Flash

Tuesday, 4 September 2018

साहिर अमृता व इमरोज.... प्रतीक पाटील

"जब कोई पुरुष महिलाओं की शक्तियों से इन्कार करता है तो वह अपने अपचेतन से इन्कार करता है- अमृता प्रीतम 📚 सर्वोच्च साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक व कवियत्री पदमविभूषण अमृता प्रीतम यांची आज ९९ वी जयंती, नुकतीच 'बीबीसी हिस्ट्री'ने जग बदलणाऱ्या १०० महिलांच्या यादीत भारतातील मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी आणि अमृता प्रीतम यांचा समावेश केलाय फक्त यावरून त्यांची उंची कळावी.
वयाच्या १६ व्या वर्षी जिचं पहिलं पुस्तक आलं, व त्याच वर्षी तिच्याहून थोराड संपादक असलेल्या व्यसनी माणसाबरोबर लग्न झालं,दोन आपत्य झाली नंतर ते लग्न काही दिवसात मोडलं. पुढे साहिर लुधियानवी या शायरवर केलेले व साहिरने देखील केलेलं अव्यक्त प्लेटोनिक प्रेम. पुढे जाऊन नियतीने वेगळे झाल्यावर वयाच्या चाळिसाव्या वर्षी आपल्याहून सहा वर्षांनी लहान अश्या चित्रकार इमरोजबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अमृता प्रीतम. वयाच्या 86 व्या वर्षी त्या गेल्या (31 August 1919 – 31 October 2005) तोपर्यंत जवळपास १०० एक पुस्तक व अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर होते.त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान. पंजाबी साहित्यातील सर्वोच्च प्रतिभा म्हणून त्या कायम स्मरणात
राहतील.
साहिर साब व अमृताजी दोघेही लाहोरचे, साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते. साहिरबद्दल लिहिताना अमृता प्रीतम एके ठिकाणी म्हणतात- "साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेरपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं.
दिल में एक चिंगारी डालकर
जब कोई सांस लेता है
कितने अंगारे सुलग उठते हैं
तू उन्हें क्यों नहीं गिनती
साहिर एकदा लाहोरला अमृताजींच्या घरी आले होते. दोघे फक्त एकमेकांना पाहत राहिले काहीही न बोलता, साहिर एकापाठोपाठ एक अश्या सिगारेट मारत राहिला होता इतका की अर्धी खोली त्याच्या अर्धवट राहिलेल्या सिगारेटच्या थोटकांनी भरून गेली. तो गेल्यावर त्यांनी ती थोटकं जमा केली व नंतर रोज ओढू लागल्या. त्या म्हणत असं वाटतं की जणू साहिर त्यांच्या हातात हात घालून आहे. तिला जणू साहिरच चं व्यसन लागलं होतं. तिनं लिहलंय की,
यह आग की बात है, तूने यह बात सुनाई है
यह जिंदगी की वही सिगरेट है,जो तूने कभी सुलगाई थी
चिंगारी तूने दी थी, यह दिल सदा जलता रहा
वक्त कलम पकड़ कर, कोई हिसाब लिखता रहा
जिंदगी का अब गम नहीं, इस आग को संभाल ले
तेरे हाथ की खेर मांगती हूं, अब और सिगरेट जला 🕯️
त्यांची पहिली भेट एका मुशायरा ( कवी संमेलन) मध्ये झाली होती, अमृताजी त्यांच्या शायरीच्या व ओघानेच त्यांच्या प्रेमात पडल्या. त्या दिवशी पाऊस होत होता घरी आल्यावरही त्या मंत्रमुग्ध झाल्यासारख्या होत्या ती जादू काही केल्या उतरत नव्हती. त्यावर त्यांचं सुंदर भाष्य त्यांच्याच शब्दात :
मुझे नहीं मालूम के साहिर के लफ्जो की जादूगरी थी या उनकी खामोश नजर का कमाल था लेकिन कुछ तो था जिसने मुझे अपनी तरफ खींच लिया। आज जब उस रात को मुड़कर देखती हूं तो ऐसा समझ आता है कि तकदीर ने मेरे दिल में इश्क की बीज डाला जिसे बारिश खी फुहारों ने बढ़ा दिया.
एकदा जयदेव साहिर यांच्या घरी आले होते, त्यांना टेबलावर एक चहाचा कप कित्येक महिने न धुतल्यासारखा बुरशी लागून असलेल्या अवस्थेत पडून होता. तो घाण कप फेकावा म्हणून जयदेव हात लावणार तेवढ्यात साहिर म्हणाले " तो तसाच ठेव, ती अमृताची आठवण आहे. ती आली होती तेव्हा तिने यात चहा पिला होता."
साहिर आजन्म अविवाहित राहिले. असं म्हणतात की साहिरची आईला त्यांचं प्रेम काही मान्य नव्हतं. काय कारण असेल ते असो, हे प्रेमी काही कधी लौकिक अर्थाने एकत्र आले नाही. एकदा अमृताजी साहिर यांच्या घरी गेल्या होत्या, त्या त्यांच्या आईला भेटून गेल्यावर साहिर आईला म्हणाले की " आई ही मुलगी तुझी सून झाली असती "
साहिर यांची शायरी व गाणीही बरीचशी या अव्यक्त नात्यावर आधारित आहे. भारताचा हा सर्वोत्तम गीतकार आपल्या गाण्यातून यावर लिहून जातो की :
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
चलो इक बार फिर से अज़नबी बन जाएँ हम दोनों
हा लेख बराच मोठा झाला आहे, तेव्हा साहिर व अमृताजी यांच्या विषयावर इथेच थांबतो.
इमरोज व अमृताजी यावर परत कधीतरी ............#प्रP
साहिर मेरे जिंदगी के लिये आसमान है
और इमरोज मेरे घर की छत - अमृता प्रीतम






"आपण दोघे चीनला जाऊ" साहिर अमृताला म्हणाला.
आश्चर्य वाटून तिनं विचारलं की " आपण चीनला जाऊन काय करणार ? "
" काय म्हणजे आपण तिथं शायरी करु "
" शायरी तर आपण इथे ही करू शकतो "
"हो पण आपण तिथं गेलो आणि कधी परत आलोच नाही तर"
ही अब्दुल हाई उर्फ साहिरची पद्धत होती प्रपोज करण्याची,म्हणजे तिथंच स्थायिक होऊ आपण दोघे असं. #प्रP
इतकं सगळं असून दोघे एकत्र का आले नाही, याचं उत्तर मला असं वाटतं की साहिरला Oedipus Complex होता. आईप्रति प्रचंड प्रेम व वडिलांच्या विषयी अतिशय द्वेष. लुधियानाचे जमीनदार असलेले फझल मोहम्मद (वडील) यांच्या त्रासाला कंटाळून सरदार बेगम (आई) वेगळी झाली, वडिलांनी नंतर दुसरं लग्न केलं मात्र मुलाचा ताबा आपल्याकडे रहावा म्हणून आईला कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. पुढे ते लाहोरला (१९४३) आले, पुढे १९४९ ला मुंबईत. गरिबीत आईने त्याला वाढवलं. साहिर हे सर्व पाहत होता. त्याच्या आईचा त्याच्या जीवनावर प्रचंड प्रभाव होता. काही असंही म्हणतात त्याचा आई मुळेच तो एकटा राहिला.
लाहोरला रात्री अमृताला तिच्या घरी भेटायला जाणारा किंवा दिल्लीत भरलेल्या पहिल्या एशियन रायटर्स कॉन्फरन्समध्ये प्रतिनिधींच्या कोटावर लावण्यात आलेल्या नावांच्या बिल्ल्यांची अदलाबदल करून स्वत:च्या कोटावर ‘अमृता’ आणि अमृताच्या कोटावर ‘साहिर’ नावाचा बिल्ला लावणारा साहिर यांची प्रेम कहाणी साहिरने कधी स्पष्टपणे पुढाकार घेऊन किंवा सांगून पूर्ण केली नाही. तो निःशब्द राहिला.
बरं अमृता का दूर गेली ? इमरोजबरोबर का राहू लागली. इमरोजच्या पाठीवर साहिर साहिर लिहिणारी दूर गेली कारण साहिर १९५० दरम्यान चित्रपटात नशीब आजमावून पाहायला आलेली गायिका १८ वर्ष्याची तरुणी सुधा मल्होत्रा हिच्यावर भाळला होता. तिला काम मिळवून देण्यात याचाच हात होता. साहिरचीच गाणी तिने सर्वाधिक गायली यावरून कळून यावं. साहिर दररोजच तिला सकाळी कामानिमित्त फोन करत, सुधा मल्होत्राचा काका त्याचा फोन आला की म्हणत आली तुझी गुड मॉर्निंग ची बेल. १९६० मध्ये इंडस्ट्रीत जेव्हा यांच्या चर्चा अफवा पसरू लागल्या त्याच दरम्यान चित्रकार इमरोज अमृताच्या एका पुस्तकाच्या कव्हर बनवण्याच्या निमित्ताने भेटू लागला होता व साहिरच्या अफवा ऐकून अमृताजी या इमरोजकडे साथीदार म्हणून पाहू लागल्या असाव्यात.
सुधा मल्होत्रा यांना नंतर विचारलं होतं की तुमचं त्यांच्यावर प्रेम होतं का ? तर यावर सुधा बोलल्या की त्यांनी साहिरला त्या नजरेने पाहिलंच नाही. पुढे सुधा मल्होत्रा यांचं गिरीधर मोटवणी यांच्याशी लग्न झालं. पद्मश्री सुधा मल्होत्रा यांनी मराठीत शुक्रतारा मंद वारा व अशी अनेक भावगीतं देखील गायली आहेत. स्त्रियांकडे आकर्षित होणारे साहिर कोणाजवळचं आपलं मन मोकळं करू शकले नाही, अबोल स्वभाव व आईप्रति आत्यंतिक काळजीने ते एकटेच राहिले असावे.
१९६४ साली जेव्हा अमृताजी व इमरोज त्यांना भेटायला मुंबईला आले तेव्हा साहिर म्हणाले :
महफिल से उठकर जाने वालो
तुम लोगों पर क्या इल्जाम
तुम आबाद घरों के वासी
मैं आवारा और बदनाम.
कारण काय असेल तर असो साहिर अमृता यांचं प्रेम सफल व्हायला हवं अशी सर्वांची मनोमन इच्छा असली तरी नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. इमरोज म्हणतो की, ‘‘साहिर नज्म से बेहतरीन नज्म तक पहुँचे. अमृता कविता से बेहतरीन कविता तक पहुँची. लेकिन दोनों जिंदगी तक न पहुँचे’. इमरोजला एकदा विचारलं होतं अमृता खरंच साहिरच्या प्रेमात होती का ? तर त्यावर तो म्हणाला की "ते दोघे एकमेकांवर खरंच प्रेम करीत नव्हते, साहिर जेव्हा मुशायरा असेल तेव्हाच दिल्लीत येत, व अमृता कधी मुंबईला गेली नाही जिथे साहिर राहत होता. साहिर हा कौटुंबिक जवाबदारी घेणारा माणूस नव्हता,हे अमृताला कळालं होतं "
कदाचित इतर मोठमोठ्या प्रेमकहाण्याप्रमाणे यांचं प्रेम आधुरं राहिलं म्हणूनच ती अमर कहाणी झाली, नाहीतर तो सर्वसामान्य संसार झाला असता. असो साहिर म्हणतो त्याप्रमाणे :
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा
(मागील लेख माझ्या वॉलवर ३१ ऑगस्टला लिहिला आहे)
पुढील लेख अमृता इमरोज वर .....................



ड्रायव्हर इमरोज असा पुकारा झाला की इमरोज गाडी घेऊन येत, अमृता प्रीतम या राज्यसभेच्या खासदार होत्या तेव्हा त्यांना घेऊन जाणे व आणणे हे काम इमरोज करत. अमृता येईपर्यंत त्यांना सोडल्यावर ते गाडीत बसून राहत तेव्हा लोकांना माहीत नव्हते की इमरोज कोण आहेत आणि ते ही कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडले नाहीत. दिल्लीतील कुठल्या दूतावासात जर अमृताला आमंत्रण असेल तर इमरोज त्यांना गाडीने सोडवत मात्र स्वतःला आमंत्रित केले नसल्यामुळे ते आत जात नसत, हळू हळू सगळ्यांना कळाले की ते त्यांचे सखा आहेत तेव्हा त्यांनाही आमंत्रित केले जाऊ लागले.
हा सिलसिला सुरू झाला तो १९५७ साली जेव्हा अमृताजी यांनी सेठी नामक चित्रकाराला आपल्या "आखरी खत" या पुस्तकाचे कव्हर बनवण्यास सांगितलं होतं. त्यांनी शमा मासिकात काम करणाऱ्या इंद्रजित उर्फ इमरोजचं नाव सुचवलं, हा माझ्यापेक्षा चांगलं काम करेल म्हणून. इमरोज तेव्हा दिल्लीत साऊथ पटेल नगर व अमृताजी वेस्ट पटेल नगर मध्ये राहत, इमरोज ते आठवताना म्हणतात की त्यांना पुस्तकाचं डिझाईन आवडलं आणि आर्टिस्ट देखील. काही दिवसांनी इमरोजचा वाढदिवस आला, तेव्हा अमृताला ते म्हणाले की माझा आज वाढदिवस, आमच्या गावाकडे कोणी वाढदिवस साजरा करत नाही मी ही कधी साजरा केला नाही. त्यावर अमृताजी बाहेर गेल्या व केक घेऊन आल्या. केक खाऊन झाल्यावर दोघे एकमेकांना बघत राहिले.
हळूहळू अमृताच्या घरी इमरोज रोज येऊ लागला, अमृताजी यांच्या १० व ११ वर्ष्याच्या मुलांना ते शाळेत स्कूटरवर घेऊन जाऊ लागले. एकदा ट्रिपल सीट वरून पोलिसांनी पावती फाडली, तेव्हा दोघांनी मिळून एक कार घेतली. १९५८ साली इमरोजला गुरुदत्त ( अभिनेता/ दिग्दर्शक) कडे काम लागलं, मानधनावरून गाडी आडली होती. इमरोज मुंबईला जाणार म्हणून अस्वस्थ होऊ लागल्या होत्या, तोंडाने मात्र एक शब्दही बोलत नव्हत्या. तीन दिवस राहिले तेव्हा " हे तीन दिवस मला माझे शेवटचे तीन दिवस वाटत आहे" म्हणाल्या. इमरोज मुंबईत गेल्यावर अमृताला ताप आला, हे कळल्यावर इमरोजदेखील हातातलं काम सोडून परत आला. त्याला रेल्वेतून उतरताना पाहताच त्यांचा ताप गेला. इमरोज मात्र त्यानंतर कधीच त्यांना सोडून गेला नाही.
भारतातील जाहीररीत्या एकत्र राहणारं हे पहिलं लिव्ह इन रिलेशनशिप जोडपं असावं. आपल्याहून वयाने आठ वर्षे लहान इमरोजबरोबर त्या एकाच छताखाली राहत असल्या तरी वेगवेगळ्या खोलीत ते झोपत. यावर इमरोजला कोणी छेडलं तर तो म्हणत की आम्हाला एकमेकांचा सुगंध येतो तेवढंच पुरेसे नाही का ? अमृता रात्री एकांतात लिहीत बसत, इमरोज मात्र लवकर झोपी जात. रात्री एक वाजता मात्र ते उठून अमृताजी यांना चहा बनवून देत. त्यांच्या लिखाणाच्या टेबलावर चहा ठेवून येत, अमृताजी लिखाणात इतक्या गर्क असत की त्या त्यांच्याकडे पाहत देखील नसत. इमरोजच्याच शब्दात " मर्द ने औरत के साथ अभी तक सोना‌ ही सीखा है, जागना नहीं, इसलिए मर्द और औरत का रिश्ता उलझनों का शिकार रहता है " हा सिलसिला चाळीस पन्नास चालत राहिला होता. समाज काय म्हणेल याची पर्वा दोघांनीही केली नाही, अमृताजी तर लहानपणापासूनच बंडखोर होत्या. इमरोज अमृताला म्हणाला की माझा समाज तू आणि तुझा समाज मी. बस्स का पर्वा करावी.
अगदी अमृताजी यांच्या शेवटच्या काळात देखील त्या एकदा बाथरूममध्ये घसरून पडल्या, त्यांच्या मांडीचं हाड मोडलं तेव्हा त्यांना उभं राहणं देखील अवघड झालं होतं. त्यावेळेस इमरोज त्यांना अंघोळ घालण्यापासून ते त्यांचे कपडे बद्लण्यापर्यंत सर्व काम करीत. अमृताजी यांच्या पतीला देखील त्यांनी वय झाल्यावर घरी आणलं होतं.
स्कूटरवरून जाताना सुरवातीच्या काळात अमृताजी बोटाने साहिर हे नाव इमरोजच्या पाठीवर लिहायची, इमरोजला ते कळत मात्र तो शांतपणे अमृताला समजून घेत. अमृता म्हणत की त्याने मला व माझ्या वेडेपणाला समजून घेतलं. त्याने माझा भूतकाळ स्वीकारला होता. माझं दुःख हे त्याने त्याचं दुःख म्हणून आपलं बनवणं हे त्याला माझ्यासाठी देव बनवतं. इमरोज एकदा बोलला होता, आम्ही एकमेकांना कोणताही शब्द दिला नाही की आणाभाका घेतल्या नाहीत. कोणतेही प्रश्न केले नाहीत की उत्तरं दिली नाहीत, परंतु प्रेम मात्र फुलत गेलं. अमृताजी व इमरोज एका निरपेक्ष धाग्याने बांधले गेले होते, इमरोज प्रेमी म्हणून साहिर व अमृताजी यांच्याहून अधिक वरचढ मानला गेला कारण प्रेम हे फक्त काही घेणं नसून देणंही आहे. संपूर्ण समर्पण हे ज्याला आलं तो अव्वल ठरतो. प्रतिभेने अमृता व साहिरहून कमी असलेला इमरोज अव्वल प्रेमी म्हणूनचं अढळ आहे. #प्रP
अमृताजी यांना जेव्हा शेवट जवळ आला हे कळालं तेव्हा त्यांनी इमरोजसाठी एक कविता लिहिली होती
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
शायद तेरे कल्पनाओं
की प्रेरणा बन
तेरे केनवास पर उतरुँगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
ख़ामोश तुझे देखती रहूँगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
या सूरज की लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूँगी
या रंगो की बाँहों में बैठ कर
तेरे केनवास पर बिछ जाऊँगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे ज़रुर मिलूँगी
या फिर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूँगी
और एक शीतल अहसास बन कर
तेरे सीने से लगूँगी
मैं और तो कुछ नहीं जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म ख़त्म होता है
तो सब कुछ ख़त्म हो जाता है
पर यादों के धागे
कायनात के लम्हें की तरह होते हैं
मैं उन लम्हों को चुनूँगी
उन धागों को समेट लूंगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
मैं तुझे फिर मिलूँगी!!
(हा साहिर अमृता व इमरोज यांच्यावरील तिसरा व अंतिम लेख आहे, अगोदरचे दोन लेख📚 माझ्या वॉलवर आहेत)



No comments:

Post a Comment

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...