* *प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या ' पाठीशी ' एक स्त्री असते....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ३० )*
*गाव तेथे महारवाडा....*
|
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ३१)*
*महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे...*
|
*बहुजनांनो , जिभेला वळत लावा...लेख समाप्ती..*
|
==================================================================================================================
*बहुजनांनो ,जिभेला वळण लावा...(भाग १ )*
*तू काय शाहू महाराज लागून गेलास होय ....*
अगदी सहज पण उपहासात्मक असे वरील वाक्य आपण पावलोपावली ऐकत असतो. कोणत्याही ठिकाणी कोणीही ऐरागैरा शाहू महाराजांचा असा ' उध्दार ' करत असतो. आपणही हे उद्गार अगदी सहज घेतो. परिणामी अत्यंत स्वस्त असे हे उद्गार एका महामानवाचा कळत नकळत उपमर्द करतेय याची जाणीव आपणाला राहत नाही .
लोकराजा शाहू महाराज हे विसाव्या शतकातील अत्यंत उदार व दुरदृष्टीचा राजा. शिवछत्रपतीचा रयत जोपासण्याचा कृतीशील वारसा शाहूंनी पुढे चालवाला. आपल्या छोट्याशा करवीर संस्थानात २१ व्या शतकातही भल्याभल्यांना पचायला जड जाईल अशी कार्ये या लोकराजाने करून दाखवली. परिणामी कोल्हापूर हे नाव महाराष्ट्रात नव्हे ...देशात नव्हे ..तर जगाच्या नकाशावर ठळकपणे नोंदवले गेले. *लोकराजा शाहूचे कोल्हापूर नगरी...*असे सर्वत्र नाव दुमदुमते.
" तू काय शाहूमहाराज लागून गेलास काय ??" असे म्हणणारे मुर्ख लोकांना शाहूची कामे कदाचित ठाऊक नसावीत. *करवीर संस्थान सुजलाम सुफलाम करणारे , राधानगरी धरण बांधून देशातील पहिले धरण बांधणारे , मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काळाच्या पुढील पावले उचलणारे , बहुजनातील शोषीतांना आरक्षण लागू करणारे , शिवमंदीर उभारून जगभर शिवचरित्र पोचवणारे , कलावंत , खेळाडू , पत्रकार घडवणारे , स्त्री सन्मान राखणारे , हिंदू मुस्लिम एकता घडवून आणणारे , ब्राम्हण्यवादी शक्तीविरोधात दंड थोपटून उभे राहणारे , अडाण्याला शहाणे बनवणारे व शहाण्याला विद्वान बनवणारे आणि विद्वानला लोकहितासाठी मार्गदर्शन करणारे ....असे एक ना अनेक रुपे वर्णीता येतील.*
*आज कोल्हापूर जिल्हा सर्व बाबतीत अग्रभागी असण्याचे एक अन् एकच कारण असे की हा जिल्हाशाहूराजाच्या त्यागाने , दुरदृष्टीने पुनीत झाला आहे.*
मग प्रश्न असा की , शाहूराजाचे नाव आपल्या ओठी गौरवाने यावे की उपहासाने ?? *ज्या माईच्या लालाने शाहू महाराजांच्या नखाएवढेही लोककार्य केलेले नसते त्याने कळत नकळतपणे केलेला उपहास योग्य आहे काय ?? मला तरी हे निषेधार्ह वाटते .*
*बहुजनांच्या लेकरांनो , आता जिभेला वळण लावा. आपल्याच तोंडाने आपल्या महामानवांचा उपमर्द आपण करावा काय ?? शिवाजी बिडी..संभाजी बिडी अशी व्यसने पोचवणारे व तरुण पिढी बर्बाद करणाऱ्या उत्पादनांना बहुजननायकाची नावे ठेवून आपल्या जखमावर मीठ चोळल गेलयं. त्यावेळी आपल्या तळपायाची आग मस्तकात जातेच ना. मग....मग शाहूराजाचा उघडउघड उपमर्द आपल्या तोंडासमोर चालवून घेणार काय??* यापुढे कळतनकळतपणे ...तू काय शाहूमहाराज लागून गेलास काय ?? असे उपहासात्मक बोलणार्याना पहिल्यांदा समज द्या .समजला तर ठीक नाहीतर कोल्हापुरी पायताण हातात घ्या .
*आणी ही सुरुवात स्वतः पासून करा. चुकुनही शाहूराजा चा उपमर्द होईल असे बोलू नका , वागू नका.*
*शाहूराजा होता म्हणून आज आपण जगतोय आनंदाने . शाहूराजाविषयी कृतज्ञ रहा. युगातून एखादा असा ..राजातील माणूस , माणसातील राजा ....तयार होतो. शाहूराजाला गौरवपूर्वक अभिवादन करा. आपण सारे या लोकराजाची प्रजा आहोत याचे भान सुटू नये.*
*!! राजर्षी शाहू महाराज की जय...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २ )*
*काय..."नगरातनं " आला आहेस काय ???*
अत्यंत उपहासात्मक व हिणकस असे हे वाक्य सर्रास आपल्या तोंडी असते. छोट्या छोट्या गोष्टीवर ही थेट प्रतिक्रिया आपण व्यक्त करत असतो. पण हे व्यक्त होताना आपण कोणत्या तरी समाजाला क्षुद्र लेखतोय व स्वतः मात्र " हायफाय " असा असल्याचा वृथा अभिमान बाळगतोय याचे आपणाला भान नसते.
*" नगरातनं...या शब्दातील " सिध्दार्थ " हे नावं आपसूकच वगळलं जाते. आपल्या "हायफाय " जिभेला सिध्दार्थ हे नावं उच्चारताना थोडे जडं जात असावे. ज्या सिध्दार्थापुढे अर्थात बुध्दापुढे अखिल जग नतमस्तक होते त्याचे नावं आपल्या जिभेवर रुळत नाही हा आपला करंटेपणा आहे. डाँ. आ.ह. साळुंखे यांनी " सर्वोत्तम भुमिपुत्र " असा उल्लेख ज्या बहुजन नायकाचा केला त्याच्यातील सर्वोत्तम आपण जाणून घेण्याचा भानगडीत पडतच नाही . परिणामी आपण करंटे राहतो.*
*कोणत्याही गोष्टीला ज्या वेळी कमी लेखायचे असते....त्यातील क्षुद्रपणा दाखवायचा असतो त्यावेळी " तू नगरातनं आलायस काय ? " असा सवाल करुन छद्मीपणे हसले जाते. पण हे कुत्सित हास्य आपण श्रेष्ठ आहोत हे दाखवायाला पुरेसे नसते. त्यासाठी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे लागते .*
*आहे का हिंमत आपल्यात ??.ज्या "नगराला" आपण हलके...कमी प्रतीचे समजातो त्याच प्रकारच्या नगरातून अखिल जगातील सर्वश्रेष्ठ बुध्दीवंत असा महामानव जन्माला यैतो आणि भारत देशाची राज्यघटना लिहीतो. त्याचे नाव असते डाँ. बाबासाहेब आंबेडकर . ज्या नगराला आपण नावे ठेवतो त्या नगरातील प्रत्येक घरात जगातील सर्वोत्तम भुमिपुत्र वास करतो. त्याचे नाव गौतम बुध्द. ज्या नगराला आपण नावे ठेवतो त्याच नगरातून दसरा दिवशी देवीचि मुख्य पालखी पहिल्यांदा येण्याचा मान आपल्या राजाने दिलाय. त्याचे नाव राजर्षी शाहू महाराज . ज्या नगराला आपण तुच्छ लेखतो त्याच नगरात " बहुजन "शब्दाची यथार्थ व्याख्या करुन कुटुःबासहीत तो माणूस जाऊन राहिला. त्याचे नाव वि. रा. शिंदे . ज्या नगराला आपण नावं ठेवतो तिथे आजही प्रत्येक घरात भारतीय राज्यघटनेची किमान एक प्रत असते.*
*आता बोला...माझ्या बहुजन बांधवांनो , यातील एक गोष्ट तरी आपण आपल्या परिसरात करु शकतो का ?? नगराला नंतर हिणकस ठरवा हो , पहिल्यांदा एक बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजात निर्माण करून दाखवाल का ?? करुणेचा सागर असणारा बुध्द जन्मताना आपल्या वर्णात जन्मला पण तो बुध्द होऊन त्या नगरात का जाऊन विसावला ?? उत्तर शोधा की याचे. एक रेषा मोठी करायची असेल तर पहिल्या रेषेपेक्षा दुसरी रेषा मोठी ओढावी लागते . तरच शौर्य असते. हि हिंमत आपल्यात आहे का ?? विचार करा.*
हिणकस बोलणे सोपे असते ..कठीण असते आपल्यातिल हिणकस घालवून स्वतःला सकस बनवून दाखवणे. त्यासाठी अभ्यास , कष्ट , चिकाटी ,प्रयत्न ,सातत्य हे गुण लागतात. दुसऱ्या समाजाला हिणकस व कमी प्रतीचे दाखवत बसण्यापेक्षा स्वतःच्या समाजाला सकस बनवण्याचे आव्हान पेला.
*बहुजनांनो.....ही जीभ लैलैलै वाईट्ट असते. माणसं जोडते अन् तोडतेही. या जिभेला विधायक विचारांचा व्यायाम होऊ दे. उगाचच स्वतःला स्वतः च " हायफाय " मानू नका. "जग " ठरवेल आपली किंमत . आणि हो , तिथे कुठलंही नगर हे नगर नसते...तिथे असतो फक्त एकच निकष . " बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल ".*
बघा , थोडा शांतपणे विचार करा. आपल्या महामानवांनी आपणाला एक आदर्श घालून दिलाय. *" हिणवंत होऊ नका , ज्ञानवंत व्हा ".*
*!!डाँ. बाबासाहेब आंबेडकर ...यांचा विजय असो.!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ३ )*
*आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात होय ??*
रागाचे भरात अथवा एखाद्याला गर्भित इशारा द्यायचे वेळी आपण हे वाक्य सहज उच्चारून जातो. या वाक्यातून सुचित होणारा अर्थ स्पष्ट आहे की , हातात बांगड्या भरणारी व्यक्ती ही दुर्बल , नामर्द , स्वतःचे संरक्षण न करू शकणारी , परावलंबीत्व , कमजोर , भित्री वगैरे वगैरे असते. याच्या उलट अर्थ असा तयार होतो की , बांगड्या हातात न भरणारे लोक हे सबल , दणकट , बलवान , स्वसंरक्षण करु शकणारे , न भिणारे वगैरे वगैरे असतात.
*बांगड्या....हा घटक स्त्री वर्गाच्या हाती असतो. सौभाग्याचा खरा दागिणा म्हणून " हिरवा चुडा " हातात परंपरागत स्त्री वापरते. फँशन म्हणून इतर रंगीबेरंगी बांगड्याही भरल्या जातात. श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्यासाठी अथवा ऐनवेळेला उपयोगी पडणारी गुंतवणूक म्हणून ही सोन्याची बांगडी बनवली जाते. बांगड्याचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतात.*
*आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत असे आत्मगौरवाने अथवा दांडगाईने जरा बारीक विचार केला तर अनेक प्रश्न उभे राहतात. आपण सर्वच हाताता बांगड्या असणाऱ्या आई नावाच्या बाईच्या पोटी जन्माला येतो. हातात बांगडी असणारी एखाद्या स्त्रीला आपण आपली पत्नी करून जीवनसाथी बनवतो. हाताता बांगडी असणारी मुलगी आपली बहीण म्हणून स्विकारतो. आपल्या मुलीच्या हातातही बांगड्या आपण हौसेने भरु देतो. बांगड्या हातात बाळगणारी मैत्रीणच्या हाताता आपला हात आपण विश्वासाने गुंफतो. " बांगड्या आणि प्रत्येक पुरुष " यांचे असे हे अतुट नाते आहे.*
*हातात बांगड्या असणारी गार्गी उभ्या राजसभेत ज्ञानी म्हणवणार्या याज्ञवल्क्याला निरुत्तर करते. हाती बांगड्या आसणारी जिजाऊ दोन निष्कलंक छत्रपती घडवून दाखवते. या दोन महान छत्रपतीचा वारसा हाती बांगडी वापरणारी करवीर राज्यसंस्थापिका महाराणी ताराराणी चालवते. बहुजनाचा महामानव जोतीबाच्या खांद्याला खांदा लावून हातात बांगडी घालणारी सावित्री क्रांतीज्योती बनून देशातील पहिली शिक्षिका बनते. हातात बांगड्या भरणार्या अनेक स्त्रीया देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होत्या. हातात बांगडी असणारी इंदिरा जगातील मोठया महासत्तेला झुकवून दाखवते.असंख्य उदाहरणे आहेत स्त्री कतृत्वाची , त्यांच्या लढाऊ पणाची. तरीही तिला " बांगड्या भलाणारी " म्हणून हिणवले का जाते ??*
वरील विधान...सहज अथवा रागात वापरताना आपण आपली आई , पत्नी , बहीण , मुलगी , मैत्रीण यांचा उपमर्द करत नाही का ?? *या बांगड्या भरलेल्या आईच्या हातातच आपण आपले बालपण घालवल...आजही तोच हात क्षणभर का होईना आपल्या डोक्यावरून फिरावा असे आपणांस वाटतेच ना. आपल्या जीवनातील सुखदुःखात सदैव साथ करणारी पत्नी आपला " हिरवा चुडा " भरालेला हात आपल्या हातात विश्वासाने सोपवते तेव्हा आपण सुखावतोच ना.बांगडी भरलेली बहीण आपल्याला भाऊबीजेला ओवाळते तेव्हा आपण आनंदतोच ना. आपली मुलगी लग्नानंतर सासरी जाताना आपल्या हातात तोच बांगडी भरालेला हात ठेवते तेव्हा आपण रडतोच ना. आपली मैत्रीण आपला हात आपल्या हाती देऊन सुखदुखाच्या गुजगोष्टी करते तेव्हा बांगडी भरलेल्या त्याच हाताना अलगद थोपटून आपण तिला " मी तुझ्या बरोबर आहे " हा दिलासा देतोच ना. मग.....मग माझ्या बांधवानो कळतनकळत आपण त्याचा अवमान का करावा ??*
*बांगडी....म्हणजे पुरुषी गुलामीचे प्रतीक असे म्हणून बांगड्या न वापरणारे अनेक स्त्रीया आहेत. त्यांच्या भावनाचा योग्य मान ही राखला जावा. अशा स्त्री वर्गाची संस्था वाढायला हवी असे माझे प्रामाणिक मत आहे. इथे प्रश्न फक्त त्यांनाच आहे की...खरेच तुमच्या म्हणण्याप्रमाणे "बांगडी घालणे" म्हणजे दुर्बलता , कमजोरी , भित्रेपणा ,परावलंबीत्व असे आपण म्हणता अथवा मानता ....तर मग माझ्या बंधूनो स्त्री वर्गाला या "बेडीतून" काढण्यासाठी तुम्ही काय पावले उचलणार आहात ?? आपली आई , पत्नी , बहीण,मुलगी ,मैत्रीण यांना किती काळ या गुलामीत रखडवणार आहात ?? विचार करा.*
*बहुजनांनो , उचलली जीभ , लावाली टाळ्याला असे वर्तन करू नका. जगातील निम्मी लोकसंख्या स्त्री जातीची आहे. हे जग घडवाण्यात त्याचा वाटा मोठा आहे. त्यांचा सन्मान करुया. स्त्री पुरूष समानता आचरणात आणूया.*
*!! नारीशक्ती जिंदाबाद !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभाला वळण लावा...( भाग ४ )*
*पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो रे....*
आपल्या अवतीभवती अनेकदा हे वाक्य आपण ऐकत असतो. एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करायला चुकला अथवा त्याला एखाद्या गोष्टीबाबत नीट कळले नाही की आपण लगेचच त्याला टोमणा हाणतो " गुडघ्यात मेंदू , दुसरे काय ". समोरची व्यक्ती ओशाळते. अन् आपल्या ओठांवर छद्मी हास्य पसरते.
*मेंदू हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा म्हणजे सर्वोच्च भाग. माणूस आणि प्राणी यांच्यातील मुख्य मुलभूत फरक म्हणजे मेंदू व मेंदूचा वापर. मेंदू किती प्रमाणात नष्ट झाला यावर माणसाचे जगणेमरणे अवलंबून असते. म्हणून मेंदू विषयी बोलताना जीभ लैलै सैल सोडू नये.*
हा वाक्प्रचार जास्त करून पैलवानाच्या बाबतीत म्हटला जातो. शरीराने बलवान असणारी व्यक्ती ही बुध्दीने कमजोर असणार अशी परंपरागत समजूत आहे. पण हे खरे आहे का ?? मुष्टीयुध्द हा प्रकार आपल्या संस्कृतीला नवीन नाहीय . हनुमान , बलराम,भीम,दुर्योधन ,जरासंध,कृष्ण असे पौराणिक व्यक्ती यात निष्णात होत्या. ( पौराणिक व्यक्ती होत्या की नव्हत्या हा भाग तूर्त बाजूला ठेवू ) कोल्हापूरचे शाहूराजे हे मल्लांचे मल्ल होते. अत्यंत धष्टपुष्ट असा त्यांचा देह. स्वातंत्र्य संग्रामत अनेक क्रांतिकारक आपला देह पुष्ट बाळगून होते. हा इतिहास आहे.
*पैलवान..हा सतत मातीच्या आखाड्यात रमणारा.( कोल्हापूर येथे राहणारे काही पैलवान मात्र रंकाळा , महाव्दार रोड येथे जाऊन महिलांची छेड काढणे , सावकारी करणे , व्यसने करणे ,दादागिरी करणे असे वाईट्ट व्यवहार करतात हे दिसून येते. या पैलवानाचा इथे विचार केलेला नाही ). *पैलवान म्हणजे जणू काही बिनडोक प्राणी असा सर्वसाधारण समज प्रचलित आहे.त्यांना कुस्ती सोडून बाकी कोणतीही गोष्ट जमतच नाही असे बरेचजण समजतात. पण हे सत्य आहे का ??? पैलवान असणारे व पैलवानाना छातीशी धरणारे शाहू महाराज हे अव्वल दर्जाचे अभ्यासू होते. प्रबोधनकार ठाकरे यांना युरोपातील कोणते ग्रंथ तुम्ही वाचले पाहिजेत याची यादीच महाराजांनी ऐकवली होती . बहुजन चळवळीचा मुख्य आधार हेच शाहूराजे होते . भारताला आँलिम्पिकमध्ये पहिले पदक कुस्तीत मिळवून देणारे खाशाबा जाधव हे पैलवानच होते . लहानपणी व तरूण वयात तालमीत खेळलेले खरेतर यांना " तात्कालिक पैलवान "म्हणावे असे अनेक जण पुढे विविध क्षेत्रात आपल्या बुध्दीचे कर्तबगारी दाखवू शकल्याची उदाहरणे असंख्य आहेत. तरीही ....तरीही पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असे का म्हटल जाते ??*
बहुजनानो , थोडा विचार करा. पैलवानकी करतानाही नुसतं शरीर बलदंड असून चालत नाहीय तर मन व बुध्दीही कुशाग्र लागते . समोरच्याकडून कोणता "डाव"कधी टाकला जाईल व त्याला क्षणात प्रत्युत्तर कसे द्यायचे याचा निर्णय पैलवानाला क्षणात करावा लागतो. यासाठी मेंदू सतत घासावा लागतो. हे सत्य जाणले की मग विचारा स्वतःच्या मनाला ....पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो हे कितपत खरं असते ??..
पैलवानाचे व्यवहार हे बिनडोकपणाचे असतात हे आपले म्हणणे क्षणभर मान्य केले तरीही असे व्यवहार आपल्या कडून होतच नाहीत याची खात्री तुम्ही देऊ शकाल ?? *साधे उदाहरण घेऊ. ...पैलवानकी म्हणजे बलदंड शरीर कमावणे. म्हणजे च चांगले आरोग्य कमावणे. ( व्यसनी पैलवानचा इथे विषय सोडा) आता मला सांगा , आपण आपल्या आरोग्याची कितपत काळजी घेतो ?? कितीदा आपण आपले शरीर घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो ?? या उदाहरणात आपल्या बिधडोकपणाचे आणखी उपउदाहरण पाहू. सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर " सिगरेट ओढणे हे स्वास्थ्याला हानिकारक आहे "असे छापलेले असते. तरीही सिगरेट बिनडोकपणे ओढली जाते. आरोग्याचा नाश अक्षरशः ओढवून घेण्याची ही कृती करणाऱ्या माणसाला खरेतर " गुडघ्यात मेंदू असणारा माणूस " म्हणायला हवे . असे माझे प्रामाणिकपणे मत आहे.*
*बहुजनांनो...जीभ फक्त तोंडात वळवळते पण तिच्याव्दारे सुटलेले शब्द असंख्य मनाना इंगळ्या डसवू शकतात. तेव्हा बोलताना जरा जपून बोलावे . आपल्या महामानवांनी आपल्याला " चांगुलपणाचा " वारसा दिला आहे. तो वारसा जपूया....वृध्दींगत करूया.*
*!! व्यसनमुक्ती जिंदाबाद !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ६ )*
*शिकून कोण मोठं झालंय...शिकून कुणी " धन "पाडलयं...*
बहुजनांच्या पोरांच्या तोंडात सदैव ही वाक्ये येत असतात. शिक्षण हे जणू काही कोणती विषवल्ली आहे अथवा अत्यंत निष्क्रिय क्रिया आहे असा बहुतेक जणांचा दृष्टिकोन आहे.हा दृष्टिकोन अत्यंत घातक आहे.
बहुजनांची अनेक पोरं " कट्ट्यावर " बसून अशी मुक्ताफळे उधळताना पाहिलं की मन विषण्ण होते. *ज्या शिक्षणाने त्यांना किमान दोनहजार वर्षे वंचित ठेवले....याच अज्ञानपणाच्या मार्गातून आपल्यावर गुलामगिरी लादली गेली...आपल्या अनेक पिढ्या केवळ अज्ञानाने मातीत मिळाल्या ...तीच "शिक्षण क्षेत्राबद्दलची अनास्था " आमची पोरं बोलताना दिसतात तेव्हा एक नवी गुलामगिरी आपल्यावर लादली जाईल की काय या शंकेने मन हेलावते.*
*या शिक्षणाचा पाया आमच्या असंख्य महामानवानी जाणीवपूर्वक रचलाय हो. अगदी शिवकालापासून विचार केला तरी शिवराय हे सहा भाषा जाणणारे होते त्यांनी संभाजीराजाला संस्कृत शिकण्याचा आग्रह धरला. शिक्षण हे ध्येय ठेवून महात्मा फुले यांनी आपले घरदार सोडले. शाहूराजाने बहुजनांच्या शिक्षणसाठी सारा खजाना रिता केला. बाबासाहेबांनी बायकोमुलांपेक्षा शिक्षण उच्च मानून बहुजनउध्दाराचे कार्य केले. या महामानवांचे "बलिदान" वाया जाऊ नये.*
बहुजन लोकांनो , शिक्षण उपयोग केवळ ' धनप्राप्ती ' या एकमेव उद्देशाने करायचा नसतो. *शिक्षणाचा मुख्य उद्देश "माणसातील माणूसपण घडवाणे" हाच असतो. घेतलेले शिक्षण कधीही वाया जात नाही .तर जीवनाच्या इतर क्षेत्रात विविध मार्गाने ते उपयोगी पडत असते. उदाहरण बघा म्हणजे कळेल. शिक्षण शिकून उपयोग काय ? असा कुत्सित टोला हाणणारा बांधव हा साधे बँकेतील चेक व्यवस्थित लिहू शकत नाही . त्यावेळी हमखास तो या आपल्या शिकलेल्या अथवा शिकत असणाऱ्या बांधवाकडेच जाऊन सल्ला विचारत असतो. त्यावेळी त्याच्या मनात आपल्या अशिक्षित पणाचा खेद अथवा खंत जाणवात असणारच की.*
तेव्हा ....माझ्या बहुजन बांधवांनो तुम्ही स्वतः शिका व इतर बांधवांना शिकायला प्रोत्साहन द्या . चुकुनही शिकणार्या मुलांचा हिरमोड करु नका. त्यांना चारचौघात अकारण आपल्या पोकळ बडेजावीने लज्जीत करू नका. आपला बांधव आपल्या मंडळाच्या कट्ट्यावर आला नाही तरी चालैल पण तो चांगल्या ठिकाणी सेटल होऊदे. उगाचच त्याच्या जीवनगतीला स्पीडब्रेकर लावू नका.
*तेव्हा आता....अज्ञानाची भिंत पाडूया. एकमेकाचा हिरमोड करण्यापेक्षा एकमेकांना साथ करुया. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , तो जे पिणार तो गुरगुरणारच अस म्हटल जाते . आपला बहुजन बांधवही गुरगुरु दे.....अव्याहत....*
त्याच्या गुरगुरपणात आपणाला आपले आवाज मिसळूया.
*शिक्षणाच्या आईचा घो.. अस बोंबलण्यापेक्षा " शिकेल तो टिकेल " हा नारा बुलंद करूया.*
त्याच्या गुरगुरपणात आपणाला आपले आवाज मिसळूया.
*शिक्षणाच्या आईचा घो.. अस बोंबलण्यापेक्षा " शिकेल तो टिकेल " हा नारा बुलंद करूया.*
*!! शिक्षणक्रांतीचा विजय आसो..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ७ )*
*"आम्ही उडतेल्या पक्ष्यांची पंख मोजतोय..."*
अत्यंत आत्मप्रौढी मिरवणारे हे वरील वाक्य अगदी सहज कुठेही कधीही ऐकायला मिळते. एखाद्या गोष्टीचे भाकीतच जणू या वाक्याने आपण करत आहोत अशा अविर्भावात आमचा बहुजन बांधव असतो. खरेतर एखाद्या गोष्टीचे अंदाज व्यक्त करणे म्हणजे तोंडाची पोपटपंची करणे नव्हे ..तर किमान माहितीचा साठा आपल्या जवळ असायला हवा तरच " उडतेल्याची पंखे मोजायची " भाषा करताना जरा जिभेला आधार लागेल . अर्थात अंदाज हे अंदाजच असतात . ते चूक ठरू शकतात याचे भानही असावे.
*आकाशात उडणारे पक्षी हे अत्यंत सुंदर मनोहारी दृश्य असते. त्यांना मनसोक्त पहावे. नजरेत साठवावे. जे पक्षी आकाशात उंचउच विहारतात त्यांच्या कडून आपल्या क्षेत्रातील आकाशात आपणही उंचउंच उडण्याचे स्वप्न पहायाला हवे. बहुजन बांधवानो , उंच व विशाल आकाशात मनसोक्त विहार करायला शिका. संकुचित आत्मप्रौढीने स्वतःच्या आकाशाचे पंख स्वतः कापू नका. "आकाशातील पक्षी " आपणाला प्रेरणा देतो . ती प्रेरणा सकारात्मक आपल्या जीवनात उतरवण्याऐवजी , माझ्या बहुजन बांधवानो त्या पक्ष्यांची पंखे मोजायची आत्मप्रौढी करू नका.*
*इथे पक्षी हा प्रतिकात्मक आहे.* *जीवनात कधीही कुठेही कुणाच्याही बाबत असा सकारात्मक विचार करा.* *जर खरोखरीच तुम्हाला पंख मोजायचे असतील अर्थात कशाबाबतही अंदाज व्यक्त करायचे असतील तर एक शास्त्रीय परिभाषा अवगत करा. एक उदाहरण पाहूया.* *कोणत्याही घटनेच्या पाठीमागील सत्य आजमवायच असेल तर त्या घटनेला ६ ' क ' कार लावा. का , कुठं , कधी , केव्हा , कुणी ,कशासाठी असे प्रश्न त्या घटनेसंदर्भात पडताळून पहा. आपण सत्याच्या अधिक जवळ जाऊ हे निश्चितच *. *हे सहा ' क ' कार म्हणजे थोडा अचूक अंदाज मिळवण्यासाठी साधने आहेत. साधने महत्त्वाची असतात पण अधिक महत्त्वाचे आहे ते " साध्य ". हे साध्य म्हणजे जीवन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून निर्वाह करणे.* *म्हणजे कोणत्याही पक्षाची पंखे मोजताना काही ठोस आधार आपल्या हाती असायला लागेल.* *उगाचच काहीतरी आत्मप्रौढीची भाषा करून स्वतःला खुजे करून दाखवू नका.*
*माझ्या बहुजन बांधवांनो , आपल्या कोणत्याही महामानवाने अशी आत्मप्रौढी मिरवली नाहीय . उलट स्वतःला त्यांनी खुल्या आकाशात विहरू दिले . स्वतः बरोबर आपल्या समाजालाही उंचउंच विहारण्याचे वास्तव स्वप्न दाखवृले. आपण आपल्या महामानवांचा जीवन आदर्श घेऊया.*
*!! आत्मप्रौढी टाळूया , वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगूया...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा ...( भाग ८ )*
*आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही ....*
कुणालाही इशारा देताना अत्यंत गर्वोन्मत्त असे हे वाक्य आपण उच्चारत असतो. यातून आपणाला समोरच्या व्यक्तीला आपण किती ताकदवान आहोत हे दाखवायचे असतेच तसेच त्याला भिती पण दाखवायचा हेतू असतो. दोन व्यक्तीच्या किरकोळ भांडणात हे वाक्य कायम ऐकू येते.अन् हे वाक्य ऐकून समोरची व्यक्ती पण चवताळते व मग हे भांडण किरकोळ राहत नाही . कारण समोरच्या व्यक्तीच्या मनात सुध्दा " आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही " ही गर्वो क्ती कायम असते.
*आई....या दोन शब्दावर आपण सर्वात जास्त विश्वास , निष्ठा , प्रेम , त्याग करत असतो. आई हा प्रत्येकाच्या हृदयातील नाजूक कोपरा असतो. हा कोपरा कोणत्याही किंमतीवर जो तो जपतही असतो. म्हणून तर दोघांच्या भांडणात जर कुणी आईवरुन शिवी दिली की दुसरा तितक्याच त्वेषाने भडकतो. अन् तो ही आईवरुन त्याला शिवी देऊ लागतो. भांडणाचे रुपांतार हे असं युध्दात होऊन जाते. म्हणून वरील वाक्य उच्चारताना गर्वोन्मत्त भावना तयार होते की " आपण मेलेल्या नव्हे तर " जिवंत " आईचे दूध पिऊन वाढलेलो आहे. अन् त्यामुळे आपण कुणालाही भीत नाही ." सांगण्याचा उद्देश हा की ...."जगात कुणीही आजवर मेलेल्या आईचे दूध पिऊन वाढलेले पोरं किमान माझ्या पाहण्यात वा वाचनात नाहीय ". सर्वजण "जिवंत" आईचे दूध पिऊनच वाडलेले असतात. तरीही मग हे वरील वाक्य शतकोनशतके का बरं उच्चारले जावे ??..*
आईचे दूध हे बालकासाठी सर्वोत्तम आहार असतो. अत्यंत शरीराला महत्त्वाची अशी पोषणमुल्ये या दुधात असतात. लहानमोठ्या व्याधींना अटकाव या दुधाने होतो . थोडक्यात आईचे दूध म्हणजे सर्व बालकांना एक प्रकारे "निसर्गतः मिळालेले संरक्षक कवच " असते. आईच्या दुधाचे ऋण फेडता येत नाही असे म्हटल जाते.
*माझ्या बहुजन बांधवांनो , प्रत्येकाला आपापली आई तितकीच प्रिय असते. तिच्या दुधावरच देह पोसला जातो. इतिहासात " हिरकणी " उदाहरण प्रसिध्द आहे. आपल्या बाळाला दुधासाठी हिरकणीने रायगडचा डौंगरकिल्ला रात्रीच्या वेळी उतरुन या दुधाचे महत्त्व अधोरेखीत केलयं. तिच्या या पराक्रमाला आपल्या महापुरुषाने अर्थात शिवाजी महाराजांनी भर दरबारात तिचा यथोचित सत्कारही केलाय. ही इतिहासकालीन घटना पुरेशी सुचक आहे की , " जिवंत आईच्या दुधानेच बालकाचे पोषण व्यवस्थित घडत असते ". तेव्हा आपल्या आईचा अर्थात " हिरकणीच्या एका अंशाचा " आपण असा रागाने अथवा आपले शारीरसामर्थ्य दाखवण्यासाठी उल्लेख करणे योग्य आहे का ?? विचार व्हावा.*
माझ्या बहुजन बांधवांनो , कुणालाही भिती दाखवणे अथवा इशारा देणे ह्या गोष्टी अत्यंत गैर आहेत. *" खरा हिंमतवान कोण ?? असा प्रश्न मला विचारला तर मी स्पष्ट नोंदवेन की जो कुणी दुसऱ्याच्या मनातील भिती कमी करतो तो खरा हिंमतवान ".*
*भिती दाखवण्यापेक्षा एखाद्याला नीती दाखवा. इशारा देऊन स्वतःच्या सामर्थ्याचे वृथा प्रदर्शन करण्यापेक्षा कमजोराला बलवान करुन स्वतः ची हिंमत सिद्ध करा. चार्वाक ते बुध्द आणि शिवराय ते भिमराय या आपल्या सार्या महामानवांनी आपणाला हाच आदर्श शिकवलाय. आपण त्यांच्या मार्गाने जाऊया.*
*हिरकणीचा अर्थात एका मातेच्या दुधाचा यथायोग्य सन्मान करणारा शिवाजीराजे आपल्यात जागवा.....इतकेच सांगणे.*
*!! हिरकणी अर्थात आईचे दुध जिंदाबाद !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४९६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ९ )*
*" काय रे , "शेंडापार्कातून" आलायस काय "?...*
अत्यंत तुच्छता व्यक्त करणारे हे वाक्य आपण किती सहजपणे बोलून जातो. समोरचा व्यक्तीही ओशाळतो. त्या व्यक्तीची नजर आपल्या हातापायाच्या बोटांकडे वळते.अगदी साहजिकपणे.
*शेंडापार्क....ज्या लोकांच्या हातापायाची बोटे झडलेली आहेत , संवेदना हरपल्या आहेत , ज्या हातापायांचा उपयोग आता फक्त भीक मागण्यासाठीच होणार अशी मानसिकता तयार झालेल्या लोकांची वस्ती म्हणजे शेंडापार्क. " कुष्ठरोगी " लोकांची वस्ती म्हणजे शेंडापार्क. समाजाने " सौंदर्याच्या " व्याख्येतून ज्यांना आपसूक वगळून टाकलय अशा लोकांची वस्ती म्हणजे शेंडापार्क. "कुरुप " हा शब्द घडीघाडीला ज्यांना अनुभवावा लागतो अशा लोकांची वस्ती म्हणजे शेंडापार्क.परंपरागत समाजाच्या तुच्छतेची व्याख्या म्हणजे शेंडापार्क.*
आजकालचे बाजारु मार्केट देहाचे सौंदर्य आधिक मुल्यवान मानते. म्हणून तर मिस वल्ड , मिस इंडिया अशा स्पर्धा दिमाखात पार पडतात. आणि यात एक अत्यंत विसंगत गोष्ट दिसून येते ती इथे नोंदवणे मला योग्य वाटते . या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचलेल्या स्पर्धकाना नेहमी एक प्रश्न सतत विचारला जातो. "आपल्या जीवनात आपण काय करु इच्छिता ??"...यावर स्पर्धक उत्तरतात " आम्ही " मानवसेवा " करु इच्छितो . टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. *प्रश्न असा पडलाय की , या मानवसेवेच्या व्याख्येत कुष्ठरोगी सेवा येत नाही का ?? आजवर विजेते ठरलेले लोकांनी कधीतरी जगाच्या कोपऱ्यात असणाऱ्या शेंडापार्कात जाऊन कुष्ठरोगी सेवा केल्याचे आपण कधी ऐकलयं का ??*सौदर्याच्या जगाच्या व्याख्येत फक्त देह सुंदर इतकी मर्यादित परिभाषा बनलेली आहे हे वास्तव आहे.
*बाबा आमटे...नावाचा एक " मनाचा सौंदर्यवादी माणूस " आपण पाहिलाय मित्रांनो. कुष्ठरोगीची सेवा करून या बहुजननायकाने शेंडापार्कचे रुपांतर "आनंदवन " मध्ये करून दाखवले. मानवसेवेचा अप्रतिम आदर्श आपल्या पुढे ठेवला. आज आनंदवन हे मानवसेवेचे तीर्थक्षेत्र बनलय.*
माझ्या बहुजन बांधवानो , तरीही आपल्या ओठांवर हे वाक्य का येते हो ?? एखाद्याला तुच्छ ठरवून आपण श्रेष्ठ असल्याचा दांभिकपणा आपण का करता ?? *जगात कुरुपता अनेक मार्गाने व अनेक अंगाने समोर येते. भ्रष्टाचार , अंधश्रध्दा , दहशतवाद , जातीयवाद , धर्मवाद ,स्त्री पुरुष असमानता , भांडवलशाही , पुरोहीतशाही आशी अनेक बाबी या मानवी जीवनात कुरुपता टिकवून आहेत. या....बहुजान बांधवानो या , मानवी जीवन कुरुप बनवणारे या बाबीसाठी आपापल्या मनात " एक शेंडापार्क " उभारुया. जी व्यक्ती अशा बाबी गौरवाने समर्थन त्या व्यक्तीला उद्देशून आपण म्हणुया " कायरे , तुझ्या मनातला शेंडापार्क तयार झाला की नाही ??" ज्यात मानवी जीवनातील " खरी कुरुपता आपणाला जीवन व्यवहारातून वगळायची आहे.*
*माझ्या बहुजन बांधवानो , एखाद्याला शारीरिक कुरुपतेवरुन हिणवू नका. शेंडापार्कचे रुपांतर आनंदवनात करणारा " बाबा " आपल्या मनांमनांत जागवां. "मानवी हात हे चांगले घडवण्यासाठी असतात " अस हे आनंदवनचे बाबा बोलायचे. आपल्या बहुजननायकाचा वारसा कृतीशील जोपासूया.....एक आनंदवन आपल्या मनातं उभारुया...मानवसेवेचे.*
*!! मानवसेवा जिंदाबाद !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १० )*
*"आमचा नाद करायचा नाही ..."*
अगदी कुठेही , कधीही सर्रास ऐकू येणारे हे वाक्य. बहुजनांच्या ओठी हे वाक्य इतके वेळा येते की , या वाक्याची जणू काही सवय होऊन गेली. स्वभावधर्मच बनलाय हा... होते काय की...इतके सवंग वाक्य बहुजन पोरं बहुजन पोराला सतत सुनावून एकमेकात,एक अदृश्य भिंत उभी करत जाते . परिणामी एक नेक सरमिसळ होण्याची प्रक्रिया दूर दूर जाते .
*आमचा नाद करू नका,...हे वाक्य एक तरूण दुसऱ्या तरूणाला , एक सार्वजनिक मंडळ दुसऱ्या मंडळाला , एक तालीमसंस्था दुसऱ्या तालमीला , एक संघटना दुसऱ्या संघटनेला म्हणत जाते . आणि मग सुरू होते एक " अभिनिवेशीपणाची रेस ". आपण न् फक्त आपणच श्रेष्ठ आहोत हा अभिनिवेश आपल्याला इतर बहुजन बांधवापासून हळूहळू अलग पाडतो. म्हणून हे वाक्य जिभेवर आणताना हजार वेळा विचार व्हावा.*
एक उदाहरण पहूया. *आपल्या हाताची सारी बोटे सारखी नसतात. करंगळी अंगठ्यापेक्षा कमी जाड व मधल्या बोटापेक्षा कमी उंच असते. म्हणून करंगळी दुय्यम ठरत नाही . अंगठा वा मधले बोट श्रेष्ठ ठरत नाही . अलग अलाग असताना ही केवळ हातांची बोटे असतात. पण ही सर्व बोटे एकत्र केली तर हांतांची मूठ बनते. ही मूठ एकत्र आवळली तर संघर्षाचे प्रतिक बनते. बोटाचे हे उदाहरण आपणाला मार्गदर्शक ठरावे.*
" नाद " हा शब्द आपल्याकडे सर्रास व्यसन म्हणूनही बोलला जातो. व्यसन हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. बहुजनांची पोरं सतत दारु , जुगार , गुटखा , मावा , सिगरेट , अमली पदार्थ , व्हिडिओ गेम वगैरे वगैरे व्यसनात अखंड बुडालेली असतात. ( सन्माननीय अपवाद ). या व्यसनापासून दूर राहिले तर बहुजनांची युवा पिढी आपल्या पूर्वजांप्रमाणे नवा इतिहास घडवू शकेल. *"आमचा नाद करायचा नाही ....ऐवजी ....आम्ही नाद करणार नाही " हे वाक्य बहुजनांची पोरं बोलतील त्यादिवशी आपल्या महामानवांचे कष्ट फलद्रुप होतील .*
माझ्या बहुजन बांधवांनो , *छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेवेळी , महात्मा फुलेनी पहिली शाळा सुरु करताना , शाहू महाराजांनी सामाजिक व सांस्कृतिक लढा लडाताना , बाबासाहेबानी भारतीय राज्यघटनेत तमाम बहुजनांचे हक्क अबाधित राखताना , संत गाडगेबाबानी बहुजनांच्या डोक्यातील अंधश्रध्देची जळमटे काढताना .........कधीतरी " आमचा नाद करायचा नाही " असा अभिनिवेश बाळगला का ???*
याउलट आपल्या तमाम महामानवांनी चांगल्या गोष्टीचा नाद करा अस्संच सांगितले . *शिवरायांनी स्वातंत्र्याचा , फुलेंनी शिक्षणाचा , शाहूंनी बलवान होण्याचा , बाबासाहेब यांनी संघर्षाचा , गाडगेबाबांनी अंधश्रध्दामुक्त होण्याचा नाद धरा अस्संच आवर्जून सांगितलंय, ते आपल्या जीवन व्यवहारातून. आपणही आपल्या बहुजन महानायकाचा आदर्श घेऊन चांगल्या व सर्वोत्तम गोष्टीचा नाद धरूया.*
*!! सर्वोत्तमाचा " नाद " धरा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ११ )*
*नशिबात आहे तेच होणार...कशाला त्रास घ्यायचा ??*
अत्यंत हताशपणा दर्शवणारे हे उद्गार अगदी सहजपणे ओठांवर येत असतात. गोष्ट छोटी असो वा मोठी ती मिळण्यात नशीबाचा वाटा लैलै महत्त्वाचा मानला जातो. पराभूत वृत्ती सहज दिसून येते. स्वतःच्या मनातील पराभवाबरोबरच दुसऱ्या बहुजन बांधवालाही नशिबाचाच मार्ग दाखवण्यात धन्यता मानली जाते. " असेल हरी तर देईल खाटल्यावरी " अशी ही आळशी अवस्था आहे.
*न....शी....ब....हे तीन शब्द माणसातील हताश व पराभूत वृत्तीचे द्योतक आहेत. प्रयत्नवाद हा सर्वात मोठा गुण या शब्दांनी मोडून पडतो. माणूस हा स्वतःच्या कर्मावर विश्वास न ठेवता नशीब नावाच्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीवर विसंबून राहतो. अर्थात त्याचा कार्यभाग बुडतोच पण त्याचा आत्मविश्वास डळमळतो. नशीबात आसेल तर मिळेलच या वाक्याने तो प्रयत्नात कसूर करतो. अपयश आले तर " माझे नशीब खोटं " अशी बोंब देतो आणि यश आले तरीही " नशिबातील गोष्ट कुठं चुकत नाही " अशी भलामणही सहज करतो. नशीब अशा प्रकारे मानवी जीवनात बेरीज वजाबाकीचा खेळ खेळत असते.नशीब हे मूळात अस्तित्वात नसतेच ...असते ते माणसाची मनोवृत्ती . ती मनातच पराभूत झाली तर अपयश व मनात सुदृढ असली तर यश हे मूळ समीकरण असते.*
एखाद्या गोष्टी अथवा घटनेत हजार प्रयत्न करूनही यश मिळत नाही तेव्हा मनुष्य हताश होतो आणि आपल्या नशीबात हे नाहीच अशा समजुतीने पराभव स्विकारतो. यामुळे नशीब शब्दावरील त्याचा विश्वास पक्का होतो आणि मग पराभवाची मालिका अखंड सुरु राहते.
*एक उदाहरण पाहूया...थाँमस अल्वा एडिसन हे नाव आपल्याला ठाऊक आहे का ?? तोच हा शास्त्रज्ञ ज्याने मानवी जीवनात " प्रकाश " आणला. एक साधा बल्ब तयार करताना एडिसनचे तब्बल हजार प्रयोग अयशस्वी ठरले. हजाराव्या प्रयोगानंतर बल्ब तयार करण्यात त्याला यश मिळाले . एक हजार प्रयोग चुकुनही एडिसन हताश व पराभूत झाला नाही . तो अखंड प्रयत्न करत राहीला आणि यश त्याच्या हातात आले. यानंतर एडिसन जो बोलला ते अत्यंत महत्त्वाचे आहे. " मी एक हजारवेळा बल्ब तयार करण्यात चुकलो...यावरून बल्ब तयार न होण्याच्या एक हजार पद्धती मला माहिती झाल्या " अशा आशयाचे विधान त्यांनी बोलले.*
माझ्या बहुजन बांधवानो....जरा विचार करा.आपल्या नशिबात असेल तर हिंदवी स्वराज्य उभे राहील अस म्हणण्यात शिवरायांनी धन्यता मानली नाही . आपल्या अथक प्रयत्नाने हिंदवी स्वराज्य घडवून दाखवले. दोन हजार वर्षाची शिक्षणबंदी उघड्या डोळ्यांनी पहायची नसते तर ती कृतीशील मोडून बहुजनाना शिक्षण प्रवाहात प्रयत्नपूर्वक आणले ते जोतीराव फुले यांनी . लोकराजा नशिबात असेल तर निर्माण होईल अस म्हणायच नसते तर स्वतः च लोकराजा प्रयत्नपूर्वक बनायचे असते हे शिकवले राजर्षी शाहुनी. दलिताना त्यांच्या नशिबाने मुक्ती मिळेल असा भ्रम बाळगायचा नसतो तर प्रयत्नपूर्वक अस्पृश्यता समाजातून नष्ट करायची असते हे दाखवले डाँ. आंबेडकर यांनी . आपल्या सर्वच बहुजननायकानी नशीब या शब्दाला उडवून लावले व प्रयत्न हा शब्द कृतीशील करून दाखवला.
*तेव्हा बहुजन बांधवांनो......न...शी..ब ..या तीन शब्दाना डोक्यातून हद्दपार करा. तिथे " प्रयत्न " हा शब्द घट्ट रुजवा. आपले मनं , मेंदू व मनगट खंबीर बनवा. हताश व पराभूत वृत्ती त्यागून अभ्यासपूर्वक प्रयत्न करून लढण्याची वृत्ती अंगी बाणवा. यातच तुमचे व बहुजन वर्गाचे हितं आहे हे जाणा.*
*!! प्रयत्नवादी बना...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १२ )*
*रडायला काय बाई आहेस होय.....*
बहुजन मुलांच्या तोंडात हे वाक्य आपण ऐकत असतोच पण विशेष म्हणजे बहुजन स्त्रीयाही हे वाक्य उच्चारत असताता. अगदी मोक्कळपणे हे वाक्य संबोधले जाते . एखाद्या व्यक्तीला तू दुर्बल नाहीएस हे सांगताना सर्रास हे वाक्य ऐकायला मिळते.
*अश्रू म्हणजे जणू फक्त दुर्बलतेचे लक्षण अशी समजून झालीय. पण हे अर्धसत्य आहे. अश्रू डोळ्यांत येणे म्हणजे रडणे. जीवनात विविध कारणपरत्वे मनुष्य रडतो. जवळच्या नातेवाईकाच्या अथवा स्नेह्याच्या अथवा मित्रमैत्रीणीच्या मृत्यू प्रसंगात मनुष्य नैसर्गिकपणे रडतो. अगदी धाय मोकलून रडतो. रडणे म्हणजे दुर्बल असणे ही गैरसमजूत आहे. दुःखाचा प्रसंग जसा रडवतो अगदी तस्सच आनंदाचे प्रसंगी सुध्दा डोळ्यांत आनंदाश्रु उभे राहतात. माणूस कुणाच्या वियोगाने जसा रडतो तसाच वियोगानंतरच्या भेटीनेही आनंदाने रडतो. हे अश्रू म्हणजे एकमेकाबद्दलची प्रेमाची , आपुलकीची , स्नेहाची पावती असते.*
मी मेल्यावर माझ्यासाठी अश्रू माझी मुलगी ढाळेल अशी आर्त आस मनात बाळगणारा बाप आपण पाहतोच की. भाऊबीजेला आपल्याला ओवाळणारे बहिणीचे हात नसतील तर आपण अंतर्बाह्य रडतोच की. एखाद्या कठीण समयी आधारासाठी आपण आपल्या पत्नीच्या खांद्यावर विश्वासाने अश्रू आपण ढाळतोच की. एखादी आनंदाची बातमी आपल्या मैत्रीणला सांगताना आपण आनंदाश्रु डोळ्यातून ओघळवतोच की. याचा अर्थ असा की विविध कारणपरत्वे आपण अश्रू ढाळणे अर्थात रडत असतोच की. मग एखाद्या गोष्टी अथवा घटनेत आपले हातपाय गळाले तर .....रडायला तू बाई आहेस काय ?? अस का म्हटल जाते ...
*अश्रू ढाळणे अथवा रडणे हा फक्त बाईचा गुणधर्म नाहीय . पुरुषही रडतोच. जीवनात मी कधीच रडलो नाही अस छातीठोकपणे सांगणारा पुरुष या पृथ्वीवर जन्माला आला असेल का ?? अगदी आपल्या महामानवांनाही अश्रू ढाळावे लागलेच की. त्यावेळी या " बाई " नावाच्या जातीनेच त्यांना आधार दिलाय ना. विचार तर करा......सईबाईच्या निधनानंतर डोळ्यांत अश्रू आलेल्या शिवरायांना जिजाऊचाच आधार होता. शिक्षण हे ध्येय घेऊन घराबाहेर पडलेल्या जोतीबाच्या डोळ्यातील आसवे सावित्रीमाईनेच पुसले असतील ना. सामाजिक व सांस्कृतिक लढ्यात पावलापावलावर परीक्षा द्यावी लागणाऱ्या शाहूराजाला आधार म्हणून पत्नी लक्ष्मीबाई यांचाच आधार होता हो. आपल्या समाजबांधवांचे होणारे शोषण पाहून अंतर्बाह्य हेलावलेल्या भिमरावाला रमाईच्या खांद्यावरच अश्रू ढाळून मोकळे वाटले ना. .....अश्रू ही ताकद आहे जर ती सकारात्मक स्विकारली तर.....*
धरणाचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. धरण जेव्हा पूर्ण क्षमतेने भरू लागते तेव्हा त्याचा बांध फुटू नये म्हणून अर्थात धरण फुटू नये म्हणून धरणाचे दरवाजे उघडले जातात. धरण जरा हलके होते. पुन्हा ताजेतवाने होते . नवीन पाणीसाठा करायला . ही रीत आहे....जीवन जगण्याची .
*माझ्या बहुजन बांधवांनो....जिभ कुठं म्हणजे कुठंच सैल सोडू नका. जीवनाची अनेक अंगे अनेक मार्गानी न्याहाळा. मगच जे बोलायच ठरवा.....सांगण्याचा मथितार्थ इतकाच की , कठीण प्रसंगात अश्रू ढाळून हलके व्हा ...आणि पुन्हा सज्ज व्हा जीवनाच्या लढाई पुन्हा एकदा लढायला. रडणे हे नेहमीच दुर्बलतेचे लक्षण नसते. तर बरेच वेळा ती लढायच्या अगोदरची " सज्जतेची एक पायरी " असते. ती पायरी जीवनात येऊदे. आवश्यक आहे. अन्यथा जास्त पाणीसाठा होऊन धरण फुटून उध्वस्त होईल. वेळीच सावरण्यासाठी अश्रू आपल्याला मार्ग दाखवत असतात. " अश्रूना दुर्बल समजू नका ...तर आपल्याला दुर्बल होण्यापासून सावरायचे असेल तर योग्य वेळी योग्य काळापर्यत अश्रू ढाळा...मोकळे व्हा."*
*!! रडायचं....पुन्हा लढायचं !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८३०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १३ )*
*उद्याचे कुणी बघितलंय , आजच जगून घ्यायचं...*
अत्यंत बिनधास्त ...पण बेफीकीरीचे हे उद्गार बहुतेक जणांच्या तोंडी असतात. दुसऱ्या व्यक्तीला सांगताना हे वाक्य फार जोरकसपणे उच्चारले जाते. "जीवन जगण्याची कलाच जणू काही आपण शिकवत आहोत " असाच काहीसा थाट असतो. होतं काय की , हे बेफीकीरीचे उद्गारातील पहिला पूर्वार्ध खरा असतो पण तो अत्यंत सवंगपणे म्हटल जातो. त्यामुळे प्रत्यक्षात जीवन व्यवहारात आपण किती या वाक्याचे विसंगत वर्तन करतोय याचे भान सुटते.
*उद्याचे कुणी बघितलयं.....असा आवेश दाखवणारे आपल्या भविष्यकाळाची चिंता का बरे करतात मग ??... बँकेत पैसे साठवून आपल्या भविष्याचा भार तो हलका करत असतो , दूरच्या प्रवासाला जाताना रिटर्न तिकीटात पैसे गुंतवतो , दहा ते वीस वर्षाच्या कालावधीचे स्वतःच्या जिवाचे विमे उतरावतो , आपल्या प्रेयसीबरोबर भावी जीवन काळाची स्वप्न पाहतो , "फ्यूचर प्लँनिंग " नावाने भरपूर गुंतवणूक करून ठेवतो , उद्या पेन्शन जास्त मिळावी म्हणून आज त्रास होत असला तरी काम ओढतो , शेअर्स भाव उद्या वाढून भरपूर फायदा मिळेल या आशेवर बरेच वर्ष शेअर्स जवळ बाळगतो....एक ना अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती असतात. तरीही ...तरीही असे बेफीकीरीच्या उद्गाराची सवय त्याला का जडली असावी ???*
नियोजन .....हे प्रत्येक बाबतीत महत्त्वाची भुमिका बजावत असते. नियोजनशून्य जगणे म्हणजे दुःखवाट तयार करत जगणे. आपल्याला नेमके काय गुंतवायचे आहे आणि भविष्यात काय मिळवायचे आहे हे ज्याला अचूक कळते तो मनुष्य यशस्वी बनू शकतो. नुसतं " आज " भागवून जगायला लागलो तर आयुष्याची हेळसांड ठरलेली . कारण ....प्रत्येक दिवस तुमचा नसतो.
आपल्या महामानवानी अत्यंत नियोजनपूर्वक कार्य केले ज्याचे फळ आपण आज चाखतोय. *औरंगजेब कधी ना कधी महाराष्ट्रात धडकणार हे अचूक ओळखून शिवरायांनी ३५० किल्ले योग्यरित्या तयार केले ज्याचा फायदा पुढे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजीराजे व ताराराणीला झाला . जोतीबा फुलेंनी नियोजन डोळ्यासमोर ठेवून सावित्रीमाईला शिकवले ज्या पुढे देशातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या आणि बहुजनांच्या दारात ज्ञानगंगा येऊ शकली. शाहूराजानी अत्यंत जबाबदार लोक आपल्या जवळ ठेवून त्यांना नियोजन करून प्रशिक्षित केले ज्याचा फायदा पुढे बहुजनांच्या चळवळीला झाला . बाबासाहेब यांनी अत्यंत नियोजनपूर्वक शिक्षण घेत गेले , ज्ञानसंपन्न बनले , ज्याचा फायदा म्हणून बाबासाहेब सर्वाना समान न्याय देणारी भारतीय राज्यघटना लिहू शकले......सांगण्याचा मथितार्थ हाच की , आपल्या महामानवांनी नुसत्या " आज " विचार केला असता तर आपणासाठी ते चांगले भविष्य व उद्दिष्ट ठेवू शकले असते का ??? विचार व्हावा.*
*माझ्या बहुजन बांधवांनो...जीवनात नियोजन या शब्दाचे महत्त्व जाणा. अगदी शेतामध्ये छोटेसे रोप लावायचे असले तरीही पहिल्यांदा आपण ती जमीन व्यवस्थित साफ करतो. एक छोटासा खड्डा पाडतो. जे रोप लावायचै ते साफ करून खड्ड्यात पुरतो. त्यावेळी खतं घालतो. त्या झाडाला सतत पाणी पुरवतो. त्याला योग्य वेळी कलमही करतो. एवढया सार्या नियोजनानंतर एका छोट्या रोपाचे भविष्यात वृक्ष बनतो. मला वाटते एवढे उदाहरण पुरेसे ठरावे .*
आपण एक गोष्ट सतत ध्यानात ठेवावी की....आपला " आज " सुंदर व्हावा यासाठी भूतकाळात कोणीतरी *फ्यूचर प्लँनिंग अर्थात नियोजन*केलेली असते. तेव्हा कुठं आपला आजचा दिवस सुखाचा असतो. ही सकारात्मक परंपरा प्रत्येक पिढीने पुढे न्यायची असते. तरच जगात मानवजात टिकून राहील. आपल्या उद्याच्या पिढीसाठी आपण झाड लावू शकलो तरच पाऊस पडणार ना. कुणी काही फक्त आजचाच विचार करत राहील तर भविष्यात झाडं बघायला तरी मिळेल का ???
*म्हणून ...माझ्या बांधवानो...जिभेला आता वळण लावा. " कशाला उद्याची बात ...हे चित्रपटात ऐकायला छान वाटते पण प्रत्यक्षात " उद्याच्या माझ्या पिढीसाठी उज्जवल वारसा ठेवण्यासाठी मी आजच पाया बनवीन " हे वाक्य अत्यंत पुरुषार्थाचे व भविष्यवेधकाचे असते. मला तरी हेच योग्य वाटते .*
*!! नियोजन करा , भविष्यवेधक बना !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १४ )*
*गावाकडनं आलं येडं...न् भज्याला म्हणतंय पेडं...*
दुसऱ्या व्यक्तीचे अज्ञान दाखवण्यात आपणाला कोण बहुमान मिळतो कुणास ठाऊक . या जगातील सर्व गोष्टींच्या अचूक ज्ञानाचा मक्ता जणू काही आपल्या कनवटीला आपण दिमाखात बांधलाय असा बरेच जणाचा आव असतो. *प्रत्येक जण आपल्या डबक्यापुरताच शहाणा असतो*हे सत्य आहे. आपल्याला माहिती असणारी प्रत्येक गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला ठाऊक असलीच पाहिजे हा दुराग्रह आहे, ती त्याला माहिती नसणे म्हणजे जणू काही सारे अज्ञान त्यांच्या पोतडीत ठासून भरलय असा समज करणे म्हणजे भ्रम आहे. वरील वाक्य अशाच भ्रमातून बाहेर पडते.
*भारत हा खेड्यांचा देश आहे. बहुसंख्य जनता खेड्यात जगते. प्रत्येक खेड्याची भाषा..सामुहीक वर्तन अलग असते.सध्या झपाटयाने होणाऱ्या शहरीकरणत वेगाने खेडं बदलत चाललंय हे वास्तव आहे. शहरात राहणारे जरा जास्त हुशार समजले जातात. माहिती तंत्रज्ञान युगात हे बरेच अंशी बरोबर असते.पण याचा अर्थ सारे शहाणपण शहरातच आहे असं नव्हे . प्रत्येक वेळी "मागास" या शब्दाकरता गाव अथवा खेडे याचा संदर्भ योग्य आहे का ??? विचार व्हावा.*
गावातून शहरात आलेल्या व्यक्तीला काही गोष्टी न समजणे हे साहजिकच आहे, तसेच शहरात राहुनही शहराबाबत काही गोष्टी माहिती नसणे हे सुध्दा साहजिकच आहे. पण एखाद्याला कमीपणा आणायचा असेल...अज्ञान दाखवून द्यायचे असेल तर सर्रास वरील वाक्य सहज तोंडावर फेकले जाते. आपल्या शहाणपणाचा टेंभा मिरवण्याचा हा उद्योग *" झाकली मूठ..." या न्यायानेच तुमचे स्वतः चे अज्ञानपण झाकून ठेवत असतो हे ध्यानात असावे.*
*गावाकडील व्यक्तीला शहरात सर्रास खाणारे पिझ्झा बर्गर हे पदार्थ खाऊन माहिती असण्याची शक्यता कमी असू शकते. कारण त्याच्या आहारात हे पदार्थ कुठेच बसत नाहीत .या पदार्थाबद्दल त्याचे अज्ञान आपण समजून घ्यायला हवे. याउलट आपण खेड्याता गेलो आणि शेतातील भुईमूग काढणं आपल्याला जमल नाही तर ते ही त्या ठिकाणी अज्ञानच असते. याचा अर्थ खेड्यातल्या व्यक्तीने आपणाल अज्ञानी ठरवणे योग्य आहे काय ?? तसेच आपणही वर्तन करावे .*
दुसरे महत्त्वाचे असे की...शहरीकरणाच्या झपाट्यात शहरात जागा परवडत नाहीय म्हणून आपण गावाकडे शोध घेतोच की... आपल्या घरचे मूळ देव ज्या खेड्यातल्या घरी असतात तिकडं जाऊन डोके टेकवतोच ना... कधीकधी चेंज अथवा एंजॉय म्हणून शेतातील खोपीत अथवा बांधावर सहकुटुंब भोजन करतोच की... याचा अर्थ सतत काही कारणाने का होईना मन गावाकडं धाव घेतेच ना... मग तेच मन गावाकडन आलेल्या आपल्या जिवलगाला ...मित्राला..,स्नेह्याला समजून घेताना का अडतंय बरं ??
*माझ्या बहुजन बांधवानो...सांगण्याचा मतितार्थ इतकाच की एखाद्या व्यक्तीचे एखाद्या गोष्टी बाबतीत अज्ञान समजून घ्या. त्याची टिंगलटवाळी करु नका. शक्य झालं तर तुमच्या जवळील ज्ञान त्याला द्या . त्याचे अज्ञान हटवा. सहकार्याचा हा हात वाया जात नाही . ती व्यक्ती त्याच्या जवळील ज्ञान तुम्हाला देईल, जे पुढेमागे आपल्या हिताचे ठरु शकेल. ज्ञान वाटण्यासाठीच असते , हिणवण्यासाठी नसते.*
*!! शहाणपण , द्यावे ....घ्यावे !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १५ )*
*"कुठं भंगीकाम करून आलायस काय..."*
मानवी श्रमाचा इतका घाणेरडा उपहास दुसरा नसावा. अगदी सहजपणे बोलले जाणारे हे वाक्य अत्यंत उपमर्द करणारे आहे..जातीयवादी पण आहे. हे वाक्य ऐकले की तळपायाची आग मस्तकात घुसते.
*भारतीय समाजव्यवस्थेत जातीव्यवस्थेने निर्माण केलेली विषम व्यवस्था सार्वज्ञात आहे. इथे कुणी कोणता व्यवसाय करावा हे सुध्दा धर्मग्रंथ म्हणवाणार्या अधर्मवादी पोथ्यांमध्ये अभिजन वर्गाने लिहून ठेवले. राजेशाहीने हे धर्मग्रंथ शिरसावंद्य मानून व्यवस्था तशी अनुकूल बनवण्यास आपली तलवार तोलून धरली. हितसंबधी लोकांनी यांच्या रुढी परंपरा बनवल्या. आणि अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाने त्या स्विकारल्या. परिणामी कष्टकरी वर्गाचा श्रमाचा घाम इथे दुर्गधी वाटू लागला. आणि अभिजन वर्गाचे जाणवे इथे पवित्र मानले जाऊ लागले . ही व्यवस्था टिकून रहावी म्हणून हितसंबधियांनी व्यवसाय व जाती यांचे सहचक्र लावून दिले . याचा परिणाम म्हणजे पवित्र म्हणवणारी कार्ये अभिजनांकडे आपसूक राहिली व मानवी जीवनाला कमीपणा आणणारी अत्यंत दुष्प्रप्य कामे बहुजनांतील शुद्रातिशुद्र वर्गाकडे परंपरा म्हणून कायमची झाली .समाजात विषम व्यवस्था कायम राहिली.*
मानवी विष्ठेची निर्गत करणे म्हणजे भंगीकाम करणे.एका मोठया वर्गाची विष्ठा वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या दुसरा लहान मानवी वर्ग विल्हेवाट करतोय ही खरेतर संपूर्ण मानवी समाजाला ( ज्यांना मन व हृदय आहे )लाजीरवाणी बाब आहे. विज्ञान तंत्रज्ञान युगात आजही उत्तर प्रदेश बिहार झारखंड अशा वेगवेगळ्या भागात डोक्यावरून मैला अर्थात विष्ठा न्यावी लागते ही घटना " भारत महासत्ता होणार " म्हणून बोंबलणार्या वर्गाच्या मुस्काटात द्यावी अशी आहे.
*मानवी देह म्हणजे मलमुत्राची गटारगंगा असे एका मोठया व्यक्तीने म्हटल आहे. ह्या मलमुत्राच्या व्यवस्थित सफाईवरच मानवी आरोग्य अवलंबून असते.हे सफाईचे काम जो वर्ग करतो तो वर्ग " मानवी जीवनाचा आरोग्यदाता " आहे. या दात्याला अक्षरशः उपमर्दाची किंमत करणे हे योग्य आहे का ??? विचार व्हावा. आज ह्या वर्गाने हे काम नाकारले तर....,,तुमची आमची सुदृढ व गुटगुटीत बालके निपजतील का ???*
*मानवी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे काम प्रत्येक महामानवाने केलयं. महात्मा गांधी स्वतः संडास साफ करत. त्याचै अनुकरण पुढे रत्नागिरीचे अप्पासाहेब पटवर्धन यासारख्या अनुयायांनी केले. अतुल पेठे नावाचे आजचे आघाडीचे नाट्यदिग्दर्शाक आजही तालमीवेळी थिएटर मधील संडास स्वतः साफ करतात. आपल्या घरातही आपले घरचे लोक घरगुती संडास स्वतःच धुतात. तेव्हा बरं आपण त्यांना भंगीकामाची अमानवी उपमा देऊन उपमर्द करत नाही . तेव्हा ....बहुजन बांधवांनो जरा जीभ विचारपूर्वक उचला.*
*सर्वात महत्त्वाचे म्हणजे ....साथी हाथ बढाना , एक अकेला थक जाएगा , मिलकर बोझ उठाना ,...या पंक्तीप्रमाणे किमान थोडा काळ श्रमाची अदलाबदल करूया की...आपल्या हातातील पंचपात्र अथवा काँम्प्युटर माऊस त्या आपल्या भंगी बांधवाच्या हाती देऊया की....आणि त्याच्या हातातील बादली व खराटा आपल्या " स्वच्छ व सुंदर " हातात घेऊया की... माझ्या बहुजन बांधवानो,.,एकदा हा प्रयोग करून पहाच. किमान आपल्या घरी ,...,.आणि मग बाहेर येऊन वरील वाक्य म्हणून दाखवा बरं*
*!! मनाची स्वच्छता ...पहिल्यांदा करा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १६ )*
*" राजकारणचे तेवढे नावं घेऊ नकोस बाबा..."*
राजकारण हा आजघडीचा सर्वाधीक बदनामी झालेला शब्द आहे आणि राजकारणी लोक सर्वात तिरस्करणीय झाले आहेत.कोणत्याही समाजाचे असणारे छोटे छोटे प्रश्न ही वर्षानुवर्षे ताटकळत ठेवणे , भ्रष्टाचार , निरंकुश सत्ता , जातीय व धार्मिक तणाव , सांस्कृतिक प्रश्नाचे विक्राळ झालेले रुप , आर्थिक प्रश्नाचे गंभीर स्वरुप , खोट्या आश्वासनांची खैरात , यामुळे जगण्यात निर्माण झालेली अनिश्चितपणा आदि सर्व कारणाने राजकारण व राजकारणी लोकांवरचा सामान्य जनतेचा विश्वास उडत चाललाय हे वास्तव आहे.
*आपल्या भारत देशाने लोकशाही व्यवस्था स्विकारलीय. लोकशाहीत राजकारण हे अपरिहार्य असते हे पहिल्यांदा नीट समजून घ्यायला हवे. आपल्या डोळ्यासमोर राजकारण म्हटल की निवडणूक , मतदान , काळा पैसा वापर , दंडुकेशाही , घराणेशाही , भ्रष्ट यंत्रणा , हाणामारी असे नानाविध रुपे येतात. परिणाम ही नसती झंझटे नकोच म्हणून सुसंस्कृत व जबाबदार नागरिक यापासून दूर राहातात. याचा फायदा वर्षानुवर्षे सात्ताधारी असणाऱ्या वर्गाला आपसूक मिळतो. " राजकारणाचे दुकान " होते ते इथे. या दुकानातून व दुकानदार कडून आपल्या हिताचे निर्णय होत नाहीत . परिणामी आपण अधिक अंतर राखतो व आपल्या ओठांवर " राजकारण व राजकारणी यांबद्दल काही सांगू नको " असे नकारात्मक व स्वहितविरोधी तत्वज्ञान बाहेर पडते. हे घातक आहे.*
मूळात राजकारण म्हणजे नेमके काय ?? मला इथे सरदार भगतसिंग आठवतात. ते बोलले होते की " राजकारण म्हणजे देशासंबंधीची , देश चालवणारी यंत्रणा समजून घेणे " अशा आशयाचे त्यांचे उद्गार आहेत. लोकशाही स्विकारलीय तर मग ही व्यवस्था नेमकी कशावर चालते ?? त्याचा मुलभूत आधार कोणता ?? कायदा कसा बनतो व कसा मोडीत काढला जातो ?? आपली न्यायव्यवस्था कोणत्या मुल्यावर चालतै ?? लोकशाहीचे चार स्तंभ कोण व का नियंत्रित करते ?? अशा अनेक घटकांचा आपल्या सारख्या सामान्य नागरिकावर कसा परिणाम घडतो ?? याचा शास्त्रोक्त अभ्यास करणे म्हणजे राजकारण समजून घेणे .निवडणुका व मतदान हा राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे पण....पण तो एकमेव नाहीय हे जेव्हा समजेल तो सुदिन.
*माझ्या बहुजन बांधवांनो , चिखल साफ करायला चिखलातच उतरावे लागते.थोडा पायाला चिखल लागला तरी कुणी नाकं हुंगायचे कारण नाहीय.कारण नाकाला हात तेच लावतात ज्यांना काठावर बसून स्वच्छतेचे तत्वज्ञान शिकवायची हौस असते. प्रत्यक्षात कार्यात जो असातो तोच असातो खरा नायक.*
आपल्या महामानवानी सुद्धा राजकारणात थेट उडी घेतलीय.गांधीजी ..नेहरू ...पटेल...आझाद हे काँग्रेस मेंबर होते. बाबासाहेबानी रिपब्लीकन हा राजकीय पक्ष काढला. भगतसिंग कम्युनिस्ट होते. सुभाषबाबू फाँरवर्ड ब्लाँक पक्ष काढला. वि.रा.शिंदेनी बहुजन पक्षाचे राजकारण केले. अजूनही बरीच उदाहरणे आहेत. सांगण्याचा मथितार्थ हा की ....राजकारण वर्ज्य नसते हा संदेश आपल्या महामानवानीच दिलाय. मग आपण का फारकत घ्यावी ??
*महत्त्वाचा प्रश्न असा की...नेमके कोणते व कुणाचे राजकारण करावे ?? जो राजकीय पक्ष सकल बहुजन वर्गाचे हित कृतीतून चिंतितो , लोकशाही मुल्यावर व व्यवस्थेवर जो विश्वास ठेवतो , समाजातील गोरगरीब लोकांच्या हिताकरता जो आपल्या तमाम निष्ठा वाहतो , जात धर्म पंथ वंश अंधश्रध्दा या पाच राष्ट्र पोखरणारे किडिपासून जो राष्ट्रांचे रक्षण करु शकतो असा राजकीय पक्ष निवडा. नवीन पक्ष काढला तरी हरकत नाहीय. समाजकारण व राजकारण या दोन रथांच्या चाकाना समसमान महत्त्व द्या . निरोगी व विधायक राजकारण शक्य आहे.*
*!! राजकारण वर्ज्य नाहीय !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १७ )*
*" रुबाब पायजे "*
अत्यंत आत्मबढाईखोर असे हे छोटे वाक्य बहुजनांच्या पोरांच्या तोंडी कायम असते. घरात असो वा गल्लीत ....शाळेत असो वा कट्ट्यावर प्रत्येक ठिकाणी हे वाक्य सर्रास ऐकू येते. रुबाब हा शब्द अगदी ओठांवर पक्का असतो.
*रुबाब म्हणजे तरी काय हो ?? जीन्स पँट , डेनीम शर्ट , बुडाखाली गाडी , डोळ्यांना गाँगल , हातात घड्याळ नव्हे कडं अथवा रंगीबेरंगी दोरे , तोंडात गुटखा किंवा मावा अथवा सिगरेट , भिरभिरती नजर पोरीवर , पायात लेदर शुज आणि याबरोबर तोंडात मोठमोठ्या बाता. हे सर्व म्हणजे रुबाब असतो. ऐट मारण्याची ही पद्धत सर्वात समान असते. अन् सर्वात वाईट्ट म्हणजे कोणत्याही कमाई न करणारे बहुजन पोरं दिमाखात वर्षानुवर्षे हे रेटत असतात. कशाच्या जोरावर ?? तर खाजगी सावाकारीतून कर्जे घेऊन हा रुबाब रेटला जातो. हे अत्यंत घातक आहे.*
रुबाबाला इंप्रेशन मारणे असेही म्हणतात. हे इंप्रेशन स्वतःला खुलवण्यासाठी नव्हे तर दुसऱ्याला दाखविण्यासाठी असते. या रुबाबाने मिळते तरी काय हो ? आपणही इतरांसारखेच आहोत ...ही स्वमनाला मान्यता मिळते. आणि मग कोणत्याही बदलाविना जीवन कर्जात ओढण्याची दृष्ट सवय लागते. या सवयीनेच बहुजन पोरांचे सर्वाधीक नुकसान झालंय.
*माझ्या बहुजन बांधवांनो...जरा विचार करा. आपल्या महामानवांनी कसे जीवन जगले ते. हिंदवी अर्थात भारतीय स्वराज्य निर्माण करणारे शिवराय हे अखंड जीवन कवड्यांची माळ गळ्यात घालून जगले. महात्मा फुले हे काँन्ट्रँक्टर असूनही साध्या वेशात राहिले. शाहू महाराज राजे असूनही गादीगिरद्यांऐवजी साध्या लाकडी पलंगावर झोपत. बाबासाहेबांनी आपल्या घरात शोभेच्या वस्तू न लावता ग्रंथांची कपाटे लावली. गांधीजी बँरीस्टर असूनही देशातील दारिद्रय बघून एका पंचासहीत जगभर भटकले. सांगण्याचा मथितार्थ असा की...साधी राहणी व उच्च विचारसरणी हा आपल्या महामानवांचा जीवनसंदेश आहे.*
*रुबाब....या शब्दाला जागून स्वतःला कर्जबाजारी करु नका. बढाईखोरपणाची सवयीने जीवनाचा घात होतो. अशा पोकळ बढाया व भपकेबाज जीवन जगण्याऐवजी स्वतःला ज्ञानसंपन्न करत जगा. ऐट...ज्ञानाची करा. तोंडात व्यसन करण्यापेक्षा गोड भाषा ठेवून लोकांना आपले करा......असे वागलात तर खर्या अर्थाने तुम्ही " रुबाबदार " असाल. विचार तर करा.*
*!! रुबाब नको , चांगल्या वर्तणुकीने रुबाबदार व्हा ..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १८ )*
*ए काळतोंड्या , ए काळुंद्रे..*
रंगाने काळा सावळा असणाऱ्या मुलाला ए काळ्या...व मुलीला ए काळुंद्रे अस सर्रास बहुजनात बोलले जाते . कधी चेष्टेने तर कधी रागानेही हा उच्चार होतो. बरोबर जोडीला एखादी शिवी हासडली जातेच. समोरच्या मुलामुलीला काय वाटत असेल याचा जराही विचार होत नाही . ही सवय दोन्ही बाजूला लागल्यामुळे "चलता है" म्हणत जिभेचे हे घाण वळण सुरुच राहते.
*त्वचेला मिळणारा काळा अथवा गोरा रंग हा त्वचेतील ठराविक घटकांच्या कमीजास्त प्रमाणावर अवलंबून असते. उष्ण कटिबंधातील लोक सर्रास काळे व शीत कटिबंधातील सफेद असण्याची शक्यता जास्त असते. ज्या ठिकाणी जो रंग जास्त प्रमाणात असतो तोच च्या ठिकाणी सौदर्याचा निकष मानला जातो. भारतासारख्या ठिकाणी सुध्दा हा भेद आढळून येतो. गोरा रंग इथे जास्त आकर्षक मानला जातो. या समजूतीचा परिणाम सर्व ठिकाणी दिसून येतो. विशेषतः लग्नाच्या वेळी जवळजवळ कुणालाही ( सन्माननीय अपवाद ) काळी मुलगी पसंत पडताना जास्त कष्ट पडतात.याचाच दाखला देताना शाहीर विठ्ठल उमाप यांनी छान गाणे रचालेय. ते म्हणतात "आजकाल अहो , जो तो म्हणतो , बायको पाहिजे गोरी......आता तुम्हीच सांगा पाव्हणं , कुठं जातील काळ्यापोरी " या कवनात खरे वास्तव मांडलय . बरोबरच एक खंतही नोंदवलीय . काळ्या मुलींच्या लग्नाचा प्रश्न विचार करण्याजोगा आहे. याउलट मुलगा काळा असला तरी तोही पहिली अट ठेवातो की मुलगी रंगाने गोरी असावी. अशा तह्रेने दोन्ही बाजूने काळ्या रंगाला डावलले जाते.*
माझ्या बहुजन बांधवानो , जरा विचार करा. तुम्ही ज्या देवाच्या दर्शनाला मंदिरात जाता तो देव काळासावळाच असतो. पंढरीचा विठोबा हा लाखो लोकाचे श्रध्दास्थान असते. बरेच देवदेवता काळ्या पाषाणात घडवलेले असतात. तरीही ते सुंदर दिसतात. कारण त्यांच्या कडे बघण्याची श्रध्देची भावना. मग बांधवांनो अशी प्रेमळ भावना जर "जिवंत काळ्या मुलामुलीबाबत " ठेवली तर तेही सुंदर दिसतील की.
*"कुणी काळे आहे की गोरे आहे यावर त्याच्या विषयी जीभ सोडणे योग्य नाहीय . " महत्त्वाचे हे की कोणत्या व्यक्तीचे मन काळे आहे ते बघणे." यावरुन त्याच्याविषयी मत ठरवण जरा सुलभ होईल. काळ्या रंगाच्या फळ्यावर उमटलेली पांढरी अक्षरे व्यक्तीला शिक्षित करतात. त्याच्या जीवनात ज्ञानाची पहाट उगवतात. तेव्हा काळ्या रंगाला नावे ठेवताना जरा विचार व्हावा.*
*या रंगाच्या भेदावरुनच अमेरिकेत मोठा भेद पडला होता. ज्या अमेरिकेत काळ्या व्यक्तीला पाहून अत्यंत तुच्छ वर्तन व्हायचे तिथेच कृष्णश्वेतवर्णीय बराक ओबामा नावाचा माणूस अमेरिकेचा राष्ट्रांध्यक्ष होतो. सर्वाना आपलेसे करतो. हे उदाहरण डोळ्यासमोर असावे.*
थोडक्यात ...कुणालाही रंगावरुन चिडवू नका. त्यांना चिडवून स्वतःचे मन किती काळे आहे याचे प्रदर्शन मांडू नका. काळागोरा या भेदाने एका मोठया राष्ट्रांची मोठी हानी झालीय. अन् मानवतेची वाट लागलीय .हे ध्यानात असूदे .
*!! काळागोरा....भेद नको !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग १९ )*
*लै विचार करु नको...डोके फिरंलं...*
अगदी सहज उच्चारले जाणारे वाक्य बहुजनांच्या पिढ्यानपिढ्या उध्वस्त करणारे आहे.एखादी बहुजन व्यक्ती एखाद्या गोष्टीवर थोडे अधिक मत व्यक्त करत असेल तर त्याला टाळण्याच्या अथवा थट्टेच्या स्वरूपात हे वाक्य बोलले जाते.विचार करणे म्हणजे जणू काही अपराध आहे अशीचा भावना यातून दृग्गोच्चर होते.माणूस व्यवस्थेच्या अधीन होऊन गुलामी स्विकारतो त्याचे मुख्य कारण त्याने ही गुलामगिरी तोडण्यासंबंधीचा विचार करणेच सोडून दिलेले असते. " गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल " असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. हा धागा इथे जुळवून बघितला तर विचार करणे ही अत्यंत गरजेची गोष्ट ठरते. मुख्य म्हणजे लै विचार करून कुणाचेच डोके फिरत नाही...उलट आपल्या धडावर आपलेच डोके विराजमान होते.
*अनादी कालापासून माणूस प्राणी हा उत्क्रांत होत आला याचे कारणच मूळी माणूस " विचार " करु लागला हेच आहे. माणूस व इतर प्राणी यातील मुलभूत फरक म्हणजे माणूस हा विचारशील प्राणी आहे. सतत नवनवे शोध घेऊन तो आदिम रानटी अवस्थेतन आजचा आधुनिक मानवापर्यत येऊन पोचलाय. लाखो वर्षे वाघ अथवा सिंह आपल्या शिकारीची पद्धत बदलू शकले नाहीत . शिकार गिळून सुस्त पडणाऱ्या अजगराला चांदण्या का चमचमतात याचे उत्तर शोधावे वाटले नाही .जंगलात वणवा लागला तर जीव मुठीत घेऊन पळणारे हत्ती हा वणवा का लागतो व तो कसा विझवावा या प्रश्नाचे उत्तर शोधू शकले नाहीत . फक्त न् फक्त मनुष्य हा विचार करून करून निसर्गाच्या अदभूत रहस्याची उकल करू पाहतोय. विचार केल्याने मनुष्याने आपले प्रभुत्व इतर प्राण्यावर सिध्द कालय. वाघ , सिंह , हत्ती असे अजस्त्र व भयंकर प्राणी माणूस पाळीव बनवू शकला ते या विचार करण्याची क्षमता होती म्हणजे . वाघ सिह हत्ती यांनी कोणत्या मानवाला पाळीव बनवले आहे असे आपण ऐकलय अथवा पाहिलय का??. इतर प्राणी आपला मेंदू फार ताणत नाहीत . माणूस मात्र आपला मेंदू विचारांच्या विविध पातळ्यावर घासतो म्हणून निसर्गचक्रात माणूस केंद्रस्थानी येऊ शकला.*
माझ्या बहुजन बांधवांनो...जरा विचार करा. आक्रमक मुस्लीम राज्यकर्त्यांकडून गोरगरीब रयतेची सुटका करुन हिंदवी अर्थात भारतीय स्वराज्य निर्माण करण्याचा " विचार " शिवरायांनी केलाच नसता तर ??? एका अविद्येने केलेले अनर्थ डोळ्यासमोर आल्यावर ही अविद्या घालविण्यासाठी विद्येचा प्रसार करण्याचा " विचार " जोतीराव - सावित्रीने केला नसता तर ??? ही राजसत्ता लोकसत्ताक करून दिनदुबळ्याना आधार देण्याचा " विचार " लोकराजा शाहूराजाने केलाच नसता तर ?? इथल्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेचा विध्वंस मानवी हक्कातून व दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर यांनी " विचार " केला नसता तर ?? देश स्वातंत्र्याच्या प्रवाहात सर्वसामान्य रयत सहभागी व्हायला पाहिजे असा " विचार " महात्मा गांधीजींनी केला नसता तर ??? ....विचार करा ..आज बहुजनसमाज कोणत्या अवस्थेत असता हो ???
*माझ्या बहुजन बांधवांनो...विचार करणे व तद्नूरुप कृती करणे हे मानवालाच जास्त शक्य आहे. यातूनच तो उत्तरोत्तर प्रगती करत गेला. माणसाने विचार करायचच सोडून दिले तर " माणसाचा पुन्हा माकड" बनण्यास जास्त वेळ लागणार नाही . तेव्हा स्वतः चा , कुटुंबाचा , जिवलगांचा , देशाचा , विश्वाचा ....विवेकी व विधायक पद्धतीने शास्त्रोक्त विचार करा. " विचार करतो तोच माणूस " ही माणसाची व्याख्या मला पटते.*
*!! विचार करा...माणूस बना !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २० )*
*हे अस्सच चालणार...काय बदलत नाही रावं....*
किती निराशाजनक उद्गार हे. माणसाचा संपूर्ण आशावाद नष्ट होतो इथे. मागील पानावरून पुढे इतकेच काय ते आयुष्य उरते मग. बदल घडणारच नसेल तर कशाला प्रयत्न करा असा निराशेचा सूर उमटतौ आणि मग व्यवस्था वर्षानुवर्षे तशीच चालू राहते. दर पिढ्यानगणीक ती व्यवस्था मानवी जीवन अधिक जटिल व कष्टप्रद बनवते. माणसाने नेहमी सकारात्मक राहून आशावाद कायम ठेवून कार्यरत राहणे हेच सर्वात योग्य असते.
*"बदल हा विश्वाचा नियम आहे " असे आधुनिक तत्वज्ञान सांगते. विश्वात सतत बदल घडत असतो. जगातील कोणत्याही गोष्टी अथवा घटना याला अपवाद नसतात. जरा पहा सर्वत्र ....पायी प्रवास करणारा माणूस आज अवकाशाचा प्रवास सहज करतोय.....कंदमुळे खाऊन जगणारा माणूस आज कंदमुळाच्या नवनवीन रेसिपीज रोज शोधून दाखवतोय.....वल्कले नेसणारा माणूस आज अत्याधुनिक ब्रँडेड कपडे घालतोय.....पायात लाकडी खटावा घालणारा माणूस आज लेदर शूज घालतोय.....साध्यासुध्या रोगाने गावच्या गावे मेलेली पाहणारा माणूस ते रोग समूळ नष्ट करू पाहतोय.....मोरपिसाने लिहिणारा माणूस आज काँम्युटर स्क्रीनवर बटणं दाबीत लिहितोय...गुहेत राहणारा माणूस आज उंचउंच इमारतीत बिनधास्त राहतोय...एक ना अनेक उदाहरणे देता येतील. सांगण्याचा मतितार्थ हाच की.....मानवी जीवनात बदल हाच नियम आहे.*
माझ्या बहुजन बांधवांनो...जरा ध्यानात घ्या. हे कायम अस्सच राहणार म्हणत शिवरायांनी हात टेकले असते तर ...तर हिंदवी अर्थात भारतीय स्वराज्य उभे राहिले असते ?? काय फरक पडत नाही म्हणत जोतीराव - सावित्रीमाई स्वस्थ बसले असते तर शिक्षण आपल्या वाट्याला आले असते का ??...बदल होत नाही म्हणून शाहूराजा थंड पडला असता तर बहुजनांच्या पूर्वृपिढीला शहाणपण व आधार मिळाला असता ??... काय फरक पडतो असा निराशावादी सूर आवळत बाबासाहेब शांत राहिले असते तर मागासवर्गाला मुक्तीची पहाट दिसली असती का ??? ..जरा विचार तर कराल.
*माझ्या बहुजन बांधवानो...बदल हा विश्वाचा नियम आहे हे खरेच आहे. परंतु जगात कोणताही बदल हा आपसूक व सहजासहजी घडत नाही . बदल घडावा यासाठी आपण स्वतः कृतीशील असावे लागते .बदलासाठी धडपडावे लागते . समाजातून अंधश्रध्दा नष्ट व्हाव्यात म्हणून नरेंद्र दाभोलकराना पुढे यावे लागते . लोकशाहीत कष्टकरी वर्गाचा आवाज मुर्दाड शासनापर्यत पोचविण्यासाठी काँ. गोविंद पानसरे यांना आवाज उठवावा लागतो. मानवी विचार स्वातंत्र्यसाठी एका साँक्रेटिसला विष प्यावे लागते .धार्मिक वर्चस्व झुगारण्यासाठी एका तुकारामाला आयुष्याची होळी पेटवावी लागते . तेव्हा ....होय तेव्हाच बदल घडून येतो. आता यापुढे निराशा टाळा. आशावादी रहा.धार्मिक , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक ,पर्यावरण अशा सार्या बाबतीत बदल शक्य आहे. या....या माझ्या बांधवांनो एकमेकांना साथ करीत , जीवनात बदल घडवित मानवी जीवन अधिक आनंददायी करुया.*
*!! बदल करूया...आशावादी राहूया ..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २१ )*
*बाईमाणसाला यातलं काय कळतयं हो...*
अखिल विश्वातील शहाणपण जणू पुरुषाच्या डोक्यात येऊन सामावलेले आहे अशा अविर्भावात हे वाक्य बोलले जाते. यात पुरुष असल्याचा आत्मगौरव व स्त्रीच्या निर्णय क्षमतेविषयीचा उपहास प्रकट होत असतो. पुरुषसत्ताक पध्दती यातूनही बळकट होत असते. निर्णय प्रक्रियेत स्थान नाहीय याचा अर्थच मूळी " आम्ही तुम्हाला जमेतं धरत नाही " असाच होतो. समस्त स्त्री वर्गाविषयीची ही भावना मानवतेच्या विरोधात जाणारी आहे. घरगुती हुकुमशाहीच्या जवळ जाणारी ही पावले वेळीच रोखायला हवीत.
*मूळात स्त्री वर्ग हा संयत असतो. त्यामुळे एखाद्या समस्येवर शांतपणे व निर्णायक तोडगा काढण्याची तिची क्षमता जास्त असू शाकते. आपल्या कडेही वारंवार स्त्री वर्गाने आपली हूशारी सिध्द केलीय. पंडीत याज्ञवल्क्याला भरसभेत निरुत्तर करणारी गार्गी आपण जाणतो. दोन रयतेचे छत्रपती घडवणारी जिजाऊ आपण श्रध्दास्थानी मानतो. जोतीरावाच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा आपल्या खांद्यावर पेलणारी सावित्रीमाई आपणाला माहिती असते. बलाढ्य औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत धूळ चारणारी ताराराणी आपणाला वंद्य असते. शाहूराजाला साथ करणारी लक्ष्मीदेवी आपणाला ठाऊक आहे. बाबासाहेब घडवण्यात माता रमाईचा वाटा आम्हाला मान्यय आहे. ब्रिटिशसमोर देशाचा तिरंगा फडकवणारी अरुणा असफ अली आपल्याला माहिती असते. बलाढ्य अमेरिकेला परतवून लावाणारी इंदिरा आपल्या कौतुकाचा विषय होतो. अशी असंख्य उदाहरणे समोर असतानाही....बाईमाणसाला यातलं काही कळत नाही असे आपल्या ओठांवर का येते..??*
माझ्या बहुजन बांधवांनो...जरा विचार करा. आपले पोरं अजूनही घरी परतले नाहीय म्हणून दाराच्या तोंडावर आपल्या वाटेकडे डोळे लावून आपली काळजी घेणारी आईला खरंच काही कळत नाही अस म्हणू का ??..आपला मोडकातोडका संसार आपल्या पूर्ण निष्ठेने वाहून खर्चाची तोंडमिळवणी करणारी आपल्या पत्नीला संसारातल काही कळत नाही अस म्हणू का ??,... आपल्या भाऊरायाला आपल्या लग्नाचा बोजा पडायला नको म्हणून लहानमोठी कामे करणाऱ्या आपल्या बहीणीला आपली काळजी नाहीय अस बोलणार का ??...आपला बाबा थकूनभागून घरी परतल्यावर त्याला त्रास देऊ नये असे शहाणपण जवळ बाळगणारी आपली मुलगीला काही कळत नाही अस म्हणाल का ?? ...आपल्या मित्राच्या सुखदुःखाची आपण वाटेकरी आहोत आशी रास्त भावना बाळगणारी आपली मैत्रीणला आपल्या मनातील काही कळतं नसेल का ?,??...विचार व्हावा.
*साधी उदाहरणे पहा....आपल्या बालकाला सहलीला जायचे असेत तरीही तो निर्णय आपण आपल्या पत्नीला विश्वासात घेऊन करत नाही . बाबा म्हणतील तेच फायनल असते.....एखाद्या गंभीर चर्चेता स्त्रीवर्गाचे मत जाणून घ्यायला आपण फारसे उत्सुक नसतो....हाँटेलला जेवायला गेलो तर तिथल्या मेनूची आँर्डर पुरुषच बरेचदा करतो....कोणता चित्रपट पहायचा याचा निर्णय आपण मनोमन करून टाकतो...अशा बरेच छोट्यामोठ्या गोष्टीत पुरुष " आँर्डरसिंग " असतो व बरोबरची स्त्री असते " शो पीस ". हे योग्य नाहीय अस मला प्रामाणिकपणे वाटते .*
माझ्या बहुजन बांधवांनो....विश्वास द्यावा लागतो . हा विश्वास व्यक्तीला निर्णय प्रक्रियेत सामावूनच द्यायचा असतो. प्रत्येक गोष्टीला फक्त एकांगी निर्णयने प्रेरीत करु नका. स्त्री वर्गाचे मत जाणा. अत्यंत सम्यक व संयत मत असते. अंतिम निर्णय घेताना अडचण येता नाही . " तिला काय कळतयं म्हणून टाळू नका , तिला याची दुसरी बाजू माहिताय ती जाणून घेऊया " अस सकारात्मक भाव जपा.....कारण " ती " नेहमीच आपले व कुटुंबाचे कल्याण चिंतीते.
*!! स्त्रीला निर्णय प्रक्रियेत सामावून घ्या !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २२ )*
*जातीसाठी माती खावी....*
भारतीय समाजात इतके संकुचित व मानवताविरोधी वाक्य दुसरे कोणतेच नाहीय . जातीबध्द समाजव्यवहार चालणारा हा देश. इथल्या तरुणाईपासून वृध्दापर्यत ओठावर हे वाक्य येते तेव्हा मनाला अत्यंत वेदना होतात. जात ...या शब्दाने भारतीय समाजाचे सर्वाधीक नुकसान केले आहे. जितक्या लवकर ही जात नष्ट होईल तितक्या लवकर आपण मानवतावादी बनू.
*जातीव्यवस्था...हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे...अस इथल्या संतसुधारकानी आयुष्यभर सांगितलं . जातीनिर्मूलनासाठी आपले अवघे जीवन वाहून दिले. ह्या जाती नष्ट होऊन भारत हे "एकमय राष्ट्र" होण्यासाठी ही सारी धडपड होती. इथे संतसुधारक जन्मले..त्यांनी जातीव्यवस्था उखडायचा प्रयत्न केला....पण ही जात अत्यंत चिवट असते. प्रत्येक जातीतील माणसांनी आपापल्या संतांचे व सुधारकांचे वाटे पाडून घेतले . संतसुधारकांचा विचार व व्यवहार जातीच्या चौकटीत बंदीस्त होऊन बसला. परिणामी " एकमय राष्ट्र " असे भारत निर्माण होऊच शकला नाही . हजारो जातीत इथली माणसे विखुरली. प्रत्येक जात स्वतःला दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ ठरवून आपल्या पायाखाली एक जात तुडवू लागली . याचा परिणाम असा झाला की...आपण कधीच " एक " होऊ शकलो नाही . याचाच फायदा घेत परकियानी येथे आक्रमण केले.भारत लुटला. गुलामगिरी वाट्याला आली. तरीही ....तरीही २१ व्या शतकात प्रवेश करतानाही प्रत्येकाच्या मनात ही जातीव्यवस्था दृश्य अथवा अदृश्य स्वरूपात असतेच असते.( सन्माननीय अपवाद ). जात जोपर्यंत जात नाही तोवर आपण "मेरा भारत महान " हे वाक्य उच्चारु नये असे मला प्रामाणिकपणे वाटते .*
माझ्या बहुजन बांधावानो..विचार करा. जातीसाठी माती खावी हे वाक्य वा तसा काही व्यवहार आपल्या महामानवांनी कधीच केला नाही . छत्रपती शिवरायांनी फक्त मराठा जातीसाठी स्वराज्य उभारले नाही तर " मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक एतद्देशीय " या अर्थाने सर्वजातीधर्मियांकरता हिंदवी अर्थात भारतीय स्वराज्य उभारले....महात्मा फुलेंनी फक्त " माळी " समाजाकरता शाळा उभारल्या नाहीत तर संपूर्ण बहुजनांच्या दारी ज्ञानगंगा आणली. शाहूराजाने फक्त "मराठा" वसतीगृह बांधले नाहीय तर वेगवेगळ्या बावीस जातीची वसतीगृहे उभारली अन् तिथला व्यवहार सर्वजातीधर्माकरता खुला केला. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिताना अथवा आरक्षण देताना प्रथम "महार" समाजाला आरक्षण न देता प्रथम ओबीसी जातीवर्गाला हा अधिकार दिला.....याचा अर्थ असा की , आपल्या महामानवानी स्वजातीत रमणे वा तिचाच उध्दार करणे असले अमानवी व्यवहार केले नाहीत .
*ही जातीव्यवस्था उध्वस्त व्हावी अशीच आपल्या महामानवांची कृती होती. ज्यांना जातीव्यवस्थेने शस्त्र धरायला बंदी केली त्यांच्याच हाती तलवार देऊन शिवरायांनी हिंदवी अर्थात भारतीय स्वराज्य उभारले. ज्यांना शिक्षणबंदी होती त्यांनाच शिक्षण देऊन जोतीबा-सावित्रीने ज्ञानगंगा सर्वत्र पोचवली. ज्यांना या अमानुष व्यवस्थेने "जगणे" नाकारले त्यांनाच शाहूराजाने आपल्या छातीशी धरले. ज्यांना आयुष्यभर न्याय्य हक्क अधिकारापासून वंचित ठेवले त्या सकल बहुजनांना बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून उपकृत केले.....आपल्या प्रत्येक महामानवाचा जीवन व्यवहार हा "जातीसाठी माती खावी असा नसून......जाती मातीत गाडावी " असाच होता.*
तेव्हा बहुजन बांधवांनो....यापुढे व्यवहारात जातीव्यवस्था राबवण्याचे अमानुष कार्य करु नका. जाती तोडण्याचे व नाती जोडण्याचे मानवकेंद्री कार्य करा. " आपण प्रथम माणूस आहोत " हे ध्यानात ठेवून "माणसासारखा" व्यवहार करा.
*!! जाती तोडा...नाती जोडा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २३ )*
*शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये....*
एक अर्धसत्य असं हे वाक्य आहे. कोर्टकचेरी हा वेळखाऊ अन् सहनशीलतैचा अंत पाहणारा मुद्दा आहे हे खरे . पण तेवढेच खरं नाहीय हो... लोकशाहीच्या चार प्रमुख स्तंभात न्यायपालिका येते . वरील वाक्य अर्धसत्य अशासाठी की हे वाक्य वैयक्तिक कारणाकरता लागू होईल परंतु सार्वजनिक हिताकरता लागू करताना....थोडा विचार व्हावा.
*मुळात माणूस कोर्टाची पायरी का चढतो ? तर त्याला अमुकतमुक प्रकरणात आपल्यावर अन्याय होतोय व आपणाला न्याय मिळायला हवा या भावनेने तो कोर्टाची पायरी चढतो. काही मिळकतीसंबंधी अथवा इतर कारणाने तो नाईलाजास्तव ही पायरी चढतो. पण आमची न्यायव्यवस्था निष्ठूर खरेच.कारण वर्षानुवर्षे प्रकरणे रेंगाळत ठेवण्याची तिला सवय ...नव्हे व्यसन जडलंय. धावपळीच्या या जगात माणूस न्यायासाठी वणवण धावपळ करतो...जवळची पुंजी संपवतो व प्रतिक्षा करत राहतो. त्यातूनही त्याच्या वाट्याला न्याय येईलच असं नाही . परिणामी वरील वाक्य त्याच्या तोंडातून अनुभवानं बाहेर पडते. ही झाली एक बाजू... मान्यय मला ती. आता जरा दुसरी बाजू पाहू.*
*वैयक्तिक कारणाने आलेले अपयश हा वैयक्तिक अनुभवच असतो व सर्वाना समान नसतो. लोकशाही व्यवस्थेत घटनाकारांनी या न्यायव्यवस्थेला चार स्तंभात सन्मान केला त्याअर्थी लोकशाही व्यवस्थेच्या नजारेतून जरा हे वाक्य पाहूया...*
*लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य अस म्हटल जाते . कायदा बनविण्याच्या व राबविण्याच्या प्रयत्नात न्यायपालिकेचा हस्तक्षेप महत्त्वाचा असतो. लोकशाही व्यवस्था नागरिकांनी निवडून दिलेले सरकार चालवते. हे सरकार कायद्याने नागरी हितकल्याणाला बांधिल असते.हे हितकल्याण होत नसेल तर नागरिकांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागते.न्यायालयाने हस्तक्षेप केला तर सरकारसुद्धा नमते.हे बरेचदा आपण अनुभवतो.अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न असो की भ्रष्टाचार मुद्दा असो,धार्मिक प्रश्न असो की क्रिडाक्षेत्राचा प्रश्न असो, सामाजिक प्रश्न असो वा शैक्षणिक प्रश्न असो... अशा किती गोष्टीत सरकार जेंव्हा नागरिकाचे मुलभूत अधिकार देण्यास जाणीवपूर्वक असमर्थता दर्शवते..तेंव्हा न्यायालय अर्थात कोर्टाची पायरी चढावीच लागते.सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या जनहितयाचिकेने कितीतरी महत्वाचे प्रश्न ऐरणीवर आलेत.ते प्रश्न सुटण्यास मदत झालीय हे वास्तव आहे.*
*लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य अस म्हटल जाते . कायदा बनविण्याच्या व राबविण्याच्या प्रयत्नात न्यायपालिकेचा हस्तक्षेप महत्त्वाचा असतो. लोकशाही व्यवस्था नागरिकांनी निवडून दिलेले सरकार चालवते. हे सरकार कायद्याने नागरी हितकल्याणाला बांधिल असते.हे हितकल्याण होत नसेल तर नागरिकांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागते.न्यायालयाने हस्तक्षेप केला तर सरकारसुद्धा नमते.हे बरेचदा आपण अनुभवतो.अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न असो की भ्रष्टाचार मुद्दा असो,धार्मिक प्रश्न असो की क्रिडाक्षेत्राचा प्रश्न असो, सामाजिक प्रश्न असो वा शैक्षणिक प्रश्न असो... अशा किती गोष्टीत सरकार जेंव्हा नागरिकाचे मुलभूत अधिकार देण्यास जाणीवपूर्वक असमर्थता दर्शवते..तेंव्हा न्यायालय अर्थात कोर्टाची पायरी चढावीच लागते.सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या जनहितयाचिकेने कितीतरी महत्वाचे प्रश्न ऐरणीवर आलेत.ते प्रश्न सुटण्यास मदत झालीय हे वास्तव आहे.*
*तेंव्हा बहुजन बांधवांनो..वैयक्तिक नव्हे पण सार्वजनिक हिताकरता ( ज्यात तुमचे वैयक्तिक हित सामावलेले असते) कोर्टाची पायरी चढावी लागणे हे लोकशाहीत अपरिहार्य असते. महात्मा गांधी असोत की नेहरू..बाबासाहेब आंबेडकर असोत की बैरिस्टर गोखले..काँ.पावसरे असोत की डॉ.दाभोलकर...आपल्या महामानवांनी सार्वजनिक हिताकरता कोर्टाची पायरी चढणे शहाणपणाचे मानले आहे.तेंव्हा हे अर्धसत्य विधान जिभेवर घोळवताना आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो व त्यामध्ये मुलभूत अधिकारासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे योग्य असते..याची जाणीव ठेवा. सार्वजनिक हिताकरता कोर्टाची पायरी शहाणा माणूसच चढेल असे मला प्रामाणिकपणे वाटते.*
*!! लोकशाहीत सार्वजनिक हिताकरता शहाण्याला कोर्टाची पायरी वर्ज्य नसते...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २४ )*
*वाचून कोण शहाणं झालंय आजवर....*
अत्यंत अडाणी , अज्ञानी व मूर्खपणाचे म्हणावे असे हे वाक्य बहुजानांच्या तोंडी आढळते तेव्हा मनं दुःखाने भरून जाते. आपला मित्र अथवा कोणी सहकारी अगदी वर्तमानपत्र वाचत असला तरीही त्याला हेटाळणीने हे वाक्य सुनावले जाते. जणू काही या जगाचे अचूक ज्ञान याच महाभागाला झालेले असते. या वाक्याने बहुजनांच्या गुलामगिरीची कारणे सापडतात.
*वाचन करणे , चिंतन करणे व तटस्थपणे आपले प्रामाणिक मत बनवणे ही खरेतर विवेकी व विचारी मनाची लक्षणे आहेत. वाचनाने मनुष्याला व्यापक ज्ञान मिळते. एक नवी दृष्टी मिळते. एखाद्या गोष्टीवर आपली भुमिका नेमकी कोणती असावी यासंबंधीचा संभ्रम वाचनाने दूर होतो . आपली एक निश्चित भुमिका...एक निश्चित मत तयार होते. वाचनाने बहुश्रुतता वाढते. समज वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक स्वतःचा दृष्टिकोन तयार होतो . "वाचाल तर वाचाल " म्हणतात ते यासाठीच .*
माझ्या बहुजन बांधवांनो...जरा विचार करा. आपल्या प्रत्येक महामानवाने " वाचन " हे त्यांच्या भात्यातील एक शस्त्र बनवले. महात्मा फुलेंनी ब्राम्हणी धर्मग्रंथ वाचले तेव्हाच त्यांना त्यातील लबाडी ध्यानात आली आणि मग " या देशातला पहिला अर्वाचीन समाजक्रांतीकारक " म्हणून जोतीराव फुले पुढे आले. शाहूराजाचे वाचन आफाट होते याचा दाखला दस्तरखुद्द प्रबोधनकार ठाकरेनी दिलाय. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाचनात घालवून स्वतःला ज्ञानसंपन्न केले व हेच ज्ञान बहुजनांच्या उन्नतीकरता वापरले. सरदार भगतसिंग हे मृत्यूच्या दारातही वाचनाचा आनंद घेत होते....एक ना अनेक आपल्या महामानवांची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत.
*माझ्या बहुजन बांधवानो ... जगात विविध गोष्टीचे विविध ज्ञान पसरलयं. जेवढे जमेल तेवढे घ्यावे व समाजालाही विवेकी बनवायचा यत्न करावा. आपल्या महामानवांनी आपणासमोर हाच आदर्श ठेवलाय. आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकूया. पुस्तकांशी मैत्री ..हा जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. तो आनंद घ्या. जीवन सुंदर बनवा....पुस्तकांसवे...*
*!! वाचाल तर वाचाल...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २५ )*
*' बायकी ' कामे कसली करतोस रे....*
बहुजन समाजाच्या पोराच्या व स्त्री वर्गाच्याही अंगवळणी पडलेल हे वाक्य. श्रमाची विभागणी स्त्री पुरुष जातीवरुन करणारे. हे वाक्य इतके सवयीचे झालंय की यात काही तरी चुकतेय असं दुतर्फा असणाऱ्या लोकांना वाटताच नाही . परिणाम असा होतो की ..मनावर नकळत हे बिंबवले जाते की अमुक अमुक काम तमक्याचे व तमुकतमुक काम अमक्याचे. ही श्रमाची विभागणी आजकालच्या धावपळीच्या जगात मग कित्येकदा त्रासदायक ठरते. पण सवायीचे गुलाम बदल घडवू इच्छित नसतात. श्रमविभागणी सुरुच राहते.
*आपल्या घरातच पहा ना...आपल्या बाळाने ' शी ' केली की आम्ही बाप म्हणवणारे आपसूक बाजूला होतो व पुढील क्रियाकर्म आपोआपच स्त्री कडे ढकलले जाते. घरातील झाडलोट करणे असो की पाणी भरणे असो , अंथरुण घालणे असो की मुलांना शाळेत पोचवणे असो , रात्री झोपताना गँसचा रेग्युलेटर बंद करणे असो की दारात पडलेल वर्तमानपत्र असो ...अशी कितीतरी कामे ही जणू काही फक्त महिला वर्गासाठीच राखीव ठेवलीयत. तर पुरुषाने काय करावं बरं ?? पुरुषाने आरामात टिवी पाहत वर्तमानपत्र वाचून ' अपडेट ' बनावे. घरात सर्व व्यवस्थित आहे की नाही याचे काटेकोर निरीक्षण करावे. मुलांच्या अभ्यासावेळी एकतर बाहेर फिरावे किंवा टिवी मोबाईल दुनियेत रमावे. कारण काय तर...दिवसभर काम करुन किती थकलेला असतो पुरुष . त्यामुळे घरी त्याला निवांत हवा असतो. पण जरा दुसरी बाजूही पहा... आपल्या घरची स्त्री सुध्दा दिवसरात्री राबतच असते हो. सकाळी लौकर उठल्यापासून रात्री उशिरा झोपण्यापर्यत तिला निवांत पणा असा नसतो. तिच्याही मनाचा थोडा विचार करावा...*
माझ्या बहुजन बांधवांनो...कधीतरी ' बायकी ' समजली जाणारी कामे जरा मनापासून करून बघा की. सकाळी उठून एकवेळ मस्त असा चहा आपल्या हाताने आपल्या पत्नीसाठी बनवून बघा. लहान बाळाला शाळेत पालक म्हणून एक दिवस सोडून या बरं. रोज ती एकटी किती पाणी भरणार ? जरा तिच्या हातातून बादली अथवा हंडा हक्काने काढून घ्या की. एक रात्री अंथरुण स्वतः अंथरुण पाहूया की. घर आपलेच आहे तेव्हा झाडू हातात आपणच घ्यायला काय हरकत आहे ? आपल्या पत्नीने भांडी घासलीत तर बाथरुममधून ती भांडी आणून आहे त्या जागेवर जरा आपणच ठेवूया की. मुलांचा अभ्यास एकदा आपणच घेऊया की.....अशा छोट्या छोट्या कामातूनच समानता नांदत असते. श्रमप्रतिष्ठा जपली जाते. मन शांत व विवेकी बनते. आपल्या जोडिदाराला बरोबरीचे स्थान दिल्याने आपणही अधिक मजबूत होतो.....म्हणून म्हटल एकदा तरी या ' बायकी ' म्हटल्या गेलेल्या कामाचा आनंद मनापासून घ्या .....
*जगात कोणतेही काम हे हलके नसते. पुरुष करत असणारे काम हे जितके घरासाठी महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे असते ते घरातील हे काम करणे. आपण ८ तास बाहेर काम करतो पण घरात आपली पत्नी १६ तास आनंदाने राबत असते. थकवा आपणाला येतो तसाच तिलाही येणारच की. श्रमाचा सन्मान विवेकाने करावा. कारण ...कारण आपले वर्तन आपले बाळं पाहत असते. त्याच्यावर जरा माणूसकीचे संस्कार करूया की. घरच्या स्त्रीने जर आपल्या घरगुती कामाचा मोबदला मागितला तर ?? जरा विचार करा....त्यापेक्षा कोणत्याही श्रमाला विभागणी करणारे वर्तन टाळा. जीवनाचा खरा आनंद " निर्लेप व विवेकी जगण्यात " आहे हे ध्यानात घ्या .*
*!! स्त्री श्रमाचा सन्मान करा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २६ )*
*गरीब लेकाची , लै माजोरी असतात ...*
अत्यंत अत्यंत दुष्टतेचं अस हे वाक्य आहे.गरीबाला चिडवणारेच नव्हे तर त्याच्या जखमांवर मीठ चोळणारे हे बोल ऐकताक्षणी तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे. गरीबावर माजोरीपणाचा शिक्का मारणारे हे वाक्य अत्यंत कडवट भावनेतून उच्चारले जाते. विशेषतः हे वाक्य आपल्या घरी घरकामासाठी येणारी मोलकरीण , दारात साफसफाई करणारे कामगार , कुणीतरी असहाय गरीब व्यक्ती अथवा कुटुंब आदी प्रकारच्या लोकांना उद्देशून म्हटल जाते.
*माजोरी असणं म्हणजे नेमके काय ?? थोडक्यात म्हणजे आवश्यकता असूनही त्याला कृतघ्नपणे नकार देऊन पोकळ ऐट मिरवणे म्हणजे माजोरी वागणे होय. आपल्या घरातील शिळे अन्न टाकून देण्याऐवजी घरच्या मोलकरणीला आपण देऊ केले व तिने नकार देणे म्हणजे ती मोलकरीण माजोरी आहे अस म्हटल जाते . आपल्या घरातील आपणाला नको असणारी एखादी चीजवस्तू आपण दारात कचरा गोळा करणाऱ्या सफाईकामागाराला देऊ करतो पण तो ती वस्तू घ्यायला नकार देतो तेव्हा तो "माजोरी" असल्याचा डंका आपण सर्वत्र पिटतो.आपल्या आसपासच्या एखाद्या गरीब व्यक्ती अथवा कुटुंबाला आपण एखादी मदत देऊ करतो आणि ती मदत घ्यायला आपणास नकार मिळतो तेव्हा ते व्यक्ती अथवा कुटुंब माजोरी असल्याचे ' प्रमाणपत्र ' आपण देऊन मोकळे होतो. आपण ज्या गरीबांना माजोरी घोषित करतो त्यांच्या मनात शिरून त्यांच्या नकाराचे कारण आपण जाणून घेतो का ?? विचार व्हावा.*
आपल्या कडे एखादा घरगुती छोटामोठा कार्यक्रम असेल व त्यातून राहिलेले शिल्लक अन्न असेल ते देऊ करताना मोलकरीण नकार देते. त्यामागे काहीतरी कारण असते. वर्षानुवर्षे आपल्या घरी घरकाम करणाऱ्या त्या बाईला आपण जाणीवपूर्वक त्या घरगुती कार्यक्रमातून वगळलेले असते अथवा तिच्या घरी आदल्या रात्रीचे जेवण शिल्लक आसू शकते अथवा तिला एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आमंत्रण असू शकते. ज्या सफाई कामगाराला आपली नको असलेली चीजवस्तू देतो त्याला नकार देण्याला दुसरी कारणे असू शकतात.एखाद्या वेळी आपण देत असणारी वस्तू त्याच्या घरी अगोदरच असू शकते अथवा चीजवस्तू वाहून नेण्याकरता त्याच्या जवळ इतर यंत्रणा नसते अथवा पैसेही नसावैत.त्या चीजवस्तूचा येणारा अतिरिक्त भार पेलण्याची त्याची क्षमता नसावी असेही होऊ शकते.( उदाहरणार्थ ..जुना फ्रीज ठेवण्यासाठी त्याच्या घरात जागा नसावी अथवा फ्रीज वापरातून येणारे अतिरिक्त वीजबील भरण्याची त्याची क्षमता नसावी ). ज्या व्यक्ती अथवा कुटुंबाला आपली मदत घेणे शक्य होत नाही त्यांच्याही पाठीमागं आनेक कारणे असू शकतात. यातील काहीही विचारात न घेता " गरीब म्हणजे माजोरी " असा शिक्का मारणे अयोग्य आहे.
*माझ्या बहुजन बांधवानो ..जरा विचार करा.जसे आपल्याखाली इतर गरीब असतात तसेच आपणही कुणा इतरांपेक्षा गरीब असतो. त्या इतर कुणी आपणालाही माजोरी म्हटल तर ?? मूळात थोडा वेगळा विचार पण करा. मोलकरणीला देणारे शिळे अन्न आपण आदल्या रात्री पोट फुटेस्तोवर ओरपलेले असते आणि त्याचा अतिरिक्त भार शरीरावर येऊ नये म्हणून आपल्यातील " औदार्य " जागं झालेलं असते. घरात " कचरा " नको म्हणून आपण ती चीजवस्तू दुसऱ्याला देत असतो. एखाद्या व्यक्ती अथवा कुटुंबाला छोटी मदत करतानाही आपल्या चेहऱ्यावर असाच सहेतूक दानशूरपणचा भाव असतो. सांगण्याचा मतितार्थ एवढाच की आपल्या कृतीमागे निर्लेप भाव नसून सहेतूक कृती असते. तेव्हा ,...मग तेव्हा आपल्याला गरीबांना माजोर्डे ठरवण्याचा हक्क अधिकार कसा मिळतो ??यापेक्षा मोलकरणीला घरगुती कार्यक्रमात सन्मानाने जेवू घाला. सफाई कामगाराशी दोन मीठे शब्द बोला. गरीब व्यक्ती कुटुंबाला गरजेच्या वेळी सहकार्य करा. त्याच्या वर माजोरीपणाचा शिक्का मारण्याअगोदर ह्या छोट्या कृती करून तरी पहा. त्या मोलकरणीच्या , सफाई कामगाराच्या, गरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावर उमटलेल्या कृतज्ञ भावाने तुम्ही संतुष्ट व्हाल. आणि पुन्हा कधीच चूकूनही " गरीब माजोरे असतात " असे शब्द वापरण्याची पाळी आपणावर खात्रीने येणार नाही.*
*!! गरीबीचा व्देष करा , गरीबाला सन्मान करा ..!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २७ )*
*जे , होतंय ते , चांगल्या साठीच...*
' जैसे थे ' वादी प्रवृत्ती कायम ठेवणारे असे हे वाक्य. ज्यांना स्वतः चे काही एक प्रामाणिक मतं नाहीय अशा व्यक्ती हे वाक्य उच्चारत असतात. जगात सर्वत्र ज्या विविध घटना अथवा गोष्टी घडतात त्यावेळी त्यावर विचारपूर्वक बोलण्यापेक्षा ' जे , होतय ते , चांगल्यासाठी ' असं बोलून मोकळ होऊन आपली जबाबदारी झटकली जाते . हे मात्र निश्चितच वाईट्ट आहे.
*एखादी गोष्ट अथवा घटना घडते तेव्हा बरेचदा त्या घटनेच्या विरोधी घटना सुध्दा घडत असतात. पहिल्या गोष्ट विषयी जेव्हा वरील वाक्य बोलतो तेव्हा साहजिकच त्याच्या विरोधी घटनेविषयी आपले मत विरोधी असायला हवे. पण होतयं काय की...पहिली गोष्ट घडली तरीही ते " चांगल्या साठी " आणि विरोधातली घटना घडली तरीही " चांगल्या साठी " अस बोलले जाते तेव्हा विसंगती स्पष्ट दिसते. उदाहरणे पहा. एखादी आतंकवादी घटना घडली की आपण असे वाक्य वापरतो का ?? एखादी भूकंप , पूर , त्सूनामी अशा नैसर्गिक विध्वंसाच्या घटना घडल्या की आपण " जे होतयं ते चांगल्या साठी " असे म्हणतो का ?? तिथे आपण आपली बुध्दी सुसंगत वापरतो. मग इतर वेळी या बुध्दीला काय होते बरं ?? जरा विचार करा......जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी अथवा घटनेला कारण असते. ते कारण मानवी मेंदूला समजू शकते. जरी आज समजले नाही तरीही उद्या ते कोणत्या मार्गाने समजेल याविषयी निश्चित आधार आपणाजवळ असतो. या विचारदृष्टीला " वैज्ञानिक दृष्टिकोन " असे नाव आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी जीवनात आपण तारतम्यपणे वापरु लागलो तर विसंगत पद्धतीने " जे होतयं ते , चांगल्या साठी " असे बिनबुडाचे विधान आपण करणार नाही .*
या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. देश गुलामगिरीत अडकला. ब्रिटिशांनी दिडशे वर्षे राज्य केले. फाळणीची दुःखद घटना घडली. लोकशाहीची हत्या करणारी आणीबाणी आपण अनुभवली. धार्मिक उन्माद आपण रोज अनुभवतो. सामाजिक तेढ घट्ट होत आहेत.राजकीय पातळीवर सगळीकडे आनंदीआनंदच आहे. लोक कोणत्याही कारणाने कधी मारले जातील याची शाश्वती नाहीय . अशा विपरीत परिस्थितीत " जे होतयं ते , चांगल्या साठी " अस आपण म्हणणार काय ?? विचार व्हावा.
*माझ्या बहुजन बांधवांनो.... चांगले अथवा वाईट्ट आपोआप घडत नाही . त्यासाठी कृतीशील हस्तक्षेप करावा लागतो. जर हस्तक्षेप विधायक व विवेकी असेल तर " चांगले " घडून येईल. हातावर हात ठेवून चांगले घडण्याची वाट पाहण हा निष्क्रियपणा आहे. असे निष्क्रिय होण्यापेक्षा " मी चांगले काहीतरी घडून येण्यासाठी कृतीशील हस्तक्षेप करेन " अस बोलायला व वागायला शिका. त्यासाठी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा....*
*!! वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २८ )*
*प्रेमात अन् युध्दात सर्व काही क्षम्य असते...*
अगदी सहज ओघात कधीही वापरले जाणारे हे वाक्य. प्रेम आणि युद्ध या खरेतर परस्पर विरोधी बाबी. मानवजातीवर प्रेम करणारे युध्दाची भाषा बोलत नाहीत ,,अन् युध्दाच्या बाता करणाऱ्या लोकांच्या मनात मानवजातीबद्दल प्रेम नसते असे माझे तरी प्रामाणिक मत आहे. तरीही या परस्पर विरोधी गोष्टी या वाक्यात सरमिसळ करताना दिसतात. वरील वाक्य अगदी कुठंही संदर्माशिवायही वापरले जाते.
*प्रेमात अन् युध्दात खरेच सर्व काही क्षम्य असते का ??... जरा विचार करा. प्रेमामध्ये जेव्हा एकतर्फी प्रेमाच्या माध्यमातून तरुणीवर अँसिड फेकले जाते ....प्रेमामध्ये अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात...प्रेमाचा उपयोग आपल्या भवितव्याची शिडी म्हणून केला जातो....प्रेमात जेव्हा आपल्या पार्टनरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारतो...प्रेम म्हणजे जस्ट टाईमपास असं बोलणारे तरुण तरुणी सहज बोलून जातात तेव्हा ....अन् तेव्हा आपण प्रेमात सर्व काही क्षम्य असतं अस आपण म्हणायच का ?? ..........तसेच युध्दाचे..जगात सर्वत्र शांतता नांदावी हे तत्वज्ञान जेव्हा युध्दामुळे उध्वस्त हौते...युध्दाअगोदरची नागरिहक्क बंधन प्रवृत्ती व युध्दानंतर नागरिकांची हरतर्हेने होणारे कुचंबणा व शोषण ...पावलापावलावर राष्ट्रवादाच्या नावाखाली मुलभूत हक्कापासून जेव्हा सरकार नागरिकाना वंचित ठेवते....युध्दाची खुमखुमी संपलेवर वाढणारी महागाई व उध्वस्त नागरी जीवन ....युध्दात दोन्ही बाजूला पडणारे सैनिकांचे शव आणि नागरिकांना जिवंतपणी सोसावे लागणाऱ्या मरणयातना....अशा घटना पाहिल्यावराही युध्दात सर्व काही क्षम्य असते अस म्हणायच धाडस आपण करु का ??...विचार करा.*
माझ्या बहुजन बांधवांनो....प्रेम हे जीवन बनवते व कधीकधी बिघडवते. मात्र युध्दानै संपूर्ण राष्ट्र उध्वस्त होऊन विश्वाला धोका पोचतो. प्रेम हे नैतिक मुल्यांवर व विचारावर आधारित असावे. निव्वळ आकर्षण हे प्रेम नसते. प्रेमामध्ये विश्वास द्यावा लाखातो ...प्रेमाची जबाबदारी स्विकारावी लागते .....युध्दाचेही काही नियम असतात. अगदी सामोपचाराचे सर्व मार्ग संपले तर न् तरच अपवादात्मक परिस्थितीत युध्द ठिक असते. पण युध्दात होणाऱ्या मानवी जिवीतहानीचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही .
*या दोन्ही बाबतीत महाभारताचे उदाहरण प्रस्तुत ठरावे. कर्णावर अपार प्रेम व त्याच्या बाहूंवर अपार विश्वास असूनही सामोपचाराचा मार्ग संपल्यावर प्रत्यक्षात रणांगणावर कृष्णाने आपले प्रेम बाजूला ठेवले. कर्णाला क्षम्य मानले नाही . ....अगदी तसेच युध्दाचा नियम तोडून रात्रीच्या अंधकारात कत्तल करणारा अश्वत्थामा यालाही कृष्णाने क्षम्य केलेले नाहीय . प्रेमात अन् युध्दात सर्व काही क्षम्य असतात हे विधान महाभारतातील उदाहरणावरुन फोल ठरते.....सांगण्याचा मथितार्थ असा की , प्रेमात आणि युध्दात सर्व काही क्षम्य नसते ....नसते.*
*!! प्रेम व युद्ध ...दोन परस्पर विरोधी गोष्टी !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग २९ )*
*प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या ' पाठीशी ' एक स्त्री असते....*
स्त्रीला दुय्यम स्थान देणारे हे वाक्य आहे हे जरा बारकाईने पाहिलं तर ध्यानात येईल. एखाद्याला हातचे राखून कौतुक करणारा हा प्रकार . यात निखळ दिलखुलासपणा नाहीय . पुरुषसत्ताक प्रवृत्ती आपले स्थान कायम राखण्यात यशस्वी झाली यांच्या अनेक कारणात अशी वरवरची उदार पण आतून फसवी असणारी वाक्ये असातात अस मला प्रामाणिकपणे वाटते .
*यशस्वी होणं प्रत्येकाला आवडत असते. मनुष्य एका क्षेत्रात यशस्वी होताच तो दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो. यश हे एक प्रकारचे ' सवय ' असते. यशाने मनुष्यचा अहंम सुखावतो व अपयशाने तो चिंतीत होत असतो. यश मिळण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात. परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यास करावा लागतो. व्यापारात यश मिळविण्यासाठी ' मार्केट ' कळावे लागते. राजकारणात यशस्वी व्हायला डावपेच व रणनीती आखता यायला हवी. समाजकारणात यशस्वी होण्यासाठी भरपूर चिकाटी व प्रयत्न असावे लागतात. जीवनात सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वरील सारे गोष्टी व दुरदृष्टी व धोरणीपणा या गोष्टी लागतात. ( बरेच जणांना यशस्वी व्हायला ' नशीब जोरावर ' लागते . मला हे पटत नाही ) ...यश हे असे सामुदायिक गोष्टीचे फळ असते. यशामुळे अतोनात आनंद होतो. आणि मग या यशाच्या " पाठीमागे " स्त्री असल्याची कबुली आपण देत असतो.*
माझ्या बहुजन बांधवांनो...जरा विचार करा. पुरुषाच्या कार्यात स्त्री त्याच्या " बरोबरीने " कार्यरत असते. पाठीशी राहण्याचा धंदा हा अध्यात्मात असातो. जे पाठीशी असतात ते संकटकाळीही " पाठीशीच " राहतात. तुम लढो , हम कपडे सँभालते है असा हा प्रकार आहे. आपल्या सुखदुःखाचा खरा वाटेकरी हा नेहमीच आपल्या " बरोबरीने जो वागतो " तोच असतो. मग....जी स्त्री आपल्या " बरोबरीने " आपल्या सुखदुःखात सामिल असते ....तिला यशाचे वाटेकरी बनवताना " पाठीशी " ठेवून दुय्यम स्थान का द्यावे ??....जरा विचार व्हावा.
*आपल्या महामानवांच्या प्रत्येक कृतीत स्त्री मग ती कोणत्याही रुपातील नेहमीच " बरोबरीने " राहिली आहे , "पाठीशी " नव्हे . शिवरायांच्या बरोबरीने आई जिजाऊ व सईबाई राहिल्या . संभाजीराजेच्या बरोबरीने महाराणी येसूबाई होती. जोतीरावांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीमाई मैदानात उतरली. शाहूराजाला पत्नी लक्ष्मीबाई यांचा बरोबरीचा आधार होता. बाबासाहेबांच्या बरोबरीने माता रमाई व माईसाहेब राहिल्या . र.धो. कर्वे बरोबरीने मालतीबाई शरीरशिक्षणासाठी प्रत्यक्षात मैदानावर होत्या.....हे सर्व महामानव यशस्वी ठरले. त्यांच्या यशस्वी पणामागे स्त्री " पाठीशी " नव्हे तर "बरोबरीने " होती.*
तेव्हा ...आता जिभेची सवय थोडी बदलूयां. " प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते "....याऐवजी....प्रत्येक यशस्वी पुरुषा " बरोबरीने " एक स्त्री असते " असं म्हणायला सुरुवात करुया.
*!! स्त्रीला दुय्यम नव्हे , बरोबरीने मान द्या !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ३० )*
*गाव तेथे महारवाडा....*
आपल्या भाषेत समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटवणारे अनेक गोष्टी असतात. अनेक सुविचार तयार होतात. अनेक म्हणी तयार होतात. आपणही फारसा विचार न करता परंपरागत पध्दतीने ते स्विकारत असतो. आपणाला या स्विकारण्यात काही वावगं वाटत नाही . मग ही भाषेतील वाक्ये जिभेवर इतकी घोळतात की कळतनकळत एखाद्या समाजावर केलेला अन्याय आपल्या ध्यानात येतच नाही . गाव तेथे महारवाडा...हे असेच वाक्य ग्रामीण भागात सर्रास वापरले जाते. या महारवाड्याचा अपभ्रंश होऊन ' म्हारुडा ' तयार झाला . शब्द बदालला पण प्रवृत्ती कायम राहिली.
*प्रत्येक गावात एक रचना असते. परंपरागत पद्धतीने चालत आलेली. भारतीय व्यवस्थेतील अनेक छोट्या जाती किंवा समुह एकत्र राहत असतात. म्हणून एखाद्या गावात पूरेपूर " पाटील गल्ली " असते अथवा "जैन वस्ती " असते. तसाच गावाबाहेर एक महार अथवा दलीत समाजाची वस्ती असते. त्या वस्तीला "महारवाडा किंवा म्हारुडा " म्हटल जाते . वर्षानुवर्षे हे अस्सच चालू आहे. गावच्या पूर्व दिशेला ही वस्ती ठळकपणे दिसून येते. गावात काही कारणांमुळे दंगल उसळली कि मग ही अशी "अलग वस्ती " आपसूकच रोषाला बळी पडते. वस्तीउध्वस्तहोते...नव्हे ..माणुसकी उजाड होते . ह्या अशा अलग वस्ती म्हणजे माणुसकीवर कलंक आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे.*
माझ्या बहुजन बांधवांनो....जरा विचार करा. आज विज्ञान तंत्रज्ञान मुळे जग मुठीत सामावलयं अस म्हणतात. जग हेच खेडे बनले आहे अस म्हटल जाते . जगभरातील माणसे जोडली गेलेली आहेत ..जवळ आली आहेत. हे जर आपल्या डोळ्यासमोर आहे तर मग....अशा अलग वस्त्या कशासाठी ??...किती वर्षे एक समुह गावाबाहेरच जगणं जगणार ?? " हम सब एक है असं नुसतं वरवराचे बोल ठरणार का ?? ....आता जागतिकीकरणाच्या रेट्यात या वस्त्या किमान गावापातळीवरा तरी उध्वस्त व्हाव्यात. मनातून महारावाडा उध्वस्त होणे ही पुढील पायरी असेल.
*मानवता.....हो ...महारवाडा उध्वस्त व्हावा आणि सर्वाजातीधर्मियाची "मानवतावाडा " जन्मास यावा.ह्या वाड्यात सुरुवातीला जरी सारे जातीधर्म एकत्र असले तरीही पुढील टप्प्यात प्रत्येकाने आपल्या जाती वा धर्म गुंडाळून ठेवून एकच " मानवता " या मुल्यावर आधारित समाजरचना करावी. आपल्या सर्व महामानवांचे हेच पहिले व अंतिम स्वप्न होते. हे स्वाप्न पुरे करायला पहिल्यांदा "जिभेला वळण लावूया " म्हणजे अंतिमतः मनाला वळण लागेल....मानवतेला वळण लागेल.*
*!! महारवाडा नको , मानवतावाडा हवा !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळण लावा...( भाग ३१)*
*महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे...*
आपला महाराष्ट्र हा नेहमीच पुरोगामी व प्रतिगामी या दोन शब्दात विभागला गेलाय. महाराष्ट्र हा संतांचा..सुधारकांचा..वीरांचा आहे. फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र अस आपण सार्थ अभिमानाने म्हणत असतो. या तीन महामानवांच्या एकत्रित चेहऱ्यातून महाराष्ट्र प्रतिमा ही " पुरोगामी " बनत गेली. प्रश्न महत्त्वाचा हा आहे की....सध्या महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे का ??..
*पुरोगामी...या शब्दाचा ढोबळ अर्थ पुढे जाणारा अथवा आधुनिक विचार करणारा असा समजला जातो. नेहमीच देशपातळीवर वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून विधायक व विवेकी वळण देणारा महाराष्ट्र " आज पुरोगामी राहिला नाही " अस खेदाने म्हणावे लागेल. तशी उदाहरणे समोर आहेत. ज्या महाराष्ट्रात डाँ. दाभोलकर व काँ. पानसरे यांचे दिवसाढवळ्या खून होतात तो महाराष्ट्र पुरोगामी कसा ?? ज्या महाराष्ट्रात खैरलांजी घडते व सामाजिक न्यायासाठी दहा वर्षे ताटकळत बसावे लागते तो महाराष्ट्र पुरोगामी कसा ?? ज्या महाराष्ट्रात अनेक जातीयवादी पक्ष संघटना यांचा जोर सर्व पातळीवर वाढला आहे तो महाराष्ट्र पुरोगामी कसा ?? ज्या महाराष्ट्रात जातीय तेढ वाढून कधीही दंगली घडू शकतात तो महाराष्ट्र पुरोगामी कसा ?? ज्या महाराष्ट्रात गणपती दूध पितो अशी अंधश्रध्दा दस्तरखुद्द मुख्यमंत्री पाळतात तो महाराष्ट्र पुरोगामी कसा ?? ज्या महाराष्ट्रात सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती दिवसेंदिवस जातीय होत आहे तो महाराष्ट्र पुरोगामी कसा ??....एक ना अनेक उदाहरणे देता येतील. तरीही आमचे काही विचारवत महाराष्ट्र पुरोगामी आहे अस का म्हणतात ??...विचार व्हावा.*
हा तोच महाराष्ट्र आहे...जिथे डावी पुरोगामी चळवळ व उजव्या प्रतिगामी शक्तीचा मुख्य अड्डा आहे. हा तोच महाराष्ट्र आहे....जिथे परप्रांतियांना बिनदिक्कत तुडवून आपले राजकीय मतलब साधले जातात. हा तोच महाराष्ट्र आहे...जिथे आंतरजातीय लग्न केले म्हणून स्वतःचा बाप आपल्या गरोदर मुलीला दगडाने ठेचून मारतो. हा तोच महाराष्ट्र आहे...जिथे शिवरायांचा इतिहास सोयीस्कर वापरून धार्मिक दंगली घडवल्या जातात. हा तोच महाराष्ट्र आहे...जिथे राज्याचे मुख्यमंत्री भोंदूबुवाच्या कार्यक्रमाना बिनदिक्कत हजेरी लावतात. हा तोच महाराष्ट्र आहे,..जिथे शेतकरी आत्महत्या करतो व कामगार नागवला जातो. हा तोच महाराष्ट्र आहे...जिथे देशातील सर्वाधिक बालमजूरी व कुपोषण घडते....किती किती सांगावे ??..
*माझ्या बहुजन बांधवांनो....एक सत्य जाणा. महाराष्ट्र हा कधीकाळी पुरोगामी विचारांचा होता. संत नामदेवापासून ज्ञानेश्वर तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यत संतांची उज्जवल परंपरा होती. जैतीबा फुलेंपासून लोकहितवादी आगरकर ते आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे पर्यत सुधारकांची मोठी फळी होती. छत्रपती शिवरायांपासून संभाजीराजे ताराराणी ते प्रतापसिंह महाराज व शाहूराजापर्यत रयतेचे वाली राज्य करत होते. पण आता....आता परिस्थिती बदललीय.प्रतिगामी ताकद वाढलेलीय.धर्मसत्ता व राजसत्ता यांची युती होतय. तेव्हा वास्तव हे की ...सध्याचा महाराष्ट्र पुरोगामी नाही .*
*!! सध्याचा महाराष्ट्र पुरोगामी नाही पण....उद्याचा महाराष्ट्र पूर्वीप्रमाणेच पुरोगामी बनवायचा कृतीशील निर्धार करुया...!!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
*बहुजनांनो , जिभेला वळत लावा...लेख समाप्ती..*
मित्रहो...गेले ३१ दिवस सलगपणे मी बहुजनांनो , जिभेला वळण लावा ही लेखमाला लिहित होतो. आज ही लेखमाला थांबवण्याचे ठरवलय. शिखरावर असताना थांबण्याच मला आवडते. अजूनही बरेच या विषयावर लिहू शकतो. पण मालिका १०० भागांचीच बरी वाटते ...लोकांना आवडते म्हणून त्याचे ५०० भाग केले की कालांतराने ती मालिका नीरस वाटू लागते . अगदी तस्सच मला माझ्या लेखमालेविषयी वाटते अन् म्हणून ३१भागानतर थांबणे योग्य वाटलं. भविष्यात पुन्हा कधीतरी याच विषयावर नव्यानं लिहिता येईल.
*मी प्रथम तुम्हा सर्वाचा मनःपूर्वक आभारी आहे. आपण दिलेला भरभरून प्रतिसाद ...योग्य वेळी केलेल्या सूचना यामुळे मी जरा बरं लिहू शकलो अशी माझी रास्त धारणा आहे. माझ्या काही साथींनी व मित्रांनी या लेखमालेचे पुस्तक काढावे अशी प्रेमळ गळं मला घातलीय. त्यांच्या प्रेमाचा मला स्विकार आहे. परंतु मित्रांनो पुस्तक काढण्यासाठी लागणारी आर्थिक ऐपत माझ्या जवळ नाहीय हे वास्तव आहे.उद्या जर कुणाला याचे पुस्तक काढावे वाटले तर मी कोणत्याही अटींशिवाय मान्यता देईन. पण वैयक्तिक मला हे शक्य नाहीय याची कबुली देतो. या लेखमालेमुळे अनेक नवे साथी ..मित्र मिळाले. महाराष्ट्रात बरेच ठिकाणी सोशल मिडियावर हि लेखमाला पोचली याचा मनापासून आनंद आहे. फोनव्दारे..व्हाट्सअँप..फेसबुक या माध्यमातून अनेकांनी अभिनंदन करून संवाद साधला. हे नवे साथी आता माझे कायमचे हितचिंतक साथी आहेत अस मी मानतो. यापुढेही आपणाशी संवाद सुरुच राहील.*
माझ्या बहुजन बांधवांनो...एक गोष्ट ध्यानात ठेवा. जातधर्म व भाषा या दोन माध्यमातूनच समाजात सामुदायिक भलेबुरे आविष्कार प्रकट होत असतात.जातीनिर्मुलन हा जसा आपला ध्यास आहे तस्सच भाषा प्रमाण करणे हे देखील ध्यास असावा. ह्या भाषेतूनच संस्कार होत असतात. तेव्हा ...ही लेखमाला आपणास योग्य वाटत असेल तर जरुर....जरुर...आपण " जिभेला वळण लावूया ",.....इतकेच सांगणे.
*यापुढेही नव्या विषयावर संवादी राहूया,...*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
==================================================================================================================================================================
No comments:
Post a Comment