*"हिंदू समाजाने ब्राह्मणांवर इतका विश्वास टाकला, परंतु त्याला ब्राह्मणांनी जो प्रतिसाद दिला, तो पाहिल्यावर मात्र मन कमालीचे उद्विग्न होऊन जाते. त्यांनी या विश्वासाचे उत्तर विश्वासघाताने दिले, हीच हिंदूंच्या धार्मिक जीवनाची एक महान शोकांतिका आहे.* ब्राह्मणांनी आपल्याच धर्माच्या अनुयायांना अक्षरश: ओरबडले. ज्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या हिताची व्यवस्था करण्याऐवजी फक्त स्वतःच्या वर्णातील लोकांचा फायदा पाहणारे नियम केले. *ब्राह्मणांखेरीज इतर लोक अज्ञानातच गुरफटलेले कसे राहतील, हे पाहिले. त्यांना अपमानित करणारे, लाचार बनवणारे नियम केले. त्यांच्यावर पिढ्यान् पिढ्या आपले वर्चस्व अबाधित रहावे, अशी व्यवस्था केली.* त्यासाठी सर्व प्रकारची नैतिकता धाब्यावर बसवली. माणूसकीला काळिमा फासणारे नियम केले. न्यायाची चाड बाळगली नाही. विवेकाचा अंकुश स्वतःला लावला नाही. खोटा इतिहास लिहिला. *आपल्याच धर्मातील असंख्य लोकांना त्यांच्या पराभवाचे क्षण हे उत्सव म्हणून साजरे करायला लावले.* सामान्य माणसांना दूर लोटले आणि जेव्हा गरजेपोटी त्यांना जवळ केले, तेव्हा आपल्या दुष्ट हेतूंच्या पूर्तीसाठी त्यांना वापरून घेतले. आपल्या दुष्कृत्यांचेही उदात्तीकरण करून घेतले. *स्वाभाविकच हिंदू धर्माला एक हृदयविदारक स्वरूप प्राप्त झाले. तो अंतर्बाह्य कलंकित झाला.*"
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
"हिंदू धर्माचे एक महत्वाचे वैशिष्टय असे, की धार्मिक क्षेत्रातील सर्व बाबी हिंदूंनी आपल्याच धर्मातील ब्राह्मणांच्या स्वाधीन केल्या, धर्मग्रंथ लिहिणे, आपल्या आचाराचे नियम ठरवणे, कर्मकांड तयार करणे, व्रतवैकल्ये निर्माण करणे, धर्माचे तत्वज्ञान ठरवणे, पुराणकथा रचणे इ. प्रकार धर्माचे स्वरूप निश्चित करण्याची जबाबदारी, जवळजवळ पूर्णांशाने त्यांच्यावर सोपवली. त्यांच्यावर अपार विश्वास ठेवला. त्यांना पूज्य मानले. त्यांना देवांचे पृथ्वीवरचे केवळ प्रतिनिधीच नव्हे, तर साक्षात भूदेव म्हणजेच पृथ्वीवरचे देवच मानले. त्यांचा शब्द-न-शब्द झेलला. त्यांचा संदेश स्वीकारला. त्यांचा आदेश मानला. त्यांच्या आदेशानुसार आपल्या समग्र वर्तनाला आकार दिला. त्यांच्या कोणत्याही कृतीबद्दल शंका घेतली नाही. त्यांना आपल्या जीवनात जणू काही सर्वोच्च स्थान देऊन टाकले. त्या बाबतीत त्यांना अनिर्बंध स्वातंत्र्य बहाल केले."
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
*"बहुजन समाजातील लोक ब्राह्मणी वर्चस्वावर सामान्यतः खाजगीत किंवा क्वचित जाहीररित्याही टीका करतात, कुरकुरतात, निंदा करतात, नावे ठेवतात आणि प्रत्यक्ष व्यवहारात मात्र जीवनातील महत्वाचा असा कोणताही प्रसंग ब्राम्हण भटजीच्या उपस्थितीशिवाय पार पाडायला तयार होत नाहीत.* ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली त्यांच्या मनात भीतीची इतकी बीजे पेरली आहेत, की त्या बीजापासून अंकुरलेल्या अंधश्रद्धांचे पीक फोफावले आहे. *बहुसंख्य अब्राह्मणांच्या मनात ब्राम्हणधर्माची इतकी दहशत आहे, की ते त्याच्यापासून फारकत घेण्याची कल्पनाही करू शकत नाहीत.* त्या धर्माच्या नियमांचे काटे बोचून रक्तबंबाळ झालेले लोकही ते काटे छाटण्याऐवजी वा त्यांच्यापासून दूर होण्याऐवजी ते काटे आपल्या शरीरात घुसवून ठेवण्यासाठीच सदैव सज्ज असतात."
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
"आपल्या विरोधकाला कमालीचे अपमानित करायचे असेल, तर त्याच्या नात्यातील त्याची आई, बहीण, पत्नी अशा कोणा तरी स्त्रीच्या चारित्र्याविषयी अपशब्द उच्चारणे, प्रत्यक्षरीत्या तिच्या चारित्र्यावर घाला घालणे अथवा आपण तिचे चारित्र्य भ्रष्ट केल्याची शिवी हासडणे, असा प्रकार सामाजिक जीवनात आपल्याला अनेकदा आढळतो. आई-बहिणीवरून दिल्या जाणाऱ्या असंख्य शिव्या याच मनोवृत्तीतून निर्माण झालेल्या असतात. *ब्राह्मणांनी वैशंपायनाच्या तोंडी घातलेली क्षत्रिय स्त्रियांच्या संबंधातील पूर्वोत्त कथा, हा त्यांनी क्षत्रियांना उद्देशून आईवरून दिलेल्या शिवीचाच प्रकार आहे. अशा प्रकारची शिवी ही वास्तव घटनेची द्योतक नसते, तर ते शिवी देणाराच्या मनातील विकृत विचाराचे चिन्ह असते.* ब्राम्हण ग्रंथकार स्त्रियांच्या आणि विशेषतः अब्राम्हण स्त्रियांच्या संदर्भात अशा प्रकारची विकृत स्वप्ने पुनःपुन्हा पहात आले आहेत. वस्तुस्थितीत जे घडू शकत नाही, ते जणू काही आपण खरोखरच करून दाखवले आहे, अशा फुशरक्याही त्यांनी मारल्या आहेत."
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
"अथर्ववेदातील नियमाचा आधार घेऊन प्रत्यक्ष व्यवहारात कर्मकांड कसे निर्माण करण्यात आले आहे, ते तुळशीच्या लग्नाचा विधी पाहिला असता स्पष्ट होते. तुळस म्हणजे जलंधर नावाच्या असुर सम्राटाची पतिव्रता पत्नी वृंदा होय. विष्णू मानला गेलेला कोणी तरी ब्राम्हण कपटाने तिचे शील भ्रष्ट करतो आणि त्यामुळे व्यथित झालेली वृंदा अग्नीत उडी टाकून आत्महत्या करते. पण आता *या पतिव्रता वृंदेचे म्हणजेच तुळशीचे दरवर्षी लग्न लावले जाते, हे तिचा पती जलंधर याच्याबरोबर नाही, तर तिचे शील भ्रष्ट करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाराबरोबर ! बहुजन समाजाने हे कर्मकांड आंधळेपणाने स्वीकारले आहे, पवित्र मानले आहे !*"
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
"राम हे भारतीय समाजातील बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे. पण मनुस्मृतीची निर्मिती झाली, त्या कालात त्याचे आरपार ब्राम्हणीकरण करण्यात आले. *बहुजन समाजाला प्रिय असलेल्या रामाचे नाव तर वापरायचे, पण त्याची प्रतिमा मात्र ब्राम्हणांना सतत शरण जाणारा राजा म्हणून रंगवायची, हे तंत्र वापरण्यात आले.* खरे तर रामाने सीतेचा त्याग केला नाही ब्राह्मणांच्या अकाली मरण पावलेल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी शूद्रतपस्वी शंबूकाची हत्या केली, या कथा मूळ रामायणात नव्हत्या. *मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्र यांच्या विरोधात उठाव केल्यावर ब्राह्मणांनी रामाच्या नावावर त्या घुसडल्या. स्वतः नामानिराळे राहून, रामाला बदनाम करून, त्यांनी स्वतःला हवी असलेली स्त्रीशूद्रविरोधी मूल्ये रामाच्या नावाखाली समाजात रुजवली.*"
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
"रामाला ब्राम्हणपरायण ठरविण्यासाठी आणखी एक विषारी डावपेच करण्यात आला. तो म्हणजे त्याच्या जन्माच्या बाबतीत एक दुष्ट विचार समाजाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजा दशरथ हा अपत्यनिर्मितीला समर्थ नव्हता. याचा अर्थ राम वगैरे त्याचे औरस पुत्र नव्हते. त्याने केलेल्या पुत्रकामेष्टीच्या वेळी त्याने ऋष्यशृंग नावाच्या ब्राम्हण ऋत्त्विजाकडून आपल्या राण्यांच्या ठिकाणी या पुत्रांची निर्मिती करून घेतली. याचा अर्थ *रामाच्या जन्मविषयीही विकृत विचार महाभारतामध्ये प्रकट करण्यात आला.* अशा प्रकारच्या धादांत खोट्या गोष्टी रचणे, हा या ग्रंथकारांच्या दृष्टीने अगदी सहज, स्वाभाविक प्रकार होता. ब्राह्मणांनी रामाविषयी सांगितलेल्या या अनेक गोष्टी खोट्या आहेत, हे सत्य स्पष्टपणे उजेडात आले नसल्यामुळे भल्या-भल्या लोकांनी रामाविषयी भलेबुरे अनेक निष्कर्ष काढले आहेत."
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे)*
"नियोगाचे नियम करताना ब्राह्मणांनी केलेली घुसखोरीही पाहण्यासारखी आहे. एखादा पुरुष निपुत्रिक मरण पावला किंवा तो हयात असूनही पुत्रनिर्मिती करण्यास असमर्थ असला, तर त्याचा पत्नीला आपद्धर्म म्हणून आपला दीर, स्वतःच्या वर्णाचा पुरुष वगैरेपासून पुत्रनिर्मिती करण्याची परवानगी होती. दिरापासून पुत्रनिर्मिती करण्याचा हा नियम तत्कालीन समाजाच्या दृष्टीने योग्य होता. कारण, तसे केल्यामुळे त्या कुटुंबाचा अंशच त्या स्त्रीच्या पुत्राच्या रूपाने म्हणून जन्माला येत असे. पण ब्राम्हणांचे तिथेही लक्ष गेले आणि त्यांनी नियोगासाठी नेमावयाच्या पुरुषांच्या यादीत दीर वगैरेंच्या बरोबरीने ब्राम्हण पुरुषांचाही अंतर्भाव केला. धर्मग्रंथामध्ये नियम घालण्याचा अधिकार त्यांनी किती अनैतिक पद्धतीने वापरला, हे यावरून स्पष्ट होते."
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १९)*
"यजमानाने विशिष्ट यज्ञ करताना आपल्या प्रवरांचा म्हणजे पूर्वजांच्या नावांचा उच्चार करावा, असा एक नियम आहे. *यजमान ब्राह्मण असेल, तर त्याने आपल्या प्रवरांचा उच्चार करावा आणि यजमान क्षत्रिय असेल, तर त्याने मात्र स्वतःच्या प्रवरांचा उच्चार करण्याऐवजी आपल्या पुरोहिताच्या प्रवरांचा उच्चार करावा, असे धर्मशास्त्र सांगते.* हा नियम पुरोहितांच्या हीन मानसिकतेचाच द्योतक आहे, यात शंका नाही."
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १९)*
"कामवासनेने प्रवृत्त झालेल्या ब्राह्मणाला ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चारही वर्णांतील स्त्रियांशी विवाह करता येतो, असे मनुस्मृती सांगते. क्षत्रिय पुरुष मात्र ब्राम्हण स्त्रीशी विवाह करू शकत नाही. विवाहामध्ये पाणिग्रहण म्हणजे वराने वधूचा हात हातात घेणे हा महत्वाचा विधी असतो. पण क्षत्रिय मुलीचा ब्राह्मण पुरुषाशी विवाह होतो, तेव्हा पाणिग्रहण विधी करू नये. त्या मुलीने ब्राम्हण पुरुषाच्या हातातील बाण आपल्या हाताने पकडावा, असेही मनुस्मृती सांगते. याचा अर्थ ब्राम्हण पुरुष क्षत्रिय स्त्रीशी जो विवाह करतो, तो खराखुरा विवाह नसतो. एक प्रकारे ती त्याची रखेल बनते. त्यामुळे ब्राम्हणाच्या ब्राम्हण पत्नीला धर्मकृत्यात जे अधिकार असतात, ते या क्षत्रिय पत्नीला नसतात."
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २०)*
"शतप्रत ब्राम्हण म्हणते, ब्राम्हण विचार करतो आणि क्षत्रिय (त्यानुसार) कृती करतो. ब्राह्मणाला राजा वा क्षत्रिय नसला, तरी काही दोष नाही. अर्थात, त्याला राजा मिळाला, तर त्याचा लाभ होईल परंतु क्षत्रियाने ब्राह्मणाविना राहणे, हा मात्र दोष होय. *ब्राम्हण मित्राच्या आदेशाविना तो जे काही कर्म करतो, ते असफल होते. म्हणून कोणतेही कर्म करू इच्छिणाऱ्या क्षत्रियाने ब्राह्मणाकडे गेलेच पाहिजे. कारण, त्यात ब्राम्हणाच्या आदेशानुसार केलेले कार्य सफल होते.*
क्षत्रियाने विचार करण्याच्या भानगडीत पडू नये, असा संकेत या धर्मग्रंथाने क्षत्रियांना दिला आहे. *आपली बुद्धी स्वतंत्रपणे वापरू नका, आपले शत्रुमित्र कोण ते स्वतः ठरवू नका, आपल्या धर्माचे स्वरूप स्वतः ठरवू नका, थोडक्यात म्हणजे सर्व बाबतींत आमच्यावर विश्वास ठेवा, असे त्यांनी त्यांना सांगितले आहे. एखादया समाजाला त्याची बुद्धी गंजत ठेवायला सांगणे, हा त्याला गुलाम बनवण्याचा प्रकार नव्हे काय?"*
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २२)*
"संत नामदेवांसारख्या महामानवाला मंदिरात कीर्तन करीत असताना हिंदू धर्माच्या मुखंडांनी शूद्र म्हणून मंदिरातून हाकलून दिले. उदात्त जीवनमूल्यांच्या क्षेत्रात मोठी परिपक्वता गाठलेल्या या महापुरुषाला 'कच्चे मडके' ठरविणाऱ्या खोटारड्या कथा त्यांनी प्रसृत केल्या. संत ज्ञानेश्वरांसारख्या कोवळ्या भावंडांचा अपार छळ केला. संत तुकारामांसारख्या महात्म्याची गाथा बुडवली. शूद्र असल्यामुळे धर्माविषयी काही लेखन करण्याचा, विचार मांडण्याचा त्यांना अधिकार नाही, असे म्हणून त्यांना छळ-छळ-छळले. पुढे राजर्षी शाहू महाराज बहुजन समाजाच्या उद्धारासाठी जीवाचे रान करीत आहेत, हे पाहून ब्राह्मणांचा इतका जळफळाट झाला, की त्यांनी या युगप्रवर्तक राजाला अपार मनस्ताप दिला, जीवघेण्या यातना दिल्या.
अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर आणि कुटील अशा परिस्थितीने घेतल्यानंतरही बहुजन समाज त्या परिस्थितीमधून निघणाऱ्या स्वाभाविक निष्कर्षाला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवत नाही, हे पाहून माझा जीव कासावीस होतो. *संत तुकारामांविषयी जर आपल्या मनात आत्यंतिक आदर आहे, तर त्यांची गाथा बुडवण्यास कारणीभूत होणारे धर्मग्रंथ हे आपले कसे काय असू शकतात, हे मला समजत नाही.*"
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २४)*
"छत्रपती शिवाजी महाराज हे केवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व ! पराक्रमी, कर्तृत्वसंपन्न, सद्गुणी, न्यायप्रिय- भाषेतली विशेषणे कमी पडावीत, एवढे विलक्षण माहात्म्य असलेला महापुरुष. शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी स्वतःचा जीव वेळोवेळी मृत्यच्या दाढेत घालून ज्यांच्या धर्माचे रक्षण केले, त्यांनीच त्यांना शूद्र म्हणून राज्याभिषेकाचा अधिकार नाकारला, त्यांना वैदिक मंत्रांचा अधिकार नसल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील एकही वैदिक पुरोहित त्यांच्या राज्याभिषेकासाठी पुढे आला नाही. त्यांनी उरावर मृत्यू झेलून उभारलेले राज्य गिळंकृत करण्यासाठी मात्र ब्राह्मणांनी जीवाचा आटापिटा केला, त्याच हेतूने अत्यंत कर्तबगार अशा छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली ठरवले, त्यांना पकडून मोगलांच्या ताब्यात देण्याची कटकारस्थाने केली, अपप्रचाराच्या जोरावर त्यांची आत्यंतिक बदनामी केली.
*छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण पुनःपुन्हा नतमस्तक व्हावे, इतके युगप्रवर्तक कार्य त्यांनी केले आहे. मग ज्या धर्माच्या प्रमुखांनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, तो धर्म आपला कसा मानता येईल, हे ही मला कळत नाही. महाराज जर हिंदू होते, वेद हे जर हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत, तर महाराजांना त्यांच्या स्वतःच्याच धर्मग्रंथाचे मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही, असे म्हणणारे लोक आपलेच धर्मबांधव आहेत, असे मानणे, हा एक प्रकारच्या गुलामगिरीचाच भाग ठरत नाही का ?*"
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २४)*
"आज आमच्या तरुण मुलांना 'गर्व से कहो हम हिंदू हैं' असं म्हणायला शिकवले जात आहे. आम्ही हिंदू आहोत, म्हणजे नेमके कोण आहोत? हिंदुत्वाने आमच्या वाट्याला काय दिले आहे ? आम्ही कितव्या दर्जाचे हिंदू आहोत ? ज्ञानेश्वर हिंदू नव्हते काय ? मग त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा छळ का करण्यात आला ? छळ करणारे कोणी हिंदूद्वेष्टे अहिंदू होते, की हिंदुत्वाचा बुरखा घेतलेले ब्राह्मण होते ? संत नामदेव जिथे किर्तन करीत होते, ते हिंदूंचेच मंदिर होते ना ? आणि त्यांना तिथून हाकलणारे कोण होते ? आम्ही कशाकशाचा अभिमान बाळगायचा ? हिंदू धर्मग्रंथांच्या आधारे संत तुकारामांची गाथा बुडवली गेली, त्याच ग्रंथांच्या आधारे शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला, अशा कृतींचा अभिमान बाळगायचा ? ज्यांना आपले स्वत्व शाबूत ठेवून माणूस म्हणून जगायचे आहे, त्यांनी या सगळ्याचा शांतपणे विचार करावा."
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २५)*
*"ब्राह्मणांनी अब्राह्मणांच्या वाट्याला जे धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन दिले आहे, ते त्यांना हिंदू धर्माचे दुय्यम अनुयायी बनवणारे आहे. त्यांच्याकडे प्रथम दर्जाची आणि प्रसंगी ब्राह्मणांपेक्षाही सरस गुणवत्ता असूनही त्यांना सुमार ब्राह्मणांपेक्षाही हीन मानले जाते.* सामान्य कुवतीच्या ब्राह्मणांनाही जी प्रतिष्ठा आणि संधी विनासायास मिळते, ती प्रतिभाशाली अब्राह्मणांना अनेकदा आयुष्यभर कष्ट करूनही मिळत नाही. ब्राह्मणांनी आपल्या धर्मशास्त्रांतून केलेले असंख्य नियम अब्राह्मणांच्या काळजावर घाव घालणारे आहेत, त्यांचा कमालीचा अपमान करणारे आहेत, त्यांच्या स्वतःच्या मनात आत्मतुच्छतेची भावना निर्माण करणारे आहेत. थोडक्यात म्हणजे या नियमांच्या आधारे ब्राह्मणांनी अब्राह्मणांना आपले गुलाम बनवण्याची यंत्रणा उभी केली आहे. *ब्राह्मणांनी अब्राह्मणांविषयी जी हजारो विषारी वचने लिहून ठेवली आहेत, तशा प्रकारचे केवळ एक वचन अब्राह्मणांनी ब्राह्मणांविषयी उच्चाटले, तर ब्राम्हण लोक लाख-लाख डंख मारतील, पिसाळून उठतील, त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल.* हा अपमान पचवणे त्यांना फार फार जड जाईल.
मग अब्राह्मणांनी मात्र ब्राह्मणांनी केलेला अपमान निमूटपणे का बरे पचवावा ? स्वतंत्र मानव म्हणून स्वाभिमानाने जगण्याची पुरेपूर क्षमता असतानाही ब्राह्मणांचे गुलाम म्हणून का जगावे ? संपूर्ण इतिहासामध्ये ब्राह्मणांनी धर्माच्या आधारे अब्राह्मणांना गुलाम बनवण्याची पराकाष्ठा केली आहे. *आता अब्राह्मणांच्या पुढे स्पष्ट असे दोन पर्याय आहेत - ब्राह्मणांचे गुलाम म्हणून लाचारीने जीवन जगायचे, की स्वतंत्र मानव म्हणून फुललेल्या स्वत्वाचे जीवन जगायचे ? ब्राह्मण जर अब्राह्मणांना गुलाम मानत असतील आणि त्यासाठी धर्माचे हत्यार वापरत असतील, तर गुलाम बनवू पाहणाऱ्या ब्राह्मणांचा आणि अब्राह्मणांचा धर्म एकच कसा असू शकेल ?"*
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २५)*
"धर्म एक कुणाचा असतो ? ज्यांना परस्परांविषयी प्रेम आहे जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे, त्यांचा धर्म एक असू शकतो. ज्यांच्या आदराची स्थाने आणि अभिमानाचे विषय एकच असतात, त्यांचा धर्म एक असतो. ज्यांची जीवनमूल्ये समान असतात आणि ज्यांना समान समान धार्मिक अधिकार प्राप्त झालेले असतात, त्यांचा धर्म एक असतो. अशा प्रकारच्या कसोट्या लावल्या, तर *ब्राह्मणांचा आणि अब्राह्मणांचा धर्म एकच असू शकत नाही, हे हजारो पुराव्यांनी सिद्ध करता येते.*
*धर्माच्याच आधारे शोषण करणारा वर्ग आणि धर्माच्याच कारणामुळे शोषणाला बळी पडलेला वर्ग, यांचा धर्म एकच कसा काय असू शकेल ? त्यांचा धर्म एक मानणे म्हणजे शोषणव्यवस्थेला मान्यता देणे होय.* यामध्ये शोषकांचा फायदा आहे आणि त्यामुळे ती व्यवस्था टिकवण्याचा ते पराकाष्ठेचा प्रयत्न करणार, हे स्पष्ट आहे. पण जे शोषणाला बळी पडले आहेत, त्यांनी ती व्यवस्था टिकवण्यासाठी जीवावर उदार व्हावे, याला गुलामगिरी म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे ?"
*(संदर्भग्रंथ : गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : २९)*
No comments:
Post a Comment