Flash

Tuesday, 24 April 2018

एका अस्वस्थ शिक्षकाची डायरी - हेरंब कुलकर्णी

एका अस्वस्थ शिक्षकाची डायरी

लेखक, संपादक, शिक्षणक्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून हेरंब आपणास माहीत आहेत.
‘सर्व शिक्षा अभियान’ मधे ते गेली दोन वर्ष समन्वयक म्हणून काम करत आहेत.
पण मुळात हेरंब हाडाचे शिक्षक आहेत. शिक्षक म्हणून स्वतःत होत गेलेल्या बदलांबद्दल....
बीएड.च्या अभ्यासक्रमात खरं तर शिक्षणाच्या निर्जीव व्याख्या पाठ करून कंटाळा आला. त्या सर्व व्याख्यांमध्ये परिवर्तन हा शब्द अपरिहार्यपणे असायचा. ठाकरे म्हटलं की ठोकशाही, कम्युनिस्ट म्हटलं की क्रांती, नरेंद्र मोदी म्हटले की रक्त आठवावं इतकं त्या व्याख्येशी परिवर्तन जोडलेलं असायचं.
शिक्षण म्हणजे परिवर्तन, काहीतरी बदलणं, एवढं लक्षात आलं. बाकी बी.एड. झाल्यावर माझ्यात काहीच परिवर्तन झालं नाही हेही लक्षात आलं. एका बाजूनं वर्गात गेलो आणि दुसरीकडून बाहेर आलो. फक्त ‘डिस्टींक्शन’चं प्रमाणपत्र हातात होतं. ते घेऊन शिक्षक झालो. मुलं ५वी ला वर्गात येतात आणि १०वी ला तशीच बाहेर पडताहेत. ‘परिवर्तन’ नावाची गोष्ट कुठं दिसते आहे हे लक्षातच येईना.
अर्थात बदल आमच्या तथाकथित शिस्तीच्या चौकटीत दिसायचे. उशीरा येणारी मुलं छडी मारली की चटकन शाळेत वेळेवर यायची. वर्गात बडबड करणार्या मुलांना छडी मारली की ती मुलंही गप्प बसायची. गृहपाठ न करणार्या मुलांना मारलं की ते गृहपाठ करून आणायचे. शाळा बुडवणार्या मुलांना आम्ही घरी जाऊन रागवायचो. शेजारपाजारचे लोक गोळा व्हायचे. त्याचा बापही त्याला बदडायचा. इतक्या व्यापक अपमानानंतर तो मुलगा शाळेत येऊन बसायचा. त्याची मान खाली आणि जिंकल्याचे भाव आमच्या चेहर्यावर. त्याच्यात बदल घडवल्याचं खोटं समाधान आम्हाला मिळायचं. एखादा विद्यार्थी उद्धटपणे वर्गात बोलायचा. त्याला मुख्याध्यापकांकडं नेऊन आम्ही फटकवून काढायचो. तो सर्व मुलांपुढं माफी मागायचा. आम्ही जिंकायचो. एक वचक निर्माण व्हायचा. गुंड मुलं बचावाच्या पवित्र्यात. आम्ही त्या परिवर्तनानं खूष व्हायचो. कॉपी करू न देण्यात माझी ख्याती. गुंड मुलं चाकूची धमकी द्यायचे. त्याला भीक न घालता मी कॉपी बाहेर काढायचो. वर्ग कॉपीमुक्त. त्या परिवर्तनानं मला ‘शिक्षणतज्ज्ञ’ झाल्याचं समाधान मिळायचं. दहावीतही मुलं-मुली - त्यांची प्रेमप्रकरणं चालायची. एखादी चिठ्ठी मी पकडली की पोलीस महासंचालकासारखी उलटतपासणी करायचो. बेइज्जत झाल्यानं ते दोघे किमान शाळेत तरी ‘नीट’ वागायचे. खाली माना घालायचे. त्यांच्यातली चारित्र्यनिर्मिती(!) बघून माझ्यातला ‘विवेकानंद’ सुखावायचा.
असं माझं सारं छान चाललं होतं. वयाच्या पंचविशीत शाळेतला एक कडक शिस्तीचा शिक्षक म्हणून पंचक्रोशीत ख्याती होती. झोपडपट्टीतली शाळा. त्यात सहा फुटी तगडी पोरं आणि किरकोळ देहयष्टीचा मी. त्या पोरांना नमवण्यात वेगळाच अहंकार सुखावायचा. शिस्तीनं आपण त्यांच्यात परिवर्तन घडवतो हा भ्रम निर्माण होत राहिला. अज्ञानातलं सुख आनंद देत राहिलं.
‘कॉपी’ या विषयानं माझा भ्रम तोडला. ‘कॉपी’ मागील मानसिकता ही अप्रामाणिकपणाशी जोडलेली आहे. शिक्षणातून प्रामाणिकपणा रुजावा ही जर भूमिका असेल तर कॉपीचं उच्चाटन झालं पाहिजे. त्या प्रबोधनासाठी मी मूल्यशिक्षणाचे तास वापरले. रोज त्या विषयावर माझं प्रवचन मुलं श्रद्धेनं ऐकायची. ‘आम्ही कॉपी का करतो?’ हे मुलांकडून मी लिहून घेतले. मुलांनी पालकांची भीती, प्रतिष्ठेच्या संकल्पना हे सारं सारं लिहिलं पण ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातला आचार्य माझ्यात संचारला होता. पुन्हा त्यांना मी उपदेशच करत राहिलो. ‘कॉपी’ करणार्या मुलांचे पालक बोलावले. त्यांची बेइज्जती केली. तरीसुद्धा मुलं सुधारली नाहीत. दहावीची सराव परीक्षा आली. मुलांना म्हणालो-कॉपी करू नका. मुलं म्हणाली नाही करणार. एकाही मुलानं कॉपी केली नाही. मला बुद्ध झाल्याचा भास झाला.
पण भ्रमाचा भोपळा बोर्डाच्या परीक्षेत फुटला. सरसकट मुलांनी कॉपी केली. मी डोळ्यात पाणी आणून त्यांना विनंती केली पण व्यर्थ. निरोपसमारंभात मुलांनी मला हातातले घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ गणिताच्या पेपरला मी मुलांकडे फेकले व म्हणालो - ‘जर आजच्या पेपरला तुम्ही कॉपी केलीत तर मी हे घड्याळ स्वीकारणार नाही.’ काहीच फरक पडला नाही. मी घड्याळ घेतले नाही. ‘इमोशनल ब्लॅकमेलींग’ व्यर्थ गेले ! मुलं खाली माना घालायची. कॉपी करण्यामागची अगतिकता त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसायची. आम्ही दिलेल्या शिक्षणातून त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत नव्हत्या. नापास झाले तर आईबाप मारहाण करण्यापासून शिक्षण बंद करण्यापर्यंत सर्व काही करणार. सामाजिक बेइज्जत वेगळीच. या अगतिकतेत माझं प्रबोधन, माझी प्रवचन मालिका सगळं वाहून गेलं. परिवर्तनाचे प्रयोग पुन्हा फसले.
पुढे निकाल लागला. ती सगळी पोरं पास झाली. कॉलेजात गेली. मी ज्यांना शिस्तीच्या चाबकानं फटकारलं होतं ती सारी पोरं पाण्याच्या वाफेनं झाकण उडावं तशी बेताल झाली होती. मला बघितलं की चांगला शिक्षक म्हणून आदर द्यायची पण त्यातली वाह्यात पोरं गुटखा खाऊन थुंकायची. अचकट-विचकट बोलायची. त्यांच्या नजरेतला बेधडकपणा, बेरकीपणा मला टोचायचा. अवमान वाटायचा. पण त्याहीपेक्षा जास्त परिवर्तन फसल्याचं दु:ख असायचं.
मी खूप विचार करायचो. ही मुलं का बदलली नसतील? आपली तळमळ यांच्यापर्यंत का पोहोचली नसेल? इतक्या महापुरुषांच्या कथा सांगूनही ते सगळंच का वाहून गेलं असेल? काहीच कसं झिरपलं नाही? आपण त्यांना चांगल्यासाठीच मारलं. तरीही आपल्याविषयी शत्रुत्वाची भावना का? हेतू चांगला पण अंमलबजावणी का फसली? मी विचार करत बसायचो. शब्दांच्या प्रबोधनातच मर्यादा आहेत. तेव्हा शब्दातीत माध्यमं कोणती आहेत, त्याचा मी शोध घ्यायला लागलो. जे. कृष्णमूर्तींच्या एका पुस्तकाचा शेवट एका गोष्टीनं झालाय. त्या गोष्टीनं मला अंतर्मुख केलं. ती कथा अशी-
‘एक साधू आपल्या शिष्यांना रोज सत्य, प्रेम, सौंदर्य यावर प्रवचन द्यायचा. एक दिवस तो प्रवचन सुरू करणार इतक्यात एक बुलबुल पक्षी तिथं आला. तो गाणं गाऊ लागला. एक तास गाणं गात राहिला. साधू काहीच बोलला नाही. शिष्य काहीच बोलले नाहीत. पक्षी उडून गेला साधू म्हणाला-
‘आजचे प्रवचन संपले’
या गोष्टीनं मला आतून हलवलं. तुमचा सहवास मुलांना बदलवू शकतो. शब्दातीत संवादच परिवर्तन घडवू शकेल. हे जाणवताच मी आध्यात्मिक शस्त्रभांडारात दाखल झालो.
जे. कृष्णमूर्ती, रजनीश वाचून काढले. अवतार मेहेरबाबांची नगरला समाधी आहे. ते ४४ वर्षे मौन राहिले. त्यांच्या मौनाचं मला आकर्षण वाटलं. एक दिवस सकाळी १० ते संध्याकाळी पाचपर्यंत समाधीसमोर मौन करून बघितलं. मुलांवर मौनाचे प्रयोग सुरू केले. विपश्यना शिकलो. मूल्यशिक्षणात मुलांकडून मौन करून घेतलं. रोज सगळा वर्ग शांतपणे मौन व्हायचा. मुलं घरीही मौन करायला लागली. कृष्णमूर्तींच्या पुस्तकातून निसर्गाचं महत्त्व कळालं. मुलांना मैदानावर नेऊन आकाशाचे रंग बघत मौन करायला शिकवलं. ‘सूर्यास्त कोणी बघितला?’ हा ‘गृहपाठ’. रोज विचारायला लागलो... तरीही परिवर्तन कुठं सापडेनाच. मी पुन्हा सुन्न झालो.
शिक्षणातून जो संवेदनशील, हळुवार, रसिक, जबाबदार नागरिक निर्माण करायचा आहे त्याची शक्यताच मला कुठे दिसेना. आमचे रुक्ष अभ्यासक्रम, त्याहीपेक्षा रुक्ष शैक्षणिक वातावरण, यातून हे सारं घडणार कसं हेच समजेना. जेलर आणि आरोपी असं आमचं मुलांशी नातं होतं. या नात्यात हे काहीच समजेना.
तिथून पुढं शिक्षणाचा शोध घेऊ लागलो. कृष्णमूर्तींची ‘सह्याद्री स्कूल’ बघून आलो. भर दुपारी उन्हात तो डोंगर चढलो. तिथून काही शिकता येतं का? याचा शोध घेतला. भटकत राहिलो. प्रयोगशील शाळांचेही दरवाजे ठोठावले. त्या शाळांनाही हाच प्रश्न विचारला की शाळा सोडल्यावर बाहेरचा समाज संस्कार पुसत राहतो, तर शाळेचे कोणते संस्कार टिकून राहिलेत? व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करून गेलेत? हे विचारत राहिलो पण इतका शास्त्रशुद्ध अभ्यास अजून व्हायचाय हे लक्षात आलं.
त्याच सुमारास नरेंद्र मोदीने गुजराथमध्ये मुस्लिमांचे शिरकाण घडवले. सुशिक्षित तरुण-तरुणींचा सहभाग विलक्षण होता. सुशिक्षितपणाचा त्यांना उपयोग इतकाच झाला की मुस्लिमांची घरे शोधण्यासाठी मतदारयादीचा वापर करावा ही सुपीक कल्पना त्यांना सुचली....तेव्हा वृत्तपत्रात मी ‘साबरमतीकाठी आधुनिक शिक्षणाचं थडगं उभारा’, असं लिहिलं. शिक्षणानं हिंसा कमी होणार नसेल तर ती कशानं कमी होणार? गुजराथमधील महाभयंकर कहाण्यांनी सुन्न करून टाकलं. ‘कम्युनल कॉम्बॅट’ नं छापलेली छायाचित्रे बघितल्यावर तर त्या रात्री न जेवताच झोपलो. माणसातल्या पशूला हाताळण्यात आमचं शिक्षण कमी पडतंय. माणसातल्या जनावराला आम्ही स्पर्शही करत नाही. मानवी भावनांचं समायोजन या शिक्षणातून कसं करता येईल? याने तर मी पुरता गोंधळून गेलो. शाळेत मुलांच्या होणार्या मारामार्या. त्यांच्यातील द्वेष, ईर्षा बघून तात्कालिक शिक्षा करायचो. पण निरुत्तर व्हायचो. पुन्हा पुन्हा जे. कृष्णमूर्तींची प्रश्नोत्तरे उघडून बघायचो. कृष्णमूर्ती सांगायचे तुमच्यातील तळमळ, समोरच्याविषयीचे उत्कट प्रेम व विषय शिकवण्यातली निष्ठाच मुलांना बदलवून टाकील. रोज डायरी लिहायचो. एखाद्या मुलाला शिक्षा केली तर स्वत:लाच खूप दोष द्यायचो. नवा संकल्प करायचो. मौनाचे प्रयोग, तळमळीनं शिकवणं, मुलांना शिक्षा न करणं, प्रेमानं संवाद वाढवणं हे सारं करत राहिलो. परिवर्तनाच्या शक्यता तपासून बघत राहिलो.
समाजातल्या आजच्या दोषांना उत्तर म्हणजे शाळा असल्या पाहिजेत असं वाटायचं. कृष्णमूर्तींमुळं सामाजिक प्रश्नांची व्यक्तिगत उत्तरं शोधायची सवय लागली. आजचा भ्रष्ट समाज, हिंसक समाज, मानवी नात्यातील क्रौर्य हे बदलायचे असेल तर शिक्षणातूनच ते घडायला हवे. शिक्षणातून ती जडणघडण होणार नसेल आणि फक्त माणसांचे राहणीमान बदलणार असेल, भाषा बदलणार असेल व मानसिकता तीच राहणार असेल तर हे सगळं बदलणार कसं?
दहा वर्षे वेगवेगळे प्रयोग करूनही रोखठोक परिवर्तनाचा ‘ब्ल्यू प्रिंट’ हाताशी लागलाय असं ठामपणे म्हणता येत नाही.
मध्यंतरी एक माजी विद्यार्थी भेटला. सध्या नगरपालिकेत काम करतोय. आदरानं नमस्कार केला. भेटीचा आनंद डोळ्यात तरळत होता. गप्पा झाल्या. मी खूप चांगलं शिकवलं असं म्हणत होता. त्याला थेटपणे प्रश्न विचारला, ‘‘मी एखादी गोष्ट शिकवली आणि तुला त्याचा आज उपयोग होतो असं नेमकं काय आहे?’’
तो बराच वेळ गप्प राहिला. तो इतकंच म्हणाला, ‘‘तुम्ही खूप काहीतरी चांगलं आम्हाला शिकवत होतात. आपण कुणीतरी चांगलं बनावं एवढं वाटत राहिलं,’’ त्याला शब्द सापडत नव्हते पण एकूणच त्याने मला चांगल्या यादीत टाकले होते! माझी आठवण म्हणजे मूल्यांची आठवण असं घडत होतं. मला वाटतं परिवर्तनाचा रस्ता याच परिघातून सुरू होत असावा...
रजनीश वाचल्यानंतर नैतिक, अनैतिकतेच्या बालिश कल्पनाही मनातून कोलमडल्या. नैतिक-अनैतिक खोड्यात तुम्ही मुलांना अडकवलं की मुले ही वायफळ बडबड विसरून जातात. एखाद्या व्यसनाचा अंमल उतरावा तसा उपदेशाचा अंमल उतरतो आणि माणूस शेवटी स्वत:तील नैसर्गिक प्रेरणांना प्रतिसाद देतो. तेव्हा नैतिकता ही शिकवण्याची गोष्ट नाही हे लक्षात येत गेलं. त्याहीपेक्षा विचार करायला शिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. एकदा विचार करायला शिकवलं की मुलं आपोआप आपल्या जगण्याचा अर्थ लावू शकतात हेही लक्षात आलं. तेव्हापासून उपदेश करण्यापेक्षा मी वर्गात विचार करायला लावणारे प्रश्न विचारू लागतो.
‘स्त्री-पुरूष’ समानता शिकवताना, ‘विवाहसंस्थेत मुलाचे वय, शिक्षण, उंची मुलीपेक्षा जास्त असावी ही अट मुलीला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बाद करणारी मानसिकता आहे’ हे मी सांगायचो, त्यामागील धोरण सांगायचो. माझं लग्न ठरल्यावर एका मुलानं मला थेटपणे, ‘सर, तुमची बायको तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे का हो?’ असं विचारून तपासलं होतं. ‘जगात म्हातारपण नसते तर?’ हा निबंध लिहिताना एका मुलानं, ‘अशा प्रकारच्या दु:खांची जाणीव झाली नसती तर सिद्धार्थ कदाचित गौतम बुद्ध झाला नसता’ असं लिहिलं, तेव्हा मी शहारलो. धर्माचा उगमच ‘अपरिहार्य दु:ख आपण थांबवू शकत नाही’ यात आहे हेच जणू त्या मुलाने सांगून टाकले.
वर्गात, बाबा आमटेंनी रस्त्यातील गटारातला महारोगी उचलल्याची कथा सांगताच शासकीय रुग्णालयाबाहेर पायात वळवळणार्या अळ्या झालेला रोगी दिसताच मुलांना ‘बाबा आमटे’ आठवले आणि तात्काळ ते माझ्याकडे आले. आम्ही तो रोगी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केला. मुलांनी महिनाभर शुश्रूषा केली. माझ्यातील ‘परिवर्तनवादी’ सुखावला...
पण तरीसुद्धा हे भावनिक प्रतिसाद माणसांच्या सवयीत रूपांतरित होतात का? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. स्मशानवैराग्यासारखे हे सारे असते का? शाळेतले संस्कार जर भावनिकच राहात असतील व समाज ते पुसत असेल तर हा परिवर्तनाचा खटाटोप तरी का करावा? या प्रश्नांनी मी चक्रावून जायचो.
मुलं कुटुंबात हिंसा बघतात. समाजात भ्रष्टाचार बघतात. शाळेतली शिकवणूक त्यांच्यावर कितपत प्रभाव गाजवत असेल? शेवटी ही पुसण्याची प्रक्रियाच प्रभावी ठरत असेल तर मूळ पाटीवर अक्षरं का लिहायची? याचं उत्तर मिळत नाही.
विजय तेंडुलकरांना एकदा भेटलो. हिंसेवर खूप चर्चा केली. त्या चर्चेतून २ X २ = ४ असं उत्तरच मिळेना. मी तेंडुलकरांना इतकंच म्हणत राहिलो की वाढत्या वयात जे गुन्हेगार होतात त्याची मुळं शाळकरी वयात असतात का? मेंदूच्या रचनेत तसं काही असतं का? हिंसा ही वृत्ती असते का? मेंदूतील हिंसेची केंद्रं नष्ट करण्यासाठी आपण शाळेत कोणते उपक्रम राबवावेत? माझ्या भाबड्या प्रश्नावर तेंडुलकर हसत होते. हिंसा ही जीवनात कोणत्याही क्षणी विकसित होणारी गोष्ट आहे. तो एक अपघात असतो. सरळ अहिंसक जीवन जगणारा माणूस कुठल्याही क्षणी हिंसक होऊ शकतो. परिस्थिती हेच त्याचे उत्तर असते.
तेंडुलकर हे सारं सांगत होते. हिंसेचे मेंदूतील जंतू मारायला कोणतही ‘ऍन्टी-बायोटिक’ नाही. संपूर्ण समाजच अहिंसक व्हायला हवा असे माझ्या लक्षात आले. माझी शोधयात्रा सुरूच राहिली. शिक्षणावरचं वाचन वाढलं. आपण किती मुलांशी क्रूर वागलो यानं मन भरून यायचं. त्यातच तोत्तोचान वाचलं. बॅन्डवाल्यांशी बोलणारी मुलगी बेशिस्त म्हणणारा शिक्षक आपणच आहोत असं वाटायला लागलं. त्याच पुस्तकात असं लिहिलंय - ‘तोत्तोचानसारख्या शाळा जगात सर्वत्र असत्या तर जगात युद्धंच झाली नसती.’ हे वाक्य वाचल्यावर - शिक्षणात हिंसा संपवण्याच्या शक्यता आहेत, तेव्हा प्रयोगशील शाळा निर्माण करणं, प्रेम झिरपणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं.
रेणू गावस्करांचे रिमांड होममधले अनुभव वाचताना प्रेम ही एक थेरपी म्हणून कसं काम करते हे लक्षात आलं. लीलाताईंच्या पुस्तकांमधून मुलांना चौकस बनवणं कसं महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं. त्यातूनच विचार करायला कसं शिकवता येईल ते लक्षात आले.
शेवटी शिक्षकाचं व्यक्तिमत्त्वच मुलांमध्ये संक्रमित होतं हेच खरं. ग्रीक साहित्यातील ऐकलेली 'The Picture of Dorian Gray' ही कथा नेहमीच मला खुणावते. निरागस चेहर्याचा राजपुत्र. त्याचं एक पोटर्रेट त्याच्या बेडरूममध्ये ठेवलेले. त्याने पाप केले की त्याचा डाग त्या पोटर्रेटवर उमटणार. व्यक्तिमत्त्व मात्र निरागसच राहणार. राजपुत्र पापं करत राहतो. पोटर्रेट डागाळत राहते. शेवटी राजपुत्राकडून खून होतो आणि पोटर्रेट रक्ताळते. राजपुत्राची निरागसता कायम राहते.
मला वाटतं शिक्षकाचं व्यक्तिमत्त्व मुलांमध्ये अशाप्रकारे परावर्तित होत असते. आपल्या गुण-दोषाचं प्रतिबिंब मुलांमध्ये पडते आणि मुलं त्याप्रमाणे घडत-बिघडत राहतात. हीच परिवर्तनाची दिशा आहे. तेव्हा शिक्षकानं स्वत:चं व्यक्तिमत्त्व अधिक संवेदनशील, हळुवार, प्रेमपूर्ण करणं हेच परिवर्तनाची शक्यता सूचित करणारं आहे इथपर्यंत येऊन मी थांबलो.
जे. कृष्णमूर्तींना एका मुलानं विचारलेल्या प्रश्नानं मला खूप काही शिकवलं. तो मुलगा कृष्णमूर्तींना विचारतो की आम्हाला खेळात जितका आनंद मिळतो तितका आनंद अभ्यासात का मिळत नाही?
कृष्णमूर्ती उत्तर देतात की तुमच्या शिक्षकांना आनंद मिळत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. एखादा गायक शेकडो तासांच्या रियाजानंतर बैठकीवर बसतो तेव्हा त्यानं म्हटलेलं गाणं लोक कित्येक दिवस गुणगुणतात. तशा तयारीनं आणि विषयावरील प्रेमानं तुमचे शिक्षक वर्गात प्रवेश करतील तेव्हा खेळण्याइतकाच आनंद तुम्हाला अभ्यासातही मिळेल...’
कृष्णमूर्तींच्या या उत्तरानं परिवर्तनाचा रस्ता दाखवला. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या चेतनेला स्पर्श करता आला पाहिजे हेही लक्षात आलं.
हे सारं डोक्यात घोळताना प्राथमिक शिक्षणाकडं वळलो. आदिवासी भागातील २०० पेक्षा जास्त गावं बघितली. ४०० पेक्षा जास्त शाळा बघितल्या. माझ्यातील शिक्षकाचा झालेला संघर्ष मला कुठेच दिसेना. पाण्यात तेल सांडल्यावर तेलाचा जसा तवंग पाण्यावर पसरतो तसा एक प्रकारचा कंटाळा शाळेवर पसरला आहे असं जाणवू लागलं. शिक्षकाचं व्यक्तिमत्त्वच कोरडंठाक आहे. त्याच्यात उत्स्फूर्तताच नाही. तो गाणी म्हणत नाही, मुलांना स्पर्श करत नाही. मुलांशी बोलत नाही. तो फक्त उभा आहे किंवा वर्गात रेंगाळतो आहे. हे बघितल्यावर मन सुन्न झालं. मुलं लिहू-वाचू शकत नाहीत यावर मी भाष्य केलेच आहे. त्यावर इतरत्र सविस्तर लिहिले आहे. पण शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वातच समृद्धी नसल्यानं वर्गात काहीच घडत नाही. मुलं वर्गात येतात, बसतात, उठून जातात एवढंच घडतंय. शिक्षकानं शिकवलं तरी त्या शिकवण्यात जान नाही. त्यानं भावनिक कविता शिकवली तरी मुलं रडत नाहीत आणि विनोद केला तरी मुलं हसत नाहीत... गुणवत्तेच्या प्रश्नापेक्षाही हे मला जास्त अस्वस्थ करणारे वाटले. शिक्षकातच काही परिवर्तन नाही तर मुलांमध्ये झिरपणारं कसं...? शिक्षकालाच समृद्ध आणि संवेदनशील कसं बनवायचं हाच खरा प्रश्न आहे !
अखेरचा प्रश्न-शिक्षणानं व्यक्तित्वात, जाणिवेच्या पातळीवर परिवर्तन करावं ही अपेक्षा व्यक्त केली, तरी फोल ठरते आहे. पण किमान सामाजिक, आर्थिक परिवर्तन ग्रामीण समाजांमध्ये निर्माण केले आहे का? या परिवर्तनाची चर्चा करावीच लागेल.
ग्रामीण भागातील बदलाला शिक्षणानं हातभार लावला आहे हे खरं. पण आदिवासी भागात असं विधान करणं धाडसाचं ठरेल. जीवनसंघर्ष इतका तीव्र आहे की शिक्षण हा आदिवासींचा शेवटचा प्राधान्यक्रम ठरतो. पण जी मुलं शाळेत येतात त्यांच्यात काही बदललं आहे का? तर याचं उत्तर नकारार्थी आहे. खूप थोडे शिकले, शहरात गेले, नोकर्या मिळाल्या. त्यांचा जीवनस्तर बदलला हे मान्य पण आदिवासींच्या भारतातील गळतीपेक्षा महाराष्ट्रातील गळतीचे प्रमाण जास्त, हे कसे समजावून घ्यायचे? झाडावरून टपाटपा पानं गळावीत तशी लेकरं शाळेबाहेर पडत आहेत. शाळाच मुलांना आकर्षित करत नाही. पकडून ठेवू शकत नाही. जगण्यातलं परिवर्तन तर खूप लांबची गोष्ट राहिली.
शिक्षणानं माणसांचे सामाजिक, आर्थिक वर्ग बदलले पाहिजेत पण आदिवासी भागात हे अपवादानेच घडते. दहावीपर्यंत पोरगा टिकतच नाही. पन्नास वर्षांपासून ज्या गावात शाळा आहे त्या गावात आजही बारावी पास पोरगा सापडत नाही. गावातील महिला किती शिकली हा प्रश्न विचारण्याची हिंमतच होत नाही.
इतकं हे सारं विदारक आहे. दहावीतला पोरगाही स्वत:चं नाव नीट लिहू शकत नाही. परिवर्तनाची गोष्टच दूर राहिली.
२०२० साली भारत महासत्ता होणार आहे. २०२० साली आज चौथीत शिकणारा पोरगा २५ वर्षांचा तरुण असेल. गडचिरोलीतला पोरगा तेंदूपत्ता गोळा करत असेल, मेळघाटातला तरुण पाखरं मारत असेल, कोकणातला तरुण मासे मारत असेल, मराठवाड्यातला तरुण रोजगार हमीवर, पश्चिम महाराष्ट्रातला तरुण दुधाची बरणी घेऊन आणि विदर्भातला तरुण शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असेल...
इतकी भयावह स्थिती आहे. माणसांचा कोणताच स्तर बदलत नाही. त्यामुळे शिक्षणावरची श्रद्धा डळमळीत होते आहे. ‘शिक्षण नोकरीसाठी नाही’ हे सांगितलं तरी भाकरीचा प्रश्न सुटत नसेल तर शिकायचं कशाला? या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही.
भ टक्या विमुक्तांच्या आश्रमशाळेत पाच जागा राखून ठेवल्या आणि भटक्यांच्या वस्तीत पोरं आश्रमशाळेत घाला असं म्हणायला गेलो. एक कैकाडी म्हणाला, ‘‘तुमच्यासारख्याच एका शहाण्याचं ऐकून पोरगं शाळेत टाकलं आणि आम्ही टोपल्या विकत गावोगावी फिरलो. आज ते पोरगं बारावी नापास झालं. ते आता तुमच्याकडूनही हुकलं आणि टोपल्याही विणू शकत नाही’’ माणसांची शिक्षणातून आर्थिक परिवर्तनाची भूक आपण कशी पुरवणार?
शिक्षणातून रोजगार नाही. सामाजिक प्रतिष्ठाही पूर्वीसारखी मिळत नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही. त्यामुळं मुलं शाळेत टिकत नाहीत. खेड्यापाड्यापर्यंत फक्त शिक्षण नेल्याचं फसवं समाधान आम्हाला मिळालं. काहीच बदललं नाही.
जीवनसंघर्ष तोच राहिला -
फूल कहते है चमन बदला है
पंछी कहता है आकाश बदला है
लेकीन मुर्दे वही है
सिर्फ कफन बदला है...
परिवर्तन झालं ते फक्त इतकंच.

No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...