Flash

Wednesday, 26 April 2017

आठवणी शिलेदारांच्या

जिजाऊंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हाती घेतलेला उपक्रम
आठवणी शिलेदारांच्या
*आठवणी लोकराज्याच्या*
स्त्री शिक्षणासंदर्भात शाहू महाराज आपले विचार जनमानसात रुजविण्यात यशस्वी होऊ लागले असे एका उदाहरणावरून दिसून येते. कोल्हापूर येथे अखिल भारतीय मराठा महिला परिषदेच्या स्वागताध्यक्ष पदावरून भाषण देत असताना राणी इंदुमतीसाहेब म्हणाल्या होत्या की ," *ही परिषद शैक्षणिक असल्यामुळे येथे मुलींच्या शिक्षणाचा विचार करणे जरूरीचे आहे. तुम्ही मुलांना व पुरुषांना शिक्षण द्याल पन जोपर्यंत स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल तोपर्यंत चालू परिस्थिती आहे अशीच राहील. समाज आपल्यातील स्त्रीवर्गाच्या पातळीच्यावर कधीच चढू शकणार नाही. पुरुषाचे शिक्षण हे एक व्यक्तिशिक्षण, पन स्त्री शिक्षण म्हणजे सार्या घराचे शिक्षण असते. स्त्रीयांना मुलांची जोपासना, आहारशात्र, निरोगीपनाची तत्त्वे, आरोग्य व सफाईशात्र, रोग्याची शुश्रुषा, जोडधंदे आणी कला वगैरे शिकवणे आवश्यक आहे. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यायोगे त्यांची मने भोळसर धार्मिक समजूतीतून मुक्त होतील, असा प्रसार करावयास पाहिजे.* "
राणी इंदुमतीसाहेबांच्या या सडेतोड विचारसंपदेतून स्पष्ट होते की राजर्षींचा स्त्री शिक्षण विषयक विचार किती खोलवर इंदुमती राणीसाहेब यांच्या मनात मुरला होता.
संदर्भ 'इंदुमती राणीसाहेब'
लेखक- कृ गो सुर्यवंशी


*आठवणी लोकराज्याच्या*
शिक्षण ही सर्व प्रकारच्या सुधारणांची गुरुकिल्ली आहे हे सांगताना राजर्षी म्हणत" *आम्ही कसे खावे, श्वास कसा घ्यावा, हे ही आम्हास शिकले पाहिजे. हे सांगणे जसे चमत्कारिक दिसते. तथापि ही गोष्ट खरी आहे. हल्लीच्या काळात शेतकी इतकी पद्धतशीर झाली आहे की ज्याला यात यश मिळवायचे आहे, त्याला त्या विषयावरील पुस्तके वाचता आली पाहिजेत व ती समजली पाहिजेत. अर्वाचीन युद्धपद्धतीत शिक्षणाची अत्यंत जरुरी आहे. प्रत्येक सैनिकास संग्रामशास्त्रावरची पुस्तके वाचता आली पाहिजेत. या ठिकाणीसुद्धा शिक्षणाचा प्रश्न आपल्यासमोर येतो. जर मराठे लोकांना शिक्षण मिळेल तर ते खात्रीने चांगले योद्धे होतील. हल्लीच्या लढाईच्या दिवसांत तोफखाण्यावरील लोक उत्तम गणिती असले पाहिजेत म्हणूनच ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते. आणी सर्व स्थितीचा विचार करता एकच तत्त्व निघते ते हे की, प्रत्येकजन चांगला सुशिक्षित झाला पाहिजे.* "
रयतेच्या मनात शिक्षणाची प्रेरणा जागी करण्याचे महान कार्य करणारा राजा
संदर्भ- राजर्षी शाहू छत्रपती जीवन व शिक्षण कार्य
लेखक- रा. तु. भगत

*आठवणी लोकराज्याच्या*
राज्यरोहणानंतर शाहू महाराज राजवाड्यात चार भिंतीत राजविलास भोगत न राहता संस्थानाचा दौरा त्यांनी सुरू केला
एकदा त्यांना हृदयद्रावक घटना पहावयास लागली
उसाच्या गुर्हाळात शेतकऱ्यांचे हात उस गाळताना घाण्यात सापडताना दिसले
महाराजांना असे चाललेले शेतकऱ्यांचे हाल पाहून दुःख झाले. व लगेच त्यांनी एक जाहीरनामा काढला
*"घाण्यामध्ये हात सापडणार नाहीत अगर तो सापडलाच तर त्यास इजा होणार नाही, अशा तर्हेची त्यात काही यांत्रिक युक्ती तारीख १ जानेवारी १८९६ च्या आत कोणी शोधून काढल्यास ज्याची युक्ती सोपी, थोडक्या खर्चात होणारी व पसंत अशी ठरेल, त्यास चांगले बक्षीस देण्यात येईल."*
शेतकऱ्यांच्या- सामान्य मानसांच्या सुखदुःखात असणारी शाहू महाराजांची समरसता आणी वैज्ञानिक दृष्टिकोन यातून प्रत्ययास येतो
संदर्भ- शाहू महाराज आणी कायदेकानू
संपादक- द. रा. बगाडे

*आठवणी लोकराज्याच्या*
राणी इंदूमतीदेवींना शिक्षण देण्याच्या संदर्भात राजर्षींचे स्त्री शिक्षणविषयक विचार पुढे आले. राणी इंदुमतीदेवींना लिहिलेल्या एका पत्रात राजर्षी म्हणतात ," *शिक्षणामुळे तुझी बुद्धी जसजशी विकास पावत जाईल तसतसे तुझे विचार अधीक उदात्त होत जातील. म्हणून आभ्यासाची हेळसांड करू नकोस. तुला सुशिक्षित करण्याची माझी फार इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्याचे तुझे कर्तव्य आहे. ही आशा फलद्रुप करण्याची सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे. अशिक्षित मनुष्याला शारीरिक दृष्टी असली तरी तो आंधळा आहे हे सांगावयास पाहीजे असे नाही.* "
एखाद्या राजाजवळ किती उदात्त विचार असू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षी होय.
संदर्भ- 'इंदुमती राणीसाहेब'
लेखक- कृ. गो. सूर्यवंशी

*आठवणी लोकराज्याच्या*
राजर्षींचा स्त्री शिक्षण विषयक लढा अविरत चालू राहीला. राजर्षी स्त्री शिक्षणविषयक केवळ विचार कार्य करून थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या राज्यातील स्त्री शिक्षण प्रसारासाठी आज्ञा काढली. ती पुढीलप्रमाणे - " *मागासलेल्या लोकांत पडदा नाही. तेंव्हा मागासलेल्या जातीतील बायका ज्यांना विद्या शिकण्याची इच्छा असेल त्यांनी मे. आप्पासाहेब व मामासाहेब सुर्वे यांच्याकडे अर्ज करावेत. म्हणजे ते बोर्डिंगची व लॉजिंगची व्यवस्था करतील. हा हुकूम गँझेट करावा"*
यासंदर्भात राजर्षींनी केलेले नियम वाचनिय आहेत. " *शिक्षणाचा प्रसार फार मंदागतीने होत आहे, म्हणून भारतातील स्त्रीयांची स्थिती सुधारणेकामी शिक्षणाचा उपयोग व्हावा तितका होत नाही. घरातील स्त्रियांना शासन करण्याच्या पुरूषी मानसिकतेमुळे स्त्रीयांना वाटेल तशा वाईट रितीने वागविण्याचा परवाणाच मिळाला आहे असे पुरुषांची समजूत झालेली दिसते. याकरिता स्त्रीयांना देत असालेल्या जाचाचे जे प्रकार इंडियन पिनल कोडच्या मर्यादेत येऊ शकत नाहीत अशा प्रकारच्या जाचापासून होणाऱ्या दुष्परिणामास आळा घालावा म्हणून हे नियम करणे आवश्यक असल्याचे दिसून येते."*
राजर्षींच्या या विचारातून स्त्रीजीवन आणी शिक्षणविषयक मानवतावादी दृष्टिकोन चटकन डोळ्यांत भरतो.
संदर्भ- 'शाहू महाराज आणी कायदेकानू'
संपादक- द. रा. बगाडे

*आठवणी लोकराज्याच्या*
शिक्षणातील अडचणीवरील उपाययोजना सांगताना शाहू महाराज म्हणतात, " *आता आपल्या भारतातील स्थिती पाहू गेल्यास इकडे मुख्य मागासलेला वर्ग म्हणजे शेतकऱ्यांचा आहे. मीही त्यापैकीच एक आहे. येथे सुशिक्षित व मागासलेले यांच्यामधील प्रश्न अगदी अलीकडचा आहे. जातीभेदामुळे भारताचे अत्यंत नुकसान केले आहे असे माझे ठाम मत आहे. पुढारलेल्या वर्गाकडून मागासलेल्यांच्या हितसंबंधाचे रक्षण होणे शक्य नाही. मोफत व सक्तीचे शिक्षण लवकरच सुरू होईल असे वाटत होते, परंतु मागासलेल्या जातीचे प्रतिनिधी कौन्सिलात असल्याशिवाय या प्रश्नांची उठावणी लवकर होणार नाही असे दिसत आहे. यासाठी शांततेच्या मार्गाने आपला हेतू साध्य केला पाहिजे. ऐक्य, परस्परांवर प्रेम, विश्वास व चिकाटी न सोडता अव्याहत प्रयत्न हीच आमची या झगड्यातील शस्त्रे आहेत."*
संदर्भ- राजर्षी शाहू महाराजांची भाषणे
संपादक - बी. बी. जाधव

*आठवणी लोकराजाच्या*
राजर्षींची स्त्री शिक्षणाबद्दलची साहसी वृत्ती आणी मानवतावादी विशाल दृष्टी खरोखरच कौतुकास्पद होती. ज्या काळात राजर्षींनी स्त्री शिक्षणाचे कार्य केले त्या काळात स्त्रीयांनी शिक्षण घेणे हे एक पाप समजण्यात येई, त्याकाळात बालविवाह व पर्दापद्धतही रूढ होती. अशावेळी राजर्षींनी स्त्री शिक्षण क्षेत्रात एक नवा प्रशस्त मार्ग निर्माण केला. संस्थानात विशेष अधिकारी म्हणून राधाबाई केळवकर यांची नेमणूक केली. आपल्या विधवा सुनेच्या जीवनाविषयी विचार करताना राजर्षी म्हणाले होते की," *ही जर अशीच अडाणी राहीली तर केरापोतेर्याचे जीवन तिला मरेपर्यंत कंठावे लागेल, तेव्हा तिला मानसासारखे जगता आले पाहिजे, त्याचबरोबर तिला स्वतःचे संरक्षण करण्याचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. आणी हे साध्य होण्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे.* "
संदर्भ -'राणी इंदुमतीसाहेब'
लेखक- कृ. गो. सूर्यवंशी

*आठवणी लोकराजाच्या*
नाशिकमधील श्री उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृह या संस्थेच्या पायाभरणी करत असता केलेले भाषणात कोल्हापूर संस्थानातील झालेल्या उत्कर्षाबाबत अभिमानाने सांगताना राजर्षी म्हणतात
" *माझ्या चिमुकल्या राज्यातील प्रजाजनांनी एका बाबतीत तरी विशेष नाव कमविले आहे. हे मी अभिमानपुर्वक सांगतो. त्यांचे उदाहरण लोकांपुढे आल्याने हा कित्ता पुष्कळ ठिकाणी गिरवला गेला आहे. ब्रिटिश पार्लामेंटला ' मदर आँफ पार्लमेंटस्' असे मोठ्या अभिमानाने इंग्रज व इतर लोक म्हणतात. त्याप्रमाणे कोल्हापूरास 'मदर आँफ बोर्डिंग हाऊसेस' म्हणजे विद्यार्थी वसतिगृहाची माता असे सार्थ यश मिळाले आहे.* "
रयतेच्या शिक्षणासाठी असलेली तळमळ कृतीत उतरवणारा असा हा लोकराजा
संदर्भ
राजर्षी शाहू महाराजांची भाषणे
संपादक - बी. बी. जाधव

*आठवणी लोकराजाच्या*
राजर्षी शाहूंच्या दुरदृष्टीमुळे कोल्हापूर हे शिक्षणाचे अग्रगण्य केंद्र ठरले. यापाठीमागे राजर्षींचे उदात्त व उदार शिक्षण धोरण होते. म्हणून ते सर्व जातीच्या पुढाऱ्यांना ऊद्देशून म्हणाले होते की," *तुम्ही अतूरदृष्टी बनू नका, भविष्यकाळाकडे दृष्टी फेका. जातीभेद मोडणे ही जरूरीची गोष्ट आहे. जातीभेदाला पुष्टी देणे हे पातक आहे. जातीसभा भरवा पण त्या एक ध्येय गाठण्यासाठी साधने आहेत हे विसरू नका. या जातीपरिषदांची अखेर ही जातीभेदांची अखेर ही असली पाहीजे. परशूरामाने क्षत्रियांचा केलेला उच्छेद असो किंवा पेशव्यांनी ब्राम्हणेतरांच्या घरावर फिरवलेली नांगर या रोगाचीच चिन्हे आहेत. असे नसते तर आपले रक्षण करणाऱ्या शिवाजी महाराजांना व इतर मराठा वीरांना शूद्र म्हणून संबोधण्याचे त्यांना काय कारण होते? हा जातीद्वेश नष्ट करायचा तर जातीभेदच नष्ट केला पाहिजे.* "
संदर्भ- 'श्री शाहू छत्रपती यांचे चरित्र '
लेखक- आ. बा. लठ्ठे

*आठवणी लोकराजाच्या*
लोकांच्या मनातून सहसा जात नाही त्याला 'जात' असे म्हटले जाते. शाहू महाराज म्हणायचे जातीसाठी माती खाण्याच्या पद्धतीला मुठमाती दिल्याशिवाय आपल्याला स्वराज्यासाठी काहीच करता येणार नाही. " *स्वराज्य अशी ओरड चोहीकडे ऐकू येत आहे. स्वराज्य आम्हाला पाहिजे आहेच. त्यायोगे आमच्यात चैतन्य उत्पन्न होईल. जोपर्यंत भारतभुमी जातीबंधनांनी निगडीत राहील तोपर्यंत स्वराज्य स्थापनेपासून मिळनारे फायदे त्यास घेताच येनार नाहीत. येथील सत्ता उच्च वर्गाच्या हाती जाईल. विचारांती माझे मत असे झाले आहे की, आमची सध्याची जातीबंधने तोडून टाकण्याचा काळ येईल, आमच्यातील अंतस्थ कलह नाहीसे करण्यास आणी आम्हाला स्वराज्यास प्राप्त करून घेण्याकरता ही अनर्थकारक जातिपद्धती झुगारून देणे आम्हास आवश्यक आहे."*
संपूर्ण राजकीय सांस्कृतिक सामाजिक स्वातंत्र्याची ओढ असलेला लोकराजा आपला शाहूराजा
संदर्भ - राजर्षी शाहू महाराजांची भाषणे
संपादक - बी.बी. जाधव

*आठवणी लोकराज्याच्या*
जातीभेदामुळे रोगग्रस्त झालेल्या समाजासाठी मोफत आणी सक्तिचे शिक्षण हे एकच औषध आहे, असे सांगताना १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे केलेल्या भाषणात राजर्षी म्हणाले," मी माझ्या संस्थानात सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले असून त्या योगाने पुढची सगळी पिढी संपूर्ण साक्षर होईल यात शंका नाही."
सन १९२० साली असे भाकीत करणारे राजर्षींनी मोफत आणी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या चळवळीतून 'सर्वांसाठी शिक्षण' हा विचार लोकमनात रुजविला. आपल्या प्रजेकडून घेतलेल्या पैशाचा विनियोग सर्व वर्गाच्या आणी प्रजेच्या शिक्षणासाठी झाला पाहिजे, असा राजर्षींचा उद्देश होता. म्हणून ते म्हणतात," निरनिराळ्या जातींना निरनिराळ्या तर्हेच्या शिक्षणसंस्था पाहीजेत. पैशाचा विनियोग सर्वच वर्गाच्या उपयोगासाठी केला पाहीजे असे माझे मत आहे"
शिक्षणगंगा आपल्या संस्थानात व संस्थानबाहेरही वहावी यासाठी अविरत कष्ट घेणारा असा हा लोकराजा

*आठवणी लोकराजाच्या*
कोल्हापूर संस्थानात राजर्षींनी निर्माण केलेली शिक्षणगंगा दुथडी भरून वाहू लागली. २५ शाळांमध्ये एकून ८५० अस्पृश्य मुले शिक्षण घेऊ लागले.
हजारो वर्षांनंतर अस्पृश्यांच्या जीवनाचा अलग ओघ सार्वजनिक जीवनगंगेत मिसळून दिला. सन १९११ साली एक मोठे पाऊल उचलत अस्पृश्यांना फी माफीचा आदेशही काढला. यात जळफळाट होत होता तो तथाकथित पुरोहित व पत्रपंडितांचा. याविषयी जास्त विरोध न करता आपले कार्य पुढे चालवण्याच्या उद्देशाने राजर्षी एका भाषणात म्हणाले," *चांगले इंग्रजी शिकलेले महार, मांग, वरिष्ठ दर्जाच्या धंद्यात आणताच ब्राम्हण खवळून गेला. अस्पृश्यांना वकिलीच्या सनदा देण्यात माझा हेतू एवढाच आहे की, जे धंदे अस्पृश्य वर्गास दडपशाहीने बंद केले आहेत, ते त्यास मोकळे करून द्यावेत व त्यांची स्थिती सुधारून त्यांच्यात आपन इतर मानसांच्या बरोबरीने आहोत असा आत्मविश्वास निर्माण करावा."*
आडणावांवरून जातीचा बोध होतो यामुळे शाहू महाराजांच्या आदेशानुसार अस्पृश्य जातीतील लोकांनी मराठमोळी आडनावे इच्छेप्रमाणे धारण करण्यास सुरूवात केली.
करवीर सरकारचे गँझेट
१६/१२/१९११
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, नागपूर
३०/०५/१९२०

*आठवणी लोकराजाच्या*
शेतकरी- कामगारांच्या शिक्षणाविषयीची तळमळ राजर्षींच्या अंगी भिनलेली होती. १९१८ च्या सुमारास कामगारांना संबोधताना राजर्षी म्हणाले ," *मी कोल्हापूरच्या राजपदावर असतानाही शिपाई व शेतकरी किंवा मजूर म्हणवून घेण्यास अभिमान वाटतो. ज्या शेतकरी वर्गात माझे कूळ वाढले त्यांच्याविषयी प्रेम व अगत्य माझ्या बाबतीत जन्मसिद्ध आहे. इंग्लंडला मजदूरांनी आपल्या उन्नतीसाठी आपले संघ स्थापन करून स्वावलंबनाचे मार्ग स्विकारले. त्याप्रमाणे आपन आपले सुव्यवस्थित संघ स्थापन केले पाहिजेत. आपल्या मुलाबाळास शिक्षण देऊन आपले आरोग्य वाढवण्याचे प्रयत्न करूनआपली उन्नती आपनच करून घेतली पाहिजे.* "
यावरून राजर्षी संघशक्तीची ताकद लोकांपर्यंत समजावून सांगण्यासाठीची तळमळ आपनास दिसते.
संदर्भ - राजर्षी शाहू महाराजांची भाषणे
संपादक - बी. बी. जाधव

*आठवणी लोकराजाच्या*
माणुसकी आणी राजपदाचा एक मनोहर मिलाप म्हणजे शाहू महाराज हे कित्येक उदाहरणाप्रमानेच या एकात्मतादर्शक विचारांने अधोरेखीत होते
लोकांच्या मनामध्ये एकात्मभाव निर्माण झाल्याशिवाय सर्व प्रकारची विषमता नष्ट होणार नाही हे सांगताना महाराज म्हणाले, " *जोपर्यंत आमच्यामध्ये जातीजमातीतील मतभेद आणी मत्सर जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही आपसात झगडत राहणार आणी आमच्या हितवृद्धीस अपाय करून घेणार. आमच्यातील अंतस्थ कलह नाहीसे करण्यास आणी आम्हास स्वराज्यास पात्र करून घेण्यास ही अनर्थकारक जातिपद्धती झुगारून देणे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे."*
चातुर्वण्य व्यवस्था नाहीशी करून जातिजातित ऐक्य निर्माण करण्यासाठी महाराज भर देत असत.

*आठवणी लोकराजाच्या*
ज्ञान दिल्याने वाढते. कौशल्य वितरणाने त्याची साहजता खुलून दिसते. या दृष्टीने राजाराम घाटगे इंडस्ट्रियल इन्स्टिट्युटचे वतिने भरवण्यात आलेल्या शैक्षणिक प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राजर्षी म्हणाले होते की," *आपले कौशल्य आपल्या मुलाशिवाय दुसऱ्यास शिकवायचे नाही अशी जी घातक वृत्ती होती तिच्यामुळे आमच्या कलांचा फार र्हास झाला. विद्येचे खरे शिक्षण ती गुप्त ठेऊन रक्षण करावयाची ही चूक आमच्या ब्राह्मण बंधूंनी प्रथम केली. त्यांचे अनुकरण इतर लोकांनी केले. ब्राम्हणेतर अज्ञान अंधकारात बुडाले. आता आपन आपल्या जातीबाहेरील मुलासही आपल्या शिल्पशाळेत घेऊन आपल्या मुलांच्या बरोबर त्यास शिक्षण देण्यास तयार आहात ही मोठी संतोषाची गोष्ट आहे."*
याप्रमाणे कला-कौशल्याची दारे सर्वांना उघडी करून उद्योगधंद्याच्या मार्फत समाज विकास साधला पाहिजे, असा राजर्षींचा सर्वोदयवादी दृष्टिकोन होता.
आर्यक्षत्रिय परिषदेच्या अध्यक्ष पदावरून बोलताना
कोल्हापूर १५ अॉगस्ट १९२०

*आठवणी लोकराजाच्या*
राजर्षींनी कोल्हापूर मध्ये चालवलेले बहूजन समाजातील पुरोहित तयार करण्याचे कार्य महाराष्ट्रभर नेहण्याचे व विशिष्ट वर्गाच्याच हाती असणारी धार्मिक सत्ता कायमची नष्ट करण्यासाठी राजर्षी प्रयत्नशील राहिले.
राजर्षींनी इंदूरच्या महाराजांना एक महत्वाचे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात की," *मला असे कळाले की, आपन क्षत्रियाला अनुसरून धार्मिक संस्कार करून घेण्याची आपली इच्छा आहे. आम्ही येथे अशी कृती केली आहे हे आपनास विदित आहेच. आमच्या या उद्दिष्टांचा पाठपुरावा करावा म्हणून आम्ही पाटगाव येथील विख्यात देवतुल्य मौनी महाराजांच्या गादीचा उपयोग करू इच्छितो. मौनीबाबा क्षत्रिय संत होते आणी ते सर्व मराठ्यांना पुजनीय वाटतात. खरोखरीच ते मराठ्यांचे जगतगुरू होते. आम्ही त्या गादीवर योग्य अशा मानसाची नेमणूक करून त्या गादीचे पुनर्जीवन करू आणी ते आमचे अधिकृत जगतगुरू होतील."*
राजर्षींनी सुरू केलेली ही 'श्री शिवाजी वैदिक शाळा' म्हणजे धार्मिक अंधःकारात चाचपडणार्या समाजाला समता-सूर्याचे दर्शन घडवून आणणारा एक मंत्रच होय.
संदर्भ- राजर्षी शाहू छत्रपती
लेखक- धनंजय कीर

*आठवणी लोकराजाच्या*
श्री शिवाजी वैदिक विद्यालयाचे कार्य १९१८ नंतर वाढीस लागले होते. या विद्यालयात मुख्यतः तीन विषय ठेवण्यात आले होते. वैदिक मंत्र, संगिताच्या स्वरूपात सांगितलेली धर्माची तत्त्वे आणी मातृभाषा. या पुरोहीतांना रेशमी सोहळे नेसण्यासंबंधी राजर्षींनी बंदी घातली होती. कारण ब्राम्हणेतर पुरोहीतांनी सोहळ्याचे महत्त्व मानण्याची गरज नाही. राजर्षी एकदा माहिती देत असताना म्हणाले होते की," *हे सोवळे नाहीसे करावे म्हणून तर माझे प्रयत्न आहेत. आमच्या हिंदू धर्मात या सोवळ्यानेच सर्व सावळा गोंधळ माजवला आहे. या सोवळ्यामुळेच अस्पृश्यता, उच्च-निचता व जातीभेद असले हिन प्रकार आमच्या धर्मात माजले आहेत. आणी हेच सोवळे पुन्हा आमच्या पुरोहितांच्या पाठीमागे कशाला? शिवाय आम्ही पडलो मराठे गडी! आम्हास घोड्यावर बसूनही इश्वराची उपासना करण्याची मुभा पाहिजे.* "
हिंदू धर्मात विशिष्ट वर्गातील पुरोहितांनी माजविलेले धर्माचे स्तोम मोडून काढून सर्व समाजामध्ये शुद्ध आचरणाचे आणी शुद्ध धर्माचे बीज राजर्षीं पेरत होते.
संदर्भ - छत्रपती शाहू महाराज जीवन व शिक्षण कार्य
लेखक- रा. तु. भगत

*आठवणी लोकराजाच्या*
शिक्षणातील अडचणीवरील उपाययोजना सांगताना शाहू महाराज म्हणतात, " *आता आपल्या भारतातील स्थिती पाहू गेल्यास इकडे मुख्य मागासलेला वर्ग म्हणजे शेतकऱ्यांचा आहे. मीही त्यापैकीच एक आहे. येथे सुशिक्षित व मागासलेले यांच्यामधील प्रश्न अगदी अलीकडचा आहे. जातीभेदामुळे भारताचे अत्यंत नुकसान केले आहे असे माझे ठाम मत आहे. पुढारलेल्या वर्गाकडून मागासलेल्यांच्या हितसंबंधाचे रक्षण होणे शक्य नाही. मोफत व सक्तीचे शिक्षण लवकरच सुरू होईल असे वाटत होते, परंतु मागासलेल्या जातीचे प्रतिनिधी कौन्सिलात असल्याशिवाय या प्रश्नांची उठावणी लवकर होणार नाही असे दिसत आहे. यासाठी शांततेच्या मार्गाने आपला हेतू साध्य केला पाहिजे. ऐक्य, परस्परांवर प्रेम, विश्वास व चिकाटी न सोडता अव्याहत प्रयत्न हीच आमची या झगड्यातील शस्त्रे आहेत."*
संदर्भ - राजर्षी शाहू महाराजांची भाषणे
संपादक- बी. बी. जाधव

*आठवणी लोकराजाच्या*
जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्युटमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी जाहिरनामा काढून म्हटले होते की, " *मराठी चौथी इयत्ता पास झाल्याबद्दल शाळामास्तरच्या सर्टिफिकेट सह अर्ज करावेत, गरिब विद्यार्थ्यांना ३ रू शिष्यवृत्ती देणेत येईल.* " राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींच्यासाठी राजर्षींनी संपुर्ण फी माफीच केली होती. स्त्रियांच्या शिक्षणाला उत्तेजन देणारा धाडसी प्रयोग सुरू केला होता. उत्तम वर्तनासाठी ४० रू बक्षिस. मराठी चौथी मद्ये पहिल्या दोन विद्यार्थिनींच्यासाठी ४० रू स्काँलरशिप ठेवण्यात आली होती.
राजर्षी शिक्षणाच्या सर्व थराकडे किती बारकाईने पाहून त्याचा सर्व अंगांनी पुर्ण विकास कसा होईल इकडे जास्त लक्ष देत होते.
संदर्भ- करवीर गँझेट भाग १

*आठवणी लोकराजाच्या*
शिक्षक हा ज्ञानवृन्द असला पाहिजे असा राजर्षींचा कटाक्ष होता. हा दृष्टिकोन लक्षात ठेऊन राजर्षींनी इंदुमतीदेवीसाठी पाच शिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये भार्गवराव कुलकर्णी हे जरा तापट स्वभावाचे होते. 'मी महाराजांना मुजरा करणार नाही' असे त्यांनी अनेकदा म्हटले होते. हे ऐकून महाराज म्हणाले ," *मी शिक्षकांना पगार देत असलो तर तो त्यांच्या विद्या दानासाठी. विद्येचे महत्त्व मी जानतो. ती विद्या जोपर्यंत ते माझ्या सुनेला देत आहेत तोपर्यंत त्यांनी मला मुजरा नाही केला तरी चालेल. उलट माझ्या सुनेच्या कल्यानासाठी मी तिच्या गुरूला नमस्कार करीन."* राजर्षींच्या ठिकाणी वास करणारी ही एका योगीराजासारखी सौजन्यशिलता व ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते याची प्रचिती आपसुकच होते.
संदर्भ- श्री छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र
लेखक- आ. बा. लठ्ठे

*आठवणी लोकराजाच्या*
शिक्षक चारित्र्यसंपन्न व श्रद्धावान असला पाहिजे. स्वतःच्या विषयाचे पुर्णज्ञान त्याला कळकळीने देता आले पाहिजे. अशी राजर्षींची शिक्षकाविषयी श्रद्धा होती. एकदा तोफखाने गुरुजींबरोबर महाराज म्हणाले की," *अहो तोफखाने, तुम्ही मांडणी मांडता ती सर्व ठीक आहे, पण तुम्ही म्हणता तसे हृदयस्थ आत्म्याला जागे करणारे शिक्षण देणारे शिक्षक मिळालेच नाहीत तर आज मुले बिघडतात तशा मुलीही बिघडण्याची शक्यता आहे."*
म्हणून मुलामुलींना खर्या थोरपणाचे, संयमाचे, नितीधैर्याचे व माणुसकीचे शिक्षण देणारे शिक्षक पाहिजेत, असा राजर्षी शाहू महाराजांचा आग्रह होता.
संदर्भ - राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज यांचे अंतरंग
लेखक- वा. द. तोफखाने

*आठवणी लोकराजाच्या*
बारा बलूतेदार महार- मांग मुलांसाठी वेगळ्या शाळा न काढता एकत्रच बसवावे व शिक्षण द्यावे असे राजर्षींनी जाहिरनामा काढलेला होता. म्हणून या शाळा म्हणजे स्वातंत्र्यपुर्वकाळातील जातीनिर्मुलनांची केंद्रेच बनली. पन अशा प्रकारे शिक्षणदान चालू असताना अनेक प्रकारच्या विषारी टिका राजर्षींना ऐकाव्या व वाचाव्या लागत होत्या. राजर्षी म्हणत," *दोन सवयी मला जडल्या आहेत, अंग मसाज करणे आणी बामणी वृत्तपत्रातील शिव्या खाणे.* " पन अशा जहरी टिकांमुळे राजर्षींनी अस्पृश्यांच्या शिक्षणांचा नाद सोडला नाही. यासंबंधी राजर्षींनी म्हटले होते की," *मी माझी मते सोडणार नाही. मी मोडेन पन वाकणार नाही. अस्पृश्यांना हात दिल्याबद्दल व मराठ्यांचा उद्धार केल्याबद्दल मला नक्कीच न्याय मिळेल. बहूजन समाजाच्या उद्धाराचे कार्य मी प्राण जाईतोवर सोडणार नाही.* "
जीवन मरणाच्या ध्येयध्यासाने राजर्षींनी शिक्षणाचे जे पवित्र कार्य सुरू केले ते त्यांच्या ठिकाणी आढळणाऱ्या अलौकिक लोकाभिमुखतेमुळेच.
संदर्भ - श्री छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र
लेखक- आ. बा. लठ्ठे

*आठवणी लोकराजाच्या*
राजर्षी शाहू महाराजांनी गानसम्राट अल्लादियांखाँसाहेब आणी रंगसम्राट आबालाल रहिमान यांना आपल्या वाड्यात आश्रय दिला होता. आबालाल यांची किर्ती ऐकून राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना आपल्या दरबारात बोलवून घेतले. *'स्टेट आर्टिस्ट'* म्हणून नेमले. त्यावेळच्या शाळाखात्यातून त्यांना पगार चालू केला. म्हणून आबालाल रहिमान यांना लोक 'मास्तर' म्हणून ओळखू लागले, *कलातपस्वी अबालाल रहिमान यांनी महाराणी अहिल्याबाई आणी राजर्षी शाहू यांची व्यक्तीचित्रे रंगवली. ती अत्यंत अप्रतिम आहेत. आहिल्याबाईंचा गौरवर्ण पिकलेल्या पिवळ्या केवड्यासारखा कसा होता आणी त्यांच्या साडीच्या पदरातून गळ्यातील दागिणा कसा चमकतो. हे रेखाटलेले तैलचित्र पाहूनच समजते.* आबालाल यांचे राजर्षी वर आदरयुक्त प्रगाढ प्रेम होते. राजर्षी गेल्यानंतर आबालाल यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आबालाल आपली असंख्य चित्रे पंचगंगा नदीच्या प्रवाहात सोडून देऊ लागले. या प्रयत्नापासून लोक आबालाल यांना परावृत्त करू लागले. तेंव्हा आबालाल त्या लोकांना म्हणाले," *माझी जिंदगी या कलेसाठी खर्च पडली आहे. या कलेचा चाहता आता जगातून निघून गेला आहे. इतरांना याची काय पर्वा? म्हणून मी माझी चित्रे कुणाच्यातरी पायदळी पडून जाण्यापेक्षा मी स्वतःच या नदीच्या स्वाधीन करतो आहे.* "
राजर्षींवर अतोनात प्रेम करणाऱ्या लोकांच्या विचारांमुळे खरे राजर्षी किती प्रघात प्रचंड विस्तारीत जनकल्यानासाठी झटनारे व्यक्तिमत्त्व होते याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही

*आठवणी लोकराजाच्या*
एकदा एका महत्त्वाच्या कामात सल्ला विचारण्याकरीता श्री शाहू महाराजांनी काही ब्राम्हण व ब्राम्हणेतर या दोन्ही वर्गाच्या वकिलांना बोलाविले होते. त्यावेळी ब्राम्हणेतर वकिलांनी असा सल्ला दिला की तीच्या योगाने महाराज त्या अडचणीतून सुखरूपपणे बाहेर पडतील. पण ब्राम्हण वकिलांनी असा सल्ला दिला की तिच्या योगाने महाराज अधिकच गोत्यात येतील. वकील निघून गेल्यावर महाराज म्हणाले ," *पाहा, श्री ! आमच्या ब्राम्हणेतर वकीलांनी सल्ला कसा दिला आणी ब्राम्हण वकीलांनी कसा दिला!* " त्यावर बाबूराव म्हणाले, " *शंभर एकत्र केली म्हणजे मराठ्यांचा एक सरदार होतो. व असले शंभर सरदार एकत्र केले म्हणजे मराठ्यांचा एक राजा होतो. असले शंभर राजे एकत्र केले म्हणजे छत्रपती होतो. नंतरच्या पिढीतील छत्रपती कर्तबगार निघाले नाहीत म्हणून तर पेशवे आमच्या घरात घुसले. सातारची गादी नष्ट केली.आणी कोल्हापूरची गादी तळहाताएवढी राहीली. तसे जर घुसखोरी झाली नसती तर मराठेच अखंड भारताचे कार्यवाह झाले असते."*
संदर्भ - विजयी मराठा राजर्षी शाहू खास अंक १९२३
संपादक - श्रीपतराव शिंदे

*आठवणी लोकराजाच्या*
राजर्षी शाहू महाराजांच्या आज्ञापत्रावरून उसाच्या चरकात सुधारणा करण्याविषयी बक्षीस ठेऊन कृषी उद्योगास प्रोत्साहन देण्याचे त्यांचे दूरदृष्टी नजरेत भरते.
*वारंवार पडणाऱ्या दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी यशस्वीपणे १९०२ मध्ये त्यांनी जलसिंचन धोरण जाहीर केले. त्यानुसार इरिगेशन अॉफिसरची नेमणूक करून संस्थानातील लहान मोठ्या तळ्यांचा, विहिरींचा अहवाल करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले.*
शेतकऱ्यांच्या बाबतीतील तळमळ व रयतेची आर्थिक घडी बसवण्यासाठीची ओढ हिच लोकराज्याच्या मोठेपणाची साक्ष देतात
संदर्भ - लोकराजा शाहू छत्रपती
लेखक - भिकशेठ ज्ञानदेव पाटील

*आठवणी लोकराजाच्या*
सत्यशोधक समाजाची सर्व तत्त्वे व कार्य महाराजांना पसंत पडल्यामुळे कोल्हापूरात या समाजाची स्थापना १९११ मध्ये केली.
समाजामार्फत ब्राम्हणेतर पुरोहित निर्माण करण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी १९१३ मध्ये सत्यशोधक शाळा सुरू केली. या शाळेवर शिक्षक म्हणून श्री डोणे या एका धनगर गृहस्थाची नेमणूक केली. श्री डोणे हे वैदिक वगैरे शास्त्रात निपुण होते. *महाराजांनी १९१२ मध्ये समाजासाठी गंगावेशीमधील एक विस्तृत अशी जागा देऊन, समाजमंदिराची इमारतही बांधून देऊन वर्षासनही चालू केले. कोल्हापूरच्या या सत्यशोधक समाजामध्ये कट्टर सत्यशोधक रा. बा. जाधव उर्फ दासराम भास्करराव जाधव , खंडेराव बागल, हरीभाऊ चव्हाण, सुबराव निकम, कृष्णराव साळुंखे, लुगडे, रामभाऊ रगतवान इत्यादी मंडळी हिरहिरीने भाग घेत असत. हे सर्व पुरोहित तयार झाल्यावर श्रावणी, विवाह विधी, इतर अनेक प्रकारचे धार्मिक कार्ये यजमानांच्या इच्छेनुसार अगदी अल्प खर्चात गरीब, श्रीमंत वगैरे सर्वांच्यामध्ये ब्राम्हण पुरोहिताशिवाय होऊ लागली.* याचप्रमाणे पुढे वैदिक विद्यालये व वसतीगृहे सुरू केली.
असा हा सांस्कृतिक सामाजिक व आर्थिक न्याय देणारा लोकराजा आपला शाहुराजा
संदर्भ - छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतीदर्शन
लेखक- स्काऊटमहर्षी हिंदुराव कृष्णराव साळुंखे
महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर

*आठवणी लोकराजाच्या*
अशाच एका चर्चेवेळी *बालगंधर्व* बोलताना म्हणाले होते की," *मला नाटकाची आवड अगदी लहानपणापासून होती हे खरे. पण स्वतः होऊन नाटकात जायची गोष्ट काढण्याइतकी ती प्रबळ झाली असती की नाही याविषयी शंकाच आहे. मी नाटकात गेलो तो मुख्यतः कोल्हापूरच्या शाहू छत्रपती महाराज यांच्याच प्रोत्साहनाने.*
मी त्यावेळी चौदा-पंधरा वर्षाचा असेन. एकदा काही निमित्तानं कोल्हापूरास गेलो असता तेथे माझी एक दोन गाणी झाली. त्यातील एका गाण्यास सरकार स्वारी हजर होती. माझे गाणे त्यांस अतिशय आवडले. पुढेपुढेतर सरकारवाड्यात माझे गाणे होऊ लागले. त्यातच माझा उजवा कान अधू आहे ती गोष्ट शाहू महाराजांच्या लक्षात आली. तेंव्हा त्यांनी लगेच मला औषधोपचाराकरीता मिरजेस डाँ. वानलेस यांच्याकडे पाठवले.
मी नाटकात जावे हे त्यावेळेपासून महाराजांच्या मनात दिसते. कारण त्यांनी मिरजेत माझी उतरण्याची सोय केली ती नेमकी किर्लोस्कर कंपनीत. आगोदरच मला नाटकाचा विशेष नाद अन् त्यात प्रत्यक्ष नाटक कंपनीत राहण्याचा मान! मग काय विचारता? मी कंपणीतच राहण्याचे ठरविले. कंपनीला या वेळी एका स्त्री पार्टीची जरुरी होती. कारण याच सुमारास रा. गोरे हे कंपनी सोडून गेले होते. आणी त्याच सुमारास मी कंपनीचा झालो. श्री शाहू महाराजांना तरी काय हेच हवे होते."
अशा अनेक मुलांच्या कलागुणांना पाहताक्षणी पारखणारा व त्यांना प्रोत्साहन देणारा हा खरा लोकराजा आपला शाहूराजा
संदर्भ - लोकराजा शाहू छत्रपती
प्रकाशक- शिव शाहू मंच कोल्हापूर

*आठवणी लोकराजाच्या*
सांगलीतील एक पांढरपेशे क्षीरसागर नावाचे वकील महाराजांना म्हणाले, ' कोल्हापूरात येऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांचे लक्ष शिक्षणाकडे लागत नाही. त्यामुळे ते अपुरे शिक्षण घेऊनच खेड्यात परत जातात. यासाठी सिटी हायस्कूल, राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल यातील सर्व गरीब विद्यार्थ्यांना दिली जानारी स्काँलरशीप पहिल्या पाच नंबरात येतील अशाच विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात.'
यावर महाराज म्हणाले," *खेडेगावात राहणारे जोशी, देशपांडे, कुलकर्णी वगैरे कुटुंबातील मंडळी शिकलेली असतात. त्यांच्या घरी त्यांच्या वडीलधार्यांकडून त्यांना अभ्यासाचे पाठ लहान असल्यापासून शिकवून म्हणावयास सांगतात. अर्थात ही मुले त्यांच्यावर विद्येचे संस्कार झाले असल्यामुळे स्काँलरशीपा मिळविणार. खेडेगावातील शेतकऱ्यांची मुले, खेडेगावातील शाळेतही 'इप्पर म्हणजे बामन' 'आगीन म्हणजे इस्तू' असे शब्द पाठ करणारे हायस्कुलमध्ये स्काँलरशिपा कशा मिळवतील?"*
सर्वसामान्य लोकांच्या अडचणी हुबेहूब ओळखणारा असा हा लोकराजा. आपला शाहूराजा
संदर्भ - छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतीदर्शन
लेखक- स्काऊटमहर्षी हिंदुराव कृष्णराव साळुंखे


*आठवणी लोकराजाच्या*
ताई महाराज प्रकरण म्हणजे शाहू महाराजांनी विकत घेतलेले दुखणे होते. या प्रकरणात बराच काळ गेला. बाबा महाराज हे महाराजांचे मित्र होते. बाबा महाराज हे अकस्मात मृत्यू पावल्यामुळे त्यांच्या विधवा पत्नीने दत्तक कोणता घ्यावा हा वाद होता. लो. टिळक हे बाबा महाराज यांच्या पत्नीचे, ताई महाराजांचे विश्वस्त होते.
*या ताई महाराजांच्या दत्तक प्रकरणासंबंधी टिळक १८ आँगस्ट १९०१ रोजी महाराजांना भेटले. बाबा महाराजांच्या दत्तक विधानास मंजुरी देऊ नका अशी त्यांनी विनंती केली. अर्थात टिळक यांना येथे दत्तक म्हणून आपलाच एक आप्तेष्ट सुचवायचा होता, पन तसे घडताना त्यांना दिसत नव्हते. महाराजांनी टिळकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचवेळी ताईमहाराज बाबा महाराजांचे दत्तक विधान उरकून घेत होत्या. दत्तक विधान संपेपर्यंत महाराजांनी टिळकांना चातुर्याने संभाषणात गुंतवून ठेविले. इकडे दत्तक विधान समारंभ अगदी व्यवस्थित पार पडला.*
संदर्भ - राजर्षी शाहू महाराज चरित्र ग्रंथ
लेखक- धनंजय कीर

*आठवणी लोकराजाच्या*
फासेपारधी सामाज तसा जंगलात राहणारा कणखर कठीण समाजात न मिसळनारा, पन यांना समाजात स्थान मिळवून देण्याचा ध्यास शाहू महाराजांनी सोडला नाही. काही फासेपारध्यांनी शाहू महाराजांच्या संस्थानात नोकरीही स्विकारली, त्यातलाच एक किस्सा सांगताना शाहू महाराज म्हणाले होते की, *"एकदा मी त्यांच्याकडे पहारा दिला होता. दिड वाजून गेल्यावर त्यांना चाहूल लागते की नाही हे पाहण्याकरीता पाठीवर एकदोन डबे घेऊन जाताना जसा आवाज होईल तसा आवाज त्यांच्या पहार्याच्या ठिकाणापासून पाचशे फुट अंतरावर मी करवीला. एका क्षणात जिथून आवाज करण्यात आला होता अगदी त्याच जागेवर लागलीच गोफणीचे दोन धोंडे आले. बरे तर बरे ज्यांनी तो आवाज केला होता ते आडोश्यास गेले होते.*"
फासेपारधी समाज कितपत जागरूक, विश्वासपात्र व तत्पर असू शकतो याचा नव्याने अनुभव आला
संदर्भ- राजर्षी शाहू महाराजांचे अंतरंग
लेखक- वा दा तोफखाने

*आठवणी लोकराजाच्या*
संस्थानात काम करणाऱ्या लोकांबाबत शाहू महाराज अतिशय जागरूक असत. कामावर असलेले मंडळी खरच व्यवस्थित काम करतात की नाही याकडे महाराजांचे बारीक लक्ष असे. एकदा असेच बाळासाहेब गायकवाड यांच्या कामाबाबत कुणकुण महाराजांना लागली व शहनिशा करण्याचे योजले.
कचेरीमधील कारकुनास इतर कागदांबरोबर एक कागद दिला व म्हणाले," *इतर कागदांबरोबर या कागदावर बाळासाहेब गायकवाड यांची सही घेऊन ये." कारकून सह्या घेऊन आल्यावर महाराजांनी बाळासाहेब यांना बोलावने पाठवले. बाळासाहेब यांच्यासमोर 'तो' कागद ठेवला व वाचावयास सांगितले. त्या कागदावर लावणीमधील ओळी लिहील्या होत्या व खाली बाळासाहेब यांची सही होती.* बाळासाहेब यांनी कागद न वाचताच त्यावर सही केली होती.
*या प्रकरणावरून महाराजांनी बाळासाहेब यांची चांगलीच कानउघडणी केली.*
असा हा प्रजाहितदक्ष व मानुसपारखी राजा संस्थानाला सोनेरी रूप देऊन गेला.
आपला राजा! शाहूराजा!!
संदर्भ - छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतीदर्शन
लेखक- स्काऊटमहर्षी हिंदुराव कृष्णराव साळुंखे
महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर

*आठवणी लोकराजाच्या*
एकदा महाराजांनी पहार्याकरीता फासेपारध्यास सोनतळीस थांबवले होते व कोणासही आत न येऊ देण्याचा हुकूम दिला होता. पन अचानक महाराजांचे थोरले बंधू बापूसाहेब महाराज समोर आले. पहारेवाल्या फासेपारध्याने त्यांस अडवीले. बापूसाहेब महाराजांचा ऋद्र अवतार पाहून पहारेकरी म्हणाले, *"आम्हाला महाराजांनी कोणासही आत सोडू नका असे सांगितले आहे. महाराजांचा हुकूम आम्ही मोडणार नाही. तुम्हाला जर आत जायचेच असेल तर ही घ्या बंदूक आणी आम्हाला गोळ्या घाला मग खूशाल जावा. महाराजांचे भाऊ आहात म्हणून सांगतो"*
तेव्हड्यात महाराज आले व हा प्रकार समजताच या पहारेकर्यांना आदबीने जवळ घेतले.
निष्टा ठेवणारे फासेपारधी समाजातील लोक अखंड संस्थानातील कामकाजात राहीले.
संदर्भ- राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणी
लेखक- माधवराव बागल

*आठवणी लोकराजाच्या*
राजाराम इंडस्ट्रियल स्कुलचे उद्घाटन करताना महाराजांनी शेतीकरीता सुधारीत अवजारांच्या गरजेचे प्रतिपादन करताना म्हटले *"आपल्या देशातील लोकांनी जुन्या शेती पद्धतीऐवजी सुधारलेल्या शेतीशास्त्राचा आणी अवजारांचा अवलंब केला पाहीजे. सुधारलेले तंत्रविज्ञान शिकण्याच्या दृष्टीने पुढं आले पाहीजे. शेतकी सुधारणेस सुधारलेल्या औतांची फार जरूरी आहे व आपले लक्ष इकडे आहे ही मोठी आनंदाची गोष्ट आहे, नांगर व मोट यांची सुधारणा ही आमच्या प्रत्येक शेतकऱ्यांचे हित करणारी आहे. आपले प्रयत्न यशस्वी होण्याचे कामी मजकडून योग्य ती मदत अवश्य मिळेल यात शंका नको"*
पारंपरिकतेला फाटा देऊन आधुनिकतेचा अवलंब करायला प्रजेला उद्युक्त करणारा असा हा लोकराजा! आपला शाहूराजा!
संदर्भ- राजर्षी शाहू गौरव ग्रंथ

*आठवणी लोकराजाच्या*
शाहू महाराज एका भाषणात आपले जातीव्यवस्थेवर मत व्यक्त करताना म्हणाले होते की,
*"जातीभेद नाहीसे होऊन जन्माच्या सबबीवर दुसऱ्यास हीन मानन्याचे नाहीसे होईल या रितीने जातीद्वेशाचा नायनाट होईल तो सुदीन असे मी समजेन. मी जातीभेद नसावा म्हणतो व जातीभेद मोडण्याचे प्रयत्न करतो. मी असे काही मुर्ख लोक पाहतो की, जे आपल्या बंधुभगीनिंना पशुगाईपेक्षा निच समजतात. पन सर्व लोकांचे पुढारी आहोत असे भासवून, तुमचे चांगले करू अशा थापा देऊन त्यांना फसविण्यात यांना शरम वाटत नाही."*
संदर्भ - राजर्षी शाहू महाराजांची भाषणे
संपादक - भ. बा. जाधव

*आठवणी लोकराजाच्या*
१९१८ साल. मुंबईसह कोल्हापूरातही इन्फ्ल्यूएंझाच्या साथीचा कहर आला होता. *तोफखाण्यांनी काही काळ शाळा बंद ठेवली, व विद्यार्थ्यांची स्वयंसेवक पथके उभा केलीत. डाँक्टरांचूया मदतीने आजार्यांची शुश्रुषा सुरू केली. महाराजांनी तोफखाण्यांच्या योजनेप्रमाने सर्व डाँक्टरांची वार्ड प्रमाणे नियुक्ती करून घरोघरी हिंडून औषधोपचार करण्यास हुकूम दिला. आजार्यांना जरूरीप्रमाने मदत मिळण्याचे नियोजन करण्यात आले. स्वतः महाराज या काळात गाडीमधून शहराचा दौरा काढीत. तालीमवार जाऊन लोकांना धीर देत. लोकांची भीती दूर करत. त्यावेळी विद्यापीठ हे रोगनिवारण, प्रतिबंधक केंद्रच बनले.*
महाराजांनी यावेळी क्षणाचीही उसंत न घेता प्रजेच्या संकटाचे ओझे स्वतःच्या शिरावर घेतले. याप्रसंगी राजांचे सुप्त प्रजावात्सल्य दिसून आले. प्रजेच्या सुखात आपले सुख माननारा, त्यांचे दुःख भार हलके करणारा असा हा थोर मानसातील राजा होऊन गेला.
संदर्भ - माझी जीवनगाथा
लेखीका - सरस्वतीबाई तोफखाने

*आठवणी लोकराजाच्या*
किर्लोस्कर कारखान्याची परिस्थिती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बिकट झाली होती. कंपनीला येणारे लोखंड पट्ट्या लंडन वरून येणारा ओघ थांबला होता. कंपनी बंद करण्याच्या मनस्थितीत लक्ष्मणरावजी किर्लोस्कर आले होते. *शेवटचा पर्याय म्हणून राजर्षींच्याकडे यासंदर्भात मदतीचा मार्ग काढण्यासाठी ते राजवाड्यावर आले. राजर्षींच्यापुढे सर्व हकिकत सांगितल्यावर किर्लोस्कर यांनी शाहूराजांकडे किल्यांच्यावरील तोफांची वितळवण्यासाठी मागणी केली. त्यावर शाहूराजे म्हणाले ," शेतकऱ्यांच्या उपयोगी जर या तोफा पडत असतील द्या त्यांना."*
राजा म्हणून राजेपणाचे जीवन न जगता या राजाने आपले राजेपन केवळ जनतेच्या हितकल्यानासाठी व सुखासाठी वेचल्यामुळे या राजाला जनतेच्या अडचणी समजल्या व त्या अंतःकरणाणे सोडविल्या.
असा हा लोकराजा! आपला शाहूराजा!
संदर्भ - छत्रपती शाहू महाराज चरित्र
लेखक - तोफखाने

*आठवणी लोकराजाच्या*
एक छोटीशी पन भरपूर काही सांगून जाणारी अशी घटना नमुद करण्यासारखी आहे.
*महाराज झोपण्यापूर्वी अंगमर्दन करून घेत असत. सेवकाकडून अंगमर्दन करून घेता घेता महाराजांना झोप लागली. बाहेर थंडीचा कडाका पडला होता. त्यामुळे असेल किंवा सकाळपासून काम केल्यामुळे असेल अंगमर्दन करता करता सेवकासही झोप यायला लागली व तो तेथेच नकळत शाहूमहाराजांशेजारी झोपी गेला. एका राजकुलामध्ये वाढलेल्या राजास आपल्याजवळ कोणी सेवक झोपला आहे हे बघताच मनस्वी राग आला असता. पन महाराज ते दृश्य पाहून स्वतःशीच हसले व त्या बिचाऱ्याची झोपमोड होऊ नये यासाठी शय्येवरून उठून दालनाबाहेरील नोकरांच्यामध्ये शेकोटीच्याभोवती जाऊन बसले.*
मानसांना मानसाप्रमाने वागवणारा व आईप्रमाने काळजी घेणारा असा हा लोकराजा! आपला शाहूराजा!
संदर्भ - राजर्षी शाहू गौरव ग्रंथ

*आठवणी लोकराजाच्या*
शाहूराजांच्या काळात अनेक कलाकार तयार झाले. त्यातलाच एक लखलखता हिरा म्हणजे बाबुराव पेंटर.
*बाबुराव व आनंदराव या पेंटर बंधूंनी १९१३ साली कोल्हापूरात 'महाराष्ट्र सिनेमा' नावाने चित्रपटगृह उभारले. शाहू महाराजांच्याच हस्ते त्याचे उद्घाटन झाले. बाबुराव पेंटर यांनी १९१७ साली मूव्ही कँमेरा बनविला. संपूर्ण स्वदेशी बनावटीचा हा भारतातील पहिलाच कँमेरा होय. त्यापाठोपाठच बाबुरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही चित्रपट संस्था स्थापन केली. या कंपनीला शाहूमहाराजांनी मंगळवार पेठ येथे देणगी म्हणून जागा दिली. व तेथेच चित्रपटांची निर्मिती होऊ लागली.*
*बाबूराव पेंटर यांच्या कंपनीमधून राजा परांजपे, बालगंधर्व, विष्णूपंत औंधकर, केशवराव दाते, बाबूराव पेंढारकर, व्ही शांताराम व असे अनेक कलाकार उदयास आले आणी त्यांनी पुढे चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावले.*
शाहूराजांच्या कारकिर्दीत रुजलेल्या बीजाचेच पुढे असे विशाल वटवृक्षात रुपांतर झाले.
संदर्भ - लोकराजा शाहू छत्रपती
संपादक - भिकशेठ ज्ञानदेव पाटील

*आठवणी लोकराजाच्या*
शाहूराजांच्या दरबारी गुणी कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन मिळत असे. कित्तेक गायकांच्या पुर्वपिढ्या याच करवीर नगरीत जोपासल्या गेल्या.
मृदंगवादक बाबुराव शाळिग्राम यांनी सांगितलेली आठवण त्यादृष्टीने बोलकी आहे. बाबुराव शाळिग्राम म्हणतात," *कुदोसिंग घराण्याचे अध्वर्यू पानसे यांच्याकडून मृदंगवादनाचे अधिक शिक्षण घेण्याची माझी इच्छा मी महाराजांकडे बोलून दाखविली होती. एकदा पानसे यांचे शिष्य अनंत साधले कोल्हापूरला आले असता त्यांचे मृदंगवादन राजवाड्यावर झाले. 'ही कुदोसिंग घराण्याची परंपरा आहे' अशी मी महाराजांना आठवण करून दिली. तेव्हा महाराजांनी साधले यांनाच आपल्या दरबारी सेवेत सामावून घेतले आणी ते मला म्हणाले, "बापू! शीक आता तुला किती शिकायचे ते! "*
अशा कित्येक कलाकारांना आपल्या कलेचे संवर्धन करण्याची संधी करवीर संस्थानामुळे प्राप्त झाली.
संदर्भ - लोकराजा शाहू छत्रपती
प्रकाशक - शिव शाहू मंच, कोल्हापूर

*आठवणी लोकराजाच्या*
शेतीप्रमानेच संस्थानातील उद्योगधंद्याच्या वाढीविषयीही महाराज कमालीचे जागरूक होते. नव्या उद्योगधंद्याची वाढ करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. *निलगिरी तेल तयार करण्याचा किंवा मधमाश्या पाळण्याचा उद्योग शाहू छत्रपतींच्या प्रोत्साहनामुळे सुरू झाला. १८ आँक्टोबर १९०५ रोजी श्री शाहू छत्रपती मिल काढण्यात आली. २७ सप्टेंबर १९०६ रोजी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल चे उद्घाटन करण्यात आले. ही कंपनी आणी कापडगिरणी संस्थानच्या मालकीची किंवा दरबाराने चालवलेली नव्हती. शाहू महाराजांनी गिरणीसाठी आवश्यक ती जमीन विनामुल्य दिली होती. गिरणीला पाणीपुरवठ्याचीही व्यवस्था केली होती. याखेरीज कोल्हापूर दरबारने कंपनीच्या भागभांडवलापैकी ५० हजाराचे भाग खरेदी केले होते. स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणांचाच हा भाग होता.*
काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा असा हा राजा.
संदर्भ - लोकराजा शाहू छत्रपती
संपादक - भिकशेठ ज्ञानदेव पाटील

*आठवणी लोकराजाच्या*
शाहूराजांनी कोणत्याही कामास उच्च व कोणत्याही कामाच निच समजले नाही. शाहूराजांनी त्यांच्या वागण्यातूनच हे धडे जनतेला दिले. त्या काळी समाजामध्ये मेलेल्या जनावरांना ओढणे हे काम कमी दर्जाचे मानले जायचे. अस्पृश्यांनाच ते करावे लागे.
*एकदा महाराजांचा एक हत्ती मेला होता. तो ओढण्यास तुरुंगाचे सर्व कैदी लागले होते. याचवेळी महाराज आपल्या रथातून येत होते. त्यांनी हे पाहील्यावर ते स्वतः रथातून उतरले व कैद्यांसोबत त्यांनीही कासरा धरला व मेलेला हत्ती ओढण्यास मदत केली.*
असा हा प्रत्येक वागणूकीतून बुसरटलेल्या विचार सोडून समाजास नविन विचार करण्यास आपल्या कृतीतून सांगणारा
लोकराजा ! आपला शाहूराजा !
संदर्भ - लोकराजा शाहू छत्रपती
संपादक - भिकशेठ ज्ञानदेव पाटील

*आठवणी लोकराजाच्या*
नाशिक येथे १६ एप्रिल १९२० रोजी अस्पृश्य वस्तिमध्ये शिलान्यास समारंभ शाहू छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते म्हणाले," *सामाजिक समतेसाठी संगर मांडल्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. अस्पृश्य बंधूंना ब्राम्हण समाजाकडून जी घृणास्पद वागणूक मिळते, त्यावरून जातीभेदाचे किळसवाणे स्वरूप स्पष्ट होते. तुम्ही आम्ही बंधू बंधू असताना मांजरे, डुकरे, कुत्री यांपेक्षाही नीचपनाने वागवण्यात येते. ही शरमेची बाब आहे. मध्यंतरीच्या काळातच या अस्पृश्यताचा प्रादुर्भाव झाला. अनादी काळी जी भिन्नभिन्न स्नानकुंडे नाशिक मध्ये होती त्यामध्येच महारांचेही स्नानकुंड होते. यावरून त्याकाळी शिवाशिवचा प्रघात बिलकुल संभव नाही. पुण्याच्या पत्रकारांना माझे हे अस्पृश्यांना वर काढण्याचे कृत्य पसंत नाही. त्यांच्या लिखानातून ते मी म्हणजे ब्राम्हण जातीचे पाय खाली खेचण्याचे काम करत आहे असेच मांडतात. म्हणूनच माझे ठाम मत आहे की, जातीभेद मोडून समाजरचनेचा पाया निकोप केल्याशिवाय आम्हाला सेल्फ-गव्हर्नमेंट दिले तरी नको."*
सर्व समाजघटकांना समान वागणूक मिळण्यासाठी धडपडणारा असा हा लोकराजा! आपला शाहूराजा!
संदर्भ - छत्रपती शाहू महाराजांच्या आठवणी
लेखक - माधवराव बागल

*आठवणी लोकराजाच्या*
राजकीय स्वातंत्र्याच्या प्रवक्त्याने मानवी स्वातंत्र्यास विरोध करावा ही टिळकांच्या जीवनातील फार मोठी विसंगती होय. परकीय राज्यकर्त्यांकडे स्वातंत्र्याची मागणी करणारे टिळक आपल्याच धर्मातील देशबांधवांना *मानवी स्वातंत्र्य* द्यायला राजी नव्हते. टिळक यांच्या मखलाशी वक्तव्यावर शाहू महाराज म्हणाले, " *'आम्हाला स्वराज्य मिळाल्यास अस्पृश्य मंडळींच्यासोबत सहभोजन करण्यास तयार आहोत' अशी गर्जना नुकतीच एका विद्वान ब्राम्हणाने निपाणी येथे केली. हा कांगावा नसून खरीच तशी मनोधारणा असेल तर सहभोजनासारख्या किरकोळ गोष्टीसाठी स्वराज्यसंपादनासारखी दिव्य अट घालण्याचे प्रयोजन काय? यावरून त्यांच्या तकलादू प्रामाणिकपणाची स्पष्ट कल्पना येते."*
अस्पृश्यता टिकवून ठेवण्यासाठी जे जे नेतेलोक प्रयत्न करत होते त्यांना शाहूमहाराज अशाप्रकारे प्रखरपणे व उघडपणे जाब विचारत होते.
लोकांना एकसंघ बनविण्यासाठी धडपडणारा असा हा लोकराजा ! आपला शाहूराजा !
संदर्भ - लोकराजा शाहू छत्रपती
संपादक - भिकशेठ ज्ञानदेव पाटील

*आठवणी लोकराजाच्या*
महाराज हुबळी येथे परिषदेला गेले होते.
महाराजांच्या लौकिकामुळे जनता महाराजांची भक्त बनलेलीच होती. सभेला जाताना लोकांनी खूप मोठी मिरवणूक काढली. पण लोकांचा आग्रह पडला की, मिरवणूकीचा रथ आपण ओढायचा म्हणून. रथाची घोडी सोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी महाराज म्हणाले, " *मी असे कधीच करू देणार नाही. मी मानसांची जनावरे करायला येथे आलेलो नाही. तर जनावरांच्यासारखे वागणाऱ्या माणसांना माणूस बनविण्याकरीता आलो आहे."*
आपले विचार प्रत्येक घडामोडीमध्ये कृतीत उतरवणारा असा हा लोकराजा ! आपला शाहूराजा !
संदर्भ - राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या आठवणी
लेखक - भाई माधवराव बागल

*आठवणी लोकराजाच्या*
*शाहू महाराज यांना जसा शिकारीचा नाद होता तसाच किंवा त्यापेक्षाही अधिक ते वन्य पशुसंवर्धन व संरक्षणासाठी पुर्ण भारतात दक्ष होते. त्यांच्या संरक्षित अभयारण्यात जंगली पशु- पक्षी सुखेनैव संचार करीत. कोल्हापूर संस्थानातून रेल्वेने अगर अन्य वाहनाने जाणार्या प्रवाशांनासुद्धा हे कळप दिसत. महाराजांना जनावरांची निपज घेणे अतिशय आवडायचे. त्यांचे रायबागमधील पशुनिपज केंद्र प्रसिद्ध होते. तेथील जनावरेही धष्टपुष्ट निपजायची. तेथे वाघ आणी चित्यांची चांगली पैदास व वाढ चांगल्या पद्धतीने केली जात होती.*
मानसांप्रमाने पशुंवरही प्रेम करणारा असा हा राजा.
संदर्भ - छत्रपती शाहू स्मृतीदर्शन
लेखक - हिंदुराव साळुंखे

*आठवणी लोकराजाच्या*
अतिशय मन हेलावून टाकणारी घटना व त्यातून शाहूरायांनी मानूसकीचा अप्रतीम अनुभव समाजाला दिला असा हा प्रसंग नमुद करण्यासारखा आहे.
१९०३ मधील श्रावण महिण्यातील घटना. एका शुक्रवारी महाराज घोडागाडीतून जात असताना नाक्यावरून त्यांचा रथ टेकडीवर पुर्वेकडे निघाला होता. यावेळी पुर्वेकडून एक बैलगाडी लोकांच्या गर्दीतून भरदाव वेगात येत होती. जमावाच्या गर्दीतून महाराजांच्या रथाला रस्ता काढणे मुष्किलच होते. अशातच काही मुलांचा घोळका गाडीच्या आडवा आला. त्यातील एका चार वर्षाच्या मुलाचा पाय घसरून तो पडला. वरून येनारी भरधाव बैलगाडी आता मुलाच्या अंगावरून जानार एवढ्यात महाराजांनी आपल्या रथातून खाली उडी मारली व त्या मुलाला बाजूला ओढून काढले. याच वेळी जमावातून काहीजन ओरडले "महाराज तो मुलगा मांगाचा आहे, त्याला हात नका लावू."
यावर महाराज संतप्त होऊन म्हणाले," *अरे तुम्हाला काही हृदय आहे का नाही तो मांग असला तरी माणूसच आहे. खबरदार पुन्हा असे वर्तन कराल तर."*
महाराजांनी त्या मुलाला रथात घेतले व जवळच असलेल्या आर्य समाजामधील गुरुकुलात पोहचवून सेक्रेटरींना बोलले, " *याला दाखल करून घ्या व ठावठिकाणा काढून पालकांना कळवा."*
कोल्हापूरच्या रयतेवर जात धर्म असा भेदभाव न करता आईप्रमाने सर्वांवर प्रेम करणारा असा हा लोकराजा ! आपला शाहूराजा !
संदर्भ - छत्रपती शाहू महाराज
लेखक - धनंजय कीर

*आठवणी लोकराजाच्या*
शाहूराजेंनी वेदोक्त प्रकरणानंतर महाराजांनी राज्यकारभारात ब्राम्हणेतर मंडळी रुजू करण्यास सुरूवात केली. इतर समाजातील योग्य मानसे शोधण्यासाठी महाराजांची नजर कायम फिरत होती.
एक दिवस एक बातमी समजली. वडगावच्या पाटलाचा मुलगा मँट्रिक पास झाला. शाहूमहाराजांना एवढा आनंद झाला की त्यांनी घोडेस्वाराला आज्ञा केली, " आत्ताच जा आणी त्या मँट्रिक झालेल्या पोराला मी बोलावलंय म्हणून सांग आणी पुढे घालूनच घेऊन ये."
काही वेळाने घोडेस्वार मुलाला घेऊन आल्यानंतर महाराज स्वतः उठून आदराने त्यास जवळ घेतले व आपल्या छोट्या बंधूंकडे वळत म्हणाले," *या भटांनी आमच्या समाजाला शिकूच दिले नाही. शिकण्याचा अधिकार तो फक्त त्यांचा? इतर समाजाने शिकले की ब्रम्हहत्येप्रमाने पाप होते. असे समाजावर बिंबवून आमचा समाज अडाणी ठेवला. या पोराने माझ्या मनात हुरूप आणला आहे. मी आता समाजाला कदापी मागे पडू देणार नाही. त्यांना शिकवीन. त्यांची राहण्याची जेवण्याची सोय करीन. आता बसून चालनार नाही."*
असा हा शिक्षणाचे मोल पुर्णपने जानलेला व आपल्या प्रजेला शिक्षणाचा पाया घालून देणारा लोकराजा ! आपला शाहूराजा !
संदर्भ - शाहूंच्या आठवणी
लेखक - नानासाहेब साळुंखे

*आठवणी लोकराजाच्या*
शाहूमहाराज आणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैत्रीबाबतीत काही गोष्टी आठवणीत राहण्यासारख्या आहेत.
डॉ. आंबेडकर यांनी उच्चपदवी प्राप्त केल्याची राजर्षी शाहू महाराजांना बातमी लागल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. जी व्यक्ती भेटावयास येईल त्या व्यक्तीसमोर डॉ. आंबेडकर यांचे कौतुक करून म्हणावयाचे, " *आता या भटांना बौद्धिक बाबतीत शह द्यावयास बहूजन समाजातील माणसे हळूहळू पुढे येऊ लागली आहेत. एक दिवस असा उगवेल की या भटांच्यापेक्षा आपल्या बहूजन समाजातील माणसेच पुढे गेलेली असतील."*
*"चांगला मनुष्यच चांगला मित्र होऊ शकतो* " हे उभयंतांच्या मैत्रीवरून दिसून येते.
संदर्भ - शाहूंच्या आठवणी
लेखक - प्रा. नानासाहेब साळुंखे

*आठवणी लोकराजाच्या*
शाहूमहाराजांनी आपल्या व्ययक्तिक आयुष्यात विवाह संबंधी काही नियम काटेकोरपणे पाळले होते, इतरांनीही तसे योग्यप्रकारे पालन करावे असे ते इच्छित होते.
आक्कासाहेब महाराज या शाहूमहाराजांच्या कन्या. यांचा विवाह आजीसाहेबांनी देवासचे तुकोजीराव पवार यांच्याशी ठरविला होता. त्याप्रमाने १९०४ साली बोलणी झाली व एका वर्षाभरात लग्न उरकावे असे मुलाकडील मंडळींची मागणी झाली.
यावेळी महाराज पत्राद्वारे म्हणाले," *१९०८ सालापर्यंत मुलीचे वय किमान चौदा वर्षाचे होईपर्यंत तिला संसारात जुंपणे मानवी अन्यायाचे व निर्दयीपणाचे होईल. सबब विवाह १९०८ साली व्हावा."* ही मागणी मान्य करून विवाह १९०८ साली संपन्न झाला.
फक्त विचाराने नव्हे तर आचरणानेही महान व जुन्या चालीरितींना तोड देऊन आधुनिक विचारसरणी जोपासनारा असा हा लोकराजा ! आपला शाहूराजा !
संदर्भ - शाहूंच्या आठवणी
लेखक - प्रा. नानासाहेब साळुंखे

*आठवणी लोकराजाच्या*
शाहू महाराजांना अपायकारक अशी व्यसने नव्हती. पान, तंबाखू, सिगारेट, बिडी, दारू, यापैकी त्यांना एकही व्यसन नव्हते. दारूची तर त्यांना अतिशय भिती वाटे.
*एकदा शेतकऱ्यांचे रानांमध्ये राणडुक्कर धुडगुस घालत आहे अशी बातमी महाराजांच्या कानावर आली. पन शिकारीची तयारी करता करता ते घोड्यावरून पडले आणी बेशुद्ध झाले. महाराजांच्या अंगातला शिण कमी व्हावा व अंगात थोडी ताकद यावी यासाठी त्यांच्यासोबतच्या डॉक्टराने औषधात थोडी उत्तेजकता म्हणून दारू मिसळली. त्यावेळी नेमके महाराज थोडे शुद्धीत यायला लागले होते, व त्यांनी तो दारूचा वास ओळखला व म्हणाले," या औषधात ब्रँडीचा वास येतोय, घातली आहे का तुम्ही?" यावर डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवून थोडी उत्तेजना मिळून जाग येण्यासाठी घातली आहे असे म्हटल्यावर महाराज पेला दूर करत म्हणाले," एवढीशी पोटात गेली तरी त्याची चट लागेल आणी आयुष्याचे मातेरे होईल. माझ्या वडिलांचे दारूने काय केले त्याची आठवण मी विसरणार नाही."*
याचमुळे महाराज दारूच्या मोहाला आयुष्यभर बळी पडले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही हा नाद लागला नाही.
संदर्भ - लोकराजा शाहू छत्रपती
लेखक - भिकशेठ ज्ञानदेव पाटील



पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...