Flash

Showing posts with label डॉ. नरेंद्र दाभोलकर. Show all posts
Showing posts with label डॉ. नरेंद्र दाभोलकर. Show all posts

Thursday, 20 April 2017

तपासणी- आपल्या उत्सवांची -डॉ. नरेंद्र दाभोळकर

वीस वर्षांहून अधिक काळ डॉ. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं आहे. गेली काही वर्षे ते ‘साप्ताहिक साधना’चे संपादक आहेत. या लेखात त्यांनी सामाजिक जीवनात अटळ असणारी कर्मकांडे आणि धर्मश्रद्धेवर आधारित सण-समारंभांची आवश्यकता नोंदवली आहे, परंतु घटनेत म्हटलेला वैज्ञानिक दृष्टिकोण अंगिकारण्याच्या कर्तव्याकडे लक्ष वेधले आहे. त्यादृष्टीने ‘साजरं करताना’ आपलं नेमकं कुठे चुकतं आणि ते बदलण्यासाठी पर्याय काय हेही सुचवलं आहे.

आजच्या बदलत्या काळामध्ये साजरीकरणाचं एक वेगळंच स्वरूप दिसतं आहे. आनंद निर्मितीच्या मूळ हेतूंना झाकून टाकतील अशा अनेक गोष्टी त्यात आलेल्या दिसतात. अनेकदा आपण त्यात सहभागी होत राहतो. आपल्याला जणू काही मजा येतेच असे स्वतःला भासवत राहतो... पण हे सारं तपासून बघायला हवे.
विषय चांगला आहे आणि बहुआयामी आहे. त्यातील सर्व आयाम या लेखात उपस्थित करता आले, तरी त्याबाबत सविस्तर मांडणी करण्याची ही जागा नव्हे. पुन्हा त्यातील प्रत्येक आयामाला काही व्यापक सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमी असतेच. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे, यावरही प्रश्नाचे आकलन व उत्तरही बदलू शकते. असो.
कर्मकांडे आणि झगमगाट
कर्मकांडे ही मानवी जीवनातील अपरिहार्य बाब आहे. दोन माणसे एकमेकाला भेटल्यानंतर हात जोडतात हे कर्मकांडच असते. परस्पराबद्दल व्यक्त करावयाच्या स्नेहाचा तो बाह्य, सोपा भाग असतो. समाजात एकत्र राहावयाचे म्हणजे एकमेकाप्रती स्नेह, आदर, प्रेम, कृतज्ञता या भावना व्यक्त कराव्याच लागतात. यासाठी केवळ शब्दांवर अवलंबून न राहता, काही कर्मकांडे निर्माण होणे अटळच होते. आवश्यकही होते. शिवाय एकमेकाला भेटावे, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, आनंद एकत्रितपणे साजरा करून आणखी वाढवावा, यासाठी कर्मकांडांची निर्मिती झाली असणार.
बघता बघता समाजाने आपली कूस बदलली आहे. बाजार संस्कृतीचे आक्रमण अनाकलनीय वेगाने समाजाच्या, व्यक्तीच्या सर्व जीवनात वादळवेगाने शिरले आहे. त्यामुळे स्वाभाविकच कुठलाही आनंद, कुठलीही भावना, जास्तीत जास्त तारस्वरात, भपकेबाजपणे आणि भडकपणे साजरी करणे - हाच जणू काही त्या भावनेला न्याय देण्याचा योग्य मार्ग आहे - असा अभिनिवेश सर्व कर्मकांडात तयार झाला आहे. अथवा तयार केला गेला आहे. बाजार संस्कृतीचे आक्रमण ही काही एकमेव बाब नाही. इतर अनेक घटक त्यामध्ये कार्यरत असतात. स्वतःची प्रतिष्ठा वाढवणे, काळा पैसा व नंबर दोनचे धंदे यांना अधिमान्यता मिळवून घेणे, राजकीय प्रभावक्षेत्राची निर्मिती, धार्मिक भावना सतत उद्दीपित ठेवण्यात गुंतलेले दूरगामी राजकीय हितसंबंध अशा अनेक बाबी या झगमगाटाने साजर्याे होणार्यार कर्मकांडाशी जोडलेल्या असतात.
पुरेसा निर्धार दाखवला तर व्यक्तिगत पातळीवर याचे उत्तर सोपे असते. व्यक्तीचा वाढदिवस साजरा होतो. काही वेळा तो ६०, ७५ अशा वयाच्या विशिष्ट टप्प्यावरचा असतो. आता यापैकी कोणताही वाढदिवस धूमधडाक्याने साजरा करावयाचा का - हा खरे तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ६० वर्षांपूर्वी निर्माण झालेली कोणतीही गोष्ट ६० वर्षांनंतर शिल्लक असेल तर ती ६० वर्षांची होणारच. यात खरोखरच साजरे करण्यासारखे काय आहे - असे माझ्यासारख्याला वाटते.
अनेकांना हा विचार फारच कोरडा वाटण्याची शक्यता आहे. या ६० वर्षात अनेक घटना, माणसे यांच्याशी ती व्यक्ती निगडीत झालेली असते. त्याबद्दल संबंधितांच्या मनात काही भावना दाटलेली असते. ती व्यक्त करायला एक प्रसंग असे वाढदिवसाकडे बघता येऊ शकते. सध्याचे याबाबतचे सारेच संकेत उलटे-पालटे झाले आहेत. वृत्तपत्रात छापून येणार्या (आणवल्या जाणार्याे) जाहिराती, प्रायोजित लेख, नाक्यानाक्यावर उभे केलेले आकर्षक रंगीत फलक या सार्यायमागे एक बटबटीतपणा स्पष्ट जाणवतो. तो संबंधितांना कसा रुचतो हा प्रश्नच आहे. याबाबत ‘मला नको होते हे, पण नाईलाजच झाला’ असा बचाव हा बहुधा ‘अग अग म्हशी मला कुठं नेशी’ या प्रकारचा असतो. स्वतःचा वाढदिवस ज्यांच्या उपस्थितीत साजरा झाला तर आवडेल अशा व्यक्ती बहुधा कोणाच्याही जीवनात मर्यादित असतात असा माझा समज आहे आणि त्यांच्या सहवासासाठी कसलेही साजरेपण करण्याची गरज खरे तर भासू नये. ज्या व्यक्ती अपरिहार्यपणे सामाजिक बनलेल्या असतात, त्यांनीही हे लक्षात ठेवायला हवे की कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आपल्या प्रत्येक वाढदिवशी अज्ञातवासात जात आणि डॉ. श्रीराम लागू, निळूभाऊ फुले अशा बुजुर्ग कलावंतांनीही आपले ६० वा ७५ चे जाहीर वाढदिवस कटाक्षाने टाळले आहेत.
लग्नासारख्या म्हटले तर व्यक्तिगत आणि म्हटले तर सार्वजनिक कर्मकांडाबद्दल देखील हीच स्थिती आहे. लग्ने साधी करावीत हे वाक्य उच्चारणे हास्यापद ठरावे अशी आजची परिस्थिती आहे, समर्थनार्थ अनेक मुद्दे असतातच. ‘लग्न काय आयुष्यात एकदाच होते त्यामध्ये नाही, तर हौसमौज करायची तरी केव्हा?’ ‘इतरांच्या लग्नात मारे पंगती झोडतो आणि स्वतःच्या लग्नाला वा स्वतःच्या घरातील लग्नाला त्यांना बोलावलंच नाही तर लोक काय म्हणतील?’ ‘हे केवळ एक निमित्त आहे हो. सगळ्यांनी एकत्र जमायला काही तरी कारण लागते. नुसतेच बोलावून एकाचवेळी सगळे सगेसोयरे येत नाहीत. लग्न आहे म्हटलं की कसं सोपं होऊन जातं’. ही आणि अशी अनेक समर्थने दिली जातात. लग्न हाही पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याने याबाबतीत काही सुचवणे अवघड असतेच.
खर्च खरा कशासाठी?
अनुत्पादक खर्च करणारे विवाहाएवढे दुसरे कर्मकांड नसेल. मंडप, रोषणाई, वाजंत्री, दारूकाम, भोजनावळी.... या सर्व बाबी पूर्णतः अनुत्पादक आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ३ लाख लग्ने होतात. आणि त्यामध्ये जवळपास १२०० ते १४०० कोटी रुपयाचा चुराडा प्रतिवर्षी होतो. दुसरीकडे महाराष्ट्रात काही लाख एकर जमीन पाण्याखाली आणण्याची शक्यता असलेला कृष्णा खोरे प्रकल्प काही ‘शे’कोटी रुपयासाठी रखडतो. आपल्या जीवनातील आनंदाबरोबरच थोडे सामाजिक वास्तवाचे भान जर ठेवण्यात आले तर केवढा मोठा फरक पडू शकेल.
पुन्हा एक गोष्ट ध्यानात घ्यावयास हवी. आयुष्यात एकदाच घडणारी घटना म्हणून जे हौसमौज करतात, त्यापैकी थोड्याच जणांच्याकडे त्याची ऐपत असते. बाकीच्यांच्या लेखी असे लग्न केले तर समाज काय म्हणेल याची भीती असते. आणि कर्मकांड असेच करावयास हवे या दबावाखाली ही मंडळी ऋण काढून सण साजरा करतात. बहुतेक लग्नातील खर्च ही मारून मुटकून करण्यात आलेली खुशीची सक्ती असते. इतर ठिकाणच्या झगमगाटाप्रमाणे लग्नातील भपका आणि वारेमाप खर्चही आता वाढतच चालले आहेत. इतरांकडील लग्नात भोजनभाऊपणा केला, देणीघेणी स्वीकारली त्याची परतफेड म्हणून आपणही तसेच वागावयास हवे असे मानले तर हे दुष्टचक्र कधीच संपणार नाही.
छानपैकी पत्र लिहून देखील भावना व्यक्त करता येतात आणि त्यात प्रामाणिकपणा असेल तर विवाहाला असणारी तुमची अनुपस्थितीही न रागावता मान्य होऊ शकते. सर्वांच्या भेटीगाठी होतात हा मुद्दा तर अगदीच तकलादू आहे. खरे तर विवाहाच्या घाईगडबड गोंधळात भेटीगाठी झाल्याचा फक्त भास होतो. एकमेकांच्या सहवासाची इच्छा मनापासून असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वकच थोडा वेळ स्वतंत्रपणे त्याच कामासाठी काढायला हवा.
कार्यकारणभाव
आज धर्माच्या उत्सवांना उघडपणे हितसंबंधांचे रूप आले आहे. एक गोष्ट स्पष्ट करावयास हवी की भारतीय घटनेने व्यक्तीला उपासनेचे व धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे. यामुळे व्यक्तीला जी धार्मिक कर्मकांडे करावयाची, त्याचे स्वातंत्र्य आहेच. या कर्मकांडांच्याकडे अनेक अंगांनी पाहता येऊ शकते. त्यातील संक्रांतीसारखे काही सण हे एकमेकातील स्नेहभावनेला व्यक्त रूप देण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही.
दुसरी काही कर्मकांडे ही पूर्णतः अवैज्ञानिक आहेत. कार्यकारणभावाला सोडून आहेत. घटनेत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे’, म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूल्य म्हणून समावेश आहे. हे जर लक्षात घेतले तर वास्तुशांत, श्राद्धविधी, वटसावित्रीची पूजा, सत्यनारायण पूजा या सार्यारच बाबी श्रद्धेच्या म्हणून संरक्षित ठेवण्याऐवजी आणि कर्मकांडांचा भाग बनवण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनाने तपासावयाच्या बाबी बनल्या पाहिजेत.
यज्ञासारख्या कर्मकांडांचा सध्या जाणीवपूर्वक जो उदो उदो चालू आहे, त्याला केवळ अवैज्ञानिक एवढ्याच कारणाने विरोध करून चालणार नाही. त्यामागचा विचार आणखी खोलात जाऊन समजून घेण्याची गरज आहे. वैदिकांनी युद्धातील कौशल्यावर अवैदिकांना, अनार्यांना पराभूत केले. मात्र पराभूत झालेल्या या समूहात अनेक कारागीर होते, चांगले शेतकरी होते. ज्यांना समाज उभा राहण्यासाठी सामावून घेण्याची गरज होती. त्याबरोबरच ही मंडळी बंड करणार नाहीत हे देखील पाहणे आर्यांच्यासाठी तेवढेच गरजेचे होते. संस्कृतीचा तो प्रारंभिक काळ होता. सृष्टीचा कार्यकारणभाव कोणालाच माहीत नव्हता. विश्वाचे नियंत्रण यातुशक्ती करते अशी कल्पना होती. या यातुशक्तीला प्रसन्न करण्यासाठी यज्ञाचे कर्मकांड वैदिकांनी हुशारीने निर्माण केले. ते अत्यंत किचकट व गुंतागुंतीचे होते. पुन्हा ते वर्णश्रेष्ठत्वात सर्वोच्च असलेल्या ब्राह्मणांनीच करावयाचे होते. यज्ञाच्या प्रभावातून आपल्याला दैवी प्रकोपातून वाचण्याची शक्ती यज्ञाद्वारे ब्राह्मण प्राप्त करून देतो - या (चुकीच्या) कल्पनेतून वैदिक आर्यांच्याबद्दलचा भीतीयुक्त दबदबा व आदर कायम राहिला. वैदिकांचे शोषणाचे हितसंबंध दीर्घकाळ सुखेनैव जोपासले गेले. हे लक्षात घेतले तर यज्ञामुळे पाऊस पडतो की नाही, एवढ्याच कार्यकारणभावाशी यज्ञ या कर्मकांडाचा संबंध नसून, त्याचा संबंध एका शोषण व्यवस्थेशी आहे हे लक्षात येईल.
सामाजिक उत्सवांचा पूर
अर्थात सध्या माणसाला जाणीवपूर्वक बेहोश करणारे जे धार्मिक उत्सव धूमधडाक्यात चालू आहेत, त्यामागचे हितसंबंध आणखीनच वेगळे व व्यापक आहेत. गेल्या दशकात महाराष्ट्रात धार्मिक उत्सवांचा उदंड पूर आला आहे. पद्धतशीरपणे आणवला गेला आहे. गणपती, नवरात्र, गरबा, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, दत्तजयंती, गुढीपाडवा, महाशिवरात्र हे सर्व धार्मिक सण आता ‘साजरे’ करावयाचे सोहळे बनले आहेत. यासाठी समाजजीवन वेठीला धरले जात आहे. लोकांची धार्मिकता वाढली आणि उत्सवांची मांदियाळी निर्माण झाली असा हा साधा सरळ संबंध नाही. ‘कर्कश धुंदीत मशगुल राहून स्वतःच्या वेदना वा खरे प्रश्न विसरण्याचा’ हा धर्मभोळेपणा नाही. ही एक कावेबाज राजकीय चाल आहे. सत्ता हातात असावी असे सर्वांनाच वाटते. मात्र त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. मते मिळवण्याचा सोपा मार्ग ज्यांना हवा, त्यांनी ही शक्कल लढवली.
प्रत्येक माणसात एक धार्मिकता असते. संतांनी ती धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न केला. धार्मिक उत्सवाचे उधाण आणून ही धार्मिकता धर्म-अभिनिवेशाकडे, धर्मअहंकाराकडे, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ याकडे आणि सरतेशेवटी धर्मविद्वेषाकडे व धर्मांधतेकडे वळवण्याचा या देशात काही शक्तींचा प्रयत्न आहे. त्यामुळे राजकारणात सत्तारूढ होण्याची शक्यता एकदम वाढते - असा त्यांचा डावपेच आहे. यासाठी धार्मिक कर्मकांडाचा जो महोत्सवी माहोल तयार केला जात आहे, त्याचा विचार ‘उत्सव कसे साजरे करता येतील’ यापेक्षा ‘त्यामागच्या स्वार्थी समाजविघातक राजकारणाचा बीमोड कसा करता येईल’ असा करावयास हवा. तो अर्थातच स्वतंत्र विषय आहे.
काय साधायचं आहे?
या धार्मिकतेचा व्यक्तिगत पातळीवरील एक आविष्कारही प्रत्येकाच्या, विशेषतः महिलांच्या जीवनात आहे. व्रतवैकल्याबाबत माणसाची आणि विशेषतः महिलांची मने हळवी असतात. व्रतामध्ये धर्माचरण असते, कुलपरंपरा सांभाळण्याचे समाधान असते, जीवनाला एक शिस्त येते, असा समज असतो. यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वतंत्र होऊ लागलेली आजची मध्यमवर्गीय सुशिक्षित महिलादेखील व्रतवैकल्यांच्या आचरणाबाबत आग्रही असते. खरे तर एका बाजूला परंपरेने संस्कारित झालेले मन आणि दुसर्याक बाजूला आधुनिकतेची ओढ यामुळे तिची अवस्था एक पाय घरात व एक बाहेर अशी झालेली असते. ती चाकोरीतून बाहेर पडू शकत नाही आणि रूढी परंपरेच्या आधीन होणे मनाने स्वीकारू शकत नाही.
श्रावणझडीने केवळ सृष्टीच भिजून निघते असे नाही तर सणवार, व्रतवैकल्यांनी श्रावणातील सर्व दिवसही भरून गेलेले असतात. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, श्रावणी सोमवार, शुक्रवार, पोळा, मंगळागौरी, कालाष्टमी, निरनिराळ्या एकादश्या, चतुर्थ्या यांची सुरू झालेली अखंड मालिका चांगली हरितालिका, ऋषिपंचमी, गौरीगणपती, नवरात्र इथपर्यंत चालूच असते आणि खरे तर वर्षभर अधूनमधून गाजत असते. ‘आमच्याकडे अजून सगळं पाळलं जातं’, असं वरवर अभिमानाने सांगणारी गृहिणी पूजा, सोवळे, दान, दक्षिणा, सवाष्ण, जेवण असे सगळे मेटाकुटीला येऊन उरकत असते. कुटुंब विभक्त असले, बाई नोकरी करणारी असली तर या कार्यक्रमात खूप तडजोडी केलेल्या असतात. पण तरीही सगळी धावपळ उरकून एक घासही न खाता ऑफिस गाठणार्याा आणि कामाने थकून भागून संध्याकाळी चिडचिडणार्‍या बायका हे चित्रही अपवादात्मक नाही..
पर्याय
तरीही हे सण, ही व्रतवैकल्ये पाळण्याचा अट्टाहास का केला जातो - हा प्रश्न ‘विशिष्ट सोवळेच कशाला नेसायला हवे? सर्वांना निर्माण करणार्याा देवाच्या पूजा, नैवेद्यासाठी ब्राह्मणच का हवा?’ अशा बाबतीतही विचारला जात नाही. मग व्रतवैकल्यांचे प्रयोजन खरोखरीच कोणते, असे छेडणे तर दूरच राहिले. आचरणाची नेमकी स्पष्टीकरणे त्यांनाच माहीत नसतात. त्यामुळे इतरांना ते समजावण्याचा प्रश्नच येत नाही. ‘लहानपणापासून रुजलेल्या श्रद्धा, परंपरा कशाला मोडायच्या?’ ‘एक प्रकारचं मानसिक समाधान मिळते, अडीअडचणीवर मात करायला बळ मिळते’, ‘सासरचा मान ठेवायला करावे लागते’, अशी अनेक उत्तरे दिली जातात.
व्रतवैकल्ये ही शेवटी आपल्या समाजजीवनाशी निगडीत आहेत. त्याला काही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संदर्भ आहेत. दसरा, संक्रांत यासारखे सण स्नेहसंबंध वाढवायला उपयोगी पडतात. हरितालिका, मंगळागौरीच्या निमित्ताने थोडा मैत्रिणींचा सहवास, थोडं माहेरपण, थोडी निसर्गाशी जवळीक साधते. शेतीवर आधारलेल्या जीवनाशी नाते जोडणारे पोळा, नागपंचमी, दिवाळी हे सण आहेत. व्रतवैकल्यांना त्या-त्या काळाचे काही उपयुक्त संदर्भ आहेत. आत्मसंयमाची शिकवण आहे. हे सगळे मानले तर मग त्यात कालोचित बदल करावा हे मानणे का जड जावे? या धार्मिक कर्मकांडावरचा अनावश्यक सर्व खर्च टाळावा, विषमतेचा संदर्भ सोडावा, त्यांना कालसुसंगत अधिक आशयपूर्ण पर्याय द्यावा असे का करू नये?
महारांना ब्राह्मणांबरोबर पंक्तीत बसवणार्याय आणि त्याबद्दल ब्राह्मणांनी वाळीत टाकल्यावर त्याला धैर्याने सामोरे जाणार्याय एकनाथाला जर आपण संत मानतो तर घरी भोजनाला व पूजेला ब्राह्मणच का लागावा? स्त्रीला जर स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपण मान्यता देतो तर सधवा-विधवा, परित्यक्ता या सीमारेषा कशाला? स्त्रीचे सगळे सौभाग्य पती आणि त्याची प्रतीके याच्याशीच निगडीत का असावे? या सगळ्या वेळा, दिवस पाळताना मासिक पाळी नसावी यासाठी गोळ्या घेऊन ती पुढे ढकलण्याची धडपड कशासाठी?
अनेक सणावारांबरोबर, व्रताबरोबर आपल्याजवळचे काही दुसर्‍याला देण्याचा एक महत्त्वाचा संस्कार अपेक्षित असतो. महात्मा फुल्यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यापर्यंत सर्वांनी याबाबत पोटतिडकीने लिखाण केले आहे. आजच्या व्रतआचरणात या गोष्टी निव्वळ उरकल्या जातात. साधे संक्रांतीचे हळदीकुंकू घ्या. बायका वस्तू लुटतात त्या बहुधा उपचार म्हणून, अतिसामान्य निरूपयोगी वस्तू. काही चांगली वस्तू दिलीच तर ज्यांची ती घ्यावयाची ऐपत आहे, ज्यांच्याकडे ती आधीच आहे वा ज्यांना त्याची अजिबात गरज नाही अशांना दिली जाते. यात कसले औचित्य? तसे पैसे एखाद्या अनाथाश्रमास मदत म्हणून दिले वा गरीब विद्यार्थ्याच्या फीवर खर्च केले तर ? चातुर्मासात किंवा अधिकमासात स्त्रिया अनेक नेम करतात. त्यातले बरेचसे दानधर्मातले असतात. एखाद्या गरीब मुलाला रोज वा आठवड्यातून एक दिवस नियमितपणे वर्षभर जेवायला घालीन वा एखाद्या निरक्षर स्त्रीला लिहायला शिकवीन अशा व्रताची आज खरी गरज आहे. अधिक मासात भटजीला वा जावयाला ३३ वस्तूंचे दान करण्याऐवजी तेच पैसे अंधशाळेला देणगी म्हणून का देऊ नयेत? वास्तुशांतीऐवजी आपल्याला मिळालेल्या निवार्याेच्या आनंदाप्रीत्यर्थ ज्यांनी आपल्या व इतर अनेकांच्या निवारा उभारणीसाठी हातभार लावले पण ज्यांच्या डोक्यावर कधीच छप्पर आले नाही त्या कष्टकर्यांलना काही मदत देता येईल. एका सश्रद्ध बाईच्या वाचनात देशातील दारिद्य्राचं वर्णन करणारा लेख आला. त्या वर्षीपासूनच्या नवरात्रात नऊ दिवस तेलाचा अखंड दिवा लावणे तिने थांबवले. एका गरजू मुलीला सन्मानाने वह्या पुस्तके, शालेय वस्तू देणे सुरू केले. आता तिचे नवरात्र शालेय वर्षाप्रमाणे जूनमध्ये सुरू होते.
व्रत आणि सणाविषयी अत्यंत जागरूक असणारा आपला समाज, विशेषतः स्त्री वर्ग राष्ट्रीय सणाविषयी अत्यंत उदासीन असतो. राष्ट्रीय संपत्तीप्रमाणेच राष्ट्रीय सणाबद्दल एकूण अनास्था असते. पण एक कुटुंब मला माहीत आहे की जे २६ जानेवारीला सर्व ओळखीच्या मंडळींना बोलावते. संक्रांतीचाच महिना म्हणून तिळगूळ व साधा साजेसा मेनू करतात. जात, धर्म, सधवा, विधवा स्त्री-पुरुष असा भेदभाव करण्याचा प्रश्नच येत नाही. छोटेसे स्नेहसंमेलनच होते. राष्ट्रीय सण साजरा करणे, हळदीकुंकू, सत्यनारायण याला पर्याय होतो. एकत्र जमणे कोणत्याही अडसराशिवाय साध्य होते.
हे सारे लिहिण्याबोलण्यापेक्षा आचरणे बरेच अवघड आहे, कारण हा संघर्ष स्वतःपासून सुरू होतो. स्वतःच्याच संस्कारांशी तो झगडा असतो. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीतही याला पोषक वातावरण नाही. वाचन करावे, विचार करावा, तर्काच्या कसोटीवर तो घासून, पुसून घ्यावा, त्याचा आचार करण्याचे मानसिक बळ स्वतःमधे निर्माण करावे वा कुटुंब, मित्रमैत्रिणी यांच्याकडून मिळवावे, कालबाह्य पुण्यांना छेद देणारी व्रतवैकल्ये वा त्यातील तो तो भाव नाकारावा, असे मुलींच्या जडणघडणीत आपल्याकडे घडतच नाही. मुलांच्यावर हे संस्कार करण्याआधी स्वतःत ते बदल जाणीवपूर्वक घडवावे लागतात, ही बाब अवघड असते, हेही एक कारण आहे.
याबरोबरच बुद्धीला पटत नाही म्हणून एखाद्याच्या श्रद्धा विचारांची त्याबरोबर जोडलेल्या कर्मकांडांची टिंगलटवाळी करणे कटाक्षाने टाळावयास हवे. भावनिक गुंतवणूक झालेले सश्रद्ध धार्मिक विचार आणि त्यांचे आचरण आणि प्रामाणिक खुली चिकित्सा व त्याआधारे कृतीचा आग्रह यांच्यातील मानसपरिवर्तन - हा शुष्क कोरडा बौद्धिक विचार नसतो तर संवेदनशील जीवन व्यापाराशी संबंधित व्यवहार असतो याचे भान बाळगावे लागते. घरातून सुरू होऊ शकणारे सुधारणेचे पहिले पाऊल म्हणून त्याकडे बघावे, बघता येते.

link http://palakneeti.org/book/export/html/1623

Wednesday, 19 April 2017

व्रत वैकल्याचा वेगळा विचार

व्रत वैकल्याचा वेगळा विचार
==================
भाग २
डॉ. नरेंद्र दाभोळकर
व्रतवैकल्ये हि शेवटी आपल्या समाज जीवनाशी निगडीत आहेत. त्याला काही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संदर्भ आहेत. दसरा-संक्रांत यासारखे सण स्नेहसंबंध वाढवायला उपयोगी पडतात . हरितालिका, मंगळागौरीच्या निमित्ताने थोडा मैत्रिणींचा सहवास, थोडं माहेरपण , थोडी निसर्गाशी जवळीक साधते. शेतीवर आधारलेल्या जीवनाशी नाते जोडणारा पोळा, नागपंचमी, दिवाळी हे सण आहेत. व्रतवैकल्यांना त्या-त्या काळाचे काही उपयुक्त संदर्भ आहेत. आत्मसंयमाची शिकवण आहे. हे सगळे मानले तर मग त्यात कालोचित बदल करावा हे मानणे का जड जावे? या धार्मिक कर्मकांडांवरचा अनावश्यक सर्व खर्च टाळावा, विषमतेचा संदर्भ सोडवा , त्यांना कालसुसंगत अधिक आशयपूर्ण संदर्भ द्यावा असे का करू नये?
महारांना ब्राह्मणाबरोबर पंक्तीत बसवणाऱ्या आणि त्याबद्दल ब्राम्हणांनी वाळीत टाकल्यावर त्याला धैर्याने सामोरे जाणाऱ्या एकनाथाला जर आपण संत मानतो तर घरी भोजनाला व पूजेला ब्राम्हणच का लागावा? स्त्रीला जर स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपण मान्यता देतो तर सधवा - विधवा, परित्यक्त्या या सीमारेषा कशाला? स्त्रीचे सगळे सौभाग्य पती आणि त्याची प्रतीके याच्याशीच का निगडीत का असावे? या सगळ्या वेळा, दिवस पाळताना मासिक पाळी नसावी यासाठी गोळ्या घेऊन ती पुढे वा मागे ढकलण्याची धडपड कशाला?
संदर्भ: विचार तर कराल?
डॉ. नरेंद्र दाभोळकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर

आज चुकीच्या विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतलीये म्हणून बुवा-बाबा वाढतात. उद्या जर विवेकी विचारांनी लोकांच्या मनाची पकड घेतली, तर कदाचित ज्यांना पाच हजार वर्षं मिळाली, त्यांच्याविरुद्धची लढाई आम्ही पाचशे वर्षांत जिंकू शकू.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर, 8 एप्रिल 2013


बुवाबाजी -
=========
भाग १ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
भूत उतरवणारा भगत, करणी काढणारा मांत्रिक, हातातील कुंकवाचा बुक्का करणारी, अंगात देवी आलेली बाई, चमत्कार करणारा सत्य साईबाबा हे सर्वजण बुवाबाजीच करत असतात; परंतु आणखी एका प्रकारची बुवाबाजी सध्या समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. ते कोणत्याही स्वरूपाचे कथित चमत्कार करत नाहीत तरीही त्यांच्याभोवती लोकांची गर्दी आढळते. हे सर्व बाबा फसवणूक परमार्थ, ईश्वरभक्ती, ईश्वरप्राप्ती, ब्रह्मज्ञान या नावाने करतात. पहिल्या प्रकारातील बाबांची ताकत ही त्यांच्या फसवणुकीच्या कसबात असते. तर दुसऱ्या प्रकारात लोकांच्या मनात कथित परमार्थाबद्दल परंपरेने आलेली जी विलक्षण मान्यता असते ती बाबा बुवाने खुबीने स्वतःशी जोडलेली असते. थोडक्यात जो या व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या दु:खाची कारणे व त्यावरील उपाय, विवेकवादी विचारसरणीशी विसंगत अशा बाधा व करणी यासारख्या कल्पना, दैव प्रारब्ध या संकल्पना रुढी परंपरा यांचे समर्थन याप्रकारे सांगतो, तो म्हणजे बुवा.
असा बुवा प्रश्न सोडवण्याच्या अवैज्ञानिक चुकीचा मार्ग दाखवतो व सर्वांगाने शोषण करतो. ही त्याची शोषण करण्याची कार्यप्रणाली म्हणजे बुवाबाजी.
सर्व बुवाबाजीला पारलौकिक कल्पना अथवा परमार्थ हा विचार जोडलेला असतो. इतर सर्व क्षेत्रात फसवणूक आहे व त्या अर्थाने ती बुवाबाजी आहे, असे अनेकांना वाटते; परंतु त्याला बुवाबाजी हा शब्द वापरणे बरोबर नाही. कारण त्या फसवणुकीना त्या त्या क्षेत्राशी संबंधित असे कायदे आहेत. मात्र थेट फसवणुकीच्या बाबी सोडल्या तर परमार्थ व ब्रह्मज्ञान हे असे क्षेत्र आहे की तेथे कायदा पोचत नाही. बहुसंख्यांना या विषयाबाबत काहीही माहिती नसते. कळून घेण्याची इच्छा नसते. माणसे प्रवाहपतित होतात व त्यातच धन्यता मानतात.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग २ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(१) अदृष्टाची भीती - आपल्या जीवनात यापुढे काय आहे ? याबद्दल बहुतेकांच्या मनात एक धास्तावलेपणा असतो. सर्व काही चांगलेच चालू असलेल्यांनाही हे कायमस्वरूपी राहील का ? असे वाटत असते. बाबा अदृष्ट जाणू शकतो. अशी चुकीची कल्पना असते.
(२) अतृप्त कामना पूर्ती - अनेक कामना, वासना अतृप्त असतात. त्या अक्षरशः असंख्य प्रकारच्या असतात. प्रचलित व्यवस्थेत त्या पूर्ण होण्याची शक्यता नसते. अशा वेळी बाबाची शक्ती उपयोगी पडेल; असे वाटते.
(३) आरोग्यविषयक सुविधांचा अभाव - असंख्य माणसांना अनेक आजार असतात ते वारंवार होत असतात. याबाबत खरे कारण जाणून घ्यावे, ते दूर करावे, आजारावर योग्य उपचार घ्यावा, या सर्व बाबींपेक्षा स्वतःच्या दैवी शक्तीने जादूसदृश्य उपाय करणारा बाबा, या लोकांना सोईचा वाटतो.
(४) मानसिक आजार - भारतात गंभीर मानसिक आजाराचे प्रमाण लोकसंख्येच्या १% आहे. अशा व्यक्तींना मानसोपचार देण्याची यंत्रणा आपल्या देशात अत्यंत खर्चिक व अपुरी आहे. या लोकांना असे वाटते की, बाबांची दैवीशक्ती व अध्यात्मिकता ही त्यांच्या मानसिकतेवर उपाय करू शकेल.
(५) मनोकायिक आजार - काही आजार असतात मनाचे ; परंतु व्यक्त होतात शरीरामार्फत. बाबाच्या श्रद्धेमुळे त्यांच्या सूचनांमुळे यापैकी काही आजारात तात्पुरता आराम मिळू शकतो आणि त्यामुळे बुवाबाजीला भूमी सुपीक होते.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ३ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(६) वैफल्यग्रस्त स्त्रिया - आपल्या समाजात अनेक कारणाने बाईचे मन वैफल्याने मोडून पडते. त्या मनाला आधार देणे व उभे करणे यासाठी आज कोणतीही अधिकृत यंत्रणा नाही. देव, धर्म, पूजापाठ या माध्यमातून काम करणाऱ्या बाबाचा आधार अशा स्त्रियांना घेता येतो कारण त्याला सामाजिक अनुमती असते.
(७) प्रारब्ध, नियती, दैव - या कल्पना प्रत्येक भारतीयाच्या मनात आपोआपच घट्ट बसलेल्या असतात. हे नशीब बदलण्याचे सामर्थ्यही कथित दैवी शक्ती ज्याकडे आहे, त्या बाबा, बुवा यांच्यात असेल असा सामान्य माणसाचा पूर्ण विश्वास असतो.
(८) आत्मा, परमात्मा, ब्रह्म, मोक्ष, मुक्ती - या शब्दांचा प्रभावही बहुसंख्य भारतीयांवर असतो. या सर्वांचा विपुल वापर करणारा बाबा स्वाभाविकपणेच लोकांना जवळचा वाटतो.
(९) चमत्कार - बाबांचे चमत्कार हे चिल्लर हातचलाखीचे प्रकार असतात. मात्र ते लोकांना दैवी शक्तीचे अविष्कार वाटतात, त्यामुळे बाबावरील विश्वास वाढतो.
(१०) गुरुपरंपरेला मान्यता - आपल्या समाजात, म्हणजेच समाजातील
पारंपारिक धार्मिक विचारात बाबा गुरु महाराज याबद्दल एक अपार श्रद्धा असते. व्यक्ती गुरुस्थानी मानली की, तिच्या बाबतीत बुद्धीने शरणागती पत्करणे व त्या व्यक्तीचे उदात्तीकरण करणे हे गुरु शिष्य नाते आपल्या समाजात, लोकमाणसात अस्तित्वातच आहे, याचाही फायदा बाबाला मिळतो.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ४ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
========================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(११) अगतिकता, अस्थिरता व अपराधी भावना - (अ) जागतिकीकरणामुळे असंख्य रोजगाराला मुकावे लागत आहे आणि जीवनात अनिश्चितता आली आहे. अशावेळी बाबांचा आधार वाटतो.
(ब) अस्थिरता रूढ अर्थाने जे स्थिर आहेत त्यांनाही कमालीच्या स्पर्धात्मक जगात जाणवते. नामवंत क्रिकेटपटू व अभिनेते ही याची चांगली उदाहरणे आहेत. या अस्थिर परिस्थितीवर बाबांच्या वरदहस्तामुळे मात करता येईल असे संबंधितांना वाटते.
(क) अपराधी भावना - समाजातील अनेकजण अनैतिक मार्गाने पैसा व अन्य सुखे मिळवत असतात, त्यामुळे मनात निर्माण होणाऱ्या अपराधी भावनेवर बुवाबाबांकडून उतारा मिळतो असे त्यांना वाटते.
(१२) विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती व अवतारवाद - या विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे असा बहुसंख्यांचा पारंपारिक विश्वास आहे. तिचा कृपाप्रसाद या ना त्या स्वरुपात काही जणांना लाभतो व आपले बाबा त्याचे प्रतिक आहेत असे त्या त्या बाबाच्या भक्तांना वाटते. याही पुढे जाऊन काहीजण स्वतःला देवाचा अवतार जाहीर करतात.
(१३) धूर्तता व शक्य अशक्यतेचा सिद्धांत - बाबा, बुवा, स्वामी महाराज ही मंडळी धूर्त व बहुधा कावेबाज असतात, त्यामुळे स्वतःचे एक वेगळे रूप ते चाणाक्षपणे उभे करतात. तसेच बाबा अथवा बुवा ज्या प्रश्नांची उत्तरे देतात त्यातील अनेक प्रश्न हो किंवा नाही (मुलगा होईल की मुलगी, लग्न ठरेल की नाही, निवडणूक जिंकेल की नाही) या स्वरूपाचे असतात. स्वाभाविकच यामध्ये काही उत्तरे बरोबर येतात व त्याचा फायदा बाबांना होतो.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ५ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(१४) सांस्कृतिकदृष्ट्या व्यक्त होण्याची गरज - व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे सांस्कृतिकदृष्ट्या समूहात व्यक्त होण्याची गरज असते. ग्रामीण भागातील एकत्रित कुटुंब पद्धतीत हे शक्य नाही व शहरी गतिमान संस्कृतीत ते जमत नाही. ही गरज महाराज स्वामी यांच्याकडून नकळत चांगली भागवली जाते. बाबाचा भक्त या पातळीवर तेथे शहरी- ग्रामीण, गरीब- श्रीमंत, सुशिक्षित- अशिक्षित, स्त्री -पुरुष एकत्र येतात.
(१५) महाराजांचे शिष्य बनणे, त्यांचा अनुग्रह घेणे, ही कळत नकळत एक राजकीय गरज निर्माण झाली आहे. व्यक्तीला व्यावहारिक राजकीय मोठेपणा हवा असतो. तसाच धार्मिक मोठेपणाही हवा असतो. बाबांकडे प्रचंड अनुयायी वर्ग असतो त्यामुळे महाराजांनी प्रतिष्ठित माणसांना मान्यता देणे आणि त्या माणसांनी कोडकौतुक करत त्यांचा अनुग्रह घेणे; असा सिद्ध साधक्पणा घडतो.
(१६) अचीकीत्सक सामाजिक मन - आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक वास्तवाची चिकित्सकपणे तपासणी करावी आणि त्यातील खरे खोटे, इष्ट अनिष्ट तपासून त्याबाबत निर्णय घ्यावा याऐवजी जे घडते आहे त्यावर विश्वास ठेवावा आणि ती श्रद्धा आहे असे म्हणून त्याची चिकित्सा करण्यास नकार द्यावा अशी सामाजिक मानसिकता बुवाबाजीला पोषक असते.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ६ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=========================================
माणसे बुवा बाबांकडे का जातात -
(१७) पैसा, सत्ता, प्रसारमाध्यमे गुंड यांची दहशत - बुवाबाजी हा एक सदैव बरकतीला आलेला धंदा आहे, त्यामुळे धंद्यातील आवश्यक नियम येथेही पाळले जातात. बुवाबाजी करणाऱ्या बाबांकडे पैसा मोठ्या प्रमाणात असतो. प्रशासकीय सत्ता व पुढारी यांच्याशी त्यांचे साटेलोटे असते. प्रसारमाध्यमे कमी जास्त प्रमाणात पैशाच्या साह्याने त्याने विकत घेतलेली असतात. आपल्या विरोधात कोणी बोलले तर त्याबाबत प्रच्छन्न धमकी दिली जाते वा काही वेळा प्रत्यक्ष हल्लाही केला जातो. अब्रू नुकसानीचे खटले घटले जातात.
(१८) दैवी दहशत - अजूनही एका बाजूला करणी, भानामती यावर लोकांचा विश्वास आहे. दुसऱ्या बाजूला प्रारब्ध बदलणारी दैवी शक्तीदेखील त्यांना खरी वाटते. याचा उलटा फायदा घेऊन करणी करून त्रास देण्यात येईल. सारे प्रारब्ध बदलून वाटोळे करण्यात येईल, या स्वरूपाच्या बाबांच्या किंवा त्यांच्या भक्तांच्या दैवी दहशतवादाच्या धमक्या बुवाबाजीचा प्रभाव वाढवण्यास कारण ठरतात.
(१९) सुसज्ज यंत्रणा - बुवाबाजी हा एक धंदा आहे; हे मान्य केले की त्यासाठी यंत्रणा उभारणी आलेच. बहुतेक मोठ्या बाबा बुवांकडे याबाबत आधुनिक व्यावसायिक दर्जाची यंत्रणा असते.
(२०) धंद्याचे रंकेट - बाबाकडील गर्दीमुळे त्यावर अवलंबून असलेले असंख्य धंद्याचे एक रंकेट तयार होते त्यांची गरज बुवाबाजी चालू राहण्यात असते.
(२१) राजमान्यता, लोकमान्यता - बुवाबाजी करणारेही काही चांगली कामे करतात. त्यातील काही पारंपारिक मान्यता असणारी असतात, तर काही आधुनिक असतात, त्यामुळे बाबाला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळते.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ७ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
======================================
बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद -
(१) चमत्कार करणारे बाबा हे असा दावा करतात की, त्यांचा चमत्कार हा परमेश्वराने त्यांना दिलेले व्हीजिटिंग कार्ड आहे, त्यामुळे लोकांना समजावे की, आपल्या मुक्तीसाठी परमेश्वराने या महामानवाला पाठवले आहे. ही त्यांची मांडणी बदमाशीची आहे, त्याचा स्पष्ट विरोध करावा.
(२) चमत्कार न करणारे अनेक बाबा तेजीत आहेत. त्यांच्या भक्तांचा प्रतिवाद असा असतो की, 'आम्हाला बाबांच्या भक्तीत काहीच साधावयाचे नाही. फक्त भक्तीच साधावयाची आहे. 'ही भक्ती कशासाठी ?' याचे उत्तर तत्परतेने असे मिळते की, या भक्तीत जीवनाचे सार्थक आहे. 'हे सार्थक कशामुळे होते ?' याचे उत्तर येते की, या भक्तीतून जीवनाचे आध्यात्मिक कल्याण घडते. 'यानंतर आध्यात्मीक कल्याण होते याचा पुरावा द्या. हा प्रश्न अप्रस्तुत असतो. कारण तसा पुरावा मागू नये अशी धारणा असते. पुरावा मागणे ही डोळसपणाची सुरवात असते आणि पुरावा न मागता शरण जाणे ही बुवाबाजीच्या श्रद्धावान मानसिकतेची पूर्वअट असते. बाबाचे असे म्हणणे असते की, भक्ताचे कल्याण कशात आहे हे त्याला समजते आणि ते भक्ताला समजणार नाही हेही बाबाला समजते.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ८ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद -
(३) श्रद्धेने महाराज अथवा गुरु यांच्यामार्फत जे सत्य स्वीकारले जाते त्याची भूमिका सर्वसाधारणपणे अशी असते की, काही सत्यांचे ज्ञान, मानवी ज्ञानशक्तीच्या पलीकडचे आहे. हे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानवी कल्याण साधण्यासाठी आवश्यक आहे. परमेश्वर कृपेने लोककल्याणासाठी काही अधिकारी व्यक्तींमध्ये ते ज्ञान प्रकटते. माझ्या बाबांमध्ये ते ज्ञान प्रकटले आहे. या ज्ञानाचा आशय असलेली विधाने सत्य आहेत की असत्य हे सिद्ध करणे मानवी शक्तीच्या पलीकडचे आहे. संबंधित अधिकारी पुरुषावर, म्हणजेच आपल्या महाराजांवर असलेल्या श्रद्धेनेच हे ज्ञान स्वीकारावे लागते.
वरवर पाहता समर्पक वाटणारी ही भूमिका आंतरविसंगत पुरेपूर भरलेली आहे. ही आंतरविसंगती कार्यकर्त्याला स्वतःला समजावयास हवी आणि इतरांना समजून सांगता यावयास हवी. उदा.
(अ) मानवी ज्ञानशक्ती पलीकडे असलेले सत्य आहे आणि तरीही त्याचे ज्ञान माणसाला होऊ शकते. असे या भूमिकेत गृहीत धरले आहे. स्वतःच्या कातडीमधून बाहेर उडी घेण्यासाठी हा प्रकार झाला.
(ब) सर्वश्रेष्ठ मानवी कल्याण करणारे हे ज्ञान आहे आणि ते सर्वज्ञ असलेल्या माझ्या महाराजांना प्राप्त झाले आहे, या बाबतीतही पुरावा काही नाही. हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि ते माझ्या महाराजांना प्राप्त झाले आहे ही बाब (अंध) श्रद्धेने स्वीकारावी लागते.
(क) कोणी सर्वज्ञ आहे असे स्वतः सर्वज्ञ असल्याशिवाय समजणे शक्य नाही आणि महाराजांची सर्वज्ञता ही देखील न तपस्लेलीच बाब राहते.
(ड) ईश्वर आहे आणि त्याने महाराजाला अधिकार दिला आहे हे माहित झाल्यामुळे, संबंधित व्यक्तीला मानव मानत नाहीत. उलट त्या व्यक्तीला अधिकारी मानत असल्यामुळे तिला ईश्वराने मानवीशक्तीपलीकडचे ज्ञान दिले असे भक्त मानतो. ईश्वर आहे की नाही, मानवी शक्तीपलीकडचे ज्ञान आहे की नाही हे माहीतच नसताना त्याने अमुक एका व्यक्तीला ज्ञानाचा अधिकार दिला हे कसे कळले ? असे कळते असे मानणे म्हणजे शांग्रील नावाचा प्रदेश आहे की नाही हेच माहित नसताना, अमका तमका माणूस शान्ग्रीलाचा राजा आहे असे मानण्यासारखे आहे.
(इ) या सर्व बाबतीत व्यक्ती प्रत्यक्षात आपापले बाबा, बुवा, गुरु, महाराज यावर श्रद्धा ठेऊन अनुभव, तर्क, पुरावा या पलीकडे उडी मारत असतात.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग ९ (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
========================================
बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद -
(४) ज्याप्रमाणे चांगली शाळा, चांगला शिक्षक, चांगला डॉक्टर शोधावा लागतो त्याप्रमाणे चांगला गुरुही शोधावा लागतो. पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तो लाभतो. असा गुरु भौतिक जीवनाची सर्व भीती घालवतो. प्रारब्ध बदलतो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून व्यक्तीची सुटका करतो. अशा गुरूच्या केवळ दर्शनाने वासना विकार गळून पडतात. नैतिक उन्नती होते. आणि अक्षय आनंदाचा ठेवा मिळतो. आता या स्वरूपाच्या गुरूला, म्हणजेच बाबा महाराज यांना या मांडणीद्वारे जणू प्रतिपरमेश्वर असे रूप दिले आहे. हे समजावून सांगायला हवे. भौतिक जीवनाची भीती प्रत्यक्ष जीवन संघर्षातून घालवावी लागते. प्रारब्ध नावाची काही गोष्ट नसते आणि जन्म मृत्यूचा फेराही नसतो, त्यामुळे तो बदलण्याचा प्रश्नच नसतो. कोणाच्याही दर्शनाने आपोआप वासना- विकार गळून पडत नाही आणि नैतिक उन्नती होत नाही. तेव्हा या स्वरूपाचे बुवाबाबांचे गुणवर्णन हे केवळ बुवाबाजीच्या धंद्यासाठी केले जाते, हे लोकांना पटवावयास हवे.
(क्रमशः)

बुवाबाजी - भाग १० (डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखणीतून)
=======================================
बुवाबाजी कोणत्या मानसिकतेमुळे यशस्वी होते, त्याची मांडणी व प्रतिवाद -
(५) भक्ताचे दु:ख गुरु तीन प्रकारे दूर करू शकतो. असे आसाराम बापूंनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. एक ध्यान मंत्र असे आध्यात्मिक मार्ग, दोन बौद्धिक पातळीवर सत्संग, तीन गुरूच्या भोवतीचे दैवी वलय आणि स्पंदने याद्वारे लोकांचे आजार बरे करण्यापासून ते आनंदलहरी कोट्यावधी लोकांपर्यंत पोचवण्याचे काम गुरु करतो. यात काय खरे आहे ? व्यक्तीला आर्थिक, सामाजिक, शारीरिक अशा अनेक शोषणाला तोंड द्यावे लागते. त्याला ध्यान आणि मंत्र उपयोगी पडू शकत नाही. कदाचित त्याद्वारे मनात शांतता प्रस्थापित झाल्यासारखे भासेल पण खरे दु:ख निवारण होणार नाही. या कथित गुरु आणि महाराजांच्या सत्संगातील विचार हे तर बहुतांश वेळा अत्यंत असंबंध आणि अनेकदा अशास्त्रीय व दिशाभूल करणारे असतात. कोणत्याही गुरु वा महाराज याच्याभोवती कसलेही अदृश्य दैवी वलय नसते आणि त्याची कसलीही स्पंदने लोकांचे आजार बरे करू शकत नाहीत. ही अंधश्रद्धा पसरवणे हीच बुवाबाजी आहे
.
(क्रमशः)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


"आत्मा नाही"
भूताच्या संदर्भातला एक खूलासा आपण केला पाहिजे. आपली कल्पना अशी असते की, माणसं मेल्यानंतर माणसांच्या शरीरामधून आत्मा नावाची कोणतीतरी गोष्ट बाहेर जाते आणि ती जी अत्यंत सूक्ष्म अशी आत्मा नावाची गोष्ट असते,ती पुन्हा कुठल्यातरी देहामध्ये प्रवेश करते,आणि यामुळे जीवनाचं सातत्य चालू आहे. आणि माणसाचा पुनर्जन्म शक्य असतो. पण जर आपण असं मान्य केलं की,माणसाचं माणूसपण असलेली सगळी बुध्दी,वासना,भावना,कल्पना,स्मरणशक्ती मेंदूत असते.मेंदूच्या पेशी विघटीत होतात,त्यावेळी माणूस मरतो.यावेळी एकही गोष्ट शरीराच्या बाहेर जात नाही. याच्यामुळे दुसर्या कुणाच्यातरी शरीरामध्ये ती प्रवेश करण्याची शक्यताच उरत नाही. या वैज्ञानिक दृष्टीनं विचार केला,तर आत्मा हि संकल्पना आणि पूर्वजन्मीच्या आठवणी हि शक्यताहीं स्वीकारता येत नाही.
" श्रद्धा-अंधश्रद्धा "
लेखक-डॉ. नरेंद्र दाभोलकर.
(पान नं.66,आवृत्ती 14 वी.)

"स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन"
पुरुषप्रधान व्यवस्था--
कधीकाळी मातृसत्ताक पद्धती समाजात होती,पण आज मात्र स्त्रीचं सर्व आयुष्य हे पुरूषी वर्चस्वाशी जोडललेलं असतं. लग्न होणं आणि मुलगाच होणं ही गोष्ट स्रीच्यासाठी सर्वस्वाची असते.पुरुषांसाठी ती एक बाब असते.म्हणूनच स्त्री ही कुमारी असते,प्रौढ कुमारी असते,सौभाग्यकांक्षीनि असते,सौभाग्यवती,घटस्फोटिता,
परित्यक्ता,विधवा अशी कोणीतरी असते.पुरुष हा तिचा 'मालक'असतो,
'पतिदेव'ही असतो. तिचं सारं असणं त्या संदर्भातच असतं.मुलगी ,पत्नी ,आई याभूमिकेतच कमीपणा घेवून जीवनाचं साफल्य मानणं हीच सार्थकता - असं तिला शिकवण्यात येतं.तिची सारी व्रतवैकल्ये 'चांगला नवरा व चांगला मुलगा 'यासाठीच असतात.नवरा कोणत्याही कारणाने मरण पावला ,तरी ती पांढर्या पायाची मानली जाते.हळदीकुंकू घेणं ,सणाच्या जेवणाला सन्मानाने बोलावणं यातून ती बाद होते.तिच्या हातून कोणताही मूहुर्त केला जात नाही. आणि स्वत:च्या मुलीचं कन्यादान करण्याचा अधिकार तीला उरत नाही. जीवनाच्या राजकारण ,सहकार,शिक्षण अशा अनेक क्षेत्रात मानानं मिरवणारा व स्वत:ला उच्च खानदानी कुळातील मानणारा मराठा समाज आजही आपल्या समाजातील तरून विधवेचा पुनर्विवाह करण्याच्या तीव्र विरोधी असतो.
"श्रद्धा-अंधश्रद्धा"
लेखक-डॉ. नरेंद्र दाभोलकर.
(पान नं.89.आवृत्ती 14वी)


"स्त्रियांचं मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा."
बहुसंख्य स्त्रिया या सतत मानसिक ताणाखाली असतात.नवर्याचं प्रेम नसने,सासूचा छळ,कुटुंबात मान्यता व प्रतिष्ठा यांचा अभाव, सांसारिक विसंवाद,लैंगिक असमाधान यांमधून उद् भवणार्या ताणामुळे स्त्रिचं व्यक्तिमत्व दुभंगतं.हे दुभंगणं काही विशिष्ट काळाशी ,स्थळाशी,व्यक्तीशी जोडलेलं असतं.जसं अमावास्या,पौर्णिमा, नवरात्र या काळात अंगात जास्त येतं.अंबाबाई देवी अथवा दत्ताचे स्थान या ठिकाणी घुमण्याचे प्रकार जास्त चालतात.हे अंगात येणं बहुदा ढोंग नसतं.एकतर ती असते प्रगाढ स्वसंमोहन अवस्था व दुसरं म्हणजे हिस्टेरीया,हा सौम्य मानसिक आजार,हा आजार असतो प्रासंगिक.छाती धडधडणं,अंग कापणं,अंग उडणं,कुणीतरी छातीवर बसण्यासारखं वाटणं,गळा आवळत आहे असा भास होणं या सर्व मनोविक्रुती आहेत. परंतु रुग्णाला त्याची सवय लागते.म्हणजे असं की,काही काळानंतर हा प्रकार तात्पुरता थांबतो व थोडे दिवसांनी पुन्हा प्रगटतो.डॉ क्टरांच्याकडून उपचार घेतल्यानंतरही तो पूर्ण बरा होतो, असं नाही. कारण गरज असते मुळ कारण बदलण्याची.घरामध्ये छळणारी सासू वा दारूड्या नवरा असेल तर ही मनोरूग्णता पून्हा पुन्हा उचल खाते.
"श्रद्धा-अंधश्रद्धा"
लेखक-डॉ. नरेंद्र दाभोलकर
(पान नं.92,93.आवृत्ती 14वी.)

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...