सामाजिक चळवळ २ पद्धतीने पुढे न्यावी...
१ ज्यांनी इतिहास चुकीचा लिहिला त्यांचे माप त्यांच्याच पदरात घालणे योग्य... पण ३६५ दिवस तेच करणे योग्य नाही.
२ तपासल्याशिवाय काही घ्यायचं नाही असं बुद्धांनी सांगितले आहे. तेव्हा प्रबोधनाचा प्रवास डोक्यापासून ह्रदयाकडे नव्हे तर ह्रदयाकडून डोक्याकडे झाला पाहिजे. बुद्धांनी ज्यासाठी हयात झिजवली त्याचसाठी आजही भांडतोय आपण. समता स्वातंत्र्य आणि बंधुता याबाबत आजही परिस्थिति जैसे तेच आहे.
व्यूहरचना अशी करा की, जनसामान्यांच्या मनामध्ये जागा निर्माण झाली पाहिजे. समाजात १०℅ शोषक ९०℅ शोषित आहेत. त्यातले ८९℅ देवांवर श्रद्धा ठेवणारे आहेत. जर तुम्ही कपाळावर मी ईश्वर मानत नाही अस लिहून प्रबोधन करायला गेलात तर त्यांच्या घराचेच नव्हे तर मनाचे ही दरवाजे आपल्याला बंद होतात.
चळवळी का फसतात? एक महत्वाचे कारण, थेट हल्ल्यामुळे...
समजा एखादा वर्षात ६ सत्यनारायण घालतो. तुमच्या प्रबोधनाने त्याने प्रमाण कमी केले व तो आता २ सत्यनारायण घालतो. तर ते चळवळीचे यश माना. बदल एका रात्रीत होत नाहीत.
बाहेरून लादलेलं गोंदण हे बाहेरच असलं तरी खरवडून काढताना यातना होणारच, पण जर ते काम कुशलतेने केले तर त्याची होणाऱ्या त्रासाला दोन हात करण्याची मानसिकता तयार होते. लक्षात घ्या.. मुकाट नसावे तसेच मोकाट ही नसावे.
* प्रश्न विचारणारांवर हल्ले करु नयेत. त्यांचे समाधान होईपर्यन्त शांतपणे उत्तरे द्यावित.
* जिभेच्या खेळाने संस्कृती उभी राहत नाही.
* टोकदार' निरिश्वरवाद नको...
"जो व्यक्ती स्वत: ईश्वराचं अस्तित्व मानत नसेल, पण ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या परंतु शोषण, विषमता वगैरेँना बळी पडलेल्या लोकांमध्ये वावरताना आपल्या निरिश्वरवाद 'टोकदार' बनवून, त्याच्या पात्याला धार लावून, तो समाजात परिवर्तन घडवू शकणार नाही. आपल्या कपाळावर ठसठशीतपणानं निरिश्वरवादाचा फलक लावून, तो लोकांमध्ये वावरु लागला, तर ज्यांच्यामध्ये परिवर्तन करायचं त्यांच्या घरांचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद होतील, मग मनाचे व बुद्धीचे दरवाजे उघडणं तर फार दूरची गोष्ट झाली. म्हणुनच त्यानं स्वत:चा निरिश्वरवाद वा टोकाची तत्सम इतर मतं काही अपवादात्मक प्रसंग वगळता स्वत:च्या उंबरठ्याच्या आत ठेवुन परिवर्तनाच्या क्षेत्रात उतरायला हवं. हा दुटप्पीपणा नव्हे, की डावपेच नव्हे. ही तडजोड नव्हे, कि फसवणुक नव्हे. हा जिव्हाळा आहे, ही आत्मीयता आहे आणि या जिव्हाळ्याचं, या आत्मीयतेचं सर्वोच्य शिखर आहे करुणा !"
विचार- डॉ. आ.ह.साळूंके
"मन निरभ्र व्हावं या पुस्तकातून"
"आपल्या पहिल्या श्वासाच्या वेळी पुढचं सगळं जीवन अज्ञातच असतं. जणू काही एक कोडं, एक रहस्यच. कधी कधी वाटतं, हे जीवन म्हणजे एक गुंता. आपण आयुष्यभर तो सोडवत बसायचं. काळ जसजसा पुढं सरकेल, तसतसा तो गुंता थोडा-थोडा सुटत जातो. अर्थात, तो सोडवण्याचा प्रयत्न शहाणपणानं केला तर ! नाही तर उलटंही होऊ शकतं, त्याची गुंतागुंत अधिक वाढूही शकते. परंतु सामान्यतः काळाच्या ओघात त्याची गुंतागुंत कमी होत जाते, असं आपण म्हणू शकतो. काळ जातो, तसं जीवनाचं रहस्य अधिकाधिक उलगडू लागतं. परंतु हे रहस्य उलगडण्याच्या प्रक्रियेतही एक व्यथा आहे, एक वेदना आहे. बहुतेकांच्या बाबतीत जीवन जेव्हा खऱ्या अर्थानं थोडं थोडं कळायला लागतं, तेव्हा ते संपत आलेलं असतं !
या वेदनेवर उपाय जरूर आहे - त्वरा!
त्वरा हा तो उपाय होय. *जीवन समजून घेण्यासाठी आणि चांगल्या रीतीनं जगण्यासाठी जितक्या लवकर सरसावता येईल, जितकी त्वरा करता येईल, तितकं ते अधिक फळ देईल, त्याचा स्वाद अधिक काळ चाखता येईल. ही त्वरा म्हणजे उतावीळपणानं, अपुऱ्या तयारीनिशी केलेली घाई नव्हे, तर परिपक्व आकलन आणि अचूक निर्णयशक्ती यांच्या आधारे केलेली कृती होय, हे मात्र विसरता कामा नये.*"
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ७)*
"जीवन लहान-सहान गोष्टींपासून ते अतिमहत्वाच्या घटनांपर्यंत असंख्य घटकांनी बनलेलं असतं. स्वाभाविकच, आपल्याला खूप जाणायचं असतं. कसं बोलावं-कसं वागावं इथंपासून ते यश आणि आनंद यांच्यामध्ये प्राधान्य केव्हा आणि कुणाला द्यावं, या गोष्टींपर्यंत नाना गोष्टी योग्य रीतीनं जाणल्या, तरंच जीवन सफल होतं. धन कसं कमवावं, त्याचा विनियोग कसा करावा, मित्र कसे जोडावेत, शत्रूंना कसं हाताळावं, नाती कशी जपावीत, इतरांना कसं फुलवावं, अपयश कसं पचवावं, उत्कर्षाच्या वेळी विनम्र कसं असावं, अशा लाख लाख गोष्टी जाणायच्या असतात. आपण यांपैकी जितक्या जास्त गोष्टी जितक्या लवकर आणू, तितकं छान ! जगताना चुकाही होतात. पण बहुतेक वेळा त्या दुरुस्त करण्याची संधीही मिळते. ही संधी मात्र वाया घालवू नये स्वतःला सावरण्याची संधी मिळाली, की जरूर सावरावं. अशी संधी मिळाली नाहीच, तर चुकांच्या परिणामांना शांतपणे समोर जावं. त्या परिणामांना भोगूनच त्यांच्यावर मात करावी. मात्र झालेल्या चुकांबद्दल, भोगलेल्या परिणामांबद्दल आयुष्यभर कुरकुरत बसू नये. शिळ्या झालेल्या गोष्टींसाठी आपल्या ताज्या श्वासांची प्रसन्नता गमावू नये."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ७)*
"माणसाचं आपल्या भूमीशी, आपल्या मातीशी असलेलं नातं आपल्या आईबरोबरच्या नात्यांइतकंच हळुवार आणि घट्ट असतं. आईप्रमाणंच मातीशीही आपली एक नाळ असते. जगण्याच्या धडपडीत माणूस आपल्या भूमीपासून कितीही दूर गेला, तरी त्याच्या आत त्याच्या जन्मभूमीचा गंध दरवळत असतोच. *आपल्याकडच्या दर्शनांमधे प्रत्येक महाभूताचा स्वतःचा एक गुणधर्म मानलेला आहे. या दर्शनांच्या मते पृथ्वीचा गंध होय. आपलं शरीर महाभूतांनी बनलेलं असतं आणि त्यामध्ये पृथ्वीचा वाटा महत्वाचा असतो. 'पृथ्वीपासून बनलेलं' या अर्थानंच शरीराला 'पार्थिव' म्हणतात.* याचा अर्थ आपण हिंडत-फिरत जगातल्या कुठल्याही बिंदूवर पोचलेलो असलो, स्थिरावलेलो असलो, तरी आपल्या मातीचा गंध आपल्या अस्तित्वात असतोच."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ९)*
"धरतीशी बोला आणि ती तुम्हांला शिकवेल ! अर्थाच्या किती मोहक लावण्यानं नटलं आहे, हे वाक्य ! आपण आपल्या भूमीशी, आपल्या मातीशी बोलू शकतो, हे साधं सत्य आपण कित्येकदा विसरूनच गेलेलो असतो. *जगभरच्या वस्तू हस्तगत करायच्या आणि त्यांचा मालक म्हणून मिरवायचं, या नादात आपण आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या देखण्या सृष्टीलाच विसरून गेलेलो असतो.* खरं तर आपण तिला डोळे भरून पाहण्यासाठी, तिचा स्पर्श आपल्या अस्तित्वात सामावून घेण्यासाठी, तिचा गंध आपल्या रक्तात ताजा करण्यासाठी तिच्याशी शब्दांच्याही पलीकडचा एक संवाद करू शकतो. ती देखील शब्दांसाठी अडून न बसता, आईनं बोटाला धरून चालायला शिकवावं त्याप्रमाणं आपल्याला मूकपणे खूप काही शिकवून जाते. आपल्या प्रत्येक श्वासाला एक वेगळी दिशा देते. हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाला एक नवा आशय देते. खरं म्हणजे कसं जगावं, कशासाठी जगावं आणि कुणासाठी जगावं, ते शिकवते. आईच्या मांडीवर डोकं ठेवून निर्धास्तपणे झोपल्यावर साऱ्या चिंता विरून जाव्यात आणि जीवाला विसावा मिळावा, तसा विसावा तिच्याही स्पर्शानं मिळतो."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १०)*
"ज्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात, त्याला स्वतःलाही आपल्या अश्रूंचं नेमकं कारण कळतंच असं नाही. ते इतके उत्स्फूर्त असतात, की निदान अश्रूंच्या क्षणी तरी त्याला त्यांच्या कारणाचं सुस्पष्ट भान असण्याची शक्यता नसते. *स्वतःच्या अश्रूंचा अर्थ स्वतःपासून खूप अलिप्त झाल्याखेरीज स्वतःलाच नीट कळू शकत नाही, हे एक प्रकारे अश्रूंचं गूढ सौंदर्यच म्हणायला हवं.*"
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १२)*
"अश्रूंचा अपमान हा निसर्गाच्या एका महान निर्मितीचा अपमान होय. ज्यांची मनं विकारानं गढूळ वा बोथट झालेली असतात, अशी काही माणसं दुसऱ्यांच्या अश्रूंची टवाळी करतात. या लोकांना त्यांनी स्वतः ढाळलेले अश्रू आठवत नाहीत, पण इतरांचे अश्रू पाहून मात्र ते त्यांना घाबराट वा रडके ठरवतात. सगळेच अश्रू 'रडण्या'चे नसतात, हे समजण्याचा त्यांचा आवाकाच नसती, त्यांच्याकडं तेवढी सहृदयताही नसते.
आपली जात पराक्रमी असल्यामुळं आपल्या जातीच्या माणसाचे डोळे कधी पाणावणं शक्यच नाही, अशा विचित्र वल्गना करणाऱ्या लोकांना अश्रूंचा किंबहुना जीवनाचाच अर्थ कळलेला नसतो. खरं तर माणसानं इतरांच्या आणि स्वत:च्याही अश्रूंचा आदर केला पाहिजे. त्यांचे उपकार मानले पाहिजेत. त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे. आपण तसं करू शकलो नाही, तर अश्रू ढाळणारी व्यक्ती कलंकित होत नाही, पण आपण मात्र मनुष्यत्वाला मुकतो."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १३)*
"संवेदनशील व्यक्तीचे पाणावलेले डोळे हे जगातील एक महान तीर्थक्षेत्र आणि त्या डोळ्यांतील अश्रू हे जगातील एक अत्यंत पवित्र-पावक तीर्थजल होय ! ज्याला हे उमजलं, त्याचं काळीज नक्कीच जिवंत असतं!"
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १३)*
"आपला ज्या माणसाशी संपर्क आला असेल, त्याला समजून घेण्याचं काम कौशल्याने आणि विवेकानं करणं आवश्यक असतं. 'सब घोडे बारा टक्के' अशा पद्धतीनं सर्वांशी वागून चालत नाही, सरसकट सर्वांना एक नियम लावता येत नाही. माणसं वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेली असतात, वेगवेगळ्या संस्कारातून आलेली असतात, वेगवेगळ्या स्वभावाची असतात, वेगवेगळ्या परिस्थितीत अडकलेली असतात. म्हणूनच प्रत्येकाशी संवाद साधण्याची आपली पद्धतही वेगवेगळी असली पाहिजे. केवळ एक माणूस घेतला, तर तोही सतत बदलत असतो. मी काल जसा होतो, तसा आज नसतो. काही क्षणांपूर्वी जसा होतो, तसा या श्वासाच्या क्षणी नसतो. आजच्या 'मी'ची प्रतिमा कालच्या 'मी'च्या चौकटीत तंतोतंत बसत नाही. माणसामध्ये सातत्यानं होणारं हे परिवर्तनही ध्यानात घेऊनच प्रसंगानुरूप कार्यपद्धती स्वीकारली पाहिजे. जीवन यशस्वी करण्यासाठी आपली संपर्कशैली अधिकाधिक कुशल आणि निर्दोष बनविली पाहिजे. सामाजिक परिवर्तनाचं उद्दिष्ट बाळगून कार्य करणाऱ्या लोकांनी तर हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवं."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १९)*
"आपल्या शरीरात बाहेरून एखादा अनिष्ट पदार्थ घुसू लागला, तर त्याला रोखून धरणं, हा आपल्या शरीराचा स्वभावच आहे. एखादा रोगजंतू शरीरात घुसू लागला, तर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी लगेच त्याच्यावर तुटून पडतात. अन्न अन्ननलिकेतून जात असताना त्याचा एखादा कण वाट चुकून श्वासनलिकेकडं वळला, तरी देखील त्या कणाला बाहेर ढकलण्यासाठी आपल्याला ठसका लागतो. निसर्गानं आपल्या शरीराला ही मोठी विवेचक आणि संरक्षक देणगी दिली आहे. पण आपल्या बुद्धीला आणि मनाला मात्र असा ठसका आपोआप लागत नाही. म्हणूनच, नको असलेल्या गोष्टी बुद्धीत शिरू लागल्या, तर आपल्या बुद्धीला ठसका लागावा, याचे संस्कार स्वतःवर करणं गरजेचं असतं."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २६)*
"आपल्या विशिष्ट लाभासाठी लोकांची दिशाभूल करणं, हाच ज्यांचा हेतू असतो, त्यांना दाही दिशा मोकळ्या असतात. त्यांच्या दृष्टीनं पथ्यापथ्याचा प्रश्नच नसतो. एका बाजूनं सत्य लपवणं, विपर्यस्त करणं व नष्ट करणं आणि दुसऱ्या बाजूनं असत्याला संरक्षण देणं, त्याला प्रोत्साहन देणं वा त्याचा फैलाव करणं, हा त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रमच असतो. त्यांच्या अशा प्रयत्नांच्या आहारी जाऊ नये, हाही आपल्या चित्तवृत्तीला योग्य वळण लावण्याचा महत्वाचा भाग होय. शिवाय, त्या लोकांनी स्वीकारलेल्या मार्गांचा अवलंब करता कामा नये, यावरही आपण ठाम असायला हवं."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २७)*
"एखाद्या ग्रामपंचायतीत वा नगरपालिकेत निवडून आलेल्या सदस्याचं अभिनंदन करण्यासाठी चौकाचौकांतून फलक लावताना आपण त्याच्यासाठी 'क्रांतिकारक, युगप्रवर्तक' अशी विशेषणं लावली तर ज्यांनी खरोखरच महान क्रांती केली आहे वा युगप्रवर्तक कार्य केलं आहे, त्या महामानवांची वर्णनं करताना कोणती विशेषणं लावणार ? नगरसेवक वगैरेंचं कार्यही आपापल्या परीनं महत्वाचंच असतं, तरीही कोणती विशेषणं कोणाला लावायची, याचं भान असायलाच हवं."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २९)*
"बुद्धांनी सगळी माणसं समान आहेत ही भूमिका मांडण्यासाठी केलेले असंख्य युक्तिवाद आणि प्रयोग जसे प्रसिद्ध आहेत, तशीच केलेली प्रत्यक्ष कृतीही विख्यात आहे. तेव्हापासून आजतागायत समतेचा आग्रह धरणारे लोक जात्यंत व्हावा म्हणून झगडत आहेतच. पण इथंच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. बुध्दांनंतर अडीज हजार वर्षं गेल्यानंतरही आपल्याला जर त्याच गोष्टीसाठी झगडावं लागत असेल, तर ही समस्या फार गंभीर आहे, चुटकीसरशी सुटणारी नाही, याकडं आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आता, ही समस्या अडीज हजार वर्षं टाकलेली असेल, तर आपण तिची कारणमीमांसा काळजीपूर्वक आणि धैर्यानं केली पाहिजे. अर्थात, ती सोडवण्याचे उपाय जुजबी असून चालणार नाहीत. त्याचबरोबर, प्रत्यक्ष वास्तवाची उपेक्षा करून डोळ्यांसमोर नुसते स्वप्नाळू आदर्श ठेवल्यामुळंही आपल्या पदरात काही पडणार नाही."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३२)*
"जातीचा अंत व्हावा, हे आपलं देखणं स्वप्न जरूर आहे, पण ते फार दूरचंही आहे आणि सहजसाध्यही नाही. म्हणून त्या दूरवरच्या ध्येयाकडं जाण्याच्या वास्तव प्रवासावर आधी लक्ष केंद्रित करावं, हेच मला अधिक महत्वाचं वाटतं. *आंतरजातीय विवाह हा नक्कीच एक विधायक मार्ग आहे. पण तोच सर्वोत्तम वा एकमेव मार्ग आहे असं मानणं उचित नव्हे. तो जात्यंत घडवण्याचा हमखास आणि प्रभावी मार्ग आहे, असंही नाही. तो अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे आणि त्याला अनेक मर्यादा आहेत, याचं भान ठेवायला हवं.* प्रेमापोटी झालेल्या आंतरजातीय विवाहाचं श्रेय जात्यंताच्या चळवळीकडं जात नाही. शिवाय, आपल्याला विचार काही मोजक्या व्यक्तींचा करायचा नसून समग्र समाजाचा करायचा आहे, हेही विसरता कामा नये. मोजक्या व्यक्तींच्या वर्तनाचाही संपूर्ण समाजावर परिणाम होतो, हे खरं आहे. त्यांच्या वर्तनामुळं काही वाटा मोकळ्या होतात, काही दिशा खुल्या होतात, यांत शंका नाही. पण एकूण समाजातील त्यांच्या अत्यल्प संख्येचा विचार करता अडीज-तीन हजार वर्षांचं दुखणं केवळ अशा कृतीमुळंच चुटकीसरशी दूर होईल, असं मानता येत नाही. असं असलं, तरी असा विवाह करणाऱ्यांना प्रोत्साहन, पाठबळ आणि संरक्षण देण्याची जबाबदारी उचलायला हवी. अर्थात, ज्यांनी असा विवाह केला ते तेवढ्याच कारणानं आपोआप समतावादी आणि ज्यांनी केला नाही ते विषमतावादी अशी उथळ मतं मांडणं, हाही जात्यंतासाठी समाजमन तयार करण्याचा सम्यक मार्ग नव्हे, असं मला वाटतं. शिवाय, असा विवाह करणाऱ्यांनाही समंजसपणानं आणि विवेकानं आपला विवाह तडीला नेणं महत्वाचं मानलं पाहिजे. अन्यथा आपल्या उद्दिष्टाची पीछेहाट होण्याचा धोका संभवतो."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३३)*
"प्रत्येक जातीच्या अंतर्गत असलेल्या पोटजाती मोडीत काढण्याचं काम झालं, तरी मोठी मजल मारल्यासारखं होईल. त्याबरोबरच अथवा त्यानंतर सांस्कृतिक वगैरे दृष्टींनी एकमेकींना अगदी जवळ असलेल्या जातींनी परस्परांमध्ये सर्वार्थानं मिसळून जाण्याची पावलं उचलावी. हे सर्व करीत असताना प्रत्येक जातीमधील समंजस लोकांनी दुसऱ्या जातीमधील लोकांशी जिव्हाळ्याचा संपर्क ठेवणं आणि शक्य त्या प्रमाणात आपल्या जातीमध्ये आणि आपल्या संपर्कातील जातीमध्येही विधायक प्रबोधन करणं, असा दुहेरी उपक्रम चालू ठेवावा. लोकांचं अज्ञान, गैरसमज, जातीय अहंकार, चुकीच्या धर्मतत्वांचा पगडा इ. गोष्टी दूर करण्यासाठी कोणतेही विश्वासार्ह प्रयत्न न करता त्यांच्यावर अचानक जात्यंताच्या संकल्पनेचा मारा करणं वा जाती पाळल्याबद्दल त्यांची निंदा करून त्यांना दूर लोटणं, अशी कृती आपल्याला जात्यंताच्या दिशेनं घेऊन जाणार नाहीत. किंबहुना, त्या आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गातील अडथळेच बनतील. *ज्यांना घराशेजारची छोटीशी टेकडी चढायला शिकवलेलं नाही, त्यांच्यावर एव्हरेस्ट चढण्याची जबरदस्ती केल्यामुळं आपल्या हाती काही लागणार नाही. याउलट, जातीचा अहंकार आणि भेदभाव आपल्या व्यापक हिताचा नाही, हे आपण लोकांना मनोमन पटवून देऊ शकलो, तर प्रत्येक जातीमधील माणसं आपल्या जातीच्या भिंतीपेक्षा अधिक उंच होतील. मग एक वेळ अशी येईल, की त्या भिंती आपल्या जागीच राहतील आणि सगळी माणसं मात्र भिंती नसलेल्या मुक्त आकाशात संचार करतील. सर्व जण एकाच आकाशात वावरतील. एकमेकांना समजून घेतील, एकमेकांचा आदर करतील, एकमेकांवर प्रेम करतील आणि अखेरीस एकच होतील !"*
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३४)*
"डोळ्यांपुढं क्रांतीचं स्वप्नच नसण्यापेक्षा निदान तसं स्वप्न उत्सुकतेनं पाहणं, हे हजार पटींनी चांगलं, असं मी जरूर मानतो. पण वास्तवाची उपेक्षा करणाऱ्या स्वप्नानं थोडंसं मनोरंजन झालं, तरी समाजस्थितीत फारसा फरक पडत नाही. *दूरवरच्या क्षितिजावर पोचण्याची स्वप्नं साकार झाल्याची धुंदी जागच्या जागी थांबून अनुभवण्यापेक्षा पायांखालच्या वाटेवर दोन पावलं पुढं सरकणं अधिक फलदायक असतं. शिवाय, प्रत्येकाची पावलं वेगळ्या तऱ्हेची असणार, ती एकाच साच्यातील असणार नाहीत. त्यामुळं जात्यंताच्या दिशेनं पडणाऱ्या वेगवेगळ्या पावलांतील प्रत्येकाचं स्वागत केलं पाहिजे. एकाला सर्वोच्च मानून दुसऱ्याला हिणवणं, हा उलट्या दिशेचा प्रवास ठरेल.* निदान जात्यंताच्या बाबतीत तरी मला यापेक्षा अधिक गतिमान पर्याय दिसत नाही."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ३४)*
"ज्ञानवंतानं देखील आपल्या ज्ञानाच्या बाबतीत फार फुशारकी मारू नये. कारण, फुशारकी मारणारा मनुष्य यथार्थ सत्य सांगत असला (आप्त असला) तरी देखील बहुतेक लोक त्याला अतिशय वैतागतात."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४२)*
"ज्ञान प्राप्त करणं ही गोष्ट प्रशंसनीयच आहे. पण कित्येकदा ज्ञान एकटं येत नाही. त्याच्या एकेका कणाबरोबर अहंकाराचा एकेक काटाची येतो. त्याच्या एकेका परामाणूबरोबर इतरांविषयीच्या तुच्छतेचं एकेक सुरवंटही मनात प्रवेश करतं. ज्ञानाच्या आगमनाबरोबर काही माणसांचं मीपण गैरवाजवी स्वरूपात फुगतं. समाजात वावरताना त्यांच्या वर्तनातून जेव्हा जेव्हा त्यांचं ज्ञान प्रकट होतं, तेव्हा तेव्हा त्यांचा मीपणा त्यांच्या सहवासातील लोकांच्या जीवनावर आघात करतो. त्यांना जखमा करतो. तो ज्ञानी आहे, हे त्यांना मान्य असतं. त्याच्या ज्ञानाबद्दल त्यांना आदरही असतो. परंतु त्या ज्ञानाबरोबर प्रकट होणारी त्याची घमेंड, त्याची फुशारकी, त्याची बढाई त्यांना असह्य होते. ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याच्यावर अवलंबून असतील, तर ते उघडपणे काही बोलत नाहीत. परंतु ते मनातून मात्र त्रासलेले, वैतागलेले असतात, बेचैन असतात. त्याच्या सहवासात राहण्याच्या कल्पनेनंच ते धास्तावून जातात."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४३)*
"अहंकारामुळं ज्ञान ज्ञान गढूळ बनतं. बुद्धिमत्ता डागाळते. कर्तृत्व तिरस्करणीय होतं. माणसं तुटतात. दुरावतात. यशस्वी होऊनही पदरात अपयश पडतं. म्हणूनच, संयमाची साथ असावी. नम्रतेमुळं ज्ञान निर्मळ राहतं. नाती प्रसन्न राहतात. जीवन कृतार्थ होतं. ज्ञानाचं खरं साफल्य यातच असतं."
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४४)*
"आत्मविष्काराची भूक ही काही गैर नव्हे. पण हा *आत्मविष्कार सम्यक आणि संतुलित स्वरूपात झाला, तरच तो स्वतःलाही आणि इतरांनाही आनंदी करतो.* मीपण जरूर दरवळलं पाहिजे, पण त्यानं स्वत्वाच्या सीमा ओलांडता कामा नये. ते जोपर्यंत त्या सीमांमध्ये राहून प्रकट होतं, तोपर्यंत आणि फक्त तोपर्यंतच सुगंधी असतं. त्या सीमा ओलांडून ते इतरांवर आक्रमण करू लागलं, इतरांना खुपू-टोचू लागलं, घायाळ करू लागलं वा अप्रसन्न करू लागलं, तर ते आपला अवघा सुगंधच गमावून बसतं. *ज्ञान जरूर हवं, पण त्यानं सहवासात येणाऱ्या माणसांच्या श्वासांना, त्यांच्या अस्तित्वाला थोडा तरी सुखद गंध द्यायला हवा. ज्ञानाबरोबर ज्ञानाचा दर्प नव्हे, तर सुगंध दरवळायला हवा !*"
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४४)*
"एखादा किरकोळ सन्मान नाकारला गेला, तर महान म्हटला गेलेला साहित्यिक जेव्हा थयथयाट करतो, संबंधितांवर शब्दांचे आसूड ओढतो, तेव्हा साहित्याच्या स्पर्शानंतरही माणूस इतका खुजा कसा काय राहू शकतो, असा प्रश्न पडतो. आपला स्वाभिमान जपायचा नसतो, असा याचा अर्थ अजिबात नाही. परंतु *स्वाभिमान उचित रीतीनं जपणं वेगळं आणि त्याला काटेरी बनवणं वेगळं.* मला असं वाटतं, की *सच्चा कलावंत उमदाच असतो, सच्चा तत्त्ववेत्ता विनम्रच असतो आणि खरा धर्मज्ञ-धम्मज्ञ समंजसच असतो.* तसं आढळत नसेल, तर तो कलेचा, तत्त्वज्ञानाचा वा धर्माचा दोष नव्हे, कला धारण करणाऱ्याला ती पेलवली नाही, तत्त्वज्ञान सांगणाऱ्याला ते मानवलं नाही आणि धर्म (धम्म) बोलणाऱ्याला तो पचला नाही, इतकाच त्याचा अर्थ असतो !"
*(संदर्भग्रंथ : मन निरभ्र व्हावं, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : ४६)*
No comments:
Post a Comment