हेरंब कुलकर्णी यांच्याशी बातचीत
Primary tabs

शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने केलेली प्रगती यावर उलटसुलट चर्चा होत असते. शिक्षणाचा प्रसार झाला, गावागावापर्यंत शाळा उघडल्या गेल्या हे खरे असले, तरी प्रश्न संपलेले नाहीत. एकीकडे चकचकीत इंटरनॅशनल स्कूल, तर दुसरीकडे दुर्गम भागातल्या शाळांची दुरवस्था, हे आपल्या राज्याचे चित्र.
हेरंब कुलकर्णी हे नाव शिक्षणक्षेत्राशी आज जोडले गेलेय. महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यात, दुर्गम भागात असलेल्या शाळांची पाहणी करून शिक्षण क्षेत्रातल्या समस्या ते सातत्याने आपल्यापुढे आणतात. त्यांची पुस्तके आणि वृत्तपत्रांमधले लेख म्हणजे या समस्यांचा लेखाजोखाच.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या ‘शाळा आहे – शिक्षण नाही!’ या पुस्तकाने एकच खळबळ माजवली. शाळेची इमारत आहे, सरकारी तिजोरीतून अनुदान जातेय, पण शिक्षण नाही, हे वास्तव दाखवणारे ते पुस्तक. या पुस्तकाचा आता इंग्लिशमधून अनुवादही येतोय. त्यानंतर आले ‘परीक्षेला पर्याय काय?’. परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वर्षाला ४००० आहे, यावर चर्चा घडवणारे हे पुस्तक. या पुस्तकाला उत्कृष्ट संपादनाचा राज्य पुरस्कार मिळाला. सहाव्या वेतन आयोगावर जळजळीत भाष्य करणारे त्यांचे पुस्तक ‘सहावा वेतन आयोग : काय खरे काय खोटे?’ हे बरेच गाजले. शाळाबाह्य मुलांचा प्रश्न सध्या चर्चेला आला आहे. ‘आमच्या शिक्षणाचे काय?’ हे याच विषयावरचे वास्तव दाखवणारे पुस्तक. त्यांच्या इतर पुस्तकांची आणि कामाची ओळख मुलाखतीतून होईलच.
शिक्षकाची नोकरी सांभाळून इतके लिहिणारे, कविता करणारे, आणि अनेक प्रश्नांवर तळमळीने काम करण्यासाठी पुढे धावणारे हेरंब कुलकर्णी. त्यांच्याशी विशाखा पाटील यांनी केलेली ही बातचीत.
‘शाळा आहे - शिक्षण नाही!’ या पुस्तकाने तुमची ओळख झाली. त्याविषयी सांगाल?
हेरंब कुलकर्णी - हे पुस्तक शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी आहे. शासन आज ३५००० कोटी रुपये शिक्षणावर खर्च करते आणि मुलांना किमान क्षमताही प्राप्त होत नाहीत, हे वास्तव मला मांडायचे होते. तेव्हा एका तपासणीच्या निमित्ताने गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदुरबार, यवतमाळ, मेळघाट या आदिवासी भागातील २०० शाळांना मी भेटी दिल्या. त्या वेळी मुलांना किमान वाचन लेखन येते का? याची मी चाचपणी केली. त्यात चौथीच्या मुलांना मी ‘चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही रेल्वेने प्रवास करतो’ हे वाक्य लिहायला दिले आणि गणितात ५११ वजा ४९९ ही वजाबाकी दिली. पण आश्चर्य वाटेल की २०० शाळांमध्ये हे वाक्य व गणित बरोबर सोडवणारा एकही वर्ग नव्हता... तीन शिक्षकांचेही हे गणित चुकले. मला ५२ गावे अशी सापडली की ज्यात गावात ५० वर्षांपासून शाळा आहे पण सातवी शिकलेला माणूस नाही. दर्जेदार शिक्षण नाही हेही गरिबीचे महत्त्वाचे कारण लक्षात आले. याच पाहणीत मी आश्रमशाळाही बघितल्या. त्यातली उपाशी मुले आणि भीषण वास्तव मी मांडले. अमर्त्य सेन यांचे प्रसिद्ध वाक्य मला उमगले, की गरिबांसाठीच्या सुविधा शेवटी गरीब सुविधा बनतात. वाईट शिक्षणातून गळती, गळतीतून दारिद्र्य आणि दरिद्री भागात पुन्हा दर्जाहीन शिक्षणसुविधा हे वास्तव कळले. एकीकडे २०२०ला महासत्ता होण्याची भाषा करताना महाराष्ट्राचे शिक्षण वास्तव पुढे आले. एकीकडे आमची मुले सिलिकॉन व्हॅलीत, तर त्यांची मुले मेळघाट व्हॅलीत पाखरे मारताहेत, हा शिक्षणातला भारत - इंडिया लक्षात आला.

या पुस्तकावर प्रतिक्रिया काय होत्या? या पुस्तकाच्या वेळी वाद झाल्याचे आठवतेय...
हेरंब कुलकर्णी - हे पुस्तक आल्यावर एका शिक्षक संघटनेने ते जाळले. अनेक शिक्षकांनी फोन करून तीव्र भावना, तर काहींनी अपशब्द वापरले. अनेक ठिकाणी त्यावर तीव्र संताप व्यक्त झाला. पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. काही शिक्षकांनी हे वास्तव तुम्ही मांडले हे चांगले केले असेही सांगितले. आदिवासी विभागाने आश्रमशाळा विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. विधानसभेत त्यावर चर्चा झाली, त्याच वेळी माध्यमांना व शहरी वाचकांना हे भीषण वास्तव समजले. या पुस्तकाचा इंग्लिश अनुवाद झाला. शासनाने हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणात चर्चेसाठी लावले. माझ्या या पहिल्याच पुस्तकाच्या प्रतिसादाने मी गोंधळून गेलो.
२००७मध्ये ते पुस्तक आले. मधल्या काळात शिक्षणाच्या गुणवत्तेत काही फरक पडलाय, असे वाटते?
हेरंब कुलकर्णी - फरक थोडासा जाणवतो. शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय. प्रयोगशील शिक्षकांची संख्या वाढते आहे, परंतु असर किंवा शासन दर वर्षी पाहणी करते त्यात अजूनही फारसा फरक पडला नाही, असे दिसतेय. मागच्या वर्षी ५० टक्के मुलांना लेखन वाचन येत नाही, तर ७६ टक्के मुलांना गुणाकार येत नाही असा निष्कर्ष निघाला. १० वर्षे सर्व शिक्षा अभियान आणि ४ वर्षे शिक्षण कायदा राबवूनही ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा वास्तव बदलले आहे असे वाटत नाही. मात्र गळतीचा दर नक्कीच कमी झाला आहे. सरकारी शिक्षणाच्या या नाराजीतून खाजगी शाळेत मुले घालण्याचे प्रमाण खूप वाढते आहे. अगदी झोपडपट्टीतले पालकसुद्धा आपली मुले खाजगी शाळेत घालत आहेत. आज भारतात उच्च शिक्षण पोहोचण्याचे प्रमाण १९ टक्के आहे, याचे कारण प्राथमिक शिक्षण दर्जेदार नसल्याने वाचन लेखन कौशल्य प्राप्त न झालेली मुले शाळा सोडून देतात. गरिबी हे शाळा सोडण्याचे दुय्यम कारण आहे; खरे कारण वाचन लेखन न आल्याने मुले शाळा सोडतात.

तुम्ही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार, बालकामगार अशा २० जिल्ह्यांत फिरून शालाबाह्य मुलांचा अभ्यास केला.. आणि दुसरीकडे शासन शाळा बंद करते अशा बातम्या आहेत. शालाबाह्य मुलांची काय स्थिती आहे ?
हेरंब कुलकर्णी - देशात आजही ३ कोटी, तर महाराष्ट्रात ८ लाख मुले शालाबाह्य आहेत असा अंदाज आहे. ही मुले बालकामगार, रेल्वे प्लॅटफॉर्म, रस्त्यावर राहणारी, वेश्यांची मुले त्याचबरोबर पोटासाठी स्थलांतर करणारी ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर, दगड खाणमजूर, बांधकाम मजूर यांची आहेत. भारतात आज राज्याराज्यात स्थलांतर करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. मुंबईत परभाषिक मजुरांसोबत हजारो मुले येतात. एकट्या महाराष्ट्रात अशी एक कोटीपेक्षा जास्त परभाषिक कुटुंबे आहेत. देशात ११ कोटी भटके विमुक्त आहेत. त्यांची लाखो मुले शाळेबाहेर आहेत. आदिवासी भागात गळती खूप मोठी आहे. पण या शाळेबाहेरच्या मुलांची चर्चा होत नाही... हे वास्तव पुढे आणण्यासाठी मी २० जिल्ह्यांत फिरून या मुलांचे वास्तव अभ्यासले. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्यात आज १३००० शाळा या १५ पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. तेव्हा शासन त्या बंद करून ती मुले जवळच्या शाळेत टाकते आहे. त्याला अनेक पैलू आहेत. काही शाळा एकमेकाजवळ अंतराचा निकष न पाळता सुरू केल्या आहेत. तेव्हा प्रत्येक शाळेचा नेमका प्रश्न तपासून चर्चा व्हावी. पण शिक्षण हक्क कायदा येऊनही ३ कोटी मुले शाळेबाहेर असणे हे डिजिटल इंडियाची भाषा बोलणार्या सरकारला भूषणावह नाही.
तुमचे ‘बखर शिक्षणाची ‘हे पुस्तक (राजहंस प्रकाशन) येते आहे. यात तुम्ही शिक्षक पालकांनी वाचावयाच्या पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. ही पुस्तके कशी निवडली?
हेरंब कुलकर्णी - शिक्षक वाचत नाहीत हे वाक्य इतक्या वेळा लिहिले जाते की ते लिहिलेले वाक्यही शिक्षक वाचत नाहीत! शिक्षकांना वाचते करण्यासाठी ललित किंवा वैचारिक पुस्तके ते एकदम वाचणार नाहीत. तेव्हा त्यांच्या शिक्षकी पेशातीलच जास्तीत जास्त पुस्तके त्यांना सुचवली पाहिजेत त्यातून एकतर ते वाचक होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते शिक्षक म्हणूनही समृद्ध होतील. त्यांना प्रयोगशील शिक्षकांची पुस्तके वाचून प्रेरणा मिळेल. म्हणून मग मी शोध घेतला, तेव्हा मराठीत ८०पेक्षा जास्त पुस्तके फक्त शिक्षणविषयक आहेत. त्यात जगभरातून अनेक पुस्तके अनुवादित झाली आहेत. ‘तोत्तोचान’, ‘समरहिल’, ‘सर विथ लव्ह’ यासारखे मास्टरपीस मराठीत आले आहेत. तेव्हा या पुस्तकांनी वाचनाची सुरुवात व्हावी असे वाटले. मी सुरुवातीला अशा पुस्तकांच्या याद्या केल्या, पण लक्षात आले की केवळ नावे सांगून पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण होत नाही. तेव्हा निवडक ६० पुस्तकांचा परिचय करून देणारे पुस्तक असे पुस्तकावरचे पुस्तक लिहिले.
पालकांसाठी हे महत्त्वाचे आहे की पालकांना जर खरे शिक्षण कशाला म्हणतात हे कळले, तर पालक मुलांकडून व शाळांकडून चुकीच्या अपेक्षा करणार नाहीत. या पुस्तकाच्या निमित्ताने मराठीत शिक्षणविषयक साहित्य अशी एक नवी चर्चा सुरू होऊन या प्रकारचे साहित्य अधिक वाढेल असे वाटते.
भारतातल्या कृष्णमूर्तीच्या सर्व शाळा तुम्ही बघितल्या आणि त्यावर तुमचे ‘जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स’ हे पुस्तक ही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.. या शाळांचे तुम्हाला काय वेगळेपण वाटले?
हेरंब कुलकर्णी - ‘शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच अशा जागा आहेत की जिथे कुणीच स्वत: होऊन जात नाही, दाखल करावे लागते’ असे भेदक वाक्य बोलणारे कृष्णमूर्ती हे शिक्षणचिंतक म्हणून जगाला परिचित आहेत. ते केवळ तत्त्वज्ञान मांडून थांबले नाहीत, तर त्यांनी पाच शाळा काढल्या. या शाळेत विविध प्रयोग केले. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या शाळा, संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा उपक्रम असलेल्या शाळा, शिक्षा आणि बक्षिसे नसलेल्या शाळा, परीक्षेऐवजी मूल्यमापन पद्धती विकसित केलेल्या शाळा मी बघितल्या. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथे जाऊन या शाळेत मी राहिलो आणि शाळा समजून घेतल्या. कृष्णमूर्तींची पुस्तके मी कॉलेजला असताना घाबरून रद्दीत टाकली होती, पण नंतर त्यांची मला ८० पुस्तके विकत घ्यावी लागली. डी.एड., बी.एड.च्या अभ्यासक्रमात कृष्णमूर्ती परिचय कुठेच नाहीत, त्यामुळे शिक्षकांना कृष्णमूर्ती माहीत होत नाहीत. या पुस्तकामुळे शिक्षक व पालकांना कृष्णमूर्ती आणि त्यांच्या शाळा माहीत होतील.
अलीकडेच तुमच्या बालवाचनालय चळवळीविषयी वाचले. तुम्ही स्वत:च्या घरापासून या उपक्रमाची सुरुवात केलीये. यामागची भूमिका काय आहे ?
हेरंब कुलकर्णी - महाराष्ट्रात मागच्या महिन्यात १५ ऑक्टोबरला ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा झाला. यानिमित्ताने केवळ वाचन संस्कृतीवर अरण्यरुदन करण्यापेक्षा आपण स्वत: सुरुवात करावी असे वाटले. बुलढाणा येथील माझे मित्र व ग्रंथपाल म्हणून विविध उपक्रम राबविणारे नरेंद्र लांजेवार(९४२२१८०४५१) यांनी बुलढाण्यात गल्लोगल्ली अशी ५० बालवाचनालये सुरू केली आहेत. त्यातून लहान मुलांची एक वाचन चळवळ तिथे उभी राहिली आहे. त्यांच्यापासुन प्रेरणा घेतली. आमच्या घराच्या परिसरात कष्टकरी कुटुंबातील मुले राहतात. त्या मुलांवर हा वाचन संस्कार महत्त्वाचा आहे. या ५० मुलांसाठी आम्ही आमच्या घरात मोफत ग्रंथालय सुरू केले. या मुलांसाठी आम्ही लहान मुलांची २५० पुस्तके आणली आहेत. सर्वात छोट्या वाचकाच्या हस्ते या बालवाचनालयाचे उद्घाटन केले. आपल्या घरातली पुस्तके मुलांना आज खुली करून देण्याची ही चळवळ वाढायला हवी, असे वाटते.

No comments:
Post a Comment