Flash

Wednesday, 7 June 2017

नग्नता,मैथुन, कला आणि घुसमट: भारत एक शोध -राजू परुळेकर


IMG_8667
कलेच्या संस्कृतीच्या विकासामध्ये आणि ईश्वराच्या अस्तित्वामध्ये वस्त्र किंवा झाकणे हे कदापी अभिप्रेत नाही.
जगभर देवदेवतांचे नग्न पुतळे आणि शिल्पे बनवली गेली आहेत. भारतामध्येही देवदेवतांची आणि अवतारांची नग्न चित्रे आणि पुतळे बनवण्याची परंपरा ग्रीकांच्या आधीपासून अस्तित्वात होती.
एवढेच नव्हे, तर जगातला, भारतातला सनातन धर्म- ज्याला आता ‘हिंदू’ असे म्हणतात, तो बहुदा एकमेव धर्म असावा ज्यामध्ये लिंग आणि योनी पूजेला असाधारण महत्त्व आहे.
इस्लाम वगळता जगातल्या सर्व धर्मांनी नग्नतेला आदर आणि दैवी शक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. अनेक ग्रीक देवतांची नग्न शिल्पं किंवा ख्रिस्ती धर्मातील नग्न आणि अर्धनग्न शिल्प आणि चित्र प्रबोधनोत्तर (post renaissance) आपल्याला पाहायला मिळतात.
IMG_8665
भारतातील अनेक मंदिरात योनि व लिंग पूजा हही अनुक्रमे शक्ति व शिव पूजा मानली जाते. हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
IMG_8671
एम. एफ. हुसेन यांनी सरस्वती देवीचे नग्न चित्र काढल्यावर नग्नता म्हणजे संस्कृतीवरील आक्रमण असल्यासारखी ओरड हिंदू कट्टरवाद्यांनी सुरू केली.
त्यामध्ये दोन भाग होते-; एक म्हणजे चित्रकला, शिल्पकला व त्या संबंधीचा विचार, त्याची अॅनाटॉमी हे सारे समजून घेण्याची कट्टरवाद्यांची तयारी नव्हती आणि दुसरे म्हणजे या सर्वांना अचानक एम. एफ. हुसेन मुस्लीम असल्याचा साक्षात्कार झाला.
MF-Husain-007
खरं तर मक्बूल फिदा हुसेन हे पंढरपुरात जन्मलेले आणि भारतीय संस्कृतीची अस्सल जाण असणारे महान कलावंत होते. परंतु, एक हजार वर्षे इस्लामच्या गुलामीत राहिलेल्या भारताला इस्लामी संस्कृतीचा पराभव हा युद्धात फक्त ५० टक्के होऊ शकतो, उरलेला पराभव हा आपल्यासारखे त्यांना बनवण्यात आहे, त्यांच्यासारखे आपण बनण्यात नाही, याचा विसर पडला.
इस्लाम हा एक असा धर्म आहे, ज्याच्यामध्ये ‘द होली बुक’ (कुराण ए शरीफ) यावर प्रश्न उपस्थित करणे, वादाला आवाहन देणे किंवा स्वत:च्या मनाप्रमाणे अर्थ लावणे याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. याला ईश्वराविषयी किंवा पवित्र गोष्टींविषयी निंदात्मक बोलणे म्हणजे धर्मनिंदा (blasphemy) मानले जाते.
‘चार्ली  हेब्दो’ या नियतकालिकामध्ये प्रेषित महंमदांची नग्न चित्रे अनेकदा छापली गेली आहेत. डेन्मार्कमध्ये एका कार्टुनिस्टने प्रेषित महंमदांचं कार्टून छापलं होतं. या साऱ्यांना जगभराच्या मुसलमानांनी मृत्यूदंड फर्मावला.
IMG_8660‘चार्ली  हेब्दो’ नियतकालिकाचे संपादक स्टेफेन चार्ब याने अशा धमक्यांना भीक न घालता महंमदांची नग्न चित्रं आपल्या नियतकालिकामध्ये छापणं चालू ठेवलं. त्यामुळे या नियतकालिकावर पॅरिसमध्ये हल्ला करून संपादकासह अनेकांना मुस्लीम कट्टरवाद्यांनी ठार मारलं.
‘सैतानाची वचनं’ हे पुस्तक कुराण आणि महंमदाचा अपमान आहे, असं समजून सलमान रश्दी या लेखकाला कित्येक वर्षांपूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली आहे.
(ह्या लेखाच्या लेखकाने) स्वत: ‘चार्ली  हेब्दो’ या नियतकालिकामधील कार्टून्स ट्विटरवरून स्टेफेन चार्ब ह्यांच्या   मृत्यनंतर श्रद्धांजली म्हणून प्रसारित केली होती. ती लेखकाच्या  टाइमलाइनवर मागे जाऊन, वाचक पाहू शकतात.
तस्लीमा नसरीननेही कुराण, इस्लाममधील स्त्रियांची अवस्था, त्यांचे होणारे भयानक शोषण आणि लिंग व योनी यांना अपवित्र मानून झाकून ठेवण्याची प्रवृत्ती याविरुद्ध वेळोवेळी लेखन करून स्वत:वर स्वत:च्या देशातून निर्वासित होण्याची वेळ आणली. इस्लाम हा असा धर्म आहे, ज्यामध्ये एकाच वेळी ‘सेक्समॅनिया’ आणि ‘सेक्सचं दमन’ हे दोन्हीही सहअस्तित्व करून आहेत.
किंबहुना ते परपस्परावलंबी आहेत. जे झाकलं जातं, त्याचं अनिवार आकर्षण मनुष्याला वाटतं. कलेच्या बाबतीत झाकून ती दृग्गोच्चर करताच येत नाही. उदा. बुरख्यातील स्त्रीचं चित्र किंवा शिल्प किंवा कोणत्याही प्रकारचं कलात्मक अविष्करण करणं हे केवळ अशक्य आहे. धर्माचा उदय आणि कलेचा उदय हा बऱ्याचदा हातात हात घालून होत असतो आणि मुख्यत्वे करून त्या त्या धर्मातले ईश्वरी अवतार आणि देवदेवतांची चित्रं, शिल्प यातूनच कलेचा आविष्कार प्रत्येक धर्मात, प्रत्येक संस्कृतीत आणि प्रत्येक प्रांतात होत असतो. मायकेलअँजलो, लिओनार्दो द विन्सी पासून एम. एफ. हुसेन यांच्यापर्यंत अनेकांनी आणि इतर अनेक कलाकारांनी आपापल्या धर्मातील किंवा इतर धर्मातील व्यक्तिरेखा त्यांना जशा दिसतात, तशा रेखाटलेल्या आहेत. त्यांची तशी शिल्पं बनवलेली आहेत.
ईश्वरी अवतार मानवी फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही उभी  करता, मग ते चित्र असो वा शिल्प तेव्हा त्याची अॅनाटॉमी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. ही अॅनाटॉमी डॉक्टरइतकीच कुशलपणे चित्रकार, शिल्पकाराला शिकावी लागते. त्यामुळे नैतिक आणि अनैतिक (मॉरल आणि अमॉरल) असा विचार कलावंताच्या मनाला शिवत नाही. तो कायम ननैतिक  (amoral) असतो.
इस्लामच्या बाबतीत मूर्तीपूजा निषिद्ध आहे. कोणत्याही मानवी फॉर्ममध्ये ईश्वरी अंश चित्रित करणं निषिद्ध आहे. एवढंच नव्हे, तर प्रेषित महंमद आणि त्यांचे नंतरचे वारसदार यांचे चित्र निर्माण करणं किंवा पूजा करणं हेही निषिद्ध आहे, नव्हे ते मृत्यूदंडास पात्र आहे. मुसलमान हा पैगंबरांचा आदर करतो. पण इबादत (भक्ती) तो फक्त अल्लाहची करतो, जो अमूर्त आहे. प्रेषित महंमदांचे स्थान हे इस्लाममध्ये अल्लाहच्या दूताचे आहे. ते साक्षात ईश्वर किंवा ईश्वरी अवतार नव्हे. परंतु, ईश्वरी दूत असल्याने ते मुसलमानांमध्ये सर्वोच्च आदराला पात्र आहेत. इस्लाम स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर स्त्रीला दैवीपणाच्या जवळपास मानत नाही.
इस्लाममध्ये स्त्री देवता नाही. पैगंबराची पत्नी किंवा मुलगी यांच्याकडे आदराने पाहिले जाते पण देवतेच्या आसपास त्यांना स्थान नाही. इस्लाममध्ये स्त्री ही पुरुषाची मालमत्ता आहे पण त्याच वेळेला त्या मर्यादित परिघात तिला काही हक्कही देण्यात आलेले आहेत, ज्या हक्कांचा मुसलमान जणू काही मानवी हक्कांच्या पलीकडे तिला काही दिल्याचा गाजावाजा करत असतात, जे धादांत खोटे आहे. हिजाब, बुरखा आणि प्राप्त पुरुषाची सेवा हेच इस्लामच्या परिघातील स्त्रियांचे भागध्येय आहे.
या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर इस्लाममधल्या कुठच्या देवीचं किंवा देवाचं नग्न किंवा अर्धनग्न चित्र काढणं, शिल्प काढणं हे शक्यच नाही. कारण, मृत्यूदंडाची शिक्षा हा भाग जरी वगळला तरी चित्र, शिल्प, नग्नता, अर्धनग्नता जरी दाखवायचीच ठरवली तरी ती काल्पनिक आणि इस्लाम धर्मात वास्तविक आधारावर नसलेली करावी लागेल, ज्याची शिक्षा वास्तवाशी संबंध नसतानाही ‘चार्ली हेब्दो’प्रमाणे मृत्यूदंडाची मिळेल. इथे हे लक्षात घ्यायला हवं की, प्रेषित महंमदांचं चित्र, कार्टून किंवा त्या संदर्भातली नग्नता जर कुणी काढायची ठरवलीच तर तो सारा मामलाच काल्पनिक असतो. कारण अशी कुणी मूळ चित्रं किंवा कल्पनाचित्रं धर्मात उपलब्धच नाहीत. कारण ते निषद्ध आहे. त्यामुळे मॅडोना, व्हीनस, खजुराहोमधली चित्रं, कामाख्या मंदिरामधील नग्न जगन्मातेचं शक्तीपीठ या साऱ्या व अश्या प्रकारच्या इतर धर्मातील संकल्पनांशी इस्लामचा दुरान्वये संबंध नाही.
मक्बूल फिदा हुसेन यांनी श्रीगणेशाची काही अप्रतिम चित्रं काढलेली आहेत. त्यांना भारतीय संस्कृतीचं, हिंदू धर्माचं अचूक ज्ञान होतं. देवी आणि देवता ज्यांची आपण प्राचीन मंदिरांमध्ये पूजा करतो, ती शिल्पं दगडांमध्ये कोरलेली नग्न शिल्पं आहेत. भारतात देवीला जगन्माता म्हटलं जातं. माता आणि मुलाच्या मध्ये नग्नतेचा मुद्दाच उपस्थित होत नाही. किंबहुना तो तसा झाला, तर उपस्थित करणाऱ्यामध्ये मातेसंबंधी कामुकतेची खोट आहे, असे मानण्यात यावे.
भारतामध्ये अनेक देवतांना मग त्या पुरुष स्वरूपात असो वा स्त्री स्वरूपात असो; पहाटेची अंघोळ घालताना त्या देवतांच्या मूर्ती नग्न असतात. पुजारी आपल्या हाताने दूध, अत्तर, पाणी, तूप, दही या पंचामृताने चोळून त्यांना अंघोळ घालतो आणि मग त्या देवतांना वस्त्रे चढवली जातात. अपवादानेच काही मूर्ती ज्या अर्वाचीन काळात बनलेल्या आहेत त्यांच्या अंगावर मूर्तीकारानेच वस्त्रे चढवलेली आहेत. पण ही वस्त्रे चढवण्या अगोदर चित्रकाराला किंवा शिल्पकाराला देव आणि देवीची अॅनाटॉमी उत्कृष्ट स्वरूपात साकारण्यासाठी मूर्ती किंवा चित्रांचा नग्न स्वरूपात विचार करावाच लागतो.
कलावंत हा नैतिक किंवा अनैतिक असत नाही. तो ननैतिक असतो. कलावंत म्हणजे पुजारी नव्हे. हुसेन यांनी सरस्वतीचं नग्न चित्र काढलं, ही हजारो वर्षांची परंपरा होती. त्यांनी मुसलमानांच्या धर्मात असे करून दाखवावे, असे त्यांना सांगणे ही मूर्खतेची परिसीमा आहे. कारण वर उल्लेखल्या प्रमाणे मुस्लीम धर्म हा या प्रकारच्या  मानवी कलाविचारांपासून पारखा आहे. त्यांची शिल्पं ही इमारतींमध्ये, वास्तूशास्त्रामध्ये प्रकट होतात. ज्या कलेला स्वाभाविक पणे मानवी मूल्य वा मानवी चेहरा नसतो. हे एक प्रकारचे कलात्मक मागासलेपणच आहे.
भारतामध्ये कॅलेंडर्स आणि शिळा प्रेससाठी देवदेवतांचा मोठा व्यापार करण्याची परंपरा राजा रविवर्मा या चित्रकाराने सुरू केली. राजा रविवर्मा हा चित्रकार म्हणून थोर होता, पण कलेच्या तत्त्वज्ञानानुसार तो एक कृतक आणि बुरसटलेला होता. त्याने अनेक देवता, ह्युमन मॉडेलचा वापर करून, त्यांना कपडे घालून पॉप्युलिस्ट बनवलं. शिळा प्रेसवर छापलेली मॉडेल्स देवदेवतांची चित्रे हिंदूंच्या घराघरांत लागली. त्यामुळे असा भ्रम पसरला की, कलावंताने देवदेवतांना कपडे घालणं, हे बंधनकारक आहे. वास्तविक, ज्या समाजामध्ये देवाचे आणि देवतांचे असाधारण असे दैवी लैंगिक अविष्करण शिल्प आणि चित्रांमधून होत होते, तिथे प्रबोधन युगाच्या जागी अंधारयुग पसरले.
कामाख्या देवी ही हिंदूंचं सर्वांत मोठं शक्तिपीठ मानतात. कामाख्या मंदिरात योनी पूजा ही अतिपवित्र आणि त्यातून येणारे रक्त हे शक्तिबीज मानले जाते.
महादेव शंकराच्या बाबतीत लिंगपूजा ही भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नग्नतेची भिती आणि पथ्य हा हिंदू धर्माचा भागच नव्हता. किंबहुना इस्लाममधील अशा प्रकारचे समज हे हिंदू उदारवादाच्या विरोधात होते. हिंदू कट्टरवाद्यांनी भारतात हिंदूंचा विजय आणि इस्लामचा पराभव एवढा ‘मनावर घेतला’ की, इस्लामची बंद संस्कृती हिंदू संस्कृतीच्या उदारतेमध्ये आणि ननैतिकमध्ये (अमॉरॅलिटी) विलीन करण्याऐवजी आपण त्यांच्याएवढेच कट्टर वागले पाहिजे, या खुळचट कल्पनेने हिंदू कट्टरवादी आपल्या मूळ नग्न आणि अद्भूत आविष्कार असलेल्या ननैतिक ईश्वरी कलेला कपडे पांघरून आणि बुरखे घालू लागले.
अलीकडच्या काळात तर देवतांच्या मूर्ती करतानाच शिल्पकार त्यात कपड्यांचे प्रावधान करतो. चित्रकारांचीही तीच गत झालेली आहे. मुळामध्ये नग्नतेला ते घाबरतात, ज्यांच्या मनात नग्नता आणि कामुकता यांच्यातला फरक स्पष्ट झालेला नसतो.
देवी ही आपण जगन्माता मानतो, शक्तिपीठ मानतो. तिच्यात व आपणात आई व मुलाचं नातं आहे, ही शिकवण आपल्याला आपल्या संस्कृतीतून मिळालेली आहे. जेव्हा आई मुलाला आणि मूल आईला नग्न पाहतं तेव्हाच दोघांचाही जन्म होतो.
IMG_8661
(कामाख्या मंदिरातील शक्ती देवीची मूर्ती योनिपुजा आणि शक्तीपीठ म्हणून भारतात अनन्यसाधारण स्थान या देवीला आणि मंदिराला आहे. )
कामाख्या देवीच्या मंदिरात शक्तिपीठ म्हणून योनी पूजा करताना तिच्या योनीतील रक्त (प्रतीकात्मक) आपण डोक्याला लावतो तेव्हा ते पीठ कामुक आहे, असे आपण मानतो का? की ती आपली संस्कृती आहे?
हुसेन यांनी सरस्वतीचे नग्न चित्र काढले, ते अतिशय कलात्मक आणि अष्टसात्विक भाव स्पष्ट करणारे होते. याउलट कलेच्या दृष्टिकोनातून पाहताना भारतमातेचे म्हणून जे एक चित्र आपण सातत्याने पाहतो, जिला अनेक पदरी साडी चापूनचोपून नेसवलेली असते आणि हळदीकुंकवाला आलेल्या सवाष्णीसारखी ती उभी असते आणि जिचे केस मोकळे सोडलेले असतात आणि एकंदरीत त्या चित्राचा पाहताना परिणाम तो अखंड भारत आहे, असाही होत नाही किंवा ती कुणाची माता आहे, असाही होत नाही. कलेचा अत्यंत बुरसटलेला आणि अर्थहीन असा अर्थ त्या साडी नेसलेल्या भारतमातेमधून प्रतीत होतो. आता कट्टरवाद्यांनी किंवा कोणत्या तरी माथेफिरूने तुमच्या गळ्यावर सुरी ठेवून तिला भारतमाता मानाच असे म्हटले तरी ही प्राचीन, अर्वाचीन आणि पोस्ट मॉडर्निझमच्या अर्थाने ते एक बोगस आणि अतिसुमार चित्र आहे.
हजार वर्षांच्या इस्लामच्या आक्रमणानंतर आपण त्यांना आपल्यासारखे बनवू शकलो नाही, उलट आपण त्यांच्यासारखे बनलो हे खरे आपले सांस्कृतिक नग्नता आहे. खरा प्रश्न ही नग्नता कुठे लपवायची, हा आहे.
नग्नता ही धर्मामध्ये त्याज्य नाही. सनातन धर्मामध्ये तर नाहीच नाही. इस्लाम आणि व्हिक्टोरियन कालखंड हा नग्नता कृतकपणे झाकण्याचा कालखंड मानला जातो. धर्म याचा खरा अर्थ प्रकृती असा होतो आणि प्रकृती ही ननैतिक असते.
दुसऱ्या बाजूने वस्त्रांचा आणि नैतिकतेचा काय संबंध? उदाहरणच घ्यायचे झाले, तर उष्ण आणि विषुववृत्ताजवळच्या कटिबंधातले लोक हे साधे आणि पातळ कपडे घालतात. तर शीत कटिबंधातील लोक हे लोकरीचे आणि विविध प्रकारच्या आवरणांनी युक्त असे खूप कपडे घालतात. याचा अर्थ जास्त कपडे घालणारे नैतिक होतात का?
वस्त्र हे नैतिकतेचं निर्देशक असतं, तर जास्त कपडे घालणारे अधिक नैतिक मानले जायला हवेत. जी गोष्ट आपण झाकतो तिची आपल्याला भिती वाटते आणि ती भिती आपल्या मनात असते.
इस्लाम हा भितीवर आधारित धर्म आहे. काही अब्राह्मनिक धर्म हे सुद्धा भितीच्या आधारावरच उभे आहेत. पण भारतात निर्माण झालेले धर्म हे भितीच्या आधारावर उभे नाहीत.
जैनांमध्ये तर दिगंबर पंथच आहे. तो पंथ अश्लील मानायचा का?
Acharya_Vidyasagar_04
एवढेच नव्हे, तर अनेक स्तूप, अनेक मंदिर, अनेक शिल्प यामधील देवदेवता नग्न स्वरूपात त्या काळच्या अज्ञात कलावंतांनी कोरून   काढलेल्या आहेत. त्या काळात आजच्या काळासारखे कट्टरवादी भारतात नव्हते म्हणून त्यांना त्यांची कला पूर्ण स्वरूपात प्रकट करता आली.
देव, अवतार हे ईश्वरी अंश असतात, ईश्वर नव्हे. ईश्वर जन्म घेत नाही, ईश्वर मृत्यू पावत नाही. त्याचा अंश ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतो, ते अवतार म्हणून आपण मान्य करतो.
Naga Sadhus Photo
अनेक साधू आणि साध्वी किंवा तंत्रसाधना करणारे साधू आणि साध्वी किंवा नागपंथीय साधू हे वस्त्रविहीन असतात. त्यांचा अश्लीलतेशी दुरान्वयेही संबंध नसतो.
हुसेन मुस्लीम असल्यामुळे मुद्दाम हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, असे ते इस्लामशी करतील का, असे विचारणे हे तद्दन बुद्धिहीनतेचे लक्षण आहे, ते यामुळेच. इस्लाम हा धर्म नव्हे. तो एक राजकीय ‘कल्ट’ म्हणजे जीवनशैली आहे. ज्याची धर्म ही दुसरी दुय्यम निकड (priority) आहे. एकंदरीत मानवी अस्तित्वाचा प्रवास हा एक शोधाचा प्रवास आहे, ज्यामध्ये अनेक कला येतात, संगीत येतं, शास्त्र येतं. क्रमच लावायचा झाला, तर खालीलप्रमाणे
१. ज्ञानयोग
२. अवतार/प्रेषित
३. धर्म
४. धर्माचे संघटन
५. धर्माच्या संघटनांच्या नावाने काम करतो, असे सांगून कृती करणाऱ्या राजकीय/अराजकीय संघटना.
असा क्रम लागतो.
खरा कलावंत हा ज्ञान, प्रेषित आणि धर्म यांच्या अस्तित्वामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर गुंतलेला असतो. त्याला धर्माच्या संघटना (उदा. शंकराचार्यांची पिठे, खिलाफत, व्हॅटिकन, वक्फ बोर्ड  वगैरे) हे काय म्हणतात याच्याशी देणेघेणे नसते. तशा प्रकारे तो कामच करू शकत नाही. या धर्माच्या संघटनांच्याही खालच्या स्तरावर धर्माच्या संघटनांच्या नावावर राजकीय/अराजकीय संघटना काम करत असतात. कोणताही खरा कलावंत त्यांना कोणतंही स्पष्टीकरण देऊ शकत नाही (आणि त्याने देऊही नये). कारण दोघांची भाषा एकमेकांसाठी अगम्य असते. संख्येच्या बळावर कलावंत निष्प्रभ आणि पराभूत होऊ शकतो. परंतु त्याचे म्हणणे हे प्राकृतिक आणि अजरामर असते आणि त्याला पराभूत करणाऱ्यांचे म्हणणे हे कृतकतेने, कामुकतेने आणि ढोंगाने बरबटलेले असते. हे सारे लक्षात घेतले की, हुसेन काय किंवा चार्ली हेब्दो, तस्लीमा नसरीन यांच्या बाबतीत काय झाले असेल, हे आपल्या लक्षात येते.
देवदेवतांची चित्रे आणि शिल्पे जगभर सर्व संस्कृतींमध्ये (अर्वाचीन भारतीय संस्कृती धरून) केवळ नग्न स्वरूपातच चित्रित किंवा शिल्पित केली गेलेली नसून त्याही पुढे जाऊन प्रत्येक धर्मामध्ये काही अपवाद सोडला तर देवदेवतांची असंख्य मैथुन चित्रं आणि शिल्प निर्माण झालेली आहेत आणि ती दैवी मानली जातात. याचं मुख्य कारण प्राकृतिक दृष्टीने आणि ज्ञानाच्या पातळीवर मैथुन हाच निर्मितीचा प्रथम आणि अखेरचा बिंदू असतो आणि ते मैथुन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये  पुननिर्मित करण्याची दैवी देणगी कलावंताला लाभलेली असते. हे ज्यांना कळत नाही, ते कलावंताची हत्या करण्याकरिता सर्व ठिकाणी, सर्व संस्कृतीमध्ये टपून बसलेले असतात. ते मैथुनाचा, नग्नतेचा विरोध करत नसून निर्मितीची, प्रकृतीची आणि ज्ञानाची हत्या करत असतात. आणि याला पाठिशी घालणारी सरकारे जेव्हा जगभरच्या वेगवेगळ्या देशांत अस्तित्वात येतात, तेव्हा त्या देशाचा, त्या प्रांताचा आणि संस्कृतीचा ऱ्हास सुरू होतो.
नैतिकतेचा प्रकृतीशी, सृजनाशी आणि ज्ञानाशी काही संबंध नाही. ज्ञान, प्रकृती आणि निसर्ग हे ननैतिक आहे. नैतिकता हा कायदा होय. परस्परविरोधी असे लाखो नैतिक कायदे नग्नता आणि मैथुन या संदर्भात आहेत. नव्हे, तर प्रत्येक गोष्टीबाबतच आहेत. विषय बदलून उदाहरणच द्यायचं झालं, तर संजय दत्त याने हत्यारं बाळगल्या बद्दल पाच वर्षं तुरुंगवासाची शिक्षा भारतात भोगली जी ब्रिटिशकालीन कायद्याप्रमाणे होती. तशा प्रकारे हत्यारं बाळगणं अमेरिकेत गुन्हा नसून अत्यंत सहज आणि सोपी बाब आहे. भारतात कायद्याप्रमाणे शिक्षा भोगल्यामुळे त्याला आता अमेरिकेचे दरवाजे कायमचे बंद झाले. शिक्षेच्या संकल्पना कश्या बदलतात आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतात हे दाखवण्याकरिता हे विषय सोडून उदाहरण घेतलं इतकच.
नग्नतेबाबत असंख्य प्रयोग जगभरच्या चित्रकार आणि शिल्पकारांनी केले आहेत. त्यात भारत प्रथम होता.
IMG_8662
खजुराहोसारखी मंदिरे, अजंठा-एलोरासारखी शिल्पे ही भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. धर्माच्या नावावर चित्रकारांना जर देवादिकांची नग्नता आणि मैथुन शिल्पे काढण्याचे बंद करायचे ठरवले, तर आपल्याला आपली संपूर्ण कलासंस्कृती आणि शिल्पसंस्कृती जी चार ते पाच हजार वर्षं जुनी आहे ती नाकारावी लागेल.
जैनिझम, बुद्धिझम, हिंदू सनातन धर्म नैतिकतेचे नियम म्हणून कलावंताला शिल्प किंवा चित्र काढताना नग्नता किंवा मैथुन शिल्प किंवा चित्र काढणे त्याज्य ठरवले नव्हते. कारण हे करत असताना प्राचीन महर्षींनी ज्ञान आणि दैवी अंश या पातळीवर सृजनाला पाहिले होते. नैतिकतेचे नियम हे कायद्यासारखे आहेत. कायदा हा सीमांनुसार बदलतो. केवळ देशाच्याच नव्हे, तर राज्याच्या सीमांनुसारही बदलतो. महाराष्ट्रात बीफ बॅन आहे, केरळात नाही. गुजरातेत दारूबंदी आहे, महाराष्ट्रात नाही. याचा अर्थ गुजरातेत दारू पिणे हा गुन्हा आहे किंवा महाराष्ट्रात बीफ खाणे हा गुन्हा आहे, पण बाजूच्या राज्यात नाही. भारतात परमिटशिवाय हत्यारं बाळगणं हा गुन्हा आहे, पण अमेरिकेत नाही. अनेक जमातींमध्ये आजही बहुपत्नी किंवा बहुपती प्रथा चालू आहेत. अशा प्रथा भारतात अनेक ठिकाणी आहेत, अनेक विमुक्त भटक्या जमातींमध्ये आहेत, तशा आधुनिक जगातही आहेत.
भारतात व्हिक्टोरियन काळातील गुलामीच्या काळात म्हणजे, राणी व्हिक्टोरियाचे साम्राज्य जगभर पसरले होते आणि त्यावरील सूर्य जेव्हा मावळत नसे तेव्हा ‘व्हिक्टोरियन मॅनरिझम’ नावाच्या एका ‘कोड ऑफ कंडक्ट’चा उदय झाला. ज्यामध्ये वागणे, बोलणे, जेवणे आणि अंगभर वस्त्र घालणे किंवा अंग संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घालणे, त्यातही स्त्री आणि पुरुषांनी जेवताना तशा प्रकारचे कपडे घालणे आणि काटे-चमचे वापरणे हे अभिजन संस्कृतीचे लक्षण मानले जाऊ लागले.
जेम्स कॅमेरूनच्या ‘टायटॅनिक’ चित्रपटात काही दृश्यांमध्ये या व्हिक्टोरियन मॅनरिझमचे नमुने पाहायला मिळतात. ज्यामध्ये एके ठिकाणी पुढे महान चित्रकार ठरलेला पिकासो याचाही उल्लेख सुमार किंवा क:पदार्थ असा आढळतो. प्रथम श्रेणीमधल्या ‘व्हिक्टोरियन अभिजनांमध्ये’ जे वातावरण होते त्याचा गुलाम भारतीय प्रजेवर दीर्घकालीन नकारात्मक असा गंभीर परिणाम झाला. व्हिक्टोरिया राणी आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटन, अमेरिका आणि ब्रिटिश सामाज्याच्या अमलाखाली असणारे अनेक राष्ट्रकुल देश हे या पगड्यातून बाहेर पडले. कला आणि संस्कृतीसाठी नैतिकतेची खोटी झापडे त्यांनी काढून टाकली.
व्हिक्टोरियन काळामध्ये ज्याने कमप्यूटरचा मूळ शोध लावला आणि ज्याने नाझींचा encrypted message decode केला तो Alan टुरिंग स्म्लैंगिक असल्यामुळे हा गुन्हा मानला गेला आणि त्याला होर्मोन्ल उपचार किंवा कैद असा पर्याय देण्यात आला. त्याने पुढे आत्महत्या केली. खर तर स्म्लैंगिकता हा आजार नव्हता, Alan टुरिंग पुढे कॉम्पुटर चा पितामह ठरला, त्याने लावलेल्या शोधामुळे हिटलर विरुद्ध्च युद्ध दोन वर्ष आधी सम्पुष्टात आल आणि इंग्लंडच्या राणीने, टुरिंगला मरणोपरांत माफी प्रदान केली.
पण ह्या उलट, प्राचीन भारतीय संस्कृती मध्ये स्म्लैंगिकता हि कोणत्याही प्रकारची रोग भावना आहे असे मानले जात नसे.
IMG_8666
आधुनिक अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रवी शंकर ह्यांनी ११ डिसेम्बर २०१३ रोजी रात्री १०:०७ मिनिटांनी ट्वीटर वर ट्वीट करून स्म्लैंगिकता हा गुन्हा मानला जात नसल्याचे स्पष्ट केले होते. किंबहुना त्यांच्या मते भगवान अय्यप्पा हि हर-हरा च्या प्रतीकात्मक स्म्लैंगिकतेची निर्मिती मानली जाते.
पण भारतामध्ये व्हिक्टोरियन विचारसरणीचा परिणाम इतक्या खोल गुलामीत झाला की, भारतीय साहित्य (उदा. गीतगोविंद), भारतीय प्राचीन कला, इतिहास, शिल्प, दगडांमध्ये कोरलेली लेणी, कालिदासापासून राधागोविंदपर्यंत शृंगारिक लेखन, वात्सायनाचे कामशास्त्र हे पाश्चिमात्त्यांनी उचलले आणि स्वतंत्र भारताचा बहुसंख्य हिंदू हा कलेमध्ये व्हिक्टोरियन होण्याकरिता धडपडू लागला. आपल्या अभीजन मालकाचा गुलाम जसा वागतो, तशी भारताची विचारसरणी झाली. एके काळी भारतात ज्ञान आणि सृजन, कला आणि कल्पना यांचे स्थान धर्म, धर्माच्या संस्था आणि धर्माच्या नावावर चालवणाऱ्या संस्था याहून वरचे होते. स्वातंत्र्योत्तर काळात गुलामी मानसिकतेचे हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन, शीख, जैन व बौद्ध कट्टरवाद्यांनी कला, जी पायावर उभी होती, ती डोक्यावर उभी केली.
इथे परत स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात काही कलावंतांनी अभिजात मुलभूत संस्थेशी नाळ जुळवून घेण्यासाठी Bombay Progressive Artist’s Group, ज्यामध्ये एफ. एन. सुझा, एस. एच. रझा, एम. एफ. हुसेन, के. एच. आरा आणि एच. ए. गडे आणि यातील एकमेव शिल्पकार असणारे एस. के. बाकरे यांनी मिळून हा ग्रूप स्थापन केला. या ग्रूपमध्ये नंतर मनीष डे, रामकुमार, अकबर पदमसी आणि तय्यब मेहता हे सामील झाले. १९५० मध्ये वासुदेव गायतोंडे, क्रिशन खन्ना आणि मोहन सामंत (जे पुढे अमेरिकेत स्थायिक झाले) हेही सामील झाले. यांचा हा ग्रूप केवळ चित्रकला नव्हे, तर शिल्पकला आणि एकंदरीतच कलाविचार याविषयी भारताची हजार वर्षांची मोगल गुलामी परंपरा, दीडशे वर्षांची ब्रिटिश गुलामी परंपरा, १९४७ साली झालेली अखंड भारताची फाळणी आणि त्यानंतरचा अमानुष नरसंहार या पार्श्वभूमीवर सृजनाचे आणि कलेचे एक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बंड होते. त्याचे विवरण या ग्रूपने काही वाक्यांत जाहिरनामा स्वरूपात स्पष्ट केले होते. ते विवरण खालीलपमाणे :
“Paint with absolute freedom for content and technique, almost anarchic, save that we are governed by one or two sound elemental and eternal laws, of asthetic order, plastic coordination and colour composition”
१९५६ साली हा ग्रूप फुटला, तरीही भारताच्या मूळ कलात्मक सृजनशील नाळेशी जोडणारे हे बंड भारतीय कलाविश्वाला (लेखन असो, चित्र असो, शिल्प असो वा साधा लेख असो) कायमचे गुलामगिरीतून मुक्त करण्याचा प्रयत्न म्हणून नोंदवले गेले. कोणताही धर्म, धार्मिक संस्था, कोणत्याही धर्माच्या कट्टरवादी संघटना, सरकार/सरकारे किंवा प्रतिगामी गुलामी विचार करणारे गट हे कलावंताच्या स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाहीत, कारण हे स्वातंत्र्य अभिजात आणि प्राकृतिक आहे, याची जवळपास १२०० वर्षं तुटलेली नाळ भारताशी या बंडाने जोडली.
या ग्रूपमधील सुझा यांनी अनेक नग्न चित्रं वेगवेगळ्या रचनांमध्ये काढलेली आहेत. जन्माने ते कॅथॉलिक होते. जगभरच्या चित्रकारांनी खरं तर मूळ भारतीय परंपरेत अनुस्यूत असलेली दैवी नग्नता जगभर पसरवली. भारतात मूळ नग्न स्वरूपात असलेली चित्रं आणि शिल्पं ही गुलामीच्या आवरणाखाली कपडे घालून कॅलेंडरवर राजा रविवर्माने सादर केली. राजा रविवर्मा आणि दीनानाथ दलाल (दलाल हेसुद्धा एक मोठे चित्रकार होते) यांचे कॅलेंडरवरील देवी-देवता किंवा शिळा प्रेसमधून छापून आलेले देवी-देवता आपण पुजू लागलो तो म्हणजे आपल्या अपवृशीय दैवी परंपरांचा आणि कलावंतांचा निचांक होता. खरं तर राजा रविवर्मा आणि दीनानाथ दलाल यांच्या अगोदरही प्राचीन काळातसुद्धा मंदिरामध्ये शिल्पांना दगडी वस्त्रं घालण्याची अपवादाने पद्धत होती, पण ती मुख्य अट नव्हती.
खिलाफत, वक्फ बोर्ड, शंकराचार्यांची पिठे, व्हॅटिकन वगैरे वगैरे धर्माच्या संस्थांना कलेमध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार कधीच नव्हता, हे आधुनिक कलापरंपरेने पुन्हा पुन्हा बजावून सांगितलेले आहे. या आधुनिक परंपरेची जननी प्रबोधन काळानंतर युरोप ही ठरली. वास्तवात, हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत हे घडलेले होते. वर उल्लेखलेल्या प्रमाणे इस्लाममध्ये मनुष्य रूपात किंवा सगुण रूपात देव किंवा देवता यांची कल्पनाच अमान्य असल्यामुळे त्यांचे देव-देवता नग्न किंवा भग्न हे कसे दाखवणार?
खरा मुसलमान हा अल्लाची इबादत (प्रार्थना) करतो, प्रेषित महंमदांची नव्हे. त्यामुळेच प्रेषित महंमदाचेच मुस्लीम धर्मामध्ये चित्र उपलब्ध नाही किंवा त्याची पुजेसाठीची देवता अशी कल्पनाही उपलब्ध नाही. आज जे पाश्चिमात्त्य देशांमध्ये प्रेषित महंमदांचे कार्टून डेन्मार्क मध्ये काढले गेले किंवा चार्लि हेब्दोमध्ये छापले गेले ती केवळ कार्टुनिस्टची कल्पना होती, त्याचा महंमदांशी काही संबंध नव्हता. त्यातून निर्माण झालेली हिंसा ही धर्माच्या नावावर चालवणाऱ्या संस्थांना स्वत:च्या हिंसाचाराचा निकडतक्ता पुढे करण्याकरिता व स्वत:ची दहशत निर्माण करण्याकरिता मिळालेले कारण होते. त्याचा मुस्लीम संस्कृतीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे मुस्लीम चित्रं आणि शिल्पं परंपरेत राजेमहराजे, मशिदी-मिनार, महाल आणि इमारती यांची भव्य आणि नेत्रदीपक अशी प्रगती झाली. परंतु त्याला मानवी चेहरा नव्हता.
इस्लाम हे एक असे अपवादात्मक उदाहरण आहे, जिथे स्त्रीला चेहराच नाही, देवतांना चेहरा नाही, प्रेषिताला चेहरा नाही आणि ज्याची उपासना करायची आहे तो संपूर्णत: निर्गुण निराकार आहे. त्यामुळे कोणत्याही कलावंतासाठी पेच हा आहे की स्वर्गीय नग्नतेतील किंवा स्वर्गीय मैथुनातील दैवी तत्त्वं मुस्लीम धार्मिक इतिहासाचा आधार घेऊन निर्माण करणं केवळ अशक्यच आहे. पण याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची नग्नता किंवा मैथुन चित्रं किंवा मानवी शरीरसंबंध याचा कलात्मक आणि निरोगी आविष्कारच मुस्लीम समाजात नसल्यामुळे संपूर्ण मुस्लीम समुदायाच्या मानसिकतेवर त्याचा निरोगी आध्यात्मिक प्रभाव पडला नसून सर्व धार्मिक शिक्षकांकडून, मुल्लामौलवींकडून इबादत केल्यानंतर सेक्सविषयक कोणकोणते फायदे पुरुषांना मिळणार आहेत, तेही केवळ भौतिक जगात नव्हे; तर मृत्यूनंतर मिळणार आहेत हे वारंवार मनावर ठसवलं जातं. भौतिक जगामध्ये किती बायका भोगता येतील, किती सेक्स गुलाम ठेवता येतील यापासून ते मृत्युनंतर ७२ हुरा कशा प्राप्त करता येतील, त्याचे तोडगे व उपाय काय याभोवतीच मुस्लीम मानस घुटमळत राहतं. याचा अर्थ नग्नता मैथुन शिल्पं, नग्न चित्रं, देवदेवतांच्या शरीरसंबंधातील वर्णनं आणि त्याची अभिजात कलेतील अभिव्यक्ती एखाद्या धर्मात नसेल, तर त्या धर्मातून कामुकता लोप पावायची सोडून ती उफाळून येते आणि सर्व शिकवण अचानक ‘सेक्स’ या एकाच विषयाभोवती फिरू लागते (जरी ती मूळ धर्मात अभिप्रेत नसली, तरी) याचं हे उत्तम उदाहरण आहे.
म्हणजे नग्नता आणि कामुकता, मैथुन यांच्या अभिव्यक्तीवरील बंदी ही माणसाला मुक्त करू शकत नाही. तर ती निरोगी कामुक बनवण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने कामुक बनवते, हेच या उदाहरणावरून दिसून येते. अनेक इस्लामी जिहादी, जिहादमधल्या मृत्यूनंतर आपल्याला कौमार्यभंग न झालेल्या ७२ हुरा भोगण्याकरिता मिळणार आहेत म्हणून केवळ आत्मघातकी पथकात दाखल होतात आणि सूसाइड बॉम्बर बनतात, हे उदाहरण स्वत:मध्ये पुरेसं बोलकं आहे. जेव्हा एम. एफ. हुसेन यांना कट्टरतावादी हिंदूंनी तुम्ही हिंदू देवदेवांची नग्न चित्रं काढली, तशी मुसलमानांची काढून दाखवा असे आवाहन दिले तेव्हा त्याचे उत्तर ते काय देणार होते? अर्थात, अभिजात कलावंताने, लेखकाने, विचारवंताने आणि शास्त्रज्ञाने आपल्या वाट्याला येणारा छळ निमूटपणे सहन करून आपले काम करावे आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या सर्वच धर्मातल्या अट्टल बदमाश आणि कट्टरवादी अज्ञानांना उत्तरं देण्यात वेळ वाया घालवू नये, हा अभिजाततेचा एक संकेत आहे. तोच हुसेन यांनी पाळला.
IMG_8669
(मध्य प्रदेशातील भोजशाला येथील संगमरवरी देवी सरस्वतीची मूर्ती . या देवतेची मूर्ती कर्झन वायलीने लुटून नेली.)
इथे सरस्वतीविषयी थोडेसे लिहायचे झाले, तर हिदू पुराणाप्रमाणे (मत्स्य पुराण) सरस्वती ही ब्रह्माची मुलगी जिची निर्मिती झाल्यावर स्वत: ब्रह्माला तिचे कामूक आकर्षण वाटल्यामुळे त्याने तिच्याशीच लग्न केले आणि या गुन्ह्याची (incest- एकाच कुटुंबातील सदस्यांशी किंवा जवळच्या नातेवाइकाशी लैंगिक संबंध ठेवणे) शिक्षा म्हणून शिवाने ब्रह्माचे एक डोके उडवले होते. चित्राचा हा पुढचा भाग हुसेन यांनी चित्रित केला असता, तर त्यांचे काय झाले असते, हे ब्रह्माच जाणो! शिवाय सरस्वती देवीची जवळपास पूर्ण नग्न किंवा अर्ध-नग्न भारतीय संस्कृतीत निर्माण झालेली शिल्प होती जी कट्टर वाद्यांना माहित नाहीत. त्यातली काही lord Curzon ने ब्रिटन मध्ये पळवून नेली.
केवळ भारतातच नव्हे, तर प्रबोधनपूर्व काळात युरोप आणि पाश्चिमात्त्य जगातसुद्धा नैतिकता, अध्यात्म, कला आणि शास्त्र या संबधीची आत्यंतिक खुळचट कल्पना जन्म घेत असते. त्याला ‘डार्क एज’ असे युरोपमध्ये नाव आहे. प्रबोधन (Renaissance) काळानंतर युरोप आणि पाश्चिमात्त्य जगातील देश बऱ्याच प्रमाणात या खुळचट कल्पानांमधून मुक्त झाले. परंतु भारतातील हिंदूवादी संघटना कलावादी विचार, कलेचे तत्त्वज्ञान, उच्च दर्जाची प्रतिभा आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांचा परिसस्पर्श न झाल्यामुळे मुस्लीम आक्रमणाच्या काळामध्ये स्त्रीला अधिकाधिक झाकण्याची प्रतिगामी पद्धत (जी पुढे व्हिक्टोरियन काळात चालू राहिली) हीच काहीतरी नैतिक आणि दैवी बाब आहे, असे विचार रूजले आणि फोफावले ज्याचे कलावंत, प्रतिभावंत, शास्त्रज्ञ बळी ठरू लागले.
आज आपण देवीदेवतांच्या पूजा करतो, मग ती भवानी माता असो की अंबामाता असो, विष्णू असो की, शंकर असो; या सर्व मूर्ती प्राचीन काळामध्ये नग्न स्वरूपात बनवलेल्या आहेत. देव आणि देवी यांना हिंदू धर्माप्रमाणे जगन्माता आणि जगत्पिता असे मानतात. मूल आणि आई, वडील आणि मूल यांच्यामध्ये नग्नता ही कामुकतेशी संबधित नसते, असा धार्मिक संकेत आहे, ज्या संकेताविरुद्ध आजच्या धार्मिक संघटना कार्यरत आहेत. महाभारतात आई आणि मुलामध्ये वस्त्र हे अहंकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानल्याची एक गोष्ट आहे.
गांधारीने आपल्या अंध नवऱ्यासाठी आयुष्यभर डोळ्याला पट्टी बांधून आपल्या डोळ्यातील प्रकाशऊर्जा बंद करून ठेवली होती. महाभारताच्या युद्धाअगोदर त्या उर्जेने आपल्या मोठ्या मुलाचे संपूर्ण शरीर संरक्षित करावे, म्हणून तिने दुर्योधनाला निर्वस्त्र व्हायला सांगितले. आजच्या कट्टरतावादी धार्मिक विचार करणाऱ्या संघटनांप्रमाणे विचार करणाऱ्या दुर्योधनाने गांधारी मातेचे शब्द ऐकून आपले गुप्तांग आणि मांड्या झाकतील, एवढेच कपडे अंगावर ठेवले आणि बाकी शरीर उघडले. गांधारीने जेव्हा डोळ्यावरील पट्टी काढून आपले नेत्र आपल्या मुलाच्या शरीरावर केंद्रित केले तेव्हा दुर्योधनाचे हे रूप पाहून तिने दु:खाने उसासा सोडला. तिच्या नेत्रातल्या उर्जेच्या कवचाचे संरक्षण दुर्योधनाच्या संपूर्ण शरीराला प्राप्त झाले, परंतु त्याच्या अज्ञान आणि अहंकाराच्या वस्त्रांमुळे आच्छादित असलेल्या त्याच्या मांड्या आणि गुप्तांग यांना आईच्या नेत्रातल्या प्रकाशउर्जेचं संरक्षण प्राप्त होऊ शकले नाही. ‘नग्न म्हणजे संपूर्ण नग्न असं मी तुला म्हटलं होतं,’ हे गांधारीने त्याला बोलूनही दाखवलं. महाभारताच्या अखेरीला दुर्योधनाचे नग्न न झालेले वस्त्राच्छादित त्याचे अवयव – मांड्या भिमाने गदेने फोडल्या आणि त्याचा शेवट झाला.
नग्नता ही निर्मितीची अंतिम पायरी आहे आणि मैथुन ही सृजनाची अंतिम पायरी आहे. त्यामुळे अभिजात शास्त्र आणि अभिजात कला या नैतिक किंवा अनैतिक असत नाहीत. त्या ननैतिक (amoral) असतात. डॉक्टरला किंवा कलावंताला झाकलेल्या शरीराची नैतिकता शिकवण्याने व त्याच्यावर या विचारांची दहशत निर्माण केल्याने व्यक्तीच्या, समाजाच्या, देशाच्या, मानव जातीच्या अस्तित्वाची, आरोग्याची आणि सांस्कृतिक पायाची हानी होते. केवळ हानीच होत नाही, तर त्याचे खच्चीकरणच होते.
या साऱ्याचा त्या त्या समाजावर गंभीर असा नकारात्मक परिणाम होतो. समाज आणि समाजमन निरोगी राहत नाही. झाडे, पाणी, पशुपक्षी आणि अतिशय दुर्मिळ झालेल्या भटक्या विमुक्त जमातींच्या नग्नतेत सहजता असते. त्यामुळे मन निरोगी बनून त्यातून कामुकता आणि हिंसाचार निर्माण होत नाही.
आदिवासींमध्ये अपदवादात्मकसुद्धा बलात्कार होत नाहीत.
याउलट नागर समाजात घरामध्येच दुर्बल घटकांवर, स्त्रियांवर घरामधीलच सबल आणि मोठी मंडळी अत्याचार आणि बलात्कार करताना आढळतात, त्याच्या बातम्याही येतात. जे घरात घडते तेच समाजातही घडते. मग आपण प्रश्न नेमका कुठे सुरू होतो, याचा विचार न करता कायदे अधिक कडक करा, अशी मागणी करतो. कायदे कितीही कडक केले, तरी अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण कमी होत नाही असे संख्याशास्त्र दाखवते.
त्याचे खरे मूळ धार्मिक टोळ्यांनी अभिजात सृजनशील कलावंतावर आणि बुद्धिवंतावर घातलेल्या कृतक बंधनात आहे. राजकीयदृष्ट्या सोयीचे नसले, तरीही हे सत्य पचवल्याशिवाय आपण अनुक्रमे अभिजात शास्त्र, अभिजात कला आणि सर्वात शेवटी खऱ्या अर्थाने अभिजात अध्यात्म (बाबा बुवा नव्हे)आणि शेवटी अभिजात ज्ञान निर्माण करू शकत नाही. उपनिषदांमध्ये ज्ञानाविषयी एक फार सुंदर बोधकथा आहे. ज्ञान हे अग्निसारखे असून ते अज्ञानाच्या गवताला जाळते आणि त्यानंतर अग्निच्याही अस्तित्वाचा विलय होतो. त्यामुळे अज्ञान संपल्यावर ज्ञान विलयाला जात असल्यामुळे अशा अभिजात ज्ञानाचा अहंकार उरत नाही, हा या बोधकथेचा अर्थ.
ज्या भूमीत उपनिषदे निर्माण झाली, त्या भूमीत अज्ञानाच्या गवताचे तण एवढे माजावे हे केवळ सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या धोक्याचे नसून व्यक्तिगत आणि राजकीय दृष्ट्याही घुसमटवून टाकणारे आहे.
हुसेन यांच्या चित्राची जी कथा झाली, तशीच वेगळी कथा सलमान रश्दी यांच्या किंवा तस्लीमा नसरीन यांच्या पुस्तकाची झाली आणि यामध्ये सरकार सहभागी होतं. सरकार याचा अर्थ कोणत्या एका पक्षाचे सरकार नव्हे, तर जे सत्तेत येईल ते सरकार. लेखकाने काय लिहावे, चित्रकाराने कोणती चित्रे काढावीत, लेखक आणि कलावंतांनी धर्माचा कसा अनुनय करावा, सत्य असले तरी बहुसंख्य लोक ज्याच्या विरोधात आहेत, ती गोष्ट चित्रित करू नये किंवा लिहु नये हे सारे सरकारे ठरवू लागली. धार्मिक गट, मग तो मुस्लीम असो, ख्रिश्चन असो, हिदू असो वा अजून इतर कोणत्या धर्माचा असो; यांच्या भावना आळीपाळीने कधी नाटकामुळे, कधी चित्रांमुळे, कधी पुस्तकामुळे कधी पेयामुळे, कधी खाद्यपदार्थांमुळे, कधी ध्येयामुळे तर कधी घोषणांमुळे दुखावल्या जाऊ लागल्या. अशा प्रकारच्या सप्तस्वातंत्र्यावर बंदी घालण्याची परंपरा आणि त्या विचारवंताला, लेखकाला, बुद्धिवंताला छळण्याची परंपरा ही कम्युनिस्ट, इस्लामिक आणि हुकूमशाही देशात नवी नाही. तिथल्या प्रचारयंत्रणा हे ‘प्रो- पीपल’ आहे म्हणजे, लोकांसाठी आहे असे सांगून करतात. भारतात संविधान प्रत्येक नागरिकाला खूप मोठे स्वातंत्र्य बहाल करते. ज्याचा तर्क दिलेला आहे किंवा अभिजात सदरात मोडते असे कोणतेही अस्तित्व, कृती भारतीय नागरिक करू शकतो. भावना दुखावणे, ही रंजक कल्पना आहे. भावना कशानेही दुखावू शकतात.
नुकतेच भाजप सरकार आल्यावर  ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे मुंबईत एका नाटकावर बंदी घालण्यात आली. त्याच वेळी बिहारमध्ये नितीश सरकारने दारूवर बंदी आली. महाराष्ट्रात बीफ खाण्यावर बंदी आली. तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’पासून ‘घाशीराम कोतवाल’ पर्यंतच्या नाटकांना झुंडशाहीला सामोरं जावं लागलं होतं. भारत हा सर्वांत जास्त बीफची निर्यात करणारा देश आहे. एम. एफ. हुसेन यांना आधुनिक भारताचे पिकासो असे संबोधले जाते. देशात दारूपेक्षा, बेगॉन पिऊन जास्त लोक लगेच मरतात, पण बेगॉनवर बंदी नाही. शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतो, पण गळफासावर बंदी नाही. चित्रकलेचा प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी कला विद्यालयात अधिकृतरित्या नग्न स्त्री, पुरुषाला समोर झोपवून अॅनाटॉमीच्या तासाला न्यूड रेखाचित्र काढतो. तो त्याच्या विषयाचा, अभ्यासाचा भाग आहे. कला महाविद्यालयात मॉडेल म्हणून अॅनाटॉमीच्या तासाला नग्न स्त्री आणि पुरुष पोझेस देतात आणि हे विद्यार्थी-विद्यार्थिनी त्याचे रेखाचित्र काढतात. डॉक्टरी शिक्षण घेत असताना नग्न स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराच्या आधारे याच अॅनाटॉमीचा अभ्यास, होऊ घातलेले डॉक्टर्स करतात. या साऱ्यातून त्या विद्यार्थी-विद्यार्थिनीं मध्ये किंवा मॉडेल्समध्ये कामुकतेची प्रचंड वाढ झालेली आढळून आलेली नाही. किंबहुना त्यांनी ते केले नाही तर समाजाला चांगले डॉक्टर्स, चित्रकार मिळणार नाहीत किंवा या शिकावू डॉक्टर्सना, या शिकावू चित्रकारांना ‘तुझ्या आईबहिणीला सांगशील का अशी पोझ द्यायला किंवा त्यांच्यावर असे प्रयोग करशील का,’ म्हणून कोणतीही धार्मिक संघटना प्रश्न विचारताना दिसत नाही!!!
या परस्परविरोधी गोष्टींची जंत्री इथे देण्याचं मूळ कारण हे की, कोणत्याही प्रकारचं moral policing हे मागासलेल्या समाजाचे लक्षण होय. आपल्या देशात ब्रिटिश कायदे आल्यावर या moral policing ला सरकारी पाठबळ लाभले. ब्रिटिश गेले, त्यांनी त्यांच्या देशातले कायदेही बदलले. परंतु १९५२ पासून जेव्हा निवडणुका होऊन त्याद्वारे आपले अस्सल भारतीय सरकार सत्तेत आले तेव्हापासून आजपर्यंत बंदी, moral policing, कलावंत, बुद्धिवंताची यातून होणारी अवहेलना, अटकसत्र प्रचंड वाढलेलं आहे किंबहुना ऊत आलेला आहे आणि आता तर त्याला राज्या-राज्यात पाठबळही मिळत आहे. मग राजकीय पक्ष कोणताही असो!  मतांसाठी लोकानुयाच्या वेगवेगळ्या कल्पना, प्रश्नाचा अभ्यास न करता उत्तर देण्याची उथळ वृत्ती, झुंडशाही करणारे जातीय आणि धार्मिक गट आणि १९ व्या शतकातला ब्रिटिश कायदा या सर्वांनी मिळून या देशातली ‘अभिजातता आणि जीनिअस’ मारून टाकलेला आहे. भारत हा राजकीय टोळ्यांचा देश बनलेला आहे आणि त्याला Draconian ब्रिटिश  कायद्याचा आधार आहे.
आज एखादा वात्सायन, कामशास्त्र लिहिल, हजारो कलावंत मिळून खजुराहोसारखी नग्न शिल्पं उभी करतील, त्यांना आवडेल ते ते खातील आणि हवा तेव्हा सोमरस पितील आणि या साऱ्याला सरकारची राजमान्यता (मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो) मिळेल, अशी कल्पना करून बघा. असं होऊ शकतं का, हा प्रश्न स्वत:लाच विचारून बघा! कोणतंही दमन हे लोकशाहीला मान्य नसतं. याला एक कारण आहे. दमन, प्रवृत्तीचं शमन न करता ती प्रवृत्ती भडकवते. आजही आपल्या समाजात समलैंगिकतेवर ‘उपचार’ करू असा दावा करणारे लोक आहेत! आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही आहे!!
असा देश आणि असा समाज प्राचीन सुवर्णयुगात जाणं शक्य आहे काय? किंवा आधुनिक महासत्ता बनणं, हे या प्रकारच्या मानसिकतेच्या पंखात बळ आणणारं आहे काय?
एम. एफ. हुसेन अखेरच्या काळात भारत सोडून गेले. ते हयात असताना त्यांच्याशी बोलताना एक वेगळीच गोष्ट कळली. कट्टरवादी टोळ्यांच्या झुंडशाहीला तोंड देताना हा अस्सल भारतीय कलावंत जेरीला आला होता. पण त्याने देश सोडला, तो त्यासाठी नव्हे. ते म्हणाले, भारतीय करप्रणाली, करअधिकारी माझ्या चित्रांच्या किमती विचारतात. एकाच आकाराच्या दोन चित्रांची किंमत वेगवेगळी किंवा कमी-अधिक का, हे मला सांगायला सांगतात. याचं  तर्कशुद्ध उत्तर एक कलावंत म्हणून मी देऊ शकत नाही आणि त्यामुळे मी जवळपास गुन्हेगार आहे, अशी वागणूक करअधिकारी देतात आणि हे चक्र अखंड चालू राहते. या छळाला कंटाळलेल्या एम.एफ हुसेन यांना कतार या देशाने आनंदाने आमंत्रण दिले आणि एम.एफ हुसेन यांनी कतारमध्ये आश्रय घेतला. पंढरपूरमध्ये जन्म घेतलेल्या आणि सिनेमांची पोस्टर्स रंगवून एके काळी उपजीविका करणाऱ्या या महान कलावंताने स्वत:च्या चित्रांच्या बळावर मिळवलेल्या पैशाच्या जोरावर कतारमध्ये गेल्यानंतर दुबईमध्ये एकरकमी पैसे देऊन लॅम्बॉर्गिनी ही गाडी विकत घेतली, जे भारतात त्यांना कधीही शक्य झालं नसतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दफन मात्र (निधर्मी) लंडनमध्ये झाले.
अनेक पातळ्यांवर झुंडशाही आणि सरकार यांनी हातमिळवणी करून वेगवेगळ्या धर्मांच्या आणि जातींच्या सहाय्याने टोळ्या करून अलौकिक प्रतिभावंत, कलावंत, लेखक आणि विचारवत यांची परवड स्वातंत्र्योत्तर (१५ ऑगस्ट १९४७ पासून) काळापासून आजपर्यंत चालू आहे, ती थांबवण्यासाठी कोणतीही व्यक्ती, संघटना, राजकीय पक्ष किंवा कोणतेही अलौकिक नेतृत्व काम करताना दिसत नाही. ही घुसमट अखेर एक दिवशी एकतर ज्वालामुखी बनेल किंवा या सपूर्ण समाजाला रसातळाला घेऊन जाईल.
ढोंगाला ऑक्सिजनचे सिलिंडर मिळतात आणि सत्याला घुसमटीचे चेंबर नशिबी येतात, तेव्हा हाडाला भेदून जाणारं अॅसिड लिहावं लागतं. हा त्या अॅसिडचा एक थेंब. हा थेंब जी जखम निर्माण करेल आणि जिथे जखम निर्माण करेल, ती अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील जखमेसारखी कधीही बरी होणार नाही. त्या जखमेवर लावायला तेल मागण्याची वेळही आता निघून गेलेली आहे!!
rajuparulekar1@gmail.com
(M) 9820124419

लिंक  https://rajuparulekar.wordpress.com/2016/04/18/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%AE/

Friday, 2 June 2017

वारांगनेव नृपनीती - दत्तप्रसाद दाभोळकर

|Nov 10, 2013, 02:00AM IST
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची पत्रे आणि संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे ‘विचारधन’ हे पुस्तक, या दोहोंत *कडव्या मुसलमानद्वेषाचे ढीगभर पुरावे* आहेत. गुरुजींनी संघाची शाखा म्हणून जनसंघ सुरू केल्यावर संघाच्या वरिष्ठ प्रचारकांनी त्यांना विचारले, ‘तुम्हीच आम्हाला सांगितलंय की, ‘वारांगनेव नृपनीती अनेक रूप:’ मग आपण वारांगनेच्या मागे का लागतोय?’ यावर गुरुजी म्हणाले, ‘वारांगनेव नृपनीती... हे बरोबरच आहे; पण आपण कुठे वारांगनेच्या मागे लागतोय? नृपनीती म्हणजे वारांगना नव्हे, पण दिल्ली जिंकून आल्यावर एखादा बाजीराव आपल्या दरबारात बसलाय आणि एखादी मस्तानी त्याच्या तालावर नाचत असेल, तर चिंता करण्याचे कारण नाही.’

या ‘वारांगनेव नृपनीती’ या संघाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे *संघाने अनेकदा खरे चेहरे लपवले आणि फसवणारे मुखवटे चेह-यावर चढवले*. जनमानस नव्हे, तर संघाचे वरिष्ठ स्वयंसेवकसुद्धा भ्रमित झाले. संघ शिक्षा वर्गातील एका चर्चेत एका वरिष्ठ स्वयंसेवकाने देवरसांना विचारले, ‘संघाची तीन तत्त्वे आपण सोडली का?’ देवरसांनी हसून त्याला विचारले, ‘कोणती तीन तत्त्वे?’ त्याने सांगितले, ‘हिंदूंचाच हिंदुस्थान, भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज व एकचालकानुवर्तित्व.’ देवरस म्हणाले, ‘अरे, संघाचे फक्त एकच तत्त्व आहे; हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, म्हणजेच हे हिंदू राष्ट्र आहे. एकदा हे झाले, की मग ‘भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज’ हे स्वाभाविकपणे येते. (संदर्भ - संघाचे महाराष्ट्र विभाग प्रमुख दामुअण्णा दाते यांचे ‘स्मरण शिल्पे’ हे पुस्तक.)

‘वारांगनेव नृपनीती’ हे मनात पक्के ठरवलेला संघ अनेक मजेशीर खेळ्या खेळतो. तो नथुरामला नाकारतो. गांधीजींना आपले दैवत मानतो. आपण यापूर्वी काय बोललोय, कसे वागलोय, हे लोक विसरले असणार, अशी त्याची पक्की खात्री असते. गांधीजींच्या खुनानंतर नथुराम गोडसेशी आमचा काही संबंध नाही, असे संघ सांगत राहिला. मात्र, ‘गांधी हत्या आणि मी’ या *पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात गोपाळ गोडसे यांनी, ‘आम्ही दोघे भाऊ संघाचे क्रियाशील स्वयंसेवक होतो’*, असे सांगितले. हे विधान त्या वेळी देशातील सर्वच वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले. परंतु त्या वेळी लालकृष्ण अडवाणी यांनी ‘गोडसेंचा संघाशी काहीही संबंध नव्हता.’ असे जाहीर करून गोडसे यांचा संघाशी संबंध नाकारला. त्यावर गोपाळ गोडसे यांनी ‘फ्रंटलाइन’ला 28 जानेवारी 1994रोजी मुलाखत देऊन अडवाणींच्या विधानाची संतप्त शब्दांत निर्भर्त्सना करून ‘आम्ही सर्व भाऊ संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होतो. आम्ही घरापेक्षा संघातच जास्त वाढलो. नथुराम बौद्धिक प्रमुख होता. संघाशी असलेला आमचा संबंध नाकारणे हा भेकडपणा आहे. *कोर्टात खटला सुरू होता त्या वेळी त्याने दिलेल्या निवेदनात संघ सोडल्याचे सांगितले होते. कारण तसे सांगितले नाही तर संघ व गोळवलकर अडचणीत येतील, असे त्याला सांगण्यात आले होते*. पण खरे म्हणजे, त्याने त्या वेळी संघ सोडलेला नव्हता.’

या ‘वारांगनेव नृपनीती’मध्ये संघ केवळ नथुरामला नाकारून थांबला नाही, तर *नंतर संघाने गांधीजींना महात्मा आणि प्रात:स्मरणीय म्हटले*. वाजपेयी आणि रज्जूभैया या दोघांची तर एकदा याबाबत चढाओढ लागली होती. *वाजपेयी यांनी गांधीजींच्या स्वप्नातले रामराज्य आणणे हे माझे कार्य आहे*, म्हणून सांगितले आणि रज्जूभैयांनी भारताच्या नवरत्नांमध्ये सर्वात देदीप्यमान असलेल्या महात्मा गांधी यांना अजून भारतरत्न मिळू नये, म्हणून संताप व्यक्त केला!
पण *संघाची गांधीजींबद्दलची यापूर्वीची भूमिका काय होती?* गुरुजींनी त्यांच्या ‘विचारधन’ या पुस्तकात ‘प्रादेशिक राष्ट्रवाद की सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या प्रकरणात ‘देशाला पौरुषहीन बनवणारे आत्मघातकी नेतृत्व’, असा त्यांचा उल्लेख केला आहे. *गुरुजींनी हा गांधीद्वेष स्वयंसेवकांच्या मनात एवढा भरला होता* की, गरज म्हणून गुरुजींनी 1965मध्ये ‘भारतभक्ती स्तोत्रात’ महात्मा गांधींच्या नावाचा समावेश केला. त्या वेळी प्रचंड नाराजी उमटली. पुणे जिल्ह्याचे एक ज्येष्ठ प्रचारक गोपाळराव देशपांडे त्यावर नाराजीने बोलले, ‘काकासाहेब मुळे यांनी माझ्या विभागात हे प्रात:स्मरण नको, असे म्हटले.’ काशिनाथपंत लिमये यांनीही विरोध प्रकट केला. संघाच्या शिस्तीत हे अक्षरश: बंड होते. गुरुजींनी पत्र पाठवून त्यांना ‘आपला निर्णय आमच्यावर बंधनकारक नाही, असा पायंडा आपणासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पाडण्याचे ठरवले, तर मी काय करणार?’ असा प्रश्न विचारला.

*महात्मा फुले, आंबेडकर अशाच प्रकारे 1985मध्ये ‘एकात्मता स्तोत्रात’ आले*. त्यानंतर तर समरसता मंचाच्या व्यासपीठावर गुरुजी, डॉ. हेडगेवार यांच्या बरोबरीने त्यांच्या फोटोंना स्थान दिले गेले. *एकेकाळी महात्मा फुले म्हणाले होते, ‘बरे झाले हे शिपायांचे बंड फसले. नाही तर पुन्हा आमच्या पायात काठी आणि हातात मडके आले असते आणि आम्ही शिकतो म्हणून आमच्या शाळा जाळल्या असत्या.’* अशा वेळी त्यांचा आणि संघ तत्त्वज्ञानाचा संबंध काय? ते राहू देत. हे ‘हिंदूंचाच हिंदुस्थान’ म्हणून उभे आहेत आणि महात्मा फुले एका ठिकाणी म्हणताहेत, ‘सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त करून महंमदाच्या जवांमर्द सैनिकांनी आर्थिक व सामाजिक पिळवणुकीतून आमची सुटका केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.’ *आता याचं संघ काय करणार?* संघाचे व्यासपीठ महात्मा फुले आणि भारतरत्न आंबेडकर नेमके काय म्हणाले ते सांगत नाही,   तर गोळवलकर आणि डॉ. हेडगेवार जे म्हणाले तेच हे महामानव यापूर्वी सांगत होते, म्हणून सांगत असते.

ज्यांचे विचार महाराष्ट्राला माहीत आहेत त्या महापुरुषांबद्दल संघ परिवार ही खेळी खेळतो, तर त्यांच्यापुढे विवेकानंद आणि सरदार पटेल म्हणजे, ‘किस झाड की पत्ती’. विवेकानंदांनी सांगितले, या देशाचा अभ्युदय करावयाचा असेल, तर हिंदू- मुसलमान सहकार्य नव्हे, तर समन्वय हवा. *या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झाली आहेत*. त्यांचं धर्मांतरही पुन्हा आपापल्या जातीतच झालंय! दलितांबद्दल आपल्या मनात जी कणव आणि सहसंवेदना आहे, तीच आपल्या मनात त्यांच्याबद्दल हवी. 10 जून 1898 रोजी सर्फराज हुसेन यांना *विवेकानंदांनी पत्र पाठवून सांगितले, ‘आमच्या अद्वैत वेदांतातील सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात समतेचा संदेश सर्वप्रथम आणला तो इस्लामनेच*. मात्र, जेथे वेदही नाहीत, कुराणही नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचे आहे. मात्र, हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल.’ 20 ऑगस्ट 1892 रोजी जुनागडच्या नवाबांना पत्र पाठवून ते सांगतात, ‘ज्यांच्या पाचशे पिढ्यांनी वेद ही काय चीज आहे हे पाहिलेले नाही, ते पुरोहित आज वेद सांगताहेत. *परमेश्वरा, ब्राह्मणांच्या रूपाने आज या देशात हिंडणा-या या राक्षसांपासून या देशाचे रक्षण कर.’* आणि 27 एप्रिल 1896 रोजी आपल्या आलमबझार मठातील शिष्यांना पत्र पाठवून ते सांगतात, ‘आपले देव आता जुने झालेत. आता आपणाला नवा देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण आपणाला नवा भारत घडवायचा आहे.’ *असे नेमके आणि भेदक विचार मांडणारे विवेकानंद*. मात्र, संघ परिवार त्यांचे आणि आमचे विचार, तत्त्वज्ञान आणि रचना एकच आहे, असे सांगत त्यांचा जयजयकार करत पुढे येतो. *विवेकानंदांचे विचार दडपून त्यांच्या नावावर आपले विचार लोकांच्या गळी मारण्याचा प्रयत्न असतो*.

संघ परिवार आज पटेलांबद्दल हेच करतोय. नेहरू, पटेल, लोहिया ही गांधीजींनी निवडलेली आणि घडवलेली माणसे आहेत. सर्वधर्म समभाव, साधनशुचिता आणि लोकशाही हे त्यांच्यावरचे वज्रलेप संस्कार आहेत. संघाने आपल्या स्वयंसेवकांवर केलेले तप्त संस्कार हिंदूंचाच हिंदुस्थान, कडवा मुसलमानद्वेष आणि एकचालकानुवर्तित्व हे आहेत. नथुराम गोडसे, बाबरी मशिदीचा विध्वंस, श्रीराम सेना हे सर्व त्यात येते. श्रीराम सेनेने मुलींना हॉटेलमधून बाहेर काढून बडविले. त्यानंतर ‘हिंदू व्हॉइस’ या परिवाराच्या मासिकात- ज्याला सरसंघचालकांचा आशीर्वाद आहे, त्यात *श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांची मुलाखत* आली. एप्रिल 2009 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या मुलाखतीत *त्याने सांगितले, ‘मी संघाचा आहे. हा अतूट संबंध आहे. नथुरामने गांधींचा खून करून फार मोठी राष्ट्रसेवा केली, असे मी मानतो. मात्र, मी तेव्हा तेथे असतो, तर नेहरूंचापण खून केला असता.’*

हे खुनाचे राजकारण करणा-या संघाबद्दल पटेल काय म्हणालेत, हे संघाने व मोदींनी लक्षात घ्यावयास हवे. केंद्रीय मंत्रिमंडळात नेहरूंनी सामील करून घेतलेले (तेव्हा हिंदू महासभेचे आणि नंतर जनसंघाचे नेते) श्यामाप्रसाद मुखर्जींना 18 जुलै 1948 रोजी पत्र पाठवून *सरदार पटेलांनी सांगितले, ‘म. गांधींचा अघोरी आणि अमानुष खून घडावा, अशा त-हेचे वातावरण हिंदू महासभा, विशेषत: रा. स्व. संघाने देशात निर्माण केले होते*, हे सरकारकडून आलेल्या पुराव्यावरून सिद्ध होते. हिंदू महासभेचे कार्यकर्ते या कटात सामील होते याबद्दल माझ्या मनात पक्की खात्री आहे. *रा. स्व. संघाच्या हालचाली तर केंद्र सरकारच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणा-या होत्या. संघावर बंदी घालूनही त्यांच्या विघातक हालचाली सुरूच असल्याचे अहवाल माझ्याकडे येत आहेत.’*

त्यानंतर *पटेलांनी 11 सप्टेंबर 1948 रोजी गोळवलकरांना पत्र पाठवले. त्यात म्हटलंय, ‘हिंदूंना संघटित करून त्यांना मदत करणे समजण्यासारखे आहे; परंतु निरपराध स्त्री-पुरुष आणि लहान मुलांवर सूड उगवायला संघ प्रेरित करीत होता. हीन पातळीवरून संघ स्वयंसेवक जे विषारी फुत्कार सोडीत होते, त्याचा परिणाम म. गांधींसारख्या अलौकिक महात्म्याच्या खुनात झाला. म. गांधींच्या खुनानंतर संघाच्या लोकांनी आनंद व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा केला. त्यामुळे संघ सरकारच्या नव्हे, तर भारतीय जनतेच्या मनातून साफ उतरला आहे. जनतेच्या मनात संताप उसळला आहे, संतापाचा पारा फारच वर चढला आहे.’*

पटेलांना काय माहीत, जनतेचा पारा उतरवता येईल, हे संघाला चांगलेच ठाऊक होते. थोडा काळ जाऊ द्यावा. मग महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न आंबेडकर, विवेकानंद आणि खुद्द सरदार पटेल आमचेच विचार मांडत होते किंवा आम्ही त्यांचा वारसा चालवतोय, हे लोकांना प्रचारातून समजावून देता येईल. विश्वामित्री पवित्रा घेऊन, नथुराम गोडसे आणि प्रमोद मुतालिक यांच्याशी आमचा संबंध काय? त्यांचे नाव आम्ही प्रथमच ऐकतोय, असे सांगता येईल आणि ‘वारांगनेव नृपनीती’ या गुरुजींनी दिलेल्या तत्त्वाची शिकवण कामी येत राहील.
- - - - - - - - - 
*टीप* - वारांगना म्हणजे वेश्या. ती ज्याप्रमाणे कधीही कोणाशीही एकनिष्ठ नसते, तिचे शब्द विश्वसनीय नसतात; तिच्यासारखीच राजाची, शासकाची नीती(धोरण) असावी, तीच वारांगनेव नृपनीती. भाजपचे लोक निर्लज्जपणे एखादी गोष्ट चुनावी जुमला म्हणू शकतात कारण ही त्यांच्या गुरूजींची शिकवण आहे.

मूळ लेखाची लिंक http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-duttaprasad-dabholkars-artical-on-rashtriya-swayamsevak-sangh-4429153-NOR.html

Tuesday, 16 May 2017

पुस्तक का वाचाव....?

!! *वाचेल तो वाचेल* !!

1- *महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट  म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले  "राईट्स ऑफ मॅन "नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली. 
2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ हे केळुसकर  गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र  हे पुस्तक आहे. 
3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग  यांना विचारले की "तुला तर उदया   फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक  वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग  जेलरला म्हणाले की "माझ्या  वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील ".
4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते.
5 - वाचन हा शब्द  कसा तयार झाला?  
वचन- म्हणजे शपथ ;
एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा  त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर्थ -
श- शतक ; 100 टक्के 
पथ- मार्ग  किंवा रस्ता 
म्हणजे शंभर टक्के यशाकडे जाणारा मार्ग होय.
वचन चा अर्थ  शपथ,
शपथ चा अर्थ यशस्वी मार्ग,
यावरून वाचन चा अर्थ हा शंभर टक्के यशस्वी मार्ग होय.
6 - बाबासाहेबानी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते, ज्यात हजारो पुस्तक होती.
7 - अब्राहम लिंकन हा तर पुस्तकवेडा माणूस होता, एकदा तर शेजार्याकडून घेतलेले पुस्तक पावसात भिजल्याने त्या पुस्तकाची मजूरी म्हणून पुस्तक देणा-याकडे काम केले.
8 - नेपोलियन बोनापार्टने वाचलेल्या  पुस्तकाची यादी आजही पॅरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.
9 - "अवंतिका" हे एक पुस्तक असून ते लिहणारी लेखिका तिचे नाव स्नेहलता दसनूरकर आहे, तिचे ते पुस्तक मिळवण्यासाठी नंबर लावावा लागतो.
10- मराठीतील पद्मा गोळे नावाची लेखिका होत्या त्यांचा मृत्यू काही मिनिटावर असताना त्यांना उठता, बसता येत नव्हते.
त्यामुळे त्या झोपून शेवटी पुस्तकाची एक एक पाने फाडून वाचत असत व पुस्तक वाचताना मरण पावल्या.
11 - आज भारतात सर्वात संपन्न जर कोणता धर्म असेल तर तो "शीख धर्म" आहे याचे कारण काय तर शीख  धर्माने ग्रंथाला गुरू मानून धर्मग्रंथाचा दर्जा दिला, तो "गुरूग्रंथसाहीब" हा धर्मग्रंथ आहे.
1 2 - लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ सुद्धा "वचन साहीत्य" म्हणजे पुस्तक आहे.
बसवेश्वर यांची वचने छापील रूपात आणण्यासाठी कर्नाटकमधील हळकटटी नावाच्या माणसाने स्वतःचे  घर विकून टाकले व रस्त्यावर राहायला लागला.

!! पुस्तक  कोणते वाचावे?? !!

काही लोक ईश्वराला  मानणारी आहेत, ती आस्तिकवादी पुस्तक  वाचतात.
काही नास्तिक आहे, ती नास्तिकवादी पुस्तके  वाचतात.
पण मला वाटते आपण आस्तिकवादीही वाचू नये व नास्तिक वादीही वाचू नये तर आपण
जगण्याला उपयुक्त ठरतील
अशी वास्तववादी पुस्तके वाचावीत.
1 3- कोणत्याही एका विषयाची पुस्तक जमा करून दहा वर्ष त्यावर चिंतन करा, अकराव्या वर्षी तुमची गणना एका विद्वानात केली जाईल.
14- ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर होईल भूईसपाट 
15- पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त  होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून  नतमस्तक होत नाही 
16- आपण गेल्यावर लोकांनी आपणाला विसरू नये असे वाटत असेल तर दोनपैकी एक काम करा 
एक लिहिण्यासारखे काहीतरी काम करा किंवा वाचण्यासारखे काहीतरी लिखाण करा*...
      
    धन्यवाद !!


Friday, 5 May 2017

वास्तुशास्त्र

"वास्तुशास्त्र" म्हणजे नेमके काय

"वास्तुशास्त्र" म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला आहे. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे, ह्या भाबड्या समजुतीमुळे या शास्त्राचा महिमा वाढला आहे.
खरं म्हणजे "स्थापत्य अभियांत्रिकी" म्हणजेच वास्तुशास्त्र..!! पण हल्ली ज्याचा वास्तुशास्त्र म्हणून उल्लेख आणि उदो उदो होतो, ते केवळ थोतांड वास्तुज्योतिषशास्त्र आहे...
एका वास्तुशास्त्र ज्योतिषाला कुणीतरी विचारले --
"पेशावाईची भरभराट का झाली?"
"शनिवार वाड्याचे तोंड उत्तरेकडे होते म्हणून!"
"मग पेशवाई का बुडाली?"
"वाड्यात प्रवेश करताना तोंड दक्षिणेला असत होते म्हणून!"
वास्तुशास्त्रातले "शास्त्र" काय आहे हे स्पष्ट करणारा हा संवाद आहे. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण गेल्या ३०-४० वर्षात वास्तुशास्त्राचे थोतांड इतके माजले आहे की अनेकजण त्याचा गंभीरपणे विचार करायला लागले आहेत. भरमसाठ पैसे आकारून, लोकांच्या भावनांशी खेळून, घरामध्ये वाट्टेल तसे बदल करायला लावून या सर्व भंपकपाणाला शास्त्राचा आणि विज्ञानाचा मुखवटा चढवण्यात हे लोक यशस्वी झाले आहेत.

वास्तुज्योतिषशास्त्री काय करतात..?

वास्तूमध्ये जे बदल करणे शक्य नसते असे बदल करायला सांगणे, घराची मूळ मांडणीच वास्तुशास्त्राला धरून नसल्याने त्या घरात विविध समस्या निर्माण होत आहेत अशी भीती घालणे अशा उपायांनी हे वास्तुशात्राचे प्रणेते आपल्या धंद्याचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यामुळेच ठेच जरी लागली तरी त्याला वास्तुच कारणीभूत असल्याचा कांगावा केला जात आहे.

वास्तुज्योतिषशास्त्राचा रोग बळावला कधी..?

साधारणपणे १९७० च्या आसपास मुंबई-पुण्यातील जुन्या चाळी आणि वाडे पाडून त्याठिकाणी ओनरशिप फ्लॅट बांधण्याच्या कामास वेग आला. गरजू लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा व्यवसाय फ़ोफ़वला. त्याकाळी घरबांधणीसाठी सुलभपणे कर्ज मिळत नव्हते आणि आजच्यासारखी गृहबांधणी व्यवसायाला भरभराट आलेली नव्हती. त्यामुळे बिल्डर लोकांनी मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी प्रभावी विक्रीकौशल्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने वास्तुशात्राची नवी आयडिया काही लोकांच्या डोक्यातून बाहेर पडली आणि "वास्तुशास्त्रानुसार सदनिका" अशा जाहिरातींचे पेव फ़ुटले.
याच चाणाक्ष लोकांनी बांधलेल्या घरातील "दोष" शोधायला सुरुवात केली. पद्धतशीरपणे सापळा रचून प्राचीन शास्त्र, पुराणे, पुरातन मंदिरे, रामायण-महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथातले दाखले देऊन भोळ्या लीकांच्या श्रद्धेच्या आधारे आपल्या व्यवसायाचा पाया भक्कम केला. अध्यात्म, मानसशास्त्र, पुराणातील भाकडकथा, जोतिषशास्त्र अशा सर्व साधनांची आपल्या मनाप्रमाणे मोडतोड करून आधुनिक वास्तुशास्त्र निर्माण करण्यात आले.

स्थापत्य अभियांत्रिकी काय सांगते..?

शास्त्र (Science) म्हटले की नियम आले. कार्यकारण संबंध आला. माती, पाणी, उजेड, वारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्व या सर्व नैसर्गिक तत्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजे खरे वास्तुशास्त्र (स्थापत्य अभियांत्रिकी). भूकंपप्रवण क्षेत्र, समुद्रकिनारे, डोंगराळ भाग, उष्ण-शीत कटिबंध, वाऱ्याची दिशा, पावसाचे प्रदेश अशा गोष्टींचा विचार वास्तू बांधताना करणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थळ, काळ, हवामान परिस्थिती, उपलब्ध साधनसामग्री यांचा विचार ह्या शास्त्राने केला पाहीज परंतु आधुनिक वास्तुज्योतिषी सांगतात त्याप्रमाणे एकच एक नियम सर्वत्र लागू पडत नाही. बऱ्याच वेळेला घर बांधणारा मालक इंजिनिअरचा सल्ला बाजूला ठेवून वास्तुशास्त्रज्ञाच्या मताला प्राधान्य देतो. स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासापेक्षा या पारंपारिक ज्योतिषांच्या अभ्यासाला प्राधान्य दिले जाते.

जुन्या भारतीय ग्रंथात काय आहे..?

काही जुन्या भारतीय ग्रंथात वास्तुनिर्मितीचे उल्लेख आहेत. पण ते फक्त महाल, राजवाडे, प्रासाद, मंदिरे, उद्याने यांच्याच संदर्भात आहेत. वास्तुज्योतीषी अशा गोष्टींचे आपल्या पुस्तकात मोठे भांडवल करतात. परंतु त्या शास्त्राप्रमाणे बांधलेल्या वास्तू आज अस्तित्वात नाहीत. ह्या माहितीत वस्तुस्थितीपेक्षा कल्पनाविलासच जास्त आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक वास्तुशिल्पे, मंदिरे आज दिसतात. परंतु त्यांचा इतिहास गेल्या हजार-बाराशे वर्षा इतकांच आहे. अनेक भग्न मंदिरे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत असेही नाही. विश्वकर्मा हा "आद्यवास्तुविशारद" मानला जातो. परंतु त्याला पुराणाशिवाय कोणताही आधार नाही. इजिप्तच्या "इम होतेप" याने आश्चर्यकारक वास्तुनिर्मिती केली. पाच हजार वर्षापूर्वीच्या या वास्तू आजही पहावयास मिळतात. मोहेंजोदाडो-हडप्पा येथील नगररचनाही तितक्याच जुन्या आहेत. त्यातील वास्तुशास्त्रही थक्क करणारे आहे. परंतु या वास्तुशास्त्राचा कोणताही मागोवा न घेता आज जे वास्तुज्योतिषी या शास्त्राच्या प्राचीन परंपरेचा उल्लेख करत आहेत तो केवळ आपमतलबी आणि स्वार्थप्रेरक आहे असेच म्हणावे लागेल.

वास्तुशांतीची परंपरा काय…?

धरणीमाता अन्न, वस्त्र, निवारा देते. ती कुणातही भेदभाव करत नाही. ती पवित्र असली तरी वास्तुनिर्मिती करताना कृमि, किटक, जंतू आणि प्राणी यांची अकारण हत्या होते. काही प्राणी निराधार होतात. कुदळीचे घाव घालून आपण त्या मातेला उपद्रव देतो. त्या कृतीचे पापक्षालन म्हणून आपण त्या स्थानी भूमिपूजन करतो. वास्तुशांती करतो. आग्नेयाला अग्नी प्रज्वलित करणे इत्यादी धार्मिक कार्ये श्रध्दापूर्वक करतो आणि नंतर त्या वास्तूत आनंदाने राहावयास जातो. हीच आपली खरी प्राचीन परंपरा. परंतु वास्तुशास्त्र नावाचे आधुनिक शास्त्र "शोधून" त्याच्या आधारे नवीन वास्तू बांधली नाही तर आपले वाटोळे होईल असा किडा एकदा डोक्यात वळवळू लागला की शास्त्र संपते, आणि "भ्रम" सुरु होतो.

वास्तुज्योतिषशास्त्राची भरभराट होण्याचे कारण..?

वास्तुज्योतिषशास्त्राची भरभराट होण्याचे एक मोठे कारण म्हणजे या क्षेत्रात प्रचंड पैसा दडलेला आहे. फलज्योतिषी, हस्तसामुद्रिकया क्षेत्रात घुसले. मंगळ वक्री आहे म्हणून समस्या निर्माण होत आहेत असे म्हणण्याऐवजी घराचा संडास ईशान्येला आहे म्हणून समस्या निर्माण आहेत असे म्हटले जावू लागले. वृत्तपत्र आणि टीव्हीवर जाहिरात करून, मेळावे घेऊन लोकांना ह्या शास्त्राच्या जाळ्यात ओढले जावू लागले. फलज्योतिषाला विचारले जाणारे प्रश्नच वास्तुज्योतीषाला विचारले जावू लागले आणि या वास्तुज्योतिषांना घबाडयोग साधला.
सामान्यपणे मनुष्याला भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे मुलाला नोकरी नाही, मुलामुलींची लग्ने जुळत नाहीत, नवरा-बायकोचे पटत नाही, सासू-सुनेचे पटत नाही, आजारपण सुटत नाही इत्यादी. कर्ज, विवंचना, व्यसनाधिनता, धंद्यामध्ये नुकसान आणि आयुष्यातले अपयश, मिळकत आणि खर्चात तफावत, यश मिळत नाही, इस्टेटीसाठी भाऊबंधकी अशा असंख्य कारणांमुळे माणसे बेजार असतात. कोणी करणी केली आहे, कुणाची नजर लागली आहे अशा सतत संशयाने ते पछाड्लेले असतात. एका मानसिक भीतीच्या दडपणाखाली ते वावरत असतात. अशा वेळी घराची मांडणी वास्तुशास्त्राला धरुन नसल्यानेच या समस्या निर्माण झाल्याचे त्यांना सांगितले तर त्यांचा त्यावर सहज विश्वास बसतो. या मानसिकतेचा कौशल्याने उपयोग करुन त्यावर भरभक्कम मोबदला घेतला जातो. शयनगृहाची जागा बदला, बैठकीचे ठिकाण बदला, पाण्याची टाकी दुसरीकडे हलवा अशा असंख्य सुचना केल्या जातात. एकदा या शास्त्राचा मनावर पगडा बसला की येणारे कोणतेही संकट वास्तूदोषामुळे येते असा समज बळावतो. त्यातूनच लोक आपले मानसिक संतुलन घालवून बसतात. एखाद्या अधिक कमकुवत मनाच्या व्यक्तीचे आयुष्यही त्यामुळे बरबाद होवून जाते.

वास्तुज्योतीषाचे व्यापारीकरण

वास्तुशास्त्र उर्फ वास्तुज्योतीषाचे आज पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. हे शास्त्र आता लोकांच्या पैशावर चांगलेच भरभराटीला आले आहे. पैसा दिला तर दोष लगेच नाहीसा होतो. जाहिरात करून मूर्ख व अज्ञानी लोकांना कसे फसवावे हे शास्त्र चांगले विकसित झाले आहे. मी अमक्या वास्तुज्योतीषाचे मार्गदर्शन घेतल्यामुळे माझा तमका फायदा झाला असे सांगणारे अनेकजण ह्या जाहिरातबाजीच्या विळख्यात अडकले आहेत. याचा आधार अमक्या पुराणात आहे असे नुसते सांगावयाचा अवकाश, श्रद्धावान भाविकांची डोळे झाकून, बुद्धी गहाण टाकून तिकडे मेंढरासारखी धावाधाव सुरु होते.
काही ठिकाणी तोडफोड करणे शक्य नसते त्यामुळे लोक तोडफोड करुन मोठ्या खर्चात पडायला तयार होत नाहीत. यांवरही वास्तुज्योतीष्यांकडे फर्मास उपाय आहेत. वास्तुदोष घालवण्यासाठी मंत्रांनी सिद्द्ध केलेली यंत्रे, रत्ने, माळा, फोटो, पादुका, घंटा, बासऱ्या, नाग, करंडे, झाडांची मुळी, त्रिशूळ असे असंख्य उपाय हजर असतात. हे किमती तोडगे खास तुमच्यासाठी नाममात्र किमतीला देऊ करणारे काही महापरोपकारी वास्तुज्योतिषीही आहेत. ऑपरेशन न करता केवळ मंत्र म्हणून अपेंडिक्स बरा होऊ शकतो. पण श्रद्धा नसेल तर मात्र का गुण येणार नाही असे म्हणणाऱ्या मांत्रिकासारखाच हा प्रकार असतो.

या थोतांडाचे मूळ काय...?

वास्तुशास्त्राचा गाभा म्हणजे अष्टदिशा आणि त्यांचे स्वामी! पुराणकर्त्यांनी एक एक दिशेला एक एक स्वामी नेमला आहे. ह्या स्वामींच्या आवडी-निवडी व स्वभाव त्यांनीच ठरवले आहेत. मनासारखे घडले तर ते प्रसन्न होतात. प्रमाद घडला तर उपद्रव करतात. दिशा हि संकल्पनाच वास्तुशास्त्राने शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट केलेली नाही. विज्ञानाच्या कसोटीवर ती टिकू शकत नाही. पृथ्वी स्थिर आहे अशा गृहीतावरच हे आधारित आहे.
सुर्य, चंद्र, गृह, तारे, ब्रह्मांड यांची गती व पृथ्वीची स्वतःची गती ही संकल्पनाच विचारात घेतली जात नाही. दिशा ही सापेक्ष (Relative) आहे. ती कुठल्याच गोष्टीचे कारण असू शकत नाही आणि त्यामुळे ह्या दिश्यांच्यावर आधारलेले शास्त्र वैज्ञानीक निकषावर टिकू शकत नाही. ऊर्ध्व आणि अधो ह्या दोन दिशाही वास्तुज्योतीषी विचारात घेत नाहीत. त्यामुळेच "दिशा" हि संकल्पनाच ह्या क्षेत्राला पेलवलेली नाही हे स्पष्ट होते.
"वास्तुपुरुष" हि प्राचीन संकल्पनाही अशीच विवादास्पद आहे. पुराणात ह्या संबंधीच्या ज्या कथा आहेत त्यानुसार वास्तुपुरुष म्हणजे -
१. शंकराच्या घामापासून निर्माण झालेले भूत
२. वास्तोष्पति नामक प्राचीन वैदिक देवता
३. छगासुर नावाचा राक्षस
४. पृथ्वी आणि आकाश यांना रोखणारे महाभूत
या सर्वांना वास्तुपुरुष असे म्हटले जाते. या वास्तुपुरुषाला ब्रम्हदेवाने असे वरदान दिले की पृथ्वीवरील लोक वास्तु निर्माण केल्यानंतर तुझी पूजा करतील व तुला बलीभाग अर्पण करतील. त्यांनी असे न केल्यास त्या घरातील व्यक्ती, धनधान्य आणि समाधान या सर्वांना तू खाऊन टाक. कोणत्या धर्मात असा लोकांना खाऊन टाकणारा देव असेल?
वास्तुशात्र हे मुख्यतः पुराणे व पुराणांचेच सहोदर असणारे "समरांगण सूत्रधार" आणि "मनसार" या ग्रंथांवर आधारित आहे. अशी पुराणे कोणत्याही शास्त्राचे प्रमाण म्हणून स्वीकारता येत नाहीत. त्यांच्यातील विसंगती, भिन्न विचार आणि विज्ञानाच्या पायावर न टिकणारी गृहिते, कर्मकांडांचा अतिरेक यामुळे शास्त्रापेक्षा धर्माला विकृत स्वरूप देण्याचेच कार्य त्यांनी केले आहे.
विचारवंतांनी आधुनिक काळामध्ये स्वीकारलेला बुद्धिप्रामाण्यवाद आणि तर्कशक्ती यांच्या आधारावरच या वास्तुशास्त्राचा विचार करावा लागतो व याठिकाणी ते शास्त्र मानवी संशयाचे निराकरण करण्यास पूर्णपणे अपुरे ठरते.
- Jagdish Kabre
माहिती संकलन - अनिल बाप्ते 

पक्षी मरतांना कुठे जातात?

पक्षी मरतांना कुठे जातात? नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा केलेला अनुवाद प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर...