*भला माणूस...*
चित्रपट क्षेत्र म्हटल की बडी बडी असामि डोक्यात असतात. कुणी अभिनयसम्राट असतो तर कुणी हृदयसम्राज्ञी असते. कुणी बडा निर्माता असतो तर कुणी उच्चकोटीचा दिग्दर्शक. कुणी चांगला गीतकार असतो तर कुणी उत्कृष्ट संगीतकार. कुणी स्टोरी लिहिणारा असतो तर कुणी स्टंट करणारा. कुणी आयटम गर्ल असते तर कुणी साईड हिरो. हे फिल्मीजगत असे वेगवेगळ्या मानवी लोकांच्या प्रतिभेचे दर्शन घडवणारे केंद्र आहे. इथे जो यशस्वी होतो तो " सेलिब्रिटी " ठरतो आणि अयशस्वी काळाच्या पडद्याआड निघून जातो. अत्यंत अन् अत्यंत बेभरवशाचे असे हे क्षेत्र असते. राजाचा रंक कधी होईल न् रंकाचा राजा कोण होईल हे सांगताच येत नाही. अशा या फिल्मीदुनियेत आपल्या अभिनयाने उत्तूंग कामगिरी बजावलीच तरीही सामाजिक कृतज्ञता जपण्यासाठी आपली प्रतिमा व प्रतिभा बिनदिक्कत विनामोबदला ज्यांनी वापरला अशा तुरळक सेलिब्रिटी लोकांच्यात एक नाव ठळकपणे ध्यानात राहते ते म्हणजे " निळूभाऊ फुले ". १३ जुलै हा त्यांचा स्मृतीदिन.
*पडद्यावर " ती " बेरकी नजर भिरभिरली की अंगावर काटा मारायचा. ती नजर अन् जोडीला संथ पण खर्जातील आवाज. आवाजातील चढउतार आणि शारीरिक हालचाली यांचा समर्पक समन्वय साधून " अख्खा पडदा " व्यापण्याची हिंमत निळू फुले या कलावंताने कमावली होती. नाट्यक्षेत्र असो की सिनेमा , निळूभाऊ करणाऱ्या प्रत्येक भुमिकेला त्यांनी आपल्या अस्सल अभिनयाने वजन प्राप्त करुन दिले. सखाराम बाईंडरमधला एक वेगळेच रसायनाने भरलेला सखाराम असो अथवा सूर्यास्त नाटकातील गांधीवादी अप्पाजी असो. या भुमिका केवळ या कलावंतासाठीच निर्माण झाल्या होत्या. मराठी चित्रपटात पाटील व सावकार यांच्या भुमिका इतक्या गाजवल्या की आजही " झेले पाटील " विसरायचा म्हटल तरी शक्य होत नाही. बरोबरीचे कलावंत अत्यंत अभिनयसंपन्न व जोमदार असतानाही आपल्या वाट्याला आलेल्या भुमिकेचे सोने करायची ताकद निळूभाऊमध्ये होती. म्हणून तर म्हटल की हा कलावंत " पडदा व्यापून टाकणारा " होता. कलावंत म्हणून जितके निळूभाऊ अजरामर ठरले तितकेच ते कायमचे स्मरणात राहीले ते सामाजिक भान जपणारा माणूस म्हणून. सामाजिक परिवर्तन वादी चळवळीना " हक्काचा सेलिब्रिटी " मिळाला तो साथी निळूभाऊच्या रुपाने. महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता आपल्या साथी कलावंताना घेऊन डाँ. नरेंद्र दाभोलकर यांच्या समन्वयाने लग्नाची बेडी हे नाटक करुन लाखो रुपयांचा निधी जमवला.डाँ. दाभोलकरानी नोंदवलय की " मोठ्या कलावंताचे कोणतेही नखरे निळूभाऊनी कधीच केले नाहीत ". समाजवादी लोहियाचा प्रभाव त्याच्यावर होता.राष्ट्र सेवादल या सानेगुरुजीनी स्थापन केलेल्या संघटनेत निळूभाऊ सामाजिक जाणीवेने व आपल्या सर्व अंगभूत क्षमतेने कार्यरत राहीले. एका बेभरवशाच्या क्षेत्रांत आयुष्य घालवूनही सामाजिक क्षेत्रातील लोकांना कायमचा भरवसा वाटणारा माणूस म्हणजे निळूभाऊ.*
निळूभाऊच्या स्मृती जपताना चित्रपट क्षेत्रातील धुरीण नतमस्तक होतीलच. त्याचबरोबर सामाजिक चळवळी सुध्दा होत आहैत हे आनंदाची गोष्ट आहे. ज्या राष्ट्र सेवादलात निळूभाऊ वाढले त्या सेवादलाच्या इचलकरंजी शाखेने " निळू फुले पिक्चर क्लब " स्थापून चित्रपट व नाट्य क्षेत्राविषयी लोकांच्या जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याची सुरुवात केलीय. ज्या दाभोलकरासमवेत निळूभाऊ सामाजिक कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले त्या शहीद नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीने निळूभाऊंची स्मृती जपण्याकरता महाराष्ट्रातील प्रत्येक अंनिस शाखेत " निळूफुले पिक्चर क्लब " स्थापन करण्यासाठी पाऊल उचलले हे अभिमानास्पद आहे. निळूभाऊ म्हणजे " भला माणूस " असे शब्द शहीद नरेंद्र दाभोलकरांनी बेळगावला एका आंतरजातीय लग्नाला जाताना उच्चारले होते तेव्हा त्यांच्या बरोबर मी सुध्दा होतो. " भला माणूस " हे शब्द काळजात रुतलेत ते तेव्हा पासूनच. अधिक काय बोलावे ...
*!! साथी निळूभाऊ फुले....विवेकी सलाम , विनम्र अभिवादन !!*
उमेशसूर्यवंशी ९९२२७८४०६५
No comments:
Post a Comment