Flash

Tuesday, 24 April 2018

दारूबंदीसाठी ग्रामसुरक्षा दल - हेरंब कुलकर्णी

दारूबंदीसाठी ग्रामसुरक्षा दल

आज महाराष्ट्रात दरवर्षी ६६००० अपघातात १५००० लोक मरतात.

गावातल्याच निवडक महिला व पुरुषांकडे अवैध दारू पकडून तिची माहिती पोलीस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांना कळवण्याचे अधिकार देण्याची सूचना दारूबंदीच्या अनेक प्रयोगांतून पुढे आली आहे. त्यावर आधारित कायद्याचा मसुदाही तयार असून तो चर्चेच्या प्रतीक्षेत आहे.
गांधीजयंतीला शासनाने अवैध दारू रोखण्याच्या तंत्रज्ञानाचे लोकार्पण केले व राज्यातील अवैध दारू थांबविण्याचा संकल्प केला. कोपर्डीच्या अमानुष प्रकरणात आरोपींना अवैध दारू मिळाली तेव्हापासून अण्णा हजारे अवैध दारूचा मुद्दा गांभीर्याने मांडत आहेत.. बिहारच्या दारूबंदीनंतर नितीशकुमार यांनी नुकतीच दिल्लीत दारूबंदीवर संघर्ष करणाऱ्या १४ राज्यांतील संस्थांची परिषद घेतली. दारूबंदी हा २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनेल अशी लक्षणे आहेत. या पाश्र्वभूमीवर अण्णांनी कोपर्डी घटनेनंतर दारूबंदी आंदोलनाची घोषणा करणे महत्त्वाचे आहे. अण्णा आज जरी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते म्हणून माहीत असले तरी यापूर्वी दारूबंदीचे सातत्यपूर्ण काम त्यांनी केले आहे.  ‘अवैध दारू रोखण्यासाठी ग्रामसंरक्षक दलाला अधिकार द्या’, अशी मागणी ते आता करीत आहेत. त्याला प्रतिसाद देणारा कायदा हिवाळी अधिवेशनात येऊ शकतो.
आज महाराष्ट्रात दरवर्षी ६६००० अपघातात १५००० लोक मरतात. यापैकी निम्मे अपघात दारू प्यायल्याने होतात. तसेच व्यसनाधीनतेने आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ७६७२ व्यसनींनी आत्महत्या केल्या. हे सर्व बघता दारूबंदी ही महाराष्ट्रात केवळ नैतिक किंवा भाबडेपणाची मागणी नाही तर अपघात, गुन्हे, आत्महत्या, महिला अत्याचार व दारिद्रय़ यांतून सुटका करण्यासाठी गरजेची आहे.
अवैध दारू रोखण्यासाठी गावोगावी ग्रामसंरक्षक दल उभारण्याची मागणी महत्त्वपूर्ण आहे. याचे कारण आज परवानाधारक दुकानांतून खेडय़ापाडय़ांत अवैध दारू विविध वाहनांतून पाठवली जाते आणि हॉटेल, दुकाने वा घरांतून विकली जाते. या दारूचा खेडय़ातील ग्राहक हा गरीब मजूर वर्ग असतो. दारूमुळे कार्यक्षमता कमी झालेले मजूर कामालाही जात नाही उलट कष्ट करणाऱ्या पत्नीची मजुरी हिसकावून घेतात. मारहाण करतात. पैसे दिले नाही तर घरातील वस्तू विकून दारू पितात. एकीकडे १४व्या वित्त आयोगाने इतका प्रचंड निधी खेडय़ात जाताना, बचत गट, अन्नसुरक्षा देताना कुटुंबात होणारी बचत ही दारू काढून घेत पुन्हा अनेक कुटुंबांना दारिद्रय़ात ढकलते आहे हे कटू वास्तव आज खेडय़ापाडय़ात दिसते. त्यामुळे आज गावागावांतील अवैध दारू कशी रोखायची हा महत्त्वाचा ग्रामीण प्रश्न झाला आहे. किमान ती रोखली गेली तरी प्रश्न वैध दारूचा फक्त काही गावांपुरता सीमित होईल (याचे कारण देशी दारूचे लायसन्स तुलनेत कमी असून नवीन दिले जात नाहीत).
अण्णांचा ग्रामरक्षक दल हा मुद्दा महत्त्वाचा अशासाठी आहे की, पोलीस व उत्पादन शुल्क खात्याकडे तक्रारी करून ग्रामीण महिला थकून गेल्या आहेत. या दोन्ही विभागाचे अपुरे मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांचे हितसंबंध यामुळे अनेकदा तक्रारी करूनही पुन:पुन्हा दारू सुरू होते व महिला अगतिक होऊन जातात. गावकरी जेव्हा संतापाने या दारू दुकानांवर चालून जातात तेव्हा दारू दुकानदार, पुरुषांवर विनयभंगाचे किंवा महिलांवर चोरी/मारहाणीचे खोटे गुन्हे टाकतात. हे प्रमाण इतके मोठे होते की अण्णा हजारेंनी आर. आर. पाटील गृहमंत्री असताना सतत पाठपुरावा करून महिलांवरचे गुन्हे काढायला लावले. यातून गावातील महिलांना संरक्षण म्हणून काही अधिकार व ओळखपत्रे दिली पाहिजेत असा मुद्दा पुढे आला. गावातील अवैध दारू पकडण्याचे अधिकार निवडक पुरुष व महिलांना दिले तर त्यातून गावपातळीवर अवैध दारू रोखली जाईल व खोटे गुन्हे महिलांवर दाखल होणार नाहीत. यातून ग्रामसंरक्षक दलाची मागणी पुढे आली आहे. हिवाळी अधिवेशनात याबाबत येणारा कायदा कसा असावा याविषयी अण्णा हजारे यांचे मुद्दे असे :
१) ज्या गावचे लोक ग्राम संरक्षक दलाची स्थापना गावच्या एकूण मतदारांच्या संख्येच्या बहुमताने ग्रामसभेत करण्यास तयार आहेत अशाच गावात ग्राम संरक्षक दलाची स्थापना करण्यात यावी.
२)  ग्राम संरक्षक दलामध्ये भारतीय घटनेप्रमाणे समतेचे अनुकरण व्हावे यासाठी गावच्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, सवर्ण अशा सर्वाना सहभागी करण्यात यावे. ग्राम संरक्षक दलात ५० टक्के महिला सभासद असाव्यात.
३) ग्राम संरक्षक दलामध्ये सहभागी करून घेण्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्य़ाची नोंद नसावी.
४) दारूबंदी कार्यात योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात यावे.
५) राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या-ज्या गावांनी ग्राम संरक्षक दल तयार केली आहेत आणि शासनाने त्यांना कायद्याने मान्यता दिलेली आहे अशा ग्राम संरक्षक दलातील सर्व सदस्य, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी यांची दरमहा प्रांताधिकारी यांनी आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा.
६) गावातील ग्राम संरक्षक दल, ग्रामपंचायत यांनी समन्वय ठेवून गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम करावे.
७) ज्याप्रमाणे ग्रामसभेत ग्राम संरक्षक दलाची स्थापना होईल त्याचप्रमाणे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या वॉर्ड सभेमध्ये ग्राम संरक्षक दलाची स्थापना करावी. महानगरपालिकेमध्ये वॉर्ड मोठा असल्यास वॉर्डसभा होणे शक्य नसेल अशा वॉर्डमध्ये मुहल्ला सभेने वॉर्ड संरक्षक दल स्थापन करावे.
या दलाच्या कार्यपद्धतीविषयी अण्णा हजारे म्हणतात की, पंचनामा करून ग्राम संरक्षक दल अवैध धंदे आढळल्यास तालुका पोलीस निरीक्षकांना कळवतील व अवैध दारू असल्यास उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला कळवतील. ते तातडीने येऊन सदर पंचनामा ताब्यात घेऊन शक्य तितक्या लवकर गुन्हा दाखल करतील. जेथे ग्राम संरक्षक दल पंचनामा करू शकत नसेल, तेथे ग्राम संरक्षक दल पोलीस निरीक्षक आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना कळवतील. या अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्राम संरक्षक दल त्याचा पाठपुरावा करीत राहील. अवैध धंदे करणाऱ्यावर तीनदा गुन्हे दाखल झाल्यास त्यांना दोन वर्षे जिल्हा तडीपारच्या सजेची तरतूद कायद्यात असावी. महिलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार असा गुन्हा असेल तर तीन वर्षे ते दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा कायद्यात करण्याची तरतूद असावी.
ज्या तालुक्यांत ग्राम संरक्षक दले अधिक अवैध धंदे पकडतील त्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक/ उप-निरीक्षक वा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांची बदली करणे, पदोन्नती रोखणे, वेतनवाढ रोखणे यासारख्या शिक्षेची तरतूद असावी. अवैध दारू वा इतर धंदे पकडण्याची वा पंचनामा करण्याची संधी या दलांना मिळू नये अशी दक्षता पोलीस व उत्पादन शुल्क खात्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा अण्णा करतात.
अण्णा म्हणतात की ग्राम संरक्षक दलाला साह्य़ व्हावे यासाठी राज्य स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या व तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी समित्या स्थापन करण्यात याव्यात. या समित्यांनी आपापल्या विभागात दारूबंदीविषयी आढावा घ्यावा. सदर समित्या त्या-त्या विभागाच्या आढावा बैठकीमध्ये समिती अध्यक्षांना त्यांच्या भागातील दारूबंदी संदर्भातील सूचना करीत राहतील.
आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे शासनाला दारू उत्पादनापासून २३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादन शुल्क दरवर्षी मिळते. सदर उत्पन्नापैकी दोन टक्के रक्कम दारूबंदी, अवैध धंदे, महिला अन्याय, अत्याचार या संबंधाने लोकशिक्षण, लोकजागृतीसाठी गावामध्ये भित्तिपत्रके, हातपत्रके व बॅनरच्या माध्यमातून खर्च करण्यात यावे. कीर्तन, मनोरंजनातून लोकशिक्षण, भाषणे, पथनाटय़ यांसारखे कार्यक्रम करण्यात यावे व त्यांना मानधन देण्यात यावे. जेणेकरून राज्यात दारूबंदी संबंधाने लोकजागृती होत राहील. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना असा धोरणात्मक निर्णय अण्णा व दाभोलकर यांच्या पुढाकाराने झालाही होता.
बीड जिल्ह्य़ात ग्रामसंरक्षक दलाचा प्रयोग यशस्वी ठरतो आहे. बीडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी जिल्ह्य़ाच्या प्रत्येक गावातील महिलांना ओळखपत्र देऊन दारू पकडण्याचे अधिकार दिले आहेत. याचा खूप चांगला परिणाम होतो आहे. बीड जिल्ह्य़ाच्या या प्रयोगाचा अभ्यास करून ग्राम संरक्षक दलाची रचना करणे शक्य आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर सतत गावकऱ्यांना दारू पकडण्याचा अधिकार देण्याचा मुद्दा मांडत असत.
अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी १९५७च्या पोलीसपाटील कायद्यात पोलीसपाटलांवर आहेच. त्यांना या ग्रामरक्षक दलाचे सचिव करून त्यांच्यावर अवैध दारू रोखण्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य आहे. सतत अवैध दारू सापडली तर पोलीसपाटील पद त्या व्यक्तीचे रद्द करण्याचीही तरतूद व्हावी. दारू वाहणारे वाहन हे जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा अधिकार पोलिसांना द्यावा. दारूचे दुकान गावात येऊ द्यावे की नाही यासाठीही मतदान व्हावे. ‘उभी बाटली आडवी बाटली कायद्या’तील जाचक अटी रद्द कराव्यात.
हिवाळी अधिवेशनात हा कायदा येण्यापूर्वी यावर चर्चा व्हायला हवी. आज पोलीस व उत्पादन शुल्क अपुरे मनुष्यबळ व हितसंबंध यामुळे अवैध दारूकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा गावकऱ्यांना काही वैधानिक मर्यादित अधिकार देणे हाच व्यवहार्य उपाय आहे. हे काम पोलिसांना पर्यायी नाही तर पूरक असेल हे लक्षात घ्यायला हवे.

हेरंब कुलकर्णी
लेखक शैक्षणिक व सामाजिक  कार्यकर्ता आहेत.

या वाढीची फळे कोणती? - हेरंब कुलकर्णी

या वाढीची फळे कोणती?

इतर अन्यायाकडे विधिमंडळाचे लक्ष वेधता येते, पण इथे विधिमंडळाचा अन्याय निवारायला कोणाकडे जायचे?


अंगणवाडी सेविकांचे हे अश्रू २०१५ सालच्या मोच्र्यातले (एक्स्प्रेस संग्रहातून

आमदारांचे वेतनभत्ते  निवृत्तीवेतन यांत वाढ करण्यास विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यावरलोकमानसातून संतापाची प्रतिक्रिया आलीत्यापेक्षा चिंताजनक हे कीयातून लोकांना त्यागाचे आवाहनकरण्याचा नैतिक अधिकार राज्यकर्ते गमावतात आणि तुम्हाला जास्त तर आम्हालाही’ हे चक्र सुरू राहते..
वि. भि. कोलते यांनी साने गुरुजींना मुंबईहून नागपूरला व्याख्यानाला बोलविले. प्रथमवर्गाच्या प्रवास खर्चाला १०० रुपये दिले. गुरुजी तिसऱ्या वर्गाने प्रवास करून उरलेले ७३ रुपये परत देतात आणि म्हणतात ‘प्रथम वर्गाने प्रवास करणे हा धर्म आमचा नव्हे’. खूप आग्रह केल्यावर ते पैसे स्वत: न घेता साधनेत देणगी म्हणून जमा करतात.. दंतकथा वाटावी अशी महाराष्ट्रातील लोकसेवकांच्या आदर्शाची गाडी आता उलटी फिरून, नागपूरहून मुंबईला पोहोचली आहे. संघ प्रचारकांच्या त्यागी परंपरा बघितलेल्या पक्षाने धनाढय़ लोकसेवक ही कल्पना अलीकडेच आमदारांसाठी झालेल्या भत्ते/निवृत्तिवेतनवाढीतून महाराष्ट्राला शिकवली आहे. इतर वेळी अतिशय त्वेषाने बोलणारे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या विधेयकावर गप्प राहण्यात नेमका कोणता करार आहे? माध्यमांत आणि समाजमाध्यमांत या निर्णयावर आक्रमक टीका, तर दुसरीकडे सर्वपक्षीय आमदार, मंत्री यांचा सन्नाटा आहे. पुन्हा विधेयक मंजूर करण्याची वेळ ही अशी, की अधिवेशन संपल्यावर पुन्हा त्यावर फारशी चर्चा होणार नाही. राज्यभरचा पाऊस आणि महाड दुर्घटना यांत माध्यमे आणि लोक गुंतल्यामुळे कुणी फारसे बोललेही नाही. आता ज्यांना विरोध करायचा त्यांनी थेट न्यायालयात जाऊन आपले लाखभर रुपये खर्च करून या लखोपती वेतनवाढीला विरोध करायचा. इतर अन्यायाकडे विधिमंडळाचे लक्ष वेधता येते, पण इथे विधिमंडळाचा अन्याय निवारायला कोणाकडे जायचे?
हे मान्यच आहे की, यात खरेच साधेपणाने जगणाऱ्या आमदारांवर लोकांच्या संतापाने अन्याय होईल व शरद पवार म्हणाले तसे, ‘मुंबईसारख्या ठिकाणी राहणे, तेथील नोकरचाकर, कार्यकर्ते तसेच आमदार महोदयांच्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींवर होणारा खर्च अमाप असतो.’  तरीही सामान्य माणसे जास्त संतापतात; कारण लोकप्रतिनिधींचा वेगाने वाढणारा संपत्तीचा आलेख, निवडणुकीतला खर्च हे बघता, ‘यांना पगार व इतर रकमेची गरजच काय?’ हा एक बिनतोड सवाल या संतापाच्या मुळाशी असतो. एखाद्या श्रीमंताचे नाव दारिद्रय़रेषेत घुसडल्यावर जी लोकभावना होते तीच भावना येथेही असते.
लोक संतापतात, याचे कारण छोटय़ा छोटय़ा राजकीय भांडणात टोकाचे वादविवाद विधिमंडळात करून विधानसभा बंद पाडणारे, वाभाडे काढणारे या विषयावर क्षणात एकत्र होतात. इतर वेळी राज्याच्या आर्थिक दुरवस्थेवर गळे काढणारे सत्ताधारी आणि दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येने दु:खी होण्याचा अभिनय करणारे विरोधक ते विषय क्षणात बाजूला सारतात. या ढोंगाची सामान्य माणसाला चीड असते.
इतक्या कमी रकमेच्या बोजाबाबत इतका संताप का असतो याचेही विश्लेषण करायला हवे. सातव्या वेतन आयोगाचा बोजा एक लाख कोटी रुपयांचा आहे, तर त्या तुलनेत आमदारांच्या वाढीव वेतन/भत्त्यांचा एकूण खर्च फक्त १२९ कोटींचा. प्रश्न या रकमेचा नसतोच. त्यामागच्या उद्दाम आणि असंवेदनशील मानसिकतेचा असतो.  या राज्यातील शेतकरी कर्जमाफी मागत असताना, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका मानधनवाढ मागत असताना, विनाअनुदानित शाळेतील शिक्षक १०० आंदोलने करत असताना आणि उपोषणात मरत असताना सतत एकच उत्तर-  शासनाकडे पैसा नाही व राज्यावर पावणेचार लाख कोटी रुपये कर्ज असल्याचे ऐकवले गेले. ते सर्वाना मान्य आहे. त्यामुळे सगळे गप्प होतात. राज्याची इतकी दयनीय स्थिती असताना स्वत:साठी मात्र ते क्षणात विसरले जाते. ‘पैसे नाहीत’ म्हणून फाटके कपडे घालून शाळेत पाठविल्या गेलेल्या लेकराने घरी यावे तर बाप नवे कपडे घालून मित्रासोबत पार्टी करत असावा हे बघितल्यावर जो संताप होईल तोच संताप आज खदखदतो आहे. आता राज्याची आर्थिक अडचण कुठे गेली हा सार्वत्रिक प्रश्न आहे.
मला स्वत:ला राज्यकर्त्यांनी यात जो त्यागाचे आवाहन करण्याचा नैतिक आधार गमावला हा सर्वात चिंतेचा विषय वाटतो. पंतप्रधानांच्या गॅस सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला जो प्रतिसाद मिळाला ते या देशात एक नवे पर्व सुरू झाल्याचे चिन्ह होते. दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्या काळात केलेल्या आवाहनाचे जागरण करत त्या राजकारणाला जोडणारे आवाहन होते. असे वाटले की, पंतप्रधान असेच आवाहन सातव्या आयोगाच्या वेळी करतील आणि देशाचा विकासदर वाढेपर्यंत तुम्ही वेतन आयोग घेऊ नका, आम्हीही वेतनकपात करतो असे म्हणतील पण ते घडले नाही. महाराष्ट्रात अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक वृत्तीविषयी आदराची भावना आहे. आम्ही वेतनकपात करतो, तुम्ही किमान दोन वर्षे वेतन आयोग मागू नका, असे आवाहन ते करतील असे वाटले होते. राज्यकर्त्यांची नियत चांगली असेल तर या देशात नक्कीच प्रतिसाद मिळतो. पण फडणवीस यांनी ती संधी गमावली आहे. यापुढे ते कर्जबाजारी राज्याचे कारण सांगून कुणाला गप्प करू शकणार नाहीत की कर्मचारी किंवा इतर समाजघटकांना त्यागाचे आवाहन करू शकणार नाहीत.
गेली १५ वर्षे वेतन आयोगांना विरोधी भूमिका घेताना माझा कर्मचारी मानसिकतेचा अभ्यास झाला. त्यात राज्यकर्ते जर उधळपट्टी करतात तर मग आम्हीच राज्याचा विचार का करायचा हा मुद्दा असतो. तेव्हा कोणतीही कार्यसंस्कृती आणि साधेपणा, त्याग ही मूल्यप्रणाली वरून खाली वाहत असते. आमदारांच्या या वागण्यामुळे आता हीच वृत्ती सर्व समाजघटक दाखवतील.
या निर्णयाचा सर्वात जास्त आनंद आमदारांपेक्षा कर्मचारी संघटनांना झाला असेल, कारण आता राज्याची आर्थिक अडचण आणि त्यागाचे आवाहन हे दोन्ही मुद्दे सातव्या वेतन आयोगाचा सामना सुरू होण्यापूर्वीच शासनाच्या बाजूने बाद झाले आहेत. आता ते कर्मचाऱ्यांना कोणत्या तोंडाने अडचणी सांगणार, किंवा राज्याच्या विकासासाठी काही वर्षे त्याग करण्याचे आवाहन करणार? फडणवीस यांच्या नि:स्पृह प्रतिमेचे दडपण येऊन कदाचित जी संभाव्य माघार घ्यावी लागली असती किंवा राज्याचे कर्ज व शेतकरी आत्महत्या यातून जे अपराधीभाव कर्मचारी संघटनांवर आले असते त्या अपराधी भावातून सुटका करण्याची महान कामगिरी आमदारांच्या या वेतनवाढीने केली आहे. त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ सातव्या वेतन आयोगाचा हा खड्डा किती रुपयांचा असेल एवढेच मोजणे सामान्य माणसांच्या हातात उरले आहे. कर्मचारी व राज्यकर्ते या दोघांनी तिजोरी रिकामी होण्याला दुसरा घटकच कसा जबाबदार आहे असे म्हणत आपला स्वार्थ साधायचा असे चालले आहे.
या निमित्ताने निवृतिवेतन या शब्दाची व्याख्याही तपासून बघायला हवी. एका खात्यात किमान २० वर्षे सतत नोकरी केली तर निवृत्तिवेतन दिले जाते. वय ५८ पूर्ण झाल्यावर आता शारीरिक श्रम किंवा इतर कोणतेही काम करू शकणार नाही, असे गृहीत धरून हे निवृत्तिवेतन दिले जाते. या निकषावर आमदारांना केवळ दोन वेळा आमदार झाल्यावर निवृत्त समजण्यामागे तर्कशास्त्र काय आहे? आज २५ वर्षांचा आमदार सलग दोन मुदतींत आमदार झाला तर ३५व्या वर्षांपासून पेन्शनला पात्र होतो. दुसरीकडे, कर्मचारी ५८व्या वर्षी काम करण्याचा थांबतो; पण राजकरणात तर साठीनंतर खरे करिअर सुरू होऊन ८०व्या वर्षीपर्यंत पदे भूषवली जातात. तेव्हा निवृत्त या शब्दालाच आव्हान द्यायला हवे. एकीकडे २००५ नंतर नोकरीला लागलेल्यांचे पेन्शन बंद केले आणि इथे विनाकारण ५०,००० रुपये पेन्शन मिळणार आहे.
जखमेवर मीठ चोळण्याचा भाग असा की शेतकरी, शेतमजूर बांधवांना पेन्शन द्या म्हणून कित्येक वर्षे मागणी होते आहे. आयुष्यभर राबलेला शेतमजूर कोणतेच काम वृद्धपणी करू शकत नाही. त्याला निर्वाहवेतन आवश्यक आहे. संसदेत असंघटितांना पेन्शन विधेयक प्रलंबित आहे. महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशी जी पेन्शन अत्यंत गरीब व गरजू निराधारांना दिली जाते तिची रक्कम १००० रुपयांपेक्षा जास्त नाही. तीही वेळेवर येत नाही. एकदा तर त्यात ३०० रुपये कपात झाली होती. या योजनांच्या ८५ लाख लाभार्थीवर मिळून फक्त १८०० कोटी खर्च केले जातात आणि इकडे ३६६ व्यक्तींवर १२९ कोटी.. असंघटित लोक  आणि लोकसेवकांतील ही विषमता ‘सम आर मोअर इक्वल’ या जॉर्ज ऑर्वेलने अधोरेखित केलेल्या विषमतानीतीची साक्ष पटवणारी आहे.

Tuesday, 20 February 2018

लावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे

लावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे


_Lavani_1.jpgमहाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे! मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी मिळाली नाही. कारण तमाशात सादर केली जाणारी लावणी म्हणजे कामोत्तेजक भावभावनांचे छचोर दर्शन असेच मानले गेले. तमाशा किंवा लावणी ही कला तिच्या अंगभूत लावण्यामुळे-सौंदर्यामुळे गावकुसाबाहेरून गावातील मंडळींना खुणावत राहिली. त्यामुळेच लावणीकला गावकुसाबाहेर राहूनही मृत पावली नाही. महाराष्ट्रातील इतर अनेक लोकनृत्ये त्यांचे स्वत्व पांढरपेशी कलांच्या प्रभावापुढे गमावत असताना लावणी मात्र तिचे अस्सल रांगडेपण टिकवून आहे. लावणीकलेला स्वतःचे स्वत्व टिकवणे शहरी संस्कृतीचा व कलांचा स्पर्श न झाल्यामुळे शक्य झाले आहे.
लावणी गेल्या दोन-तीन दशकांत मात्र पांढरपेशांचेही मनोरंजन करताना दिसत आहे. त्या कलेने अनेक बदल-स्थित्यंतरे पचवली आहेत. लावणी पेशवाईच्या अस्ताबरोबर संपली असे वाटत असतानाच, खोलवर घुसवली गेलेली ती कला जमिनीच्या आतून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने वर उन्मुक्तपणे फोफावलेली, बहरलेली जाणवते.
मराठी सारस्वताच्या गेल्या साडेसातशे वर्षांत संतांचे आणि पंतांचे साहित्य जसे टिकून राहिले तद्वत तंतांचे म्हणजे शाहिरांचे लावणीवाङ्मयही टिकून राहिले, कारण लावणी रचनाकारांनी लावणीमध्ये समाजमनाचा, समाजाच्या विशिष्ट भावनांचा वेध घेतला आहे.
लावणीचा अभ्यास प्रामुख्याने लावणीच्या संहितेच्या अंगाने झाला आहे. त्यामुळे लावणी म्हणजे काय, लावणीत हाताळले गेलेले विषय या अनुषंगाने लावणीवर चर्चा होत राहिली. परंतु तिच्या दृश्यरूपाबद्दल - सादरीकरणाबद्दल कमी लिहिले गेले. तसेच, लावणी हे तमाशातील गण-गवळण-बतावणी या शृंखलेतील एक अंग असल्यामुळे ‘तमाशातील एक उपांग’ एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून लावणीकडे बघितले गेले. लावणीचे जे स्वरूप सद्यकाळात बघायला मिळते, त्यातून ‘लावणी’ या शब्दाचा नेमका अर्थबोध होत नाही.
- व्युत्पत्तिकोशकार कृ.पां. कुलकर्णी यांनी लावणी म्हणजे एक प्रकारचे ग्राम्यगीत (A kind of rural erotic song) अशी ‘लावणी’ची व्याख्या केली आहे. त्यांनी ती व्याख्या करतानाच ग्राम्यता, शृंगारिकता व गेयता अशी लावणीची तीन प्रमुख लक्षणे सांगितली आहेत.
- अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी ‘जी हृदयाला चटका लावते ती लावणी’ असे म्हटले आहे.
- प्रसिद्ध साहित्यिक दुर्गा भागवत यांनी ‘शेतात लावणी करताना म्हटले जाणारे गीत ते लावणी’ अशी लावणीची व्याख्या केली आहे (‘लोकसाहित्याची रूपरेखा’). दुर्गा भागवत यांनी पुढे म्हटले, की लावणी करताना म्हटली जाणारी कृषिकर्मातील ती गीते गाण्याची प्रथा नंतर सार्वत्रिक पावली.
- समीक्षक म. वा. धोंड म्हणतात, ‘सर्वसामान्य जनांच्या मनोरंजनाकरता त्यांना रूचतील अशा लौकिक, पौराणिक वा आध्यात्मिक विषयांवर रचलेली, कडे व ढोलके यांच्या तालावर विशिष्ट ढंगाने म्हटलेली खटकेबाज व सफाईदार पद्यावर्तनी वा भृंगावर्तनी जातिरचना म्हणजे लावणी.’ (‘म‍ऱ्हाटी लावणी’)
- डॉ. प्रभाकर मांडे यांनी लावणीची व्याख्या केली आहे, की लावणी ही एक प्रकारची कविता, गाणे, चीज असून डफ, तुणतुणे, टाळ व दिमडी-ढोलके इत्यादी वाद्यांच्या जोडीने ते म्हटले जाते. लावणी हा गायनप्रकार प्रामुख्याने भावनात्मक संगीताचा असल्याने लावणी म्हणजे शृंगार-विरहाचा परिपोष करणारी बहुजनसमाजाच्या बोलीभाषेतील भावगीतिकाच होय.
- तमाशा परंपरेत लहानाचे मोठे झालेले नामदेव व्हटकर यांनीही लावणीची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ती व्याख्या अधिक सुसंगत आहे. ते लिहितात- ‘पूर्वीच्या काळातील गाणारा अशिक्षित कवी आपल्या साथीदारांच्या ताफ्यात बसून कशी रचना करत असेल, याचे चित्र डोळ्यांपुढे आणले, की ‘लावणी’ शब्द कोठून आला ते झटकन उमगते. ढोलकी किंवा तुणतुणे यांची बारीक साथ चालू आहे. शाहीर शून्यात बघत शब्द हुडकून आणून एकापुढे एक लावत आहे. घाट, माट, थाट अशी यमके ठेक्यात जुळून शब्दांची बरोबर लावण झाली, गाणे तालासुरात री ओढणा‍ऱ्यांनाही चांगले जमून ठाकठीक बसले, की मग ते पूर्ण झाले. अशा वेळी अमक्या विषयावरची लावण किंवा लावणी झाली का? असे विचारले जाई. म्हणूनच शब्दांच्या या लावणीवरूनच ‘लावणी’ हा शब्द आला असावा.’ (‘मराठीची लोककला-तमाशा’)
- काही मान्यवरांनी लवण म्हणजे सुंदर. तसेच लवण या शब्दाचा अर्थ मीठ असाही आहे. मिठाने जशी जेवणाची गोडी वाढते, तशी लावणीमुळे नृत्याची गोडी वाढते, म्हणून लवण या शब्दावरूनच ‘लावणी’ शब्द आल्याचाही निष्कर्ष काढला आहे.
- काहींनी आकर्षक शब्दांची सुभग मांडणी म्हणजे लावणी अशीही व्याख्या केली आहे.
या व्याख्यांव्यतिरिक्त लावणीची व्युत्पत्ती सांगण्याचा एक प्रयत्न ‘लावणी’ नृत्यातील एका विशिष्ट हालचालीवरूनही केला गेला आहे. लावणीतील नर्तकी ‘कंबर हलवी शंभर जागी लवून’ म्हणून ती लवणी म्हणजे लावणी अशी व्याख्या केली गेली आहे. लावणी या नृत्यप्रकाराच्या अशा विविध व्याख्या केल्या गेल्या असल्या, तरी ‘लावणी’ची एकच एक व्यवच्छेदक व्याख्या केली गेलेली नाही. वरील कोठल्याही व्याख्येतून लावणीचा उगम व विकास यांचा नेमका बोध होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभ्यासकांनी लावणीची व्याख्या करताना गेल्या साडेतीनशे वर्षांतील लावणीची परंपराच डोळ्यांसमोर ठेवलेली दिसते, पण लावणी हा शब्द थेट ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतही आढळतो. उपलब्ध असलेली सगळ्यात जुनी लावणी मन्मथ शिवलिंग यांची असून ती क‍ऱ्हाडच्या भवानीदेवीवर रचलेली आहे. तसेच ती चौदाव्या शतकातील आहे. म्हणजे लावणी हा शब्द अकराव्या शतकापासूनच प्रचलित होता.
महाराष्ट्रातील लावणी किंवा तमाशा यांचा मूळ स्रोत उत्तरेत असल्याचे म्हटले जाते. ते खरेही काही अंशी आहे. लावणी हा शब्द मराठी सारस्वतात पूर्वापार वापरात असला आणि लावण्या चौदाव्या शतकापासून लिहिल्या जात असल्या, तरी त्यात स्त्रीचे नृत्य हा प्रकार नव्हता. सुरुवातीला, लावणी रचणारे कवी किंवा शाहीर स्वतः डफाच्या साथीने लावणी जमावासमोर सादर करत असत. रामजोशी-होनाजी बाळा यांच्या काळातही लावणीगायन हे प्रामुख्याने त्या-त्या शाहिराने केले. कालांतराने, मोगलांचे आक्रमण महाराष्ट्रावर झाले, तेव्हा त्या सैन्याबरोबर त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नर्तिकांचा वर्गही आला. त्या नर्तिका दिवाणखाना पद्धतीनुसार नाचून-गाऊन मुस्लिम सैन्याचे मनोरंजन करत. ते नाचगाणे महाराष्ट्रातील तत्कालीन कोल्हाटी-धनगर-मांग अशा फिरस्त्या असलेल्या जमातींनी पाहिले आणि आत्मसात केले. त्या समाजातील मंडळी तमाशा क्षेत्रात अधिक असण्यामागील कारण ते होय.
लावणीत सादर केले जाणारे स्त्रीनृत्य हे लावणीचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र त्या नृत्याची सुरुवात नेमकी कशी झाली हे अनुत्तरित आहे. लावणीनृत्यातील तत्कारांसारख्या पदन्यासावरून ते उत्तरेतील ‘कथक’ या शास्त्रीय नृत्यातून आले असावे असे जाणकारांचे मत आहे. मुस्लिम सैन्याबरोबर आलेल्या नृत्यांगना तशा प्रकारचे नृत्य करत असल्यामुळे ते काही अंशी खरेही आहे. परंतु पदन्यासातील तत्कार सोडला तर लावणीनृत्याचा उत्तरेकडील नृत्याशी काहीही संबंध नाही. उलट, महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या वाघ्या-मुरळी नृत्याशी लावणीनृत्याचा अधिक जवळचा संबंध आहे. वाघ्या-मुरळी नृत्यात मुरळी ज्याप्रमाणे कमरेत वाकतात किंवा हाताच्या मुद्रा करतात, त्याप्रमाणेच लावणीनर्तिका करतात.
महाराष्ट्रात समाजाच्या मनोरंजनासाठी म्हणून स्त्रीने नाचणे या प्रकारची कोठलीही कला अस्तित्वात नव्हती. तामिळनाडूमध्ये देवाच्या मनोरंजनासाठी देवदासी नाचत, त्यांच्या दासीअट्टमपासून भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याची निर्मिती झाली किंवा ओरिसातील मदिरांत देवदासी करत असलेल्या ‘महारी’ नृत्यातून प्रसिद्ध ओडिसी या शास्त्रीय नृत्याचा जन्म झाला. महाराष्ट्रात तसे झाले नाही. महाराष्ट्रात विविध देवदेवतांना स्त्रीपुरुष ‘सोडण्या’ची प्रथा होती. उदाहरणार्थ, रवळनाथाच्या भाविणी, खंडोबाच्या वाघ्या-मुरळी... त्या सा‍ऱ्यांनी देवाची सेवा करावी एवढाच हेतू सुरुवातीला होता. त्यात नृत्य वगैरे भाग नव्हता, मात्र गाणे आवर्जून असायचे. अनेक भाविणी देवासाठी म्हणून गायच्या.
सुरुवातीच्या काळात, तमाशात स्त्रीपात्र नव्हते. पुरुष नाचे स्त्रीपात्र रंगवून नाचायचे. तमाशात किंवा लावणीत स्त्री नाचवण्याची पद्धत रूढ झाली ती पेशवाईत. दुस‍ऱ्या बाजीरावाने शाहिरांना आणि त्यांच्या लावणीकलेला प्रोत्साहन दिल्यामुळे त्या काळात मोठ्या प्रमाणावर लावणीची रचना झाली. तसेच, राजाश्रय मिळतो म्हणून अनेक जण त्या क्षेत्रात आले. त्या काळात अनेक महिलाही लावणीगायन करायच्या. त्यांचे गाणे खुलेआम रस्त्यावर होत नसे. कलावंतिणी बावनखणीसारख्या बंदिस्त वास्तूंमध्ये गात. त्यांचे गाणे ऐकण्यास तत्कालीन प्रतिष्ठित समाज जात असे.
लावणी ही स्त्रीनृत्यप्रधान कला असल्यामुळे त्याकडे सारेजण आकर्षित झालेले दिसतात. लावणीचे सादरीकरणानुसार कोणकोणते भेद आहेत यावर फार लिहिले-बोलले गेलेले नाही. लावणीचे त्यानुसार तीन प्रमुख भेद पडतात. पैकी पहिली शाहिरी लावणी, दुसरी बैठकीची लावणी आणि तिसरी फडाची लावणी. पैकी शाहिरी लावणी शाहीर त्याच्या साथीदारांच्या मदतीने व डफ-तुणतुण्याच्या साथीने सादर करतो. शाहीर सादर करत असलेली लावणी काहीशी उच्च स्वरातील म्हणजे पोवाड्याशी मेळ साधणारी असते. शाहिरी लावणीत नर्तिका नसते. शाहीर व त्याचे झिलकरी आवाजाच्या चढउताराने लावणी रंगवतात. बैठकीची लावणी हा प्रकार महत्त्वाचा आहे. त्या प्रकारात लावणी बसून सादर केली जाते. मात्र बसून सादर केली जाते, म्हणून ती बैठकीची लावणी नव्हे! तर कोणीतरी आयोजित केलेल्या बैठकीत सादर होणारी, म्हणून ती बैठकीची लावणी! उत्तरप्रदेशात लखनौमधील कोठींवर ज्याप्रमाणे ठुमरी-दाद‍ऱ्याची बरसात रसिकांवर केली जाते, त्याचप्रमाणे बैठकीच्या लावणीत शास्त्रीय ढंगाच्या विलंबित गतीच्या लावण्या सादर केल्या जातात. बैठकीच्या लावण्या या उपशास्त्रीय प्रकारात मोडतात. साथीची वाद्येही तेथे नेहमीपेक्षा वेगळी असतात. उदाहरणार्थ, फडाच्या लावणीत ढोलके-तुणतुणे ही वाद्ये असतात. परंतु बैठकीच्या लावणीत साथीला तबला, पेटी आणि सारंगी अशी खानदानी शास्त्रीय वाद्ये असतात. बैठकीच्या लावणीत गाणारी कलावती गाणा‍ऱ्याबरोबर बसून भावदर्शक अभिनयही करते. तिचा तो अभिनय केवळ चेह‍ऱ्यावरील नसतो, तर ती संपूर्ण अंगाने, पण बसूनच बोलत असते. गायिका गाण्याबरोबर करत असलेल्या त्या अभिनयाला ‘अदा’ असे तमासगिरांच्या भाषेत बोलले जाते, तर चेह‍ऱ्यावरच्या अभिनयाला ‘भावकाम’ असा शब्द वापरला जातो. पेशवाईत बैठकीची लावणी सादर करणा‍ऱ्या अनेक कलावती होत्या. त्यांचा मुक्काम व दिवाणखाने पुण्याच्या शुक्रवारपेठेतील बावनखणी या परिसरात असायचे. बैठकीच्या लावण्या म्हणणा‍ऱ्या गायिकांचे उपकार महाराष्ट्रावर खूप आहेत, कारण त्यांनीच उत्तर पेशवाईत नावारूपाला आलेली लावणीकला ख‍ऱ्या अर्थाने जोपासली. त्याचे श्रेयही दुस‍ऱ्या बाजीरावालाच जाते. त्याने शास्त्रीय ढंगाच्या ठुम‍ऱ्या-दादरे ऐकले होते. त्याने त्याच्या दरबारी असलेल्या होनाजी बाळाला ते ऐकूनच शास्त्रीय ढंगात म्हणता येतील, अशा लावण्यांची रचना करण्यास सांगितले. शाहिरांनी तशा लावण्या रचून सादर केल्याही. मात्र पेशवाई १८१८ मध्ये बुडाल्यावर लावणी कलेला कोणी वाली उरला नाही. साहजिकच, शाहीरही पेशवाईबरोबर देशोधडीला लागले. बैठकीच्या किंबहुना, एकूणच लावणीच्या त्या पडत्या काळात बावनखणीतील कलावंतिणींनी पेशवाईतील लावण्या आत्मसात करून-टिकवून ठेवल्या. त्यांच्यामुळेच लावणीचा पारंपरिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचला आहे.
बैठकीच्या लावण्या उत्तरेतील मुज‍ऱ्याच्या धर्तीवर म्हणणा‍ऱ्या अनेक नामवंत गायिका महाराष्ट्रात होऊन गेल्या. त्यामध्ये बाई सुंदराबाई, कौसल्याबाई कोपरगावकर, गोदावरी पुणेकर, अनसूयाबाई जेजुरीकर अशा गायिकांचा आदराने उल्लेख करावा लागेल. ज्यांनी बैठकीची लावणी गायली-जपली अशा यमुनाबाई वाईकर, गुलाबबाई संगमनेरकर यांच्यासारखे मोजके कलावंत विसाव्या शतकात होते.
फडाच्या लावणीला लावणीच्या क्षेत्रात प्रतिष्ठा अधिक आहे. फडाच्या लावणीची खासीयत म्हणजे त्या लावणी प्रकारात मुख्य नर्तकीबरोबर नाच्या-सोंगाड्या असे इतर साथीदार असतात. नर्तकी लावणी उभ्याने नाचून सादर करते. फडाच्या लावणीत गाणारी वेगळी असते आणि नाचणारी वेगळी असते. मात्र ‘बैठकीची लावणी’ व ‘फडाची लावणी’ यांमधील मुख्य भेद म्हणजे बैठकीची लावणी संथ असते, तर फडाची लावणी जलदगतीची असते. तसेच, फडाच्या लावणीत ढोलकी आणि तुणतुणे यांना अतिशय महत्त्व असते. फडाच्या लावणीला ढोलकीची लावणी असेही म्हणतात.
फडाची लावणी हा लावणीचा मुख्य प्रकार असला तरी त्यात चौकाची लावणी, छक्कड लावणी, बालेघाटी, जुनरी, धनगरी असे काही पोट प्रकार आहेत. त्यांतील बालेघाटी, जुनरी व धनगरी लावणी हे भेद प्रादेशिकतेमुळे व विशिष्ट जमातीमुळे पडलेले आहेत. मात्र चौकाची लावणी व छक्कड लावणी हे भेद लावणीच्या ठरावीक गुणवैशिष्ट्यांमुळे पडलेले आहेत. उदाहरणार्थ, चौकाची लावणी मोठी असून चार चार ओळींचे एकेक कडवे असते. प्रत्येक लावणीत तशी चारपाच कडवी असतात. चौकाच्या लावणीचे वेगळेपण म्हणजे त्या लावणीत प्रत्येक कडव्याची चाल वेगळी असते तर छक्कड लावणीत फक्त सहा ओळी असतात. त्या लावणीची मांडणीही विशिष्ट पद्धतीने केलेली असते. त्या लावणीत सहा ओळींची वैशिष्ट्यपूर्ण विभागणी केलेली असते. ती विभागणी दोन ओळी + तीन ओळी + एक ओळ अशी असते. उदाहरण म्हणून अप्पा तांबोळी यांची पुढील लावणी पाहा –
जाता जाता धक्का यानं मारला गं
कसा मस्तीचा बोकुड मेला
मी जात होते पाण्याला
माझ्या मागून चोरावानी आला
शिरी माठ भरून घेतला
यानं निरीस हात माझ्या घातला गं...कसा मस्तीचा बोकुड मेला
म्हणजे दोन ओळींचे ध्रुपद, तीन ओळींचा अंतरा आणि सहावी ओळ पुन्हा मूळ ध्रुपदाला जोडून घेतलेली.
लावण्या, त्यांच्यामध्ये ‘चौकाची’, ‘छक्कड’ असा फरक असला तरी जलदगतीच्याच असतात. त्यामुळे त्या रसिकांना आवडतात. त्याउलट, बैठकीच्या लावण्या ठाय लयीत असल्यामुळे त्या फक्त संगीताचे दर्दी असलेल्यांना आवडतात. लावण्यांचे असे काही भेद आहेत. मात्र लावण्यांचा विचार सादरीकरणातील त्या भेदांच्या अंगानेच व्हायला हवा. कारण वर्षांमागून वर्षें सरली तरी संहिता कायम असते. फरक पडतो, तो सादरीकरणात. तेव्हा गेल्या काही वर्षांत बदललेल्या लावणीच्या फॉर्मचा विचार व्हायला हवा!
- मुकुंद कुळे, 9769982424

Tuesday, 31 October 2017

अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी

ब्लॉग स्पेस

अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी
 Mar 23, 2009
अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी
Posted by सोनाली देशपांडे | {5} कॉमेन्ट्स
अमृता प्रीतम आपलं आयुष्य एखाद्या कवितेप्रमाणे जगल्या.. त्यांचं आयुष्य फुलपंखी नक्कीच नव्हतं. शारीरिक-मानसिक दु:खही भरपूर होती. पण इमरोझ आणि अमृता यांची साथ सगळ्या संकटांना सामना करू शकेल इतकी भक्कम होती.

अमृता-इमरोझ अ लव्ह स्टोरी या उमा त्रिलोक यांच्या इंग्लिश पुस्तकाचं भाषांतर अनुराधा पुनर्वसू यांनी केलं अमृता-इमरोझ एक प्रेम कहाणी या नावानं.. या पुस्तकात आपल्याला फक्त अमृता-प्रीतम किंवा इमरोझ भेटत नाहीत.. तर सापडतो एक सच्चेपणा आणि दुर्मिळ अशी प्रेमभावना..जी शारिरी प्रेमाच्याही पलीकडे जाते..

चाळीशीत अमृता प्रीतमना इमरोझ भेटले. अमृता प्रीतम आणि इमरोझ यांचा सहवास 40 वर्षांचा..तेही कुठल्याच कायदेशीर नात्याचा अट्टहास न करता. फक्त प्रेमाच्या नात्यावर त्यांचा संसार झाला. 60-65 वर्षांपूर्वीची ही गोष्ट म्हणजे एक क्रांतीच होती.. उमा त्रिलोक अमृताजींना भेटल्या तेव्हा अमृताजी थकल्या होत्या. आजारी होत्या. आणि त्याच काळातलं इमरोझ-अमृता यांचं नातं लेखिकेनं अनुभवलं आणि शब्दबद्ध केलं.

अमृता-इमरोझच्या आयुष्यातले एकेक किस्से लेखिका गुंफत जाते. अधेमधे त्यावर भाष्यही करते. ओघवत्या भाषाशैलीमुळे वाचकाच्या समोर ते प्रसंगच उभे राहतात.

दोन मुलांची आई आणि विवाहित असलेल्या असलेल्या अमृताजींचा इमरोझबरोबर राहण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठं बंडच होतं. त्यावर लेखिका म्हणते, 'बदल पाहिजे बदल पाहिजे अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात बदल घडून येतो, तेव्हा मात्र घाबरतो. अमृता-इमरोझनं स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची नवी वेगळी भाषा दिली आहे.'

अमृता प्रीतमची बंडखोरी आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. एक किस्सा असा आहे की दोघं मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत होते. ट्रेनमध्ये सामानात काही दारू वा मादक पदार्थ आहेत का हे तपासायला पोलीस आले. अमृता प्रीतम म्हणतात - 'आमच्यापाशी तसं काही नाही, याची खात्री करून घेऊन त्यांनी आम्हाला सोडून दिलं. पण एकमेकांबरोबर असण्याची नशा आम्हाला पुरेशी आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. आमची नशा ते थोडीच उतरवू शकणार होते.'

अमृता-इमरोझ एक परिकथा वाटली, तरी तिला वास्तवाची झालर आहे. म्हणूनच अमृताजींचं साहिर सुधियानींवर असलेल्या प्रेमाचाही उल्लेख येतोच आणि त्याचा स्वीकार इमरोझनी केलाच होता. अमृताजी इमरोझपेक्षा वयानं मोठ्या. त्यांच्या आजारपणात इमरोझनी त्यांची खूप सेवा केली. इमरोझ हे मोठे चित्रकार होते.. पण अमृताजींपुढे ते तसे झाकोळलेले राहिले. त्यावर ते स्वत: म्हणतात, 'लोक म्हणतात की तुमचं आयुष्य तुम्ही केवळ अमृताला वारा घालण्यातच व्यतीत केलं. पण त्यांना हे माहीत नाही की तिला वारा घालता घालता मलाही हवा लागत होती.'

लेखिकेनं नात्याचे इतके पैलू मांडलेत की वाचताना थक्क व्हायला होतं.. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अमृता किंवा इमरोझला महान बनवलं नाही. की स्वत:चा उदोउदोही केला नाही. ही माणसांची गोष्ट आहे. त्यांच्या गुणदोषांसकट.. पण ही माणसंच अनोखी आहेत.एके ठिकाणी इमरोझ म्हणतात, अमृताची भेट झाल्यापासून माझ्यातली रागाची भावना लुप्त झाली. प्रेमाची भावना प्रबळ झाल्यामुळे द्वेष, राग, मत्सर यांना थाराच नसावा. प्रकाश असेल तिथे अंधार असेल का?

पुस्तकात अमृताजींच्या पंजाबी कवितांचंही भाषांतर आहे. ते फारच नैसर्गिक वाटतं. आपल्या आजूबाजूला मनाच्या आणि रक्ताच्या नात्यांतली असुया, कडवटपणा आपण पाहत असतो. अनुभवत असतो. अनेक जण मी माझं मला या वर्तुळात फिरत असतात. या सर्व परिस्थितीत हे पुस्तक हाती पडतं आणि ते वाचल्यावर आनंदाची लहर आपल्या मनात बराच काळ तरंगत राहते..

सोनाली देशपांडे

link - http://im.ibnlokmat.tv/showblog.php?id=57212

वाचकांचे ‘आसमान’ उंचावणारी लेखिका

वाचकांचे ‘आसमान’ उंचावणारी लेखिका

31 Aug 2014, 0027 hrs IST,Maharashtra Times  
amruta
मनोज बोरगावकर

हिंदीतील विख्यात लेखिका अमृता प्रीतम यांचा ३१ ऑगस्टला जन्मदिवस. 'मेरी नजर में लेखक वो है, जो आपने पाठकोंका आसमान उंचाँ करे,' अशा शब्दांत लेखकाची व्याख्या करणाऱ्या, संपूर्ण आयुष्यभर लिहिणं आणि जगणं यात तसूभरही अंतर नसणाऱ्या या मनस्वी लेखिकेबद्दल.

अमृता प्रीतम हे फार मोठे अदबी नाव. लिहिणं आणि जगणं यात तसूभरही अंतर नसणारी ही लेखिका. 'चिंतनशील माणसांच्या हातात 'तर्क' असतो, दगड नाही. म्हणूनच जेव्हा कोणता हात दगड घेऊन उगारला जातो तेव्हा पहिली जखम होते ती माणसाला नव्हे, तर माणुसकीला,' असं म्हणणारी अमृता केवढं त्रिकालबाधित विधान करुन जाते आणि म्हणूनच ती प्रत्येकाला आपली समकालीन वाटत राहते. निरंतर समकालीन. ३१ ऑगस्ट तिचा जन्मदिवस. ए‌क निमित्त!

तिनं अनेक पुस्तकं लिहिली. जगातील विविध भाषांत त्यांचे अनुवादही झाले. 'ज्ञानपीठा'पर्यंत सारेच पुरस्कार तिला मिळाले. एवढंच तिचं मोठपण नाही, तर तिने जगण्याचा एक सलिका निर्माण केला. तो मोलाचा. लाख मोलाचा. इमरोजजींना फोनवर बोलताना सहज म्हणालो, 'सगळ्या वाचकांना, तिच्या चाहत्यांना ऑगस्ट महिन्यात अमृताची फार आठवण येते.'

ते म्हणाले, ''याद आनेको मैं उसे भुला ही कहा हूँ।'

'गंगा जिस्म धोती है। सोच नही,

पाप सोच करती है। जिस्म नही।

असे म्हणणारे इमरोज आणि अमृता प्रीतम कुठलाही फेमिनिझम किंवा वुमेनिझमचा दावा न करताही स्त्री-पुरुष नात्याची एक वेगळी वीण आपल्यासमोर साक्षात करीत जातात. स्त्रीच्या पदराला हात घालणं ही आज पुरुषार्थाची व्याख्या ठरत असताना, स्त्रीच्या पदराआडचं दुःख पाहता येणं म्हणजे पुरुषार्थ अशी बाराखडी नव्याने गिरवून घेण्याचा प्रयत्न अमृता प्रीतम आणि इमरोज आपल्या जगण्या, वागण्या, लिखाणातून करीत राहिले.

'सगळं काही खर्च करुन बाकी जे काही उरत असतं, त्यालाच तर आयुष्य म्हणत असतात,' अशी आयुष्याची थेट भिडणारी व्याख्या करणारी अमृता, जीवनातल्या नकारांवर नाही तर, स्वीकारांवर मनस्वी प्रेम करते.

'मन मंथन ही गाथा', 'सपनोंकी नीलीसी लकीर', 'उनके हस्ताक्षर', 'ना-रुक्मिणी ना-राधा', 'कोरे कागज', 'मन मिर्झा तन साहिबा', 'अज्ञात का निमंत्रण' आदी पुस्तके वाचकांना वेगळ्या अर्थाने समृद्ध करीत राहतात. पुरस्कार, मानमरातब यासाठी अमृतानं कधीही आपली लेखणी झिजवली नाही. ती मनातला आणि बाहेरचा कोलाहल टिपत राहिली आणि कागदावर मांडत राहिली. कमावण्या, गमावण्याचे कोणतेही व्यवहारी हिशोब न मांडता प्रसंगी आपल्या लोकांपासून जलावतन होण्याची किंमतदेखील तिने मोजली; पण लेखणीची बेअदब होऊ दिली नाही.

अमृता प्रीतमची लेखकाची व्याख्याच लेखक या शब्दाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी आहे. ती म्हणते, 'मेरी नजर में लेखक वो है, जो आपने पाठकोंका आसमान उंचाँ करे.' किती बरोबर बोलली अमृता! आज धर्म, प्रांत, भाषा या नावाखाली जो अंधकार सगळीकडे पसरला आहे, अशा परिस्थितीतही अमृतासारखे लेखक दिव्यागत सभोवार उजळून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. अन्यथा, हा अंधारच सारीकडे व्यापून राहिला असता.

स्त्रीविषयक दुःखाचा कोपरा लिहिताना अमृताची लेखणी अधिकच हळवी होत जाते. ‌स्त्रियांच्या आयुष्याची परवड मिथहास असो, इतिहास असो का, वर्तमान असो अथकपणे चालूच आहे. कुंती, गांधारी, सीता, द्रौपदी यांना पाय ठेवायला जमीन पुष्कळ मिळाली; पण पाय ठेवलेली जमीन विश्वासाची कुठे होती? आदींसारखे प्रश्न ही पडले ते अमृताचे साहित्य वाचूनच. भारताच्या नाही तर, जगाच्या इतिहासातील किती स्त्रियांची नावे सांगता येतील की, त्यांना आपल्या जिवंतपणी आपलं साहित्य प्रकाशित करता आले नाही. फ्रान्सची लेखिका जॉर्ज सॅन्ड हिला लिहिण्यासाठी मर्दानी कपडे वापरून जगावे लागले. इंग्रजी साहित्यातील बहिणी एमिली, ऐनी, शार्लेट, ब्रॉन्टे यांनी आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले, त्यावर लेखक म्हणून पुरुषांचे नाव होते. स्वित्झर्लंडची लेखिका अल्फान्सिका सर्तोरनी १८८२ला जन्मली; पण लिहिण्याच्या गुन्ह्यांचा कहर हा ‌की, तिला आत्महत्या करावी लागली. एला आखमतोबा एक रशियन कवयित्री. त्या काळातल्या मोठ-मोठ्या कवींमध्ये तिचे नाव घेतले जायचे; पण स्टॅलिनच्या कालावधीत तिच्या नवऱ्याला आणि मुलाला कैदेत टाकले गेले अन् तिला 'हाफ सेंट हाफ प्रॉस्टिट्यूट' म्हणून हिणविले गेले. ऐनेतोलिया पोजी (इटली), ज्युलिया बर्गोस (अमेरिका) किंवा मेरी कफन जहरिले धागोंसे सिया जा रहा है। असे म्हणणारी पाकिस्तानी शायरा सारा शगुफ्ता या साऱ्यांना लिहिण्याची सजा म्हणून आत्महत्याच करावी लागली. स्त्री जातीच्या दुःखाला वाचा फोडताना अमृताची लेखणी जणू स्वतःशीच हितगूज करायला लागते. एकंदरच साऱ्याच सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना अमृता लिहून जाते.

यह धरती एक खूबसुरत किताब है।

चाँद सुरत के जिल्दवाली

पर खुदाया

यह भुख और गरिबी

सहम और गुलामी

क्या यह तेरी इबारत है

या तेरे प्रकाशकसे रह गई

प्रूफ रीडिंग की ग‌लतियॉँ...।

म्हणूनच आज तिच्या जन्मदिवशी तिची आवडती लेखिका आइन रँडकडून एक वाक्य उधार घेऊन म्हणावेसे वाटते. 'अमृता आय थॅँक यू फॉर व्हॉट यू आर!' 

link - https://maharashtratimes.indiatimes.com/assembly-elections-2014/mumbai-assembly-elections-2014/editorial/ravivar-mata/amruta-pritam/electionarticleshow/41285369.cms 

मैं तुम्हे फ़िर मिलूंगी

मैं तुम्हे फ़िर मिलूंगी

>> समीर गायकवाड
अमृता प्रीतम हे हिंदुस्थानी साहित्यातील एक लखलखीत नाव. समाजाच्या बंधनात स्वत:ला जखडून न घेता त्या इमरोजसोबत एक आदर्श नातं जगल्या. ३१ ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतिदिन. यानिमित्त या वादळी व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा वेध.
आताच्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबातील गुजरांवाला या शहरात ३१ ऑगस्ट १९१९ ला जन्मलेल्या अमृतांचा वयाच्या सहाव्या वर्षी साखरपुडा झाला, अकराव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले, सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन् सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते तर इमरोजबरोबर त्या पन्नास वर्षे एकत्र राहिल्या. तीन ओळीत सांगता येईल अशी अमृता प्रीतम यांची कथा आहे.
कवी साहीर लुधियानवी अमृतांच्या आयुष्यात आले. त्यांच्या विलक्षण काव्यप्रतिभेनं, भावविभोर शब्दकळेनं आणि व्यक्तिमत्त्वानं त्यांना झपाटलं. इतकं की त्यांच्याशिवाय आयुष्याची त्या कल्पनाच करू शकत नव्हत्या. अमृता आणि साहीरची साहित्यिक कारकीर्द याच काळात फुलत बहरत होती. या काळात साहीरनं अमृताचं अवघं जगणंच व्यापलं होतं. अमृतांच्या लेखनातही त्याचे पडसाद स्वच्छपणे जाणवतात. पुढे साहीर मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावायला आले आणि मग इथलेच झाले. चित्रपट गीतकार आणि शायर म्हणून त्यांनी अमाप ख्याती मिळवली. ‘साहीर मुंबईला गेले आणि त्या मायानगरीचाच झाले’, या वास्तवानं अमृता एकीकडे आतून उन्मळून पडल्या. उद्ध्वस्त झाल्या. तर दुसरीकडे साहीर यशाच्या पायऱ्या चढत गेले याचाही अमृतांना आनंद झाला. या संमिश्र भावनांचं परिणत रूप म्हणजे त्यांचं ‘आखरी खत’हे पुस्तक! ज्याला पुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. साहीर जरी त्यांच्यापासून दूर गेले तरी त्या कधीही त्यांना विसरू शकल्या नाहीत. अगदी इमरोजचं उत्कट, निस्सीम प्रेम त्यांच्या वाट्याला येऊनही!

साहीरसाठी अमृतांनी लिहिलेल्या ‘आखरी खत’चं कव्हर तयार करण्यासाठी म्हणून चित्रकार इमरोजशी त्यांची पहिली भेट १९५८ मध्ये झाली. योगायोग म्हणजे साहीरच्या प्रेमापोटी लिहिलेल्या कवितेच्या अनुषंगाने झालेल्या या भेटीनं अमृतांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. इमरोजशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांची मैत्री वाढत गेली. इमरोज खरं तर अमृतांपेक्षा सहा वर्षांनी लहान होते; पण साहीरच्या विरहानं पोळलेल्या अमृतांना दुःखाच्या त्या खाईतून बाहेर काढलं ते इमरोजनंच! इमरोज त्यावेळी ख्यातनाम चित्रकार म्हणून सर्वपरिचित होते. तर अमृतांना नुकतीच कुठं साहित्यिक वर्तुळात प्रसिद्धी आणि मानमान्यता मिळू लागली होती. साहीरच्या दुःखातून अमृतांना बाहेर काढताना इमरोज नकळत त्यांच्यात गुंतत गेला. अर्थात अमृतांनासुद्धा त्याच्याबद्दल हुरहूर वाटू लागली होती. पण ती त्यांनी कधी व्यक्त केली नव्हती. इमरोजबरोबरच्या आयुष्याबद्दल ‘रसिदी टिकट’मध्ये लिहिताना अमृतांनी म्हटलंय, ‘कुणा व्यक्तीला एखाद्या दिवसाचं प्रतीक मानता येत असेल तर इमरोज माझा ‘१५ ऑगस्ट’ होता.. माझ्या स्वातंत्र्याची ग्वाही देणारा! याउलट, साहीर हा एक विचार होता. हवेत तरळणारा. कदाचित माझ्याच कल्पनाशक्तीची ती जादू होती. मात्र इमरोजबरोबरचं आयुष्य ही एक अखंड धुंदी होती.. कधीही न सरणारी.’ ‘इमरोज भेटला आणि बाप, भाऊ, मुलगा आणि प्रियकर या सगळ्याच शब्दांना अर्थ प्राप्त झाला.. ते जिवंत झाले,’ असं अमृतांनी लिहिलंय. अमृता प्रीतम आणि इमरोज यांचा सहवास जवळपास पन्नासेक वर्षांचा होता. या दोघांनी इतकी वर्षे एकत्र राहून आपसातल्या तादात्म्यतेला नात्याचे नाव दिले नाही.

अमृता रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट, आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासनतास लेखन करत राहायच्या आणि रात्री एकच्या सुमारास इमरोज आपल्या पावलांचा आवाज न करता हळुवारपणे येत व त्यांच्या पुढ्यात गरम चहा ठेवून जाई. रात्री एक वाजताचा हा चहा इमरोजनी जवळपास चाळिसेक वर्षे अव्याहतपणे अन् प्रेमाने बनवून दिला. या दोघांनीही जग काय म्हणते याची कधीच फिकीर केली नव्हती. कारण एकाच घरात दोन वेगवेगळ्या खोलीत राहणाऱ्या या दोन व्यक्तींचे आत्मे एक झाले होते!!

आपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणाऱ्या अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या त्या मुक्त होत्या, पण स्वैर स्वच्छंदी नव्हत्या. याचं बोलकं उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल अशा पुष्कळ घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. त्यापैकीच एक त्यांच्या पतीच्या संदर्भात आहे. अमृतांचे पती प्रीतमसिंग यांना त्यांच्या अखेरच्या एकाकी दिवसांत अमृतांनी आपल्या घरी आणलं होतं आणि त्यांची सारी सेवाशुश्रूषा केली होती. अमृता-इमरोजच्या घरातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. त्याच बरोबर जेव्हा १९८० मध्ये साहीरचं मुंबईत हार्टऍटॅकने अकाली निधन झालं तेव्हा अमृतांना जणू आपलाच मृत्यू झालाय असं वाटलं होतं. त्यातून त्या कधी बाहेर आल्या नाहीत. या सर्वांतून त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. जगाचे आपल्या प्रेमाबद्दल काय मत आहे याच्या फंद्यात न पडलेल्या अमृतांनी आपल्या प्रेमाबद्दल आपले काय विचार आहेत किंवा या जगावेगळ्या प्रेमत्रिकोणाबद्दल आपल्याला काय वाटते यावर एक कविता लिहिली होती. अमृतांनी आपल्या मरणापूर्वी काही दिवस आधी आपल्या जीवलग प्रियकराला आणि आयुष्याच्या अभिन्न जोडीदाराला इमरोजला उद्देशून लिहिलेली ही कविता अत्यंत प्रसिद्ध आहे! तिचे अनेक भाषांत अनुवाद झाले होते.
आपल्या आयुष्यात इतकं सारं घडत असताना अमृतामधील लेखिका स्वस्थ बसणे अशक्य होते. त्यांची लेखणी, प्रेम आणि विद्रोहाची गाथा एकाच वेळी रचत होती. अमृतांच्या या धगधगत्या लेखणीने प्रस्थापित लेखनाला व विचारांना जबरदस्त धक्का बसला. मात्र त्या डगमगल्या नाहीत. आपल्या कथांनी त्यांनी एक वादळ निर्माण केले. अमृतांच्या जीवनाप्रमाणे त्यांचं लेखन बहुआयामी होत गेलं. याला काही अंशी इमरोजदेखील कारणीभूत आहे. परस्परांवरील प्रगाढ प्रेमातून कायदेशीर लग्नबंधन न स्वीकारताही ४० वर्षांहून अधिक काळ अखंड धुंदीचं त्यांचं सहजीवन त्यांच्या वैचारिक परिपक्वतेची जाणीव करून देण्यास पुरेसं आहे. या सहजीवनात इमरोजनं साहीरचं अमृताच्या आयुष्यातील ‘असणं’ सहजगत्या स्वीकारून आपला सच्चेपणा सिद्ध केला होता. मुक्त विचारांमुळे अमृतांच्या काव्यात बंडखोरीचे रसायन प्रेमरसातून पाझरत राहते. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी इतर आशय विषयांनादेखील हात घातला आहे. या अद्भुतरसाने उत्कट ओथंबलेली कविताही त्यांनी लिहिली आहे. २०व्या शतकातील हिंदी आणि पंजाबी भाषेतील या कवयित्रीने साहित्य अकादमीचा पुरस्कार घेणाऱया पहिल्या महिलेचा मान मिळवला. अमृता एक सिद्धहस्त कादंबरीकार तसेच निबंधकार होत्या. सहा दशकांच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी १०० पुस्तके लिहिली. यात कविता, चरित्र, निबंध, पंजाबी लोकगीते, हिंदुस्थानी आणि परकीय भाषांमधील आत्मचरित्रांचा समावेश आहे. त्यांना साहित्यसेवेबद्दल पद्मविभूषण आणि साहित्याचा हिंदुस्थानातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कारदेखील मिळाला होता. अमृताजींच्या आयुष्यातील या सर्व घडामोडीत व जडणघडणीत खुशवंतसिंह यांचा मोलाचा वाटा होता. रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ अशा मैत्रीच्या नात्याचे हे दोघे एक मूर्तिमंत प्रतीक ठरावेत इतकी त्यांची मैत्री निस्सीम आणि गहिरी होती. विशेष म्हणजे विजातीय लिंगी मैत्रीकडे हिंदुस्थानी समाज आजही जिथे संशयाने पाहतो त्याच समाजात खुशवंतसिंह आणि अमृता प्रीतम यांची अगाध मैत्री १९५० पासून सुरू झाली ती त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत टिकून राहिली.
दोन मुलांची आई आणि विवाहित असलेल्या अमृताजींचा इमरोजबरोबर राहण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठं बंडच होतं. त्यावर ‘अमृता-इमरोज ए लव्ह स्टोरी’ या पुस्तकाच्या लेखिका उमा त्रिलोक म्हणतात, ‘बदल पाहिजे, बदल पाहिजे अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात बदल घडून येतो तेव्हा मात्र घाबरतो. अमृता-इमरोजनं स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची नवी वेगळी भाषा दिली आहे.’ खरंच बदल पचवणे आपल्या समाजाला कठीण जाते. आजकालच्या सकाळी कनेक्ट, दुपारी ब्रेकअप अन् संध्याकाळी पुन्हा दुसरीकडे कनेक्ट अशा बेगडी प्रेमयुगात साहीर- अमृता – इमरोज यांचं प्रेम खऱ्या प्रेमाचं चिरंतन आत्मिक सत्य अजरामर करून जातं. आपण साहीर -अमृता – इमरोज यांचं प्रेम जेव्हा जेव्हा वाचत जातो तेव्हा दरवेळेस आपल्या प्रेमाच्या व्याख्या अन् संदर्भ बदलत जातात. जगण्याचा खरा अर्थ अन् प्रेमातलं जगणं शोधायचं असेल तर अमृता-इमरोजच्या प्रेम अध्यायाचे वाचन व्हायलाच हवे. अमृतांनी इमरोजसाठी लिहिलेल्या कवितोचा भावगर्भ अनुवाद गुलजारजींनी केला आहे. अमुता-इमरोज यांचं नातं या कवितेत सामावला आहे.
मैं तुम्हे फ़िर मिलूंगी
कहाँ किस तरह यह नही जानती
शायद तुम्हारे तख्यिल की कोई चिंगारी बन कर
तुम्हारे केनवास पर उतरूंगी
या शायद तुम्हारे कैनवास के ऊपर
एक रहस्यमय रेखा बन कर
खामोश तुम्हे देखती रहूंगी
– sameerbapu@gmail.com

link - http://www.saamana.com/life-of-renowned-author-amruta-pritam/

एक सात्विक वादळ - अमृता प्रीतम




31 ऑगस्ट, अमृता प्रीतमचा वाढदिवस. बरेचदा वाटतं एक लेख लिहीण्याइतकी मी नक्कीच ओळखते तिला . मग वाटतं, छे!! मला जे समजतं , जे वाटतं ते शब्दांमधे बांधण्याइतकी समर्थ मी नक्कीच नाहीये. आणि मग तिथेच वाटतं, 'युरेका ' .. सापडलं मला की मला काय आकर्षण वाटतं तिच्या व्यक्तीमत्त्वाचं.. माझं 'दुबळं' असणं, समाजाच्या चौकटीचं सतत भान बाळगणं आणि तिने ते सशक्तपणे झुगारणं .. नुसतं झुगारणं ही बंडखोरी नव्हे तर स्वत:तल्या प्रतिभेला जपत स्वत:च्या नियमांनूसार आयुष्य जगणं !!! पुस्तकं खरेदी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो माझ्यासाठी नेहेमी . एका पुस्तकाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना त्या दरम्यान सुरू होती. घेतलेल्या कुठल्यातरी पुस्तकावर एक लहानसं पुस्तक हाती आलं , मुळचं 'उमा त्रिलोक ' या लेखिकेचं आणि 'अनुराधा पुनर्वसू ' यांनी मराठीत भाषांतरित केलेलं 'अमृता इमरोज ' एक प्रेमकहाणी नावाचं ते पुस्तक !!!
अमृता प्रीतम एक मोठ्या पंजाबी लेखिका होत्या इतपतच ज्ञान होते तोवर मला.. केव्हातरी सहज पुस्तक चाळायला म्हणून हातात घेतलं . मात्र जसजशी वाचत गेले तेव्हा मात्र अमृताच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडत गेले. इथे इमरोजना वेगळं काढणं शक्यच नाहीये. ते दोघे वेगळे होतेच कधी...
एक जिगसॉ पझल येतं इश्वराकडून , आपल्यात एक अपूर्ण आपण असतो . त्या पझलचा दुसरा भाग देवाने पाठवलेला असतो ... आणि ती दोन अपूर्णत्त्व जिथे भेटतात ते जीवन यशस्वी असते वगैरे प्रेमाच्या संकल्पना मनात कायम होत्या माझ्या , स्वत:ही तसेच काही जगण्याकडे कलही आहे पण बऱ्याच गोष्टी बोलत नाही आपण सहसा!! 'हसं' होइल आपलं अशी एक सुप्त भिती बाळगत आपण आपल्यातलं सामान्य असणं मान्य करतो. अमृता आणि इमरोज यांच्या वयातलं 'उलटं' अंतर आज तितकसं बोचणार नाहीदेखील पण समाजासाठी अश्या बाबींची मान्यता ५०-६० वर्षापूर्वी निश्चित नव्हती . त्यातही लग्नाच्या रूढ बंधनात न अडकता ४० वर्षापेक्षा अधिक काळाचं त्यांचं सहजीवन हा विषयच भुरळ घालणारा. अमृताला आधिच्या लग्नापासून झालेली मुलं आणि इमरोज अविवाहित , वेगळं आहे नं रसायन !!!
समाजाचा समाजानेच रचलेला एक पाया आहे.. वर्षानूवर्षे माणसांच्या अनेक पिढ्या त्या पायाला धरून जगताहेत. आमच्या पायावर आम्ही उभे आहोत हा दावाही ठोकतात.. आपण कसलातरी आधार घेतलाय ही जाणिवच जिथे नाही तिथे त्या आधाराशिवाय उभं रहाण्याचं आपल्यात सामर्थ्य असतं हे भान कुठून येणार ??? एखादा येतो मग चुकार गडी जो समाजाच्या या पायाला आव्हान करतो.. त्याच्या मजबूत भिंतींपलीकडे पहातो.. अवघड असतं हे नेहेमी .. पायाला चिकटलेली माणसं अश्या स्वतंत्र उभ्या रहाणाऱ्या माणसाचे पाय ओढतात ... त्यात जर ती एक स्त्री असेल तर विचारायलाच नको.. जे आजही कठीण आहे ते आजपासून अनेक वर्षापूर्वीअजूनच कठीण असणार नाही का ..
प्रस्थापितांविरुद्ध बंड करायचाय नं मग समर्थ असायला लागतं !! कणखर , मजबूत वगैरे असावं लागतं .. अमृता तश्या होत्या !! इथे मुळात 'भरकटण्याचा ' धोका फार .. केलेल्या प्रत्येक कृतीचं समाज स्पष्टीकरण मागतो अश्या वेळेस ... ते द्यायचं नसतं कारण ते मुळात ज्यांना समजत नाही तेच ते मागतात.. आपला वेगळा सुर आपण लावायचा असतो, समाज ऐकणार असतो तो सुर पण आपण यशस्वी झाल्यानंतर .. मधला काळ मात्र मोठा बाका असतो ...
काही लोक 'आवडून जातात ' आपल्याला. सुर जुळतात, झंकार ऐकू येतो , ते होत होतं अमृताबाबत.
' इतिहास माझ्या स्वयंपाकघरात आला आणि भुकेलाच परतला . ' ही ओळ असो किंवा , 'तिच्या आयुष्याचे धुमसते निखारे काळाने हलवले , त्या चटक्यांनी त्याच्या बोटांवर फोड आले. ' असो, जसजसे अमृताच्या साहित्याचे हलके हलके दर्शन व्हायला लागते मनाचा गोंधळ उडायला लागतो.. शब्दांची वेगळीच बांधणी असते ही.. अमृताच्याच एका पुस्तकाचं नावं आहे 'अक्षरों की रासलीला ' . किती योग्य आहे हा शब्द तिच्या रचनांसाठीही ... शब्दच जणू खेळताहेत एकमेकांशी आणि घडवताहेत एक अप्रतिम काव्य !!! वीज चमकते नं क्षणभर कसा लख्ख प्रकाश दिपवतो आपल्याला तशी धारदार रचना मोहात पाडते .
कधी कधी एखादं पुस्तकं वाचायला घेतलं की आवडतं पण उगाच मन साशंक होतं की आपल्या या आलूलकीला तडा तर नाही नं जाणार.. तसे न होता अमृताबाबत कुठेतरी खात्री वाटायला लागते, इथे मुळातं नातं विश्वासाचं आहे.. निडर, बंडखोर, स्वत:शी प्रामाणिक लोकांबद्दल मला नेहेमी आदर वाटत आलाय , त्यांच्याकडे स्वत:चा विकास करण्याचंच नव्हे तर समाजाला एक सकस दृष्टिकोण देण्याचं सामर्थ्य असतं.
१२२ पानं झपाटलेली .. पुस्तकात अमृता - इमरोजच्या तरल नात्याचे अनेक सुरेख, तरल पैलू , अमृताच्या साहिर लुधियानवीबद्दल कायम वाटलेल्या प्रेमाचे रंग, तिचं प्रसंगी कणखर नं एक स्त्री म्हणून स्वत:तलं स्त्रीतत्त्वाशी प्रामाणिक असणं सगळंच आहे.. काहीतरी देऊन जाणारं पुस्तक !!! आपल्याला अंतर्बाह्य समृद्ध झाल्यासारखं वाटवणारी एक सोबत..
इमरोजसाठीची तिची 'मै तेनू फिर मिलांगी ' कविता अशीच अप्रतिम!!
पुस्तक वाचून संपलं पण एक अस्वस्थता सोबतीला आली.. ती अजून खाद्य मागत होती. अमृताचा अजून शोध घे म्हणून सांगत होती... अमृताचं लिखाण झपाटल्यासारखं शोधलं आणि वाचलं मग!!
फाळणीचं दु:ख अनुभवलेली अमृता.. त्या व्यथेला कायम मनात बाळगलेली अमृता ... हीर ची दास्तान लिहिणाऱ्या 'वारिस शाह ' ला फाळणी दरम्यान अत्याचार झालेल्या मुलींबद्दलही लिही रे सांगणारी , ' वारिस शाह ' ही कविता लिहिणारी अमृता ..
फाळणीच्या वेळी पळवून नेलेल्या मुलींचा नंतर शोध घेतला गेला त्यातल्या अनेक मुलींच्या पोटात कोणाचं तरी बीज वाढत होतं .. त्या बाळांबाबत अमृता लिहीते , " उस बच्चे की ओर से - जिसके जन्म पर किसी भी आंख में उसके लिये ममता नहीं होती , रोती हुई मां और गुमशुदा बाप उसे विरासत में मिलते हैं ... "
" मैं एक धिक्कार हूं -
जो इन्सान की जात पर पड रही .
और पैदाईश हूं - उस वक्त की
जब सुरज चांद -
आकाश के हाथों छूट रहे थे
और एक -एक करके
सब सितारे टूट रहे थे .. "
'पिंजर' पाहिला तो केवळ अमृतासाठी .. तिच्या प्रेमात पुन्हा एकवार पडण्यासाठी !! फाळणीपूर्वी पाकिस्तानात असलेल्या एका गावातली'पुरो ' (उर्मिला मातोंडकर ).. तिचे लग्न ठरलेय.पूर्वजांच्या वैमनस्यातून सुडाच्या भावनेने तिला त्या गावातला रशीद नावाचा मुसलमान पळवून नेतो.. हा रशीद मनाने अतिशय चांगला आहे.. त्याच्याकडे राहून आलेल्या पुरोला घरी कोणी स्विकारायला तयार नाही. नाईलाजाने पुरोचा रशीदशी निकाह होतो, तिला त्याला स्विकारावं लागतं .. परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरीही स्वत्व जपणारी.. खंबीर, लढावू वृत्तीची पुरो . आणि शेवटी 'रशीद' च्या चांगुलपणामूळे, त्याच्यातल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधत धावणारी , त्याच्या नावाने हंबरडा फोडणारी एक साधी , हळवी स्त्री.. खऱ्या प्रेमापुढे सहज झुकणारी, त्याची कदर करणारी स्त्री !! उर्मिला इथे 'पुरो ' हे पात्र जगलीये. मात्र त्या पात्रात अमृता शोधता येते इतका तिचा ठसा मनावर उमटलाय..
ही पुरो सिनेमात शेवटी म्हणते, " चाहे कोइ लडकी हिंदू हो या मुसलमान, जो भी लडकी लौटकर अपने ठिकाने पहूँचती है समझो की उसीके साथ पुरो की आत्मा भी ठिकाने पहूँच गयी.. " !! स्वत: अमृताचे शब्द आहेत हे..
अमृताच्या सगळ्याच नायिका एक नवा प्रश्न सजगतेने सोडवणाऱ्या आहेत.. प्रस्थापितांविरुद्ध बंड करणाऱ्या तर कधी वेगळीच वाट शोधून पहाणाऱ्या.. मात्र त्या 'चुकीच्या' कधिही नाहीयेत . म्हणजे अमृता एक शहाणपण स्वत:च बाळगून होती ... एक सुधारक विचारांनी भरलेलं, काळाच्या पुढे जाऊ पहाणारं सुंदर मन होतं तिच्याकडे. तिची बुद्धिमत्ता तिच्या कथेतल्या नायिकांच्या संवादातून आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेतून दिसून येते.
स्त्री आणि पुरूषाच्या नात्याबाबत अमृताने तिच्या एका कथेतल्या नायिकेद्द्वारे मांडलेले विचार खूप काही सांगणारे आहेत..
मलिका नावाची ही नायिका आजारपणात दवाखान्यात जाते आणि तिथे एक फॉर्म भरून देतेय ..
वय विचारून झालय , आता डॉक्टर तिला विचारतो ' तुम्हारे मालिक का नाम ?? ' .. तेव्हा ही नायिका त्याला खडसावते मी घड्याळ किंवा सायकल नाहिये मला मालिक असायला, मी एक स्त्री आहे... चपापलेला डॉक्टर तिच्या पतीचे नाव विचारतो. तेव्हा ती सांगते ," मै बेरोजगार हूं ! '" ...
गोंधळलेला डॉक्टर पुन्हा सांगतो मी तुझ्या नोकरीबाबत विचारत नाहीये . तेव्हा ती त्याला समजावते ," हर इन्सान किसी न किसी काम पर लगा हूआ होता है, जैसे आप डॉक्टर लगे हुए है, यह पास खडी हुई बीबी नर्स लगी हुइ है ... इसी तरह जब लोग ब्याह करते है, तो मर्द खाविंद लग जाते है और औरतें बिवीयां लग जाती है ... वैसे मै किसी की बीवी लगी हुइ नही हूं!!! "
आता मात्र पुरत्या गोंधळलेल्या डॉक्टरला मलिका समजावते , की जगातल्या सगळ्या व्यवसायामधे 'तरक्की' होते, जसे आज मेजर असलेले उद्या कर्नल होतात, परवा ब्रिगेडियर होतात आणि मग जनरल !! मात्र 'शादी- ब्याह ' च्या या पेश्यामधे तरक्की होत नाही !!!
' यात कुठली तरक्की होणार ? ' असा डॉक्टरचा प्रश्न येतो .
तेव्हा मलिका उत्तर देते , " डाक्टर साहब हो तो सकती है , पर मैने कभी होती हुए देखी नही । यही कि आज जो इन्सान खाविंद लगा हुआ है , वह कल को महबूब हो जाए , और कल जो महबूब बने वह परसों खुदा बन जाए .. "
किती वेगळा विचार आहे हा.. किती खरा आणि ... साध्या सरळ सहज शब्दात , एका गुंतागूंतीच्या नात्याला बांधू शकणारी अमृता म्हणूनच इमरोजसोबत विवाहाच्या बंधनात न अडकता एक यशस्वी सोबत करू शकली.
ध्यास घ्यावा वाटतो या लेखिकेचा आणि तिच्या साहित्याचा!!! 'वादळ ' पेलावसं वाटतं हे ..खूप लिहावसं वाटतं तिच्याबद्दल.
एक मात्र खरं की ...
अमृताचं वादळी विचारचक्राचं अत्यंत सात्विक असणं , वेदनेचं पचवणं आणि त्यावर मात करून येताना अजून परिपक्व होणं समजलं की अमृता मनापासून खूप आवडते .. ते समजण्यासाठी तिला वारंवार भेटावं लागतं . विशेष मेहेनत नाही लागत अर्थात, तीचं लिखाण आणि विचार तशी भुरळ घालतात आपल्याला समर्थपणे !!
अमृताचीच एक कविता आहे .. समाजाच्या बंधनांतून स्वत:ला न जखडता स्वतंत्र जगणाऱ्यांच्या व्यथांबद्दल आणि प्रवासाबद्दलच्या तिच्या कवितेतल्या काही ओळी..
पैर में लोहा डले
कान में पत्थर ढले
सोचों का हिसाब रुकें
सिक्के का हिसाब चले ..
और लगा -
आज मैने अपने घर का नम्बर मिटाया है
गली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है
हर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है ...
गर आपने मुझे कभी तलाश करना है..
तो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ -
यह एक शाप है - एक वर है
और जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे
समझना - वह मेरा घर है !!!
And that solves the mystery . माझ्यामते जर समाजातल्या काही रुढी परंपरांविरुद्ध मी बंड करत असेन , चुकीला चूक म्हणू शकत असेन तर माझ्यात 'अमृताचा ' एक अंश नक्कीच आहे.. तेच नातं आहे माझं तिच्याशी !!!
म्हणून वारंवार मलाही तिला म्हणावसं वाटतं असावं ' मै तेनू फिर मिलांगी"!!!

link -  https://m.dailyhunt.in/news/india/marathi/womanvishwa-epaper-womvis/ek+satvik+vadal+amrita+pritam-newsid-72568427

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...