Flash

Tuesday, 24 April 2018

‘शिक्षण-तोड’ रोखण्यासाठी..- हेरंब कुलकर्णी

‘शिक्षण-तोड’ रोखण्यासाठी..

शासन त्याच गावातील शाळेत हंगामी वसतिगृहे सुरू करते; पण त्यातील निकृष्ट सुविधांमुळे पालक मुले ठेवत नाहीत.

ऊसतोड तसेच वीटभट्टी कामगार म्हणून स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील सुमारे तीन ते पाच लाख मुलांचे शिक्षणदरवर्षी खंडित होतेशासनाचे विद्यमान विभाग आणि कारखाने वा वीटभट्टी मालक यांनी पुरेसे योगदान दिल्यासही आबाळ आपण रोखू शकतोकशी, ते काही उदाहरणांनिशी सांगणारा लेख..
साखर कारखान्यांचे बॉयलर आता धडधडू लागले आहेत. ऊसतोड कामगार बिऱ्हाड पाठीवर घेऊन पोहोचत आहेत. रोजगारासाठी स्थलांतर हा महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न आणि तितकाच दुर्लक्षित प्रश्न आहे. जिरायत भागात एकच पीक निघते. ते काढल्यावर दिवाळीनंतर किमान २५ लाखांहून अधिक कामगार दरवर्षी हंगामी स्थलांतर करतात. त्यात १२ लाख ऊसतोड व तितकीच संख्या प्रत्येकी वीटभट्टी मजूर व आदिवासी भागांतून स्थलांतर होते. त्यात पुन्हा बांधकाम मजूर व दगडखाण मजूर असे वर्षभरासाठीचे स्थलांतर यात धरलेले नाही. मजुरीसाठी आदिवासींचे स्थलांतर मेळघाट, नंदुरबार व सर्वच आदिवासी जिल्ह्य़ांतून होते. शासन त्याच गावातील शाळेत हंगामी वसतिगृहे सुरू करते; पण त्यातील निकृष्ट सुविधांमुळे पालक मुले ठेवत नाहीत. ज्या गावातून हे पालक स्थलांतर करतात, त्याच गावात मुलांना थांबविण्याचे शाळांकडून प्रयत्न होत नाहीत. त्या गावात ६ महिने हंगामी वसतिगृह सुरू करण्याची शाळांची मानसिकता नसते. पालक मुलींना शाळेत असुरक्षित जागेत चालणाऱ्या वसतिगृहात ठेवायला तयार नसतात. हे पालक ज्या ऊस कारखान्यावर जातात तेथे जवळ शाळेत मुलांना दाखल करणे होत नाही. पालक रात्री कधी तरी कामाला जातात तेव्हा ही मुले कुठे सोडून जायची, हा प्रश्न असतो. ऊस तोडत वेगवेगळ्या गावांत फिरावे लागते तेव्हा एकच शाळा निवडता येत नाही. सहा महिने गावाकडे एक शाळा व नंतर दुसरी, यात मुलांचे शिक्षण होत नाही. परिणामी बालमजुरी वाढते.
बांधकाम व्यवसाय सध्या खूप वाढल्याने वीटभट्टय़ा खूप वाढल्या आहेत. एका तालुक्यात ५० पेक्षा जास्त वीटभट्टय़ा असतात. गावापासून वीटभट्टी दूर असल्याने तेथून या मजुरांच्या मुलांना शाळेत येणे कठीण असते. वीटभट्टय़ांवरच्या आनुषंगिक कामांसाठी मग या मुलांचा वापर होतो. भट्टीवर येणारे बहुतेक मजूर हे निरक्षर आदिवासी (भिल्ल वा कातकरी) असतात. भट्टीवर मुलांची संख्या अनेकदा १० पेक्षा कमी असल्याने प्रत्येक भट्टीवर शाळा चालविणेही कठीण होते.
उपाययोजना
ऊसतोड किंवा वीटभट्टी या दोन्ही प्रकारांत मुले ज्या गावातून स्थलांतर होतात त्याच गावात थांबवायला हवीत. कारखान्यावर व वीटभट्टीवर ही मुले कामाला लावली जातात व शिक्षणाची सोय नीट होत नाही. तेव्हा ज्या गावातून येतात त्याच परिसरात या मुलांच्या शिक्षणाची सोय करायला हवी. गावपातळीवरच्या राजकारणातून ही वसतिगृहे नीट चालत नाहीत. एका वर्षी २५ कोटी खर्च होतो. इतकी मोठी रक्कम वापरून ज्या परिसरातून स्थलांतर होते त्या परिसरातील बाजारच्या गावात एक वसतिगृह सुरू करण्यात यावे. वसतिगृहाची इमारत दोन मजली असावी. वरील मजल्यावर राहण्याची सोय असावी व खाली शाळा असावी. परिसरातील स्थलांतर झालेल्या पालकांची मुले इथे दाखल करण्यात यावीत व ज्या शाळेतून जास्त स्थलांतर झाले आहे तेथील शिक्षकांना या वसतिगृहातल्या शाळेत प्रतिनियुक्ती देण्यात यावी. इमारत बांधणे व तेथे कर्मचारी नियुक्त करणे याची जबाबदारी साखर संघाने घ्यावी व शिक्षण विभागाने शिक्षणाची जबाबदारी घ्यावी. या वसतिगृहावर नियंत्रणासाठी त्या गावातील जागरूक नागरिक, अधिकारी व ज्या गावांतील मुले तिथे आहेत त्या गावांच्या सरपंचांसह समिती बनवावी. अशा प्रकारे प्रत्यक्ष वसतिगृहाचा प्रयोग सध्या बीड जिल्ह्य़ात दीपक नागरगोजे व त्यांचे सहकारी करीत आहेत. १३ वसतिगृहांत ३००० विद्यार्थी आहेत. या प्रयोगाचा अभ्यास शासनाने एक मॉडेल म्हणून करावा. ‘इमारत शासनाने बांधावी, स्वयंसेवी संस्थांनी चालवावी व समाजाने त्यावर नियंत्रण ठेवावे,’ असेही मॉडेल विचारात घ्यावे. कायमस्वरूपी वसतिगृह हाच मला या समस्येवर पर्याय दिसतो. महाराष्ट्रातून स्थलांतर कोठून होते हे आता नक्की झाले आहे. अशा तालुक्यांत अशी वसतिगृहे उभारणे सहज शक्य आहे. मुले मूळ गावी थांबविणे हाच योग्य मार्ग आहे.
 कारखान्यांची  वीटभट्टीची जबाबदारी 
एवढे प्रयत्न करूनसुद्धा जर ऊसतोड कामगार येताना कारखानास्थळावर मुले घेऊन आलेच तर कारखान्याने शिक्षण विभागाला सांगून कामगारांचे सर्वेक्षण करावे. विमा योजनेसाठी कारखाना प्रत्येक मजुरांचा सव्‍‌र्हे करतोच, त्यात मुलांची माहिती घेता येऊ शकेल. कारखान्याने कारखान्यावर एक निवासी वसतिगृह इमारत बांधावी. जवळ शाळा नसेल तर जवळ शाळेची इमारत बांधावी. शाळा असेल तर खोल्या वाढवाव्यात. वसतिगृहाची गरज यासाठी आहे की कारखानास्थळावर जितके मजूर राहतात तितकेच मजूर हे आजूबाजूच्या गावांत ऊसतोडीला पाठविलेले असतात व ते सतत राहण्याचे ठिकाण बदलत राहतात. शिक्षणाविना राहणारी ती मुले या वसतिगृहात आणता येतील, कारखानास्थळावरची मुले प्रचंड थंडीतही सुरक्षित ठिकाणी राहतील. वसतिगृहात राहिल्याने या मुलांना पालक ऊस तोडायला नेणे, वाढे बांधायला लावणे अशी कामे सांगणार नाहीत व ते शिक्षणाच्या वातावरणात राहतील. रात्री लवकर पालक ऊस तोडायला जातात तेव्हा मुले सोडून जाणे जोखमीचे असते, त्यामुळे सोबत फडावर नेतात; पण वसतिगृह झाले तर तो प्रश्न सुटेल. माध्यमिक शाळेतील मुले असतील व ती शाळा जर लांब असेल तर कारखान्याने त्यांना एसटी पास काढून द्यावेत. सर्वच मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे. वसतिगृह धोरणावर अंमल होईपर्यंत जर मुले पालकांसोबत राहणार असतील तर कारखान्याने स्लिप बॉय किंवा स्वतंत्र कर्मचारी नेमून रोज ही सर्व मुले गोळा करायला मदत करावी व शाळेत नेऊन पोहोचवावी. मुकादम हा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याशी करार करताना ‘माझ्या टोळीत मुले सोबत येणार नाहीत’ असे लिहून घेतले तर तो पालकांना मुलांना गावाकडेच शाळेत किंवा वसतिगृहात ठेवण्याचा प्रयत्न करील आणि जर तरीही मुले सोबत आलीच तर ती मुले जवळच्या शाळेत दाखल करण्याची व रोज पाठविण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकावी. कारखानास्थळावर आलेल्या मजुरांसाठी सांगली जिल्ह्य़ातील किसनवीर साखर कारखाना वाळवा, श्रीदत्त कारखाना शिरोळ, तर नगर जिल्ह्य़ातील अकोल्याचा अगस्ती सहकारी साखर कारखाना यांच्या यशस्वी प्रयत्नांचा अभ्यास करण्यात यावा. अगस्ती कारखाना दरवर्षी एक स्वतंत्र कर्मचारी रोज मुले गोळा करायला नेमतो व हायस्कूलला जाणाऱ्या मुलांना एसटीचा पास काढून देतो. हे सर्व साखर कारखान्यांना सहज शक्य आहे.
ऊसतोड कामगारांसाठी ते जेथून स्थलांतर करतात तेथेच कायमस्वरूपी वसतिगृहे असावीत, त्या वसतिगृहांत हे विद्यार्थी सामावून घ्यावेत. वीटभट्टीवर जाणारे बहुतेक मजूर हे आदिवासी असल्याने आदिवासी आश्रमशाळेत या मुलांना दाखल करण्याबाबत पालकांचे प्रबोधन करावे. आश्रमशाळांना केवळ सहा महिन्यांसाठीही प्रवेश देण्याची मुभा देण्याची गरज आहे. वीटभट्टी मालकांनाही ज्या मजुरांशी करार करणार आहात त्यांची मुले सोबत येणार नाहीत व आश्रमशाळेत दाखल होतील, असे प्रयत्न करण्याचे कायदेशीर बंधन घालण्याची गरज आहे. वीटभट्टीवर ज्या भिल्ल जमातीतून कामगार येतात त्या जमातीच्या नेत्यांना शासनाने शिक्षणदूत म्हणून नेमून निवासी शाळेत मुले दाखल करण्याच्या प्रबोधनाची जबाबदारी द्यावी. आदिवासी विभागाने यात पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रात काही विशिष्ट ठिकाणी या जमातीच्या दरवर्षी यात्रा भरतात. त्या ठिकाणी त्या जिल्ह्य़ाने पथनाटय़, पत्रके वाटणे अशा प्रकारे प्रबोधन करावे. प्रत्यक्ष तरीही जर हे मजूर आपल्या मुलांना सोबत घेऊन आलेच तर जवळच्या आश्रमशाळेत भट्टीमालकाने दाखल करावेत. जर जवळ आदिवासी विभागाची आश्रमशाळा नसेल तर अन्य विभागाच्या आश्रमशाळा वा बालगृहात ही मुले ठेवली जातील, असे कायदेशीर बदल करण्याची गरज आहे. जर अशी व्यवस्था होत नसेल तर जवळच्या सरकारी किंवा खासगी शाळेने सर्वेक्षण करून ही मुले दाखल करावीत. हे सर्वेक्षण, वीटभट्टी सुरू झाल्यावर लगेच करावे. या मुलांना रोज शाळेत नेण्याची व्यवस्था करणे हे मालकाचे कर्तव्य असेल असे महसूल विभागाने त्याला बजावण्याची गरज आहे. वीटभट्टी मालकाला परवानगीही महसूल विभागाने देण्याची तरतूद आहे. तेव्हा परवानगी देताना वीटभट्टी मालकाकडून माझ्या कामगारांची मुले सोबत नसतील, त्यांना गावाकडेच मी आश्रमशाळेत दाखल करण्याचा प्रयत्न करीन व जर अपवाद म्हणून आलेच तर आपल्या तालुक्यातील आश्रमशाळेत दाखल करेन किंवा जवळच्या शाळेत पाठवेन असे प्रतिज्ञापत्र घेण्याची गरज आहे. वीटभट्टीवर आलेल्या मुलांचा वावर भट्टीवर बालमजूर म्हणून होतो तेव्हा या कामगार विभागाने डिसेंबर ते एप्रिल या काळात वीटभट्टी भेटी कराव्यात.
बांधकाम मजूर व दगडखाण मजूर यांचे स्थलांतर हे एक वर्षांचे असते. त्यांच्यात परभाषिक मुलांची संख्या जास्त आहे. दगडखाणीवर स्वतंत्र शाळा सुरू करायला हव्यात, परंतु त्यासाठी नेमलेल्या समितीच्या बैठकाही होत नाहीत, गांभीर्यही नाही अशी यात काम करणाऱ्या ‘संतुलन’ संस्थेची तक्रार आहे. बांधकाम साइटचे सर्वेक्षणच होत नाही. वास्तविक बांधकाम ठेकेदारांकडून जो ‘सेस’ गोळा होतो तो या मुलांच्या शिक्षणासाठी वापरायला हवा. परभाषक मुलांसाठी स्वतंत्र सोय करण्याची गरज आहे.
याखेरीज, महाराष्ट्रात फिरत्या धनगर समूहाचा फिरते राहून मेंढय़ा पाळणे हा व्यवसाय आहे. हे वर्षभर फिरतात हे गृहीत धरून कायमस्वरूपी योजना आखण्याची गरज आहे. गुजरातमधून आलेले गवळी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागांत मोठय़ा संख्येने आहेत. हे धनगर एनटी या संवर्गातील असल्याने समाजकल्याणच्या आजच्या आश्रमशाळेत ही मुले सामावणे नक्कीच शक्य आहे. यात बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे. याबाबत प्रबोधनाची गरज आहे. ज्या गावात जातील तेथील पोलीस/ पोलीस पाटील यांनी त्यांना कायद्याची जाणीव सतत करून देण्याची गरज आहे.
लेखक शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत.
ईमेल : herambkulkarni1971@gmail.com 

दारूबंदीसाठी ग्रामसुरक्षा दल - हेरंब कुलकर्णी

दारूबंदीसाठी ग्रामसुरक्षा दल

आज महाराष्ट्रात दरवर्षी ६६००० अपघातात १५००० लोक मरतात.

गावातल्याच निवडक महिला व पुरुषांकडे अवैध दारू पकडून तिची माहिती पोलीस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांना कळवण्याचे अधिकार देण्याची सूचना दारूबंदीच्या अनेक प्रयोगांतून पुढे आली आहे. त्यावर आधारित कायद्याचा मसुदाही तयार असून तो चर्चेच्या प्रतीक्षेत आहे.
गांधीजयंतीला शासनाने अवैध दारू रोखण्याच्या तंत्रज्ञानाचे लोकार्पण केले व राज्यातील अवैध दारू थांबविण्याचा संकल्प केला. कोपर्डीच्या अमानुष प्रकरणात आरोपींना अवैध दारू मिळाली तेव्हापासून अण्णा हजारे अवैध दारूचा मुद्दा गांभीर्याने मांडत आहेत.. बिहारच्या दारूबंदीनंतर नितीशकुमार यांनी नुकतीच दिल्लीत दारूबंदीवर संघर्ष करणाऱ्या १४ राज्यांतील संस्थांची परिषद घेतली. दारूबंदी हा २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनेल अशी लक्षणे आहेत. या पाश्र्वभूमीवर अण्णांनी कोपर्डी घटनेनंतर दारूबंदी आंदोलनाची घोषणा करणे महत्त्वाचे आहे. अण्णा आज जरी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते म्हणून माहीत असले तरी यापूर्वी दारूबंदीचे सातत्यपूर्ण काम त्यांनी केले आहे.  ‘अवैध दारू रोखण्यासाठी ग्रामसंरक्षक दलाला अधिकार द्या’, अशी मागणी ते आता करीत आहेत. त्याला प्रतिसाद देणारा कायदा हिवाळी अधिवेशनात येऊ शकतो.
आज महाराष्ट्रात दरवर्षी ६६००० अपघातात १५००० लोक मरतात. यापैकी निम्मे अपघात दारू प्यायल्याने होतात. तसेच व्यसनाधीनतेने आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ७६७२ व्यसनींनी आत्महत्या केल्या. हे सर्व बघता दारूबंदी ही महाराष्ट्रात केवळ नैतिक किंवा भाबडेपणाची मागणी नाही तर अपघात, गुन्हे, आत्महत्या, महिला अत्याचार व दारिद्रय़ यांतून सुटका करण्यासाठी गरजेची आहे.
अवैध दारू रोखण्यासाठी गावोगावी ग्रामसंरक्षक दल उभारण्याची मागणी महत्त्वपूर्ण आहे. याचे कारण आज परवानाधारक दुकानांतून खेडय़ापाडय़ांत अवैध दारू विविध वाहनांतून पाठवली जाते आणि हॉटेल, दुकाने वा घरांतून विकली जाते. या दारूचा खेडय़ातील ग्राहक हा गरीब मजूर वर्ग असतो. दारूमुळे कार्यक्षमता कमी झालेले मजूर कामालाही जात नाही उलट कष्ट करणाऱ्या पत्नीची मजुरी हिसकावून घेतात. मारहाण करतात. पैसे दिले नाही तर घरातील वस्तू विकून दारू पितात. एकीकडे १४व्या वित्त आयोगाने इतका प्रचंड निधी खेडय़ात जाताना, बचत गट, अन्नसुरक्षा देताना कुटुंबात होणारी बचत ही दारू काढून घेत पुन्हा अनेक कुटुंबांना दारिद्रय़ात ढकलते आहे हे कटू वास्तव आज खेडय़ापाडय़ात दिसते. त्यामुळे आज गावागावांतील अवैध दारू कशी रोखायची हा महत्त्वाचा ग्रामीण प्रश्न झाला आहे. किमान ती रोखली गेली तरी प्रश्न वैध दारूचा फक्त काही गावांपुरता सीमित होईल (याचे कारण देशी दारूचे लायसन्स तुलनेत कमी असून नवीन दिले जात नाहीत).
अण्णांचा ग्रामरक्षक दल हा मुद्दा महत्त्वाचा अशासाठी आहे की, पोलीस व उत्पादन शुल्क खात्याकडे तक्रारी करून ग्रामीण महिला थकून गेल्या आहेत. या दोन्ही विभागाचे अपुरे मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांचे हितसंबंध यामुळे अनेकदा तक्रारी करूनही पुन:पुन्हा दारू सुरू होते व महिला अगतिक होऊन जातात. गावकरी जेव्हा संतापाने या दारू दुकानांवर चालून जातात तेव्हा दारू दुकानदार, पुरुषांवर विनयभंगाचे किंवा महिलांवर चोरी/मारहाणीचे खोटे गुन्हे टाकतात. हे प्रमाण इतके मोठे होते की अण्णा हजारेंनी आर. आर. पाटील गृहमंत्री असताना सतत पाठपुरावा करून महिलांवरचे गुन्हे काढायला लावले. यातून गावातील महिलांना संरक्षण म्हणून काही अधिकार व ओळखपत्रे दिली पाहिजेत असा मुद्दा पुढे आला. गावातील अवैध दारू पकडण्याचे अधिकार निवडक पुरुष व महिलांना दिले तर त्यातून गावपातळीवर अवैध दारू रोखली जाईल व खोटे गुन्हे महिलांवर दाखल होणार नाहीत. यातून ग्रामसंरक्षक दलाची मागणी पुढे आली आहे. हिवाळी अधिवेशनात याबाबत येणारा कायदा कसा असावा याविषयी अण्णा हजारे यांचे मुद्दे असे :
१) ज्या गावचे लोक ग्राम संरक्षक दलाची स्थापना गावच्या एकूण मतदारांच्या संख्येच्या बहुमताने ग्रामसभेत करण्यास तयार आहेत अशाच गावात ग्राम संरक्षक दलाची स्थापना करण्यात यावी.
२)  ग्राम संरक्षक दलामध्ये भारतीय घटनेप्रमाणे समतेचे अनुकरण व्हावे यासाठी गावच्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, सवर्ण अशा सर्वाना सहभागी करण्यात यावे. ग्राम संरक्षक दलात ५० टक्के महिला सभासद असाव्यात.
३) ग्राम संरक्षक दलामध्ये सहभागी करून घेण्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्य़ाची नोंद नसावी.
४) दारूबंदी कार्यात योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात यावे.
५) राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या-ज्या गावांनी ग्राम संरक्षक दल तयार केली आहेत आणि शासनाने त्यांना कायद्याने मान्यता दिलेली आहे अशा ग्राम संरक्षक दलातील सर्व सदस्य, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी यांची दरमहा प्रांताधिकारी यांनी आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा.
६) गावातील ग्राम संरक्षक दल, ग्रामपंचायत यांनी समन्वय ठेवून गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम करावे.
७) ज्याप्रमाणे ग्रामसभेत ग्राम संरक्षक दलाची स्थापना होईल त्याचप्रमाणे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या वॉर्ड सभेमध्ये ग्राम संरक्षक दलाची स्थापना करावी. महानगरपालिकेमध्ये वॉर्ड मोठा असल्यास वॉर्डसभा होणे शक्य नसेल अशा वॉर्डमध्ये मुहल्ला सभेने वॉर्ड संरक्षक दल स्थापन करावे.
या दलाच्या कार्यपद्धतीविषयी अण्णा हजारे म्हणतात की, पंचनामा करून ग्राम संरक्षक दल अवैध धंदे आढळल्यास तालुका पोलीस निरीक्षकांना कळवतील व अवैध दारू असल्यास उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला कळवतील. ते तातडीने येऊन सदर पंचनामा ताब्यात घेऊन शक्य तितक्या लवकर गुन्हा दाखल करतील. जेथे ग्राम संरक्षक दल पंचनामा करू शकत नसेल, तेथे ग्राम संरक्षक दल पोलीस निरीक्षक आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना कळवतील. या अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्राम संरक्षक दल त्याचा पाठपुरावा करीत राहील. अवैध धंदे करणाऱ्यावर तीनदा गुन्हे दाखल झाल्यास त्यांना दोन वर्षे जिल्हा तडीपारच्या सजेची तरतूद कायद्यात असावी. महिलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार असा गुन्हा असेल तर तीन वर्षे ते दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा कायद्यात करण्याची तरतूद असावी.
ज्या तालुक्यांत ग्राम संरक्षक दले अधिक अवैध धंदे पकडतील त्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक/ उप-निरीक्षक वा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांची बदली करणे, पदोन्नती रोखणे, वेतनवाढ रोखणे यासारख्या शिक्षेची तरतूद असावी. अवैध दारू वा इतर धंदे पकडण्याची वा पंचनामा करण्याची संधी या दलांना मिळू नये अशी दक्षता पोलीस व उत्पादन शुल्क खात्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा अण्णा करतात.
अण्णा म्हणतात की ग्राम संरक्षक दलाला साह्य़ व्हावे यासाठी राज्य स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या व तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी समित्या स्थापन करण्यात याव्यात. या समित्यांनी आपापल्या विभागात दारूबंदीविषयी आढावा घ्यावा. सदर समित्या त्या-त्या विभागाच्या आढावा बैठकीमध्ये समिती अध्यक्षांना त्यांच्या भागातील दारूबंदी संदर्भातील सूचना करीत राहतील.
आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे शासनाला दारू उत्पादनापासून २३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादन शुल्क दरवर्षी मिळते. सदर उत्पन्नापैकी दोन टक्के रक्कम दारूबंदी, अवैध धंदे, महिला अन्याय, अत्याचार या संबंधाने लोकशिक्षण, लोकजागृतीसाठी गावामध्ये भित्तिपत्रके, हातपत्रके व बॅनरच्या माध्यमातून खर्च करण्यात यावे. कीर्तन, मनोरंजनातून लोकशिक्षण, भाषणे, पथनाटय़ यांसारखे कार्यक्रम करण्यात यावे व त्यांना मानधन देण्यात यावे. जेणेकरून राज्यात दारूबंदी संबंधाने लोकजागृती होत राहील. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना असा धोरणात्मक निर्णय अण्णा व दाभोलकर यांच्या पुढाकाराने झालाही होता.
बीड जिल्ह्य़ात ग्रामसंरक्षक दलाचा प्रयोग यशस्वी ठरतो आहे. बीडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी जिल्ह्य़ाच्या प्रत्येक गावातील महिलांना ओळखपत्र देऊन दारू पकडण्याचे अधिकार दिले आहेत. याचा खूप चांगला परिणाम होतो आहे. बीड जिल्ह्य़ाच्या या प्रयोगाचा अभ्यास करून ग्राम संरक्षक दलाची रचना करणे शक्य आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर सतत गावकऱ्यांना दारू पकडण्याचा अधिकार देण्याचा मुद्दा मांडत असत.
अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी १९५७च्या पोलीसपाटील कायद्यात पोलीसपाटलांवर आहेच. त्यांना या ग्रामरक्षक दलाचे सचिव करून त्यांच्यावर अवैध दारू रोखण्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य आहे. सतत अवैध दारू सापडली तर पोलीसपाटील पद त्या व्यक्तीचे रद्द करण्याचीही तरतूद व्हावी. दारू वाहणारे वाहन हे जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा अधिकार पोलिसांना द्यावा. दारूचे दुकान गावात येऊ द्यावे की नाही यासाठीही मतदान व्हावे. ‘उभी बाटली आडवी बाटली कायद्या’तील जाचक अटी रद्द कराव्यात.
हिवाळी अधिवेशनात हा कायदा येण्यापूर्वी यावर चर्चा व्हायला हवी. आज पोलीस व उत्पादन शुल्क अपुरे मनुष्यबळ व हितसंबंध यामुळे अवैध दारूकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा गावकऱ्यांना काही वैधानिक मर्यादित अधिकार देणे हाच व्यवहार्य उपाय आहे. हे काम पोलिसांना पर्यायी नाही तर पूरक असेल हे लक्षात घ्यायला हवे.

हेरंब कुलकर्णी
लेखक शैक्षणिक व सामाजिक  कार्यकर्ता आहेत.

या वाढीची फळे कोणती? - हेरंब कुलकर्णी

या वाढीची फळे कोणती?

इतर अन्यायाकडे विधिमंडळाचे लक्ष वेधता येते, पण इथे विधिमंडळाचा अन्याय निवारायला कोणाकडे जायचे?


अंगणवाडी सेविकांचे हे अश्रू २०१५ सालच्या मोच्र्यातले (एक्स्प्रेस संग्रहातून

आमदारांचे वेतनभत्ते  निवृत्तीवेतन यांत वाढ करण्यास विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यावरलोकमानसातून संतापाची प्रतिक्रिया आलीत्यापेक्षा चिंताजनक हे कीयातून लोकांना त्यागाचे आवाहनकरण्याचा नैतिक अधिकार राज्यकर्ते गमावतात आणि तुम्हाला जास्त तर आम्हालाही’ हे चक्र सुरू राहते..
वि. भि. कोलते यांनी साने गुरुजींना मुंबईहून नागपूरला व्याख्यानाला बोलविले. प्रथमवर्गाच्या प्रवास खर्चाला १०० रुपये दिले. गुरुजी तिसऱ्या वर्गाने प्रवास करून उरलेले ७३ रुपये परत देतात आणि म्हणतात ‘प्रथम वर्गाने प्रवास करणे हा धर्म आमचा नव्हे’. खूप आग्रह केल्यावर ते पैसे स्वत: न घेता साधनेत देणगी म्हणून जमा करतात.. दंतकथा वाटावी अशी महाराष्ट्रातील लोकसेवकांच्या आदर्शाची गाडी आता उलटी फिरून, नागपूरहून मुंबईला पोहोचली आहे. संघ प्रचारकांच्या त्यागी परंपरा बघितलेल्या पक्षाने धनाढय़ लोकसेवक ही कल्पना अलीकडेच आमदारांसाठी झालेल्या भत्ते/निवृत्तिवेतनवाढीतून महाराष्ट्राला शिकवली आहे. इतर वेळी अतिशय त्वेषाने बोलणारे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या विधेयकावर गप्प राहण्यात नेमका कोणता करार आहे? माध्यमांत आणि समाजमाध्यमांत या निर्णयावर आक्रमक टीका, तर दुसरीकडे सर्वपक्षीय आमदार, मंत्री यांचा सन्नाटा आहे. पुन्हा विधेयक मंजूर करण्याची वेळ ही अशी, की अधिवेशन संपल्यावर पुन्हा त्यावर फारशी चर्चा होणार नाही. राज्यभरचा पाऊस आणि महाड दुर्घटना यांत माध्यमे आणि लोक गुंतल्यामुळे कुणी फारसे बोललेही नाही. आता ज्यांना विरोध करायचा त्यांनी थेट न्यायालयात जाऊन आपले लाखभर रुपये खर्च करून या लखोपती वेतनवाढीला विरोध करायचा. इतर अन्यायाकडे विधिमंडळाचे लक्ष वेधता येते, पण इथे विधिमंडळाचा अन्याय निवारायला कोणाकडे जायचे?
हे मान्यच आहे की, यात खरेच साधेपणाने जगणाऱ्या आमदारांवर लोकांच्या संतापाने अन्याय होईल व शरद पवार म्हणाले तसे, ‘मुंबईसारख्या ठिकाणी राहणे, तेथील नोकरचाकर, कार्यकर्ते तसेच आमदार महोदयांच्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींवर होणारा खर्च अमाप असतो.’  तरीही सामान्य माणसे जास्त संतापतात; कारण लोकप्रतिनिधींचा वेगाने वाढणारा संपत्तीचा आलेख, निवडणुकीतला खर्च हे बघता, ‘यांना पगार व इतर रकमेची गरजच काय?’ हा एक बिनतोड सवाल या संतापाच्या मुळाशी असतो. एखाद्या श्रीमंताचे नाव दारिद्रय़रेषेत घुसडल्यावर जी लोकभावना होते तीच भावना येथेही असते.
लोक संतापतात, याचे कारण छोटय़ा छोटय़ा राजकीय भांडणात टोकाचे वादविवाद विधिमंडळात करून विधानसभा बंद पाडणारे, वाभाडे काढणारे या विषयावर क्षणात एकत्र होतात. इतर वेळी राज्याच्या आर्थिक दुरवस्थेवर गळे काढणारे सत्ताधारी आणि दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येने दु:खी होण्याचा अभिनय करणारे विरोधक ते विषय क्षणात बाजूला सारतात. या ढोंगाची सामान्य माणसाला चीड असते.
इतक्या कमी रकमेच्या बोजाबाबत इतका संताप का असतो याचेही विश्लेषण करायला हवे. सातव्या वेतन आयोगाचा बोजा एक लाख कोटी रुपयांचा आहे, तर त्या तुलनेत आमदारांच्या वाढीव वेतन/भत्त्यांचा एकूण खर्च फक्त १२९ कोटींचा. प्रश्न या रकमेचा नसतोच. त्यामागच्या उद्दाम आणि असंवेदनशील मानसिकतेचा असतो.  या राज्यातील शेतकरी कर्जमाफी मागत असताना, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका मानधनवाढ मागत असताना, विनाअनुदानित शाळेतील शिक्षक १०० आंदोलने करत असताना आणि उपोषणात मरत असताना सतत एकच उत्तर-  शासनाकडे पैसा नाही व राज्यावर पावणेचार लाख कोटी रुपये कर्ज असल्याचे ऐकवले गेले. ते सर्वाना मान्य आहे. त्यामुळे सगळे गप्प होतात. राज्याची इतकी दयनीय स्थिती असताना स्वत:साठी मात्र ते क्षणात विसरले जाते. ‘पैसे नाहीत’ म्हणून फाटके कपडे घालून शाळेत पाठविल्या गेलेल्या लेकराने घरी यावे तर बाप नवे कपडे घालून मित्रासोबत पार्टी करत असावा हे बघितल्यावर जो संताप होईल तोच संताप आज खदखदतो आहे. आता राज्याची आर्थिक अडचण कुठे गेली हा सार्वत्रिक प्रश्न आहे.
मला स्वत:ला राज्यकर्त्यांनी यात जो त्यागाचे आवाहन करण्याचा नैतिक आधार गमावला हा सर्वात चिंतेचा विषय वाटतो. पंतप्रधानांच्या गॅस सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला जो प्रतिसाद मिळाला ते या देशात एक नवे पर्व सुरू झाल्याचे चिन्ह होते. दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्या काळात केलेल्या आवाहनाचे जागरण करत त्या राजकारणाला जोडणारे आवाहन होते. असे वाटले की, पंतप्रधान असेच आवाहन सातव्या आयोगाच्या वेळी करतील आणि देशाचा विकासदर वाढेपर्यंत तुम्ही वेतन आयोग घेऊ नका, आम्हीही वेतनकपात करतो असे म्हणतील पण ते घडले नाही. महाराष्ट्रात अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक वृत्तीविषयी आदराची भावना आहे. आम्ही वेतनकपात करतो, तुम्ही किमान दोन वर्षे वेतन आयोग मागू नका, असे आवाहन ते करतील असे वाटले होते. राज्यकर्त्यांची नियत चांगली असेल तर या देशात नक्कीच प्रतिसाद मिळतो. पण फडणवीस यांनी ती संधी गमावली आहे. यापुढे ते कर्जबाजारी राज्याचे कारण सांगून कुणाला गप्प करू शकणार नाहीत की कर्मचारी किंवा इतर समाजघटकांना त्यागाचे आवाहन करू शकणार नाहीत.
गेली १५ वर्षे वेतन आयोगांना विरोधी भूमिका घेताना माझा कर्मचारी मानसिकतेचा अभ्यास झाला. त्यात राज्यकर्ते जर उधळपट्टी करतात तर मग आम्हीच राज्याचा विचार का करायचा हा मुद्दा असतो. तेव्हा कोणतीही कार्यसंस्कृती आणि साधेपणा, त्याग ही मूल्यप्रणाली वरून खाली वाहत असते. आमदारांच्या या वागण्यामुळे आता हीच वृत्ती सर्व समाजघटक दाखवतील.
या निर्णयाचा सर्वात जास्त आनंद आमदारांपेक्षा कर्मचारी संघटनांना झाला असेल, कारण आता राज्याची आर्थिक अडचण आणि त्यागाचे आवाहन हे दोन्ही मुद्दे सातव्या वेतन आयोगाचा सामना सुरू होण्यापूर्वीच शासनाच्या बाजूने बाद झाले आहेत. आता ते कर्मचाऱ्यांना कोणत्या तोंडाने अडचणी सांगणार, किंवा राज्याच्या विकासासाठी काही वर्षे त्याग करण्याचे आवाहन करणार? फडणवीस यांच्या नि:स्पृह प्रतिमेचे दडपण येऊन कदाचित जी संभाव्य माघार घ्यावी लागली असती किंवा राज्याचे कर्ज व शेतकरी आत्महत्या यातून जे अपराधीभाव कर्मचारी संघटनांवर आले असते त्या अपराधी भावातून सुटका करण्याची महान कामगिरी आमदारांच्या या वेतनवाढीने केली आहे. त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ सातव्या वेतन आयोगाचा हा खड्डा किती रुपयांचा असेल एवढेच मोजणे सामान्य माणसांच्या हातात उरले आहे. कर्मचारी व राज्यकर्ते या दोघांनी तिजोरी रिकामी होण्याला दुसरा घटकच कसा जबाबदार आहे असे म्हणत आपला स्वार्थ साधायचा असे चालले आहे.
या निमित्ताने निवृतिवेतन या शब्दाची व्याख्याही तपासून बघायला हवी. एका खात्यात किमान २० वर्षे सतत नोकरी केली तर निवृत्तिवेतन दिले जाते. वय ५८ पूर्ण झाल्यावर आता शारीरिक श्रम किंवा इतर कोणतेही काम करू शकणार नाही, असे गृहीत धरून हे निवृत्तिवेतन दिले जाते. या निकषावर आमदारांना केवळ दोन वेळा आमदार झाल्यावर निवृत्त समजण्यामागे तर्कशास्त्र काय आहे? आज २५ वर्षांचा आमदार सलग दोन मुदतींत आमदार झाला तर ३५व्या वर्षांपासून पेन्शनला पात्र होतो. दुसरीकडे, कर्मचारी ५८व्या वर्षी काम करण्याचा थांबतो; पण राजकरणात तर साठीनंतर खरे करिअर सुरू होऊन ८०व्या वर्षीपर्यंत पदे भूषवली जातात. तेव्हा निवृत्त या शब्दालाच आव्हान द्यायला हवे. एकीकडे २००५ नंतर नोकरीला लागलेल्यांचे पेन्शन बंद केले आणि इथे विनाकारण ५०,००० रुपये पेन्शन मिळणार आहे.
जखमेवर मीठ चोळण्याचा भाग असा की शेतकरी, शेतमजूर बांधवांना पेन्शन द्या म्हणून कित्येक वर्षे मागणी होते आहे. आयुष्यभर राबलेला शेतमजूर कोणतेच काम वृद्धपणी करू शकत नाही. त्याला निर्वाहवेतन आवश्यक आहे. संसदेत असंघटितांना पेन्शन विधेयक प्रलंबित आहे. महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशी जी पेन्शन अत्यंत गरीब व गरजू निराधारांना दिली जाते तिची रक्कम १००० रुपयांपेक्षा जास्त नाही. तीही वेळेवर येत नाही. एकदा तर त्यात ३०० रुपये कपात झाली होती. या योजनांच्या ८५ लाख लाभार्थीवर मिळून फक्त १८०० कोटी खर्च केले जातात आणि इकडे ३६६ व्यक्तींवर १२९ कोटी.. असंघटित लोक  आणि लोकसेवकांतील ही विषमता ‘सम आर मोअर इक्वल’ या जॉर्ज ऑर्वेलने अधोरेखित केलेल्या विषमतानीतीची साक्ष पटवणारी आहे.

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...