Flash

Thursday, 13 July 2017

निळू फुले - सच्चा दिलदार माणूस अन कसदार अभिनेता ....-समीर गायकवाड

Submitted by समीर गायकवाड on 26 May, 2016 - 00:04

सोबतच्या फोटोत मध्ये बसलेले कोण आहेत हे साऱ्यांनीच ओळखले असेल. मात्र आजच्या सोशलमिडीयाप्रवण नव्या पिढीला निळूभाऊ काही ठराविक एंगलमधूनच माहिती आहेत. निळूभाऊंचा बेरकी मुद्रेतला एखादा फोटो टाकून त्याखाली ‘बाई वाड्यावर या’ असं लिहिलं तरी वाचणारा माणूस गालातल्या गालात हसतो. कधीकधी “मास्तर आमचं पोरगं नापास कसं झालं?” अशी विचारणा करणारे निळूभाऊ whatsapp वा एफबीवर दिसतात तर कधी 'छ्बुला म्हणावं तेवढं सांजच्याला वाड्याव ये' अशी साखरपेरणी करत मिशीला पीळ घालत, एका हातात धोतराचा सोगा धरून असणारे निळूभाऊ आपल्याला सोशल मिडीयावर अधून मधून भेटत असतात. धोतर, पायात कोल्हापूरी चपला व डोक्यावर गांधी टोपी अशा वेशातील निळू फुल्यांची एंट्री झाली की पिटातले प्रेक्षक शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत. तर बायका ‘मुडदा बशविला याचा' म्हणून निळूभाऊंच्या नावाने कडकडा बोटे मोडत. बायका त्यांचा प्रचंड राग करीत. अनेकदा त्यांच्या रोषाचा ‘सामना' निळू भाऊंना करावा लागला.
13178990_1015106631876074_4133666315869296267_n.jpg
त्त्यांच्या शेवटच्या काळात आलेल्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक होता 'सातच्या आत घरात'. यातला त्यांचा संवाद अन त्यातील काही शब्दांवर रगडून, जोर देऊन बोलण्याची लकब यामुळे तो संवाद चिरकालीन स्मरणात राहील असा रंगला होता. चित्रपटात निळू भाऊ हे एक सहकार सम्राट असतात अन त्यांच्या दिवट्या कुलदिपकाने दिवसाढवळ्या 'दिवे लावल्या'वर पोलीस त्याला अटक करायला येतात असा सीन आहे. पोलीस इन्स्पेक्टर आणि निळूभाऊ यांचा हा संवाद आपण नुसता वाचला तरी आपल्या डोळ्यापुढे खटकेबाज निळूभाऊ उभे राहतात -
निळूभाऊ - आमच्या घराण्यात गलास फोडल्याचे बारा आणे कधी कुणी भरले नाहीत. पोरानं दारु प्यावी, मास्तराला मारावं, हवालदाराच्या कानफटात ठेऊन द्यावी आन बापानं नायतर आज्यानं सगळं नुसतं करंगळीवर निभाऊन न्यावं.... हे बगा इनिसप्याक्टर...
इन्स्पेक्टरः मांजरेकर..
निळूभाऊ: क्वॉकनातले क्यॅय?
इन्स्पेक्टरः हो !
निळूभाऊ: 'तर्रीपन ऐकायचं !! ते तुमचं काय डायर्‍या, यफाराय, पंचनामा जितं कुटं युवराजांचं नाव असंल तितं काट मारायची.येवड्यासाठी मला शीयेम ना फोन करायला लाऊ नका. ते सोत्ता इथं येतील !
बाकी....पोरीला साडीचोळी.. ह्ये आमी करु! आवो खानदानी पध्दतय ती आमची !.."
ही सारी अगदी साधी वाक्ये आहेत पण निळूभाऊंच्या तोंडून ऐकताना जी मजा येते ती औरच !
निळूभाऊ जिथं जिथं चित्रीकरणासाठी जात तिथं माणसांचे मोहोळ गोळा होई. शूटिंगच्या काळात निळूभाऊंना ‘पाहायला’ येणाऱ्यांमध्ये अनेक जण असायचे. कोल्हापूरच्या स्टुडिओबाहेर एक पापडविक्रेता हा त्यापैकीच एक. तो चित्रीकरणादरम्यान तासन्तास येऊन निळूभाऊंना पाहत बसायचा. तो तसा बसला तर त्याचा धंदा कसा होणार, याचा विचार निळूभाऊ करायचे. त्याला अधिक झळ बसू नये म्हणून ते स्वत: त्याच्याकडून पापड विकत घेत असत. सतत येऊन येऊन त्याची निळूभाऊंशी ओळख झालेली. पापड विकत घेता घेता मग कधी ते त्याच्याबरोबर जेवणाचा आस्वादही घेत! आपले शुटींग पाहायला आलेल्या सामान्य माणसाच्या ताटास ताट लावून बसणारया निळूभाऊंना खऱ्या अर्थाने माणूसवेडा म्हणता येईल.
व्ही. शांतारामांच्या पिंजरात निळूभाऊंची भूमिका छोटी होती. मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे.'पिंजरा'त मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनयसामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं 'सामना' करताना दोघांनाही मजा आली. निळूभाऊंना ‘सखाराम बाईंडर' या नाटकानंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना 'हिंदूराव धोंडे पाटील' साकारण्याची संधी मिळाली. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने गाजलेला ‘सामना' हा माईल स्टोन. 'सामना'त निळूभाऊंचा सामना डॉक्टरांशी होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग रसिकांना मिळाला. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी समर्थपणे न्याय दिला.
इथे निळू भाऊंच्या दोन आठवणी आवर्जून सांगण्याजोग्या आहेत ज्यावरून त्यांचे वलय आणि त्यांचा स्वभाव यांचा सहज अंदाज येतो. ‘एक गाव बारा भानगडी’नंतर झेलेअण्णा सगळ्या खेडोपाडी पोहोचला होता. बिगारी कामगार, रिक्षावाले, ट्रक ड्रायव्हर ते गावाकडचे शेतमजुर या सर्वानी त्याचं स्वागत केलं होतं. निळू भाऊंचे पडद्यावरील आगमन गाजले असले तरी त्यांचा मुळचा पिंड नाट्यभूमीचा असल्याने त्यांनी नाटकास अलविदा केले नव्हते. ‘बारा भानगडी’ गाजला तरी नाटकासाठी त्यांची रुटीन त्यांनी सेट केले होते. औरंगाबादला नाटकाचा प्रयोग करून पुणेमार्गे कोल्हापूरला शूटिंगला जायला ते पुण्यातल्या एका नाक्यावर ट्रकची वाट पाहत उभे होते. थंडीचा मोसम असल्याने निळूभाऊंनी कानटोपी घातली होती. प्रवासाने त्यांच्या अंगातला शर्ट चुरगाळून गेला होता. कराडला चाललेल्या एका ट्रकवाल्यानं ही 'सवारी' घेतली. धान्याच्या पोत्यावर आपली पथारी टाकून निळूभाऊ तिथेच पाठ टेकते झाले. तिथेच क्लीनरही होता. त्याचं ध्यान निळूभाऊंच्या हालचालीकडे गेले अन त्याला यांना कुठे तरी पाहिल्यासारखे वाटले अन त्याची ट्यूब पेटली कानटोपी’मुळं आधी लक्षात आलं नाही मात्र त्याने हातातल्या बॅटरीचा झोत दोन-चार वेळा निळूभाऊंवर टाकून खात्री केली. ट्रक पुढं गेल्यावर मात्र तो ओरडायला लागला. त्यानं ड्रायव्हरला थांबवलं अन सांगितलं की, 'मागं झेलेअण्णा हाय !"
ट्रक थांबला. निळूभाऊंना बघून ड्रायव्हरसुद्धा खूश झाला. त्यानं आपल्या केबिनमध्ये त्यांना आदरानं बसवलं. निळूभाऊंच्या सादगीने त्याचा जीव मोठा झाला. एके ठिकाणी ट्रक थांबवून आपल्या बरोबरच्या शिदोरीतले दोन घास अगदी अगत्याने दिले. त्यांनीही ते त्याच मनोभावाने पोटात घातले. ‘झेलेअण्णा’ आपल्यासारखाच माणूस आहे, याचा आनंद ड्रायव्हरला झाला होता. जेवणानंतर ट्रकच्या मागच्या बाजूची पोती हलवून त्यांची झोपायची सोय ड्रायव्हर आणि क्लीनरनं केली. निळूभाऊंना झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा त्यांनी विचारलं, ‘कराड आलं का?’
ड्रायव्हर म्हणाला, ‘कराड नाही, आपण कोल्हापूरला पोहोचलोय !'
निळूभाऊ हैराण झाले. ते म्हणाले, ‘अरे पण कराडला जाणार होता ना ट्रक?’
‘व्हय, तुमी झोपला व्हता. म्हनलं, कोल्हापुरात सोडू तुमास्नी’, ड्रायव्हर उत्तरला.
त्या दिवशी मालट्रकने निळूभाऊ शूटिंगला पोचले. त्यांचा मेकअप सुरू असताना त्यांचं लक्ष मात्र आपल्या या ड्रायव्हर-क्लीनर मित्रांकडे होते, त्यांनी त्यांची मस्त बडदास्त ठेवली. त्यांना चहा-नाष्ता दिला. शूटिंगची अपूर्वाई त्यांच्या तोंडावर दिसत होती तर त्यांचे समाधानी चेहरे पाहून निळूभाऊ तृप्त झाले होते.
निळूभाऊंना ‘सखाराम बाईंडर' या नाटकानंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना 'हिंदूराव धोंडे पाटील' साकारण्याची संधी मिळाली. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने गाजलेला ‘सामना' हा माईल स्टोन. 'सामना'त निळूभाऊंचा सामना डॉक्टरांशी होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग रसिकांना मिळाला.एक गाव नंतर आलेल्या 'सामना' चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, "अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला...!" मध्येच कधी तरी भुजंगसारखा वेगळा सिनेमा करायला मिळायचा. भस्म्या रोग झालेला त्यातला खादाड भुजंग साकारताना निळूभाऊंना मजा आली असणार. 'पिंजरा'त देखील भाव खाऊन जातात ते निळू फुलेच. कुत्र्याच्या पंगतीत बसून जेवायचा प्रसंग असो किंवा मास्तरांना 'आता नुसता हसतो मास्तर....' म्हणणे असो, निळूभाऊंनी आपली अदाकारी झकास वठवली आहे. ओठाची कुंची करुन, भुवई उंचावत नाटकीपणे बोलण्याच्या बर्‍याच भूमिका करण्यात अन अशा रग्गील भूमिका साकारण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांच्यावर शिक्का बसलेल्या एकसुरी भूमिकांच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम पुनरुज्जीवीत होईल अशी वेधक भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेलच कमी आले. अरुण साधूंच्या 'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' या दोन कादंबऱ्यांवर 'सिंहासन' हा मराठी चित्रपट जब्बार पटेल काढत होते. डॉ. श्रीराम लागू, अरुण सरनाईक, दत्ता भट, सतीश दुभाषी, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, श्रीकांत मोघे असे सगळे दादा कलाकार होते. यात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही. सिनेमा पाहून आज किती तरी वर्षे लोटलीत मात्र निळू भाऊंचा पत्रकार 'दिगू' डोळ्यापुढून जात नाही.
निळू फुल्यांचे शुटींगची एक झलक पाहण्यासाठी तेंव्हा अनेक जन उतावीळ असत, त्यांच्या शुटींग पाहण्याला अधीर झालेल्या व्यक्तीपैकी एक विश्वास पाटील सुद्धा होते, जे आजचे मोठे लेखक आहेत. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत शूटिंगच्या काळात अनेक रसिक अन तितकेच बघे त्यांना ‘बघायला’ जायचे! अशाच एका दिवशी कॉलेजची दोन तरुण पोरं स्टुडिओत घुसली. विनाकारण सेटवर घुसून वेळेचा अपव्यय करणारी ही आगंतुक पोरं म्हणजे एक व्याप होता. ते दोन तरुण सेटवर घुसल्याचं कुणाच्या तरी लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या दोघांना हाकलण्यासाठी आवाज दिला. मात्र ते तरुण जायला तयार होत नव्हते. ‘आम्ही निळू फुलेंना भेटायला आलो आहोत,’ असा लकडा त्यांनी लावला. तेव्हढ्यात निळूभाऊ शॉट आटोपून आले. पाहतात तर दोन अनोळखी मुलं त्यांना भेटण्यासाठी तिष्टत होती, अन त्यांना सेटवरून हुसकावून लावलं जातंय ! त्यांनी हुसकावणारयाला थांबवलं. त्या पोरांना जवळ बोलावलं. त्यांची आस्थेनं चौकशी केली. ‘काय शिकताय?’, ‘कितवीत आहात?’, ‘कोणती पुस्तकं वाचताय?’ असे वेगळेच सवाल केले. शूटिंग पाहून झाल्यावर त्यांना माघारी पाठवलं. त्यातला एक तरुण नंतर त्यांचा मित्र झाला. तोच पुढे जाऊन आपला 'पानिपत'कार विश्वास पाटील झाला . अशी जादू निळू भाऊंच्या अभिनयाची होती.
जेंव्हा 'एक गाव बारा भानगडी' हिट झाला ..... तो किस्सा देखील असाच आहे. तेव्हा ते 'कथा अकलेच्या कांद्याची' मध्ये काम करत होते. गाडीमध्ये त्यांची जागा ठरलेली असे, ती कुठं असायची ? कंडक्टरच्या बाजूला जी मधली जागा असायची तिथे ते झोपायचे. गाडी नसली की मिळेल त्या वाहनाने नाटकाला पोहोचायचे. एकदा ते रेल्वेने लातूरला गेले. आणि सकाळ होताच जागे होऊन पाहतात तो काय उठलो अगदी सकाळी तर लातूर स्टेशनवरती १५-२० हजारांचा मॉब चहूबाजूला. शिट्ट्या, पोलीस, असा दंगा चालू होता. त्यांचे सहकारी म्हणू लागले हे लोक जाऊ देत मग आपण उतरु. त्यांनी तिथेच तोंड बिंड धुतलं आणि बसून राहिले. मात्र मॉब काही हलत नव्हता. अखेर एकेक करून सगळे उतरले अन हे दोघेच गाडीत राहिले. मॉबच्या शिट्ट्या आणि आवाज, बोंबाबोंब चालूच होती. तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर आला. त्याने यांच्या बद्दल दुसऱ्याकडे चौकशी केली. त्यावर एक पोलीस म्हणाला,’ते काय तिथे बसलेत ते’. मग तो पोलीस यांच्याजवळ येऊन म्हणाला,’ए चला उठा’. त्यांना कळेना, त्यांनाच का उठवतोय. अखेर त्यांनी दरवाजा उघडला अन या दोघांना जमावापुढं उभं केलं. लोकांनी जो दंगा केला. ‘आला, आला, आला’! काय एखाद्याची प्रसिद्धीची हवा काय असू शकते. १५-२० हजार लोक नुसते, पोलिसांनी मोठं कडं केलेलं, त्याच्यामध्ये मात्र हे दोघे चुरगळलेल्या कपड्यातले बावळट वाटावे असे दिसत होते. इतकी बेकार परिस्थिती होती त्यांची. जोडीला हातात त्या मोठ्या वळकटया होत्या. इन्स्पेक्टर ‘हटो हटो’ करीत होता. लॉजपर्यंत त्यांची अशीच मिरवणूक निघाली. लॉजच्या मालकाने ‘साहेबांसाठी स्पेशल दुसरी खोली’ म्हणून निळू भाऊंना स्पेशल खोलीत ठेवलं. मात्र निळू भाऊंना मात्र कळत नव्हते की हा साहेब कोण आहे ? आख्खं हॉटेल, लॉज माणसांनी भरलेलं नुसतं. हा काय चमत्कार आहे असंच त्यांना वाटलं.
आपल्यावर उपकार केलेल्या. आपल्याला मदत केलेल्या माणसाची ते नेहमी जाणीव ठेवत. याचा एक भारी किस्सा आहे. एकोणीसशे पंच्याऐंशी सालची गोष्ट! काँग्रेस वजा जाऊन इतर पक्ष एकत्र येऊन ‘पुलोद’ची स्थापना झाली होती. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत ‘पुलोद’चे उमेदवार होते दिलीप सोपल! पूर्वी सोपलांनी निळूभाऊंच्या बार्शीतल्या नाटकाच्या प्रयोगानिमित्त गाठभेट घेऊन काही सहकार्य देऊ केलं होतं! गोविंद चंडक यांच्या सांगण्यावरून सोपलांचा प्रचार करायला निळूभाऊ एकोणीसशे पंच्याऐंशीला बार्शीत आले होते. त्यावेळी सोपल दुसरीकडे सभेत होते. तेव्हा, ‘सोपलांना कशाला बोलावता, त्यांचा प्रचार सुरू राहू दे! आपण आपलं काम करू’, असं म्हणत निळूभाऊंनी बार्शीच्या शाहीर अमर शेख चौकात सभा घेतली. निळूभाऊंची अफाट क्रेझ होती. त्यांना बघायला, ऐकायला हजारो लोक आलेले. त्यातही महिलांची संख्या खूप होती. निळूभाऊंनी त्या प्रचंड गर्दीपुढं सोपलांसाठी सभा घेतली. त्यात ते बोलले- ‘‘पडद्यावरचा माझा कावेबाज अभिनय पाहून तुम्हाला मला मारावंसं वाटत असेल, तर खुशाल मारा. पण मत मात्र सोपलांना द्या!’’ इतका रसिकप्रिय माणूस सभेनंतर न जेवता पुढच्या कार्यक्रमाला निघून गेला. एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या निवडणुकीत दिलीप सोपल पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांनी विधानसभेत पाऊल टाकलं. त्यासाठी निळूभाऊंच्या सभेनं भरीव काम केलं.आपल्या ऋणानुबंधाची आठवण ठेवून त्याबरहुकुम वागणारा हा दिग्गज अभिनेता किती मोठा माणूस होता याची यातून प्रचिती येते.
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला . नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणा – या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते . या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीने उपयोग केला . सहज सुंदर अभिनय करणा – या निळूभाऊंनी . काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला. मराठी सोबतच निळू भाऊंनी हिंदी सिनेमात देखील आपला ठसा उमटवला. त्यापैकी ‘ कुली , गुमनाम है कोई , जरा सी जिंदगानी , रामनगरी , नागिन – २ ‘ यात त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. ‘नामदेव शिंपी’नंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे चित्रपटात काम करायचे नाही, असे ठरवले होते. पण निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आग्रहास्तव काही आश्वासने त्यांनी पूर्ण केली.
त्यांनी त्यांच्यातला माणूस सदैव जिवंत ठेवला. त्यांचे शूटिंग जयप्रभामध्ये सुरू असताना एक उदबत्ती विकणारा तरुण काही न बोलता मेकअप रूम आणि सेटवर कोपऱ्यात बसत असे. निळूभाऊंकडं त्याचं काही काम नसे आणि निळूभाऊंचंही त्याच्याकडं काही देणं-घेणं नव्हतं. परंतु तिथं बसून मनाला शांती लाभते, निळूभाऊंच्या सहवासानं ऊर्जा मिळते, असं म्हणून तो तिथं बसून राही. निळूभाऊ त्याला हुसकावून न लावता त्याला बसू देत अन त्याच्यापासून स्वतःला प्रेरणा घेत !
व्यक्तिरेखा खलनायकी असल्या तरी निळूभाऊ अत्यंत भला माणूस होते. ते म्हणायचे, की ' प्रत्येक कलावंताला आपल्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. मी माझ्या जीवनात अत्यंत साधा आहे, पण पडद्यावर मात्र खलनायक. पण मी या भूमिका किती प्रभावीपणे करतो हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आजही मी सामाजिक कामाच्या निमित्ताने खेड्यापाड्यात जातो, तेव्हा माझ्या पडद्यावरची खलनायकी भूमिका किती प्रभावी आहे याची पावती मिळते. गावातल्या शिक्षिका, नर्स, गृहिणी माझ्यापासून दूर रहातात. त्यांना वाटते, की पडद्यावरचा निळू फुले प्रत्यक्षातही तसाच वागतो की काय?'
चित्रपटातल्या भूमिकांनी निळू फुले देशभर पोहोचले असले तरी नाटक हीच त्यांची मूळ आवड होती. 'नाटक करताना मजा येते, असं ते म्हणायचे. नाटक करताना सावधगिरी बाळगावी लागते. तुमच्या प्रत्येक संवादावर लगेचच प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. तिथेच खर्‍या अभिनेत्याची कसोटी लागते, असं ते म्हणत.
आपल्या निराळ्या व जबर संवाद फेकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव “निळकंठ कृष्णाजी फुले”असे होते तर त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणार्‍या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात ‘रोंगे’ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्‍या अर्थाने पुढे आले.
'अकलेच्या कांद्या'च्या खूप आधी त्यांच्यातल्या अभिनेत्याचा जन्म लहानपणीच झाला होता. निळूभाऊंना लहाणपणापासूनच नकलांची आवड. शिक्षकांच्या नकला ते करून दाखवायचे. मग शिक्षकांनाही त्यांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच नाटकाची आवड जोपासली गेली. याच काळात देशात स्वातंत्र्याचे आंदोलन चालले होते. त्यांचे बंधू दत्तात्रय हे या आंदोलनात होते. त्यांना शिक्षाही झाली होती. त्यांचीच प्रेरणा घेऊन हान असले तरी चिठ्ठ्या पोहोविणे, निरोप देणे ही कामेही त्यांनी केली. चळवळीशी त्यांचा संबंध आला तेव्हापासून. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेवा दल या दोन्ही संघटना फार्मात होत्या. निळूभाऊ खेळायसाठी म्हणून संघाच्या शाखेवर जायचे. पण त्यांच्याबरोबर दलित, ख्रिश्चन आणि इतर जातीतील मुलंही असायची. दलित आणि मुस्लिम मुलांना आणू नका, असे तिथल्या शाखा प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे मग संघ सुटला. मग तिथे राष्ट्रसेवादलाशी संबंध आला. तिथे मात्र सर्वधर्मियांना येण्याची मुभा होती.
नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले . सेवादलातच त्यांना राम नगरकर, लीलाधर हेगडे, वसंत बापट ही मंडळी भेटली. निळूभाऊंच्या अभिनयाचा पाया कलापथकाने घातला. या कलापथकाद्वारे प्रबोधन आणि मनोरंजन यांचा संयोग साधून लोकनाट्ये व्हायची. त्यातला अर्धा भाग लिखित आणि अर्धा स्वयंस्फूर्त असायचा.मग व्यावसायिक नाटकात त्यांनी पदार्पण केले. हे सर्व करत असतानाच त्यांच्या मुळच्याच घट्ट असलेल्या सामाजिक जाणिवा अधिक व्यापक होत गेल्या. हे सर्व त्याना सहज साध्य झाले कारण ते हाडाचे कार्यकर्ते होते. एकदा इंदिरा गांधी पुण्यात आल्या तेव्हा निळू भाऊ, शांती नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चक्क त्यांच्या गाडीला डेक्कनवर अडवलं आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी रिबेरो यांनी त्यांच्या पाठीवर सणसणीत छडया चालवल्या होत्या. कारण निळू भाऊंनी रस्त्यावर चक्क आडवे पडून गाडी पूर्ण ब्लॉकच केली होती. धडाधडा पोलिसांनी मारायला सुरुवात केली. मात्र या घटनेतून त्यांच्यातल्या जिद्दी स्वभावाला आणखी धार आली होती.
ते सुरुवातीला एका कला पथकातून लोकनाट्य करायचे. त्यानंतर त्यांनी व्यवसायिक लोकनाट्य ‘कथा अकलेच्या कांद्याची’ यातून नाट्य सृष्टीत पदार्पण केले. या लोकनाट्याचे जवळजवळ २००० प्रयोग पूर्ण केले. त्याच्या दुसर्‍या अंकात त्यांना पुढार्‍याची भूमिका साकारायची होती. ती प्रयत्नपूर्वक साकारली व त्यातील त्यांचे ते काम पाहुन चित्रपटसृष्टीतील काही मंडळी चकित झाली. दिग्दर्शक अनंत मानेंनी त्याच्यातला गुणी अभिनेता हेरला आणि 'एक गाव बारा भानगडी'मध्ये झेले अण्णाची भूमिका दिली. तेव्हा मिळालेली संधी न दवडता ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले. चित्रपट बेफाम चालला व त्या एका वर्षात त्यांचे ७ चित्रपट प्रदर्शित झाले. 'एक गाव बारा भानगडी'च्या 'झेलेअण्णां'च्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झालीही भूमिका अजरामर झाली. शंकर पाटलांनी लिहिलेला हा चित्रपट होता. मराठी आणि कानडी सीमेवरील ही व्यक्तिरेखा होती. शंकर पाटलांकडे जाऊन पंधरा दिवस निळूभाऊ ही भाषा शिकले. यानंतर मग त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. पण मराठी चित्रपटाला त्यांचा बेरकी, खलनायकी पाटील किंवा सरपंचच जास्त गाजला. पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंना विजय तेंडुलकरांचं 'सखाराम बाइंडर' नाटक मिळालं आणि या नाटकानं इतिहास घडवला. निळूभाऊंच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असं या नाटकाचं वर्णन करावं लागेल. वास्तविक तेंडुलकर निळूभाऊंना सखाराम पेलवेल का, याविषयी साशंक होते. मात्र, कमलाकर सारंग निळू फुलेंच्याच नावावर ठाम होते. त्यांनी तेंडुलकरांना कथाचा प्रयोग दाखवला. त्यानंतर निळूभाऊंना हे काम मिळालं. 'बाइंडर' आणि त्याचा पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे. या नाटकानं निळूभाऊंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिलं. कथा अकलेच्या कांद्याची, सखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबुतर ही त्यांची गाजलेली नाटके, या सर्वाचे त्यांनी जवळपास दहा एक हजार प्रयोग केले. कथाचे दोनेक, जंगली कबूतरचे दीडेक हजार, सखारामचे आठशे प्रयोग केले.
आजही दुष्ट, कपटी पाटील किंवा, बेरकी इसम असे व्यक्तिविशेष समोर आणले की का कुणास ठाऊक निळू फुले आठवतात. अशा प्रकारच्या खलनायकी भूमिकांवर एवढा जबरदस्त पगडा उमटविणार्‍या निळू भाऊंच्या कर्तृत्वाचे मोजमाप केवळ खलनायक म्हणून करता येणार नाही, पण त्यांच्या आयुष्यातला मोठा भाग या प्रकारच्या भूमिकांनीच व्यापला आहे, हेही विसरता येणार नाही. वैशिष्ट्यपूर्ण आवाज, संवादफेकीची वेगळी शैली, तिरपी व भेदक नजर आणि याला समर्थ अभिनयाची जोड या जोरावर निळूभाऊंनी अनेक भूमिकांचे सोने केले.
चित्रपट क्षेत्रातील कलाकारांचे खाजगी आयुष्य लोकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिले आहे. निळूभाऊंनी याबाबतीत आधीपासूनच दक्षता बाळगली होती. स्त्रियांबद्दलचं आकर्षण या विषयीचं त्यांचं मत त्यांच्याच शब्दात देणं अधिक उचित ठरेल. ते म्हणतात, "मी स्त्रीचा असा स्वतंत्रपणे विचार केलेला नाही. मी संसारालासुध्दा लायक नाही. तसंही मला कळतं की, ती शरीराची किंवा आपण जे काही दिवसभर केले ते कुठेतरी बोलून दाखवण्याची जागा आणि मग शारीरिक संबंध, हे यानंतर मग कुठेही अडचणीचं होता कामा नये असं. त्या वेळी फार कटकटीचं होतं. मला एखादी स्त्री माझ्यात इन्व्हॉल्व्ह झाली आणि ती मला व्यापून टाकायला लागली की मला नाही आवडत. तिनं कब्जा नाही करता कामा. तिने वेसण नाही घालता कामा आणि तिनं सातत्यानं माझ्या जवळ असणं, हेही मला नाही आवडत. माझे जे मित्रमैत्रिणी आहेत, ते स्वतंत्र आहेत आणि ते तुम्हालाही तसेच स्वतंत्र ठेवू इच्छितात. त्यांनाही ते आवडत नाही की, तू व्यापून टाकणार माझं आयुष्य आणि तुझ्यावर मी व्यापून राहणार. अशी स्त्री-मैत्री असू शकते. असे काही मित्र आहेत ज्यांची नावे घेणे बरे नाही, पण आहेत. ते एकमेकांना कुठेही जड होत नाहीत. एकमेकांना कुठेही ऑकवर्ड करीत नाहीत. ते एकत्र येतात, एकत्र राहतात आणि निघून जातात, ते कळवतसुध्दा नाहीत. पुन्हा ते अधिक चांगल्या पध्दतीने एकत्र येऊ शकतात. बिलकुल एकमेकांना तुमच्या व्यक्तिगत, खाजगी जीवनाबद्दल कसलाही संबंध नाही, आकस नाही, नुसता सहवास..." सिनेसृष्टीशी संबंध असणारा पुरुष कलावंत स्त्रियांविषयीचे आपले इतके परखड व स्पष्ट विचार मांडताना क्वचितच आढळतो.
व्यक्तिगत आयुष्यात निळूभाऊ अत्यंत साधे होते. पांढरा पायजमा आणि वर झब्बा, खांद्यावर कापडी झोळी हाच त्यांचा कायमचा वेश. त्यात कधीच बदल झाल्याचे स्मरत नाही. खलनायकाच्या भूमिकेत असताना शिवराळ भाषा वापरणारे, तसेच वावरणारे निळू फुले यांच्याशी गप्पा मारताना हा माणूस अतिशय अभ्यासू आहे, हे जाणवे. शिक्षण फार झाले नसलं तरी वाचन मात्र दांडगे होते. त्याचा प्रत्यय त्यांच्या गप्पामधून सदैव जाणवत असे. निळूभाऊ स्वभावाने विनम्र होते नि कमालीचे सज्जनही होते. पडद्यावरची खलनायकी छटा त्यांच्या आयुष्यात अजिबात नव्हती. पडद्यावर अभिनय करणारे निळूभाऊ सार्वजनिक आयुष्यात मात्र सामाजिक उत्तरदायीत्व मानणारे होते, म्हणूनच ते अनके चळवळींशी जोडले गेले होते. सत्यशोधक समाजाशी त्यांचा संबंध होताच, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही काम ते करीत. वर्तमानातील अनेक घटना-घडामोडींवर ते आवर्जून टिप्पणी करत. त्यांचे वाचनही दांडगे होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने 'फुले' उधळण्याच्या योग्यतेचा 'नायक' गेला.
लोकरंजनातून लोकप्रबोधन हे सूत्र प्रमाण मानून, आयुष्यभर सामाजिक बांधिलकी हे मूल्य अंगी बाणवून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिलेले ज्येष्ठ कलाकार व कार्यकर्ते म्हणजे निळू फुले होत. निळूभाऊंचा बेरकी, संपूर्ण देहबोलीतून खलनायकी दर्शविणारा अभिनय, त्यांचा खर्जातला वैशिष्ट्यपूर्ण आवाज यांची नक्कल करत, त्यावरून ‘मिमीक्री’ करत आजही महाराष्ट्रातील शेकडो कलाकार लोकांचे मनोरंजन करत आहेत. यावरूनच निळूभाऊंची अभिनयातील श्रेष्ठता सिद्ध होते. असे हे अष्टपैलू निळू भाऊ एक मातब्बर कलाकार तर होतेच अन एक सामाजिक जाणीव असलेले हाडाचे सच्चे साधे कार्यकर्ते देखील होते. आजही मराठी सिने-नाट्य सृष्टीत त्यांची जागा रिक्त आहे अन भविष्यात देखील ती कुणी भरून काढेल की नाही याची शाश्वती नाही.
- समीर गायकवाड.
संदर्भ - १)मी : निळू फुले!
पूर्वप्रसिद्धी : किस्त्रिम नोव्हेंबर १९८९
२)‘जनमनातला माणूस : निळू फुले’ - रजनीश जोशी.

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...