
*विरंगी मी ! विमुक्त मी !* या डॉ. अंजली जोशींच्या पुस्तकातील सुभाषिते पूर्ण झाली आहेत. या सुभाषितांना वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल वाचकांचे मनःपूर्वक आभार... ही सुभाषिते सुरु असतानाच महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा ललित ग्रंथ पुरस्कार सदर पुस्तकास प्राप्त झाला, त्याचा विशेष आनंद झाला.
आजपासून *सिमोन द बोव्हुआर* यांच्या *द सेकंड सेक्स* या पुस्तकातील सुभाषिते आपल्यासमोर मांडतोय. जगभर गाजलेला हा ग्रंथ *करुणा गोखले* यांनी अनुवादित केला असून पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित केला आहे. मी जेव्हा हे पुस्तक हाती घेतले, तेव्हा त्याच्या अर्पणपत्रिकेतील 'स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते' या वाक्यानेच मी आकर्षित झालो आणि वाचण्याचा मोह आवरला नाही.
सिमोन द बोव्हुआरचे 'द सेकंड सेक्स' हे पुस्तक स्त्रीवादावरचे बायबल समजले जाते. स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगांनी चर्चा तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही. केवळ स्त्रीच नव्हे, तर प्राणी जगतातील नर-मादी हा जीवशास्त्रीय फरकसुद्धा एका टप्प्यावर कसा धूसर होत जातो, याचे विश्लेषण करत करत सिमोन माणसातील नर-मादी या दोन वर्गांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अंगांनी ज्या सखोलतेने ऊहापोह करते, त्याने वाचक केवळ स्तिमित होतो. सिमोनची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतीकरण यांची ताकद एवढी प्रचंड आहे की, सेकंड सेक्स वाचलेली व्यक्ती; मग ती स्त्री असो, व पुरुष, एका वेगळ्या (आणि अधिक स्वच्छ) नजरेने स्वतःकडे आणि भिन्नलिंगी व्यक्तीकडे बघू लागते.
गायनाचे उपजत अंग लाभलेल्या व्यक्तीला सूर आणि तालाचे मूलभूत प्रशिक्षण मिळाल्यास तिच्या कलासाधनेस योग्य मार्ग सापडतो. तद्वत स्त्री पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुषांमधील परस्पर सहकार्य यांची आस असणाऱ्या व्यक्तींना द सेकंड सेक्स चे वाचन अपरिहार्य आहे. स्त्रीत्वाच्या आणि पुरुषत्वाच्या वज्रलेप संकल्पनांनी मनुष्यत्वास अतोनात जखमी केले आहे. लिंग-भेदांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीचे माणूसपण फुलायचे असेल, तर माणसानेच तयार केलेल्या लिंगनिष्ठ चौकटी, श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या श्रेणी नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुळात त्या का आणि कशा तयार झाल्या, हे समजून घ्यायला हवे. आपणच निर्माण केलेल्या या सापळ्यातून रक्तबंबाळ न होता कसे बाहेर पडायचे हे पण जाणले पाहिजे. ही दोन्ही कष्टप्रद कामे सिमोनच्या पुस्तकाने कष्टसाध्य होतात.
"आर्थिक परावलंबित्व, विवाह, मातृत्व व घरकाम हे स्त्रीला गुलामगिरीत करकचणारे साखळदंड आहेत; आधुनिक स्त्रीने या शृंखलांचा पाश गळ्याभोवती पडू देऊ नये."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : १५)*
"पुरुषाची विचारपद्धती शंभर टक्के योग्य नसते, त्याच्यातही अनेक घृणास्पद त्रुटी आहेत, स्त्रीने स्वतःस आमूलाग्र बदलून पुरुषासारखे जगण्याचा प्रयत्न करण्याएवढा पुरुष वंद्य वा अनुकरणीय नाही, पुरुषानेसुद्धा स्त्रीकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : १६)*
"स्त्रीच्या दुय्यमत्वाला पुरुषावरील पुरुष श्रेष्ठत्वाचे सामाजिक संस्कार जेवढे कारणीभूत असतात, तेवढीच स्त्रीला दिली जाणारी आत्मश्लाघेची शिकवणही कारणीभूत असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : १८)*
"स्त्रीच्या अनेक समस्यांचे मूळ ती स्त्री असण्यात आणि भोवतालच्या समाजाने पुरुषप्रधानता जोपासण्यात असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : १८)*
"स्त्री व पुरुषांमधील नैसर्गिक फरकांना अवास्तव प्रमाणात भडक करून त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमतांमध्ये व पर्यायाने त्यांच्या सामाजिक स्तरांमध्ये जी खोल दरी निर्माण केली गेली आहे, ती निसर्गसुलभ नसून मानवनिर्मित आहे."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २०)*
“विवाह वा मातृत्वाचा निर्णय स्त्रीने विचारपूर्वक घ्यावा, अनिच्छेने त्याचे जोखड आयुष्यभर बाळगू नये. घर, बालसंगोपन या सबबीखाली निष्क्रियता, एकसुरीपणा, परावलंबित्व यांना बळी पडू नये.
प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक आलाच पाहिजे; विणकाम, भरतकामात रस वाटलाच पाहिजे, मातृत्वाची ओढ वाटलीच पाहिजे असा समाजाचा आग्रह असतो. त्यामुळे जिला यापेक्षा निराळ्या गोष्टीत रस आहे, ती स्त्री विक्षिप्त समजली जाते. खरे तर अनेक स्त्रीसुलभ नसून सामाजिक संस्कारांनी स्त्रीमध्ये रुजवल्या जातात.”
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २२)*
“मानवी अस्तित्वाला दोन मूलभूत बाजू आहेत. एक बाजू म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी करावी लागणारी खाणे, पिणे, झोपणे, पुनरुत्पत्ती, स्वच्छता, स्वयंपाक, बालसंगोपन इ. नित्यकर्मे. तर दुसरी बाजू म्हणजे दैनंदिन देहधर्माच्या पलीकडे जाऊन काहीतरी भव्यदिव्य, व्यापक परिणाम साधणारी निर्मिती करणे. स्त्रीजीवनाचे दुर्दैव म्हणजे पुरुषाने मानवी अस्तित्वाची सर्जनशील बाजू फक्त स्वतःकडे ठेवली. याउलट सर्व दैनंदिन नित्यकर्मे स्त्रीच्या खांद्यावर टाकली. परिणामत: स्त्रीने काहीही भव्यदिव्य कामगिरी करण्याची शक्यताच संपुष्टात आली. तिचे अस्तित्व केवळ रांधा, वाढा, उष्टी काढा, मूल जन्माला घाला यातच अडकून पडले. *स्त्री-पुरुष दरी कमी व्हायची असेल, स्त्रीला स्वतःचे जीवन सार्थ करायचे असेल, तर तिने ते ऐहिक नित्यकर्मांच्या पातळीच्यावर उचलून काहीतरी सर्जनशील उपक्रमांचा पाठपुरावा केला पाहिजे.*
सर्व घरकाम स्त्री करणार हे पुरुष गृहित धरून चालतो. त्यांना हे गृहीतक सोयीस्कर आहे. तो आपणहून, स्वेच्छेने घरकामाचा एकसुरीपणा स्वतःवर लादून घेणार नाही. त्यासाठी त्याची मानसिकता पूर्णपणे नव्याने घडवणे आवश्यक आहे. *मुलीवर जसे आर्थिक स्वावलंबनाचे संस्कार करणे आवश्यक आहे, तसेच मुलाला प्रापंचिक जबाबदाऱ्या उचलण्याचे बाळकडू देणे गरजेचे आहे.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २५)*
“स्त्रीने स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. ते साधायचे असल्यास स्वतःच्या उपजीविकेसाठी पुरुषावर अवलंबून न राहता स्वतः अर्थार्जन केले पाहिजे. आर्थिक स्वावलंबन हे स्वावलंबनाचे केवळ एक अंग झाले. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, स्वतःच्या दैनंदिन गरजा स्वतः भागवणे, स्वतःची सर्व कामे स्वतःला करता येणे ही स्वावलंबनाची इतर अंगे आहेत व ती तेवढीच महत्त्वाची आहेत. रोज दोन वेळा जेवणे ही ज्याची प्राथमिक गरज आहे, त्याचे स्वतःचे अन्न स्वतःला शिजवता येऊ नये हे केवढे मोठे परावलंबन आहे !
*पुरुष जे करतो, ते स्त्रीला आले नाही, तर स्त्री परावलंबी, पण स्त्री जे करू शकते, ते पुरुषाला येत नसेल, तर त्याला मात्र परावलंबी म्हणायचे नाही, हा दुटप्पीपणा का?*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २६)*
“पुरुषाच्या तुलनेत स्त्रीच्या वाट्याला येणारे शरीर कमी शक्तिशाली असते व त्याचा अनिष्ट परिणाम स्त्रीच्या धैर्यावर होतो. शरीर हे आयुष्यभर आरूढ होण्याचे प्रमुख साधन आहे. पुरुषापेक्षा स्त्रीला मिळालेले शरीर हे साधन कमकुवत आहे. हे थोडेसे गैरसोयीचेपण आहे. आज खूपशी मोठमोठी कामे यंत्राचे एक बटण दाबून करून घेता येतात. मग स्त्रीपेक्षा पुरुष अधिक बलवान असतो याला फारसे महत्व उरत नाही. परंतु तरीही स्त्रीने स्वतःचे शरीर अधिकाधिक ताकदवान करणे हाच सूज्ञपणा होय."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २८)*
“जगातील प्रत्येक माणूस म्हातारा होत असतो, तरीही वृद्धापकाळाविषयी काही गंभीर लेखन होण्याची समाजाला गरज भासत नाही, यावरून आपण वृद्धांना समाजप्रवाहाच्या बाहेर फेकत असतो, हेच सिद्ध होते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४३)*
“पुरुष जसे म्हातारे होतात, तशाच स्त्रिया पण म्हाताऱ्या होत असतात. तरीसुद्धा वार्धक्याच्या समस्येविषयी बोलताना पुरुषांनाच डोळ्यांसमोर ठेवून बोलले जाते. याचे कारण देशाच्या कायद्यांमध्ये, सामाजिक, औद्योगिक आचारसंहितांमध्ये फक्त पुरुषांचेच अस्तित्व उमटते. देशाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये स्त्रीचा सहभाग कमी असल्याने तिच्या वार्धक्याची कुणी विशेष दखल घेत नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४३)*
“वृद्धांची आर्थिक विपन्नावस्था टाळण्यासाठी निवृत्तीवेतन, स्वस्त गृहबांधणी, जेष्ठ नागरिकांसाठी खास वसाहती, त्यांना वाजवी दरात त्वरित वैद्यकीय मदत, त्यांच्यासाठी करमणुकीच्या सोयी हे सर्व प्रत्येक वृद्धाला मिळते का यांविषयी आपण व्यक्तिगत पातळीवर व त्याचप्रमाणे समाज म्हणून जागरूक राहिलो, तरच आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घ्यायचा अधिकार प्राप्त होईल.
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४५)*
“वृद्धापकाळातील क्रियाशून्य दिनचर्या, एकलेपणा, कंटाळा, करमणुकीचा, विरंगुळ्याचा अभाव हे केवळ वार्धक्यात सुरु होते असे नाही. या साऱ्या दु:सह बाबी प्रत्येक माणूस त्याच्या प्रौढ जीवनात अनुभवत असतो. पण त्या वयात दिवसाचे ८-१० तास नोकरीत जात असल्याने त्याच्या ते लक्षात येत नाही. नोकरीतून निवृत्त झाल्याबरोबर त्याला त्याचे प्रत्यंतर येते. औद्योगिकीकरण झालेल्या आजच्या समाजात निशीतला माणूस सुद्धा अपुरे वेतन, कामाचा एकसुरीपणा, दर्जेदार करमणुकीचा अभाव, छंदोपासनेविषयी अज्ञान किंवा औदासीन्य; छंदांसाठी लागणाऱ्या वेळेचा वा साधनांचा अभाव व सांस्कृतिक समृद्धीवर फक्त उच्चभ्रूंची मक्तेदारी हे सर्व सहन करतच असतो. पोटासाठी करायचे ८-९ तासांचे कष्ट सोडल्यास एरवी तो पूर्णतया निरर्थक आयुष्यच जगत असतो. फक्त निवृत्त झाल्यावर ही निरार्थकता अधिक गडद होते.
हे टाळायचे असेल, तर व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर वार्धक्याचे सुनियोजन करणे आणि स्वतःची उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी वयाच्या चाळिशीपासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. विभक्त कुटुंबपद्धतीतसुद्धा ते साधणे अशक्य नाही. परंतु त्यासाठी स्त्री-पुरुष दोघांनीही स्वतःच्या दृष्टिकोनातून मूलभूत बदल करणे गरजेचे आहे."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४५)*
“स्त्री वृद्ध झाली, तरी शरीराने ठणठणीत असेल तर उपयोगी जीवन जगू शकते. तिची तिच्या कुटुंबात व नातेवाईकांमध्ये अधिक भावनिक गुंतवणूक असते. बालसंगोपन, स्वयंपाक, घराची स्वच्छता इ. जीवनावश्यक कौशल्ये तिच्यामध्ये असल्याने वय झाले तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती तरुण कुटुंबीयांच्या जीवनक्रमाशी जोडून घेऊ शकते.
निवृत्तीनंतरचे पुरुषाचे घरातील अस्तित्व क्रियाशील ठेवायचे असेल, वार्धक्यातील निरर्थकता, निरुपयोगीपणा टाळायचा असेल, तर स्त्रीइतकाच पुरुषाचाही घरातील सहभाग तरुण वयापासून उपयुक्त हवा. परंतु त्यासाठी संपूर्ण आयुष्याची उभारणीच घरकामाच्या समान वाटपावर व्हायला हवी. त्यासाठी स्त्रीची कामे व पुरुषाची कामे असे शिक्कामोर्तबही बंद करायला हवे."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४६)*
“स्त्री असो वा पुरुष, प्रत्येक व्यक्तीने कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या निर्णय स्वातंत्र्याशी तडजोड करणे योग्य नाही, माणसाची आर्थिक परिस्थिती त्याच्यावर अनेक बंधने टाकत असते. आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत त्याच्या अगदी मूलभूत हक्कांवर सुद्धा गदा येते. सर्वांत आधी त्याच्या निर्णय स्वातंत्र्याचा संकोच होतो. स्त्री सर्वस्व पुरुषाला वाहून देऊन स्वतःची निर्णयक्षमता व पर्यायाने स्वतंत्र विचार करण्याची कुवत गहाण टाकते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५२)*
“आपल्याला मिळालेले शिक्षण हे साध्य नसून आत्मविकासाचे साधन आहे याचे पुरेसे भान शिक्षित स्त्रीने ठेवले नाही. तसेच अर्थार्जन हे सुद्धा साध्य नाही, केवळ उपजीविकेचे साधन आहे. ते प्राप्त करून घेतल्यानंतर बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय जबाबदाऱ्यांचे जाणीवपूर्वक पालन हे प्रत्येक नागरिकाचे व पर्यायाने प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे, हा समज फार थोड्या स्त्रियांना आला आहे."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ६७)*
“प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या नात्याने पुरुषाशी बांधली गेलेली आहे. भोवतालच्या पुरुषप्रधान व्यवस्थेत राहताना पुरुषांनी निर्माण केलेली मूल्ये ती झुगारूनही देऊ शकत नाही आणि स्वतःची मूल्यव्यवस्थाही निर्माण करू शकत नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. म्हणूनच स्त्री आत्मनिर्भर व्हायची असेल, तर पुरुषातील सत्तेची ईर्षा आणि मालकी हक्काची भावना कमी व्हायला हवी. कौटुंबिक जीवनातील आर्थिक सत्तेचे प्रापंचिक जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करायला हवे. त्यासाठी स्त्रीला व्यावसायिक कौशल्ये हस्तगत करणे अपरिहार्य आहे असे संपूर्ण समाजाला वाटायला हवे. आजपर्यंत स्त्रीकडून केवळ सेवेची व पुनरुत्पत्तीची अपेक्षा ठेवली जात होती. आता तिच्याकडून स्वयंसिद्धतेची अपेक्षा ठेवावी लागेल. स्त्री व पुरुष दोघांनाही स्वतःविषयीचा व त्याच वेळी एकमेकांविषयीचा दृष्टिकोन बदलावा लागेल. *स्त्री म्हणजे पुरुषाला 'करून घालणारी' सेविका नाही व पुरुष स्त्रीला 'जन्मभर पोसणारा तारणहार' नाही, हे ज्या दिवशी स्त्री-पुरुष दोघांनाही उमगेल, त्याच दिवशी स्त्री-पुरुष समानतेची पहाट झाली असे म्हणता येईल.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ६८)*
“मनुष्य जमातीचे दोन निसर्गनिर्मित गट आहेत. एक स्त्रियांचा व दुसरा पुरुषांचा. या दोघांचीही शरीरे, हालचाली, चेहरेपट्टी, छंद, आवडीचे विषय, काम हे सर्व उघडउघड भिन्न असतात. कदाचित हे भेद वरवरचे असतील आणि कालांतराने ते नष्टही होतील. परंतु आज हे भेद स्पष्टपणे आहेत, हे नाकारून चालणार नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ७०)*
“आपल्या पूर्वजांमध्ये एक काल्पनिक उभी रेषा प्रमाण म्हणून धरली जायची व तिच्या अनुषंगाने कुठल्याही तिरप्या रेषेचा कोन ठरवला जायचा. तसाच काहीसा प्रकार मानवजातीच्या बाबतीत होतो. पुरुषजात हे प्रमाण ! ते गृहीतक ! व त्याच्या अनुषंगाने स्त्री जात ही निराळी, अपघातात्मक म्हणून जोखली जाणार. ती निराळी कारण तिच्या शरीरात गर्भाशय आणि रज:पिंड असतात, स्त्री (म्हणे) तिच्या ग्रंथीद्वारे विचार करते. पण हा आरोप करताना पुरुष साफ विसरतात की, त्यांच्याही शरीरात ग्रंथी आहेत आणि त्यासुद्धा अनेक स्त्राव शरीरात सोडत असतात."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ७१)*
“कुणीच प्रथम स्वतःला 'पर' किंवा दुय्यम गृहीत धरून दुसऱ्या व्यक्तींचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करत नसतो. दुय्यम व्यक्तीला दुय्यमत्व दिले जाते, कारण कुणीतरी स्वतःला 'प्रधान', 'श्रेष्ठ' दर्जा देण्यासाठी तथाकथित दुय्यमाचा संदर्भ म्हणून वापर करत असतो. दुय्यम व्यक्ती जर पडखाऊ असेल, तरच ती स्वतःला प्राधान्य, श्रेष्ठत्व मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. बहुतांश स्त्रिया असा प्रयत्न करताना दिसत नाहीत. मग प्रश्न असा पडतो की, स्त्रियांमध्ये हा पडखाऊपणा येतो कुठून ?"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ७३)*
“जगभरच्या स्त्रिया विविध सामाजिक स्तरांत विखुरलेल्या अवस्थेत राहतात व कुठल्याही स्तरांत राहिल्या, तरी तेथील पुरुषांशी जोडलेल्या असतात, आधी वडिलांशी व नंतर नवऱ्याशी ! त्यांच्यातील अनुबंधाला भावनिक, आर्थिक, कौटुंबिक असे अनेक पदर असतात. त्यामुळे कुठल्याही परक्या स्त्रीपेक्षा स्वतःच्या कुटुंबातील पुरुष त्यांना जास्त जवळचा वाटतो. मध्यमवर्गीय स्त्री ही एखाद्या कष्टकरी महिलेपेक्षा मध्यमवर्गीय पुरुषाशी जास्त चटकन जवळीक साधू शकते.
स्त्रीचे तिच्या शोषणकर्त्याबरोबरचे नाते विलक्षण गुंतागुंतीचे व अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मानवातील लिंगभेद निसर्गनिर्मित व जीवशास्त्रीय आहेत. स्त्री व पुरुष हे मानवाच्या अस्तित्वाचे दोन अविभाज्य घटक आहेत. मानवाच्या वंशवृद्धीसाठी दोघांचीही सारखीच गरज आहे. पर्यायाने मनुष्य समाजाचे, स्त्री समाज व पुरुष समाज असे काटेकोर, परस्परांत अभिसरण न ठेवणारे विभाजन करता येत नाही. परंतु *दुर्दैवाची बाब म्हणजे एका संपूर्ण अस्तित्वाचे अविभाज्य अर्धांग असूनही स्त्री दुय्यम समजली जाते.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ७४)*
“लैंगिक भूक व अपत्यप्राप्तीची आस पूर्ण होण्यासाठी पुरुष स्त्रीवर अवलंबून असतो. असे असूनही पुरुषांच्या गरजांचा हुकुमी एक्का वापरून स्त्रीने स्वतःचे स्वातंत्र्य प्राप्त केले, असे वास्तवात घडताना दिसत नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ७५)*
“स्त्रिया पुरुषाच्या गुलाम जरी नसल्या, तरी त्याच्या आश्रित नेहमीच होत्या. दोघांच्याही सामाजिक दर्जात प्रथमपासूनच जमीन अस्मानाचे अंतर आहे. आज जरी स्त्रीच्या जीवनमानात थोडीफार सुधारणा दिसत असली, तरी पिढ्यांपिढ्यांच्या रुढीप्रियतेपायी प्रत्यक्षात ही समानता कधीच वास्तवात उतरत नाही. आर्थिक व्यवहारांमध्ये स्त्री-पुरुषांच्या दर्जातील तफावत जास्त प्रकर्षाने जाणवते. शिक्षण, अनुभव, श्रम या बाबतीत एकाच पातळीवर असणाऱ्या स्त्री-पुरुषांत पुरुषाला जास्त पगार व वरचा हुद्दा मिळतो. बढतीची संधी त्याला जास्त चटकन मिळते. औद्योगिक व राजकीय वर्तुळात सर्वत्र पुरुषांची मक्तेदारी असते. *आज स्त्रिया घरांचा उंबरठा ओलांडून जगात वावरू लागल्या आहेत, पण हे जग पुरुषांचे आहे ही पुरुषांची भूमिका अजून टिकून आहे आणि स्त्रियासुद्धा ते पूर्णपणे जाणून आहेत.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ७५)*
“पुरुषांच्या जगात चंचूप्रवेश करून स्वतःचे स्थान निर्माण करायचे असेल, तर आतापर्यंत पुरुषाने स्त्रीला बहाल केलेल्या सर्व सवलतींवर पाणी सोडायला हवे. गेली अनेक शतके पुरुष स्त्रीला स्वतःच्या छत्राखाली घेऊन तिच्या उदरनिर्वाहाची काळजी वाहत आहे. तिचे संरक्षण करीत आहे. त्यामुळे तिला स्वतःच्या भौतिक गरजांची कधी विवंचना करावी लागली नाही. पण स्वतंत्र, स्वावलंबी व्हायचे, तर स्वतःच्या गरजा एकटीच्या हिमतीवर भागवण्याची जबाबदारी शिरावर येऊन पडते. परंतु *माणसाला स्वातंत्र्याची जशी एक नैसर्गिक ओढ असते, तशीच सर्व काळज्यांच्या भार दुसऱ्यावर टाकून त्याच्या अधीन राहण्याचा मोहसुद्धा अनेक वेळा प्रबळ असतो. हा मार्ग पत्करला की माणसाच्या प्रगतीला खीळ बसलीच म्हणून समजा. कारण मग ती व्यक्ती दुसऱ्याच्या दयेवर जगणारे निष्क्रिय बांडगुळ होऊन बसते.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ७६)*
“आपण कितीही तटस्थ राहायचे म्हटले तरी मानवी जीवनातल्या कुठल्याही समस्येवर विचार करताना व्यक्तिगत पूर्वग्रह त्यात डोकावतातच. कोणते प्रश्न कोणत्या दृष्टिकोनातून सोडवले जाणार, हे व्यक्ती व लिंगसापेक्ष असते. त्यामुळे आपला दृष्टिकोन लपवून ठेवण्यापेक्षा प्रथमपासूनच तो खुला करणे फायद्याचे ठरते. असे केल्याने श्रेष्ठ, कनिष्ठ, चांगले, वाईट, विकास, प्रतिक्रिया यांसारख्या शब्दांच्या अर्थाविषयी गोंधळ होत नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ८३)*
“योग्य जोडीदार मिळाल्यास स्त्री-पुरुष एकमेकांच्या साथीने चांगले जीवन जगू शकतात, हे खरे. तरीही स्त्रीने स्वतःचे जीवन स्वतःच्या हिकमतीवर उभारावे म्हणजे पुरुषाचा आधार गेला, तरी ती उन्मळून पडणार नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ८४)*
“आपल्या इच्छित ध्येयाकडे, स्वातंत्र्याकडे अविरत वाटचाल करण्यातच माणसाच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो असे मला वाटते. ज्याची वाटचाल खुंटली आहे, तो परस्वाधीन, परतंत्र जीवन जगू लागतो अशी माझी धारणा आहे. परिस्थितीपुढे मान झुकवून "परमेश्वराने ठेवले आहे त्यात समाधानाने राहावे." असे म्हणणाऱ्यांना मिंधेपण येते. या मिंधेपणाला जर त्या व्यक्तीची हरकत नसेल, तर ती तिची नैतिक घसरगुंडी समजावी. जर हे मिंधेपण एखाद्यावर जबरदस्तीने लादले जात असेल, तर त्यातून दडपशाही, शोषण व पर्यायाने वैफल्य निर्माण होते आणि वैफल्य काय किंवा नैतिक घडरगुंडी काय, दोन्ही सारखेच वाईट !"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ८३)*
“पुरुष लिंगभेदाला आणि स्त्री-पुरुषांमधील नात्याला मुख्यत्वेकरून संभोगाच्या दृष्टिकोनातून महत्त्व देतो. परंतु माणसाचे अस्तित्व हा केवळ प्रासंगिक योगायोग म्हणता येणार नाही. माणसाच्या अस्तित्वातील प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण आहे. आपापल्या परीने ती माणसाच्या अस्तित्वाला आकार देते.
या जगात माणूस म्हणून वावरणे याचाच अर्थ एक सजीव शरीर असणे आणि जगाकडे बघण्याची एक दृष्टी असणे. *शरीर ही एक भौतिकदृष्ट्या दृश्य आणि स्पृश्य गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ त्या शरीराची रचना अमुक एका प्रकारची असेल, तर ते महत्त्वाचे आणि दुसऱ्या प्रकारची असेल, तर दुय्यम असे नव्हे.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ८९)*
“संभोगाच्या क्रियेतील नराचे वर्चस्व त्याच्या प्रत्येक हालचालीतून व्यक्त होते. बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांत नर मादीच्या अंगावर असतो. त्याचे शिश्न तो हत्यारासारखे वापरतो. याउलट मादी निमूटपणे ते हत्यार स्वतःच्या शरीरात खुपसू देणारी कळसूत्री बाहुली ठरते. नर तिच्या शरीरात शुक्रजंतू सोडतो. मादीला ते घ्यावे लागतात. त्यानंतर फलधारणा व पुढच्या प्रक्रिया जरी तिच्या शरीरात घडत असल्या, तरी संभोगाच्या क्रियेत ती नरापुढे मन तुकवते. नर तिच्या शरीरावर आक्रमण व अतिक्रमण करतो. तिच्या शरीरामध्ये बाह्य घटक सोडतो. एक प्रकारे हे मादीच्या संपूर्ण अस्तित्वावरच आक्रमण असते. व्यक्तिश: जरी तिला कामेच्छा असली, तरी संभोग ही तिच्या दृष्टीने पूर्णपणे तिच्या शरीरात खोलवर घडणारी घटना ठरते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ९९)*
“सस्तन प्राण्यांमध्ये नर व मादीतला मुख्य फरक असतो तो असा : नर शुक्रजंतूद्वारे मादीच्या शरीरात एक सजीव चैतन्य सोडतो व त्या क्षणी त्याचा या चैतन्याबरोबरचा संबंध तुटतो. याउलट मादीमध्ये अंडे अंडाशयापासून जरी अलग झाले, तरी फलित झाल्यास पुन्हा मादीच्याच गर्भाशयात येऊन स्थिरावते व त्या क्षणी तिच्या अस्तित्वाची दोन अस्तित्वे तयार होतात. हे अस्तित्व तिच्या शरीराच्या आधारे जगते. नवा जीव जन्माला आल्यावर सुद्धा मादी पिलापासून पूर्णपणे विलग होत नाही. कारण नवजात पिल्लाचे पोषण मादीच्या शरीरावरच होत असते. म्हणूनच नवा जीव नक्की कधी स्वतंत्र जीव समजायचा ? फलधारणा झाल्याबरोबर ? जन्माला आल्यानंतर ? की आईचे दूध पिणे सोडल्यावर ?
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : १००)*
"स्त्री जेव्हा फक्त पुरुषाला उपभोगासाठी मिळालेली सजीव वस्तू मानली जाते, तेव्हा तिच्या शरीराला केवळ 'एक पार्थिव अस्तित्व' याशिवाय दुसरा संदर्भ असत नाही. म्हणून तर स्त्रीचे नितंब व उरोज हे स्त्री रेखाटनांमध्ये व शिल्पांमध्ये प्रमुख अवयव असतात. या दोन्ही अवयवांत कमीत कमी मज्जातंतू असतात. हे अवयव मांसल असण्यास केवळ मांसल असणे याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही महत्त्व नसते. पौर्वात्य देशात आढळणारी गुबगुबीत, स्थूल स्त्रियांविषयीची आवड सर्वश्रुत आहेच. पाश्चिमात्य देशांत स्त्रियांमधील स्थूलतेपेक्षा सुडौल बांध्याला जास्त महत्त्व दिले जात असले, तरीसुद्धा स्त्रीचे उरोज व नितंब या अवयवांचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २०२)*
"पुरुषाच्या उच्च दर्जाच्या निर्मितीमागे स्त्रीची प्रेरणा असते हे खरे, पण तुरळक अपवाद सोडल्यास प्रेरणा देणारी स्त्री त्या पुरुषाची पत्नी नसते. कुठलीही स्त्री पत्नी झाली की तिच्यातील अमूर्त आदर्शवत गुण नष्ट होऊन ती दररोजचे बेचव वास्तव होऊन बसते. तिच्यातील जादुई आकर्षण लोप पावते. एक परीने पत्नी म्हणजे पुरुषासाठी आयुष्यभराचे ओझे होऊन बसते. म्हणूनच प्रेम आणि विवाह या दोन परस्परविरोधी संकल्पना होऊन बसतात व विवाहबाह्य शृंगारावर अगणित कादंबऱ्या लिहिल्या जातात. *विवाहबाह्य प्रकरणे (किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे तर व्यभिचार) नष्ट व्हायची असतील, तर त्याबरोबर विवाहसंस्थापण संपुष्टात यावी लागेल.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २१९)*
"मुलाच्या मानसिक वाढीमध्ये त्याची लैंगिकता व पर्यायाने स्त्री फार निर्णायक ठरते. क्वचित कधीतरी असेही घडते की, स्त्रीऐवजी दुसरे कसेलतरी काल्पनिक अस्तित्व केंद्रस्थानी ठेवून मुलाची लैंगिकता आकार घेते. पण खरे तर स्त्रीसुद्धा प्रत्यक्ष आहे तशी स्वीकारली न जाता पुरुषाच्या कल्पनाविश्वासाचाच आविष्कार असल्याने बहुसंख्य मुलांच्या लैंगिक भावना कुठल्यातरी स्त्रीभोवती आकार घेतात. स्त्री त्यांच्या दृष्टीने मानसिक खेळपण असते व आव्हाणपण असते. आयुष्याच्या एका टप्प्यावर मुलाच्या (पर्यायाने पुरुषाच्या) सर्व भाव-भावना स्त्रीभोवती फिरताना दिसतात. पुरुष आपल्या आपल्या सर्व इच्छा, सर्व भयगंड स्त्रीवर लादतो. सरतेशेवटी पुरुषाच्या दृष्टीने स्त्री एक गूढ, अनाकलनीय कोडे होऊन बसते. ती वास्तवात कशी आहे, हे त्यालाही नीट समजत नाही व स्त्रीला स्वतःलाही ते कळत नाही. याला कारण पुरुष तिला स्वतःपेक्षा पूर्ण निराळे असे परतत्व समजतो. त्याच्यामध्ये जे जे नाही, ते सर्व काही या परतत्वात असावे, असे त्याला वाटते. या संभ्रमावस्थेत प्रत्यक्ष स्त्री कशी आहे, हे नीटसे व्यक्त होऊ शकत नाही व पुरुषाला अपेक्षित असे गुण तिच्यात नसतील, तर ते व्यक्त तरी कुठून होणार ? सरतेशेवटी स्त्री म्हणजे एक फसवे अस्तित्व होऊन बसते. असे अस्तित्व जे पुरुषाच्या अस्तित्वाशीही समरस होऊ शकत नाही व स्वतःचीही अभिव्यक्ती नीट साधू शकत नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २२२)*
"स्त्रीविषयीचे वास्तवातील अनुभव, तिच्याविषयीची शास्त्रीय माहिती, निरीक्षणाद्वारे सिद्ध करता येण्याजोगे ज्ञान, तर्कनिष्ठ नीतीनियम यांऐवजी भ्रामक आदर्शवाद, तर्कदृष्ट अपसमज, कर्मठ रूढी इ. घातक बाबी त्रिकालाबाधित सत्य म्हणून जनमानसात रुजवल्या जातात. प्रत्यक्षात प्रत्येक स्त्रीचे वागणे व्यक्तिविशिष्ट, वैविध्यपूर्ण व उत्स्फूर्त असले तरी त्याचे मूल्यमापन कालबाह्य विचारांच्या व रूढी नियमांच्याद्वारे केले जाते. म्हणजेच *प्रत्यक्षात स्त्री कशी आहे याविषयीचे वास्तव पूर्णपणे अव्हेरून त्याऐवजी ती कशी असावी, याविषयीच्या पुरुषाच्या ज्या अपेक्षा असतात, त्याच स्त्रीविषयीचे अंतिम सत्य म्हणून गळी उतरवल्या जातात. प्रत्यक्षात स्त्रीचे वागणे या तथाकथित सत्याबरहुकूम नसले, की त्या स्त्रीमध्ये काहीतरी दोष आहे असे समजले जाते.* समाजाच्या स्त्रीविषयीच्या कल्पना चुकीच्या आहेत असे मानले न जाता आजकालच्या स्त्रियाच स्त्रीत्वापासून दूर जात आहेत, असा प्रचार केला जातो. परिणामतः होते काय, तर स्त्रीची निसर्गसुलभ वर्तणूक सदोष म्हणून दडपून टाकली जाते. याउलट तिच्याविषयीचे काल्पनिक समजच नैसर्गिक समजले जाऊ लागतात."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २२५)*
"वास्तवात स्त्रीमध्ये विविध गुण-अवगुणांचा मिलाफ आढळतो. शिवाय परिस्थितीनुसार तिच्या मनोवृत्तीत व वर्तणुकीत बदल घडून येतात. समाज मात्र तिच्याविषयी इतकी नानाविध मिथके मनात ठेवतो की, स्त्रीचे प्रत्यक्षातील वागणे बघून तो बुचकळ्यातच पडतो. पूर्वीच्या काळी अनेकांना अचंबा वाटे की, वर्णाने सावळ्या माणसाचे केस भुरे कसे काय असू शकतील ? पण प्रत्येक गोरा माणूस भुरे केस व निळे डोळे घेऊन जन्मत नाही व भुऱ्या केसांचे लोक गोरेच असतात, असेही नाही. त्याचप्रमाणे *स्त्री नाजूक, घाबरट, ऋजूच असते असे नाही. ती धीराची, स्मार्ट व त्याचवेळी प्रेमळपण असू शकते. पुरुषांना मात्र हे वास्तव पचवणे जड जाते.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २३६)*
"पुरुषाच्या मनात सर्वांत खोलवर रुजलेले स्त्रीविषयक मिथक म्हणजे, 'स्त्री हे एक अगम्य गूढ आहे.' हे मिथक पुरुषाला फार सोयीचे असते, कारण स्त्रीची एखादी कृती किंवा विचार त्याला समजला नाही, तर त्यास तो स्वतःचे अज्ञान वा अक्षमता न समजता स्त्रीच अगम्य असते, असे म्हणून स्वतःवरची समजून घेण्याची जबाबदारी झटकून मोकळा होतो. असे केल्याने त्याचा आळस व बौद्धिक कुवत या दोन्हींना धक्का बसत नाही.
खरे तर स्त्री असो वा पुरुष, प्रत्येक व्यक्ती थोड्या फार प्रमाणात अगम्यच असते. उदा. शारीरिक अनुभव, मासिक पाळीतील त्रास, गर्भारपणातील अवघडलेपण, बाळंतपणाच्या वेदना, कामपूर्तीचा क्षण हे सर्व अनुभव पुरुषाला अनाकलनीय राहणार. त्याचबरोबर पुरुषाच्या शारीरिक अनुभूती स्त्रीला कधीही समजणार नाहीत. परंतु गूढतेचा मुद्दा दुहेरी असतो, हे पुरुष कधीही लक्षात घेत नाहीत व स्त्रिया पुढाकार घेऊन स्वतःच्या दृष्टिकोनातून पुरुषाचे वर्णन कधीही करत नाहीत. पुरुष मात्र त्यांचा दृष्टिकोन हेच स्त्रीविषयीचे अंतिम सत्य आहे असे आग्रहाने मांडतात. त्यामुळे पुरुषाला स्त्री समजू शकत नाही म्हणजे निसर्गतःच ती समजण्यापलीकडची आहे असे मानले जाते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २३८)*
"भावनांच्या बाबतीत एक फार मोठी गुंतागुंत असते. भावनेला कृतीतून व्यक्त केल्याशिवाय स्वतंत्र अस्तित्व लाभत नाही. त्यामुळे भावना खरी आहे की खोटी, हे अनेकदा लक्षात येत नाही. पुरुषाला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यास पूर्ण मुभा असल्याने तो स्त्रीवरील प्रेमाची भावना उघडपणे व्यक्त करतो. आर्थिकदृष्ट्या तो परस्वाधीन नसल्याने आपल्या आवडीच्या स्त्रीला भेटवस्तू देतो. तिला मागणी घालून तिच्याशी विवाह करतो. विवाहाद्वारे तिला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देतो. बहुसंख्य वेळा असे घडते की, पुरुष स्वतःच्या व्यवसायात दिवसभर व्यस्त असतो. स्त्री मात्र तुलनेने रिकामी असते. पुरुष वेळात वेळ काढून आपल्या प्रियतमेला भेटायला जातो. पर्यायाने तो तिला आपला 'वेळ'ही देतो. स्त्री हे सर्व त्याच्याकडून स्वीकारते. परंतु एक प्रश्न उरतोच की, या सगळ्याचा स्वीकार ती पुरुषावरच्या प्रेमामुळे करते की केवळ रंजन म्हणून ? तिचे तिच्या नवऱ्यावर प्रेम असते की तिच्या विवाहावर ? अर्थात पुरुषांच्या भावनेच्या बाबतीतही कसलीच खात्री देता येत नाही. स्त्रीला तो अनेक चीजवस्तू देतो ते प्रेमापोटी की तिची दया येऊन ? स्त्री-पुरुष संबंधाच्या बाबतीत आपणास एवढेच म्हणता येते की, पुरुषाशी संबंध ठेवून स्त्रीला अनेक फायदे मिळत असतात. पुरुषाला मात्र स्त्रीबरोबरचे नाते तिच्यावर प्रेम असेल, तरच किफायतशीर असते. कारण त्यातून त्याला 'प्रेम' ही एकमेव देणगी मिळत असते. प्रेमच जर नसेल, तर स्त्रीशी नाते हा पुरुषाच्या दृष्टीने आतबट्ट्याचा व्यवहारच असतो."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २३९)*
"अनेक पुरुषांचा ओरडा सुरू असतो की, बायकांना झालंय तरी काय ? आजच्या बायका बायकांसारख्या वागतायत कुठे ? स्त्रियांमधील स्त्रीसुलभ गुणविशेष संपुष्टात आलेत इत्यादी. या आरडाओरडीचा अर्थ आता नीट समजू शकतो. पुरुषाच्या दृष्टीने (व ज्या स्त्रिया पुरुषाच्या दृष्टिकोनातून स्त्रियांकडे बघतात त्यांच्याही दृष्टीने) केवळ स्त्रीचे शरीर असणे व स्त्रीचे शारीरिक व्यवहार पार पाडणे ( म्हणजे मासिक पाळी येणे, मूल होणे) हे 'स्त्री' असण्यास पुरेसे नसते. खरी स्त्री होण्यासाठी तिने स्वतःला परतत्त्व आणि दुय्यम समजणे आवश्यक असते. *आधुनिक काळात तर परिस्थिती अधिकच जटिल झाली आहे. कारण पुरुष स्त्रीला सक्षम माणूस समजतो, सर्व सामाजिक व्यवहार तिने पुरुषाच्या बरोबरीने करावेत अशी अपेक्षा करतो, तिने शिकावे, विविध क्षेत्रांत संशोधन करावे असे त्यास वाटते व त्याच वेळी तिने स्वतःस दुय्यम समजावे अशीपण अपेक्षा ठेवतो. परंतु या दोन परस्परविरोधी अपेक्षा आहेत. त्यांची सांगड घालता घालता स्त्रीचे स्वतःचे संतुलन डळमळू लागते. पुरुषाच्या बाबतीत ही समस्या कधीही उद्भवत नाही. त्याचे सामाजिक जीवन व कौटुंबिक जीवन यात अंतर्गत संघर्ष नसतो. तो घराबाहेर जितका यशस्वी होईल, तेवढा त्याचा कुटुंबातील दर्जापण उंचावतो. याउलट स्त्रीला मात्र घरात व घराबाहेर असे दोन वेगळे मुखवटे लावावे लागतात. ती घराबाहेर जेवढी यशस्वी होईल, तेवढे तिला कुटुंबात नम्रपणे वागावे लागते.* कारण व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी असणे स्त्रीसुलभतेच्या विरोधात समजले होते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २४१)*
"सध्याच्या संक्रमणाच्या काळात मात्र स्त्रीला स्वत्व फुलविणे व तिच्यावर लादलेले तथाकथित स्त्रीसुलभ गुणविशेष जपणे ही दोन्ही कर्तव्ये पार पाडावी लागत असल्याने तिचा विलक्षण गोंधळ उडाला आहे. परिणामतः तिच्यावर Lost Sex किंवा संभ्रमित जमात असा शिक्का बसला आहे. काही स्त्रिया पुन्हा स्त्रीच्या परंपरागत भूमिकेकडे वळत आहेत. कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वत्व फुलवण्यापेक्षा गतानुगतिक प्रवाहात झोकून देणे त्यांना तुलनेने कमी कष्टप्रद वाटते. पण काळाचे चक्र उलटे फिरवता येत नाही. *कितीही इच्छा झाली, तरी आज स्त्रीला ५०० वर्षांपूर्वीचे जिणे जगता येणार नाही. पुरुषाला ते स्त्रीवर लादता येणार नाही. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी परिस्थितीतील बदल मोकळ्या मनाने स्वीकारणे हेच श्रेयस्कर होय. अशाने स्त्रीला संपूर्ण मानवाचा दर्जा प्राप्त होईल. स्त्री जेव्हा स्वधर्मानुसार स्वतःसाठी जगू शकेल, तेव्हा ती खऱ्या अर्थाने पुरुषाचीपण सहचरी होईल.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २४२)*
"मुलगी जर स्वतःला मुलांपेक्षा कमी लेखत असेल, तर त्याला तिच्या अवतीभोवतीची परिस्थिती कारणीभूत असते. तिच्यावर जर कठोर नैतिक बंधने टाकली जात असतील, तिच्यात व मुलामध्ये प्रत्येक बाबतीत फरक केला जात असेल, तिला डावलून मुलाला विकासाच्या संधी दिल्या जात असतील, तर तिच्यामध्ये मुलांविषयी असूया व आपल्याला त्याच्यासारखे शरीर लाभले नाही म्हणून न्यूनगंड निर्माण होतो. तसेच, मुलाला ज्या सवलती मिळतात, त्यांच्यामुळे त्याच्या मनात निष्कारण स्वतःविषयी श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते व याचा संबंध अपरिपक्व वयात तो स्वतःच्या शिश्नाशी जोडतो. कारण तेवढा एक अवयव सोडल्यास त्याच्यात व लहान मुलीत वरकरणी शारीरिकदृष्ट्या काहीच फरक नसतो."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २४९)*
"मुलीची नैसर्गिक वाढ अगदी कोवळ्या वयापासून छाटली जाते. तिने गोड दिसावे, सौम्य वागावे असे तिच्यावर बिंबवले जाते. तिला जिवंत बाहुलीच समजले जाते आणि बाहुलीप्रमाणेच तिला निष्क्रियपण बनवले जाते. मुलांप्रमाणेच तिला उपजत स्वभावधर्मानुसार वाढू दिले, मस्ती करू दिली, प्रसंगी हाणामारी करू दिली, तर मुलांप्रमाणेच तीपण धट्टीकट्टी होईल, स्वतःच्या बुद्धीने बालसुलभ उचापत्या करेल. *ज्या मुलींना मुलांसारखे वाढवले जाते, त्या स्वतंत्र प्रज्ञेच्या व कणखर निपजतात.*
बहुतेक वेळा वडिलांना आपल्या मुलींनी कणखर निपजावे असे वाटत असते व त्यानुसार ते मुलीवर संस्कार करू बघतात. पण आजूबाजूला जर सगळ्या मुली बाहुलीसारख्या वाढवल्या जात असतील, तर ही मुलगी हडेलहप्प म्हणून तिची टिंगल होते. शिवाय कुटुंबातल्या आज्या, मावशा, काक्या, माम्यापण वडिलांच्या विरोधात उभ्या राहतात व मुलगी धटिंगण होऊ नये म्हणून वडिलांना डावलून तिच्यावर संस्कार करण्याची सारी सूत्रे स्वतःकडे घेतात."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २५१)*
*"मुलींचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्यांची संपूर्ण मानसिक जडणघडण फक्त स्त्रियांच्या देखरेखीखाली होते.* तसे पाहिले तर लहान मुलगापण आईच्याच हाताखाली वाढतो. परंतु आई त्याच्या पुरुषपणाचा आदर राखून त्याला वाढवते. याउलट मुलीला मात्र ती स्वतःसाठी स्त्रियांच्या मर्यादित विश्वात वाढवण्यासाठी तयार करते. याच कारणास्तव मुलगी व आई हे नाते अत्यंत गुंतागुंतीचे असते. आईला मुलगी म्हणजे स्वतःचेच प्रतिबिंब वाटते. आईला आपल्या स्त्रीजन्माची लाज असते व तीच लाज ती मुलीच्या मनातही निर्माण करते. आई स्वतः सामाजिक दडपणांची बळी असते. तिला आदर्श स्त्रीच्या कल्पनांची झापडं लागलेली असतात. तीच झापडं लावून ती मुलीलाही आदर्श बनवण्याचा प्रयत्न करते. अगदी पराकोटीची प्रेमळ, मुलीच्या भल्यासाठी जीव ओतणारी आईसुद्धा याला अपवाद नाही. कारण *आपली मुलगी स्त्रीच्या समाजमान्य कल्पनांमध्ये चपखल बसली, तरच तिचे आयुष्य सुकर होईल. अन्यथा तिला समाजाचा रोष सहन करावा लागेल, अशी भीती तिला असते."*
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २५२)*
"लहान मुलांना आईचे अनुकरण करायला आवडते. त्यामुळे आई घरात करते ती सर्व कामे त्यांना करून बघायची असतात. पण बहुतेक मुलांना घरकामापासून दूर ठेवले जाते. एवढेच नाही, तर भाजी चिरायला आणि कपड्यांच्या घड्या करायला तू काय मुलगी आहेस का ? हे पण त्याला सुनावले जाते. याउलट मुलीने मात्र आईच्या कामात लुडबूड केल्यास तिचे कौतुकच होते. किंबहुना ती थोडी मोठी झाल्यावर तिने घरकाम केलेच पाहिजे, अशी तिच्यावर सक्ती होते. त्यामुळे टेबल पूस, पाने घे, भाजी निवडून दे, केर काढ, धाकट्या भावंडांना सांभाळ यांसारखी अनेक कामे मुलगी बालपणापासून करते. त्याबद्दल मोठ्यांकडून तिचे भरपूर कौतुकही होते. *बालवयात या कौतुकाने मुलीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. परंतु त्या बदल्यात ती स्वतःचे बालपण फार लवकर गमावून बसते.* लहान वयातच आईच्या जबाबदाऱ्या उचलण्याचे बंधन तिच्यावर आल्याने तिला अकाली प्रौढत्व येते. गरीब घरातील मुलगी तर चक्क बालमजुराचेच जिणे जगू लागते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २५४)*
"स्त्रीचे दुय्यमत्व धर्मग्रंथांमधून ठासून सांगितले जाते. सर्वसाधारणपणे कुटुंबातील स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक वृत्तीच्या असतात व मुलांपेक्षा मुली आई किंवा आजीच्या अधिक सान्निध्यात असल्याने त्यांच्यावर धार्मिक संस्कारही मुलांपेक्षा जास्त होतात. धर्मात परमेश्वर नेहमी पुरुष असतो. त्याचे पृथ्वीवरील दूत पुरुष असतात. रोजच्या जीवनात धार्मिक कर्मकांड सांभाळणारे पुजारी पुरुषच असतात. त्यामुळे लहान मुलीच्या मनात नकळत परमेश्वर म्हणजे पुरुषच असे समीकरण तयार होते. धार्मिक समारंभात स्त्रीला पुढाकार घेण्याची परवानगी नसल्याने स्त्रीने पुरुषाची अनुयायी असणे धर्मातच सांगितले आहे, असा मुलीचा समज होतो. परमेश्वराला वश करायचे म्हणजे पुरुषाला वश करायचे, हे तिच्या डोक्यात पक्के बसते. यथावकाश आपल्या आयुष्यात आपण पुरुषांना खुश ठेवणे आवश्यक आहे अशी पक्की खूणगाठ ती मनाशी बांधते. पुरुषाला खुश ठेवण्यासाठी तिने फक्त सुंदर असणे पुरेसे आहे; त्याहून जास्त काही कर्तृत्व तिने दाखवण्याची गरज नाही असाही तिचा समज करून दिला जातो. त्यामुळे मुलगी बालवयापासून सुंदर दिसण्याला महत्व देऊ लागते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २५६)*
"मनातून मुलीला वाटत असते की, मुलांनी आपल्याला समानतेच्या पातळीवर वागवावे. मुलांचा सामाजिक दर्जा तिच्यापेक्षा वरचा असतो. त्यामुळे आपण जे करू, ते मुलांना आवडावे, असे तिला वाटत असते. खरे तर बहुसंख्य मुलींना आपण मुलगा असतो तर बरे, असेच वाटत असते. *अनेक सर्वेक्षणांमधून वारंवार निदर्शनास येते की, जवळजवळ ७५% मुलींना असे वाटत असे की, मुलाचा जन्म मिळाला असता तर बरे. याउलट एकही मुलगा मुलीच्या जन्माची इच्छा धरत नाही.* एक सर्वेक्षणात तर ९०% मुलांनी सांगितले की, स्त्रीजन्म मिळण्यापेक्षा दुसरे काहीही झालेले चालेल. मुली जेव्हा मुलाच्या जन्माची इच्छा धरतात, तेव्हा त्यामागची कारणेपण देतात. "मुलांना मुलींसारखे मासिक पाळी वगैरेचे त्रास नसतात.".... "आई मुलावर जास्त प्रेम करते."......"मुलांना खूप निरनिराळ्या गोष्टी करता येतात.".... (पतंग उडविणे, नदीत डुंबणे, ट्रेकिंगला जाणे, इ.)..... "मुलांना अभ्यास करण्यासाठी अधिक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जातात."..... "मी मुलगा असते तर, मुलांना घाबरण्याचे कारण उरले नसते."..... "मुलांना हवे ते करण्याचे स्वातंत्र्य असते.".....त्यांना सारखे स्वतःच्या कपड्यांचे व्यवधान ठेवावे लागत नाही. इ. इ."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २५८)*
"जी व्यक्ती स्वतःला एक स्वतंत्र, क्रियाशील अस्तित्व समजत असते, तिला जर कळले की, ती स्वतंत्र नसून दुय्यमत्व, निकृष्ट दर्जा हे तिचे कायमचे, ईश्वरदत्त सारतत्व आहे, तर अनुभव त्या व्यक्तीला बुचकळ्यात टाकणारा ठरतो. जी व्यक्ती स्वतःला एक प्रमुख अस्तित्व मानत असते, त्याला जर आपण एक परतत्व मानले जातो, असा अनुभव आला, तर तो पचवणे जड जाते. लहान मुलीच्या बाबतीत नेमके हेच घडते. जगात वावरण्याचे प्रशिक्षण मिळत असतानाच स्त्री असणे म्हणजे काय यातली खरी मेख तिच्या लक्षात येते. ती ज्या वर्तुळात वावरते, ते एक बंदिस्त, मर्यादित आणि पुरुषाच्या नियंत्रणाखाली असणारे विश्व असते, तिने कितीही धाडस करून वर उडायचा प्रयत्न केला, तरी अडकवायला भिंती उभ्या केलेल्या असतात. पुरुषाचे देव आभाळात इतक्या वर असतात की, पृथ्वीवर त्याच्यासाठी देव असून नसल्यासारखेच असतात. पण लहान मुलगी मात्र सदैव पुरुषाचे रूप धारण केलेल्या देवांच्या गराड्यातच जगत असते. निकृष्ट दर्जा पाचवीला पूजलेल्या सर्वांनाच वरील अनुभव येतो."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २६०)*
*"अंकित जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये स्वातंत्र्याची एक स्वाभाविक मागणी जशी वास करत असते, तशीच एक अस्वाभाविक अशी अलिप्त राहण्याची, निवृत्त वृत्तीने त्रासदायक वास्तवापासून दूर जाण्याचीपण प्रवृत्ती आढळून येते. मुलीच्या बाबतीत हेच होते.* निष्क्रिय, अलिप्त राहण्याचे खूप फायदे असतात, त्यात खूप सुख असते, असे संस्कार तिचे आईवडील, शिक्षक, पुस्तके, पुराणकथा तिच्यावर सतत करतात. तिने शृंखला तोडून उंच भरारी घेण्याचे प्रयत्न केले की अडथळ्यांनी तिचा कपाळमोक्ष होणार हे ठरलेलेच असते. तसा तो झाला की निष्क्रिय आणि अलिप्त होण्याचा तिला आणखी मोह होतो. पण निष्क्रिय झाली की तिच्या नशिबी 'स्त्री' चे असे विधिलिखित लादले जाण्याची शक्यता वाढते. या संकटाने तिचा थरकाप होतो. *लहान मुलगा, मग तो महत्वाकांक्षी असो, की लाजरा बुजरा, पण भविष्यातील खुल्या भरारीची काही तरी स्वप्न बघतो. तो इंजिनियर, खलाशी, शेतकरी इ. इ. काहीही होऊ शकतो. पण तो जग बघण्याचे बेत करतो. तो खेड्यातच थांबेल किंवा शहरात जाईल. श्रीमंत होईल. हे सर्व करायला आपण मुक्त आहोत हे तो जाणून असतो. पण मुलगी मात्र कुणाची तरी बायको होणार, मग आई आणि त्यानंतर आजी होणार. तिच्या आईने जसे घर चकाचक ठेवले, तसेच तीपण ठेवणार; ती लहान असताना तिच्या आईने जसा तिचा सांभाळ केला, तसाच ती तिच्या मुलांचा करणार.* आताशी ती बाराच वर्षांची आहे, पण तिचे भविष्य तिच्या कपाळावर आतापासून लिहून ठेवलेले आहे. आपल्या आयुष्याविषयी चिंतन करताना तिला हेच विधिलिखित दिसते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २६०)*
"स्त्री-पुरुषांमधील लैंगिक संबंधांची चुणूक मुलांना जर अपघाताने दिसली, तर त्याविषयी काहीतरी थातूरमातूर उत्तरे दिली जातात. त्यामुळे मुले अधिकच बावचळतात. शिवाय सुरक्षिततेसाठी जेव्हा मुलांना परक्या लोकांपासून सावध राहायला शिकवतात, तेव्हासुद्धा लैंगिक चाळे करणे म्हणजे विकृती किंवा गुन्हा आहे, अशा स्वरूपात ते सांगितले जाते. म्हणूनच ओळखीच्या माणसांची किंवा प्रत्यक्ष आईवडिलांची कामक्रीडा मुलांच्या नजरेस पडली, तर 'चांगली' माणसेसुद्धा अशी घाणेरडी कृत्ये करतात, हा धक्का मुले पचवू शकत नाहीत. मुलीला हा धक्का अधिक जाणवतो, कारण '₹पुरुष स्त्रीला 'काहीतरी करतो', हे तिला दिसलेले असते.
लैंगिकतेविषयीच्या अर्धवट ज्ञानाने तिच्या भोवतीचे संरक्षक कवच तडकते आहे, असे तिला वाटू लागते. आपले भविष्य काळेकुट्ट आहे आणि आपल्याला कुणाचाही आधार नाही, डोक्यावर कुणाचे छत्र नाही, असे तिला वाटू लागते. आपल्याला मुलगी म्हणून कसला तरी गूढ, अनाकलनीय शाप मिळाला आहे, पण तो नक्की काय, हे तिला कळत नाही, त्यामुळे ती अधिकच हैराण होते. तिला मिळालेली माहिती अगदीच तुटक तुटक, असंबद्ध असते. पुस्तकांमधून तिला त्याविषयी जे काही वाचायला मिळते, ते अनेकदा परस्परविरोधी असते. पूर्णपणे तांत्रिक माहितीनेसुद्धा हे गूढ उकलतेच असे नाही. मुलीच्या डोक्यात शंभर प्रश्न गर्दी करत असतात. संभोगाची क्रिया वेदनामय असते की आनंदादायी ? ती किती वेळ चालते ? पाच मिनिटे की रात्रभर ? कधीतरी कुठे तरी लिहिलेले असते की, एक मिठी मारली आणि स्त्रीला दिवस गेले. याउलट दुसरीकडे कुठेतरी लिहिलेले असते की, भरपूर संभोगसुख उपभोगूनही बाईला मूल झाले नाही. मग काय खरे मानायचे ? स्त्री-पुरुष रोज 'हे' करतात की अधूनमधून ? मुलगी बायबल, शब्दकोश असे काय काय वाचून आणि मैत्रिणींना विचारून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करते, पण तिचे कशानेही समाधान होत नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २६१)*
"१२-१३ व्या वर्षी मुलीच्या लैंगिक जाणिवा सौम्य स्वरूपात जागृत होतात. मुले जशी हस्तमैथुन करू लागतात, तशा किती मुली हस्तमैथुन करतात व काय प्रमाणात करतात, हे शोधून काढणे कठीण आहे. कारण मुलांना जसा हाताळण्यासाठी ठळकपणे शरीराबाहेर येणारा अवयव असतो, त्याप्रमाणे मुलींना तो नसतो. शिश्नातून मिळणाऱ्या स्पर्शसुखाची कल्पना मुलाला अगदी तान्हेपणापासून असते, तशी ती मुलीला नसते. १२-१३ वर्षांची झाल्यावर अपघातानेच तिला शिष्निकेजवळील स्पर्शाचा आनंद उमगतो. परंतु या आनंदाचा किंवा लैंगिक आनंदाचा संबंध आपल्या गुप्त अवयवाशी आहे, हा कार्यकारणभाव तिच्या लक्षात येत नाही. अर्थात, मुलगी कितीही अनभिज्ञ असली, तरी तिचे शरीर बदलतच असते. योनीमार्ग ओलसर राहू लागतो, अधूनमधून हुळहुळा होतो. या अनुभूतीचा संबंध लैंगिकतेशी आहे याची पुसटशी जाणीव होऊ लागते. पण पुढाकार घेऊन ती भावना व्यक्त करणे तिला मानसिक दृष्ट्या जमत नाही. सामाजिक दृष्ट्या तिला तशी मुभा नसते व शारीरिक दृष्ट्या ते शक्यपण नसते. मुलगा त्याच्या विशिष्ट शरीररचनेमुळे पुढाकार घेऊन लैंगिक भावना व्यक्त करू शकतो. याबाबत त्याची भूमिका स्वच्छ असते. त्यासाठी त्याला काहीही लपवाछपवी करावी लागत नाही. मुलीला मात्र तिच्या शरीररचनेमुळे तिची कामभावना जागृत करणारी जागा नक्की कुठे आहे, हे कळत नाही. त्यामुळे पुढाकार घेऊन व्यक्त करण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. बरोबरच्या मैत्रिणी, चित्रपट, वर्गातील काही अतिधाडसी मुले यांच्या प्रभावाखाली येऊन तिचा लैंगिकतेमधील रस वाढला, तरीसुद्धा या नवीन साहसामध्ये दुसऱ्या कुणीतरी पुढाकार घेतला, तरच आपल्याला या सुखाची चव चाखायला मिळणार, हे तिला उमगते व त्यामुळेही तिच्यामध्ये परावलंबित्वाची भावना वाढीला लागते. आपले शरीर दुसऱ्या कुणाला तरी अर्पण करण्यासाठी आहे, असा तिचा ग्रह होतो. हा ग्रह इतर अनेक बाबतीत तिचे कुटुंबीय तिच्या मनावर रुजवत असतातच. (उदा : मुलगी म्हणजे परक्याचे धन....) पण स्वतःच्या लैंगिक भविष्याची तिला जाणीव झाली की हा ग्रह अधिकच पक्का होऊ लागतो."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २६४)*
"मुलीच्या दृष्टीने १४-१५ वर्षांचे वय फार अवघड, संभ्रमावस्थेचे व धोक्याचे असते. अर्धवट ज्ञान, वाईट संगत लाभण्याची शक्यता, अविवेकी मित्र-मैत्रिणींच्या प्रभावांमुळे मानसिकतेवर होणारे दुष्परिणाम, भाबडेपणामुळे होऊ शकणारी फसवणूक इत्यादी अनेक धोके या वयातील मुलींपुढे आ वासून उभे असतात. एकीकडे स्त्री-पुरूष आकर्षणाचा खेळ तिच्या मनात सुरू होतो. त्याच वेळी कुटुंबातील संस्कार, नीती-अनीतीच्या विचारांचा धाक, स्वतःसाठी काय योग्य, काय अयोग्य याची अपुरी जाण यांमुळे १३-१४ व्या वर्षी अनेक मुली स्वतःचे नुकसान करून घेतात. *हा कठीण काळ मुलीला कमीत-कमी कष्टप्रद व्हावा यासाठी तिला लैंगिकतेविषयी अंधारात ठेवण्यापेक्षा वस्तुनिष्ठपणे सर्व वास्तव समजावून देणे इष्ट ठरते. अन्यथा शरम, संभ्रम, भीती, अपराधी भावना या सर्वांमुळे पुढील आयुष्यातही ती ठेचकाळत राहते.* मोठे होणे म्हणजे स्त्री होणे; व स्त्री होणे म्हणजे पुरुषाच्या जबरदस्तीला तोंड देणे, हे दुःख, ही कल्पना तिला हादरवून सोडते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २६६)*
"स्त्रीमुक्तीविरोधी बोलणारे नेहमी एक युक्तिवाद करतात की, मुलगी इतकी निमूटपणे स्वतःला लग्नात सुपूर्त करते याला कारण ती बुद्धी, कर्तृत्व, क्षमता, सामर्थ्य, मनोबल या सर्वांत मुलांपेक्षा कमी असते. परंतु असा युक्तिवाद करणे म्हणजे घोड्यापुढे गाडी ठेवणे होय. मुलगी खरोखरच कर्तृत्व, मनोबल, व्यावसायिक कौशल्य यांत कमी पडते, कारण लहानपणापासून तिला लग्नासाठीच तयार केले जाते. व्यावसायिक कौशल्य, शिक्षण, कर्तृत्व हे तिच्यासाठी अनावश्यक मानले जाते. ते तिच्यामध्ये रुजवण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीत."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २६८)*
"स्त्रीला तिच्या शारीरिक शक्तींच्या मर्यादांमुळे हिंसक शक्तीप्रयोगाचे धडे घेता येत नाहीत हे जरी खरे असले, तरीपण आपल्या आपल्या शरीराचा वापर करून जर ती जगाला सकारात्मक पद्धतीने स्वतःची ओळख पटवून देऊ शकली, तर तिचे संकोचलेपण नक्की दूर होईल. म्हणूनच मुलींनी पोहायला हवे, गिर्यारोहण करायला हवे, विमान चालवायला हवे, ऊन, पाऊस, वारा यांना तोंड द्यायला हवे, धोके पत्करून साहसे करायला हवीत. असे केल्याने मुलीच्या मनातील स्वतःच्या शारीरिक दौर्बल्याची भावना नक्की कमी होईल. बालपणापासून जर मुलीला अंगमस्तीचे खेळ खेळू दिले, तर मग तिची स्वतःच्या शरीराविषयीची लाज आणि तक्रार दोन्ही निघून जातील व तिच्या संपूर्ण व्यक्तीमत्वातच आत्मविश्वास येईल. या आत्मविश्वासाचा चांगला परिणाम तिच्या बौद्धिक कामगिरीवरपण दिसून येईल."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २६९)*
"मुलगा जेव्हा एखाद्या घटनेला किंवा निर्णयाला विरोध करतो, तेव्हा अपेक्षित परिणाम साधेलच असे नाही. परंतु त्याची निदान नोंद तरी घेतली जाते. काही प्रमाणात तो परिस्थितीत पाहिजे तसा बदलपण घडवून आणू शकतो. मुलीच्या विरोधाची मात्र कुचेष्टा होते. तो अविचार समजला जातो. त्याला तमाशाचे स्वरूप येते. मुख्य म्हणजे बंधानांविरुद्ध मुलीने आवाज उठवला की निर्बंध अधिकच कडक होतात."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २७६)*
"सोळा वर्षाच्या मुलीने अनेक यातनामय धक्के पचवलेले असतात. वयात येणे, मासिक पाळीचा त्रास, लैंगिक भावनांचा उदय, नानाविध आशंका, घृणा, धूसर अनुभव इ.इ. अनेक क्लेशकारक गोष्टी तिने अंत:करणात साठवून ठेवलेल्या असतात. आणि आपली गुपिते काशी सुरक्षित ठेवायची, हे तिने नीट शिकून घेतलेले असते. साधी पाळीच्या वेळची फडकी लपवून ठेवणे आणि आपल्याला पाळी सुरू आहे आहे कुणाला कळू न देणे एवढ्यासाठीसुद्धा या वयातल्या मुलीला केवढातरी खोटारडेपणा करावा लागतो. *सुसंस्कृतपणाच्या, सफाईदारपणाच्या नावाखाली जर तुम्हाला तुमची अगदी प्राथमिक, शरीर सत्येसुद्धा लपवून ठेवावी लागली, तर त्यातून दांभिकपणा सुरू होतोच.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २७८)*
"मुलीचा विरोध समाजाची मानसिकता बदलू शकत नाही, मूल्यव्यवस्थेत उदारता आणू शकत नाही किंवा मुलीचा दर्जापण सुधारू शकत नाही. म्हणूनतर मुलीचे बंड व तिची स्वप्ने, दोन्ही अवास्तव आणि निष्फळ ठरतात. अखेरीस मुलगी हतबल होऊन स्वतःकडे 'पुरुषाला समर्पित करण्याची वस्तू' या दृष्टिकोनातून बघण्याची सवय करते. *ज्या वयात जोमाने भविष्य उभारणीसाठी कष्ट करायचे, ताकद कमवायची, ज्ञान संपादन करायचे, त्याच वयात मुलीवर आंतरिक उर्मी दडपून टाकून समर्पणाची वाट बघण्याची, स्वतःला सजवून आकर्षक ठेवण्याची सक्ती केली जाते. स्त्रीजीवनाची ही फार मोठी शोकांतिका आहे."*
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २७९)*
"ज्या वयात उरात महत्त्वकांक्षा, आशा बाळगायच्या त्याच वयात आपण निष्क्रिय, परावलंबी आहोत असे वाटणे, ही फार दुर्दैवाची बाब होय. ज्या वयात समृद्ध आयुष्य जगण्याची आणि जगात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छा मनात असते, त्याच वयात हतबल वाटणे दुःखद होय. ज्या वयात जग पादाक्रांत करायचे, त्याच वयात मुलीला कळते की, स्त्रीसाठी कष्टाने जिंकून घेण्यासारखे काही नसते. उलट तिला स्वतःवरचा हक्कसुद्धा सोडावा लागतो. तिचे भविष्य कुठल्यातरी पुरुषाच्या सदिच्छेवर अवलंबून असणार. सामाजिक आणि लैंगिक जीवनाच्या बाबतीत तिच्या इच्छा उदयास येतात, पण त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. शारीरिक किंवा आर्थिक पातळीवर काहीही करून दाखवण्याचा तिचा उत्साह ताबडतोब दडपला जातो. साहजिकच तिचा अस्थिर स्वभाव, तिचे रडणे - भेकणे, तिची अस्वस्थता हे सर्व तिच्या शारीरिक दौर्बल्यामुळे घडत नाही, तर ती आयुष्याशी नीट जुळवून घेऊ शकत नाही, याची ती लक्षणे असतात."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २८०)*
"मुलीने कितीही स्वतंत्रपणे स्वतःचा मार्गक्रम निवडला, तरीही स्वतःच्या आयुष्यात पुरुषासाठी व पर्यायाने विवाहासाठी एक छोटासा कप्पा ठेवतेच. तिला भीती वाटते की, तिने जर तिच्या व्यवसायाला किंवा आवडीच्या प्रकल्पाला पूर्णपणे वाहून घेतले, तर तिच्या स्त्री-सुलभ आयुष्याला कायमची मुकेल. ही भीती अगदी उघडपणे प्रकट झाली नाही, तरी सुप्तपणे मनात दडलेली असते. व त्यापायी मुलीची हाती घेतलेल्या कार्यावरची निष्ठा थोडी पातळ होते. पुरुषाला मनात व आयुष्यातही स्थान द्यायचे एकदा मुलीने ठरवले, की स्वतःला आकर्षक ठेवण्यात तिची बऱ्यापैकी मानसिक शक्ती खर्ची पडते. असे होऊ लागले की हाती घेतलेल्या कामाला ती फक्त जेवढा आवश्यक आहे तेवढाच वेळ देते. नेमका हाच मुलगा व मुलगी यांच्या करिअरमधला मुख्य फरक असतो. मुलाने स्वेच्छेने एखादा उपक्रम हाती घेतला की तो त्यात स्वतःला पूर्णतया झोकून देतो. याचा अर्थ मुलींनी आपल्या कामावर निष्ठा कमी असते किंवा काहीतरी भव्यदिव्य करण्याएवढी कुवत त्यांच्यामध्ये नसते असे नाही; तर तिच्यावरील परंपरागत संस्कार, समाजाच्या तिच्याकडून अपेक्षा आणि तिच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा या इतक्या परस्परविरोधी असतात की, तिच्या मनात स्वतःच्या भविष्याविषयी दुभंगलेपण येते. करिअरच्या गरजा आणि प्रपंचाची बंधने या दोन्हींचा तोल साधण्यात तिची खूप मानसिक शक्ती खर्ची पडते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २८३)*
"मुलीचा पौगंडावस्थेतून तारुण्याकडे प्रवास होताना तिच्या लैंगिक भावनांचापण विकास होत असतो. त्याचाही तिच्या मानसिकतेवर सखोल परिणाम होतो. लहानपणी जर तिला पुरुषाच्या लैंगिक विकृतीचा अनुभव आला असेल किंवा तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर कठोर नीतिमत्तेचे संस्कार केले असतील, तर तिला संपूर्ण पुरुषजातीची घृणा बसते व लैंगिक संबंधांविषयीची किळस मोठेपणीसुद्धा सहजासहजी जात नाही. याउलट क्वचित असेही घडते की, तरुण मुलगी बराच काळ लैंगिक सुखापासून वंचित राहते. एक मात्र खरे की प्रत्येक मुलीची लैंगिक भावना ही तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आकार घेते व प्रत्येकीच्या बाबतीत ती एक निराळीच अनुभूती असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २८३)*
"लैंगिक स्वातंत्र्य हा पुरुषाचा हक्क मानला जातो. याउलट स्त्रीचे लैंगिक जीवन विवाहाच्या चौकटीत बंदिस्त केले जाते. अगदी अनादिकाळापासून संभोग हे स्त्रीने पुरुषाला देण्याचे सुख मानले जाते. संभोग म्हणजे स्त्रीने केलेली सेवा. त्याचा मोबदला म्हणून पुरुष स्त्रीला जन्मभर पोसतो किंवा इतर काही भेटवस्तू देतो. सेवेमध्ये मालक-नोकर हे द्वैत अंतर्भूत असते. सेवा करणारा चाकरी करतो. त्याबद्दल मालक त्याला मोबदला देतो. विवाहसंस्थेच्या किंवा वेश्याव्यवसायाच्या स्वरूपातून हे चाकर-मालक द्वैत स्पष्टपणे दिसून येते. विवाहामध्ये स्त्री स्वतःचे अस्तित्व पुसून टाकून पुरुषाला समर्पित होते. त्याबदल्यात नवरा तिला जन्मभर सांभाळतो. वेश्या व्यवसायात पुरुष रोख पैसे टाकून स्त्रीची सेवा विकत घेतो. उच्च वर्गातील व्यक्ती कनिष्ठ वर्गातील व्यक्तीला चाकरीवर ठेवू शकते. तद्वत उच्च वर्गीय पुरुष कनिष्ठ स्तरातील स्त्रीशी शरीरसंबंध ठेवू शकतो. परंतु कनिष्ठ वर्गातील व्यक्ती उच्च स्तरातील व्यक्तीला नोकर म्हणून ठेवू शकत नाही. या सामाजिक रुढीला अनुसरून उच्चवर्गीय स्त्री कनिष्ठ वर्गातील पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवू शकत नाही. कारण तसे केल्यास कनिष्ठ दर्जाच्या पुरुषाने उच्चवर्गीय स्त्रीला 'नासवले' असे समजले जाते.
पुरुष स्वतःच्या लैंगिक जीवनाविषयी जी भाषा वापरतो, ती सुद्धा अगदी वैशिष्टयपूर्ण असते. पुरुष एखाद्या स्त्रीला 'घेतो' किंवा 'पटकावतो' , याउलट एखादी स्त्री 'वापरलेली' , 'नासलेली' असते किंवा 'अनाघ्रात' असते. अशा वर्णनांतून पुरुषाचा पुढाकार व स्त्रीच्या सक्रिय सहभागाचा अभाव अभिप्रेत असतो."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २८५)*
"लग्नाआधी मुलगी कुणाच्या प्रेमात असेल, तर पुरुषाच्या हळुवार स्पर्शाचा तिला अनुभव असतो. परंतु लग्नानंतर नवऱ्याच्या भूमिकेतील पुरुष अनेक जणींच्या बाबतीत एवढा हळुवार नसतो. तो अधिक जबरदस्तीने वागतो. दुर्दैवाने बहुतांश मुलींच्या बाबतीत मधुचंद्राच्या रात्रीचा संभोग हा बलात्कारच असतो. कित्येक जणींना त्याबरोबर मारहाणही सहन करावी लागते. ग्रामीण व अशिक्षित नवऱ्याच्या डोक्यात मधुचंद्राची रात्र म्हणजे फक्त त्याला लैंगिक समाधान मिळवून देण्याचा व पतीचे अधिकार वसूल करण्याचा क्षण असेच समीकरण असते. त्यामुळे या स्तरातील बहुतेक मुलींचा कौमार्यभंग हा अत्यंत भयभीत, अपमानित अवस्थेत, शारीरिक इजा सहन करत होतो.
पती समंजस व सुसंस्कृत असला, तरी कौमार्यभंगात शारीरिक इजा होतेच. संभोगाची पूर्ण कल्पना नसलेल्या नवपरिणित स्त्रीला योनिप्रवेश इतका क्लेशकारक असू शकतो, याची कल्पना नसते. त्यामुळे मानसिक दृष्ट्या जरी पती-पत्नी एकमेकांच्या जवळ आले, तरी नवरीच्या दृष्टीने पहिला संभोग म्हणजे छोटीशी शस्त्रक्रियाच असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २९१)*
"लैंगिक जीवनाची अकाली व जबरी सुरुवात हे स्त्रियांच्या मानसिक आजारांमागील एक प्रमुख कारण मानले जाते. हे टाळायचे असेल, तर मुलीच्या कामभावना कुठल्याही दोषभावनेपासून मुक्त अशा स्थितीत हळूहळू विकसित झाल्या पाहिजेत. लैंगिक जीवनाची अकाली सुरुवात टाळली की मुलगी अज्ञानाची, जबरदस्तीची, हिंसात्मक संभोगाची बळी होणे टळेल. परिपक्व वय, गर्भनिरोधक साधनांविषयी यथायोग्य माहिती, जोडीदाराशी पुरेसा पूर्वपरिचय, स्वतःच्या लैंगिकतेकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन या सर्वांतून मुलीच्या लैंगिक जीवनाचा संतुलित प्रारंभ साधता येईल."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २९३)*
"काही मुली लैंगिकतेविषयी वाटणारी कुतूहलमिश्रित भीती घालवण्यासाठी नको इतक्या लहान वयात लैंगिक साहस करत सुटतात. वेगवेगळ्या पुरुषांबरोबर संबंध ठेवल्याने कामक्रीडेविषयी सर्व काही कळेल व आपली भीती जाईल, असा त्यांचा समज असतो. प्रत्यक्षात मात्र घडते उलटेच. अपरिपक्व वयात लैंगिक नात्यांमध्ये गुंतल्यामुळे कामभावनेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जन्मभर अपरिपक्वच राहतो.
केवळ बंडखोरी म्हणून, भीतीपोटी किंवा नीतीविषयीच्या धार्मिक पगड्यावर प्रतिक्रिया म्हणून जर मुलगी शरीर संबंधास सामोरी गेली, तर तो काही सच्चा लैंगिक अनुभव ठरत नाही. कारण त्यात तिची भावनिक गुंतवणूक शून्य असते. अशा मुलींचा शारीरिक पातळीवर जरी कौमार्यभंग झाला, तरी त्या मानसिकदृष्ट्या अननुभवी मुलीच असतात. म्हणूनच अनेकदा अशा मुलीचा जर अधिकारी वृत्तीच्या एखाद्या पुरुषाशी संबंध आला, तर त्या त्याला अननुभवी मुलीने विरोध करावा, तसाच प्रतिकार करतात. त्यांची लैंगिक संबंधांविषयीची भावना धूसर, दोलायमान राहते. कुणी त्यांना कुरवाळायला लागले, तर त्यांना गुदगुल्या होतात, चुंबन घ्यायला लागले, तर त्यांना हसू येते. शारीरिक जवळीकेकडे त्या एक खेळ म्हणूनच बघत असतात. त्यासाठी जर त्यांचा मूड नसेल, तर जोडीदाराची शरीरसंबंधाची मागणी त्यांना अप्रस्तुत आणि चुकीची वाटते. म्हणूनच *जी स्त्री कामभावनेला नैसर्गिक इच्छा म्हणून स्वीकारते आणि त्यातील आनंद घेण्यास खुलेपणाने तयार होते, तीच लैंगिक जीवनात परिपक्वता साधू शकते.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २९३)*
"स्त्रीच्या कामजीवनातील एक अडचण म्हणजे पुरुषाच्या कामपूर्तीचा क्षण व स्त्रीच्या कामपूर्तीचा क्षण यांत कधीच मेळ नसतो. पुरुषाला खूपच चटकन वीर्यपतन होते व तो कामपूर्तीचा आनंद घेऊन मोकळा होतो. याउलट स्त्रीसाठी तो क्षण येण्यास अधिक वेळ लागतो. परिणामतः अनेकदा स्त्रीची कामेच्छा अतृप्तच राहते. बहुसंख्य पुरुष संभोगाच्या वेळी फक्त स्वतःच्या कामपूर्तीचा विचार करतात व स्त्रीची कुचंबणा लक्षात न घेता स्त्रियांना दूषणे देतात की, स्त्रियांची भूकच राक्षसी असते, त्यांचे कधी समाधानच होत नाही इ. इ.
पुरुषाप्रमाणे स्त्रीच्या कामक्रीडेला निश्चित असा शेवट नसतो. नक्की काय घडले म्हणजे कामपूर्ती होणार, हे स्त्रीला कळत नाही. तिचे समाधान शारीरिक कमी व मानसिक अधिक असते. शिवाय त्याला निश्चित शेवट नसल्याने कामपूर्ती झाल्यावरसुद्धा ते सौम्य स्वरूपात शरीरभर रेंगाळत राहते. पुरुषासारखे ते झटकन एका कुठल्यातरी क्षणाला संपत नाही. म्हणून तर वाजवीपेक्षा जास्त आक्रमक राहून स्त्रीला कामपूर्तीचा आनंद मिळवून देण्याचा पुरुषाचा प्रयत्न नेहमी असफल ठरतो."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : २९५)*
"स्त्री-पुरुष समानतेचे तत्व जर स्त्री-पुरुषांच्या मानसिक जडणघडणीत रुजले तर स्त्रियांमधील समलिंगी संभोगाचे प्रमाण कमी होईल. परंतु जोपर्यंत पुरुष स्वतःला स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ समजतात, तोपर्यंत काही टक्के स्त्रिया तरी पुरुषांचे श्रेष्ठत्व अमान्य करून समलिंगी संबंधांकडे वळणारच."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३०२)*
"ज्या स्त्रीचा आत्मविश्वास दांडगा असतो, बौद्धिक कुवत चांगली असते, ती स्त्री स्वतःकडे कुठल्याही प्रकारचा कमीपणा न घेता पुरुषाशी बरोबरीच्या नात्याने लैंगिक संबंध ठेवू शकते. ज्याप्रमाणे पुरुष स्वतःच्या पुरुष असण्याचा त्रास करुन न घेताय जीवन उपभोगू शकतो, त्याप्रमाणे अशी स्त्रीसुद्धा स्त्री असण्याबद्दल कुठलीही खंत न बाळगता आनंदाने जगू शकते. अर्थात पुरुषास ते अगदी सहजी जमते. याउलट स्त्रीला मात्र स्वत्व टिकवत ठेवणे व त्याच वेळी पुरुषाबरोबर लैंगिक जीवन जगणे अशी परस्परविरोधी कृत्ये करावी लागतात. त्यासाठी बराच वैचारिक संघर्ष करावा लागतो. बरीच मानसिक शक्ती खर्च करावी लागते. प्रत्येक स्त्रीमध्ये तेवढी शक्ती किंवा चिकाटी असतेच असे नाही. त्यामुळे अनेक जणी चटकन पुरुषाला शरण तरी जातात किंवा पुरुषाला आयुष्यातून वगळून समलिंगी संबंधांची वाट पकडतात."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३०३)*
"समलिंगी आकर्षण हा नशिबाला मिळालेला शापही नाही, आणि मुद्दाम आचरणात आणलेली विकृतीही नाही. विशिष्ट परिस्थितीत अंगिकारलेला तो एक दृष्टिकोन आहे. म्हणजेच त्यामागे काही प्रेरणापण असते आणि स्वतंत्रपणे घेतलेला निर्णयपण असतो. हा निर्णय घेण्यामागे फक्त शारीरिक कारणे, त्या व्यक्तींचा फक्त मानसशास्त्रीय इतिहास, किंवा फक्त सामाजिक परिस्थिती कार्यरत नसतात. परंतु या सर्वांचा साकल्याने विचार केल्यास अशा संबंधांचे स्पष्टीकरण मिळू शकते. कुठल्याही प्राप्त परिस्थितीत तोच त्यातल्या त्यात सोयिस्कर व सुखदायी मार्ग उपलब्ध आहे, असे तिला वाटते, म्हणून ती समलिंगी नात्याची दिशा स्वीकारते. तिच्यापुरता तो विचार करून घेतलेला निर्णय असतो. इतर कुठल्याही निर्णयाप्रमाणे हा निर्णयपण चुकीचा वा बरोबर ठरू शकतो. कुठलाही मार्गक्रम पूर्णपणे सुखदायी कधीच नसतो. त्यात अपेक्षाभंग, वैफल्य, आभास असे त्रासदायक टप्पेपण असतात, आणि सुखद अनुभव, मनःशांती, सौख्य असे टप्पेपण येतात. स्त्रियांमधील समलिंगी संभोगाचा मार्गसुद्धा या नियमाला अपवाद नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३०९)*
"अविवाहित स्त्री आर्थिक दृष्ट्याच इतकी पारतंत्र्यात असते की, लैंगिक स्वातंत्र्य वगैरे बाकी सर्व अगदी अशक्य कोटीतीलच वाटतात. शिवाय स्त्री स्वतःच्या उदरनिर्वाहापुरते मिळवू लागली, तरी तिने लग्न न केल्यास तिच्या व्यक्तिमत्वात काहीतरी उणीव आहे, असे समाज समजतो. परिणामतः तिला योग्य ती सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही. एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून आपली दखल घेतली जावी, असे तिला वाटत असल्यास तिला विवाह करावाच लागतो. स्त्रीने अविवाहित राहण्याला जर एवढा विरोध असतो, तर मग अविवाहित स्त्रीस अपत्य होण्यास केवढा विरोध असणार ? मातृत्वाचा आदर हा फक्त विवाहित स्त्रीच्या बाबतीतच केला जातो. कुमारी माता सतत लोकनिंदेचे लक्ष्य असते. ती व तिचे मूल हे दोघेही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बहिष्काराचे बळी ठरतात. म्हणूनच आजही बहुसंख्य तरुण मुली शिक्षण संपल्यावर काय करणार असे विचारले की 'लग्न' असे उत्तर देतात."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३१५)*
"पत्नीच्या भूमिकेत स्त्री एक ठरावीक पुरुषाबरोबर भावनिक नाते प्रस्थापित करत नसते, तर स्त्रीच्या म्हणून समजल्या जाणाऱ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत असते. विवाहाच्या चौकटीत स्त्रीचे लैंगिक आयुष्य दोन प्रकारांनी आकार घेते. एक म्हणजे विवाहाव्यतिरिक्त लैंगिक सुखाचा दुसरा कुठलाही मार्ग तिला उपलब्ध राहत नाही. संभोगसुख हीसुद्धा संस्था झाल्यामुळे त्यात व्यक्तिगत समाधानापेक्षा सामाजिक हिताचे रक्षण अधिक महत्त्वाचे बनते. तसे पाहता पुरुषाच्या लैंगिक आयुष्याभोवतीपण लग्नबंधनाची चौकट बसतेच. पण ती ओलांडण्याची मुभा ज्याप्रमाणे समाज त्याला देतो, तशी स्त्रीला देत नाही. पुरुष तत्कालिकतेच्या पलिकडे जाऊन या जगाचा एक नागरिक आणि काम करणारा सक्रिय सदस्य म्हणून लग्नाआधी (आणि लग्नबाह्यसुद्धा) विविध सुखांचा उपयोग घेऊ शकतो. त्याच्या गरजा भागवण्याची, त्यासाठी निरनिराळे मार्ग चोखाळण्याची स्पष्टीकरणेपण त्याला उपलब्ध असतात. पण *ज्या जगात स्त्रीची केवळ 'मादी' ही व्याख्या केली जाते, त्या जगात तिला फक्त 'मादी' म्हणून मार्गक्रम स्वीकारावा लागतो.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३१७)*
"फार पूर्वी मातृसत्ताक समाजात विवाहाआधी मुलीचे कौमार्यभंग होण्यामध्ये काही वावगे समजले जात नसे. परंतु पितृसत्ताक पद्धती रूढ होऊ लागल्यावर मुलीच्या योनिशुचितेलाही अवाजवी महत्व येऊ लागले. यास एक आर्थिक बाजू अशी होती की, दुसऱ्या कुठल्यातरी पुरुषाचा अंकुर जर विवाहाच्या वेळी नववधूच्या पोटात असेल, तर पतीची संपत्ती वारसाहक्काने भलत्याच पुरुषाच्या मुलास जाणार. परंतु या विचारापेक्षाही वधूवरील एकाधिकार सत्तेची भावना त्यात जास्त प्रबळ असे. *योनिशुचितेचे प्रस्थ आजही जगभर टिकून आहे.* एवढेच काय, पण अनेक समाजांत लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीनंतर वधूच्या कौमार्यभंगाने डागाळलेली चादर घरात जमलेल्या पाहुण्यांना अभिमानाने दाखवली जाते. जेणेकरून वधू लग्नाआधी योनिशुद्ध होती याचा दाखलाच सासरच्यांकडे राहतो. वरील सर्व उपचार म्हणजे व्यक्तीची कामभावना ही सामाजिक विधी व पुनरुत्पत्तीचे प्राणीपातळीवरचे कार्य यामध्ये कशी दुभंगली जाते, याचे प्रतीक होय. *स्त्री-पुरुषांमधील कामजीवनात उत्स्फूर्तता, स्वेच्छा, स्वातंत्र्य व परस्परसौख्य अभिप्रेत असायला हवे. परंतु जेव्हा ते सामाजिक कर्तव्य होते, तेव्हा त्यातील सुखाचा घटक निघून जातो व ते केवळ प्राणीपातळीवरील शरीर संबंधांवर येऊन ठेपते. म्हणून तर या शरीरसंबंधाचा जेव्हा वाजत-गाजत भरपूर खर्च करून सोहळा केला जातो, तेव्हा ते विचित्र वाटते.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३२०)*
"मानवतावादी नीतिमत्तेमध्ये आयुष्याच्या प्रत्येक अनुभवाला मानवी अन्वय असणे अभिप्रेत असते. त्यामध्ये स्वातंत्र्याची कल्पनाही अभिप्रेत असते. पूर्णपणे सच्च्या, नीतिमान अशा कामसंबंधांमध्ये इच्छा आणि इच्छापूर्तीच्या आनंदाचा मुक्त अविष्कार असतो. किंवा निदान लैंगिकतेच्या संदर्भातील मुक्त अनुभूतीसाठी प्रयत्न असतो. परंतु हे केव्हा शक्य होते ? समोरची व्यक्ती ही एक स्वतंत्र व्यक्ती, स्वतंत्र अस्तित्व आहे, हे एकमेकांनी मान्य केले तर ! पण जेव्हा लैंगिकता व्यक्त करणे हे व्यक्तीच्या अधिकारात न राहता त्यासाठी धर्म किंवा समाजाकडून मान्यतेची गरज लागते, तेव्हा लैंगिक संबंधातील जोडीदारांमध्ये प्राणिपातळीवरील शरीर नातेच प्रस्थापित होते. कर्मठ वृत्तीच्या वृद्ध स्त्रिया किंवा शिक्षिका लैंगिक संबंधांविषयी घृणेने बोलतात. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण त्यांनी स्त्री-पुरुषांमधील कामक्रीडेला मलमूत्रविसर्जनवादी शारीरिक विधींच्याच पातळीला आणून बसवलेले असते. म्हणूनच तर लग्न समारंभामध्ये चावट विनोदांना ऊत येतो. एकीकडे कामक्रीडेस उघडी-वाघडी प्राणीपातळीवरील क्रिया मानून दुसरीकडे त्याचा भव्य समारंभ करणे हे तर फारच बिभत्स होय. विवाह सोहळ्यातून एक सार्वत्रिक आणि अमूर्त असे महत्वाचे घटित व्यक्त होते. स्त्री व पुरुषांचे मीलन ! पण एकांतात ते अमूर्त राहत नाही, तर दोन वास्तवातील व्यक्तींचे मीलन असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३२१)*
"तसे पाहता विवाहानंतरची पहिली रात्र ही स्त्री-पुरुष दोघांसाठीही परीक्षेचीच रात्र असते. नववधूला संभोगाची भीती, लाज व थोडीशी उत्सुकताही असते. परंतु तिच्यावरील नैतिक शिकवणीमुळे संभोगसुखाची अनुभूती घेता घेता ती आखडू लागते. नवऱ्याला जर बायकोविषयी पुरेसा आदर असेल, तर तो सुद्धा सभ्यतेच्या दडपणाखाली तिला पुरेसे खुलवू शकत नाही. याउलट तिला उद्दीपित करण्यासाठी तो फार कामूक वागला, तर ती नाराज होण्याची शक्यता असते. तुरळक नशीबवान दांपत्य सोडल्यास बहुसंख्य स्त्रियांना पहिल्या रात्री आपला नवरा धटिंगण तरी वाटतो किंवा दुबळा तरी. परिणामतः संभोग हे विवाहित स्त्रियांसाठी कंटाळवाणे व अनेकदा घृणास्पद कर्तव्य होऊन बसते. *वस्तुस्थिती अशी आहे की, अनेक स्त्रिया संभोगातून कुठल्याही प्रकारचा आनंद न मिळवता आया बनतात. अगदी आजीपणाला पोचल्या, तरी कामपूर्ती म्हणजे काय, हे त्यांनी एकदाही अनुभवलेले नसते.* काही स्त्रिया संभोग कर्तव्य टाळण्यासाठी अनेक सबबी शोधतात. डॉक्टर्सकडून खोटी निदाने वदवून घेतात. जेणेकरून नवऱ्याबरोबर शरीरसंबंध टळेल. विवाहविषयक सल्लागारांकडे येणाऱ्या अनेक स्रियांची तक्रार असते की, त्यांच्या नवऱ्यामध्ये वाजवीपेक्षा जास्त कामेच्छा आहे. नवरा पुरेसे संभोगसुख देत नाही अशी तक्रार करणाऱ्या स्रिया संख्येने फार म्हणजे फारच थोड्या आढळतात. वास्तवात स्त्रीची कामक्रीडा करण्याची क्षमता शारीरिकदृष्ट्या अमर्याद असू शकते. असे असतानासुद्धा हे घडते, याचाच अर्थ असा की, *स्त्री-पुरुषांच्या लैंगिक इच्छांना विवाहाद्वारे सामाजिक अधिष्ठान देण्याच्या प्रयत्नात स्त्रीची लैंगिक इच्छा समूळच मारली जाते.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३२२)*
"संभोग जर खुल्या मनाने दोघांच्याहीकडून उत्स्फूर्तपणे झाला, तर पहिल्या रात्रीचा अनुभव फारसा हानिकारक ठरत नाही. दोघांनाही एकमेकांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची, सुखदुःखांची कदर असेल तर कामव्यवहारांत कुणीच कुणावर कुरघोडी वा जबरदस्ती करत नाही. एकमेकांना सुख देण्याच्या भावनेने घडलेल्या कामक्रीडेत काहीही लाजीरवाणे, विकृत उरत नाही. उलट तो दोघांसाठीही परमोच्च सुखाचा प्रेमविष्कार ठरतो. परंतु *लग्नसंस्थेतील सगळ्यात मोठा दोष म्हणजे जो लैंगिक संबंध उत्स्फूर्तपणे घडल्यास परमोच्च सुख देऊ शकतो, त्यास हक्क व कर्तव्याचे रूप येते. विवाहामध्ये स्त्री-पुरुषांचा परस्परपरिचय फक्त दोन शरीरे म्हणून होतो. त्यांचा मानसिक पातळीवर मिलाफ होतच नाही.* अगदी तुरळक जोडप्यांमध्ये मात्र लैंगिक संबंध संयमाने, एकमेकांच्या कलाने शिकत शिकत, आकार घेतात व जसा काळ जाईल, तसे परिपक्व होतात. अशा जोडप्यांत शरीरसंबंधांविषयी स्त्रीच्या मनात घृणा उत्पन्न होत नाही. उलट ती आतुरतेने व उत्स्फूर्तपणे कामजीवनास प्रारंभ करते. लैंगिक सुखोपभोग काहीतरी अनैतिक आहे, हा तिचा पूर्वीचा अपसमज गळून पडतो. सुखी कामजीवनामुळे पती-पत्नीमधील नातेसंबंध केवळ शारीरिक पातळीवर न राहता दोघांच्याही मनात एकमेकांविषयी आपुलकी निर्माण होते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३२३)*
"स्त्री-पुरुषांमधील शारीरिक आकर्षण विवाह टिकवून ठेवण्यास पुरेसे नसते. तसेच समाधानी कामजीवन हे विवाहाचे एकमेव उद्दिष्ट होऊ शकत नाही. लैंगिक संबंध हे कुणावरही लादलेले बंधन नसावे. ते स्त्री-पुरुषांच्या स्वेच्छेनुसार व प्रासंगिक असावेत."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३२५)*
"दोन आत्मनिर्भर व्यक्तींनी केवळ त्यांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या अमर्याद प्रेमाच्या तत्त्वाला अनुसरून एकत्र येणे ही आदर्श अवस्था झाली. देह आणि आत्म्याचे द्वैत जर आपण मान्य केले, तर आत्म्यासाठी शरीर ही केवळ अनुषांगिक बाब असते. तसेच विवाहामध्ये दोघांसाठीही जोडीदार म्हणजे एक अपरिहार्य, प्रासंगिक, कंटाळवाणी बाब होणार. आत्म्याचे मीलन नसेल, तर शरीराचे एकत्र येणे हा अनुषांगिक उपचारच. मग एकमेकांचा स्वीकार करणे आणि एकमेकांवर प्रेम करणे हीपण अटळ, भौतिक परिस्थितीजन्य सक्ती. पण स्वीकार करणे आणि प्रेम करणे यांची कायम गल्लत केली जाते. माणूस जे स्वीकारतो, त्याच्यावर त्याचे प्रेम असतेच असे नाही. माणूस त्याचे शरीर, त्याचा भूतकाळ, त्याची वर्तमान परिस्थिती हे सर्व स्वीकारतो. कारण ते त्याला सहन केलेच पाहिजे, असे त्याला वाटत असते. पण प्रेम ही एक बाह्यवर्ती भावना आहे. आपल्यापेक्षा भिन्न, विलग व्यक्तीविषयी वाटणारी तीव्र ओढ आहे. याउलट एखादे ओझे, दडपशाही स्वीकारणे म्हणजे प्रेम नाही. त्यात तिटकाऱ्याचीच भावना अधिक असते. आपुलकी, नाराजी, तिरस्कार, बंधने, अलिप्तपणा, कंटाळा, दांभिकपणा, निमूट स्वीकृती या सगळ्यांच्या मिश्रणाला, त्यावर रंगसफेदी करून त्याला वैवाहिक प्रेम असे नाव देऊन त्याचा आदर केला जातो. पण जे शारीरिक प्रेमाला लागू पडते, तेच प्रेमभावनेलाही लागू पडते. ती जर मुक्त असेल, तरच ती सच्ची असू शकते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३४१)*
"वैवाहिक नात्यातील आपुलकीविषयी हिरीरीने बोलणाऱ्यांना हे कबूल असते की, विवाह म्हणजे गोड गोड प्रेमप्रकरण नव्हे. पण म्हणूनच त्यात एक वेगळी गोडी आहे, असे त्यांचे म्हणणे असते. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाने एखाद्या गोष्टीचा उल्लेख करण्याची फार नामी पद्धत शोधून काढली आहे. त्यात दैनंदिन दिनचर्येला साहसाचे रूप दिले जाते, कंटाळ्याला शहाणपण म्हटले जाते, एकनिष्ठतेला अत्युच्च आनंद देणारी तीव्र इच्छा मानले जाते आणि कुटुंबात एकमेकांविषयी वाटणारा तिरस्कार म्हणजे प्रेमाच्या सखोल भावनेचे रूप समजले जाते. पण वस्तुस्थिती अशी आहे की, *जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना आवडत नसतात, पण एकमेकांपासून त्यांचे निभतपण नाही तेव्हा त्यांच्यामधले नाते अगदी कीवेस्पद असते. अशा नात्याला सर्वांत सुंदर मानवी नाते म्हणणे चूक आहे.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३४१)*
"स्त्रीला दिलेले सुखाचे वचन लग्नसंस्था पाळत नाही, हा लग्नसंस्थेचा प्रमुख दोष नाही. कारण सुखाचे वचन कुणीच कुणाला देऊ शकत नाही. विवाहसंस्थेतील मुख्य त्रुटी म्हणजे स्त्रीला एक घट्ट चाकोरीत बंदिस्त केले जाते. लग्नाआधी ती एक स्वच्छंद आयुष्य जगलेली असते. लग्नानंतर मात्र घराच्या चौकटीत अडकते. या चौकटीला फक्त रहाटगाडग्याची गती असते. रोज, वर्षानुवर्षे तेच ते !!"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३४५)*
"काही तरी कमी आहे आणि विवाहाद्वारे पती-पत्नी ही कमतरता एकत्रितपणे भरून काढतात, याच विचाराने जर विवाह केला, तर त्यातून वैफल्यच येणार. विवाह हे दोन "पूर्ण" जीवांचे एकत्र येणे हवे, यात दोन स्वतंत्र जीव एकत्र आले पाहिजेत. विवाहाकडे कधीही कब्जा करणे, पलायन, माघार, उपचार म्हणून बघू नये. दाम्पत्य हे कधीही एक घटक मानू नये. जोडपे म्हणजे एक बंद कप्पा नव्हे. उलट स्त्री व पुरुष दोघेही समाजात एक स्वतंत्र घटक म्हणून अस्तित्वात असावेत. दोघांनीही आत्मनिर्भरतेने स्वतःचा विकास साधावा. असे झाले, तर संपूर्णपणे उदार मनोवस्थेत ते एकमेकांशी जवळीक साधू शकतील. आपण दोघेही स्वतंत्र व्यक्ती आहोत, या जाणिवेवर त्यांची जवळीक आधारलेली असावी."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३४६)*
"विवाहसंस्थेतील साचलेपण टाळायचा असेल, तर प्रत्येक स्त्रीने पत्नी व माता होण्याआधी एक पूर्ण विकसित व्यक्ती बनले पाहिजे. समाजाचा एक स्वयंपूर्ण घटक बनले पाहिजे. व्यक्ती म्हणून तिला स्वतःचे कार्यक्षेत्र व स्थान हवे. स्वत्वाचे वलय सोबत घेऊन तिने पतीबरोबर सहजीवन सुरू केले, तर मग ती प्रपंचाच्या रहाटगाडग्यात विरघळून जाणार नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाही ती स्वतःचे अस्तित्व गमावून बसणार नाही. पती व पत्नी या दोघांचेही अस्तित्व सहजीवनाच्या चौकटीत परस्परसहकार्याने फुलले, तर विवाहाची चौकट चिरस्थायी आनंद देऊ शकते. प्रत्यक्षात अशी जोडपी आढळतातही. काही विवाहबंधने जोडलेली, तर काही अविवाहित पण साहचर्याने बांधलेली !"
(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३४६)
"मालक-गुलाम हे द्वैत स्त्री-पुरुष नात्यामध्ये स्पष्ट उठून दिसते. गुलामाला वेठीला धरता धरता तो इतका आवश्यक होईन बसतो की, मालकच त्याचा गुलाम होऊन बसतो. स्त्रीला अंगठ्याखाली ठेवता ठेवता पुरुषाला ती इतकी आवश्यक होऊन बसते की, तिच्यावाचून त्याचे पान हलत नाही. अगदी अशीच परिस्थिती स्त्रियांचीपण होऊ शकते. ज्या स्त्रिया नवऱ्यावर अतिरेकी हुकूमत गाजवून त्याला सतत आपल्या भोवती रुंजी घालायला लावतात, त्या वरकरणी घरात सर्वेसर्वा वाटतात. पण खरेतर अशाच स्त्रिया जास्त परावलंबी असतात. नवरा जर त्यांना सोडून गेला, तर त्या पूर्ण कोलमडतात. यातली मेख अशी आहे की, वरकरणी स्त्री कितीही अधिकारी वृत्तीची वाटली, तरी जोपर्यंत ती अर्थार्जन करत नसते, तोपर्यंत ती स्वतंत्र असूच शकत नाही, कारण नवऱ्याने त्रासून तिला सोडले, तर तिची अवस्था अगदी केविलवाणी होते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३४८)*
"विवाहबंधन दोघांनाही जाचक होऊ द्यायचे नसेल, तर त्यावर एकमेव उपाय म्हणजे लग्न हे स्त्रीसाठी करीअर समजणे थांबले पाहिजे. यावर अनेक पुरुष म्हणतील की, स्त्रिया आताच इतक्या तर त्रास देतात, तर स्वतंत्र झाल्यावर किती छळतील ? परंतु या युक्तिवादामागील तर्कशास्त्रच समूळ चूक आहे. विवाहित स्त्री नवऱ्याला छळत असेल, तर विवाहससंस्थेचे स्वरूप व स्त्रीचे जिणे मूलतः बदलले पाहिजे. स्त्री स्वतःच्या महत्वकांक्षांचा बोजा पुरुषावर टाकते, कारण तिला स्वतःला स्वतःच्या आकांक्षा पुऱ्या करण्याची संधी दिली जात नाही. बायकोच्या काचातून मुक्त व्हायचे असल्यास पुरुषाने प्रथम स्त्रीला मुक्त केले पाहिजे. तिला आयुष्यात काही तरी मनाप्रमाणे करू दिले, तरच ती नवऱ्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जगू देईल. आज बाई आपला सगळा बोजा पुरुषावर टाकते, कारण तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची परवानगी नाही. ती जर मिळाली, तर पुरुषाला तिचे ओझे बाळगावे लागणार नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३४८)*
"परंपरेनुसार मूल जन्माला घालणे हे स्त्रीचे आद्य कर्तव्य समजले जाते. ते कर्तव्य पार पाडल्यावर खरे तर तिचे घरातील स्थान उंचावले पाहिजे. आई होणे ही जर स्त्रीची इतिकर्तव्यता असेल, तर प्रत्येक मातेस कृतार्थ वाटले पाहिजे. आपल्या बाळामार्फत 'स्व' चे व्यक्तीकरण साधता आले पाहिजे. आई झाल्यावर तिची सामाजिक प्रतिष्ठासुद्धा वाढली पाहिजे. स्त्री जोपर्यंत माता होत नाही, तोपर्यंत जर अपूर्ण समजली जात असेल, तर मूल झाल्यावर तिला परिपूर्तीचे समाधान मिळाले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र असेच घडते का, हे पाहणे महत्वाचे ठरेल."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३४९)*
"जो समाज अद्यापि जन्माला न आलेल्या गर्भाच्या हक्कांविषयी तावातावाने बोलतो, तोच समाज जन्माला आलेल्या अश्राप जिवाच्या योग्य संगोपनाविषयी मात्र पूर्ण बेफिकीर असतो. गर्भपात करणाऱ्या डॉक्टर्सना उच्च स्वरात मानवतेचे मारेकरी म्हणून संबोधणारा समाज अनाथालयात व बालसुधार गृहात बालकांवर अत्याचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी मात्र मूग गिळून बसतो. गर्भपात करणाऱ्या डॉक्टर्सना कोर्टात खेचणारे लोक स्वतःच्या मुलांना मारहाण करणाऱ्या, त्यांना उपाशी ठेवणाऱ्या आईवडिलांविरुद्ध मात्र काहीही कृती करत नाहीत. अशा वेळी मुले ही आईवडिलांची मालमत्ता आहे; त्यात इतरांनी पडणे योग्य नव्हे, अशी भूमिका ते घेतात. परंतु त्याच तर्कानुसार गर्भावर मातेचा हक्क असून तिला मूल नको असल्यास ती गर्भपात करून घेऊ शकते, असे मात्र या लोकांना वाटत नाही. परिणामतः सामाजिक हस्तक्षेपाअभावी आज लाखो मुलांना जन्मदात्यांकडूनच अमानुष छळ सहन करावा लागतो."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३५१)*
"अपत्यहीन स्त्रीच्या कुठल्याही समस्येवर खापर तिला मूल नाही, या वास्तवावर फोडले जाते. एखादी स्त्री स्वैराचारी असेल, तर मूल नाही म्हणून ती स्वैराचार करते, मूल नाही, म्हणून ती लोभी आहे, मूल नाही, म्हणून तिला राक्षसी महत्त्वकांक्षा आहे किंवा मूल नाही, म्हणून ती समलिंगी संभोगाकडे खेचली गेली आहे इत्यादी, इत्यादी. इच्छा असूनही मूल होत नसेल, तर स्त्री दुःखीकष्टी होईल, थोडी चिडचिडपणा होणे शक्य नाही. परंतु तिच्यातील प्रत्येक दोषाचे, प्रत्येक चुकीचे मूळ तिच्या अपत्यहीनतेत असते असे म्हणणे वास्तवास धरून नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३६८)*
"मातृत्वाविषयी दोन फार मोठे गैरसमज जनमानसात घट्ट रुजलेले आहेत. एक म्हणजे आई होणे हीच स्त्रीजीवनाची परिपूर्ती आहे, असे प्रत्येक स्त्रीस वाटते. हा समज वास्तवास धरून नाही. फक्त आई होणे हे संतुलित, समाधानी जीवन जगण्यास पुरेसे नसते. स्त्रीला स्वतःच्या आवडीचे कार्यक्षेत्र नसेल, 'स्व' च्या व्यक्तीकरणासाठी काही माध्यम उपलब्ध नसेल, तर मुलाबाळांचे नीट संगोपन करतानासुद्धा तिच्या मनात नैराश्य असतेच. आपण काहीच करत नाही, ओल्यावर घरकामाचा एकसुरीपणा लादला गेला आहे, आपली क्षितिजे कोंडली आहेत, या विचारांनी तिला वैफल्य येते. स्त्रीचे आपल्या मुलांबरोबरचे नाते हे तिच्या इतर सर्वांबरोबरच्या नात्याचे एक अंग असते. इतर सर्व विश्व बाजूला सारून फक्त मुलांबरोबरचे तिचे संबंध राहिले, तर ते संबंध एकांगी होतात. अशा संकुचित जगात आई व मूल हे दोघेही गुदमरतात. मनोविश्लेषण तज्ज्ञांच्या सर्वेक्षणांमधून वारंवार प्रत्ययास येते की, जी स्त्री तिच्या अवतीभोवतीच्या जगात चांगल्या प्रकारे सामावलेली आहे, तिच्या आवडीचे, तिच्या दृष्टीने उपयोगी असे काम करत आहे, तिचे मातृत्वाचे ओझे आनंदाने उचलू शकते व तीच आईपणातून आनंदपण मिळवू शकते. मातृत्व हे तिच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक परिणामांपैकी एक लोभस परिणाम असते. याउलट ज्या स्त्रीच्या आयुष्याला फक्त 'आई असणे' हे एकमेव परिणाम असते, ती अधुरे, विफल आयुष्य जगत असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३६९)*
"मातृत्वाचा निकोप आनंद घ्यायचा असेल, तर स्त्रीने घरात व घराबाहेरही समृद्ध जीवनाचा आनंद घ्यायला हवा. नानाविध अनुभवांना सामोरे जायला हवे. परंतु तिच्यावरच्या जबाबदाऱ्या इतक्या विविध प्रकारच्या असतात की, त्यांचा एकमेकींशी मेळ घालणे ही तारेवरची कसरत होऊन बसते. सुगृहिणी व्हायचे, तर घराची स्वच्छता, टापटीप सांभाळली पाहिजे. पण लहान मुले तर टापटीप क्षणोक्षणी उधळून लावतात. स्वतःचे आरोग्य, शरीरसौष्ठव टिकवावे हे समजत असते, पण बाळंतपणात शरीर बेडौल होते आणि मुलांचे करता करता स्त्रीला व्यायामाला वेळ आणि शक्ती उरत नाही. घराबाहेर काही छंद, व्यवसाय करायचा, तर मूल सांभाळण्याची चांगली सोय सर्वत्र उपलब्ध असतेच असे नाही. एकीकडे आईची जबाबदारी पार पाडायची व दुसरीकडे 'स्व' चे व्यक्तीकरण साधायचे अशा कचाट्यात आजच्या अनेक स्त्रिया सापडलेल्या दिसतात. 'फक्त कुणाची तरी आई' या स्वतःच्या अस्तित्वावर आधुनिक स्त्री समाधानी राहणे शक्यच नाही. तिला स्वतःचे असे सामाजिक स्थान हवे असते. कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी आई, याव्यतिरिक्त फक्त एक व्यक्ती म्हणून समाजाने आपली दखल घ्यावी, अशी तिची इच्छा असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३७१)*
"जी स्त्री उघड-उघड देहाचे सौंदर्य दाखवत हिंडते, तिची समाज कुचेष्टा करतो. परंतु जी स्त्री स्वतःच्या स्त्रीत्वाचे प्रदर्शन करण्यास सपशेल नकार देते, तीपण समाजाच्या टीकेचे लक्ष्य होते. स्त्रीने थोडाफार तरी नट्टापट्टा करणे हे स्त्रीसुलभ व आवश्यक आहे, अशी समाजाची धारण असते. साध्या राहणाऱ्या स्त्रीवर पुरुषी, बंडखोर, मुद्दाम पुरुषांचे अनुकरण करणारी, असे शिक्के बसतात. ती लेस्बियन असावी, अशीपण लोकांना शंका येते. किंवा ती नक्की विक्षिप्त आहे; आणि आपले वेगळेपण उठून दिसावे असा तिचा हेतू आहे, असे लोकांना वाटते. स्त्री जेव्हा स्वतःची शोभेची वस्तू करायला नकार देते, तेव्हा ती समाजाचा रोष ओढवून घेते. त्यामुळे चार लोकांत आपण वेगळे पडू नये असे जर तिला वाटत असेल, तर तिला स्त्रीची समाजमान्य प्रतिमा जपावी लागते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३७४)*
"एंगल्स म्हणालाच आहे : एकपत्नीत्व रूढ झाल्यामुळे दोन सामाजिक सत्ये उदयाला आली. एक - स्त्रीचा विवाहबाह्य प्रियकर. दोन - विवाहित स्त्रीचा फसवणुक झालेला नवरा. एकपत्नीत्व आणि वेश्या व्यवसायाच्या बरोबरीने विवाहबाह्य संबंध हीसुद्धा सामाजिक संस्था उदयास येणारच. तिला कितीही शिक्षा केली, नष्ट करायचा प्रयत्न केला, तरी ती दडपून टाकता येणार नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३८४)*
"आजची स्त्री विविध क्षेत्रांत मोकळेपणाने वावरू शकते. तिच्या लैंगिक इच्छेचीसुद्धा थोडीफार दखल घेतली जाऊ लागली आहे. परंतु विवाह आणि शारीरिक आकर्षण यांची सांगड घालणे अवघडच असते. पती-पत्नींमधील सौदार्ह व दोघांचे कामजीवन (विवाहांतर्गत व विवाहबाह्य) यांची फारकत केली, तर कदाचित विवाहाचे बंधन दोघांसाठीही सुखावह व मुलांसाठी कल्याणकारी ठरेल. विवाहबाह्य संबंधातही लपवाछपवी, फसवणूक हे काही घडणार नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३८६)*
"स्वतंत्र स्त्री आणि स्वैराचारी स्त्री यामध्ये नेहमी गफलत केली जाते. स्वतंत्र स्त्रीचा प्रियकरसुद्धा ही गफलत करतो. अशा स्त्रीने स्वेच्छेने आपल्याशी संबंध ठेवले आहेत, असे तो मानत नाही. आपण तिला कब्जात घेतले, अखेरीस ती गळाला लागलीच, असे त्याला वाटत असते. प्रियकराच्या या मग्रुरीने स्वाभिमानी स्त्री स्वतःतर दुखावली जातेच, शिवाय आपल्या नवऱ्यालाही प्रियकराचा उद्धटपणा सहन करावा लागतो, हे तिला रुचत नाही. स्त्रीच्या कामजीवनाची ही सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास जाणवते की प्रतिकूल सामाजिक मानसिकतेमुळे पुरुषाबरोबर समानतेने वागणे स्त्रीला अतिशय अवघड जाते.
अर्थात विवाहबाह्य संबंध, परपुरुषाबरोबर मैत्री, स्वैराचार हे सर्व तुरळक प्रमाणात घडणारे अपवाद आहेत. या अपवादांमुळे विवाहसंस्थेचे स्वरूप फारसे बदलत नाही व त्यातील त्रुटीपण कमी होत नाहीत. फार तर त्या थोडा काळ सहन करण्यास मदत होते. हे अपवाद म्हणजे अयोग्य मानले गेलेली, कर्तव्यच्युतीची उदाहरणे होत. त्यांनी स्त्रीला स्वतःचे विधिलिखित स्वतःच्या हातात घेण्याचे बळ प्राप्त होत नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३८७)*
"स्त्री वेश्याव्यवसायाकडे स्वेच्छेने वळते की ओढली जाते ? पूर्वीच्या काळी गुन्हेगार व वेश्या या दोघांची एकत्र मोट बांधण्याचा प्रघात होता. वेश्या बुद्धीने कमी असतात, असाही एक प्रचलित समज होता. आज मात्र वेश्या गुन्हेगार असते, असे कुणी मानत नाही. ती निर्बुद्ध असते, असेही कुणाला वाटत नाही. मानसिक संतुलन बिघडल्याचे प्रमाण वेश्यांमध्ये जास्त असते हे खरे; पण त्यास सामाजिक कारणे आहेत. तसेच वेश्या बुद्धीने कमी असतात हा समज प्रचलित होण्यामागचे खरे कारण हे असेल की, मंदबुद्धीच्या स्त्रीला दुसरे कसलेच कसब आत्मसात करणे जमले नाही, तर शरीरविक्रय हा अर्थार्जनाचा एकमेव पर्याय तिच्यापुढे उरतो. कदाचित म्हणूनच तथाकथित सुमार बुद्धीच्या स्त्रिया नाइलाजाने वेश्याव्यवसाय पत्करत असणार. अन्यथा वेश्यांनी विशेषकरून मंदबुद्धी असण्याचे कारण नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, जेथे दारिद्र्य आणि बेकारीचे राज्य आहे, तेथे समाज मिळेल त्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच वेश्याव्यवसाय व बेकारीचा फार जवळचा संबंध आढळून येतो. *ज्या राज्यात रोजगार व किमान वेतन सर्वांत कमी, त्या राज्यात वेश्याव्यवसायात पडणाऱ्या स्त्रियांची संख्या सर्वांत जास्त असते.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३८९)*
"वेश्यांच्या आयुष्यातील सर्वांत अन्यायकारक व लज्जास्पद गोष्ट म्हणजे त्यांची आर्थिक हलाखी. त्यांचे दलाल व त्यांच्या 'मॅडम' त्यांचे शक्य तेवढे आर्थिक शोषण करत असतात. त्यामुळे त्या जन्मभर दारिद्र्यात पिचत राहतात. दारिद्र्याबरोबर अनारोग्य आलेच. साधारणपणे पाच वर्षे या व्यवसायात काढल्यावर जवळजवळ ७५% वेश्यांना सिफिलिसची लागण होते. २५% वेश्यांवर गोनोरिआ चिघळल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागते. विसातील एकीला क्षयाची बाधा झालेली असते. ६०% वेश्यांना दारू वा अमली पदार्थांचे व्यसन असते. ४०% वेश्या वयाची चाळीशी गाठण्याआधी मरण पावतात. काहींना पुरेशी काळजी घेऊनही गर्भ राहतोच. चांगल्या डॉक्टरकडून गर्भपात करून घेण्याएवढे पैसे नसल्यामुळे स्वतःच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गर्भ पाडण्याचे प्रमाण वेश्यांमध्ये खूप असते. परिणामतः अनेकजणी जंतुसंसर्ग होऊन मृत्युमुखी पडतात.
या व्यवसायातील मुली सतत असुरक्षित असतात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी गिऱ्हाइके, व्यसनाधीन दलालांची मग्रुरी, अचानक पडणाऱ्या पोलिसांच्या धाडी, तेवढ्याच अकस्मात येणाऱ्या वैद्यकीय तपासणीच्या नोटिसा, त्या वेळी विचारले जाणारे अपमानास्पद प्रश्न, पदोपदी होणारी अवहेलना, सामाजिक बहिष्कार या सर्वांचा सम्यक परिणाम म्हणजे *वेश्या ही भावना असणारी, हाडामांसाची माणूस आहे या वास्तवाचे कुणाला भानच राहत नाही.* ती रोगांनी पछाडलेली प्राणिमात्र म्हणून जगते व प्राण्याच्याच मौतीने मरते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ३९३)*
"साहित्याला खरा अर्थ व प्रतिष्ठा केव्हा प्राप्त होते ? जेव्हा विधायक कार्यात मग्न असलेल्या व्यक्तीला ते भावते व वाचलेल्या साहित्यामुळे त्या व्यक्तीची क्षितिजे अधिक रुंदावतात तेव्हा ! माणसाच्या उदात्तीकरणाच्या प्रक्रियेत साहित्याचा सहभाग असेल, तर ते साहित्य अर्थपूर्ण ठरते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४१८)*
"अनेकदा स्त्री जगताचा व पुरुषांच्या विश्वाचा तुलनात्मक विचार केला जातो. परंतु स्त्रियांचे स्वतंत्र असे विश्व नसतेच ! फार तर त्यांचा एखादा छोटासा गट असतो. त्या गटाचे नियंत्रण मात्र पुरुषांच्या हातात असते. त्यामुळे गटातील स्त्रीचा दर्जा दुय्यमच असतो. स्त्रिया त्यांच्या शरीरसाधर्म्य मुळे एकत्र येतात खऱ्या, परंतु त्यांच्यामध्ये संघटित भावना फारशी नसते. त्यामुळे त्या पुरुषांच्या जगातील एक घटकपण असतात व त्याच वेळी स्वतःचा छोटा गट करून पुरुषाच्या विरोधातपण उभ्या असतात. फक्त स्त्रियांचे असे स्वतःचे विश्व असले, तरी ते चहुबाजूंनी पुरुषांच्या विश्वाने घेरलेले असते. त्यामुळे त्या धड स्वतःच्या विश्वातही शांतपणे जगू शकत नाहीत आणि पुरुषाच्या जगातही सुखाने वावरू शकत नाहीत."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४२०)*
"वाट्याला आलेले दुःख निमूटपणे भोगण्याच्या मानसिकतेमुळे स्त्रीमध्ये जो सोशिकपणा येतो, तो मात्र प्रशंसनीय असतो. पुरुषांपेक्षा स्त्रिया शारीरिक वेदना अधिक चिवटपणे सहन करतात. कसोटीच्या काळात स्त्री अधिक धीराने आला प्रसंग निभावते. पुरुषासारखी आक्रमकता व फाजील उद्धटपणा तिच्यात नसतो. ह्यामुळेच अनेक स्त्रिया फार आरडाओरड न करता, शांतपणे व अधिक परिणामकारकरित्या आपला विरोध दर्शवू शकतात. मोठी संकटे, दुर्दैवाचा घाला, दारिद्र्य इत्यादींचा सामना पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक धीरोदात्तपणे, हसतमुखाने करतात. स्त्री चटकन घायकुतीला येत नाही. विस्कटलेली घडी पूर्ववत व्हायला वेळ लागणार, हे ती जाणून असते व वाट बघायची तिची तयारी असते. एखादे काम मनावर घेऊन करायचेच ठरवले, तर ती त्यात अभूतपूर्व यश मिळवू शकते. म्हणूनच स्त्रीच्या सामर्थ्याला कमी लेखण्याची चूक कुणी करू नये."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४२५)*
"अन्न, निवारा तर प्राणीमात्रांनापण आवश्यक असतात. मनुष्यप्राणी मात्र फक्त या तीन गरजा भागवून गप्प बसत नाही. तो अधिक काहीतरी दैदिप्यमान करू बघतो. मात्र स्त्रीचे सारे अस्तित्व प्राणिपातळीवरच्या या तीन गरजा भागविण्यातच खर्च होते. स्त्रीचे पंख छाटलेले असतात आणि तिचे जग स्वयंपाकघरात बंदिस्त असते. अशा वेळी ती थिटे आयुष्य जगते; तिची झेपच कमी असते, यांसारखे आरोप करून तिची निर्भर्त्सना करण्यात काय अर्थ आहे ? तिचीपण क्षितिजे विस्तारली, तिलापण मोकळेपणी आकाशात भरारी घेण्याचे स्वातंत्र्य दिले, तर तीपण स्वयंपाकघरात अडकून न राहता मनमोकळे आयुष्य जगेल."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४२८)*
"स्त्रीने प्रेमात पडणे व पुरुषाने प्रेमात पडणे यात फार मोठा फरक असतो व हा फरक स्त्री-पुरुषांमध्ये गैरसमज व तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो. बायरन म्हणाला ते खरंच आहे की, पुरुषासाठी स्त्रीच्या प्रेमात पडणे ही त्याच्या जीवनातील अनेक घटनांपैकी एक घटना असते. याउलट स्त्रीच्या दृष्टीने प्रेमात पडणे हेच तिचे संपूर्ण अस्तित्व असते. नित्शे आपल्या Gay Science या पुस्तकात हेच म्हणतो, प्रेम या शब्दाचा अर्थ स्त्री व पुरुषांसाठी भिन्न असतो. स्त्रीसाठी प्रेम म्हणजे केवळ भक्ती नव्हे, तर कुठचेही हातचे न ठेवता, कशाचीही पर्वा न करता तनमनाने केलेले संपूर्ण समर्पण ! स्त्रीने केलेले प्रेम बिनशर्त असते. त्यामुळे त्यास श्रद्धेचे रूप येते. याउलट पुरुषाचे एखाद्या स्त्रीवर प्रेम असते याचा अर्थ त्या स्त्रीने त्याच्यावर प्रेम करावे, अशी त्याची इच्छा असते. प्रेमात पडलेल्या स्त्रीमध्ये जी समर्पणाची भावना निर्माण होते, तशी समर्पणाची इच्छा त्याच्या मनाला शिवतसुद्धा नाही. तशी ती पुरुषामध्ये निर्माण झाली, तर ते खरे पुरुषच नाहीत असे म्हणावे लागेल."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४६३)*
"पुरुषाची सार्वजनिक जीवनातील भाषणबाजी, सुसंस्कृत वागणे व खाजगी जीवनातील तऱ्हेवाईकपणा यांतील दरी बघून त्याची बायको अवाक होते. बाहेर तो संततीनियमनाविरुद्ध बोलतो, पण स्वतःला मात्र सोयिस्कर वाटतील तेवढीच मुले होऊ देतो. एक तोंडाने पतिव्रता स्त्रीची स्तुती करतो, पण मनातून शेजाऱ्याच्या बायकोने पातिव्रात्य सोडून देऊन आपल्याबरोबर प्रेमाचे चाळे करावेत, असे त्याला वाटते. बहुतेक सर्व पुरुष गर्भपात हा गुन्हा होय असे उच्चरवाने म्हणतात, पण हेच पुरुष दरवर्षी लाखो स्त्रियांवर गर्भपाताची वेळ आणतात. बायको किंवा मैत्रिणीला गैरसोयीच्या वेळी दिवस गेले की नवरा वा प्रियकरच स्त्रीला गर्भ पाडून टाकण्यास हक्काने सांगतात. किंबहुना वेळ पडली, तर गर्भपाताचा मार्ग आहेच असे ते मनातल्या मनात गृहीतच धरून चाललेले असतात. स्त्री गर्भपाताच्या गुन्ह्याला नक्की तयार होणार, असा त्यांना भरवसा असतो. *पुरुषाला ज्या नीतिमान समाजाविषयी आदर असतो, त्या समाजातील समतोल व ऐक्य टिकून राहायचे असेल, तर स्त्रीने गर्भपाताची अनीती करणे गरजेचे असते.*"
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४३५)*
"प्रेमभावना नुसती मानसिक असून चालत नाही. शारीरिक पातळीवर ती फलद्रुप झाली, तरच तिचे उत्कट प्रेमात रुपांतर होऊ शकते. क्वचित कधीतरी असेही होते की, शारीरिक जवळीकीमुळे कालांतराने प्रेमभावना निर्माण होते. अशा केसमध्ये पुरुष लैंगिकदृष्टया स्त्रीला भारावून टाकतो. सुरुवातीस तो तिला विशेष आकर्षक वाटलेला नसतो, तोच नंतर मात्र तिला अद्वितीय, उदात्त वाटू लागतो."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४६५)*
"खऱ्या प्रेमात समोरच्या व्यक्तीच्या माणूसपणाचा विसर पडला नाही पाहिजे. स्त्रीला प्रियकराचे दोष, मर्यादा, त्याच्यातील त्रुटींची जाणीव असायला हवी. प्रेम म्हणजे मुक्तीचा मार्ग नसून दोन हाडामासाच्या माणसांमधील नाते आहे, याचे भान असायला हवे. आंधळ्या भक्तिमार्गाने केलेल्या प्रेमात प्रियकराला देवत्व चिकटवले जाते. जे इतरांना दिसते, ते प्रेमाने आंधळ्या झालेल्या स्त्रीला दिसू शकत नाही. तिच्या आजूबाजूच्या बायका आपापसात कुजबुजतात की तिने त्याच्यावर इतके प्रेम करण्याची त्यांची लायकी नाही. स्त्री ज्या पुरुषाची पूजा करते, त्या पुरुषातील सुमार गुण किंवा दोष दिसले की त्या स्त्रीची निराशा होते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४७५)*
"लहान मुलाला जशी अंगावरचे दूध तोडले की सारखी आई-वडिलांच्या प्रेमळ कटाक्षांची गरज असते तशी ! स्त्रीलापण पुरुषाच्या प्रेमळ स्पर्शातून एक दिलासा हवा असतो की, शरीराने जरी ती संभोगाच्या अत्युच्च क्षणापासून दूर ओढली गेली असली, तरी अजूनही ती त्या पूर्णत्वाचाच एक भाग आहे. कामपूर्तीच्या क्षणाला जाऊन ठेपल्यानंतरसुद्धा तिची संपूर्ण तृप्ती झालेली नसते. स्वतःच्या देहाची धुंदी ओसरू लागली तरी तिची कामेच्छा आपुलकीच्या ओढीतून रेंगाळत राहते. रतिसुख देऊन पुरुष तिला तिच्या भावनांमधून मुक्त करत नाही, तर उलट जवळीकीमध्ये अधिकच बद्ध करतो. एकदा कामपूर्ती अनुभवली की पुरुषाला स्त्रीची इच्छा राहत नाही. पण तसे जर त्याने वरकरणी दर्शवले, तर ते स्त्रीला खपत नाही. त्याची प्रेमभावना अढळ व अक्षत असावी, असे तिला वाटते. त्याची क्षणिकसुद्धा अलिप्तता तिला सहन होत नाही. संभोगाचा शरीर पातळीवरचा क्षण जेव्हा उदात्त समाधी-अवस्थेला पोचतो, तेव्हा उष्ण आठवणीपण सुखद होतात. ओसरून जाणाऱ्या सुखात पुन्हा नवी आशा, नवे अभिवचन दिसते. सुख हे निसर्गसुलभ व म्हणूनच समर्थनीय वाटते. अशा प्रसंगी स्त्री स्वतःची लैंगिकता स्वाभिमानाने स्वीकारते, कारण ती शरीर पातळीवर न राहता तिचे उदात्तीकरण होते. उत्तेजना, कामेच्छा, कामपूर्ती या केवळ अवस्था राहत नाहीत, तर ते एक सत्कृत्य होते. तिचे शरीर केवळ भोग्य वस्तू राहत नाही, तर एक ज्योत, एक ईशस्तवन बनते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४६९)*
"खऱ्या प्रेमात समोरच्या व्यक्तीच्या माणूसपणाचा विसर पडला नाही पाहिजे. स्त्रीला प्रियकराचे दोष, मर्यादा, त्याच्यातील त्रुटींची जाणीव असायला हवी. प्रेम म्हणजे मुक्तीचा मार्ग नसून दोन हाडामासाच्या माणसांमधील नाते आहे, याचे भान असायला हवे. आंधळ्या भक्तिमार्गाने केलेल्या प्रेमात प्रियकराला देवत्व चिकटवले जाते. जे इतरांना दिसते, ते प्रेमाने आंधळ्या झालेल्या स्त्रीला दिसू शकत नाही. तिच्या आजूबाजूच्या बायका आपापसात कुजबुजतात की तिने त्याच्यावर इतके प्रेम करण्याची त्यांची लायकी नाही. स्त्री ज्या पुरुषाची पूजा करते, त्या पुरुषातील सुमार गुण किंवा दोष दिसले की त्या स्त्रीची निराशा होते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४७५)*
"खऱ्या प्रेमामध्ये दोघांच्याही स्वातंत्र्याचा योग्य विचार व्हायला हवा. तसे झाले, तर प्रेमिकांना स्वतःच्या अस्तित्वाचेही भान राहील व आपल्या जोडीदाराचा अंश आपल्यात आहे हीपण जाणीव होईल. कुणीच पार्थिव पातळीवर अडकून पडणार नाही. कुणाचीच वाढ खुंटणार नाही. दोघे मिळून काही उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतील व दोघेही स्वतःची अशी खास मूल्ये जपतील. प्रेमामुळे दोघांचेही आयुष्य समृद्ध होईल व दोघेही एकमेकांना समर्पित होऊन स्वतःचे आत्मभानपण जागृत ठेवतील."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४८९)*
"प्रेमामुळे आपण आत्ममग्नतेतून बाहेर पडतो व तेव्हाच आपल्याला स्वतःची खरी ओळख होते. प्रेमामध्ये आपल्याला पूरक अशा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध येतो व त्यातून आपला स्वतःचा आत्मविश्वास बळावतो. प्रेमामुळे माणसाला नवी दृष्टी मिळते, ज्यामुळे नेहमीची जमीन, नेहमीचे आकाश नवे वाटू लागते. प्रेम म्हणजे एक गूढ असते. त्यात सारे जग निराळे भासते व आपणपण बदलतो. आपल्यातला बदल फक्त आपल्यालाच जाणवतो असे नाही, तर तो आणखी एक माणसाला माहीत असतो. त्यातूनही सुंदर वास्तव म्हणजे आपल्यातील बदल ती दुसरी व्यक्तीच आपल्याला जाणवून देते. म्हणून तर पुरुषाचे आत्मभान जागृत होण्यात स्त्री फार महत्वाची भूमिका बजावत असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४८९)*
"ज्या दिवशी स्त्री प्रेमामुळे कमकुवत न बनता अधिक समर्थ बनेल, प्रीतीचा अनुभव आपल्या सर्व क्षमतांसह घेईल, ज्या दिवशी प्रेमामध्ये तिला स्वतःचा विसर न पडता स्वत्व सापडेल, ज्या दिवशी तिला प्रेमापायी स्वतःची मानहानी न करता ती स्वाभिमानाने जगू लागेल, त्या दिवशी तिला प्रेमामधून पुरुषाला मिळते त्याप्रमाणे नवजीवन मिळेल. प्रेमात पडणे हे तिच्यासाठी जीवघेणे संकट ठरणार नाही. असे जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत प्रेम म्हणजे सीमित विश्वात अडकलेल्या, अधुऱ्या, अविकसित क्षमतेच्या, सतत स्वत्व दुखावल्या जाणाऱ्या स्त्रियांकरिता एक सुंदर रूप धारण केलेला शाप ठरणार."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ४९१)*
"पुरुषाने जर प्रेयसीकडे दासी या दृष्टिकोनातून बघण्याऐवजी तिच्यावर स्वतःच्या बरोबरीची स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रेम केले, तिच्यापुढे गुर्मी किंवा न्यूनगंड दाखवला नाही, तर स्त्रियापण त्यांच्यापुढे स्वतःचे स्त्रीत्व टिकवून ठेवण्याचा आटापिटा करणार नाहीत. तर त्यांच्या निसर्गसुलभ स्वभावधर्मानुसार मोकळ्या ढाकळ्या वागू शकतील. विशेष काही त्रास न घेता, साधे-सरळ वाहूनसुद्धा आपण स्त्री आहोत याची प्रचीती त्यांना येऊ शकेल. कारण त्या खरोखर स्त्रिया असतातच."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५०७)*
"जी स्त्री पुरुषांप्रमाणेच अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते, स्वतःची शक्ती अनेक उपक्रमात खर्च करत असते, जिला लोकांच्या विरोधाला तोंड देणे किती कठीण आहे, जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष किती तीव्र आहे, याची जाणीव असते तिला फक्त स्वतःचे शारीरिक चोचले पुरविणे पुरेसे वाटत नाही. पुरुषाप्रमाणेच तिला पण श्रमपरिहारार्थ विरंगुळ्याची आणि सौम्य, सुसंस्कृत प्रणयाची गरज असते. परंतु अजूनही बहुसंख्य सामाजिक स्तरांत स्त्रियांना हे स्वातंत्र्य मिळत नाही. असे स्वातंत्र्य घेण्याचा तिने प्रयत्न केला, तर ती बदनाम होण्याचा धोका असतो. तिच्या करिअरलाही धक्का पोचू शकतो. फार फार तर ती दांभिकपणा करू शकते. परंतु त्याचा तिला मनस्तापच होतो. ती तिच्या क्षेत्रात जितकी यशस्वी होईल, तिची सामाजिक प्रतिष्ठा जेवढी वाढेल, तेवढे लोक तिच्या खाजगी आयुष्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हे फक्त महानगरांमध्येच घडू शकते. लहान गावांमध्ये लोक तिच्यावर घारीसारखी नजर ठेवतात. शिवाय जेथे लोकप्रवादाची फारशी भीती नसते, तेथेसुद्धा ती पुरुषासारखे स्वातंत्र्य घेऊ शकत नाही. स्त्री व पुरुषाच्या परिस्थितीत थोडाफार फरक राहतोच. याला रूढी जेवढ्या कारणीभूत असतात तेवढीच स्त्रीची विशिष्ट लैंगिक भावनापण कारणीभूत असते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५०८)*
"लैंगिक क्रियेत दोन्ही साथीदारांनी एकमेकांना कमी न लेखता समान पातळीवर संबंध ठेवले, तर परपीडन व आत्मपीडन हे दोन्ही टाळता येते. स्त्री-पुरुष दोघांमध्येही थोडी सुसंस्कृतता, थोडा उमदेपणा असेल, तर हार-जीत या भावनाच राहत नाहीत. कामक्रीडा ही सुखाची विशुद्ध देवाण-घेवाण बनते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५१३)*
"स्त्रीने स्वतःच्या शारीरिक त्रासांकडे फार लक्ष दिले की ते त्रास वाढतात. क्रीडाक्षेत्रातील तसेच इतर दगदगीची कामे करणाऱ्या स्त्रियांना पाळीचा त्रास तुलनेने कमी होतो. कारण त्यांचे पाळीकडे फारसे लक्षच नसते. अर्थात काहींच्या बाबतीत शारीरिक त्रास इतका जबरदस्त असतो की, अगदी खूप चपळ, सशक्त स्त्रियांनासुद्धा एक दिवस पूर्णपणे अंथरुणात झोपून काढावा लागतो. या दिवसात त्यांचे शरीर त्यांचा निर्घृण छळ करते. परंतु असे असूनही आपल्या कार्यक्षेत्रात त्या यशस्वी होऊन दाखवतातच.
मला स्वतःला तर खात्रीच पटली आहे की, स्त्रीचे त्रास, तिची ओढाताण तिच्या शरीररचनेपेक्षासुद्धा मानसिक कारणांमुळे होत असते. खूपशा स्त्री-रोग तज्ज्ञांचेसुद्धा हेच म्हणणे पडते. स्त्रीला असंख्य मानसिक दडपणे सहन करावी लागतात. घरची व घराबाहेरची अनेक कामे तिच्यावर लादली जातात त्यामुळे ती तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गांजून जाते. याचा अर्थ तिला होणारे सगळे आजार काल्पनिक असतात असे नव्हे. ते खरेच असतात. परंतु ते परिस्थितीजन्य असतात व ही परिस्थिती तिच्या शरीरापायी उद्भवत नसून प्राप्त परिस्थितीपायी शरीर आजारी पडत असते. स्त्रीला जर योग्य वातावरणात काम करण्याची संधी मिळाली, तर तिची आजारपणे हा तिच्या कामातील अडथळा राहणार नाही. किंबहुना तिची प्रकृती सुधारेलच, कारण आवडीचे काम करताना छोट्या-मोठ्या त्रासांचा ती बाऊ करत बसणार नाही."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५१९)*
"अविश्वासाच्या वातावरणात काम करणारी व्यक्ती स्वतःला विसरून काम करू शकत नाही. स्वतःची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ती सर्वस्व झोकून झेप घेत नाही. नेमून दिलेले काम चोख करण्याकडे तिचा कल राहतो धाडसाने ध्येयप्राप्तीसाठी धडपड केली की निराशा पदरी पडण्याचा धोका असतो हे खरे, परंतु त्यात अनपेक्षितपणे मोठे फायदे मिळण्याचीपण शक्यता असते याउलट फार जपून वागले की त्याची फळे पण यथातथाच मिळतात."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५२५)*
"साहित्य, कला, तत्वज्ञान या साऱ्या स्वातंत्र्याच्या पायावर नव्याने जग उभे करण्याच्या गोष्टी आहेत. जी व्यक्ती असे जग पुनःनिर्माण करण्याचा प्रयत्न करेल, तिला मुळात स्वतंत्रपणे जगण्याची संधी असायला हवी. रूढी व संस्कारांमुळे स्त्रीवर जी बंधने घातली जातात, त्यांमुळे तिचे या जगविषयीचे आकलनच फार तोटके असते. जेव्हा या जगात स्वतःचे स्थान मिळविण्याचा झगडा फार तीव्र असतो, तेव्हा या जगापासून दूर जाऊन काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या जगातून बाहेर येऊन त्यावर पकड घट्ट करायची असेल, तर सर्वप्रथम एकट्याने जगणे शिकले पाहिजे. त्यासाठी स्त्रीने कितीही यातना झाल्या तरी चालेल, परंतु अभिमानाने स्वतंत्रपणे जगण्याचे व अलौकिक अनुभवातीत ज्ञान मिळवण्याचे धडे घेतले पाहिजेत."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५३६)*
"आपला असा भ्रम असतो की, आपल्याबरोबर कुणी असेल तर त्याचा फायदाच होईल. परंतु साथीदार काय किंवा कुटुंबीय काय त्यांनी आपल्याबरोबर येण्यासाठी आपल्याला ताटकळावे लागते. परंतु यशस्वी व्हायचे असेल, हातून महत्वाचे काही काम घडायचे असेल, तर एकट्याने पुढे जाण्याचे स्वातंत्र्य हवे."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५०७)*
"स्रीभोवतीच्या असंख्य शृंखला जेव्हा तुटतील, ती जेव्हा स्वतःसाठी, स्वतःच्या माध्यमातून जगू लागेल, पुरुष जेव्हा तिला स्वतःच्या कब्जातून सोडेल, तेव्हा तीपण काव्य करेल. तिलापण अपरिचित अनुभवांनी भरलेली अलिबाबाची गुहा सापडेल. तिचे आदर्श जग आपल्या आजच्या जगापेक्षा निराळे असेल का ? तिला पण चित्रविचित्र, अतर्क्य, आनंददायक, घृणास्पद गोष्टी दिसतील, पण त्या स्वीकारून ती त्यांचा अनव्य लावेल. तिचे नवे विश्व पुरुषाच्या विश्वापेक्षा निराळेच असेल, असे खात्रीलायकपणे म्हणता येत नाही. कारण पुरुष ज्या परिस्थितीत जगतो, ती परिस्थिती स्वतःसाठी तयार करूनच ती स्वतःचे स्वातंत्र्य मिळवू शकते. ती पुरुषापेक्षा किती निराळी असेल, किंवा तिच्यातील व पुरुषातील भेद किती महत्वाचे ठरतील, यांविषयी काहीही भाकित करणे योग्य होणार नाही. या क्षणी आपण एकच विधान छातीठोकपणे करू शकतो, ते म्हणजे आतापर्यंत संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी स्त्रीला स्वतःच्या विकासाच्या संधी नाकारल्या जात होत्या. आता मात्र स्त्रीला तिच्या व इतरांच्याही हितासाठी समान संधी उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे, नव्हे ती काळाची गरजच आहे."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५४०)*
"मानवी समाजात काहीच निसर्गनिर्मित नसते. इतर बहुसंख्य घटितांप्रमाणे स्त्रीत्व हे सुद्धा मानवाच्या सांस्कृतिक प्रवासाचा परिपाक आहे. तिच्या विधिलिखितातील इतरांचा हस्तक्षेप फार मूलगामी ठरतो. या हस्तक्षेपाचे स्वरूप बदलले, तर त्याचा पूर्णतया निराळा परिणाम दिसून येईल. स्त्री घडवली जाते ती तिच्या गूढ अंत:प्रेरणामुळे किंवा हार्मोन्समुळे नाही. तिचा देह व तिचे भोवतालच्या जगबरोबरचे नाते यांचे स्वरूप हे ती सोडून इतरांच्या दृष्टिकोनामुळे व कृतीमुळे ठरवले जाते व त्यानुसार ती स्त्री म्हणून घडते."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५५१)*
"स्त्री जेव्हा स्वतःसाठी जगू लागेल, तेव्हा एक दुय्यम अस्तित्व व पुरुषाच्या स्वप्नांचे माध्यम म्हणून जगणे ती बंद करेल. दुय्यम असण्यामुळे आज तिला ज्या सवलती मिळतात, त्यापण बंद होतील. पुरुषाला सुद्धा एकीकडे निसर्ग व दुसरीकडे त्याच्याचसारख्या मागण्या करणारी स्वतंत्र स्त्री यामध्ये सापडल्यावर निष्क्रिय, अनुगामिनी स्त्री ही मोठीच देणगी वाटेल. आज तो आपल्या सहचरीला ज्या वेषात गुंडाळत असतो, तो वेष जरी फसवा असला, तरी त्या सबबीखाली त्याला जे अनुभव येतात, ते खरेच असतात व ते अतिशय जिव्हाळ्याचे आणि मूल्यवान अनुभव असतात. स्त्रीच्या परावलंबित्वामुळे, दुय्यमत्वामुळे, तिच्या वाट्याला येणाऱ्या दुःखामुळे तिच्या व्यक्तिमत्वाला एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू येतो. स्त्री स्वावलंबी आणि स्वतंत्र झाली की पुरुषाचे बरेचसे त्रास कमी होतील व त्याचबरोबर त्याच्या काही सोयी, सवलतीपण हिरावून घेतल्या जातील. असे घडले की काही लैंगिक साहसेपण संपुष्टात येतील."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५५७)*
"रोजच्या व्यवहारात स्त्री-पुरुषांचा दर्जा समान झाला, तर चैन, विषयासक्ती लैंगिक उत्कटता, अत्युच्च आनंदाची भावना इत्यादी अनुभूती घेणे अशक्य होईल, ही भीती पूर्णपणे अनाठायी आहे. पार्थिवाच्या विरोधात चिततत्व, अनादिअनंताच्या विरोधात क्षणभंगुर, सीमिततेविरुद्ध सर्वातिततेचे आव्हान, विस्मरण, आंतरिक पोकळी विरुद्ध निखळ आनंद यांमधील द्वंद्व हे कधीही न संपणारे द्वंद्व आहे. जिवंत लैंगिकतेमध्ये नेहमीच दोन जिवांमधील ताणतणाव, यातना, हर्ष, वैफल्य, जय या भावनांचे नाट्य मूर्त रूप घेणार. स्त्रीला मुक्त करणे याचा अर्थ तिला पुरुषाबरोबर एकाच नात्यात जखडून न ठेवता तिला बहुरंगी नाती प्रस्थापित करण्याचे स्वातंत्र्य देणे. स्त्रीला तिचे स्वतंत्र अस्तित्व मिळू द्या. स्त्री व पुरुष दोघेही एकमेकांना क्रियाशील अस्तित्व मानू लागतील व त्याच वेळी एकमेकांसाठीही उरतील. अशा त्यांच्या नात्यातील देवाणघेवाणीमुळे त्यांच्यामधील आकर्षण, स्वामित्व भावना, प्रेम, स्वप्न, साहस या भावनांचे चमत्कार नाहीसे होणार नाहीत. तसेच देवाणघेवाण, विजय, कुरघोडी, मिलन या शब्दांचे अर्थही लोप पावणार नाहीत. निम्म्या मानवजातीची गुलामगिरी व त्यामध्ये अभिप्रेत असणारी दांभिक समाजव्यवस्था नष्ट झाली की मानव समाजाच्या स्त्री-पुरुष विभागणीला खऱ्या अर्थाने महत्व प्राप्त होईल व स्त्री-पुरुष जोडीला स्वतःचे खरे स्वरूप सापडेल."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५५८)*
"मार्क्सचे म्हणणे होते की, माणसांमधील थेट, नैसर्गिक व अत्यावश्यक नाते हे स्त्री-पुरुषांमध्येच असू शकते. त्यांच्या नात्याच्या स्वरूपावरून माणूस मानवतेच्या नक्की कोणत्या टप्प्यावर उभा आहे, हे समजते. माणसा-माणसातील नाते हे स्त्री-पुरुषांमध्ये सर्वांत नैसर्गिक रूप धारण करते. त्यांच्यामधील नात्यावरून माणसाचे नैसर्गिक वागणे किती माणुसकीचे आहे, याची कल्पना येते. माणूस कुठपर्यंत निसर्गधर्माला जागून वागत आहे, हेपण कळते किंवा मनुष्यधर्म हा किती प्रमाणात त्याचा स्वभावधर्म झाला आहे, हे लक्षात येते.
वर उद्धृत केलेला युक्तिवाद स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कारार्थ
पुरेसा ठरावा. प्राप्त परिस्थितीत स्वातंत्र्याचे राज्य प्रस्थापित करणे आता माणसाच्याच हातात आहे. त्यात उत्तुंग यश मिळवायचे असेल, तर स्त्री-पुरुष दोघांनीही आपल्यातील नैसर्गिक भेद स्वीकारून त्याही पलीकडचा असा नातेसंबंध एकमेकांत जोपासणे आवश्यक आहे."
*(संदर्भग्रंथ : द सेकंड सेक्स, लेखिका : सिमोन द बोव्हुआर, अनुवादिका : करुणा गोखले, पृष्ठ क्रमांक : ५५९)*