Flash

Tuesday, 24 April 2018

दारूबंदीसाठी ग्रामसुरक्षा दल - हेरंब कुलकर्णी

दारूबंदीसाठी ग्रामसुरक्षा दल

आज महाराष्ट्रात दरवर्षी ६६००० अपघातात १५००० लोक मरतात.

गावातल्याच निवडक महिला व पुरुषांकडे अवैध दारू पकडून तिची माहिती पोलीस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांना कळवण्याचे अधिकार देण्याची सूचना दारूबंदीच्या अनेक प्रयोगांतून पुढे आली आहे. त्यावर आधारित कायद्याचा मसुदाही तयार असून तो चर्चेच्या प्रतीक्षेत आहे.
गांधीजयंतीला शासनाने अवैध दारू रोखण्याच्या तंत्रज्ञानाचे लोकार्पण केले व राज्यातील अवैध दारू थांबविण्याचा संकल्प केला. कोपर्डीच्या अमानुष प्रकरणात आरोपींना अवैध दारू मिळाली तेव्हापासून अण्णा हजारे अवैध दारूचा मुद्दा गांभीर्याने मांडत आहेत.. बिहारच्या दारूबंदीनंतर नितीशकुमार यांनी नुकतीच दिल्लीत दारूबंदीवर संघर्ष करणाऱ्या १४ राज्यांतील संस्थांची परिषद घेतली. दारूबंदी हा २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनेल अशी लक्षणे आहेत. या पाश्र्वभूमीवर अण्णांनी कोपर्डी घटनेनंतर दारूबंदी आंदोलनाची घोषणा करणे महत्त्वाचे आहे. अण्णा आज जरी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते म्हणून माहीत असले तरी यापूर्वी दारूबंदीचे सातत्यपूर्ण काम त्यांनी केले आहे.  ‘अवैध दारू रोखण्यासाठी ग्रामसंरक्षक दलाला अधिकार द्या’, अशी मागणी ते आता करीत आहेत. त्याला प्रतिसाद देणारा कायदा हिवाळी अधिवेशनात येऊ शकतो.
आज महाराष्ट्रात दरवर्षी ६६००० अपघातात १५००० लोक मरतात. यापैकी निम्मे अपघात दारू प्यायल्याने होतात. तसेच व्यसनाधीनतेने आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ७६७२ व्यसनींनी आत्महत्या केल्या. हे सर्व बघता दारूबंदी ही महाराष्ट्रात केवळ नैतिक किंवा भाबडेपणाची मागणी नाही तर अपघात, गुन्हे, आत्महत्या, महिला अत्याचार व दारिद्रय़ यांतून सुटका करण्यासाठी गरजेची आहे.
अवैध दारू रोखण्यासाठी गावोगावी ग्रामसंरक्षक दल उभारण्याची मागणी महत्त्वपूर्ण आहे. याचे कारण आज परवानाधारक दुकानांतून खेडय़ापाडय़ांत अवैध दारू विविध वाहनांतून पाठवली जाते आणि हॉटेल, दुकाने वा घरांतून विकली जाते. या दारूचा खेडय़ातील ग्राहक हा गरीब मजूर वर्ग असतो. दारूमुळे कार्यक्षमता कमी झालेले मजूर कामालाही जात नाही उलट कष्ट करणाऱ्या पत्नीची मजुरी हिसकावून घेतात. मारहाण करतात. पैसे दिले नाही तर घरातील वस्तू विकून दारू पितात. एकीकडे १४व्या वित्त आयोगाने इतका प्रचंड निधी खेडय़ात जाताना, बचत गट, अन्नसुरक्षा देताना कुटुंबात होणारी बचत ही दारू काढून घेत पुन्हा अनेक कुटुंबांना दारिद्रय़ात ढकलते आहे हे कटू वास्तव आज खेडय़ापाडय़ात दिसते. त्यामुळे आज गावागावांतील अवैध दारू कशी रोखायची हा महत्त्वाचा ग्रामीण प्रश्न झाला आहे. किमान ती रोखली गेली तरी प्रश्न वैध दारूचा फक्त काही गावांपुरता सीमित होईल (याचे कारण देशी दारूचे लायसन्स तुलनेत कमी असून नवीन दिले जात नाहीत).
अण्णांचा ग्रामरक्षक दल हा मुद्दा महत्त्वाचा अशासाठी आहे की, पोलीस व उत्पादन शुल्क खात्याकडे तक्रारी करून ग्रामीण महिला थकून गेल्या आहेत. या दोन्ही विभागाचे अपुरे मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांचे हितसंबंध यामुळे अनेकदा तक्रारी करूनही पुन:पुन्हा दारू सुरू होते व महिला अगतिक होऊन जातात. गावकरी जेव्हा संतापाने या दारू दुकानांवर चालून जातात तेव्हा दारू दुकानदार, पुरुषांवर विनयभंगाचे किंवा महिलांवर चोरी/मारहाणीचे खोटे गुन्हे टाकतात. हे प्रमाण इतके मोठे होते की अण्णा हजारेंनी आर. आर. पाटील गृहमंत्री असताना सतत पाठपुरावा करून महिलांवरचे गुन्हे काढायला लावले. यातून गावातील महिलांना संरक्षण म्हणून काही अधिकार व ओळखपत्रे दिली पाहिजेत असा मुद्दा पुढे आला. गावातील अवैध दारू पकडण्याचे अधिकार निवडक पुरुष व महिलांना दिले तर त्यातून गावपातळीवर अवैध दारू रोखली जाईल व खोटे गुन्हे महिलांवर दाखल होणार नाहीत. यातून ग्रामसंरक्षक दलाची मागणी पुढे आली आहे. हिवाळी अधिवेशनात याबाबत येणारा कायदा कसा असावा याविषयी अण्णा हजारे यांचे मुद्दे असे :
१) ज्या गावचे लोक ग्राम संरक्षक दलाची स्थापना गावच्या एकूण मतदारांच्या संख्येच्या बहुमताने ग्रामसभेत करण्यास तयार आहेत अशाच गावात ग्राम संरक्षक दलाची स्थापना करण्यात यावी.
२)  ग्राम संरक्षक दलामध्ये भारतीय घटनेप्रमाणे समतेचे अनुकरण व्हावे यासाठी गावच्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, सवर्ण अशा सर्वाना सहभागी करण्यात यावे. ग्राम संरक्षक दलात ५० टक्के महिला सभासद असाव्यात.
३) ग्राम संरक्षक दलामध्ये सहभागी करून घेण्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्य़ाची नोंद नसावी.
४) दारूबंदी कार्यात योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात यावे.
५) राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या-ज्या गावांनी ग्राम संरक्षक दल तयार केली आहेत आणि शासनाने त्यांना कायद्याने मान्यता दिलेली आहे अशा ग्राम संरक्षक दलातील सर्व सदस्य, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी यांची दरमहा प्रांताधिकारी यांनी आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा.
६) गावातील ग्राम संरक्षक दल, ग्रामपंचायत यांनी समन्वय ठेवून गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम करावे.
७) ज्याप्रमाणे ग्रामसभेत ग्राम संरक्षक दलाची स्थापना होईल त्याचप्रमाणे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या वॉर्ड सभेमध्ये ग्राम संरक्षक दलाची स्थापना करावी. महानगरपालिकेमध्ये वॉर्ड मोठा असल्यास वॉर्डसभा होणे शक्य नसेल अशा वॉर्डमध्ये मुहल्ला सभेने वॉर्ड संरक्षक दल स्थापन करावे.
या दलाच्या कार्यपद्धतीविषयी अण्णा हजारे म्हणतात की, पंचनामा करून ग्राम संरक्षक दल अवैध धंदे आढळल्यास तालुका पोलीस निरीक्षकांना कळवतील व अवैध दारू असल्यास उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला कळवतील. ते तातडीने येऊन सदर पंचनामा ताब्यात घेऊन शक्य तितक्या लवकर गुन्हा दाखल करतील. जेथे ग्राम संरक्षक दल पंचनामा करू शकत नसेल, तेथे ग्राम संरक्षक दल पोलीस निरीक्षक आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना कळवतील. या अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्राम संरक्षक दल त्याचा पाठपुरावा करीत राहील. अवैध धंदे करणाऱ्यावर तीनदा गुन्हे दाखल झाल्यास त्यांना दोन वर्षे जिल्हा तडीपारच्या सजेची तरतूद कायद्यात असावी. महिलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार असा गुन्हा असेल तर तीन वर्षे ते दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा कायद्यात करण्याची तरतूद असावी.
ज्या तालुक्यांत ग्राम संरक्षक दले अधिक अवैध धंदे पकडतील त्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक/ उप-निरीक्षक वा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांची बदली करणे, पदोन्नती रोखणे, वेतनवाढ रोखणे यासारख्या शिक्षेची तरतूद असावी. अवैध दारू वा इतर धंदे पकडण्याची वा पंचनामा करण्याची संधी या दलांना मिळू नये अशी दक्षता पोलीस व उत्पादन शुल्क खात्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा अण्णा करतात.
अण्णा म्हणतात की ग्राम संरक्षक दलाला साह्य़ व्हावे यासाठी राज्य स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या व तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी समित्या स्थापन करण्यात याव्यात. या समित्यांनी आपापल्या विभागात दारूबंदीविषयी आढावा घ्यावा. सदर समित्या त्या-त्या विभागाच्या आढावा बैठकीमध्ये समिती अध्यक्षांना त्यांच्या भागातील दारूबंदी संदर्भातील सूचना करीत राहतील.
आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे शासनाला दारू उत्पादनापासून २३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादन शुल्क दरवर्षी मिळते. सदर उत्पन्नापैकी दोन टक्के रक्कम दारूबंदी, अवैध धंदे, महिला अन्याय, अत्याचार या संबंधाने लोकशिक्षण, लोकजागृतीसाठी गावामध्ये भित्तिपत्रके, हातपत्रके व बॅनरच्या माध्यमातून खर्च करण्यात यावे. कीर्तन, मनोरंजनातून लोकशिक्षण, भाषणे, पथनाटय़ यांसारखे कार्यक्रम करण्यात यावे व त्यांना मानधन देण्यात यावे. जेणेकरून राज्यात दारूबंदी संबंधाने लोकजागृती होत राहील. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना असा धोरणात्मक निर्णय अण्णा व दाभोलकर यांच्या पुढाकाराने झालाही होता.
बीड जिल्ह्य़ात ग्रामसंरक्षक दलाचा प्रयोग यशस्वी ठरतो आहे. बीडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी जिल्ह्य़ाच्या प्रत्येक गावातील महिलांना ओळखपत्र देऊन दारू पकडण्याचे अधिकार दिले आहेत. याचा खूप चांगला परिणाम होतो आहे. बीड जिल्ह्य़ाच्या या प्रयोगाचा अभ्यास करून ग्राम संरक्षक दलाची रचना करणे शक्य आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर सतत गावकऱ्यांना दारू पकडण्याचा अधिकार देण्याचा मुद्दा मांडत असत.
अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी १९५७च्या पोलीसपाटील कायद्यात पोलीसपाटलांवर आहेच. त्यांना या ग्रामरक्षक दलाचे सचिव करून त्यांच्यावर अवैध दारू रोखण्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य आहे. सतत अवैध दारू सापडली तर पोलीसपाटील पद त्या व्यक्तीचे रद्द करण्याचीही तरतूद व्हावी. दारू वाहणारे वाहन हे जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा अधिकार पोलिसांना द्यावा. दारूचे दुकान गावात येऊ द्यावे की नाही यासाठीही मतदान व्हावे. ‘उभी बाटली आडवी बाटली कायद्या’तील जाचक अटी रद्द कराव्यात.
हिवाळी अधिवेशनात हा कायदा येण्यापूर्वी यावर चर्चा व्हायला हवी. आज पोलीस व उत्पादन शुल्क अपुरे मनुष्यबळ व हितसंबंध यामुळे अवैध दारूकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा गावकऱ्यांना काही वैधानिक मर्यादित अधिकार देणे हाच व्यवहार्य उपाय आहे. हे काम पोलिसांना पर्यायी नाही तर पूरक असेल हे लक्षात घ्यायला हवे.

हेरंब कुलकर्णी
लेखक शैक्षणिक व सामाजिक  कार्यकर्ता आहेत.

या वाढीची फळे कोणती? - हेरंब कुलकर्णी

या वाढीची फळे कोणती?

इतर अन्यायाकडे विधिमंडळाचे लक्ष वेधता येते, पण इथे विधिमंडळाचा अन्याय निवारायला कोणाकडे जायचे?


अंगणवाडी सेविकांचे हे अश्रू २०१५ सालच्या मोच्र्यातले (एक्स्प्रेस संग्रहातून

आमदारांचे वेतनभत्ते  निवृत्तीवेतन यांत वाढ करण्यास विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यावरलोकमानसातून संतापाची प्रतिक्रिया आलीत्यापेक्षा चिंताजनक हे कीयातून लोकांना त्यागाचे आवाहनकरण्याचा नैतिक अधिकार राज्यकर्ते गमावतात आणि तुम्हाला जास्त तर आम्हालाही’ हे चक्र सुरू राहते..
वि. भि. कोलते यांनी साने गुरुजींना मुंबईहून नागपूरला व्याख्यानाला बोलविले. प्रथमवर्गाच्या प्रवास खर्चाला १०० रुपये दिले. गुरुजी तिसऱ्या वर्गाने प्रवास करून उरलेले ७३ रुपये परत देतात आणि म्हणतात ‘प्रथम वर्गाने प्रवास करणे हा धर्म आमचा नव्हे’. खूप आग्रह केल्यावर ते पैसे स्वत: न घेता साधनेत देणगी म्हणून जमा करतात.. दंतकथा वाटावी अशी महाराष्ट्रातील लोकसेवकांच्या आदर्शाची गाडी आता उलटी फिरून, नागपूरहून मुंबईला पोहोचली आहे. संघ प्रचारकांच्या त्यागी परंपरा बघितलेल्या पक्षाने धनाढय़ लोकसेवक ही कल्पना अलीकडेच आमदारांसाठी झालेल्या भत्ते/निवृत्तिवेतनवाढीतून महाराष्ट्राला शिकवली आहे. इतर वेळी अतिशय त्वेषाने बोलणारे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या विधेयकावर गप्प राहण्यात नेमका कोणता करार आहे? माध्यमांत आणि समाजमाध्यमांत या निर्णयावर आक्रमक टीका, तर दुसरीकडे सर्वपक्षीय आमदार, मंत्री यांचा सन्नाटा आहे. पुन्हा विधेयक मंजूर करण्याची वेळ ही अशी, की अधिवेशन संपल्यावर पुन्हा त्यावर फारशी चर्चा होणार नाही. राज्यभरचा पाऊस आणि महाड दुर्घटना यांत माध्यमे आणि लोक गुंतल्यामुळे कुणी फारसे बोललेही नाही. आता ज्यांना विरोध करायचा त्यांनी थेट न्यायालयात जाऊन आपले लाखभर रुपये खर्च करून या लखोपती वेतनवाढीला विरोध करायचा. इतर अन्यायाकडे विधिमंडळाचे लक्ष वेधता येते, पण इथे विधिमंडळाचा अन्याय निवारायला कोणाकडे जायचे?
हे मान्यच आहे की, यात खरेच साधेपणाने जगणाऱ्या आमदारांवर लोकांच्या संतापाने अन्याय होईल व शरद पवार म्हणाले तसे, ‘मुंबईसारख्या ठिकाणी राहणे, तेथील नोकरचाकर, कार्यकर्ते तसेच आमदार महोदयांच्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींवर होणारा खर्च अमाप असतो.’  तरीही सामान्य माणसे जास्त संतापतात; कारण लोकप्रतिनिधींचा वेगाने वाढणारा संपत्तीचा आलेख, निवडणुकीतला खर्च हे बघता, ‘यांना पगार व इतर रकमेची गरजच काय?’ हा एक बिनतोड सवाल या संतापाच्या मुळाशी असतो. एखाद्या श्रीमंताचे नाव दारिद्रय़रेषेत घुसडल्यावर जी लोकभावना होते तीच भावना येथेही असते.
लोक संतापतात, याचे कारण छोटय़ा छोटय़ा राजकीय भांडणात टोकाचे वादविवाद विधिमंडळात करून विधानसभा बंद पाडणारे, वाभाडे काढणारे या विषयावर क्षणात एकत्र होतात. इतर वेळी राज्याच्या आर्थिक दुरवस्थेवर गळे काढणारे सत्ताधारी आणि दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्येने दु:खी होण्याचा अभिनय करणारे विरोधक ते विषय क्षणात बाजूला सारतात. या ढोंगाची सामान्य माणसाला चीड असते.
इतक्या कमी रकमेच्या बोजाबाबत इतका संताप का असतो याचेही विश्लेषण करायला हवे. सातव्या वेतन आयोगाचा बोजा एक लाख कोटी रुपयांचा आहे, तर त्या तुलनेत आमदारांच्या वाढीव वेतन/भत्त्यांचा एकूण खर्च फक्त १२९ कोटींचा. प्रश्न या रकमेचा नसतोच. त्यामागच्या उद्दाम आणि असंवेदनशील मानसिकतेचा असतो.  या राज्यातील शेतकरी कर्जमाफी मागत असताना, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका मानधनवाढ मागत असताना, विनाअनुदानित शाळेतील शिक्षक १०० आंदोलने करत असताना आणि उपोषणात मरत असताना सतत एकच उत्तर-  शासनाकडे पैसा नाही व राज्यावर पावणेचार लाख कोटी रुपये कर्ज असल्याचे ऐकवले गेले. ते सर्वाना मान्य आहे. त्यामुळे सगळे गप्प होतात. राज्याची इतकी दयनीय स्थिती असताना स्वत:साठी मात्र ते क्षणात विसरले जाते. ‘पैसे नाहीत’ म्हणून फाटके कपडे घालून शाळेत पाठविल्या गेलेल्या लेकराने घरी यावे तर बाप नवे कपडे घालून मित्रासोबत पार्टी करत असावा हे बघितल्यावर जो संताप होईल तोच संताप आज खदखदतो आहे. आता राज्याची आर्थिक अडचण कुठे गेली हा सार्वत्रिक प्रश्न आहे.
मला स्वत:ला राज्यकर्त्यांनी यात जो त्यागाचे आवाहन करण्याचा नैतिक आधार गमावला हा सर्वात चिंतेचा विषय वाटतो. पंतप्रधानांच्या गॅस सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला जो प्रतिसाद मिळाला ते या देशात एक नवे पर्व सुरू झाल्याचे चिन्ह होते. दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्या काळात केलेल्या आवाहनाचे जागरण करत त्या राजकारणाला जोडणारे आवाहन होते. असे वाटले की, पंतप्रधान असेच आवाहन सातव्या आयोगाच्या वेळी करतील आणि देशाचा विकासदर वाढेपर्यंत तुम्ही वेतन आयोग घेऊ नका, आम्हीही वेतनकपात करतो असे म्हणतील पण ते घडले नाही. महाराष्ट्रात अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक वृत्तीविषयी आदराची भावना आहे. आम्ही वेतनकपात करतो, तुम्ही किमान दोन वर्षे वेतन आयोग मागू नका, असे आवाहन ते करतील असे वाटले होते. राज्यकर्त्यांची नियत चांगली असेल तर या देशात नक्कीच प्रतिसाद मिळतो. पण फडणवीस यांनी ती संधी गमावली आहे. यापुढे ते कर्जबाजारी राज्याचे कारण सांगून कुणाला गप्प करू शकणार नाहीत की कर्मचारी किंवा इतर समाजघटकांना त्यागाचे आवाहन करू शकणार नाहीत.
गेली १५ वर्षे वेतन आयोगांना विरोधी भूमिका घेताना माझा कर्मचारी मानसिकतेचा अभ्यास झाला. त्यात राज्यकर्ते जर उधळपट्टी करतात तर मग आम्हीच राज्याचा विचार का करायचा हा मुद्दा असतो. तेव्हा कोणतीही कार्यसंस्कृती आणि साधेपणा, त्याग ही मूल्यप्रणाली वरून खाली वाहत असते. आमदारांच्या या वागण्यामुळे आता हीच वृत्ती सर्व समाजघटक दाखवतील.
या निर्णयाचा सर्वात जास्त आनंद आमदारांपेक्षा कर्मचारी संघटनांना झाला असेल, कारण आता राज्याची आर्थिक अडचण आणि त्यागाचे आवाहन हे दोन्ही मुद्दे सातव्या वेतन आयोगाचा सामना सुरू होण्यापूर्वीच शासनाच्या बाजूने बाद झाले आहेत. आता ते कर्मचाऱ्यांना कोणत्या तोंडाने अडचणी सांगणार, किंवा राज्याच्या विकासासाठी काही वर्षे त्याग करण्याचे आवाहन करणार? फडणवीस यांच्या नि:स्पृह प्रतिमेचे दडपण येऊन कदाचित जी संभाव्य माघार घ्यावी लागली असती किंवा राज्याचे कर्ज व शेतकरी आत्महत्या यातून जे अपराधीभाव कर्मचारी संघटनांवर आले असते त्या अपराधी भावातून सुटका करण्याची महान कामगिरी आमदारांच्या या वेतनवाढीने केली आहे. त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ सातव्या वेतन आयोगाचा हा खड्डा किती रुपयांचा असेल एवढेच मोजणे सामान्य माणसांच्या हातात उरले आहे. कर्मचारी व राज्यकर्ते या दोघांनी तिजोरी रिकामी होण्याला दुसरा घटकच कसा जबाबदार आहे असे म्हणत आपला स्वार्थ साधायचा असे चालले आहे.
या निमित्ताने निवृतिवेतन या शब्दाची व्याख्याही तपासून बघायला हवी. एका खात्यात किमान २० वर्षे सतत नोकरी केली तर निवृत्तिवेतन दिले जाते. वय ५८ पूर्ण झाल्यावर आता शारीरिक श्रम किंवा इतर कोणतेही काम करू शकणार नाही, असे गृहीत धरून हे निवृत्तिवेतन दिले जाते. या निकषावर आमदारांना केवळ दोन वेळा आमदार झाल्यावर निवृत्त समजण्यामागे तर्कशास्त्र काय आहे? आज २५ वर्षांचा आमदार सलग दोन मुदतींत आमदार झाला तर ३५व्या वर्षांपासून पेन्शनला पात्र होतो. दुसरीकडे, कर्मचारी ५८व्या वर्षी काम करण्याचा थांबतो; पण राजकरणात तर साठीनंतर खरे करिअर सुरू होऊन ८०व्या वर्षीपर्यंत पदे भूषवली जातात. तेव्हा निवृत्त या शब्दालाच आव्हान द्यायला हवे. एकीकडे २००५ नंतर नोकरीला लागलेल्यांचे पेन्शन बंद केले आणि इथे विनाकारण ५०,००० रुपये पेन्शन मिळणार आहे.
जखमेवर मीठ चोळण्याचा भाग असा की शेतकरी, शेतमजूर बांधवांना पेन्शन द्या म्हणून कित्येक वर्षे मागणी होते आहे. आयुष्यभर राबलेला शेतमजूर कोणतेच काम वृद्धपणी करू शकत नाही. त्याला निर्वाहवेतन आवश्यक आहे. संसदेत असंघटितांना पेन्शन विधेयक प्रलंबित आहे. महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशी जी पेन्शन अत्यंत गरीब व गरजू निराधारांना दिली जाते तिची रक्कम १००० रुपयांपेक्षा जास्त नाही. तीही वेळेवर येत नाही. एकदा तर त्यात ३०० रुपये कपात झाली होती. या योजनांच्या ८५ लाख लाभार्थीवर मिळून फक्त १८०० कोटी खर्च केले जातात आणि इकडे ३६६ व्यक्तींवर १२९ कोटी.. असंघटित लोक  आणि लोकसेवकांतील ही विषमता ‘सम आर मोअर इक्वल’ या जॉर्ज ऑर्वेलने अधोरेखित केलेल्या विषमतानीतीची साक्ष पटवणारी आहे.

Tuesday, 20 February 2018

लावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे

लावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे


_Lavani_1.jpgमहाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे! मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी मिळाली नाही. कारण तमाशात सादर केली जाणारी लावणी म्हणजे कामोत्तेजक भावभावनांचे छचोर दर्शन असेच मानले गेले. तमाशा किंवा लावणी ही कला तिच्या अंगभूत लावण्यामुळे-सौंदर्यामुळे गावकुसाबाहेरून गावातील मंडळींना खुणावत राहिली. त्यामुळेच लावणीकला गावकुसाबाहेर राहूनही मृत पावली नाही. महाराष्ट्रातील इतर अनेक लोकनृत्ये त्यांचे स्वत्व पांढरपेशी कलांच्या प्रभावापुढे गमावत असताना लावणी मात्र तिचे अस्सल रांगडेपण टिकवून आहे. लावणीकलेला स्वतःचे स्वत्व टिकवणे शहरी संस्कृतीचा व कलांचा स्पर्श न झाल्यामुळे शक्य झाले आहे.
लावणी गेल्या दोन-तीन दशकांत मात्र पांढरपेशांचेही मनोरंजन करताना दिसत आहे. त्या कलेने अनेक बदल-स्थित्यंतरे पचवली आहेत. लावणी पेशवाईच्या अस्ताबरोबर संपली असे वाटत असतानाच, खोलवर घुसवली गेलेली ती कला जमिनीच्या आतून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने वर उन्मुक्तपणे फोफावलेली, बहरलेली जाणवते.
मराठी सारस्वताच्या गेल्या साडेसातशे वर्षांत संतांचे आणि पंतांचे साहित्य जसे टिकून राहिले तद्वत तंतांचे म्हणजे शाहिरांचे लावणीवाङ्मयही टिकून राहिले, कारण लावणी रचनाकारांनी लावणीमध्ये समाजमनाचा, समाजाच्या विशिष्ट भावनांचा वेध घेतला आहे.
लावणीचा अभ्यास प्रामुख्याने लावणीच्या संहितेच्या अंगाने झाला आहे. त्यामुळे लावणी म्हणजे काय, लावणीत हाताळले गेलेले विषय या अनुषंगाने लावणीवर चर्चा होत राहिली. परंतु तिच्या दृश्यरूपाबद्दल - सादरीकरणाबद्दल कमी लिहिले गेले. तसेच, लावणी हे तमाशातील गण-गवळण-बतावणी या शृंखलेतील एक अंग असल्यामुळे ‘तमाशातील एक उपांग’ एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून लावणीकडे बघितले गेले. लावणीचे जे स्वरूप सद्यकाळात बघायला मिळते, त्यातून ‘लावणी’ या शब्दाचा नेमका अर्थबोध होत नाही.
- व्युत्पत्तिकोशकार कृ.पां. कुलकर्णी यांनी लावणी म्हणजे एक प्रकारचे ग्राम्यगीत (A kind of rural erotic song) अशी ‘लावणी’ची व्याख्या केली आहे. त्यांनी ती व्याख्या करतानाच ग्राम्यता, शृंगारिकता व गेयता अशी लावणीची तीन प्रमुख लक्षणे सांगितली आहेत.
- अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी ‘जी हृदयाला चटका लावते ती लावणी’ असे म्हटले आहे.
- प्रसिद्ध साहित्यिक दुर्गा भागवत यांनी ‘शेतात लावणी करताना म्हटले जाणारे गीत ते लावणी’ अशी लावणीची व्याख्या केली आहे (‘लोकसाहित्याची रूपरेखा’). दुर्गा भागवत यांनी पुढे म्हटले, की लावणी करताना म्हटली जाणारी कृषिकर्मातील ती गीते गाण्याची प्रथा नंतर सार्वत्रिक पावली.
- समीक्षक म. वा. धोंड म्हणतात, ‘सर्वसामान्य जनांच्या मनोरंजनाकरता त्यांना रूचतील अशा लौकिक, पौराणिक वा आध्यात्मिक विषयांवर रचलेली, कडे व ढोलके यांच्या तालावर विशिष्ट ढंगाने म्हटलेली खटकेबाज व सफाईदार पद्यावर्तनी वा भृंगावर्तनी जातिरचना म्हणजे लावणी.’ (‘म‍ऱ्हाटी लावणी’)
- डॉ. प्रभाकर मांडे यांनी लावणीची व्याख्या केली आहे, की लावणी ही एक प्रकारची कविता, गाणे, चीज असून डफ, तुणतुणे, टाळ व दिमडी-ढोलके इत्यादी वाद्यांच्या जोडीने ते म्हटले जाते. लावणी हा गायनप्रकार प्रामुख्याने भावनात्मक संगीताचा असल्याने लावणी म्हणजे शृंगार-विरहाचा परिपोष करणारी बहुजनसमाजाच्या बोलीभाषेतील भावगीतिकाच होय.
- तमाशा परंपरेत लहानाचे मोठे झालेले नामदेव व्हटकर यांनीही लावणीची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ती व्याख्या अधिक सुसंगत आहे. ते लिहितात- ‘पूर्वीच्या काळातील गाणारा अशिक्षित कवी आपल्या साथीदारांच्या ताफ्यात बसून कशी रचना करत असेल, याचे चित्र डोळ्यांपुढे आणले, की ‘लावणी’ शब्द कोठून आला ते झटकन उमगते. ढोलकी किंवा तुणतुणे यांची बारीक साथ चालू आहे. शाहीर शून्यात बघत शब्द हुडकून आणून एकापुढे एक लावत आहे. घाट, माट, थाट अशी यमके ठेक्यात जुळून शब्दांची बरोबर लावण झाली, गाणे तालासुरात री ओढणा‍ऱ्यांनाही चांगले जमून ठाकठीक बसले, की मग ते पूर्ण झाले. अशा वेळी अमक्या विषयावरची लावण किंवा लावणी झाली का? असे विचारले जाई. म्हणूनच शब्दांच्या या लावणीवरूनच ‘लावणी’ हा शब्द आला असावा.’ (‘मराठीची लोककला-तमाशा’)
- काही मान्यवरांनी लवण म्हणजे सुंदर. तसेच लवण या शब्दाचा अर्थ मीठ असाही आहे. मिठाने जशी जेवणाची गोडी वाढते, तशी लावणीमुळे नृत्याची गोडी वाढते, म्हणून लवण या शब्दावरूनच ‘लावणी’ शब्द आल्याचाही निष्कर्ष काढला आहे.
- काहींनी आकर्षक शब्दांची सुभग मांडणी म्हणजे लावणी अशीही व्याख्या केली आहे.
या व्याख्यांव्यतिरिक्त लावणीची व्युत्पत्ती सांगण्याचा एक प्रयत्न ‘लावणी’ नृत्यातील एका विशिष्ट हालचालीवरूनही केला गेला आहे. लावणीतील नर्तकी ‘कंबर हलवी शंभर जागी लवून’ म्हणून ती लवणी म्हणजे लावणी अशी व्याख्या केली गेली आहे. लावणी या नृत्यप्रकाराच्या अशा विविध व्याख्या केल्या गेल्या असल्या, तरी ‘लावणी’ची एकच एक व्यवच्छेदक व्याख्या केली गेलेली नाही. वरील कोठल्याही व्याख्येतून लावणीचा उगम व विकास यांचा नेमका बोध होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभ्यासकांनी लावणीची व्याख्या करताना गेल्या साडेतीनशे वर्षांतील लावणीची परंपराच डोळ्यांसमोर ठेवलेली दिसते, पण लावणी हा शब्द थेट ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतही आढळतो. उपलब्ध असलेली सगळ्यात जुनी लावणी मन्मथ शिवलिंग यांची असून ती क‍ऱ्हाडच्या भवानीदेवीवर रचलेली आहे. तसेच ती चौदाव्या शतकातील आहे. म्हणजे लावणी हा शब्द अकराव्या शतकापासूनच प्रचलित होता.
महाराष्ट्रातील लावणी किंवा तमाशा यांचा मूळ स्रोत उत्तरेत असल्याचे म्हटले जाते. ते खरेही काही अंशी आहे. लावणी हा शब्द मराठी सारस्वतात पूर्वापार वापरात असला आणि लावण्या चौदाव्या शतकापासून लिहिल्या जात असल्या, तरी त्यात स्त्रीचे नृत्य हा प्रकार नव्हता. सुरुवातीला, लावणी रचणारे कवी किंवा शाहीर स्वतः डफाच्या साथीने लावणी जमावासमोर सादर करत असत. रामजोशी-होनाजी बाळा यांच्या काळातही लावणीगायन हे प्रामुख्याने त्या-त्या शाहिराने केले. कालांतराने, मोगलांचे आक्रमण महाराष्ट्रावर झाले, तेव्हा त्या सैन्याबरोबर त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नर्तिकांचा वर्गही आला. त्या नर्तिका दिवाणखाना पद्धतीनुसार नाचून-गाऊन मुस्लिम सैन्याचे मनोरंजन करत. ते नाचगाणे महाराष्ट्रातील तत्कालीन कोल्हाटी-धनगर-मांग अशा फिरस्त्या असलेल्या जमातींनी पाहिले आणि आत्मसात केले. त्या समाजातील मंडळी तमाशा क्षेत्रात अधिक असण्यामागील कारण ते होय.
लावणीत सादर केले जाणारे स्त्रीनृत्य हे लावणीचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र त्या नृत्याची सुरुवात नेमकी कशी झाली हे अनुत्तरित आहे. लावणीनृत्यातील तत्कारांसारख्या पदन्यासावरून ते उत्तरेतील ‘कथक’ या शास्त्रीय नृत्यातून आले असावे असे जाणकारांचे मत आहे. मुस्लिम सैन्याबरोबर आलेल्या नृत्यांगना तशा प्रकारचे नृत्य करत असल्यामुळे ते काही अंशी खरेही आहे. परंतु पदन्यासातील तत्कार सोडला तर लावणीनृत्याचा उत्तरेकडील नृत्याशी काहीही संबंध नाही. उलट, महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या वाघ्या-मुरळी नृत्याशी लावणीनृत्याचा अधिक जवळचा संबंध आहे. वाघ्या-मुरळी नृत्यात मुरळी ज्याप्रमाणे कमरेत वाकतात किंवा हाताच्या मुद्रा करतात, त्याप्रमाणेच लावणीनर्तिका करतात.
महाराष्ट्रात समाजाच्या मनोरंजनासाठी म्हणून स्त्रीने नाचणे या प्रकारची कोठलीही कला अस्तित्वात नव्हती. तामिळनाडूमध्ये देवाच्या मनोरंजनासाठी देवदासी नाचत, त्यांच्या दासीअट्टमपासून भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याची निर्मिती झाली किंवा ओरिसातील मदिरांत देवदासी करत असलेल्या ‘महारी’ नृत्यातून प्रसिद्ध ओडिसी या शास्त्रीय नृत्याचा जन्म झाला. महाराष्ट्रात तसे झाले नाही. महाराष्ट्रात विविध देवदेवतांना स्त्रीपुरुष ‘सोडण्या’ची प्रथा होती. उदाहरणार्थ, रवळनाथाच्या भाविणी, खंडोबाच्या वाघ्या-मुरळी... त्या सा‍ऱ्यांनी देवाची सेवा करावी एवढाच हेतू सुरुवातीला होता. त्यात नृत्य वगैरे भाग नव्हता, मात्र गाणे आवर्जून असायचे. अनेक भाविणी देवासाठी म्हणून गायच्या.
सुरुवातीच्या काळात, तमाशात स्त्रीपात्र नव्हते. पुरुष नाचे स्त्रीपात्र रंगवून नाचायचे. तमाशात किंवा लावणीत स्त्री नाचवण्याची पद्धत रूढ झाली ती पेशवाईत. दुस‍ऱ्या बाजीरावाने शाहिरांना आणि त्यांच्या लावणीकलेला प्रोत्साहन दिल्यामुळे त्या काळात मोठ्या प्रमाणावर लावणीची रचना झाली. तसेच, राजाश्रय मिळतो म्हणून अनेक जण त्या क्षेत्रात आले. त्या काळात अनेक महिलाही लावणीगायन करायच्या. त्यांचे गाणे खुलेआम रस्त्यावर होत नसे. कलावंतिणी बावनखणीसारख्या बंदिस्त वास्तूंमध्ये गात. त्यांचे गाणे ऐकण्यास तत्कालीन प्रतिष्ठित समाज जात असे.
लावणी ही स्त्रीनृत्यप्रधान कला असल्यामुळे त्याकडे सारेजण आकर्षित झालेले दिसतात. लावणीचे सादरीकरणानुसार कोणकोणते भेद आहेत यावर फार लिहिले-बोलले गेलेले नाही. लावणीचे त्यानुसार तीन प्रमुख भेद पडतात. पैकी पहिली शाहिरी लावणी, दुसरी बैठकीची लावणी आणि तिसरी फडाची लावणी. पैकी शाहिरी लावणी शाहीर त्याच्या साथीदारांच्या मदतीने व डफ-तुणतुण्याच्या साथीने सादर करतो. शाहीर सादर करत असलेली लावणी काहीशी उच्च स्वरातील म्हणजे पोवाड्याशी मेळ साधणारी असते. शाहिरी लावणीत नर्तिका नसते. शाहीर व त्याचे झिलकरी आवाजाच्या चढउताराने लावणी रंगवतात. बैठकीची लावणी हा प्रकार महत्त्वाचा आहे. त्या प्रकारात लावणी बसून सादर केली जाते. मात्र बसून सादर केली जाते, म्हणून ती बैठकीची लावणी नव्हे! तर कोणीतरी आयोजित केलेल्या बैठकीत सादर होणारी, म्हणून ती बैठकीची लावणी! उत्तरप्रदेशात लखनौमधील कोठींवर ज्याप्रमाणे ठुमरी-दाद‍ऱ्याची बरसात रसिकांवर केली जाते, त्याचप्रमाणे बैठकीच्या लावणीत शास्त्रीय ढंगाच्या विलंबित गतीच्या लावण्या सादर केल्या जातात. बैठकीच्या लावण्या या उपशास्त्रीय प्रकारात मोडतात. साथीची वाद्येही तेथे नेहमीपेक्षा वेगळी असतात. उदाहरणार्थ, फडाच्या लावणीत ढोलके-तुणतुणे ही वाद्ये असतात. परंतु बैठकीच्या लावणीत साथीला तबला, पेटी आणि सारंगी अशी खानदानी शास्त्रीय वाद्ये असतात. बैठकीच्या लावणीत गाणारी कलावती गाणा‍ऱ्याबरोबर बसून भावदर्शक अभिनयही करते. तिचा तो अभिनय केवळ चेह‍ऱ्यावरील नसतो, तर ती संपूर्ण अंगाने, पण बसूनच बोलत असते. गायिका गाण्याबरोबर करत असलेल्या त्या अभिनयाला ‘अदा’ असे तमासगिरांच्या भाषेत बोलले जाते, तर चेह‍ऱ्यावरच्या अभिनयाला ‘भावकाम’ असा शब्द वापरला जातो. पेशवाईत बैठकीची लावणी सादर करणा‍ऱ्या अनेक कलावती होत्या. त्यांचा मुक्काम व दिवाणखाने पुण्याच्या शुक्रवारपेठेतील बावनखणी या परिसरात असायचे. बैठकीच्या लावण्या म्हणणा‍ऱ्या गायिकांचे उपकार महाराष्ट्रावर खूप आहेत, कारण त्यांनीच उत्तर पेशवाईत नावारूपाला आलेली लावणीकला ख‍ऱ्या अर्थाने जोपासली. त्याचे श्रेयही दुस‍ऱ्या बाजीरावालाच जाते. त्याने शास्त्रीय ढंगाच्या ठुम‍ऱ्या-दादरे ऐकले होते. त्याने त्याच्या दरबारी असलेल्या होनाजी बाळाला ते ऐकूनच शास्त्रीय ढंगात म्हणता येतील, अशा लावण्यांची रचना करण्यास सांगितले. शाहिरांनी तशा लावण्या रचून सादर केल्याही. मात्र पेशवाई १८१८ मध्ये बुडाल्यावर लावणी कलेला कोणी वाली उरला नाही. साहजिकच, शाहीरही पेशवाईबरोबर देशोधडीला लागले. बैठकीच्या किंबहुना, एकूणच लावणीच्या त्या पडत्या काळात बावनखणीतील कलावंतिणींनी पेशवाईतील लावण्या आत्मसात करून-टिकवून ठेवल्या. त्यांच्यामुळेच लावणीचा पारंपरिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचला आहे.
बैठकीच्या लावण्या उत्तरेतील मुज‍ऱ्याच्या धर्तीवर म्हणणा‍ऱ्या अनेक नामवंत गायिका महाराष्ट्रात होऊन गेल्या. त्यामध्ये बाई सुंदराबाई, कौसल्याबाई कोपरगावकर, गोदावरी पुणेकर, अनसूयाबाई जेजुरीकर अशा गायिकांचा आदराने उल्लेख करावा लागेल. ज्यांनी बैठकीची लावणी गायली-जपली अशा यमुनाबाई वाईकर, गुलाबबाई संगमनेरकर यांच्यासारखे मोजके कलावंत विसाव्या शतकात होते.
फडाच्या लावणीला लावणीच्या क्षेत्रात प्रतिष्ठा अधिक आहे. फडाच्या लावणीची खासीयत म्हणजे त्या लावणी प्रकारात मुख्य नर्तकीबरोबर नाच्या-सोंगाड्या असे इतर साथीदार असतात. नर्तकी लावणी उभ्याने नाचून सादर करते. फडाच्या लावणीत गाणारी वेगळी असते आणि नाचणारी वेगळी असते. मात्र ‘बैठकीची लावणी’ व ‘फडाची लावणी’ यांमधील मुख्य भेद म्हणजे बैठकीची लावणी संथ असते, तर फडाची लावणी जलदगतीची असते. तसेच, फडाच्या लावणीत ढोलकी आणि तुणतुणे यांना अतिशय महत्त्व असते. फडाच्या लावणीला ढोलकीची लावणी असेही म्हणतात.
फडाची लावणी हा लावणीचा मुख्य प्रकार असला तरी त्यात चौकाची लावणी, छक्कड लावणी, बालेघाटी, जुनरी, धनगरी असे काही पोट प्रकार आहेत. त्यांतील बालेघाटी, जुनरी व धनगरी लावणी हे भेद प्रादेशिकतेमुळे व विशिष्ट जमातीमुळे पडलेले आहेत. मात्र चौकाची लावणी व छक्कड लावणी हे भेद लावणीच्या ठरावीक गुणवैशिष्ट्यांमुळे पडलेले आहेत. उदाहरणार्थ, चौकाची लावणी मोठी असून चार चार ओळींचे एकेक कडवे असते. प्रत्येक लावणीत तशी चारपाच कडवी असतात. चौकाच्या लावणीचे वेगळेपण म्हणजे त्या लावणीत प्रत्येक कडव्याची चाल वेगळी असते तर छक्कड लावणीत फक्त सहा ओळी असतात. त्या लावणीची मांडणीही विशिष्ट पद्धतीने केलेली असते. त्या लावणीत सहा ओळींची वैशिष्ट्यपूर्ण विभागणी केलेली असते. ती विभागणी दोन ओळी + तीन ओळी + एक ओळ अशी असते. उदाहरण म्हणून अप्पा तांबोळी यांची पुढील लावणी पाहा –
जाता जाता धक्का यानं मारला गं
कसा मस्तीचा बोकुड मेला
मी जात होते पाण्याला
माझ्या मागून चोरावानी आला
शिरी माठ भरून घेतला
यानं निरीस हात माझ्या घातला गं...कसा मस्तीचा बोकुड मेला
म्हणजे दोन ओळींचे ध्रुपद, तीन ओळींचा अंतरा आणि सहावी ओळ पुन्हा मूळ ध्रुपदाला जोडून घेतलेली.
लावण्या, त्यांच्यामध्ये ‘चौकाची’, ‘छक्कड’ असा फरक असला तरी जलदगतीच्याच असतात. त्यामुळे त्या रसिकांना आवडतात. त्याउलट, बैठकीच्या लावण्या ठाय लयीत असल्यामुळे त्या फक्त संगीताचे दर्दी असलेल्यांना आवडतात. लावण्यांचे असे काही भेद आहेत. मात्र लावण्यांचा विचार सादरीकरणातील त्या भेदांच्या अंगानेच व्हायला हवा. कारण वर्षांमागून वर्षें सरली तरी संहिता कायम असते. फरक पडतो, तो सादरीकरणात. तेव्हा गेल्या काही वर्षांत बदललेल्या लावणीच्या फॉर्मचा विचार व्हायला हवा!
- मुकुंद कुळे, 9769982424

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...