Flash

Tuesday, 31 October 2017

मैं तुम्हे फ़िर मिलूंगी

मैं तुम्हे फ़िर मिलूंगी

>> समीर गायकवाड
अमृता प्रीतम हे हिंदुस्थानी साहित्यातील एक लखलखीत नाव. समाजाच्या बंधनात स्वत:ला जखडून न घेता त्या इमरोजसोबत एक आदर्श नातं जगल्या. ३१ ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतिदिन. यानिमित्त या वादळी व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा वेध.
आताच्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबातील गुजरांवाला या शहरात ३१ ऑगस्ट १९१९ ला जन्मलेल्या अमृतांचा वयाच्या सहाव्या वर्षी साखरपुडा झाला, अकराव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले, सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन् सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते तर इमरोजबरोबर त्या पन्नास वर्षे एकत्र राहिल्या. तीन ओळीत सांगता येईल अशी अमृता प्रीतम यांची कथा आहे.
कवी साहीर लुधियानवी अमृतांच्या आयुष्यात आले. त्यांच्या विलक्षण काव्यप्रतिभेनं, भावविभोर शब्दकळेनं आणि व्यक्तिमत्त्वानं त्यांना झपाटलं. इतकं की त्यांच्याशिवाय आयुष्याची त्या कल्पनाच करू शकत नव्हत्या. अमृता आणि साहीरची साहित्यिक कारकीर्द याच काळात फुलत बहरत होती. या काळात साहीरनं अमृताचं अवघं जगणंच व्यापलं होतं. अमृतांच्या लेखनातही त्याचे पडसाद स्वच्छपणे जाणवतात. पुढे साहीर मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावायला आले आणि मग इथलेच झाले. चित्रपट गीतकार आणि शायर म्हणून त्यांनी अमाप ख्याती मिळवली. ‘साहीर मुंबईला गेले आणि त्या मायानगरीचाच झाले’, या वास्तवानं अमृता एकीकडे आतून उन्मळून पडल्या. उद्ध्वस्त झाल्या. तर दुसरीकडे साहीर यशाच्या पायऱ्या चढत गेले याचाही अमृतांना आनंद झाला. या संमिश्र भावनांचं परिणत रूप म्हणजे त्यांचं ‘आखरी खत’हे पुस्तक! ज्याला पुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. साहीर जरी त्यांच्यापासून दूर गेले तरी त्या कधीही त्यांना विसरू शकल्या नाहीत. अगदी इमरोजचं उत्कट, निस्सीम प्रेम त्यांच्या वाट्याला येऊनही!

साहीरसाठी अमृतांनी लिहिलेल्या ‘आखरी खत’चं कव्हर तयार करण्यासाठी म्हणून चित्रकार इमरोजशी त्यांची पहिली भेट १९५८ मध्ये झाली. योगायोग म्हणजे साहीरच्या प्रेमापोटी लिहिलेल्या कवितेच्या अनुषंगाने झालेल्या या भेटीनं अमृतांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. इमरोजशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांची मैत्री वाढत गेली. इमरोज खरं तर अमृतांपेक्षा सहा वर्षांनी लहान होते; पण साहीरच्या विरहानं पोळलेल्या अमृतांना दुःखाच्या त्या खाईतून बाहेर काढलं ते इमरोजनंच! इमरोज त्यावेळी ख्यातनाम चित्रकार म्हणून सर्वपरिचित होते. तर अमृतांना नुकतीच कुठं साहित्यिक वर्तुळात प्रसिद्धी आणि मानमान्यता मिळू लागली होती. साहीरच्या दुःखातून अमृतांना बाहेर काढताना इमरोज नकळत त्यांच्यात गुंतत गेला. अर्थात अमृतांनासुद्धा त्याच्याबद्दल हुरहूर वाटू लागली होती. पण ती त्यांनी कधी व्यक्त केली नव्हती. इमरोजबरोबरच्या आयुष्याबद्दल ‘रसिदी टिकट’मध्ये लिहिताना अमृतांनी म्हटलंय, ‘कुणा व्यक्तीला एखाद्या दिवसाचं प्रतीक मानता येत असेल तर इमरोज माझा ‘१५ ऑगस्ट’ होता.. माझ्या स्वातंत्र्याची ग्वाही देणारा! याउलट, साहीर हा एक विचार होता. हवेत तरळणारा. कदाचित माझ्याच कल्पनाशक्तीची ती जादू होती. मात्र इमरोजबरोबरचं आयुष्य ही एक अखंड धुंदी होती.. कधीही न सरणारी.’ ‘इमरोज भेटला आणि बाप, भाऊ, मुलगा आणि प्रियकर या सगळ्याच शब्दांना अर्थ प्राप्त झाला.. ते जिवंत झाले,’ असं अमृतांनी लिहिलंय. अमृता प्रीतम आणि इमरोज यांचा सहवास जवळपास पन्नासेक वर्षांचा होता. या दोघांनी इतकी वर्षे एकत्र राहून आपसातल्या तादात्म्यतेला नात्याचे नाव दिले नाही.

अमृता रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट, आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासनतास लेखन करत राहायच्या आणि रात्री एकच्या सुमारास इमरोज आपल्या पावलांचा आवाज न करता हळुवारपणे येत व त्यांच्या पुढ्यात गरम चहा ठेवून जाई. रात्री एक वाजताचा हा चहा इमरोजनी जवळपास चाळिसेक वर्षे अव्याहतपणे अन् प्रेमाने बनवून दिला. या दोघांनीही जग काय म्हणते याची कधीच फिकीर केली नव्हती. कारण एकाच घरात दोन वेगवेगळ्या खोलीत राहणाऱ्या या दोन व्यक्तींचे आत्मे एक झाले होते!!

आपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणाऱ्या अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या त्या मुक्त होत्या, पण स्वैर स्वच्छंदी नव्हत्या. याचं बोलकं उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल अशा पुष्कळ घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. त्यापैकीच एक त्यांच्या पतीच्या संदर्भात आहे. अमृतांचे पती प्रीतमसिंग यांना त्यांच्या अखेरच्या एकाकी दिवसांत अमृतांनी आपल्या घरी आणलं होतं आणि त्यांची सारी सेवाशुश्रूषा केली होती. अमृता-इमरोजच्या घरातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. त्याच बरोबर जेव्हा १९८० मध्ये साहीरचं मुंबईत हार्टऍटॅकने अकाली निधन झालं तेव्हा अमृतांना जणू आपलाच मृत्यू झालाय असं वाटलं होतं. त्यातून त्या कधी बाहेर आल्या नाहीत. या सर्वांतून त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. जगाचे आपल्या प्रेमाबद्दल काय मत आहे याच्या फंद्यात न पडलेल्या अमृतांनी आपल्या प्रेमाबद्दल आपले काय विचार आहेत किंवा या जगावेगळ्या प्रेमत्रिकोणाबद्दल आपल्याला काय वाटते यावर एक कविता लिहिली होती. अमृतांनी आपल्या मरणापूर्वी काही दिवस आधी आपल्या जीवलग प्रियकराला आणि आयुष्याच्या अभिन्न जोडीदाराला इमरोजला उद्देशून लिहिलेली ही कविता अत्यंत प्रसिद्ध आहे! तिचे अनेक भाषांत अनुवाद झाले होते.
आपल्या आयुष्यात इतकं सारं घडत असताना अमृतामधील लेखिका स्वस्थ बसणे अशक्य होते. त्यांची लेखणी, प्रेम आणि विद्रोहाची गाथा एकाच वेळी रचत होती. अमृतांच्या या धगधगत्या लेखणीने प्रस्थापित लेखनाला व विचारांना जबरदस्त धक्का बसला. मात्र त्या डगमगल्या नाहीत. आपल्या कथांनी त्यांनी एक वादळ निर्माण केले. अमृतांच्या जीवनाप्रमाणे त्यांचं लेखन बहुआयामी होत गेलं. याला काही अंशी इमरोजदेखील कारणीभूत आहे. परस्परांवरील प्रगाढ प्रेमातून कायदेशीर लग्नबंधन न स्वीकारताही ४० वर्षांहून अधिक काळ अखंड धुंदीचं त्यांचं सहजीवन त्यांच्या वैचारिक परिपक्वतेची जाणीव करून देण्यास पुरेसं आहे. या सहजीवनात इमरोजनं साहीरचं अमृताच्या आयुष्यातील ‘असणं’ सहजगत्या स्वीकारून आपला सच्चेपणा सिद्ध केला होता. मुक्त विचारांमुळे अमृतांच्या काव्यात बंडखोरीचे रसायन प्रेमरसातून पाझरत राहते. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी इतर आशय विषयांनादेखील हात घातला आहे. या अद्भुतरसाने उत्कट ओथंबलेली कविताही त्यांनी लिहिली आहे. २०व्या शतकातील हिंदी आणि पंजाबी भाषेतील या कवयित्रीने साहित्य अकादमीचा पुरस्कार घेणाऱया पहिल्या महिलेचा मान मिळवला. अमृता एक सिद्धहस्त कादंबरीकार तसेच निबंधकार होत्या. सहा दशकांच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी १०० पुस्तके लिहिली. यात कविता, चरित्र, निबंध, पंजाबी लोकगीते, हिंदुस्थानी आणि परकीय भाषांमधील आत्मचरित्रांचा समावेश आहे. त्यांना साहित्यसेवेबद्दल पद्मविभूषण आणि साहित्याचा हिंदुस्थानातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कारदेखील मिळाला होता. अमृताजींच्या आयुष्यातील या सर्व घडामोडीत व जडणघडणीत खुशवंतसिंह यांचा मोलाचा वाटा होता. रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ अशा मैत्रीच्या नात्याचे हे दोघे एक मूर्तिमंत प्रतीक ठरावेत इतकी त्यांची मैत्री निस्सीम आणि गहिरी होती. विशेष म्हणजे विजातीय लिंगी मैत्रीकडे हिंदुस्थानी समाज आजही जिथे संशयाने पाहतो त्याच समाजात खुशवंतसिंह आणि अमृता प्रीतम यांची अगाध मैत्री १९५० पासून सुरू झाली ती त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत टिकून राहिली.
दोन मुलांची आई आणि विवाहित असलेल्या अमृताजींचा इमरोजबरोबर राहण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठं बंडच होतं. त्यावर ‘अमृता-इमरोज ए लव्ह स्टोरी’ या पुस्तकाच्या लेखिका उमा त्रिलोक म्हणतात, ‘बदल पाहिजे, बदल पाहिजे अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात बदल घडून येतो तेव्हा मात्र घाबरतो. अमृता-इमरोजनं स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची नवी वेगळी भाषा दिली आहे.’ खरंच बदल पचवणे आपल्या समाजाला कठीण जाते. आजकालच्या सकाळी कनेक्ट, दुपारी ब्रेकअप अन् संध्याकाळी पुन्हा दुसरीकडे कनेक्ट अशा बेगडी प्रेमयुगात साहीर- अमृता – इमरोज यांचं प्रेम खऱ्या प्रेमाचं चिरंतन आत्मिक सत्य अजरामर करून जातं. आपण साहीर -अमृता – इमरोज यांचं प्रेम जेव्हा जेव्हा वाचत जातो तेव्हा दरवेळेस आपल्या प्रेमाच्या व्याख्या अन् संदर्भ बदलत जातात. जगण्याचा खरा अर्थ अन् प्रेमातलं जगणं शोधायचं असेल तर अमृता-इमरोजच्या प्रेम अध्यायाचे वाचन व्हायलाच हवे. अमृतांनी इमरोजसाठी लिहिलेल्या कवितोचा भावगर्भ अनुवाद गुलजारजींनी केला आहे. अमुता-इमरोज यांचं नातं या कवितेत सामावला आहे.
मैं तुम्हे फ़िर मिलूंगी
कहाँ किस तरह यह नही जानती
शायद तुम्हारे तख्यिल की कोई चिंगारी बन कर
तुम्हारे केनवास पर उतरूंगी
या शायद तुम्हारे कैनवास के ऊपर
एक रहस्यमय रेखा बन कर
खामोश तुम्हे देखती रहूंगी
– sameerbapu@gmail.com

link - http://www.saamana.com/life-of-renowned-author-amruta-pritam/

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...