31 ऑगस्ट, अमृता प्रीतमचा वाढदिवस. बरेचदा वाटतं एक लेख लिहीण्याइतकी मी नक्कीच ओळखते तिला . मग वाटतं, छे!! मला जे समजतं , जे वाटतं ते शब्दांमधे बांधण्याइतकी समर्थ मी नक्कीच नाहीये. आणि मग तिथेच वाटतं, 'युरेका ' .. सापडलं मला की मला काय आकर्षण वाटतं तिच्या व्यक्तीमत्त्वाचं.. माझं 'दुबळं' असणं, समाजाच्या चौकटीचं सतत भान बाळगणं आणि तिने ते सशक्तपणे झुगारणं .. नुसतं झुगारणं ही बंडखोरी नव्हे तर स्वत:तल्या प्रतिभेला जपत स्वत:च्या नियमांनूसार आयुष्य जगणं !!! पुस्तकं खरेदी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो माझ्यासाठी नेहेमी . एका पुस्तकाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना त्या दरम्यान सुरू होती. घेतलेल्या कुठल्यातरी पुस्तकावर एक लहानसं पुस्तक हाती आलं , मुळचं 'उमा त्रिलोक ' या लेखिकेचं आणि 'अनुराधा पुनर्वसू ' यांनी मराठीत भाषांतरित केलेलं 'अमृता इमरोज ' एक प्रेमकहाणी नावाचं ते पुस्तक !!!
अमृता प्रीतम एक मोठ्या पंजाबी लेखिका होत्या इतपतच ज्ञान होते तोवर मला.. केव्हातरी सहज पुस्तक चाळायला म्हणून हातात घेतलं . मात्र जसजशी वाचत गेले तेव्हा मात्र अमृताच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडत गेले. इथे इमरोजना वेगळं काढणं शक्यच नाहीये. ते दोघे वेगळे होतेच कधी...
एक जिगसॉ पझल येतं इश्वराकडून , आपल्यात एक अपूर्ण आपण असतो . त्या पझलचा दुसरा भाग देवाने पाठवलेला असतो ... आणि ती दोन अपूर्णत्त्व जिथे भेटतात ते जीवन यशस्वी असते वगैरे प्रेमाच्या संकल्पना मनात कायम होत्या माझ्या , स्वत:ही तसेच काही जगण्याकडे कलही आहे पण बऱ्याच गोष्टी बोलत नाही आपण सहसा!! 'हसं' होइल आपलं अशी एक सुप्त भिती बाळगत आपण आपल्यातलं सामान्य असणं मान्य करतो. अमृता आणि इमरोज यांच्या वयातलं 'उलटं' अंतर आज तितकसं बोचणार नाहीदेखील पण समाजासाठी अश्या बाबींची मान्यता ५०-६० वर्षापूर्वी निश्चित नव्हती . त्यातही लग्नाच्या रूढ बंधनात न अडकता ४० वर्षापेक्षा अधिक काळाचं त्यांचं सहजीवन हा विषयच भुरळ घालणारा. अमृताला आधिच्या लग्नापासून झालेली मुलं आणि इमरोज अविवाहित , वेगळं आहे नं रसायन !!!
समाजाचा समाजानेच रचलेला एक पाया आहे.. वर्षानूवर्षे माणसांच्या अनेक पिढ्या त्या पायाला धरून जगताहेत. आमच्या पायावर आम्ही उभे आहोत हा दावाही ठोकतात.. आपण कसलातरी आधार घेतलाय ही जाणिवच जिथे नाही तिथे त्या आधाराशिवाय उभं रहाण्याचं आपल्यात सामर्थ्य असतं हे भान कुठून येणार ??? एखादा येतो मग चुकार गडी जो समाजाच्या या पायाला आव्हान करतो.. त्याच्या मजबूत भिंतींपलीकडे पहातो.. अवघड असतं हे नेहेमी .. पायाला चिकटलेली माणसं अश्या स्वतंत्र उभ्या रहाणाऱ्या माणसाचे पाय ओढतात ... त्यात जर ती एक स्त्री असेल तर विचारायलाच नको.. जे आजही कठीण आहे ते आजपासून अनेक वर्षापूर्वीअजूनच कठीण असणार नाही का ..
प्रस्थापितांविरुद्ध बंड करायचाय नं मग समर्थ असायला लागतं !! कणखर , मजबूत वगैरे असावं लागतं .. अमृता तश्या होत्या !! इथे मुळात 'भरकटण्याचा ' धोका फार .. केलेल्या प्रत्येक कृतीचं समाज स्पष्टीकरण मागतो अश्या वेळेस ... ते द्यायचं नसतं कारण ते मुळात ज्यांना समजत नाही तेच ते मागतात.. आपला वेगळा सुर आपण लावायचा असतो, समाज ऐकणार असतो तो सुर पण आपण यशस्वी झाल्यानंतर .. मधला काळ मात्र मोठा बाका असतो ...
काही लोक 'आवडून जातात ' आपल्याला. सुर जुळतात, झंकार ऐकू येतो , ते होत होतं अमृताबाबत.
' इतिहास माझ्या स्वयंपाकघरात आला आणि भुकेलाच परतला . ' ही ओळ असो किंवा , 'तिच्या आयुष्याचे धुमसते निखारे काळाने हलवले , त्या चटक्यांनी त्याच्या बोटांवर फोड आले. ' असो, जसजसे अमृताच्या साहित्याचे हलके हलके दर्शन व्हायला लागते मनाचा गोंधळ उडायला लागतो.. शब्दांची वेगळीच बांधणी असते ही.. अमृताच्याच एका पुस्तकाचं नावं आहे 'अक्षरों की रासलीला ' . किती योग्य आहे हा शब्द तिच्या रचनांसाठीही ... शब्दच जणू खेळताहेत एकमेकांशी आणि घडवताहेत एक अप्रतिम काव्य !!! वीज चमकते नं क्षणभर कसा लख्ख प्रकाश दिपवतो आपल्याला तशी धारदार रचना मोहात पाडते .
कधी कधी एखादं पुस्तकं वाचायला घेतलं की आवडतं पण उगाच मन साशंक होतं की आपल्या या आलूलकीला तडा तर नाही नं जाणार.. तसे न होता अमृताबाबत कुठेतरी खात्री वाटायला लागते, इथे मुळातं नातं विश्वासाचं आहे.. निडर, बंडखोर, स्वत:शी प्रामाणिक लोकांबद्दल मला नेहेमी आदर वाटत आलाय , त्यांच्याकडे स्वत:चा विकास करण्याचंच नव्हे तर समाजाला एक सकस दृष्टिकोण देण्याचं सामर्थ्य असतं.
१२२ पानं झपाटलेली .. पुस्तकात अमृता - इमरोजच्या तरल नात्याचे अनेक सुरेख, तरल पैलू , अमृताच्या साहिर लुधियानवीबद्दल कायम वाटलेल्या प्रेमाचे रंग, तिचं प्रसंगी कणखर नं एक स्त्री म्हणून स्वत:तलं स्त्रीतत्त्वाशी प्रामाणिक असणं सगळंच आहे.. काहीतरी देऊन जाणारं पुस्तक !!! आपल्याला अंतर्बाह्य समृद्ध झाल्यासारखं वाटवणारी एक सोबत..
इमरोजसाठीची तिची 'मै तेनू फिर मिलांगी ' कविता अशीच अप्रतिम!!
पुस्तक वाचून संपलं पण एक अस्वस्थता सोबतीला आली.. ती अजून खाद्य मागत होती. अमृताचा अजून शोध घे म्हणून सांगत होती... अमृताचं लिखाण झपाटल्यासारखं शोधलं आणि वाचलं मग!!
फाळणीचं दु:ख अनुभवलेली अमृता.. त्या व्यथेला कायम मनात बाळगलेली अमृता ... हीर ची दास्तान लिहिणाऱ्या 'वारिस शाह ' ला फाळणी दरम्यान अत्याचार झालेल्या मुलींबद्दलही लिही रे सांगणारी , ' वारिस शाह ' ही कविता लिहिणारी अमृता ..
फाळणीच्या वेळी पळवून नेलेल्या मुलींचा नंतर शोध घेतला गेला त्यातल्या अनेक मुलींच्या पोटात कोणाचं तरी बीज वाढत होतं .. त्या बाळांबाबत अमृता लिहीते , " उस बच्चे की ओर से - जिसके जन्म पर किसी भी आंख में उसके लिये ममता नहीं होती , रोती हुई मां और गुमशुदा बाप उसे विरासत में मिलते हैं ... "
" मैं एक धिक्कार हूं -
जो इन्सान की जात पर पड रही .
और पैदाईश हूं - उस वक्त की
जब सुरज चांद -
आकाश के हाथों छूट रहे थे
और एक -एक करके
सब सितारे टूट रहे थे .. "
'पिंजर' पाहिला तो केवळ अमृतासाठी .. तिच्या प्रेमात पुन्हा एकवार पडण्यासाठी !! फाळणीपूर्वी पाकिस्तानात असलेल्या एका गावातली'पुरो ' (उर्मिला मातोंडकर ).. तिचे लग्न ठरलेय.पूर्वजांच्या वैमनस्यातून सुडाच्या भावनेने तिला त्या गावातला रशीद नावाचा मुसलमान पळवून नेतो.. हा रशीद मनाने अतिशय चांगला आहे.. त्याच्याकडे राहून आलेल्या पुरोला घरी कोणी स्विकारायला तयार नाही. नाईलाजाने पुरोचा रशीदशी निकाह होतो, तिला त्याला स्विकारावं लागतं .. परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरीही स्वत्व जपणारी.. खंबीर, लढावू वृत्तीची पुरो . आणि शेवटी 'रशीद' च्या चांगुलपणामूळे, त्याच्यातल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधत धावणारी , त्याच्या नावाने हंबरडा फोडणारी एक साधी , हळवी स्त्री.. खऱ्या प्रेमापुढे सहज झुकणारी, त्याची कदर करणारी स्त्री !! उर्मिला इथे 'पुरो ' हे पात्र जगलीये. मात्र त्या पात्रात अमृता शोधता येते इतका तिचा ठसा मनावर उमटलाय..
ही पुरो सिनेमात शेवटी म्हणते, " चाहे कोइ लडकी हिंदू हो या मुसलमान, जो भी लडकी लौटकर अपने ठिकाने पहूँचती है समझो की उसीके साथ पुरो की आत्मा भी ठिकाने पहूँच गयी.. " !! स्वत: अमृताचे शब्द आहेत हे..
अमृताच्या सगळ्याच नायिका एक नवा प्रश्न सजगतेने सोडवणाऱ्या आहेत.. प्रस्थापितांविरुद्ध बंड करणाऱ्या तर कधी वेगळीच वाट शोधून पहाणाऱ्या.. मात्र त्या 'चुकीच्या' कधिही नाहीयेत . म्हणजे अमृता एक शहाणपण स्वत:च बाळगून होती ... एक सुधारक विचारांनी भरलेलं, काळाच्या पुढे जाऊ पहाणारं सुंदर मन होतं तिच्याकडे. तिची बुद्धिमत्ता तिच्या कथेतल्या नायिकांच्या संवादातून आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेतून दिसून येते.
स्त्री आणि पुरूषाच्या नात्याबाबत अमृताने तिच्या एका कथेतल्या नायिकेद्द्वारे मांडलेले विचार खूप काही सांगणारे आहेत..
मलिका नावाची ही नायिका आजारपणात दवाखान्यात जाते आणि तिथे एक फॉर्म भरून देतेय ..
वय विचारून झालय , आता डॉक्टर तिला विचारतो ' तुम्हारे मालिक का नाम ?? ' .. तेव्हा ही नायिका त्याला खडसावते मी घड्याळ किंवा सायकल नाहिये मला मालिक असायला, मी एक स्त्री आहे... चपापलेला डॉक्टर तिच्या पतीचे नाव विचारतो. तेव्हा ती सांगते ," मै बेरोजगार हूं ! '" ...
गोंधळलेला डॉक्टर पुन्हा सांगतो मी तुझ्या नोकरीबाबत विचारत नाहीये . तेव्हा ती त्याला समजावते ," हर इन्सान किसी न किसी काम पर लगा हूआ होता है, जैसे आप डॉक्टर लगे हुए है, यह पास खडी हुई बीबी नर्स लगी हुइ है ... इसी तरह जब लोग ब्याह करते है, तो मर्द खाविंद लग जाते है और औरतें बिवीयां लग जाती है ... वैसे मै किसी की बीवी लगी हुइ नही हूं!!! "
आता मात्र पुरत्या गोंधळलेल्या डॉक्टरला मलिका समजावते , की जगातल्या सगळ्या व्यवसायामधे 'तरक्की' होते, जसे आज मेजर असलेले उद्या कर्नल होतात, परवा ब्रिगेडियर होतात आणि मग जनरल !! मात्र 'शादी- ब्याह ' च्या या पेश्यामधे तरक्की होत नाही !!!
' यात कुठली तरक्की होणार ? ' असा डॉक्टरचा प्रश्न येतो .
तेव्हा मलिका उत्तर देते , " डाक्टर साहब हो तो सकती है , पर मैने कभी होती हुए देखी नही । यही कि आज जो इन्सान खाविंद लगा हुआ है , वह कल को महबूब हो जाए , और कल जो महबूब बने वह परसों खुदा बन जाए .. "
किती वेगळा विचार आहे हा.. किती खरा आणि ... साध्या सरळ सहज शब्दात , एका गुंतागूंतीच्या नात्याला बांधू शकणारी अमृता म्हणूनच इमरोजसोबत विवाहाच्या बंधनात न अडकता एक यशस्वी सोबत करू शकली.
ध्यास घ्यावा वाटतो या लेखिकेचा आणि तिच्या साहित्याचा!!! 'वादळ ' पेलावसं वाटतं हे ..खूप लिहावसं वाटतं तिच्याबद्दल.
एक मात्र खरं की ...
अमृताचं वादळी विचारचक्राचं अत्यंत सात्विक असणं , वेदनेचं पचवणं आणि त्यावर मात करून येताना अजून परिपक्व होणं समजलं की अमृता मनापासून खूप आवडते .. ते समजण्यासाठी तिला वारंवार भेटावं लागतं . विशेष मेहेनत नाही लागत अर्थात, तीचं लिखाण आणि विचार तशी भुरळ घालतात आपल्याला समर्थपणे !!
अमृताचीच एक कविता आहे .. समाजाच्या बंधनांतून स्वत:ला न जखडता स्वतंत्र जगणाऱ्यांच्या व्यथांबद्दल आणि प्रवासाबद्दलच्या तिच्या कवितेतल्या काही ओळी..
पैर में लोहा डले
कान में पत्थर ढले
सोचों का हिसाब रुकें
सिक्के का हिसाब चले ..
और लगा -
आज मैने अपने घर का नम्बर मिटाया है
गली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है
हर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है ...
गर आपने मुझे कभी तलाश करना है..
तो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ -
यह एक शाप है - एक वर है
और जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे
समझना - वह मेरा घर है !!!
And that solves the mystery . माझ्यामते जर समाजातल्या काही रुढी परंपरांविरुद्ध मी बंड करत असेन , चुकीला चूक म्हणू शकत असेन तर माझ्यात 'अमृताचा ' एक अंश नक्कीच आहे.. तेच नातं आहे माझं तिच्याशी !!!
म्हणून वारंवार मलाही तिला म्हणावसं वाटतं असावं ' मै तेनू फिर मिलांगी"!!!
link - https://m.dailyhunt.in/news/india/marathi/womanvishwa-epaper-womvis/ek+satvik+vadal+amrita+pritam-newsid-72568427