Flash

Tuesday, 24 April 2018

मला माफ करा डॉ. दाभोळकर हेरंब कुलकर्णी ....

हेरंब कुलकर्णी ....मला माफ करा डॉ. दाभोळकर

मला माफ करा डॉक्टर
दाभोळकर

तुम्ही गेल्यानंतर मी श्रद्धांजली सभेला गेलो नाही 
मोर्च्यात ही गेलॊ नाही 
अपराधी भावनेने मन भरून आलय 
तुमच्या १८ वर्षाच्या लढाईत मी काहीच का केलं नाही

समुद्राने पिल्ल नेलेल्या टिटविच्या आकांताने तुम्ही ओरडताना मी समुद्राचे सौदर्य बघत राहिलो
कधी ना तुमच्या आंदोलनात आलो … आंदोलनाच्या बाजूने लेख सोडाच साधे वाचकांचे पत्रही लिहिले नाही
फक्त तुम्ही भेटल्यावर हवापाण्याच्या गप्पा माराव्यात तशी विधेयकाची चौकशी करत राहिलो
क्रिकेटचा सामना बघावा तसा सरकार विरुद्ध अनिस ही लढाई बघत राहिलो

प्रत्येक ख्रिस्ताला आपला क्रूस आपल्यालाच वाहून न्यावा लागतो …हे लढाईच्या बाबतही खरे असते का ….?

तुम्ही आम्हाला हवे होता ।महा रा ष्ट्र फाउन्देशनसाठी साधनेसाठी व्याख्यान मालांसाठी माझ्या पुरोगामी प्रतिमेला झळाळी देण्यासाठी……यासाठी मला तुमची मैत्री हवी होती ….तुमच्या लढाई शी मला काहीच घेणे नव्हते

मंत्रालयाच्या पायरया दर अधिवेशनापूर्वी तुम्ही एकटेच चढत होता
आणि अधिवेशन संपल्यावर विधिमंडलातुन एकटेच पायरया उतरत होतात …।
मी मात्र मोजत होतो वर्षे क्रिकेट्च्या सामन्या सारखी

तुम्ही गेल्यावर रस्त्यावर उतरलेल्या गर्दी च्या एक दशांश गर्दी तेव्हा जरी उतरली असती तर तुमची तडफड तगमग कारणी लागली असती

तुमच्या मरणाची ब्रेकिंग न्यूज संपल्यावर तुमची जिवंत पणी उपेक्षा करणारे आम्ही खरच लढणार आहोत का ।?

आता आम्ही म्हणतो आहोत गोळीने विचार संपत नाही
असेच आम्ही म्हणालो होतो गांधीला संपवल्यावर
असेच आम्ही म्हणालो होतो सफदर हाश्मीला संपवल्यावर
असेच आम्ही म्हणालो होतो शंकर गुहा नियोगीला संपविल्यावर …

पण आज वास्तव काय आहे डॉक्टर
मोदीमय गुजराथेत गांधी कुठे शोधायचे
सफदर हाश्मीचे राजकीय नाटक कोणत्या रस्त्यावर बघायचे
भांडवलदार आणी नक्षल वाद्यांनी वाटून घेतलेल्या छत्तीसगढ मध्ये नियोगी कुठे शोधयाचे

आपल्या महान परंपरेनुसार जिथे गावोगावी तुम्ही शिव्या खाल्या तिथे आता तुमच्या साठी गावोगावी हार आहेत
तुमचा स्मृतिदिन तुमचे स्मारक तुमच्या नावाने पुरस्कार हे सारं यथासांग साजरे आम्ही करू
तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्हाला १८ वर्षे ज्यांनी तळ तळ करायला लावली त्यांच्याकडून आम्हाला तुमचे मोठेपण ऐकावे लागेल….

डॉक्टर
मला लाज फक्त याची वाटते की १८ वर्षे तुम्ही लढताना मी निष्क्रिय जिवंत होतो
तुम्ही असहाय्य पणे मारले जातांना मी जिवंत होतो ……

हेरंब कुलकर्णी
९२७०९४७९७१

…तू लेख का छापत नाय - हेरंब कुलकर्णी

“…तू लेख का छापत नाय”

   
5
महाराष्ट्र टाइम्स ने पेज थ्री टाइप बदल केले तेव्हा त्यावर टीका करणारा ‘बाळशास्त्री जांभेकरांना अनावृत्त पत्र ‘ हा लेख मी लिहिला होता. तो राग डोक्यात ठेवून आजचे संपादक अशोक पानवलकर यांनी माझे लेखन महाराष्ट्र टाइम्स मध्ये छापणे बंद केले. या असहिष्णुतेवर चर्चा व्हायला हवी यासाठी त्यांना लिहिलेले पत्र मी सोबत जोडले आहे. राजकारण्यांना सहिष्णुता शिकविणारे हे संपादक यांनी असे अनेकांना लिहिणे बंद केल्याचे समजते. त्यांनी  पत्राला उत्तरही दिले नाही.केवळ टीका करणारा लेख लिहिला म्हणून छापायचे नाही महाराष्ट्राच्या उदारमतवादी परंपरेला अशी वृत्ती घातक आहे ..
प्रिय अशोक पानवलकर,
हेरंब कुलकर्णीचा नमस्कार
यापूर्वी मी तुम्हाला २ पत्र किमान १० वेळा फोन व १० sms केले.. तुम्ही प्रतिसाद दिला नाही. पत्र फोन व sms याला तुम्ही प्रतिसाद देत नसल्याने हे शेवटचे पत्र मी लिहितो आहे. इतक्यावेळा केलेल्या पत्र फोनला प्रतिसाद न देणे हे माणूस म्हणून मला खूप अपमानकारक वाटले.
तुम्ही संपादक झाल्यापासून तुम्ही माझे लेखन छापत नाही. याबाबत तुम्हाला थेट विचारणा केल्यावर आता उत्तर ही देत नाही. शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत या विषयावर ४५ गावामध्ये जाऊन तिथले मुलांच्या लग्नाचे वास्तव मांडणारा लेख तुमच्याकडे मी पाठवला.आज ग्रामीण महाराष्ट्रात ही गंभीर समस्या आहे. आमचा हेतु हा असतो की तुमच्या  माध्यमातून हा विषय राज्याचे धोरणकर्ते,साहित्यिक ,विचारवंत यांच्यापर्यंत जावा आणि या प्रश्नाची कोंडी फुटावी. पण आम्ही इतके कष्ट घेवून हा विषय पुढे आणूनही तुम्ही जागा दिली नाही.त्याची बातमी करतो असे मला कळवले पण अशी बातमीही केली नाही. हा प्रकार नेमका काय आहे ? म्हणजे हे असले विषय तुम्हाला लेख सोडा तर बातमीच्याही लायकीचे वाटत नाहीत का ? एका एका गावात आज १०० मुले बिनलग्नाची आहेत आणि त्याची तुम्ही दखल ही घेणार नाही.
सकाळ या आमच्या अभ्यासावर अग्रलेख लिहिते.लोकमत पुरवणीचा मुख्य विषय करते. चॅनल चर्चा करतात आणि तुम्हाला बातमीचा ही विषय वाटत नाही ??  संपादक म्हणून तुमचा नाकारण्याचा नक्कीच हक्क आहे पण गेली अनेक वर्षे तुम्ही ज्याप्रकारे माझे लेखन नाकारत आहात त्या तुमच्या मानसिकतेचा माझ्याविषयीच्या आकसाचा हा मला भाग वाटतो.  खरं तर तुमची माझी ओळख ही नाही. पण संपादक झाल्यापासून तुम्ही असे का वागता याचे कारण नंतर लक्षात आले.
महाराष्ट्र टाइम्स ने पेज थ्री कल्चर सुरू केले. चित्रपट,फॅशन,गणपती,नवरात्र साड्या हे सुरू केल्यावर त्याविरोधात मी ‘बाळशास्त्री जांभेकरांना अनावृत्त पत्र’ असा एक लेख लिहिला होता. खरे तर तुम्ही तो लावून घेण्याचे काहीच कारण नव्हते. तो धोरणावर टीका करणारा होता पण तो राग धरून संपादक झाल्यावर तुम्ही मला काळ्या यादीत टाकले. खरे तर टाइम्सने जे बदल केले ते तुम्हालाही खटकायला हवेत पण तुम्ही माझ्यावर राग काढलात.
काही मुद्दे लिहितो
१)  एका संस्थेने माझ्या मुलांच्या प्रश्नावरचा लेख तुमच्याकडे पाठविला. तुम्ही स्पष्टपणे ‘त्यांचा लेख आमच्याकडे चालणार नाही’ असे सांगितले. त्या संस्थेने मला दुसरीकडे लेख देताना अगदी सहजपणे ही अडचण सांगितली. तेव्हा मला तुम्ही माझा तिरस्कार करता मला नाकारता आहात हे प्रथम कळाले.
२)  ५ वर्षात किमान २० पेक्षा जास्त लेख व लिहिण्याचे विषय मी विविध तुमच्या सहकार्‍याकडे पाठविले. तुमचे सहकारी स्पष्ट बोलत नाहीत मला कारण सांगत नाहीत. ते लेख नाकारण्याचे कारण सांगू शकत नाहीत पण तुमचा माझ्याविषयीचा दृष्टिकोन माहीत असल्याने ते घेत नसावेत. त्यामुळे हा लेख मी थेट तुम्हाला पाठवला पण तो ही नाकारला तेव्हा माझा संशय खरा ठरला.
३)  सर्वात वाईट  वाटले ते, मी पुस्तक दिनानिमित्त राज्यातील मान्यवरांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी पुस्तके अशी यादी मी तयार केली. सोशल मीडियातून ७०० जणांची मते घेवून स्वत: ५००० रुपये खर्च करून यादी प्रसिद्ध केली पण पाठपुरावा करून बातमी सुद्धा आली नाही. इतके कष्ट घेऊन साधी बातमी सुद्धा तुम्ही येवू दिली नाही. तेव्हा खूप वेदना झाल्या वाचनसंस्कृती वाढावी म्हणून आम्ही ग्रामीण भागात काही प्रयत्न करतो आणि तुम्ही व्यक्तिगत तिरस्कार करता.
४)  यावर मी तुमच्याशी बोललो तेव्हा तुम्ही म्हणाला की मी कोणत्याही विषयात नव्या लोकांना संधी देतो. शिक्षणात हे मान्य आहे पण नव्यानेच लिहिण्याचा निकष लावला तर या निकषावर मी लिहिलेला शेतकरी प्रश्नावरचा लेख मी नव्यानेच लिहितो आहे. दारूबंदी विषयावर मी नव्याने लिहितो पण मग तिथे तुम्ही माझे लेख नवीन लेखक म्हणून का छापत नाही?  म्हणजे केवळ मला टाळण्यासाठीच हे निकष सांगता असे वाटते.
५)  मी लोकसत्तात लिहितो म्हणून घेत नसाल असे म्हटले तर दोन्हीकडे लिहिणारे मी अनेक नावे दाखवून देईन. आणि लोकसत्तात वर्षात जास्तीत जास्त २ ते ३ लेख माझे सध्या येतात म्हणून असे वागणार ?
६)  आमची अडचण समजून घ्या. आपले नाव यावे ही प्रेरणा शेकडो लेख आणि ९ पुस्तके प्रसिद्ध झाल्यावर संपली आहे आता प्रत्यक्ष सामाजिक काम करताना काही प्रश्न पुढे न्यावेत यासाठी आम्ही लिहितो. एखाद्या धोरणात्मक विषयावर मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही  मुंबईच्या पेपरमध्ये लिहितो. चॅनलमध्ये विषय मांडतो. त्यामुळे आम्ही आग्रह धरतो. पण ती आमची कार्यकर्ता म्हणून तगमग तुम्ही लक्षात घेत नाही. लोकसत्ता,सकाळ,लोकमत आमची ही भावना समजून घेतात पण तुम्ही नाही.
एखाद्याचे लेखन छापायचे नाही असे ठरविणे ही असहिष्णुता आहे. आपण मोदीभक्तांना असहिष्णु म्हणणार आणि दुसरीकडे तुमच्या धोरणावर टीका करतो म्हणून आम्हाला दूर ठेवणार हे योग्य आहे का ? माणूस म्हणून तुम्ही कोणाशी कसेही वागू शकता पण संपादक म्हणून तुम्ही असा भेदभाव करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आमच्यावर टीका करता मग कशाला आमच्याकडे लिहिता असे म्हणत असाल तर ते चालणार नाही. टीका करण्याचा आणि अभिव्यक्तीचा दोन्ही अधिकार लेखक म्हणून असला पाहिजे… या न्यायाने मग कशावरच टीका करता येणार नाही.
तुम्ही छापले नाहीतर दुसरे कोणीतरी छापणार आहेच. लेखन छापले जाणे माझ्यासाठी समस्या नाही, तुम्ही नाकारल्याने काहीच फरक पडत नाही. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे व नियतकालिके अतिशय सन्मानाने माझे लेखन छापतात. पण मला काही लेखक असे दूर टाकणे, संपादक म्हणून उदार मनाचे नसणे आकस ठेवणे  ही तुमची असहिष्णुता विलक्षण क्लेशदायक वाटते
कुमार केतकरांचे उदाहरण देतो. शरद जोशींशी मतभेद होते. जोशीच्या ७५ व्या वाढदिवसाला मी शरद जोशींची मुलाखत घेतली. केतकरांनी वाचक पत्र रद्द करून पूर्ण अर्धे पान ती छापली. हा उदारमतवाद तुम्ही शिकावा अशी तुमच्यापेक्षा लहान असूनही सांगतो. तुम्ही असे अनेकांशी वागत आहात. मराठी पत्रकारितेच्या उदारमतवादी परंपरेला तुम्ही असहिष्णु वळण देत आहात. आज माझे लेख न छापण्याचे समाधान तुम्हाला मिळेल पण माझ्यातला लेखक तुम्ही थांबवू शकणार नाही. तुम्ही उद्या निवृत्त व्हाल पण माझ्या मनात मात्र हे कायम राहील की एक संपादक आपल्याशी इतक्या वाईटरितीने वागले… मी सर्वत्र लिहितो पण गेल्या २० वर्षात असे संपादक मी प्रथमच पाहत आहे.
मी हा विषय अतिशय गंभीरपणे घेतला असून ही असहिष्णुता सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या, महाराष्ट्राच्यासमोर आणावी असे वाटते आहे. विनाकारण एखाद्याचा तिरस्कार तुम्ही का करता हे सांगितले पाहिजे. खरं सांगू पानवलकर, आपला कोणीतरी इतका तिरस्कार करते हे खूप वेदनादायक असते.
हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१) 

एका अस्वस्थ शिक्षकाची डायरी - हेरंब कुलकर्णी

एका अस्वस्थ शिक्षकाची डायरी

लेखक, संपादक, शिक्षणक्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून हेरंब आपणास माहीत आहेत.
‘सर्व शिक्षा अभियान’ मधे ते गेली दोन वर्ष समन्वयक म्हणून काम करत आहेत.
पण मुळात हेरंब हाडाचे शिक्षक आहेत. शिक्षक म्हणून स्वतःत होत गेलेल्या बदलांबद्दल....
बीएड.च्या अभ्यासक्रमात खरं तर शिक्षणाच्या निर्जीव व्याख्या पाठ करून कंटाळा आला. त्या सर्व व्याख्यांमध्ये परिवर्तन हा शब्द अपरिहार्यपणे असायचा. ठाकरे म्हटलं की ठोकशाही, कम्युनिस्ट म्हटलं की क्रांती, नरेंद्र मोदी म्हटले की रक्त आठवावं इतकं त्या व्याख्येशी परिवर्तन जोडलेलं असायचं.
शिक्षण म्हणजे परिवर्तन, काहीतरी बदलणं, एवढं लक्षात आलं. बाकी बी.एड. झाल्यावर माझ्यात काहीच परिवर्तन झालं नाही हेही लक्षात आलं. एका बाजूनं वर्गात गेलो आणि दुसरीकडून बाहेर आलो. फक्त ‘डिस्टींक्शन’चं प्रमाणपत्र हातात होतं. ते घेऊन शिक्षक झालो. मुलं ५वी ला वर्गात येतात आणि १०वी ला तशीच बाहेर पडताहेत. ‘परिवर्तन’ नावाची गोष्ट कुठं दिसते आहे हे लक्षातच येईना.
अर्थात बदल आमच्या तथाकथित शिस्तीच्या चौकटीत दिसायचे. उशीरा येणारी मुलं छडी मारली की चटकन शाळेत वेळेवर यायची. वर्गात बडबड करणार्या मुलांना छडी मारली की ती मुलंही गप्प बसायची. गृहपाठ न करणार्या मुलांना मारलं की ते गृहपाठ करून आणायचे. शाळा बुडवणार्या मुलांना आम्ही घरी जाऊन रागवायचो. शेजारपाजारचे लोक गोळा व्हायचे. त्याचा बापही त्याला बदडायचा. इतक्या व्यापक अपमानानंतर तो मुलगा शाळेत येऊन बसायचा. त्याची मान खाली आणि जिंकल्याचे भाव आमच्या चेहर्यावर. त्याच्यात बदल घडवल्याचं खोटं समाधान आम्हाला मिळायचं. एखादा विद्यार्थी उद्धटपणे वर्गात बोलायचा. त्याला मुख्याध्यापकांकडं नेऊन आम्ही फटकवून काढायचो. तो सर्व मुलांपुढं माफी मागायचा. आम्ही जिंकायचो. एक वचक निर्माण व्हायचा. गुंड मुलं बचावाच्या पवित्र्यात. आम्ही त्या परिवर्तनानं खूष व्हायचो. कॉपी करू न देण्यात माझी ख्याती. गुंड मुलं चाकूची धमकी द्यायचे. त्याला भीक न घालता मी कॉपी बाहेर काढायचो. वर्ग कॉपीमुक्त. त्या परिवर्तनानं मला ‘शिक्षणतज्ज्ञ’ झाल्याचं समाधान मिळायचं. दहावीतही मुलं-मुली - त्यांची प्रेमप्रकरणं चालायची. एखादी चिठ्ठी मी पकडली की पोलीस महासंचालकासारखी उलटतपासणी करायचो. बेइज्जत झाल्यानं ते दोघे किमान शाळेत तरी ‘नीट’ वागायचे. खाली माना घालायचे. त्यांच्यातली चारित्र्यनिर्मिती(!) बघून माझ्यातला ‘विवेकानंद’ सुखावायचा.
असं माझं सारं छान चाललं होतं. वयाच्या पंचविशीत शाळेतला एक कडक शिस्तीचा शिक्षक म्हणून पंचक्रोशीत ख्याती होती. झोपडपट्टीतली शाळा. त्यात सहा फुटी तगडी पोरं आणि किरकोळ देहयष्टीचा मी. त्या पोरांना नमवण्यात वेगळाच अहंकार सुखावायचा. शिस्तीनं आपण त्यांच्यात परिवर्तन घडवतो हा भ्रम निर्माण होत राहिला. अज्ञानातलं सुख आनंद देत राहिलं.
‘कॉपी’ या विषयानं माझा भ्रम तोडला. ‘कॉपी’ मागील मानसिकता ही अप्रामाणिकपणाशी जोडलेली आहे. शिक्षणातून प्रामाणिकपणा रुजावा ही जर भूमिका असेल तर कॉपीचं उच्चाटन झालं पाहिजे. त्या प्रबोधनासाठी मी मूल्यशिक्षणाचे तास वापरले. रोज त्या विषयावर माझं प्रवचन मुलं श्रद्धेनं ऐकायची. ‘आम्ही कॉपी का करतो?’ हे मुलांकडून मी लिहून घेतले. मुलांनी पालकांची भीती, प्रतिष्ठेच्या संकल्पना हे सारं सारं लिहिलं पण ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकातला आचार्य माझ्यात संचारला होता. पुन्हा त्यांना मी उपदेशच करत राहिलो. ‘कॉपी’ करणार्या मुलांचे पालक बोलावले. त्यांची बेइज्जती केली. तरीसुद्धा मुलं सुधारली नाहीत. दहावीची सराव परीक्षा आली. मुलांना म्हणालो-कॉपी करू नका. मुलं म्हणाली नाही करणार. एकाही मुलानं कॉपी केली नाही. मला बुद्ध झाल्याचा भास झाला.
पण भ्रमाचा भोपळा बोर्डाच्या परीक्षेत फुटला. सरसकट मुलांनी कॉपी केली. मी डोळ्यात पाणी आणून त्यांना विनंती केली पण व्यर्थ. निरोपसमारंभात मुलांनी मला हातातले घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ गणिताच्या पेपरला मी मुलांकडे फेकले व म्हणालो - ‘जर आजच्या पेपरला तुम्ही कॉपी केलीत तर मी हे घड्याळ स्वीकारणार नाही.’ काहीच फरक पडला नाही. मी घड्याळ घेतले नाही. ‘इमोशनल ब्लॅकमेलींग’ व्यर्थ गेले ! मुलं खाली माना घालायची. कॉपी करण्यामागची अगतिकता त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसायची. आम्ही दिलेल्या शिक्षणातून त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत नव्हत्या. नापास झाले तर आईबाप मारहाण करण्यापासून शिक्षण बंद करण्यापर्यंत सर्व काही करणार. सामाजिक बेइज्जत वेगळीच. या अगतिकतेत माझं प्रबोधन, माझी प्रवचन मालिका सगळं वाहून गेलं. परिवर्तनाचे प्रयोग पुन्हा फसले.
पुढे निकाल लागला. ती सगळी पोरं पास झाली. कॉलेजात गेली. मी ज्यांना शिस्तीच्या चाबकानं फटकारलं होतं ती सारी पोरं पाण्याच्या वाफेनं झाकण उडावं तशी बेताल झाली होती. मला बघितलं की चांगला शिक्षक म्हणून आदर द्यायची पण त्यातली वाह्यात पोरं गुटखा खाऊन थुंकायची. अचकट-विचकट बोलायची. त्यांच्या नजरेतला बेधडकपणा, बेरकीपणा मला टोचायचा. अवमान वाटायचा. पण त्याहीपेक्षा जास्त परिवर्तन फसल्याचं दु:ख असायचं.
मी खूप विचार करायचो. ही मुलं का बदलली नसतील? आपली तळमळ यांच्यापर्यंत का पोहोचली नसेल? इतक्या महापुरुषांच्या कथा सांगूनही ते सगळंच का वाहून गेलं असेल? काहीच कसं झिरपलं नाही? आपण त्यांना चांगल्यासाठीच मारलं. तरीही आपल्याविषयी शत्रुत्वाची भावना का? हेतू चांगला पण अंमलबजावणी का फसली? मी विचार करत बसायचो. शब्दांच्या प्रबोधनातच मर्यादा आहेत. तेव्हा शब्दातीत माध्यमं कोणती आहेत, त्याचा मी शोध घ्यायला लागलो. जे. कृष्णमूर्तींच्या एका पुस्तकाचा शेवट एका गोष्टीनं झालाय. त्या गोष्टीनं मला अंतर्मुख केलं. ती कथा अशी-
‘एक साधू आपल्या शिष्यांना रोज सत्य, प्रेम, सौंदर्य यावर प्रवचन द्यायचा. एक दिवस तो प्रवचन सुरू करणार इतक्यात एक बुलबुल पक्षी तिथं आला. तो गाणं गाऊ लागला. एक तास गाणं गात राहिला. साधू काहीच बोलला नाही. शिष्य काहीच बोलले नाहीत. पक्षी उडून गेला साधू म्हणाला-
‘आजचे प्रवचन संपले’
या गोष्टीनं मला आतून हलवलं. तुमचा सहवास मुलांना बदलवू शकतो. शब्दातीत संवादच परिवर्तन घडवू शकेल. हे जाणवताच मी आध्यात्मिक शस्त्रभांडारात दाखल झालो.
जे. कृष्णमूर्ती, रजनीश वाचून काढले. अवतार मेहेरबाबांची नगरला समाधी आहे. ते ४४ वर्षे मौन राहिले. त्यांच्या मौनाचं मला आकर्षण वाटलं. एक दिवस सकाळी १० ते संध्याकाळी पाचपर्यंत समाधीसमोर मौन करून बघितलं. मुलांवर मौनाचे प्रयोग सुरू केले. विपश्यना शिकलो. मूल्यशिक्षणात मुलांकडून मौन करून घेतलं. रोज सगळा वर्ग शांतपणे मौन व्हायचा. मुलं घरीही मौन करायला लागली. कृष्णमूर्तींच्या पुस्तकातून निसर्गाचं महत्त्व कळालं. मुलांना मैदानावर नेऊन आकाशाचे रंग बघत मौन करायला शिकवलं. ‘सूर्यास्त कोणी बघितला?’ हा ‘गृहपाठ’. रोज विचारायला लागलो... तरीही परिवर्तन कुठं सापडेनाच. मी पुन्हा सुन्न झालो.
शिक्षणातून जो संवेदनशील, हळुवार, रसिक, जबाबदार नागरिक निर्माण करायचा आहे त्याची शक्यताच मला कुठे दिसेना. आमचे रुक्ष अभ्यासक्रम, त्याहीपेक्षा रुक्ष शैक्षणिक वातावरण, यातून हे सारं घडणार कसं हेच समजेना. जेलर आणि आरोपी असं आमचं मुलांशी नातं होतं. या नात्यात हे काहीच समजेना.
तिथून पुढं शिक्षणाचा शोध घेऊ लागलो. कृष्णमूर्तींची ‘सह्याद्री स्कूल’ बघून आलो. भर दुपारी उन्हात तो डोंगर चढलो. तिथून काही शिकता येतं का? याचा शोध घेतला. भटकत राहिलो. प्रयोगशील शाळांचेही दरवाजे ठोठावले. त्या शाळांनाही हाच प्रश्न विचारला की शाळा सोडल्यावर बाहेरचा समाज संस्कार पुसत राहतो, तर शाळेचे कोणते संस्कार टिकून राहिलेत? व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करून गेलेत? हे विचारत राहिलो पण इतका शास्त्रशुद्ध अभ्यास अजून व्हायचाय हे लक्षात आलं.
त्याच सुमारास नरेंद्र मोदीने गुजराथमध्ये मुस्लिमांचे शिरकाण घडवले. सुशिक्षित तरुण-तरुणींचा सहभाग विलक्षण होता. सुशिक्षितपणाचा त्यांना उपयोग इतकाच झाला की मुस्लिमांची घरे शोधण्यासाठी मतदारयादीचा वापर करावा ही सुपीक कल्पना त्यांना सुचली....तेव्हा वृत्तपत्रात मी ‘साबरमतीकाठी आधुनिक शिक्षणाचं थडगं उभारा’, असं लिहिलं. शिक्षणानं हिंसा कमी होणार नसेल तर ती कशानं कमी होणार? गुजराथमधील महाभयंकर कहाण्यांनी सुन्न करून टाकलं. ‘कम्युनल कॉम्बॅट’ नं छापलेली छायाचित्रे बघितल्यावर तर त्या रात्री न जेवताच झोपलो. माणसातल्या पशूला हाताळण्यात आमचं शिक्षण कमी पडतंय. माणसातल्या जनावराला आम्ही स्पर्शही करत नाही. मानवी भावनांचं समायोजन या शिक्षणातून कसं करता येईल? याने तर मी पुरता गोंधळून गेलो. शाळेत मुलांच्या होणार्या मारामार्या. त्यांच्यातील द्वेष, ईर्षा बघून तात्कालिक शिक्षा करायचो. पण निरुत्तर व्हायचो. पुन्हा पुन्हा जे. कृष्णमूर्तींची प्रश्नोत्तरे उघडून बघायचो. कृष्णमूर्ती सांगायचे तुमच्यातील तळमळ, समोरच्याविषयीचे उत्कट प्रेम व विषय शिकवण्यातली निष्ठाच मुलांना बदलवून टाकील. रोज डायरी लिहायचो. एखाद्या मुलाला शिक्षा केली तर स्वत:लाच खूप दोष द्यायचो. नवा संकल्प करायचो. मौनाचे प्रयोग, तळमळीनं शिकवणं, मुलांना शिक्षा न करणं, प्रेमानं संवाद वाढवणं हे सारं करत राहिलो. परिवर्तनाच्या शक्यता तपासून बघत राहिलो.
समाजातल्या आजच्या दोषांना उत्तर म्हणजे शाळा असल्या पाहिजेत असं वाटायचं. कृष्णमूर्तींमुळं सामाजिक प्रश्नांची व्यक्तिगत उत्तरं शोधायची सवय लागली. आजचा भ्रष्ट समाज, हिंसक समाज, मानवी नात्यातील क्रौर्य हे बदलायचे असेल तर शिक्षणातूनच ते घडायला हवे. शिक्षणातून ती जडणघडण होणार नसेल आणि फक्त माणसांचे राहणीमान बदलणार असेल, भाषा बदलणार असेल व मानसिकता तीच राहणार असेल तर हे सगळं बदलणार कसं?
दहा वर्षे वेगवेगळे प्रयोग करूनही रोखठोक परिवर्तनाचा ‘ब्ल्यू प्रिंट’ हाताशी लागलाय असं ठामपणे म्हणता येत नाही.
मध्यंतरी एक माजी विद्यार्थी भेटला. सध्या नगरपालिकेत काम करतोय. आदरानं नमस्कार केला. भेटीचा आनंद डोळ्यात तरळत होता. गप्पा झाल्या. मी खूप चांगलं शिकवलं असं म्हणत होता. त्याला थेटपणे प्रश्न विचारला, ‘‘मी एखादी गोष्ट शिकवली आणि तुला त्याचा आज उपयोग होतो असं नेमकं काय आहे?’’
तो बराच वेळ गप्प राहिला. तो इतकंच म्हणाला, ‘‘तुम्ही खूप काहीतरी चांगलं आम्हाला शिकवत होतात. आपण कुणीतरी चांगलं बनावं एवढं वाटत राहिलं,’’ त्याला शब्द सापडत नव्हते पण एकूणच त्याने मला चांगल्या यादीत टाकले होते! माझी आठवण म्हणजे मूल्यांची आठवण असं घडत होतं. मला वाटतं परिवर्तनाचा रस्ता याच परिघातून सुरू होत असावा...
रजनीश वाचल्यानंतर नैतिक, अनैतिकतेच्या बालिश कल्पनाही मनातून कोलमडल्या. नैतिक-अनैतिक खोड्यात तुम्ही मुलांना अडकवलं की मुले ही वायफळ बडबड विसरून जातात. एखाद्या व्यसनाचा अंमल उतरावा तसा उपदेशाचा अंमल उतरतो आणि माणूस शेवटी स्वत:तील नैसर्गिक प्रेरणांना प्रतिसाद देतो. तेव्हा नैतिकता ही शिकवण्याची गोष्ट नाही हे लक्षात येत गेलं. त्याहीपेक्षा विचार करायला शिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. एकदा विचार करायला शिकवलं की मुलं आपोआप आपल्या जगण्याचा अर्थ लावू शकतात हेही लक्षात आलं. तेव्हापासून उपदेश करण्यापेक्षा मी वर्गात विचार करायला लावणारे प्रश्न विचारू लागतो.
‘स्त्री-पुरूष’ समानता शिकवताना, ‘विवाहसंस्थेत मुलाचे वय, शिक्षण, उंची मुलीपेक्षा जास्त असावी ही अट मुलीला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बाद करणारी मानसिकता आहे’ हे मी सांगायचो, त्यामागील धोरण सांगायचो. माझं लग्न ठरल्यावर एका मुलानं मला थेटपणे, ‘सर, तुमची बायको तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे का हो?’ असं विचारून तपासलं होतं. ‘जगात म्हातारपण नसते तर?’ हा निबंध लिहिताना एका मुलानं, ‘अशा प्रकारच्या दु:खांची जाणीव झाली नसती तर सिद्धार्थ कदाचित गौतम बुद्ध झाला नसता’ असं लिहिलं, तेव्हा मी शहारलो. धर्माचा उगमच ‘अपरिहार्य दु:ख आपण थांबवू शकत नाही’ यात आहे हेच जणू त्या मुलाने सांगून टाकले.
वर्गात, बाबा आमटेंनी रस्त्यातील गटारातला महारोगी उचलल्याची कथा सांगताच शासकीय रुग्णालयाबाहेर पायात वळवळणार्या अळ्या झालेला रोगी दिसताच मुलांना ‘बाबा आमटे’ आठवले आणि तात्काळ ते माझ्याकडे आले. आम्ही तो रोगी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केला. मुलांनी महिनाभर शुश्रूषा केली. माझ्यातील ‘परिवर्तनवादी’ सुखावला...
पण तरीसुद्धा हे भावनिक प्रतिसाद माणसांच्या सवयीत रूपांतरित होतात का? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. स्मशानवैराग्यासारखे हे सारे असते का? शाळेतले संस्कार जर भावनिकच राहात असतील व समाज ते पुसत असेल तर हा परिवर्तनाचा खटाटोप तरी का करावा? या प्रश्नांनी मी चक्रावून जायचो.
मुलं कुटुंबात हिंसा बघतात. समाजात भ्रष्टाचार बघतात. शाळेतली शिकवणूक त्यांच्यावर कितपत प्रभाव गाजवत असेल? शेवटी ही पुसण्याची प्रक्रियाच प्रभावी ठरत असेल तर मूळ पाटीवर अक्षरं का लिहायची? याचं उत्तर मिळत नाही.
विजय तेंडुलकरांना एकदा भेटलो. हिंसेवर खूप चर्चा केली. त्या चर्चेतून २ X २ = ४ असं उत्तरच मिळेना. मी तेंडुलकरांना इतकंच म्हणत राहिलो की वाढत्या वयात जे गुन्हेगार होतात त्याची मुळं शाळकरी वयात असतात का? मेंदूच्या रचनेत तसं काही असतं का? हिंसा ही वृत्ती असते का? मेंदूतील हिंसेची केंद्रं नष्ट करण्यासाठी आपण शाळेत कोणते उपक्रम राबवावेत? माझ्या भाबड्या प्रश्नावर तेंडुलकर हसत होते. हिंसा ही जीवनात कोणत्याही क्षणी विकसित होणारी गोष्ट आहे. तो एक अपघात असतो. सरळ अहिंसक जीवन जगणारा माणूस कुठल्याही क्षणी हिंसक होऊ शकतो. परिस्थिती हेच त्याचे उत्तर असते.
तेंडुलकर हे सारं सांगत होते. हिंसेचे मेंदूतील जंतू मारायला कोणतही ‘ऍन्टी-बायोटिक’ नाही. संपूर्ण समाजच अहिंसक व्हायला हवा असे माझ्या लक्षात आले. माझी शोधयात्रा सुरूच राहिली. शिक्षणावरचं वाचन वाढलं. आपण किती मुलांशी क्रूर वागलो यानं मन भरून यायचं. त्यातच तोत्तोचान वाचलं. बॅन्डवाल्यांशी बोलणारी मुलगी बेशिस्त म्हणणारा शिक्षक आपणच आहोत असं वाटायला लागलं. त्याच पुस्तकात असं लिहिलंय - ‘तोत्तोचानसारख्या शाळा जगात सर्वत्र असत्या तर जगात युद्धंच झाली नसती.’ हे वाक्य वाचल्यावर - शिक्षणात हिंसा संपवण्याच्या शक्यता आहेत, तेव्हा प्रयोगशील शाळा निर्माण करणं, प्रेम झिरपणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं.
रेणू गावस्करांचे रिमांड होममधले अनुभव वाचताना प्रेम ही एक थेरपी म्हणून कसं काम करते हे लक्षात आलं. लीलाताईंच्या पुस्तकांमधून मुलांना चौकस बनवणं कसं महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं. त्यातूनच विचार करायला कसं शिकवता येईल ते लक्षात आले.
शेवटी शिक्षकाचं व्यक्तिमत्त्वच मुलांमध्ये संक्रमित होतं हेच खरं. ग्रीक साहित्यातील ऐकलेली 'The Picture of Dorian Gray' ही कथा नेहमीच मला खुणावते. निरागस चेहर्याचा राजपुत्र. त्याचं एक पोटर्रेट त्याच्या बेडरूममध्ये ठेवलेले. त्याने पाप केले की त्याचा डाग त्या पोटर्रेटवर उमटणार. व्यक्तिमत्त्व मात्र निरागसच राहणार. राजपुत्र पापं करत राहतो. पोटर्रेट डागाळत राहते. शेवटी राजपुत्राकडून खून होतो आणि पोटर्रेट रक्ताळते. राजपुत्राची निरागसता कायम राहते.
मला वाटतं शिक्षकाचं व्यक्तिमत्त्व मुलांमध्ये अशाप्रकारे परावर्तित होत असते. आपल्या गुण-दोषाचं प्रतिबिंब मुलांमध्ये पडते आणि मुलं त्याप्रमाणे घडत-बिघडत राहतात. हीच परिवर्तनाची दिशा आहे. तेव्हा शिक्षकानं स्वत:चं व्यक्तिमत्त्व अधिक संवेदनशील, हळुवार, प्रेमपूर्ण करणं हेच परिवर्तनाची शक्यता सूचित करणारं आहे इथपर्यंत येऊन मी थांबलो.
जे. कृष्णमूर्तींना एका मुलानं विचारलेल्या प्रश्नानं मला खूप काही शिकवलं. तो मुलगा कृष्णमूर्तींना विचारतो की आम्हाला खेळात जितका आनंद मिळतो तितका आनंद अभ्यासात का मिळत नाही?
कृष्णमूर्ती उत्तर देतात की तुमच्या शिक्षकांना आनंद मिळत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. एखादा गायक शेकडो तासांच्या रियाजानंतर बैठकीवर बसतो तेव्हा त्यानं म्हटलेलं गाणं लोक कित्येक दिवस गुणगुणतात. तशा तयारीनं आणि विषयावरील प्रेमानं तुमचे शिक्षक वर्गात प्रवेश करतील तेव्हा खेळण्याइतकाच आनंद तुम्हाला अभ्यासातही मिळेल...’
कृष्णमूर्तींच्या या उत्तरानं परिवर्तनाचा रस्ता दाखवला. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या चेतनेला स्पर्श करता आला पाहिजे हेही लक्षात आलं.
हे सारं डोक्यात घोळताना प्राथमिक शिक्षणाकडं वळलो. आदिवासी भागातील २०० पेक्षा जास्त गावं बघितली. ४०० पेक्षा जास्त शाळा बघितल्या. माझ्यातील शिक्षकाचा झालेला संघर्ष मला कुठेच दिसेना. पाण्यात तेल सांडल्यावर तेलाचा जसा तवंग पाण्यावर पसरतो तसा एक प्रकारचा कंटाळा शाळेवर पसरला आहे असं जाणवू लागलं. शिक्षकाचं व्यक्तिमत्त्वच कोरडंठाक आहे. त्याच्यात उत्स्फूर्तताच नाही. तो गाणी म्हणत नाही, मुलांना स्पर्श करत नाही. मुलांशी बोलत नाही. तो फक्त उभा आहे किंवा वर्गात रेंगाळतो आहे. हे बघितल्यावर मन सुन्न झालं. मुलं लिहू-वाचू शकत नाहीत यावर मी भाष्य केलेच आहे. त्यावर इतरत्र सविस्तर लिहिले आहे. पण शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वातच समृद्धी नसल्यानं वर्गात काहीच घडत नाही. मुलं वर्गात येतात, बसतात, उठून जातात एवढंच घडतंय. शिक्षकानं शिकवलं तरी त्या शिकवण्यात जान नाही. त्यानं भावनिक कविता शिकवली तरी मुलं रडत नाहीत आणि विनोद केला तरी मुलं हसत नाहीत... गुणवत्तेच्या प्रश्नापेक्षाही हे मला जास्त अस्वस्थ करणारे वाटले. शिक्षकातच काही परिवर्तन नाही तर मुलांमध्ये झिरपणारं कसं...? शिक्षकालाच समृद्ध आणि संवेदनशील कसं बनवायचं हाच खरा प्रश्न आहे !
अखेरचा प्रश्न-शिक्षणानं व्यक्तित्वात, जाणिवेच्या पातळीवर परिवर्तन करावं ही अपेक्षा व्यक्त केली, तरी फोल ठरते आहे. पण किमान सामाजिक, आर्थिक परिवर्तन ग्रामीण समाजांमध्ये निर्माण केले आहे का? या परिवर्तनाची चर्चा करावीच लागेल.
ग्रामीण भागातील बदलाला शिक्षणानं हातभार लावला आहे हे खरं. पण आदिवासी भागात असं विधान करणं धाडसाचं ठरेल. जीवनसंघर्ष इतका तीव्र आहे की शिक्षण हा आदिवासींचा शेवटचा प्राधान्यक्रम ठरतो. पण जी मुलं शाळेत येतात त्यांच्यात काही बदललं आहे का? तर याचं उत्तर नकारार्थी आहे. खूप थोडे शिकले, शहरात गेले, नोकर्या मिळाल्या. त्यांचा जीवनस्तर बदलला हे मान्य पण आदिवासींच्या भारतातील गळतीपेक्षा महाराष्ट्रातील गळतीचे प्रमाण जास्त, हे कसे समजावून घ्यायचे? झाडावरून टपाटपा पानं गळावीत तशी लेकरं शाळेबाहेर पडत आहेत. शाळाच मुलांना आकर्षित करत नाही. पकडून ठेवू शकत नाही. जगण्यातलं परिवर्तन तर खूप लांबची गोष्ट राहिली.
शिक्षणानं माणसांचे सामाजिक, आर्थिक वर्ग बदलले पाहिजेत पण आदिवासी भागात हे अपवादानेच घडते. दहावीपर्यंत पोरगा टिकतच नाही. पन्नास वर्षांपासून ज्या गावात शाळा आहे त्या गावात आजही बारावी पास पोरगा सापडत नाही. गावातील महिला किती शिकली हा प्रश्न विचारण्याची हिंमतच होत नाही.
इतकं हे सारं विदारक आहे. दहावीतला पोरगाही स्वत:चं नाव नीट लिहू शकत नाही. परिवर्तनाची गोष्टच दूर राहिली.
२०२० साली भारत महासत्ता होणार आहे. २०२० साली आज चौथीत शिकणारा पोरगा २५ वर्षांचा तरुण असेल. गडचिरोलीतला पोरगा तेंदूपत्ता गोळा करत असेल, मेळघाटातला तरुण पाखरं मारत असेल, कोकणातला तरुण मासे मारत असेल, मराठवाड्यातला तरुण रोजगार हमीवर, पश्चिम महाराष्ट्रातला तरुण दुधाची बरणी घेऊन आणि विदर्भातला तरुण शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असेल...
इतकी भयावह स्थिती आहे. माणसांचा कोणताच स्तर बदलत नाही. त्यामुळे शिक्षणावरची श्रद्धा डळमळीत होते आहे. ‘शिक्षण नोकरीसाठी नाही’ हे सांगितलं तरी भाकरीचा प्रश्न सुटत नसेल तर शिकायचं कशाला? या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही.
भ टक्या विमुक्तांच्या आश्रमशाळेत पाच जागा राखून ठेवल्या आणि भटक्यांच्या वस्तीत पोरं आश्रमशाळेत घाला असं म्हणायला गेलो. एक कैकाडी म्हणाला, ‘‘तुमच्यासारख्याच एका शहाण्याचं ऐकून पोरगं शाळेत टाकलं आणि आम्ही टोपल्या विकत गावोगावी फिरलो. आज ते पोरगं बारावी नापास झालं. ते आता तुमच्याकडूनही हुकलं आणि टोपल्याही विणू शकत नाही’’ माणसांची शिक्षणातून आर्थिक परिवर्तनाची भूक आपण कशी पुरवणार?
शिक्षणातून रोजगार नाही. सामाजिक प्रतिष्ठाही पूर्वीसारखी मिळत नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही. त्यामुळं मुलं शाळेत टिकत नाहीत. खेड्यापाड्यापर्यंत फक्त शिक्षण नेल्याचं फसवं समाधान आम्हाला मिळालं. काहीच बदललं नाही.
जीवनसंघर्ष तोच राहिला -
फूल कहते है चमन बदला है
पंछी कहता है आकाश बदला है
लेकीन मुर्दे वही है
सिर्फ कफन बदला है...
परिवर्तन झालं ते फक्त इतकंच.

पालकांसाठी लेख - (हेरंब कुलकर्णी )

पालकांसाठी लेख (हेरंब कुलकर्णी )
टिव्ही आणि सोशल मिडिया यांचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर आज सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत लेख प्रसिद्ध झाला आहे.......................
हजार तासांची घरातली शाळा..... ___________________________
शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ?ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!
१००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे काळजीने बघत नाहीत.
याउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात.
तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ?या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.
टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.
आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते.ओरडणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?
ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये
संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.
तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणार्याम रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते
यावर उपाय काय? आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव,खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे,खेळणे .त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.
राजीव दीक्षित म्हणायचे की राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही

टीव्ही बंद अभियान
जळगाव येथील कुतूहल फाउंडेशन चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध माध्यमातून या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही,मोबाईल,इंटरनेट, व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार विद्यार्थी, पालक यांना वितरीत करतात टीव्ही,मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही ,मोबाईल,इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.
महेश गोरडे फोन नंबर ९४२०७८७१७३
२० सोनेरी वर्ष
महेश गोरडे सांगतात की रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.
भारतातील मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).
वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.
रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.
‘आहट’ या हॉरर मालिकेचे ४८ टक्के प्रेक्षक हे चार ते १४ वयोगटातील मुलं आहेत.
स्टार वनवरील ‘हॉरर नाईट्स’ या मालिकेचे हिंदी भाषिक राज्यांतील ४८ टक्के प्रेक्षक १४ वर्षांखालील मुलं आहेत, तर २५ टक्के प्रेक्षक हे नऊ वर्षांखालील मुलं आहेत.
( ‘व्हॉट्स ऑन इंडिया’ने मे २०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षण)
(महेश गोरडे 9420787173)
----------------------------------------- लेखन /// हेरंब कुलकर्णी फोन ९२७०९४७९७१
ईमेल herambkulkarni1971@gmail.com 

हजार तासांची घरातली शाळा...(हेरंब कुलकर्णी)

हजार तासांची घरातली शाळा...(हेरंब कुलकर्णी)

हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com
रविवार, 4 डिसेंबर 2016
टीव्हीनं आणि सोशल मीडियानं मुलांचं शारीरिक नुकसान जेवढं होतं, त्यापेक्षाही कितीतरी नुकसान हे मानसिक स्तरावरचं असतं. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्यानं मुलांनाही मग हिंसक वृत्ती आवडू लागते. भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. 
शिक्षण कायद्यानं प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास, तर माध्यमिक शाळा एक हजार तास चालते. इतका कमी काळ चालणाऱ्या शाळेचं आपण समाज, शासन, पालक म्हणून किती बारकाईनं मूल्यमापन करतो? आणि त्यांच्याकडून आपल्या अपेक्षाही कितीतरी असतात. ते करायलाही हरकत नाही; पण हजार तासांची दुसरी एक शाळा आपल्या घरातच भरत असते...पण त्या शाळेकडं पालक लक्ष देत नाहीत किंवा ‘दर्जा सुधारा’ म्हणून त्या शाळेशी भांडतही नाहीत. त्या शाळेकडून आपण अपेक्षाही करत नाही. कोणती आहे ती शाळा? ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मीडियाची...!
घरातली मुलं टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात एक हजार तासांपेक्षाही जास्त वेळ बघतात. म्हणजे शाळेत ते जेवढा वेळ असतात, तेवढाच वेळ ते या शाळेतही असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडं पालक, समाज, शासन काळजीनं पाहत नाहीत. याउलट टीव्हीच्या विरोधात बोलणाऱ्यांना ‘फॅडिस्ट’ समजलं जातं. आम्ही आमच्या घरातला टीव्ही गेली तीन वर्षं बंद ठेवला आहे. त्याचा लाभ म्हणजे मुलांचं वाचन वाढलं, चित्र काढणं वाढलं, गंभीरपणे एखादा विषय समजून घेणं वाढलं. माझं स्वतःचं लेखन टीव्ही नसल्यानं वाढलं. ज्या विषयात आवड आहे ती माहिती मुलगा नेटवर बघतो.
बातम्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्यानं काही फरक पडत नाही. हे सगळं सकारात्मक परिमाण मी अनुभवत आहे; पण जेव्हा आमच्याकडं कुणी येतं आणि घरात टीव्ही नाही हे त्याला किंवा तिला कळतं, तेव्हा ते आमच्याकडं जणू काही दयेनंच पाहत असतात.
‘जगाच्या ज्ञानापासून मुलांना दूर ठेवू नका,’ असा उपदेशही करतात. तेव्हा या टीव्ही आणि सोशल मीडियाच्या अनौपचारिक शाळा खरंच जगाचं परिपूर्ण ज्ञान देतात का? पारंपरिक शाळा जशा विकासाच्या संधी मुलांना देतात, तशा संधी या शाळा देतात का? या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.
टीव्हीनं आणि सोशल मीडियानं मुलांचं शारीरिक नुकसान जेवढं होतं, त्यापेक्षाही कितीतरी नुकसान हे मानसिक स्तरावरचं असतं. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्यानं मुलांना मग हिंसक वृत्तीही आवडू लागते.  
भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकट्यानं किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही पाहायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात. म्युझिक व्हिडिओज्‌, थरारपट इत्यादी पाहायला आवडतं. आपली मुलं टीव्ही आणि सोशल मीडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची मोडतोड होते. हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात. अपघात बघून ‘थंडपणे पुढं जाणारी पिढी’ घडते. ओरडणं, शिवीगाळ, प्रसंगी मारहाण हे स्वभावविशेष होतात. मध्यंतरी नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्‍यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलकं उदाहरण ठरावं. प्रेमप्रकरणं अगदी पाचवीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या तीन वर्षात मुंबईत १५ वर्षांच्या आतल्या मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नांत १४४ टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे, तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशिलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही? ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळं तिथं मुलं जास्त टीव्ही बघतात. मोबाईल बघतात. या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतल्या जगातली घरं, तिथली सुंदर, नटलेली आई, गाडी आपल्या वाट्याला का नाही, अशा विचारांतून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये निर्माण होतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, टीव्ही जास्त पाहणाऱ्या मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांब उडीदेखील मारू शकत नाहीत! नी अनेक तास टीव्ही पाहिल्यानं त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात, त्यांच्या शरीरातल्या मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळं भविष्यात त्यांच्या प्रकृतीला गंभीर धोका उद्भवू शकतो. तासन्‌तास टीव्ही पाहिल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्‍यता असते. पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडं रक्त वाहून नेणाऱ्या रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होतो...असे काही निष्कर्ष माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून पुढं आले आहेत.
यावर उपाय काय? आम्ही आमच्या घरचा टीव्ही जसा बंद ठेवला आहे हा एक उपाय आणि ते शक्‍य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज एक तास टीव्ही पाहण्याचं वेळापत्रक ठरवावं. कार्यक्रम एकत्र पाहावेत. 
कार्यक्रम पाहिल्यावर मुलांशी चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव, खोटी जीवनमूल्यं यावर चर्चा करून त्यांना वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर पालकांनीही स्वतः सोशल मीडिया कमीत कमी वापरून मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणं, खेळणं, त्यांच्याबरोबर चित्र काढणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं असं करायला हवं. मुलं पालकांचं अनुकरण करतात असतात. तेव्हा तुमच्या हातात पुस्तकं आली आणि घरात लहान मुलांसाठीची पुस्तकं असली तरच मुलं ती वाचतील. पालक टीव्हीसमोर आणि व्हॉट्‌सॲपवर असतील तर मुलंही साहजिकच तेच करणार...तेव्हा टीव्ही, सोशल मीडियाला समर्थ पर्याय पालकांनी दिले, तरच मुलं ‘घरातली हजार तासांच्या शाळे’पासून वाचू शकतील.
टीव्ही बंद अभियान
जळगाव इथल्या ‘कुतूहल फाउंडेशन’चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरूकता करण्याचं काम गेल्या १० वर्षांपासून करत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाख माहितीपत्रकांचं वाटप त्यांनी केलं. ४० हजारांहून अधिक मुलांचं सामूहिक समुपदेशन करण्यात आलं आहे. शेकडो व्याख्यानं, कार्यशाळा, चर्चासत्रं, विविध स्पर्धा, पालकसभा, शिक्षकसभा अशा विविध माध्यमांतून या विषयावर नियमित प्रबोधन गोरडे करत असतात. ‘टीव्ही बंद’ नव्हे, तर ‘टीव्ही शिस्त’ अशा पद्धतीनं ते हे अभियान राबवतात. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्‌सॲप, फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा, असं सांगणारं ‘या टीव्हीचं काय करायचं?’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. त्याला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी टीव्हीला केवळ विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू केले. त्यात विज्ञानप्रकल्प, बौद्धिक खेळणी, सीडी, पुस्तकं, सहली यांसह उपक्रमकेंद्र ते चालवतात. 
२० सोनेरी वर्षं
महेश गोरडे सांगतात ः ‘‘रोज सरासरी ४ तास टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकचा वापर याप्रमाणे एका वर्षाला एक हजार ४६० तास, तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७ हजार ६०० तास टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकसाठी खर्च होतो. १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यातली २० सोनेरी वर्षं टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकवर अक्षरशः वाया घालवतो. 
देशात मुलं (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटं (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात.
शनिवारी-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटं (सुमारे साडेतीन तास).
वय वर्षं चार ते नऊ या वयोगटातल्या मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटं आहे.
संपूर्ण देशभरातली तीन कोटींहून अधिक मुलं (चार ते १४ वर्षं) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात. रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिंदास चॅनेलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुलं आहेत.
(‘व्हॉट्‌स ऑन इंडिया’चं सर्वेक्षण)
Web Title: heramb kulkarni article

Link - http://www.esakal.com/saptarang/heramb-kulkarni-article-18866

हेरंब कुलकर्णी यांच्याशी बातचीत

हेरंब कुलकर्णी यांच्याशी बातचीत

Primary tabs

विशाखा पाटील's picture
विशाखा पाटील in दिवाळी अंक
3 Nov 2015 - 6:51 pm
.
.
शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने केलेली प्रगती यावर उलटसुलट चर्चा होत असते. शिक्षणाचा प्रसार झाला, गावागावापर्यंत शाळा उघडल्या गेल्या हे खरे असले, तरी प्रश्न संपलेले नाहीत. एकीकडे चकचकीत इंटरनॅशनल स्कूल, तर दुसरीकडे दुर्गम भागातल्या शाळांची दुरवस्था, हे आपल्या राज्याचे चित्र.
हेरंब कुलकर्णी हे नाव शिक्षणक्षेत्राशी आज जोडले गेलेय. महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात, दुर्गम भागात असलेल्या शाळांची पाहणी करून शिक्षण क्षेत्रातल्या समस्या ते सातत्याने आपल्यापुढे आणतात. त्यांची पुस्तके आणि वृत्तपत्रांमधले लेख म्हणजे या समस्यांचा लेखाजोखाच.   
काही वर्षांपूर्वी त्यांच्या ‘शाळा आहे – शिक्षण नाही!’ या पुस्तकाने एकच खळबळ माजवली. शाळेची इमारत आहे, सरकारी तिजोरीतून अनुदान जातेय, पण शिक्षण नाही, हे वास्तव दाखवणारे ते पुस्तक. या पुस्तकाचा आता इंग्लिशमधून अनुवादही येतोय. त्यानंतर आले ‘परीक्षेला पर्याय काय?’. परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वर्षाला ४००० आहे, यावर चर्चा घडवणारे हे पुस्तक. या पुस्तकाला उत्कृष्ट संपादनाचा राज्य पुरस्कार मिळाला. सहाव्या वेतन आयोगावर जळजळीत भाष्य करणारे त्यांचे पुस्तक ‘सहावा वेतन आयोग : काय खरे काय खोटे?’ हे बरेच गाजले. शाळाबाह्य मुलांचा प्रश्न सध्या चर्चेला आला आहे. ‘आमच्या शिक्षणाचे काय?’ हे याच विषयावरचे वास्तव दाखवणारे पुस्तक. त्यांच्या इतर पुस्तकांची आणि कामाची ओळख मुलाखतीतून होईलच.
शिक्षकाची नोकरी सांभाळून इतके लिहिणारे, कविता करणारे, आणि अनेक प्रश्नांवर तळमळीने काम करण्यासाठी पुढे धावणारे हेरंब कुलकर्णी. त्यांच्याशी विशाखा पाटील यांनी केलेली ही बातचीत.  
‘शाळा आहे - शिक्षण नाही!’ या पुस्तकाने तुमची ओळख झाली. त्याविषयी सांगाल?
हेरंब कुलकर्णी - हे पुस्तक शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी आहे. शासन आज ३५००० कोटी रुपये शिक्षणावर खर्च करते आणि मुलांना किमान क्षमताही प्राप्त होत नाहीत, हे वास्तव मला मांडायचे होते. तेव्हा एका तपासणीच्या निमित्ताने गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदुरबार, यवतमाळ, मेळघाट या आदिवासी भागातील २०० शाळांना मी भेटी दिल्या. त्या वेळी मुलांना किमान वाचन लेखन येते का? याची मी चाचपणी केली. त्यात चौथीच्या मुलांना मी ‘चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही रेल्वेने प्रवास करतो’ हे वाक्य लिहायला दिले आणि गणितात ५११ वजा ४९९ ही वजाबाकी दिली. पण आश्चर्य वाटेल की २०० शाळांमध्ये हे वाक्य व गणित बरोबर सोडवणारा एकही वर्ग नव्हता... तीन शिक्षकांचेही हे गणित चुकले. मला ५२ गावे अशी सापडली की ज्यात गावात ५० वर्षांपासून शाळा आहे पण सातवी शिकलेला माणूस नाही. दर्जेदार शिक्षण नाही हेही गरिबीचे महत्त्वाचे कारण लक्षात आले. याच पाहणीत मी आश्रमशाळाही बघितल्या. त्यातली उपाशी मुले आणि भीषण वास्तव मी मांडले. अमर्त्य सेन यांचे प्रसिद्ध वाक्य मला उमगले, की गरिबांसाठीच्या सुविधा शेवटी गरीब सुविधा बनतात. वाईट शिक्षणातून गळती, गळतीतून दारिद्र्य आणि दरिद्री भागात पुन्हा दर्जाहीन शिक्षणसुविधा हे वास्तव कळले. एकीकडे २०२०ला महासत्ता होण्याची भाषा करताना महाराष्ट्राचे शिक्षण वास्तव पुढे आले. एकीकडे आमची मुले सिलिकॉन व्हॅलीत, तर त्यांची मुले मेळघाट व्हॅलीत पाखरे मारताहेत, हा शिक्षणातला भारत - इंडिया लक्षात आला.
या पुस्तकावर प्रतिक्रिया काय होत्या? या पुस्तकाच्या वेळी वाद झाल्याचे आठवतेय...  
हेरंब कुलकर्णी - हे पुस्तक आल्यावर एका शिक्षक संघटनेने ते जाळले. अनेक शिक्षकांनी फोन करून तीव्र भावना, तर काहींनी अपशब्द वापरले. अनेक ठिकाणी त्यावर तीव्र संताप व्यक्त झाला. पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. काही शिक्षकांनी हे वास्तव तुम्ही मांडले हे चांगले केले असेही सांगितले. आदिवासी विभागाने आश्रमशाळा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. विधानसभेत त्यावर चर्चा झाली, त्याच वेळी माध्यमांना व शहरी वाचकांना हे भीषण वास्तव समजले. या पुस्तकाचा इंग्लिश अनुवाद झाला. शासनाने हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणात चर्चेसाठी लावले. माझ्या या पहिल्याच पुस्तकाच्या प्रतिसादाने मी गोंधळून गेलो.
२००७मध्ये ते पुस्तक आले. मधल्या काळात शिक्षणाच्या गुणवत्तेत काही फरक पडलाय, असे वाटते?
हेरंब कुलकर्णी - फरक थोडासा जाणवतो. शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय. प्रयोगशील शिक्षकांची संख्या वाढते आहे, परंतु असर किंवा शासन दर वर्षी पाहणी करते त्यात अजूनही फारसा फरक पडला नाही, असे दिसतेय. मागच्या वर्षी ५० टक्के मुलांना लेखन वाचन येत नाही, तर ७६ टक्के मुलांना गुणाकार येत नाही असा निष्कर्ष निघाला. १० वर्षे सर्व शिक्षा अभियान आणि ४ वर्षे शिक्षण कायदा राबवूनही ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा वास्तव बदलले आहे असे वाटत नाही. मात्र गळतीचा दर नक्कीच कमी झाला आहे. सरकारी शिक्षणाच्या या नाराजीतून खाजगी शाळेत मुले घालण्याचे प्रमाण खूप वाढते आहे. अगदी झोपडपट्टीतले पालकसुद्धा आपली मुले खाजगी शाळेत घालत आहेत. आज भारतात उच्च शिक्षण पोहोचण्याचे प्रमाण १९ टक्के आहे, याचे कारण प्राथमिक शिक्षण दर्जेदार नसल्याने वाचन लेखन कौशल्य प्राप्त न झालेली मुले शाळा सोडून देतात. गरिबी हे शाळा सोडण्याचे दुय्यम कारण आहे; खरे कारण वाचन लेखन न आल्याने मुले शाळा सोडतात.
तुम्ही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार, बालकामगार अशा २० जिल्ह्यांत फिरून शालाबाह्य मुलांचा अभ्यास केला.. आणि दुसरीकडे शासन शाळा बंद करते अशा बातम्या आहेत. शालाबाह्य मुलांची काय स्थिती आहे ?
हेरंब कुलकर्णी - देशात आजही ३ कोटी, तर महाराष्ट्रात ८ लाख मुले शालाबाह्य आहेत असा अंदाज आहे. ही मुले बालकामगार, रेल्वे प्लॅटफॉर्म, रस्त्यावर राहणारी, वेश्यांची मुले त्याचबरोबर पोटासाठी स्थलांतर करणारी ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर, दगड खाणमजूर, बांधकाम मजूर यांची आहेत. भारतात आज राज्याराज्यात स्थलांतर करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. मुंबईत परभाषिक मजुरांसोबत हजारो मुले येतात. एकट्या महाराष्ट्रात अशी एक कोटीपेक्षा जास्त परभाषिक कुटुंबे आहेत. देशात ११ कोटी भटके विमुक्त आहेत. त्यांची लाखो मुले शाळेबाहेर आहेत. आदिवासी भागात गळती खूप मोठी आहे. पण या शाळेबाहेरच्या मुलांची चर्चा होत नाही... हे वास्तव पुढे आणण्यासाठी मी २० जिल्ह्यांत फिरून या मुलांचे वास्तव अभ्यासले. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राज्यात आज १३००० शाळा या १५ पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. तेव्हा शासन त्या बंद करून ती मुले जवळच्या शाळेत टाकते आहे. त्याला अनेक पैलू आहेत. काही शाळा एकमेकाजवळ अंतराचा निकष न पाळता सुरू केल्या आहेत. तेव्हा प्रत्येक शाळेचा नेमका प्रश्न तपासून चर्चा व्हावी. पण शिक्षण हक्क कायदा येऊनही ३ कोटी मुले शाळेबाहेर असणे हे डिजिटल इंडियाची भाषा बोलणार्‍या सरकारला भूषणावह नाही.
तुमचे ‘बखर शिक्षणाची ‘हे पुस्तक (राजहंस प्रकाशन) येते आहे. यात तुम्ही शिक्षक पालकांनी वाचावयाच्या पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. ही पुस्तके कशी निवडली?
हेरंब कुलकर्णी - शिक्षक वाचत नाहीत हे वाक्य इतक्या वेळा लिहिले जाते की ते लिहिलेले वाक्यही शिक्षक वाचत नाहीत! शिक्षकांना वाचते करण्यासाठी ललित किंवा वैचारिक पुस्तके ते एकदम वाचणार नाहीत. तेव्हा त्यांच्या शिक्षकी पेशातीलच जास्तीत जास्त पुस्तके त्यांना सुचवली पाहिजेत त्यातून एकतर ते वाचक होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते शिक्षक म्हणूनही समृद्ध होतील. त्यांना प्रयोगशील शिक्षकांची पुस्तके वाचून प्रेरणा मिळेल. म्हणून मग मी शोध घेतला, तेव्हा मराठीत ८०पेक्षा जास्त पुस्तके फक्त शिक्षणविषयक आहेत. त्यात जगभरातून अनेक पुस्तके अनुवादित झाली आहेत. ‘तोत्तोचान’, ‘समरहिल’, ‘सर विथ लव्ह’ यासारखे मास्टरपीस मराठीत आले आहेत. तेव्हा या पुस्तकांनी वाचनाची सुरुवात व्हावी असे वाटले. मी सुरुवातीला अशा पुस्तकांच्या याद्या केल्या, पण लक्षात आले की केवळ नावे सांगून पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण होत नाही. तेव्हा निवडक ६० पुस्तकांचा परिचय करून देणारे पुस्तक असे पुस्तकावरचे पुस्तक लिहिले.
पालकांसाठी हे महत्त्वाचे आहे की पालकांना जर खरे शिक्षण कशाला म्हणतात हे कळले, तर पालक मुलांकडून व शाळांकडून चुकीच्या अपेक्षा करणार नाहीत. या पुस्तकाच्या निमित्ताने मराठीत शिक्षणविषयक साहित्य अशी एक नवी चर्चा सुरू होऊन या प्रकारचे साहित्य अधिक वाढेल असे वाटते.
भारतातल्या कृष्णमूर्तीच्या सर्व शाळा तुम्ही बघितल्या आणि त्यावर तुमचे ‘जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स’ हे पुस्तक ही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.. या शाळांचे तुम्हाला काय वेगळेपण वाटले?
हेरंब कुलकर्णी - ‘शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच अशा जागा आहेत की जिथे कुणीच स्वत: होऊन जात नाही, दाखल करावे लागते’ असे भेदक वाक्य बोलणारे कृष्णमूर्ती हे शिक्षणचिंतक म्हणून जगाला परिचित आहेत. ते केवळ तत्त्वज्ञान मांडून थांबले नाहीत, तर त्यांनी पाच शाळा काढल्या. या शाळेत विविध प्रयोग केले. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या शाळा, संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा उपक्रम असलेल्या शाळा, शिक्षा आणि बक्षिसे नसलेल्या शाळा, परीक्षेऐवजी मूल्यमापन पद्धती विकसित केलेल्या शाळा मी बघितल्या. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथे जाऊन या शाळेत मी राहिलो आणि शाळा समजून घेतल्या. कृष्णमूर्तींची पुस्तके मी कॉलेजला असताना घाबरून रद्दीत टाकली होती, पण नंतर त्यांची मला ८० पुस्तके विकत घ्यावी लागली. डी.एड., बी.एड.च्या अभ्यासक्रमात कृष्णमूर्ती परिचय कुठेच नाहीत, त्यामुळे शिक्षकांना कृष्णमूर्ती माहीत होत नाहीत. या पुस्तकामुळे शिक्षक व पालकांना कृष्णमूर्ती आणि त्यांच्या शाळा माहीत होतील.
अलीकडेच तुमच्या बालवाचनालय चळवळीविषयी वाचले. तुम्ही स्वत:च्या घरापासून या उपक्रमाची सुरुवात केलीये. यामागची भूमिका काय आहे ?
हेरंब कुलकर्णी - महाराष्ट्रात मागच्या महिन्यात १५ ऑक्टोबरला ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा झाला. यानिमित्ताने केवळ वाचन संस्कृतीवर अरण्यरुदन करण्यापेक्षा आपण स्वत: सुरुवात करावी असे वाटले. बुलढाणा येथील माझे मित्र व ग्रंथपाल म्हणून विविध उपक्रम राबविणारे नरेंद्र लांजेवार(९४२२१८०४५१) यांनी बुलढाण्यात गल्लोगल्ली अशी ५० बालवाचनालये सुरू केली आहेत. त्यातून लहान मुलांची एक वाचन चळवळ तिथे उभी राहिली आहे. त्यांच्यापासुन प्रेरणा घेतली. आमच्या घराच्या परिसरात कष्टकरी कुटुंबातील मुले राहतात. त्या मुलांवर हा वाचन संस्कार महत्त्वाचा आहे. या ५० मुलांसाठी आम्ही आमच्या घरात मोफत ग्रंथालय सुरू केले. या मुलांसाठी आम्ही लहान मुलांची २५० पुस्तके आणली आहेत. सर्वात छोट्या वाचकाच्या हस्ते या बालवाचनालयाचे उद्घाटन केले. आपल्या घरातली पुस्तके मुलांना आज खुली करून देण्याची ही चळवळ वाढायला हवी, असे वाटते.
.

‘शिक्षण-तोड’ रोखण्यासाठी..- हेरंब कुलकर्णी

‘शिक्षण-तोड’ रोखण्यासाठी..

शासन त्याच गावातील शाळेत हंगामी वसतिगृहे सुरू करते; पण त्यातील निकृष्ट सुविधांमुळे पालक मुले ठेवत नाहीत.

ऊसतोड तसेच वीटभट्टी कामगार म्हणून स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील सुमारे तीन ते पाच लाख मुलांचे शिक्षणदरवर्षी खंडित होतेशासनाचे विद्यमान विभाग आणि कारखाने वा वीटभट्टी मालक यांनी पुरेसे योगदान दिल्यासही आबाळ आपण रोखू शकतोकशी, ते काही उदाहरणांनिशी सांगणारा लेख..
साखर कारखान्यांचे बॉयलर आता धडधडू लागले आहेत. ऊसतोड कामगार बिऱ्हाड पाठीवर घेऊन पोहोचत आहेत. रोजगारासाठी स्थलांतर हा महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न आणि तितकाच दुर्लक्षित प्रश्न आहे. जिरायत भागात एकच पीक निघते. ते काढल्यावर दिवाळीनंतर किमान २५ लाखांहून अधिक कामगार दरवर्षी हंगामी स्थलांतर करतात. त्यात १२ लाख ऊसतोड व तितकीच संख्या प्रत्येकी वीटभट्टी मजूर व आदिवासी भागांतून स्थलांतर होते. त्यात पुन्हा बांधकाम मजूर व दगडखाण मजूर असे वर्षभरासाठीचे स्थलांतर यात धरलेले नाही. मजुरीसाठी आदिवासींचे स्थलांतर मेळघाट, नंदुरबार व सर्वच आदिवासी जिल्ह्य़ांतून होते. शासन त्याच गावातील शाळेत हंगामी वसतिगृहे सुरू करते; पण त्यातील निकृष्ट सुविधांमुळे पालक मुले ठेवत नाहीत. ज्या गावातून हे पालक स्थलांतर करतात, त्याच गावात मुलांना थांबविण्याचे शाळांकडून प्रयत्न होत नाहीत. त्या गावात ६ महिने हंगामी वसतिगृह सुरू करण्याची शाळांची मानसिकता नसते. पालक मुलींना शाळेत असुरक्षित जागेत चालणाऱ्या वसतिगृहात ठेवायला तयार नसतात. हे पालक ज्या ऊस कारखान्यावर जातात तेथे जवळ शाळेत मुलांना दाखल करणे होत नाही. पालक रात्री कधी तरी कामाला जातात तेव्हा ही मुले कुठे सोडून जायची, हा प्रश्न असतो. ऊस तोडत वेगवेगळ्या गावांत फिरावे लागते तेव्हा एकच शाळा निवडता येत नाही. सहा महिने गावाकडे एक शाळा व नंतर दुसरी, यात मुलांचे शिक्षण होत नाही. परिणामी बालमजुरी वाढते.
बांधकाम व्यवसाय सध्या खूप वाढल्याने वीटभट्टय़ा खूप वाढल्या आहेत. एका तालुक्यात ५० पेक्षा जास्त वीटभट्टय़ा असतात. गावापासून वीटभट्टी दूर असल्याने तेथून या मजुरांच्या मुलांना शाळेत येणे कठीण असते. वीटभट्टय़ांवरच्या आनुषंगिक कामांसाठी मग या मुलांचा वापर होतो. भट्टीवर येणारे बहुतेक मजूर हे निरक्षर आदिवासी (भिल्ल वा कातकरी) असतात. भट्टीवर मुलांची संख्या अनेकदा १० पेक्षा कमी असल्याने प्रत्येक भट्टीवर शाळा चालविणेही कठीण होते.
उपाययोजना
ऊसतोड किंवा वीटभट्टी या दोन्ही प्रकारांत मुले ज्या गावातून स्थलांतर होतात त्याच गावात थांबवायला हवीत. कारखान्यावर व वीटभट्टीवर ही मुले कामाला लावली जातात व शिक्षणाची सोय नीट होत नाही. तेव्हा ज्या गावातून येतात त्याच परिसरात या मुलांच्या शिक्षणाची सोय करायला हवी. गावपातळीवरच्या राजकारणातून ही वसतिगृहे नीट चालत नाहीत. एका वर्षी २५ कोटी खर्च होतो. इतकी मोठी रक्कम वापरून ज्या परिसरातून स्थलांतर होते त्या परिसरातील बाजारच्या गावात एक वसतिगृह सुरू करण्यात यावे. वसतिगृहाची इमारत दोन मजली असावी. वरील मजल्यावर राहण्याची सोय असावी व खाली शाळा असावी. परिसरातील स्थलांतर झालेल्या पालकांची मुले इथे दाखल करण्यात यावीत व ज्या शाळेतून जास्त स्थलांतर झाले आहे तेथील शिक्षकांना या वसतिगृहातल्या शाळेत प्रतिनियुक्ती देण्यात यावी. इमारत बांधणे व तेथे कर्मचारी नियुक्त करणे याची जबाबदारी साखर संघाने घ्यावी व शिक्षण विभागाने शिक्षणाची जबाबदारी घ्यावी. या वसतिगृहावर नियंत्रणासाठी त्या गावातील जागरूक नागरिक, अधिकारी व ज्या गावांतील मुले तिथे आहेत त्या गावांच्या सरपंचांसह समिती बनवावी. अशा प्रकारे प्रत्यक्ष वसतिगृहाचा प्रयोग सध्या बीड जिल्ह्य़ात दीपक नागरगोजे व त्यांचे सहकारी करीत आहेत. १३ वसतिगृहांत ३००० विद्यार्थी आहेत. या प्रयोगाचा अभ्यास शासनाने एक मॉडेल म्हणून करावा. ‘इमारत शासनाने बांधावी, स्वयंसेवी संस्थांनी चालवावी व समाजाने त्यावर नियंत्रण ठेवावे,’ असेही मॉडेल विचारात घ्यावे. कायमस्वरूपी वसतिगृह हाच मला या समस्येवर पर्याय दिसतो. महाराष्ट्रातून स्थलांतर कोठून होते हे आता नक्की झाले आहे. अशा तालुक्यांत अशी वसतिगृहे उभारणे सहज शक्य आहे. मुले मूळ गावी थांबविणे हाच योग्य मार्ग आहे.
 कारखान्यांची  वीटभट्टीची जबाबदारी 
एवढे प्रयत्न करूनसुद्धा जर ऊसतोड कामगार येताना कारखानास्थळावर मुले घेऊन आलेच तर कारखान्याने शिक्षण विभागाला सांगून कामगारांचे सर्वेक्षण करावे. विमा योजनेसाठी कारखाना प्रत्येक मजुरांचा सव्‍‌र्हे करतोच, त्यात मुलांची माहिती घेता येऊ शकेल. कारखान्याने कारखान्यावर एक निवासी वसतिगृह इमारत बांधावी. जवळ शाळा नसेल तर जवळ शाळेची इमारत बांधावी. शाळा असेल तर खोल्या वाढवाव्यात. वसतिगृहाची गरज यासाठी आहे की कारखानास्थळावर जितके मजूर राहतात तितकेच मजूर हे आजूबाजूच्या गावांत ऊसतोडीला पाठविलेले असतात व ते सतत राहण्याचे ठिकाण बदलत राहतात. शिक्षणाविना राहणारी ती मुले या वसतिगृहात आणता येतील, कारखानास्थळावरची मुले प्रचंड थंडीतही सुरक्षित ठिकाणी राहतील. वसतिगृहात राहिल्याने या मुलांना पालक ऊस तोडायला नेणे, वाढे बांधायला लावणे अशी कामे सांगणार नाहीत व ते शिक्षणाच्या वातावरणात राहतील. रात्री लवकर पालक ऊस तोडायला जातात तेव्हा मुले सोडून जाणे जोखमीचे असते, त्यामुळे सोबत फडावर नेतात; पण वसतिगृह झाले तर तो प्रश्न सुटेल. माध्यमिक शाळेतील मुले असतील व ती शाळा जर लांब असेल तर कारखान्याने त्यांना एसटी पास काढून द्यावेत. सर्वच मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे. वसतिगृह धोरणावर अंमल होईपर्यंत जर मुले पालकांसोबत राहणार असतील तर कारखान्याने स्लिप बॉय किंवा स्वतंत्र कर्मचारी नेमून रोज ही सर्व मुले गोळा करायला मदत करावी व शाळेत नेऊन पोहोचवावी. मुकादम हा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याशी करार करताना ‘माझ्या टोळीत मुले सोबत येणार नाहीत’ असे लिहून घेतले तर तो पालकांना मुलांना गावाकडेच शाळेत किंवा वसतिगृहात ठेवण्याचा प्रयत्न करील आणि जर तरीही मुले सोबत आलीच तर ती मुले जवळच्या शाळेत दाखल करण्याची व रोज पाठविण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकावी. कारखानास्थळावर आलेल्या मजुरांसाठी सांगली जिल्ह्य़ातील किसनवीर साखर कारखाना वाळवा, श्रीदत्त कारखाना शिरोळ, तर नगर जिल्ह्य़ातील अकोल्याचा अगस्ती सहकारी साखर कारखाना यांच्या यशस्वी प्रयत्नांचा अभ्यास करण्यात यावा. अगस्ती कारखाना दरवर्षी एक स्वतंत्र कर्मचारी रोज मुले गोळा करायला नेमतो व हायस्कूलला जाणाऱ्या मुलांना एसटीचा पास काढून देतो. हे सर्व साखर कारखान्यांना सहज शक्य आहे.
ऊसतोड कामगारांसाठी ते जेथून स्थलांतर करतात तेथेच कायमस्वरूपी वसतिगृहे असावीत, त्या वसतिगृहांत हे विद्यार्थी सामावून घ्यावेत. वीटभट्टीवर जाणारे बहुतेक मजूर हे आदिवासी असल्याने आदिवासी आश्रमशाळेत या मुलांना दाखल करण्याबाबत पालकांचे प्रबोधन करावे. आश्रमशाळांना केवळ सहा महिन्यांसाठीही प्रवेश देण्याची मुभा देण्याची गरज आहे. वीटभट्टी मालकांनाही ज्या मजुरांशी करार करणार आहात त्यांची मुले सोबत येणार नाहीत व आश्रमशाळेत दाखल होतील, असे प्रयत्न करण्याचे कायदेशीर बंधन घालण्याची गरज आहे. वीटभट्टीवर ज्या भिल्ल जमातीतून कामगार येतात त्या जमातीच्या नेत्यांना शासनाने शिक्षणदूत म्हणून नेमून निवासी शाळेत मुले दाखल करण्याच्या प्रबोधनाची जबाबदारी द्यावी. आदिवासी विभागाने यात पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रात काही विशिष्ट ठिकाणी या जमातीच्या दरवर्षी यात्रा भरतात. त्या ठिकाणी त्या जिल्ह्य़ाने पथनाटय़, पत्रके वाटणे अशा प्रकारे प्रबोधन करावे. प्रत्यक्ष तरीही जर हे मजूर आपल्या मुलांना सोबत घेऊन आलेच तर जवळच्या आश्रमशाळेत भट्टीमालकाने दाखल करावेत. जर जवळ आदिवासी विभागाची आश्रमशाळा नसेल तर अन्य विभागाच्या आश्रमशाळा वा बालगृहात ही मुले ठेवली जातील, असे कायदेशीर बदल करण्याची गरज आहे. जर अशी व्यवस्था होत नसेल तर जवळच्या सरकारी किंवा खासगी शाळेने सर्वेक्षण करून ही मुले दाखल करावीत. हे सर्वेक्षण, वीटभट्टी सुरू झाल्यावर लगेच करावे. या मुलांना रोज शाळेत नेण्याची व्यवस्था करणे हे मालकाचे कर्तव्य असेल असे महसूल विभागाने त्याला बजावण्याची गरज आहे. वीटभट्टी मालकाला परवानगीही महसूल विभागाने देण्याची तरतूद आहे. तेव्हा परवानगी देताना वीटभट्टी मालकाकडून माझ्या कामगारांची मुले सोबत नसतील, त्यांना गावाकडेच मी आश्रमशाळेत दाखल करण्याचा प्रयत्न करीन व जर अपवाद म्हणून आलेच तर आपल्या तालुक्यातील आश्रमशाळेत दाखल करेन किंवा जवळच्या शाळेत पाठवेन असे प्रतिज्ञापत्र घेण्याची गरज आहे. वीटभट्टीवर आलेल्या मुलांचा वावर भट्टीवर बालमजूर म्हणून होतो तेव्हा या कामगार विभागाने डिसेंबर ते एप्रिल या काळात वीटभट्टी भेटी कराव्यात.
बांधकाम मजूर व दगडखाण मजूर यांचे स्थलांतर हे एक वर्षांचे असते. त्यांच्यात परभाषिक मुलांची संख्या जास्त आहे. दगडखाणीवर स्वतंत्र शाळा सुरू करायला हव्यात, परंतु त्यासाठी नेमलेल्या समितीच्या बैठकाही होत नाहीत, गांभीर्यही नाही अशी यात काम करणाऱ्या ‘संतुलन’ संस्थेची तक्रार आहे. बांधकाम साइटचे सर्वेक्षणच होत नाही. वास्तविक बांधकाम ठेकेदारांकडून जो ‘सेस’ गोळा होतो तो या मुलांच्या शिक्षणासाठी वापरायला हवा. परभाषक मुलांसाठी स्वतंत्र सोय करण्याची गरज आहे.
याखेरीज, महाराष्ट्रात फिरत्या धनगर समूहाचा फिरते राहून मेंढय़ा पाळणे हा व्यवसाय आहे. हे वर्षभर फिरतात हे गृहीत धरून कायमस्वरूपी योजना आखण्याची गरज आहे. गुजरातमधून आलेले गवळी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागांत मोठय़ा संख्येने आहेत. हे धनगर एनटी या संवर्गातील असल्याने समाजकल्याणच्या आजच्या आश्रमशाळेत ही मुले सामावणे नक्कीच शक्य आहे. यात बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे. याबाबत प्रबोधनाची गरज आहे. ज्या गावात जातील तेथील पोलीस/ पोलीस पाटील यांनी त्यांना कायद्याची जाणीव सतत करून देण्याची गरज आहे.
लेखक शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत.
ईमेल : herambkulkarni1971@gmail.com 

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...