Flash

Tuesday, 18 April 2017

मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी




कुठले विचार निवडायचे ते मीच ठरवू शकतो ना ? मग मी असे विचार निवडेन की जे मला अडचणींतून पुढे जायला मदत करतील आणि एखादा रस्ता दाखवतील !

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी पान क्रमांक - ५)


"म्हणजे माझी भीती मीच निर्माण केली होती. मग जशी मी ती निर्माण करू शकतो, तशी ती घालवूनही देऊ शकतो. आपली भीती मुख्यतः आपणच निर्माण केलेली असते त्यामुळे तिला थारा द्यायचा कि नाही हे सुद्धा आपल्याच हातात असते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी पान क्रमांक ७)*


"ममा-डॅडींच्या वागण्यामुळे जेव्हा राग येतो, चिडचिड होते, तेव्हा खरंतर मलाच किती त्रास होतो ! त्यांच्यापर्यंत तो पोहोचतो की नाही कोण जाणे ! याचा अर्थ माझा राग काहीच कामाचा नाही. उलट मनस्ताप अधिकच वाढवतो. त्यापेक्षा शांत बसावं हेच उत्तम ! कारण तोच मार्ग अधिक शहाणपणाचा आणि कमी त्रासाचा आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली एलिस पान क्रमांक - ५)*


"ममा-डॅडींना बदलणं जरी माझ्या हातात नसलं, तरी त्यांच्याबाबत कुठले विचार करावेत, हे मात्र बहुतांशी माझ्याच हातात आहे. कारण माझे विचार, ते किंवा इतर कुणीही ठरवू शकणार नाहीत."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ५)*


"आपल्याला आवडत नसणाऱ्या परिस्थितीतही अनेक चांगल्या गोष्टी लपलेल्या असतात. त्यामुळे तशा परिस्थितीचेही काही फायदे होऊ शकतात."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -६)*


"डोकं प्रचंड दुखत असताना विचार थांबायचे नाहीत. माझ्या वाट्याला ही डोकेदुखी का? यात माझा काय दोष? असे विचार मनात आले की डोकं जास्तच ठणकायला लागायचं, हा ठणका कसा थांबवायचा, तेच कळायचं नाही. एक गोष्ट कळत गेली ती म्हणजे डोकेदुखी मी थांबवू शकत नव्हतो पण डोकेदुखीबद्दलचे त्रासदायक विचार मात्र नक्कीच थांबवू शकत होतो. हे विचार डोकेदुखी थांबवायला मदत तर करत नव्हतेच; उलट ते माझं दुखणं मात्र अजून वाढवत होते. मग अशा वेळी मी काय करू शकत होतो? दुखणं अजून वाढवणं किंवा विचार बदलून डोकेदुखीवर उपाय शोधणं असे दोन पर्याय समोर होते. अर्थातच मी दुसरा पर्याय निवडला."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -७)*


"कुठलीही परिस्थिती अगदी संपूर्णत: वाईट नसते. त्यातून काहीतरी चांगलं निघतंच."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -१०)*


"कोणावर अवलंबून राहिलं की, उलट त्याचा त्रासच जास्त होतो, त्यापेक्षा होतील तेवढी कामं स्वतः केलेली परवडलं !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -११)*


"एखादी गोष्ट शिकेपर्यंत कठीण वाटत असते. पण प्रत्यक्षात शिकल्यानंतर कळतं, की वास्तविक ही किती सोपी गोष्ट आहे ! आपण उगाचच त्याचा एवढा बाऊ करतो आणि सोपी गोष्टही कठीण करून ठेवतो !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -१२)*


"भीतीच न वाटणं म्हणजे धैर्य नव्हे; तर वाटलेल्या भीतीवर प्रयत्नपूर्वक मात करणं म्हणजे धैर्य !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -१३)*


"कुठल्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं असेल, तर त्या गोष्टीसंबंधी शक्य तेवढं सखोल ज्ञान संपादन करायला पाहिजे; त्यासाठी खूप वाचलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - १४)*


मला वाटत होतं, खूप वाचलं की माझा विकास होईल. पण आता लक्षात यायला लागलं, की नुसतं वाचणं पुरेसं नव्हतं. मनाची मशागत करायची असेल, तर वाचलेल्या मजकुरावर स्वतःच्या बुद्धीने विचार करणं जरुरीचं होतं. वाचन कसं करावं, याचा एका विद्वानाने दिलेला कानमंत्र मला तंतोतंत पटायला लागला. *" उगाच भाराभर पुस्तकं घाईघाईने वाचण्यापेक्षा केवळ एका पानाचं संथपणे, रवंथ करत परिशीलन करणं श्रेयस्कर आहे. "*

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - १६)*


स्वतःची कीव करणारे विचार मनात यायला सुरुवात झाली, की मी त्या विचारांना उलटं फिरवतो. हे मला हल्ली जमायला लागलंय. मी स्वतःला सांगायला सुरुवात करतो, *" इतर मुलांसारख्या मला अनेक गोष्टी मिळत नसल्या, तरी त्या न मिळाल्यामुळेच मी इतरांपेक्षा वेगळा विचार करू शकतोय ! तो न करणं हेच माझं वेगळेपण आहे ! "*

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - १८)*


कठीण प्रसंगाला थोर व्यक्ती कशा सामोऱ्या जातात, हे मी वाचलं होतं. या वाचनातून मी शिकलो होतो, *"एखादी कठीण परिस्थिती उभी ठाकल्यामुळे जेव्हा आपण अस्वस्थ होतो, तेव्हा ती परिस्थिती बदलणं आपल्या हातात आहे का ? हे अगोदर बघितलं पाहिजे, ती आपण बदलू शकत असू, तर ती पूर्णपणे किंवा निदान जमेल तेवढी बदलण्याचा प्रयत्न प्रयत्न केला पाहिजे. जर ती बदलत येत नसेल, तर मात्र तिच्याबद्दलचे निष्फळ विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आहे त्या परिस्थितीशी शक्यतो जुळवून घ्यायला सज्ज झालं पाहिजे."*

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -२३)*


आपले विचार सर्वस्वी हवामानावर किंवा बाहेरच्या वातावरणावर अवलंबून असतात का ? तसं असेल तर कडाक्याच्या थंडीत सर्वजण कामधंदा न करता घरात बसून राहतील. असं तर होत नाही, याचाच अर्थ आपले विचार हर बाहेरच्या गोष्टींपासून बहुतांशी स्वतंत्र आहेत. ते आपल्याच हातांत असतात. बाहेरच्या वातावरणाचा किती परिणाम स्वतःवर होऊ द्यायचा, हेही बऱ्याच प्रमाणात आपल्याच हातांत असतं. ठरवलं तर आपले विचार आपण बदलू शकतो. आपल्याला हवे तसे फिरवूही शकतो.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -२६)*


झोपण्यापूर्वी इंग्रजीची वही उघडली. राल्फ वॉल्डो इमर्सन या जगप्रसिद्ध तत्ववेत्याने लिहिलेला 'सेल्फ-रिलायस' हा निबंध जॉन्सन सरांनी वर्गात शिकवला होता. त्यातले महत्वाचे विचार मी वहीत लिहून ठेवले होते. इमर्सनने लिहिलं होतं, *"स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला निराधार व परावलंबी समजू नका. स्वतःवर अवलंबून राहण्याची सवय जडवून घ्या. कधीकधी माणूस बिकट परिस्थितीच्या अशा काही कोंडीत सापडतो, की सुटकेचा काही मार्गच नाही असं त्याला वाटतं. पण त्याने खंबीरपणे स्वतःवर विश्वास ठेवला, तर त्या कोंडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा, कुठला ना कुठला मार्ग त्याला दिसू लागतो."*

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - २७)*


हल्ली जिकडेतिकडे पुस्तकंच दिसतात. खाताना, पिताना, काम करताना, फार काय झोपतानाही पुस्तकांतलेच विचार मनात नाचत असतात. कधी एकदा रिकामा वेळ मिळतोय आणि पुस्तक उघडतोय, असं होऊन जातं. पुस्तकांचं हे जग मला फार आवडतं. माणसांपेक्षा पुस्तकंच जास्त प्रिय वाटतात. माणसं किती बदलत असतात ! आज आपल्याला जवळचा असणारा मनुष्य, उद्या जवळचा असेलच याची खात्री देता येत नाही. पुस्तकांचं तसं नाही. हवी तेव्हा ती उघडावीत. आपल्या सेवेला ती कायम तत्पर असतात. ती बदलत नाहीत. उलट परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायला शिकवतात. नवीन विचार शिकवतात.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ३१)*


तत्त्वज्ञान म्हणजे 'लव्ह ऑफ विज्डम !' तत्त्वज्ञानाचं उद्दिष्ट आहे, आपल्याला विचार करायला प्रवृत्त करणं ! ज्याला ज्ञानाबद्दल ममत्व वाटतं, ज्याची वृत्ती ज्ञानपिपासू आहे, त्याच्यासाठी तत्त्वज्ञान हा अगदी योग्य विषय आहे. इतर विषय नोकरी किंवा व्यवसायाचं शिक्षण देतात. पण तत्त्वज्ञान त्याही पलीकडे जाऊन,  जीवन अर्थपूर्णरीत्या कसं जगावं, याचं शिक्षण देतं. हा विषय प्रत्येक गोष्टीच्या गाभ्यापर्यंत जातो. म्हणूनच तर म्हंटलं जत, की सर्व विषय हे तत्त्वज्ञानाच्या उदरातून प्रसवलेले आहेत. जीवनाकडे पाहण्याची विशाल दृष्टी प्राप्त करून देणं हाच तत्त्वज्ञानाचा उपयोग आहे.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -३२)*


जॉन्सन सरांची मला आठवण यायची. ते सांगायचे, *"स्वतःचा बौद्धिक विकास करायचा असेल, तर नुसतं वाचन पुरेसं नाही. वाचनाला लेखनाची जोड दिली पाहिजे. मनात साठलेलं लिहिलं पाहिजे. लिखाणातून नेमकेपणा येते. विचारांत सुसूत्रता येते."*

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ३५)*


"कुठलाही विचार कळलाय असं वाटत असलं, तरीही प्रत्यक्ष जेव्हा तो लिहायला घेतो, तेव्हाच तो उमजण्याची खरी कसोटी लागते. वाचण्यापेक्षा लिहिणं हे फार कठीण काम असतं. आपल्याला एखादा विषय सुस्पष्ट आणि मुद्देसुदपणे लिहिता आला, तर तो विषय आपल्या पचनी पडला आहे, असं समजायला हरकत नाही. अशा लेखनामुळे तो मनात अधिक खोलवर मुरतो. म्हणूनच एखादा विषय आत्मसात करायचा असेल, तर तो नेटक्या भाषेत लिहिण्याचा सराव करावा हे उत्तम !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -३५)*


"सभ्यता म्हणजे काय ? असभ्यता म्हणजे काय ? सर्व दारुडे नाहीतर ड्रग-अॅडिक्ट हे कायम असभ्यच असतात का ? निर्व्यसनी माणसं सदैव सभ्यपणेच वागतात का ? एखादा मनुष्य दारुड्या नाहीतर ड्रग-अॅडिक्ट असेल तर त्यांचं दारू पिणं किंवा ड्रग्ज घेणं हे वाईट आहे, असं आपण फार फार तर म्हणू शकतो. पण म्हणून तो संपूर्णपणे असभ्य झाला, असं लेबल त्याला लावू शकतो का ?"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -३४)*


"एखाद्या माणसाचं विशिष्ट वागणं किंवा बोलणं पटलं नाही, तर त्या माणसाचाच नायनाट करण्याची प्रवृत्ती धोकादायक नाही का ? असा नायनाट करून त्याचा जगण्याचा अधिकार नष्ट करणं न्यायाचं नाही. प्रत्येकाचंच कुठलं ना कुठलंतरी वागणं किंवा विचार इतरांना पटत नाही. प्रत्येकाने जर तसं वागायचं ठरवलं, तर मग आपल्यापैकी कुठला माणूस सुरक्षित राहील ? उलट अशा मनोवृत्तीमुळे माणसामाणसांतला द्वेषभाव अजूनच वाढीला लागेल. अशा मनोवृत्तीचा उदो उदो करणं थांबवलं पाहिजे. कारण ही मनोवृत्ती अमानुष हिंसाचाराला आणि आक्रमकतेला चिथावणी देणारी आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ३७)*


"माणसाच्या वागण्याचा विचार करणं आणि त्याचा संपूर्ण माणूस म्हणून विचार करणं; यात जर फरक केला तर माणसामाणसातलं वैमनस्य दूर होऊ शकतं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -३८)*


"जेव्हा मनुष्य कोणत्याही कारणामुळे का होईना, पण स्वतःचा दृष्टिकोन तपासून पाहतो आणि त्याची हडसून-खडसून चिकित्सा करतो, तेव्हाच त्याच्यात बदल होतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ३९)*



"मनुष्यात बदल होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याला स्वतःत बदल व्हावा, असं मनापासून वाटलं पाहिजे. पण जर त्या मनुष्याला असं वाटत नसेल तर मात्र दुसऱ्या माणसाने त्याला बदलण्यासाठी कितीही कष्ट घेतले, तरी ते सफल होण्याची शक्यता कमी असते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४०)*


"प्रत्येक गायक हा एक गाता रसिक असतो आणि प्रत्येक रसिक हा एक मुका गायक असतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -४३)*



"ज्या विषयामुळे विचार, भावना आणि कृती अशा तीनही प्रक्रिया उद्दीपित होतात, त्या विषयाशीच आपण समरस होऊ शकतो ! एकरूप होऊ शकतो ! या तीनही प्रक्रिया जागं करण्याचं सामर्थ्य संगीतात असतं. म्हणूनच ते मनाला भिडतं ! प्रभावी ठरतं !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -४४)*


"आपण एखाद्या गोष्टीवर का विश्वास ठेवतो ? त्या विश्वास ठेवण्याला काही संयुक्तिक कारण असतं, की एखादी गोष्ट आपल्याला केवळ सांगितली जाते म्हणून आपण विश्वास ठेवत जातो ?"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४५)*



"मानवा सकट सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ती कशी झाली हे या ग्रंथातून मला स्पष्टपणे उमगलंय ! जगातली सर्व चराचर सृष्टी हळूहळू होत होत, आजच्या स्थितीला येऊन ठेपली आहे. धर्मग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराने ती एका फटक्यात निर्माण केलेली नाही. याचाच अर्थ असा, की धर्मग्रंथात लिहिलेली माहिती खोटी आणि फसवणूक करणारी आहे. धर्मग्रंथ असत्यावर आधारलेला आहे, हे मला पक्क कळून चुकलंय ! तसं जर असेल, तर धर्मग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वरावर तरी भरवसा का ठेवायचा ?"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४५)*



"आपला अनुभव कितीही दुःखद आणि विनाशकारी असला, तरीही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आपलं चांगलंच होईल असं म्हणणं, म्हणजे सत्याकडे पाठ फिरवल्यासारखं आहे. मग सत्य काय आहे ? सत्य असं आहे की, परमेश्वराची प्रार्थना आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यांत मुळी कार्यकारणसंबंधच नाही. असा संबंधच जर मुळात नसेल, तर परमेश्वराची कितीही प्रार्थना केली तरी जीवनातल्या घटना बदलणार तरी कशा ? आपल्या वाट्याला विशिष्ट परिस्थिती का येते, याला कोणतंच खास किंवा वैश्विक कारण नाही."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक -४५)*




"तत्त्वज्ञानाच्या अनेक पुस्तकांतून कळलेलं सत्य असं आहे, की न्याय ही संकल्पना माणसाने निर्माण केलीय. ती जगात नैसर्गिकरित्या अस्तित्वात नसते. मग या जगावर राज्य करणारा परमेश्वर हा स्वभावतःच न्यायी आहे, अशी मनाची खोटी समजूत का घालायची ?
परमेश्वर जर स्वभावतःच न्यायी असेल, तर तो आपल्या बऱ्या वाईट कर्मानुसार फळ देईलच की ! त्यासाठी त्याची वेगळी प्रार्थना कशासाठी ? खरं म्हणजे प्रार्थनेत परमेश्वराच्या न्यायीपणाला आवाहन नसतंच ! उलट परमेश्वराने न्यायीपणा बाजूला ठेवून केवळ आपल्या मनासारखं करावं, अशी आळवणी त्याचा प्रत्येक भक्त करत असतो. ही आळवणी करून तो थांबत नाही, तर परमेश्वराने आपल्यावर कृपा करावी म्हणून त्याला प्रसन्न करण्याचे तो निरनिराळे मार्गही तो शोधत असतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४६)*



"जेव्हा मी ज्यूधर्मियांच्या प्रार्थनामंदिरात म्हणजे सिनेगॉगमध्ये जातो, तेव्हा तिथले धर्मगुरू म्हणजे रबाई सांगत असतात, की परमेश्वर दयाळू आहे. त्याला अनन्यपणे शरण गेलात की तुमचे सर्व प्रश्न सुटतील. असा उपदेश करताना परमेश्वर दयाळू कसा आहे, याचा कुठलाही निर्णायक पुरावा त्यांना सादर करता येत नाही. मग मनात प्रश्नांमागून प्रश्न अविरतपणे उमटत जातात. मला पटतील अशी कुठलीही कारणं रबाई देऊ शकत नाहीत. पण ते केवळ धर्मगुरू आहेत, म्हणून त्यांचं म्हणणं मी आंधळेपणाने का ऐकावं ? मला मिळालेली स्वतंत्र बुद्धी मी गहाण का ठेवावी?"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४६)*



"परमेश्वराला शरण जाण्याचे निरनिराळे प्रकार रबाई सांगत असतात. माझ्या पाहण्यातले सर्वजण ते आचारणातही आणतात. परमेश्वराला शरण जाणं, म्हणजे स्वतःला क्षुल्लक समजून त्याची करुणा भाकणं ! विविध प्रकारे स्तुती करून त्याची आळवणी करणं ! त्याचा कृपावर्षाव व्हावा म्हणून याचना करणं ! पण हे सर्व प्रकार पाहून मनात प्रश्नचिन्ह उठतं, की असा स्तुतीला हपापलेला, प्रार्थनांनी भुलणारा परमेश्वर खरोखरच सर्वोत्तम आणि सर्वशक्तिमान आहे, असं आपण म्हणू शकतो काय? एखाद्या अहंकारी मनुष्याप्रमाणे परमेश्वर जर स्तुतीला भाळणारा आणि प्रार्थनेने द्रवणारा असेल, तर त्याची भक्ती करणं म्हणजे मला नि:सत्वपणाचं लक्षण वाटतं!"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४६)*


*हे जग परमेश्वराने निर्माण केलंय* रबाई सांगत असतात. त्यांच्या सांगण्याने माझं समाधान होत नाही. कारण मग *परमेश्वराला कुणी निर्माण केलं, हा प्रश्न लगेच उभा राहतो.*हा प्रश्न मी त्यांना विचारलाही ! त्यांनी उत्तर दिले, *परमेश्वराला कुणी निर्माण करायला लागत नाही, तो स्वयंभू आहे.* माझ्या मनात लगेच पुढचा प्रश्न उभा राहिला, की *परमेश्वर जर स्वयंभू असेल तर जगच स्वयंभू का असू शकत नाही ?*

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४६)*



"सिनेगॉगमध्ये असंही सांगतात, की परमेश्वराची प्रार्थना केल्याने मानसिक शांती मिळते. कदाचित ते खरंही असेल ! पण या कल्पनेची परीक्षा घेतल्यावर तिच्यातला फोलपणा जाणवतोय ! कारण एखादा माणूस परमेश्वरावरच काय, पण कोणत्याही गोष्टीवर भक्तिभावाने पूर्ण विश्वास ठेऊन तिची प्रार्थना करत असेल, तर त्याला मानसिक शांती लाभू शकते. थोडक्यात, परमेश्वरापेक्षा कशावर तरी विश्वास ठेवल्याने मानसिक शांती मिळत असावी. परमेश्वराऐवजी जर कुणी सैतानावर गाढ विश्वास ठेवून त्याची प्रार्थना केली, तर त्याही भक्ताला मानसिक शांती मिळू शकते.

खोलात विचार करताना कळतंय की, असा विश्वास माणसाचं नुकसान करण्याचीही दाट शक्यता आहे. परम दयाळू ईश्वर कठीण समयी आपल्या रक्षणासाठी धावून येत नाही. असं जेव्हा ईश्वरभक्ताला समजेल, तेव्हा त्याचा केवढा मोठा भ्रमनिरास होईल ! तो मानसिकदृष्ट्या सुधारण्याऐवजी अधिकच अस्वस्थ होईल ! निराश होऊ शकेल ! म्हणजेच ईश्वरावरचा विश्वास हा उपयुक्त न ठरता, उलट मारकच ठरण्याची शक्यता आहे किंवा तो ईश्वरावरची भक्ती टिकवून ठेवण्यासाठी 'होतं ते चांगल्यासाठीच होतं' अशा कोणत्यातरी बिनबुडाच्या विचारसरणीला शरण जाईल !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४७)*


"बिनबुडाच्या कल्पनांवर विश्वास ठेवण्यापेक्षा, आपलं ज्ञान आणि सामर्थ्य मर्यादित आहे, हे मान्य करणं जास्त उपयुक्त आहे. कितीही प्रयत्न केला तरीही एखादं अरिष्ट आपल्यावर कोसळतंच ! पण त्यामुळे खचून न जाता त्यातून मार्ग काढणं, हेच जास्त श्रेयस्कर आहे." 

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४७)*



"एखाद्या गोष्टीवर श्रद्धा किंवा विश्वास ठेवणं अगदी सोपं असतं. कारण त्यात बुद्धीचा वापर करायचा नसतो. सत्यासत्यतेची शहानिशा करायची नसते. शिवाय श्रद्धा ठेवण्यात काहीच कष्ट नसतात. पण चिकित्सा म्हंटलं की कष्ट अटळ असतात. बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करणं भाग असतं आणि म्हणूनच ते कठीण असतं. त्यामुळे मनुष्य चिकित्सा करणं टाळत राहतो आणि श्रद्धेचा आश्रय घेतो. मग त्याला वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची सवय लागत राहते. ही सवय फार घातक आहे. कारण कुठलाही कठीण प्रसंग आला, की ईश्वराला शरण जाऊन मनुष्य प्रयत्न करायचंच थांबवतो.

सर्वशक्तिमान ईश्वरावर सर्व भार टाकला, की मग आपण मानसिकदृष्ट्या दुबळं होत जातो. मग ईश्वरापुरतीच ही श्रद्धा मर्यादित राहत नाही. कशा ना कशावरतरी गाढ श्रद्धा ठेवण्याची सवय लागते. कठीण प्रसंगांत ईश्वरच कशाला, कुठलंही श्रद्धास्थान तारक वाटायला लागतं. कालांतराने ईश्वराबरोबरच स्वतःला लाडके म्हणवणारे त्याचे भक्तही पूजनीय असल्याचा शोध लागतो आणि हे करताना एक दिवस बुद्धीला पूर्ण रजा द्यायला लागते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४७)*



"आपण लहानपणापासूनच आपल्या कुटुंबियांकडून, शिक्षकांकडून, इतर माणसांकडून, कित्येक आचार-विचार आणि बरी-वाईट मूल्य किती नि:शंकपणे चटकन स्वीकारत असतो! इतरांकडून मिळणाऱ्या विचारांची चिकित्सा करण्याची बुद्धी लहान वयात असतेच कुठे? लहानपणी जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि प्रेमासाठी, आपल्याला इतरांवरच अवलंबून राहावं लागतं. पण इतरांवरच्या परावलंबनाची लहानपणची सवय आपण स्वतःत इतकी मुरवून घेतलेली असते, की प्रौढपणी क्षमता असूनही स्वतंत्रपणे विचार करणंही आपल्याला मुश्किल होतं ! इतरांचं म्हणणं आपण डोळे मिटून स्वीकारत राहतो. सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहणं आणि आपला भार आपल्यापेक्षा कुठल्यातरी अधिक सामर्थ्यवान व्यक्ती अथवा शक्तीवर टाळणं, ही आपण अत्यावश्यक गरज समजतो. या शिकवणुकीचं बाळकडू मलाही दिलं गेलंय. पण ते प्राशन करायचं की नाही, याचं स्वातंत्र्य मला निश्चितच आहे. 

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४८)*



"ईश्वराचं अस्तित्व सत्य पुरावा देऊन कुणीही सिद्ध केलेलं नाही असं म्हणणं योग्य असलं, तरी ते भविष्यातही सिद्ध करता येणं अजिबातच शक्य नाही, असं म्हणायला तरी कुठला पुरावा आहे? असा ठाम पुरावा अजूनतरी उपलब्ध नाही. तो तसा उपलब्ध नसताना परमेश्वराचं अस्तित्व कधीच सिद्ध करता येणं शक्य नाही असं म्हणणं, म्हणजे तर्कदुष्ट आणि हेकट भूमिका घेणं आहे. साहजिकच ईश्वराचं अस्तित्व अज्ञात आहे, अशी अज्ञेयवादी भूमिका घेणं तर्कशुद्ध नाही का ? वरकरणी पाहता तसं वाटतं खरं ! पण ईश्वराचं अस्तित्व भविष्यात सिद्ध होण्याची संभाव्यता फार कमी आहे, म्हणजे ०.००००००००१ टक्के आहे, असं म्हटलं तरी चालेल ! म्हणूनच मी अज्ञेयवादाऐवजी सरळ निरीश्वरवादच मान्य करतो.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पान क्रमांक - ४८)*


"मी एक प्रमादशील मनुष्य आहे. प्रमादशील असल्यामुळे माझ्यात परिपूर्णत्व नाही. तरीदेखील मला लाभलेल्या बुद्धीसामर्थ्याचा उपयोग करून, मी जमेल तेव्हा स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करेन. मला हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी, ईश्वरी कृपेची भिक्षा न मागता माझ्या सामर्थ्यावर मदार ठेवून पुढची वाटचाल करेन.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ४९)*


"पौगंडावस्थेतल्या शारीरिक आणि मानसिक बदलांचा परिचय करून देणारा विल्यम बायर, या तज्ज्ञाने लिहिलेला ग्रंथ हातात पडला. मानसिक घडामोडींचं एक अद्भुत विश्व त्या ग्रंथातून प्रकट झालं. त्यात लिहिलं होतं, 'जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याचा विलास हा अखंड चालूच असतो. शारीरिक विकास हा जन्मापासूनच होत असतो. पण पौगंडावस्थेपासून त्याला गती मिळते आणि तारुण्यावस्थेपर्यंत तो पूर्ण होतो. शारीरिक बदल हे आपण डोळ्यांनी पाहू शकतो. पण मानसिक बदलांचा अंदाज वर्तनावरूनच करावा लागतो. कारण ते डोळ्यांना दिसत नाहीत. पौगंडावस्थेत प्रत्यक्ष शारीरिक बदल होताना दिसले, तरी मानसिक बदलांना तीव्र त्या आधीपासूनच सुरुवात झालेली असते. हे मानसिक बदल तीव्र स्वरूपाचे असतात. यांतला सर्वात मोठा मानसिक बदल म्हणजे, या वयापासून मुलामुलींना एकमेकांचं पराकोटीचं आकर्षण वाटायला सुरुवात होते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ५६)*


"पौगंडावस्थेतला ठळक मानसिक बदल म्हणजे मनात रंगवली जाणारी कल्पनाचित्र. कल्पनाचित्र रंगवण्याची प्रक्रिया पौगंडावस्थेच्या आधीपासून सुरु झाली असली, तरी त्यांची तीव्रता आणि गती पौगंडावस्थेपासूनच वाढते. आवडत्या मुली किंवा मुलाबरोबरच्या प्रणयक्रीडा, साहसपूर्ण प्रसंग, आपला सर्वत्र गौरव होत आहे असा प्रसंग, आपण इतरांना संकटातून वाचवलं आहे असा प्रसंग असे या वयातील कल्पनाचित्रांचे वेगवेगळे विषय असतात.

या वयात 'स्व'ला सभोवतालच्या समाजात भक्कम स्थान मिळवून देण्यासाठी मुलंमुली धडपडत असतात. त्यामुळे त्यांच्यात स्वतः कुणीतरी विशेष आहोत, हे दाखवण्याची प्रबळ उर्मी असते. ही ऊर्जा त्यांना प्रत्यक्षपणे व्यक्त करता येत नसली, तरी कल्पनाचित्रांच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते. या वयात त्यांचा 'स्व' इतका प्रबळ असतो, की एकदाच कल्पनाचित्रं पाहून 'स्व' ची पूर्ती होत नाही, तर या कल्पनाचित्रांचा एक चित्रपटच मूल मनातल्या मनात पाहत असतं.

या वैविध्यपूर्ण कल्पनाचित्रांचा मूलस्रोत म्हणजे परस्परांबद्दल वाटणारं आकर्षण ! पौगंडावस्थेतल्या प्रत्येक मुलामुलीला आपली कल्पनाचित्रं ही अत्यंत खाजगी आणि गुप्त आहेत असं वाटत असतं, पण त्यांची खुमारी अशी असते, की प्रत्येकाच्याच मनात ती सार्वत्रिकपणे संचार करत असतात.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ५७)*



"ज्याची परिणती सामान्यतः कामेच्छेच्या परिपूर्तीत होते, अशा तऱ्हेने केलेलं स्वतःच्या जननेंद्रियांचं उद्दीपन म्हणजे हस्तमैथुन ! हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून आलेला आहे. स्वतःच्या जननेंद्रियाचं उद्दीपन करताना मुख्यतः हाताचाच वापर केला जात असल्याने, यास हस्तमैथुन अस म्हटलं जातं. पण हाताव्यतिरिक्त इतर अनेक साधनांचा वापर करूनही स्वतःच्या जननेंद्रियाचं उद्दीपन करता येतं. हस्तमैथुनाला ऑटोइरॉटीसिझम असंही म्हटलं जातं. याचा अर्थ 'स्व-उद्दीपन'. या कृतीत अयोग्य काहीच नाही. 

९० टक्क्यांपेक्षा जास्त स्त्री-पुरुष हस्तमैथुनाद्वारे आपली कामवासना शमवतात. पण ते खाजगी आणि गुप्त समजलं जात असल्यामुळे त्याबाबतची माहिती प्रकाशात येणं अवघड जातं. प्राण्यांच्याही अनेक जातींत नर आणि मादी हस्तमैथुन करताना आढळून येतात. शरीरामध्ये जी काही सुखोत्तेजक क्षेत्रं आहेत त्यातलं एक आहे - जननेंद्रिय ! त्याला स्पर्श करून सुख मिळवणं हे नैसर्गिक आहे. त्यामुळे अगदी लहान वयातलं मूलही - अगदी अर्भकही - स्वतःच्या जननेंद्रियांना स्पर्श करताना दिसून येतं. पण त्यावेळी वीर्य तयार झालेलं नसल्यामुळे वीर्यस्खलन होत नाही. 

पौगंडावस्थेपासून लैंगिक संप्रेरकं शरीरात स्रावायला लागतात. प्रबळ कामेच्छा झाली, की वीर्यस्खलनाद्वारे ते शरीराच्या बाहेर पडतं. हस्तमैथुनाद्वारे शरीराची कुठल्याही प्रकारची हानी होत नाही.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ६०)*


"वीर्यनिर्मिती ही शरीरात चालणारी अखंड प्रक्रिया आहे. जोपर्यंत लैंगिक संप्रेरकांचं काम शरीरात चालू आहे, तोपर्यंत वीर्यनिर्मिती होतच राहणार ! वीर्यस्खलन झाल्याने ही प्रक्रिया थांबत नाही. ज्याप्रमाणे वीर्यनिर्मिती करणं हे लैंगिक संप्रेरकांचं काम आहे;  त्याचप्रमाणे साठवलेलं वीर्य अधूनमधून शरीराच्या बाहे टाकणं हेही त्यांचंच काम आहे. ज्याप्रमाणे शरीर वीर्यनिर्मिती करत असतं, त्याचप्रमाणे वीर्यस्खलनाला आवश्यक असणारी कामेच्छा मन तयार करत असतं. थोडक्यात, वीर्यस्खलनासाठी शरीर आणि मन या दोहोंची साथ असावी लागते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ६१)*


"हस्तमैथुन हे पाप आहे किंवा अनैतिक आहे, ही भावना अनेकांच्या मनात खोल ठाण मांडून बसलेली असते. ती केवळ हस्तमैथुनापुरतीच मर्यादित रहात नाही, तर मनात कामेच्छा बाळगणं हेच मुळी अनैतिक आहे; असं व्यापक स्वरूप ती धारण करते. कामेच्छा ही नैसर्गिक मानसिक प्रेरणाच आहे. मग ह्या नैसर्गिक प्रेरणेमुळे अपराधी अपराधी का वाटून घ्यायचं ?

मी जर नीतीचा भंग करत असेन तर माझं कृत्य अनैतिक आहे, असं निश्चितच म्हणू शकेन. मुळात नीती म्हणजे काय ? तत्वज्ञानाच्या अनेक ग्रंथांतून मला नीतीची व्याख्या कळलेली होती. ती अशी - समाजात सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावी अशी तत्व म्हणजे नीती !

म्हणजेच नीतीचा संबंध हा सामाजिक वर्तनाशी आहे. एकट्या मनुष्याच्या वर्तनाशी नाही. हस्तमैथुन हे एकट्याने स्वतःशीच केलं जात असल्यामुळे या कृतीला सामाजिक कृती म्हणताच येत नाही. त्यामुळे हस्तमैथुन करून मी कुठल्याही नीतीचा भंग करत नव्हतो.

समजा एक बेटावर एक मनुष्य एकटाच असेल, तर तो जे वर्तन करत असेल ते नैतिकही असणार नाही किंवा अनैतिकही असणार नाही. कारण जोपर्यंत दुसऱ्या माणसाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध त्याच्या वर्तनाशी येत नाही, तोपर्यंत त्याचं वर्तन नैतिक अथवा अनैतिक ठरवता येणार नाही. 

हस्तमैथुन करणारा मनुष्य दुसऱ्याचं कुठलंही नुकसान करत नसल्यामुळे त्याच्या या कृत्यात नीतीचा प्रश्न उद्भवत नाही. अर्थात असा मनुष्य कदाचित स्वतःचं नुकसान करून घेऊ शकेल ! म्हणजे जर तो हस्तमैथुनाचा अतिरेक करत असेल, तर त्याचं ते वर्तन आत्मघातकी होऊ शकेल. पण तरीही ते अनैतिक आहे, असं म्हणायला काहीही आधार नाही."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ६१)*


"लैंगिक भावना म्हणजे लैंगिक कृती नव्हेत ! भावना जाणवणं आणि कृती करणं यात फरक आहे. वयाने ज्येष्ठ आणि नात्याने पूज्य असलेल्या स्त्रियांबाबत जेव्हा मनात कामुक विचार येतात, तेव्हा ते केवळ मनातच असतात. मी जर त्यांच्याशी प्रत्यक्षात असभ्य वर्तन करत नसेन आणि माझे विचार केवळ मनापुरतेच मर्यादित असतील, तसंच त्यामुळे इतरांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नसेल; तर मी सुद्धा ते विचार मनात आणल्याबद्दल स्वतःला अपराधी किंवा अनैतिक का समजावं ? ते विचार नाकारणंकिंवा मला तसं वाटतंच नाही, असं खोटं खोटं म्हणणं किंवा ते दाबून टाकणं, ही मला स्वतःशी प्रतारणा वाटायला लागली. मनात आलेल्या सर्व चांगल्या- वाईट, कामुक विचारांचा मुक्तपणे स्वीकार करायचा, असं मी ठरवलं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ६२)*


"हस्तमैथुनाने तोटे तर होत नाहीतच, पण उलट फायदेच होतात. पहिला फायदा म्हणजे अर्थातच कामवासनेचं शमन होतं. पण दुसरा फायदा म्हणजे दैनंदिन जीवनातले ताणतणाव हस्तमैथुनामुळे नष्ट होतात. पण हे दोन्ही फायदे पदरात पाडून घ्यायचे असतील, तर हस्तमैथुन करताना अपराधी भावनेला अर्धचंद्र देणं मात्र शिकून घेतलं पाहिजे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ६३)*


"मनातल्या प्रबळ भावनांचा उत्फुर्तपणे खळखळणारा प्रवाह म्हणजे काव्य; शांत चित्ताने केलेल्या भावनांच्या संस्मरणातून काव्याचा जन्म होतो ! प्रत्येक साहित्यकृतीला जीवनाबद्दल काहीतरी सांगायचं असतं, फक्त ते सांगणं समजून घ्यायला लागतं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ६८)*


"उच्च क्षमता आपल्यात असणं म्हणजे काय ? तर एखादी विशिष्ट गोष्ट आपण इतरांपेक्षा जास्त चांगली करू शकण्याची नैसर्गिक देणगी आपल्याला प्राप्त होणं ! पण आपल्यात एखादी क्षमता उपजत असली, तर याचा अर्थ ती आपोआपच प्रगटत नाही, तर मेहनतीचे, श्रमाचे संस्कार तिच्यावर करावे लागतात. त्या क्षमतेचा वापर करण्याची कला स्वतःत मुरवून घ्यावी लागते. त्यासाठी साधना करावी लागते. मेहनत करावी लागते. तेव्हाच तिचा जास्तीत जास्त वापर मनुष्य करू शकतो. नाहीतर उच्च क्षमता असूनही तिचा वापर करत नसलेला मनुष्य तिथेच राहतो. गंजून जातो. ती क्षमता असूनही वाया घालवतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ६८)*


"कोणत्याही कामाच्या बाबतीत चालढकल केली, तर कटकटींमधून तात्पुरती सुटका होते. पण त्यामुळे दूरवरच्या हितावर पाणी पडतं. म्हणूनच नजीकच्या आनंदापेक्षा दूरवरच्या हिताचा विचार करणं अधिक श्रेयस्कर आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ७१)*


"स्वतःचं वर्तन अयोग्य आहे असं समजण्यात आणि मी अपराधी आहे असं समजण्यात फरक आहे.

आपलं वर्तन अयोग्य आहे असं आपल्याला वाटलं तर घडलेल्या कृत्याची जबाबदारी आपण मान्य करतो आणि तसं कृत्य परत हातून न घडण्यासाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. ते सुधारण्याच्या दृष्टीने निश्चित पावलं टाकतो.

पण जेव्हा आपण स्वतःला अपराधी मानतो, तेव्हा माझं वर्तन चुकीचं आहे एवढंच म्हणून थांबत नाही; तर संपूर्ण स्वतःचाच धिक्कार करतो. स्वतःची निंदा करतो. 'संपूर्ण व्यक्तिमत्वावरच' ठपका ठेवून स्वतःला माणूस म्हणून नगण्य समजतो आणि असा निष्कर्ष काढतो, की भविष्यकाळातही मी अशाच प्रकारे वागत राहीन. मग आपण वर्तन सुधारण्याचाही प्रयत्न करू शकत नाही."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ७४)*


"प्रत्येक मनुष्यात कुठलातरी गुण कमी प्रमाणात असतोच ! पण जेव्हा मनुष्य एखादा गुण कमी आहे म्हणून मी सगळ्याच बाबतीत नगण्य आहे, असं संपूर्णत्वाचं मापन करतो; तेव्हा त्याच्यात न्यूनगंड तयार होतो. कारण नगण्य असा मारलेला शेरा, स्वतःचा बिनशर्तपणे स्वीकार करण्यात त्याला अडथळा आणतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ७७)*


"समजा एका फळांच्या करंडीत अनेक फळं ठेवलेली आहेत. त्यातील काही फळं पिकलेली आहेत, काही रसाळ आहेत, काही कच्ची आहेत, काही किडकी आहेत. मग करंडीमध्ये नक्की कशा प्रकारची फळं आहेत, हे एका शिक्क्याद्वारे ठरवू शकू का ? अशक्य आहे ! कारण त्या फळांमध्ये एवढं वैविध्य आहे, की एकच विशेषण त्या सर्व फळांना कसं लावता येईल ? 

मनुष्याचं व्यक्तिमत्व त्या फळांच्या करंडीसारखं आहे. नानाविध स्वभाववैशिष्टयांनी भरलेल्या मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला चांगला-वाईट, उच्च-नगण्य अशा तऱ्हेचं एकच विशेषण देणं कठीण आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ७७)*


"लग्न न झालेल्या माझ्यासारख्या कॉलेजवयीन मुलांची वास्तविक पंचाईत होते. लग्न होईपर्यंत प्रत्यक्ष लैंगिक वर्तन करायला रुढीप्रिय समाजाची संमती नसते. कामभावना तर पौगंडावस्थेपासूनच जागृत झालेली असते. लग्न होईपर्यंतच्या दीर्घ कालावधीत ती शमवायची कशी याबाबत मात्र कुठल्याच परंपरेत उत्तर नसतं. उलट स्वतःची वासना दडपून टाकून लग्न होईपर्यंत ब्रह्मचार्याचा पुरस्कार करावा याबाबतचचं दडपणच जास्त तीव्र असतं, पण ब्रम्हचर्य पाळून शरीराची आणि मनाची हानी विनाकारण का करून घ्यायची किंवा पौगंडावस्थेपासून तीव्र लैंगिक भावना निसर्ग आपल्यात का जागृत करतो यांपैकी एकाही प्रश्नाचं तर्कशुद्ध उत्तर कुठल्याच धर्मग्रंथात लिहिलेलं नसतं. मग लैंगिकदृष्ट्या परिपक्व असलेल्या माझ्यासारख्या मुलांनी लैंगिक उर्मी शमवण्यासाठी मार्ग तरी कुठला शोधायचा ?"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ९१)*


"कुठलीही समस्या उभी ठाकली, की सर्वप्रथम आपण समस्येबाबत स्वतःला अस्वस्थ करून घेतो. मग आपण असं अस्वस्थ होताच कामा नये, असं स्वतःला सांगून आपल्या अस्वस्थतेत आणखी भर घालतो. त्यामुळे आपली मूळ समस्या अस्वस्थतेच्या विळख्यात अडकून पडते. 
याला मी नाव दिलं, 'डिस्टर्बन्स अबाऊट डिस्टर्बन्स' 
समस्येवर उपाय करायचा असेल, तर प्रथम तिला अस्वस्थतेच्या विळख्यातून मुक्त केलं पाहिजे.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ८३)*


"कामतृप्तीसाठी चोरटे शरीरसंबंध ठेवण्यापेक्षा हस्तमैथुनातून आनंद कसा घ्यावा याबाबतचं मार्गदर्शन मुलांना करणं, हे मी सभ्यतेचंच लक्षण समजतो. उगाच आडपडद्याने खोटं-नाटं मी लिहीत नाही. जे काही वास्तव आहे, त्याला थेट भिडण्याचा माझा स्वभाव आहे. स्त्री दिसल्यानंतर खऱ्या भावना लपवून उगाचच गुळमुळीतपणे, ती मला बहिणीसारखी वाटते, पवित्र वाटते, असं कृत्रिम, वरपांगी, खोटं लिहायला मला आवडत नाही. स्त्रीकडे मी कामुक दृष्टीने बघतो आणि थेट खरं लिहतो. कारण मी स्वतःशी प्रामाणिक आहे. कुठलेही अडसर न ठेवता स्वतःच्या लैंगिकतेचा स्वीकार मी मुक्तपणे केलाय. असा स्वीकार करणं ही फार अवघड गोष्ट आहे.
*जोपर्यंत लैंगिक गोष्टींचा संबंध पापाशी लावला जातोय तोपर्यंत त्यांना समाजमान्यता मिळणं कठीण आहे.*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ९२)*


"कामवासना नैसर्गिक आहे. ती ओळखली नाहीत किंवा दडपून टाकली तर त्यामुळे जास्त मानसिक हानी होईल. कामतृप्तीचे योग्य मार्ग शोधण्यावर भर द्या. कामवासनेची तृप्ती करण्यासाठी आपल्यासारख्या अविवाहित कॉलेजवयीन मुलांसमोर फक्त दोनच पर्याय शिल्लक राहतात. हस्तमैथुन करणं किंवा चोरटे शरीरसंबंध ठेवणं. चोरट्या शरीरसंबंधात धोका तर आहेच, शिवाय रोगराई होण्याचीही भीती आहे. 

त्यापेक्षा हस्तमैथुनाचा पर्याय हा जास्त श्रेयस्कर आहे. कुणालाही त्रास न देता किंवा अन्य व्यक्तीशी संबंध न येता हस्तमैथुनाद्वारे कामतृप्तीचा आनंद आपण स्वतःच स्वतःचा घेऊ शकतो. किंबहुना प्रत्यक्ष लैंगिक वर्तन करेपर्यंत, कामभावना शमवण्याचा तोच एक उत्तम मार्ग आहे. समाजाची संमती असो व नसो, प्रत्येकजण हस्तमैथुन करतच असतो. पण समाजाचं दडपण इतकं प्रचंड असतं, की ते करताना आपण पाप करत आहोत असं वाटून घेत असतो. लैंगिक वर्तनाचं उद्दिष्ट आनंद मिळवणं आहे. अपराधी भावना मनात असेल, तर ती या आनंदाला बाधक ठरते. 

हस्तमैथुनातला आनंद घ्यायचा असेल, तर अपराधी भावनेचं ओझं झुगारून द्या. हस्तमैथुनाचा आनंद मुक्तपणे घ्या."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ९२)*

"अश्लील मानल्या जाणाऱ्या लैंगिक गोष्टी जर लपवाछपवी न करता समाजात मोकळेपणाने मांडल्या गेल्या तर जेवढं नुकसान होऊ शकतं, त्यापेक्षाही कितीतरी अधिक नुकसान त्यांच्याभोवती गुढतेचं वलय निर्माण केल्यामुळे होत असतं. कारण कुठल्याही गोष्टीसंबंधी गुढतेचं वलय जेव्हा निर्माण केलं जातं, तेव्हा त्यासंबंधीची उत्सुकता आणि आकर्षण अजूनच वाढीला लागतं. याला पुरावा असा आहे, की कितीही सोज्ज्वळपणाचा आव आणला आणि कितीही कडक कायदा असला, तरी अगदी सुसंस्कृत घराण्यातलेही जवळजवळ सर्वच स्त्री-पुरुष तारुण्यात कधी ना कधी तरी अश्लील चित्रं पाहण्यात, अश्लील गप्पा-विनोद करण्यात, आनंद मानतातच ! पण त्यांच्या मनातले लैंगिकतेबाबतचे सामाजिक निर्बंध एवढे तीव्र असतात की, हे उघडपणे कबूल करण्याचं धारिष्ट्य त्यांच्यामध्ये नसतं.

हे निर्बंध आपण जोपर्यंत दूर करणार नाही, तोपर्यंत स्वतंत्र बुद्धीने विचारही करू शकणार नाही. स्वतःच्या लैंगिकतेचा मुक्तपणे स्वीकार केल्यावर कळेल, की या शब्दांत लाजिरवाणं काहीच नाही ! शब्द हे तटस्थ असतात. हा लाजिरवाणेपणा आहे, तो मनात ! तो झुगारून दिला, की दिसेल सभ्यपणाच्या मुखवट्यामागचं आपलं खरं रूप ! आपण जसे आहोत, तसे नाही हे दाखवण्याची आत्यंतिक धडपड ! त्यामुळं स्वतःच्या नैसर्गिक प्रवृत्तींशी इमान ठेवण्याचा केवढा मोठा आनंद आपण गमावतोय, तेही समजेल !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १०५)*


"पूर्वीच्या काळात जेव्हा स्त्रियांनी अंगभर कपडे परिधान करण्याचा प्रघात होता, तेव्हा स्त्रियांचा नुसता घोटा दृष्टीला पडला, तरी पुरुषांच्या वासना चाळवल्या जायच्या. आताच्या काळात कमी कपडे परिधान करण्याचा प्रघात असताना, स्त्रियांच्या मांड्या बघितल्या, तरी पुरुषांना काही वाटेनासं झालंय. उद्या काहीच कपडे न करण्याची फॅशन निघाली, तर अनावृत्त स्त्रीला पाहूनही वासना चाळवल्या जाणार नाहीत.

यातून वस्तुनिष्ठ निष्कर्ष निघतो, की लोकांची अश्लीलतेची आवड फारच कमी प्रमाणात जीवशास्त्रीय असते. ती बहुतांशी निर्माण होते ती, लैंगिकतेबाबतच्या जोपासलेल्या दृष्टिकोनातून !

ती जर पूर्णपणे जीवशास्त्रीय असती, तर स्त्रियांचे नेमके कुठले अवयव पाहून पुरुषांच्या भावना चाळवल्या जाव्यात, हे समाजातल्या बदलत्या फॅशनवर अवलंबून राहिलं नसतं! अश्लीलतेची ही आवड एका विशिष्ठ संस्कृतीत किंवा समाजातही एकसंधपणे आढळून येत नाही; तर एकाच समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींमध्येही अनेक भेद असतात. एका व्यक्तीला जे श्लील वाटतं, ते दुसऱ्या व्यक्तीला अश्लील वाटू शकतं किंवा एका व्यक्तीच्या वासना ज्या गोष्टीमुळे चाळवल्या जातील, नेमक्या त्याच गोष्टीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या वासना चाळवल्या जातीलच, असं नव्हे ! याचं कारण असं आहे, की प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा भिन्न असतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १०६)*


"तुमचं मन आणि विचार जरा खुले करून पहा. अपराधीपणाचा हा सल आपल्या मनात का असतो याचा शोध घेतलात, तर आढळून येईल, की तथाकथित धर्ममार्तंडांनी आणि नीतिवाद्यांनी आपल्या मनात लैंगिकतेबद्दलचा एक दृष्टिकोन पद्धतशीरपणे रुजवलाय. तो म्हणजे- कामवासनेत आणि स्त्री-पुरुषांच्या शारीरिक संबंधातच अपवित्रता आहे! पाप आहे! विवाहाचे काही मंत्रतंत्र झाले असतील तर मात्र हे पाप धुवून निघतं. समाजावरचा स्वतःचा पगडा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांचं मानसिक दास्यत्व पत्करण्यासाठी, या धर्ममार्तंडांनी उचललेली ही पावलं आहेत !

पण हे जसं खरं आहे तसंच हेही खरं आहे, की या दृष्टिकोनाचा कितीही भडिसार झाला तरीही तो स्वीकारायचा का नाही, याचं स्वातंत्र्य आपल्याला निश्चितच आहे. मानसिक दास्यत्व लादण्याचा प्रयत्न केला, तरी तो झुगारण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला आहे. हे झुगारून देऊन उघड्या डोळ्यांनी पाहिलंत तर दिसेल, की या दृष्टिकोनाला काडीइतकाही आधार नाही. 

आधार नसलेल्या गोष्टी छातीशी कवटाळून बसून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. लैंगिकतेबाबतची स्वतःची मतं ठरवा. कुणी सांगितलंय, लिहिलंय, मनावर बिंबवलंय, म्हणून स्वीकारू नका ! मनापासून पटलेल्या गोष्टी अंमलात आणा ! लैंगिक स्वातंत्र्य पूर्णपणे उपभोगा ! यालाच मी 'स्वेच्छाचार' असं संबोधतो.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १०८)*


"मला प्रामाणिकपणे वाटतं, की सनातन्यांचं विरक्तीचं बुरसटलेलं तत्वज्ञान आणि आधुनिकांचं अनिर्बंध तत्वज्ञान यांत फारसा काही फरक नाही. नितीचं स्तोम माजवणाऱ्या सनातन्यांनी कामप्रेरणेचं दमन करण्याची शिकवण देऊन समाजाचं जेवढं नुकसान केलेलं आहे, तेवढंच नुकसान नीतीचे सर्व बंध झुगारून देऊ पाहणारे आणि स्वतःला आधुनिकतेचे आणि लैंगिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणवणारे करत आहेत ! समागमाची ओझरती जरी इच्छा झाली, तरी मागचा पुढचा कसलाही विचार न करता ती ताबडतोब पुरी करायला काहीच हरकत नाही किंवा त्या इच्छेला नीतिनियमांचं बंधन घालायचं कारण नाही, असं समजणं योग्य नव्हे. कारण कोणत्याही सामाजिक वर्तनाचा विचार संपूर्णतः नीतिनिरपेक्ष असून चालत नाही."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १०९)*


"नीतीचे नियम कामजीवनाला लागू केले, तर विवाहपूर्व लैंगिक संबंधही मला अनैतिक वाटत नाहीत. विवाहापूर्वी स्त्री-पुरुषांची एकमेकांवर नुसती प्रीतीच असेल, तर वैवाहिक आयुष्य सुखाचं होईल याची हमी देता येत नाही. लैंगिक अनुरूपतेचा प्रत्यय दोघांनाही घ्यायला हवा. बरेच लोक अशा संबंधांना अनैतिक समजतात.

पण एखादा मनुष्य स्वतःच्या कामजीवनात नीतिनियमांचं पालन कसोटीने करत असेल, तर परस्परसंमतीने व स्वखुशीने पत्करलेले विवाहपूर्व लैंगिक संबंध 'नैतिक' शब्दाच्या कोणत्याही रास्त अर्थाने अनैतिक ठरत नाहीत. त्याने कुठले नीतिनियम पाळावेत, हेही मी ग्रंथात लिहिलं आहे.

सर्वात प्रथम, तो मनुष्य व प्रणयक्रीडेतली त्याची जोडीदार प्रौढ, सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असणं आवश्यक आहे. तिच्याबरोबर त्याने खोटं बोलता काम नये. तिच्यावर गर्भधारणेचं किंवा गुप्तरोगाचं संकट मुद्दाम लादता कामा नये. तसंच स्वतःची वासना भागवण्यासाठी तिच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा त्याला अपाय करता कामा नये. हे नीतिनियम पाळणारा मनुष्य अनैतिक वर्तन करत नाही, असं माझं मत आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १०९)*


"लैंगिक स्वातंत्र्याचा उपभोग घ्या असं मांडताना कुठले नीतिनियम पाळावेत, याचाही उहापोह मी माझ्या ग्रंथात केलाय. स्त्री-पुरुष लैंगिक संबंधातली खरी नैतिक जाणीव म्हणजे परस्परांच्या शरीराबद्दल आदर वाटणं ! तसंच जोडीदाराची इच्छा नसेल, तर तिच्या किंवा त्याच्या देहाला स्पर्श न करण्याचं भान ठेवणं! अर्थात स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि ज्यामुळे आपल्या जोडीदाराला अपाय होईल असं वर्तन मुद्दाम न करणं, या सामाजिक नीतिनियमांचाही कामजीवनात उपयोग करणं आवश्यक आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १०९)*


"विवाहपूर्व लैंगिक संबंध ज्या वर्गात मोडतात, त्याच वर्गात व्यभिचार किंवा विवाहबाह्य लैंगिक संबंध मोडतात काय ? व्यभिचारात निदान एक व्यक्ती अशी असते, की ती कायदेशीरपणे दुसऱ्याशी विवाहबद्ध असते. आपल्या समाजात विवाह सामान्यतः एकपत्नीव्रतानुसार असतो. विवाहाच्या करारानुसार विवाहित व्यक्ती, एकमेकांच्या अपरोक्ष लैंगिकबाबतीत बेईमानी न करण्याबाबत वचनबद्ध असतात. व्यभिचारी माणूस स्वतःच्या जोडीदाराला फसवत असल्यामुळे त्याच्या विश्वासाचा भंग करत असतो. जर त्याच्या जोडीदाराची त्याच्या व्यभिचाराला संमती असेल, तर मग ती वेगळी गोष्ट झाली ! पण बहुतेक वेळा वस्तुस्थिती अशी नसते. व्यभिचार हा बहुधा जोडीदाराच्या नकळत दुटप्पीपणे केला जातो. असं असेल तर व्यभिचार हा, विवाहातल्या उघड आणि गर्भित कराराबाबत निश्चित पणे अनैतिक असतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक -११०)*



"मनुष्य दुःखी होतो, कारण कळत-नकळत तो स्वतःच्या इच्छांचं रूपांतर अनिवार्य गरजांमध्ये करतो. एखाद्या गोष्टींची गरज किंवा अपेक्षा असणं, हे समाधानाचं कारण होऊ शकतं; पण ते बहुदा तीव्र मानसिक दुःखाचं कारण होऊ शकतं. अनिवार्य गरज पूर्ण झाली नाही, तर फारच भयंकर होईल असं वाटून माणूस स्वतःला आत्यंतिक त्रास करून घेतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ११७)*


"काही विचारवंत आणि तत्ववेत्ते सांगतात की, मानसिक दुःखाचं मूळ कारण इच्छा, आकांक्षा, वासना आहे. त्या नाहीशा केल्या तर ते दूर होऊ शकतं. इच्छा, आकांक्षा, वासना यांतून सोडवणूक करणं, म्हणजे दुःखाबरोबरच सर्व सुखाचाही त्याग करण्यासारखं नाही का ? कुठलीच इच्छा, आकांक्षा, वासना नसलेला मनुष्य हा मनुष्य नसेल, तर माणूसपण हरवलेला तो एक थंड गोळा असेल ! 

मानसिक दुःखाचं कारण हे इच्छा, आकांक्षा, वासना नाही. या सर्व मनात ठेवून किंवा त्यांची पूर्तता वारंवार न होऊनही माणूस आनंदाने जगू शकतो. फक्त या इच्छा, आकांक्षा, वासना जीवनात अत्यावश्यक किंवा अनिवार्य आहेत, असं वाटू न घेण्याची काळजी त्याने घेतली पाहिजे. एखादी गोष्ट मला हवीच आहे, या 'च' च्या विळख्यातून जर आपण सुटका करून घेतली, तर जीवनातल्या सुखप्राप्तीचा राजमार्ग मोकळा झाला आहे, असं मानायला हरकत नाही."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - ११७)*


"एखादी गोष्ट आधीच घडलेली असताना ती तशी घडताच कामा नये, असं म्हणण्यात कितपत शहाणपण आहे ? समजा मी असं म्हणून स्वतःला त्रास करून घेतला, की मी आता २४ वर्षांचा आहे; पण मी २० वर्षांचाच असायला हवा होतो, तर माझं म्हणणं वेडगळपणाचं ठरेल ! कारण मी २४ वर्षांचा असणं ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारणं हा वेडेपणा आहे ! त्याचप्रमाणे एखाद्या माणसाचं बोलणं होऊन गेल्यानंतर त्याने असं बोलायलाच नको होतं, असं म्हणणं हाही वेडेपणाच आहे !

एखाद्या माणसाचं बोलणं मनाला लागलं असं म्हणणं म्हणजेच तो माणूस जे बोलेल, ते खरं मानणं होय ! जर त्या माणसाच्या बोलण्याला वस्तुस्थितीचा आधार असेल तरंच ते खरं मानावं ! जर असा आधार नसेल, तर ते खरं मानण्याची गरज नाही. मग ते मनाला लागण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १२२)*


"आपलं आयुष्य हे एका व्यक्तीपुरतं किंवा एखाद्या घटनेपुरतं मर्यादित ठेवण्याएवढं छोटं नसतं ! ते खूप मोठं असतं ! आपणच ते मोठं करायचं असतं !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १३०)*


"अतीव दुःखाचा प्रहार डोक्यावर झाला, तरी तो सोसला पाहिजे. काही प्रसंग असे असतात, की नुसतं सोसणंच नशिबी असतं ! असं असलं तरीही त्या सोसण्यातही स्वातंत्र्य असतं. ते हे, की वाट्याला आलेलं दुःख आत्मनाश करत सोसायचं, का दुःख गिळून आपल्या मार्गाने पुढे जात सोसायचं !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १३१)*

"आपण जेव्हा इतरांबद्दल संतापतो आणि त्रागा करतो, तेव्हा नकळत त्यांचाच विचार परत परत करत राहतो. त्यांच्याबद्दल स्वतःशी परत परत बोलत राहतो. त्यांच्याबद्दल संताप आणि द्वेष मनात परत परत घोळवत ठेवतो. त्याचा परत परत उच्चार करत राहतो. याचा परिणाम असा होतो; की ज्या वैशिष्ठयांचा आपल्याला राग येत असतो, नेमकी तीच वैशिष्ट्य आपण आपल्या साऱ्या व्यक्तित्वात खोलवर रुजवतो. ज्यांच्याबद्दल आपल्या मनात संताप धुमसत असतो, त्यांच्यावर आपल्या संतापाचा काहीच परिणाम होत नसतो. किंबहुना आपला संताप त्यांच्या खिजगणतीही नसतो ! त्यामुळे आपण त्यांच्यावर अधिकच संतापतो. शेवटी आतल्या आत संतापाने जळत राहून, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य मात्र हरवून बसतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १३५)*

*नो गेन विदाऊट पेन*
काही मिळवायचं असेल तर श्रमाला पर्याय नाही. या क्षणी परिश्रम नकोसे वाटत असले, तरी दूरवरच्या हितासाठी अटळ आहेत. ते कुठल्या ना कुठल्या रुपात भविष्यात मधुर फळं देतील.
*ऍडव्हर्सिटी इज ए ब्लेसिंग इन डिसगाईज*
प्रतिकूल परिस्थिती हे आपल्याला मिळालेलं छुपं वरदान असतं. प्रतिकूल परिस्थिती वरकरणी जरी कितीही कठीण वाटली, तरी ती कणखर बनण्याचं प्रशिक्षण देते. टणक बनवते. तिला तोंड देऊन आपला विकास होतो. मानसिक प्रगती होते.
*धिस टू विल पास*
हेही दिवस जातील. आताच्या परिस्थितीत कष्ट सोसावे लागले, तरी कोणतीच परिस्थिती आहे तशीच राहत नसते. तिच्यात बदल होत असतो. असं होणं निसर्गनियमाला धरूनच आहे.

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १३६)*

""चिनी तत्ववेत्ता कन्फ्युशियस याने २००० वर्षांपूर्वीच एक संदेश दिला होता. तो मी वहीत लिहून ठेवला होता. रोज सकाळी कामावर जाताना तो वाचून जायचो. तो संदेश होता -

सर्व गोष्टी झटपट होण्याची इच्छा बाळगू नका.
केवळ नजीकच्या फायद्यांकडे लक्ष देऊ नका.
कारण सर्व गोष्टी झटपट होण्याची इच्छा धरलीत,
तर त्या बिनचूक करण्यापासून वंचित राहाल.
आणि केवळ नजीकच्या फायद्यांवर लक्ष केंद्रित केलंत,
तर हातून घडणाऱ्या थोर कार्याला मुकाल."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १३७)*

"विवाहाअंतर्गत लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ परस्परांमधल्या लैंगिक क्रीडांचं स्वातंत्र्य नव्हे तर लैंगिक संबंधासाठी कुठलाही जोडीदार निवडण्याचा हक्क असणं. विवाहाचं छप्पर एकदा डोक्यावर आलं, की एकदा निवडलेल्या जोडीदाराबरोबर आवडो न आवडो, पण आयुष्यभर स्वतःला असं करकचून आवळून बांधणं आणि त्या बांधण्यातून झालेली घुसमट सहन करत उभं आयुष्य काढणं मला पसंद नव्हतं. विवाहाबाबतची माझी संकल्पना प्रचलित समजुतीला धक्का देणारी असली, तरीही मला प्रामाणिकपणे पटली होती. पती-पत्नींमधील लैंगिक एकनिष्ठता ही विवाह टिकण्यासाठी आवश्यक अट समजली जाता कामा नये. जोडीदारांनी एकमेकांना आनंद देण्यासाठी विवाह करावा. पण हा आनंद त्यांनी केवळ एकमेकांपासूनच घेतला पाहिजे, ही सक्ती मला अनाठायी वाटत होती."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४२)*

"कुठलंही नातं जेव्हा स्वखुशीचं असतं, तेव्हा त्या नातेसंबंधात सहजता, उत्स्फूर्तता आणि नैसर्गिकता असते. ज्या वेळी त्या नात्यात कुठल्याही प्रकारच्या सक्तीचा समावेश होतो, त्या वेळी मात्र नातेसंबंधातली सहजता हरवून जाते. उरतो तो थंड व्यवहार ! ज्या संबंधात सक्ती केली जाते, तिथं ते होत जाणं अपरिहार्य असतं. एकच व्यक्ती, अगदी ती जीवनाची जोडीदार असली, तरी आपल्या सर्व गरजा तिने सर्वसदाकाळ पुरवल्याच पाहिजेत, ही अपेक्षा समंजसपणाची नाही."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४२)*

"मानवी मनाची जी जडणघडण आहे, त्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींबद्दल कामभावना वाटणं, हि एक अटळ अशी शक्यता आहे. जर हे वास्तव आहे तसं स्वीकारलं, तर विवाहसंस्था ही स्त्री-पुरुषांसाठी जास्तीत जास्त सुखकर होईल. पण ते न स्वीकारल्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवले तर जातातचं, पण ते ठेवताना त्या संबंधांना चोरटेपणाचा किंवा छुपेपणाचा पदर राहतो. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला डोकावून पाहिलं की दिसतं, धार्मिक नियम अथवा कायदेकानून कितीही कडक असले तरीही सभ्यतेच्या बुरख्याआड विवाहबाह्य लैंगिक संबंध हे राजरोसपणे चालूच आहेत. प्रतिवर्षी त्यांचं प्रमाणही वाढतंय ! याचं कारण असं आहे, की स्त्री-पुरुष विवाहबद्ध झाल्याबरोबरच त्यांना जगातील इतर सर्व व्यक्ती आवडेनाशा झाल्या पाहिजेत, ही अपेक्षाच अवास्तव आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४२)*

"विवाहाअंतर्गत जोडीदारांना इतर स्वातंत्र्याबरोबरच लैंगिक स्वातंत्र्यही असेल, तर एकमेकांच्या गरजा ते मोकळेपणी मान्य करतील आणि एकमेकांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा यथोचित आदर करतील.या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊनही विवाहाची चौकट आपण भक्कम ठेवू शकतो. मी त्याला लैंगिक बेईमानी अथवा व्यभिचार मानत नव्हतो. याउलट विवाहाच्या एका शिक्क्याखाली जोडीदाराच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करणंच मला अयोग्य वाटत होतं. विवाहाअंतर्गत संबंधात अशी अवास्तव बंधनं जेव्हा लादली जातात, तेव्हा जोडीदाराच्या नकळत अन्य व्यक्तीशी चोरटेपणाने छुपे संबंध ठेवायला उत्तेजन मिळतं. जेव्हा स्वतःच्या कामप्रेरणेचा स्पष्टपणे स्वीकार करण्याचं धाडस नसतं, तेव्हाच एखादी गोष्ट चोरटेपणाने करावीशी वाटते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४३)*


"ज्यावेळी कृतीला विचारांचं अधिष्ठान असतं, त्यावेळी स्वतःशी उघड सामना करण्याचं धाडसही येतं. आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो. स्वतःचे विचार समाजाशी जुळणारे नसले, तरी समाजाशी खंबीरपणे टक्कर देण्याचं नैतिक धैर्य आपल्यात आपोआप येत जातं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४३)*


"प्रेम अजरामर असतं, अलौकिक असतं आणि अमर असतं, हे सर्व काव्यात्म भाषेत ठीक आहे ! पण वास्तव दृष्टिकोनातून पाहिलं, तर प्रेमभावना ही लौकिक पातळीवरच एक भावना आहे. माणूस प्रियकरावर अथवा प्रेयसीवर जसं प्रेम करू शकतो, तसंच गणित, विज्ञान, तत्वज्ञान यांसारख्या एखाद्या विषयावरही प्रेम करू शकतो. फार काय, अमूर्त संकल्पनेवरही प्रेम करू शकतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४४)*



"प्रेमभावना ही आनंद, दुःख, राग, भीती इत्यादी सर्वसामान्य भावनांसारखीच एक भावना आहे. तिला वेगळे मानदंड देण्याची आवश्यकता नाही. इतर सर्व भावना ज्याप्रमाणे निर्माण होतात आणि नष्टही होतात, त्याचप्रमाणे प्रेमभावनाही निर्माण होऊन नष्टही होऊ शकते. थोडक्यात, तर सर्व भावनांप्रमाणे प्रेमभावनाही उत्पत्ती, विकास, ऱ्हास व विलय या सर्व अवस्थांतून प्रवास करू शकते. प्रेम करणं म्हणजे कुठल्यातरी व्यक्तीत पूर्णपणे तल्लीन होणं आणि तिच्याविषयी सकारात्मक मूल्यमापन करणं ! जर हे मूल्यमापन बदललं तर प्रेमभावनेतही बदल होऊ शकतो. प्रेमभावना मनात सतत आळवत ठेवायची का हद्दपार करायची, हा निर्णय मला सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४४)*

"प्रेमभावनेतही मानसिक आणि शारीरिक असा फरक आपण करत असतो. ती मनातल्या मनात जोपासणं आपण उदात्त पातळीवरचं समजतो. पण शरीर पातळीवरच्या प्रेमाला नीच स्थान देतो. तर्कशुद्धपणे विचार केला तर प्रेमभावनेच्या आविष्कारात असा भेदभाव करणं चुकीचं आहे. मानसिक म्हणजे उच्च आणि शारीरिक म्हणजे नीच, या तथाकथित समजुतीला काहीही आधार नाही किंवा शरीर पातळीवरच्या प्रेमाला कमी समजण्याचं कारण नाही. उलट मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर जोपासलेली प्रेमभावना, जीवनातला एक सर्वोत्कृष्ट अनुभव आपल्याला देऊ शकते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४४)*


"आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासाठी जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या प्राणांची आहुती देते, तेव्हा ती नकळतच गृहीत धरत असते, की मला स्वतंत्र अस्तित्व किंवा मूल्य नाही ! माझं मूल्य हे माझ्या प्रेमिकाने मला स्वीकारण्यावर किंवा अव्हेरण्यावर अवलंबून आहे ! थोडक्यात या व्यक्तीचं स्वतःवर फारच कमी प्रेम असतं. त्यामुळे प्रेमिक जगात नसेल, तर त्याच्याशिवाय जगात राहण्याची कल्पना तिला असह्य व्हायला लागते. आपल्या प्रेमिकाशी आपण किती एकरूप किंवा समर्पित झालो आहोत हे दाखवण्याची ही रीत मला रोगट वाटते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४५)*



"एकरूप किंवा समर्पित होणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व दुसऱ्याच्या स्वाधीन करणं नव्हे ! जेव्हा आपण आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व आंधळेपणाने दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो, तेव्हा स्वतःला नगण्य लेखतो; किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपला गैरफायदा घ्यायला उत्तेजनच देत असतो ! याउलट जेव्हा प्रेमिकाचं आपल्या प्रेयसीवर निरोगी प्रेम असतं, तेव्हा इतर व्यक्तींच्या तुलनेने त्याला त्याची प्रेयसीच अधिक प्रिय असते ! पण प्रेम करणं किंवा प्रेम मिळवणं ही काही त्याची जीवनावश्यक गरज नसते ! स्वतःच्या प्रेयसीबद्दल त्याला विलक्षण प्रेम वाटत असलं, तरी तो वेडापिसा होऊन तिच्या प्रेमात गुरफटून जात नाही. तिच्या प्रेमात पडूनही तो स्वतःला नगण्य समजत नाही. त्याला प्रेयसीचं प्रेम हवं असतं; अगदी तीव्रपणे हवं असतं; पण प्रेम ही काही त्याची अत्यावश्यक गरज नसते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४५)*



"प्रेमाबद्दलच्या कितीतरी संकल्पना आपण डोळेझाकपणे स्वीकारतो. यांतली प्रत्येक रूढ संकल्पना मी वस्तुनिष्ठतेच्या पुराव्यावर खोदून खोदून तपासली. 

प्रेमाबद्दलची मी तपासलेली पहिली संकल्पना होती,
*प्रेम ही कुठलीतरी गूढरम्य शक्ती आहे. म्हणून ती सामान्य भाषेत व्यक्त करता येत नाही.*

माझा निष्कर्ष होता, 
*प्रेम ही इतर भावनांसारखीच एक भावना आहे. प्रेम म्हणजे दुसरंतिसरं काही नसून दुसऱ्या व्यक्तीबाबत आपण केलेलं मूल्यमापन असतं आणि म्हणूनच सामान्य भाषेतही ते व्यक्त करता येतं.*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४५)*




*प्रेमाबद्दलचा प्रचलित समज*- एक मनुष्य एक वेळी केवळ एकाच व्यक्तीवर प्रेम करू शकतो.
*निष्कर्ष*- एक मनुष्य एक वेळी एकापेक्षा अधिक व्यक्तींवरही प्रेम करू शकतो.

*प्रेमाबद्दलचा प्रचलित समज*- वैवाहिक जोडीदारांत प्रेम आपोआपच निर्माण होतं.
*निष्कर्ष*- प्रेमाला विवाहाचं बंधन असतंच असं नाही. वैवाहिक जोडीदाराबद्दल प्रेम वाटू न देताही काहीजण विवाह निभावून देतात. याउलट जिच्याशी स्वतःचा विवाह झाला नाही, अशा व्यक्तीबद्दलही आत्यंतिक प्रेम वाटू शकतं.

*प्रेमाबद्दलचा प्रचलित समज*- एखाद्यावर प्रेम करणं, याचाच अर्थ त्या व्यक्तीवर प्रेमाचा वर्षाव करणं होय.
*निष्कर्ष*- आपल्यावर अगदी उत्कटपणे प्रेम करणारी व्यक्तीही, आपल्यावर अखंडपणे, सदोदित प्रेम करत नसते ! ते स्वर्गीय प्रेम अधूनमधून खंडितही होत असतं !

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४६)*


प्रेमाबद्दलच्या अजून एका संकल्पनेचा शोध घ्यावासा मला वाटला. ती संकल्पना म्हणजे *लव्ह ऍट फर्स्ट साईट - प्रथमदर्शनी प्रेम !*

अशा प्रेमामागच्या मानसिक प्रक्रिया काय असतात, याचा विचार करताना लक्षात आलं, की असं प्रेम वाटण्याअगोदर प्रेमिक मुळातच प्रेमाच्या शोधात असतो. उत्कट प्रेम करायला उत्सुक असतो. प्रेम करायला सुयोग्य अशा व्यक्तीचे गुणविशेष त्याच्या मनात ठरलेले असतात. समोरची व्यक्ती त्या गुणविशेषांच्या जवळपास जरी असली तरी प्रेमिकाला वाटतं, की जिच्या शोधात होतो ती प्रेमिका हीच आहे !

थोडक्यात प्रथमदर्शनी प्रेम जडण्यात कुठलंही दैवी प्रयोजन नसतं किंवा प्रेम जडण्याची प्रक्रिया अचानक, उत्स्फूर्तपणे घडलेली नसते ! तर 'मला प्रेयसी हवी आहे' असा प्रेमाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन प्रेमिकाच्या मनात कळत-नकळत आधीपासूनच तयार झालेला असतो ! हाच दृष्टिकोन पाहताक्षणीच प्रेम जडवत असतो !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४७)*


"भावना तीव्रपणे अनुभवणं मला जिवंतपणाचं, माणूसपणाचं वाटतं ! तीव्र संवेदनशीलता किंवा हळवेपणा हा गुणविशेष म्हणजे दुबळेपणा नाही ! उलट या गुणविशेषणामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या भाववृत्ती तिच्या मनोभूमिकेतून समजून घेता येतात. त्याची अनुभूती त्यांच्याइतक्याच तीव्रतेने अनुभवता येते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४८)*


"प्रख्यात आंग्ल कवी टेनिसन म्हणतात, 'इट इज बेटर टू हॅव लव्हड् अँड लॉस्ट, दॅन नेव्हर टू हॅव लव्हड् ऍट ऑल' (It is better to have loved and lost, than never to have loved at all)
*प्रेमाचा अनुभव अजिबातच न घेण्यापेक्षा, प्रेमात पडून प्रेमभंग झालेला जास्ती बरा !*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १४८)*


"कामभावनेतली मानसशास्त्रीय बाजू बऱ्याच वेळा उपेक्षित राहते. हेच कामजीवनातल्या दुःखाचं आणि अतृप्तीचं मुख्य कारण असतं. स्वतःच्या लैंगिकतेचा शोध घेणं म्हणजे स्वतःचा विकास करणं होय."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५१)*

"लैंगिकतेबाबतचे निर्बंध एवढे तीव्र असतात, की ते मेंदूलाही वेसण घालतात. लैंगिकतेसंबंधी मोकळेपणाने बोलणं आपण वर्ज्य समजतो. पारंपरिक वातावरणाचा पगडा इतका जोरदार असतो, की जणूकाही आपल्याला लैंगिक भावनाच नाहीत असं दाखवण्यात स्त्री-पुरुषांना एक प्रकारचा अभिमान वाटतो. लैंगिकदृष्ट्या उदासिनता किंवा अनाकर्षण जोपासणं म्हणजे सोज्ज्वलता आणि सात्विकता हे समीकरण डोक्यात इतकं घट्ट बसलेलं असतं, की स्वतःच्या नैसर्गिक प्रेरणांना आपण कधी फाटा देतो तेच समजत नाही."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५१)*


"महान विचारवंत टॉलस्टॉय म्हणाले होते, 'जगातली सर्वात भीषण महायुद्ध ही युद्धभूमीवर घडण्यापेक्षा एकमेकांना शय्यासोबत करणाऱ्या जोडप्यांकडून शय्येवर घडत असतात !' जोडीदारांमधला लैंगिक असंतोष कुठल्या पातळीला पोहोचलेला असतो, याबाबत टॉलस्टॉय यांचं हे विधान निश्चितच विचार करायला लावणारं होतं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५२)*


"कामतृप्ती ही एक आवश्यक सोपस्कार उरकून घेण्यासारखी क्रिया नाही. केवळ समागमाची क्रिया म्हणजे कामतृप्ती नाही ! समागम हा कामतृप्तीचा फार मर्यादित अर्थ आहे. कामतृप्तीचा अर्थ फार व्यापक आहे. *केवळ समागमापुरतेच स्त्री-पुरुष शय्यासोबत करत असतील, तर त्यांचं लैंगिक जीवन कंटाळवाणं असणं अपरिहार्य आहे.* समागमाची एकच एक क्रिया, एकाच पद्धतीने वर्षानुवर्ष करत राहिलात, तर लैंगिक जीवन केवळ नीरस होत जातं असं नव्हे, तर आयुष्यातला खूप मोठा आनंदही तुम्ही गमावून बसता ! हा आनंद घ्यायचा असेल, तर मनातले अडसर दूर सारा ! मनाला मोकळेपणे स्वैर फिरू द्या ! यासाठी आवश्यक आहे प्रयोगशीलता ! 

तुम्ही दोन प्रकारे प्रयोगशील राहू शकता. *एक म्हणजे जोडीदारांमध्ये वैविध्य आणा ! जर तुम्ही जोडीदाराशी एकनिष्ठ असाल, तर दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही करत असलेल्या प्रणयक्रीडांमध्ये वैविध्य आणा ! ते आणण्यासाठी सर्वप्रथम स्वतःच्या मानसिकतेत बदल करा.* कामभावना निषिद्ध मानली नाहीत, तर कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रणयक्रीडांमध्ये वैविध्य आणू शकू, याचा चौकसपणे शोध घेऊ शकाल !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५२)*


"आपल्याला पढवलेलं असतं, की कामप्रेरणेचं ईश्वरी किंवा नैसर्गिक प्रयोजन म्हणजे प्रजोत्पादन आणि वंशसातत्य ! डोळे उघडे ठेवून विचार केलात तर आढळून येईल की *प्रजोत्पादन हे कामप्रेरणेचं केवळ एक उद्दिष्ट आहे, पण ते काही एकमेव उद्दिष्ट नाही ! कामप्रेरणेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे, आनंद घेणं !* कामप्रेरणेच्या तृप्तीमुळे मिळणारा आनंद अत्युच्च कोटीतला असतो. त्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा असेल, तर कामप्रेरणा केवळ प्रजोत्पादनासाठी आहे, असा मनातला बंदिस्त विचार मुळासकट नष्ट करा.

वर्षानुवर्ष मनावर बिंबवल्या गेलेल्या या समजुतींचे पाश झुगारून द्या. त्यांचा मनावरचा प्रभाव दूर करा. तो दूर केलात, की स्वतःच्या शरीराकडे तुमचं नीट लक्ष जाईल ! स्वतःच्या शरीराची लाज वाटून घेणं तुम्ही सोडून द्याल ! जननेंद्रियाव्यतिरिक्त इतर सुखोत्तेजक भागही तेवढेच प्रभावी आहेत, याची तुम्हाला प्रचिती येईल. स्वतःच्या शरीराकडे शोधक नजरेने तुम्ही पाहू शकाल. मग तुम्ही हेही तपासू शकाल, की लैंगिक उद्दीपनासाठी स्वतःच्या शरीरातला कुठला सुखोत्तेजक भाग जास्तीत जास्त प्रभावी आहे ! त्यावर लक्ष केंद्रित करून कामतृप्तीतला आनंद जास्तीत जास्त लुटू शकाल. त्यासाठी केवळ जननेंद्रियावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर कामतृप्तीसाठी कसा करता येईल, त्याच्या नवनवीन कल्पना तुमच्या मनात आकाराला येतील. लैंगिक वर्तनाच्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतींनी कामतृप्ती वृद्धिंगत होऊ शकेल, हे तुम्ही चौकसपणे पाहू शकाल."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५३)*



"आपल्याला पढवलेलं असतं, की कामप्रेरणेचं ईश्वरी किंवा नैसर्गिक प्रयोजन म्हणजे प्रजोत्पादन आणि वंशसातत्य ! डोळे उघडे ठेवून विचार केलात तर आढळून येईल की *प्रजोत्पादन हे कामप्रेरणेचं केवळ एक उद्दिष्ट आहे, पण ते काही एकमेव उद्दिष्ट नाही ! कामप्रेरणेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे, आनंद घेणं !* कामप्रेरणेच्या तृप्तीमुळे मिळणारा आनंद अत्युच्च कोटीतला असतो. त्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा असेल, तर कामप्रेरणा केवळ प्रजोत्पादनासाठी आहे, असा मनातला बंदिस्त विचार मुळासकट नष्ट करा.

वर्षानुवर्ष मनावर बिंबवल्या गेलेल्या या समजुतींचे पाश झुगारून द्या. त्यांचा मनावरचा प्रभाव दूर करा. तो दूर केलात, की स्वतःच्या शरीराकडे तुमचं नीट लक्ष जाईल ! स्वतःच्या शरीराची लाज वाटून घेणं तुम्ही सोडून द्याल ! जननेंद्रियाव्यतिरिक्त इतर सुखोत्तेजक भागही तेवढेच प्रभावी आहेत, याची तुम्हाला प्रचिती येईल. स्वतःच्या शरीराकडे शोधक नजरेने तुम्ही पाहू शकाल. मग तुम्ही हेही तपासू शकाल, की लैंगिक उद्दीपनासाठी स्वतःच्या शरीरातला कुठला सुखोत्तेजक भाग जास्तीत जास्त प्रभावी आहे ! त्यावर लक्ष केंद्रित करून कामतृप्तीतला आनंद जास्तीत जास्त लुटू शकाल. त्यासाठी केवळ जननेंद्रियावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर कामतृप्तीसाठी कसा करता येईल, त्याच्या नवनवीन कल्पना तुमच्या मनात आकाराला येतील. लैंगिक वर्तनाच्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतींनी कामतृप्ती वृद्धिंगत होऊ शकेल, हे तुम्ही चौकसपणे पाहू शकाल."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५३)*


"९० टक्के स्त्री-पुरुष समागमाच्या वेळी पारंपरिक आसनांचा -मिशनरी पोझिशनचा म्हणजेच पुरुषाने स्त्रीवर आरूढ होण्याच्या पद्धतीचाच प्रामुख्याने वापर करतात. शारीरिकदृष्ट्या विचार केला तर कामक्रीडेचा आनंद घेण्यासाठी समागमाची इतर आसनं पारंपरिक आसनापेक्षा निश्चितच सुलभ असतात. पण पारंपरिक आसनामुळे गर्भधारणा होण्याचा संभव जास्त असल्यामुळे, बहुतेक वेळा याच आसनाचा पुरस्कार केला जातो. *कामक्रीडेचं उद्दिष्ट हे आनंदापेक्षा प्रजोत्पादनातच आहे, या विचारसरणीचा पगडा इतका दृढ असतो, की पारंपरिक आसनापेक्षा समागमाच्या काही वेगळ्या पद्धती अथवा आसनं असू शकतात, याचा बहुसंख्य स्त्री-पुरुषांनी कधी विचारच केलेला नसतो !*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५३)*


"प्रणयक्रीडेतलं धाडस दाखवण्यासाठी, प्रत्येक लैंगिक वर्तनाची परिणती ही समागमात किंवा उत्कर्षबिंदू गाठण्यात झाली पाहिजे, या समजुतीच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घ्या ! मग समागमविरहीत प्रणयक्रीडाही म्हणजे मुखमैथुन, गुद्मैथुन किंवा रतिक्रीडेचे इतर प्रकारही कामतृप्तीचा निखळ आनंद देऊ शकतात, याची प्रचिती तुम्हाला येईल."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५४)*


"विशिष्ट प्रणयक्रीडा ह्या विकृतु असतात असा जर तुमचा समज असेल, तर तुम्ही कामतृप्तीतल्या निखळ आनंदापासून स्वतःला वंचित ठेवाल ! खरं सांगायचं तर, कुठल्या वर्तनाला विकृत म्हणावं याबाबतही स्वतंत्र विचार आपण फारच क्वचित केलेला असतो. जी लैंगिक क्रिया प्रजोत्पादनाशी संबंधित नाही, तिचं विकृत असं नामाभिदान करणाऱ्या रुढीबद्ध विचारसरणीला आपण मुकाटपणे मान डोलावलेली असते. कारण स्वतःचे वेगळे विचार आपल्याकडे नसतात किंवा स्वतंत्र विचारशक्ती असली, तरीही तिचा वापर कामप्रेरणेच्या बाबतीत करण्याची क्षमता आपण हरवून बसलेलो असतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५४)*


"कामतृप्तीतला आनंद हा कामेच्छेच्या तीव्रतेपेक्षा अजून एका महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून असतो. ती म्हणजे, लैंगिकतेबद्दल बाळगला जाणारा सखोल आणि व्यापक दृष्टिकोन ! कामेच्छा अगदी तीव्र असूनही लैंगिकतेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जर रोगट असेल, तर आपण काहीतरी पाप करत आहोत, असं वाटून तुम्ही असमाधानी राहाल ! याउलट कामेच्छा फारशी तीव्र नसूनही लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप असेल, तर छोट्या छोट्या-मोठ्या लैंगिक क्रियांतून मिळणारा कामतृप्तीतला आनंदही व्यापक व बहुरंगी असेल !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५४)*


"माझ्याकडे येणारी दाम्पत्य सरसकट एक प्रश्न वारंवार विचारायची. *दिवसातून आठवड्यातून किंवा महिन्यातून किती वेळा समागम करणं योग्य समजावं?* अशा वेळी चुकीच्या गृहितकांशी सामना करायला शिकवताना मी सांगायचो,
तुमच्या मनातलं पहिलं चुकीचं गृहीतक आहे, की सर्व माणसं मूलत: सारखी असतात आणि विशिष्ट पद्धती वापरल्या तर सारख्याच पातळीची कामतृप्ती मिळू शकते. 

प्रत्येक मनुष्याचं लैंगिक वर्तन हे इतरांपेक्षा भिन्न असतं. त्यामुळे तो वापरत असलेल्या पद्धतीतही भिन्नता असते. प्रत्येक जोडप्याच्या लैंगिक वर्तनात इतकी भिन्नता असते, की सरासरी लैंगिक वर्तनाचे निश्चित ठोकताळे ठरवून, अमुक एखादी कृती योग्य किंवा अयोग्य अशी शिफारस करता येणार नाही.

दुसरं चुकीचं गृहीतक म्हणजे कामतृप्तीतला आनंद हा समागम किती वेळा होतो यावरच संपूर्णत: अवलंबून असतो. कामतृप्तीतला आनंद हा समागमाच्या वारंवारितेबरोबरच इतरही अनेक घटकांवर, उदाहरणार्थ गुणात्मक दृष्ट्या तो कसा होतो, यावरही अवलंबून आहे. आपलं वर्तन सर्वसामान्य आहे का सरासरी, असं नवीन जू मानेवर लादू नका ! नाहीतर लैंगिक वर्तन करताना मनात ठरवलेल्या सरासरी मानदंडांशी सतत तुलना करत राहाल आणि त्या वर्तनातला आनंदच हिरावून घ्याल ! स्वतःला कुठल्याही मानदंडात बसवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कामक्रीडेतला आनंद गौण समजणं ! त्यामुळे सरासरी मानदंडाचं हे ओझं फेकून देऊन मुक्तपणे कामजीवनाचा आनंद लुटा !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५५)*


"जनानेंद्रियांच्या आकाराचे काही फायदे-तोटे जरूर आहेत.पण ते लहान-मोठं असण्यावर कामतृप्तीतला आनंद अवलंबून नाही. लैंगिक सुख हे फक्त जनानेंद्रियाशीच संबंधित आहे, या विचारसरणीचा पगडा किती घट्ट असतो पाहा ! जननेंद्रियाचा वापर न करताही शरीरातल्या इतर सुखोत्तेजक भागांचा परिणामकारक वापर करूनही तुम्ही स्वतःची व जोडीदाराची कामतृप्ती करु शकता. इतकंच नव्हे, तर केवळ कामोत्तेजक शब्दांच्या साहाय्याने स्वतःला व जोडीदाराला मानसिकदृष्ट्या चेतवूनही कामतृप्ती होऊ शकते. मात्र त्यासाठी कामकौशल्य विकसित करणं गरजेचं आहे; कारण कामतृप्तीचा आनंद शारीरिक ठेवणीवर नाही, तर कामक्रीडेतल्या कौशल्यावर अवलंबून आहे ! शारीरिक ठेवण ही जन्मजात असते आणि बहुतांशी अपरिवर्तनीय असते. पण कामक्रीडेतलं कौशल्य मात्र जन्मजात नाही. तर ते शिकावं लागतं. एकदा का हे कौशल्य प्राप्त करून घेतलंत, की शारीरिक ठेवणीच्या उणिवेची फिकीर करायची गरजही तुम्हाला भासणार नाही ! मात्र जर तुम्ही असा ठाम दृष्टिकोन बाळगला असेल, की शारीरिक ठेवणीमुळे मी कामतृप्तीचा आनंद संपूर्णत: उपभोगू शकत नाही किंवा जोडीदाराला समाधानी करू शकत नाही, तर जननेंद्रियाचा आकार लहान असो वा मोठा; खरोखरच तो आनंद घेण्यात आणि देण्यात तुम्ही कमी पडाल !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५५)*



"स्वतःच्या समलिंगी कामजीवनाबाबत अपराधी भावना बाळगू नका ! कामजीवन समलिंगी असावं का भिन्नलिंगी, ही वैयक्तिक निवड असते. आपण ठरवलेला तो अग्रक्रम असतो ! या बाबतीत निवड ही विकृती ठरू शकत नाही. त्यामुळे योग्य का अयोग्य, हा प्रश्नच इथे उद्भवत नाही !

समजा, मी असं म्हटलं, की मला पिवळा रंग हिरव्या रंगापेक्षा जास्त आवडतो, तर ती केवळ माझी वैयक्तिक निवड असते. रंगांच्या निवडीबाबतचं ते माझं मतस्वातंत्र्य असतं. अर्थातच, हिरवा रंग आवडत नाही, याबाबत मला अपराधी भावना वाटण्याचा प्रश्न येत नाही. पण समलिंगी कामजीवनाच्या निवडीबाबत मात्र केवळ निवड या निखळ दृष्टिकोनातून पाहिलं न जाता, त्यात अपराधी भावनेची छटा गडद असते. याचं कारण असं आहे, की मी जे वर्तन करतोय, ते नैतिकदृष्ट्या मी करताच काम नये, या विचारांचे प्राबल्य मनात असते. त्यामुळे अपराधी भावना वाटत राहते.

*एखादं वर्तन नैतिकदृष्ट्या करताच काम नये असं आपण म्हणत असतो, तेव्हा त्या विधानाच्या पाठीमागे लपलेला विचार असतो, मी समाजापेक्षा वेगळं काहीतरी करतोय ! ते सर्वसंमत नाही ! ते विकृत आहे ! म्हणून ते करताच कामा नये !*"


*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५६)*


"एखादी व्यक्ती एखादं लैंगिक वर्तन जर झपाटल्याप्रमाणे किंवा अनिवार्यपणे केवळ त्याच वर्तनाला चिकटून राहून करत असेल, तर तिचं वर्तन 'विकृत' म्हणून संबोधता येईल. पण असं वर्तन केवळ समलिंगी कामजीवनातच नव्हे, तर भिन्नलिंगी कामजीवनातही आढळून येतं. म्हणूनच समलिंगी कामजीवनासाठी वेगळे मानदंड प्रस्थापित करण्याची गरज नाही. *जर दोन सज्ञान जोडीदार परस्पर संमतीने कुणालाही अपाय न करता स्वखुशीने कामतृप्ती करत असतील, मग ती समलिंगी संबंधाद्वारे असली, तरीही कुठल्या सुजाण निकषांच्या आधारावर ती विकृत ठरत नाही.*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५६)*


"मनुष्य मुख्यतः दोन कारणांमुळे समलिंगी संबंध ठेवत असतो. एक म्हणजे समलिंगी संबंध ठेवण्याकडे काही व्यक्तींचा जैविक कल असतो. दुसरं म्हणजे काही व्यक्ती समलिंगी संबंध सरावाने शिकून घेतात. ही प्रवृत्ती जैविक असो वा आत्मसात केलेली असो, समलिंगी संबंधांकडे पाहण्याचा व्यक्तींचा दृष्टिकोन त्यांच्या वर्तनावर फार मोठा परिणाम करत असतो. तो जर हटवादी असेल, तर मात्र अशा लैंगिक वर्तनात समस्या निर्माण होतात. हा दृष्टीकोन असा असतो, की कामतृप्तीचा आनंद केवळ समलिंगी संबंधाद्वारेच मिळू शकतो ! अशा व्यक्ती समलिंगी संबंधांव्यतिरिक्त इतर कुठल्याही पद्धतीचा अवलंब करायला धजावत नाहीत आणि लैंगिक जीवन आकुंचित करून घेतात."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५७)*

"समलिंगी संबंधांची आवड विकृत नसून ती केवळ वैयक्तिक रुची असते, या मताचा पुरस्कार अनेक लैंगिक तज्ञ करतात. आधुनिक संशोधन सांगतं, की लैंगिक संबंधांबाबत समलिंगी व भिन्नलिंगी याबाबत आपण जो अग्रक्रम ठरवतो, तो सुद्धा फारच क्वचित जन्मजात असतो. समाजाने जाणता-अजाणता आपल्याला शिकवलेल्या दृष्टिकोनांवर हा अग्रक्रम बहुतांशी अवलंबून असतो. समलिंगी किंवा भिन्नलिंगी संबंधांकडे असणारा कल काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मजात असला, तरी अपरिवर्तनीय नसतो. शारीरिकदृष्ट्या विचार केला, तर आपल्यापैकी बहुतेकांची दोन्ही प्रकारचे संबंध ठेवण्याची जन्मजात प्रवृत्ती असते. पण सामाजिक रुढींमुळे आपण एका विशिष्ट पठडीतच विचार करतो. हा विचार असा असतो, की समलिंगी संबंधांतून प्रजोत्पादन होत नसल्यामुळे रे विकृत असतात. या विचारामुळे भिन्नलिंगी संबंधांचं प्राधान्य आपण निश्चितच करतो. सतत आचरणात आणल्यामुळे तेच आपल्याला नैसर्गिक वाटायला लागतात. त्यामुळे समलिंगी संबंध आपण अनैसर्गिक समजतो आणि तो अनुभव घेणंच टाळतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५७)*

"लैंगिक विषयावरील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या समलिंगी संबंध ही केवळ आपली रुची असते, या निष्कर्षावर थांबणं मी नाकारलं. या मताच्या पुढे एक पाऊल टाकून मी असा निष्कर्ष काढला, की समलिंगी संबंधांचा अनुभव प्रत्येकाने जीवनात निदान एकदा तरी घेणं आवश्यक आहे. जर समलिंगी कामजीवनाबद्दल तुच्छता, किळस, हेटाळणी अशा नकारात्मक भावना मनात असतील, तर याचा अर्थ आपल्या मनातली जळमटं अजूनही दूर झालेली नाहीत. स्वच्छ नजरेने या संबंधांकडे आपण पाहू शकत नाही. ही जळमटं पूर्णपणे हटवण्याचा एकच मार्ग, म्हणजे *समलिंगी संबंधांचा प्रत्यक्ष अनुभव घेणं होय !*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५८)*


"कुणालाही शारीरिक किंवा मानसिक अपाय होत नसेल, तर प्रौढ जोडीदारांनी कुठलाही अनुभव परस्परसंमतीने घेण्यात मला काहीच आक्षेपार्ह वाटत नव्हतं. उलट असा अनुभव घेण्यातली प्रयोगशीलता, हा सुद्धा आत्मप्रगटीकरणाचा एक आवश्यक भाग आहे, असं मी समजत होतो. एखाद्या गोष्टीचा अनुभव न घेताच केवळ पूर्वग्रहदूषित कल्पनांच्या आधारे तो अनुभवच नाकारणं, मला रास्त वाटत नव्हतं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १५८)*

"जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असतो, तेव्हा कुठलाच पर्याय आता उपलब्ध नाही, अशी स्वतःची समजूत करून घेत असतो. समस्येभोवती असलेले भावनिक अस्वस्थतेचे ढग दूर केले, की मग त्या समस्येकडे तटस्थपणे आणि सुस्पष्ठतेने पाहता येतं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १६३)*


"कुठल्याही गोष्टीबाबत मग ती म्हणजे तत्व असो, मूल्य असो, विचारसंप्रदाय असो अथवा व्यक्ती असो - आपण जेव्हा कडवी भूमिका घेतो, तेव्हा आपली विचारधारा एकांगी होऊ लागते. परिणामी, तिचा आपण विचारशून्यपणे स्वीकार करू लागतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १६७)*


"आपल्या बोलण्यात आणि लिहिण्यात जे शब्द येत असतात, ते शब्दश: तटस्थ असतात. पण त्या शब्दांचा आपण जो अर्थ लावत असतो, त्या अर्थावर आपल्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. म्हणूनच एखाद्या मनुष्याच्या मानसिक घडामोडी समजून घ्यायच्या असतील; तर काय घडलं आहे यापेक्षा त्या घडण्यातून तो काय अर्थ काढत असतो, हे समजून घेणं महत्वाचं आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७०)*



"जेव्हा प्रतिकूल परिस्थिती अनपेक्षितपणे उभी ठाकते, तेव्हा त्या परिस्थितीच्या नुसत्या विचारानेच आपण इतकं गर्भगळीत होतो, की ती परिस्थिती निभावून नेण्यासाठी शिल्लक असणारं उरलंसुरलं मनोधैर्यही त्या गर्भगळीत होण्याने नष्ट होतं. आणि मग ती परिस्थिती मला सहनच करता येणार नाही, असा अवास्तव निष्कर्ष काढून आपण स्वतःला चिंतेच्या खाईत लोटून देतो. जादूची कांडी फिरेल आणि आपल्यापुढील समस्या तात्काळ नाहीशी होईन, अशी समजूतही कधी कधी मनाशी बाळगतो. पण भ्रमाचा भोपळा फुटून वस्तुस्थिती जेव्हा अंगावर उलटते, तेव्हा मात्र हतबल होऊन कोसळून पडतो. म्हणजेच प्राप्त परिस्थितीपेक्षा त्या परिस्थितीबाबतचे विचारच जास्त भयप्रद असतात ! त्याच परिस्थितीबाबत थोडासा वेगळा विचार करण्याची सवय स्वतःला लावून घेतली, तर आपण कोसळण्यापासून स्वतःला सावरू शकतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७१)*


"कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी शर्थीने झुंजावं. पण ती परिस्थिती बदलता येणं आपल्या नियंत्रणापलीकडचं असेल, तर तिच्याशी तडजोड करणंच हिताचं असतं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७३)*


"व्यक्तिमत्व ही खरंतर एक प्रक्रिया असते. याचाच अर्थ ती स्थिर नसून बदलती असते. व्यक्तिमत्व प्रक्रियेप्रमाणे बदलतं असतं ! प्रवाही असतं ! अशा प्रवाही व्यक्तिमत्वाला विशिष्ट गुणविशेषांचं लेबल लावणं चुकीचं होतं, ते लावलं, तर व्यक्तिमत्वातले काही घटक आपण स्वतःच्या इच्छेनुसार बदलू शकतो, या शक्यतेलाच नकार देण्यासारखं होतं ! आणि हे व्यक्तिमत्व विकासाला मारक होतं !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७५)*


"व्यक्तिमत्व हे इतकं बहुआयामी, व्यामिश्र आणि गुंतागुंतीचं असतं, की व्यक्तिमत्व कसोट्यांद्वारे मोजलेल्या एका किंवा अनेक वैशिष्टयांमधे त्याला सरसकट कोंबणं आणि त्या वैशिष्टयांच्या आधारे संपूर्ण व्यक्तिमत्वाबाबत अंदाज बांधणं मला मनापासून पटत नव्हतं.

व्यक्तिमत्व कसोट्यांवरून दिसून येणाऱ्या वैशिष्ट्यांच्या आधारे संपूर्ण व्यक्तिमत्वाचं निदान करणं, म्हणजे समुद्राच्या एका थेंबाचं मोजमापन करून त्या समुद्राची व्याप्ती किती असेल, समुद्रतळ किती खोल असेल, भरती-ओहोटीचा वेग किती असेल, याबाबत अंदाज वर्तवल्यासारखं होतं !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७५)*


"आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि भोवतालच्या जगाबद्दल अनेक दृष्टिकोन बालपणापासून जोपासतो. ते आपल्या जीवन-तत्वज्ञानातून प्रसावतात. यातले काही दृष्टिकोन मानसिक स्वास्थासाठी हितकारक असतात. जीवनातल्या समस्या सोडवायला ते मदत करतात. पण काही मानसिक स्वास्थ्याला मारक असतात. आपल्यापुढच्या समस्या ते अजूनच जटिल करून ठेवतात."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७५)*


"जेव्हा एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असते, तेव्हा तिच्या मनात हितकारक दृष्टिकोनाऐवजी अहितकारक दृष्टिकोन प्रबळ झालेले असतात. त्यामुळे या दृष्टिकोनांना अनुसरून ती आत्मघातकी वर्तन करायला लागते. त्या व्यक्तीच्या मानसिक समस्येचा अभ्यास करायचा असेल, तर तिच्या सदोष दृष्टिकोनांच्या मुळाशी रुजलेल्या घातक जीवन तत्वज्ञानाचा मागोवा घेतला पाहिजे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७५)*

"स्वतःच्या मनाचा कौल झिडकारून तुम्ही दुसरंच काहीतरी करत राहिलात, तर ते फारतर निभावून नेऊ शकाल ! पण त्यात रममाण होणं कठीण आहे ! त्याऐवजी मनाचा कौल ओळखून त्याप्रमाणे वागलात, तर स्वतःचे वेगळे सूर तुम्ही तयार करू शकाल ! तुम्हाला लक्षात येईल, की हे वेगळे सूर ओठांवर निव्वळ गुणगुणले जात नाहीत, तर ते तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहेत ! असं होता होता एक दिवस असा उजाडेल, की हे सूर तुमचंच जीवनगाणं गायला लागतील !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७६)*

"एकाच स्त्रीशी आयुष्यभरासाठी बांधून घेण्याला मी एकनिष्ठता समजत नव्हतो. एकनिष्ठतेचा मी लावलेला अर्थ अगदी सोपा होता. तो म्हणजे, एक वेळी एकाच स्त्रीवर एकनिष्ठपणे प्रेम करणं ! म्हणजे जेव्हा एका स्त्रीवर मी प्रेम करायचो, तेव्हा तिच्यावरचं माझं प्रेम अगदी उत्कट आणि एकनिष्ठ असायचं ! त्यावेळी दुसऱ्या स्त्रीवर फार गंभीरपणे आणि अगदी गाढ प्रेम करत नसायचो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १७७)*


"सर्वसाधारणपणे स्त्रियांना लैंगिक उत्कर्षबिंदूचा प्रत्यय आल्यानंतर त्या श्रांत अवस्थेत जातात. या काळास 'रिफ्रेक्टरी पिरिअड' असं म्हंटलं जातं. या काळात इंद्रियांची संवेदनशीलता इतकी तीव्र झालेली असते, की लागोपाठचा दुसरा उत्कर्षबिंदू त्यांना नकोसा वाटण्याची शक्यता असते. पण ज्यांची लैंगिक क्षमता अत्यंत तीव्र स्वरूपाची असते, अशा स्त्रिया मात्र अविरतपणे एकापाठोपाठ अनेक उत्कर्षबिंदूंचा अनुभव घेऊ शकतात. अशा स्त्रियांना 'मल्टि-ऑरगॅस्मिक विमेन' म्हणजे तुलनेने थोड्या काळात अनेक उत्कर्षबिंदू गाठू शकणाऱ्या स्त्रिया, असं संबोधलं जातं. अशा स्त्रियांची कामतृप्ती करणं हे पुरुषत्वाला आव्हान असतं आणि ते अत्यंत आनंददायीही असतं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १८३)*


"सुप्रसिद्ध मनोविश्लेषणतज्ञ डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी मांडलेल्या 'द्वि-उत्कर्षबिंदू' सिद्धांतामध्ये त्यांचं असं प्रतिपादन होतं, की स्त्रियांमध्ये प्रत्ययाला येणारा उत्कर्षबिंदू हा दोन प्रकारचा असतो. एक प्रकार म्हणजे 'व्हजायनल ऑरगॅजम' म्हणजेच योनीतल्या उद्दीपनाने गाठला जाणारा उत्कर्षबिंदू ! सर्वसामान्य भाषेत याला 'जी-स्पॉट' असंही संबोधलं जातं. उत्कर्षबिंदूचा दुसरा प्रकार म्हणजे 'क्लायटोरल ऑरगॅजम'. याचाच अर्थ 'क्लायटोरीस' म्हणजेच मदनध्वजासारखा भाग चेतवून गाठता येणारा उत्कर्षबिंदू !

फ्राईड यांच्या मते, कोवळ्या वयात किंवा पौगंडावस्थेत स्त्रिया दुसऱ्या प्रकारच्या म्हणजेच, मदनध्वजाच्या उद्दीपनाने येणारा उत्कर्षबिंदू अनुभवतात. अशा प्रकारचा उत्कर्षबिंदू हा अपरिपक्व कामक्रीडेचं लक्षण आहे. तारुण्यावस्थेत परिपक्वता आल्यानंतर समागमाद्वारे योनीतल्या उद्दीपनाने त्या उत्कर्षबिंदू गाठतात. त्यामुळे योनीतल्या उद्दीपनाने गाठल्या जाणाऱ्या उत्कर्षबिंदूतलं कामसुख, हे मदनध्वजाच्या उद्दीपनाने येणाऱ्या उत्कर्षबिंदूतल्या कामसुखापेक्षा श्रेष्ठ प्रतीचं असतं. थोडक्यात, स्त्रिया खऱ्या अर्थाने परमोच्च कामसुख, योनीतल्या उद्दीपनानेच मिळवू शकतात, असा सिद्धांत फ्राईड यांनी मांडला होता."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १८३)*



"स्त्रियांच्या कामभावनेचा अभ्यास केल्यानंतर मी अशा निष्कर्षाला आलो, की स्त्रियांना योनीतल्या उद्दीपनाने मिळणारं लैंगिक सुख आणि मदनध्वजाच्या उद्दीपनाने मिळणार लैंगिक सुख हे परस्परविरोधी असण्याचं काहीच कारण नव्हतं ! स्त्रियांची शरीर-रचना आणि शरीरअवयवांची संवेदनशीलता बारकाईने अभ्यासल्यानंतर लक्षात आलं, की स्त्रियांच्या योनीच्या आतील भाग हा फारसा संवेदनशील नसतो. याउलट मदनध्वजाजवळचा भागं हा योनीपेक्षाही जास्त संवेदशील असतो. त्यामुळे स्त्रियांना योनीतल्या उद्दीपनानेच खरं कामसुख मिळतं, या फ्राईड यांच्या प्रतिपादनाला कुठलाच शास्त्रीय पुरावा मिळत नव्हता.

फ्राईड यांच्या द्वि-उत्कर्षबिंदू सिद्धांताला मान्यता देणं म्हणजे पुरुषाशी होणाऱ्या समागमातून मिळणारं कामसुखच केवळ श्रेष्ठ प्रतीचं असतं, असं नकळतपणे मनावर ठसवणं होय. असं जर ठसत गेलं तर कामसुख केवळ समागमातूनच मिळतं, अशी समजूत होऊन स्त्रियांच्या लैंगिकतेची मजल योनीमार्गाच्या उद्दीपनापुढे जाऊ शकणार नाही ! किंबहुना ती जाऊच नये, म्हणजे स्त्रियांना त्यांचं लैंगिक सुख समागमाव्यतिरिक्त इतर मार्गांनी शोधण्यास आपोआपच मज्जाव होईल अशी पुरुषप्रधान मानसिकता या विचारांच्या पाठी आहे."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १८३)*


"दोन व्यक्तिमत्वांत टोकाचा फरक असल्यास त्यांच्या आवडीनिवडींत, अभिरुचींतच नव्हे, तर परस्परांना समजून घेण्यातही फरक पडत जातो. विचार करण्याच्या पद्धतींमध्ये फार मोठी तफावत राहते. त्यामुळे एकाला आवश्यक वाटणारी गोष्ट, दुसऱ्याला संपूर्णपणे अनावश्यक किंवा क्षुद्र वाटते. या भिन्न विचारपद्धती, मानसिक एकरूपतेला अवरोध करत राहतात आणि कालांतराने मानसिक अंतर पडणं अटळ होत जातं !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १८५)*


"संतुलित आणि असंतुलित व्यक्तिमत्व असलेल्या अनेक व्यक्तिंच्या वर्तनाचं सूक्ष्मपणे अवलोकन केल्यावर मी अशा निष्कर्षाला आलो होतो, की मूर्खासारखं वागण्याचं बीज निदान काही प्रमाणात तरी माणसाच्या जैविक प्रवृत्तीतच सामावलेलं असतं. इतर प्रसंगी संतुलित आणि वस्तुनिष्ठ विचार करणाऱ्या व्यक्ती कधी कधी मूर्खासारखं वागतात, कारण मूर्खासारखं वागण्याची प्रवृत्ती काही अंशी तरी नैसर्गिकच असते !

या निष्कर्षाच्या पुष्टीदाखल काही पुरावाही मी गोळा केला होता. तो काहीसा असा होता:
▪जगातली सर्व माणसं कधी ना कधी तरी मूर्खासारखं वागतात !
▪जगातली सर्व माणसं एकदाच नव्हे, तर परत परत मूर्खासारखं वागतात !
▪बुद्धिमान गणली जाणारी माणसंही कधी ना कधी तरी मूर्खासारखं वागतात !
▪बुद्धिमान गणली जाणारी माणसं अगदी साध्या प्रसंगातही मूर्खासारखं वागतात !
▪ बुद्धिमान गणली जाणारी माणसं अगदी साध्या प्रसंगातही परत परत मूर्खासारखं वागतात!

या पुराव्यावरून मी स्वतःबाबत जो निष्कर्ष काढला, तो म्हणजे -

अनेक वेळा शहाण्यासारखं वागूनही मी कधी कधी मूर्खासारखं वागतो. कारण मूर्खासारखं किंवा अविवेकी वागणं हा माणसाला मिळालेला जैविक वारसा आहे. म्हणूनच माझं अविवेकी वागणंसुद्धा माझ्या विवेकी वागण्याएवढंच नैसर्गिक आहे ! किंबहुना *मी सदासर्वकाळ विवेकाने वागलंच पाहिजे, हा दुराग्रहही अविवेकी आहे !*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १८६)*


"बहुसंख्य लोकांनी एखादी गोष्ट करणं, हा योग्यतेचा निकष ठरू शकत नाही. हा निकष ग्राह्य धरायचं ठरवलं, तर मग एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत स्त्रियांना दुय्यम लेखण्याच्या अनेक प्रथा बहुसंख्य लोक पाळत होते. पण म्हणून त्या योग्य होत्या, असं आपण म्हणू शकतो का ? अर्थातच नाही. फार फार तर मी असं म्हणू शकेन, की त्या प्रथा पुरुषांना सोयीच्या होत्या, पण म्हणून त्या योग्य नव्हत्या.

एखादी कृती केवळ स्वतःला उपयुक्त असणं, हा त्या कृतीच्या योग्यायोग्यतेचा निकष निश्चितच नाही. याचाच अर्थ एखादी कृती केवळ स्वहित साधत असेल, तर ती योग्य असतेच असं नव्हे ! तर स्वहिताबरोबरच परहित पाहणारी कृती निश्चितपणे योग्य असते, असं म्हणता येईल ! सर्व धर्मही पुरातन काळापासून हेच सांगतात, की इतरांनी तुमच्याशी ज्या प्रकारे वागलेलं तुम्हाला रुचणार नाही, तशा प्रकारे तुम्हीही त्यांच्याशी वागू नका. म्हणजेच, अन्य व्यक्ती अथवा समूहाच्या जागी स्वतःला कल्पून आणि त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करूनही ती कृती योग्य वाटली, तरच ती योग्य असते."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १८९)*


"एखाद्या माणसाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला, तर त्याच्या कृत्यांचं मूल्यमापन करून त्या कृत्याबद्दल शासन देणं योग्य आहे. पण त्यावरून त्या संपूर्ण माणसावरच 'गुन्हेगार' असा शिक्का मारणं मला तर्कदुष्ट आणि अशास्त्रीय वाटतं. कारण तसं मानणं म्हणजे आयुष्याच्या अंतापर्यंत तो मनुष्य गुन्हेच करत राहील, असं त्याच्या भविष्याबद्दल आधीच पूर्वकथन करणं होतं ! असा दृष्टिकोन ठेवणं, म्हणजे त्याला सुधारण्याची संधीच नाकारल्यासारखं होतं."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १९७)*


*"जोपर्यंत समाजात लैंगिकतेचा स्वीकार मोकळेपणी केला जात नाही, तोपर्यंत लैंगिकतेबद्दलच हे छुप आकर्षण कायम राहणार !* धर्म मार्तंडांनी लैंगिकतेवर कितीही कडक निर्बंध घातले, तरी या कडक निर्बंधांमुळे हे आकर्षण थांबणार नाही ! उलट निर्बंध जितके कडक, तितक्याच तीव्रतेने हे आकर्षण वाढीला लागून विकृत मार्गांनीच व्यक्त होण्याची जास्त शक्यता आहे, मानसिक आरोग्य संवर्धन करणारा *लैंगिकतेबाबतचा निकोप दृष्टिकोन जोपासायचा असेल, तर लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याला पर्याय नाही."*

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - १९८)*

सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन सांगतं, की विवाहाच्या मानसिकतेचं मूळ कारण हे सामाजिक आहे. *मानसिक आणि लैंगिकदृष्ट्या विचार केला, तर प्रत्येक व्यक्तीची वैशिष्टयं ही विवाहाला अनुकूल असतातच असं नाही ! पण विवाह करण्यासाठी सामाजिक दडपण एवढं प्रचंड असतं की विवाह झालाच पाहिजे, अशी मानसिक गरज व्यक्तीत निर्माण होत जाते!
विवाह झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपण खरोखरच विवाह का केलेला असतो, या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वतःशी शोधण्याचा प्रयत्न केला, तर आढळून येईल, की विवाह करण्याचा प्रघात असतो म्हणून प्रवाहपतिताप्रमाणे आपण विवाह केलेला असतो ! त्या विवाह करण्याला सामाजिक कारणाशिवाय काही खास कारण नसतं ! विवाहाचा पाया ज्या लैंगिक गरजांवर आधारलेला असतो, त्यांच्याबाबतही आपण फारसा विचार केलेला नसतो. विवाह करताना तो मी नक्की का करतोय; ती माझी मानसिक गरज आहे का; माझी मानसिक आणि लैंगिक गरज जोडीदाराच्या मानसिक आणि लैंगिक गरजांशी मिळतीजुळती आहे का; या प्रश्नांचा विचार विवाहित माणसं फार क्वचित करतात."
(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २०१)


"केवळ अद्भुतरम्य प्रेम आणि शारीरिक आकर्षण, यापलीकडे जाऊन स्वतःच्या मानसिक वैशिष्टयांशी अनुरूप जोडीदार मिळाल्यामुळे विवाह करणारी जोडपी ही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच असतात. वैवाहिक सौख्यासाठी आवश्यक असणारा मानसिक अनुरूपतेचा घटक बहुतांशी दुर्लक्षिलाच जातो. *विवाह करताना केवळ रूप, शिक्षण, सामाजिक स्थान यांसारख्या वरवरच्या घटकांमध्ये अनुरूपता शोधली जाते. अशा विवाहांत मानसिक अनुरूपता या मुख्य घटकाचाच अभाव असतो. पण विवाह टिकवण्याचं सामाजिक दडपण एवढं प्रचंड असतं, की मानसिक अनुरूपता नसली तरीही बरेचसे विवाह हे फक्त निभावून नेले जातात.* अशा वैवाहिक जोडीदारांमधले लैंगिक संबंधही फारसे आल्हाददायक नसतात."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २०१)*

"सामाजिक मानसशास्त्रज्ञांना गवसलेलं सत्य असं आहे, की *समाज पुढारलेला असो व मागासलेला, जगभरातले बहुतांशी विवाह हे सामाजिक आणि आर्थिक घटकांवरच प्रामुख्याने आधारलेले असतात. विवाहसंस्थेची उभारणीच मुळी व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच याच तत्वातून झाली असेल, तर मग विवाहबाह्य संबंध, चोरटे आणि छुपे संबंध, वाढत्या प्रमाणातली लैंगिक गुन्हेगारी, विकृत संबंध, वेश्यागमन अशा गोष्टींना समाजात उधाण येणंही अपरिहार्य आहे.* हे सगळं थांबवून समाजाच्या मानसिक आरोग्याचं संवर्धन करावयाचं असेल, तर मानसिकतेचा विचार करण्यास अग्रक्रमाने प्राधान्य द्यावयास हवं. *मला अभिप्रेत असणारी ही मानसिकता म्हणजे जोडीदाराच्या शारीरिक, मानसिक आणि लैंगिक गरजा या स्वतःच्या गरजांपेक्षा वेगळ्या असू शकतात, या जाणिवेचं भान होय ! हे भान जर दोन्ही जोडीदारांना असेल, तर या गरजांचा आदर ठेवूनही परस्परांच्या स्वातंत्र्याचा हक्क ते मोकळेपणाने मान्य करतील आणि निकोप परस्परसंबंधांची जोपासना करू शकतील.* असे संबंध हे मानसिक आरोग्याच्या संवर्धनाचे द्योतक आहेत."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २०२)*

"कुठला निर्णय घ्यावा याचं मी जसंजसं विश्लेषण करत गेलो, तसंतसं लक्षात येत गेलं, की शंभर टक्के अचूक निर्णय फार क्वचितच घेता येतो ! प्रत्येक निर्णयाचे काहीतरी फायदे-तोटे असतातच ! पण आपण मात्र निर्णय घेताना अशा निर्णयाच्या शोधात असतो, की ज्यामध्ये केवळ फायदेच आहेत, तोटे नाहीत ! केवळ फायदे असलेलाच निर्णय घ्यायचा असेल, तर तिथे निर्णय घ्यायचा प्रश्न उद्भवतच नाही ! ती गोष्ट करूनच आपण मोकळे होतो !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २०२)*

"मनुष्य एकटा राहो नाहीतर जोडीदारासमवेत राहो, पण प्रत्येक मनुष्याला स्वतःचं असं खाजगी आणि स्वतंत्र लैंगिक जीवन असतं. जोडीदारासमवेत राहणाऱ्या मनुष्याच्या जीवनातलं जोडीदारासमवेतचं कामजीवन, हा त्याच्या स्वतंत्र, लैंगिक जीवनाचा एक भाग असतो. पण त्याचं संपूर्ण कामजीवन हे जोडीदारासमवेतच्या कामजीवनापेक्षाही खूप व्यापक असतं. *एकटं राहणं किंवा जोडीदार नसणं, म्हणजे लैंगिक सुखापासून वंचित राहणं नव्हे ! तर एकटं राहूनही, जोडीदार नसतानाही कामतृप्तीचा आनंद स्वतःच्या शरीराच्या माध्यमातून घेता येतो.*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २१४)*

"कुठलीही गोष्ट करताना 'ती मी केलीच पाहिजे' असा विचार जर मनात असेल, तर या विचारातला 'च' हा धोकादायक ठरू शकतो. कारण ती गोष्ट काहीही करून केलीच पाहिजे, असं अत्यावश्यक बंधन तो आपल्यावर लादतो. मी अमुक एक गोष्ट केलीच पाहिजे, असं मनाशी घोकत बसल्याने मनात चिंता उत्पन्न होते; कारण ती गोष्ट आपल्याला करता आली नाही, तर आपण कुचकामी आहोत असं सिद्ध होईल, या विचाराने आपण अतोनात अस्वस्थ होतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २१६)*


"मनुष्य आपल्या सभोवतालच्या घटनांमुळे अस्वस्थ होत नाही; तर त्या घटनांकडे बघण्याच्या त्याच्या दृष्टिकोनामुळे अस्वस्थ होतो.
प्रत्येकाच्याच मनात कुठले ना कुठले दृष्टिकोन दडी मारून बसलेले असतात. प्रत्येकजण त्या दृष्टिकोनांनुसारच सभोवतालच्या परिस्थितीचा व घटनांचा अर्थ लावत असतो."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २२९)*

"घटना किंवा परिस्थिती तटस्थ असते. तिच्यात भावना निर्माण करण्याची शक्ती नसते. तशी असती, तर समान परिस्थितीतल्या सगळ्या लोकांच्या मनात एकच भावना निर्माण झाली असती. पण तसं होताना दिसत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती परिस्थितीचा अर्थ लावून त्या अर्थाचं जे मूल्यमापन करते, त्यानुसार तिच्या भावना ठरत असतात. 

उदाहरणार्थ : एखाद्या विद्यार्थ्याने नापास झाल्यामुळे आत्महत्या केली, असं आपण विधान करतो, पण हे खरं नाही ! जर हे खरं असतं, तर नापास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानेच आत्महत्या करायला हवी. तसं होताना दिसत नाही. याचाच अर्थ असा, की विशिष्ट विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं कारण हे नापास होणं नाही, तर त्या घटनेचा तो जो अर्थ लावतो, ते आहे !"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २३०)*


"जीवनातली प्रत्येक घटना किंवा परिस्थिती आपण नियंत्रित करू शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता, आपण दुराग्रहाने ती नियंत्रित करायला जातो. आपला हा दुराग्रह, समस्यांचं निराकरण करण्याच्या मार्गात नको त्या भावनिक अडचणी निर्माण करतो. *जर परिस्थिती पूर्णपणे बदलता येण्यासारखी नसेल, तर खळखळ न करता तिचा स्वीकार केला, तर त्याच परिस्थितीतल्या ज्या गोष्टी बदलणं शक्य असतं, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं सुलभ होईल.*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २३१)*

"स्वतःला बदलणं हे आपल्या हातांत आहे. माणूस आधी अपरिवर्तनीय परिस्थिती बदलण्यासाठी झगडत राहतो. ती बदलत नाही, म्हणून अधिकाधिक कष्टीही होत जातो. या सगळ्या खटाटोपापेक्षा स्वतःला बदलणं हे आपल्याच हातांत आहे; याचाच त्याला विसर पडतो.

*स्वतःत बदल करायचा म्हणजे इतर व्यक्ती किंवा बाहेरच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन विवेकी ठेवण्याचा प्रयत्न करायचा.*

उदाहरणार्थ, नोकरीत वरिष्ठांशी पटत नसेल आणि काही कारणाने नोकरी बदलणंही शक्य नसेल, तर वरिष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर मानसिक क्लेश कमी होतील."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २३१)*


"मला अभिप्रेत असणारा विवेकी दृष्टिकोन वस्तुस्थितीवर आधारलेला आहे. *विवेकी विचार करणं, ही तितकीशी सोपी गोष्ट नाही.* बऱ्याचशा दुःखांचं आणि मानसिक क्लेशांचं मूळ अशास्त्रीय, तर्कदृष्ट, अवास्तव अशा अविवेकी विचारांमध्येच सापडतं. म्हणूनच *विवेकनिष्ठ विचार करण्याची सवय लहान वयापासून अंगवळणी पडली, तर समाजाचं मानसिक आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे.*"

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २३१)*


"विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची उभारणी ही विवेकवादी विचारसरणीवर झालेली आहे. भावनिक अस्वस्थता दूर करणं, हे याचं उद्दिष्ट आहे. *भावनिक अस्वस्थता ही केवळ भोवतालची परिस्थिती किंवा अन्य व्यक्ती निर्माण करत नाही, तर ती प्राय: आपली आपणच निर्माण केलेली असते. बाह्य जगातल्या घटनांकडे आणि इतरांच्या वर्तनाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याचा काय अर्थ लावतो व मूल्यमापन करतो, यावरच आपल्या हर्ष-खेद, सुख-दुःख इत्यादी भावना प्रामुख्याने अवलंबून असतात. ज्याप्रमाणे आपली अस्वस्थता आपण निर्माण करू शकतो, त्याचप्रमाणे तिचं उच्चाटन करणंही आपल्याच हातांत असतं.*

विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र सांगतं, की भावनिक अस्वस्थता दूर करायची असेल, तर चालू घटकेला कोणते अविवेकी दृष्टिकोन मनात धिंगाणा घालत आहेत, हे आपण प्रथम शोधलं पाहिजे. मग त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांचा नायनाट करण्याचं तंत्र आत्मसात केलं पाहिजे. भावनिक अस्वस्थतेचं कारण मुख्यतः अविवेकी विचारसरणीत असतं. म्हणून स्वतःला विवेकी विचार करण्याची सवय लावून घेतली, तर आपण जीवन सुखाने व समाधानाने व्यतीत करु शकू."

*(मी अल्बर्ट एलिस, डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक - २३१)*

"प्रत्येक मनुष्य मनात जोपासलेल्या दृष्टिकोनानुसार विचार करत असतो, मी या दृष्टिकोनांचे दोन भाग पाडले आहेत. एक आहे, विवेकी दृष्टिकोन आणि दुसरा आहे, अविवेकी दृष्टिकोन.

*विवेकी दृष्टिकोन विकासाला मदत करणारे असतात, तर अविवेकी दृष्टिकोन विकासात अडथळा आणणारे असतात.*

मुळात हे दृष्टिकोन आपल्या मनात तयार होतातच कसे ?

त्याचं एक कारण म्हणजे, *विशिष्ट दृष्टिकोन आत्मसात करण्याकडे माणसाचा जन्मजात कल असतो.*
दुसरं कारण म्हणजे, *भोवतालच्या समाजातून चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य, हितकारक-अहितकारक याबाबतची त्याला मिळत असलेली शिकवण !*
आणि तिसरं कारण म्हणजे, *आपण स्वतःच स्वतःचे ठरवलेले दृष्टिकोन*

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*


"आपल्या मनात ठाण मांडून बसलेले अनेक दृष्टिकोन आपण स्वतंत्र विचार करून किंवा शास्त्रीय कस लावून स्वीकारलेले नसतात. त्यामुळे अनेक तर्कदुष्ट आणि अवास्तव दृष्टिकोन आपण उराशी कवटाळून बसतो. राग, मत्सर, वैरभाव, अपराधी भावना, द्वेष अशा आत्मविघातक भावनांच्या मुळाशी हेच सदोष दृष्टिकोन असतात. यांनाच मी 'अविवेकी दृष्टिकोन' असं संबोधतो. हेच दृष्टिकोन भावनिक अस्वस्थतेला जन्म देतात."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*

"जेव्हा एखादा विचार आपल्याला अंतर्बाह्य पटलेला असतो, तेव्हा त्या विचारांचा पाठपुरावा करण्याचं बळ आपल्याला प्राप्त होतं. ते इतकं प्रभावी असतं, की एकट्याने झुंज लढवण्याचं सामर्थ्य विनासायास एकवटून येतं."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*

"आपल्या विचारप्रक्रिया इतक्या प्रभावी असतात, की भावना आणि वर्तनात परिवर्तन घडवून आणण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं ! विचार आणि भावना एकमेकांशी इतके निगडित झालेले असतात व त्यांचं अस्तित्व इतकं परस्परावलंबी असतं, की रोजच्या व्यवहारात आपले विचार हेच आपल्या भावना होतात व आपल्या भावना आपल्या चिंतनाचा एक भाग होतात."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*


"जर अपराधी भावना किंवा चिंता न बाळगता हस्तमैथुन केलं जात असेल, तर त्याच्यासारखं किफायतशीर, अपायहीन आणि मानसिक ताणतणाव कमी करणारं दुसरं कृत्य शोधूनही सापडणार नाही."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*


"माणसाचं मूल्य किंवा लायकी त्याच्या पराक्रमावर, कार्यक्षमतेवर आणि यशस्वितेवर ठरते, या गृहितकामुळे माणूस यशस्वी होण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहतो. हा प्रयत्न करत असताना एक गोष्ट तो नजरेआड करतो. *यश जसं कर्तृत्वावर अवलंबून असतं, तसंच ते बाहेरच्या परिस्थितीजन्य अनेक घटकांवरही अवलंबून असतं. हे घटक बहुतेक वेळा आपल्या नियंत्रणाबाहेरचे असतात आणि तेही बदलते असतात.* त्यामुळे एखादा माणूस जीवनातल्या सर्वच बाबतीत सदासर्वदा यशस्वी होत राहणं, ही अशक्य गोष्ट आहे.

याचाच अर्थ असा, की *कुठल्याही कृतीत माणसाने 'माणूस' म्हणून वैयक्तिक मूल्य गुंतवलं असेल, तर ते धोकादायक ठरतं.* एखाद्या माणसाने यशस्वी होण्यात वैयक्तिक मूल्य गुंतवलं असेल, तर प्रत्येक बाबतीत मी यशस्वी झालंच पाहिजे, ही समजूत त्याच्या मानगुटीवर घट्ट बसते. परिणामी वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करून यशस्वी व्हायचा तो पराकोटीचा प्रयत्न करतो. जर यश मिळालं, तर त्याचाही आनंद त्याला निर्भेळपणे उपभोगता येत नाही. कारण हे यश टिकेल की नाही, याचं दडपण त्याच्या मनावर सतत राहतं. म्हणजेच *यशस्वी होऊनही तो प्रक्षुब्धच असतो.*

यशस्वी माणसासारखाच अयशस्वी माणूसही प्रक्षुब्ध असतो ! कारण तो ही आपलं मूल्य किंवा लायकी यशस्वी होण्यावर अवलंबून ठेवत असतो. यामुळे जर तो अयशस्वी झाला तर आपलं संपूर्ण मूल्यच कमी झालं, असं समजून तो ते पचवू शकत नाही आणि प्रक्षुब्ध होऊन टोकाच्या प्रतिक्रिया देतो."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*

"माणूस केवळ अस्तित्वात आहे म्हणून त्याला मूल्य आहे. जिवंत असणं, सजीवता असणं, अस्तित्वात असणं हीच एक मौल्यवान गोष्ट आहे! यशस्वी असणं किंवा नसणं, हा त्या माणसाचा गुणविशेष आहे. तो यशस्वी किंवा अयशस्वी असला, तरी त्यामुळे त्याचं 'माणूस' म्हणून मूल्य कमी-जास्त होत नाही."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*


"माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या संदर्भात 'मूल्य' ही संकल्पनाच अर्थहीन आहे. कुणाच्याही बाबतीत संपूर्ण व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या माणसाला 'चांगला माणूस' किंवा 'वाईट माणूस' ठरवणं हे तर्कदृष्ट्याही बरोबर नाही. *आपण एखाद्याचं वर्तन चांगलं किंवा वाईट ठरवू शकतो. पण त्याऐवजी त्याच्या संपूर्ण मनुष्यत्वावरच 'चांगला' किंवा 'वाईट' असा शिक्का मारणं, हे त्याच्यावर अन्यायकारक आहे.* असा शिक्का मारला तर आयुष्यभर त्याच्या मृत्यूपर्यंत तो असाच वागणार आहे, असं आपण आधीच गृहीत धरतो ! त्याच्या वागण्यात बदल होण्याच्या शक्यतेचा आपण विचारच करत नाही !

याचाच अर्थ असा, की एखादा माणूस एकदा चांगला वागला, म्हणजे तो कायमचा चांगला ठरत नाही. तसंच एखादा माणूस एकदा वाईट वागला म्हणून कायमचा वाईट ठरत नाही ! म्हणजे *आपण एखाद्या माणसाच्या वागण्याचं मूल्यमापन करू शकतो, पण 'संपूर्ण' माणसाचं नाही !* यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे *आपल्या लहान-मोठया वर्तनप्रकारांनी 'संपूर्ण मी' बनला आहे. आपलं एखादं विशिष्ट वर्तन म्हणजे 'संपूर्ण मी' नव्हे !*"

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*


*"माणसाने स्वतःच्या गुणविशेषांसकट, बऱ्या-वाईट वर्तनासकट, आपण जसे आहोत तसा बिनशर्त स्वीकार केला, तर त्याची भावनिक अस्वस्थता कमी होऊ शकते.* कारण आपण स्वतःचा स्वीकारही कित्येक अटी लादून म्हणजेच सशर्तपणे करत असतो.
उदाहरणार्थ, एखादी गोष्ट उत्तम रीतीने केली किंवा विशिष्ट पद्धतीनेच वागलो, तरच आपण स्वतःला आवडून घेतो ! त्यात कमी पडलो, की स्वतःलाच बोल लावत बसतो ! *आपण जसे आहोत तसा स्वतःचा स्वीकार न केल्यामुळे, आत्मघातकी भावनांची वादळंही मनात निर्माण करतो !"*

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*


"माणूस मुळातच प्रमादशील प्राणी आहे. त्याने स्वतःच्या चुकांचा क्षमाक्षीलतेने स्वीकार केला पाहिजे. *आपणच स्वतःचा स्वीकार करायचं नाकारलं, तर इतरांनी स्वीकार करायची अपेक्षा तरी कशी काय ठेवू शकतो ? स्वतःचा बिनशर्त स्वीकार केला, तर या पृथ्वीतलावरील किमान एक तरी माणूस आपल्या हिताचं रक्षण करत आहे, याची आपण खात्री बाळगू शकतो !* अशाच पद्धतीने आपण इतरांचा आणि परिस्थितीचाही बिनशर्त स्वीकार करू शकतो.

स्वतःचा, इतरांचा आणि परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार करणं म्हणजे मनःशांती प्राप्त करून घेणं! असा स्वीकार करणारा माणूस केवळ सहनशीलता आणि सहिष्णुताच दाखवतो असं नाही, तर जीवनातली अनिश्चितता, संदिग्धता, अज्ञान, चुकलेले आराखडे, अस्ताव्यस्तता किंवा गोंधळ यांचीही कण्हत-कुंथत नव्हे, तर मोकळेपणाने स्वीकार करतो."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*


"आपलं आयुष्य हे समुद्रात भटकणाऱ्या लाकडी ओंडक्याप्रमाणे नसतं, तर सुकाणू असलेल्या जहाजाप्रमाणे असतं ! या सुकाणूचं नियंत्रण आपल्याच हातात असतं ! जहाज कुठे वळवायचं, ते कसं बदलायचं, कुठला मार्ग आक्रमायचा, हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं !"

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*

"प्रणयी युगुल जेव्हा स्वतःच्या सुखाबरोबरच जोडीदाराच्या सुखावर लक्ष केंद्रित करतं, तेव्हा तो प्रणय नुसता प्रणय नसतो ! तर परस्परांना स्फूर्ती देणारं, चैतन्य देणारं अमृत असतं, जीवनातली सर्वात प्रभावशाली अशी प्रेरणा असते."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*

"सर्वसाधारणपणे असा समज असतो, की लहान वयात मुलांचे विचार हे अपरिपक्व आणि स्वप्निल असतात, त्यामुळे विवेकी विचार अंगात बाणवणं कठीण असतं. याउलट माझं म्हणणं असं होतं, की *जर अविवेकी दृष्टिकोनांतून विचार करण्याचा कल लहान वयात दिसून आला तर तो बदलणं, प्रौढ वयापेक्षा सोपं जातं. कारण जसजसं वय वाढत जातं, तसतसे अविवेकी दृष्टिकोन हे केवळ दृष्टिकोनांपुरतेच मर्यादित राहत नाहीत, तर जीवन-तत्वज्ञानाचा ते एक अविभाज्य दृष्टिकोन हे फोफावण्याच्या आतच मुळापासून उपटून काढणं सोपं जातं.* अविवेकी विचारसरणीमुळे समस्या कशा निर्माण होतात, हे मुलांना दाखवून दिलं तर विवेकी विचार ते सहजपणे आत्मसात करू शकतात."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी)*

"धार्मिकता ही मानसिक आरोग्याला मारक असण्यापेक्षा धर्मांधता ही मानसिक आरोग्याला मारक असते. धर्मांधता म्हणजेच धर्मावर असलेला आंधळा, कट्टर किंवा ताठर विश्वास !

*एखाद्या माणसाचा धर्मावर असलेला विश्वास, हा त्याच्या मानसिक आरोग्याचं नुकसान करत नाही. पण नुसत्या विश्वासाऐवजी, विशिष्ट धर्मच सर्वश्रेष्ठ आहे किंवा विशिष्टच धर्माचं पालन सर्वांनी करायला पाहिजे, अशा प्रकारचा आंधळा, कट्टर किंवा ताठर विश्वास मात्र निश्चितच मानसिक आरोग्याचं नुकसान करतो.*

केवळ धर्मच नाही तर कुठल्याही विचारसरणीवरचा आंधळा, कट्टर किंवा ताठर विश्वास हा सुद्धा मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असतो, हाच नियम लागू करायचा झाला, तर नास्तिकतेलाही लागू करता येईल. *ईश्वरावर विश्वास न ठेवणं, या केवळ एकमेव मार्गानेच भावनिक स्वावलंबन येऊ शकतं, अशी विचारसरणीही हटवादी आहे. कारण एकदा का अशी हटवादी विचारसरणी स्वीकारली, की मग इतर मार्ग किंवा इतर मतप्रवाहांवर विचार करण्याची लवचिकता नष्ट होते. म्हणजेच नास्तिकतासुद्धा आंधळी, कट्टर आणि ताठर असू शकते.* ती तशी असेल, तर मानसिक आरोग्याला मारक असू शकते."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३०७)*


"कुठल्याही गोष्टीबाबतचं आपलं मत-मग ती आस्तिकता असो नाहीतर नास्तिकता - मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम करत नाही. पण त्या मताकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र लवचिक नसेल, हटवादी असेल किंवा केवळ माझाच दृष्टिकोन सर्वश्रेष्ठ आहे अशा स्वरूपाचा ताठर असेल, तर मात्र मानसिक आरोग्यावर निश्चितच दुष्परिणाम होऊ शकतो."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३०८)*


*"अविवेकी प्रवृत्ती झुगारून देण्याकरता आयुष्यात काहीतरी विलक्षण घडावंच लागतं हीच मुळी एक अविवेकी कल्पना आहे !* आपल्यात बदल होण्यासाठी कुठलीतरी घटना घडावी लागते, हा दृष्टिकोन मनात किती खोलवर रुजलेला असतो. तसं पाहिलं तर, प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही तरी घडतच असतं. पण त्या घडण्यापेक्षाही महत्वाचं असतं, ते तुम्ही त्या घडण्याबद्दल विचार करून त्याला काय प्रतिसाद देता ते!"

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३०९)*


"माझा दृढ विश्वास आहे, की आपल्यात हवा तसा बदल करणं हे पूर्णपणे आपल्याच हातात असतं आणि कुठली सवय अंगात बाणवायची किंवा नाही याचं स्वातंत्र्यही पूर्णपणे आपलंच असतं."

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३१०)*

*"कुठल्याही व्यक्तीचं कार्य हे त्या व्यक्तीपेक्षाही मोठं होतं, तेव्हा पुरस्कारासाठी खटपट करावी लागत नाही ! तर आपणहून वाट शोधत चालत येतात.* ते मिळाले, तरी तो चार दिवसांचा लखलखाट असतो, याचं भान कधीच सुटू दिलं नाही मी ! त्यांचा कालावधी फार छोटा असतो. तो संपला, की ना ती व्यक्ती कुणाच्या स्मरणात असते, ना तिचा तो पुरस्कार! हे पुरस्कार नंतर अडगळच ठरतात!

म्हणूनच पुरस्कारांपेक्षा लेखनाचं मला महत्व जास्त वाटतं ! *आपलं कार्य लिखित स्वरूपात असलं, की ते अडगळ ठरत नाही ! विचारांचा वारसा पुढेपुढे संक्रमित करत राहण्याची ताकद त्या लेखनात असते! मृत्यूमुळेही ही ताकद थांबत नाही ! म्हणूनच लेखनाचं योगदान हे अनमोल असतं."*

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३२७)*


रुग्णशय्येवर असताना एका पत्रकाराने एक खोचक प्रश्न विचारला होता, *"सोळा तासांच्या अथक कामाच्या दिनक्रमाची सवय असताना, अचानक अंथरुणाला खिळून पडण्याची वेळ जेव्हा आली, तेव्हा तुम्हाला काय वाटतं?"* 
क्षणाचाही अवधी न दवडता मी उत्तर दिलं होतं, *"अंथरुणाला खिळून पडल्यावर काम करता येत नाही, हीच मुळी एक अविवेकी कल्पना आहे ! त्यामुळे कदाचित दृश्य पातळीवरचं काम आपण करू शकणार नाही. पण मानसिक पातळीवरचं चिंतनाचं काम करायला आपल्याला कुणीही अडवू शकणार नाही !"*

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३२७)*


"रक्ताची असोत नाहीतर कुठलीही, मुळात नाती अशी भुसभुशीतच असतात का ? जरासा धक्का लागला तरी सहजपणे उन्मळून पडणारी ! उगाचच खत-पाणी घालत ती फुलण्याची वेडी आशा मनाशी धरून जोपासत बसतो आपण ती ! मग एक दिवस कळतं की रंगीबेरंगी फुलं आलेल्या या नात्यांची मुळं खोलवर रुजलीच नव्हती ! आणि मग एकटंच असतो आपण ! स्वतःचं स्वतःशीच नातं जोपासायला लागतं मग ! मग म्हणूनच जीव तोडून सांगत असतो सगळ्यांना, की स्वतःवर भरवसा ठेवण्याची, स्वतःवर अवलंबून राहण्याची सवय पहिल्यापासून अंगात बाणवा ! वादळापासून स्वतःचं रक्षण करायचं असेल, तर स्वतःच स्वतःला सावरायला लागणार आहे तुम्हाला !"

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३३३)*


*"आयुष्यात विकसित होणारी काही नाती अशी असतात, की रूढ नात्याच्या कुठल्याच साच्यात ती बसू शकत नाहीत ! ती इतकी सखोल असतात, की नातं या शब्दाचे बंधही भेदण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं."*

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३३६)*


"एक धीरगंभीर आवाज ऐकू येतोय ! माझ्याच विचारांचा प्रतिध्वनी आहे तो! आता मृत्यूच्या दारात तर अधिकच जोमाने स्वतःचं अस्तित्व जाणवून देतोय !

तो सांगतोय, *अवघड परिस्थितीवरही मात करण्याचं सामर्थ्य मनुष्याच्या विचारशक्तीत आहे आणि विचारशक्तीचं हे सामर्थ्य हेच मनुष्याचं वेगळेपण आहे !*

मला ऐकू येणारा हा आवाज दशदिशांत तसाच झंकारत राहू दे !.... मानवजातीला उपयोग होण्याचं सामर्थ्य त्या आवाजात आहे. असा उपयोग झाला, तर मला कृतार्थ वाटेल.... हा आवाज जास्तीत जास्त प्रबळ व्हावा, हीच माझी अंतिम इच्छा आहे.... माझ्या विचारांबाबत आस्था बाळगणाऱ्या देश विदेशांतल्या सर्वांनाच माझं शेवटचं सांगणं आहे, की माझी अंतिम इच्छा पूर्ण करा ! तीच मला वाहिलेली खरीखुरी आदरांजली असेल !"

*(संदर्भग्रंथ : मी अल्बर्ट एलिस, लेखिका : डॉ. अंजली जोशी, पृष्ठ क्रमांक : ३३६)*

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...