Flash

Wednesday, 19 April 2017

इस्लाम मध्ये समता आहे का ?

इस्लाम मध्ये समता आहे का ?
पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)
बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)
इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९)
मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :
" नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा "
: डॉ आंबेडकर (८-२३०)
.---------------------------------
----------------------------------
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -
" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१)
-----------------------------------
-----------------------------------
पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)
जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...