Flash

Showing posts with label लैंगिकता. Show all posts
Showing posts with label लैंगिकता. Show all posts

Saturday, 20 October 2018

व्यंगविनोद आणि अश्लीलता! -मनोहर सप्रे

व्यंगविनोद आणि अश्लीलता!

ग्रंथनामा - झलक 

  • ‘मनोहारी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 06 October 2018
  • ग्रंथनामाझलकमनोहारीManohariमनोहर सप्रेManohar Sapreव्यंगचित्रकारCartoonist
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचं ‘मनोहारी’ हे नवं पुस्तक नुकतंच प्रफुल्लता प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. त्यातील हे एक प्रकरण.
.............................................................................................................................................
खूप वर्षांपूर्वी ‘सोसायटी अँड मॉरल्स’ या पुस्तकात आरंभीच उपस्थित केलेला एक सवाल व्यंगविनोदाच्या निमित्तानं डोळ्यांसमोर येतो! तो म्हणजे जिच्याविषयी सारा समाज नैतिक हाकाटी करतो ती खून, मारामाऱ्या, फसवाफसवी, शारीरिक छळ, दरोडे अशी गुन्हेगारी साहित्य आणि सिनेमाचा विषय म्हणून आम्हाला बिनदिक्कत चालते, मग त्यातल्या लैंगिकतेबाबत आम्ही एवढे हळवे आणि अनुदार होतो, ते का? एकूण व्यंगविनोदाबाबतही नेमका हाच सवाल उभा होतो, म्हणून त्याचं लैंगिकतेशी नातं काय हा प्रश्न उभा होतो!
एक गोष्ट मात्र निश्चित की, श्लील-अश्लील हा भेद मुळातच स्थळ, काळ, परिस्थिती, संदर्भ आणि व्यक्ती इतक्या विविधतेला सापेक्ष आहे. या सगळ्यात काळानुसार बदल होत जातात. मात्र कालचं अश्लील आज श्लील म्हणून दुर्लक्षित होतं. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आचार्य अत्र्यांच्या ‘ब्रह्मचारी’ सिनेमात मीनाक्षीला पोहण्याच्या पोशाखात दाखवल्यानं कोण हाहाकार माजला होता! आज स्त्रीच्या उघड्या अंगाविषयी कुणाला खंत वाटत नाही आणि वाटलीच तर उरलेल्यांविषयीच हळहळ वाटते! आज जे विनोद आणि जी व्यंगचित्रं विविध प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत पोचतात, त्यातला एखादा पण पूर्वी बाहेर आला नसता!
श्लील-अश्लील हा निवाडा ज्या निकषावर होतो, तो म्हणजे समाजमान्यताप्राप्त लैंगिकता. वस्तुत: माणसातल्या प्राणित्वाचा एक अंगीभूत भाग म्हणून लैंगिकता हे एक निसर्गवास्तव आहे. पशुप्रमाणे त्यात नैतिक-अनैतिक असा कुठलाच मूल्यभेद नाही. पशुप्रमाणेच मुक्त व स्वैर लैंगिक संबंध संपून मानवात स्थिर असे युगुल (pair bond relation) संबंध निर्माण झाले, तेव्हा कुठे लैंगिक नियमन हा समाजव्यवस्थेचा मूलाधार झाला. आणि तेथून श्लील-अश्लील हे भेद सुरू झाले. आरंभीच्या साऱ्या समाजव्यवस्था याबाबत कडक आणि कठोर होत्या. मात्र यंत्रयुगाच्या सुरुवातीनंतर क्रमानं होत गेलेल्या शहरीकरणातून मानवी समूहात जे बदल झाले, त्यात व्यक्तिस्वातंत्र्यात जलदगतीनं होत गेलेली वाढ हा फार मोठा घटक होता! त्यातून सनातन्यांची व्यक्तिजीवनावरची पकड सैल होत गेली. या ओघात विनोदाच्या प्रांतात पाश्चात्य विनोदात मिस्किलीच्या माध्यमातून लैंगिकतेचा शिरकाव झाला आणि पुढे तिचा अश्लीलतेकडे जरा जादा झुकाव सुरू झाला. ‘परमिसिव्ह’ समाजव्यवस्थेमुळे या प्रक्रियेला जोरकस उत्तेजन मिळाल्यामुळे जागतिक पातळीवरच्या विनोदात हा गुणविशेष अनिर्बंध पाझरला. ‘प्लेबॉय’ आणि ‘मॅड’ यांसारख्या नियतकालिकांनी ब्रँड म्हणून जागतिक व्यंगविनोदाला आकार देणं हा याचा पुरावा!
अश्लील माध्यमाची एक जमेची बाजू म्हणजे त्यातून सांगितलेला विनोद समजायला विशेषसा बौद्धिक व्यायाम लागत नाही. शिवाय अधिक धारदार म्हणून जादा हास्यकारी होतो. फक्त त्यात अश्लीलतेचा अतिरेक होऊन तो बीभत्स होण्याची शक्यता वाढते. ही अवस्था टाळण्यासाठी योग्य त्या संतुलनासाठी कोणता निकष लावावा हा कूट प्रश्न निर्माण होतो. मात्र उपहासिक विनोदांबाबत अश्लीलता काही प्रमाणात क्षम्य ठरते, कारण त्यातली अश्लीलता साध्य नसून टीका म्हणून केवळ साधनीभृत असते.
व्यंगविनोदाची व्यक्ती व वर्ग सापेक्षता लैंगिकतेचा जरा जरी सार्वजनिक उल्लेख झाला तरी सनातनी अश्लीलतेची ओरड करतात. लैंगिकता आणि अश्लीलता या संज्ञा अध्येमध्ये संलग्न केल्या जात असल्या तरी तत्त्वत: त्या एक नाहीत. अन्यथा लैंगिक शिक्षणावरची पुस्तकं अश्लील ठरतील की! याचा अर्थ हा की केवळ व्यंगविनोदात लैंगिकतेचा वापर केला म्हणून तो अश्लील ठरत नाही! लैंगिकता ही मानवी प्राण्याची नैसर्गिक अशी सुप्त प्रेरणा आहे. परंपरागत सांस्कृतिक संस्कार म्हणून तिची प्रगट अभिव्यक्ती नाकारली जाते. विनोदाच्या आडवळणी माध्यमातून खुबीदारपणे ती व्यक्त केल्यावर ती हास्यकारी ठरते.
थोडक्यात वास्तवाचंच विडंबनात्मक रूपांतर म्हणजे विनोद, मग तो शाब्दिक असो वा चित्रित असो! पुरुषाला स्त्रीविषयक कायम नैसर्गिक आकर्षण असतं, हे चिरंतन वास्तव हास्यकारकतेतून अधोरेखित करणं हीच तर त्यातली व्यंग्यचित्रकारांची इच्छा आणि किमया आहे! यात कुठलीच ठळक विकृती नसल्यानं लैंगिक संदर्भ असूनही त्यात काहीएक आक्षेपकारी नाही! पुरुषी वासनेच्या वेगळेपणाच्या संदर्भातलं सोबतचं व्यंगचित्र बघा. त्यात घराची यजमानीण मैत्रिणीला म्हणते, “मला बाई हे घर मुळीच आवडलं नव्हतं, पण यांचाच हट्ट पडला ना?... म्हणे काय छान दृश्य दिसतं इथनं!” आता बोला!
जीवनमूल्यांकडे बघण्याची स्त्री-पुरुष यांची नजर व्यक्तीसापेक्ष म्हणजे संपूर्णपणे वेगवेगळी असते, हे आपण सगळे प्रत्ययही अनुभवतो. ती किती पराकोटीची भिन्न असू शकते याचा ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये आलेला एक बहारीचा किस्सा माझ्या जमेस आहे. वरवर चावट वाटणाऱ्या त्यात स्त्री-पुरुष जीवनवास्तवाची एक विलक्षण आणि धारदार अनुभूती देण्याचं सामर्थ्य आहे. नग्न चित्रकारितेत खास प्रावीण्य असलेला एक चित्रकार असतो. घरातच त्याचा स्टुडिओ असतो. तिथं नग्न मॉडेल या नात्यानं पोज द्यायला एक तरुणी त्याच्याकडे रोज येत असते. एके दिवशी ती अशीच येऊन कपडे उतरवायला लागली असता चित्रकार म्हणतो, “असू दे, आज काम बंद ठेवू या. मला बरं नाही म्हणून मूड नाही. फक्त एक कप चहा मात्र करून देशील तर बरं!” मॉडेलनं त्याप्रमाणे त्याला चहा करून दिला आणि तो तो घेत असता ती त्याच्याशी बोलत बसली. दरम्यान, गेटचं लॅच उघडल्याचा आवाज आला. तो ऐकताच चित्रकार गडबडून म्हणतो, “बाप रे! बायको आलेली दिसते?... चटकन कपडे काढ बघू!” चित्रकारी संदर्भात मॉडेलची नग्नता अक्षम्य ठरू नये, मात्र तिनं ‘वस्त्रात’ नवऱ्याला चहा करून देणं मात्र बायकोला गैर व संशयास्पद वाटावं हा निखळ विनोद नाही, तर या उपहासातून स्त्री स्वभावाची सार्वत्रिकता दर्शवणं आहे!
व्यंगविनोदाच्या प्रांतात असल्याच सापेक्षतेपायी एक मजेशीर विरोधाभास आढळतो. तो म्हणजे जिथं अश्लीलता मूळ चित्र वा मजकूर यात कणभरही नसते, तिथं नकळत वाचक वा प्रेक्षकच आपणहून ती गृहीत धरून चालतात. जसं एका छोट्याशा खाजगी ‘गेट टूगेदर’मध्ये रात्रीचे दहा वाजून गेलेत म्हणून एक तरुण विवाहिता उठून पलीकडल्या पुरुषांच्या जमावातल्या आपल्या नवऱ्याला जरा चढ्या आवाजात म्हणते, “अहो, चला की! जवळजवळ झोपायची वेळ झालीय!” त्यावर लगेच सगळ्या चेहऱ्यांवर मिस्कील हास्य झळकतं, ते मग का?
या पुढलं उदाहरण तर एक अतर्क्य अशी अफलातून वास्तव घटना आहे, दादरच्या एका बँकेत वास्तवात घडलेली! एक बाई तिथल्या काउंटरवर अकाउटंटशी तंटत असतात. त्यांच्या अकाउटंचे तपशील काही केल्या बँकेशी जुळत नसतात. तेव्हा त्या आरडाओरड करत म्हणतात- “अहो असं काय म्हणताय, जमणार नाही म्हणून! तुम्ही तुमचंच धरून बसलात तर कसं होईल? तुम्ही माझी फिगर पहा ना नीट. हवं तर मी सगळं उघडून दाखवते तुम्हाला. मग तुम्ही हात लावा. तुम्ही आधी खाली तर बघा. खालची फिगर बघा. मग तुमचं पाहा! सगळं तुमच्या हातात आहे! आपण दोघांनी बसून नीट केलं तर सगळं नीट जमेल. तुमची करायची इच्छा पाहिजे फक्त. अगदी तुम्ही माझी फिगर धरून उलटे खालून वर करत गेलात ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही रोज करता म्हणजे आम्ही कधी केलंच नाही असं नाहीये. स्वत:च माझ्या हातांनी हे सगळे करू शकते!” तात्पर्य, यावर तुमची प्राथमिक प्रतिक्रिया काय ते तुम्हीच बघा!
व्यंगविनोदाची संदर्भ सापेक्षता!
सारे ज्याला चक्क अश्लील म्हणून शिक्का मारतील असा एक खाससा अफलातून किस्सा माझ्या जमेस आहे. तो मुद्दाम इथं देतो. विशेष म्हणजे त्यातल्या तिन्ही घटनांत परिस्थितीजन्य संदर्भ समान आहे. मात्र प्रत्येकाचं लक्ष्य म्हणजे बेअरिंग वेगवेगळं आहे. संकरित पैदाशीसाठी गाय फळवणं यासाठीचे हे सारे प्रयत्न आहेत. अश्लीलतेकडे स्पष्ट झुकलेल्या पहिल्या उदाहरणात हा प्रयोग दाखवण्यासाठी व्हेटेरनरी कॉलेजमधील प्राचार्य मुला-मुलींना एकत्र करून सर्वांना उद्देशून म्हणतात, “तुम्ही समोर जे जे दिसतं ते लक्षपूर्वक पहा आणि नंतर ते वहीत सविस्तर लिहून अखेर तुमचा निष्कर्ष नोंदवा!” तिथं एक गाय आणली जाते. पाठोपाठ एक वळू आणून तिच्यावर सोडला जातो. तो गायीभोवती फक्त चार-सहा फेऱ्या मारून स्तब्ध उभा राहतो. गायीतच काही तरी गडबड असावी हे वाटून मग दुसरी गाय आणण्यात येते, पण वळूचं पुन्हा तेच! अशा क्रमानं चार-पाच गायी बदलून होतात, पण वळूचं प्रत्येक वेळी तेच! हे पाहून प्राचार्य वैतागून प्रयोगशाळेत जाऊन एक थोरला चिमटा घेऊन येतात आणि त्यानं वळूच्या माथ्यावरचे बचकाभर केस उपटतात. तसा चिडून वळू पुढलं काम फत्ते करतो. प्रयोग संपतो, तसे विद्यार्थी नोटबुकमध्ये लिहू लागतात. प्राचार्य प्रत्येकामागे उभा राहून वाचत जातात. एका मुलीनं सर्व काही सविस्तर लिहून खाली आपला निष्कर्ष लिहिलेला असतो- “या प्रकारे आमच्या प्राचार्यांना टक्कल का आहे, हे आम्हाला समजलं!”
दुसऱ्या उदाहरणातही स्थिती तीच असते, तिथंही गायी पाठोपाठ तशाच बदलल्या जातात, पण आयात केलेल्या अमेरिकन वळूचं फेऱ्या मारणं आणि नंतर स्तब्ध होणं तसंच! अखेर वळूतच काही गडबड असावी म्हणून कॉलेजचे प्राचार्य ताबडतोब अमेरिकेत मेल पाठवून हे असं का, अशी विचारणा करतात, तेव्हा तडक उत्तर येतं की, “आम्ही वळूचा बायोडाटा काळजीपूर्वक तपासला, तेव्हा लक्षात आलं की, आम्ही चुकून तुम्हाला ‘कन्सलटंट’ पाठवलाय!”
तिसऱ्या प्रयोगातही प्रसंग व रचना तीच, फक्त तो प्रकार बघायला पती-पत्नी असं एक जोडपं गेलेलं असतं. तेथील रेतन विधी पाहून पत्नी उत्सुकता म्हणून तेथील तज्ज्ञाला विचारते, “का हो, एक वळू गायीला किती वेळा फळवू शकतो?” उत्तर येतं, “आठ-दहा वेळा!” बाई कोपरखळी मारून नवऱ्याला उपरोधानं म्हणते, “बघा हो!” नवराही बेटा चांगलाच बेरकी असतो. तो तज्ज्ञाला विचारतो, “काय हो, गाय तीच का वेगवेगळ्या?” त्यावर उत्तर येतं- “वेगवेगळ्या!’’ मग नवरा बायकोला म्हणतो, “बघ ग!”
वरील तिन्ही उदाहरणांपैकी पहिल्यात कल्पनारम्य चमत्कृतीतून निखळ हसवणं हा हेतू आहे. दुसऱ्यात ‘कन्सल्टन्ट’ या एकूण ‘निष्क्रिय’ वर्गावर उपहासिक टोमणा वा सटायर आहे, तर तिसऱ्यात फक्त विवाहितांनाच समजेल अशा बेरकी मानसशास्त्रीय वास्तवाचा मिस्किली चिमटा आहे! तात्पर्य, वरील दुसऱ्या आणि तिसऱ्या किस्स्यात अश्लीलता हे फक्त माध्यम आहे, तर पहिल्यात ते केवळ उद्दिष्ट आहे! मात्र सामान्यत: वाचक हा मूलभूत फरक विसरून त्यांना सर्रास एकाच मापानं निखळ हास्यकारीच मानतात. मुळात ही त्यांच्या रसिकतेतली उणीव आहे.
व्यंगविनोदातली सांकेतिक सूचकता!
सोबत ‘कॉल बेल’वरचं एक बहारीचं व्यंगचित्र दिलेलं आहे. त्यात कॉलबेलचं बटण म्हणून स्तनाग्राचा वापर दाखवला आहे. हीच त्यातली अश्लीलतेची झाक आहे, पण व्यंग्यचित्रकारानं केवळ आपल्या विलक्षण कल्पकतेनं तीवर मात केलेली आहे. आणि परिणाम म्हणून हे चित्र केवळ मिस्किलीत जमा झालं आहे. तात्पर्य, खाद्यान्नात मसाल्यानं जी लज्जत येते, तीच नेमकी केवळ सांकेतिक शृंगारिक लैंगिकतेनं येते.
याचा एक नमुनेदार किस्सा असा - एक पत्नी नवऱ्याला म्हणते, “शेजारच्या जोश्यांनी सिगरेट सोडली, नाही तर तुम्ही बघा, कशातही जरासुद्धा संयम नाही!” यावर नवरा तापून म्हणतो, “ठीक आहे! आता दाखवतोच तुला माझ्यात किती संयम आहे तो! आजपासून आपण वेगवेगळ्या खोल्यात झोपायचं!” लगेच तशी सुरुवात होतेही! असे दोन-चार दिवस गेल्यावर एके दिवशी रात्री नवऱ्याच्या दारावर हलकी थाप पडते. तो दार उघडून बघतो, तो बाहेर बायको उभी! नवरा विचारतो, “काय ग?” त्यावर ती उत्तरते, “अहो, जोश्यांनी सिगरेट सुरू केली की!”
थोडक्यात असं म्हणता येईल की, अश्लीलतेकडे झुकलेल्या विनोदात वा व्यंगचित्रात सांकेतिकता जेवढी सूक्ष्म तेवढा त्याचा कलात्मक दर्जा थोरला! वेगळ्या भाषेत सांकेतिकता ही एक प्रकारची अंतर्गत मर्यादा वा ‘सेन्सॉरशिप’च की! याच कोटीतलं ज्याला अभिजात म्हणता येईल, असं सोबतचं एक व्यंगचित्र. तसं पाहता छोट्या मुलाला घेऊन फिरायला निघालेले आई-बाप हे काही फार दुर्मीळ दृश्य नव्हे! पण या व्यंग्यचित्रातली खुमारी त्यातल्या तिघांच्या कपड्यांच्या डिझाईनवरून लगेच ध्यानात येईल! मुलाच्या कपड्यांवरचं चौकडीचं डिझाईन हा उघडच मातापित्याच्या लैंगिक मीलनाचा संकेत आहे, म्हणजे एक प्रकारे ती अश्लीलता असूनही संकेती तंत्रामुळे तिला हास्यकारी स्वरूप आलं आहे. आणि हीच व्यंग्यचित्रकारितेची खरी किमया!
अश्लीलता, सामाजिक-राजकीय टीकेचं एक प्रभावी माध्यम!
अश्लीलता एक अभिव्यक्ती माध्यम म्हणून फार प्रभावी असल्यानं अलीकडे विनोदातून तिचा वापर सामाजिक, राजकीय टीकाकार फार मोठ्या प्रमाणावर करू लागला आहे. सामाजिक पातळीवरचा त्याचा एक नमुना असा. घटना अमेरिकेतली! एका तरुणाचं शेजारच्या मुलीवर प्रेम असतं. आपण तिच्याशीच लग्न करणार असं तो जाहीर करतो. बापाचा या प्रस्तावाला कडाडून विरोध असतो, पण याचं कारण काय ते तो काही केल्या सांगत नाही. अखेर निकरावर येऊन मुलगा ते विचारतो, तेव्हा बाप कुजबुजत म्हणतो, “अरे, ती तुझी बहीण आहे!” हे ऐकून मुलाला पराकोटीचा धक्का बसतो आणि तो गलितगात्र होतो. त्याची ही हालत पाहून आई पाठीवर हात फिरवून त्याला म्हणते, “बेटा, तू बिनदिक्कत तिच्याशी लग्न कर... तू काही तिचा खरा भाऊ नाहीस!” आजच्या अमेरिकन समाजातल्या नैतिक घसरणीवरचा हा अप्रतिम परिणामकारी उपहास आहे! आता बोला!
कायम वादग्रस्त ठरलेल्या श्लील-अश्लील या द्वंद्वाबाबत समारोपात एवढंच म्हणता येईल की, ही बाब प्राय: ‘पुरुषार्थी’ आहे आणि याला कारण पुरुषाचं दुपेडी व्यक्तिमत्त्व, समूहात आणि खासगीत वेगवेगळं असलेलं! समूहात वावरताना माणूस कायम संभावितपणाचा मुखवटा घालून असतो. त्याच्या बोलण्या-चालण्याला अदृश्य मर्यादा असतात. मात्र हाच माणूस खासगी मैफिलीत ‘खासे’ जोक्स न कचरता सांगत असतो!
विषयासंदर्भात दुसरा एक सहसा विचारात न घेतला जाणारा मुद्दा आहे, तो म्हणजे अश्लील व्यंगविनोदांच्या प्रांतात स्त्रियांचा सहभाग जवळपास नगण्य आहे. फार तर त्यांच्याबाबत एक सुप्त ग्राहकता त्यांच्यात असू शकेल! एकूण व्यंगकारितेत स्त्रिया अभावानंच असणं हा म्हणून केवळ योगायोग मानता येत नाही! यात त्यांच्यासाठी ‘विनयभंग’ हा मुद्दा महत्त्वाचा असावा वा याला सामाजिक सेन्सॉरशिप तरी कारणीभूत असावी. मात्र असल्या सगळ्या किस्स्यांत ‘पात्र’ म्हणून स्त्री सहभाग हा अटळपणे असतोच!
विषयाच्या समारोपातला अखेरचा मुद्दा म्हणजे माध्यम म्हणून लैंगिकतेचा प्रमाणित आणि संयमित वापर गैर नसून रास्त असतो. विनोदाला अश्लीलतेचा सूचकसा हलका स्पर्श देण्यातून कितीतरी अभिजात विनोद निर्माण झालेले आहेत! त्यातला एक बेहद्द नमुना म्हणून एका फ्रेंच व्यंगचित्राचा दाखला देतो. त्यात जेमतेम दहा-अकरा वर्षांची एक बाला आपल्या नितंबांवर ब्रेसियर लावून आरशात पाठमोरी बघताना दाखवली आहे. बालवयात सर्वांनाच आपण केव्हा मोठे होऊ याची उत्सुक घाई असते. त्यातून तारुण्याच्या उंबरठ्यावर ‘फॅन्टसीज’ निर्माण होतात. कारण त्या फार सुखद असतात. प्रस्तुत व्यंगचित्रात वयात येण्याची ही उमंग मिस्किलीतून रेखाटली आहे. मुलं बऱ्याचदा खोट्या-खोट्या मिशा लावतात, तसलाच हा प्रकार! म्हणूनच माध्यम लैंगिक असूनही हे चित्र मानसशास्त्रीयदृष्ट्या अभिजात मानलं गेलं आहे!

Monday, 24 April 2017

पदराआडचा वात्स्यायन - रुची

पदराआडचा वात्स्यायन

कामसूत्र
ऐतिहासिक व्यक्तींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात अधिष्ठान द्यायचे, की त्यांच्याकडे संपूर्ण तटस्थतेने काळाच्या चश्म्यातून पाहायचे या निर्णयसंभ्रमातच अनेक फड रंगतात; त्यांतून त्या व्यक्तींच्या, घटनांच्या आणि संदर्भांच्या अनेक प्रती निघतात. अनेकदा अभ्यासकांच्या भूमिकांचेही इतके ध्रुवीकरण झालेले असते, की त्यातून एकसंध आणि संतुलित चित्र निर्माण होत नाही. मग हा निवाडा वैयक्तिक पातळीवर आपल्यालाच करावा लागतो.
वात्स्यायनाच्या कामसूत्राकडे आणि कामसूत्रातल्या वात्स्यायनाकडे पाहताना, हा निवाडा करणे मला कष्टाचे पडते. एकतर संस्कृतवर प्रभुत्व नसल्याने त्याच्या इंग्रजी भाषांतरांना शरण जावे लागते. त्यात ही भाषांतरे देशी व्यक्तीने केली आहेत की विदेशी, त्यांच्या राजकीय-सामाजिक भूमिका कोणत्या होत्या, हे भाषांतर कोणत्या काळात झाले, या सगळयांवरून अर्थनिष्पत्तीत मोठे फरक पडतात. स्वातंत्र्यपूर्व काळात रिचर्ड बर्टनसारख्या इंग्रजांच्या पुढाकाराने झालेले भाषांतर आणि त्यातून प्राचीन भारतातील तथाकथित लैंगिक मोकळेपणाचे गौरवीकरण; स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रवादी भारतीयांनी गेलेले भाषांतर आणि त्यातून झालेले वात्स्यायनाचे गौरवीकरण; त्यानंतरच्या काळातल्या अभ्यासकांनी आणि स्त्रीवाद्यांनी केलेले त्याचे खंडन आणि वर्ण-लिंग-जातभेद दृढ करणारा अजून एक ब्राम्हण्यवादी ग्रंथ अशी झालेली त्याची मांडणी; आणि आता अगदी अलीकडच्या काळात पुनश्च थोड्या सहानुभूतीने वात्स्यायनाच्या उदारमतवादाला जाणून घेणारी भूमिका, त्याला संदिग्धतेचा फायदा देणारी भाषा, अशा विविध अंगांनी त्याच्याकडे पाहूनही यांतला नक्की कोणता दृष्टिकोन आपल्या भूमिकेशी मिळताजुळता आहे याचा निवाडा मला करता आलेला नाही. अशा वेगवेगळ्या अंगांनी विचार केल्याने या ग्रंथाचे रसग्रहण मात्र कमालीचे सुरस झाले आहे हे नक्की.
कामसूत्राची आणि माझी पहिली ओळख साधारण २००० सालाच्या आसपास, रिचर्ड बर्टनने केलेल्या अनुवादाच्या रूपाने झाली. त्या काळात हा ग्रंथ वाचून मी चांगलीच बुचकळ्यात पडले होते. या ग्रंथाला समकालीन असलेल्या काळातले वर्ण-जात-लिंग भेदभाव, या भेदांच्या आधारे निर्माण केलेली हक्कांतली तीव्र असमानता आणि या पुस्तकांतून वर्णन केलेला लैंगिक मोकळेपणा यांचा मेळ काही बसत नव्हता. त्या काळाच्या तुलनेत आजच्या आधुनिक समाजात स्त्री-पुरुष समानता वाढलेली होती, वर्णव्यवस्थेचे महत्त्व तुलनेने घटलेले दिसत होतेआणि इतर क्षेत्रांत आधुनिकतेचा स्वीकार झालेला होता. पण त्याच वेळी लैंगिक व्यवहारांवरची बंधने तुलनेने वाढलेली दिसत होती, स्त्री-पुरुषांच्या कामप्रेरणांचे दमन होत होते आणि एकूणच शरीरसंबंधाविषयीचा अवघडलेला अपराधीपणाही दिसत होता. या दोहोंमधल्या विसंगतीचा अर्थ लावताना मला अडखळायला झाले.
कामक्रीडांच्या वर्णनांनी भरलेल्या या प्राचीन भारतीय ग्रंथात, वात्स्यायन कमालीच्या सहजतेने, उघडपणे आणि मोकळेपणाने मानवी लैंगिक व्यवहारांची वर्णने करतो; पॉर्न सिनेमातल्या नायक-नायिकांना क्लिष्ट वाटतील अशी आसने सांगतो; सर्व स्त्री-पुरुषांनी - अगदी कुमारिकांनीही - विवाहापूर्वी या ग्रंथाचे शिक्षण घ्यावे अशी शिफारस करतो. त्याच वेळी, आजच्या आधुनिक समाजात मात्र अविवाहित स्त्री-पुरुषांना लैंगिकतेचे शिक्षण देण्या़ची शिफारस करणे सोडाच, पण त्यांच्या हाती अपघातानेही अशी पुस्तके पडू नयेत यासाठी आटापिटा करण्यात येतो. या ग्रंथात वर्णन केलेले अनेक व्यवहार आजच्या समाजातही अनेकांना असभ्य किंवा अनैतिक वाटतात. पण ती वर्णने करणारा वात्स्यायन मात्र आपल्या थोर प्राचीन संस्कृतीचा शिलेदार असल्याने अपराधी ठरत नाही. तसेच ग्रंथातील वर्णने अगदी थेट आणि संदर्भासह असल्याने 'याचा मूळ अर्थ आध्यात्मिक होता' वगैरे नेहमीची सारवासारवी करणेही धर्ममार्तंडांना शक्य होत नाही. अशा सगळ्या उलटसुलट गमतीजमतींमुळे एकूणच भारतीयांसाठी प्राचीन खजुराहो मंदिरांप्रमाणेच वात्स्यायनाचे कामसूत्रही गैरसोयीचे आहेत हे मात्र माझ्या लक्ष्यात आले होते.
धक्का बसण्याचा हा सुरुवातीचा थोडा काळ उलटल्यावर मग कामसूत्र वाचताना मात्र कानशिले वेगळ्याच कारणाने गरम व्हायला लागली. वांग्याच्या भाजीची पाककृती देताना आपण ज्या सहजतेने - जांभळ्या रंगाची पाच-सहा कोवळी वांगी निवडावीत - वगैरे सूचनांनिशी सुरुवात करतो, त्या सहजतेने 'स्त्री कशी मिळवावी, तिला संभोगासाठी कशी तयार करावी, कोणत्या प्रकारच्या क्रिया कोणत्या प्रकारच्या स्त्रीबरोबर कराव्यात' वगैरे सांगताना स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू असल्याचे वात्स्यायन सहज गृहीत धरतो. उदाहरणार्थ हा परिच्छेद पाहा,
"प्रेमप्रकरण करण्यासाठी कोवळ्या युवती, विधवा आणि वेश्यांसारख्या स्त्रिया उपयुक्त असतात. भोगासाठी हव्या आहेत की मुलेबाळे जन्माला घालण्यासाठी यावरून स्त्रीचे दोन प्रकार ठरतात. आपल्या जातीची आणि वयाने लहान असलेली मुलगी ही सर्वांत चांगली निवड ठरते. आपल्यापेक्षा खालच्या जातीची - विशेषत: कौमार्य भंगलेली - युवती शक्यतो निवडू नये. आपल्याहून खालच्या जातीच्या मुलीचा कौमार्यभंग तुम्ही केलात, तर ती तुमच्या पत्नीचे स्थान मागू शकते. अशा प्रकरणांत स्त्रीच्या कौमार्याची खात्री अर्थातच करून घ्यावी लागते. अशा लहान वयाच्या युवतीच्या पाठोपाठ कौमार्यभंग झालेल्या विधवेचा क्रमांक येतो आणि त्याच्या पाठोपाठ वेश्येचा."
त्या काळच्या स्त्रीला होकार-नकाराचा अधिकार होता असे गृहीत धरूनही स्त्रीच्या उपभोग्यतेनुसार तिचे वर्गीकरण आणि वस्तूकरण करण्याच्या या शैलीमुळे माझ्या वैतागावर नियंत्रण ठेवणे मला कठीण व्हायला लागले. त्यातही उच्चवर्णीय, धनाढ्य व्यक्तीसाठी सेविका अथवा खालच्या वर्णातली कोणतीही स्त्री उपलब्ध असते हे गृहीतक, तशा धनिकाला असलेली गणिकांकडे जाण्याची असलेली मोकळीक, पुन्हा स्वतःची हक्काची बायको त्याला संभोगासाठी कायमच उपलब्ध असणे, विवाहित स्त्रीवर मात्र नैतिकतेची असंख्य बंधने असणे या सगळ्यांतून वर्णवर्चस्वाचा आणि पुरुषप्रधानतेचा दर्प येत होता. तो टाळून या ग्रंथाकडे पाहणे अशक्य होऊन बसले होते. दरम्यान काही स्त्रीवादी आणि डाव्या भारतीय अभ्यासकांनी लिहिलेले विश्लेषण वाचल्यावर तर हा कामक्रीडांवर लिहिलेला ग्रंथ असला, तरी त्यामागे एक सनातनी दृष्टिकोनच आहे यावर शिक्कामोर्तब झाले. या पुस्तकातले नागरकाच्या दिनचर्येचे वर्णन पाहिले, तर हा ग्रंथ एका विलासी, उपजीविकेसाठी काहीही कामधंदा न करावा लागणाऱ्या उच्चवर्णीय पुरुषासाठीच लिहिला गेलेला आहे हे स्वच्छ दिसते. हा असा पुरुष सामाजिक उतरंडीत सगळ्यात वरच्या पायरीवर बसलेला असल्याने त्याच्या खालचे सगळे जीव त्याच्यासाठी या-ना-त्या पद्धतीने सेवादातेच ठरतात. त्यामुळे हा दृष्टिकोन त्याच्या लैंगिक व्यवहारांतूनही दिसणे स्वाभाविकच आहे. पण म्हणून आधुनिक समाजातल्या समानतेच्या तत्त्वांची सवय झालेल्या व्यक्तीला हे वाचताना त्याचा कमी त्रास होत नाही. त्या काळातल्या संदर्भचौकटींसह या पुस्तकाकडे पाहायला हवे हे खरे, पण ते प्रयत्नपूर्वक करावे लागते.
माझ्या बाबतीत हे झाले ते कालांतराने आणि थोडे अपघाताने. एकदा वात्स्यायनाने केलेली नागरकाच्या दिनचर्येची वर्णने वाचताना मला त्यात वुडहाउसच्या पुस्तकांतील 'बर्टी वूस्टर'ची झाक दिसली आणि तेव्हापासून या पुस्तकाचे मनोरंजक मूल्य समजायला लागले. तीच ती उच्चवर्गीय रिकामटेकड्या युवकाला परंपरेने लाभलेली समृद्धी आणि त्या समृद्धीचा आस्वाद घेताना समाजाने आखून दिलेल्या चाकोरीनुसार ठरलेली सुसंस्कृतपणाची दिनचर्या! असे असले तरी आपल्या कामसूत्राच्या नायकाचे कामजीवन, व्हिक्टोरियन बर्टीपेक्षा शतपटींनी अधिक यशस्वी आणि धडाडीचे असल्याने माझ्यासाठी कामसूत्राचे मनोरंजनमूल्य अजूनच वाढले. एकूणच या ग्रंथाचा काळ आणि याचा अपेक्षित वाचक कोण होता हे एकदा लक्ष्यात आल्यावर त्याच्या मर्यादा आणि त्याची उपयुक्तता याकडे थोड्या समजूतदारपणे पाहणे शक्य झाले.
हा जो धनिक नागर आहे, तोही बर्टी वूस्टरसारखाच रिकामटेकडा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत विलासीपणा करणारा आहे. असे असले तरी त्याने आपल्या धनाचा आणि सुविधांचा सुसंस्कृतपणे उपभोग कसा घ्यावा याबद्दलचे संकेतही वात्स्यायनासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. कामसूत्रातून दिसणाऱ्या या नागरी समाजाबद्दल अरविंद कोल्हटकरांनी लिहिलेला सविस्तर लेख २०१५च्या 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात असल्याने त्याबद्दल अधिक लिहीत नाही; पण या आपल्या समृद्धीचा उपभोग घेण्यासाठी का होईना, कामसूत्राच्या नायकाला चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे दिसते. उपजीविकेसाठी नाही, तरी सुसंस्कृत म्हणवून घेण्यासाठी त्याला अगदी पुष्परचनांपासून ते काव्यशास्त्र आणि साहित्याच्या अभ्यासासारख्या अनेक गोष्टी शिकाव्या लागत असत असे दिसते.
हा नागरक उच्चवर्णीय - अर्थात ब्राह्मण - असावा असे अनुमान अनेकांनी काढले आहे, पण अनेक अभ्यासकांच्या मते हा पुरुष फक्त धनिक असणे अपेक्षित होते. वेंडी डॉनिजर यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले 'रिडीमिंग द कामसूत्र' हे पुस्तक या संदर्भात वाचनात आले.
रिडीमिंग द कामसूत्र
त्यात वात्स्यायनाकडे आणि कामसूत्राकडे पाहण्याचा अधिक रोचक आणि समजूतदार दृष्टिकोन दिसून येतो. या पुस्तकात लेखिका वात्स्यायनाचा उदारमतवाद ओळखते, त्याच्या चातुर्याचे कौतुक करते; पण त्याचे गौरवीकरण मात्र होऊ देत नाही. असा मध्यममार्ग स्वीकारणाऱ्या अभ्यासकांच्या भूमिकेतून विचार केल्यावर हा ग्रंथ प्रत्यक्ष कामक्रीडांच्या पलीकडेही अतिशय रोचक वाटायला लागतो.
या ग्रंथात स्त्रीपुरुष आणि समलैंगिक व्यक्ती यांच्या विविध कामक्रीडांची वर्णने असली तरी या ग्रंथाचा अपेक्षित मुख्य वाचक आणि नायक हा प्रामुख्याने भिन्नलिंगी लैंगिक संबंधांत रस असणारा उच्चवर्गीय, धनिक पुरुष आहे हे उघड आहे. संभोगाच्या प्रकारांचे जे मुख्य प्रकरण आहे, ते भेदनाच्या (penetration) वेगवेगळ्या रंगामध्येच घोळत राहते. या ग्रंथाचे ज्ञान सर्व स्त्री-पुरुषांसाठी आवश्यक आहे आणि अविवाहित स्त्रियांनीही याचे शिक्षण घ्यावे असे वात्स्यायनाने आवर्जून सांगितले आहे. तरीही हे लेखन पुरुषालाच केंद्रबिंदू मानून लिहिलेले आहे हे उघड आहे. वात्स्यायन म्हणतो, की सर्व स्त्रियांनी विवाहापूर्वी कामशास्त्राचे शिक्षण घ्यावे आणि विवाहानंतरही आपल्या पतीच्या अनुमतीनुसार ते चालू ठेवावे. तो असेही म्हणतो, की विद्वानांच्या मते स्त्रियांना (शिक्षणाच्या अभावी) ग्रंथांचे अवलोकन करणे शक्य नसल्याने ते शिकवण्याचा प्रयत्न निरुपयोगी आहे. पण वात्स्यायनाच्या मते स्त्रियांचा प्रात्यक्षिकात सहभाग असल्याने हे ज्ञान त्यांना देणे उपयुक्त आहे. तो म्हणतो, "ज्याप्रमाणे खगोलशास्त्र हे किचकट शास्त्र शिकण्याची सर्वांची वैचारिक कुवत नसली, तरी ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवरून मुहूर्त शुभ आहे की नाही ते कोणीही ओळखू शकते; त्याचप्रमाणे कामशास्त्राचे शास्त्रशुद्ध अध्ययन स्त्रीसाठी शक्य नसले, तरी त्याच्या प्रात्यक्षिकाशी तिचा घनिष्ट संबंध येत असल्याने या शास्त्राची माहिती समजून घेणे तिला शक्य आहे." आपल्या स्त्रीला असे लैंगिक शिक्षण देणे पुरुषाच्या लैंगिक सुखासाठी उपयुक्त असल्याने अशा प्रकारचा मर्यादित उदारमतवाद पुरुषप्रधानतेलाच सोयीचा आहे हे स्वयंस्पष्ट आहे. पण त्यातली मेख अशी, की वात्स्यायनाचे हे मत त्या काळातील विद्वानांच्या मताविरुद्ध होते.
कामसूत्र हे एका अर्थाने त्याच्या आधीच्या काळातल्या, या विषयाशी संबंधित असलेल्या ग्रंथांतल्या कल्पनांचे संकलन आहे. कामसूत्रातील कल्पना, विचार हे त्या काळासाठी अभिनव होते याला पुरावा नाही. वात्स्यायनाच्या नंतरही 'रतिरहस्य', 'अनंगरंग' अशा ग्रंथांमधून संभोगाच्या अनेक आसनांची सविस्तर वर्णने आहेत. वात्स्यायनही अनेक ठिकाणी इतर ग्रंथांचे आणि त्यांच्या लेखकांचे दाखले देतो. हे दाखले कधी आपल्या मुद्द्यांना बळकटी देण्यासाठी असतात, तर कधी मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यासाठी असतात. असे असताना मग वात्स्यायनाच्या कामसूत्राचे वेगळेपण कशात आहे? तर हे वेगळेपण संकल्पनांच्या मांडणीत आहे, ग्रंथाच्या उद्दिष्टांत आहे आणि त्याच्या काहीशा उदारमतवादात आहे.
पहिले महत्त्वाचे वेगळेपण असे, की वात्स्यायनाच्या मते कामक्रीडांचा मुख्य उद्देश भोगातून मिळणारी शुद्ध आनंदप्राप्ती हा आहे. अगदी सद्यकाळातल्या मुस्लीम, ज्यू, ख्रिश्चन इत्यादी बांधीव धर्मांच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर 'शुद्ध आनंदप्राप्तीसाठी संभोग' हा प्राथमिक विचारच क्रांतिकारी ठरतो. अशा धर्मांच्या मते संभोगाचे मुख्य उद्दिष्ट पुनरुत्पादन हेच आहे आणि एरवी त्यातून मिळणारा आनंद ही काहीसा अपराधीपणा बाळगण्याची गोष्ट आहे. वात्स्यायन मात्र 'काम' हे 'धर्म' आणि 'अर्थ' यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे असे हिरिरीने मांडतो आणि त्यातून होणाऱ्या आनंदप्राप्तीवरच भर देतो.
दुसरे वेगळेपण असे, की आपल्या ग्रंथात ठिकठिकाणी वात्स्यायन मनूचे आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे दाखले देतो. पण इथे तो ज्या लैंगिक क्रियांना 'वाममार्ग' असे संबोधतो, त्यांबद्दल शिक्षेची तरतूद मात्र सांगत नाही. मनू आणि कौटिल्य मात्र अशा प्रकारच्या शिक्षांचे तपशील सांगायला चुकत नाहीत. लैंगिक व्यवहारांतले वैविध्य हे माणसागणिक, तसेच प्रादेशिक, सामाजिक संकेतांप्रमाणे बदलत असते; पण मनुष्याने सर्वसाधारणपणे धर्माचरण करावे असे वात्स्यायन मांडताना दिसतो. ही भूमिका आज्ञावजा धमकी नाही, तर सौम्य उपदेशात्मक आहे. अनेकदा त्याही पुढे जाऊन वात्स्यायन मोठ्या खुबीने नियमांतल्या पळवाटाही सुचवतो.
अशा वादग्रस्त मुद्द्यांबाबत वात्स्यायनाच्याच मांडणीत लक्षणीय विरोधाभासही दिसतो. मनूने रचलेले धर्मशास्त्र श्लोकांच्या रूपात (पद्यात) आहे, तर कौटिल्याच्या अर्थशास्त्राप्रमाणेच वात्स्यायनाचे कामसूत्र मुख्यत: गद्य आहे. अर्थशास्त्राप्रमाणेच कामसूत्राची बरीचशी मांडणी गद्य आहे, पण एखाद्या प्रकरणाच्या शेवटी असलेल्या श्लोकांपुरते पद्यही त्यात आहे. या गद्य प्रकरणांत अधार्मिक - आणि अनेकदा धर्मविरोधी - बाबींची चर्चा झाल्यावर शेवटच्या श्लोकात धर्माला अनुसरून घेतलेली भूमिका असा विरोधाभास साधलेला दिसतो. हा विरोधाभास सहेतुक तर आहेच, पण तो वात्स्यायनासारख्या लेखकांची धर्मासंबंधीची ढोंगी भूमिकाही स्पष्ट करतो.
एखाद्या प्रकरणात धर्मबाह्य लैंगिक क्रियांची सविस्तर आणि चविष्ट चर्चा करून झाल्यावर त्या प्रकरणाअखेरीस, असे व्यवहार वाममार्ग असल्याचे सांगणे असे वात्स्यायन अनेकदा करतो. अशा चतुर मांडणीमुळे धर्मपरंपरांना प्रत्यक्ष आव्हान न देताही त्यातला विरोधाभास वाचकांच्या लक्ष्यात आणून देऊन वात्स्यायनाने या कायदेशीर पळवाटा शोधल्या असतील काय, याकडे डॉनिजर आपले लक्ष वेधतात. धर्मपरंपरांना उघड विरोध करण्याऐवजी आधी सविस्तर, सखोल प्रक्षोभक मते मांडायची आणि मग त्यांचे अतिशय गुळमुळीत खंडन करायचे अशी रणनीती योजून वात्स्यायनाने आपला ग्रंथ धर्ममार्तंडांच्या कचाट्यातून वाचवला आहे की काय असे वाटते. या गोष्टी वात्स्यायनाने जाणीवपूर्वक केलेल्या आहेत हे अनेक उदाहरणांतून सिद्ध करता येते.
या संदर्भात 'औपरिष्टक' अर्थात मुखमैथुन हे वादग्रस्त प्रकरण उदाहरण म्हणून पाहणे गरजेचे वाटते. अशा प्रकारचा संभोग तत्कालीन धर्मपरंपरांनुसार अयोग्य आणि धर्माला धरून नसल्याने वात्स्यायन या प्रकरणात अनेक कोलांट्या मारताना दिसतो.
औपरिष्टक प्रकरणाची सुरवात 'तृतीयप्रकृती' या संज्ञेच्या स्पष्टीकरणापासून होते. स्त्री आणि पुरुष यांच्याबरोबरच वात्स्यायन एका तिसऱ्या प्रकारच्या लैंगिकतेचा उल्लेख करतो. तिला तो तृतीयप्रकृती असे संबोधतो. या तृतीयपंथामध्ये स्त्रीसारखा पोषाख करणारे पुरुष, पुरुषासारखाच पोशाख करणारे पण पुरुषाविषयी लैंगिक आकर्षण असणारे पुरुष; स्त्रैण पुरुष; नपुसंक पुरुष, पुरुषासारखा पोशाख करणाऱ्या आणि स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण असणाऱ्या स्त्रिया, अशा अनेकांचा तो उल्लेख करतो. रोचक भाग असा आहे, की यांपैकी कोणत्याही व्यवहारांना वात्स्यायन 'अनैसर्गिक' म्हणत नाही. उलट एका प्रकारच्या सहजतेने त्यांचे वर्णन करतो. अशा तृतीयपंथी व्यक्तींपैकी जे स्त्रीसारखा पोषाख करणारे पुरुष असतात (ट्रान्सव्हेन्टाइन्स), ते इतर पुरुषांबरोबर (सामान्य अर्थात स्ट्रेट) मुखमैथुनात सहभागी होतात आणि अशा प्रकारांतून उपजीविका करतात असे वात्स्यायन सांगतो. त्यानंतर वात्स्यायन पुरुषांसारखा वेष आणि आविर्भाव असलेल्या, पण पुरुषांविषयीच लैंगिक आकर्षण असणाऱ्या - पुरुषांविषयी लिहितो. असे पुरुष साधारणपणे अंगमालीश करून उपजीविका करतात आणि अनेकदा आपल्या ग्राहकांशी मुखमैथुनादी संबंध ठेवतात असेही वात्स्यायन सांगतो. वात्स्यायनाच्या शब्दांत या संबंधांचे वर्णन,
"अंगाला मालीश करताना तो आपल्या ग्राहकाच्या अंगावर ओणवा होऊन त्याच्या शरीराला स्पर्श करत ग्राहकाच्या मांडया आतल्या बाजूने रगडतो. मांड्यांना मालीश करताना तो आपला चेहरा ग्राहकाच्या मांड्यांच्या निकट आणतो. मालीश करण्याच्या आविर्भावात तो ग्राहकाच्या जांघांजवळ जात आणि लिंगाला टाळून त्याच्या वृषणाला स्पर्श करतो*. अशा स्पर्शाने ग्राहक उत्तेजित झाल्याने त्याचे लिंग ताठ झाल्यास नुसत्या मांड्या चोळल्याने असे झाल्याबद्दल थोडी थट्टा करत तो लिंग चोळायला सुरुवात करतो. लिंग ताठर होणे हे आमंत्रण समजून तो ग्राहकाच्या संमतीशिवाय मुखमैथुनास प्रारंभ करतो. ग्राहकने हे करण्यासाठी त्याला आमंत्रण दिल्यास तो सुरुवातीला याला थोडी हरकत घेतो आणि "मी असले प्रकार करत नाही" असे म्हणत एकदा हे काम स्त्रियांचे असल्याची समज देतो आणि नंतर थोड्याश्या अनिच्छेने आपली संमती देतो. त्यानंतर एकूण आठ प्रकारांनी हे मैथुन आचरले जाते. ओठांनी स्पर्श करणे (निमित), बाजूंनी हलके चावे घेणे (पार्ष्वतोदष्ट), बाह्यांगांने दाबणे (बहिःसंदंश), आतून दाबणे (अंत:संदंश), चुंबणे (चुम्बितक), चाटत घासणे (परिमृष्टक), आंब्यासारखे चोखणे (आम्रचूषितक), पूर्ण गिळणे (संगर). या क्रिया एकामागून एक अशा प्रकारे स्खलन होईपर्यंत केल्या जातात."
*हा स्पर्श अजाणतेपणी झाला असे दाखवणे यात अभिप्रेत असावे.
वात्स्यायन त्यानंतर या आठ क्रियांचे पूर्ण तपशिलासहित वर्णन करतो. त्यानंतर तो सांगतो की अशा प्रकारचे संभोग, कुल्टा, स्वैरिणी (लेस्बियन्स), सेविका, ओझे वाहून नेणाऱ्या स्त्रिया यांच्याबरोबरही करता येतात आणि मुखमैथुन ही केवळ तृतीयप्रकृतीच्या पुरुषांपुरतीच वापरली जाणारी संज्ञा नव्हे.
इतकी तपशीलवार वर्णने करून झाल्यावर वात्स्यायन म्हणतो की,
"धर्मग्रंथांत सांगितले गेले आहे की मुखाचा लिंगाशी स्पर्श होणे त्याज्य असल्यामुळे ब्राह्मणांसाठी हे त्याज्य आहे आणि त्यामुळे असे वर्तन असंस्कृत होते, म्हणून ते निषिद्ध आहे. वात्स्यायनाच्या मते वेश्यागमन करणाऱ्यासाठी हे वर्तन पाप नव्हे, पण ते इतरांबरोबर करणे टाळावे. मुखमैथुन वेश्येबरोबर केल्याने ते पाप होत नाही, आपल्या प्रांतातल्या सभ्यतेच्या संकेतात ते बसले नाही, तरी त्याला पाप म्हणता येत नाही. स्वत:च्या पत्नीबरोबर मात्र असे वर्तन पाप होते आणि आपल्या पूर्वजांचे पंधरा वर्षांचे पुण्य त्यामुळे वाया जाते, त्यामुळे असे असंस्कृत प्रकार टाळावेत. अर्थात स्त्रीच्या योनीशी मुखाचा स्पर्श जर एखाद्या स्थानिक परंपरेने वैध असेल, तर शास्त्राप्रमाणे ते निषिद्ध नाही."
त्यापुढे तो मुखमैथुनाविषयीच्या निरनिराळ्या प्रदेशांतल्या परंपरांचे वर्णन करतो. वात्स्यायनाच्या मते पाटलीपुत्र वगळता प्रचय, दक्षिण पांचाल, अयोध्या, सौरसेना वगैरे प्रांतात मुखमैथुन अधिक आढळते आणि ते त्यांना फारसे वावगे वाटत नाही. पाटलीपुत्रात हे प्रकार फक्त वेश्यांबरोबर केले जातात, पण स्त्रीयोनीशी मुखाचा स्पर्श करणे टाळले जाते. अशा वेगवेगळ्या टिप्पण्यांमधून या वादग्रस्त मुद्द्यासंदर्भात तत्कालीन समाजातही प्रादेशिक फरक होता असे जाणवते. त्याचबरोबर आपल्या समाजाबाहेरील लोकांकडे खालच्या नजरेने पाहण्याचा प्रादेशिक उच्च-नीच भावही होता असेही असू शकते.
यानंतर वात्स्यायन या मुद्द्यावर स्वत:चे मत व्यक्त करताना म्हणतो,
"नैतिकतेच्या मुद्द्यांचा विचार करताना केवळ शास्त्रात काय लिहिले आहे, याच्याबरोबरच स्थानिक परंपरा काय आहेत आणि इतर परिस्थितीनुरूप बाबी काय आहेत याचा विचार करणेही गरजेचे असते. पत्नीची मासिक पाळी चालू असेल, तर मुखमैथुन चालू शकते किंवा वेश्येशी संबंध ठेवायचे असतील, तर तिथेही मुखमैथुन वैध होते.* शास्त्रातल्या नियमांना चिकटून राहण्यापेक्षा स्थानिक परंपरांनुसार आणि आपल्या अंतर्मनाला जे बरोबर वाटते त्याप्रमाणे वागावे."
*पळवाटांचे आणि मध्यममार्गाचे उत्तम उदाहरण!
सर्वसाधारणपणे परंपरेनुसार वागणाऱ्यांनाही लैंगिक आचरणाच्या बाबतीत धर्माला चिकटून राहणे आवडत नाही आणि त्यांच्यासाठी हे असे मध्यममार्ग सोयीचे असतात हे वात्स्यायनाने चाणाक्षपणे ओळखलेले दिसते. त्याच्या या भूमिका म्हणजे बोटचेपेपणा होता असे कोणाला वाटेल; तरी ज्याप्रमाणे आणीबाणीच्या काळात सरकारला विरोध करण्यासाठी कायदेशीर पळवाटा किंवा उपरोध यांसारखी आयुधेच वापरावी लागत, त्याचप्रमाणे मनूच्या काळातल्या कायदाव्यवस्थेत असे मध्यममार्ग स्वीकारावे लागले असणे वात्स्यायनासाठी सहजशक्य आणि स्वाभाविक आहे.
स्त्रीसंबंधातल्या मुखमैथुनाबाबत मत व्यक्त केल्यानंतर याच प्रकरणात, तो पुन्हा पुरुषांच्यातल्या समलिंगी संबंधांकडे वळतो.
"घरात कामाला असलेली काही तरुण मुले जी आपल्या पेहेरावाविषयी अतिशय जागरुक असतात, ती अनेकदा पुरुषांशी संबंध ठेवतात. त्यांच्यापैकी काही जण कालांतराने अशा संबंधांना कंटाळून स्त्रियांकडे वळतात. काही समलिंगी पुरुष आपल्या जोडीदाराबरोबर अधिक गहिरे संबंध प्रस्थापित करतात आणि अनेकदा एकमेकांशी विवाहही करतात*. आपल्या जोडीदाराबरोबर प्रेमाचे आणि विश्वासाचे संबंध प्रस्थापित करून ते कायमस्वरूपी आणि मैत्रीपूर्ण बंधनात अडकतात. अशा प्रकारचे संबंध दोन स्त्रियांच्यातही दिसून येतात."
*तत्कालीन समाजातही समलिंगी विवाह होत असत याचा अतिशय रोचक संदर्भ.
इतके वाचल्यावर वात्स्यायनाच्या उदारमतवादाबद्दल कौतुक वाटत वाटू लागते. तोच वात्स्यायन त्याच्या खास शैलीनुसार प्रकरणाच्या अखेरीस, हे प्रकार अनुचित असल्याने ते टाळावेत असा पुनरुल्लेख करतो! पण अशा संबंधांना तो आजार किंवा वैगुण्य असेही संबोधत नाही. सामाजिक आणि प्रादेशिक संकेतांप्रमाणे उचित-अनुचित व्यवहारांच्या सीमा पुसट होतात; त्याचबरोबर नैसर्गिक ऊर्मी घेऊन जन्माला आलेल्या व्यक्तींचे लैंगिक व्यवहारही नैसर्गिकच असतात असा स्वीकार त्याच्या शैलीतून जाणवतो. वात्स्यायनाचा हा काहीसा उदारमतवाद त्याच्या काळातल्या धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र या ग्रंथांच्या तुलनेत अधिक ठळकपणे जाणवतो. वात्स्यायनाचा उदारमतवाद जाणवण्यासाठी त्या काळातल्या इतर ग्रंथांसह कामसूत्राचाही तौलनिक अभ्यास करणे गरजेचे ठरते. 'रिडीमिंग द कामसूत्र' या आपल्या पुस्तकात वेंडी डॉनिंजर नेमके हेच करतात. विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने कामशास्त्राची धर्मशास्त्राशी आणि अर्थशास्त्राशी तुलना करून, हा काही वेळा उघड तर काही वेळा छुपा उदारमतवाद त्या तपासतात. या लेखातली अनेक उदाहरणे आणि संदर्भ वेंडीच्या पुस्तकात अधिक तपशिलात आलेले आहेत.
कामसूत्र

स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहतानाही वात्स्यायन बराच समजूतदार वाटतो. लग्नानंतर स्त्रीला शरीरसंबंधांची भीती वाटू नये म्हणून तिला हळूहळू प्रेमाने वश करावे असे सांगताना, तिला कोणत्या प्रकारच्या क्रिडांमुळे अधिक सुख मिळते हे सांगताना, किंवा संभोगापूर्वी आणि संभोगानंतर आपले वर्तन कसे असावे हे सांगताना तो बराच सहृदय वाटतो. विशेषतः संभोगापूर्वीचे खाणे-पिणे, कलास्वाद, लाडिक बोलणे, संभोगानंतर एकमेकांच्या सान्निध्यात गोड गोष्टी करणे, आकाशातले ग्रह-तारे-राशी एकत्र न्याहाळणे या प्रकारच्या वर्णनांतून वात्स्यायन काहीसा रोमँटिक आणि कलासक्तही वाटतो. सुख ओरबाडायचे नसते, तर प्रयत्नपूर्वक आणि सुसंस्कृतपणे त्याचा आस्वाद घ्यायचा असतो अशी त्याची भूमिका पटण्यासारखीच वाटते. स्त्रीच्या लैंगिक सुखाबद्दलही वात्स्यायन अधिक उदारतवादाने विचार करताना दिसतो. स्त्रीलाही पुरुषाप्रमाणेच लैंगिक भावनोत्कटतेचा अनुभव मिळावा असे सुचवताना तो अशा आनंदाच्या कळसबिंदूला पोहोचलेल्या स्त्रीचा आविर्भाव कसा असतो त्याचे वर्णनही करतो आणि स्त्रीला अशा आनंदापासून वंचित ठेवले, तर ती कंटाळून दुसऱ्या पुरुषाबरोबर रत होईल अशी भीतीही व्यक्त करतो. अशा उल्लेखांमधून वात्स्यायनाच्या दृष्टीने स्त्रीला स्वातंत्र्य असल्याचे जाणवते; जे त्या काळातल्या मनू किंवा कौटिल्याच्या तुलनेत अधिक उठून दिसते. रतिसुखाचा संबंध केवळ पुनरुत्पादनाशी आहे हे खोडून काढण्यासाठी तो दाखवून देतो, की मनुष्य स्त्रिया माजावर नसतानाही लैंगिक सबंध ठेवतात; जे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहे. त्याची ही भूमिका इतर धर्मशास्त्रांच्या तुलनेत अतिशय वेगळी आणि म्हणून लक्षणीय आहे. विवाहबाह्य संबंधांच्या मुद्द्यांतही वात्स्यायन स्त्रीच्या मानसिकतेकडे अधिक समजूतदारपणे पाहतो. कोणत्या कारणांसाठी स्त्री आपल्या पुरुषाचा विश्वासघात करायला प्रवृत्त होते आणि कोणत्या कारणांसाठी ती असे करण्याचे टाळते याचा ऊहापोह करताना तो असे दर्शवितो, की स्त्री असे निर्णय घेताना आपल्या परिस्थितीचा, भल्याबुऱ्याचा आणि परिणामांचा विचार करण्यास सक्षम असते. अर्थात वात्स्यायनाच्या दृष्टीने सर्व स्त्रियांना सारखेच अधिकार आहेत असेही नव्हे. त्याच्या दृष्टीने राजाच्या पत्नी, वेश्या, गणिका वगैरे स्त्रियांना इतर विवाहित स्त्रियांपेक्षा अधिक स्वातंत्र्य होते असे दिसते. अशाच एका रोचक प्रकरणात गणिका आपल्या नकोश्या झालेल्या प्रेमिकाला चतुराईने कसे कटवतात याविषयी तो मार्गदर्शन करतो.
"त्याला जसे वागणे आवडते, त्याच्याविरुद्ध वर्तन त्या करतात आणि त्याला जे आवडत नाही असे वागणे त्या वारंवार करतात. त्याला ज्या गोष्टींची माहिती नाही अशा गोष्टींवर त्या अधिकाधिक चर्चा करतात. त्याला ज्या गोष्टींत रस आहे अशा बाबींत त्या अतिशय अनुत्साह किंवा वैताग दाखवितात. तो बोलत असताना त्या त्याच्याकडे दुर्लक्ष्य करून आपल्या नोकरगणांवर डाफरतात आणि त्याच्या बोलण्यात व्यत्यय आणल्यावर मग दुसऱ्याच विषयावर बोलत राहतात. लोकांसमोर त्या त्याचे दोष दाखवत राहतात, त्याच्या विनोदावर हसत नाहीत आणि त्याच्या विनोदी नसलेल्या वक्तव्यांवर हसतात. त्याच्यासारखे दोष असलेल्या पुरुषांवर त्या टीका करतात आणि एकांतात निरुत्साह दाखवितात. अशा प्रकारच्या वर्तनाने तो लवकरच कंटाळतो आणि सोडून जातो."
विवाहित स्त्रीसाठी मात्र नवऱ्याला कसे सोडून द्यावे यासाठी काही मार्गदर्शन नाही. उलट आपले वर्तन त्याच्या मर्जीत राहण्यासारखेच असावे असा सल्ला आहे!
स्त्रियांच्या दृष्टीने कामसूत्रातला अजून एक रोचक उल्लेख म्हणजे संभोगातल्या भूमिकांच्या अदलाबदलीचा. वात्स्यायन म्हणतो, की कधीकधी कामभावनेच्या आवेगात स्त्री अचानक आपली स्त्रीसुलभ नम्र भूमिका विसरून पुरुषासारखी आक्रमक बनते. अशा वेळी पुरुष नमते घेतो व आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध भूमिका स्वीकारतो. स्त्री आपल्या सुखासाठी, आपल्याला हवे ते करते, त्याला थपडाही मारते. अशा प्रकारे काही काळ रत झाल्यावर स्त्री-पुरुष पुन्हा आपल्या नैसर्गिक भूमिकांत परततात. इथे वात्स्यायन अनेक पारंपरिक मिथकांना छेद देतो आणि थपडा मारणे वगैरे वर्णनांतून बीडीएसएम प्रकारचे संबंधही ननैतिक भूमिकेतून पाहतो.
मनूने विवाहाचे जे वेगवेगळे कायदेशीर प्रकार सांगितले आहेत, त्यातल्या पहिल्या चार-पाच प्रकारच्या विवाहांत स्त्रीच्या पसंतीचा विचार केला जात नाही. त्यामानाने कामसूत्रात स्त्री-पुरुष यांच्या परस्पर निवडीने केल्या गेलेल्या प्रेमविवाहाला सर्वाधिक योग्य ठरविले गेलेले आहे. मनूच्या धर्मशास्त्राच्या आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या मानाने हे फारच वेगळे आहे. स्त्रीच्या नातेवाइकांची कत्तल करून तिला तिच्या मर्जीविरुद्ध पळवून नेण्याच्या अघोरी विवाहाला वात्स्यायन पूर्णपणे अनैतिक समजतो. त्यापेक्षा स्त्रीला दारू पाजून किंवा गुंगीचे औषध देऊन मग तिच्याशी बळजबरी करून तिला लग्नाला भाग पाडण्याचा प्रकार अनुचित असला, तरी वरच्या अघोरी विवाहापेक्षा तो बरा आहे असे नमूद करतो. यांतले काही उल्लेख आपल्या आजच्या समाजाच्या आणि कायद्यांच्या दृष्टीने गुन्हे ठरत असल्याने आपल्याला धक्कादायक वाटत असले, तरी त्यामुळेच त्या काळी वात्स्यायनाने परस्परसंमतीने केलेल्या विवाहाला पहिले स्थान देणे हे त्याचा उदारमतवादाचेच लक्षण होते हे अधिक प्रकर्षाने जाणवते. त्याच्या मते वैवाहिक आयुष्याचे यश परस्परांविषयीच्या प्रेमभावनेत असल्याने, एकमेकांच्या निवडीने आणि संंमतीनेच विवाह केला जाणे महत्त्वाचे होते.
पत्नीच्या कर्तव्यांच्या प्रकरणात वैवाहिक स्त्रीला वात्स्यायन परंपरागत भूमिकेतच पाहत असला, तरी "स्त्रिया मुळातच उधळपट्टी करणाऱ्या असल्याने त्यांना लगाम घालावा" वगैरे मनूसारखी टोकाची मुक्ताफळेही त्याने उधळलेली नाहीत. गृहकृत्यदक्ष स्त्रीने घर कसे चालवावे, पाककला, बागकाम, हस्तकौशल्ये, अर्थनियोजन कसे करावे वगैरेची वर्णने आजच्या काळातल्या 'गुड हाऊसकीपिंग' प्रकारच्या मासिकांतल्यासारखीच वाटतात आणि व्यावहारिकपणे, चातुर्याने, गोडीगुलाबीने नवऱ्याच्या आणि सासरच्या व्यक्तींच्या मर्जीत राहावे वगैरे वर्णने त्या काळासाठी अपेक्षितच वाटतात. एकुलत्या पत्नीचे वर्तन कसे असावे, मुख्य पत्नीने सवतींशी कसा व्यवहार करावा वगैरे प्रकरणेही त्या काळासाठी सुसंगतच आहेत. मग प्रश्न पडतो तो असा - आजच्या आधुनिक समाजासाठी - विशेषत: आजच्या स्त्रीसाठी - या ग्रंथाची नक्की उपयुक्तता काय?
असंख्य प्रकारच्या संभोगांची वर्णने असूनही स्त्रीला आनंद मिळणे म्हणजे फक्त पुरुषाचा कार्यभाग साधण्यासाठी असलेली सोय असे म्हणणारा आणि तिला इतर कर्मठ धर्मवाद्यांच्या तुलनेत थोडी अधिक स्वातंत्र्ये देणारा तत्कालीन उदारमतवाद आजच्या स्त्रीला का महत्त्वाचा वाटावा? योन्यांची आणि लिंगांची, त्यांच्या आकारांची विस्तारपूर्वक वर्णने करताना स्त्रीच्या गुप्तांगातला तिला लैंगिक सुख मिळण्यासाठी महत्त्वाचा असलेला मदनध्वजासारखा भाग या ग्रंथात गुप्तच राहतो, हे अज्ञान होते की हेतुपुरस्सर हेही तपासावेसे वाटते. हे अज्ञान म्हणावे तर स्त्रीच्या कामसुखाबद्दलचं भान आणि ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीने हा उदारमतवाद निरुपयोगी ठरतो आणि हे हेतुपुरस्सर असल्यास मुळात उदारमतवादच ढोंगी ठरतो.
किन्सी किंवा 'मास्टर्स अँड जॉन्सन' यांच्या संशोधनापूर्वी स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल मिथकेच अधिक होती आणि प्रामु़ख्याने त्यांच्याच संशोधनामुळे आधुनिक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला हेच सत्य इथे पुन्हा सिद्ध होते. कारण वात्स्यायन त्याच्या काळातल्या स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल अधिक जागरूक असला, तरी स्त्रीला तृप्ती मुख्यत: भेदनातूनच मिळते या मिथकाला तोही शरण जातानाच दिसतो.
इतके सारे वळसे घेऊनही आजच्या समाजासाठी कामसूत्राचे महत्त्व बरेच आहे असे वाटते.
या उपरोल्लेखित संशोधकांच्या शास्त्रीय संशोधनाआधी, प्रगत समजल्या जाणाऱ्या देशांतही लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय संकुचित आणि अपराधी असाच होता. तिथल्या धर्मांप्रमाणे पाहता शरीरसंबंध म्हणजे पुनरुत्पादनाकरता नाईलाजाने केली जाणारी, अपराधगंड बाळगण्याची गोष्ट असेच मानले जाई. रिचर्ड बर्टनसारख्या ब्रिटीश व्यक्तीला तत्कालीन व्हिक्टोरियन समाजातल्या अपराधगंड बाळगाणाऱ्या अशा रटाळ कामव्यवहारांच्या तुलनेत हा ग्रंथ क्रांतिकारी का वाटला असेल ते समजू शकते. त्याचबरोबर 'पूर्वेकडच्या अशक्य वाटणाऱ्या सुरस कामुक कथा' असे एक्झॉटिक पुस्तक म्हणून कामसूत्राची ख्याती का पसरली असेल तेही समजू शकते.
भारतात पूर्वी हा अवघडलेपणा नसावा. आधी मोगल आणि नंतर ब्रिटीश राजवटींच्या काळात लैंगिक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला असावा. त्यामुळेच आजच्या भारतात अशीच अवघडलेली, अपराधी वृत्ती पसरली असावी. वेंडी डॉनिजरना वाटते, की या सर्व पार्श्वभूमीवर भारतात कामसूत्राचे पुनरुज्जीवन व्हावे, अशासारख्या ग्रंथांतला उदारमतवाद आजच्या भारतीयांनी ओळखावा आणि हीदेखील आपलीच समृद्ध संस्कृती आहे हे त्यांनी स्वीकारावे. 'आम्ही म्हणतो तीच हिंदू धर्माची आवृत्ती बरोबर' असे म्हणणाऱ्या सनातनी, कर्मठ धर्ममार्तंडांच्या आणि राष्ट्रवाद्यांच्या हातून आपल्या धर्मातल्या उदारमतवादी परंपरांची सुटका करावी.
हा ग्रंथ अशा प्रकारे भाषांतरातून वाचल्यावर, त्याबद्दलचा अवघडलेपणा बाळगणाऱ्या समाजात वाढल्यावर, त्यातली गुंतागुंत आणि विरोधाभास यथाशक्ती समजून घेतल्यावर आणि इतक्या साऱ्या अवगुंठनांच्या आड दडलेला वात्स्यायन थोडा थोडा दिसू लागल्यावर, मला काय वाटते?
मला असे वाटते, की आधुनिक भारतीयांनी कामसूत्राची लाज बाळगू नये किंवा त्याचे गौरवीकरणही करू नये; पण ज्या हिंदू धर्माला आपण सर्वसमावेशक धर्म समजतो, तो अशा विविधतांनी आणि अनेकदा विसंगतींनीही भरलेला आहे याची जाणीव ठेवावी. त्यातले उदारमतवादी विचार ओळखावेत, 'जाज्वल्य धर्माभिमानाच्या' लाटेतही तथाकथित धर्ममार्तंडांना गैरसोयीचा असलेला हा उदारमतवाद जिवंत ठेवावा.
कामसूत्राचे पुनरुज्जीवन करण्यामागचे अजून एक महत्त्वाचे कारण या राजकारणाच्या पलीकडचे आहे, ते म्हणजे या ग्रंथाचे मनोरंजनमूल्य. त्यातल्या आसनांची वर्णने वाचल्यावर वाटते, आपले पूर्वज एकतर महामानव तरी होते किंवा ऑलंपिक दर्जाचे कसरतपटू तरी होते! तथाकथित वाममार्गांच्या क्रियांचे वर्णन करतानाही वात्स्यायनाने शोधलेल्या पळवाटा वाचून हसू येते, त्याच्या चतुराईचे कौतुक वाटते.
सर्वात जमेची बाजू म्हणजे भिन्नलिंगी संबंधात रस असलेल्या स्त्री-पुरुषांचे किंवा इतर वेगळ्या प्रकारच्या लैंगिक प्रेरणा असलेल्या व्यक्तींचे कामजीवन हा साजरा करण्याचा, अभ्यास करण्याचा, उपभोग घेण्याचा आणि आनंद मिळविण्याचा विषय आहे असा स्वच्छ दृष्टिकोन या पुस्तकाच्या निमित्ताने मिळतो, त्यासाठी वात्स्यायन आजोबांचे कौतुक आणि अभिनंदन!
व्याप्तिनिर्देश, तळटीपा आणि संदर्भ :
१) संस्कृतचे ज्ञान नसल्याने इंग्रजी भाषांतरांवरून आणि इंग्रजी लेखांवरून अनुमान काढून लेख लिहिलेला आहे. त्यामुळे तपशिलाबद्दल आणि मजकुराबद्दल मतांतरे असू शकतील याची कल्पना आहे. पण त्यामुळेच वात्स्यायनाच्या कामसूत्राकडे भाषांतराच्या त्रुटींच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज अधिरेखित होते. भाषांतर वाचताना एखाद्या संकल्पनेचे इंग्रजीकरण समजले नाही अथवा पटले नाही, तर तो शब्द मूळ संस्कृतात कसा वापरला आहे ते पाहिल्याने शंका दूर झाली असे अनेकदा अनुभवास आले. त्यावरून मराठीवरील संस्कृतचा प्रभावही उघड झाला आणि संस्कृतचे इंग्रजीपेक्षा प्रादेशिक भाषांतले अनुवाद भारतीयांसाठी अधिक मौल्यवान आहेत हेही जाणवले. मोक्ष, मुक्ती, गृहस्थाश्रम, पूर्वजांचे पुण्य अशा संकल्पना, वेश्या-गणिका यांसारख्या शब्दांतला सूक्ष्म फरक, 'सोड ना आता' वगैरे वाक्यांतला छुप्या संमतीचा अर्थ वगैरे गोष्टी भारतीयांना प्रादेशिक भाषेतूनच अधिक स्वच्छपणे समजतात. त्यामुळे संस्कृत-इंग्रजी- पुन्हा संस्कृत आणि नंतर शेवटी मराठी असा वेडावाकडा घास घेण्याऐवजी संस्कृत ते मराठी असा थेट प्रवास सोपा झाला असता असे फार प्रकर्षाने जाणवले.
२) वेंडी डॉनिजर हे शब्दांतले असे सूक्ष्म फरक तपासतात, भाषांतरांवरची इंग्रजी प्रभावाची पुटे दूर करतात आणि सोप्या पण नेमक्या भाषेत त्याबद्दल लिहितात. त्यामुळे त्यांच्या इंग्रजीतल्या लिखाणातूनही बरेच काही मिळते. प्रसंगी प्रस्थापित मतांशी फारकत घेतही त्या आपल्या विवेकबुद्धीच्या आणि व्यासंगाच्या कसोट्यांवर प्राचीन ग्रंथांकडे पाहतात. असे असताना त्यांच्यासारख्या अभ्यासकांच्या पुस्तकांवर भारतात बंदी आणले जाते हे फारच लाजिरवाणे आहे. त्याचे खापर समस्त भारतीयांवर न फोडता, हिंदू धर्म आपल्या कह्यात ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या सनातनी धर्ममार्तंडांवर डॉनिजर नेम धरतात; पण संस्कृतचे किंवा इंग्रजीचे ज्ञान नसणाऱ्या भारतीयांच्या लक्ष्यात ही बाब आणून देण्यासाठी अशा प्रकारचे स्वतंत्र लेखन प्रादेशिक भाषांतून होणे अधिक गरजेचे आहे.
***
चित्रस्रोत : आंतरजालावरून साभार ()

link - http://aisiakshare.com/node/5247

'कामसूत्रा'मधून दिसणारा वात्स्यायनकालीन भारतीय सुखवस्तु समाज - अरविंद कोल्हटकर

'कामसूत्रा'मधून दिसणारा वात्स्यायनकालीन भारतीय सुखवस्तु समाज

'कामसूत्रा'मधून दिसणारा वात्स्यायनकालीन भारतीय सुखवस्तु समाज
प्रस्तावना
वात्स्यायनाच्या - ज्याचे मल्लनाग वात्स्यायन असेहि नाव पाहण्यात येते - 'कामसूत्र' ग्रंथाचा विषय काय आहे असा प्रश्न जर सर्वसामान्य जाणकार व्यक्तीला केला तर शंभरापैकी नव्वद वेळा असे उत्तर मिळेल की स्त्रीपुरुषांमधील संभोगक्रीडेची तन्त्रे सांगणारा हा ग्रंथ आहे. उत्तर देणाऱ्याच्या मनात त्यावेळी खजुराहो, कोणार्क इत्यादि मंदिरातील ह्या क्रीडेच्या नाना पद्धती दाखविणारी चित्रे तरळत असतात. कामक्रीडेची चौसष्ट आसने वगैरे त्याने बहुधा ऐकलेले असते. योनिमार्गाच्या लांबीनुसार स्त्रियांचे मृगी, वडवा (घोडी) आणि हस्तिनी, तसेच मेहनाच्या म्हणजेच लिंगाच्या लांबीनुसार पुरुषांचे शश (ससा), वृष (बैल) आणि अश्व (घोडा) असे तीन प्रकार असतात. त्यांच्या जोड्या जमवून केलेल्या काही कोष्टकांची अडगळहि त्याच्या डोक्यामध्ये भरलेली असते. (एकंदरीतच संस्कृत शास्त्रकारांच्या प्रघाताप्रमाणे वात्स्यायनाने ठिकठिकाणी वेगवेगळी कोष्टके दिलेली आहेत.) अशा प्रकारच्या सामान्यज्ञानावरून 'कामसूत्र' ग्रंथ हा काही प्रकारचे sex manual असावा असे त्याला वाटत असते. '६४ आसने' अथवा असे काही सूचक शब्द गूगलच्या शोधपेटीमध्ये घालून पाहिले तर ह्या विधानाची पडताळणी करता येईल.
'६४ आसने' ह्या समजुतीबद्दल येथेच थोडे स्पष्ट करावे असे वाटते. स्वत: वात्स्यायनाने ६४ आसने मोजून कोठेच दाखविलेली नाहीत. संभोगक्रियेचे वर्णन 'कामसूत्रा'च्या 'सांप्रयोगिक' ह्या दुसऱ्या अधिकरणामध्ये येते. त्यातील दुसऱ्या अध्यायामध्ये ह्या 'सांप्रयोगिक' नावाच्या अधिकरणाला 'चतु:षष्टि' म्हणजे 'चौसष्ठी' असे पूर्वाचार्य म्हणतात हे त्याने लिहिले आहे - शास्त्रमेवेदं चतु:षष्टिरिति आचार्यवाद: - आणि त्या नावाचा उगम काय ह्याबाबतहि विवरण दिले आहे. त्यानुसार वात्स्यायनाचा पूर्वसूरि बाभ्रव्य ह्याने सांप्रदायिक प्रकरणाच्या चुम्बन, नखक्षत, दन्तव्रण अशा एकूण आठ भागांचे प्रत्येकी पुन: आठ प्रकारांमध्ये विभाजन होते म्हणून ह्या प्रकरणाचे नाव 'चतु:षष्टि' असे विधान केले आहे. त्याचा उल्लेख करून वात्स्यायन म्हणतो की ते चुकीचे आहे कारण 'सांप्रयोगिक' प्रकरणाचे आठाहून अधिक, एकूण दहा, भाग पडतात. अजून एक मत वात्स्यायन उद्धृत करतो. त्यानुसार ऋग्वेदामधील एकूण १०२८ सूक्ते १० मण्डलांमध्ये विभागली आहेत. एकूण ऋग्वेदाचे भाग करण्याची दुसरीहि एक पद्धत आहे ती म्हणजे प्रत्येकी ८ अध्यायांच्या ८ अष्टकांमध्ये तीच सूक्ते बसवायची. ह्या साम्यामुळे ऋग्वेदावरूनच 'सांप्रयोगिक' प्रकरणाला 'चतु:षष्टि' हे नाव मिळाले आहे. वात्स्यायनाला तेहि मान्य नाही. तो अखेर सांगतो की 'चतु:षष्टि' हे नाव वाच्यार्थाने घ्यायची आवश्यकता नाही. जसे सप्तपर्णी वृक्षाला सातच पाने असतात असे नाही, त्याला 'सप्तपर्णी' हे नाव रूढीने चिकटले आहे. तद्वत् 'सांप्रयोगिक' प्रकरणाचे 'चतु:षष्टि' हे नाव रूढीचाच भाग आहे, अधिक काही नाही.
वात्स्यायनाचे जरी असे स्पष्ट सांगणे असले तरी 'चतु:षष्टि' प्रकरणामध्ये चौसष्ट आसने वर्णिली आहेत ह्या विचाराचा जनमानसावरील पगडा कमी होत नाही. 'कामसूत्र' हे sex manual आहे अशा प्रचाराने त्याची विक्री करणारे लेखक प्रत्यक्ष चौसष्ट चित्रे वा जुन्या मंदिरांमधील शिल्पांची छायाचित्रे छापून ह्या भोळ्या कल्पनेला खतपाणीच घालतात.)
कामसूत्र हे sex manual आहे काय?
'कामसूत्र' हे एक sex manual आहे ही समजूत पूर्णत: असत्यहि नाही. 'कामसूत्रा'चा काही भाग निश्चितपणे अशा तन्त्रांची माहिती देण्यासाठी लिहिला गेला आहे. मात्र अशी माहिती देणे हा त्याचा प्रमुख उद्देश नाही आणि शरीरसुख हे एकच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून हे लेखन वात्स्यायनाने केलेले नाही. त्या पलीकडे जाऊन अर्थ आणि काम हे भारतीय विचारातील दोन पुरुषार्थ आयुष्यामध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रकाराने प्राप्त केल्याने धर्माचीहि प्राप्ति होते हे तत्त्व सांगण्याचे कार्य 'कामसूत्र' करते. त्यातहि 'काम' ह्यावर विशेष ध्यान देऊन त्याच्या प्राप्तीच्या मार्गातील टप्पे कोणते आणि ते कसे पार करायचे ह्याचे वस्तुनिष्ठ मार्गदर्शन 'कामसूत्रा'कडून मिळते. 'काम' परिपूर्ण जीवनाला आवश्यक आहे - necessary - पण जीवनाचे तेच एक ध्येय - sufficient - होऊ शकत नाही ही त्याची शिकवण आहे. मनुष्याचे आचरण नेहमी नैतिक आणि नियमांना धरून असावे हा सूर सर्व लेखनात जाणवतो. मद्य कसे बनवावे ही कृति सांगणारे लेखन ज्याप्रमाणे अतिरिक्त मद्यपानाला उत्तेजन देत नाही आणि तसेच शरीरसुख कसे भोगावयाचे हे सांगणारे हे लेखन ते सुख कोठल्या मर्यादेपर्यंत उपभोगावे आणि त्यापलीकडे जीवनाची काय ध्येये आहेत हेहि सांगते. 'काम' हा पुरुषार्थ साधण्याची योग्य वेळ ही ब्रह्मचर्य पाळून विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतरच येते, आधी नाही असे तो स्पष्टपणे म्हणतो. ह्या बाबतीत त्याचे आणि कालिदासाचे एकमत आहे. कालिदासानेहि रघुकुलातील राजांचे वर्णन करतांना 'शैशवेऽभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्' (बालपणामध्ये त्यांनी विद्या मिळविल्या आणि यौवनामध्ये विषयोपभोग केला) असे त्यांचे वर्णन केले आहे.
भारताच्या प्राचीन परंपरेतील ग्रंथ हे बहुश: धर्माचे पालन करावे कारण त्यातूनच मोक्ष मिळतो अशी शिकवण देतात. स्त्री हे सर्व अध:पाताचे मूळ आहे, काम हा षड्रिपूंपैकी एक आहे, इन्द्रियांचे लाड न पुरवता त्यांचे दमन केल्यानेच मोक्ष मिळतो अशा प्रकारची शिकवण देतात. हे ग्रंथ धर्म आणि अर्थ एका बाजूला तर काम त्यांच्या विरुद्ध पक्षात अशी भूमिका मांडतात. वात्स्यायन असे करीत नाही तर कामभावनेला आयुष्यात स्वत:चे स्थान आहे, तिचे योग्य मार्गाने शमन करण्यात काहीहि अयोग्य नाही अशी स्पष्ट भूमिका तो घेतो. प्राचीन पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. वात्स्यायन मात्र अनेक ठिकाणी स्त्रियांना समजून घेण्याची उदार भूमिका घेतांना दिसतो.
'कामसूत्र' कोणासाठी?
हा ग्रंथ लिहिला गेला आहे तो मोठया नगरामध्ये राहणाऱ्या समृद्ध 'नागरका'ला समोर ठेवून. 'कामसूत्र'कालीन दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील भारतीय समाज हा समृद्ध समाज होता. अशा समाजाचा घटक असलेल्या समृद्ध नागरकाची राहणी कशी असावी, त्याने आपले जीवन कसे जगावे अशी दृष्टि हा ग्रंथ देतो. ह्या ग्रंथाच्या शिकवणुकीचा रोख असलेल्या तरुण स्त्रियाहि समाजाच्या अशाच वरच्या थरातील आहेत. राजा, त्याचे महामात्र आणि मन्त्री, राजाच्या चाकरीमधल्या उच्च स्थानावरच्या सेवकांच्या कन्या आणि पत्नी ह्यांना समोर ठेवून वात्स्यायनाने ग्रंथ लिहिला आहे हे जाणवते. ह्या वरच्या समाजामध्ये नागरकाच्या पत्नीचे स्थान काय, तिने कसे आचरण ठेवावे हे हा ग्रंथ सांगतो. ह्या समाजामध्ये 'गणिका' ह्या वर्गाला स्वत:चे स्थान होते. 'मृच्छकटिक' नाटकातील वसन्तसेना, बौद्ध संप्रदायातील आम्रपाली, 'कुट्टनीमत' काव्यातील मालती, अशा गणिकांच्या वर्तनावरून त्यांच्या सांस्कृतिक पातळीची, शिक्षणाची आणि सामाजिक स्थानाची कल्पना येते. गणिकावृत्ति हा विषयहि विस्ताराने 'कामसूत्रा'मध्ये दाखविला आहे. दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील नागरकांचे आणि त्यांच्या समपातळीच्या लोकांचे भौतिक जीवन कसे होते, त्यांचा दिनक्रम काय होता, त्यांचे छंद आणि विरंगुळ्याचे मार्ग काय होते ह्याचे दुर्मिळ दर्शन ह्या ग्रंथामधून होते.
वात्स्यायनाची ओळख
हा ग्रंथ लिहिणारा वात्स्यायन कोण होता, तो कोठल्या भागातला आणि त्याने ग्रंथ कोणत्या काळात लिहिला ह्याबाबत निश्चित अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. अन्तर्गत पुरावा, अन्य ग्रंथांशी तुलना, वात्स्यायनाचा स्पष्ट उल्लेख अन्य लेखनामध्ये मिळणे अशा मार्गाने काही तर्क बांधता येतात, ते असे:
आपस्तंबाच्या गृह्यसूत्रांतील काही शब्दरचना 'कामसूत्रा'मध्ये तशाच्या तशा किंवा फार थोड्या फरकाने आलेल्या आहेत. आपले काही पूर्वसूरि म्हणजे पांचाल देशात होऊन गेलेला बाभ्रव्य, पाटलिपुत्रातील गणिकांच्या विनन्तीवरून लेखन करणारा दत्तक, काश्मीरवासी गोनर्दीय आणि गोणिकापुत्र, सुवर्णनाभ, चारायण, घोटकमुख आणि कुचुमार ह्यांच्या लेखनाचे उल्लेख 'कामसूत्रा'त अनेक जागी मिळतात. पैकी गोनर्दीय आणि गोणिकापुत्र ही दोन्ही नावे पाणिनीच्या महाभाष्यात दिसतात. गोणिकापुत्र हे पाणिनीचेच एक नाव आहे असे एक मत आहे. वात्स्यायनाची काही सूत्रांची शब्दरचना पाणिनीच्या महाभाष्यामधून घेतल्यासारखे जाणवते. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचीहि छाया 'कामसूत्रा'मध्ये कोठेकोठे जाणवते. किंबहुना वात्स्यायन आणि अर्थशास्त्राचा लेखक विष्णुगुप्त हे एकच व्यक्ति होते असेहि एक मत आहे. ह्या सर्वावरून असे म्हणता येईल की वात्स्यायन हा पाणिनि आणि कौटिल्य ह्यांचा उत्तरकालीन आहे आणि इसवी सनपूर्व चौथे शतक ही वात्स्यायनाच्या कालाची वरची सीमा आहे.
वात्स्यायनाच्या कालाची खालची सीमा म्हणजे तो कालिदासाला पूर्वकालीन दिसतो. कालिदासाला 'कामसूत्र' ग्रंथ माहीत असावा कारण शाकुन्तल नाटकामध्ये वात्स्यायनाचेच शब्द एका जागी वापरलेले दिसतात. नाटकाच्या चौथ्या अंकात काश्यप मुनि आश्रम सोडून पतिगृही निघालेल्या शकुन्तलेला जो उपदेश करतात त्यामध्ये हा पुढील प्रख्यात श्लोक आहे:
शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने
भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधयः॥
(शाकुन्तल ४.१८)
(काश्यपमुनि शकुन्तलेस उद्देशून) मोठयांची सेवा कर, अन्य सवतींशी मैत्रिणींप्रमाणे वाग, पतीने राग केला तरी रुष्ट होऊ नकोस, सेवकांशी प्रेमाची वर्तणूक ठेव आणि स्वभाग्यामुळे गर्व बाळगू नकोस. असे करणाऱ्या स्त्रिया गृहिणी म्हणून आदरास पात्र होतात, ह्याउलट वागणाऱ्या कुटुंबाला खाली नेतात.
ह्या श्लोकाच्या तिसऱ्या चरणामध्ये 'भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी' ह्याऐवजी 'भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भोगेष्वनुत्सेकिनी' असा पाठ बंगाल भागामध्ये सापडतो. ह्या पाठातील शब्द आणि संकल्पना 'कामसूत्रा'मध्ये 'भार्याधिकारिक' ह्या क्र. ४ च्या अधिकरणामध्ये १ल्या अध्यायात भेटतात. पत्नीने आपली वर्तणूक कशी ठेवावी हे सांगताना 'भोगेष्वनुत्सेक:। परिजने दाक्षिण्यम्' अशी तेथील शब्दरचना आहे आणि तिचेच प्रतिबिंब वरील श्लोकामध्ये आहे. रघुवंश काव्यातील ७व्या सर्गात इन्दुमतीने राजपुत्र अज ह्याला स्वयंवरामध्ये वरल्यावर अज जेव्हा इंदुमतीचे पाणिग्रहण करतो - तिचा हात आपल्या हाताने धरतो - तेव्हा कालिदास त्या प्रसंगाचे वर्णन करतांना सांगतो:
आसीद्वर: कण्टकितप्रकोष्ठ: स्विन्नाङ्गुलि: संववृते कुमारी। (७.२२.१)
(वराचे मनगट रोमांचित झाले, कुमारीच्या बोटांना घाम सुटला.)
ह्यावर टीकाकार मल्लिनाथ लिहितो: अत्र वात्स्यायन: - कन्या तु प्रथमसमागमे स्विन्नाङ्गुलि: स्विन्नमुखी च भवति। पुरुषस्तु रोमाञ्चितो भवति। एभिरनयोर्भावं परीक्षेत।
(येथे वात्स्यायन लिहितो - पहिल्या भेटीत कन्येच्या बोटांना आणि मुखाला घाम येतो तर पुरुष रोमांचित होतो. ह्यावरून त्यांच्या भावना समजतात.) अशी अन्यहि साम्यस्थळे आहेत ज्यावरून असे म्हणता यावे की वात्स्यायनाच्या 'कामसूत्रा'शी कालिदास परिचित होता. सुबन्धु ह्या कवीने 'वासवदत्ता' नावाचे गद्यकाव्य रचले आहे. त्यामध्ये विन्ध्य पर्वताच्या वर्णनामध्ये जी विशेषणांची मालिका आहे त्यामध्ये 'कामसूत्रविन्यास इव मल्लनागघटित: कान्तारसामोदय:' ह्या वर्णनामध्ये वात्स्यायनाने रचलेल्या कामसूत्राचा प्रत्यक्ष उल्लेख आहे. कालिदास आणि सुबन्धु इसवी सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेले असे मानले तर वात्स्यायन त्याआधीचा असे म्हणावे लागते.
वात्स्यायनाच्या कालनिर्णयासाठी 'कामसूत्रा'मधील काही उल्लेख मार्गदर्शक आहेत. दुसऱ्या अधिकरणाच्या ७ व्या अध्यायामध्ये सुरतक्रीडेमध्ये प्रतिपक्षाला दिलेल्या वेदना आणि दु:ख हेहि सुखकारक असतात असे वात्स्यायन सांगतो. मात्र हे टोकाला जाता कामा नये - आत्यन्तिकं तु परिहरेत् - असेहि तो बजावतो. तेथे अशा अतिरेकाचे उदाहरण म्हणून तो पुढील संदर्भ देतो: कर्तर्या कुन्तल: शातकर्णि: शातवाहनो महादेवीं मलयवतीम् (जघान)। (शातवाहनकुलातील कुन्तल शातकर्णीने महाराणी मलयवतीला कात्रीने मारून टाकले.) वात्स्यायनाच्या आठवणीत किंवा ऐकण्यात ही घटना आहे असे दिसते. अर्थात् वात्स्यायनाचा काल कुन्तल शातकर्णीनंतरचा असणार. हा राजा इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये होऊन गेला. त्याचप्रमाणे आभीरांचे उल्लेख ग्रन्थामध्ये काही ठिकाणी आलेले आहेत. 'परिष्वङ्गचुम्बननखदन्तचूषणप्रधाना: क्षतवर्जिता: प्रहणनसाध्या मालव्य आभीर्यश्च' - मालव आणि आभीर प्रान्तातील स्त्रियांना आलिंगन, चुंबन, नखव्रण, दन्तव्रण आणि चोषण आवडते, व्रण न करता केलेल्या प्रहारांनी त्या वश होतात.आभीरं हि कोट्टराजं परभवनगतं भ्रातृप्रयुक्तो रजको जघान - ह्या मागची कथा यशोधर सांगतो: श्रेष्ठी वसुमित्राच्या घरात त्याच्या भार्येच्या अभिलाषाने शिरलेल्या आभीर कोट्टराजाचा त्याचे राज्य हवे असलेल्या त्याच्या भावाने परटाकरवी घात केला. आभीर राजांची लहानलहान राज्ये माळवा प्रान्तात सन २२५ च्या पुढेमागे होती असे मानले जाते. ह्यावरून वास्यायनाचा काल इ.स. २५० ते इ.स. ४०० ह्या काळात पडतो असे म्हणता येते.
वात्स्यायन प्राचीन भारताच्या कोणत्या भागात राहात असावा ह्याबाबत मात्र पुराव्याच्या अभावी काहीच सांगता येत नाही. पश्चिमोत्तर भागातील बाह्लीकांच्या (बॅक्ट्रिया) प्रदेशापासून ते दक्षिणापथापर्यंत आणि पश्चिम किनाऱ्यावरील अपरान्तापासून (कोकण) ते पूर्वेकडील वंग-कलिंग-कामरूपापर्यंत अनेक प्रदेशांचे आणि तेथे राहणाऱ्या लोकांच्या सवयींचे वर्णन वात्स्यायन करतो. ह्या सर्व प्रदेशांबद्दल त्याला कमीअधिक माहिती होती असे दिसते. कालिदास विदिशा-उज्जयिनी भागाचे वर्णन रंगून करतो त्यावरून तो तेथलाच असावा असा तर्क बांधता येतो. अशी कोठलीच खूण वात्स्यायन मागे ठेवत नाही. अपरान्त, लाट (गुजराथ), सौराष्ट्र, महाराष्ट्र, विदर्भ, वत्सगुल्मक - वाशीम - अशा उल्लेखांची तुलनेने अधिक संख्या पाहता त्यावरून असे वाटते की तो भारताच्या पश्चिम प्रदेशाचा रहिवासी असावा. दाक्षिणात्य हे मामाच्या मुलीशी विवाह करणे पसंत करतात ह्या त्याच्या नापसंतीदर्शक विधानावरून त्याचा दक्षिणेशी परिचय चांगला होता पण तो तेथला राहणारा नसावा असे म्हणता येते. आजहि कर्नाटकाच्या ग्रामीण भागात ही चाल दिसते असे ऐकले आहे.
कामसूत्राचा अलीकडचा प्रसार
संपूर्णतया ऐहिक अशा विषयाला वाहिलेला हा ग्रंथ १९व्या शतकाचा अखेरीपर्यंत सर्वसामान्य वाचकाला माहीतच नव्हता. तो जगापुढे कसा आला ह्याचा इतिहास मनोरंजक आहे. १९व्या शतकामध्ये हिंदुस्तानातील ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये सर रिचर्ड बर्टन (१८२१-१८९०) हे रंगतदार व्यक्तिमत्त्व उठून दिसते. मूळचे बॉंबे आर्मीतील बर्टन हे पौर्वात्य भाषांचे जाणकार, आणि धाडसी प्रवासी म्हणून आपल्या माहितीचे आहेत. दरवेशाच्या वेषामध्ये मक्का-मदिना ह्या अन्य धर्मीयांना बंदी असलेल्या स्थळांचा प्रवास, नाइल नदीच्या उगमाचा आणि टांगानिका सरोवराचा शोध अशासाठींचे त्यांचे प्रवास ह्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. अरेबियन नाइट्स् हे पुस्तकहि त्यांनी जगापुढे आणले. १८८० च्या सुमारास बर्टन आणि त्यांचे एक सहकारी आय.सी.एस. सेवेमधील सेवानिवृत्त अधिकारी फॉस्टर फिट्झजेराल्ड अर्बथनॉट (१८३३-१९०१) हे कामशास्त्राला वाहिलेल्या 'अनंगरंग' ह्या कल्याणमल्लाने १६व्या शतकामध्ये लिहिलेल्या संस्कृत ग्रंथाच्या भाषान्तरामध्ये गढलेले होते. त्यावेळी अशा ग्रंथांमध्ये वात्स्यायनकृत 'कामशास्त्र' हा ग्रंथ सर्वात जुना आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्याची बिनचूक आणि पूर्ण प्रत मिळणे दुरापास्त होते म्हणून मुंबई, कलकत्ता, जयपूर आणि वाराणसी येथे शोध घेऊन चार प्रती आणि ग्रंथावर १३व्या शतकामध्ये लिहिली गेलेली यशोधराची 'जयमंगला' ही टीका ही हस्तलिखिते उपलब्ध झाली. त्यांची एकमेकांशी तुलना करून एक शुद्ध प्रत बनविण्याचे काम पंडितांनी केले आणि १९व्या शतकातील प्रख्यात पुरातत्त्व अभ्यासक भगवानलाल इन्द्राजी आणि मुंबई विद्यापीठात तेव्हा शिक्षण घेत असलेले शिवराम परशुराम भिडे ह्या दोघांनी त्याचे इंग्लिश भाषान्तर तयार केले. हे भाषान्तर लंडनमधील 'The Hindoo Kama Shastra Society' मार्फत १८८३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. विक्टोरिअन समाजाच्या नैतिक वर्तणुकीच्या बंदिस्त नियमांपासून आणि Obscene Publications Act, 1857 सारख्या तत्कालीन अश्लीलताविरोधी कायद्यांपासून सुटका मिळविण्यासाठी पुस्तकाचे खाजगी वाटप केवळ सोसायटीच्या सदस्यांपुरते मर्यादित ठेवण्यात आले आणि पुस्तकाच्या केवळ २५० प्रती छापून सदस्यांना वाटण्यात आल्या. त्यामध्ये भाषान्तरकर्त्यांची नावे देण्यात आली नाहीत तसेच बर्टन आणि अर्बथनॉट ह्यांचीहि नावे कोठे दिसत नाहीत. अजून एक गमतीची बाब अशी की अश्लीलता कायद्यापासून आणखी सुरक्षा मिळविण्यासाठी ब्रिटनमधल्या वाचकास सहज समजतील असे penis आणि vagina हे शब्द पूर्णपणे टाळून त्यांच्या जागी संस्कृतमधून उचललेल्या lingam आणि yoni ह्या शब्दांचा वापर केला आहे. (ह्याच The Hindoo Kama Shastra Society कडून नंतर बर्टनच्या 'अरेबियन नाइट्स्' ह्या पुस्तकाचे वितरण झाले. 'कामशास्त्र' पुस्तकाला बर्टन ह्यांची प्रस्तावना सहीशिवायची आहे. अशा रीतीने १९व्या शतकाच्या अखेरीच्या दिवसांमध्ये हे पुस्तक प्रथम जगापुढे आले. ह्या पुस्तकात छापलेले भाषान्तर बर्टनचे आहे अशी समज सर्वत्र रूढ होती, पण बर्टन ह्यांना स्वत:ला संस्कृत वाचता येत नसे.
मर्यादित वर्तुळामध्ये पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला. बंदिस्त वातावरणात ताज्या वाऱ्याची झुळुक यावी असे वाचकांना वाटले. तत्कालीन विक्टोरियन समाजात 'काम' ह्या भावनेचे जीवनातील महत्त्व मानण्याची प्रथा नव्हती. स्त्रियांना कामवासनाच नसते असल्या वेडगळ विचारांचा पगडा लोकांच्या मनावर होता. विवाहसंबंध म्हणजे आपल्याला हवे ते सुख नवऱ्याने ओरबाडून घ्यायचे इतकेच बहुतेकजण मानत असत. अशा वातावरणात कामभावना पुरुष आणि स्त्री दोघांच्याहि मनात नैसर्गिक असते आणि तिचे योग्य रीतीने शमन हा सुखी जीवनाचा पाया आहे, असा नवा विचार ह्या पुस्तकाने विक्टोरियन समाजापुढे मांडला.
अश्लीलता विरोधी कायद्यांच्या भीतीने बर्टन आणि फिट्झजेराल्ड पुस्तकाच्या उपयुक्ततेविषयी फार उघडपणे बोलायला चाचरत असावेत तरीहि आपल्या सहीशिवायच्या प्रस्तावनेमध्ये ते असे म्हणतात:
After a perusal of the Hindoo work, and of the English books above mentioned, the reader will understand the sub­ject, at all events from a materialistic, realistic, and practical point of view. If all science is founded more or less on a stratum of facts, there can be no harm in making known to mankind generally certain matters intimately connected with their private, domestic, and social life.
Alas! Complete ignorance of them has unfortunately wrecked many a man and many a woman, while a little knowledge of a subject generally ignored by the masses would have enabled numbers of people to have understood many things which they believed to be quite incomprehensible, or which were not thought worthy of their consideration.
ब्रिटनमध्ये हे पुस्तक छापले गेले ह्यापासून प्रेरणा घेऊन जयपूर दरबारातील विद्वान महामहोपाध्याय दुर्गाप्रसाद ह्यांनी यशोधराच्या 'जयमंगला' टीकेसह देवनागरीमध्ये मूळ ग्रंथ १८९१ साली हिंदुस्तानात पहिल्यांदा प्रकाशित केला. असा ग्रंथ प्रकाशित होणे आवश्यक आहे हे त्यांना स्वत:ला पटलेले असूनहि तकालीन रीतिरिवाजांना हे पुस्तक रुचणार नाही ह्याचीहि त्यांना जाणीव होती. म्हणून पुस्तक कोठेच विक्रीस न ठेवता लेखकाकडून प्रत पोस्टाने मागवून घेणे हा एकच विक्रीचा मार्ग त्यांनी खुला ठेवला होता. ह्या विषयी आपल्या प्रस्तावनेमध्ये ते लिहितात: 'यद्यपि पण्डितमात्रगम्यप्रौढसंस्कृतनिबद्धस्यास्य ग्रन्थस्य प्रकटतयापि कृते प्रचारे न कापि साधारणजनक्षतिशङ्का किंतु वर्तमानव्यवहारानुरोधेन गुप्ततयैव विद्वत्स्वेवास्य प्रचारं चिकीर्षामि।' (पंडितांनाच समजेल अशा प्रौढ संस्कृतात लिहिलेल्या ह्या ग्रंथाचा उघड प्रचार केला तरी सर्वसामान्य जनांस त्यापासून काही नुकसानी नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानव्यवहाराला धरून गुप्ततेने विद्वानांमध्येच त्याचा प्रचार व्हावा अशी माझी इच्छा आहे.)
तदनंतर १९२९ मध्ये वाराणसीच्या 'चौखंबा संस्कृत सीरीज्' मध्ये गोस्वामी दामोदर शास्त्री ह्यांनी संपादिलेली अशी ह्या ग्रंथाची नवी आवृत्ति निघाली. तदनंतर अनेकांनी आपपल्या आवृत्त्या वा भाषान्तरे प्रकाशात आणली आहेत आणि ह्या ग्रंथाविषयीचे गूढतेचे, गैरसमजांचे आणि अज्ञानाचे वलय बऱ्याच प्रमाणात आता दूर झाले आहे असे वाटते.
कामसूत्रातील विषय
ह्या प्रस्तावनेनंतर ग्रंथाच्या अन्तर्भागामध्ये काय आहे ह्यावर ओझरती दृष्टि टाकू. एकूण ग्रंथ गद्यामध्ये सूत्ररूपाने लिहिला आहे आणि मधूनमधून काही श्लोक भेटतात. श्लोकांपैकी काही वात्स्यायनाचे स्वरचित दिसतात तर काही वात्स्यायनाने अन्य पूर्वसूरींचे वापरले आहेत. ग्रंथाचे सात भाग केले आहेत आणि त्या प्रत्येक भागास 'अधिकरण' असे नाव आहे. प्रत्येक अधिकरणात काही अध्याय आणि प्रत्येक अध्यायात एक वा अधिक प्रकरणे आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये क्रमांकाने गद्यरूप सूत्रे दिली आहेत आणि मधूनमधून अधिक स्पष्टीकरणासाठी अज्ञात कवींचे श्लोक उद्धृत केले आहेत. प्रत्येक प्रकरणात एक विशिष्ट प्रश्न घेऊन त्याचा विचार केलेला आहे. असे ६४ प्रश्न ६४ प्रकरणात विवेचिले आहेत. सात अधिकरणे अशी:
१. साधारण - (अधिकरण १, अध्याय ५, प्रकरणे ५). ह्या अधिकरणाच्या पहिल्या प्रकरणात कामशास्त्रामध्यें कोणते विषय आहेत, त्यांची अनुक्रमणिका दिली आहे. त्यालाच ग्रंथकाराने 'शास्त्रसंग्रह' असे नाव दिले आहे. दुसऱ्या प्रकरणात धर्म, अर्थ व कामरूपी त्रिवर्गाची आवश्यकता मनुष्यास कितपत पाहिजे याची सोपपत्तिक माहिती दिली आहे. ह्याला 'त्रिवर्गप्रतिपत्ति' असे नाव ग्रंथकाराने दिले आहे. 'विद्यासमुद्देश' नांवाच्या तिसऱ्या प्रकरणात कामशास्त्र शिकण्याला अधिकारी कोण, व्यावहारिक किंवा शास्त्रीय ज्ञान ह्यांपैकी स्त्रियांना कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची विशेष जरूरी आहे, ह्याचा विचार केला आहे. शिष्ट समाजातील स्त्रिया, पुरुष आणि गणिका ह्यांना माहीत असाव्यात अशा चौसष्ट कलांची यादी येथे आहे. विशेषत: स्त्रियांनी हे कलाज्ञान स्वत:च्या दाईची आपल्याबरोबर लहानाची मोठी झालेली मुलगी, विश्वासातील मैत्रीण, समवयस्क मावशी, जुनी सेविका, भिक्षुणी झालेली स्त्री अथवा विश्वासातील बहीण ह्यांच्याकडून एकान्तात मिळवायचे आहे. (दीपा मेहतांच्या 'कामसूत्र' ह्या चित्रपटामध्ये सिनेतारका रेखा अशाच एका व्यवसायनिवृत्त गणिकेच्या भूमिकेमध्ये गणिकाव्यवसायामध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या तरुणींना असे शिक्षण देते हा प्रसंग आठवतो.)
नागरकाने कसे वागावे, त्याचा रोजचा व्यवहार कसा असावा, त्याचे मित्र कोणत्या जातीचे किंवा दर्जाचे असावेत ह्याचा विचार पुढच्या 'नागरकवृत्त' ह्या चौथ्या प्रकरणात केला आहे. त्यापुढील पाचव्या प्रकरणात नायकाला साहाय्य करणारे दूत वा दूती कसे असावेत, त्यांची कार्ये कोणती असा विचार असून त्याला 'नायकसहायदूतीकर्मविमर्श' असे नांव दिले आहे.
२. सांप्रयोगिक - (अधिकरण २, अध्याय १०, प्रकरणे १७):- 'संप्रयोग' ह्याचा शब्दश: मूळ अर्थ म्हणजे 'जोडले जाण्याची स्थिति'. स्त्री-पुरुषमैथुनालाहि लक्षणेने हे वर्णन लावता येते आणि येथे तोच अर्थ अभिप्रेत आहे. सांप्रयोगिक अधिकरण म्हणजे ज्यामध्ये संप्रयोगाची चर्चा आहे असे अधिकरण. पुरुषांचे तीन विभागामध्ये आणि स्त्रियांचे तीन विभागात विभाजन होऊ शकते असे प्रारम्भी म्हटलेच आहे. त्यातील समान स्त्री-पुरुषांचा व्यवहार म्हणजे समरत. वीर्यस्खलनामुळे समसमान स्त्री-पुरुषांपैकी कोणास प्रारंभी आणि कोणास नंतर वीर्यपतनामुळे सुख होते ह्याचा बऱ्याच तपशीलाने विचार त्यापुढील 'प्रीतिविशेष' प्रकरणामध्ये केलेला आहे. प्रीतिविशेषाला वाढविणारी अन्य कारणे त्यानंतरच्या प्रकरणांमध्ये दिली आहेत. चुंबन, नखदंतप्रहरण, निरनिराळ्या देशांतील चुंबनादिकांचे रीतिरिवाज, नायिकेकडून नायकाप्रमाणे कृति केली जाणे (पुरुषायित), षंढसमागमवर्तन, प्रणयकलह, पशुपक्ष्यांचे अनुकरण करून निरनिराळ्या प्रकारांनी करता येऊ शकणाऱ्या रतिक्रीडा (चित्रयोग) अशी ही दुसऱ्या अधिकरणामधील अन्य प्रकरणे आहेत.
३. कन्यासंप्रयुक्तक - (अधिकरण ३, अध्याय ५, प्रकरणे ९) :- तिसऱ्या अधिकरणामध्ये नक्षत्रे व लक्षणे या दृष्टीने विवाह करण्यास योग्य म्हणजे भावी कल्याण सुचविणारी कन्या कशी असावी, वधूवरांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थाची भूमिका काय, उपवर कन्येच्या घरातील वडीलधाऱ्यांनी वरसंशोधन कसे करावे, विवाह झाल्यावर नूतनपतीने नवोढा पत्नीशी शारीरिक स्पर्शांमधून ओळख कशी वाढवावी जेणेकरून दोघांमध्ये प्रेम उत्पन्न होईल अशा गोष्टींचा विचार या अधिकरणामध्ये केला आहे. म्हणून ह्याला 'कन्यासंप्रयुक्तक' असे नाव आहे.
४. भार्याधिकारिक - (अधिकरण ४, अध्याय २, प्रकरणे ८):- भार्या, पुनर्भू व वेश्या या त्रिविध नायिकांनी घरामध्ये कसे वागावे, याचा येथे विचार केला असल्यामुळे अधिकरणास 'भार्याधिकारिक' म्हटले आहे. या अधिकरणात आदर्श भार्येचे वर्तन, भार्येने करावयाची कामे, गृहकृत्यांविषयी दक्षता आणि बहुपत्निक घरामध्ये भार्येने अन्य सपत्नींशी कसे वर्तन ठेवावे ह्याचे मार्गदर्शन आहे. अक्षतयोनि विधवेचा (जिचा विवाह झाल्यावर पतीशी संबंध येण्यापूर्वीच पति वारला अशी स्त्री) पुनर्विवाह होऊ शकत होता असे दिसते. तसेच पति मृत झाल्यानंतरहि शारीरिक भूक भागविण्याची इच्छा असलेल्या स्त्रीला दुसऱ्या पुरुषाबरोबर राहण्याची संमति होती असे दिसते, मात्र तिला विधिवत् पुनर्विवाह करता येत नव्हता. अशा दोन्ही प्रकारच्या पत्नींना 'पुनर्भू' असे म्हटले आहे. (ह्या बाबतीत वात्स्यायन मनूपेक्षा अशा स्त्रियांना अधिक स्वातन्त्र्य देणारा दिसतो. मनूला कोठल्याहि विधवेचा पुनर्विवाह अमान्य आहे. मनुस्मृति अध्याय ९ मध्ये केवळ निपुत्रिका विधवेला एका पुत्राची प्राप्ति करण्यासाठी 'नियोग' पद्धति वापरण्याची मुभा तो देतो.) 'पुनर्भू' पत्नीने वर्तन कसे ठेवावे हे ह्या अधिकरणामध्ये सांगितले आहे. पतीच्या प्रेमाला पूर्णत: पारख्या झालेल्या पत्नीने कसे वर्तन करावे हे त्यापुढे सांगितले आहे. राजाच्या अन्त:पुरातील स्त्रियांचे व्यवहार उपरोक्त पद्धतीने होतात कारण तेथेहि विवाहित राण्या, पुनर्भू, वेश्या आणि नाटकशाला अशा चार पातळ्यांवरील स्त्रिया असत. अधिकरणाच्या अखेरीस राजाने आपल्या अन्त:पुरातील स्त्रियांशी कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन आहे. असे दिसते की दुपारच्या निद्रेनंतर राजाने अन्त:पुरामध्ये जाऊन सर्व राण्या आणि अन्य स्त्रियांशी त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार वार्तालाप करावा. ह्या सर्व राण्यांमध्ये राजाच्या शयनगृहामध्ये जाण्याच्या पाळ्या असत आणि ह्या पाळ्यांची देखरेख करणासाठी कंचुकी आणि महत्तरिका नावाच्या सेविका असत. जिची पाळी आहे ती आणि ज्यांच्या पाळ्या पूर्वी काही प्रकाराने चुकल्या असतील अशा अन्त:पुरातील स्त्रिया आपापल्या सेविकांच्या हस्ते राजासाठी आलेपने आणि आपल्या आपल्या अंगठया कंचुकीकडे पाठवीत आणि कंचुकी त्या सर्व गोष्टी राजापुढे ठेवीत. राजा त्यापैकी जिचे आलेपन आणि अंगठी उचलेल तिची त्या रात्री पाळी असा नियम दिसतो.
५. पारदारिक - (अधिकरण ५, अध्याय ६, प्रकरणे १०):- परस्त्रीला आपल्या नादी लावण्यासाठी पुरुषामध्ये काय गुण पाहिजेत, अशी नादी लागू शकणारी स्त्री कशी ओळखावी, मनात भरलेल्या स्त्रीला वश करून घेण्यासाठी कशा प्रकारची व्यक्ति दूतकर्म करू शकते. अशा दूत किंवा दूतीने हे कार्य पार पाडण्यासाठी काय केले पाहिजे असे विषय ह्या अधिकरणाच्या पहिल्या ५ प्रकरणांमध्ये वर्णन केले आहेत. त्यानंतरची प्रकरणे अन्त:पुरात राहणाऱ्या स्त्रियांविषयी आहेत. अन्त:पुरात राहणाऱ्या अनेक स्त्रियांमध्ये एकच पति असतो. त्यामुळे काहीजणी शरीरसुखापासून वंचित राहतात. अशा स्त्रियांनी कृत्रिम साधने वापरून - उदा. केळ्यासारखे फळ, लिंगधारी पुरुषाकृति इ. - सखी अथवा दासीच्या मदतीने स्वत:चे रंजन करावे, स्त्री न मिळवू शकणाऱ्या पुरुषाने हस्तमैथुन करावे, अन्त:पुरातील स्त्रियांच्या दासी आणि परिचारिकांनी बाहेरील नागरकांना आशा दाखवून आत आणावे, मात्र अशा नागरकांनी ह्या करण्यातील धोके ध्यानात ठेवून अशा आकर्षणांपासून दूर राहावे, अन्त:पुरामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या पुरुषाने काय काळजी घेतली पाहिजे आणि कशापासून सुरक्षित राहायला पाहिजे अशा प्रकारचे उपदेश वात्स्यायन देतो.
६. वैशिक - (अधिकरण ६, अध्याय ६, प्रकरणे ६):- गणिका - वेश्या ह्या विषयाच्या सन्दर्भातील माहिती ह्या अधिकरणामध्ये दिलेली आहे म्हणून या प्रकरणाला 'वैशिक' अधिकरण असे नाव आहे. यामध्ये वेश्येने वागण्याचे नियम, वेश्येस मदतनिसांची आवश्यकता, संबंध ठेवण्यास योग्य आणि अयोग्य पुरुष विचार, लक्ष्य केलेल्या पुरुषाकडून द्रव्य मिळविण्याचे मार्ग, विरक्त पुरुषास अनुरक्त करण्याचे उपाय, द्रव्यरहित पुरुषास घालवून देण्याचा मार्ग, इत्यादि प्रकरणे या अधिकरणामध्ये आहेत.
७. औपनिषदिक - (अधिकरण ७, अध्याय २, प्रकरणे ६):- वशीकरण, लिंगवृद्धि वगैरेसाठीचे तोडगे आणि उपाय या अधिकरणामध्ये सांगितलेले आहेत म्हणून याला औपनिषदिक (गुप्‍त उपाय अधिकरण) असे नाव आहे.
वात्स्यायनाच्या ग्रन्थाचा हा विस्तृत आवाका पाहता असे दिसते की ज्या वाचकाला केवळ एक sex manual हवे आहे त्याने आपला वेळ ह्या ग्रन्थामध्ये न दवडता 'अनंगरंग' कल्याणमल्लाने १६व्या शतकामध्ये लिहिलेल्या ग्रन्थाकडे जावे हे उचित, कारण तेथे वात्स्यायनाच्या ग्रन्थातील दुसरे अधिकरण (संभोगक्रियांचे वैविध्य) आणि सातवे अधिकरण (वशीकरण, आकार वाढविण्यासाठीचे जादूटोणे) इतकेच दिले आहे.
हे झाले 'कामसूत्रा'तील विषयांचे ओझरते दर्शन. आता ग्रंथामध्ये प्राचीन भारतीय नागर जीवनाचे काय दर्शन घडते ते पाहू.
नागरक
वात्स्यायनाचा ग्रंथ म्हणजे समृद्ध नागरकाचा मार्गदर्शक आहे. अशा नागरकाने आपले ब्रह्मचर्यवृत्तीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि नागरकाचे जीवन जगण्यासाठी पुरेसे धन आणि फावला वेळ त्याच्यापाशी उपलब्ध आहे. तो वरच्या तीन वर्णांपैकी एका वर्णाचा आहे. त्याचे धन धर्मशास्त्राला मान्य अशा मार्गाने त्याने जमविले आहे. हे मार्ग म्हणजे ब्राह्मणाच्या बाबतीत त्याला यज्ञकार्य, अध्यापन अशातून मिळणारी दक्षिणा, क्षत्रियाच्या बाबतीत सैनिकी व्यवसायाचे धन आणि वैश्याच्या बाबतीत व्यापार, सावकारी इत्यादि. वारसाने आलेला पैसाहि ह्या कामाला उपयोगी येतो. एखाद्या तरुणाचा पिता मोठा राजपुरुष आणि राजाचा विश्वासू असेल तर अशा पित्याचे धन त्याच्या मुलाच्या नागरकवृत्तीने राहण्याच्या कामी येऊ शकते. 'कुट्टनीमतम्' (कुंटिणीचा उपदेश) ह्या काश्मीरच्या राजाचा मन्त्री दामोदरगुप्त ह्याने आठव्या शतकामध्ये रचलेल्या काव्यात 'राजपुरुषाचा पुत्र चिन्तामणि हा तुला योग्य सावज आहे' असा सल्ला विकराला नावाची कुंटीण मालती ह्या तरुण गणिकेला देतांना दिसते. एखाद्याजवळ चौसष्ट कलांचे ज्ञान असेल पण पैशाचा अभाव असेल तर असा मनुष्य 'पीठमर्द' किंवा 'विट' असा दुसऱ्या नागरकाचा मित्र बनून त्याच्या साहाय्याने नागरक जीवनाचा लाभ घेऊ शकतो. ह्यांपैकी विशेषत: विट अनेक संस्कृत नाटकांमधून भेटतो. ('Libertine' आणि 'pander' हे अनुक्रमे पीठमर्द आणि विट ह्यांचे चांगले समानार्थी शब्द आहेत.)
अशा नागरकाने आपल्या निवासासाठी एखादे पत्तन, नगर, किवा लहानमोठे खर्वट, असे निवडून तेथे राहावे. त्यामध्ये अन्यहि प्रतिष्ठित लोक राहतात, तसेच नागरकाला आपला व्यवसायहि चालवता येतो. (नगरांच्या ह्या प्रकारांचे यशोधराने दिलेले स्पष्टीकरण असे आहे. पत्तन म्हणजे राजधानीची जागा, नगर म्हणजे ८०० गावांचे केन्द्र असलेले मोठे गाव, मोठे खर्वट - ह्याला 'द्रोणमुखी' असेहि म्हणतात - म्हणजे ४०० गावांचे केन्द्र आणि खर्वट म्हणजे २०० गावांचे केन्द्र.) प्राचीन भारतामध्ये वात्स्यायनाच्या वेळी अनेक लहानमोठी राज्ये सर्वत्र विखुरली होती आणि त्या प्रत्येक राज्याचे लहानमोठे राजधानीचे नगर होते. अशा अनेक नगरांची नावे आणि वर्णने आपल्याला तत्कालीन वाङ्मयामध्ये दिसतात. आजच्या तुलनेने खूपच कमी लोकसंख्या आणि मुबलक जमीन ह्यामुळे शेती आणि शेतीवर अवलंबून असलेले व्यवसाय चालू होते. पश्चिमेकडचे देश आणि पूर्वेकडचे चीनसारखे देश ह्यांच्या मधोमध असल्याने भारतदेशाचा व्यापारहि जोरात होता आणि ही सर्व संपत्ति अशा लहानमोठया नगरांमध्ये केन्द्रित होत होती. असे एखादे समृद्ध नगर निवडून नागरकाने तेथे आपले वसतिस्थान निश्चित करावे असा उपदेश वात्स्यायन नागरकाला देतो.
नागरकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या व्यक्तीने अशा नगरामध्ये आपले सुंदर घर - वासगृह - बांधून ते सुबक वस्तूंनी सजवावे. अशा घराजवळ मुबलक पाण्याचा साठा असावा. घरामध्ये सेवकांसाठी वसतीची वेगळी जागा असावी. घराचे दोन भाग असावेत. एक आतला भाग घरातील स्त्रियांसाठी आणि दुसरा बाहेरचा भाग नागरकाच्या स्वत:च्या व्यवसायासाठी आणि मनोरंजनासाठी. घरामध्ये घरच्या उपयोगासाठी लागणारी फळे, फुले, धान्य देणारी एक बाग (पुष्पवाटिका) असावी. असे घर पुरेसे मोठे असले तर त्याला 'हर्म्य' किंवा 'प्रासाद' म्हणत असत. अशा प्रासादाच्या गच्चीवर बसून नागरक चन्द्रप्रकाशाचा आनंद घेऊ शके. अशा प्रासादांमध्ये थंडाव्यासाठी कारंजी आणि फवारे असलेले धारागृह - ज्यास समुद्रगृह असे म्हणत असत - बांधले जाई.
नागरकाच्या स्वत:च्या वापराच्या भागात कशी व्यवस्था असावी? सारवून गुळगुळीत जमीन केलेल्या ह्या भागामध्ये एक शय्या असावी आणि तिच्यावर पांढरेशुभ्र अस्तरण आणि शिरोभागासाठी आणि पायांसाठी उशा असाव्यात. तशीच अजून एक शय्या - प्रतिशय्यिका - असावी. दोन शय्यांचे कारण 'जयमंगला' टीका लिहिणारा यशोधर ह्याने दिले आहे ते असे. पहिली शय्या ही नागरकाच्या झोपण्यासाठी आणि प्रतिशय्या पत्नीसह करण्याच्या शृंगारासाठी. यशोधर असे सांगतो की ज्या शय्येवर नागरक आपल्या पत्नीबरोबर शृंगार करतो त्या वापरलेल्या शय्येवर न झोपणे हा शिष्टाचार. ह्यासाठी दोन शय्यांची ही सोय. गणिकेबरोबरचा शृंगार झोपण्याच्याच शय्येवेर केलेला चालत असे. शय्येच्या मागे नागरकाच्या देवांच्या मूर्ति आणि रात्री वापरून उरलेला चंदनलेप, फुलांच्या माळा, मेण ठेवण्याचा करंडा, घामाचा वास येऊ नये म्हणून वापरायची सुगन्धी द्रव्ये, तमालपत्रे, तोंडाला वास येऊ नये ह्यासाठी मातुलुंग ह्या लिंबाच्या जातीच्या फळाची साले आणि खाण्यासाठी ताम्बूल - पानांचे विडे - ठेवण्यासाठी जडावाचे लहान मेज असावे. जमिनीवर मुखरस सोडण्यासाठी तस्त - पतत्ग्रह - असावे. भिंतीवर हत्तीच्या दाताच्या खुंटीवर - नागदन्त - गवसणीमध्ये घातलेली वीणा, चित्र काढण्याचा फलक, रंगांच्या कांडयांची गुंडाळी, एखादे पुस्तक आणि कुरण्टकाच्या फुलांच्या (Amaranth) माळा असाव्यात. कुरण्टकाची फुले शय्येवर वापरण्याचे कारण यशोधर देतो ते असे की ही फुले लवकर कोमेजत नाहीत. शय्येपासून फार दूर नाही असे अस्तरण जमिनीवर असावे आणि तेथे डोके टेकायला तक्के असावेत. फाशांनी खेळायचे आणि सोंगट्यांनी खेळायचे फलक असावेत. एका बाजूस विणण्याची आणि लाकडावर कोरीव काम करण्याची उपकरणे असावीत. बाहेरच्या बाजूस पोपट-मैना-सारिका अशा क्रीडापक्ष्यांचे पिंजरे असावेत. वृक्षवाटिकेमध्ये दाट सावलीच्या जागी अस्तरण घातलेला झोपाळा असावा.
नागरकाचा नित्याचा दिनक्रम ह्यानंतर सांगितला आहे. त्याने पहाटे उठून आह्निके आवरावीत, दन्तधावन वापरावे, सुवासिक धूर दिलेली वस्त्रे आणि शिरोभूषण परिधान करावीत. अल्प प्रमाणात चन्दनलेप आणि माळा लेऊन अळत्याच्या आणि मेणाच्या वापराने ओठ लाल करावेत, आरशामध्ये बघावे, मुखवासासाठी तांबूल खावा आणि आपल्या नित्याच्या कामासाठी बाहेर पडावे. वर उल्लेखिलेल्या चौसष्ट कलांपैकी पाच कला ह्या प्रसाधनाशी संबंधित आहेत. त्या म्हणजे माल्यग्रन्थन (माळा गुंफणे), शेखरकापीडयोजन (शेखरक आणि आपीडक अशा प्रकारची शिरोभूषणे - diadems and chaplets - तयार करणे), नेपथ्यप्रयोग (वस्त्रपरिधान), कर्णपत्रभंग (कानाचे अलंकार बनविणे), गन्धयुक्ति (सुवासिक द्रव्ये मिसळणे) आणि भूषणयोजन (दागिने घालणे). ह्या कलांचे ज्ञान येथे कामास येते.
नागरकाची वेषभूषा कशी असावी ह्याचे वात्स्यायनाने दिलेले विवरण काहीसे त्रोटक आहे. ह्याचेच अधिक तपशीलातील वर्णन दामोदरगुप्ताच्या वर उल्लेखिलेल्या 'कुट्टनीमत' काव्यात आहे. मालती नावाचा गणिकेला 'चिन्तामणि हा तुला उत्तम सावज आहे' असे सल्ला देतांना विकराला नावाची कुंटीण त्याचे जे वर्णन करते ते वात्स्यायनाच्या नागरकाला तंतोतंत लागू होते आणि त्यावरून दुसऱ्या-तिसऱ्या शतकातला सुखवस्तु नागरक कसा असेल हे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ह्या चिन्तामणीचा पिता हा एक महत्त्वाचा राजपुरुष आहे आणि तो नेहमी कोठल्यातरी राजकार्यावर बाहेरगावीच असतो. परिणामत: चिन्तामणि हाच जणू गावाचा मुखिया असल्यासारखा वागतो. त्याने पाच बोटे लांबीचे केस राखले आहेत. त्याच्या एका कानात 'दलवीटक' आणि दुसऱ्यात 'सीसपत्रक' फुलांच्या आकाराची कुंडले आहेत. बोटात आंगठया आणि गळ्याभोवती सोन्याचे हार आहेत. त्याने अंगावर केशराचे विलेपन लावले आहे. त्याच्या अंगावर सोनसळी वस्त्रे आहेत. त्याच्या मागोमाग त्याचा ताम्बूलकरंडक घेऊन एक सेवक चालत असतो. त्याच्या पायात मेण लावून नरम केलेली आणि तुरुष्क - तुर्की - पद्धतीचा नाल लावलेली पादत्राणे आहेत.
कामे करून परतल्यावर नित्यस्नान करावे. त्यामध्ये प्रत्येक दुसऱ्या दिवशी अंगमर्दन, तिसऱ्या दिवशी फेस निर्माण करणाऱ्या गोष्टींचा उपयोग, - रिठे, शिकेकाई इत्यादि, साबण भारतात अरबांबरोबर आला - चौथ्या दिवशी डोके आणि चेहरा ह्यांची श्मश्रू करावी. शरीराच्या अन्य भागांतील केस दर पाचव्या आणि १० व्या दिवशी काढून टाकावेत. काखेतील घाम नियमितपणे स्वच्छ करावा. सकाळी आणि दुपारी भोजन करावे. भोजनानंतर पोपट, सारिका अशा पक्ष्यांचे बोलणे ऐकावे. लावा पक्षी, कोंबडे आणि एडक्यांच्या झुंजी पाहाव्यात. पीठमर्द, विट आणि विदूषक ह्या मित्रांबरोबर कलाविनोदात वेळ काढावा. नंतर निद्रा घ्यावी. उठल्यावर पुन: प्रसाधन करून बाहेर पडावे आणि समशील नागरक मित्रांबरोबर गप्पागोष्टी कराव्या. सायंकाळी गायन ऐकावे. त्यानंतर धूपाने सुगन्धित केलेल्या आणि फुलांनी सजविलेल्या वासगृहामध्ये आधी ठरलेल्या गणिकेची पीठमर्द, विट आणि विदूषक ह्या मित्रांबरोबर वाट पहावी, तिच्याकडे दूती पाठवावी अथवा स्वत: जावे. आलेल्या गणिकेला तिचे प्रसाधन नीट करायला मदत करावी. ही नित्याची दिनचर्या. वात्स्यायन येथे थांबतो. यशोधराने दिलेले कारण असे की ह्यानंतरची कामक्रीडा 'सांप्रयोगिक' ह्या दुसऱ्या अधिकरणामध्ये वर्णिली आहे.
दुसऱ्या अधिकरणातील दहाव्या अध्यायामध्ये ह्यापुढील वर्णन आहे. आलेल्या गणिकेसह मद्यप्राशन झाल्यावर पीठमर्द, विट आणि अन्य उपस्थितांना फुले, गन्धद्रव्ये, ताम्बूल देऊन निरोप द्यावा. तदनंतर एकान्तात रतिक्रीडा करावी. रतिक्रीडेनंतर दोघांनीहि एकमेकांकडे न पाहता वेगवेगळे स्नानगृहाकडे जावे. तेथून परतल्यावर ताम्बूलसेवन करावे, चन्दनाची उटी एकमेकांस लावावी आणि काही अल्पोपहार करावा. त्यामध्ये फळांचा रस, तळलेले पदार्थ, आंबवलेली तांदुळाची कांजी, मांसाच्या तुकडयांसह सूप, सुके मांस, साखरेसह संत्र्यासारखी फळे, इत्यादींचा समावेश असावा. नायकाने सहचरीसह सौधावर बसून चन्द्रप्रकाशाचा आनंद घ्यावा आणि ध्रुव, अरुन्धती, सप्तर्षि इत्यादि तारे ओळखावेत.
हे पीठमर्द, विट आणि विदूषक नावाचे नागरकाचे मित्र कोण आहेत? पीठमर्द आणि विट हे दोघेहि अकिंचन आहेत आणि तरीहि चौसष्ट कलांचे ज्ञान त्यांच्यापाशी आहे. संपत्ति सोडली तर नागरक होण्याची अन्य सर्व पात्रता त्यांच्यापाशी आहे. तिचा उपयोग करून आपले पोट भरण्याच्या हेतूने देश सोडून दुसऱ्या देशात कोणा नागरकाचा सहायक बनतो तो पीठमर्द. विटहि तसाच पण पीठमर्दाला पत्नी नाही, मात्र विटाला आहे आणि तो त्याच देशाचा रहिवासी आहे. विदूषक म्हणजे हसूनखेळून असणारा आणि गमत्या असा नागरकाचा विश्वासू मित्र. नागरकाची गुप्ततेने करायची कामे तो आनंदाने करतो. विट आणि विदूषक ही पात्रे संस्कृत नाटकांमध्ये नेहमी भेटतात. टीकाकार यशोधर ह्यांना 'उपनागरक' असे म्हणतो. हीच कार्ये कलाचतुर अशी भिक्षुकपत्नी, दासीपुत्री, विधवा स्त्री आणि म्हातारी कुट्टनी (कुंटीण) ह्याहि करू शकतात.
नित्याच्या दिनचर्येपलीकडे नागरकाची नैमित्तिक म्हणजे कारणाने उद्भवणारी कार्येहि असतात. आवश्यकतेनुसार देवळांचे - आयतन - प्रबन्धन म्हणजे व्यवस्थापन, नागरकांच्या काव्यशास्त्रविनोदनासाठी गोष्ठींचे आयोजन, मद्यप्राशनासाठी एकत्र येणे, उद्यानविहाराच्या भेटी, समस्यापूर्तीसारख्या खेळांसाठी एकत्र जमणे ह्यातहि नागरक वेळोवेळी भाग घेत असतो.
प्रतिमास पंचमीचा दिवस हा सरस्वतीचा दिवस. त्या दिवशी सरस्वतीच्या आयतनामध्ये नागरकांनी एकत्र जमावे आणि नेमलेले गायक आणि नर्तक, तसेच बाहेरून आलेले कलाकार ह्यांनी देवीची सेवा करावी. अशा बैठकीला 'समाज' म्हणतात. दुसऱ्या दिवशी बाहेरच्या कलाकारांना योग्य ती पारितोषिके देऊन निरोप द्यावा. (सध्या सरस्वतीची अशी वेगळी देवळे कोठेच दिसत नाहीत. त्या काळात ती गावोगावी असावीत असे दिसते.) हे करण्यासाठी नागरक ज्या व्यावसायिक 'गणा'चा सदस्य आहे त्या गणाने एकोप्याने असावे आणि येणाऱ्या-जाणाऱ्याचे आदरातिथ्य करावे. अन्य देवतांच्या विशेष दिवशी असाच समारंभ करावा. येथे 'गण' म्हणजे त्या त्या व्यवसायातील लोकांचा संघ किंवा guild. मृच्छकटिक नाटकात कामदेवाच्या आयतनाचा उल्लेख आहे ते येथे स्मरते.
गणिकेच्या घरी, मंडपामध्ये वा एखाद्या नागरकाच्या मोकळ्या घरामध्ये विद्या, बुद्धि, शील, वित्त आणि वयाने समान असलेल्या नागरकांचे गप्पागोष्टी करण्यासाठी जमणे ह्याला गोष्ठीसमवाय म्हणतात. तेथे कलाविषयक चर्चा, समस्यापूरण असे केले जावे. अशा गोष्ठींमध्ये यशस्वी ठरण्यासाठी आवश्यक असलेले गुण वात्स्यायन सांगतो ते असे - केवळ संस्कृतमध्ये नाही आणि केवळ देशभाषेमध्ये नाही, तर दोन्ही प्रकारांनी बोलू शकणाऱ्याला गोष्ठीमध्ये बहुमान मिळतो. तेथे सुज्ञ व्यक्तीने द्वेषपूर्ण, अतिस्वैर आणि हिंसक असे काही बोलू नये. लोकांना काय आवडते ह्याचा कल पाहून आणि त्यांचे रंजन हेच डोळ्यापुढे ठेवून गोष्ठीमध्ये भाग घेणारा यश पावतो. संस्कृत आणि देशभाषा ह्या दोन्हींवर वात्स्यायनाने दिलेला भर पाहून असे वाटते की त्याच्या काळात संस्कृत आणि देशीभाषा अशा दोन्ही प्रकारच्या भाषांचे मिश्रण शिष्ट समाजाच्या बोलण्यात असावे.
येथे थोडे विषयान्तर. वेदांमधील प्राचीन आर्ष भाषेनंतर जी पाणिनीने संस्कारित केलेली भाषा आहे ती आपल्याला अभिजात काव्य, नाटक, शास्त्रचर्चा अशा प्रकारच्या ग्रन्थांमध्ये आढळते. कालिदासासारख्या कवींनी हीच भाषा वापरली आहे. ह्या भाषेला आपण आज 'संस्कृत' भाषा म्हणतो. अशी ही संस्कृत म्हणजे संस्कार केली गेलेली भाषा हि कोणा समाजगटाची बोलण्याची भाषाहि होती का ती केवळ शिष्ट लोकांची ग्रान्थिक भाषाच होती हा एक वादाचा मुद्दा आहे. एका मतानुसार ही भाषा केवळ ग्रान्थिकच होती आणि समाजातील सर्व दैनिक व्यवहार निरनिराळ्या देशी भाषांमधूनच केला जात असे. संस्कृत भाषेला 'संस्कृत' हे नाव केव्हा पडले हाहि असाच एक वादाचा प्रश्न आहे.
ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कामसूत्रातील दोन उल्लेख उपयुक्त ठरू शकतील. गोष्ठीसमवायामध्ये यशस्वी होण्यासाठी संस्कृत आणि देशीभाषा अशा दोहोंचाहि उपयोग केल्यास बहुमान मिळतो अशा अर्थाचा एक श्लोक गोष्ठीसन्दर्भामध्ये वात्स्यायन देतो. नात्यन्तं संस्कृतेनैव नात्यन्तं देशभाषया। कथां गोष्ठीषु कथयॅंल्लोके बहुमतो भवेत्॥ (संपूर्ण संस्कृत नाही आणि संपूर्ण देशी भाषेत नाही अशी कथा सांगणारा गोष्ठीमध्ये बहुमान मिळवतो.) चौसष्ट कलांच्या यादीमध्ये 'देशभाषाविज्ञान' ही कला शेहेचाळिसाव्या क्रमांकावर आहे. ५ (१.४.१६) ह्यावरून असे म्हणता येईल की शिष्ट लोकांची नेहमीची परस्परांमध्ये वापरायची भाषा संस्कृत असावी आणि म्हणूनच 'देशभाषाविज्ञान' ह्याला कलेचा दर्जा मिळालेला आहे.
एकमेकाच्या घरांमध्ये 'आपानक' म्हणजे मद्यपानाच्या बैठका व्हाव्यात. तेथे मधु, मैरेय, आसव अशी मद्ये, तसेच नाना क्षार, फळे, भाज्या घातलेल्या, कडू, तिखट, आंबट अशा चवींच्या खाद्यपदार्थांचे सेवन गणिकांनी सर्वांना घडवावे आणि स्वत: करावे. हे 'आपानक' उद्यानातहि घडवून आणले जाऊ शकते. प्राचीन ग्रीसमधील hetaera तेथील नागरकांबरोबर symposium मध्ये (शब्दश: अर्थ मद्यप्राशनाची बैठक) भाग घेत असत तो 'आपानका'चाच ग्रीक अवतार दिसतो. यजुर्वेदातील रुद्रसूक्तामध्ये चमक भागात सूक्तकर्ता रुद्रदेवतेकडून ज्या अनेक भौतिक जीवन आनंदी करणाऱ्या गोष्टी मागतो त्यामध्ये 'सपीतिश्च मे' अशी एक मागणी आहे. 'सपीति' म्हणजे एकत्र बसून मित्रांसह मद्यपान. 'आपानका'चा हा एक आणखी जुना अवतार दिसतो.
प्राचीन भारतामध्ये मध, नाना धान्ये, उसाचा रस आणि त्याच्यातून निघणाऱ्या गुळासारख्या गोष्टी, फळाचे रस अशांपासून आंबवण्याच्या प्रक्रियेने नाना नावांची मादक द्रव्ये करून प्यायची पद्धत होती. ह्याच्या अनेक याद्या निरनिराळ्या जागी दिसतात. त्यातील ही एक पहा: माध्वीक मधापासून, खार्जूर खजुरापासून, गौडी गुळापासून, शीधु उसाच्या रसापासून, सुरा तांदुळापासून, कोहल यवापासून, मधुलिका गव्हापासून, पैष्टी नाना धान्यांपासून, मधूकपुष्पोत्थ मोहाच्या फुलांपासून, जाम्बव जांभळापासून, कादम्बरी कदंबाच्या फुलांपासून, वारुणी ताड, माड आणि खजुराच्या झाडाच्या रसापासून (sap), वल्कलि बेहडा आणि गूळ ह्यांच्या मिश्रणापासून. अशा प्रकारची पेये एकत्र बसून पिऊन काव्यशास्त्रविनोदात काळ घालविणे म्हणजे 'आपानक'. येथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. वात्स्यायनाच्या काळापर्यंत 'मनुस्मृति' लिहून झाली असणार. तिच्यामध्ये त्रैवर्णिकांना कोणतेहि मद्यपान निषिद्ध आहे. मनु म्हणतो - सुरा अन्नाचा मल आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनी सुरा पिऊ नये. गौडी, पैष्टी आणि माध्वी हे सुरेचे तीन प्रकार. ब्राह्मणांनी ते पिऊ नयेत. मद्य, मांस, सुरा, आसव हे यक्ष, राक्षस, पिशाचांचे अन्न आहे. देवाला दिलेला हवि खाणाऱ्या ब्राह्मणाने ते खाऊपिऊ नयेत. काय प्यावे हेहि मनु सांगतो - अग्निवर्ण गोमूत्र, पाणी, दूध, घृत, गोमयाचा रस हे आमरणान्त प्यावे. मनूच्या तुलनेमध्ये वात्स्यायन बऱ्याच सवलती देत आहे.
आपानकाबरोबरच खाणे येणारच. येथेहि वात्स्यायन शाकाहार आणि मांसाहार दोन्हींना संमति दर्शवितो. चौसष्ट कलांच्या यादीत 'विचित्रशाकयूषभक्ष्यविकारक्रिया' ही कला दाखविली आहे. यशोधराने तिचा अर्थ वेगवेगळ्या भाज्या, यूष (soup) इत्यादि बनविणे असा दिला असून 'यूष' ह्याचे मुगासारख्या डाळींपासून बनविलेले आणि मांसापासून बनविलेले असे दोन अर्थ दाखविले आहेत. खाद्यपदार्थांमध्ये भाताची कांजी, तळलेले आणि भाजलेले मांस अशा गोष्टींचा समावेश आहे.१०
कधीकधी सकाळी उठल्यानंतर सजवलेल्या घोडयावर बसून गणिकांसह आणि परिचारकांना बरोबर घेऊन उद्यानात जावे. तेथे कोंबडे, लावा पक्षी, एडके ह्यांच्या प्रेक्षणीय झुंजींमध्ये काळ घालवून उद्यानात गेल्याच्या खुणा अंगावर धारण करून संध्याकाळी स्वगृही परतावे. हा झाला उद्यानविहार. असाच जलविहार. तो मगरी, मोठे मासे इत्यादि काढून टाकलेल्या पाण्याच्या आणि चारी बाजूंनी बांधलेल्या जलाशयामध्ये करावा.
ह्यानंतर काही सणांची नावे आणि वर्णने येतात.११ त्यामध्ये यक्षरात्रि, कौमुदीजागर, सुवसन्तक अशा सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या, तसेच स्थानिक महत्त्वाच्या सहकारभंजिका, अभ्यूषखादिका, बिसखादिका, नवपत्रिका, उदकक्ष्वेडिका, पांचालानुयान, एकशाल्मली, यवचतुर्थी, आलोलचतुर्थी, मदनोत्सव, दमनभंजिका, होलाका, अशोकोत्तंसिका, पुष्पावचायिका, चूतलतिका, इक्षुभंजिका, कदम्बयुद्ध असे उल्लेख आहेत. यशोधराच्या टीकेवरून ह्या सणांचे स्वरूप आणि चालू नाव काय असावे ह्याबद्दल थोडा तर्क करता येतो. यक्षरात्रि म्हणजे दिवाळीचा सण असावा कारण त्या दिवशी लोक द्यूत खेळतात असा उल्लेख यशोधराने केला आहे. कौमुदीजागर अश्विनाच्या पौर्णिमेला होतो. चन्द्रकिरणांखाली लोक रात्र जागून काढतात. हीच सध्याची कोजागिरी पौर्णिमा. सुवसन्तक म्हणजे वसन्तपंचमी असावी. ह्या दिवशी सुंदर स्त्रीने मद्याची चूळ अशोक वृक्षाच्या बुंध्यावर टाकली तर तो चांगला फुलतो असा संस्कृत काव्यांमधील संकेत आहे. स्थानिक सणांमध्ये सहकारभंजिका म्हणजे आंबे खाण्याचा उत्सव दिसतो. नंतर अभ्यूषखादिका म्हणजे पहाटे ताजी धान्ये विस्तवावर भाजून खाणे असा उत्सव दाखविला आहे. ह्यालाच आपण हुरडा म्हणतो. आलोलचतुर्थी म्हणजे चतुर्थीला झोपाळ्यांवर बसण्याचा सण. सध्या हीच क्रीडा नागपंचमीला होते. होलाका म्हणजे होळी. ह्या दिवशी किंशुकपुष्पांचा रंग काढून तो एकमेकांवर टाकतात. बाकीचे खेळ त्यांच्या नावावरून तर्काने जाणावे लागतात. बिसखादिका म्हणजे कमळाचे तन्तु खाणे. उदकक्ष्वेडिका म्हणजे एकमेकांवर पाणी मारणे. अशोकोत्तंसिका आणि चूतलतिका म्हणजे मस्तकावर अशोकाची नवी पालवी आणि आंब्याचा मोहोर तुऱ्यासारखा लावणे. इक्षुभंजिका म्हणजे ऊस खाण्याचा किंवा सध्या केला जातो तसा रसपानाचा कार्यक्रम असावा.
आतापर्यंत वर्णन केलेले सर्व आचरण नगरात राहणाऱ्या सुसंस्कृत नागरकाचे आहे. लहान खेड्यातील ग्रामीण प्रजा त्यापासून दूर असे पण त्यांनीही आपली पातळी उंचावण्याचा प्रयत्न करावा असा उपदेश वात्स्यायन देतो. नागरी जीवनाचे दर्शन झालेल्या ग्रामीणाने आपल्या विचार करू शकणाऱ्या - विचक्षण - बान्धवांसमोर त्याचे वर्णन करावे. त्यांनीहि तसे वागण्याचा, गोष्ठी इत्यादींचे आयोजन करण्याचा आग्रह धरावा.
अंतर्गृह
वात्स्यायनाच्या नागरकाचे दिवस अनेकविध आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये जातो. त्याच्या भार्येबाबत मात्र वात्स्यायन तिच्या वर्तनावरचे नानाविध निर्बंधच प्रामुख्याने सांगतांना दिसतो. तत्कालीन स्मृतिकारांच्या पुरुषप्रधान परंपरेला हे धरूनच आहे. पुरुषाप्रमाणेच स्त्रीमध्येहि कामभावना असते हे तो अमान्य करीत नाही. मात्र पुरुषाने आपली कामभावना शमविण्यासाठी काय करावे हे तो जितक्या तपशीलाने सांगतो तितक्या तपशीलात स्त्रीच्या बाबतीत तो जात नाही. गणिकेच्या गणिकावृत्ति धारण करण्यामागे कामेच्छा असते असे तो मोकळेपणे लिहितो, पण विवाहित भार्येच्या बाबतीत तो तिची घरातील कर्तव्येच सांगतांना दिसतो.
वात्स्यायनाच्या डोळ्यासमोरचे कुटुंब हे आजच्यासारखे 'हम दो हमारे दो' असे केन्द्रित नाही. ते एकत्र कुटुंब आहे आणि सध्याच्या समाजात बहुश: स्मृतिरूपाने उरलेल्या समृद्ध एकत्र कुटुंबात पत्नीकडून जी अपेक्षा ठेवली जात असे तीच वात्स्यायनाच्या लेखनात दिसते. तिने वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत राहावे, देवधर्माची आणि कुलाचारांची काळजी घ्यावी, पतीच्या संमतीशिवाय उंबरठा ओलांडू नये, पतीला भोजनात काय आवडते आणि काय नाही ह्यावर ध्यान ठेवावे, पतीकडून काही दुर्वर्तन किंवा अनावश्यक खर्च झाला तरी त्यावर वाद न करता त्याला एकान्तात नम्रपणे ते सांगावे अशा अपेक्षा तो ठेवतो. मात्र ही पत्नी अगदी निरक्षर अणि परावलंबी नाही. तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तिने वर्षाचे उत्पन्न आणि व्यय ह्यांचा ताळमेळ ठेवावा, परिचारकांचे वेतन द्यावे, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तु बाजारावर नजर ठेवून स्वस्त असतील तेव्हा घेऊन ठेवून साठवाव्या, स्वयंपाकात लागणाऱ्या भाज्या वेळच्यावेळी पेरून तयार ठेवाव्यात, कापसाचे सूत काढून त्याची वस्त्रे बनवावी, मोहरीचे तेल तसेच उसापासून गूळ वेळच्यावेळी काढून तयार ठेवावेत, तांदूळ कांडून घ्यावेत, घराच्या वापरासाठी दोर वळून ठेवावेत, शेतीच्या कामाचे प्राणी तसेच मनोरंजनासाठी ठेवलेले शुक-सारिका-कोकिला-मयूर-वानर-मृग ह्यांची देखभाल करावी, जुनी वस्त्रे सांभाळून ठेऊन, परिचारकांना चांगल्या कामासाठी बक्षीस म्हणून ती वेळोवेळी देत जावे अशा अनेक सूचना वात्स्यायन देतो. ह्यावरून स्त्रीलाहि कामापुरते लिहिणे-वाचणे होते हे जाणवते आणि त्याचबरोबर घर कसे चालत असे ह्याचीहि कल्पना येते. राजा, त्याचे मन्त्री, महामात्र, वेगवेगळ्या दर्जाचे कार्याध्यक्ष, नगरप्रमुख अशा उच्चपदस्थांच्या कन्या पुरुषांइतक्याच शिक्षित असत असा उल्लेख वात्स्यायनाने एका जागी केला आहे.
नागरकाच्या अन्तर्गृहामध्ये एकाहून अधिक पत्नी असणे ही सर्वांच्या अंगवळणी पडलेली समाजमान्य गोष्ट होती. लहान वयात विवाह झाल्यानंतर पति वारल्यामुळे विधवा झालेल्या कुमारिका कन्येस पुनर्विवाह करता येत असे आणि अशा पत्नीस 'पुनर्भू' असे म्हणत असत. पुनर्भूचा दर्जा अन्तर्गृहामधील अन्य स्त्रियांहून खालचा असे. काही गणिका कायमच्या एका पुरुषाला अंगीकारून त्याच्या अन्तर्गृहाचा भाग होत असत. त्यांचा दर्जा पुनर्भूच्याहि खालचा असे. पुरुषाशिवाय राहणे जिला अशक्य आहे अशा विधवेलाहि एखाद्या पुरुषाच्या अन्तर्गृहामध्ये जागा मिळे. ह्या सर्व स्त्रियांनी एकमेकींशी खेळीमेळीने कसे राहावे ह्याचे धडे वात्स्यायन देतो.
स्त्रियांच्या संदर्भात 'चौसष्ट विद्यां'चा उल्लेख अनेक जागी भेटतो. त्यांचे ज्ञान नागरकाला तसेच स्त्रियांनाहि असावे अशी अपेक्षा होती. विवाहापूर्वी पितृगृहीच कन्या ह्या विद्या शिकून घेत असत. अशा विद्यांची यादी पहिल्या अधिकरणामध्ये दिलेली आहे.१२ त्यामध्ये लेखन, वाचन, गायन, वीणा-तन्त्री-डमरु-जलतरंग अशा वाद्यांचे वादन, नर्तन, भिंतीवर आणि फलकावर चित्रकला अशा सहज जाणवणाऱ्या कलांबरोबर प्रहेलिका (उखाणे), पुस्तकवाचन, नाटकाख्यायिकादर्शन, काव्यसमस्यापूरण, छन्दोज्ञान (वृत्तांचे ज्ञान) अशा लेखन-वाचनाशी परिचय दाखविणाऱ्या कला आहेत. ह्याशिवाय पाककला, लाकडावर कोरीव काम, वेताच्या विणलेल्या गोष्टी करणे, सुईने विणणे-शिवणे-रफू करणे, सोने-रुपे-रत्ने ह्यांची परीक्षा, मुलांची खेळणी बनविणे अशा उपयुक्त कला आहेत. चित्रकलेमध्ये कोणते रंग प्रामुख्याने वापरले जात आणि ते कसे मिळवले जात हे एका ठिकाणी सांगितले आहे. हे रंग ठेवण्याच्या पेटीला 'पटोलिका' म्हणत असत. पटोलिका बहुधा शिंपल्यांनी मढविलेली असावी करण 'पटोलक' म्हणजे शिंपला असा अर्थ कोशकार देतात. अशा पटोलिकेमध्ये 'अलक्तक' हा लाखेपासून बनलेला तांबडा रंग, 'मन:शिला' हा तांबडया आर्सेनिकपासून बनलेला रंग, 'हरिताल' म्हणजे yellow orphiment, 'हिंगुल' म्हणजे शेंदरी रंग आणि श्यामवर्ण म्हणजे निळा, काळा आणि हिरवा हे रंग असत.
मुले-मुली कोणते खेळ खेळत ह्याचा मनोरंजक उल्लेख एका ठिकाणी आहे.१३ त्यामध्ये गृहक (भातुकली), भक्तपाककरण (लुटुपुटीचा स्वयंपाक करणे), दुहितृका (बाहुली), आकर्षक्रीडा (सोंगट्यांनी खेळणे), मध्यमाङ्गुलिग्रहण (मधले बोट ओळखणे), षट्पाषाणक (सहा खडे वापरून सागरगोट्यांचा खेळ), सुनिमीलितिका (आंधळी कोशिंबीर), आरब्धिका, लवणवीथिका (आट्यापाट्या?), गोधूमपुञ्जिका (गव्हाच्या आतमध्ये लपवलेली गोष्ट शोधणे) अशा काही खेळांचा उल्लेख आहे.
गणिका
'गणिका' ह्या वर्गाची चर्चा वात्स्यायनाने 'वैशिक' ह्या सहाव्या अधिकरणामध्ये केली आहे. गणिकांना वात्स्यायनकालीन समाजामध्ये महत्त्वाचे स्थान होते. सर्वसामान्य देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांहून त्यांचा दर्जा वरचा होता कारण त्या नागरकाइतक्या शिकलेल्या आणि चौसष्ट कलांमध्ये पारंगत असत. अन्य व्यवसायांप्रमाणे त्यांचाहि 'गण' (guild) असे. सभ्य समाजाच्या चालीरीतींचे ज्ञान तिच्याजवळ असे. काळवेळ जाणण्याची पाचपोच, दुर्गुणांचा अभाव अशांमुळे नागरकांचे 'आपानक', गोष्ठी, उद्यानविहार अशा स्थानी तिलाहि प्रवेश होता. वात्स्यायन सांगतो की अशा कलांच्या ज्ञानामुळे त्यांचा दर्जा उंचावला जाऊन लोकांच्या आणि राजसत्तेच्या मनात त्यांना गणिका म्हणून प्रतिष्ठा मिळते.१४
ह्या कलांमुळे शीलरूपगुणांनी युक्त अशी वेश्या 'गणिका' ह्या पदवीस पोहोचते आणि जनसमुदायामध्ये स्थान मिळवते. राजा आणि गुणवान् लोक तिला मानतात, कलोपदेश करण्यामुळे लोक तिच्या अवतीभवती असतात, विदग्ध लोकांना तिचा सहवास हवाहवासा वाटतो आणि लोक तिला उदाहरणासारखे मानतात.
गणिका स्वत:जवळ चांगला पैसा बाळगून असत आणि आपल्या स्थानानुरूप त्याचा व्यय करीत असत. देवायतने, तलाव, विश्रामगृहे इत्यादि बांधणे अशा कामांत त्या आपला पैसा वापरीत असत असे वात्स्यायनाच्या लिहिण्यावरून दिसते.१५ त्या प्रासादतुल्य घरांमध्ये राहू शकत कारण मृच्छकटिकाच्या चौथ्या अंकात वसन्तसेनेचे घर पाहून हे गणिकेचे घर आहे का कुबेराचे असा प्रश्न विदूषक मैत्रेयाला पडला आहे. (किं तावद्गणिकागारमथवा कुबेरभवनपरिच्छेद: मृच्छकटिक अंक ४) वात्स्यायनाची गणिका ही व्यवहारज्ञानीहि आहे. तिने दर्शविलेले प्रेम आणि आस्था ही कृत्रिम असावयाला हवी, कारण तिचे प्रमुख ध्येय हे गणिकाव्यवसायातून धन मिळविणे हेच आहे हे वात्स्यायनाने स्पष्ट केले आहे. कोणते नागरक सहज फशी पडतात, कोणाच्या मागे लागण्यात वेळ घालवू नये, स्वसंरक्षणासाठी कोणाशी चांगले संबंध ठेवावेत, प्रियकराजवळचे धन संपले की त्याला कसे टाळावे अशा सर्व चलाख्या वात्स्यायन मोकळेपणे सांगतो. गणिका आपल्या आईच्या वा अन्य अनुभवी कुट्टनीच्या आश्रयाने राहते, आणि ह्या सर्व खेळामध्ये तिचा ढालीसारखा उपयोग करते.
आजच्या वाचकाच्या दृष्टीतून ह्या ग्रन्थाची उपयुक्तता कितपत आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर वाचकाला त्यापासून काय हवे आहे त्यावर अवलंबून आहे असे म्हणता येईल. रतिसुख कसे घ्यायचे ह्याचे ज्ञान चित्रपट-विडिओ-यूट्यूब च्या जमान्यात आता कोणासहि अपरिचित असायचे काही कारण नाही. तसेच विवाहयोग्य कन्येचा शोध कसा करावा, विवाहानंतर पत्नीने घरामध्ये कसे राहावे, एका पतीच्या एकाहून अधिक पत्नी असल्यास त्यांनी एकमेकींशी कसे वर्तन ठेवावे अशा प्रकारचे वात्स्यायनाचे उपदेश सामाजिक स्थिति दोन हजार वर्षांमध्ये पूर्ण बदलल्याने आता कालबाह्यच म्हणायला हवेत. 'गणिका' ह्या विषयावर वात्स्यायनाने बरेच काही लिहिले आहे. तो वर्ग आता समाजात अधिकृतरीत्या आता उरलाच नाही. आवडलेल्या स्त्रीला वश करून घेण्याचे उपाय आणि तोडगे, लैंगिक शक्ति वाढवण्यासाठी वात्स्यायनाने सांगितलेले जादूटोणा प्रकारचे उपाय आता कोणालाही पटणार नाहीत. मला हा ग्रन्थ आता अभ्यसनीय वाटतो तो अशा कारणाने की दोन सहस्रकांपूर्वीच्या भारतातील नागर समाज कसा राहात होता ह्याचे अन्यत्र कोठे सहजी न दिसणारे दर्शन येथे मिळते.
प्राचीन भारतातील सुवर्णकाल म्हणतात त्या भारताचे वात्स्यायनाच्या 'कामसूत्रा'मध्ये दिसणारे हे ओझरते दर्शन.
टीपा
१. वाम एव सुरतेष्वपि काम:। किरातार्जुनीय ९.४९
२. कामसूत्र २.७.२८, कामसूत्रातील ह्या पुढील संदर्भ असे दाखविले आहेत: अधिकरण, नंतर त्यातील अध्याय आणि त्यानंतर सूत्राचा क्रमांक. २.७.२८ म्हणजे अधिकरण २, अध्याय ७ आणि सूत्र २८.
३. कामसूत्र २.५.२४.
४. कामसूत्र ५.५.२८.
५. कामसूत्र १.३.१६.
६ कामसूत्र १.४.५०.
७. उदय चन्द्र दत्त लिखित 'Materia Medica of the Hindus', पृ. २७२.
८. सुरा वै मलमन्नानां पाप्मा च मलमश्नुते।
तस्माद्ब्राह्मणराजन्यौ वैश्यश्च न सुरां पिबेत्॥
गौडी पैष्टी च माध्वी च विज्ञेया त्रिविधा सुरा।
यथैवैका तथा सर्वा न पातव्या द्विजोत्तमै:॥
यक्षरक्ष:पिशाचान्नं मद्यं मांसं सुरासवम्।
तद्ब्राह्मणेन नात्तव्यं देवानामश्नता हवि:॥ मनुस्मृति ९.९४-९६.
९. गोमूत्रमग्निवर्णं वा पिबेदुदकमेव वा।
पयो घृतं वाऽऽमरणाद्गोशकृद्रसमेव वा॥ मनुस्मृति ९.९२.
१०. अच्छरसकयूषमम्लयवागूं भृष्टमांसोपदंशानि पानकानि चूतफलानि शुष्कमांसं मातुलुङ्गचक्राणि सशर्कराणि च यथादेशसात्म्यं च। कामसूत्र २.१०.१७.
११. कामसूत्र १.४.४२.
१२. कामसूत्र १.३.१६.
१३. कामसूत्र ३.३.५-७.
१४. आभिरभ्युच्छ्रिता वेश्या शीलरूपगुणान्विता।
लभते गणिकाशब्दं स्थानं च जनसंसदि॥
पूजिता सा सदा राज्ञा गुणवद्भिश्च संस्तुता।
प्रार्थनीयाऽभिगम्या च लक्ष्यभूता च जायते॥ कामसूत्र १.३.२०-२१.
१५. देवकुलतडागानां करणं, स्थलीनामग्निचैत्यानां निबन्धनं,
गोसहस्राणां पात्रान्तरितं दानं, देवतानां पूजोपहारप्रवर्तनम्। कामसूत्र ६.५.२५.

link -http://www.aisiakshare.com/node/4507

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...